वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es24 पृ. ७-२०
  • जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
  • उपशिर्षक
  • सोमवार, १ जानेवारी
  • मंगळवार, २ जानेवारी
  • बुधवार, ३ जानेवारी
  • गुरुवार, ४ जानेवारी
  • शुक्रवार, ५ जानेवारी
  • शनिवार, ६ जानेवारी
  • रविवार, ७ जानेवारी
  • सोमवार, ८ जानेवारी
  • मंगळवार, ९ जानेवारी
  • बुधवार, १० जानेवारी
  • गुरुवार, ११ जानेवारी
  • शुक्रवार, १२ जानेवारी
  • शनिवार, १३ जानेवारी
  • रविवार, १४ जानेवारी
  • सोमवार, १५ जानेवारी
  • मंगळवार, १६ जानेवारी
  • बुधवार, १७ जानेवारी
  • गुरुवार, १८ जानेवारी
  • शुक्रवार, १९ जानेवारी
  • शनिवार, २० जानेवारी
  • रविवार, २१ जानेवारी
  • सोमवार, २२ जानेवारी
  • मंगळवार, २३ जानेवारी
  • बुधवार, २४ जानेवारी
  • गुरुवार, २५ जानेवारी
  • शुक्रवार, २६ जानेवारी
  • शनिवार, २७ जानेवारी
  • रविवार, २८ जानेवारी
  • सोमवार, २९ जानेवारी
  • मंगळवार, ३० जानेवारी
  • बुधवार, ३१ जानेवारी
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२४
es24 पृ. ७-२०

जानेवारी

सोमवार, १ जानेवारी

यासाठीच मी तीमथ्यला तुमच्याकडे पाठवत आहे. कारण प्रभूमध्ये ते माझं प्रिय आणि विश्‍वासू लेकरू आहे.​—१ करिंथ ४:१७.

तीमथ्यमध्ये काही उल्लेखनीय ख्रिस्ती गुण होते. त्यामुळेच तो यहोवाचा चांगला सेवक बनू शकला. (फिलिप्पै. २:१९-२२) प्रेषित पौलने त्याच्याविषयी जे लिहिलं त्यावरून कळतं की तो नम्र, एकनिष्ठ, मेहनती आणि भरवशालायक होता. त्याला भाऊबहिणींची मनापासून काळजी होती. म्हणूनच पौलचा तीमथ्यवर भरवसा होता आणि त्यामुळेच त्याने त्याला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या दिल्या. त्याचप्रमाणे, आपणही जेव्हा स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण वाढवतो, तेव्हा यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि मंडळीतल्या भाऊबहिणींनाही आपला फायदा होतो. (स्तो. २५:९; १३८:६) म्हणून तुम्हाला स्वतःमध्ये कोणत्या बाबतीत सुधारणा करायची आहे, त्याबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करा. मग असा एक ख्रिस्ती गुण निवडा जो तुम्हाला स्वतःमध्ये वाढवायचा आहे. तुम्ही स्वतःला असं विचारू शकतो: ‘मी भाऊबहिणींना आणखी जास्त सहानुभूती कशी दाखवू शकतो? मी इतरांसोबत शांती राखायला आणि त्यांना माफ करायला तयार असतो का?’ तसंच, तुम्हाला आणखी कुठे सुधारणा करता येईल याबद्दल तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रालासुद्धा विचारू शकता किंवा त्याचा सल्ला घेऊ शकता.​—नीति. २७:६. टेहळणी बुरूज२२.०४ २३ ¶४-५

मंगळवार, २ जानेवारी

प्रत्येकाने आपापल्या कामांचं परीक्षण करावं.​—गलती. ६:४.

