जुलै
सोमवार, १ जुलै
बोलण्यात विश्वासू जणांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव.—१ तीम. ४:१२.
यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि त्याने आपल्याला बोलण्याची क्षमता दिली आहे. पण बोलण्याच्या या क्षमतेचा गैरवापर झाला. सैतान हव्वाशी खोटं बोलला आणि त्यामुळे मानवांनी पाप केलं आणि ते अपरिपूर्ण बनले. (उत्प. ३:१-४) आदामनेसुद्धा आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा दुरुपयोग केला. त्याने आधी आपल्या चुकांचा दोष हव्वावर आणि नंतर यहोवावरही लावला. (उत्प. ३:१२) पुढे काइनने आपला भाऊ हाबेल याचा खून केल्यानंतर, तो यहोवाशी खोटं बोलला. (उत्प. ४:९) आज चित्रपटांमध्ये लोक घाणेरडी भाषा बोलताना आणि शिवीगाळ करताना दाखवले जातात. अशीच भाषा आपल्याला शाळा, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणीही ऐकायला मिळते. आपण जर सावध राहिलो नाही, तर आपणसुद्धा घाणेरडी भाषा ऐकून-ऐकून तसंच बोलायला लागू. हे खरं आहे, की ख्रिस्ती असल्यामुळे आपण कधीच अशी भाषा बोलणार नाही. पण आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल तर आपण बोलण्याच्या क्षमतेचा चांगल्या प्रकारे, म्हणजेच यहोवाची स्तुती करण्यासाठी वापर केला पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०४ ४ ¶१-३
मंगळवार, २ जुलै
तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.—मत्त. ६:२४.
येशूचा धनसंपत्तीबद्दल किंवा पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन होता. त्याला खाण्यापिण्याची आवड होती. (लूक १९:२, ६, ७) त्याच्या पहिल्या चमत्कारात त्याने अतिशय चांगल्या दर्जाचा द्राक्षारस तयार केला. (योहा. २:१०, ११) आणि त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याने खूप महागाचा झगा घातला होता. (योहा. १९:२३, २४) पण असं असलं, तरी येशूने पैशाला किंवा धनसंपत्तीला आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान कधीच दिलं नाही येशूने सांगितलं की जर आपण देवाच्या राज्याला जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं, तर यहोवा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. (मत्त. ६:३१-३३) पैशाच्या बाबतीत देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागल्यामुळे आपल्या बऱ्याच भाऊबहिणींना खूप फायदा झाला आहे. डॅनीएल नावाच्या एका अविवाहित भावाच्या उदाहरणाचा विचार करा. तो म्हणतो: “तरुणपणीच मी ठरवलं होतं, की मी माझ्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देईन.” डॅनीएलने त्याचं जीवन साधं ठेवल्यामुळे त्याला विपत्ती मदतकार्यात तसंच बेथेलमध्ये आपल्या वेळेचा आणि कौशल्यांचा उपयोग करणं शक्य झालं आहे. तो म्हणतो: “यहोवाने मला जे आशीर्वाद दिलेत, ते पैशात मोजले जाऊ शकत नाहीत.” टेहळणी बुरूज२२.०५ २१-२२ ¶६-७
बुधवार, ३ जुलै
[यहोवाने] तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात आणलं.—१ पेत्र २:९.
आपण बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचा नियमित अभ्यास करण्याद्वारे दाखवू शकतो, की आपल्याला सत्याची कदर आहे. कारण सत्यात येऊन आपल्याला कितीही वर्षं झालेली असली तरीही आपण नवनवीन गोष्टी शिकत राहू शकतो. अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागते पण त्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यांनाच वाचायला आणि अभ्यास करायला आवडत नाही. पण सत्याची सखोल समज मिळण्यासाठी यहोवा आपल्याला ‘शोध घेत राहायचं’ प्रोत्साहन देतो. (नीति. २:४-६) जर आपण अशी मेहनत घेतली, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कॉरी नावाचा एक भाऊ सांगतो, की तो बायबल वाचताना एका वेळी एकाच वचनावर लक्ष देतो. तो सांगतो: “मी त्या वचनातली प्रत्येक फुटनोट वाचतो. मी संदर्भ वचनं उघडून पाहतो आणि थोडा रिसर्चही करतो. अशा पद्धतीने अभ्यास केल्यामुळे मला प्रत्येक वचनातून बरंच काही शिकायला मिळतं.” कदाचित आपली अभ्यास करायची पद्धत वेगळी असेल. पण आपण कोणत्याही पद्धतीने अभ्यास केला, तरीसुद्धा जेव्हा आपण त्यासाठी वेळ काढतो आणि मेहनत घेतो, तेव्हा सत्याबद्दल आपल्याला कदर आहे, हे आपण दाखवत असतो.—स्तो. १:१-३. टेहळणी बुरूज२२.०८ १७ ¶१३; १८ ¶१५-१६
गुरुवार, ४ जुलै
मी एका कुशल कारागिरासारखी त्याच्यासोबत होते. दिवसेंदिवस मी त्याला खूप प्रिय वाटू लागले. मी सतत त्याच्यासमोर आनंदी असायचे.—नीति. ८:३०.
येशू पृथ्वीवर आला तेव्हा आपल्या शिष्यांना पित्याबद्दल शिकवण्यासाठी त्याने सृष्टीतल्या बऱ्याच गोष्टींचा उपयोग केला. याचं एक उदाहरण आता आपण पाहू या. यहोवा सगळ्यांवर प्रेम करतो. डोंगरावरच्या आपल्या प्रवचनात येशूने सृष्टीतल्या अशा दोन गोष्टींकडे शिष्यांचं लक्ष वेधलं, ज्यांचा लोक सहसा जास्त विचार करत नाहीत. त्या म्हणजे, सूर्यप्रकाश आणि पाऊस. या दोन्ही गोष्टी जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. यहोवाला पाहिजे असतं तर जे लोक त्याची सेवा करत नाहीत त्यांना त्याने या गोष्टी पुरवल्या नसत्या. पण त्याचं सगळ्यांवर प्रेम असल्यामुळे तो सर्वांना त्या पुरवतो. (मत्त. ५:४३-४५) येशूने या गोष्टीचा उपयोग करून आपल्या शिष्यांना शिकवलं, की आपणही सगळ्यांवर प्रेम करावं अशी यहोवाची इच्छा आहे. सूर्यास्ताचं नयनरम्य दृश्य पाहताना किंवा तजेला देणाऱ्या पावसाच्या सरी झेलताना नेहमी या गोष्टीची आठवण ठेवा, की यहोवा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांवर खूप प्रेम करतो. आपणही सगळ्यांना राज्याचा संदेश सांगून त्याच्यासारखंच सर्वांवर प्रेम करू शकतो. टेहळणी बुरूज२३.०३ १७ ¶९-१०
शुक्रवार, ५ जुलै
मला फार आश्चर्य वाटलं.—प्रकटी. १७:६.
प्रेषित योहानने असं काय पाहिलं ज्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं? एका गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर त्याला एक स्त्री बसलेली दिसली. त्या स्त्रीला एका “मोठ्या वेश्येच्या” रूपात दाखवण्यात आलं आहे आणि तिला “मोठी बाबेल” असं म्हणण्यात आलं आहे. ती ‘पृथ्वीवरच्या राजांसोबत’ “अनैतिक लैंगिक कृत्यं” करते. (प्रकटी. १७:१-५) “मोठी बाबेल” कोण आहे? ही स्त्री कोणत्याही राजकीय संघटनेला सूचित करू शकत नाही. कारण ती जगातल्या राजकीय पुढाऱ्यांसोबत अनैतिक कामं करते, असं प्रकटीकरणात सांगण्यात आलं आहे. (प्रकटी. १८:९) खरंतर ती या शासकांवर अधिकार गाजवायचा प्रयत्न करते. कारण प्रकटीकरणात असं म्हटलं आहे, की ती या जंगली पशूवर बसलेली आहे. ती स्त्री सैतानाच्या जगातल्या लोभी व्यापारी संस्थांनाही सूचित करू शकत नाही. कारण त्यांना ‘पृथ्वीचे व्यापारी’ असं म्हणून एका वेगळ्या गटाच्या रूपात दाखवण्यात आलं आहे. (प्रकटी. १८:११, १५, १६) प्राचीन काळात बाबेल शहर खोट्या उपासनेचं केंद्र होतं. त्यामुळे मोठी बाबेल ही सर्व प्रकारच्या खोट्या उपासनेला सूचित करते असं म्हणता येईल. खरं पाहिलं तर मोठी बाबेल हे खोट्या धर्माचं जागतिक साम्राज्य आहे.—प्रकटी. १७:५, १८. टेहळणी बुरूज२२.०५ ११ ¶१४-१६
शनिवार, ६ जुलै
तुमचा शत्रू, सैतान हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.—१ पेत्र ५:८.
आपली मुलंसुद्धा यहोवाची सेवा करायचं निवडतील का, अशी चिंता काही बहिणींना वाटत असेल. कारण सैतानाच्या या जगात आपल्या मुलांना किती वेगवेगळ्या दबावांचा सामना करावा लागतो, हे त्यांना माहीत आहे. शिवाय आपल्या काही बहिणींना एकट्यानेच आपल्या मुलांना वाढवावं लागतं. तसंच, काहींचे पतीही सत्यात नाहीत. आजसुद्धा आईवडिलांपैकी फक्त एकच जण सत्यात असेल, तर मुलांना यहोवाविषयी शिकवणं कठीण जाऊ शकतं. पण ज्या कुटुंबात आईवडील दोघंही सत्यात आहेत, त्यांनासुद्धा आपल्या मुलांच्या मनात यहोवाबद्दल प्रेम उत्पन्न करणं कठीण जाऊ शकतं. कोणतीही परिस्थिती असली तरी काळजी करू नका. यहोवा तुमची नक्की मदत करेल. कौटुंबिक उपासनेसाठी इतर अनुभवी पालक संघटनेद्वारे पुरवलेल्या शिकवण्याच्या साधनांचा वापर कसा करतात, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. (नीति. ११:१४) तुमच्या मुलांसोबत मनमोकळेपणाने बोलण्यासाठीसुद्धा यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. तुमच्या मुलांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेता याव्यात म्हणून तुम्ही त्याला मदतीसाठी प्रार्थना करू शकता.—नीती. २०:५. टेहळणी बुरूज२२.०४ १७ ¶४, ७; १८ ¶९
रविवार, ७ जुलै
मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं आणि तुम्हाला सत्याचं अचूक ज्ञान आणि पूर्ण समज मिळावी.—फिलिप्पै. १:९.
येशूने आपल्या पित्याच्या व्यक्तिमत्वाचं अगदी हुबेहुब अनुकरण केलं. त्यामुळे यहोवावरचं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण येशूबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (इब्री १:३) येशूबद्दल जास्त जाणून घेण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांचा अभ्यास करणं. जर तुम्हाला दररोज बायबल वाचायची सवय नसेल तर आतापासूनच तुम्ही ते सुरू करू शकता. येशूबद्दलचे अहवाल वाचत असताना खासकरून त्याच्या गुणांकडे लक्ष द्या. लोकांना त्याच्यासोबत राहायला आणि त्याच्यासोबत बोलायला आवडायचं. तो लहान मुलांना प्रेमाने आपल्या जवळ घ्यायचा. (मार्क १०:१३-१६) शिष्यांना त्याच्यासोबत बोलायला कधीच संकोच वाटत नव्हता. ते अगदी सहजपणे आपल्या मनातल्या गोष्टी त्याला सांगू शकत होते. (मत्त. १६:२२) तो आपल्या पित्यासारखाच होता. यहोवासुद्धा नेहमी आपलं ऐकून घ्यायला तयार असतो. म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो आणि आपले विचार आणि आपल्या भावना त्याला मनमोकळेपणाने सांगू शकतो. तो आपल्याबद्दल काय विचार करेल अशी भीती मनात बाळगायची आपल्याला गरज नाही. कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला आपली काळजी आहे.—१ पेत्र ५:७. टेहळणी बुरूज२२.०८ ३ ¶४-५
सोमवार, ८ जुलै
हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस.—स्तो. ८६:५.
यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे त्याला आपल्याबद्दल सगळंकाही माहीत आहे. जरा विचार करा! या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याला खडा न् खडा माहिती आहे. (स्तो. १३९:१५-१७) त्यामुळे, जन्मापासूनच आपल्यामध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत याची त्याला कल्पना आहे. शिवाय आपल्या जीवनात आजपर्यंत कायकाय घडलंय, आणि आपल्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्त्वावर त्याचा कसा परिणाम झालाय हेसुद्धा त्याला माहीत आहे. यहोवा आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे तो काय करतो? तो नेहमी आपल्याशी दयाळूपणे वागतो. (स्तो. ७८:३९; १०३:१३, १४) यहोवाने हे दाखवून दिलंय की आपल्याला माफ करायची त्याची खरंच इच्छा आहे. आदामने केलेल्या पापामुळे आपण सगळेच पाप आणि मृत्यूचे गुलाम बनलो आहोत हे यहोवाला माहीत आहे. (रोम. ५:१२) आणि या गुलामीतून स्वतःची किंवा दुसऱ्या कोणाची सुटका करणं आपल्या हातात नाही. (स्तो. ४९:७-९) पण आपल्यावर प्रेम असल्यामुळे यहोवाने दयाळूपणे आपली सुटका करण्यासाठी एक व्यवस्था केली. योहान ३:१६ यातून आपल्याला कळतं की त्याने त्याच्या एकुलत्या एका मुलाला आपल्यासाठी मरण सोसायला पृथ्वीवर पाठवलं.—मत्त. २०:२८; रोम. ५:१९. टेहळणी बुरूज२२.०६ ३ ¶५-६
मंगळवार, ९ जुलै
दयाळू माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो.—नीति. ११:१७.
क्षमा करणाऱ्यांनाच क्षमा केली जाईल हे यहोवाने ईयोबच्या बाबतीत जे केलं त्यावरून दिसून आलं. अलीफज, बिल्दद आणि सोफर या ईयोबच्या मित्रांनी त्याला पुष्कळ बरं-वाईट बोलून त्याचं मन दुखावलं होतं. पण यहोवाने ईयोबला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं. आणि त्याने तसं केल्यानंतर यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. (ईयो. ४२:८-१०) मनात राग ठेवल्यामुळे आपलंच नुकसान होतं. जेव्हा आपण मनातून राग काढून टाकतो तेव्हा आपलं मन हलकं होतं, शांत होतं. आणि आपल्याला ती शांती मिळावी अशी यहोवाची इच्छा आहे. (इफिस. ४:३१, ३२) म्हणूनच तो आपल्याला सांगतो की, “राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक.” (स्तो. ३७:८) हा सल्ला खरंच खूप फायद्याचा आहे. कारण मनात राग ठेवल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडतं. (नीति. १४:३०) जसं विष प्यायल्यामुळे दुसऱ्या कोणाला नाही तर आपल्यालाच त्याचा त्रास होईल, तसंच मनात राग ठेवल्यामुळे आपलं मन दुखावणाऱ्याला नाही तर आपल्यालाच त्याचा वाईट परिणाम भोगावा लागेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आपण जेव्हा दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा आपण स्वतःचंच भलं करत असतो. कारण यामुळे आपल्याला मनाची शांती मिळते आणि आपण आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकतो. टेहळणी बुरूज२२.०६ १० ¶९-१०
बुधवार, १० जुलै
आपण विश्वासाचं आणि प्रेमाचं कवच आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या.—१ थेस्सलनी. ५:८.
आपली आशा एका सैनिकाच्या टोपासारखी आपलं संरक्षण करते. त्यामुळे यहोवासोबतचं आपलं नातं कमकुवत करेल अशी स्वार्थी जीवनशैली टाळायला आणि आपल्या विचारांचं संरक्षण करायला आपल्याला मदत होते. (१ करिंथ. १५:३३, ३४) आपल्याला यहोवाला कधीच खूश करता येणार नाही, अशा विचारांपासूनही आशेचा हा टोप आपलं संरक्षण करतो. ईयोबचं खोटं सांत्वन करायला आलेल्या अलीफजनेसुद्धा ईयोबच्या मनात असाच विचार घालायचा प्रयत्न केला. त्याने म्हटलं: “शेवटी नाशवंत मानव शुद्ध कसा असू शकतो?” आणि पुढे तो देवाबद्दल असं म्हणतो, “बघ, देवाला तर आपल्या स्वर्गदूतांवरही भरवसा नाही, त्याच्या नजरेत आकाशही शुद्ध नाही.” (ईयो. १५:१४, १५) खरंच, किती खोटं होतं हे! हे लक्षात ठेवा की अशा विचारांच्या मागे सैतान आहे. त्याला माहीत आहे, की तुम्ही जर अशाच गोष्टींवर विचार करत राहिला, तर तुमची आशा अंधूक होत जाईल. म्हणून आपण असले खोटे विचार आपल्या मनातून काढून टाकले पाहिजे. आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. आणि ते मिळवण्यासाठी तो आपल्याला मदत करेल, यावर आपण कधीच शंका घेऊ नये.—१ तीम. २:३, ४. टेहळणी बुरूज२२.१० २५-२६ ¶८-१०
गुरुवार, ११ जुलै
ईयोबने आपल्या ओठांनी पाप केलं नाही.—ईयो. २:१०.
सैतान ईयोबला असं पटवून द्यायचा प्रयत्न करत होता, की यहोवा त्याच्यावर नाराज असल्यामुळे त्याच्यावर ही सगळी दुःखं ओढावली आहेत. म्हणूनच सैतानाने ईयोबच्या दहा मुलांना ठार मारण्यासाठी एक वादळ आणलं. ईयोबची मुलं एका घरात सोबत मिळून मेजवानी करत होते तेव्हा त्या घराला वादळाचा तडाखा बसून ते कोसळलं. आणि त्यात त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. (ईयो. १:१८, १९) तसंच, ईयोबच्या कळपांना आणि त्यांची राखण करणाऱ्या सेवकांना भस्म करण्यासाठी त्याने आकाशातून आगीचा वर्षावही केला. (ईयो. १:१६) ज्या प्रकारे ते वादळ आलं आणि आकाशातून आगीचा वर्षाव झाला, त्यावरून ईयोबला वाटलं की यहोवानेच ती संकटं आणली आहेत. आणि म्हणून त्याने असा निष्कर्ष काढला, की आपण काहीतरी चूक केल्यामुळे यहोवा त्याच्यावर नाराज आहे. पण असं असलं तरी, ईयोबने आपल्या स्वर्गातल्या पित्याची निंदा केली नाही. उलट तो म्हणाला, की इतक्या वर्षांपासून देवाने मला कितीतरी चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मग देवाकडून फक्त चांगलं तेच का घ्यावं, वाईट का घेऊ नये? शेवटी तो म्हणाला: “यहोवाच्या नावाची स्तुती होत राहो.”—ईयो. १:२०, २१. टेहळणी बुरूज२२.०६ २१ ¶७
शुक्रवार, १२ जुलै
माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील. पण जो शेवटपर्यंत धीर धरेल, त्यालाच वाचवलं जाईल.—मार्क १३:१३.
येशूने योहान १७:१४ आपल्या शिष्यांना अशाच प्रकारचा इशारा दिला होता. गेल्या १०० वर्षांत आपण खासकरून भविष्यवाणीतली ही गोष्ट पूर्ण होताना पाहिली आहे. ती कशी? १९१४ मध्ये येशू मसीही राजा बनल्यानंतर थोड्याच काळात सैतानाला स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं. तो आता परत स्वर्गात जाऊ शकत नाही आणि लवकरच त्याचा नाश होणार आहे. (प्रकटी. १२:९, १२) पण तो शांत बसलेला नाही. उलट तो खूप क्रोधित झाला आहे आणि देवाच्या लोकांवर सगळा राग काढत आहे. (प्रकटी. १२:१३, १७) आणि या कारणामुळे सैतानाचं जग देवाच्या लोकांचा आणखीनच द्वेष करत आहे. पण आपण सैतानाला आणि त्याच्या साथीदारांना घाबरण्याची काही गरज नाही. उलट, प्रेषित पौलसारखं आपण हे खातरीने म्हणू शकतो, की “जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभं राहू शकतं?” (रोम. ८:३१) आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. टेहळणी बुरूज२२.०७ १८ ¶१४-१५
शनिवार, १३ जुलै
राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.—मत्त. २४:१४.
येशूला या गोष्टीची काळजी नव्हती, की जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला प्रचाराच्या कामासाठी पुरेसे कामकरी असतील की नाही. कारण एका स्तोत्रात दिलेली ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होईल या गोष्टीची त्याला खातरी होती: “तू आपलं सैन्य घेऊन युद्धाला निघशील, त्या दिवशी तुझे लोक स्वेच्छेने पुढे येतील.” (स्तो. ११०:३) जर तुम्हीसुद्धा प्रचाराच्या कामात सहभाग घेत आहात, तर ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही येशूला आणि विश्वासू दासाला पाठिंबा देत आहात. प्रचाराचं हे काम पूर्ण होत आहे पण त्यासोबतच या कामात काही आव्हानंसुद्धा आहेत. पहिलं आव्हान म्हणजे या कार्याला होणारा विरोध. धर्मत्यागी लोकांनी तसंच धार्मिक आणि राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कामाबद्दल बरीच खोटी माहिती पसरवली आहे. कधीकधी आपले नातेवाईक, ओळखीचे लोक किंवा कामावरचे लोक या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात. आणि यामुळे ते यहोवाची सेवा आणि प्रचाराचं काम करण्यापासून आपल्याला रोखायचा प्रयत्न करतात. काही देशांमध्ये साक्षीदारांना धमक्या दिल्या जातात, त्यांना अटक केली जाते आणि कधीकधी तर त्यांना जेलमध्येही टाकलं जातं. टेहळणी बुरूज२२.०७ ८ ¶१; ९ ¶५-६
रविवार, १४ जुलै
आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.—प्रे. कार्यं १४:२२.
दररोज बायबल वाचण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला काढावा आणि त्यावर सखोल विचार करावा, अशी यहोवाची इच्छा आहे. बायबलमध्ये शिकलेल्या गोष्टींप्रमाणे आपण वागतो, तेव्हा आपला विश्वास मजबूत होत जातो आणि यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होत जातं. यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायचं बळ मिळतं. तसंच जे देवाच्या वचनाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात, त्यांना तो आपली पवित्र शक्ती देतो. आणि ती शक्ती आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी “असाधारण सामर्थ्य” देते. (२ करिंथ. ४:७-१०) यहोवाच्या मदतीने “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आपल्याला भरपूर गोष्टी पुरवतात. जसं की, लेख, व्हिडिओ आणि गीतं. या सगळ्या गोष्टींमुळे आपला विश्वास मजबूत होतो आणि आपण आध्यात्मिक रितीने जागरूक राहतो. (मत्त. २४:४५) दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा एकमेकांवर प्रेम कसं दाखवायचं आणि एकमेकांचं सांत्वन कसं करायचं, हे यहोवाने त्याच्या लोकांना शिकवलं आहे. (२ करिंथ. १:३, ४; १ थेस्सलनी. ४:९) आपले भाऊबहिणसुद्धा आपल्याला विश्वासात टिकून राहायला मदत करण्यासाठी आतुर असतात. टेहळणी बुरूज२२.०८ १२ ¶१२-१४
सोमवार, १५ जुलै
तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र शक्तीमुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवायचा प्रयत्न करत राहा.—इफिस. ४:३.
आपण इतरांशी बोलताना आपल्या भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांचा उल्लेख केला पाहिजे. असं केल्यामुळे भाऊबहिणींना एकमेकांच्या आणखी जवळ यायला मदत होईल आणि मंडळीतलं प्रेमसुद्धा वाढेल. कधीकधी मंडळीतल्या प्रौढ ख्रिस्ती भाऊबहिणींमध्येसुद्धा मतभेद किंवा वाद-विवाद होऊ शकतात. प्रेषित पौल आणि बर्णबा चांगले मित्र होते पण त्यांच्यातही वाद झाला. पुढच्या मिशनरी दौऱ्यात मार्कला सोबत घ्यायचं की नाही यावरून त्यांच्यात वाद झाला. “त्यांच्यात इतकं कडाक्याचं भांडण झालं, की ते एकमेकांपासून वेगळे झाले.” (प्रे. कार्यं १५:३७-३९) पण पौल, बर्णबा आणि मार्क यांनी आपसातले वाद मिटवले आणि ते पुन्हा एक झाले. पुढे बर्णबा आणि मार्क या दोघांबद्दल पौल चांगलं बोलला. (१ करिंथ. ९:६; कलस्सै. ४:१०) आपलेसुद्धा मंडळीतल्या भाऊबहिणींशी काही मतभेद असतील तर आपण ते मिटवले पाहिजेत आणि त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष दिलं पाहिजे. असं केल्यामुळे मंडळीची शांती आणि एकता टिकून राहील. टेहळणी बुरूज२२.०८ २३ ¶१०-११
मंगळवार, १६ जुलै
तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढायचं सोडून द्या.—मत्त. ७:१.
आपण यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. पण हे करत असताना आपण इतरांचा न्याय करू नये आणि स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजू नये. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” आहे. (उत्प. १८:२५) यहोवाने न्याय करायचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. यहोवाचा नीतिमान सेवक योसेफ याचा विचार करा. जे त्याच्याशी अगदी वाईट वागले होते त्यांचाही न्याय त्याने स्वतः केला नाही. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याच्यावर खूप अत्याचार केला होता. त्याला दास म्हणून विकलं होतं, आणि तो मेलाय असं त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. बऱ्याच वर्षांनंतर योसेफची त्याच्या भावांसोबत पुन्हा भेट झाली. योसेफ आता एक मोठा अधिकारी बनला होता. आणि त्यामुळे आपल्या भावांना शिक्षा देऊन तो त्यांचा बदला घेऊ शकत होता. पण त्याच्या भावांना त्यांनी केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप झाला होता. असं असलं तरी योसेफ आपला बदला घेईल असं त्यांना वाटत होतं. पण योसेफने त्यांना असं म्हणून धीर दिला: “घाबरू नका. मी काय देव आहे?” (उत्प. ३७:१८-२०, २७, २८, ३१-३५; ५०:१५-२१) योसेफने हे नम्रपणे ओळखलं की त्याच्या भावांचा न्याय करायचा अधिकार फक्त यहोवाला आहे. टेहळणी बुरूज२२.०८ ३० ¶१८-१९
बुधवार, १७ जुलै
ज्यांचं भलं केलं पाहिजे, त्यांचं भलं करण्याची तुझ्यात ताकद असेल, तर तसं करण्यापासून मागे हटू नकोस.—नीति. ३:२७.
तुम्हाला माहीत आहे का, एखाद्याने केलेल्या कळकळीच्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी यहोवा तुमचा उपयोग करू शकतो? तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल, सहाय्यक सेवक असाल, पायनियर किंवा प्रचारक असाल, तरुण किंवा वयस्कर असाल, तरीसुद्धा यहोवा तुमचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करू शकतो. यहोवावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा त्याच्याकडे मदतीसाठी प्रार्थना करते, तेव्हा तो मंडळीतल्या वडिलांचा किंवा त्याच्या विश्वासू सेवकांचा उपयोग तिला सांत्वन देण्यासाठी करतो. (कलस्सै. ४:११) खरंच, यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची अशा प्रकारे सेवा करायचा हा किती मोठा बहुमान आपल्याकडे आहे! महामारी, विपत्ती किंवा छळ यांसारखी कठीण परिस्थिती येते, तेव्हा खासकरून भाऊबहिणींना मदत करायची संधी आपल्याजवळ असते. आपल्याला इतरांना मदत करायची इच्छा आहे, पण आपल्याच घरचे लोक आजारी असल्यामुळे किंवा पैशाची अडचण असल्यामुळे आपल्याला तसं करता येत नाही. पण जेव्हा आपल्या भाऊबहिणींसाठी काही-ना-काही करायची आपली इच्छा असते आणि त्यासाठी शक्य तितकं करायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा यहोवाला ते पाहून आनंद होतो.—नीति. १९:१७. टेहळणी बुरूज२२.१२ २२ ¶१-२
गुरुवार, १८ जुलै
मी तुम्हाला आज्ञा देतो, की जसं मी तुमच्यावर प्रेम केलंय, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.—योहा. १५:१२.
प्रेम भरवशाचा आधार आहे. येशूने म्हटलं होतं की यहोवावर प्रेम करणं आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं या दोन सगळ्यात महत्त्वाच्या आज्ञा आहेत. (मत्त. २२:३७-३९) यहोवा स्वतः भरवशालायक आहे. आणि यहोवावर आपलं प्रेम असल्यामुळे त्याच्या परिपूर्ण उदाहरणाचं अनुकरण करायची प्रेरणा आपल्याला मिळते. उदाहरणार्थ, भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे आपण त्यांच्या खासगी गोष्टी गुप्त ठेवतो. त्यांचं ज्यामुळे नुकसान होईल किंवा त्यांना अवघडल्यासारखं वाटेल किंवा ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील अशा कोणत्याही गोष्टी आपण इतरांना सांगणार नाही. नम्रताही आपल्याला भरवशालायक होण्यासाठी मदत करते. एक नम्र व्यक्ती एखादी गोष्ट सगळ्यात आधी सांगून इतरांना प्रभावित करायचा प्रयत्न करत नाही. (फिलिप्पै. २:३) एक नम्र व्यक्ती कधीही असं दाखवत नाही की मी इतरांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, माझ्याकडे काहीतरी गुप्त माहिती आहे पण ती मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं ती कधीही भासवायचा प्रयत्न करत नाही. तसंच एक नम्र व्यक्ती बायबलमध्ये किंवा आपल्या बायबल आधारित प्रकाशनांमध्ये ज्या गोष्टींबद्दल सांगितलेलं नाही त्यांबद्दल स्वतःचे अंदाज बांधून इतरांना सांगणार नाही. टेहळणी बुरूज२२.०९ १२ ¶१२-१३
शुक्रवार, १९ जुलै
खरं ज्ञान खूप वाढेल.—दानी. १२:४.
स्वर्गदूताने दानीएलला सांगितलं की या पुस्तकातल्या भविष्यवाण्यांचा अर्थ देवाच्या लोकांना आणखी स्पष्टपणे समजेल. पण “[दुष्ट लोकांपैकी] एकालाही या गोष्टी समजणार नाहीत.” (दानी. १२:१०) आपण या दुष्ट लोकांपैकी नाही, हे दाखवून देण्याची आत्ताच वेळ आहे. (मला. ३:१६-१८) यहोवा त्याची “खास प्रजा” आणि मौल्यवान संपत्ती असणाऱ्या त्याच्या उपासकांना आज एकत्र करत आहे. आपणही या लोकांपैकी असावं असं आपल्याला वाटतं. खरंच, आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत. पण लवकरच यापेक्षाही अद्भुत घटना घडणार आहेत. थोड्याच काळात आपण सगळ्या दुष्ट लोकांचा नाश होताना पाहू. त्यानंतर यहोवाने दानीएलला दिलेलं हे वचनही पूर्ण होताना आपण पाहू: “तू तुझं प्रतिफळ मिळवण्यासाठी पुन्हा उठशील.” (दानी. १२:१३, तळटीप) जेव्हा दानीएल आणि त्याच्यासोबत आपले प्रियजन ‘पुन्हा उठतील,’ तो दिवस पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात का? तर मग आत्ताच यहोवाला विश्वासू राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव कायम राहील. टेहळणी बुरूज२२.०९ २४ ¶१७; २५ ¶१९-२०
शनिवार, २० जुलै
मी तुला पाठवतोय.—यहे. २:३.
यहोवाच्या या शब्दांमुळे यहेज्केलला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल. असं का? कारण यहोवाने मोशे आणि यशया यांना आपले संदेष्टे म्हणून निवडलं, तेव्हासुद्धा त्याने अशाच प्रकारचे शब्द वापरले होते हे त्याला आठवलं असेल. (निर्ग. ३:१०; यश. ६:८) तसंच या दोन्ही संदेष्ट्यांना त्यांच्या कठीण जबाबदाऱ्या पूर्ण करायला यहोवाने कशी मदत केली होती हेसुद्धा यहेज्केलला माहीत होतं. म्हणून ‘मी तुला पाठवतोय’ असं यहोवा जेव्हा दोनदा यहेज्केलला म्हणाला तेव्हा त्याला या गोष्टीची खातरी पटली असेल, की यहोवा नक्की त्याला मदत करेल. इतकंच नाही तर यहेज्केलच्या पुस्तकात “मला यहोवाकडून असा संदेश मिळाला” आणि “यहोवाकडून मला पुन्हा एकदा असा संदेश मिळाला” ही वाक्यं बऱ्याचदा वाचायला मिळतात. (यहे. ३:१६; ६:१) या सर्व गोष्टींमुळे यहेज्केलची पक्की खातरी पटली असेल, की यहोवाच त्याला पाठवत आहे. तसंच, यहेज्केल एका याजकाचा मुलगा होता. त्यामुळे आधीच्या काळात यहोवाने आपल्या संदेष्ट्यांना मदत करायचं वचन कसं दिलं होतं हे त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं असेल. यहोवाने इसहाक, याकोब आणि यिर्मया यांना म्हटलं होतं: “मी तुझ्यासोबत आहे.”—उत्प. २६:२४; २८:१५; यिर्म. १:८. टेहळणी बुरूज२२.११ २ ¶३
रविवार, २१ जुलै
सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी [हे] गरजेचं आहे.—योहा. १७:३.
आदाम हव्वाने पाप केलं आणि तेव्हापासून त्यांची मुलं, म्हणजे सगळे लोक मरत आहेत. आणि तरीसुद्धा यहोवाने मानवांबद्दल असलेला आपला मूळ उद्देश बदललेला नाही. (यश. ५५:११) आजसुद्धा त्याची अशीच इच्छा आहे, की त्याच्या विश्वासू सेवकांनी कायम जगावं. भूतकाळात यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी जे सांगितलं आणि जे केलं त्याचा विचार करा. यहोवाने वचन दिलं आहे, की तो मेलेल्या लोकांना पुन्हा उठवेल आणि त्यांना कायमचं जीवन जगण्याची संधी देईल. (प्रे. कार्यं २४:१५; तीत १:१, २) विश्वासू ईयोबलासुद्धा याची खातरी होती की यहोवा मेलेल्या लोकांना पुन्हा उठवण्यासाठी आतूर आहे. (ईयो. १४:१४, १५) दानीएल संदेष्ट्यालासुद्धा माहीत होतं की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यांना कायमचं जीवन जगण्याची आशा असेल. (स्तो. ३७:२९; दानी. १२:२, १३) येशूच्या काळातल्या यहुदी लोकांनासुद्धा माहीत होतं, की यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांना “सर्वकाळाचं जीवन” देऊ शकतो. (लूक १०:२५; १८:१८) येशूनेसुद्धा लोकांसोबत बोलताना बऱ्याच वेळा या गोष्टीचा उल्लेख केला. आणि त्याला स्वतःलासुद्धा यहोवाने जिवंत केलं होतं.—मत्त. १९:२९; २२:३१, ३२; लूक १८:३०; योहा. ११:२५. टेहळणी बुरूज२२.१२ ४-५ ¶८-९
सोमवार, २२ जुलै
हे यहोवा, माझा तुझ्यावर भरवसा आहे.—स्तो. ३१:१४.
यहोवा आपल्याला त्याच्या जवळ यायचं प्रोत्साहन देतो. (याको. ४:८) आपण त्याला आपला देव, पिता आणि मित्र समजावं अशी त्याची इच्छा आहे. तो आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो आणि आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपल्याला मदत करतो. तसंच त्याच्या संघटनेद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन देतो आणि आपलं संरक्षण करतो. यहोवाच्या जवळ जाण्यासाठी आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि त्याचं वचन वाचून त्यावर मनन केलं पाहिजे. असं केल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि कदर वाढेल. तसंच यामुळे आपल्याला त्याच्या आज्ञा पाळायची आणि त्याची स्तुती करायची प्रेरणा मिळेल. कारण यासाठी फक्त तोच योग्य आहे. (प्रकटी. ४:११) आपण यहोवाला जितकं जास्त जाणून घेऊ तितकाच आपला त्याच्यावर असलेला भरवसा वाढेल. तसंच आज ज्या संघटनेद्वारे तो आपल्याला मदत करत आहे त्या संघटनेवरचाही आपला भरवसा वाढेल. सैतान यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला आपला भरवसा हळूहळू कमजोर करायचा प्रयत्न करतो. पण सैतानाच्या अशा कुयुक्त्यांचा आपण प्रतिकार करू शकतो. जर आपण आपला विश्वास मजबूत केला आणि यहोवावर असलेला आपला भरवसा डळमळू दिला नाही, तर आपण कधीही यहोवापासून आणि त्याच्या संघटनेपासून दूर जाणार नाही.—स्तो. ३१:१३, १४. टेहळणी बुरूज२२.११ १४ ¶१-३
मंगळवार, २३ जुलै
त्यांच्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा किंवा उपासना करण्यापेक्षा, ते मरायला तयार झाले.—दानी. ३:२८.
आजपर्यंत यहोवाच्या अनेक विश्वासू सेवकांनी आपलं स्वातंत्र्यच नाही, तर आपला जीवसुद्धा धोक्यात घातला आहे. कारण यहोवावर त्यांचं मनापासून प्रेम आहे आणि तोच सर्वोच्च अधिकारी आहे आणि त्यालाच आपल्यावर राज्य करायचा अधिकार आहे, असं ते मानतात. ते त्या तीन इब्री तरुणांसारखे आहेत, जे यहोवाला विश्वासू राहण्यासाठी आगीच्या भट्टीतसुद्धा जायला तयार झाले. यहोवाला एकनिष्ठ राहणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल स्तोत्रकर्ता दावीदने लिहिलं: “यहोवा लोकांबद्दल आपला निर्णय सुनावेल. हे यहोवा, माझं नीतिमत्त्व आणि माझा खरेपणा पाहून माझा न्याय कर.” (स्तो. ७:८) दावीदने असंही म्हटलं: “खरेपणा आणि सरळपणा माझं रक्षण करोत.” (स्तो. २५:२१) जगण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, काहीही झालं तरी यहोवाला शेवटपर्यंत विश्वासू राहणं आणि प्रत्येक परिस्थितीत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवणं. आपण जर त्याला एकनिष्ठ राहिलो, तर आपल्यालासुद्धा स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटेल. त्याने म्हटलं: “जे निर्दोष मार्गाने [म्हणजे एकनिष्ठेने] चालतात; जे यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे वागतात, ते सुखी आहेत!”— स्तो. ११९:१, तळटीप. टेहळणी बुरूज२२.१० १७ ¶१८-१९
बुधवार, २४ जुलै
देवाचे अदृश्य गुण हे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून दिसून येतात.—रोम. १:२०.
आपल्या संपूर्ण आयुष्यात ईयोब बऱ्याच लोकांसोबत बोलला असेल. पण यहोवासोबत त्याचं जे बोलणं झालं ते तो आयुष्यात कधीच विसरला नसेल. कारण त्या वेळी यहोवाने ईयोबला त्याने निर्माण केलेल्या अद्भुत गोष्टींचं निरीक्षण करायला सांगितलं. त्यावरून यहोवा किती बुद्धिमान आहे आणि आपल्या सेवकांची काळजी घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, यावर ईयोबचा भरवसा आणखी वाढला. उदाहरणार्थ, त्याने ईयोबला आठवण करून दिली, की तो जर पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांची काळजी घेऊ शकतो तर ईयोबचीपण काळजी घेऊ शकतो. (ईयो. ३८:३९-४१; ३९:१, ५, १३-१६) सृष्टीतली अशी बरीचशी उदाहरणं लक्षात घेतल्यावर ईयोबला देवाच्या अप्रतिम गुणांबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. आपणही सृष्टीचं निरीक्षण करून देवाबद्दल बरंच काही शिकू शकतो. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. आपण जर शहराच्या गजबजलेल्या वातावरणात राहत असू तर निसर्गातल्या गोष्टी आपल्याला फारशा पाहायला मिळणार नाहीत. आणि आपण जरी शहरापासून दूर एखाद्या गावात राहत असलो, तरी निसर्गातल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याजवळ कदाचित पुरेसा वेळ नसेल. पण तरी, सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज२३.०३ १५ ¶१-२
गुरुवार, २५ जुलै
शहाणा धोका पाहून लपतो.—नीति. २२:३.
येशूने म्हटलं होतं की शेवटच्या दिवसांत “मोठमोठे भूकंप” होतील आणि इतर विपत्तींचा आपल्याला सामना करावा लागेल. (लूक २१:११) शिवाय, ‘अनीती वाढेल’ असंही येशूने सांगितलं होतं. आज गुन्हेगारी, हिंसा आणि दहशतवादी हल्ल्याचं जे प्रमाण वाढलंय त्यातून हे दिसून येतं. (मत्त. २४:१२) पण लक्षात घ्या, येशूने असं कधीच म्हटलं नव्हतं, की यहोवाला न मानणाऱ्या लोकांवरच अशी संकटं येतील. उलट, यहोवाच्या बऱ्याच विश्वासू सेवकांनासुद्धा अशा समस्यांना तोंड द्यावं लागलंय. (यश. ५७:१; २ करिंथ. ११:२५) अशी एखादी विपत्ती आली तर कदाचित यहोवा चमत्कार करून आपल्याला त्यातून सोडवणार नाही. पण अशा परिस्थितीत शांत आणि स्थिर राहायला तो आपल्याला मदत करेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. एखादा तातडीचा प्रसंग आल्यानंतर काय करायचं याबद्दल आपण आधीच तयारी केली, तर आपल्याला मदत होईल. पण आधीच तयारी केल्यामुळे यहोवावर आपला विश्वास नाही असा याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. उलट आधीच तयारी केल्यामुळे यहोवावर आपला विश्वास आहे हे आपण दाखवत असतो. कारण विपत्ती येण्याच्या आधीच आपण तयारी करावी असं देवाच्या वचनात सांगितलंय. टेहळणी बुरूज२२.१२ १८ ¶९-१०
शुक्रवार, २६ जुलै
जीव वाचवण्यासाठी देवानेच मला तुमच्यापुढे पाठवलं आहे.—उत्प. ४५:५.
योसेफ तुरुंगात असताना यहोवाने इजिप्तच्या राजाला अशी दोन स्वप्नं दाखवली ज्यांमुळे राजा खूप अस्वस्थ झाला. जेव्हा राजाला कळलं, की योसेफ स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो तेव्हा त्याने त्याला बोलवून घेतलं. यहोवाच्या मदतीने योसेफने स्वप्नांचा अर्थ तर सांगितलाच, पण त्यासोबतच त्याने राजाला एक उपयोगी सल्लासुद्धा दिला. त्यामुळे इजिप्तच्या राजावर योसेफची खूप चांगली छाप पडली. फारो राजाने ओळखलं की यहोवा योसेफसोबत आहे. आणि म्हणूनच त्याने योसेफला संपूर्ण इजिप्त देशावर अन्नधान्याचा अधिकारी म्हणून नेमलं. (उत्प. ४१:३८, ४१-४४) पुढे एक अतिशय भयंकर दुष्काळ पडला. आणि त्याचा परिणाम इजिप्तवरच नाही, तर ज्या ठिकाणी योसेफचं कुटुंब राहत होतं त्या कनान देशातही झाला. पण योसेफ आता एक मोठा अधिकारी असल्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाला वाचवता येणार होतं. आणि त्यामुळे मसीहा ज्या वंशातून येणार होता तो वंश सुरक्षित राहणार होता. या सगळ्या गोष्टींमध्ये योसेफला जे यश मिळालं त्यामागे साहजिकच यहोवा होता. शेवटी, योसेफच्या भावांनी त्याच्याविरुद्ध जो दुष्ट कट रचला होता त्याचाच वापर करून यहोवाने आपला उद्देश पूर्ण केला होता. टेहळणी बुरूज२३.०१ १७ ¶११-१२
शनिवार, २७ जुलै
स्वतःकडे लक्ष द्या.—लूक २१:३४.
जी व्यक्ती स्वतःकडे लक्ष देते ती यहोवासोबतचं आपलं नातं कोणत्या गोष्टींमुळे तुटू शकतं हे लगेच ओळखते आणि त्यांपासून दूर राहायचा प्रयत्न करते. असं करून ती स्वतःला देवाच्या प्रेमात टिकवून ठेवते. (नीति. २२:३; यहू. २०, २१) प्रेषित पौलनेसुद्धा ख्रिश्चनांना स्वतःकडे लक्ष द्यायचा सल्ला दिला. जसं की, इफिसमधल्या ख्रिश्चनांना त्याने म्हटलं: “तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला.” (इफिस. ५:१५, १६) यहोवासोबतची आपली मैत्री तोडण्याचा सैतान सतत प्रयत्न करतो. त्यामुळे बायबल आपल्याला सल्ला देतं, की “यहोवाची इच्छा काय आहे, हे ओळखायचा नेहमी प्रयत्न करा.” म्हणजे मग सैतानाच्या कोणत्याही हल्ल्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करता येईल. (इफिस. ५:१७) योग्य निर्णय घेण्यासाठी आपण “यहोवाची इच्छा काय आहे” हे ओळखायचा किंवा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण बायबलचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. जितकं जास्त आपण यहोवाची इच्छा आणि “ख्रिस्ताचं मन” समजून घ्यायचा प्रयत्न करू तितके जास्त आपण ‘बुद्धिमानांसारखे चालू.’ ज्या गोष्टींच्या बाबतीत बायबलमध्ये स्पष्ट नियम दिलेले नाहीत त्या बाबतींतही आपल्याला योग्य निर्णय घेता येतील.—१ करिंथ. २:१४-१६ टेहळणी बुरूज२३.०२ १६-१७ ¶७-९
रविवार, २८ जुलै
आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.—रोम. १२:२.
तुम्ही तुमचं घर किती वेळा स्वच्छ करता? तुम्ही पहिल्यांदा घरात राहायला आला तेव्हा तुम्ही चांगली साफसफाई केली असेल. पण नंतर जर तुम्ही साफसफाई करायचं सोडून दिलं तर काय होईल? लवकरच तुमचं घर धुळीने पुन्हा माखून जाईल आणि घाण होईल. घर निटनेटकं ठेवायचं असेल तर ते वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. घराला निटनेटकं ठेवण्यासाठी जसं प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, तसं आपल्या विचारसरणीच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही आहे. बाप्तिस्मा घेण्याआधी आपण स्वतःमध्ये योग्य तो बदल करण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल. आणि आपल्या “शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध” केलं असेल. (२ करिंथ. ७:१) पण आता प्रेषित पौलने दिलेल्या एका सल्ल्याचंही आपल्याला अनुकरण करावं लागेल. त्याने असा सल्ला दिला, की तुमच्या मनोवृत्तीत “सतत बदल करत राहा.” (इफिस. ४:२३) या जगाची धूळ आणि घाण आपल्या मनात साचू लागेल. पण हे जर आपल्याला टाळायचं असेल आणि यहोवासमोर आपल्याला शुद्ध राहायचं असेल, तर आपण आपल्या विचारसरणीचं, व्यक्तिमत्त्वाचं आणि इच्छा-आकांक्षांचं नेहमी परीक्षण करत राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०१ ८ ¶१-२
सोमवार, २९ जुलै
देवाची पवित्र शक्ती कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.—मत्त. ३:१६.
येशू लोकांना शिकवायचा तेव्हा त्यांना किती छान वाटलं असेल याचा विचार करा. कारण शिकवताना तो नेहमी शास्त्रवचनांचा उल्लेख करायचा. विशेष म्हणजे त्याला सगळी शास्त्रवचनं जशीच्या तशी आठवायची! येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र शक्तीने त्याला अभिषिक्त करण्यात आलं, तेव्हा पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गातल्या जीवनाच्या त्याच्या सगळ्या आठवणी त्याला परत देण्यात आल्या. त्याच्या बाप्तिस्म्यानंतर त्याने जे शब्द म्हटले आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे जे शेवटचे शब्द होते, ते सगळे शास्त्रवचनांतलेच होते. (अनु. ८:३; स्तो. ३१:५; लूक ४:४; २३:४६) आणि या दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या मध्ये असलेल्या साडेतीन वर्षांचा काळातही लोकांना शिकवताना त्याने शास्त्रवचनं वाचली, त्यांचा जसाच्या तसा उल्लेख केला आणि ती समजावून सांगितली. (मत्त. ५:१७, १८, २१, २२, २७, २८; लूक ४:१६-२०) पृथ्वीवर आपलं सेवाकार्य सुरू करायच्या कित्येक वर्षांआधीपासून येशूने बऱ्याचदा देवाचं वचन ऐकलं आणि वाचलं होतं. जसं की, त्याने नक्कीच मरीया आणि योसेफला शास्त्रवचनांचा जसाच्या तसा उल्लेख करताना ऐकलं असेल. (अनु. ६:६, ७) याशिवाय, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी तो आपल्या कुटुंबासोबत सभास्थानात गेला असेल. (लूक ४:१६) तिथे शास्त्रवचनं वाचली जात असताना त्याने ती खूप लक्ष देऊन ऐकली असतील. टेहळणी बुरूज२३.०२ ८ ¶१-२
मंगळवार, ३० जुलै
तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर प्रेम करा.—मार्क १२:३०.
यहोवावर प्रेम करण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे, की त्याच्याकडूनच आपल्याला जीवन मिळालंय. तसंच, “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” देणाराही तोच आहे. (स्तो. ३६:९; याको. १:१७) हो, प्रत्येक चांगली गोष्ट, जिचा आनंद आपण घेतो ती आपल्या प्रेमळ आणि उदार देवाने आपल्याला दिली आहे. खंडणी बलिदान ही यहोवाने दिलेली सगळ्यात अनोखी भेट आहे, असं आपण का म्हणू शकतो? यहोवा आणि त्याच्या मुलाच्या नात्याचा विचार करा. येशू म्हणाला होता: “पित्याचं माझ्यावर प्रेम आहे” आणि “माझं पित्यावर प्रेम आहे.” (योहा. १०:१७; १४:३१) ते दोघं लाखो वर्षांपासून एकत्र आहेत. साहजिकच त्यांचं नातं खूप घट्ट असेल. (नीति. ८:२२, २३, ३०) त्यामुळे विचार करा देवाने त्याच्या मुलाला दुःख आणि मरण सोसण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं, तेव्हा देवाला किती वेदना झाल्या असतील. खरंच, यहोवाचं संपूर्ण मानवजातीवर, अगदी तुमच्यावरही खूप प्रेम आहे. इतकं, की तुम्हाला आणि इतरांना कायमचं जीवन जगता यावं, म्हणून तो आपल्या काळजाचा तुकडाही द्यायला तयार झाला. (योहा. ३:१६; गलती. २:२०) देवावर प्रेम करण्याचं यापेक्षा आणखी मोठं कारण कोणतं असू शकतं? टेहळणी बुरूज२३.०३ ४-५ ¶११-१३
बुधवार, ३१ जुलै
जे तुमच्याजवळ आहे ते घट्ट धरून ठेवा.—प्रकटी. २:२५.
आपण धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींपासून दूर राहिलं पाहिजे. येशूने पर्गम मंडळीतल्या काही जणांना दोषी ठरवलं कारण ते मंडळीत फुटी पाडत होते. (प्रकटी. २:१४-१६) याउलट, थुवतीरा मंडळीतल्या बांधवांची त्याने प्रशंसा केली. कारण ते “सैतानाच्या गहन गोष्टींना” बळी पडले नाहीत. त्यांनी पुढेही सत्याला ‘घट्ट धरून ठवावं’ असं उत्तेजन त्याने त्यांना दिलं. (प्रकटी. २:२४-२६) या मंडळीतले विश्वासात कमजोर असलेले काही जण खोट्या शिकवणींच्या मागे लागून विश्वासापासून भरकटले होते. आणि त्यामुळे त्यांनी पश्चात्ताप करणं गरजेचं होतं. मग आज आपल्याबद्दल काय? आज आपणसुद्धा देवाच्या वचनाच्या विरोधात असलेल्या शिकवणींपासून दूर राहिलं पाहिजे. धर्मत्यागी लोक “देवाची भक्ती करायचा फक्त दिखावा” करतात पण त्यांच्या ‘जीवनावर तिचा प्रभाव नसतो.’ (२ तीम. ३:५) जर आपण देवाच्या वचनाचा नियमितपणे आणि सखोल अभ्यास केला, तर आपल्याला खोट्या शिकवणी लगेच ओळखून त्यांपासून दूर राहणं सोपं जाईल. (२ तीम. ३:१४-१७; यहू. ३, ४) यहोवा आपली उपासना स्वीकारतो की नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. जर आपण असं काहीतरी करत असू ज्यामुळे यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही, तर मग आपण लगेच पावलं उचलून स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे.—प्रकटी. २:५, १६; ३:३, १६. टेहळणी बुरूज२२.०५ ४ ¶९; ५ ¶११