वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es24 पृ. ९६-१०९
  • ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
  • उपशिर्षक
  • गुरुवार, १ ऑगस्ट
  • शुक्रवार, २ ऑगस्ट
  • शनिवार, ३ ऑगस्ट
  • रविवार, ४ ऑगस्ट
  • सोमवार, ५ ऑगस्ट
  • मंगळवार, ६ ऑगस्ट
  • बुधवार, ७ ऑगस्ट
  • गुरुवार, ८ ऑगस्ट
  • शुक्रवार, ९ ऑगस्ट
  • शनिवार, १० ऑगस्ट
  • रविवार, ११ ऑगस्ट
  • सोमवार, १२ ऑगस्ट
  • मंगळवार, १३ ऑगस्ट
  • बुधवार, १४ ऑगस्ट
  • गुरुवार, १५ ऑगस्ट
  • शुक्रवार, १६ ऑगस्ट
  • शनिवार, १७ ऑगस्ट
  • रविवार, १८ ऑगस्ट
  • सोमवार, १९ ऑगस्ट
  • मंगळवार, २० ऑगस्ट
  • बुधवार, २१ ऑगस्ट
  • गुरुवार, २२ ऑगस्ट
  • शुक्रवार, २३ ऑगस्ट
  • शनिवार, २४ ऑगस्ट
  • रविवार, २५ ऑगस्ट
  • सोमवार, २६ ऑगस्ट
  • मंगळवार, २७ ऑगस्ट
  • बुधवार, २८ ऑगस्ट
  • गुरुवार, २९ ऑगस्ट
  • शुक्रवार, ३० ऑगस्ट
  • शनिवार, ३१ ऑगस्ट
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
es24 पृ. ९६-१०९

ऑगस्ट

गुरुवार, १ ऑगस्ट

जे यहोवाची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर मनन करतात त्या सर्वांसाठी एक स्मरणाचं पुस्तक त्याच्यापुढे लिहिण्यात आलं.​—मला. ३:१६.

जे लोक यहोवाची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर मनन करतात त्यांच्या बोलण्याकडे यहोवा लक्ष देतो आणि त्यांचं नाव आपल्या ‘स्मरण पुस्तकात’ लिहितो. पण यहोवा असं का करतो? कारण आपल्या बोलण्यावरून कळतं की आपल्या मनात काय आहे. येशूने म्हटलं: “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.” (मत्त. १२:३४) जे यहोवावर प्रेम करतात त्यांना नवीन जगात सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी त्याची इच्छा आहे. आपण ज्या प्रकारे बोलतो त्यावरून ठरतं की यहोवा आपली उपासना स्वीकारेल की नाही. (याको. १:२६) जे लोक यहोवावर प्रेम करत नाहीत ते खूप रागाने, उद्धटपणे आणि गर्विष्ठपणे बोलतात. (२ तीम. ३:१-५) पण आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही, तर आपल्याला आपल्या बोलण्यातून यहोवाचं मन आनंदित करायचं आहे. जरा विचार करा, आपण जर सभांमध्ये आणि प्रचारात खूप आदराने बोललो पण घरच्यांशी कठोरपणे किंवा त्यांना घालून-पाडून बोललो तर यहोवाला ते आवडेल का?​—१ पेत्र ३:७. टेहळणी बुरूज२२.०४ ५ ¶४-५

शुक्रवार, २ ऑगस्ट

हे वेश्‍येचा तिरस्कार करतील. ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील.​—प्रकटी. १७:१६.

मोठ्या बाबेलचा नाश करण्याचा विचार देव दहा शिंगं आणि जंगली पशूच्या मनात घालतो. याचा अर्थ जगातली राष्ट्रं, गडद लाल रंगाच्या जंगली पशूचा म्हणजेच संयुक्‍त राष्ट्रसंघाचा वापर करून खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यावर हल्ला करतील आणि त्याचा पूर्णपणे नाश करतील. असं करण्यासाठी स्वतः यहोवा त्यांना प्रवृत्त करेल. (प्रकटी. १८:२१-२४) याचा आपल्याशी काय संबंध आहे? आपण “आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना” करत राहिली पाहिजे. (याको. १:२७) मोठ्या बाबेलच्या खोट्या शिकवणी, मूर्तिपूजक सणवार, खालावलेले नैतिक स्तर आणि भूतविद्येशी संबंधित असलेल्या प्रथा यांपासून आपण पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. यासोबतच लोकांनी तिच्या पापाचे भागीदार होऊ नये म्हणून “तिच्यामधून बाहेर या” असा इशारा आपण त्यांना देत राहिलं पाहिजे.​—प्रकटी. १८:४. टेहळणी बुरूज२२.०५ ११ ¶१७; १४ ¶१८

शनिवार, ३ ऑगस्ट

मी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाच्या कार्यांबद्दल बोलीन.​—यश. ६३:७.

आईवडिलांनो, मिळेल त्या संधीचा वापर करून मुलांसोबत यहोवाबद्दल आणि त्याने तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल बोला. (अनु. ६:६, ७) घरात सगळे सत्यात नसल्यामुळे मुलांसोबत नियमितपणे अभ्यास करणं शक्य नसतं. तेव्हा खासकरून असं करणं खूप महत्त्वाचं ठरेल. क्रिस्टीन नावाची एक बहीण म्हणते, “घरी मुलांसोबत यहोवाबद्दल बोलायच्या खूप कमी संधी मला मिळायच्या. म्हणून मी मिळेल त्या संधीचा फायदा करून घ्यायचे.” त्यासोबतच तुम्ही आपल्या मुलांना यहोवाच्या संघटनेबद्दल आणि आपल्या भाऊबहिणींबद्दल चांगल्या गोष्टीसुद्धा सांगू शकता. त्यांच्यासमोर मंडळीतल्या वडिलांची टिका करू नका. नाहीतर समस्या येतील तेव्हा ते वडीलांची मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे जाणार नाहीत. घरात शांती टिकून ठेवायचा प्रयत्न करा. तुमचं आपल्या पतीवर आणि मुलांवर प्रेम आहे, याची त्यांना नेहमी जाणीव करून द्या. तुमच्या पतीसोबत नेहमी प्रेमाने आणि आदराने बोला. आणि मुलांनाही तसंच करायला शिकवा. असं केल्याने तुम्ही एक शांतीपूर्ण वातावरण तयार कराल ज्यामुळे मुलं यहोवाबद्दल शिकायला तयार होतील.​—याको. ३:१८. टेहळणी बुरूज२२.०४ १८ ¶१०-११

रविवार, ४ ऑगस्ट

मला तुझी कार्यं माहीत आहेत.​—प्रकटी. ३:१.

येशूने इफिस मंडळीला जो संदेश पाठवला होता त्यावरून आपल्याला कळतं की तिथल्या ख्रिश्‍चनांनी खूप संकटं सोसली होती. बऱ्‍याच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला तरी त्यांनी यहोवाची सेवा करायचं सोडलं नव्हतं. असं असलं, तरी यहोवासाठी असलेलं त्यांचं सुरवातीचं प्रेम आटलं होतं. यहोवाने त्यांची उपासना स्वीकारावी म्हणून त्यांना आपलं प्रेम पुन्हा वाढवायची गरज होती. त्याचप्रमाणे आज आपणसुद्धा बऱ्‍याच संकटांचा सामना करून यहोवाची सेवा करत असू. पण आपण हे योग्य कारणांसाठी केलं पाहिजे. कारण यहोवा आपण काय करतो हेच पाहत नाही, तर ते का करतो हेसुद्धा तो पाहतो. आपण कोणत्या हेतूने त्याची उपासना करतो हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याची अशी इच्छा आहे, की त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि कदर असल्यामुळे आपण त्याची उपासना करावी. (नीति. १६:२; मार्क १२:२९, ३०) आपण नेहमी जागृत आणि सतर्क राहिलं पाहिजे. सार्दीस मंडळीच्या ख्रिश्‍चनांची समस्या थोडी वेगळी होती. पूर्वी ते आध्यात्मिक कार्यांमध्ये उत्साही होते. पण हळूहळू देवाच्या सेवेतला त्यांचा आवेश कमी होत गेला. म्हणून येशूने त्यांना ‘जागे व्हा’ असा सल्ला दिला. (प्रकटी. ३:१-३) आजपर्यंत आपण यहोवाच्या सेवेत जे काही केलं ते तो विसरणार नाही यात काही शंका नाही.​—इब्री ६:१०. टेहळणी बुरूज२२.०५ ३ ¶६-७

सोमवार, ५ ऑगस्ट

मेहनत केल्याने नेहमीच फायदा होतो.​—नीति. १४:२३.

मेहनतीने केलेल्या कामातून आपल्याला आनंद मिळतो. शलमोनने म्हटलं “ही देवाची देणगी आहे.” (उप. ५:१८, १९) शलमोन स्वतःच्या अनुभवातून हे बोलत होता. कारण त्याने स्वतःसुद्धा बरीच मेहनत घेतली होती. त्याने द्राक्षमळे लावले, तसंच घरं, उद्यानं आणि तलाव बनवले. शिवाय, त्याने कित्येक शहरंही बांधली. (१ राजे ९:१९; उप. २:४-६) या सगळ्यांसाठी त्याला नक्कीच खूप परिश्रम घ्यावे लागले असतील. त्यातून त्याला समाधानही मिळालं असेल यात काहीच शंका नाही. पण शलमोनने फक्‍त या गोष्टींत आनंद शोधला नाही, तर त्याने यहोवासाठी बरंच काही केलं. उदाहरणार्थ, यहोवाच्या उपासनेसाठी त्याने एक भव्य मंदिर बांधायचं काम हातात घेतलं. या प्रकल्पाला सात वर्षं लागली! (१ राजे ६:३८; ९:१) अशा प्रकारे आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची कामं केल्यानंतर शलमोनला हे जाणवलं, की इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवाची सेवा करणं हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्याने लिहिलं: “सर्वकाही ऐकून झाल्यावर, सर्व गोष्टींचा सारांश हा आहे: खऱ्‍या देवाचं भय मान आणि त्याच्या आज्ञा पाळ.”​—उप. १२:१३. टेहळणी बुरूज२२.०५ २२ ¶८

मंगळवार, ६ ऑगस्ट

देवाने ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली.​—इफिस. ४:३२.

बायबलमध्ये अशा बऱ्‍याच जणांची उदाहरणं आहेत, ज्यांना यहोवाने मोठ्या मनाने माफ केलं. तुम्हाला असं एखादं उदाहरण आठवतं का? कदाचित तुम्हाला मनश्‍शे राजाचं उदाहरण आठवलं असेल. त्याने बऱ्‍याच वाईट गोष्टी केल्या. जसं की, त्याने आपल्या राज्यातल्या लोकांना मूर्तिपूजा करायचं प्रोत्साहन दिलं. तसंच त्याने खोट्या देवांची उपासना केली आणि स्वतःच्या मुलांचा बळी दिला. इतकंच काय, तर त्याने यहोवाच्या पवित्र मंदिरात एका खोट्या देवाची मूर्ती ठेवली. म्हणूनच बायबलमध्ये मनश्‍शेबद्दल असं म्हटलंय: “त्याने फार मोठ्या प्रमाणात यहोवाच्या नजेरत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला.” (२ इति. ३३:२-७) पण इतकं सगळं असूनही जेव्हा मनश्‍शेने मनापासून पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं. (२ इति. ३३:१२, १३) तुम्हाला कदाचित दावीद राजाचं उदाहरणही आठवत असेल. त्याने व्यभिचार आणि खून यांसारखी गंभीर पापं केली होती. पण जेव्हा त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला आणि आपली चूक कबूल केली, तेव्हा यहोवाने त्यालासुद्धा माफ केलं. (२ शमु. १२:९, १०, १३, १४) तर या उदाहरणांवरून आपण अगदी खातरीने असं म्हणू शकतो, की यहोवा आपल्याला माफ करायला नेहमी तयार असतो. टेहळणी बुरूज२२.०६ ३ ¶७

बुधवार, ७ ऑगस्ट

धीर धरा; आपली मनं खंबीर करा.​—याको. ५:८.

आपली आशा कायम डोळ्यांपुढे ठेवणं नेहमीच सोपं नसतं. कारण देव आपली अभिवचनं पूर्ण करेपर्यंत वाट पाहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की यहोवा सदासर्वकाळापासून जिवंत आहे. आणि वेळेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे. (२ पेत्र ३:८, ९) तो अगदी योग्य वेळी आपला उद्देश पूर्ण करेल. पण ती वेळ कदाचित आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेल. मग देवाची अभिवचनं पूर्ण होण्याची धीराने वाट पाहत असताना आपण आपली आशा कशी मजबूत ठेवू शकतो? (याको. ५:७) सर्वकाळाच्या जीवनाची आशा यहोवाने आपल्याला दिली आहे आणि तोच ती पूर्ण करणार आहे. त्यामुळे आपण त्याच्या जवळ राहिलं पाहिजे. खरंतर बायबल आपल्याला सांगतं, की आपल्याला जर आपली आशा मजबूत ठेवायची असेल तर यहोवा अस्तित्वात आहे, आणि “त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो” असा विश्‍वास आपण ठेवला पाहिजे. (इब्री ११:१, ६) यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती आहे, या गोष्टीवर आपला जितका जास्त विश्‍वास असेल तितकी जास्त आपल्याला या गोष्टीची खातरी होईल, की त्याने दिलेली सगळी अभिवचनं तो नक्की पूर्ण करेल. आपली आशा पक्की करण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि बायबल वाचन केलं पाहिजे. आपण यहोवाला पाहू शकत नसलो, तरी त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. आपण प्रार्थनेत त्याच्याशी बोलू शकतो आणि तो नक्की ऐकेल अशी खातरी बाळगू शकतो.​—यिर्म. २९:११, १२. टेहळणी बुरूज२२.१० २६-२७ ¶११-१३

गुरुवार, ८ ऑगस्ट

ईयोबने बोलायला सुरुवात केली आणि आपल्या जन्माच्या दिवसाला तो शाप देऊ लागला.​—ईयो. ३:१.