यहोवाची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं. असं आपण यासाठी म्हणू शकतो कारण आनंद हा पवित्र शक्‍तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२) बायबल असंही म्हणतं की घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे. जेव्हा आपण सेवाकार्यात पूर्ण मनाने भाग घेतो आणि आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या मार्गांनी मदत करतो, तेव्हा आपल्याला भरपूर आनंद होतो. (प्रे. कार्यं २०:३५) आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रेषित पौलने म्हटलं की आपण आनंदी राहण्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, आपण यहोवाला आपल्या परीने सर्वात चांगलं ते दिलं पाहिजे. जर आपण सर्वात चांगलं ते दिलं तर आपल्याला आनंद होईल. (मत्त. २२:३६-३८) दुसरी गोष्ट म्हणजे, आपण स्वतःची तुलना इतरांशी करू नये. आपल्याकडे जी शक्‍ती आणि कौशल्य आहे, तसंच आपल्याला जे प्रशिक्षण मिळालं आहे त्यामुळे यहोवाच्या सेवेत आपल्याला खूप काही करता येतं. आणि यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. तसंच, इतर जण सेवाकार्यातल्या काही पैलूंमध्ये आपल्यापेक्षा चांगलं करत असतील तर आपण त्याबद्दलसुद्धा आनंद मानला पाहिजे. कारण ते आपल्या कौशल्यांचा वापर यहोवाच्या गौरवासाठी करतात. टेहळणी बुरूज२२.०४ १० ¶१-२

बुधवार, ३ जानेवारी

तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.​—लूक २१:२८.

अचानक होणाऱ्‍या मोठ्या बाबेलच्या नाशामुळे हे जग हादरून जाईल. (प्रकटी. १८:८-१०) यामुळे कदाचित बऱ्‍याच कठीण परिस्थितींचा सामना करावा लागेल. पण देवाचे लोक त्या वेळी आनंदी असतील. याची दोन कारणं आहेत. एकतर, यहोवा देवाच्या एका जुन्या शत्रूचा पूर्णपणे नाश झालेला असेल. आणि दुसरं कारण म्हणजे, या दुष्ट जगापासून आपली सुटका अगदी जवळ आली असेल. दानीएलने भविष्यवाणीत सांगितलं होतं, की “खरं ज्ञान खूप वाढेल.” आणि अगदी असंच घडलंय! आपल्या काळाबद्दल केलेल्या भविष्यवाण्यांचा अर्थ आपल्याला स्पष्टपणे समजलाय. (दानी. १२:४, ९, १०) या सगळ्या भविष्यवाण्या किती तंतोतंत पूर्ण होत आहेत, हे पाहून आपण थक्क होतो आणि यहोवाबद्दल आणि त्याच्या प्रेरित वचनाबद्दल आपल्या मनातला आदर आणखी वाढतो. (यश. ४६:१०; ५५:११) म्हणून बायबलचा सखोल अभ्यास करून आणि इतरांनाही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत करून आपला विश्‍वास दिवसेंदिवस मजबूत करत राहा. जे यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतात, त्यांचं तो रक्षण करेल आणि त्यांना “कायम टिकणारी शांती” देईल.​—यश. २६:३. टेहळणी बुरूज२२.०७ ६-७ ¶१६-१७

गुरुवार, ४ जानेवारी

त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणलं. ​—प्रकटी. १६:१६.

प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपल्याला कळतं, की स्वर्गात देवाचं राज्य सुरू झालं आहे. आणि सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर फेकून देण्यात आलं आहे. (प्रकटी. १२:१-९) त्यामुळे स्वर्गात आता शांती आहे. पण आपल्यासाठी मात्र कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. का? कारण सैतान खूप क्रोधित झाला आहे आणि पृथ्वीवर यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत असलेल्यांवर तो हल्ला करत आहे. (प्रकटी. १२:१२, १५, १७) सैतान आपल्यावर वेगवेगळ्या मार्गांनी हल्ला करत असला, तरीसुद्धा आपण यहोवाला विश्‍वासू कसं राहू शकतो? (प्रकटी. १३:१०) भविष्यात काय होणार आहे, हे समजून घेतल्यामुळे आपल्याला असं करायला मदत होईल. उदाहरणार्थ, प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रेषित योहानने आपल्याला लवकरच कोणकोणते आशीर्वाद मिळणार आहेत ते सांगितलं आहे. यांपैकी एक आशीर्वाद म्हणजे, देवाच्या शत्रूंचा पूर्णपणे नाश केला जाईल. प्रकटीकरणाच्या पहिल्याच वचनात असं म्हटलं आहे, की या पुस्तकातली माहिती “चिन्हांच्या रूपात,” म्हणजेच लाक्षणिक भाषेत सांगण्यात आली आहे.​—प्रकटी. १:१. टेहळणी बुरूज२२.०५ ८ ¶१-३

शुक्रवार, ५ जानेवारी

शेवटल्या काळात मी तुला माझ्या देशाविरुद्ध घेऊन येईन. म्हणजे, तुझ्याद्वारे जेव्हा मी राष्ट्रांच्या नजरेत स्वतःला पवित्र करीन, तेव्हा हे गोग! राष्ट्रांना कळून येईल की मी कोण आहे.​—यहे. ३८:१६.

यहोवाच्या विश्‍वासू सेवकांच्या या ठाम भूमिकेमुळे यहोवाचा विरोध करणारे लोक त्यांच्यावर खूप संतापतील. आणि त्यामुळे राष्ट्रांचा एक समूह संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या लोकांवर हल्ला करेल. रागाने वेडेपिसे झालेले हे विरोधी, देवाच्या लोकांवर जो हल्ला करतील त्याला बायबलच्या भविष्यवाणीत मागोगच्या गोगचा हल्ला असं म्हटलं आहे. (यहे. ३८:१४, १५) यहोवाच्या लोकांवर हा क्रूर हल्ला केला जाईल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? तो म्हणतो: “त्या दिवशी माझा क्रोध भयंकर भडकेल.” (यहे. ३८:१८, २१-२३) यानंतर काय होईल ते आपण प्रकटीकरणाच्या १९ व्या अध्यायात वाचतो. तिथे सांगितलं आहे, की यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आपल्या मुलाला पाठवेल. मागोगच्या गोगविरुद्ध असलेल्या या लढाईत ‘स्वर्गातली सैन्यं’ म्हणजे विश्‍वासू स्वर्गदूत आणि १,४४,००० जण येशूसोबत लढतील. (प्रकटी. १७:१४; १९:११-१५) या लढाईचा शेवट कसा होईल? यहोवाचा विरोध करणाऱ्‍या सगळ्या लोकांचा आणि संघटनांचा संपूर्ण नाश होईल!​—प्रकटी. १९:१९-२१. टेहळणी बुरूज२२.०५ १७ ¶९-१०

शनिवार, ६ जानेवारी

मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये शत्रुत्व निर्माण करीन.​—उत्प. ३:१५.

आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यावर लगेचच यहोवाने एक महत्त्वाची भविष्यवाणी केली. आणि त्याद्वारे त्यांच्या वंशजांना एक आशा दिली. ती भविष्यवाणी आपल्याला उत्पत्ती ३:१५ मध्ये वाचायला मिळते. तिथे म्हटलंय: “मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या संततीमध्ये व तिच्या संततीमध्ये शत्रुत्व निर्माण करीन. तो तुझं डोकं ठेचेल आणि तू त्याच्या टाचेवर घाव करशील.” ही भविष्यवाणी बायबलच्या पहिल्या पुस्तकात पाहायला मिळते. पण कोणत्या-ना-कोणत्या मार्गाने बायबलमधल्या इतर सर्व पुस्तकांचा या भविष्यवाणीशी संबंध आहे. जसे माळेतले सगळे मोती एकाच धाग्यात ओवलेले असतात त्याच प्रकारे बायबलच्या सगळ्या पुस्तकांमधला एकंदर संदेश उत्पत्ती ३:१५ मधल्या एकाच भविष्यवाणीत सामावलेला आहे असं म्हणता येईल. हा संदेश म्हणजे देव एका सुटका करणाऱ्‍याला पाठवेल आणि तो सैतानाचा आणि त्याच्या सर्व दुष्ट साथीदारांचा नाश करेल. यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सगळ्यांसाठी हा खरंच किती मोठा आशीर्वाद असेल! ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली आणि आपल्याला याचा कसा फायदा होऊ शकतो हे बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला समजायला मदत होईल. टेहळणी बुरूज२२.०७ १४ ¶१-३

रविवार, ७ जानेवारी

यहोवा स्वतः बुद्धी देतो.​—नीति. २:६.

तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करता यावी म्हणून यहोवाकडे बुद्धी मागा. (याको. १:५) कारण यहोवाच आपल्याला सगळ्यात चांगलं मार्गदर्शन देऊ शकतो. असं का म्हणता येईल? याची बरीच कारणं आहेत. पण त्यांपैकी दोन कारणांचा विचार करा. पहिलं म्हणजे, पालक म्हणून यहोवाच सगळ्यात अनुभवी आहे. (स्तो. ३६:९) आणि दुसरं म्हणजे त्याने दिलेल्या सल्ल्यामुळे आपला नेहमी फायदाच होतो. (यश. ४८:१७) यहोवा आज त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे, बायबलवर आधारित असलेलं मार्गदर्शन भरपूर प्रमाणात पुरवत आहे. तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी तुम्ही या माहितीचा उपयोग करू शकता. (मत्त. २४:४५) उदाहरणार्थ आजपर्यंत आपल्या प्रकाशनांमध्ये कुटुंबासाठी उपयोगी असलेली बरीच माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यापैकी बरेच लेख आता आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसंच, आपल्या वेबसाईटवर मुलाखती आणि नाट्यरूपांतर असलेले बरेच व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मुलांना वाढवण्यासाठी हे व्हिडिओ आईवडिलांना खूप उपयोगी ठरू शकतात.​—नीति. २:४, ५. टेहळणी बुरूज२२.०५ २७ ¶४-५

सोमवार, ८ जानेवारी

तू फक्‍त अपराध पाहिले असतेस, तर हे याह, तुझ्यापुढे कोण उभं राहू शकलं असतं?​—स्तो १३०:३.

क्षमा करायच्या बाबतीत यहोवाची तुलना कोणाशीही केली जाऊ शकत नाही. कारण तो क्षमा करायला नेहमी तयार असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याबद्दल त्याला खडा न्‌ खडा माहीत आहे. तो आपल्याला अगदी पूर्णपणे ओळखतो आणि आपण मनापासून पश्‍चात्ताप केलाय की नाही हे फक्‍त तोच पाहू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो ती जणू कायमची पुसून टाकतो. यामुळे आपण शुद्ध विवेकाने त्याची उपासना करू शकतो आणि तो पुन्हा एकदा आपल्याला मित्र म्हणून स्वीकारतो. जोपर्यंत आपण अपरिपूर्ण आहोत तोपर्यंत साहजिकच आपल्या हातून पाप होत राहील. पण इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स,  खंड २ पान ७७१ वर दिलेल्या शब्दांमधून आपल्याला सांत्वन मिळू शकतं. तिथं म्हटलंय: “आपल्या सेवकांचा न्याय करताना यहोवा दयाळूपणे ही गोष्ट लक्षात घेतो की ते सगळे अपरिपूर्ण आहेत. आणि म्हणून अपरिपूर्णतेमुळे होणाऱ्‍या चुकांबद्दल आपण सतत दुःखी राहायची किंवा मनात दोष भावना बाळगायची गरज नाही. (स्तो १०३:८-१४; १३०:३) जर आपण देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागायचा मनापासून प्रयत्न करत असू तर आपण आनंदी राहू शकतो. (फिलि ४:४-६; १यो ३:१९-२२).” टेहळणी बुरूज२२.०६ ७ ¶१८-१९

मंगळवार, ९ जानेवारी

माझ्या नावामुळे तुम्हाला राजांच्या आणि राज्यपालांच्या समोर नेलं जाईल.​—लूक २१:१२.

काही जणांना सरकारी अधिकाऱ्‍यांकडून छळ होण्यापेक्षा या गोष्टीची जास्त भीती वाटते की आपण यहोवाचे साक्षीदार झालो हे जर आपल्या घरच्यांना कळालं तर ते काय म्हणतील. कारण त्यांचं त्यांच्या घरच्यांवर प्रेम असतं आणि त्यांनीसुद्धा यहोवाबद्दल जाणून घ्यावं आणि त्याच्यावर प्रेम करावं अशी त्यांची इच्छा असते. पण जेव्हा त्यांच्या घरचे लोक यहोवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल अपमानास्पद बोलतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. हे खरंय की काही वेळा जे नातेवाईक अगोदर विरोध करायचे ते नंतर सत्यात आले. पण समजा आपल्या बाबतीत तसं झालं नाही आणि जर आपल्या नातेवाइकांनी आपण साक्षीदार झालो म्हणून आपल्यासोबतचे सगळे नातेसंबंध तोडून टाकले तर काय? अशा वेळी आपण काय करू? स्तोत्र २७:१० या वचनामुळे आपल्याला खूप सांत्वन मिळतं. यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे जेव्हा आपण आठवणीत ठेवतो, तेव्हा आपल्या घरच्यांकडून जरी विरोध झाला तरी आपण घाबरून जात नाही. तसंच विरोधाचा धीराने सामना केल्यामुळे यहोवा आपल्याला प्रतिफळ देईल, या गोष्टीवर आपला भरवसा असतो. घरच्यांनी जरी आपल्याला सोडून दिलं तरी यहोवा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल आणि मन शांत ठेवून आनंदी राहायलाही तो आपल्याला मदत करेल. तसंच त्याच्यासोबतचं आपलं नातं टिकवून ठेवायलाही तो आपल्याला मदत करेल. टेहळणी बुरूज२२.०६ १६-१७ ¶११-१३

बुधवार, १० जानेवारी

ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसलं आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.​—१ पेत्र २:२१.

येशू पृथ्वीवर होता तेव्हा लोकांनी त्याच्यावर खोटा आरोप लावला, की तो दारुडा आहे, खादाड आहे, सैतानाची कार्य करतो, शब्बाथ मोडतो आणि इतकंच काय तर देवाची निंदाही करतो. (मत्त. ११:१९; २६:६५; लूक ११:१५; योहा. ९:१६) असं असलं तरी, येशूने त्यांना रागाने उत्तर दिलं नाही किंवा तो त्यांच्याबद्दल वाईट बोलला नाही. आपल्यासोबतही कोणी कठोरपणे बोललं तर आपण येशूसारखंच त्यांना उलट उत्तर देणार नाही किंवा त्यांच्याशी कठोरपणे बोलणार नाही. (१ पेत्र २:२२, २३) पण हे खरं आहे, की असं करणं सोपं नाही. (याको. ३:२) मग आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? सेवाकार्यात घरमालक जर आपल्याशी कठोरपणे बोलला तर लगेच वाईट वाटून घेऊ नका. सॅम नावाचा भाऊ म्हणतो, “घरमालकाला सत्य समजणं किती महत्त्वाचं आहे आणि तो पुढे जाऊन बदलू शकतो याबद्दल मी अशा वेळी विचार करतो.” कधीकधी घरमालक आपल्यावर फक्‍त यासाठी रागावतो कारण आपण त्याच्या घरी चुकीच्या वेळी गेलेलो असतो. आपल्यावर कोणी रागावलं तर आपण मनातल्या मनात लहानशी प्रार्थना करू शकतो. शांत राहण्यासाठी आणि आपल्या तोंडून काही चुकीचं किंवा समोरच्याचा अनादर होईल असं काही निघू नये म्हणून आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. टेहळणी बुरूज२२.०४ ६ ¶८-९

गुरुवार, ११ जानेवारी

देवाच्या जवळ या.​—याको. ४:८.

आपल्या मुलांना यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करायचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करणं. (२ तीम. ३:१४-१७) पण मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याचा आणखी एक मार्ग बायबलमध्ये सांगितला आहे. नीतिवचनांच्या पुस्तकात एक वडील आपल्या मुलाला याची आठवण करून देतात, की सृष्टीतून दिसून येणारे देवाचे गुण त्याने कधीही नजरेआड होऊ देऊ नये. (नीति. ३:१९-२१) आईवडिलांनो, तुम्हाला तुमच्या मुलांसोबत बाहेर मोकळ्या वातावरणात वेळ घालवायला नक्कीच आवडत असेल. मग अशा वेळी, आपल्या मुलांना यहोवाने “निर्माण केलेल्या गोष्टींवरून” त्याचे सुंदर गुण कसे दिसून येतात हे समजायला तुम्ही मदत करू शकता का? (रोम. १:२०) लोकांना शिकवण्यासाठी येशूने सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग कसा केला याकडे लक्ष द्या. एका प्रसंगी, त्याने आपल्या शिष्यांना कावळ्यांचं आणि रानफुलांचं निरीक्षण करायला सांगितलं. (लूक १२:२४, २७-३०) आपला स्वर्गातला पिता किती उदार आणि प्रेमळ आहे याबद्दल त्याने शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला. तो म्हणजे, यहोवा जर कावळ्यांना खाऊ घालतो आणि रानातल्या फुलांना इतक्या सुंदर कपड्यांनी सजवतो, तर तो आपल्या विश्‍वासू सेवकांचीही नक्कीच काळजी घेईल. टेहळणी बुरूज२३.०३ २०-२१ ¶१-४

शुक्रवार, १२ जानेवारी

मुलाद्वारे पित्याचा गौरव व्हावा, म्हणून माझ्या नावाने तुम्ही जी काही विनंती कराल ती मी पूर्ण करीन.​—योहा. १४:१३.

आपण येशूच्याद्वारे प्रार्थना करू शकतो याबद्दल आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत. आपण जेव्हा येशूच्या नावाने प्रार्थना करतो, तेव्हा यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांचं उत्तरही देतो. येशूच्या माध्यमानेच यहोवा आपल्या विनंत्या पूर्ण करतो. तसंच त्याच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो. (रोम. ५:१) येशूबद्दल बायबलमध्ये असं म्हटलंय, “आपल्याला लाभलेला महायाजक . . . स्वर्गात सर्वोच्च देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री ८:१) तसंच बायबल असंही सांगतं, की तो “पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक आहे.” (१ योहा. २:१) आपण अपरिपूर्ण असल्यामुळे कमजोर आहोत ही गोष्ट येशू ओळखतो आणि तो आपल्याशी सहानुभूतीने वागतो. तसंच, तो आपल्यासाठी यहोवाकडे “विनंतीही करतो.” असा महायाजक आपल्याला दिल्याबद्दल आपण यहोवाचे खरंच किती आभारी आहोत! (रोम. ८:३४; इब्री ४:१५) खरंतर, येशूने बलिदान दिलं नसतं तर आपण यहोवाला प्रार्थनाच करू शकलो नसतो. यहोवाने त्याच्या प्रिय मुलाला आपल्यासाठी पृथ्वीवर पाठवलं यावरून दिसून येतं की त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. या मौल्यवान देणगीबद्दल आपण त्याचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत, नाही का? टेहळणी बुरूज२२.०७ २३ ¶१०-१२

शनिवार, १३ जानेवारी

जो भरवशालायक असतो, तो [गोष्टी] गुप्त ठेवतो.​—नीति. ११:१३.

जो भरवशालायक असतो तो दिलेला शब्द पाळतो आणि नेहमी खरं बोलतो. (स्तो. १५:४) लोकांनाही माहीत असतं, की आपण अशा व्यक्‍तीवर भरवसा ठेवू शकतो. आपल्या भाऊबहिणींनी आपल्याबद्दलही असा विचार करावा अशी आपली इच्छा आहे. आपण इतरांना आपल्यावर भरवसा ठेवायला लावू शकत नाही. आपण तो भरवसा कमवला पाहिजे. भरवसा हा पैशासारखा असतो. तो कमवणं कठीण आहे पण गमावणं सोपं आहे. यहोवाने नक्कीच आपला भरवसा जिंकलाय असं आपण म्हणू शकतो. कारण “त्याची सर्व कार्यं भरवशालायक आहेत.” (स्तो. ३३:४) आपणही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा अशी त्याची इच्छा आहे. (इफिस. ५:१) आपण प्रेमळ आणि भरवशालायक असलेल्या भाऊबहिणींच्या एका मोठ्या परिवाराचा भाग आहोत यासाठी आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत! पण आपल्या भाऊबहिणींचा भरवसा मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेम, नम्रता, समंजसपणा, प्रामाणिकपणा आणि आत्मसंयम यांसारखे गुण स्वतःमध्ये वाढवायचा प्रयत्न केला, तर मंडळीत सगळ्यांना एकमेकांवर भरवसा ठेवणं सोपं जाईल. आपण सर्व जण यहोवा देवाचं अनुकरण करत राहू या आणि भरवशालायक असल्याचं दाखवून देऊ या! टेहळणी बुरूज२२.०९ ८ ¶१-२; १३ ¶१७

रविवार, १४ जानेवारी

यहोवाचं भय मानणाऱ्‍यांवर त्याची नजर असते.​—स्तो. ३३:१८.

मंडळीत बरेच भाऊबहीण असूनसुद्धा कधीकधी आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटू शकतं. तसंच, आपल्यापैकी काही जणांना निराशेच्या भावना सतावत असतील, आणि या भावनांचा आपल्याला एकट्यानेच सामना करावा लागेल असं कदाचित वाटू शकतं. पण आपल्याला असं वाटावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. देवाचा विश्‍वासू सेवक एलीया याच्यासोबत काय घडलं याचा विचार करा. त्याने एलीयाला आपलं मन मोकळं करायचं प्रोत्साहन दिलं. यासाठी दोनदा त्याने त्याला विचारलं, “एलीया, तू इथे काय करतोस?” (१ राजे १९:९, १३) आणि जेव्हा एलीया बोलू लागला तेव्हा यहोवाने त्याचं लक्ष देऊन ऐकलं. तसंच त्याने एलीयाला सांगितलं, की इस्राएलमध्ये अजूनही शुद्ध उपासना करणारे बरेच जण आहेत. आणि अशा प्रकारे त्याला धीर दिला. (१ राजे १९:११, १२, १८) नक्कीच, यहोवासमोर आपलं मन मोकळं केल्यावर आणि यहोवाचं उत्तर ऐकल्यावर एलीयाला खूप बरं वाटलं असेल. त्यानंतर यहोवाने त्याला बऱ्‍याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या दिल्या. त्याने हजाएलला सीरियाचा राजा, येहूला इस्राएलचा राजा आणि अलीशाला संदेष्टा म्हणून नियुक्‍त करायला त्याला सांगितलं. (१ राजे १९:१५, १६) या सगळ्या जबाबदाऱ्‍या देऊन यहोवाने एलीयाला चांगल्या गोष्टींकडे लक्ष लावायला मदत केली. आणि त्याच्यासोबत काम करण्यासाठी यहोवाने त्याला अलीशा हा एक चांगला साथीदारही दिला. टेहळणी बुरूज२२.०८ ८ ¶३; ९ ¶५

सोमवार, १५ जानेवारी

एकमेकांना प्रोत्साहन देत [राहा] आणि एकमेकांना बळकट करत [राहा].​—१ थेस्सलनी. ५:११.

तुमच्या मंडळीत कधी नवीन राज्यसभागृह बांधायचं किंवा ते दुरूस्त करायचं काम झालं आहे का? जर झालं असेल, तर त्या नवीन सभागृहात जी पहिली सभा झाली होती, ती तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ते सुंदर नवीन सभागृह पाहून तुम्ही यहोवाचे आभार मानले असतील. कदाचित तुम्हाला इतकं भरून आलं असेल, की सुरुवातीचं गाणं गायलाही तुम्हाला जमलं नसेल. खरंच, जेव्हा-जेव्हा एक नवीन राज्यसभागृह बांधलं जातं तेव्हा-तेव्हा यहोवाची खूप स्तुती होते. पण जेव्हा आपण या राज्यसभागृहांमध्ये येणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देतो तेव्हा तर यहोवाची आणखीनच जास्त स्तुती होते. कारण भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं हेही एक प्रकारचं बांधकामच आहे. असं आपण का म्हणू शकतो? आजच्या वचनात प्रेषित पौलने ‘एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि बळकट करा’ असं म्हटलं. इथे त्याने जो ग्रीक शब्द वापरला त्याचा संबंध बांधकामाशी आहे. आणि हे बांधकाम खरोखरच्या इमारती बांधण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. भाऊबहिणींना प्रोत्साहन द्यायच्या बाबतीत प्रेषित पौलचं एक खूप सुंदर उदाहरण आपल्यासमोर आहे. तो नेहमी भाऊबहिणींची परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. आपण पौलचं अनुकरण करू शकतो आणि आज आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊ शकतो.​—१ करिंथ. ११:१. टेहळणी बुरूज२२.०८ २० ¶१-२

मंगळवार, १६ जानेवारी

यहोवाच्या सेवकांना शोभेल असं [वागा].​—कलस्सै. १:१०.

देवाने आपल्याला नीतिमान समजावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या सगळ्या व्यवहारात पूर्णपणे प्रामाणिक असलं पाहिजे. नीतिमत्त्वाचा संबंध न्यायाशीसुद्धा आहे. एक नीतिमान व्यक्‍ती नेहमी न्यायाने वागते. कोणावरही अन्याय झालेला तिला पाहवत नाही. तसंच जो खरोखर नीतिमान असतो त्याला नेहमी यहोवाला ‘पूर्णपणे संतुष्ट करायची’ इच्छा असते. आणि म्हणून कोणताही निर्णय घेताना यहोवाला त्याच्याबद्दल कसं वाटेल याचाही तो विचार करतो. बायबलमध्ये सांगितलंय की नीतिमत्त्वाचा उगम यहोवापासून होतो. म्हणूनच बायबलमध्ये त्याला “नीतिमत्त्वाचं निवासस्थान” असं म्हटलंय. (यिर्म. ५०:७) यहोवा निर्माणकर्ता असल्यामुळे बरोबर काय आणि चूक काय याचे स्तर तोच ठरवू शकतो. शिवाय त्याचे स्तर मानवांच्या विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. (नीति. १४:१२; यश. ५५:८, ९) पण आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बनवलं आहे. त्यामुळे त्याच्या उच्च नीतिमान स्तरांप्रमाणे जगणं आपल्याला शक्य आहे. (उत्प. १:२७) आणि त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जगायची आपली इच्छासुद्धा आहे. आपल्या पित्यावर आपलं प्रेम असल्यामुळे आपण होताहोईल तितकं त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो.​—इफिस. ५:१. टेहळणी बुरूज२२.०८ २७ ¶५-६

बुधवार, १७ जानेवारी

यहोवाची इच्छा काय आहे, हे ओळखायचा नेहमी प्रयत्न करा.​—इफिस. ५:१७.

जेव्हा आपण खूप दुःखी असतो किंवा निराश असतो तेव्हा कदाचित आपल्याला असं काहीतरी करावंसं वाटेल ज्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत होईल. आणि हे समजण्यासारखं आहे. पण अशा वेळी आपण सावध असलं पाहिजे, नाहीतर आपण असं काहीतरी करून बसू ज्याचा यहोवा द्वेष करतो. (इफिस. ५:१०-१२, १५, १६) पौलने फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात असं प्रोत्साहन दिलं, की त्यांनी ‘नीतिमान, शुद्ध, प्रिय मानण्यालायक आणि चांगलं’ आहे अशा गोष्टींचा नेहमी विचार करावा. (फिलिप्पै. ४:८) पौल या ठिकाणी खासकरून मनोरंजनाबद्दल बोलत नसला, तरी आपल्या मोकळ्या वेळेत मनोरंजनाची निवड करताना आपण या गोष्टींचा विचार करू शकतो. उदाहरणार्थ, एखादा चित्रपट पाहण्याआधी आपण स्वतःला असं विचारू शकतो, की हा चित्रपट ‘शुद्ध’ आहे का? तो चांगलंय असं म्हणता येईल का? तसंच, “गाणी ऐकताना,” “पुस्तकं वाचताना,” किंवा “व्हिडिओ गेम्स” खेळताना आपण स्वतःला विचारू शकतो, की या गोष्टी यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे आहेत का? अशा प्रकारे विचार केल्यामुळे कोणत्या गोष्टी देवाला मान्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे आपल्याला समजायला मदत होईल. आपल्या सर्वांनाच यहोवाच्या उच्च स्तरांप्रमाणे जगण्याची इच्छा आहे.​—स्तो. ११९:१-३ टेहळणी बुरूज२२.१० ९ ¶११-१२

गुरुवार, १८ जानेवारी

माणसाच्या मनात काय आहे हे तो ओळखू शकत होता.​—योहा. २:२५.

मृत्यूच्या आधी अनीतिमान लोकांपैकी काहींनी खूप वाईट आणि नीच कामं केली होती. त्यामुळे यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे कसं जगायचं हे त्यांना शिकवावं लागेल. आणि त्यासाठी देवाच्या राज्यात, आजपर्यंत कधीही झाला नव्हता इतका मोठा शैक्षणिक कार्यक्रम राबवला जाईल. अनीतिमान लोकांना कोण शिकवेल? मोठ्या लोकसमुदायातले आणि पुनरुत्थान झालेले नीतिमान लोक त्यांना शिकवतील. या अनीतिमान लोकांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जावीत म्हणून त्यांना यहोवासोबत एक जवळचं नातं जोडून त्याला आपलं जीवन समर्पित करावं लागेल. अनीतिमान लोक या शिक्षणाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत न्यायाधीश म्हणून काम करणारे अभिषिक्‍त जन खूप उत्सुक असतील. (प्रकटी. २०:४) इतकी सगळी मदत देऊनही जे प्रतिसाद देणार नाहीत त्यांना नवीन जगात राहू दिलं जाणार नाही. मग ते १०० वर्षांचे जरी असले तरी त्यांना नवीन जगातून काढून टाकलं जाईल. (यश. ६५:२०) यहोवा आणि येशू प्रत्येकाचं मन पाहू शकतात त्यामुळे ते नवीन जगात कोणालाही इतरांचं कोणत्याही प्रकारे नुकसान करू देणार नाहीत.​—यश. ११:९; ६०:१८; ६५:२५. टेहळणी बुरूज२२.०९ १७ ¶११-१२

शुक्रवार, १९ जानेवारी

प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावं.​—रोम. १३:१.

या वचनात ