वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es24 पृ. ७१-८३
  • जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
  • उपशिर्षक
  • शनिवार, १ जून
  • रविवार, २ जून
  • सोमवार, ३ जून
  • मंगळवार, ४ जून
  • बुधवार, ५ जून
  • गुरुवार, ६ जून
  • शुक्रवार, ७ जून
  • शनिवार, ८ जून
  • रविवार, ९ जून
  • सोमवार, १० जून
  • मंगळवार, ११ जून
  • बुधवार, १२ जून
  • गुरुवार, १३ जून
  • शुक्रवार, १४ जून
  • शनिवार, १५ जून
  • रविवार, १६ जून
  • सोमवार, १७ जून
  • मंगळवार, १८ जून
  • बुधवार, १९ जून
  • गुरुवार, २० जून
  • शुक्रवार, २१ जून
  • शनिवार, २२ जून
  • रविवार, २३ जून
  • सोमवार, २४ जून
  • मंगळवार, २५ जून
  • बुधवार, २६ जून
  • गुरुवार, २७ जून
  • शुक्रवार, २८ जून
  • शनिवार, २९ जून
  • रविवार, ३० जून
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
es24 पृ. ७१-८३

जून

शनिवार, १ जून

माझं शरीर किड्यांनी भरलंय; घाणीने माखलंय, माझ्या त्वचेवर खपल्या आहेत आणि त्यांतून पू निघतोय.​—ईयो. ७:५.

ईयोबचं यहोवासोबत एक जवळचं नातं होतं. त्याचं एक मोठं आनंदी कुटुंब होतं. आणि त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती. (ईयो. १:१-५) पण फक्‍त एका दिवसात त्याने आपलं जवळपास सगळं गमावलं. सर्वात आधी त्याची धनसंपत्ती गेली. (ईयो. १:१३-१७) मग त्याच दिवशी त्याची सगळी मुलं एका दुर्घटनेत मारली गेली. कल्पना करा, की आपली दहा मुलं वारली आहेत हे कळल्यावर ईयोब आणि त्याची पत्नी किती हादरून गेले असतील आणि दुःखामुळे त्यांची काय अवस्था झाली असेल. अहवालात म्हटलंय की दुःखामुळे ईयोबने आपला झगा फाडला आणि तो अक्षरशः जमिनीवर कोसळला! (ईयो. १:१८-२०) यानंतर सैतानाने ईयोबच्या आरोग्यावर हल्ला केला आणि त्याची अगदी दयनीय अवस्था करून टाकली. (ईयो. २:६-८) एकेकाळी ईयोबला समाजात खूप मानसन्मान होता. लोक सल्ला घ्यायला त्याच्याकडे यायचे. (ईयो. ३१:१८) पण आता त्याला कोणीही विचारत नव्हतं. तो अगदी एकटा पडला होता. त्याच्या भावांनी, जवळच्या मित्रांनी, इतकंच काय तर त्याच्या घरच्या नोकरांनीसुद्धा त्याला एक प्रकारे वाळीत टाकलं होतं!​—ईयो. १९:१३, १४, १६. टेहळणी बुरूज२२.०६ २१ ¶५, ६

रविवार, २ जून

आपण सगळ्या गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावं.​—इफिस. ४:१५.

बाप्तिस्म्यानंतर आपण सगळ्यांनीच, प्रेषित पौलने इफिसच्या मंडळीला दिलेला सल्ला पाळला पाहिजे. त्याने ख्रिस्ती या नात्याने त्यांना ‘पूर्णपणे विकसित व्हायचं’ प्रोत्साहन दिलं. (इफिस. ४:१३, तळटीप) म्हणजे ‘पुढेही प्रगती करत राहा’ असं तो त्यांना सांगत होता. यहोवावर तुमचं खूप प्रेम आहे यात काही शंका नाही. पण तुम्ही हे प्रेम आणखी वाढवू शकता. ते कसं? फिलिप्पैकर १:९ मध्ये प्रेषित पौलने याचा एक मार्ग सांगितलाय. पौलने अशी प्रार्थना केली की फिलिप्पैमधल्या भाऊबहिणींचं प्रेम “दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं.” यावरून कळतं, की यहोवावरचं आपलं प्रेम आपण आणखी वाढवू शकतो. पण हे आपल्याला कसं करता येईल? त्यासाठी आपण “सत्याचं अचूक ज्ञान आणि पूर्ण समज” मिळवली पाहिजे. आपण यहोवाला जितकं जास्त जाणून घेतो, तितकं आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढत जातं. तसंच त्याच्या सुंदर गुणांबद्दल आणि तो ज्या प्रकारे काम करतो त्याबद्दल आपली कदर वाढते. त्यामुळे त्याचं मन आनंदित करायची आपली इच्छाही वाढते. आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी टाळायचा आपला निश्‍चयही पक्का होतो. यासोबतच, त्याची काय इच्छा आहे आणि आपण त्याप्रमाणे कसं वागू शकतो हे समजून घ्यायचा आपण नेहमी प्रयत्न करतो. टेहळणी बुरूज२२.०८ २-३ ¶३-४

सोमवार, ३ जून

येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण, जे देवाने त्याला यासाठी दिलं, की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात.​—प्रकटी. १:१.

प्रकटीकरणाच्या पुस्तकात जे लिहिलं आहे, ते इतर लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी म्हणजे देवाच्या समर्पित सेवकांसाठी आहे. आणि म्हणून यातल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आपणसुद्धा सहभागी आहोत हे पाहून आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको. त्यातल्या भविष्यवाण्यांची पूर्ण होण्याच्या वेळेबद्दल वृद्ध झालेल्या प्रेषित योहानने असं म्हटलं: “पवित्र शक्‍तीच्या प्रभावाखाली येऊन मी प्रभूच्या दिवसात पोहोचलो.” (प्रकटी. १:१०) योहानने हे शब्द इ.स ९६ मध्ये लिहिले. त्या वेळी “प्रभूचा दिवस” सुरू व्हायला अजून बराच काळ होता. (मत्त. २५:१४, १९; लूक १९:१२) बायबलमधल्या भविष्यवाणीप्रमाणे तो दिवस १९१४ ला सुरू झाला, जेव्हा येशू स्वर्गात राजा बनला. तेव्हापासून, देवाच्या लोकांशी संबंधित असलेल्या प्रकटीकरणातल्या भविष्यवाण्या पूर्ण व्हायला सुरवात झाली. याचाच अर्थ आज आपण “प्रभूच्या दिवसात” जगत आहोत!​—प्रकटी. १:३. टेहळणी बुरूज२२.०५ २ ¶२-३

मंगळवार, ४ जून

जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही पकडण्यात आलं.​—प्रकटी. १९:२०.

जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आलं. याचा अर्थ देवाचे शत्रू म्हणजे ही सरकारं अजूनही सत्तेवर असतानाच त्यांचा कायमचा नाश केली जाईल. या भविष्यवाण्यांचा आपल्याशी काय संबंध आहे? ख्रिस्ती या नात्याने आपण देवाला आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठ असलं पाहिजे. (योहा. १८:३६) आपण या जगातल्या राजकीय गोष्टींच्या बाबतीत पूर्णपणे निष्पक्ष राहणं गरजेचं आहे. पण कधीकधी आपल्याला हे खूप कठीण जाऊ शकतं. कारण जगातली सरकारं आपल्याकडून अशी अपेक्षा करतात, की आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून त्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा. जे त्यांच्या दबावाला बळी पडतात, ते एका अर्थाने स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतात. (प्रकटी. १३:१६, १७) पण जे लोक ही खूण करून घेतात, ते यहोवाचा क्रोध ओढवून घेतील आणि ते कायमचं जीवन गमावून बसतील. (प्रकटी. १४:९, १०; २०:४) तर मग, कितीही दबाव आला तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाने पूर्णपणे निष्पक्ष राहणं खरंच किती महत्त्वाचं आहे! टेहळणी बुरूज२२.०५ १०-११ ¶१२-१३

बुधवार, ५ जून

आपल्या कामात कुशल असलेला माणूस तू पाहिला आहेस का? तो सर्वसामान्य लोकांसमोर नाही, तर राजांसमोर उभा राहील.​—नीति. २२:२९.

यहोवाच्या सेवेत उपयोगी पडेल असं कौशल्य शिकून घेण्याचं एक ध्येय तुम्ही ठेवू शकता. जर आपण आपली कौशल्यं वाढवली तर आपल्याला जास्त जबाबदाऱ्‍या घेता येतील. बेथेल गृहाच्या इमारती, संमेलन गृह आणि आपली राज्य सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाऊबहिणींची गरज असते. अशा भाऊबहिणींनी बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्‍या अनुभवी भाऊबहिणींकडून वेगवेगळी कौशल्यं शिकून घेतली आहेत. आज संमेलन गृहांची आणि राज्य सभागृहांची दुरुस्ती करण्यासाठी भाऊ आणि बहिणी वेगवेगळी कौशल्यं शिकत आहेत. अशा आणि यांसारख्या अनेक मार्गांनी “सर्वकाळाचा राजा” यहोवा देव आणि “राजांचा राजा” येशू ख्रिस्त आपल्या कुशल सेवकांचा वापर करून अनेक अद्‌भुत गोष्टी साकारत आहेत. (१ तीम. १:१७; ६:१५) खरंच, स्वतःच्या स्तुतीसाठी नाही, तर यहोवाच्या गौरवासाठी आपल्या कौशल्यांचा वापर व्हावा आणि त्यासाठी आपण मेहनत घ्यावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे.​—योहा. ८:५४. टेहळणी बुरूज२२.०४ २४ ¶७; २५ ¶११

गुरुवार, ६ जून

पैशामुळे संरक्षण मिळतं.​—उप. ७:१२.

शलमोनकडे अमाप संपत्ती होती आणि तो ऐशआरामात राहायचा. (१ राजे १०:७, १४, १५) याउलट येशूकडे फारसं काही नव्हतं. त्याच्याकडे स्वतःचं घरसुद्धा नव्हतं. (मत्त. ८:२०) या दोघांची परिस्थिती वेगवेगळी जरी असली, तरी त्या दोघांचा धनसंपत्तीबद्दल किंवा पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन होता. कारण त्या दोघांकडेही यहोवाकडून मिळणारी बुद्धी होती. शलमोनने मान्य केली की आपल्याजवळ पैसे असले, तर आपण जीवनासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी आणि त्यांसोबतच काही चैनीच्या वस्तूही घेऊ शकतो. शलमोनला कशाचीच कमी नव्हती. पण त्याला याची जाणीव होती, की पैसाच सर्वकाही नाही. म्हणूनच त्याने लिहिलं, “भरपूर धनसंपत्तीपेक्षा चांगलं नाव [किंवा, “नावलौकिक,” तळटीप] मिळवणं बरं.” (नीति. २२:१) तसंच ज्यांना धनसंपत्तीची हाव असते त्यांच्याकडे सर्वकाही असूनही ते सुखी नसतात, ही गोष्टही शलमोनने ओळखली होती. (उप. ५:१०, १२) म्हणूनच त्याने सल्ला दिला, की आपण जीवनात पैशाला आवश्‍यकतेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही.​—नीति. २३:४, ५. टेहळणी बुरूज२२.०५ २१ ¶४-५

शुक्रवार, ७ जून

तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे, तुम्हाला दया दाखवण्यासाठी तो पाऊल उचलेल. कारण यहोवा हा न्यायी देव आहे. त्याची वाट पाहत राहणारे सर्व आनंदी असतात.​—यश. ३०:१८.

यहोवाने आज आपल्याला जे आशीर्वाद दिले आहेत त्यांवर मनन केल्यामुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं. आणि पुढे यहोवा आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे, त्यांवर मनन केल्यामुळे कायम त्याची सेवा करत राहण्याची आपली आशा आणखी मजबूत होते. आणि या सर्व गोष्टींमुळे आपण आता आनंदाने यहोवाची सेवा करू शकतो. यहोवा या दुष्ट जगाचा अंत करेल तेव्हा आपल्याला वाचवण्यासाठी तो “पाऊल उचलेल.” यहोवा “न्यायी देव” आहे, त्यामुळे आपण ही खातरी बाळगू शकतो, की तो सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी एक दिवसही उशीर लावणार नाही. (यश. २५:९) आपल्या सुटकेच्या त्या दिवसाची आपण यहोवासोबत मिळून धीराने वाट पाहत आहोत. पण तो दिवस येईपर्यंत आपण सतत प्रार्थना करत राहू या, देवाच्या वचनाचा अभ्यास करून ते लागू करत राहू या आणि आपल्या आशीर्वादांवर मनन करत राहू या. जर आपण असं केलं तर यहोवा आपल्याला शेवटपर्यंत त्याच्या सेवेत टिकून राहायला आणि आनंदाने त्याची उपासना करत राहायला मदत करेल. टेहळणी बुरूज२२.११ १३ ¶१८-१९

शनिवार, ८ जून

तुझ्या आईची शिकवण सोडू नकोस.​—नीति. १:८.

बायबलमध्ये तीमथ्यचा बाप्तिस्मा कसा आणि केव्हा झाला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. पण त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याच्या आईला, युनीकेला नक्कीच खूप आनंद झाला असेल यात काही शंका नाही. (नीति. २३:२५) यहोवा आणि येशूवर प्रेम करायला शिकवण्यासाठी तिने जी मेहनत घेतली होती, तिचं चीज झालं होतं. तीमथ्यचे आईवडील वेगवेगळ्या धर्मातून होते. त्याचे वडील ग्रीक आणि त्याची आई व आजी यहुदी होते. आणि अशा घरात तो लहानाचा मोठा झाला होता. (प्रे. कार्यं १६:१) तीमथ्य किशोर वयात होता, तेव्हा कदाचित युनीके आणि लोईसने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असावा. पण त्या वेळीसुद्धा त्याच्या वडिलांनी आपला धर्म सोडला नाही. पण आपण कोणत्या धर्माप्रमाणे चालायचं, हा प्रश्‍न तीमथ्यसमोर होता. आज आईची भूमिका पार पाडणाऱ्‍या ख्रिस्ती स्त्रियासुद्धा आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. आपल्या मुलांचं यहोवासोबत एक चांगलं नातं असावं, असं त्यांना मनापासून वाटतं. आणि यासाठी त्या जी मेहनत घेत आहेत, त्याची यहोवा खूप कदर करतो. (नीति. १:८, ९) त्याने अशा कित्येक बहिणींना आपल्या मुलांना सत्य शिकवायला मदत केली आहे. टेहळणी बुरूज२२.०४ १६ ¶१-३

रविवार, ९ जून

देवाने आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घातलं.​—प्रकटी. १७:१७.

लवकरच यहोवा “आपला विचार पूर्ण करण्याचं” या सरकारांच्या मनात घालेल. याचा काय परिणाम होईल? ही सरकारं म्हणजेच “दहा राजे” खोट्या धार्मिक संघटनांवर हल्ला करतील आणि त्यांचा पूर्णपणे नाश करतील. (प्रकटी. १७:१, २, १२, १६) मोठ्या बाबेलचा नाश जवळ आहे असं आपण का म्हणू शकतो? यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, की प्राचीन काळात बॅबिलोन (बाबेल) शहराला फरात (युफ्रेटिस) नदीच्या पाण्यामुळे संरक्षण मिळायचं. मोठ्या बाबेलला म्हणजेच खोट्या धर्मांना पाठिंबा देणाऱ्‍या लाखो लोकांची तुलना प्रकटीकरणाच्या पुस्तकात याच संरक्षण देणाऱ्‍या ‘पाण्याच्या प्रवाहांशी’ केली आहे. (प्रकटी. १७:१५) पण भविष्यवाणीत असंही सांगितलं आहे, की हे पाणी ‘आटून जाईल.’ यावरून दिसतं, की बरेच लोक खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला पाठिंबा द्यायचं सोडून देतील. (प्रकटी. १६:१२) आज ही भविष्यवाणी पूर्ण होताना दिसत आहे. कारण आज बऱ्‍याच लोकांचा धर्मांवरून विश्‍वास उडालाय. आणि आता ते आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दुसरीकडे जाऊ लागले आहेत. टेहळणी बुरूज२२.०७ ५-६ ¶१४-१५

सोमवार, १० जून

जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही. न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!​—याको. २:१३.

माफ केल्यामुळे यहोवाच्या दयेबद्दल आपण कदर दाखवतो. येशूने लोकांना एक उदाहरण दिलं ज्यात त्याने यहोवाची तुलना एका मालकाशी केली. त्या मालकाच्या दासांपैकी एका दासावर त्याचं खूप मोठं कर्ज असतं. पण तरी मालक ते मोठं कर्ज माफ करतो. पण याच दासाचं दुसऱ्‍या एका दासावर थोडंसं कर्ज असतं. तो मात्र त्या दुसऱ्‍या दासाला दया दाखवत नाही आणि त्याचं कर्ज माफ करत नाही. (मत्त. १८:२३-३५) या उदाहरणातून येशू आपल्याला काय शिकवायचा प्रयत्न करत होता? यहोवाने आपल्याला किती दया दाखवली आहे, याची जर आपल्याला मनापासून कदर असेल तर आपोआपच आपल्याला इतरांना माफ करावंसं वाटेल. (स्तो. १०३:९) याबद्दल बऱ्‍याच वर्षांआधी एका टेहळणी बुरूज  मासिकात असं म्हटलं होतं: “यहोवाने आपल्याला ख्रिस्ताद्वारे जी क्षमा केली आहे आणि जी दया दाखवली ती इतकी मोठी आहे, की आपण दुसऱ्‍यांना कितीही वेळा माफ केलं तरी आपण कधीच त्याची बरोबरी करू शकणार नाही.” क्षमा करणाऱ्‍यांनाच क्षमा केली जाईल. जे दुसऱ्‍यांना दया दाखवतात त्यांना यहोवासुद्धा दया दाखवतो. (मत्त. ५:७) येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं तेव्हा त्यानेसुद्धा ही गोष्ट स्पष्ट केली.​—मत्त. ६:१४, १५. टेहळणी बुरूज२२.०६ १० ¶८-९

मंगळवार, ११ जून

तुझ्या संततीमुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.​—उत्प. २२:१८.

येशू एक मानव म्हणून या पृथ्वीवर आला होता. त्याने त्याच्या पित्याचं व्यक्‍तिमत्वं अगदी पूर्णपणे दाखवून दिलं. (योहा. १४:९) यामुळे त्याच्याद्वारे आपल्याला यहोवा देवाची ओळख करून घेणं आणि त्याच्यावर प्रेम करणं सोपं झालं. तसंच, आज तो ख्रिस्ती मंडळीचं मार्गदर्शन करत आहे आणि आपल्याला त्याच्या शिकवणींमुळे आणि मार्गदर्शनामुळे फायदा होतोय. आपल्या वागण्या-बोलण्याने आपण यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो हे त्याने आपल्याला शिकवलंय. तसंच येशूचा मृत्यू झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना फायदा झाला आहे. तो कसा? येशूचा मृत्यू झाल्यानंतर यहोवाने त्याला पुन्हा जिवंत केलं आणि त्याच्या परिपूर्ण बलिदानाची किंमत स्वीकारली. त्यामुळे येशूचं हे बलिदान “आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.” (१ योहा. १:७) येशू आज एक वैभवशाली अमर राजा आहे. लवकरच तो सापाचं डोकं ठेचेल. (उत्प. ३:१५) सैतानाचा नाश केला जाईल तेव्हा देवाच्या सेवकांना खूप आनंद होईल. तोपर्यंत हार मानू नका. आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. तो “पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना” असंख्य आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज२२.०७ १८ ¶१३; १९ ¶१९

बुधवार, १२ जून

या गोष्टी आपल्याला सोसाव्याच लागतील.​—१ थेस्सलनी. ३:३.

ध्येय ठेवताना आपण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार असलं पाहिजे. का बरं? कारण परिस्थिती कधी आणि कशी बदलेल हे आपल्या हातात नसतं. एक उदाहरण घ्या: थेस्सलनीका इथे एक नवीन मंडळी सुरू करण्यासाठी प्रेषित पौलने मदत केली. पण विरोधकांनी पौलला ते शहर सोडायला भाग पाडलं. (प्रे. कार्यं १७:१-५, १०) जर पौल तिथे थांबला असता, तर तिथल्या भाऊबहिणींचा जीव धोक्यात आला असता. पण पौलने त्यांना मदत करायचं सोडलं नाही. त्याने बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतलं. आणि थेस्सलनीका इथल्या भाऊबहिणींच्या मदतीसाठी तीमथ्यला पाठवलं. (१ थेस्सलनी. ३:१, २) तेव्हा भाऊबहिणींना नक्कीच खूप आनंद झाला असेल! आपण पौलच्या या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. कदाचित आपणही एखादं ध्येय ठेवलं असेल, पण परिस्थिती बदल्यामुळे आपल्याला ते गाठता येत नसेल. (उप. ९:११) अशा वेळी, आपण दुसरं एखादं ध्येय ठेवू शकतो जे आपल्याला सहज गाठता येईल. टेहळणी बुरूज२२.०४ २५-२६ ¶१४-१५

गुरुवार, १३ जून

जो माणूस धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी!​—याको. १:१२.

यहोवाने आपल्याला भविष्यासाठी एक आशा दिली आहे आणि त्या आशेमुळे आपल्याला खूप सांत्वन मिळतं. कठीण परीक्षांचा सामना करत असताना बायबलमधल्या काही वचनांतून आपल्याला कसं सांत्वन मिळतं याचा विचार करा. उदाहरणार्थ, यहोवा आपल्याला अशी खातरी देतो, की कोणतीही गोष्ट म्हणजे कठीण परीक्षासुद्धा आपल्याला त्याच्या ‘प्रेमापासून वेगळं करू शकत नाही.’ (रोम. ८:३८, ३९) तसंच तो आपल्याला असंही आश्‍वासन देतो, की “त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.” (स्तो. १४५:१८) यहोवा आपल्याला सांगतो, की आपण जर त्याच्यावर भरवसा ठेवला तर आपण कोणत्याही परीक्षेचा धीराने सामना करू शकतो. आणि कठीण परीक्षांचा सामना करत असतानाही आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो. (१ करिंथ. १०:१३; याको. १:२) बायबल आपल्याला याचीही आठवण करून देतं, की पुढे जे कायमचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत त्याच्या तुलनेत आजच्या समस्या तात्पुरत्या आणि काही काळासाठी आहेत. (२ करिंथ. ४:१६-१८) यहोवाने आपल्याला वचन दिलंय, की आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण असलेल्या सैतानाचा आणि त्याला साथ देणाऱ्‍या सगळ्यांचा तो नाश करेल. (स्तो. ३७:१०) तुम्ही बायबलमधली अशी काही सांत्वन देणारी वचनं पाठ केली आहेत का, ज्यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा धीराने सामना करायला मदत होईल? टेहळणी बुरूज२२.०८ ११ ¶११

शुक्रवार, १४ जून

अशा गोष्टींचा नेहमी विचार करत जा.​—फिलिप्पै. ४:८.

आपल्याला दररोज, वर्षानुवर्षं यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जगायला जमेल का, अशी चिंता तुम्हाला कधी वाटली आहे? यहोवा असं म्हणतो, की आपलं नीतिमत्त्व “समुद्राच्या लाटांसारखं” असू शकतं. (यश. ४८:१८) तुम्ही एका अफाट समुद्राच्या किनाऱ्‍यावर उभे आहात आणि सतत एका मागून एक येणाऱ्‍या लाटांकडे तुम्ही पाहत आहात अशी कल्पना करा. त्या शांत समुद्राकडे पाहताना तुम्हाला कधी अशी चिंता वाटेल का, की एक दिवशी त्या लाटा अचानक किनाऱ्‍याकडे यायच्या थांबतील? नक्कीच नाही! कारण तुम्हाला माहीत आहे की ते येतच राहतील. तुमचं नीतिमत्त्वसुद्धा समुद्राच्या त्या लाटांसारखं असू शकतं. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जेव्हाही तुम्हाला एखादा निर्णय घायचा असतो तेव्हा स्वतःला विचारा, ‘मी काय करावं असं यहोवाला वाटतं?’ आणि मग त्याप्रमाणे करा. ते करणं कितीही कठीण असलं तरी मागे हटू नका. कारण तुमचा प्रेमळ पिता नेहमी तुमच्यासोबत असेल आणि तो तुम्हाला मदत करेल. तो तुम्हाला नेहमी त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे वागत राहायला मदत करेल.​—यश. ४०:२९-३१. टेहळणी बुरूज२२.०८ ३० ¶१५-१७

शनिवार, १५ जून

ती १,००० वर्षं पूर्ण होताच सैतानाची कैदेतून सुटका केली जाईल.​—प्रकटी. २०:७.

१,००० वर्षांच्या शेवटी सैतानाला कैदेतून सोडलं जाईल. आणि त्या वेळी तो परिपूर्ण मानवांना बहकवण्याचा प्रयत्न करेल. या परीक्षेच्या काळात पृथ्वीवर असलेल्या सगळ्या परिपूर्ण मानवांना ते कोणाच्या बाजूने आहेत, हे दाखवण्याची संधी मिळेल. म्हणजेच देवाच्या नावाचा आणि त्याच्या सर्वोच्च अधिकाराचा ते खरोखरच आदर करतात का, हे दाखवण्याची संधी त्यांना मिळेल. (प्रकटी. २०:८-१०) सैतान त्यांना बहकवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण काय करेल यावर जीवनाच्या पुस्तकात त्यांची नावं कायमची लिहिली जातील की नाही हे ठरेल. त्यांच्यापैकी काही जण आदाम आणि हव्वाप्रमाणे यहोवाच्या अधिकाराला नाकारतील. त्यांची संख्या सांगितलेली नाही. पण मग त्यांच्यासोबत काय होईल? प्रकटीकरण २०:१५ मध्ये म्हटलंय: “ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आढळलं नाही, त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.” याचा अर्थ या बंडखोर लोकांचा पूर्णपणे आणि कायमचा नाश केला जाईल. पण परिपूर्ण मानवांपैकी बहुतेक जण यशस्वीपणे या शेवटच्या परीक्षेला पार करतील. टेहळणी बुरूज२२.०९ २३-२४ ¶१५-१६

रविवार, १६ जून

जोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.​—प्रे. कार्यं १५:१.

पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्‍चनांचं असं म्हणणं होतं, की जे विदेशी लोक ख्रिस्ती बनले होते त्यांनी सुंता करणं गरजेचं आहे. यहूदी लोकांनी ख्रिश्‍चनांची टीका करू नये म्हणून कदाचित ते असं म्हणत असावेत. (गलती. ६:१२) प्रेषित पौल स्वतः या गोष्टीशी मुळीच सहमत नव्हता. पण आपल्याच मतावर अडून राहण्याऐवजी त्याने नम्रपणे हा विषय यरुशलेममधल्या प्रेषितांच्या आणि वडील जनांच्या समोर ठेवला. (प्रे. कार्यं १५:२) पौलने ज्या प्रकारे ही समस्या हाताळली त्यामुळे मंडळीत शांती आणि आनंद कसा टिकवून ठेवायचा हे भाऊबहिणींना शिकायला मिळालं. (प्रे. कार्यं १५:३०, ३१) आजसुद्धा मंडळीत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतभेद निर्माण होऊ शकतो. अशा वेळी मंडळीतली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ज्यांना मंडळीची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलं आहे त्यांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. सहसा अशा विषयांबद्दल बायबल काय म्हणतं हे आपल्या प्रकाशनांमध्ये आणि संघटनेने पुरवलेल्या लेखी मार्गदर्शनामध्ये दिलेलं असतं. जर आपण स्वतःचीच मतं पुढे करण्याऐवजी हे मार्गदर्शन स्वीकारलं तर मंडळीतली शांती आपल्याला टिकवून ठेवता येईल. टेहळणी बुरूज२२.०८ २२ ¶८-९

सोमवार, १७ जून

खरा मित्र नेहमी प्रेम करतो.​—नीति. १७:१७.

कधीकधी आपल्याला आपल्या जवळच्या मित्रासमोर आपलं मन मोकळं करावंसं वाटतं आणि त्याला मनातलं सगळं काही सांगावंसं वाटतं. पण असं करणं सगळ्यांसाठीच सोपं नसतं. आपल्या मनातले विचार इतरांसमोर बोलून दाखवणं काही जणांना कठीण जातं. आणि आपल्या मित्राने आपल्या खासगी गोष्टी इतरांना सांगितल्यात हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा तर आपल्याला धक्काच बसतो. पण तेच जेव्हा तो आपल्या खासगी गोष्टी गुप्त ठेवतो तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं! मंडळीतले वडील भरवशालायक असतात. ते ‘वाऱ्‍यापासून लपण्याची जागा, आणि वादळी पावसापासून मिळणाऱ्‍या आसऱ्‍यासारखे’ असतात. (यश. ३२:२) आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतो. आणि आपण त्यांना सांगितलेली माहिती ते इतर कोणाला सांगणार नाहीत याची आपल्याला खातरी असते. काही गोष्टी त्यांना गुप्त ठेवाव्या लागतात. त्यामुळे अशी माहिती त्यांच्याकडून काढून घ्यायचा आपण प्रयत्न करणार नाही. तसंच त्यांच्या पत्नींचीही आपण कदर करतो, कारण त्या आपल्या पतीकडून गोपनीय माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. खरंतर वडिलांच्या पत्नींना भाऊबहिणींबद्दल गुप्त गोष्टी माहीत नसणं ही त्यांच्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे. टेहळणी बुरूज२२.०९ ११ ¶१०-११

मंगळवार, १८ जून

मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा केला जाईल.​—स्तो. ४६:१०.

आपण ही खातरी बाळगू शकतो, की येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना नक्की वाचवेल. (मत्त. २४:२१; दानी. १२:१) जगभरातल्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर जेव्हा मागोगचा गोग, म्हणजे राष्ट्रांचा समूह क्रूर हल्ला करेल, तेव्हा हे घडेल. राष्ट्रांच्या या समूहात संयुक्‍त राष्ट्र संघाचे सगळे १९३ सदस्य जरी असले, तरी सर्वोच्च देवासमोर आणि त्याच्या स्वर्गातल्या सैन्यासमोर त्यांचा काहीच टिकाव लागणार नाही. यहोवा वचन देतो: “मी पुष्कळ राष्ट्रांसमोर स्वतःचा गौरव करीन, स्वतःला पवित्र करीन, आणि त्यांना दाखवून देईन की मी कोण आहे. तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.” (यहे. ३८:१४-१६, २३) मागोगचा गोग यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल तेव्हा हर्मगिदोनाच्या युद्धाची सुरुवात होईल. तेव्हा यहोवा ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांचा’ नाश करून टाकेल. (प्रकटी. १६:१४, १६; १९:१९-२१) पण “फक्‍त सरळ मनाचे लोक पृथ्वीवर राहतील आणि जे निर्दोष आहेत तेच तिच्यावर टिकून राहतील.”​—नीति. २:२१, तळटीप. टेहळणी बुरूज२२.१० १६-१७ ¶१६-१७

बुधवार, १९ जून

[देवाची] अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं.​—१ तीम. २:४.

आपण कोणाचं मन पाहू शकत नाही. फक्‍त ‘यहोवा हेतूंचं परीक्षण करू शकतो.’ (नीति. १६:२) वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या आणि संस्कृतीच्या लोकांवर त्याचं प्रेम आहे आणि आपणही आपली “मनं मोठी” करावीत असं त्याला वाटतं. (२ करिंथ. ६:१३) आपण आपल्या भाऊबहिणींचा न्याय करण्याऐवजी सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे. जे मंडळीचा भाग नाहीत अशा लोकांचासुद्धा न्याय करायचा अधिकार आपल्याला नाही. सत्यात नसलेल्या एखाद्या नातेवाईकाबद्दल, ‘तो कधीच सत्यात येणार नाही’ असं म्हणणं योग्य राहील का? नाही. असं म्हणणं त्याचा न्याय केल्यासारखं होईल. यावरून आपण गर्विष्ठ आहोत आणि स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजतो, असं दिसून येईल. आज यहोवा “सगळ्या लोकांना” पश्‍चात्ताप करायची संधी देतोय. (प्रे. कार्यं १७:३०) लक्षात ठेवा, जो स्वतःला इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजतो तो एका अर्थाने अनीतिमानच असतो. यहोवाच्या नीतिमान स्तरांवर प्रेम केल्यामुळे आपलं जीवन आनंदी होईल. तसंच लोक आपल्यावर प्रेम करतील आणि त्यांना यहोवाच्या जवळ यायलाही मदत होईल. टेहळणी बुरूज२२.०८ ३१ ¶२०-२२

गुरुवार, २० जून

त्यांना समजेल, की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा होता.​—यहे. २:५.

आपलं प्रचाराचं काम करत असताना लोक आपला विरोध करतील हे आपल्याला माहीतच आहे. आणि भविष्यात आपल्याला जास्त विरोधाचा सामना करावा लागू शकतो. (दानी. ११:४४; २ तीम. ३:१२; प्रकटी. १६:२१) पण असं असलं तरी यहोवा आपल्याला लागणारी सगळी मदत नक्की पुरवेल. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहोवाने त्याच्या सेवकांना आजपर्यंत नेहमीच मदत केली आहे; मग त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्‍या कितीही कठीण असल्या तरीही. बाबेलमधल्या यहुदी बंदिवानांना प्रचार करणाऱ्‍या यहेज्केल संदेष्ट्याचाच विचार करा. यहेज्केलला कशा प्रकारच्या लोकांना प्रचार करायचा होता? यहोवाने त्या लोकांबद्दल म्हटलं, की ते “मगरूर,” ‘कठोर मनाचे’ आणि “बंडखोर” आहेत. ते लोक इतके दुष्ट आणि क्रूर होते की यहोवाने त्यांची तुलना काट्या-कुट्यांशी आणि विंचवांशी केली. आणि म्हणूनच यहोवाने पुन्हा-पुन्हा यहेज्केलला सांगितलं: “भिऊ नकोस”! (यहे. २:३-६) यहेज्केलला अशा प्रकारच्या लोकांमध्ये प्रचाराचं काम करायचं होतं, तरीसुद्धा तो आपलं काम पूर्ण करू शकला. कारण (१) यहोवाने त्याला पाठवलं होतं, (२) देवाच्या पवित्र शक्‍तीमुळे त्याला ताकद मिळाली आणि (३) देवाच्या शब्दांमुळे त्याचा विश्‍वास मजबूत झाला. टेहळणी बुरूज२२.११ २ ¶१-२

शुक्रवार, २१ जून

ज्या दिवशी तू त्याचं फळ खाशील त्या दिवशी तू नक्की मरशील.​—उत्प. २:१७.

यहोवाने वनस्पती आणि प्राण्यांना अशा प्रकारे बनवलंय, की ते फक्‍त काही काळच जगू शकतात. पण फक्‍त मानवांनाच त्याने कायम जिवंत राहण्याच्या क्षमतेने बनवलंय. यहोवाने आपल्या मनात कायम जगण्याची इच्छा घातली आहे. बायबल सांगतं, की “त्याने माणसांना अनंतकाळाची जाणीव दिली आहे.” (उप. ३:११) म्हणूनच आपल्यापैकी कोणालाही मरावसं वाटत नाही आणि मृत्यू जणू आपला शत्रू आहे असं आपल्याला वाटतं. (१ करिंथ. १५:२६) विचार करा, आपण आजारी पडतो तेव्हा आपण तसंच शांत राहून मृत्यूची वाट पाहत बसतो का? नाही. उलट आपण डॉक्टरकडे जातो आणि औषधोपचार घेऊन त्या आजारातून बरं व्हायचा प्रयत्न करतो. जिवंत राहण्यासाठी जे काही करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करतो. तसंच आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा जेव्हा मृत्यू होतो, मग ती तरुण असो किंवा वयस्कर असो, आपल्याला खूप दुःख होतं आणि आपण दुःखात पूर्णपणे बुडून जातो. (योहा. ११:३२, ३३) आपण कायम जगावं अशी जर यहोवाची इच्छा नसती, तर त्याने तशी इच्छा आपल्या मनात घातलीच नसती आणि तशी क्षमताही आपल्याला दिली नसती. टेहळणी बुरूज२२.१२ ३ ¶५; ४ ¶७

शनिवार, २२ जून

संपूर्ण जगातले तुमचे बांधव अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.​—१ पेत्र ५:९.

या कठीण काळात आपले बरेचसे भाऊबहीण कदाचित आजारी असतील, घाबरले असतील किंवा त्यांना एकटं वाटत असेल. भाऊबहिणींच्या संपर्कात राहायचा नेहमी प्रयत्न करा. महामारीदरम्यान आपल्याला आपल्या भाऊबहिणींपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावं लागत असेल. अशा वेळी तुम्हाला कदाचित प्रेषित योहानसारखं वाटेल. त्याला गायसला प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. (३ योहा. १३, १४) पण परिस्थितीमुळे आपल्याला असं करता येणार नाही हे त्याला माहीत होतं. मग अशा वेळेस योहानने काय केलं? त्याने त्याला जे शक्य होतं ते केलं. त्याने गायसला पत्र लिहिलं. तुम्हालाही जेव्हा आपल्या भाऊबहिणींना प्रत्यक्ष भेटता येत नाही, तेव्हा तुम्ही इतर मार्गांनी त्यांच्या संपर्कात राहू शकता. तुम्ही भाऊबहिणींच्या संपर्कात राहाल तेव्हा तुम्हाला एकटं-एकटं वाटणार नाही, आणि अशा परिस्थितीत तुम्हाला शांत राहायला मदत होईल. पण तरीही तुम्हाला जास्त चिंता वाटत असेल, तर तुम्ही मंडळीतल्या वडिलांकडून मदत घेऊ शकता. ते तुम्हाला नक्की प्रोत्साहन देतील.​—यश. ३२:१, २. टेहळणी बुरूज२२.१२ १७-१८ ¶६-७

रविवार, २३ जून

योसेफच्या मालकाने त्याला धरून, राजाच्या कैद्यांना जिथे ठेवलं जायचं त्या तुरुंगात टाकलं.​—उत्प. ३९:२०.

बायबलमध्ये असंही म्हटलंय, की त्याच्या पायात बेड्या आणि गळ्यात लोखंडी साखळ्या घालण्यात आल्या होत्या. (स्तो. १०५:१७, १८) योसेफची परिस्थिती आता आणखीनच वाईट होत चालली होती. एकेकाळी भरवशाचा असलेला हा सेवक आता एक असाहाय्य कैदी बनला होता. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का, की तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत आहात आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रार्थना करता. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखीनच वाईट बनत जाते. असं होऊ शकतं, कारण सैतानाच्या या जगात आपल्यावर येणाऱ्‍या संकटांना आणि परीक्षांना यहोवा अडवत नाही. (१ योहा. ५:१९) पण एका गोष्टीची तुम्ही खातरी ठेवू शकता. ती म्हणजे, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची यहोवाला पूर्ण जाणीव आहे आणि त्याला तुमची काळजी आहे. (मत्त. १०:२९-३१; १ पेत्र ५:६, ७) इतकंच नाही तर त्याने आपल्याला असं वचनही दिलंय, की “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री १३:५) अगदी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर आहे असं आपल्याला वाटतं तेव्हासुद्धा यहोवा त्या परिस्थितीतून पार व्हायला आपल्याला मदत करतो. टेहळणी बुरूज२३.०१ १६ ¶७-८

सोमवार, २४ जून

देव मोठ्या मनाने क्षमा करेल.​—यश. ५५:७.

आपल्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा यहोवा आपल्याला सोडून देणार नाही अशी खातरी आपल्याला बायबलमधून मिळते. इस्राएली लोकांचाच विचार करा. त्यांनी यहोवाविरुद्ध वारंवार पाप केलं. पण जेव्हा त्यांनी मनापासून पश्‍चात्ताप केला, तेव्हा यहोवाने त्यांना क्षमा केली. देवाचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनासुद्धा माहीत होतं. त्या वेळी मंडळीतला एक जण गंभीर पाप करत होता. पण नंतर जेव्हा त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला, तेव्हा प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने त्यांना त्याला ‘क्षमा करून सांत्वन द्यायला’ सांगितलं. (२ करिंथ. २:६, ७; १ करिंथ. ५:१-५) आपल्या उपासकांच्या हातून जेव्हा चुका झाल्या तेव्हा यहोवाने त्यांना नाकारलं नाही. ही गोष्ट खरंच किती विशेष आहे! उलट त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे त्याने त्यांना मदत केली, त्यांना सुधारलं आणि त्यांना त्याच्यासोबत जवळची मैत्री करायला मदत केली. आजही जे आपल्या चुकांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप करतात त्यांना यहोवा क्षमा करायला तयार आहे. (याको. ४:८-१०) बायबलमधून आपल्याला कळतं की यहोवा किती बुद्धिमान आहे, न्यायी आहे आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. इतकंच नाही तर आपल्याला हेही कळतं, की आपण यहोवाला जाणून घ्यावं आणि त्याच्याशी मैत्री करावी अशी त्याची इच्छा आहे. टेहळणी बुरूज२३.०२ ७ ¶१६-१७

मंगळवार, २५ जून

या वचनाकडे तुम्ही लक्ष देत आहात हे चांगलं आहे.​—२ पेत्र १:१९.

जगभरात सध्या ज्या घटना घडत आहेत त्यांमुळे बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत हे पाहायची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. कारण येशूने अशा काही विशिष्ट घटना सांगितल्या होत्या ज्यांमुळे या दुष्ट जगाचा अंत जवळ आलाय हे ओळखायला आपल्याला मदत होणार होती. (मत्त. २४:३-१४) तसंच, आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी प्रेषित पेत्रनेसुद्धा आपल्याला बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत याकडे लक्ष द्यायचं प्रोत्साहन दिलं. (२ पेत्र १:२०, २१) बायबलच्या भविष्यवाण्यांवर विचार करताना योग्य दृष्टिकोन ठेवायला तो आपल्याला मदत करतो. तो आपल्याला ‘यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवायचा’ सल्ला देतो. (२ पेत्र ३:११-१३) तो कशासाठी? हर्मगिदोन नेमकं कोणत्या ‘दिवशी’ आणि कोणत्या ‘वेळी’ येईल हे माहीत करून घेण्यासाठी नाही, तर उरलेल्या वेळेचा उपयोग आपली ‘वागणूक पवित्र ठेवण्यासाठी आणि देवाच्या भक्‍तीची कार्यं करण्यासाठी’ आपल्याला करायचा आहे. (मत्त. २४:३६; लूक १२:४०) आपल्याला आपलं आचरण चांगलं ठेवायची आणि यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो ते त्याच्यावरच्या प्रेमापोटी करायची आपली इच्छा आहे. आणि हे करण्यासाठी आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०२ १६ ¶४, ६

बुधवार, २६ जून

माझी दुसरीही मेंढरं आहेत. मला त्यांनाही आणलं पाहिजे.​—योहा. १०:१६.

नंदनवनात राहायला योग्य ठरण्यासाठी दुसऱ्‍या मेंढरातल्या लोकांनी आत्तापासूनच काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आपल्याला येशूबद्दल कदर दाखवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, अभिषिक्‍त भावांसोबत आपण ज्या प्रकारे वागतो त्यावरून येशूबद्दल असलेलं आपलं प्रेम आपण दाखवतो. आणि याच आधारावर मेंढरांचा न्याय केला जाईल असं येशूने सांगितलं होतं. (मत्त. २५:३१-४०) आपण प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात उत्साहाने सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा देऊ शकतो. (मत्त. २८:१८-२०) यहोवाला नंदनवनात ज्याप्रकारचे लोक हवेत तशी व्यक्‍ती बनण्यासाठी आपल्याला नंदनवन येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. आपण आतापासूनच काही चांगले गुण आपल्यामध्ये वाढवू शकतो. जसं की, आपण आपल्या वागण्या-बोलण्यात नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू शकतो. तसंच आपण सगळ्या बाबतीत संयम बाळगण्याचा प्रयत्न करू शकतो. यासोबतच आपण यहोवाला, आपल्या विवाहसोबत्याला आणि आपल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ राहिलं पाहिजे. या दुष्ट जगात राहत असताना, देवाच्या स्तरांप्रमाणे जगायचा जितका जास्त आपण प्रयत्न करू तितकं जास्त आपल्याला नंदनवनातही त्याप्रमाणे जगायला सोपं जाईल. शिवाय त्या नवीन जगात उपयोगी पडतील अशी कौशल्य आणि गुण वाढवायचा प्रयत्न आपण आत्तापासूनच करू शकतो. यावरून दिसून येईल की आपण त्या नवीन जगात राहायला उत्सुक आहोत आणि तयारी करत आहोत. टेहळणी बुरूज२२.१२ ११-१२ ¶१४-१६

गुरुवार, २७ जून

ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल.​—योहा. १४:२१.

येशूवर प्रेम करण्याचं आणखी एक कारण म्हणजे, तो आपला राजा आहे. आणि त्याच्यासारखा दुसरा राजा आपल्याला मिळूच शकला नसता. कारण स्वतः यहोवा देवाने त्याला शिकवलंय आणि त्याला राज्य करायला नेमलंय. (यश. ५०:४, ५) तसंच येशूने नेहमी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्‍यांचा विचार केला. (योहा. १३:१) त्यामुळे आपण सगळ्यांनी येशूवर मनापासून प्रेम केलं पाहिजे. त्याने सांगितलं की ज्यांचं त्याच्यावर प्रेम आहे आणि जे त्याचे मित्र आहेत, ते त्याची आज्ञा पाळून त्याच्यावरचं प्रेम दाखवतात. (योहा. १४:१५; १५:१४, १५) खरंच, यहोवाच्या मुलाचा मित्र असणं किती अभिमानाची गोष्ट आहे! येशू नम्र आहे आणि अगदी आपल्या पित्यासारखा आहे हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे. बायबलमधून तुम्ही शिकलात, की त्याने कसं भुकेल्यांना जेवू घातलं, निराश झालेल्यांना दिलासा दिला, एवढंच नाही तर आजाऱ्‍यांना बरंसुद्धा केलं. (मत्त. १४:१४-२१) आणि आज तो मंडळीचं कसं नेतृत्व करतोय, हेही तुम्ही पाहत आहात. (मत्त. २३:१०) तसंच, तुम्हाला हेसुद्धा माहीत आहे, की देवाच्या राज्याचा राजा या नात्याने तो पुढेही आपल्यासाठी यांहून मोठ्या बऱ्‍याच गोष्टी करणार आहे. मग तुम्ही त्याच्यावरचं आपलं प्रेम कसं दाखवू शकता? त्याच्यासारखं वागून! आणि त्याच्यासारखं वागण्याचा एक मार्ग म्हणजे, यहोवाला आपलं जीवन समर्पित करणं आणि बाप्तिस्मा घेणं. टेहळणी बुरूज२३.०३ ४ ¶८, १०

शुक्रवार, २८ जून

आपले डोळे वर करा आणि आकाशाकडे बघा. या सगळ्या ताऱ्‍यांना कोणी बनवलं?​—यश. ४०:२६.

यहोवाने फक्‍त आकाशच नाही, तर सबंध पृथ्वीला आणि समुद्राला अनेक आश्‍चर्यकारक गोष्टींनी भरून टाकलंय. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला मिळतं. (स्तो. १०४:२४, २५) तसंच यहोवाने आपल्याला कशा प्रकारे बनवलंय याचाही विचार करा. निसर्गातल्या गोष्टींमध्ये लपलेली सुंदरता ओळखून तिचा आनंद घेण्याची क्षमता त्याने आपल्याला दिली आहे. शिवाय पाहण्याची, ऐकण्याची, स्पर्श करण्याची, चव घेण्याची आणि गंध ओळखण्याची क्षमता वापरून निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याची कुवतसुद्धा त्याने आपल्याला दिली आहे. आपण सृष्टीचं निरीक्षण का केलं पाहिजे याचं आणखी एक कारण बायबलमध्ये सांगितलंय. ते म्हणजे, सृष्टीतून आपल्याला यहोवाच्या गुणांबद्दल शिकायला मिळतं. (रोम. १:२०) उदाहरणार्थ, सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं दिसून येईल, की त्यांची रचना अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे. त्यातून यहोवाची बुद्धी दिसून येते. तसंच खाण्यासाठी यहोवाने किती वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या आहेत याचाही विचार करा. यावरून मानवांवर त्याचं किती प्रेम आहे हे दिसून येतं. जेव्हा आपण यहोवाने बनवलेल्या गोष्टींमधून त्याचं व्यक्‍तिमत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू लागतो आणि त्याच्या आणखी जवळ जातो. टेहळणी बुरूज२३.०३ १६ ¶४-५

शनिवार, २९ जून

तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत.​—स्तो. ११९:१६०.

आज जगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे देवाच्या वचनावरचा भरवसा टिकवून ठेवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. लोक कदाचित आपल्या मनात बायबल खरंच सत्य आहे का, तसंच देवाने आपल्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी खरंच विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नियुक्‍त केलं आहे का याबद्दल शंका निर्माण करतील. पण देवाचं वचन सत्य आहे अशी जर आपली खातरी असेल तर आपल्या विश्‍वासावर होणाऱ्‍या अशा हल्ल्यांचा आपण विरोध करू शकतो. उलट आपण असं म्हणू, की “मी [यहोवाच्या] कायद्यांचं नेहमी, अगदी शेवटपर्यंत पालन करण्याचा निश्‍चय केलाय.” (स्तो. ११९:११२) इतरांना बायबलच्या सत्याबद्दल सांगायला आणि मदत करायला आपल्याला “लाज वाटणार नाही.” (स्तो. ११९:४६) उलट आपला छळ झाला आणि आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी “आनंदाने धीर” धरून आपल्याला ती सहन करता येईल. (कलस्सै. १:११; स्तो. ११९:१४३, १५७) सत्य आपल्याला स्थिर ठेवतं आणि या सत्यामुळेच आपल्या जीवनाला एक निश्‍चित ध्येय आणि दिशा मिळते. देवाच्या राज्याच्या अधिकाराखाली एक चांगलं भविष्य मिळवायची आशाही आपल्याला मिळते. टेहळणी बुरूज२३.०१ ७ ¶१६-१७

रविवार, ३० जून

मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.​—योहा. १३:३४.

येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या शिष्यांसाठी बराच वेळ प्रार्थना केली. त्याने आपल्या पित्याला अशी विनंती केली, की “त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ.” (योहा. १७:१५) खरंच येशूचं त्याच्या शिष्यांवर किती प्रेम होतं! काही वेळातच तो स्वतः एका कठीण परीक्षेचा सामना करणार होता. पण त्या वेळीही त्याला आपल्या प्रेषितांची काळजी लागलेली होती. येशूसारखंच प्रार्थना करताना आपणसुद्धा फक्‍त आपल्याच गरजांचा विचार करत नाही. उलट आपण आपल्या भाऊबहिणींसाठीही नेहमी प्रार्थना करतो. असं करून आपण दाखवतो, की येशूने एकमेकांवर प्रेम करण्याबद्दल जी आज्ञा दिली तिचं आपण पालन करतो. तसंच, आपल्या भाऊबहिणींवर आपलं किती प्रेम आहे, हेसुद्धा आपण यहोवाला दाखवतो. पण आपल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना केल्यामुळे खरंच काही फायदा होतो का? हो नक्कीच होतो. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं, “नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.” (याको. ५:१६) आपल्या भाऊबहिणींना बऱ्‍याच कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०७ २३-२४ ¶१३-१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा