मार्च
शुक्रवार, १ मार्च
तुम्ही बढाई का मारता?—१ करिंथ. ४:७.
प्रेषित पेत्रने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला, की त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा त्यांनी इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयोग करावा. त्याने म्हटलं, की आपण “देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत. त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात दान मिळालं आहे, त्याप्रमाणे त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावं.” (१ पेत्र ४:१०) याचाच अर्थ, आपल्याजवळ असलेल्या कौशल्यांचा किंवा क्षमतांचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे. आपण असा विचार करू नये की आपण असं केलं तर इतर लोक आपल्यावर जळतील किंवा त्यामुळे निराश होतील. आपण त्यांबद्दल बढाई मारणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. (१ करिंथ. ४:६) आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याजवळ ज्या काही क्षमता आहेत त्या आपल्याला यहोवानेच दिल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांचा उपयोग लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे म्हणून नाही, तर मंडळीला प्रोत्साहन मिळेल यासाठी केला पाहिजे. (फिलिप्पै. २:३) अशा प्रकारे आपण आपल्या क्षमतांचा उपयोग यहोवाच्या कामासाठी केला तर आपण नक्कीच आनंदी होऊ. कारण आपण तसं इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर यहोवाची स्तुती करण्यासाठी करतो. टेहळणी बुरूज२२.०४ ११-१२ ¶७-९
शनिवार, २ मार्च
तुझ्या नियमशास्त्रातल्या सुंदर गोष्टी स्पष्टपणे दिसाव्यात, म्हणून माझे डोळे उघड.—स्तो. ११९:१८.
शास्त्रवचनांवर येशूचं जिवापाड प्रेम होतं. त्याबद्दल त्याला कसं वाटेल हे स्तोत्र ४०:८ मध्ये आधीच सांगितलं होतं. तिथे म्हटलंय: “तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो आणि तुझं नियमशास्त्र माझ्या हृदयावर लिहिलेलं आहे.” शास्त्रवचनांवर येशूचं प्रेम असल्यामुळे तो आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकला. आपण जर देवाचं वचन वाचलं आणि त्यावर मनापासून प्रेम केलं, तर आपणही आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकतो. (स्तो. १:१-३) देवाचं वचन समजून घेण्याच्या बाबतीत येशूने जे म्हटलं आणि त्या बाबतीत त्याने स्वतःचं जे उदाहरण मांडलं ते लक्षात घेऊन आपणही बायबल वाचण्याची आपली कौशल्यं वाढवत राहू या. बायबलमधले अहवाल समजून घेण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, हळूहळू वाचलं पाहिजे, स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टी थोडक्यात लिहून काढल्या पाहिजेत. तसंच, समजबुद्धीचा वापर करून आपण वाचलेल्या माहितीचं बारकाईने परीक्षण करू शकतो. आणि त्यासाठी बायबल आधारित प्रकाशनांची मदतही घेऊ शकतो. तसंच, वाचत असताना आपण योग्य मनोवृत्ती ठेवून वाचू शकतो आणि त्याप्रमाणे चालू शकतो. अशा प्रकारे जर आपण बायबल वाचायचा प्रयत्न केला तर त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल आणि यहोवासोबतचं आपलं नातंही घट्ट होईल.—स्तो. ११९:१७; याको. ४:८. टेहळणी बुरूज२३.०२ १३ ¶१५-१६
रविवार, ३ मार्च
मेहनत करणाऱ्यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात.—नीति. २१:५.
विशिष्ट ध्येय ठेवा. मग त्यावर काम करण्यासाठी व्यावहारिक पावलं उचला. तुम्हाला जर शिकवण्याचं कौशल्य वाढवायचं असेल, तर वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा या माहितीपत्रकाचा तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे. आठवड्यादरम्यानच्या सभेत तुम्हाला जर एखादा भाग मिळाला असेल, तर आधीच एखाद्या अनुभवी बांधवाला तो ऐकवा. आणि त्यामध्ये कुठे सुधारणा करता येईल ते त्याला विचारा. अशा प्रकारे तुम्ही जर आधीपासूनच चांगली केली, तर तुम्ही मेहनत घेत आहात आणि भरवशालायक आहात हे इतरांना दिसून येईल (२ करिंथ. ८:२२) तुम्ही जे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुम्हाला कठीण वाटत असेल तर काय? हार मानू नका आणि त्यावर काम करत राहा! तीमथ्य एक प्रभावी वक्ता किंवा एक उत्कृष्ट शिक्षक बनला का? बायबल याबद्दल काही सांगत नाही. पण पौलचा सल्ला मानल्यामुळे तीमथ्य आपल्या जबाबदाऱ्या नक्कीच आणखी चांगल्या प्रकारे पार पाडू शकला असेल यात काही शंका नाही.—२ तीम. ३:१०. टेहळणी बुरूज२२.०४ २४-२५ ¶८-११
सोमवार, ४ मार्च
एक जंगली पशू समुद्रातून वर येताना मला दिसला. त्याला दहा शिंगं आणि सात डोकी होती.—प्रकटी. १३:१.
सात डोकी असलेला जंगली पशू कोणाला सूचित करतो? हा जंगली पशू चित्त्यासारखा होता. पण त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे आणि तोंड सिंहाच्या तोंडासारखं होतं आणि त्याला दहा शिंगं होती. दानीएलच्या सातव्या अध्यायात उल्लेख केलेल्या चार प्राण्यांमध्येही आपल्याला ही सगळी वैशिष्ट्यं पाहायला मिळतात. पण प्रकटीकरणाच्या पुस्तकात ही सगळी वैशिष्ट्यं चार वेगवेगळ्या पशूंमध्ये नाही तर एकाच पशूमध्ये दिसून येतात. हा पशू कोणत्याही एका सरकारला किंवा जागतिक साम्राज्याला सूचित करत नाही. त्याच्याबद्दल असं सांगितलं आहे, की तो “प्रत्येक वंश, लोक, भाषा आणि राष्ट्र” यांच्यावर राज्य करतो. याचा अर्थ कोणत्याही एका देशाच्या सरकारापेक्षा त्याच्याकडे जास्त सत्ता आणि अधिकार आहे. (प्रकटी. १३:७) यावरून आपल्याला कळतं, की हा जंगली पशू आजपर्यंतच्या इतिहासात मानवजातीवर अधिकार गाजवलेल्या सगळ्या राजकीय सत्तांना सूचित करतो. (उप. ८:९) याचा आणखी एक पुरावा म्हणजे बायबलमध्ये बऱ्याचदा दहा ही संख्या पूर्णतेला सूचित करण्यासाठी वापरण्यात आली आहे. टेहळणी बुरूज२२.०५ ९ ¶६
मंगळवार, ५ मार्च
तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही—प्रकटी. २१:४.
या सुंदर तरतुदींचा फायदा कोणाकोणाला घेता येईल? सर्वात आधी हर्मगिदोनातून बचावलेल्या मोठया लोकसमुदायाला तसंच नवीन जगात जन्माला आलेल्या लहान मुलांनाही यांचा फायदा होईल. पण प्रकटीकरणाच्या २० व्या अध्यायात असंही म्हटलं आहे, की मेलेल्यांचं पुनरुत्थान होईल. (प्रकटी. २०:११-१३) ज्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत देवाची विश्वासूपणे सेवा केली अशा “नीतिमान” लोकांचं पुनरुत्थान होईल. तसंच, ज्यांना यहोवाबद्दल शिकून घेण्याची संधी मिळाली नाही, अशा “अनीतिमान” लोकांचंही पुनरुत्थान होईल. (प्रे. कार्यं २४:१५; योहा. ५:२८, २९) पण याचा अर्थ हजार वर्षांच्या काळात सगळ्यांचंच पुनरुत्थान होईल का? नाही. यहोवाची सेवा करायची संधी मिळूनही ज्या दुष्ट लोकांनी ती नाकारली, त्यांना पुन्हा उठवलं जाणार नाही. त्यांना संधी मिळाली होती, पण त्यांनी दाखवून दिलं की पृथ्वीवरच्या नंदनवनात कायमचं जीवन जगायच्या ते लायक नाहीत.—मत्त. २५:४६; २ थेस्सलनी. १:९; प्रकटी. १७:८; २०:१५. टेहळणी बुरूज२२.०५ १८ ¶१६-१७
बुधवार, ६ मार्च
आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.—योहा. ६:६८.
संपूर्ण पृथ्वीवर खरी उपासना केली जावी म्हणून येशूने ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ एक उल्लेखनीय संघटना तयार केली आहे. (मत्त. २४:४५) या संघटनेबद्दल तुम्हाला कसं वाटतं? कदाचित तुमच्याही भावना प्रेषित पेत्रसारख्या असतील. त्याने येशूला आजच्या वचनातले शब्द म्हटले. खरंच, यहोवाच्या संघटनेबद्दल आपल्याला कळलं नसतं तर आज आपण कुठे असतो? या संघटनेद्वारे आज ख्रिस्त आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्न पुरवत आहे. तसंच, तो आपलं सेवाकार्य चांगल्या प्रकारे पार पाडायला आवश्यक असलेलं प्रशिक्षण देत आहे. यासोबतच, आपल्याला यहोवाचं मन आनंदित करता यावं म्हणून “नवीन व्यक्तिमत्त्व” विकसित करण्यासाठीसुद्धा तो आपल्याला मदत करत आहे. (इफिस. ४:२४) संकटाच्या काळात येशू आपल्याला योग्य मार्गदर्शन देतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोविड महामारीच्या काळात आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन. या मार्गदर्शनामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा झाला. या महामारीचा कसा सामना करावा याबद्दल जगभरात गोंधळ माजला होता. पण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी येशूने आपल्याला त्याच्या संघटनेद्वारे स्पष्ट सूचना पुरवल्या. टेहळणी बुरूज२२.०७ १२ ¶१३-१४
गुरुवार, ७ मार्च
कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.—फिलिप्पै. १:१०.
यहोवाने इस्राएली लोकांना आज्ञा दिली होती की त्यांनी आपल्या मुलांना नेहमी यहोवाबद्दल शिकवावं. (अनु. ६:६, ७) त्या काळात आईवडिलांजवळ मुलांशी बोलण्यासाठी आणि त्यांच्या मनात यहोवाचं प्रेम रुजवण्यासाठी दिवसभरात बऱ्याच संधी असायच्या. उदाहरणार्थ, शेतात पेरणी करण्यासाठी किंवा कापणी करण्यासाठी मुलं बरेच तास आपल्या वडिलांसोबत मिळून काम करायची. तसंच, मुलीसुद्धा बराच वेळ आपल्या आईसोबत मिळून विणकाम, शिवणकाम आणि घरातली इतर कामं करायच्या. आईवडील आणि मुलं सोबत मिळून काम करायची तेव्हा त्यांना बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर एकमेकांसोबत बोलायची संधी मिळायची. जसं की, यहोवाच्या चांगुलपणाबद्दल, दयाळूपणाबद्दल आणि तो आपल्या कुटुंबाला कशी मदत करतो याबद्दल ते एकमेकांशी बोलायचे. बऱ्याच देशांमध्ये आईवडिलांना आणि मुलांना दिवसभरात एकमेकांसोबत वेळ घालवणं शक्य होत नाही. कारण आईवडील कामाला तर मुलं शाळेला जातात. म्हणूनच आईवडिलांनी आपल्या मुलांशी बोलण्यासाठी संधी शोधणं खूप गरजेचं आहे.—इफिस. ५:१५, १६. टेहळणी बुरूज२२.०५ २८ ¶१०-११
शुक्रवार, ८ मार्च
अनीतिमान माणसं देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का?—१ करिंथ. ६:९.
गंभीर पापांमुळे देवाच्या नियमांचा घोर अपमान होतो. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या हातून जर असं गंभीर पाप घडलं तर त्याने यहोवाकडे ते कबूल केलं पाहिजे आणि मंडळीतल्या वडिलांना जाऊन सांगितलं पाहिजे. (स्तो. ३२:५; याको. ५:१४) वडिलांकडे जाणं का गरजेचं आहे? हे खरंय, की फक्त यहोवाच ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा करू शकतो. पण पाप करणाऱ्या व्यक्तीला मंडळीत राहू द्यायचं की नाही हे बायबल तत्त्वांच्या आधारावर ठरवायची जबाबदारी यहोवाने वडिलांवर सोपवली आहे. (१ करिंथ. ५:१२) कोणताही निर्णय घेण्याआधी वडील काही प्रश्नांवर विचार करतात. जसं की, पाप करणाऱ्याने ते जाणूनबुजून केलंय का? त्याने ते ठरवून केलंय का? इतरांपासून लपवून ठेवायचा त्याने प्रयत्न केला का? बऱ्याच काळापासून तो ते पाप करत होता का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याला मनापासून पश्चात्ताप झालाय हे दिसून येतंय का? आणि यहोवाने त्याला माफ केलंय याची काही चिन्ह दिसतात का?—प्रे. कार्यं ३:१९. टेहळणी बुरूज२२.०६ ९ ¶४
शनिवार, ९ मार्च
खरेपणाची आवड धरा.—जख. ८:१९.
येशूनेसुद्धा त्याच्या शिष्यांना नीतीने चालायला सांगितलं. (मत्त. ५:६) यासाठी एखाद्याकडे योग्य, चांगलं आणि देवाच्या नजरेत शुद्ध ते करण्याची जबरदस्त इच्छा असली पाहिजे. तुम्हालासुद्धा नीतीने आणि खरेपणाने चालायला आवडतं का? नक्कीच आवडत असेल. तसंच, तुम्हाला खोटेपणा आणि दुष्टपणा अजिबात आवडत नसेल. (स्तो. ११९:१२८, १६३) जो खोटं बोलतो तो या जगाच्या शासकाप्रमाणे, म्हणजे सैतानाप्रमाणे वागतो. (योहा. ८:४४; १२:३१) कारण एदेन बागेत झालेल्या बंडापासूनच सैतान देवाबद्दल खोटं पसरवत आलाय. खरंतर यहोवाचं पवित्र नाव बदनाम करणं हासुद्धा सैतानाचा एक हेतू आहे. तो लोकांना असं मानायला लावतो, की यहोवा प्रामाणिक नाही, तो एक स्वार्थी शासक आहे आणि लोकांपासून चांगलं ते राखून ठेवतो. (उत्प. ३:१, ४, ५) त्यामुळे लोक देवाबद्दल खूप चुकीचा विचार करतात. म्हणून माणसं जेव्हा ‘खरेपणाची आवड धरत’ नाहीत, तेव्हा सैतान त्यांना सर्व प्रकारच्या अनीतीच्या आणि दुष्टपणाच्या जाळ्यात अडकवतो.—रोम. १:२५-३१. टेहळणी बुरूज२३.०३ २ ¶३
रविवार, १० मार्च
यहोवाचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.—स्तो. १००:५.
तुम्ही एखादी वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करत असाल, पण कधीकधी तीच गोष्ट तुमच्याकडून पुन्हा होत असेल. किंवा मग, तुम्हाला तुमचं ध्येय अजूनही गाठता आलेलं नाही म्हणून तुम्ही निराश होत असाल, तुमची चीडचीडही होत असेल. मग अशा वेळी धीर धरायला तुम्हाला कशामुळे मदत होईल? यहोवावरचं प्रेम तुम्हाला मदत करेल. यहोवावरचं प्रेम ही तुमच्याकडे असलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. (नीति. ३:३-६) हे प्रेम तुम्हाला जीवनातल्या कोणत्याही समस्येचा यशस्वीपणे सामना करायचं बळ देऊ शकतं. बायबलमध्ये यहोवाने त्याच्या सेवकांना दाखवलेल्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपल्याला बऱ्याचदा वाचायला मिळतं. यहोवा जेव्हा त्याच्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतो, तेव्हा तो त्यांना कधीच सोडत नाही; तो कायम त्यांच्यासोबत असतो. त्याने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपात बनवलंय, त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारचं प्रेम दाखवू शकता. (उत्प. १:२६) मग तुम्हाला ते कसं दाखवता येईल? सगळ्यात आधी यहोवाचे आभार माना. (१ थेस्सलनी. ५:१८) ‘यहोवाने मला प्रेम कसं दाखवलंय,’ याचा दररोज विचार करा. मग त्याने तुमच्यासाठी केलेल्या काही विशिष्ट गोष्टींसाठी त्याचे आभार मानायला विसरू नका. यहोवाने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत, त्या खास तुमच्यासाठी केल्या आहेत हे ओळखा. टेहळणी बुरूज२३.०३ १२ ¶१७-१९
सोमवार, ११ मार्च
माणसाच्या मनात काय आहे हे येशू ओळखू शकत होता.—योहा २:२५.
येशू आपल्या सगळ्याच शिष्यांशी खूप प्रेमाने आणि धीराने वागला. यावरून आपण काय शिकतो? हेच की, इतर जण कसं वागतात हे महत्त्वाचं असलं, तरी त्यांच्या चुका आणि कमतरता पाहून आपण त्यांच्याशी कसं वागतो हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या भावामुळे किंवा बहिणीमुळे आपलं मन दुखावलं असेल तर आपण स्वतःला विचारू शकतो: ‘तो ज्या प्रकारे वागला त्याचा मी स्वतःला इतका त्रास का करून घेतो? माझ्यातच काहीतरी कमी आहे का, आणि मला स्वतःला त्यावर काम करायची गरज आहे का? ज्या भावाने किंवा बहिणीने माझं मन दुखावलंय ती एखाद्या वाईट परिस्थितीतून चालली आहे का? रागवण्याचं योग्य कारण असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून मला निःस्वार्थ प्रेम कसं दाखवता येईल?’ आपण जितकं जास्त इतरांशी प्रेमाने वागू तितकं जास्त दिसून येईल की आपण येशूचे खरे शिष्य आहोत. येशूच्या उदाहरणातून आपण हेही शिकतो, की आपण आपल्या भाऊबहिणींना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २०:५) हे खरंय की आपण येशूसारखं इतरांची मनं ओळखू शकत नाही. पण आपले भाऊबहीण आपल्याला दुखावतात तेव्हा आपण त्यांच्याशी धीराने वागू शकतो. (इफिस. ४:१, २; १ पेत्र ३:८) आपण जर त्यांना जवळून ओळखायचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी धीराने वागायला आपल्याला सोपं जाईल. टेहळणी बुरूज२३.०३ ३० ¶१४-१६
मंगळवार, १२ मार्च
तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे.—लूक २०:३८.
आपण गंभीर आजाराचा सामना करत असतो, तेव्हा सैतान या परिस्थितीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो. आपण विश्वासाशी तडजोड करावी अशी त्याची इच्छा असते. अशा वेळी डॉक्टर किंवा सत्यात नसलेले आपले नातेवाईक आपल्यावर रक्त घेऊन देवाची आज्ञा मोडायचा दबाव टाकू शकतात. किंवा ते अशी एखादी उपचार पद्धत निवडायचा आपल्यावर दबाव टाकतील, जी बायबल तत्त्वांच्या विरोधात आहे. आपल्यापैकी कोणाचीही मरायची इच्छा नाही. पण काही कारणांमुळे जरी आपल्याला मृत्यू आला, तरी यहोवा आपल्यावर प्रेम करायचं सोडणार नाही हे आपल्याला माहीत आहे. (रोम. ८:३७-३९) जेव्हा यहोवाचे विश्वासू सेवक मरतात, तेव्हा यहोवा त्यांना आठवणीत ठेवतो. ते जणू यहोवासाठी जिवंतच असतात. (लूक २०:३७) आणि त्यांना पुन्हा उठवण्यासाठी तो आतुर असतो. (ईयो. १४:१५) आपल्याला “सर्वकाळाचं जीवन मिळावं” म्हणून यहोवाने खूप मोठी किंमत मोजली आहे. (योहा. ३:१६) यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि तो आपली किती काळजी करतो, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून जेव्हा आपण खूप आजारी असतो किंवा आपल्याला ठार मारायची धमकी दिली जाते, तेव्हा यहोवाला सोडून देण्याऐवजी आपण सांत्वन, बुद्धी आणि शक्तीसाठी त्याच्याकडे वळलं पाहिजे.—स्तो. ४१:३. टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१६-१७
बुधवार, १३ मार्च
खरी बुद्धी रस्त्यावर हाक मारते.—नीति. १:२०.
बायबल म्हणतं: “यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे, आणि परमपवित्र देवाचं ज्ञान हीच समजशक्ती आहे.” (नीति. ९:१०) त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण ‘परमपवित्र देवाच्या ज्ञानाच्या’ आधारावर, म्हणजे यहोवाचे विचार लक्षात घेऊन ते घेतले पाहिजेत. आपल्याला हे कसं करता येईल? त्यासाठी आपण बायबलचा आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास करू शकतो. असं करून आपण खरी बुद्धी दाखवत असतो. (नीति. २:५-७) फक्त यहोवाच आपल्याला खरी बुद्धी देऊ शकतो. (रोम. १६:२७) असं का म्हणता येईल? पहिलं कारण म्हणजे, तो आपला निर्माणकर्ता आहे आणि त्याने जे काही निर्माण केलंय त्याबद्दल त्याला अमर्याद ज्ञान आहे. (स्तो. १०४:२४) दुसरं कारण म्हणजे, तो जे काही करतो त्यातून त्याची अफाट बुद्धी दिसून येते. (रोम. ११:३३) आणि तिसरं कारण म्हणजे, जे त्याच्या सुज्ञ सल्ल्यांप्रमाणे चालतात त्यांना नेहमी फायदाच होतो. (नीति. २:१०-१२) आपल्याला जर खरी बुद्धी मिळवायची असेल, तर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. आणि कोणतेही निर्णय घेताना किंवा कोणतंही काम करताना आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. टेहळणी बुरूज२२.१० १९ ¶३-४
गुरुवार, १४ मार्च
स्वर्गात युद्ध सुरू झालं: मीखाएल आणि त्याचे दूत अजगराविरुद्ध लढले आणि अजगर आणि त्याचे दूतही लढले. पण, त्यांचं काही चाललं नाही आणि त्यापुढे स्वर्गात त्यांच्यासाठी कोणतंही स्थान उरलं नाही.—प्रकटी. १२:७, ८.
प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, सैतान या युद्धात हरला. आणि त्यानंतर त्याला आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना पृथ्वीवर फेकून देण्यात आलं. यामुळे सैतान खूप क्रोधित झाला आणि त्याने आपला सगळा राग मानवजातीवर काढायला सुरवात केली. आणि म्हणून ‘पृथ्वीवर मोठी विपत्ती ओढवली.’ (प्रकटी. १२:९-१२) या भविष्यवाण्यांमुळे आपल्याला कसा फायदा होतो? जागतिक घडामोडी आणि लोकांच्या प्रवृत्तीत जो बदल झालाय, त्यामुळे आपल्याला हे समजायला मदत होते की येशू राजा बनलाय. त्यामुळे जेव्हा आपण लोकांना स्वार्थीपणे किंवा क्रूरपणे वागताना पाहतो, तेव्हा निराश होण्याऐवजी आपण हे आठवणीत ठेवू शकतो की खरंतर यामुळे बायबलमधली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. खरंच, देवाचं राज्य सुरू झालंय यात काहीही शंका नाही! (स्तो. ३७:१) आणि जसजसं हर्मगिदोन जवळ येईल, तसतशी जगातली ही वाईट परिस्थिती आणखीनच वाढत जाईल. (मार्क १३:८; २ तीम. ३:१३) या सगळ्या भयानक घटना आज का घडत आहेत हे समजून घ्यायला आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने आपल्याला मदत केली आहे यासाठी खरंच आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत! टेहळणी बुरूज२२.०७ ३-४ ¶७-८
शुक्रवार, १५ मार्च
नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.—याको. ५:१६.
यहोवाने आपल्या भाऊबहिणींना आजारपण, नैसर्गिक विपत्ती, युद्ध, छळ आणि अशा इतर बऱ्याच समस्यांमध्ये टिकून राहण्यासाठी मदत करावी म्हणून आपण त्याला विनंती केली पाहिजे. अशा संकटांचा सामना करत असलेल्या काही भाऊबहिणींना तुम्ही ओळखता का? मग यहोवाला प्रार्थना करताना तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना मदत करायची विनंती त्याला करू शकता. जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो, तेव्हा आपण दाखवतो की आपण मनापासून आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो. तसंच जे भाऊबहीण बराच त्याग करून संकटात सापडलेल्यांना मदत करतात त्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करू शकतो. मंडळीत पुढाकार घेणाऱ्या भावांसाठीसुद्धा आपण प्रार्थना केली पाहिजे. या प्रार्थनांची ते खूप कदर करतात. आणि या प्रार्थनांमुळे त्यांना मदत होते. प्रेषित पौललाही भाऊबहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनांची कदर होती. त्याने असं लिहिलं: “माझ्यासाठीही अशी प्रार्थना करा, की मी बोलण्यासाठी तोंड उघडेन तेव्हा मला शब्द सुचावेत; म्हणजे, आनंदाच्या संदेशाचं पवित्र रहस्य जाहीर करण्यासाठी मी धैर्याने बोलू शकेन.” (इफिस. ६:१९) आजही आपल्यामध्ये बरेच पुढाकार घेणारे भाऊ आहेत. आणि ते आपल्यासाठी खूप मेहनत घेतात. यहोवाने त्यांच्या कामावर आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करून आपण त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम दाखवून दिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०७ २३-२४ ¶१४-१६
शनिवार, १६ मार्च
आपण तारणाच्या आशेचा टोप घालू या.—१ थेस्सलनी. ५:८.
युद्धात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सैनिक आपल्या डोक्यावर टोप घालायचे. आपणही एका अर्थाने सैतानाविरुद्ध युद्धच लढत आहोत. आणि सैतानाच्या हल्ल्यापासून आपण आपल्या डोक्याचं, म्हणजेच आपल्या विचारांचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. आपली विचारसरणी दूषित करण्यासाठी तो आपल्यावर अनेक प्रलोभनं आणतो आणि जगातल्या वेगवेगळ्या विचारसरणींचा आपल्यावर भडिमार करतो. सैनिकाचा टोप जसं त्याच्या डोक्याचं संरक्षण करतो, तसंच आपली आशासुद्धा आपल्या विचारांचं संरक्षण करते आणि त्यामुळे आपल्याला यहोवाला विश्वासू राहणं शक्य होतं. आपण जर या आशेवर विचार करत राहिलो नाही, तर आपण स्वतःच्याच इच्छा पूर्ण करत राहू आणि यहोवाने जे सुंदर अभिवचन दिलंय, त्याचा आपल्याला विसर पडेल. प्राचीन करिंथमध्ये राहणाऱ्या काही ख्रिश्चनांचाच विचार करा. देवाने दिलेल्या एका महत्त्वाच्या अभिवचनाचा, म्हणजे पुनरुत्थानाच्या आशेवरचा त्यांचा विश्वास उडाला होता. (१ करिंथ. १५:१२) ज्यांना भविष्याच्या जीवनाची आशा नाही, ते फक्त आजच्यापुरतं जगतात असा तर्क पौलने त्यांच्यापुढे मांडला. (१ करिंथ. १५:३२) आजसुद्धा बरेच जण असे आहेत, ज्यांना देवाच्या अभिवचनांबद्दल माहीत नाही. त्यामुळे ते फक्त आजच्यापुरतं जगतात आणि त्यांचं लक्ष फक्त मौजमजा करण्याकडे असतं. आपला भरवसा मात्र देवाने जे सुंदर भविष्याचं अभिवचन दिलंय त्यावर आहे. टेहळणी बुरूज२२.१० २५-२६ ¶८-९
रविवार, १७ मार्च
प्रार्थना करत राहा.—१ थेस्सलनी. ५:१७.
आपण यहोवाला प्रार्थना करावी असं तो आपल्याला प्रोत्साहन देतो. आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे तो पाहतो. आणि आपण कोणत्याही वेळेला त्याला प्रार्थना केली तरी तो आपलं ऐकेल अशी तो आपल्याला खातरी देतो. आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकून त्याला आनंद होतो. (नीति. १५:८) तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही यहोवाला कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकता? यहोवासमोर आपलं मन मोकळं करा. (स्तो. ६२:८) तुम्हाला कशाबद्दल काळजी वाटते आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतं ते त्याला सांगा. या भावनांवर मात करता यावी म्हणून काय करता येईल हे समजावं म्हणून त्याच्याकडे मदत मागा. तसंच स्पष्टपणे बोलण्यासाठी यहोवाने तुम्हाला धैर्य द्यावं अशी त्याला विनंती करा. तसंच, इतरांच्या भावना न दुखावता तुम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही त्याच्याकडे बुद्धीसुद्धा मागू शकता. (लूक २१:१४, १५) जर तुम्हाला निराशेच्या भावना सतावत असतील तर एखाद्या प्रौढ ख्रिस्ती भावाशी किंवा बहिणीशी त्याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही यहोवाकडे मदत मागू शकता. तुम्ही ज्याच्याशी बोलणार आहात त्याने तुमचं चांगल्या प्रकारे ऐकून घ्यावं आणि तुम्हाला समजून घ्यावं म्हणून तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. आणि तो तुमच्या प्रार्थनेचं कसं उत्तर देतो ते पाहा. तसंच इतरांकडून मदत घ्यायला तयार असा. जर तुम्ही असं केलं, तर तुम्हाला एकटेपणाच्या भावनांवर मात करता येईल. टेहळणी बुरूज२२.०८ १० ¶६
सोमवार, १८ मार्च
ही सगळी माणसं कैसराच्या हुकमांच्या विरोधात वागत आहेत.—प्रे. कार्यं १७:७.
थेस्सलनीकाच्या नवीन मंडळीतल्या भाऊबहिणींना तीव्र छळाचा सामना करावा लागला. संतापलेल्या विरोधकांच्या जमावाने काही बांधवांना फरफटत शहराच्या अधिकाऱ्यांपुढे आणलं. (प्रे. कार्यं १७:६) त्या नवीन भाऊबहिणींना किती धक्का बसला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का? खरंतर या घटनेमुळे यहोवाच्या सेवेत त्यांचा आवेश कमी होऊ शकला असता. पण प्रेषित पौलला असं घडू द्यायचं नव्हतं. त्याने नवीनच तयार झालेल्या मंडळीची काळजी घेण्यासाठी एक व्यवस्था केली. पौलने थेस्सलनीकामधल्या भाऊबहिणींना म्हटलं, “आम्ही आमचा भाऊ . . . तीमथ्य, याला तुमच्याकडे पाठवलं. हे यासाठी, की या संकटांमुळे तुमच्यापैकी कोणाचाही विश्वास डळमळू नये.” (१ थेस्सलनी. ३:२, ३) पौलने लुस्त्रमधल्या भाऊबहिणींचा विश्वास कसा मजबूत केला हे तीमथ्यने पाहिलं होतं. यहोवाने त्यांना कशी मदत केली हे त्याने स्वतः पाहिलं असल्यामुळे तो थेस्सलनीकातल्या भाऊबहिणींना याची खातरी देऊ शकला, की सगळं काही ठीक होईल.—प्रे. कार्यं १४:८, १९-२२; इब्री १२:२. टेहळणी बुरूज२२.०८ २१ ¶४
मंगळवार, १९ मार्च
त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं.—१ योहा. ४:९.
१८७० च्या काळात चार्ल्स टेझ रस्सल आणि त्यांच्यासोबत असलेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या एका गटाने शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास करायला सुरवात केली. येशूच्या बलिदानाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा स्मारकविधी कसा पाळला गेला पाहिजे याबद्दलचं सत्य त्यांना माहीत करून घ्यायचं होतं. त्या काळात त्यांनी अभ्यास करून जे संशोधन केलं, त्यामुळे आज आपल्याला खूप फायदा होत आहे. तो कसा? येशूच्या बलिदानाचा काय अर्थ आहे आणि त्यामुळे संपूर्ण मानवजातीला कसा फायदा होणार आहे, याबद्दलचं सत्य आपल्याला यहोवाच्या आशीर्वादामुळे समजलं आहे. (१ योहा. २:१, २) तसंच, देवाची आज्ञा पाळणाऱ्या लोकांना कोणती आशा मिळणार आहे, तेही बायबल आपल्याला सांगतं. काहींना स्वर्गातल्या अमर जीवनाची आशा आहे, तर बाकीच्या लाखो लोकांना पृथ्वीवर कायम जीवन जगण्याची आशा आहे. यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो आणि येशूच्या बलिदानामुळे आपल्याला कसा फायदा होतो यावर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण यहोवाच्या आणखी जवळ जातो. (१ पेत्र ३:१८) त्यामुळे त्या विश्वासू बायबल विद्यार्थ्यांप्रमाणेच आपणसुद्धा इतरांना स्मारकविधीचं आमंत्रण देतो. टेहळणी बुरूज२३.०१ २१ ¶६-७
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) मार्क १४:३-९
बुधवार, २० मार्च
तो सगळ्यांसाठी मेला ते या उद्देशाने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावं.—२ करिंथ. ५:१५.
येशूने लोकांना हे शिकवलं, की देवाच्या राज्यामुळे आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळतील. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत. कारण त्यामुळेच आपल्याला त्याच्यासोबत आणि यहोवासोबत जवळची मैत्री करणं शक्य होतं. जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची, तसंच मरण पावलेल्या आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा भेटण्याची आशा आहे. (योहा. ५:२८, २९; रोम. ६:२३) हे सगळे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण खरंतर काहीच विशेष केलेलं नाही. शिवाय, यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. (रोम. ५:८, २०, २१) पण त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींसाठी आपल्याला किती कदर आहे हे आपण नक्कीच दाखवू शकतो. ते कसं? आपल्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी आपण करू शकतो. जसं की, उपासनेशी संबंधित असलेल्या इमारतींचं बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी आपण पुढे येऊ शकतो. टेहळणी बुरूज२३.०१ २६ ¶३; २८ ¶५
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: दिवसा घडलेल्या घटना) मार्क ११:१-११
गुरुवार, २१ मार्च
कोकरा मला दिसला आणि त्याच्यासोबत १,४४,००० जण होते.—प्रकटी. १४:१.
जे देवाच्या राज्यात राज्य करतील त्यांना संपूर्ण पृथ्वीवरच्या करोडो लोकांची काळजी घ्यावी लागेल. येशूप्रमाणे १,४४,००० जणसुद्धा राजे आणि याजक म्हणून काम करतील. (प्रकटी. ५:१०) मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे इस्राएली लोकांची शारीरिक आणि आध्यात्मिक रीत्या काळजी घेणं ही याजकांची प्रमुख जबाबदारी होती. नियमशास्त्र हे ‘पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया होतं.’ यावरून आपण म्हणू शकतो की येशूसोबत राज्य करणारे १,४४,००० जणसुद्धा देवाच्या लोकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील. (इब्री १०:१) पण हे राजे आणि याजक पृथ्वीवर असलेल्या देवाच्या लोकांना नेमक्या कोणत्या माध्यमाने मार्गदर्शन पुरवतील हे तर येणारा काळच सांगेल. पण आपण ही खातरी बाळगू शकतो, की येणाऱ्या नंदनवनात पृथ्वीवर असलेल्या देवाच्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत राहील.—प्रकटी. २१:३, ४. टेहळणी बुरूज२२.१२ ११ ¶११-१३
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १०: दिवसा घडलेल्या घटना) मार्क ११:१२-१९
शुक्रवार, २२ मार्च
प्रभू येईपर्यंत, तुम्ही त्याच्या मृत्यूची घोषणा कराल.—१ करिंथ. ११:२६.
लोकांना स्मारकविधीला आमंत्रण देण्याचं एक कारण म्हणजे, त्यांना यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल शिकायला मिळावं, हे आहे. (योहा. ३:१६) स्मारकविधीला आल्यानंतर ते जे काही पाहतील आणि ऐकतील त्यामुळे त्यांना आणखी शिकून घ्यायचं आणि यहोवाचे सेवक बनायचं प्रोत्साहन मिळावं अशी आपली इच्छा असते. जे यहोवाची सेवा करण्यात थंड पडले आहेत अशांनाही आपण आमंत्रण देतो. यहोवाचं अजूनही त्यांच्यावर प्रेम आहे, याची त्यांना जाणीव व्हावी अशी आपली इच्छा असते. असे अनेक जण स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारतात आणि त्यांना पाहून आपल्याला खूप आनंद होतो. स्मारकविधीला आल्यामुळे आपण आधी किती आनंदाने यहोवाची सेवा करायचो, याची त्यांना आठवण होते. (स्तो. १०३:१-४) काही लोक आपलं आमंत्रण स्वीकारतील, तर काही जण स्वीकारणार नाहीत. पण आपण आवेशाने लोकांना आमंत्रण देत राहिलं पाहिजे. यहोवाला स्मारकविधीला आलेली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे.—लूक १५:७; १ तीम. २:३, ४. टेहळणी बुरूज२३.०१ २० ¶१; २२-२३ ¶९-११
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ११: दिवसा घडलेल्या घटना) मार्क ११:२०–१२:२७, ४१-४४
शनिवार, २३ मार्च
यहोवाचं भय मानणाऱ्यांवर त्याची नजर असते.—स्तो. ३३:१८.
आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला एक खास विनंती केली. आपल्या अनुयायांना यहोवाने सांभाळावं अशी विनंती त्याने केली. (योहा. १७:१५, २०) येशूला हे माहीत होतं, की यहोवा नेहमीच आपल्या लोकांना सांभाळतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांचं संरक्षण करतो. पण त्याला हेही माहीत होतं, की येणाऱ्या दिवसांत त्याच्या अनुयायांना सैतानाकडून खूप मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागेल. सैतानाच्या या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी त्यांना यहोवाच्या मदतीची गरज असेल याची येशूला जाणीव होती. सैतानाच्या जगात राहणं आज खऱ्या ख्रिश्चनांसाठी सोपं नाही. कारण आपल्याला अशा वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपण निराश होतो. तसंच, यहोवाला एकनिष्ठ राहणंसुद्धा आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण आपल्याला अशा संकटांना घाबरण्याची काही गरज नाही. कारण आपल्याला सांभाळण्यासाठी यहोवाची आपल्यावर नजर आहे. आपण कोणत्या कठीण परिस्थितींतून जात आहोत हे त्याला माहीत आहे. आणि त्यांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. ‘यहोवाचं भय मानणाऱ्यांवर त्याची नजर असते तो त्यांना वाचवतो’—स्तो. ३३:१८-२०. टेहळणी बुरूज२२.०८ ८ ¶१-२
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १२: दिवसा घडलेल्या घटना) मार्क १४:१, २, १०, ११; मत्तय २६:१-५, १४-१६
स्मारकविधीची तारीख
सूर्यास्तानंतर
रविवार, २४ मार्च
माझी आठवण म्हणून हे करत राहा.—लूक २२:१९.
दर वर्षी स्मारकविधीच्या काळात आपण अशा बऱ्याच गोष्टी करतो, ज्यांमुळे येशूच्या बलिदानाबद्दल असलेली आपली कदर दिसून येते. जसं की, त्याच्या मृत्यूमुळे आपल्याला कसा फायदा झाला आहे याबद्दल आपण विचार करतो, प्रार्थना करतो. तसंच आपण जास्तीत जास्त लोकांना स्मारकविधीला यायचं प्रोत्साहन देतो. आणि काहीही झालं तरी स्मारकविधीला उपस्थित राहायचा आपला ठाम निश्चय असतो. स्मारकविधीच्या दिवशी आपण शिकतो की मानवजातीला खंडणी बलिदानाची गरज का आहे आणि एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सगळ्यांच्या पापांची क्षमा कशी होते. तसंच, भाकर आणि द्राक्षारस कशाला सूचित करतो आणि कोण त्याचं सेवन करू शकतात, याचीसुद्धा आपल्याला आठवण करून दिली जाते. (लूक २२:१९, २०) आणि ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील यावरसुद्धा आपण मनन करतो. (यश. ३५:५, ६; ६५:१७, २१-२३) बायबलमधल्या या महत्त्वपूर्ण शिकवणींना आपण क्षुल्लक समजलं नाही पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०१ २० ¶२; २१ ¶४
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १३: दिवसा घडलेल्या घटना) मार्क १४:१२-१६; मत्तय २६:१७-१९ (निसान १४: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) मार्क १४:१७-७२
सोमवार, २५ मार्च
देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.—योहा. ३:१६.
आपल्याला पापांपासून क्षमा मिळावी म्हणून देवाने त्याच्या मुलाचं बलिदान दिलं आणि या खंडणी बलिदानामुळे आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळणं शक्य झालं. (मत्त. २०:२८) पौलने म्हटलं: “कारण मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे, त्यामुळे पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे होतं. कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.” (१ करिंथ. १५:२१, २२) देवाचं राज्य पृथ्वीवर यावं आणि त्याची इच्छा पृथ्वीवर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायला येशूने त्याच्या अनुयायांना शिकवलं. (मत्त. ६:९, १०) पृथ्वीवर मानवांनी कायमचं जगावं हासुद्धा देवाच्या उद्देशाचाच एक भाग आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने त्याच्या मुलाला मसीही राज्याचा राजा म्हणून नियुक्त केलं आहे. आणि येशूसोबत मिळून देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा पृथ्वीवरून १,४४,००० जणांना गोळा करत आहे.—प्रकटी. ५:९, १०. टेहळणी बुरूज२२.१२ ५ ¶११-१२
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १४: दिवसा घडलेल्या घटना) मार्क १५:१-४७
मंगळवार, २६ मार्च
ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं . . . ते या उद्देशाने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही जगावं.—२ करिंथ. ५:१४, १५.
आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा साहजिकच आपल्याला खूप दुःख होतं. शेवटी-शेवटी तिला किती त्रास झाला ते आठवून सुरवातीला आपल्यालाही खूप त्रास होतो. पण काही काळानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या अशाही काही गोष्टी आठवू लागतात ज्यांमुळे आपल्याला बरं वाटतं. त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी आठवून, किंवा आपल्याला धीर देण्यासाठी, खूश करण्यासाठी त्यांनी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टी आठवून आपल्याला आनंद वाटू लागतो. अगदी तसंच, आपण जेव्हा येशूच्या मृत्यूबद्दल आणि त्याआधी त्याला काय-काय सहन करावं लागलं यांबद्दल वाचतो तेव्हा आपण दुःखी होतो. खासकरून स्मारकविधीच्या काळात, आपण त्याने दिलेलं खंडणी बलिदान किती महत्त्वाचं आहे यावर विचार करतो. (१ करिंथ. ११:२४, २५) पण पृथ्वीवर असताना त्याने ज्या गोष्टी शिकवल्या आणि केल्या त्यांवर मनन केल्यामुळे आपल्याला खूप आनंद होऊ शकतो. तसंच, तो सध्या काय करत आहे आणि भविष्यात काय करणार आहे यावर खोलवर विचार केल्यामुळेही आपल्याला प्रोत्साहन मिळतं. टेहळणी बुरूज२३.०१ २६ ¶१-२
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १५: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २७:६२-६६ (निसान १६: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) मार्क १६:१
बुधवार, २७ मार्च
आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.—मत्त. ६:३३.
येशूचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे शिष्य फार दुःखी होते. कारण त्यांनी फक्त एका जवळच्या मित्राला गमावलं नव्हतं, तर आता आपल्याला काहीच आशा नाही असंही त्यांना वाटत होतं. (लूक २४:१७-२१) पण येशूने जेव्हा त्यांना दर्शन दिलं, तेव्हा बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण करण्यात त्याची काय भूमिका आहे हे त्याने त्यांना समजावून सांगितलं. तसंच, त्याने त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारीही सोपवली. (लूक २४:२६, २७, ४५-४८) यामुळे असं झालं, की येशू स्वर्गात गेला, तोपर्यंत दुःखात बुडालेले त्याचे शिष्य पुन्हा आनंदी झाले होते. कारण त्यांना समजलं होती, की आपला प्रभू जिवंत आहे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करायला तो आपल्याला मदतही करेल. आणि या आनंदामुळे ते मोठ्या आवेशाने यहोवाची स्तुती करू लागले. (लूक २४:५२, ५३; प्रे. कार्यं ५:४२) आपण येशूच्या शिष्यांचं अनुकरण करण्यासाठी आपण देवाच्या राज्याला जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. आपण जर धीराने यहोवाची सेवा करत राहिलो तर यहोवा आपल्याला वचन देतो की तो आपल्याला भरपूर आशीर्वाद देईल.—नीति. १०:२२. टेहळणी बुरूज२३.०१ ३०-३१ ¶१५-१६
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १६: दिवसा घडलेल्या घटना) मार्क १६:२-८
गुरुवार, २८ मार्च
तू पुन्हा मातीला मिळशील.—उत्प. ३:१९.
आदाम आणि हव्वाने जी चूक केली ती चूक करायची आपली मुळीच इच्छा नाही. आणि जर आपल्याला ती चूक करायचं टाळायचं असेल तर आपण यहोवाबद्दल शिकत राहिलं पाहिजे, त्याच्या गुणांची कदर केली पाहिजे आणि त्याचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे यहोवावर असलेलं आपलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. अब्राहामचंच उदाहरण घ्या. त्याचं यहोवावर मनापासून प्रेम होतं. यहोवाचे निर्णय समजून घ्यायला कठीण गेलं तेव्हासुद्धा तो यहोवाच्या विरोधात गेला नाही. उलट त्याने यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, अब्राहामच्या काळात यहोवाने सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश करायचं ठरवलं. जेव्हा अब्राहामला हे कळलं तेव्हा “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” दुष्टांसोबत नीतिमान लोकांचाही नाश करेल का, अशी भीती त्याला सुरुवातीला वाटली. यहोवा असं करू शकतो ही गोष्ट अब्राहामला पटत नव्हती. म्हणून त्याने नम्रपणे यहोवाला एकापाठोपाठ एक असे बरेच प्रश्न विचारले. आणि यहोवाने धीराने त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. शेवटी अब्राहामला याची जाणीव झाली, की यहोवा प्रत्येक माणसाचं हृदय पारखतो आणि तो दुष्टांसोबत निर्दोष लोकांना कधीही शिक्षा देत नाही.—उत्प. १८:२०-३२. टेहळणी बुरूज२२.०८ २८ ¶९-१०
शुक्रवार, २९ मार्च
जो भरवशालायक असतो, तो [गोष्टी] गुप्त ठेवतो.—नीति. ११:१३.
इ.स.पू. ४५५ मध्ये राज्यपाल नहेम्याने यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधल्या. शहराची काळजी घेण्यासाठी तो अशा लोकांना शोधत होता जे भरवशालायक असतील. त्याने निवडलेल्या लोकांमध्ये किल्ल्याचा अधिकारी हनन्याहसुद्धा होता. बायबलमध्ये म्हटलंय की हनन्याह “खूप भरवशालायक माणूस होता आणि तो इतर बऱ्याच लोकांपेक्षा खऱ्या देवाची जास्त भीती बाळगायचा.” (नहे. ७:२) यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि त्याला नाराज करण्याची भीती असल्यामुळे हनन्याह त्याच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचा. या गुणांमुळे आपल्यालाही यहोवाची प्रामाणिकपणे सेवा करायला आणि भरवशालायक व्हायला मदत होईल. आता तुखिक याचं उदाहरण पाहू या. तो प्रेषित पौलचा एक भरवशालायक सोबती होता. तुखिकने पौलला खूप मदत केली आणि म्हणून त्याने त्याला “विश्वासू सेवक” म्हटलं. (इफिस. ६:२१, २२) त्याने इफिस आणि कलस्सै इथल्या भावांना पौलची पत्रं पोहोचवली. आणि इतकंच नाही तर त्यांना प्रोत्साहन आणि सांत्वनसुद्धा दिलं. तुखिकप्रमाणेच आज विश्वासू आणि भरवशालायक बांधव आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करतात.—कलस्सै. ४:७-९. टेहळणी बुरूज२२.०९ ९-१० ¶५-६
शनिवार, ३० मार्च
प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.—१ पेत्र ४:८.
१३ वर्षं योसेफला खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. योसेफ असा विचार करू शकला असता: ‘यहोवाचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का? मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने मला का सोडून दिलं?’ पण योसेफने असा विचार केला नाही आणि मनात रागही ठेवला नाही. उलट त्याने शांत राहून योग्यपणे विचार केला. आणि जेव्हा त्याला त्याच्या भावांचा बदला घेण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने तसं केलं नाही. उलट तो त्यांच्याशी प्रेमाने वागला आणि त्याने त्यांना क्षमा केली. (उत्प. ४५:४, ५) योसेफ अशा प्रकारे का वागू शकला? कारण त्याने स्पष्टपणे विचार केला. फक्त स्वतःच्या समस्यांबद्दल विचार करण्याऐवजी यहोवाची इच्छा काय आहे याबद्दल त्याने विचार केला. (उत्प. ५०:१९-२१) मग यावरून आपण काय शिकू शकतो? जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर यहोवावर रागवू नका किंवा त्याने आपल्याला सोडून दिलंय असा विचार करू नका. उलट तुमच्या समस्येचा सामना करायला तो तुम्हाला कशी मदत करत आहे याबद्दल विचार करा. तसंच इतर जण तुमच्याशी वाईट वागतात तेव्हा क्षमा करायला तयार असा आणि “प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं” हे लक्षात ठेवा. टेहळणी बुरूज२२.११ २१ ¶४
रविवार, ३१ मार्च
सर्व राज्यं त्यांची सेवा करतील आणि त्यांच्या अधीन राहतील.—दानी. ७:२७.
दानीएलला असे काही दृष्टान्त दिसले, ज्यात त्याने स्पष्टपणे पाहिलं, की इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा यहोवाचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. सुरवातीला त्याने चार हिंस्र प्राणी पाहिले, जे प्राचीन काळातल्या आणि आजच्या काळातल्या महाशक्तींना सूचित करत होते. त्या महाशक्ती म्हणजे बाबेल, मेद व पर्शिया, ग्रीस, रोम आणि त्यातून निघालेली आजच्या काळातली अँग्लो-अमेरिका ही महासत्ता. (दानी. ७:१-३, १७) मग दानीएलने पाहिलं, की स्वर्गात यहोवा न्याय करण्यासाठी राजासनावर बसला आहे. (दानी. ७:९, १०) दानीएल पुढे पाहतो, की यहोवा मानवी सरकारांची सर्व सत्ता आणि अधिकार काढून घेतो. आणि तो अशांना देतो ज्यांना तो मिळाला पाहिजे आणि जे जास्त शक्तिशाली आहेत. ते कोण आहेत? त्यांच्यापैकी एक आहे “मनुष्याच्या मुलासारखा” असलेला येशू ख्रिस्त आहे, आणि दुसरे, “सर्वश्रेष्ठ देवाचे पवित्र जन,” म्हणजे १,४४,००० जण आहेत. ते “सदासर्वकाळासाठी” राज्य करतील. (दानी. ७:१३, १४, १८) खरंच असं करण्याचा अधिकार फक्त यहोवालाच आहे. दृष्टान्तात दानीएलने जे काही पाहिलं, ते त्याने आधी लिहिलेल्या गोष्टींशीही जुळणारं होतं. त्याने म्हटलं होतं: “[स्वर्गाचा देव] राजांना राजासनावर बसवतो आणि त्यांना राजासनावरून काढूनही टाकतो.”—दानी. २:१९-२१. टेहळणी बुरूज२२.१० १४-१५ ¶९-११