वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es24 पृ. २०-३२
  • फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
  • उपशिर्षक
  • गुरुवार, १ फेब्रुवारी
  • शुक्रवार, २ फेब्रुवारी
  • शनिवार, ३ फेब्रुवारी
  • रविवार, ४ फेब्रुवारी
  • सोमवार, ५ फेब्रुवारी
  • मंगळवार, ६ फेब्रुवारी
  • बुधवार, ७ फेब्रुवारी
  • गुरुवार, ८ फेब्रुवारी
  • शुक्रवार, ९ फेब्रुवारी
  • शनिवार, १० फेब्रुवारी
  • रविवार, ११ फेब्रुवारी
  • सोमवार, १२ फेब्रुवारी
  • मंगळवार, १३ फेब्रुवारी
  • बुधवार, १४ फेब्रुवारी
  • गुरुवार, १५ फेब्रुवारी
  • शुक्रवार, १६ फेब्रुवारी
  • शनिवार, १७ फेब्रुवारी
  • रविवार, १८ फेब्रुवारी
  • सोमवार, १९ फेब्रुवारी
  • मंगळवार, २० फेब्रुवारी
  • बुधवार, २१ फेब्रुवारी
  • गुरुवार, २२ फेब्रुवारी
  • शुक्रवार, २३ फेब्रुवारी
  • शनिवार, २४ फेब्रुवारी
  • रविवार, २५ फेब्रुवारी
  • सोमवार, २६ फेब्रुवारी
  • मंगळवार, २७ फेब्रुवारी
  • बुधवार, २८ फेब्रुवारी
  • गुरुवार, २९ फेब्रुवारी
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
es24 पृ. २०-३२

फेब्रुवारी

गुरुवार, १ फेब्रुवारी

जसं मी तुमच्यावर प्रेम केलंय, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.​—योहा. १५:१२.

आजच्या वचनातल्या शब्दांचा काय अर्थ होतो? येशूने समजावून सांगितलं, की हे आत्मत्यागी प्रेम आहे. म्हणजेच, वेळ पडली तर एक ख्रिस्ती आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी स्वतःचा जीव द्यायलाही तयार असेल. प्रेम किती महत्त्वाचं आहे हे बायबलमध्ये वारंवार सांगण्यात आलंय. बऱ्‍याच लोकांची आवडती वचनंसुद्धा प्रेमाबद्दलच आहेत. जसं की, “देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” (मत्त. २२:३९) “प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.” (१ पेत्र ४:८) “प्रेम कधीही नाहीसं होत नाही.” (१ करिंथ. १३:८) बायबलमधली ही आणि अशी इतर वचनं वाचल्यावर लक्षात येतं, की प्रेमाचा हा सुंदर गुण विकसित करणं आणि तो दाखवणं किती महत्त्वाचं आहे. खऱ्‍या प्रेमाचा उगम यहोवाच आहे. आणि ज्यांच्यावर यहोवाची पवित्र शक्‍ती आणि त्याचा आशीर्वाद आहे त्यांच्यामध्येच खरं प्रेम असू शकतं. (१ योहा. ४:७) म्हणूनच निःस्वार्थ प्रेम हे आपल्या खऱ्‍या शिष्यांचं ओळखचिन्ह असेल असं जे येशूने म्हटलं त्याचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. येशूने सांगितलं होतं त्याप्रमाणे आपल्यातलं खरं प्रेम पाहूनच अनेक जण हे ओळखतात की आपण येशूचे खरे शिष्य आहोत. टेहळणी बुरूज२३.०३ २७-२८ ¶५-८

शुक्रवार, २ फेब्रुवारी

तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.​—लूक ७:४८.

तुम्हाला इतरांना माफ करायची वृत्ती स्वतःमध्ये वाढवायची गरज आहे का? असेल, तर ज्यांनी क्षमाशील वृत्ती दाखवली आणि ज्यांनी दाखवली नाही, अशी बायबलमधली काही उदाहरणं तुम्ही वाचू शकता आणि त्यावर मनन करू शकता. जसं की, येशूच्या उदाहरणाचा विचार करा. तो क्षमा करायला नेहमी तयार होता. (लूक ७:४७) इतरांनी आधी केलेल्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी पुढे ते काय चांगलं करू शकतात याकडे त्याने लक्ष दिलं. याउलट त्या काळात परूशी लोक “इतरांना अगदीच तुच्छ लेखायचे.” (लूक १८:९) मग अशा काही उदाहरणांवर मनन केल्यानंतर स्वतःला विचारा: ‘मला इतरांमधले चांगले गुण दिसतात का? मी त्यांच्या कोणत्या गुणांकडे जास्त लक्ष देतो?’ तुम्हाला जर एखाद्याला माफ करायला कठीण जात असेल, तर त्यांच्यात कोणकोणते चांगले गुण आहेत ते सगळे लिहून काढा. आणि मग स्वतःला विचारा: ‘माझ्या जागी येशू असता तर त्याने या व्यक्‍तीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं असतं? त्याने त्याला माफ केलं नसतं का?’ असं केल्यामुळे इतरांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला बदलता येईल. सुरुवातीला कदाचित ज्याने आपलं मन दुखावलं आहे, त्याला माफ करणं आपल्याला कठीण जाईल. पण अशा प्रकारे जर आपण प्रयत्न करत राहिलो, तर इतरांना माफ करणं आपल्याला सोपं जाईल. टेहळणी बुरूज२२.०४ २३ ¶६

शनिवार, ३ फेब्रुवारी

येशूने आपल्या दूताला पाठवून [प्रकटीकरण] चिन्हांच्या रूपात प्रकट केलं.​—प्रकटी. १:१.

प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाचे शत्रू कोण आहेत हेसुद्धा लाक्षणिक भाषेत सांगितलं आहे. या पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या जंगली पशूंचं वर्णन वाचायला मिळतं. उदाहरणार्थ, यापैकी “एक जंगली पशू समुद्रातून वर येताना” दिसतो. याला “दहा शिंगं आणि सात डोकी” आहेत. (प्रकटी. १३:१) त्यानंतर “आणखी एक जंगली पशू पृथ्वीतून वर येताना” दिसतो. हा जंगली पशू अजगरासारखा बोलतो आणि “आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.” (प्रकटी. १३:११-१३) पुढे आपण एक वेगळ्या प्रकारचा पशू पाहतो. या “गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर,” एक वेश्‍या बसलेली आहे. हे तीन जंगली पशू अशा शत्रूंना सूचित करतात, जे बऱ्‍याच काळापासून यहोवा देवाचा आणि त्याच्या राज्याचा विरोध करत आले आहेत. आणि म्हणूनच हे शत्रू नेमके कोण आहेत, हे समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. (प्रकटी. १७:१, ३) वेगवेगळे पशू आणि वेश्‍या कोणाला सूचित करते हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण बायबलचीच मदत घेऊ शकतो. कारण प्रकटीकरणात सांगितलेल्या बऱ्‍याच चिन्हांबद्दल बायबलच्या इतर पुस्तकांमध्ये आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. टेहळणी बुरूज२२.०५ ८-९ ¶३-४

रविवार, ४ फेब्रुवारी

तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने प्रेम कर.​—मत्त. २२:३७.

वाढत्या वयामुळे किंवा आजारपणामुळे यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांना आधीसारखी सेवा करता येत नाही. तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला जास्त करता येत नसेल आणि तुम्ही निराश होत असाल तर स्वतःला विचारा: ‘यहोवाची माझ्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे?’ त्याची हीच अपेक्षा आहे की तुमच्या सध्याच्या परिस्थितीनुसार तुमच्या परीने तुम्ही सर्वात चांगलं ते द्यावं. ८० वर्षांच्या एका वयस्कर बहिणीचा विचार करा. त्यांना वाटतं की ४० वर्षांच्या असताना त्या जितकं करू शकत होत्या तितकं त्यांना आता करता येत नाही. आणि यामुळे त्या दुःखी होतात. त्या यहोवाची सेवा मनापासून करत आहेत पण त्यांना वाटतं की तो त्यांच्यावर खूश नाही. पण खरंच असं आहे का? जरा विचार करा, त्या ४० वर्षांच्या होत्या तेव्हाही त्या यहोवाची मनापासून सेवा करत होत्या आणि आता ८० वर्षांच्या असतानाही त्या मनापासून सेवा करत आहेत. याचाच अर्थ, त्या आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते देत आहेत. जर आपण सर्वात चांगलं ते दिलं तर तो नक्कीच आपल्याला “शाब्बास!” म्हणेल. (मत्तय २५:२०-२३ सोबत तुलना करा.) आपली परिस्थिती चांगली नसली तरी आपण आनंदी राहू शकतो. यासाठी आपण यहोवाच्या सेवेत काय करू शकत नाही यापेक्षा काय करू शकतो यावर लक्ष लावलं पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०४ १० ¶२; ११ ¶४-६

सोमवार, ५ फेब्रुवारी

मला पवित्र नगरी, नवीन यरुशलेम दिसली.​—प्रकटी. २१:२.

प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायात १,४४,००० जणांची तुलना एका सुंदर शहरासोबत केली आहे. त्याला ‘नवीन यरुशलेम’ असं म्हटलं आहे. या शहराला १२ दगडांचा पाया आहे आणि त्यावर “कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची १२ नावं लिहिलेली” आहेत. (प्रकटी. २१:१०-१४; इफिस. २:२०) हे लाक्षणिक शहर इतर सर्व शहरांपेक्षा खूपच वेगळं आहे. या शहराचा मुख्य रस्ता शुद्ध सोन्याचा आहे. त्याची १२ फाटकं मोत्यांची आहेत. तसंच त्याच्या भिंती आणि पाये मौल्यवान रत्नांनी सजवलेले आहेत. आणि हे शहर चौकोनी आहे. त्याच्या रुंदीइतकीच त्याची लांबी आहे. (प्रकटी. २१:१५-२१) पण योहानच्या लक्षात येतं की या शहरात एक गोष्ट नाही. तो पुढे काय म्हणतो याकडे लक्ष द्या. “त्या नगरात मला मंदिर दिसलं नाही, कारण सर्वसमर्थ देव यहोवा आणि कोकरा हेच त्याचं मंदिर आहे. त्या नगराला सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. कारण देवाच्या तेजाने ते नगर प्रकाशित होतं आणि कोकरा त्याचा दीप आहे.” (प्रकटी. २१:२२, २३) नवीन यरुशलेम शहर ज्यांनी मिळून बनलं आहे ते १,४४,००० जण खुद्द यहोवासोबत असतील.​—इब्री ७:२७; प्रकटी. २२:३, ४. टेहळणी बुरूज२२.०५ १७-१८ ¶१४-१५

मंगळवार, ६ फेब्रुवारी

एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा. . . . यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.​—कलस्सै. ३:१३.

यहोवा आपला निर्माणकर्ता, आपल्याला नियम देणारा आणि आपला न्यायाधीश आहे. (स्तो. १००:३; यश. ३३:२२) त्यामुळे आपण पाप करतो तेव्हा आपल्याला क्षमा करायचा त्याला अधिकार आहे. पण तो आपला प्रेमळ पितासुद्धा आहे. आणि म्हणून आपण मनापासून पश्‍चात्ताप करतो तेव्हा तो आपल्याला क्षमा करायला नेहमी तयार असतो. (स्तो. ८६:५) यशया संदेष्ट्याद्वारे यहोवा आपल्याला प्रेमळपणे असं सांगतो: “तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील.” (यश. १:१८) आपण सगळे अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हातून चुका होतात आणि आपण एकमेकांचं मन दुखावतो. (याको. ३:२) मग याचा अर्थ असा होतो का, की आपण एकमेकांसोबत चांगलं नातं ठेवूच शकत नाही? नाही, याचा असा अर्थ होत नाही. आपण नक्कीच एकमेकांसोबत चांगलं नातं ठेवू शकतो. पण त्यासाठी आपण एकमेकांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. (नीति. १७:९; १९:११; मत्त. १८:२१, २२) यहोवाची इच्छा आहे की जेव्हा आपण छोट्यामोठ्या चुका करतो आणि एकमेकांना दुखावतो, तेव्हा आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे. आणि असं करणं हे आपलं कर्तव्यच आहे. कारण यहोवा आपल्याला कितीतरी वेळा “मोठ्या मनाने” क्षमा करतो.​—यश. ५५:७. टेहळणी बुरूज२२.०६ ८ ¶१-२

बुधवार, ७ फेब्रुवारी

तुम्ही विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात, त्यांचं अनुकरण करणारे व्हाल.​—इब्री ६:१२.

हे खरं आहे की आपण इतरांसोबत स्वतःची तुलना करू नये, पण देवाच्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांतून आपण नक्कीच खूप काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, आपण येशूकडून बरंच काही शिकू शकतो. तो परिपूर्ण होता. तरी अपरिपूर्ण मानव त्याने दाखवलेल्या सुंदर गुणांतून आणि कामांतून शिकू शकतात. (१ पेत्र २:२१) आपण जर त्याच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण करायचा प्रयत्न केला तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे यहोवाची सेवा करता येईल. बायबलमध्ये अशा कितीतरी विश्‍वासू स्त्री-पुरूषांची उदाहरणं आहेत जे आपल्यासारखेच अपरिपूर्ण होते. पण तरीसुद्धा आपण त्यांच्या उदाहरणांचं अनुकरण करू शकतो. दावीद राजाचाच विचार करा. त्याच्याबद्दल यहोवाने म्हटलं, की तो “माझ्या मनासारखा माणूस” आहे. (प्रे. कार्यं १३:२२) पण दावीदने काही गंभीर चुका केल्या. असं असलं तरी तो आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. असं का म्हणता येईल? कारण आपल्या चुकांसाठी त्याने कारणं दिली नाहीत. उलट, कडक शब्दांत दिलेला सल्ला त्याने स्वीकारला आणि त्याने जे काही केलं होतं त्याबद्दल त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला. यामुळे यहोवाने त्याला माफ केलं.​—स्तो. ५१:३, ४, १०-१२. टेहळणी बुरूज२२.०४ १३ ¶११-१२

गुरुवार, ८ फेब्रुवारी

माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपल्याकडे असलेलं सर्वकाही देईल.​—ईयो. २:४.

बायबलमध्ये मृत्यूला शत्रू म्हटलंय. (१ करिंथ. १५:२५, २६) मरणाच्या विचारानेच आपल्याला भीती वाटते. खासकरून जेव्हा आपण किंवा आपल्या जवळचे लोक गंभीर आजाराचा सामना करत असतात तेव्हा. पण आपल्याला मरणाची भीती का वाटते? कारण आपल्याला निर्माण करतानाच यहोवाने आपल्या मनात कायम जगण्याची इच्छा घातली आहे. (उप. ३:११) मरणाची भीती वाटत असल्यामुळेच आपण आपलं आरोग्य जपायचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी आपण चांगला आहार घेतो आणि व्यायाम करतो. तसंच आजारी पडल्यावर आपण लगेच डॉक्टरकडे जातो आणि औषधोपचार घेतो. तसंच आपण विनाकारण आपला जीव धोक्यात घालत नाही. त्यामुळे मरणाच्या भीतीमुळे एक प्रकारे आपलं संरक्षणच होतं असं म्हणता येईल. जीवन आपल्यासाठी मौल्यवान आहे, हे सैतानाला माहीत आहे. त्यामुळे त्याचा असा दावा आहे, की जीव वाचवण्यासाठी आपण काहीही करायला तयार होऊ. अगदी यहोवासोबतचं आपलं नातं तोडायलाही तयार होऊ. (ईयो. २:५) सैतानाचा हा दावा किती खोटा आहे! पण सैतानाजवळ “मृत्यू घडवून आणण्याची ताकद” असल्यामुळे तो आपल्याला वाटणाऱ्‍या भीतीचा फायदा घेतो. आणि आपण यहोवाला सोडून द्यावं म्हणून तो आपल्याला मरणाचा धाक दाखवतो.​—इब्री २:१४, १५. टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१५-१६

शुक्रवार, ९ फेब्रुवारी

सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये.​—इफिस. ४:२६.

जिथे बंदी आहे अशा ठिकाणी आपल्याला छोट्या-छोट्या गटांमध्ये भेटावं लागेल. म्हणून आपण आत्तापासूनच भाऊबहिणींसोबत शांतीचं नातं टिकवून ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला एकमेकांशी नाही तर सैतानाशी लढायचं आहे. म्हणून आपल्या भाऊबहिणींच्या चुकांकडे जास्त लक्ष देऊ नका. किंवा मतभेद झाले तर ते लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करा. (नीति. १९:११) एकमेकांना मदत करायच्या बाबतीत पुढाकार घ्या. (तीत ३:१४) सर्व भाऊबहिणींनी मिळून जेव्हा अपघात झालेल्या एका बहिणीला मदत केली, तेव्हा त्याचा चांगला परिणाम प्रचारकार्याच्या गटातल्या इतर भाऊबहिणींवरपण झाला. ते आणखी एकमेकांच्या जवळ आले आणि त्याच्यातलं नातं आणखी घट्ट झालं. (स्तो. १३३:१) आज बऱ्‍याच देशांमध्ये सरकारने आपल्या कामावर बंदी घातली आहे. पण अशा ठिकाणी आपले हजारो भाऊबहीण विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. काहींना तर त्यांच्या विश्‍वासामुळे जेलमध्ये टाकण्यात आलंय. आपण अशा भाऊबहिणींसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करू शकतो. आपण अशा भाऊबहिणींसाठीही प्रार्थना करू शकतो जे जेलमध्ये असलेल्या या भाऊबहिणींना मदत करत आहेत. त्यांना माहीत आहे की आपल्यालाही अटक केली जाऊ शकते, पण तरीही न घाबरता ते जेलमध्ये असलेल्या या भाऊबहिणींना गरजेच्या वस्तू पुरवतात, त्यांना यहोवावर भरवसा ठेवायला उत्तेजन देतात आणि कोर्टात त्यांच्यावतीने लढतात. (कलस्सै. ४:३, १८) म्हणून, अशा भाऊबहिणींसाठी प्रार्थना केली नाही तरी काय फरक पडेल, असा विचार करू नका. कारण प्रार्थनेत जबरदस्त ताकद असते!​—२ थेस्सलनी. ३:१, २; १ तीम. २:१, २. टेहळणी बुरूज२२.१२ २६-२७ ¶१५-१६

शनिवार, १० फेब्रुवारी

इतरांना शिकवणारा तू, स्वतःला का शिकवत नाहीस?​—रोम. २:२१.

मुलं सहसा आपल्या आईवडिलांचं अनुकरण करतात. अर्थात, आईवडीलसुद्धा अपरिपूर्ण आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हातूनही चुका होतात. (रोम. ३:२३) पण असं असलं, तरी आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. एका वडिलाने असं म्हटलं: “स्पंज जसं सगळं काही शोषून घेतो तशीच मुलंही असतात. आम्ही मुलांना जे शिकवतो त्याप्रमाणे जर वागलो नाही, तर मुलं ही गोष्ट लगेच आमच्या लक्षात आणून देतात. म्हणूनच, जर मुलांनी यहोवावर प्रेम करावं अशी आपली इच्छा असेल, तर आपण स्वतः त्याच्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि हे आपल्या वागण्यातून दिसून आलं पाहिजे.” आईवडिलांनो ही गोष्ट कधीही विसरू नका, की यहोवावर असलेल्या तुमच्या प्रेमाचा तुमच्या मुलांवर जबरदस्त प्रभाव पडतो. तुम्ही आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला बऱ्‍याच मार्गांनी शिकवू शकता. १७ वर्षांचा अँड्रू म्हणतो: “प्रार्थना करणं किती महत्त्वाचंय हे माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून शिकवलंय. दररोज रात्री झोपण्याआधी माझी स्वतःची प्रार्थना झाली असली, तरी पप्पा माझ्यासोबत येऊन प्रार्थना करायचे. . . . आज मी अगदी सहजपणे यहोवाशी प्रार्थनेत बोलतो. आणि तो माझा पिता आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतो ही गोष्ट मला जाणवते. माझ्या आईवडिलांनी मला प्रार्थनेचं महत्त्व शिकवल्यामुळेच हे शक्य झालं.” टेहळणी बुरूज२२.०५ २८ ¶७-८

रविवार, ११ फेब्रुवारी

ही घटना आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे तुम्हाला वाचवणाऱ्‍या बाप्तिस्म्याचे चिन्ह आहे.​—१ पेत्र ३:२१.

बाप्तिस्मा घ्यायला सगळ्यात आधी आपण आपल्या पापांसाठी मनापासून पश्‍चात्ताप केला पाहिजे. (प्रे. कार्यं २:३७, ३८) कारण जर आपण मनापासून पश्‍चात्ताप केला, तरच आपल्याला स्वतःमध्ये प्रामाणिकपणे बदल करता येतील. यहोवाला न आवडणाऱ्‍या सगळ्या वाईट सवयी, जसं की अनैतिक जीवन, तंबाखूचं व्यसन, घाणेरडी भाषा किंवा शिवीगाळ यांसारख्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या आहेत का? (१ करिंथ. ६:९, १०; २ करिंथ. ७:१; इफिस. ४:२९) तुम्ही असं केलं नसेल, तर प्रयत्न करायचं सोडू नका. ज्यांच्यासोबत तुम्ही अभ्यास करत आहात त्यांच्याशी बोला किंवा मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. जर तुम्ही लहान असाल, तर तुमच्या आईवडिलांची मदत घ्या. ते तुम्हाला अशा वाईट सवयी सोडायला मदत करतील. यहोवाच्या सेवेतली कामं नियमितपणे करणंही तितकंच महत्त्वाचंय. यामध्ये ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणं आणि त्यांत भाग घेणंही येतं. या गोष्टींची स्वतःला सवय लावून घ्या. (इब्री १०:२४, २५) आणि प्रचारकार्यासाठी पात्र ठरल्यावर ते नियमितपणे करत राहा. टेहळणी बुरूज२३.०३ १०-११ ¶१४-१६

सोमवार, १२ फेब्रुवारी

यहोवा देव सापाला म्हणाला: “तू हे केलंस, त्यामुळे तू शापित आहेस.”​—उत्प. ३:१४.

उत्पत्ती ३:१४, १५ या वचनांमध्ये ‘साप,’ आणि ‘सापाची संतती’ यांचा उल्लेख केलाय. एदेन बागेत यहोवाने जे म्हटलं ते साहजिकच एका सापाला समजू शकत नाही. त्यामुळे भविष्यवाणीत ज्याचा उल्लेख केलाय तो खरोखरचा साप असू शकत नाही. तर मग तो कोण आहे? तो नक्कीच विचार करू शकणारा एक व्यक्‍ती असला पाहिजे. प्रकटीकरण १२:९ आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतं, की ‘जुना साप’ हा दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे. बायबलमध्ये प्रत्येकच ठिकाणी संतती हा शब्द एखाद्याच्या मुलांबद्दल सांगण्यासाठी वापरलेला नाही. तर एखाद्याच्या विचारांचं आणि वागणुकीचं अनुकरण करणाऱ्‍यांनाही त्याची संतती असं म्हटलंय. त्यामुळे सापाची संतती हे असे दुष्ट स्वर्गदूत आणि मानव आहेत, जे सैतानाप्रमाणेच यहोवा देवाचा आणि त्याच्या लोकांचा विरोध करतात. यांमध्ये नोहाच्या काळात ज्यांनी स्वर्गातलं आपलं स्थान सोडून दिलं होतं ते दुष्ट स्वर्गदूतही आहेत. तसंच जे दुष्ट मानव त्यांच्या पित्यासारखं म्हणजेच सैतानासारखंच वागतात तेसुद्धा यांमध्ये आहेत.​—उत्प. ६:१, २; योहा. ८:४४; १ योहा. ५:१९; यहू. ६. टेहळणी बुरूज२२.०७ १४-१५ ¶४-५

मंगळवार, १३ फेब्रुवारी

कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.​—फिलिप्पै. १:१०.

प्रेषित पौलचं भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. शिवाय त्याने स्वतःही बऱ्‍याच परीक्षांचा सामना केला होता. त्यामुळे जेव्हा भाऊबहीण कठीण परिस्थितीतून जात होते, तेव्हा तो त्यांना सहानुभूती दाखवू शकला आणि त्यांची परिस्थिती समजून घेऊ शकला. एकदा जेव्हा त्याला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला, तेव्हा स्वतःचं आणि आपल्या सोबत्यांचं पोट भरण्यासाठी त्याला कष्टाचं काम करावं लागलं. (प्रे. कार्यं २०:३४) तो तंबू बनवायचं काम करायचा. करिंथला आल्यावर त्याने सुरुवातीला अक्विल्ला आणि प्रिस्किल्लासोबत काम केलं कारण तेसुद्धा तंबू बनवायचे. पण “दर शब्बाथाच्या दिवशी” तो यहुदी आणि ग्रीक लोकांना आनंदाचा संदेश सांगायचा. मग जेव्हा सीला आणि तीमथ्य आले “तेव्हा पौलने प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं.” (प्रे. कार्यं १८:२-५) यावरून कळतं, की आपल्या जीवनातलं सगळ्या महत्त्वाचं काम पौल कधीच विसरला नव्हता. ते म्हणजे यहोवाची सेवा करणं. पौल स्वतः कष्ट करत असल्यामुळे तो भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊ शकला. जीवनातल्या समस्यांमुळे किंवा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागत असल्यामुळे त्यांनी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींकडे, म्हणजेच यहोवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष करायला नको याची पौलने त्यांना आठवण करून दिली. टेहळणी बुरूज२२.०८ २० ¶३

बुधवार, १४ फेब्रुवारी

सगळ्या राष्ट्रांत राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.​—मार्क १३:१०.

संपूर्ण पृथ्वीवर राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला जावा अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) हे काम इतकं महत्त्वाचं आहे, की या कामाचं मार्गदर्शन करायची जबाबदारी त्याने आपल्या प्रिय मुलावर सोपवली आहे. आपल्याला याची खातरी आहे की या कामासाठी येशू अगदी योग्य आहे. आणि अंत येण्याआधी त्याच्या देखरेखीखाली हे काम यहोवाच्या इच्छेप्रमाणे नक्की पूर्ण केलं जाईल. (मत्त. २४:१४) आपण असं का म्हणू शकतो? स्वर्गात जाण्याआधी येशू गालीलमधल्या एका डोंगरावर आपल्या काही विश्‍वासू शिष्यांना भेटला. त्याने त्यांना सांगितलं: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.” आणि यानंतर लगेच तो त्यांना म्हणाला: “म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.” (मत्त. २८:१८, १९) तर यावरून कळतं, की प्रचाराच्या कामाचं मार्गदर्शन करायचा अधिकारही येशूला देण्यात आलाय. तसंच त्याच्या देखरेखीखाली प्रचाराचं हे काम आपल्या काळापर्यंत चालू राहील. टेहळणी बुरूज२२.०७ ८ ¶१, ३; ९ ¶४

गुरुवार, १५ फेब्रुवारी

अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे त्याची हाक ऐकतील आणि बाहेर येतील. चांगली कामं करणाऱ्‍यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल.​—योहा. ५:२८, २९.

नीतिमान लोक म्हणजे ज्यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी चांगली कामं केली होती. त्यांचं पुनरुत्थान हे “जीवनाचं पुनरुत्थान” असेल कारण त्यांची नावं आधीच जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असतील. याचा अर्थ योहान ५:२९ मध्ये ‘चांगली कामं करणाऱ्‍यांच्या’ पुनरुत्थानाबद्दल जे सांगितलं आहे आणि प्रेषितांची कार्यं २४:१५ मध्ये ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानाबद्दल’ जे सांगितलं आहे, ते सारखंच आहे. रोमकर ६:७ मध्ये म्हटलंय: “जो मेला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आलं आहे.” हे खरं आहे, की नीतिमान लोकांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या पापांपासून ते मुक्‍त होतात. पण त्यांनी विश्‍वासूपणे केलेली सेवा यहोवा विसरणार नाही. (इब्री ६:१०) असं असलं तरी पुनरुत्थान झालेल्या या नीतिमान लोकांची नावं पुढेही जीवनाच्या पुस्तकात राहावीत म्हणून त्यांनी नवीन जगात विश्‍वासू राहणं गरजेचं असेल. टेहळणी बुरूज२२.०९ १८ ¶१३, १५

शुक्रवार, १६ फेब्रुवारी

[यहोवाची] सर्व कार्यं भरवशालायक आहेत.​—स्तो. ३३:४.

भरवशालायक असण्याच्या बाबतीत दानीएल संदेष्ट्याने आपल्यासमोर एक खूप चांगलं उदाहरण मांडलंय. त्याला बाबेलमध्ये कैदी बनवून नेण्यात आलं होतं. तरीसुद्धा काही काळातच भरवशालायक असण्याच्या बाबतीत त्याने एक चांगलं नाव कमवलं होतं. आणि जेव्हा यहोवाच्या मदतीने त्याने बाबेलच्या नबुखद्‌नेस्सर राजाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, तेव्हा लोकांचा त्याच्यावरचा भरवसा आणखीनच वाढला. (दानी. ४:२०-२२, २५) मग बऱ्‍याच वर्षांनंतर बाबेलच्या राजमहालाच्या भिंतीवर एक गूढ संदेश दिसला. या गूढ संदेशाचा अचूक अर्थ सांगून दानीएलने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की तो भरवशालायक आहे. (दानी. ५:५, २५-२९) पुढे, मेदचा राजा दारयावेश आणि त्याच्या अधिकाऱ्‍यांनीही ही गोष्ट ओळखली की दानीएलकडे “विलक्षण बुद्धिमत्ता” आहे. दानीएल “भरवशालायक असून त्याच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा किंवा अप्रामाणिकपणा” नाही ही गोष्ट त्यांनी मान्य केली. (दानी. ६:३, ४) आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो: ‘लोक मला एक भरवशालायक व्यक्‍ती म्हणून ओळखतात का?’ आपण भरवशालायक असतो तेव्हा यहोवाची स्तुती होते. टेहळणी बुरूज२२.०९ ८-९ ¶२-४

शनिवार, १७ फेब्रुवारी

देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा.​—इफिस. ५:१.

बरोबर आणि चूक याबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांचं पालन करणं आपल्यासाठी फायद्याचं आहे. असं का म्हणता येईल? कल्पना करा, की प्रत्येक चौकात जर ट्रॅफिक सिग्नल लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या ऐवजी वेगवेगळ्या रंगाचे असतील तर काय होईल. यामुळे खूप गोंधळ माजेल आणि बरेच अपघात होतील. तसंच विचार करा, की जर बांधकाम करणाऱ्‍या कंपन्यांनी कोणतेच नियम पाळले नाहीत किंवा हलक्या दर्जाचा माल वापरला तर काय होईल? यामुळे बांधकाम चांगल्या दर्जाचं होणार नाही आणि बिल्डींग कोसळून बऱ्‍याच जणांचा मृत्यू होऊ शकतो. तसंच डॉक्टर किंवा नर्सने उपचार करताना योग्य नियम पाळले नाहीत तर कितीतरी लोकांचा जीव जाऊ शकतो. यावरून कळतं की भरवशालायक स्तर किंवा नियम असणं गरजेचं आहे कारण यामुळे आपलं संरक्षण होतं. त्याच प्रकारे यहोवाच्या स्तरांमुळेसुद्धा आपलं संरक्षण होतं. जे यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात त्यांना तो आशीर्वाद देतो. त्याने असं वचन दिलंय: “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.” (स्तो. ३७:२९) संपूर्ण जगात जेव्हा लोक यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागतील तेव्हा लोकांमध्ये किती ऐक्य असेल आणि किती शांतीचं आणि आनंदाचं वातावरण असेल याची कल्पना करा! तुम्ही असं आनंदी जीवन जगावं अशी यहोवाची इच्छा आहे. खरंच, आपल्यापैकी प्रत्येकाने नीतिमत्त्वावर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे! टेहळणी बुरूज२२.०८ २७-२८ ¶६-८

रविवार, १८ फेब्रुवारी

सगळ्या बाबतींत सावध राहा.​—२ तीम. ४:५.

जेव्हा आपल्यापुढे समस्या येतात तेव्हा यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. मग या समस्यांवर आपण मात कशी करू शकतो. त्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे आणि विश्‍वासात स्थिर राहिलं पाहिजे. सावध राहण्याचा अर्थ होतो, की आपण शांत राहून स्पष्टपणे विचार करतो आणि सर्व गोष्टींच्या बाबतीत यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतो. असं केल्यामुळे आपल्याला भावनांच्या आहारी न जाता योग्यपणे विचार करायला मदत होईल. एखादा भाऊ किंवा बहीण किंवा मग एखादा जबाबदार बांधव तुमच्याशी चुकीचं वागलाय असं कदाचित तुम्हाला वाटलं असेल. कदाचित त्या बांधवाला तुम्हाला मुद्दाम दुखवायचं नसेल. (रोम. ३:२३; याको. ३:२) असं असलं तरी त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल. तुम्ही असासुद्धा विचार केला असेल, ‘एक भाऊ असं कसं काय वागू शकतो? ही खरंच यहोवाची संघटना आहे का?’ खरंतर आपण असाच विचार करावा अशी सैतानाची इच्छा आहे. (२ करिंथ. २:११) पण असा चुकीचा विचार केल्यामुळे आपण यहोवापासून आणि त्याच्या संघटनेपासून दूर जाऊ शकतो. मनात राग ठेवू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज२२.११ २० ¶१, ३; २१ ¶४

सोमवार, १९ फेब्रुवारी

यहोवावर आशा ठेव.​—स्तो. २७:१४.

यहोवाने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची एक अद्‌भुत आशा दिली आहे. काही जणांना स्वर्गात अमर जीवनाची आशा आहे. (१ करिंथ. १५:५०, ५३) पण बहुतेक जणांना पृथ्वीवर कायमचं निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची आशा आहे. (प्रकटी. २१:३, ४) आपली आशा कुठलीही असो, स्वर्गातली किंवा पृथ्वीवरची, ती आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. भविष्याबद्दलच्या आशेची आपल्याला पक्की खातरी आहे, कारण ती स्वतः यहोवाने आपल्याला दिली आहे. (रोम. १५:१३) त्याने आपल्याला काय वचन दिलंय हे आपल्याला माहीत आहे. आणि दिलेलं वचन तो नेहमी पूर्ण करतो हेही आपल्याला माहीत आहे. (गण. २३:१९) तसंच, आपल्याला याचीही खातरी आहे, की त्याने जे वचन दिलंय, ते पूर्ण करायची इच्छा आणि ताकदही त्याच्यामध्ये आहे. आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा असं त्याला वाटतं. यहोवावर आपली आशा पक्की असेल, तर आपल्याला परीक्षांना धीराने तोंड देता येईल आणि धैर्याने आणि आनंदाने भविष्याचा सामना करता येईल. टेहळणी बुरूज२२.१० २४ ¶१-३

मंगळवार, २० फेब्रुवारी

ते बंडखोर लोक आहेत, यहोवाची शिकवण ऐकायची त्यांची मुळीच इच्छा नाही.​—यश. ३०:९.

लोकांनी यहोवाचं ऐकायला नकार दिल्यामुळे यशयाने सांगितलं, की यहोवा त्यांच्यावर संकट येऊ देईल. (यश. ३०:५, १७; यिर्म. २५:८-११) आणि अगदी तसंच झालं. त्या लोकांना बंदी बनवून बाबेलला नेण्यात आलं. पण त्या यहुद्यांपैकी काही जण विश्‍वासू होते. यशयाने त्यांना सांगितलं, की यहोवा एक दिवस त्यांना यरुशलेमला पुन्हा परत आणेल आणि ते तिथे राहू शकतील. (यश. ३०:१८, १९) यशयाचे हे शब्द पूर्ण झाले. यहोवाने त्यांना बंदिवासातून सोडवलं. पण त्यांची सुटका लगेच झाली नाही. यशयाने म्हटलं होतं, की “तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे.” या शब्दांवरून कळतं, की विश्‍वासू यहुद्यांची सुटका होण्याआधी काही काळ जाणार होता. खरंतर इस्राएली लोकांना ७० वर्षं बाबेलमध्ये राहावं लागलं आणि त्यानंतरच त्यांच्यापैकी उरलेले काही लोक यरुशलेमला परत येऊ शकले. (यश. १०:२१; यिर्म. २९:१०) बंदिवासात असताना ते दुःखाचे अश्रू गाळत होते. पण आपल्या मायदेशी परत आल्यावर त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. टेहळणी बुरूज२२.११ ९ ¶४

बुधवार, २१ फेब्रुवारी

नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत.​—मत्त. ५:१०.

येशूबद्दल साक्ष देत असल्यामुळे पहिल्या शतकात प्रेषितांचा छळ करण्यात आला. आणि आजही काही देशांत आपल्या भाऊबहिणींना अशाच छळाचा सामना करावा लागत आहे. यहुद्यांच्या न्यायसभेने प्रेषितांना असं बजावून सांगितलं होतं, की “त्यांनी येशूच्या नावाने काहीच बोलू किंवा शिकवू नये.” (प्रे. कार्यं ४:१८-२०; ५:२७, २८, ४०) पण प्रेषितांना माहीत होतं, की या अधिकाऱ्‍यांपेक्षाही ज्याला मोठा अधिकार आहे, त्याने त्यांना ख्रिस्ताबद्दल ‘प्रचार करायची आणि पूर्ण साक्ष द्यायची’ आज्ञा दिली आहे. (प्रे. कार्यं १०:४२) म्हणून प्रेषितांच्या वतीने बोलताना पेत्र आणि योहान यांनी धैर्याने त्यांना सांगितलं, की ते त्यांच्याऐवजी देवाची आज्ञा पाळतील आणि ते येशूबद्दल बोलायचं थांबवणार नाहीत. (प्रे. कार्यं ५:२९) प्रेषितांच्या एकनिष्ठेबद्दल त्यांना फटके मारण्यात आले. पण तरी “येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं, म्हणून ते आनंदाने न्यायसभेतून बाहेर गेले.” आणि ते लगेच आनंदाचा संदेश सांगू लागले!​—प्रे. कार्यं ५:४१, ४२. टेहळणी बुरूज२२.१० १२-१३ ¶२-४

गुरुवार, २२ फेब्रुवारी

माझ्यासाठी तर देवाच्या जवळ जाणं हेच हिताचं आहे.​—स्तो. ७३:२८.

जेव्हा आपण यहोवाबद्दल शिकायला सुरुवात करतो, तेव्हा आपण बायबलच्या फक्‍त मूलभूत गोष्टी शिकतो. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलने या मूलभूत गोष्टींना “प्राथमिक गोष्टी” असं म्हटलं. पण असं म्हणून, तो या तत्त्वांना क्षुल्लक समजत नव्हता. उलट, त्याने त्यांची तुलना लहान बाळाला पोषण देणाऱ्‍या दुधाशी केली. (इब्री ५:१२; ६:१) पण त्याने सर्व ख्रिश्‍चनांना एवढ्यावरच न थांबता, देवाच्या वचनातली गहन सत्यं शिकण्याचंही प्रोत्साहन दिलं. तुम्ही बायबलची गहन सत्यं जाणून घ्यायची आपली भूक वाढवली आहे का? तुमच्या मनात आध्यात्मिक प्रगती करत राहायची इच्छा आहे का? तुम्हाला यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकत राहायला आवडेल का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना अभ्यास करायला कठीण जातं. तुमच्याबद्दल काय? शाळेत तुम्ही चांगलं लिहायला, वाचायला शिकला का? तुम्हाला अभ्यास करायला आवडायचं का? की आपल्याला अभ्यास कधीच जमणार नाही असं तुम्हाला वाटायचं? बऱ्‍याच लोकांनाही असंच वाटतं. पण यहोवा एक परिपूर्ण आणि सगळ्यात चांगला शिक्षक आहे. त्यामुळे तो तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. टेहळणी बुरूज२३.०३ ९-१० ¶८-१०

शुक्रवार, २३ फेब्रुवारी

नम्र व्हा आणि तुमचं तारण करायला समर्थ असलेली वचनं देवाला तुमच्या हृदयात रुजवू द्या.​—याको. १:२१.

नम्र असल्यामुळे देवाचं वचन आपल्या मनापर्यंत जाईल आणि आपल्याला स्वतःमध्ये बदल करता येतील. तसंच दया, करूणा आणि प्रेम यांसारखे सुंदर गुण आपल्याला स्वतःमध्ये विकसित करता येतील आणि आपल्या वागण्या-बोलण्यातून ते दाखवता येतील. आपण इतरांशी ज्या प्रकारे वागतो त्यावरून दिसून येईल, की आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालतो की नाही. परूश्‍यांनी देवाचं वचन वाचलं खरं, पण त्याप्रमाणे त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही. आणि त्यामुळे ‘जे निर्दोष आहेत त्यांना ते दोष लावत राहिले.’ (मत्त. १२:७) अगदी तसंच, आपण इतरांबद्दल कशा प्रकारे विचार करतो आणि त्यांच्याशी कशा प्रकारे वागतो त्यावरून दिसून येईल, की देवाच्या वचनाप्रमाणे आपण स्वतःमध्ये बदल केले आहेत की नाही. उदाहरणार्थ, आपण सहसा इतरांच्या चांगल्या गुणांबद्दल बोलतो की त्यांच्या वाईट गुणांबद्दलच बोलत असतो? आपण इतरांना दया दाखवायला आणि मोठ्या मनाने क्षमा करायला तयार असतो का? की आपण नेहमी इतरांची टिकाच करतो आणि त्यांच्याबद्दल मनात राग धरतो? या प्रश्‍नांची आपण स्वतःला जी उत्तरं देऊ त्यावरून दिसून येईल, की देवाच्या वचनाप्रमाणे आपण आपले विचार, आपल्या भावना बदलतो का आणि त्याप्रमाणे चालतो का.​—१ तीम. ४:१२, १५; इब्री ४:१२. टेहळणी बुरूज२३.०२ १२ ¶१३-१४

शनिवार, २४ फेब्रुवारी

मी तुझा देव यहोवा, तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे, “घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.”​—यश. ४१:१३.

अरिमथाई इथल्या योसेफचाच विचार करा. तो यहुदी न्यायसभेचा एका सदस्य होता. यहुदी लोकांमध्ये त्याला मानाचं स्थान होतं. तो येशूचा शिष्य तर होता, पण त्याने ही गोष्ट कधीही उघडपणे बोलून दाखवली नाही. त्याच्याबद्दल योहानने म्हटलं: “[तो] येशूचा शिष्य होता, पण ही गोष्ट त्याने यहुद्यांच्या भीतीमुळे लपवून ठेवली होती.” (योहा. १९:३८) योसेफला कदाचित ही भीती असावी, की आपण येशूचे शिष्य आहोत ही गोष्ट जर लोकांना कळली तर समाजात लोक आपल्याकडे आदराने पाहणार नाहीत. कारण काहीही असो, पण बायबल सांगतं की येशूच्या मृत्यूनंतर “तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.” (मार्क १५:४२, ४३) त्यानंतर आपण येशूचे शिष्य आहोत ही गोष्ट त्याने लोकांपासून लपवली नाही. योसेफसारखंच तुम्हालाही लोकांची भीती वाटते का? टेहळणी बुरूज२३.०१ ३० ¶१३-१४

रविवार, २५ फेब्रुवारी

तुमच्या सर्व माणसांना आणि सेवेसाठी नेहमी हजर असलेल्या तुमच्या सेवकांना तुमच्याकडून बुद्धीचे शब्द ऐकायला मिळतात, ही त्यांच्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!​—१ राजे १०:८.

शलमोनच्या राज्यात इस्राएलमध्ये इतकी शांती आणि समृद्धी होती, की त्याची बातमी दूर-दूरपर्यंत पोहोचली. शबाच्या राणीलासुद्धा त्याच्याबद्दल कळलं. शलमोनच्या राज्यात परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी ती एका दूरच्या देशातून येरुशलेमला प्रवास करून आली. (१ राजे १०:१) शलमोनच्या राज्यातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तिने आजच्या वचनातले शब्द म्हटले. पण यहोवा त्याच्या मुलाच्या म्हणजे येशूच्या राज्यात जे करेल त्याची ही फक्‍त एक झलक होती. येशू प्रत्येक बाबतीत शलमोनपेक्षा श्रेष्ठ आहे. शलमोन अपरिपूर्ण होता आणि त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देवाच्या लोकांवर पुढे अनेक संकटं आली. पण येशू एक परिपूर्ण राजा आहे आणि तो कधीच चुकत नाही. (लूक १:३२; इब्री ४:१४, १५) येशूने सिद्ध केलं की तो कधीच पाप करणार नाही किंवा अशी कोणतीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे त्याच्या प्रजेचं नुकसान होईल. खरंच येशू आपला राजा आहे ही आपल्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे! टेहळणी बुरूज२२.१२ ११ ¶९-१०

सोमवार, २६ फेब्रुवारी

जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन राहा. कारण ते तुमचं रक्षण करत आहेत.​—इब्री १३:१७.

आपण राहतो त्या ठिकाणी साथीचा रोग पसरत असेल तर काय? अशा वेळी शासनाने दिलेल्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जसं की, नियमितपणे हात धुणं, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क घालणं आणि रोगाची लक्षणं दिसत असतील तर वेगळं राहणं. आपण जेव्हा या गोष्टींचं पालन करतो तेव्हा जीवनाच्या देणगीबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दिसून येतं. तातडीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा मित्रपरिवाराकडून, शेजारपाजाऱ्‍यांकडून किंवा मिडीयाद्वारे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. अशा वेळी “प्रत्येक शब्दावर” विश्‍वास ठेवण्यापेक्षा आपण सरकारकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्‍यांकडून मिळणाऱ्‍या भरवशालायक माहितीवर विश्‍वास ठेवला पाहिजे. (नीति. १४:१५) अशा वेळी मंडळीच्या सभांबद्दल किंवा प्रचार कार्याबद्दल मार्गदर्शन देण्याआधी नियमन मंडळ आणि शाखा कार्यालयं अचूक माहिती मिळवण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्‍या सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं आपण जेव्हा पालन करतो, तेव्हा आपण स्वतःचं आणि इतरांचंही संरक्षण करत असतो. शिवाय, असं केल्यामुळे इतर लोकांसमोर यहोवाच्या साक्षीदारांचं एक चांगलं उदाहरण राहतं.​—१ पेत्र २:१२. टेहळणी बुरूज२३.०२ २३ ¶११-१२

मंगळवार, २७ फेब्रुवारी

[ऐका] आणि तुमचा देव यहोवा याचं भय मानायला [शिका].​—अनु. ३१:१३.

इस्राएली लोक जेव्हा वचन दिलेल्या देशात आले, तेव्हा ते देशभर पसरले आणि वेगवेगळ्या भागांमध्ये राहू लागले. त्यामुळे एका भागात राहणारे इस्राएली लोक दुसऱ्‍या भागात राहणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींना अगदी सहज विसरू शकत होते. पण यहोवाने असं होऊ दिलं नाही. त्याने आपल्या लोकांना अशी आज्ञा दिली, की काही खास प्रसंगी त्यांनी एकत्र यावं म्हणजे देवाचं वचन त्यांना ऐकता येईल आणि त्याचा अर्थ समजून घेता येईल. (अनु. ३१:१०-१२; नहे. ८:२, ८, १८) विचार करा, एक विश्‍वासू इस्राएली या आज्ञेप्रमाणे यरुशलेमला यायचा आणि वेगवेगळ्या भागातून आलेल्या आपल्या लाखो भाऊबहिणींना भेटायचा, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! अशा प्रकारे यहोवाने आपल्या लोकांना एकत्र यायला आणि त्यांच्यातली एकी टिकवून ठेवायला मदत केली. नंतर जेव्हा ख्रिस्ती मंडळ्यांची स्थापना झाली, तेव्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे बरेच लोक होते. पण ते सगळे एकत्र मिळून खऱ्‍या देवाची उपासना करू शकत होते. आणि नव्याने विश्‍वास स्वीकारणारे लोक इतर भाऊबहिणींच्या मदतीने आणि सभांमध्ये एकत्र येऊन देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजू शकत होते.​—प्रे. कार्यं २:४२; ८:३०, ३१. टेहळणी बुरूज२३.०२ ३ ¶७

बुधवार, २८ फेब्रुवारी

सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे गरजेचं आहे.​—योहा. १७:३.

यहोवाने आपल्याला असं अभिवचन दिलंय, की जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला “सर्वकाळाचं जीवन” मिळेल. (रोम. ६:२३) जेव्हा आपण त्याच्या अभिवचनावर मनन करतो तेव्हा त्याच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढत जातं. आपल्या स्वर्गातल्या पित्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे, की आपण त्याच्यापासून कधीच दूर होऊ नये असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याने आपल्याला हे अभिवचन दिलंय. देवाने दिलेल्या सर्वकाळाच्या जीवनाच्या अभिवचनामुळे आपण धीराने समस्यांचा सामना करू शकतो. अगदी आपल्या शत्रूंनी आपल्याला मारून टाकायची धमकी दिली, तरीसुद्धा आपण यहोवाची सेवा करायचं सोडणार नाही. याचं एक कारण म्हणजे आपला मृत्यू जरी झाला तरी यहोवाला विश्‍वासू राहिल्यामुळे तो आपल्याला पुन्हा जिवंत करेल आणि आपण पुन्हा कधीच मरणार नाही अशी आपल्याला पक्की खातरी आहे. (योहा. ५:२८, २९; १ करिंथ. १५:५५-५८; इब्री २:१५) आपल्याला माहीत आहे की यहोवा जीवनाचा उगम असल्यामुळे आणि तो कायम जिवंत असल्यामुळे आपण अशी खातरी ठेवू शकतो, की तो आपल्याला कायमचं जीवन देऊ शकतो. (स्तो. ३६:९) बायबल आपल्याला सांगतं, की यहोवा नेहमी अस्तित्वात होता आणि पुढेही त्याचं अस्तित्व कायम राहील.​—स्तो. ९०:२; १०२:१२, २४, २७. टेहळणी बुरूज२२.१२ २ ¶१-३

गुरुवार, २९ फेब्रुवारी

ख्रिस्ताच्या प्रेमापासून कोण आपल्याला वेगळं करू शकतं? संकट, दुःख, छळ . . . आपल्याला वेगळं करू शकतो का?​—रोम. ८:३५.

आपण यहोवाचे लोक आहोत. त्यामुळे आपल्यावर जेव्हा परीक्षा येतात तेव्हा आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही. कारण बायबलमध्येही असं म्हटलंय, की “आपल्याला बऱ्‍याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.” (प्रे. कार्यं १४:२२) शिवाय आपल्याला हेही माहीत आहे, की देवाच्या राज्यात जाईपर्यंत काही समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत. कारण फक्‍त देवाच्या राज्यातच “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.” (प्रकटी. २१:४) आपल्यावर संकटं येतात तेव्हा यहोवा ती आडवत नाही, पण त्यांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला नक्की मदत करतो. रोममधल्या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलने काय म्हटलं ते पाहा. सुरवातीला त्याने त्याला आणि त्याच्या ख्रिस्ती बांधवांना कोणकोणत्या वाईट परीक्षांचा सामना करावा लागला ते सांगितलं. आणि त्यानंतर त्याने लिहिलं: “ज्याने आपल्यावर प्रेम केलं त्याच्या मदतीने आपण या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे विजय मिळवत आहोत.” (रोम. ८:३६, ३७) याचाच अर्थ, आपण संकटातून जात असतानासुद्धा यहोवा आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतो. टेहळणी बुरूज२३.०१ १४ ¶१-२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा