एप्रिल
सोमवार, १ एप्रिल
तुमच्या विश्वासाची पारख झाल्यामुळे धीर उत्पन्न होतो.—याको. १:३.
स्वतःला विचारा: ‘मला सल्ला दिला जातो तेव्हा मला कसं वाटतं? मी लगेच माझ्या चुका कबूल करतो का, की कारणं द्यायचा प्रयत्न करतो? मी स्वतःच्या चुकांचा दोष लगेच दुसऱ्यांवर लावतो का?’ तुम्ही बायबलमधल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणाबद्दल वाचताना विचार करू शकता की त्यांना समस्यांचा सामना करावा लागला त्या वेळी त्यांनी त्या कशा हाताळल्या. बायबलमधून अशा प्रत्येक सेवकाबद्दल वाचताना स्वतःला विचारा: ‘यहोवाच्या या विश्वासू सेवकाचं मी आणखी चांगल्या प्रकारे अनुकरण कसं करू शकतो?’ आपण आपल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातूनही बरंच काही शिकू शकतो; मग ते लहान असोत किंवा मोठे. उदाहरणार्थ, तुमच्या मंडळीत असं कोणी आहे का जो बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येचा विश्वासूपणे सामना करत आहे. जसं की, मित्रांच्या दबावाचा, कुटुंबाच्या विरोधाचा किंवा एखाद्या आजाराचा. त्या भावामध्ये किंवा बहिणीमध्ये तुम्हाला असे काही गुण दिसतात का, जे तुम्हाला स्वतःमध्ये वाढवायला आवडतील? अशा चांगल्या उदाहरणांबद्दल विचार केल्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या समस्यांचा सामना करायला मदत होईल. खरंच, आपण यहोवाचे किती आभारी आहोत, की विश्वासाची अशी जिवंत उदाहरणं आपल्यामध्ये आहेत.—इब्री १३:७. टेहळणी बुरूज२२.०४ १३ ¶१३-१४
मंगळवार, २ एप्रिल
घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.—प्रे. कार्यं २०:३५.
जेव्हा आपल्या जीवनात एखादी समस्या येते तेव्हा आपलं ऐकून घेण्यासाठी आणि आपल्याला सांत्वन देण्यासाठी वडील वेळ काढतात तेव्हा आपल्याला हिंमत मिळते. तसंच आपल्याला जेव्हा एखादा बायबल अभ्यास घेण्यासाठी मदतीची गरज असते, तेव्हा एखादा अनुभवी पायनियर भाऊ किंवा बहीण आपल्यासोबत येतात आणि आपल्याला काही गोष्टी सुचवतात तेव्हाही आपल्याला खूप मदत होते. हे सगळे भाऊबहीण आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी आनंदाने तयार असतात. आपणही इतर भाऊबहिणींना मदत करायला तयार असलो तर आपल्याला तसाच आनंद अनुभवता येईल. म्हणून तुम्हीही इतरांची मदत करायचं ध्येय ठेवू शकता. तुम्हाला जर एखादं ध्येय ठेवायचं असेल, तर आपल्यासमोर एखादं विशिष्ट ध्येय ठेवणं महत्त्वाचं आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. समजा तुम्ही असा विचार केला, की ‘मला मंडळीत आणखी सेवा करायची इच्छा आहे.’ पण असा विचार करणं हे विशिष्ट ध्येय ठेवण्यासारखं होणार नाही. कारण हे ध्येय नेमकं कसं गाठायचं हे तुम्हाला समजणार नाही. किंवा ते ध्येय तुम्ही पूर्ण केलं आहे की नाही हेसुद्धा तुम्हाला तपासून पाहता येणार नाही. म्हणूनच ध्येय ठेवताना नेहमी स्पष्ट आणि विशिष्ट ध्येय ठेवा. त्यासाठी हवं असेल तर तुमचं ध्येय काय आहे, आणि ते तुम्ही कसं गाठणार आहात ते लिहून ठेवा. टेहळणी बुरूज२२.०४ २५ ¶१२-१३
बुधवार, ३ एप्रिल
तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.—याको. २:८.
आज यहोवा त्याच्या राज्याची प्रजा म्हणून एका ‘मोठ्या लोकसमुदायाला’ गोळा करत आहे आणि त्यांना प्रशिक्षण देत आहे. (प्रकटी. ७:९, १०) आज लोक एकमेकांचा तिरस्कार करतात. इतर राष्ट्रातल्या लोकांबद्दल आणि वंशांबद्दल त्यांच्या मनात भेदभाव आहे. पण मोठ्या लोकसमुदायातले लोक एकमेकांवर प्रेम करतात आणि अशा गोष्टींपासून दूर राहायचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांनी जणू त्यांच्या तलवारी ठोकून नांगरांचे फाळ बनवले आहेत. (मीखा ४:३) जगातले लोक युद्धं करतात आणि त्यात लाखो लोक मारले जातात. पण मोठ्या लोकसमुदायातले लोक इतरांना “खरं जीवन” जगता यावं म्हणून खऱ्या देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल शिकवतात. (१ तीम. ६:१९) हे लोक देवाच्या राज्याला पाठिंबा देतात आणि त्यामुळे काही वेळा त्यांच्या कुटुंबातले लोक त्यांचा विरोध करतात. आणि कधीकधी तर त्यांना आर्थिक अडचणींनासुद्धा तोंड द्यावं लागतं. पण त्यांच्या गरजा नेहमी पूर्ण होतील या गोष्टीची यहोवा नेहमी काळजी घेतो. (मत्त. ६:२५, ३०-३३; लूक १८:२९, ३०) या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होतं, की देवाचं राज्य एक खरोखरचं सरकार आहे आणि ते त्याची इच्छा नेहमी पूर्ण करत राहील. टेहळणी बुरूज२२.१२ ५ ¶१३
गुरुवार, ४ एप्रिल
आमेन! प्रभू येशू, ये.—प्रकटी. २२:२०.
१,००० वर्षांच्या शेवटी पृथ्वीवर असलेले सर्व जण परिपूर्ण झालेले असतील. त्यानंतर आदामकडून वारशाने आलेल्या पापाचे दुष्परिणाम कोणालाही भोगावे लागणार नाहीत. (रोम. ५:१२) मानवांना आदामच्या पापापासून पूर्णपणे मुक्त करण्यात आलेलं असेल. अशा प्रकारे १,००० वर्षांच्या शेवटी ते परिपूर्ण झालेले असतील आणि या अर्थाने ते “पुन्हा जिवंत” होतील. (प्रकटी. २०:५) आपल्याला माहीत आहे की सैतानाने जेव्हा परिपूर्ण असलेल्या येशूची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हासुद्धा येशू यहोवाला एकनिष्ठ राहिला. पण सैतानाला जेव्हा परिपूर्ण मानवांची परीक्षा घ्यायची संधी दिली जाईल, तेव्हा तेसुद्धा येशूप्रमाणेच यहोवाला एकनिष्ठ राहतील का? १,००० वर्षांच्या शेवटी जेव्हा सैतानाला अथांग डोहातून सोडलं जाईल तेव्हा प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर द्यायची संधी मिळेल. (प्रकटी. २०:७) या शेवटच्या परीक्षेत जे विश्वासू राहतील, त्यांना कायमचं जीवन आणि खरं स्वातंत्र्य अनुभवता येईल. (रोम. ८:२१) पण जे देवाच्या विरोधात जातील त्यांचा कायमचा नाश केला जाईल.—प्रकटी. २०:८-१०. टेहळणी बुरूज२२.०५ १९ ¶१८-२०
शुक्रवार, ५ एप्रिल
तू त्याच्या टाचेवर घाव करशील.—उत्प. ३:१५.
सैतानाने जेव्हा यहुदी आणि रोमी लोकांना, देवाच्या मुलाला ठार मारायला प्रवृत्त केलं तेव्हा हे शब्द पूर्ण झाले. (लूक २३:१३, २०-२४) ज्या प्रकारे एखाद्याच्या टाचेवर जखम झाली तर तो काही काळासाठी चालू शकत नाही, त्याच प्रकारे येशूचा मृत्यू झाला तेव्हा काही काळासाठी तो काहीही करू शकत नव्हता आणि तीन दिवसांपर्यंत तो मेलेल्या स्थितीत कबरेत होता. (मत्त. १६:२१) उत्पत्ती ३:१५ मधल्या भविष्यवाणीतून हे दिसून येतं की येशू तसाच कबरेत राहणार नव्हता. का? कारण या भविष्यवाणीप्रमाणे स्त्रीची संतती सापाचं डोकं ठेचणार होती. आणि यासाठी येशूचं पुनरुत्थान होणं गरजेचं होतं. आणि अगदी तसंच झालं. येशूच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी त्याला एक अमर अदृश्य व्यक्ती म्हणून जिवंत करण्यात आलं. यहोवाने ठरवलेल्या वेळी येशू सैतानाचा समूळ नाश करेल. (इब्री २:१४) जे येशूसोबत राज्य करतील ते त्याच्यासोबत मिळून देवाच्या शत्रूंचा म्हणजेच सापाच्या संततीचा या पृथ्वीवरून पूर्णपणे नाश करतील.—प्रकटी. १७:१४; २०:४, १०. टेहळणी बुरूज२२.०७ १६ ¶११-१२
शनिवार, ६ एप्रिल
बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल.—नीति. १३:२०.
आईवडिलांनो, आपल्या मुलांना चांगले मित्र बनवायला मदत करा. बायबलमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे, की आपण ज्यांच्याशी मैत्री करतो, त्यांचा आपल्यावर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. तुमच्या मुलांची कोणाशी मैत्री आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ज्यांचं यहोवावर प्रेम आहे, असे चांगले मित्र बनवायला तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता? (१ करिंथ. १५:३३) यासाठी, मंडळीत चांगली प्रगती करत असलेल्या भाऊबहिणींनी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवावा म्हणून तुम्ही त्यांना आपल्या घरी बोलवू शकता. (स्तो. ११९:६३) टोनी नावाचे एक वडील सांगतात: “बऱ्याच वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या तरुण आणि वयस्कर भाऊबहिणींना आमच्या घरी जेवायला बोलवतो. आणि मग आम्ही सगळे मिळून कौटुंबिक उपासनासुद्धा करतो. यामुळे आम्हाला यहोवावर प्रेम करणाऱ्या आणि आनंदाने त्याची सेवा करणाऱ्या वेगवेगळ्या भाऊबहिणींशी ओळख वाढवायची संधी मिळते. . . . त्यांचा अनुभव, त्यांचा आवेश आणि स्वार्थत्यागी वृत्ती पाहून आमच्या मुलांवर खूप जबरदस्त प्रभाव पडला आहे. आणि त्यांनाही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत झाली आहे.” टेहळणी बुरूज२२.०५ २९-३० ¶१४-१५
रविवार, ७ एप्रिल
पृथ्वीवर ज्या गोष्टी बांधाल, त्या स्वर्गात आधीच बांधलेल्या असतील.—मत्त. १८:१८.
जेव्हा वडील पाप केलेल्या व्यक्तीला भेटतात तेव्हा त्याच्या बाबतीत यहोवाने जो निर्णय घेतलाय तोच निर्णय घ्यायचा ते प्रयत्न करतात. या व्यवस्थेचा मंडळीला कसा फायदा होतो? यामुळे मंडळीचं संरक्षण होतं. कारण पश्चात्ताप न करणाऱ्या ज्या लोकांपासून यहोवाच्या मेंढरांना नुकसान होऊ शकतं त्यांना मंडळीतून काढून टाकलं जातं. (१ करिंथ. ५:६, ७, ११-१३; तीत ३:१०, ११) तसंच, यामुळे पाप करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा पश्चात्ताप करायला आणि यहोवाकडून माफी मिळवायला मदत होते. (लूक ५:३२) पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला यहोवासोबतचं आपलं नातं पुन्हा मजबूत करता यावं म्हणून वडील त्याच्यासाठी प्रार्थना करतात. (याको. ५:१५) पाप केलेल्या व्यक्तीला भेटल्यावर जर वडिलांच्या हे लक्षात आलं की तिला पश्चात्ताप झालेला नाही, तर अशा व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत केलं जातं. असं असलं तरी, पुढे जर त्या व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने मनापासून पश्चात्ताप करून स्वतःमध्ये बदल केला तर यहोवा त्याला माफ करायला तयार आहे. (लूक १५:१७-२४) त्याने खूप गंभीर पाप केलेलं असलं तरी यहोवा त्याला क्षमा करेल.—२ इति. ३३:९, १२, १३; १ तीम. १:१५. टेहळणी बुरूज२२.०६ ९ ¶५-६
सोमवार, ८ एप्रिल
सावध राहा, जागे राहा! तुमचा शत्रू, सैतान हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.—१ पेत्र ५:८.
यहोवाच्या मदतीने जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींनी कठीण परिस्थितीवर मात केली आहे आणि त्यांनी यशस्वीपणे सैतानाचा सामना केला आहे. (१ पेत्र ५:९) तुम्हीसुद्धा नक्कीच असं करू शकता! लवकरच यहोवा, येशूला आणि त्याच्यासोबत राज्य करणाऱ्यांना “सैतानाची कार्यं उद्ध्वस्त” करायची आज्ञा देईल. (१ योहा. ३:८) त्यानंतर पृथ्वीवर असलेल्या देवाच्या सेवकांना “कसलीच भीती वाटणार नाही आणि कोणीही [त्यांना] घाबरवणार नाही.” (यश. ५४:१४; मीखा ४:४) पण तोपर्यंत आपण आपल्या भीतीवर मात करत राहण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो नेहमी आपलं संरक्षण करेल असा भरवसा आपण दिवसेंदिवस वाढवत राहिलं पाहिजे. प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कसं सांभाळलं यावर मनन केल्यामुळे आणि त्याबद्दल एकमेकांशी नेहमी बोलल्यामुळे आपल्याला असं करायला मदत होईल. तसंच कठीण परिस्थितीला तोंड देताना त्याने आपल्याला कशी मदत केली, हेसुद्धा आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. यहोवाच्या मदतीने आपण नक्कीच आपल्या भीतीवर मात करू शकतो!—स्तो. ३४:४. टेहळणी बुरूज२२.०६ १९ ¶१९-२०
मंगळवार, ९ एप्रिल
एक दगड पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर येऊन आदळला.—दानी. २:३४.
‘लोखंड आणि मातीने बनलेल्या पावलांनी’ सूचित करण्यात आलेली जागतिक महासत्ता आज राज्य करत आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा ब्रिटन आणि अमेरिकेने एकजूट होऊन काम करायला सुरवात केली तेव्हा ही जागतिक महासत्ता अस्तित्वात आली. आज तिला अँग्लो-अमेरिकन महासत्ता म्हटलं जातं. ही महासत्ता आधीच्या सगळ्या महासत्तांपेक्षा वेगळी आहे. दानीएलला स्वप्नात दिसलेल्या पुतळ्याबद्दलच्या भविष्यवाणीत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांवरून हे स्पष्ट होतं. पुतळ्याच्या दृष्टान्तात आधीच्या सगळ्या महासत्तांना सोनं किंवा चांदी यासारख्या फक्त एकाच धातुने सूचित करण्यात आलं आहे. पण अँग्लो-अमेरिकन महासत्तेला मात्र लोखंड आणि मातीच्या मिश्रणाने सूचित केलं आहे. माती ही ‘मानवांच्या वंशजांना’ म्हणजेच सर्वसाधारण लोकांना सूचित करते. (दानी. २:४३, तळटीप) आणि या महासत्तेवर सामान्य लोकांचा किती प्रभाव आहे, हे आज आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आज आपण पाहतो की सर्वसामान्य लोक आपल्या अधिकारांसाठी लढतात, आंदोलनं करतात तसंच कामगार आपले हक्क मिळवण्यासाठी यूनियन बनवतात, तसंच निवडणुकांचा काय परिणाम असेल आणि कोणतं सरकार सत्तेवर येईल हेसुद्धा लोकच ठरवतात. त्यामुळे या महासत्तेची ताकद कमजोर होते आणि तिला आपली धोरणं पूर्णपणे अमलात आणता येत नाहीत. टेहळणी बुरूज२२.०७ ४-५ ¶९-१०
बुधवार, १० एप्रिल
ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं हेच माझं अन्न आहे.—योहा. ४:३४.
बाप्तिस्मा घेण्याबद्दल तुमच्या मनात अजूनही शंका आहे का? अशा वेळी स्वतःला विचारा, ‘मी अजून बाप्तिस्मा घ्यायला का थांबलोय?’ (प्रे. कार्यं ८:३६) येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करायची तुलना जेवणाशी केली. का? अन्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. येशूला माहीत होतं, की यहोवा आपल्याला जे करायला सांगतो ते आपल्याच फायद्याचं आहे. तो आपल्याला असं काहीच करायला सांगणार नाही, ज्यामुळे आपलं नुकसान होईल. तुम्ही बाप्तिस्मा घ्यावा हीसुद्धा त्याचीच इच्छा आहे. (प्रे. कार्यं २:३८) मग बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला फायदाच होईल या गोष्टीची तुम्ही खातरी बाळगू शकता. कुठलंही चांगलं जेवण घ्यायला आपण नाही म्हणणार नाही, मग बाप्तिस्मा घ्यायला का मागे-पुढे पाहावं? या सगळ्यानंतरही काही जण म्हणतील, की ‘मी अजून बाप्तिस्म्यासाठी तयार नाहीए.’ हे खरंय, की समर्पण करून बाप्तिस्मा घेणं, आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. तसंच, त्याच्या तयारीसाठी वेळ आणि मेहनतही लागते. टेहळणी बुरूज२३.०३ ७ ¶१८-२०
गुरुवार, ११ एप्रिल
“तुझ्या संततीला” असं म्हणण्यात आलं, म्हणजे फक्त एकाला आणि तो ख्रिस्त आहे.—गलती. ३:१६.
येशूला अभिषिक्त करण्यात आलं, तेव्हा तो स्त्रीच्या संततीचा प्रमुख भाग बनला. येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्यानंतर देवाने त्याला “गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट” घातला. त्याने त्याला “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार” आणि यासोबतच “सैतानाची कार्यं उद्ध्वस्त” करण्याचाही अधिकार दिला. (इब्री २:७; मत्त. २८:१८; १ योहा. ३:८) पण या संततीचा दुसरा भागही असणार होता. प्रेषित पौलने संततीच्या या दुसऱ्या भागाबद्दल यहुदी आणि गैरयहुदी अभिषिक्त ख्रिश्चनांना असं सांगितलं: “जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही खरोखर अब्राहामची संतती आणि त्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे वारस आहात.” (गलती. ३:२८, २९) जेव्हा यहोवा एखाद्या व्यक्तीला पवित्र शक्तीने अभिषिक्त करतो, तेव्हा ती व्यक्ती स्त्रीच्या संततीचा भाग बनते. तर यावरून कळतं की स्त्रीच्या संततीत येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० जण आहेत. (प्रकटी. १४:१) हे सर्व जण आपल्या पित्याप्रमाणे म्हणजे यहोवाप्रमाणे विचार करायचा आणि वागायचा प्रयत्न करतात. टेहळणी बुरूज२२.०७ १६ ¶८-९
शुक्रवार, १२ एप्रिल
मला माझ्या जीवनाचा वीट आलाय; मला आता आणखी जगायचं नाही.—ईयो. ७:१६.
या शेवटच्या काळात आपल्या सर्वांनाच कठीण परीक्षांचा सामना करावा लागेल हे आपल्याला माहीत आहे. (२ तीम. ३:१) अशा वेळी आपण अगदी खचून जातो आणि काय करावं हे आपल्याला सुचत नाही. खासकरून जेव्हा एकापाठोपाठ एक समस्या येतात किंवा सगळ्याच समस्या एकदम येतात तेव्हा आपल्याला असं वाटू शकतं. पण अशा परिस्थितीतही यहोवाची नजर आपल्यावर आहे हे कधीही विसरू नका. त्याच्या मदतीने आपण कोणत्याही समस्येचा धैर्याने सामना करू शकतो. यहोवाने त्याचा विश्वासू सेवक ईयोब याला कशी मदत केली याचा विचार करा. त्याच्यावर एकापाठोपाठ एक खूप कठीण समस्या आल्या. एकाच दिवशी घडलेल्या भयानक दुर्घटनांमध्ये त्याची गुरंढोरं गेली. त्याच्या सेवकांना ठार मारण्यात आलं आणि इतकंच काय तर त्याने त्याच्या मुलामुलींनाही गमावलं. (ईयो. १:१३-१९) या दुःखातून तो अजून सावरलाही नव्हता इतक्यातच त्याला एक वेदनादायक आणि किळसवाणा आजार झाला. (ईयो. २:७) यहोवाचं ईयोबवर लक्ष होतं. ईयोबवर प्रेम असल्यामुळे यहोवाने त्याला त्याच्या सगळ्या परीक्षांचा धीराने सामना करायला मदत केली. टेहळणी बुरूज२२.०८ ११ ¶८-१०
शनिवार, १३ एप्रिल
यहोवा ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो सुधारतो.—इब्री १२:६.
ताडन दिलं जातं तेव्हा साहजिकच आपल्याला दुःख होतं. आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा आपल्याशी खूप कठोरपणे व्यवहार करण्यात आला असं आपल्याला वाटू शकतं. आणि यामुळे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. ती म्हणजे, यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला हे ताडन देतो. (इब्री १२:५, ११) म्हणून ताडन स्वीकारा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. काही वेळा येशूने इतर प्रेषितांसमोर पेत्रला त्याची चूक लक्षात आणून दिली. (मार्क ८:३३; लूक २२:३१-३४) पेत्रला त्या वेळी नक्कीच खूप लाज वाटली असेल. पण तरीसुद्धा तो येशूला एकनिष्ठ राहिला. त्याने ताडन स्वीकारलं आणि आपल्या चुकांमधून धडा घेतला. पेत्रच्या या एकनिष्ठतेमुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि मंडळीत त्याला बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. (योहा. २१:१५-१७; प्रे. कार्यं १०:२४-३३; १ पेत्र १:१) ताडन दिलं जातं तेव्हा आपल्याला लाज वाटते आणि वाईटही वाटतं. पण फक्त त्याचाच विचार करण्याऐवजी जेव्हा आपण ते ताडन स्वीकारतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही फायदा होतो. ताडनाबद्दल जर आपण योग्य दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींशी आणखी मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल. टेहळणी बुरूज२२.११ २१-२२ ¶६-७
रविवार, १४ एप्रिल
तिथे [इसहाकचं] होमार्पण कर.—उत्प. २२:२.
यहोवा कधीच अन्यायीपणे किंवा क्रूरपणे वागणार नाही हे अब्राहामला माहीत होतं. यहोवाने त्याला वचन दिलं होतं, की इसहाकद्वारे एक राष्ट्र निर्माण होईल. पण अजूनपर्यंत इसहाकला मुलं झाली नव्हती. म्हणून, प्रेषित पौल सांगतो त्याप्रमाणे, अब्राहामने असा तर्क केला की यहोवा त्याच्या लाडक्या मुलाला, इसहाकला पुन्हा जिवंत करायला समर्थ आहे. (इब्री ११:१७-१९) अब्राहामचा यहोवावर पूर्ण भरवसा होता आणि त्याला याची खातरी होती की यहोवा योग्य तेच करेल. आणि म्हणून यहोवाने दिलेली आज्ञा खूप कठीण असूनही अब्राहामने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे केलं. (उत्प. २२:१-१२) आपण अब्राहामचं अनुकरण कसं करू शकतो? त्याच्याप्रमाणे आपणसुद्धा यहोवाचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ आणि त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढेल. (स्तो. ७३:२८) आणि देवाच्या विचारसरणीप्रमाणे निर्णय घ्यायला आपला विवेक प्रशिक्षित होईल. (इब्री ५:१४) आणि वाईट गोष्ट करायच्या मोहाला आपण बळी पडणार नाही. आपल्या स्वर्गीय पित्याचं मन दुखावेल आणि त्याच्यासोबतचं आपलं नातं धोक्यात येईल अशी कोणतीही गोष्ट करायचा आपण विचारही करणार नाही. टेहळणी बुरूज२२.०८ २८-२९ ¶११-१२
सोमवार, १५ एप्रिल
मनातल्या चिंतेने माणूस खचून जातो, पण दिलासा देणाऱ्या शब्दांमुळे त्याला आनंद होतो.—नीति. १२:२५.
प्रेषित पौल आणि बर्णबा हे दोघं लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखियाला परत आले, तेव्हा त्यांनी “प्रत्येक मंडळीत वडिलांना नियुक्त केलं.” (प्रे. कार्यं १४:२१-२३) नियुक्त केलेल्या या भावांनी तिथल्या मंडळीला नक्कीच खूप सांत्वन आणि दिलासा दिला असेल, आणि आज मंडळीतले वडीलसुद्धा तेच करतात. वडिलांनो, तुमच्या मंडळीतसुद्धा कदाचित असे भाऊबहीण असतील ज्यांना “दिलासा देणाऱ्या शब्दांची” आणि प्रोत्साहनाची गरज असेल. तेव्हा अशा भाऊबहिणींकडे लक्ष द्या आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न करा. पौलने भाऊबहिणींना आठवण करून दिली, की आपण ‘साक्षीदारांच्या मोठ्या ढगाने वेढलेले’ आहोत. प्राचीन काळातल्या या विश्वासू साक्षीदारांनी यहोवाच्या मदतीने बऱ्याच कठीण परीक्षांचा सामना केला होता. (इब्री १२:१) पौलला माहीत होतं, की या साक्षीदारांच्या अहवालांवर विचार केल्यामुळे भाऊबहिणींना समस्यांचा सामना करायचं बळ मिळेल आणि त्यांना ‘जिवंत देवाच्या शहराकडे’ लक्ष लावायला मदत होईल. (इब्री १२:२२) आणि आजही तीच गोष्ट खरी आहे. आपण जेव्हा गिदोन, बाराक, दावीद, शमुवेल आणि अशा इतर बऱ्याच जणांना यहोवाने कशी मदत केली त्याबद्दल वाचतो, तेव्हा आपल्यालाही धैर्य मिळत नाही का?—इब्री ११:३२-३५. टेहळणी बुरूज२२.०८ २१-२२ ¶५-६
मंगळवार, १६ एप्रिल
ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.—प्रकटी. २०:१३.
पुनरुत्थान झालेल्या लोकांचा न्याय कोणत्या ‘कृत्यांच्या’ आधारावर केला जाईल? त्यांनी मृत्यूच्या आधी जी कामं केली होती, त्याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल का? नाही! कारण त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी आधी केलेल्या पापांपासून त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं. त्यामुळे ही ‘कृत्यं’ त्यांच्या आधीच्या जीवनातली असू शकत नाहीत. त्याऐवजी, नवीन जगात त्यांना जे शिक्षण दिलं जाईल, ते शिक्षण घेतल्यानंतर ते जसं वागतील त्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल. नोहा, शमुवेल, दावीद आणि दानीएलसारख्या विश्वासू सेवकांनासुद्धा येशू ख्रिस्ताबद्दल शिकून घ्यावं लागेल आणि त्याच्या बलिदानावर विश्वास असल्याचं दाखवावं लागेल. जर या विश्वासू लोकांना शिकण्याची गरज असेल, तर मग अनीतिमान लोकांना शिकण्याची आणखी किती गरज असेल! जे या अद्भुत संधीचा फायदा करून घेणार नाहीत, त्यांच्यासोबत शेवटी काय होईल? प्रकटीकरण २०:१५ मध्ये सांगितलंय, की “ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आढळलं नाही, त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.” याचाच अर्थ त्यांचा पूर्णपणे आणि कायमचा नाश केला जाईल. म्हणून जीवनाच्या पुस्तकात आपलं नावं लिहिलं जावं आणि त्यात ते कायम राहावं, म्हणून आपण किती प्रयत्न केले पाहिजेत! टेहळणी बुरूज२२.०९ १९ ¶१७-१९
बुधवार, १७ एप्रिल
देवासमोर आणि माणसांसमोर विवेक शुद्ध ठेवा.—प्रे. कार्यं २४:१६.
आपण बायबलमधून जे काही शिकलोय त्याच्या आधारावर आपण सहसा आपल्या आरोग्याबद्दल आणि उपचारांबद्दल निर्णय घेत असतो. (१ तीम. ३:९) असे निर्णय घेताना आणि त्यांबद्दल इतरांशी बोलताना आपण फिलिप्पैकर ४:५ मध्ये दिलेलं तत्त्व लक्षात ठेवतो. तिथे म्हटलंय: “तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या.” जेव्हा आपण समंजसपणा दाखवतो तेव्हा आपण आपल्या आरोग्याबद्दल खूप जास्त काळजी करत बसत नाही. आपल्या भाऊबहिणींनी आपल्यापेक्षा वेगळे निर्णय घेतले तरी आपण त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आदर करतो. (रोम. १४:१०-१२) जीवनाचा उगम असलेल्या यहोवा देवाने आपल्याला हे मौल्यवान जीवन दिलंय. त्यामुळे आपल्या जीवनाचं संरक्षण करून आणि पूर्ण मनाने देवाची सेवा करून आपण जीवनाबद्दल कदर असल्याचं दाखवत असतो. (प्रकटी. ४:११) सध्या आपल्याला आजारांना आणि वेगवेगळ्या विपत्तींना तोंड द्यावं लागतं. पण आपण अशा प्रकारचं जीवन जगावं अशी यहोवाची इच्छा नव्हती. म्हणून तो लवकरच आपल्याला कायमचं जीवन देणार आहे जिथे कोणत्याच प्रकारचं दुःख आणि मृत्यू नसेल. (प्रकटी. २१:४) पण सध्या आपण जिवंत आहोत आणि आपल्या प्रेमळ पित्याची, यहोवाची सेवा करू शकतो ही किती चांगली गोष्ट आहे! टेहळणी बुरूज२३.०२ २५ ¶१७-१८
गुरुवार, १८ एप्रिल
तुमचं राज्य विभागून ते मेदच्या आणि पर्शियाच्या लोकांना देण्यात आलंय.—दानी. ५:२८.
‘वरिष्ठ अधिकाऱ्यांवर’ आपला अधिकार असल्याचं यहोवाने अनेकदा स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. (रोम. १३:१) याची तीन उदाहरणं लक्षात घ्या. इजिप्तच्या फारो राजाने यहोवाच्या लोकांना गुलाम बनवलं होतं, आणि वारंवार विनंती करूनही त्याने त्यांना जाऊ दिलं नाही. पण यहोवाने त्यांची सुटका केली आणि तांबड्या समुद्रात फारोचा नाश केला. (निर्ग. १४:२६-२८; स्तो. १३६:१५) तसंच, एकदा बाबेलच्या बेलशस्सर राजाने खूप मोठी मेजवानी ठेवली आणि त्याने ‘स्वर्गाच्या देवाविरुद्ध जाऊन स्वतःचा गौरव केला.’ इतकंच नाही, तर यहोवाची स्तुती करण्याऐवजी त्याने ‘सोन्याच्या आणि चांदीच्या’ दैवतांची स्तुती केली. (दानी. ५:२२, २३) पण देवाने त्या गर्विष्ठ माणसाला नमवलं. “त्याच रात्री” बेलशस्सरला मारून टाकण्यात आलं आणि त्याचं राज्य मेद आणि पर्शियाला देण्यात आलं. (दानी. ५:३०, ३१) शिवाय, पॅलेस्टाईनचा राजा हेरोद अग्रिप्पा पहिला, याने प्रेषित याकोबला मारून टाकलं आणि नंतर प्रेषित पेत्रलाही मारून टाकण्याच्या उद्देशाने त्याला तुरुंगात टाकलं. पण यहोवाने हेरोदचा कट उधळला. कारण “यहोवाच्या दूताने त्याला मारलं,” आणि तो किडे पडून मेला.—प्रे. कार्यं १२:१-५,२१-२३. टेहळणी बुरूज२२.१० १५ ¶१२
शुक्रवार, १९ एप्रिल
मी तुमचं ऐकेन.—यिर्म. २९:१२.
प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांची कशी काळजी घेतली याबद्दल जेव्हा आपण वाचू तेव्हा आपली आशा आणखी पक्की होईल. कारण बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी “आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला मदत करतात आणि सांत्वन देतात.” (रोम. १५:४) यहोवाने आपली अभिवचनं कशी पूर्ण केली यावर मनन करा. यहोवाने अब्राहाम आणि सारासाठी काय केलं त्याचा विचार करा. त्यांचं वय झालं होतं आणि त्यामुळे त्यांना मुलं होऊ शकत नव्हती. तरी त्यांना एक मुलगा होईल असं अभिवचन यहोवाने त्यांना दिलं होतं. (उत्प. १८:१०) अब्राहामने या गोष्टीवर विश्वास ठेवला का? बायबल म्हणतं, की त्याने “असा विश्वास ठेवला की तो पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल.” (रोम. ४:१८) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर ही अशक्य गोष्ट वाटते. पण यहोवा आपलं अभिवचन नक्की पूर्ण करेल असा विश्वास अब्राहामला होता. आणि अब्राहामची मुळीच निराशा झाली नाही. (रोम. ४:१९-२१) बायबलमधले काही अहवाल दाखवून देतात, की यहोवाने दिलेली अभिवचनं तो नक्की पूर्ण करेल. टेहळणी बुरूज२२.१० २७ ¶१३-१४
शनिवार, २० एप्रिल
तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.—यश. ३०:२०.
हे शब्द यहुद्यांची बंदिवासातून सुटका झाली तेव्हा पूर्ण झाले. यहोवाच्या मार्गदर्शनाने त्याचे लोक शुद्ध उपासना पुन्हा सुरू करू शकले. आणि अशा रीतीने यहोवाने हे दाखवून दिलं, की तो खरंच एक महान शिक्षक आहे. आज यहोवा आपलाही महान शिक्षक आहे, हा खरंच किती मोठा आशीर्वाद आहे! पुढे आणखी एका शब्दचित्राचा वापर करून यशया आपली तुलना विद्यार्थ्यांशी करतो. आणि यहोवा आपल्याला शिकवत आहे असं तो सांगतो. तो म्हणतो: “तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.” या शब्दचित्रात यहोवा जणू आपल्या समोर उभा राहून आपल्याला शिकवतोय. हा आपल्यासाठी खरंच खूप मोठा बहुमान आहे. आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे आपल्याला खूप फायदा होतो. पण आज यहोवाचं मार्गदर्शन आपल्याला कसं मिळतं? त्याच्या संघटनेद्वारे. संघटनेकडून आपल्याला जे स्पष्ट मार्गदर्शन मिळतं, त्याबद्दल आपण खरंच किती आभारी आहोत! हे मार्गदर्शन आपल्याला सभांमधून, तसंच प्रकाशनांमधून, ब्रॉडकास्टिंगच्या कार्यक्रमांमधून आणि अशा इतर बऱ्याच मार्गांनी मिळतं. या मार्गदर्शनामुळे आपल्याला कठीण परिस्थितीचा धीराने सामना करता येतो आणि आनंदी राहता येतं. टेहळणी बुरूज२२.११ १० ¶८-९
रविवार, २१ एप्रिल
जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?—मत्त. २४:३.
येशू फक्त यहुदी व्यवस्थेच्या समाप्तीबद्दलच बोलला नाही; तर ‘जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीबद्दलही,’ म्हणजे सध्या आपण ज्या दुष्ट जगात जगतोय त्याच्या अंताबद्दलही बोलला. येशू म्हणाला: “त्या दिवसाबद्दल किंवा त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही; स्वर्गदूतांना नाही आणि मुलालाही नाही, तर फक्त पित्याला माहीत आहे.” मग त्याने आपल्या सगळ्या शिष्यांना ‘सावध आणि जागे राहण्याचा’ इशारा दिला. (मार्क १३:३२-३७) पहिल्या शतकातल्या यहुदी ख्रिश्चनांनी सावध आणि जागे राहणं खूप गरजेचं होतं. कारण त्यामुळेच पुढे त्यांचा जीव वाचणार होता. येशूने आपल्या अनुयायांना म्हटलं: “जेव्हा तुम्ही यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहाल, तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे हे ओळखा.” त्या वेळी येशूने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे त्याच्या अनुयायांनी ‘डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करायची होती.’ (लूक २१:२०, २१) रोमी सैन्यांनी जेव्हा यरुशलेमचा नाश केला तेव्हा ज्यांनी येशूच्या या इशाऱ्याप्रमाणे केलं त्यांचं जीवन वाचलं. आज आपण या दुष्ट जगाच्या शेवटच्या काळात जगत आहोत. त्यामुळे आपणसुद्धा नेहमी सावध आणि जागे राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०२ १४ ¶१-२; १६ ¶३
सोमवार, २२ एप्रिल
यहोवा सत्याच्या देव आहे.—स्तो. ३१:५.
यहोवा त्याच्या लोकांना प्रामाणिकपणे आणि नीतीने चालायला शिकवतो. यामुळे त्यांना मनाची शांती मिळते आणि सन्मानाने जगता येतं. (नीति. १३:५, ६) बायबल अभ्यास करताना तुम्हालासुद्धा ही गोष्ट जाणवलीच असेल. त्या वेळी तुमच्या लक्षात आलं असेल, की यहोवाच्या मार्गाने चालल्यामुळे सगळ्या मानवजातीला आणि व्यक्तिशः तुम्हालासुद्धा फायदाच होईल. (स्तो. ७७:१३) म्हणूनच यहोवाच्या बाजूने उभं राहून योग्य ते करायची तुमची नक्कीच इच्छा असेल. (मत्त. ६:३३) तसंच, त्याच्याबद्दलचं सत्य सांगितलं जावं आणि त्याच्या नावावरचा कलंक पुसला जावा असंही तुम्हाला वाटत असेल. पण हे तुम्ही कसं करू शकता? तुम्ही ज्या प्रकारे जीवन जगता, त्यावरून तुम्ही सगळ्यांना हे दाखवून देऊ शकता, की तुम्ही सैतानाचा खोटेपणा धुडकावून लावलाय आणि खऱ्याची बाजू घेतली आहे. तसंच तुम्ही हेसुद्धा दाखवू शकता, की यहोवाच तुमचा शासक असावा अशी तुमची इच्छा आहे. शिवाय त्याच्या मार्गाने चालायचीही तुमची इच्छा आहे. पण हे तुम्ही कसं कराल? प्रार्थनेत यहोवाला आयुष्यभर त्याची सेवा करायचं वचन द्या आणि हे समर्पण बाप्तिस्म्याद्वारे सगळ्यांसमोर जाहीर करा. जे योग्य आणि खरं आहे त्यावरच्या प्रेमामुळे आपल्याला बाप्तिस्म्याचं पाऊल उचलायला मदत होऊ शकते. टेहळणी बुरूज२३.०३ ३ ¶४-५
मंगळवार, २३ एप्रिल
तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भीतीने खचू देऊ नका.—योहा. १४:२७.
बायबलमध्ये अशा शांतीबद्दल सांगितलंय, ज्याबद्दल जगातल्या लोकांना काहीच माहीत नाही. याला बायबलमध्ये “देवाची शांती” असं म्हटलंय. आणि ही शांती स्वर्गातल्या पित्यासोबत असलेल्या जवळच्या नात्यामुळे आपण अनुभवू शकतो. जेव्हा आपल्याला ही शांती मिळते तेव्हा आपल्याला सुरक्षित वाटतं. (फिलिप्पै. ४:६, ७) यामुळे भाऊबहिणींसोबत आपली मैत्री आणखी घट्ट होते आणि शांतीच्या देवासोबत आपलं जे चांगलं नातं आहे, त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. (१ थेस्सलनी. ५:२३) जेव्हा आपण देवाला ओळखू लागतो, त्याच्यावर भरवसा ठेवतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा देवाची शांती आपल्याला मिळते. आणि आपण कठीण परिस्थितीला तोंड देत असताना आपल्याला कितीही चिंता असल्या, तरी मन शांत ठेवायला आपल्याला मदत होते. जेव्हा महामारी, विपत्ती, सामाजिक अशांतता आणि छळ यांसारखी मोठमोठी संकटं येतात तेव्हा देवाची शांती अनुभवणं खरंच शक्य आहे का? यांसारखी संकटं येतात तेव्हा आपण घाबरून जातो. पण आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भाऊबहिणींनी येशूच्या या सल्ल्याचं पालन केलं आहे. आणि यहोवाच्या मदतीने त्यांनी कठीण परिस्थितीतसुद्धा ही शांती अनुभवली आहे. टेहळणी बुरूज२२.१२ १६ ¶१-२
बुधवार, २४ एप्रिल
पवित्र शक्तीद्वारे आवेशी असा. यहोवाचे दास होऊन त्याची सेवा करा.—रोम. १२:११.
आपल्या आयुष्यात जे काही घडतं, त्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे सध्या यहोवाच्या सेवेत आपल्याकडे जी जबाबदारी आहे, ती आपल्याकडे कायमच असेल असं म्हणता येणार नाही. म्हणून आपल्याकडे असलेल्या जबाबदारीमुळे यहोवा आपल्यावर प्रेम करतो, असा आपण विचार करू नये. आणि स्वतःची तुलनाही इतरांशी करू नये. (गलती. ६:४) म्हणून इतरांना मदत करण्याचे आणि यहोवाची सेवा करण्याचे वेगवेगळे मार्ग आपण शोधले पाहिजेत. तुम्ही जर तुमचं जीवन साधं ठेवलं आणि विनाकारण कर्ज घ्यायचं टाळलं, तर तुम्हाला यहोवाची आणखी जास्त सेवा करता येईल. मोठं ध्येय गाठता यावं म्हणून छोटी-छोटी ध्येयं ठेवा. जसं की, तुम्हाला जर नियमित पायनियर म्हणून सेवा करायची असेल, तर सध्या तुम्ही दर महिन्याला सहायक पायनियर म्हणून सेवा करू शकता का? जर तुम्हाला सहायक सेवक म्हणून सेवा करायची असेल, तर तुम्ही प्रचारकार्यात जास्त वेळ देऊ शकता का? अशा प्रकारे छोटी-छोटी ध्येयं ठेवल्यामुळे तुम्हाला जो अनुभव मिळेल त्यामुळे भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायला तुम्हाला मदत होईल. म्हणून तुम्हाला जी काही जबाबदारी दिली जाईल त्यात होताहोईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. टेहळणी बुरूज२२.०४ २६ ¶१६-१७
गुरुवार, २५ एप्रिल
माझं यहोवावर प्रेम आहे कारण तो माझी हाक, माझ्या मदतीच्या याचना ऐकतो.—स्तो. ११६:१.
यहोवा आपल्याला जीवनातल्या समस्यांचा सामना करायला आणि आनंदाने त्याची सेवा करत राहायला मदत करतो. जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करून आपली एखादी चिंता त्याला सांगतो, तेव्हा यहोवा कदाचित आधी आपल्याला त्या समस्येचा सामना करण्यासाठी ताकद देईल. आणि जर आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली समस्या लगेच दूर झाली नाही, तर तिचा सामना करण्यासाठी आपण वारंवार यहोवाला प्रार्थना करून ताकद मागितली पाहिजे. यहोवा स्वतः आपल्याला असं करायचं प्रोत्साहन देतो. हे यशयाच्या या शब्दांवरून आपल्याला कळतं: “[यहोवाला] स्वस्थ बसू देऊ नका.” (यश. ६२:७) या शब्दांचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो, की आपण यहोवाला सतत प्रार्थना करत राहिलं पाहिजे. इतक्या वेळा, की जणू त्याला जराही स्वस्थ बसता येणार नाही. यशयाच्या या शब्दांवरून आपल्याला येशूने दिलेल्या एका उदाहरणाचीही आठवण होते. प्रार्थनेबद्दल असलेलं ते उदाहरण आपल्याला लूक ११:८-१०, १३ या वचनांत वाचायला मिळतं. तिथे येशू आपल्याला सांगतो, की आपण यहोवाकडे पवित्र शक्ती ‘मागत राहिली’ पाहिजे. तसंच योग्य निर्णय घेता यावेत म्हणून आपण मार्गदर्शनासाठीही यहोवाला विनंती करू शकतो. टेहळणी बुरूज२२.११ ८ ¶१; ९ ¶६-७
शुक्रवार, २६ एप्रिल
आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.—प्रे. कार्यं १४:२२.
तुम्ही आणि तुमचं कुटुंब आत्तापासूनच छळाचा सामना करण्यासाठी तयारी करू शकता. छळ झाला तर आपल्यासोबत कोणकोणत्या वाईट गोष्टी घडतील यावर विचार करत बसू नका. उलट यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी भक्कम करा आणि तुमच्या मुलांनाही तसंच करण्याचं प्रोत्साहन द्या. तुम्हाला जर जास्तच चिंता वाटत असेल तर यहोवासमोर प्रार्थनेत आपलं मन मोकळं करा. (स्तो. ६२:७, ८) आपण यहोवावर का भरवसा ठेवू शकतो यावर कुटुंब मिळून चर्चा करा. विपत्तीचा सामना करण्यासाठी जसं तुम्ही तुमच्या मुलांना तयार केलं होतं, तसंच छळाचा सामना करण्यासाठीही तुम्ही त्यांना तयार करू शकता. यहोवावर भरवसा ठेवायला शिकवल्यामुळे तेसुद्धा धैर्याने आणि शांत मनाने छळाला तोंड देऊ शकतील. देवाची शांती अनुभवल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटतं. (फिलिप्पै. ४:६, ७) आज आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा, विपत्तींचा आणि छळाचा सामना करावा लागत आहे. पण देवाकडून मिळणाऱ्या शांतीमुळे आपल्याला आपलं मन स्थिर ठेवायला मदत होते. मंडळीतले वडील आपल्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यांच्याद्वारे तो आपली काळजी घेतो. तसंच, एकमेकांना मदत करायची संधीसुद्धा त्याने आपल्याला दिली आहे. आज कदाचित काही जणांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नसेल. तरी पुढे येणाऱ्या परीक्षांना तोंड देण्यासाठी, इतकंच नव्हे तर ‘मोठ्या संकटासाठी’ आपण सगळ्यांनीच आत्तापासूनच तयारी केली पाहिजे.—मत्त. २४:२१. टेहळणी बुरूज२२.१२ २७ ¶१७-१८
शनिवार, २७ एप्रिल
मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.—मत्त. ९:१३.
जर आपण पूर्वी एखादं गंभीर पाप केलं असेल, तर त्याबद्दल असलेली दोषीपणाची भावना आपण आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्याला आपल्या पापांची माफी मिळू शकते. पण म्हणून आपण असाही विचार करू नये की आपण “जाणूनबुजून पाप करत राहिलो” तरी यहोवा आपल्याला माफ करेल. (इब्री १०:२६-३१) पण दुसरीकडे आपल्या हातून झालेल्या गंभीर पापाची आपल्याला कधीच माफी मिळू शकणार नाही असाही आपण विचार करू नये. जर आपण आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला असेल, यहोवाकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मदत घेतली असेल आणि ते पाप करायचं सोडून दिलं असेल तर आपण खातरी बाळगू शकतो की यहोवाने आपल्याला मोठ्या मनाने क्षमा केली आहे. (यश. ५५:७; प्रे. कार्यं ३:१९) आपल्या हातून कितीही मोठं पाप झालं असलं, तरी खंडणी बलिदानात ते पुसून टाकण्याची ताकद आहे. आणि त्यामुळे आपल्याला नंदनवनात जीवन मिळेल आणि ते जीवन आपल्याला कधीच कंटाळवाणं वाटणार नाही. तेव्हा आपल्याला नेहमी नवीन-नवीन लोकांना भेटायची संधी असेल आणि समाधान देणारं काम असेल. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, आपल्याला दररोज यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल. आणि त्याने पुरवलेल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेता येईल. यहोवाबद्दल आपण कितीही शिकून घेतलं तरी त्याच्याबद्दल जाणून घेण्यासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी असतील. तसंच त्याने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दलही शिकण्यासारखं बरंच काही असेल. टेहळणी बुरूज२२.१२ १३ ¶१७, १९
रविवार, २८ एप्रिल
मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये शत्रुत्व निर्माण करीन.—उत्प. ३:१५.
ही ‘स्त्री’ हव्वा असू शकत नाही. भविष्यवाणीत म्हटलंय की स्त्रीची संतती सापाचं डोकं “ठेचेल.” साप सैतानाला सूचित करतो आणि सैतान एक अदृश्य व्यक्ती असल्यामुळे हव्वेच्या पोटी जन्मलेल्या अपरिपूर्ण संततीपैकी कोणीही त्याला ठेचू शकत नाही. तर मग सैतानाला कोण मारणार होतं? उत्पत्ती ३:१५ मध्ये उल्लेख केलेली स्त्री कोण आहे हे आपल्याला बायबलच्या शेवटच्या पुस्तकातून कळतं. (प्रकटी. १२:१, २, ५, १०) ही एक सर्वसाधारण स्त्री नाही. ती लाक्षणिक असून तिच्या पायाखाली चंद्र आहे आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट आहे. आणि ती एका असाधारण मुलाला, म्हणजे देवाच्या राज्याला जन्म देते. हे राज्य स्वर्गात असल्यामुळे, ती स्त्रीसुद्धा स्वर्गात असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरून आपण असं म्हणू शकतो, की ही स्त्री यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाला सूचित करते ज्यात देवाचे विश्वासू स्वर्गदूत आहेत. (गलती. ४:२६) देवाचं वचन आपल्याला स्त्रीच्या संततीचा प्रमुख भाग समजून घ्यायलाही मदत करतं. तो अब्राहामचा वंशज असणार होता.—उत्प. २२:१५-१८. टेहळणी बुरूज२२.०७ १५ ¶६-८
सोमवार, २९ एप्रिल
तुम्ही ते माणसांचं वचन म्हणून नाही, तर देवाचं वचन म्हणून स्वीकारलं; आणि ते खरोखर देवाचंच वचन आहे.—१ थेस्सलनी. २:१३.
यहोवाने बायबलसारखी जी सुंदर भेट दिली आहे, त्यात रोजच्या जीवनासाठी बरेच सल्ले आहेत. बायबलचा सल्ला मानल्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण जीवनच बदलून गेलंय. यावरून कळतं, की यहोवा खरंच किती बुद्धिमान आहे. मोशेने जेव्हा बायबलची सुरवातीची काही पुस्तकं लिहिली, तेव्हा इस्राएली लोकांना त्याने काय म्हटलं याकडे लक्ष द्या: “हे फक्त पोकळ शब्द नाहीत, तर हे तुमचं जीवन आहे.” (अनु. ३२:४७) ज्यांनी बायबलचा सल्ला मानला ते चांगलं आणि आनंदी जीवन जगू शकले. (स्तो. १:२, ३) आज बायबल लिहून हजारो वर्षं जरी झाली असली, तरी त्याची ताकद कमी झालेली नाही. बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी कायमच उपयोगाच्या असल्याचं दिसतं. आधीच्या काळातसुद्धा लोकांना त्यामुळे फायदा झालाय आणि आजही होतोय. जेव्हा आपण हे पवित्र पुस्तक वाचतो आणि त्यात शिकायला मिळालेल्या गोष्टींवर मनन करतो, तेव्हा त्यातला सल्ला आपल्या जीवनात कसा लागू करायचा, हे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा लेखक यहोवा देव त्याची जबरदस्त पवित्र शक्ती आपल्याला देतो. (स्तो. ११९:२७; मला. ३:१६; इब्री ४:१२) जर बायबलचा लेखकच आपल्याला इतकी मदत करायला तयार आहे, तर मग बायबल नियमितपणे वाचून आपण त्याचा फायदा का करून घेऊ नये? टेहळणी बुरूज२३.०२ ३ ¶५-६
मंगळवार, ३० एप्रिल
तो अशा रितीने नाश करेल, की सगळ्यांना आश्चर्य वाटेल.—दानी. ८:२४.
प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायातून आपल्याला समजतं की अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला “कोकऱ्यासारखी दोन शिंगं होती, पण तो अजगरासारखा बोलू लागला.” हा पशू “मोठमोठी चिन्हं करतो; लोकांसमोर आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.” (प्रकटी. १३:११-१५) प्रकटीकरणाच्या १६ व्या आणि १९ व्या अध्यायात या जंगली पशूला ‘खोटा संदेष्टा’ असं म्हटलं आहे. (प्रकटी. १६:१३; १९:२०) अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेबद्दल दानीएलनेही एक मिळती-जुळती गोष्ट सांगितली आहे. त्याने म्हटलं की ही महासत्ता “खूप मोठ्या प्रमाणावर नाश करेल.” (दानी. ८:१९, २३, २४, तळटीप) दुसऱ्या महायुद्धादरम्यान अगदी हेच घडलं. त्या युद्धात जपानवर दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि तेव्हा हे युद्ध संपलं. हे अणुबॉम्ब ब्रिटन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी मिळून बनवले होते. एका अर्थाने असं म्हणता येईल, की अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेने ‘आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षाव केला.’ टेहळणी बुरूज२२.०५ १० ¶९