सप्टेंबर
रविवार, १ सप्टेंबर
आपण देवाचे उपासक आहोत असं समजणारा एखादा माणूस आपल्या जिभेला लगाम घालत नसेल, तर तो स्वतःची फसवणूक करत आहे आणि त्याची उपासना व्यर्थ आहे.—याको. १:२६.
आपण आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा चांगला वापर करतो तेव्हा आपण यहोवाचे उपासक आहोत हे दिसून येतं. त्यामुळे “देवाची सेवा करणारा आणि न करणारा, यांतला फरक” लोक ओळखू शकतात. (मला. ३:१८) हीच गोष्ट किम नावाच्या बहिणीसोबत घडली. तिला तिच्या वर्गातल्या एका मुलीसोबत एका प्रोजेक्टवर काम करायला सांगितलं होतं. सोबत काम केल्यावर त्या मुलीला कळलं की किम शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. तिच्या लक्षात आलं की किम कोणाबद्दल वाईट बोलत नाही, सगळ्यांसोबत चांगली वागते आणि शिवीगाळ करत नाही. किम इतकी वेगळी का आहे, हे समजल्यावर ती मुलगी काही काळाने बायबल अभ्यास करायला तयार झाली. खरंच विचार करा, अशा प्रकारे आपल्या चांगल्या बोलण्यामुळे लोक सत्य शिकायला तयार होतात तेव्हा यहोवाला किती आनंद होत असेल! यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे आपलं बोलणं असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. टेहळणी बुरूज२२.०४ ५-६ ¶५-७
सोमवार, २ सप्टेंबर
स्त्रिया स्वतःच्या संपत्तीतून येशूची आणि त्याच्या शिष्यांची सेवा करायच्या.—लूक ८:३.
येशूने मग्दालीया मरीयाची सात दुष्ट स्वर्गदूतांपासून सुटका केली तेव्हा तिला किती बरं वाटलं असेल याचा विचार करा. हे उपकार मी कसे फेडू असं तिला वाटलं असेल. त्यामुळे ती येशूची शिष्या बनली आणि तिने सेवाकार्याला पाठिंबा दिला. (लूक ८:१-३) येशूने मरीयासाठी जे केलं होतं ती खरंच खूप मोठी गोष्ट होती. पण पुढे तो तिच्यासाठी जे काही करणार होता त्याची तिने कल्पनासुद्धा केली नसेल. तो आपल्या जीवनाचं बलिदान देणार होता. त्यामुळे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार होता त्याला सर्वकाळाचं जीवन मिळू शकणार होतं. (योहा. ३:१६) येशू जेव्हा वधस्तंभावर यातना सहन करत होता तेव्हा त्याला आणि इतरांना आधार देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी मरीया तिथेच थांबली होती. (योहा. १९:२५) मग येशूचा मृत्यू झाल्यावर त्याच्या शरीराला सुगंधी मसाले लावण्यासाठी ती इतर दोन स्त्रियांसोबत येशूच्या कबरेजवळ गेली. (मार्क १६:१, २) अशा प्रकारे मरीया शेवटपर्यंत येशूला विश्वासू राहिली. आणि त्यामुळे येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला भेटण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा बहुमान तिला मिळाला. असा बहुमान खूप कमी शिष्यांना मिळाला होता.—योहा. २०:११-१८. टेहळणी बुरूज२३.०१ २७ ¶४
मंगळवार, ३ सप्टेंबर
तू एकतर गरम किंवा थंड असायला हवं होतं.—प्रकटी. ३:१५.
यहोवाच्या सेवेत आपण पूर्वी जे केलं त्याच्या भरवशावर आपण राहू शकत नाही. कदाचित पूर्वीइतकं करायला आता आपल्याला जमत नसेल. पण तरी आपण “प्रभूच्या सेवेत” व्यस्त राहिलं पाहिजे आणि शेवटपर्यंत जागृत आणि सतर्क राहिलं पाहिजे. (१ करिंथ. १५:५८; मत्त. २४:१३; मार्क १३:३३) आपण आवेशाने आणि पूर्ण मनाने यहोवाची उपासना केली पाहिजे. येशूने लावदिकिया मंडळीला जो सल्ला दिला होता त्यावरून दिसून येतं, की या मंडळीची समस्याही जरा वेगळी होती. यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत ते “कोमट” बनले होते. आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत त्यांना जराही उत्साह नसल्यामुळे येशूने त्यांना सांगितलं, की ते “दयनीय आणि दरिद्री” अवस्थेत आहेत. त्यांनी यहोवाबद्दल आणि त्याच्या उपासनेबद्दल ज्वलंत आवेश दाखवण्याची गरज होती. (प्रकटी. ३:१६, १७, १९) यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? यहोवाच्या सेवेत जर आपलाही आवेश थोडा कमी झाला असेल, तर यहोवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल आपण आपली कदर वाढवली पाहिजे. (प्रकटी. ३:१८) जीवनातल्या सुखसोयींच्या मागे लागून आपण यहोवाच्या उपासनेला कधीच दुसऱ्या स्थानी ठेवू नये. टेहळणी बुरूज२२.०५ ३-४ ¶७-८
बुधवार, ४ सप्टेंबर
जे यहोवाची भीती बाळगतात त्या सर्वांसाठी एक स्मरणाचं पुस्तक त्याच्यापुढे लिहिण्यात आलं.—मला. ३:१६.
हजारो वर्षांपासून यहोवा एक खास पुस्तक लिहीत आहे. या पुस्तकात यहोवाच्या विश्वासू सेवकांची नावं आहेत. यातलं पहिलं नाव हे पहिला विश्वासू साक्षीदार हाबेल याचं होतं. (लूक ११:५०, ५१) तेव्हापासून आजपर्यंत कित्येक शतकांदरम्यान यहोवा या पुस्तकात बरीच नावं लिहीत आला आहे आणि आज या पुस्तकात लाखो नावं आहेत. बायबलमध्ये या पुस्तकाला “स्मरणाचं पुस्तक,” ‘जीवनाचं पुस्तक’ आणि ‘जीवनाची गुंडाळी’ असं म्हणण्यात आलंय. (मला. ३:१६; प्रकटी. ३:५; १७:८) या खास पुस्तकात अशा सगळ्या लोकांची नावं आहेत जे यहोवाची उपासना करतात, त्याची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर प्रेम करतात. या सगळ्या लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळण्याची संधी आहे. आज आपण येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवासोबत एक जवळचं नातं जोडलं तर आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल. (योहा. ३:१६, ३६) आणि आपली सर्वांचीच इच्छा आहे, की आपलं नाव त्या पुस्तकात लिहिलं जावं; मग आपली आशा स्वर्गातल्या जीवनाची असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची. टेहळणी बुरूज२२.०९ १४ ¶१-२
गुरुवार, ५ सप्टेंबर
त्यांना बहकवणाऱ्या सैतानाला अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात फेकून देण्यात आलं.—प्रकटी. २०:१०.
प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘अग्नीच्या रंगाच्या एका मोठ्या अजगराबद्दल’ सांगितलं आहे. (प्रकटी. १२:३) हा अजगर, येशू आणि त्याच्या स्वर्गदूतांबरोबर लढतो. (प्रकटी. १२:७-९) तसंच, तो देवाच्या लोकांवर हल्ला करतो आणि जंगली पशूंना म्हणजेच मानवी सरकारांना अधिकार देतो. (प्रकटी. १२:१७; १३:४) हा अजगर कोण आहे? तो ‘जुना साप’ म्हणजेच दियाबल सैतान आहे. (प्रकटी. १२:९; २०:२) यहोवाच्या इतर सगळ्या शत्रूंच्या पाठीमागे खरंतर तोच आहे. अजगराचं शेवटी काय होईल? प्रकटीकरण २०:१-३ यात असं सांगितलं आहे, की एक स्वर्गदूत सैतानाला अथांग डोहात फेकून देईल. याचा अर्थ त्याला कैद करून ठेवण्यात येईल. कैदेत असल्यामुळे ‘१,००० वर्षं पूर्ण होईपर्यंत तो राष्ट्रांना बहकवू’ शकणार नाही. शेवटी सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना “अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात” फेकून देण्यात येईल. याचाच अर्थ त्यांचा कायमचा नाश केला जाईल. जरा कल्पना करा, सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत अस्तित्वात नसतील तेव्हा तो खरंच किती सुंदर काळ असेल! टेहळणी बुरूज२२.०५ १४ ¶१९-२०
शुक्रवार, ६ सप्टेंबर
त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.—इफिस. ४:२८.
येशूसुद्धा खूप मेहनती होता. तरुण वयापासूनच तो सुतारकाम करू लागला. (मार्क ६:३) येशू एका मोठ्या कुटुंबात वाढला. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तो जी काही मेहनत करत होता, त्याबद्दल त्याच्या आईवडिलांना नक्कीच खूप कौतुक वाटत असेल. येशू परिपूर्ण होता, त्यामुळे त्याचं कामसुद्धा खूप चांगल्या दर्जाचं असेल यात काहीच शंका नाही. आणि साहजिकच त्याने बनवलेल्या सामानाला भरपूर मागणी असेल. येशूलासुद्धा या कामातून खूप समाधान मिळत असेल. असं असलं, तरी येशूने आपला सगळा वेळ अशा कामांतच घालवला नाही तर त्याने आध्यात्मिक गोष्टींसाठीसुद्धा वेळ काढला. (योहा. ७:१५) नंतर, जेव्हा तो पूर्णवेळ प्रचाराचं काम करू लागला, तेव्हा त्याने असा सल्ला दिला: “नाश होणाऱ्या अन्नासाठी खटपट करू नका. तर अशा अन्नासाठी खटपट करा, जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं.” (योहा. ६:२७) आणि डोंगरावरच्या उपदेशात येशू म्हणाला: “स्वर्गात संपत्ती साठवा“. (मत्त. ६:२०) देवाकडून मिळालेली बुद्धी आपल्यालासुद्धा नोकरी-व्यवसायाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत करेल. बायबल आपल्याला असा सल्ला देतं, की आपण “मेहनत करावी . . . प्रामाणिकपणे काम करावं.” टेहळणी बुरूज२२.०५ २२ ¶९-१०
शनिवार, ७ सप्टेंबर
जिने तुला जन्म दिला ती हर्ष करेल.—नीति. २३:२५
युनीकेने आपलं चांगलं उदाहरण तीमथ्यसमोर ठेवलं होतं. ती जे काही करत होती, त्यावरून तिचं यहोवावर किती प्रेम आहे हे त्याला नक्कीच दिसून आलं असेल. शिवाय, यहोवाची सेवा करत असल्यामुळे ती किती आनंदी होती, हेसुद्धा त्याला जाणवलं असेल. आजही आपल्या बऱ्याच बहिणींनी, “एकाही शब्दाशिवाय” आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना यहोवाची सेवा करायला प्रवृत्त केलं आहे. (१ पेत्र ३:१, २) तुम्हीसुद्धा असंच करू शकता. ते कसं? यहोवासोबतच्या नात्याला तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या. (अनु. ६:५, ६) आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी तुम्ही बराच त्याग करत आहात. त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ, पैसा, झोप आणि यासारख्या इतर गोष्टींचा त्याग करता. पण त्यात इतकं व्यस्त होऊ नका की तुम्हाला यहोवासाठी वेळच उरणार नाही. उलट यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करता यावं म्हणून तुमच्या वैयक्तिक प्रार्थनांसाठी, व्यक्तिगत बायबल अभ्यासासाठी आणि मंडळीच्या सभांसाठी वेळ काढा. असं केल्यामुळे यहोवासोबत तुमचं नातं मजबूत तर होईलच, पण त्यासोबत तुमच्या कुटुंबासमोर आणि इतरांसमोरही तुमचं चांगलं उदाहरण असेल. टेहळणी बुरूज२२.०४ १६ ¶१; १९ ¶१२-१३
रविवार, ८ सप्टेंबर
आपल्या सेवकांचा न्याय कर. दुष्टाला दोषी ठरवून त्याचा गुन्हा त्याच्याच माथ्यावर मार. आणि नीतिमानाला निर्दोष ठरवून त्याच्या नीतिमान कार्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ दे.—१ राजे ८:३२.
कोणाचाही न्याय करायची जबाबदारी आपल्यावर नाही. म्हणून आपण त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. तो न्याय यहोवा करेल. कारण तोच या विश्वातला सर्वोच्च न्यायाधीश आहे. (रोम. १४:१०-१२) चूक काय आणि बरोबर काय हे यहोवाच सांगू शकतो. आणि त्याच्या या परिपूर्ण स्तरांप्रमाणे तो नेहमी योग्य न्याय करेल याची खातरी आपण ठेवू शकतो. (उत्प. १८:२५) माणसाच्या अपरिपूर्णतेमुळे आणि पापांमुळे झालेले वाईट परिणाम यहोवा लवकरच पूर्णपणे काढून टाकेल. आपण त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या वेळी आपल्या सगळ्या शारीरिक समस्या दूर केल्या जातील. तसंच आपल्या मनावर झालेल्या जखमासुद्धा कायमच्या भरून काढल्या जातील. (स्तो. ७२:१२-१४; प्रकटी. २१:३, ४) त्यांची आठवणसुद्धा कधी आपल्या मनात येणार नाही. तो सुंदर काळ यायची वाट पाहत असताना, आपण यहोवाचे आभार मानू शकतो, की त्याने आपल्याला त्याचं अनुकरण करून इतरांना माफ करायची क्षमता दिली आहे. टेहळणी बुरूज२२.०६ १३ ¶१८-१९
सोमवार, ९ सप्टेंबर
सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?—उत्प. १८:२५.
एक चांगला न्यायाधीश तोच असतो, ज्याला कायद्याची आणि नियमांची पूर्ण समज असते. तसंच, चूक काय आणि बरोबर काय याची त्याला चांगली जाण असायली हवी. यासोबतच एका चांगल्या न्यायाधीशाला आणखी कशाची गरज असते? कोणताही निर्णय देण्याआधी एखाद्या केसशी संबंधित असलेल्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी त्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की यहोवा हाच सगळ्यात चांगला न्यायाधीश आहे, कारण त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही. यहोवा मानवी न्यायाधीशांसारखा नाही. कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत न्याय करताना त्याला त्या गोष्टीच्या सगळ्या बाजू माहीत असतात. (उत्प. १८:२०, २१; स्तो. ९०:८) मानवांसारखा तो फक्त पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींच्या आधारावर न्याय करत नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मतःच असलेले गुण, तिच्यावर झालेले संस्कार, ती ज्या वातावरणात वाढली, तसंच तिच्या भावना आणि तिचे विचार या सगळ्या गोष्टींचा तिच्या वागण्यावर कसा परिणाम होतो, हे यहोवा अगदी चांगल्या प्रकारे समजू शकतो. शिवाय, आपल्या मनात काय आहे हेसुद्धा तो पाहू शकतो. त्यामुळे एखादी गोष्ट करण्यामागचा त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे तो पूर्णपणे समजू शकतो. खरंच, यहोवापासून काहीही लपलेलं नाही! (इब्री ४:१३) त्यामुळे, जेव्हा यहोवा एखाद्या व्यक्तीला माफ करतो, तेव्हा सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. टेहळणी बुरूज२२.०६ ४ ¶८-९
मंगळवार, १० सप्टेंबर
माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपल्याकडे असलेलं सर्वकाही देईल.—ईयो. २:४.
ईयोबच्या बाबतीत सैतानाने जे डावपेच वापरले, ते आपण समजून घेतले पाहिजेत. कारण आज आपल्या बाबतीतही तो असेच डावपेच वापरतो. सैतानाचं म्हणणं आहे, की यहोवाच्या सेवकांचं त्याच्यावर फक्त नावापुरतंच प्रेम आहे. आणि जर परिस्थिती जीवावर बेतली तर ते त्याच्याकडे पाठ फिरवायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. तसंच, सैतानाचा असाही दावा आहे, की देवाचं आपल्यावर काही प्रेम नाही आणि आपण त्याच्या मनासारखं वागायचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला काही फरक पडत नाही. पण सैतानाचे हे डावपेच माहीत असल्यामुळे आपण फसत नाही आणि यहोवावर आशा ठेवतो. जेव्हा आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ती एक संधी आहे, असं आपण समजलं पाहिजे. ईयोबला ज्या संकटांचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याला आपल्यातल्या कमतरता ओळखता आल्या आणि स्वतःमध्ये सुधारणा करता आली. जसं की, आपल्याला आणखी नम्र व्हायची गरज आहे, हे त्याला समजलं. (ईयो. ४२:३) ईयोबप्रमाणेच जेव्हा आपल्यावरही संकटं येतात, तेव्हा आपल्यालाही स्वतःबद्दल बरंच काही समजतं. आपल्यात कोणत्या कमतरता आहेत हे कळल्यावर आपण त्यात सुधारणा करायचा प्रयत्न करू शकतो. टेहळणी बुरूज२२.०६ २३ ¶१३-१४
बुधवार, ११ सप्टेंबर
यहोवा म्हणतो, “तुम्ही माझे साक्षीदार आहात, हो, तू माझा सेवक आहेस. मी तुला निवडलंय.”—यश. ४३:१०.
यहोवा आपल्याला वचन देतो की तो आपल्याला मदत करेल. उदाहरणार्थ, “तुम्ही माझे साक्षीदार आहात,” असं म्हणण्याआधी यहोवाने असं वचन दिलं: “तू जलाशय ओलांडशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन, तू नद्यांमधून जाशील तरी तू बुडणार नाहीस, तू आगीतून चालशील तरी तुला भाजणार नाही, आगीच्या ज्वालांची तुला झळ बसणार नाही.” (यश. ४३:२) आपलं प्रचाराचं काम करताना कधीकधी आपल्यासमोर अशा समस्या येतात ज्या नदीच्या पुरासारख्या आणि आगीच्या ज्वालांसारख्या असतात. पण तरीसुद्धा यहोवाच्या मदतीने आपण प्रचाराचं हे काम करत राहतो. (यश. ४१:१३) आजसुद्धा बहुतेक लोक आपला संदेश ऐकत नाहीत. पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, की लोकांनी आपला संदेश ऐकला नाही तरीसुद्धा देवाचे साक्षीदार म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो आहोत असा याचा अर्थ होत नाही. उलट, आपण आपला संदेश विश्वासूपणे सांगत राहतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला सांत्वन आणि बळ मिळतं. प्रेषित पौलने म्हटलं: “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.”—१ करिंथ. ३:८; ४:१, २. टेहळणी बुरूज२२.११ ४ ¶५-६
गुरुवार, १२ सप्टेंबर
जगातल्या लोकांमध्ये आपलं वागणं चांगलं ठेवा.—१ पेत्र २:१२.
आज “वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व राष्ट्रांमधून” लोक बायबलमधल्या सत्याची “शुद्ध भाषा” बोलायला शिकत आहेत. (जख. ८:२३; सफ. ३:९) आज २४० देशांमधून ८० लाखांपेक्षा जास्त लोक यहोवाच्या संघटनेत आहेत. आणि दरवर्षी लाखो लोक बाप्तिस्मा घेत आहेत. पण या संख्या सगळ्यात महत्त्वाच्या नाहीत. तर या नवीन शिष्यांनी जे “नवीन व्यक्तिमत्वं” धारण केलंय आणि आपल्यामध्ये जे ख्रिस्ती गुण उत्पन्न केलेत ते जास्त महत्त्वाचंय. (कलस्सै. ३:८-१०) यांपैकी बरेच जण आधी अनैतिक जीवन जगायचे, ते हिंसक होते, भेदभाव करायचे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची विचारसरणी होती. पण त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. यावरून दिसून येतं, की यशया २:४ मधली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. तिथं म्हटलंय, ‘ते युद्ध करायला शिकणार नाहीत.’ आज आपण सगळेच नवीन व्यक्तिमत्त्वं धारण करायचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे लोकांना देवाच्या संघटनेकडे यायला मदत होत आहे. आणि यावरून आपण हेही दाखवतो, की प्रचाराच्या कामाची देखरेख करणाऱ्या येशूचं आपण अनुकरण करत आहोत. (योहा. १३:३५) हे सगळं करणं आपल्याला कशामुळे शक्य होत आहे? कारण येशू आपल्याला लागणारी सगळी मदत पुरवत आहे. टेहळणी बुरूज२२.०७ ९ ¶७-८
शुक्रवार, १३ सप्टेंबर
माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या धूपाप्रमाणे असो.—स्तो. १४१:२.
जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसोबत बोलतोय अशा प्रकारे बोलू नये. उलट, आपण खूप आदराने बोललं पाहिजे. कारण यहोवा या संपूर्ण विश्वाचा वैभवशाली राजा आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला यशया, यहेज्केल, दानीएल आणि योहानला दिसलेल्या दृष्टान्तात पाहायला मिळते. त्या सगळ्यांनी यहोवाला एका वैभवशाली राजाच्या रूपात पाहिलं. जसं की यशयाने “यहोवाला उंच स्थानावर असलेल्या एका भव्य राजासनावर बसलेलं पाहिलं.” (यश. ६:१-३) तर, यहेज्केलने यहोवाला त्याच्या स्वर्गीय रथावर विराजमान असलेलं पाहिलं. आणि त्याच्याभोवती मेघधनुष्यासारखं विलक्षण तेज पसरलेलं होतं. (यहे. १:२६-२८) दानीएलने “अति प्राचीन” असा कोणी आपल्या राजासनावर बसलेला पाहिला. त्याचे कपडे पांढरे शुभ्र होते आणि त्याचं राजासन आगीच्या ज्वालांचं होतं. (दानी. ७:९, १०) आणि योहाननेही यहोवाला एका राजासनावर विराजमान असलेलं पाहिलं. त्या राजासनाच्या भोवती पाचूसारखं दिसणारं मेघधनुष्य होतं. (प्रकटी. ४:२-४) खरंच, यहोवा किती महान आणि गौरवशाली आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते, की आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो हा आपल्यासाठी किती असाधारण बहुमान आहे! आणि म्हणूनच आपण नम्रपणे आणि आदराने त्याच्याशी बोललं पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०७ २० ¶३
शनिवार, १४ सप्टेंबर
धूर्त, चलाख माणसांकडून फसवलं जाणारे असू [नका].—इफिस. ४:१४.
तरुणांनो, सैतान तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यापासून रोखायचा प्रयत्न करेल. आणि यासाठी तो बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या बाबतीत तुमच्या मनात शंका निर्माण करेल. जसं की, काही लोक तुम्हाला असं पटवून द्यायचा प्रयत्न करतील की आपल्याला देवाने निर्माण केलं नाही, तर आपण उत्क्रांतीमुळे अस्तित्वात आलो. लहान असताना कदाचित तुम्ही याबद्दल जास्त विचार केला नसेल. पण आता तुम्हाला शाळेत त्याबद्दल शिकवलं जात असेल. आणि शिक्षक तुम्हाला याबाबतीत जे शिकवतात ते अगदी पटण्यासारखं आहे असं तुम्हाला वाटेल. पण कदाचित त्यांनी निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाबद्दलचे पुरावे कधीच तपासून पाहिले नसतील. नीतिवचनं १८:१७ मधलं तत्त्व नेहमी लक्षात ठेवा. तिथे म्हटलंय: “जो आपला दावा आधी मांडतो, त्याचं म्हणणं योग्य वाटतं, पण नंतर दुसरा पक्ष येऊन त्याची उलटतपासणी करतो.” तर यावरून आपण काय शिकतो? शाळेत जे काही शिकवलं जातं त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी बायबलमध्ये आणि प्रकाशनांमध्ये जे सांगितलंय त्याचं चांगल्या प्रकारे परीक्षण करा. टेहळणी बुरूज२२.०८ २ ¶२; ४ ¶८
रविवार, १५ सप्टेंबर
त्यातल्या सर्व आज्ञांचं काळजीपूर्वक पालन कर. असं केलंस तर तू यशस्वी होशील आणि सुज्ञपणे वागशील.—यहो. १:८.
देवाचं वचन वाचताना आपण ते समजूनही घेतलं पाहिजे; नाहीतर त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. उदाहरणार्थ, ‘नियमशास्त्राचा जाणकार असलेल्या एका माणसाला’ येशू काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. (लूक १०:२५-२९) “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?” असं त्या माणसाने येशूला विचारलं, तेव्हा येशू त्याला म्हणाला: “नियमशास्त्रात काय लिहिलंय? तू काय वाचलं आहेस?” तेव्हा देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्याविषयी शास्त्रवचनांत जे सांगितलंय त्याचा त्या माणसाने जसाच्या तसा उल्लेख केला. (लेवी. १९:१८; अनु. ६:५) पण त्यानंतर लगेच तो येशूला म्हणाला: “मुळात माझा शेजारी कोण?” यावरून दिसून आलं, की त्याने जे काही वाचलं होतं, त्याचा खरा अर्थ त्याला कळला नव्हता. त्यामुळे साहजिकच ती शास्त्रवचनं जीवनात कशी लागू करायची हे त्याला माहीत नव्हतं. शास्त्रवचनं समजून घेण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे लक्ष देऊन वाचण्यासाठी देवाकडे पवित्र शक्तीची मदत मागा. टेहळणी बुरूज२३.०२ ९ ¶४-५
सोमवार, १६ सप्टेंबर
सत्याच्या मार्गावर चालत [राहा].—३ योहा. ४.
“तुम्ही सत्यात कसं आला?” हा प्रश्न तुम्हाला नक्कीच बऱ्याच भाऊबहिणींनी विचारला असेल. एखाद्या भावाची किंवा बहिणीची ओळख करून घेताना आपण सहसा त्यांना हा प्रश्न विचारतो. त्यांना सत्य कसं समजलं आणि ते यहोवाची सेवा कशी करू लागले हे जाणून घ्यायला आपल्याला आवडतं. आणि आपण सत्यात कसे आलो हे त्यांना सांगायलाही आपल्याला आवडतं. (रोम. १:११) जेव्हा-जेव्हा आपण भाऊबहिणींशी याबद्दल बोलतो तेव्हा-तेव्हा सत्य किती अनमोल आहे याची आपल्याला जाणीव होते. तसंच ‘सत्याच्या मार्गावर चालत राहायचा,’ म्हणजेच यहोवाचं मन आनंदित होईल आशा प्रकारे जीवन जगायचा आपला निर्धारही आणखी पक्का होतो. सत्य आपल्यासाठी मौल्यवान असण्याची बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, ज्याने आपल्याला हे सत्य दिलं आहे त्या यहोवा देवावर आपलं खूप प्रेम आहे. त्याच्या वचनातून म्हणजेच बायबलमधून आपल्याला कळलं आहे, की तो आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. पण यासोबतच आपल्याला हेही कळलं की तो आपली काळजी घेणारा एक प्रेमळ पितासुद्धा आहे.—१ पेत्र ५:७. टेहळणी बुरूज२२.०८ १४ ¶१, ३
मंगळवार, १७ सप्टेंबर
गरिबांची आठवण ठेवा.—गलती. २:१०.
प्रेषित पौलने भाऊबहिणींना “चांगली कार्यं” करून प्रेम दाखवायचं प्रोत्साहन दिलं. (इब्री १०:२४) त्याने आपल्या शब्दातूनच नाही तर आपल्या उदाहरणातूनसुद्धा बरंच काही शिकवलं. उदाहरणार्थ, यहूदीयातल्या भाऊबहिणींना जेव्हा दुष्काळाचा सामना करावा लागला तेव्हा पौलने गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोचवल्या. (प्रे. कार्यं ११:२७-३०) प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात पौल व्यस्त असला, तरी गरजू भाऊबहिणींना मदत करण्यात तो नेहमी पुढे असायचा. असं करण्याद्वारे यहोवा आपली नेहमी काळजी घेईल या गोष्टीवर त्याने भाऊबहीणींचा भरवसा वाढवला. आज आपणसुद्धा विपत्ती मदतकार्यात आपला वेळ, शक्ती आणि कौशल्य वापरतो तेव्हा आपण भाऊबहिणींना त्यांचा विश्वास मजबूत करायला मदत करत असतो. आपण जेव्हा जगभरात चाललेल्या कार्यासाठी नियमितपणे दान देतो, तेव्हासुद्धा आपण भाऊबहिणींना एका प्रकारे मदत करत असतो. या आणि अशा बऱ्याच मार्गांनी आपण आपल्या भाऊबहिणींना हा भरवसा ठेवायला मदत करतो, की यहोवा त्यांना कधीच सोडणार नाही. टेहळणी बुरूज२२.०८ २४ ¶१४
बुधवार, १८ सप्टेंबर
भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेप्रमाणे झाली नाही, तर माणसं देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाने बोलली.—२ पेत्र १:२१.
बायबलमध्ये बऱ्याच भविष्यवाण्या आहेत. त्यांच्यापैकी काही तर पूर्ण होण्याच्या शेकडो वर्षांआधी लिहिण्यात आल्या होत्या. आणि त्या जशा लिहिल्या होत्या तशाच पूर्णही झाल्या याचे इतिहासात पुरावे आहेत. आणि ही गोष्ट आपल्याला आश्चर्याची वाटत नाही, कारण बायबलमधल्या भविष्यवाण्या यहोवाकडून आहेत हे आपल्याला माहीत आहे. प्राचीन बाबेल शहराबद्दल केलेल्या भविष्यवाणीचाच विचार कसा. इ.स.पू. ७७८ ते ७३२ दरम्यान यशया संदेष्ट्याने देवाच्या प्रेरणेने असं सांगितलं होतं, की या शहराला काबीज केलं जाईल. तसंच या शहरावर कोरेश नावाचा राजा कब्जा करेल आणि तो हे नेमकं कसं करेल हेसुद्धा यशयाने सांगितलं होतं. (यश. ४४:२७–४५:२) शिवाय या शहराचा पूर्णपणे नाश होईल आणि हे शहर ओसाड पडेल असंसुद्धा यशयाने सांगितलं होतं. (यश. १३:१९, २०) इ.स.पू. ५३९ मध्ये मेद आणि पारसच्या साम्राज्याने बाबेलवर कब्जा केला. आणि एकेकाळी शक्तिशाली असलेल्या या शहराचे आज फक्त काही अवशेषच उरले आहेत. टेहळणी बुरूज२३.०१ ४ ¶१०
गुरुवार, १९ सप्टेंबर
एकमेकांना प्रोत्साहन देत [राहा].—१ थेस्सलनी. ५:११.
यहोवाने आपल्याला जगभरातल्या त्याच्या उपासकांच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी निवडलंय. हा खरंच एक मोठा बहुमान आहे. आणि त्याच्या कुटुंबाचा भाग असल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. (मार्क १०:२९, ३०) जगभरातले आपले भाऊबहीण आपल्यासारखंच यहोवावर प्रेम करतात आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जगायचा पूर्ण प्रयत्न करतात. आपली भाषा, संस्कृती आणि पेहराव वेगवेगळे आहेत. पण आपण आपल्या भाऊबहिणींना पहिल्यांदा जरी भेटलो तरी आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. शिवाय त्यांच्यासोबत मिळून आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची स्तुती आणि उपासना करायलाही आपल्याला खूप आवडतं. आणि त्यांच्यासोबत ऐक्याने राहणंही गरजेचं आहे. (स्तो. १३३:१) कधीकधी आपण चिंतांच्या ओझ्याखाली दबून जातो तेव्हा ते आपल्याला मदत करतात. (रोम. १५:१; गलती. ६:२) तसंच यहोवाच्या सेवेत व्यस्त राहण्यासाठी आणि आध्यात्मिक रित्या मजबूत राहण्यासाठी ते आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतात. (इब्री १०:२३-२५) विचार करा, आपल्या भाऊबहिणींची साथ नसती तर सैतानाविरुद्ध आणि या दुष्ट जगाविरुद्ध लढणं आपल्याला किती कठीण झालं असतं. टेहळणी बुरूज२२.०९ २-३ ¶३-४
शुक्रवार, २० सप्टेंबर
जिभेवर ताबा ठेवणारा शहाणपणाने वागतो.—नीति. १०:१९.
सोशल मिडियाचा वापर करत असताना आपल्या आत्मसंयमाची परीक्षा होऊ शकते. जर आपण खबरदारी बाळगली नाही तर नकळत आपल्याकडून गोपनीय माहिती इतरांना कळू शकते आणि मग ती वाऱ्यासारखी पसरू शकते. आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून एकदा का आपल्याकडून काही महिती गेली, की मग पुढे तिचा कसा उपयोग होईल किंवा त्यामुळे कायकाय नुकसान होईल यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं. आणि म्हणूनच आत्मसंयम खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा विरोधक आपल्याकडून माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा आत्मसंयमाचा हा गुण आपल्याला शांत राहायला मदत करेल आणि आपण त्यांना अशी कोणतीही माहिती देणार नाही ज्यामुळे आपल्या भाऊबहिणींसाठी धोका निर्माण होईल. हे अशा एखाद्या देशात घडू शकतं जिथे आपल्या कामावर सरकारने बंदी घातली आहे किंवा निर्बंध लादले आहेत. जर आपण अशा देशात राहत असू तर पोलीस आपली चौकशी करू शकतात आणि आपल्या कामाबद्दल आणि भाऊबहिणींबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात. या आणि अशा इतर परिस्थितींमध्येही आपण बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे “आपल्या तोंडाला लगाम” घातला पाहिजे. (स्तो. ३९:१) आपण आपल्या घरच्या लोकांसोबत, मित्रांसोबत, भाऊबहिणींसोबत किंवा इतर कोणासोबतही व्यवहार करतो तेव्हा आपण भरवशालायक असलं पाहिजे. आणि भरवशालायक असण्यासाठी आत्मसंयम खूप महत्त्वाचा आहे. टेहळणी बुरूज२२.०९ १३ ¶१६
शनिवार, २१ सप्टेंबर
सुखी आहे तो माणूस, जो यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो.—स्तो. १:१, २.
खऱ्या अर्थाने आनंदी राहायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक अन्न घ्यावं लागेल. आणि आपल्याला खरंच त्याची गरज आहे. म्हणूनच येशूने म्हटलं होतं: “माणसाने फक्त भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगलं पाहिजे.” (मत्त. ४:४) त्यामुळे दररोज न चुकता आपण देवाच्या मौल्यवान वचनातून म्हणजे बायबलमधून आध्यात्मिक अन्न घेत राहिलं पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती यहोवाने बायबलमध्ये प्रेमळपणे दिली आहे. आपल्याला जीवन देण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. त्याच्यासोबत एक जवळचं नातं आपण कसं जोडू शकतो आणि आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलही त्यात सांगितलंय. तसंच भविष्याबद्दल त्याने आपल्याला जी सुंदर आशा दिली आहे त्याबद्दलही आपल्याला शिकायला मिळतं. (यिर्म. २९:११) बायबलचा अभ्यास केल्यामुळे ही सत्यं जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपलं मन आनंदाने भरून जातं. जेव्हा आपण जीवनातल्या समस्यांमुळे निराश होतो, तेव्हा बायबल वाचून त्यावर मनन करण्यासाठी आपण थोडा जास्त वेळ काढला पाहिजे. टेहळणी बुरूज२२.१० ७ ¶४-६
रविवार, २२ सप्टेंबर
समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हा.—१ करिंथ. १४:२०.
म्हणूनच बायबल आपल्याला म्हणतं, की आपण अज्ञानी राहू नये. आणि त्यासाठी लागणारी “खरी बुद्धी” बायबलची तत्त्वं जीवनात लागू करून आपण मिळवू शकतो. आणि हळूहळू आपण प्रत्यक्ष हे अनुभवू, की बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपण समस्या कशा टाळू शकतो आणि योग्य निर्णय कसे घेऊ शकतो. आपण घेतलेले निर्णय योग्य आहेत का हे वेळोवेळी तपासून पाहणंसुद्धा गरजेचं आहे. आपण जर काही काळापासून बायबलचा अभ्यास करत असलो आणि सभांनाही येत असलो, तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की ‘मी अजूनपर्यंत यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा का घेतला नाही?’ आणि आपला जर बाप्तिस्मा झाला असेल, तर प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात आपण प्रगती करत आहोत का? आपण बायबलच्या तत्त्वांप्रमाणे चालतो हे आपल्या निर्णयांवरून दिसून येतं का? इतरांशी वागताना आपण ख्रिस्तासारखे गुण दाखवतो का? या बाबतीत कुठेही सुधारणा करायची गरज आहे असं जर आपल्याला जाणवलं, तर आपण यहोवाच्या सूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण देवाच्या सूचना ‘अज्ञानी लोकांना,’ म्हणजे ‘अनुभव नसलेल्या लोकांना बुद्धिमान’ बनवतात.—स्तो. १९:७. टेहळणी बुरूज२२.१० २० ¶८
सोमवार, २३ सप्टेंबर
देवाची पवित्र शक्ती जिथे कुठे जायला प्रवृत्त करायची तिथे ते जायचे.—यहे. १:२०.
देवाची पवित्र शक्ती किती ताकदवान आहे हे यहेज्केलने पाहिलं. पवित्र शक्ती सामर्थ्यशाली स्वर्गदूतांवर आणि यहोवाच्या स्वर्गीय रथाच्या भल्या मोठ्या चाकांवर कशी कार्य करते हे त्याने दृष्टान्तात पाहिलं. (यहे. १:२१) हे पाहून यहेज्केलवर काय परिणाम झाला? त्याबद्दल त्याने लिहिलं: “मी ते पाहिलं, तेव्हा मी जमिनीवर पालथा पडलो.” यहेज्केल आश्चर्यचकित होऊन जमिनीवर पालथा पडला. (यहे. १:२८) यानंतर जेव्हा-जेव्हा त्याने या जबरदस्त दृष्टान्तावर विचार केला असेल तेव्हा-तेव्हा त्याला ताकद मिळाली असेल. आणि त्याची खातरी पटली असेल, की देवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने तो आपलं प्रचाराचं काम पूर्ण करू शकतो. यहोवाने यहेज्केलला आज्ञा दिली: “मनुष्याच्या मुला! उठून उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.” या आज्ञेमुळे आणि ‘पवित्र शक्तीमुळे’ यहेज्केलला पुन्हा उठून उभं राहण्यासाठी बळ मिळालं. (यहे. २:१, २) यानंतर पुढेही यहेज्केलला त्याच्या सेवाकार्यात ‘देवाच्या हाताने’ म्हणजेच त्याच्या पवित्र शक्तीने मार्गदर्शन दिलं.—यहे. ३:२२; ८:१; ३३:२२; ३७:१, तळटीप; ४०:१. टेहळणी बुरूज२२.११ ४ ¶७-८
मंगळवार, २४ सप्टेंबर
मागून एक आवाज तुमच्या कानांवर पडेल.—यश. ३०:२१.
इथे यशया संदेष्टा यहोवाची तुलना अशा एका शिक्षकाशी करतो, जो आपल्या विद्यार्थ्यांच्या मागेमागे चालत आहे आणि कोणत्या मार्गाने जायचं हे त्यांना सांगत आहे. आजसुद्धा यहोवाचा आवाज मागून आपल्या कानांवर पडतो. तो कसा? देवाचे प्रेरित शब्द बायबलमध्ये बऱ्याच काळाआधी लिहून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, जेव्हा आपण बायबल वाचतो, तेव्हा एका अर्थाने देवाचा आवाज मागून आपल्या कानांवर पडतो. (यश. ५१:४) यहोवा आपल्याला जे मार्गदर्शन देत आहे, त्याचा पूर्णपणे फायदा घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? याबद्दल यशया कोणत्या दोन गोष्टी सांगतो त्याकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे “योग्य मार्ग हा आहे,” असं तो म्हणतो. आणि दुसरी म्हणजे “यावर चाला.” “योग्य मार्ग” माहीत असणं पुरेसं नाही, तर आपण ‘त्यावर चाललंही’ पाहिजे. आज यहोवाची संघटना त्याच्या वचनाचा अर्थ आपल्याला समजावून सांगते. आणि त्यावरून आपल्याला कळतं, की यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो. तसंच, आपण जे काही शिकतो ते आपण आपल्या जीवनात कसं लागू करू शकतो हेही आपल्याला समजतं. यहोवाची सेवा कोणत्याही परिस्थितीत आनंदाने करत राहण्यासाठी आपण या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. असं केल्यामुळेच आपण ही खातरी ठेवू शकतो, की यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज२२.११ ११ ¶१०-११
बुधवार, २५ सप्टेंबर
मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात शिरतील.—प्रे. कार्यं २०:२९
प्रेषितांच्या मृत्यूच्या काही काळानंतर खोटे ख्रिस्ती मंडळीमध्ये शिरू लागले. (मत्त. १३:२४-२७, ३७-३९) ते ‘शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवू लागले.’ (प्रे. कार्यं २०:३०) त्यातलीच एक चुकीची गोष्ट म्हणजे, पुष्कळ लोकांच्या पापांचा भार वाहून नेण्यासाठी ख्रिस्ताला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण करण्यात आलेलं नाही, तर त्याला वारंवार बलिदान देण्याची गरज आहे, असं ते शिकवू लागले. (इब्री ९:२७, २८) आज बऱ्याच प्रामाणिक मनाच्या लोकांना हीच गोष्ट शिकवण्यात आली आहे. आणि त्यामुळे ते दर आठवडी आणि कधीकधी तर दररोज “पवित्र मिस्सा बलिदान” म्हटलेला विधी पाळण्यासाठी चर्चमध्ये जातात. ख्रिस्ती धर्मातले काही पंथ हा विधी दररोज पाळत नसले, तरी येशूच्या मृत्यूमुळे काय शक्य झालंय हे त्यांच्यातल्या बहुतेक सदस्यांना माहीत नाही. टेहळणी बुरूज२३.०१ २१ ¶५
गुरुवार, २६ सप्टेंबर
चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका.—इब्री १३:१६.
येशूच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान तो मेलेल्या लोकांना पुन्हा उठवेल. तसंच तो देवाची आज्ञा पाळणाऱ्या लोकांना हळूहळू परिपूर्ण व्हायला मदत करेल. जे लोक नीतिमान ठरतील त्यांना “पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.” (स्तो. ३७:१०, ११, २९) आणि मग “शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल.” (१ करिंथ. १५:२६) कायमचं जीवन जगण्याची आपली आशा ही देवाच्या वचनावर आधारलेली आहे. या आशेमुळे आपल्याला या शेवटच्या कठीण दिवसांतसुद्धा यहोवाला एकनिष्ठ राहायला मदत होते. पण आपल्याला कायमचं जीवन मिळणार आहे म्हणून आपण यहोवाला एकनिष्ठ राहतो असं नाही. तर आपल्या मनात यहोवाबद्दल आणि येशूबद्दल जे गाढ प्रेम आहे, त्यामुळे आपण त्यांना एकनिष्ठ राहतो. (२ करिंथ. ५:१४, १५) यामुळे आपण त्यांचं अनुकरण करतो आणि आपल्या आशेबद्दल इतरांना सांगतो. (रोम. १०:१३-१५) अशा प्रकारे आपण निःस्वार्थ आणि उदार मनोवृत्ती दाखवतो तेव्हा आपण यहोवाचे मित्र बनतो. कारण त्याला अशाच प्रकारच्या लोकांशी मैत्री करायला आवडते. टेहळणी बुरूज२२.१२ ६-७ ¶१५-१६
शुक्रवार, २७ सप्टेंबर
ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्या सगळ्यांचा छळ केला जाईल.—२ तीम. ३:१२.
छळामुळे आपली शांती भंग होऊ शकते. आपण घाबरून जाऊ शकतो आणि पुढे काय होईल याची आपल्याला चिंता वाटू शकते. असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे येशूने सांगितलेल्या गोष्टींच्या बाबतीत आपण सावध असलं पाहिजे. त्याने म्हटलं होतं, की छळामुळे आपला विश्वास डळमळू शकतो. (योहा. १६:१, २) येशूने सांगितलं की आपला छळ होईल, पण त्याने या गोष्टीचीही खातरी दिली की तशा परिस्थितीत आपण विश्वासू राहू शकतो. (योहा. १५:२०; १६:३३) आपल्या कामावर प्रतिबंध लावला जातो किंवा बंदी घातली जाते तेव्हा आपल्याला शाखा कार्यालयाकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून काही सूचना मिळू शकतात. आपल्याला सुरक्षित राहता यावं, आध्यात्मिक अन्न मिळत राहावं आणि जितकं शक्य असेल तितकं प्रचारकार्य करता यावं, म्हणून या सूचना आपल्याला दिल्या जातात. या सूचनांचं पूर्णपणे पालन करायचा प्रयत्न करा. (याको. ३:१७) तसंच आपल्या भाऊबहिणींबद्दल ज्यांना जाणून घ्यायचा हक्क नाही अशा कोणत्याही व्यक्तीला त्याबद्दल सांगू नका.—उप. ३:७. टेहळणी बुरूज२२.१२ २०-२१ ¶१४-१६
शनिवार, २८ सप्टेंबर
अशीच मेहनती वृत्ती पुढेही दाखवा.—इब्री ६:११.
आज येशूचे अनुयायी जगभरात देवाच्या राज्याचा संदेश सांगत आहेत आणि येशू त्यांचं मार्गदर्शन करत आहे. प्रचाराचं काम कसं करायचं हे यहोवाच्या संघटनेद्वारे तो आपल्याला शिकवतो आणि त्या कामासाठी लागणारी साधनंही पुरवतो. (मत्त. २८:१८-२०) अशा प्रकारे येशूने जे वचन दिलं होतं ते त्याने पूर्ण केलंय. पण आपल्याबद्दल काय? प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात नेहमी व्यस्त राहून आणि या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत असताना कायम जागे राहून आपण आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. तसंच, इब्री लोकांना ६:११, १२ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपली आशा “शेवटपर्यंत” डोळ्यांसमोर ठेवली पाहिजे. सैतानाच्या या दुष्ट जगाचा अंत करण्यासाठी यहोवाने एक विशिष्ट दिवस आणि वेळ आधीच ठरवली आहे. तो दिवस येईल तेव्हा नवीन जगाबद्दल यहोवाने त्याच्या वचनात दिलेल्या सगळ्या भविष्यवाण्या तो नक्की पूर्ण करेल. मात्र त्या दिवसाची पाट पाहत असताना, काही वेळा आपल्याला वाटेल, की अंत यायला खूपच उशीर होतोय. पण यहोवाचा तो दिवस यायला मुळीच “उशीर होणार नाही!” (हब. २:३) त्यामुळे आपण ‘यहोवाकडे डोळे लावून आपलं तारण करणाऱ्या देवाची धीराने वाट पाहायचा’ निर्धार करू या.—मीखा ७:७. टेहळणी बुरूज२३.०२ १९ ¶१५-१६
रविवार, २९ सप्टेंबर
तू अतुल्य आहेस!—स्तो. ४०:५.
पर्वत शिखरांवर चढणाऱ्या गिर्यारोहकाचं एकच ध्येय असतं. ते म्हणजे त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचणं. पण हे करत असताना तो मधे-मधे थांबून तो निसर्गातल्या सुंदर दृष्यांचा आनंदसुद्धा घेतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा कठीण परिस्थितीतून जात असताना मधे-मधे थांबून यहोवा आपल्याला कशी मदत करत आहे याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण या प्रश्नांवर विचार केला पाहिजे, की ‘आज मी यहोवाचा आशीर्वाद कसा अनुभवला?’ ‘मी ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे त्यात टिकून राहायला यहोवा मला कशी मदत करत आहे?’ कठीण परिस्थितीत टिकून राहायला यहोवाने तुम्हाला कशी मदत केली ते दाखवणारी एक तरी गोष्ट तुम्हाला मिळते का ते शोधायचा प्रयत्न करा. येणाऱ्या संकटातून यहोवाने आपल्याला सोडवावं अशी प्रार्थना तुम्ही करत असाल. (फिलिप्पै. ४:६) पण सध्या यहोवा आपल्याला कोणकोणते आशीर्वाद देत आहेत याचीही आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण संकटातून जात असताना टिकून राहण्यासाठी मदत करायचं आणि बळ द्यायचं वचन यहोवाने आपल्याला दिलंय. त्यामुळे अशा परिस्थितीत यहोवाची आपल्याला साथ आहे हे कधीही विसरू नका. असं केल्यामुळे कठीण परिस्थितीतून किंवा संकटातून जात असतानासुद्धा, यहोवा आपल्याला मदत करत आहे हे आपल्याला जाणवेल.—उत्प. ४१:५१, ५२. टेहळणी बुरूज२३.०१ १९ ¶१७-१८
सोमवार, ३० सप्टेंबर
तुम्ही यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे.—२ पेत्र ३:१२.
हे प्रश्न विचारून स्वतःचं परीक्षण करा: ‘मी ज्या प्रकारे जीवन जगतोय, त्यावरून या जगाचा अंत जवळ आलाय याची मला जाणीव असल्याचं दिसून येतं का? शिक्षणाबद्दल आणि नोकरी-व्यवसायाबद्दल मी जे निर्णय घेतो त्यांवरून यहोवाची सेवा माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची आहे, हे दिसून येतं का? यहोवा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करेल, असा विश्वास मला आहे का?’ यहोवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा आपण आपल्या विचारसरणीत आणि जीवनात बदल करतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! (मत्त. ६:२५-२७, ३३; फिलिप्पै. ४:१२, १३) आपण आपल्या विचारसरणीचं नेहमी परीक्षण करत राहिलं पाहिजे. आणि जिथे गरज आहे तिथे नेहमी बदल करत राहिलं पाहिजे. प्रेषित पौलने करिंथमधल्या भाऊबहिणींना असा सल्ला दिला: “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा. तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे सतत पाहा.” (२ करिंथ. १३:५) म्हणूनच आपण देवाचं वचन वाचून आपल्या विचारसरणीत बदल करत राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण यहोवासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. आणि मग त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनात आवश्यक ते बदल केले पाहिजेत.—१ करिंथ. २:१४-१६. टेहळणी बुरूज२३.०१ ९ ¶५-६