ते चित्र डोळ्यापुढे उभं करायचा प्रयत्न करा. आजारामुळे अगदी बेजार झालेला ईयोब राखेत बसलाय. त्याला सतत असाहाय्य वेदना होता आहेत. (ईयो. २:८) डोंगराएवढ्या दुःखाखाली ईयोब अगदी दबून गेलाय. आपल्या लेकरांना गमावल्याच्या दुःखाने त्याच्या मनाला पोखरून टाकलंय. त्याचे मित्र सारखे त्याला दोष लावत आहेत आणि तो एक वाईट माणूस आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत. पण सुरवातीला ईयोब एक शब्दही बोलत नाही. (ईयो. २:१३) ईयोब काहीच बोलत नाही हे पाहून त्याच्या मित्रांना कदाचित वाटलं असेल, की त्याने देवाला सोडून दिलंय आणि आता तो त्याची निंदा करेल. पण जर त्यांना खरंच असं वाटलं असेल, तर त्यांची किती घोर निराशा झाली असेल. कारण काही वेळाने ईयोबने कदाचित त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून असं म्हटलं: “मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!” (ईयो. २७:५) इतकं दुःख सोसूनसुद्धा ईयोब हिम्मत का हारला नाही? आणि त्याचा विश्‍वास इतका मजबूत का होता? कारण दुःखांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं होतं तरी त्याने क्षणभरासाठीही आपली आशा नजरेआड होऊ दिली नाही. या सगळ्या दुःखातून आपला प्रेमळ देव एक ना एक दिवस आपल्याला नक्की सोडवेल याची त्याला पक्की खातरी होती. आपला जीव जरी गेला तरी यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करेल हे त्याला माहीत होतं.​—ईयो. १४:१३-१५. टेहळणी बुरूज२२.०६ २२ ¶९

शुक्रवार, ९ ऑगस्ट

म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा: “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.”​—मत्त. ६:९, १०.

संपूर्ण विश्‍वाच्या निर्माणकर्त्याने आपल्याला त्याच्यासोबत बोलायची संधी दिली आहे ही खरंच किती विशेष गोष्ट आहे! आपण कोणत्याही वेळी आणि कोणत्याही भाषेत त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करू शकतो. आपण हॉस्पिटलमधल्या बेडवर असू किंवा जेलमधल्या तुरुंगातल्या कोठडीत असू, आपला प्रेमळ पिता आपलं ऐकेल याची खातरी आपण बाळगू शकतो. खरंच आपल्याला मिळालेल्या या बहुमानाबद्दल आपण नेहमी त्याची कदर बाळगली पाहिजे. दावीद राजाच्या मनात प्रार्थनेच्या बहुमानाबद्दल खूप कदर होती. म्हणूनच त्याच्या एका गीतात तो यहोवाला असं म्हणाला: “माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या धूपाप्रमाणे असो.” (स्तो. १४१:१, २) त्याच्या काळात याजक मंदिरात जो पवित्र धूप जाळायचे तो खूप काळजीपूर्वक तयार केला जायचा. (निर्ग. ३०:३४, ३५) अगदी त्याच प्रकारे यहोवाला प्रार्थना करताना आपण त्याच्यासोबत जे काही बोलणार आहोत त्याचा आधीच चांगला विचार करावा अशी दावीदची इच्छा होती. आपलीही अशीच इच्छा आहे. कारण आपल्या प्रार्थनेमुळे यहोवाला आनंद व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. टेहळणी बुरूज२२.०७ २० ¶१-२; २१ ¶४

शनिवार, १० ऑगस्ट

सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन, असं यहोवा म्हणतो.​—रोम. १२:१९.

बदला घेणं यहोवाचं काम आहे. जेव्हा कोणी आपल्याविरुद्ध पाप करतं, तेव्हा त्यांचा बदला घ्यायचा अधिकार यहोवाने आपल्याला दिलेला नाही. (रोम. १२: २०, २१) आपण अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे देवासारखा एखाद्या गोष्टीचा आपण योग्यपणे न्याय करू शकत नाही. (इब्री ४:१३) शिवाय, कधीकधी आपण आपल्या भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. पण यहोवाने याकोबला असं लिहायची प्रेरणा दिली होती, “रागाच्या आहारी जाणारा माणूस देवाच्या नीतिमत्त्वाप्रमाणे कार्य करू शकत नाही.” (याको. १:२०) याउलट, यहोवा नीतिमान आहे आणि म्हणून आपण ही खातरी ठेवू शकतो की तो नक्कीच योग्य न्याय करेल. माफ केल्यामुळे, यहोवा योग्य न्याय करेल असा आपल्याला भरवसा आहे हे दिसून येतं. एखादी गोष्ट आपण यहोवाच्या हातात सोपवून देतो तेव्हा आपण हे दाखवत असतो, की यहोवा झालेलं सगळं नुकसान भरून काढेल असा आपल्याला भरवसा आहे. देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगात मनावर झालेल्या जखमा “कोणालाही आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.”​—यश. ६५:१७. टेहळणी बुरूज२२.०६ १०-११ ¶११-१२

रविवार, ११ ऑगस्ट

माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.​—मत्त. २४:९.

आज आपला द्वेष केला जातो, आपल्या कामाचा विरोध केला जातो, यावरूनच स्पष्ट होतं की आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करत आहोत. (मत्त. ५:११, १२) आपल्याला माहीत आहे, की या विरोधाच्या मागे सैतानाचा हात आहे. पण आपल्याला हेही माहीत आहे की तो येशूइतका शक्‍तिशाली नाही. आपल्या कामाला येशूचा पाठिंबा असल्यामुळे आज आनंदाचा संदेश सगळ्या राष्ट्रांच्या लोकांपर्यंत पोचवला जात आहे. आज जगभरातले लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. आणि आपल्या प्रचाराच्या कामात हेसुद्धा एक आव्हान आहे. प्रेषित योहानला दिलेल्या प्रकटीकरणात येशूने सांगितलं होतं की आपल्या दिवसांत या आव्हानावरसुद्धा मात केली जाईल. (प्रकटी. १४:६, ७) मग येशूचे हे शब्द आज कसे पूर्ण होत आहेत? आज आपण जगाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. jw.org या आपल्या वेबसाईटवर १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबल आधारित साहित्य उपलब्ध आहे. शिष्य बनवण्याच्या कामासाठी असणारं आपलं मुख्य साधन कायम जीवनाचा आनंद घ्या! हे पुस्तक ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टेहळणी बुरूज२२.०७ ९ ¶६-७

सोमवार, १२ ऑगस्ट

पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश मिळतं.​—नीति. ११:१४.

येशूला लोकांबद्दल सहानुभूती होती. प्रेषित मत्तयने म्हटलं: “त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.” (मत्त. ९:३६) आणि यहोवाबद्दल काय? यहोवाला लोकांबद्दल कसं वाटतं? येशूने म्हटलं: “या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या पित्याची इच्छा नाही.” (मत्त. १८:१४) हे शब्द वाचून आपल्याला किती बरं वाटतं! कारण यावरून आपल्याला कळतं, की येशूला जशी लोकांबद्दल सहानुभूती होती तशीच यहोवालासुद्धा आहे. आणि त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. खरंच, आपण येशूबद्दल जितकं जास्त जाणून घेऊ तितकंच यहोवावरचं आपलं प्रेम वाढत जाईल. तुम्हालाही यहोवा आणि येशूसारखंच इतरांशी प्रेमळपणे वागायची आणि ख्रिस्ती या नात्याने प्रगती करायची इच्छा आहे का? मग आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या तुमच्या मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवायचा आणि त्यांची चांगल्या प्रकारे ओळख करून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसून येईल, की ते किती आनंदी आहेत. आणि यहोवाची सेवा करायचा त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना कधीच पस्तावा झाला नाही. यहोवाच्या सेवेत त्यांना कोणकोणते अनुभव आले त्याबद्दल त्यांना विचारा. तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यांचा सल्ला घ्या. कारण बायबल सांगतं, की “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश मिळतं.” टेहळणी बुरूज२२.०८ ३ ¶६-७

मंगळवार, १३ ऑगस्ट

यहोवाची नजर नीतिमानांवर असते.​—१ पेत्र ३:१२.

आपल्या सगळ्यांनाच कोणत्या-ना-कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागेल. पण परीक्षांचा सामना करताना आपण कधीच एकटं असणार नाही. कारण एका प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाची नेहमी आपल्यावर नजर असते. तो नेहमी आपल्यासोबत असतो. आणि जेव्हा-जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा-तेव्हा त्या ऐकण्यासाठी आणि आपल्याला मदत करण्यासाठी तो आतुर असतो. (यश. ४३:२) आपल्याला खातरी आहे, की आपण येणाऱ्‍या समस्यांचा नक्कीच सामना करू शकतो. कारण त्या समस्यांचा सामना करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या यहोवाने उदारपणे पुरवल्या आहेत. त्याने आपल्याला त्याला प्रार्थना करायचा बहुमान दिला आहे, बायबल, भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न, तसंच गरज असते तेव्हा मदत करण्यासाठी आपल्या भाऊबहिणींचं एक प्रेमळ कुटुंब दिलं आहे. आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर लक्ष असतं याबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत. कारण यामुळेच आपण सर्व प्रकारच्या परिस्थितीत आनंदी राहू शकतो. (स्तो. ३३:२१) यहोवा आपली प्रेमळपणे काळजी घेतो याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व तरतुदींचा फायदा घेऊन आपण ही कदर दाखवू शकतो. यहोवाने नेहमी आपली काळजी घ्यावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागत राहिलो आणि योग्य ते केलं, तर यहोवाची नजर नेहमी आपल्यावर राहील. टेहळणी बुरूज२२.०८ १३ ¶१५-१६

बुधवार, १४ ऑगस्ट

तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत.​—स्तो. ११९:१६०.

बऱ्‍याच लोकांना कोणावर भरवसा ठेवायचा हे समजत नाही. राजकीय पुढारी, वैज्ञानिक आणि व्यापारी क्षेत्रातल्या लोकांवरचा त्यांचा भरवसासुद्धा कमी होत चाललाय. आज चर्चच्या पाळकांबद्दलही त्यांच्या मनात आदर उरलेला नाही. आणि त्यामुळे पाळक ज्या ग्रंथाचं अनुकरण करतात ते बायबल तरी खरंय का अशी शंका त्यांना वाटते. यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला याची पूर्ण खातरी आहे, की तो ‘सत्याचा देव’ आहे आणि आपलं नेहमी भलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ३१:५; यश. ४८:१७) बायबलमध्ये जे दिलंय त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो. बायबलच्या एका विद्वानाने जे म्हटलं त्या गोष्टीशी आपणही सहमत आहोत. त्याने म्हटलं: “देवाने जे काही म्हटलंय ते कधीच खोटं असू शकत नाही किंवा कधीच खोटं ठरणार नाही. देवाच्या लोकांचा देवावर भरवसा आहे आणि त्यामुळे त्याने जे म्हटलं त्यावरही ते भरवसा ठेवू शकतात.” टेहळणी बुरूज२३.०१ २ ¶१-२

गुरुवार, १५ ऑगस्ट

एकमेकांचा विचार [करा].​—इब्री १०:२४.

आपण जेव्हा भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत करतो तेव्हा आपण त्यांना यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहन देतो. आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सत्यात नसलेले लोक काहींची थट्टा करतात. काहींना गंभीर आजार आहेत तर काहींचं मन दुखावलं गेल्यामुळे ते निराश झाले आहेत. असेही काही भाऊबहीण आहेत जे या जगाचा शेवट होण्याची बऱ्‍याच काळापासून वाट पाहत आहेत. या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्या भाऊबहिणींच्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागला. प्रेषित पौलने शास्त्रवचनांचा उपयोग करून भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत केला. उदाहरणार्थ, काही यहुदी ख्रिश्‍चनांचे नातेवाईक विश्‍वासात नव्हते. आणि यहुदी धर्म ख्रिस्ती धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणून ते त्यांची टीका करायचे. या नातेवाइकांना काय उत्तर द्यावं हे कदाचित आपल्या भाऊबहिणींना कळत नव्हतं. पण पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांचा विश्‍वास नक्कीच खूप मजबूत झाला असेल. (इब्री १:५, ६; २:२, ३; ९:२४, २५) या पत्रात पौलने ज्या प्रकारे तर्क केला त्यामुळे त्यांना टीका करणाऱ्‍यांना उत्तर द्यायला नक्कीच मदत झाली असेल. टेहळणी बुरूज२२.०८ २३-२४ ¶१२-१४

शुक्रवार, १६ ऑगस्ट

जो यहोवावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.​—यिर्म. १७:१७.

आज सैतानाच्या या जगात लोकांना कोणावर भरवसा ठेवावा हे कळत नाही. कारण व्यापारी, धर्मपुढारी आणि राजकीय नेते यांच्याकडून सतत त्यांची फसवणूक होत असते. आणि यामुळे लोकांना आपल्या मित्रांवर, शेजाऱ्‍यांवर इतकंच काय तर आपल्या घरच्या लोकांवरही भरवसा ठेवणं कठीण जातं. पण याचं आपल्याला काही नवल वाटत नाही. कारण बायबलमध्ये आधीच असं सांगितलं होतं, की ‘शेवटच्या दिवसात लोक बेइमान, इतरांची बदनामी करणारे आणि विश्‍वासघात करणारे असतील.’ आणि आज अगदी असंच घडत आहे. आज लोक या ‘जगाच्या देवासारखं’ म्हणजे सैतानासारखं वागतात आणि तो मुळीच भरवशालायक नाही. (२ तीम. ३:१-४; २ करिंथ. ४:४) पण ख्रिस्ती या नात्याने आपण मात्र यहोवा देवावर पूर्ण भरवसा ठेवतो. आपल्याला याची खातरी आहे की तो आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला ‘कधीच त्यागणार नाही.’ (स्तो. ९:१०) आपला ख्रिस्त येशूवरसुद्धा पूर्ण भरवसा आहे कारण त्याने आपल्यासाठी त्याचं जीवन दिलं. (१ पेत्र ३:१८) शिवाय आपण स्वतःच्या अनुभवातून हे शिकलो आहोत, की बायबलमध्ये भरवशालायक मार्गदर्शन आहे.​—२ तीम. ३:१६, १७. टेहळणी बुरूज२२.०९ २ ¶१-२

शनिवार, १७ ऑगस्ट

जो कोणी यहोवाची भीती बाळगतो, जो त्याच्या मार्गांनी चालतो, तो सुखी आहे!​—स्तो. १२८:१.

खरा आनंद फक्‍त आनंदी असल्याची भावना नाही, जी येते आणि जाते. तर खरा आनंद एक व्यक्‍ती आयुष्यभर अनुभवू शकते. कसं बरं? डोंगरावरच्या प्रवचनात येशूने म्हटलं होतं: “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.” (मत्त. ५:३) येशूला हे माहीत होतं की मानवांमध्ये आपल्या निर्माणकर्त्याला, म्हणजे यहोवा देवाला जाणून घेण्याची आणि त्याची उपासना करण्याची तीव्र इच्छा आहे. यालाच येशू “देवाच्या मार्गदर्शनाची भूक” असं म्हणत होता. आणि यहोवा एक ‘आनंदी देव’ असल्यामुळे जे त्याची उपासना करतात तेसुद्धा आनंदी राहू शकतात. (१ तीम. १:११) जीवनात आनंदी राहायचं असेल तर आपली परिस्थिती चांगली असणं गरजेचं आहे का? नाही. येशूने डोंगरावरच्या प्रवचनात म्हटलं, “जे शोक करतात ते सुखी आहेत.” तसंच “नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय” त्यांच्याबद्दलही येशूने असंच म्हटलं. (मत्त. ५:४, १०, ११) येशू आपल्याला हेच शिकवत होता, की खरा आनंद मिळवणं हे चांगल्या परिस्थितीमुळे नाही तर देवाच्या मार्गदर्शनासाठी आपली भूक भागवल्यामुळे आणि देवासोबत एक जवळचं नातं जोडल्यामुळे शक्य आहे.​—याको. ४:८. टेहळणी बुरूज२२.१० ६ ¶१-३

रविवार, १८ ऑगस्ट

जो खरोखर समंजस असतो, तो शांत राहतो.​—नीति. ११:१२.

समंजसपणा एका ख्रिस्ती व्यक्‍तीला “शांत राहण्याची वेळ आणि बोलण्याची वेळ” कोणती आहे हे समजून घ्यायला मदत करेल. (उप. ३:७) “बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ” अशी एक म्हण आहे. दुसऱ्‍या शब्दांत म्हणायचं तर कधीकधी बोलण्यापेक्षा शांत राहणंच जास्त चांगलं असतं. उदाहरणार्थ, मंडळीत सेवा करणाऱ्‍या एका अनुभवी वडिलांचा विचार करा. त्यांना इतर मंडळ्यांमधल्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी मदत करायला सहसा बोलवलं जातं. त्यांच्याच मंडळीत सेवा करणाऱ्‍या दुसऱ्‍या एका वडिलाने त्यांच्याबद्दल असं म्हटलं, “ते मंडळ्यांबद्दलची गोपनीय माहिती आपल्या तोंडून जाऊ नये याची नेहमी काळजी घेतात.” या वडिलांच्या समंजसपणामुळे त्यांच्या मंडळीच्या वडील वर्गातल्या सर्व भावांना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. कारण त्यांना याची खातरी आहे की त्यांची गोपनीय माहितीसुद्धा ते कधीच इतरांना सांगणार नाही. प्रामाणिकपणा हासुद्धा भरवशालायक असण्याचाच एक भाग आहे. प्रामाणिक व्यक्‍तीवर आपला भरवसा असतो कारण तो नेहमी खरं तेच बोलेल हे आपल्याला माहीत असतं.​—इफिस. ४:२५; इब्री १३:१८. टेहळणी बुरूज२२.०९ १२ ¶१४-१५

सोमवार, १९ ऑगस्ट

यहोवाच्या विरोधात कसलीही बुद्धी, शहाणपण आणि योजना चालत नाही.​—नीति. २१:३०.

खरी बुद्धी जेव्हा ‘रस्त्यावर हाक मारते’ तेव्हा बरेच जण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. (नीति. १:२०) बायबल म्हणतं, की असे तीन प्रकारचे लोक आहेत जे खरी बुद्धी नाकारतात. ते म्हणजे: ‘अज्ञानी लोक,’ ‘थट्टा करणारे’ आणि ‘मूर्ख लोक.’ (नीति. १:२२-२५) ज्यांना सहज फसवलं जाऊ शकतं अशा भोळ्याभाबड्या, अनुभव नसलेल्या लोकांना बायबलमध्ये ‘अज्ञानी लोक’ असं म्हटलं आहे. (नीति. १४:१५, तळटीप.) उदाहरणार्थ, आज धार्मिक आणि राजकीय पुढारी लाखो लोकांची दिशाभूल करत असल्याचं बघायला मिळतं. अशा लोकांकडून आपली दिशाभूल झाली आहे हे समजल्यावर अनेकांना धक्काच बसतो. पण नीतिवचनं १:२२ मध्ये ज्यांना ‘अज्ञानी लोक’ म्हटलं आहे त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. ते अज्ञानीच राहायची निवड करतात. कारण त्यांना तसंच राहायला आवडतं. (यिर्म. ५:३१) त्यांना बायबल काय म्हणतं हे शिकायला किंवा बायबलच्या नीतिनियमांप्रमाणे चालायला त्यांना आवडत नाही. पण आपल्याला मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्‍या लोकांसारखं व्हायचं नाही.​—नीति. १:३२; २७:१२. टेहळणी बुरूज२२.१० १९ ¶५-७

मंगळवार, २० ऑगस्ट

माणसांनी स्थापन केलेल्या प्रत्येक अधिकाराच्या अधीन राहा.​—१ पेत्र २:१३.

देवाच्या संघटनेकडूनसुद्धा आपल्याला सुरक्षेसाठी काही मार्गदर्शन दिलं जातं. जसं की, बऱ्‍याच वेळा आपल्याला आपला फोन नंबर आणि पत्ता मंडळीतल्या वडिलांना द्यायला सांगितलं जातं. म्हणजे विपत्तीच्या वेळेस ते तुम्हाला लगेच संपर्क करू शकतील. कधीकधी आपल्याला असंही सांगितलं जाऊ शकतं, की आपण आपल्या घरातच राहावं. किंवा ती जागा सोडून इतर सुरक्षित ठिकाणी जावं. गरजेच्या वस्तू साठवून ठेवण्याबद्दल किंवा इतरांना केव्हा आणि कशी मदत करायची याबद्दलसुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. जर आपण या सूचनांचं पालन केलं नाही तर आपल्या स्वतःच्या आणि मंडळीतल्या वडिलांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण मिळणाऱ्‍या सूचनांचं नेहमी पालन केलं पाहिजे. ते आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी झटत असतात. (इब्री १३:१७) बऱ्‍याच भाऊबहिणींना विपत्तीमुळे किंवा सामाजिक अशांततेमुळे त्यांचं घर सोडून दुसऱ्‍या ठिकाणी जावं लागलंय. स्थलांतरित झालेल्या या भाऊबहिणींनी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आणि यहोवाच्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवायचा प्रयत्न केला आहे. छळामुळे स्थलांतरित झालेल्या पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच हे भाऊबहीणसुद्धा “आनंदाचा संदेश” घोषित करत राहिले. (प्रे. कार्यं ८:४) यामुळे त्यांना त्यांच्या कठीण परिस्थितीवर नाही, तर देवाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करायला मदत झाली. याचा परिणाम म्हणजे, ते आपली शांती आणि आनंद टिकवून ठेवू शकले. टेहळणी बुरूज२२.१२ १९ ¶१२-१३

बुधवार, २१ ऑगस्ट

यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.​—स्तो. ११८:६.

यहोवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे. येशूने आपल्या शिष्यांना प्रचाराला पाठवण्याआधी, विरोध होण्याबद्दल त्यांच्या मनात असलेली भीती दूर करायला मदत केली. (मत्त. १०:२९-३१) त्याने त्यांना इस्राएलमध्ये सर्रासपणे पाहायला मिळणाऱ्‍या एका पक्ष्याबद्दल, म्हणजेच चिमणीबद्दल सांगितलं. येशूच्या काळात या पक्ष्याची किंमत खूपच कमी होती. असं असलं तरी येशूने शिष्यांना म्हटलं: “यांपैकी एकही तुमच्या पित्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही.” त्याने पुढे म्हटलं: “पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.” असं म्हणून त्याने शिष्यांना याची खातरी करून दिली, की त्यांच्यापैकी प्रत्येक जण यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान आहे आणि म्हणून त्यांना विरोधाला घाबरण्याची गरज नाही. शिष्य जेव्हा गावांमध्ये आणि नगरांमध्ये प्रचार करत असतील तेव्हा चिमण्यांना पाहून त्यांना नक्कीच येशूचे हे शब्द आठवले असतील. तुम्ही जेव्हा छोट्या-छोट्या पक्ष्यांना पाहाल तेव्हा हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवाला तुमची काळजी आहे, कारण “पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.” यहोवाच्या मदतीने तुम्ही धैर्याने कुठल्याही विरोधाचा सामना करू शकता. टेहळणी बुरूज२३.०३ १८ ¶१२

गुरुवार, २२ ऑगस्ट

तुमच्यामुळेच फारो आणि त्याचे सेवक आमचा द्वेष करू लागले आहेत. आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात तलवार दिली आहे.​—निर्ग. ५:२१.

कधीकधी आपल्यावर कठीण समस्या येऊ शकतात. जसं की, कुटुंबाकडून आपला विरोध होऊ शकतो किंवा आपली नोकरी जाऊ शकते. जेव्हा आपल्याला बऱ्‍याच काळापासून एखाद्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण निराश होऊ शकतो आणि खचून जाऊ शकतो. सैतान अशा परिस्थितीचा फायदा घेतो आणि यहोवाचं खरंच आपल्यावर प्रेम आहे की नाही याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण करतो. ‘यहोवामुळे किंवा त्याच्या संघटनेमुळे तर आपल्यावर ही समस्या आली नसेल ना?,’ असे प्रश्‍न तो आपल्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो. इजिप्तमध्ये राहणाऱ्‍या इस्राएली लोकांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं. त्यांना गुलामीतून सोडवण्यासाठी यहोवाने मोशे आणि अहरोनला नेमलं आहे या गोष्टीवर सुरुवातीला त्यांचा भरवसा होता. (निर्ग. ४:२९-३१) पण नंतर जेव्हा फारो त्यांच्यावर जास्तच अत्याचार करायला लागला तेव्हा त्यांनी मोशेला आणि अहरोनला आपल्या समस्यांसाठी दोषी ठरवलं. (निर्ग. ५:१९, २०) असं म्हणून त्यांनी देवाच्या विश्‍वासू सेवकांना दोष दिला. ही खरंच किती दुःखाची गोष्ट होती! जर तुम्हीही बऱ्‍याच काळापासून कठीण समस्यांचा सामना करत असाल, तर प्रार्थनेत यहोवाजवळ आपलं मन मोकळं करा आणि मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहा. टेहळणी बुरूज२२.११ १५ ¶५-६

शुक्रवार, २३ ऑगस्ट

मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की अशी वेळ येत आहे, खरंतर आलीच आहे, जेव्हा मेलेले लोक देवाच्या मुलाची हाक ऐकतील आणि ज्यांनी त्याचं ऐकलंय ते जिवंत होतील.​—योहा. ५:२५.

यहोवाने आपल्याला जीवन दिलं आहे, त्यामुळे आपला मृत्यू जरी झाला तरी तो आपल्याला पुन्हा जिवंत करू शकतो. त्याने एलीया संदेष्ट्याला सारफथच्या विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत करायची ताकद दिली. (१ राजे १७:२१-२३) नंतर अलीशा संदेष्ट्यानेसुद्धा शूनेममधल्या स्त्रीच्या मुलाला यहोवाच्या मदतीने पुन्हा जिवंत केलं. (२ राजे ४:१८-२०, ३४-३७) या आणि अशा इतर अहवालांवरून कळतं, की यहोवाकडे मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद आहे. यहोवाने येशूलासुद्धा ही ताकद दिली. पृथ्वीवर असताना त्याने बऱ्‍याच लोकांना जिवंत केलं. (योहा. ११:२३-२५, ४३, ४४) आज येशू स्वर्गात आहे आणि त्याला ‘स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार देण्यात आलाय.’ आणि त्यामुळे ‘स्मारक कबरींमध्ये असलेल्या सगळ्यांना’ कायमचं जीवन देण्याचं अभिवचन येशू पूर्ण करू शकतो.​—मत्त. २८:१८; योहा. ५:२६-२९. टेहळणी बुरूज२२.१२ ५ ¶१०

शनिवार, २४ ऑगस्ट

इस्राएलचं घराणं मात्र तुझं ऐकणार नाही, कारण त्यांना माझं ऐकायचंच नाही.​—यहे. ३:७.

यहेज्केलला नाकारून खरंतर लोक यहोवाला नाकारत होते. आजच्या वचनातल्या शब्दांमुळे यहेज्केलला सांत्वन मिळालं असेल. कारण लोकांनी त्याचा संदेश ऐकला नाही तरी तो संदेष्टा म्हणून कुठेतरी कमी पडला होता, असा त्याचा अर्थ होत नव्हता. यहोवाने त्याला असंही सांगितलं की त्याने घोषित केलेले न्यायदंड खरे ठरतील तेव्हा लोकांना कळेल, की “त्यांच्यामध्ये खरोखर एक संदेष्टा होता.” (यहे. २:५; ३३:३३) या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यामुळे यहेज्केलला सांत्वन मिळालं असेल. आणि आपलं प्रचाराचं काम पूर्ण करण्यासाठी ताकद मिळाली असेल. आज आपल्यालासुद्धा यहोवाने पाठवलं आहे हे समजल्यामुळे आपल्याला धैर्य मिळतं. तो आपल्याला त्याचे “साक्षीदार” म्हणतो. (यश. ४३:१०) हा आपल्यासाठी खरंच किती मोठा सन्मान आहे! जसं यहोवाने यहेज्केलला म्हटलं: “भिऊ नकोस,” तसंच यहोवा आपल्यालासुद्धा म्हणतो: “घाबरू नका.” (यहे. २:६) आपल्याला आपल्या विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहेज्केलप्रमाणे यहोवानेच आपल्याला पाठवलं आहे आणि तो नेहमी आपल्याला मदत करेल.​—यश. ४४:८. टेहळणी बुरूज२२.११ ३-४ ¶४-५

रविवार, २५ ऑगस्ट

जो भरवशालायक असतो, तो [गोष्टी] गुप्त ठेवतो.​—नीति. ११:१३.

आज आपल्या मंडळीतल्या वडिलांची आणि सहायक सेवकांची आपल्याला खूप कदर वाटते. हे विश्‍वासू बांधव आध्यात्मिक रीतीने आपली खूप चांगली काळजी घेतात आणि म्हणून आपण यहोवाचे आभार मानले पाहिजे. पण मग आपणसुद्धा भरवशालायक आहोत हे आपण कसं दाखवू शकतो? आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण असं असलं तरी त्यांच्या खासगी गोष्टी जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू नये. पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीत काही जणांना ‘गप्पा मारण्याची सवय होती आणि ते दुसऱ्‍यांच्या कामांत लुडबुड करायचे. तसंच, ज्यांबद्दल त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींबद्दल ते बोलायचे.’ (१ तीम. ५:१३) आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची इच्छा नाही. पण कदाचित एखादा भाऊ किंवा बहीण स्वतःहून आपल्याला त्यांच्याबद्दल एखादी खासगी माहिती सांगेल, आणि अशी अपेक्षा करेल की आपण ती दुसऱ्‍या कोणाला सांगू नये. उदाहरणार्थ, कदाचित एखादी बहीण आपल्याला तिला झालेल्या एखाद्या आजाराबद्दल सांगेल किंवा दुसऱ्‍या एखाद्या समस्येबद्दल सांगेल. आणि याबद्दल आपण कुठे बोलू नये असं कदाचित ती म्हणेल. अशा वेळी आपण तिच्या विनंतीला मान देऊन ती माहिती स्वतःजवळच ठेवली पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०९ १० ¶७-८

सोमवार, २६ ऑगस्ट

आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या.​—रोम. १२:२

‘विचारसरणी बदलणं’ यासाठी असलेल्या ग्रीक वाक्यांशाचं भाषांतर ‘मनाचं नवीनीकरण’ असंही केलं जाऊ शकतं. एखाद्या गोष्टीचं नवीनीकरण करणं म्हणजे फक्‍त वरवर बदल करणं असं नाही. उदाहरणार्थ, एखाद्या घराचं नवीनीकरण करायचं असतं तेव्हा आपण फक्‍त त्याची सजावट करत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनाचं नवीनीकरण करण्यासाठी फक्‍त काही चांगली कामं करणंच पुरेसं नाही. तर आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत, याचंसुद्धा खोलवर परीक्षण केलं पाहिजे. आणि यहोवाच्या स्तरांचं जवळून पालन करण्यासाठी, आपल्या जीवनात आवश्‍यक ते बदल आपण केले पाहिजेत. शिवाय, हे एकदाच करून चालणार नाही, तर आपण ते सतत करत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण परिपूर्ण होऊ तेव्हा आपण नेहमी असंच वागू ज्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल. पण तोपर्यंत यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहावे लागतील. रोमकर १२:२ मध्ये आपली विचारसरणी बदलणं आणि देवाची इच्छा काय आहे ते समजून घेणं, यांचा कसा संबंध आहे ते प्रेषित पौलने समजावून सांगितलं आहे. जगाचा प्रभाव स्वतःवर पडू देण्याऐवजी आपण सतत स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. तसंच, आपण जी ध्येयं ठेवतो किंवा जे निर्णय घेतो त्यांवर जगाच्या विचारसरणीपेक्षा, देवाच्या विचारसरणीचा आपण किती प्रभाव पडू देतो हेसुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०१ ८-९ ¶३-४

मंगळवार, २७ ऑगस्ट

तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल. नीतिमान माणसाला तो कधीच पडू देणार नाही.​—स्तो. ५५:२२.

आपल्या आयुष्यात घडणाऱ्‍या प्रत्येक घटनेला वळण देऊन तो सगळ्या वाईट गोष्टींना एका चांगल्या गोष्टीत बदलतो का? नाही. बायबल असं शिकवत नाही. (उप. ८:९; ९:११) पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा यहोवाला त्या गोष्टीची जाणीव असते, आणि आपण मदतीसाठी करत असलेल्या प्रार्थना तो ऐकतो. (स्तो. ३४:१५; यश. ५९:१) इतकंच नाही, तर आपण ज्या कठीण परिस्थितीतून जात आहोत त्या परिस्थितीतून यशस्वीपणे पार व्हायला तो आपल्याला मदत करतो. ते कसं? याचा एक मार्ग म्हणजे, यहोवा अगदी योग्य वेळेला धीर आणि सांत्वन देऊ आपली मदत करतो. (२ करिंथ. १:३, ४) तुम्हाला तुमच्या जीवनातली अशी एखादी वेळ किंवा घटना आठवते का, जेव्हा यहोवाने तुम्हाला अगदी योग्य वेळेला धीर आणि सांत्वन देऊन मदत केली? बऱ्‍याच वेळा असं होतं, की एखाद्या कठीण परिस्थितीतून पार झाल्यानंतरच यहोवाने त्या परिस्थितीत आपल्याला कशी मदत केली ते आपल्या लक्षात येतं. टेहळणी बुरूज२३.०१ १७-१८ ¶१३-१५

बुधवार, २८ ऑगस्ट

जो जंगली पशू होता, पण आता नाही, . . . त्याचा नाश होईल.​—प्रकटी. १७:११.

हा जंगली पशूसुद्धा सात डोकी असलेल्या जंगली पशूसारखाच दिसतो. पण फरक फक्‍त इतकाच आहे, की हा पशू गडद लाल रंगाचा आहे. त्याला “जंगली पशूची मूर्ती” आणि ‘आठवा राजासुद्धा’ म्हटलं आहे. (प्रकटी. १३:१४, १५; १७:३, ८) या ‘राजाबद्दल’ असं म्हटलं आहे, की तो “आधी होता, पण आता नाही आणि तरी पुन्हा हजर होईल.” हे शब्द संयुक्‍त राष्ट्रसंघाला अगदी अचूकपणे लागू होतात. कारण ही संघटना सुरुवातीला लीग ऑफ नेशन्स या नावाने अस्तित्वात होती. पुढे दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान तिचं अस्तित्व संपलं. नंतर ती संयुक्‍त राष्ट्रसंघ या नावाने पुन्हा अस्तित्वात आली आणि आज ती सबंध जगाच्या राजकीय व्यवस्थेसाठी काम करते. जंगली पशू किंवा सरकारं लोकांना यहोवाचा आणि त्याच्या सेवकांचा विरोध करण्याचं प्रोत्साहन देतात. एका अर्थाने ते “संपूर्ण पृथ्वीवरच्या [राजांना]” हर्मगिदोनसाठी म्हणजेच “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र करतात.”​—प्रकटी. १६:१३, १४, १६. टेहळणी बुरूज२२.०५ १० ¶१०-११

गुरुवार, २९ ऑगस्ट

तू काय वाचलं आहेस?​—लूक १०:२६.

येशू जेव्हा स्वतः पवित्र लिखाणं वाचायला शिकला तेव्हा त्याला शास्त्रवचनं फक्‍त चांगली माहीतच नव्हती, तर त्याला ती मनापासून आवडायची आणि त्यांप्रमाणे तो चालायचाही. उदाहरणार्थ, तो फक्‍त १२ वर्षांचा होता तेव्हा मंदिरात घडलेल्या त्या घटनेचाच विचार करा. त्या वेळी नियमशास्त्राची चांगली माहिती असणारे गुरूजन “त्याची समजशक्‍ती पाहून आणि त्याची उत्तरं ऐकून अगदी थक्क झाले होते.” (लूक २:४६, ४७, ५२) आपणही नियमितपणे शास्त्रवचनं वाचली, तर आपल्यालाही त्यांची चांगली ओळख होईल आणि ती मनापासून आवडू लागतील. त्यासाठी नियमशास्त्राची चांगली ओळख असलेले शास्त्री, परूशी आणि सदूकी यांसारख्या लोकांना येशूने जे म्हटलं त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. हे धर्मगुरू नेहमी शास्त्रवचनं वाचायचे, पण त्यांपासून त्यांना काहीच फायदा झाला नाही. कारण अशा तीन गोष्टी होत्या ज्यांमध्ये ते कमी पडत होते. आणि त्या तीन गोष्टी काय आहेत हे येशूने त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याने त्यांना जे सांगितलं त्यामुळे (१) आपण जे काही वाचतो ते समजून घ्यायला, (२) शास्त्रवचनांतली मौल्यवान रत्नं शोधायला आणि (३) देवाच्या वचनाप्रमाणे चालायला आपल्याला आणखी मदत होईल. टेहळणी बुरूज२३.०२ ८-९ ¶२-३

शुक्रवार, ३० ऑगस्ट

शहाणा धोका पाहून लपतो.​—नीति. २२:३.

अशा बऱ्‍याचशा गोष्टी आहेत ज्यांमुळे यहोवासोबतची आपली मैत्री तुटू शकते. जसं की, फ्लर्टिंग किंवा इश्‍कबाजी करणं, खूप जास्त दारू पिणं, अतिप्रमाणात खाणं; तसंच हिंसक मनोरंजन, पोर्नोग्राफी किंवा अश्‍लील साहित्य आणि अशा बऱ्‍याच गोष्टी. (स्तो. १०१:३) यहोवासोबतची आपली मैत्री तोडण्यासाठी सैतान हा टपूनच बसलेला आहे. (१ पेत्र ५:८) त्यामुळे आपण जर नेहमी सावध आणि जागे राहिलो नाही, तर सैतान आपल्या मनात ईर्ष्या, अप्रामाणिकपणा, लोभ, द्वेष, गर्वाची भावना आणि राग यांसारख्या गोष्टींचं बी पेरू शकतो. (गलती. ५:१९-२१) पण त्या मुळासकट उपटून काढण्यासाठी आपण जर वेळीच पाऊल उचललं नाही, तर एका विषारी रोपाप्रमाणे त्या वाढत जातील आणि पुढे आपल्यालाच त्यांचा त्रास होईल. (याको. १:१४, १५) पण अशाही काही गोष्टी असतात ज्यांमागचा धोका आपल्या लगेच लक्षात येणार नाही. जसं की, वाईट संगत. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्या वागण्या-बोलण्याचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडत असतो. (१ करिंथ. १५:३३) त्यामुळे आपलं जर स्वतःकडे लक्ष असेल, तर यहोवाच्या स्तरांप्रमाणे जीवन न जगणाऱ्‍या लोकांसोबत आपण विनाकारण वेळ घालवणार नाही. (लूक २१:३४; २ करिंथ. ६:१५) उलट, त्यामागचा धोका ओळखून आपण त्यापासून लांब राहू. टेहळणी बुरूज२३.०२ १६ ¶७; १७ ¶१०-११

शनिवार, ३१ ऑगस्ट

देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं पालन करावं.​—१ योहा. ५:३.

यहोवाबद्दल जास्तीत जास्त शिकून घेतल्यामुळे त्याच्यावरचं तुमचं प्रेम नक्कीच वाढलं असेल. आमची खातरी आहे की तुम्हाला आत्ता आणि पुढेही त्याच्यासोबत एक कायमचं नातं जोडायचं आहे आणि तुम्ही ते करू शकता. आपण त्याचं मन आनंदित करावं असं त्याला वाटतं आणि त्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहनही देतो. (नीति. २३:१५, १६) आणि तुम्ही हे फक्‍त बोलूनच नाही, तर तुमच्या वागण्यातूनही दाखवू शकता. ज्या प्रकारे तुम्ही जीवन जगता त्यावरून दिसून येईल, की तुम्ही खरंच यहोवावर प्रेम करता. हे तुमच्या जीवनातलं सगळ्यात चांगलं ध्येय असेल. तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता? सगळ्यात आधी त्याला प्रार्थना करून सांगा की तुम्ही तुमचं जीवन त्याला समर्पित केलंय. (स्तो. ४०:८) त्यानंतर, तुम्ही बाप्तिस्मा घेऊन तुमचं हे समर्पण जाहीर करू शकता. हा क्षण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असेल. बाप्तिस्मा घेऊन तुम्ही तुमच्या एका नव्या आयुष्याची सुरुवात करता; तुम्ही स्वतःसाठी नाही, तर यहोवासाठी जगता. (रोम. १४:८; १ पेत्र ४:१, २) हा कदाचित खूप मोठा निर्णय वाटेल आणि तो आहेसुद्धा! पण यामुळे तुम्हाला सगळ्यात चांगलं जीवन जगणं शक्य होईल. टेहळणी बुरूज२३.०३ ५-६ ¶१४-१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा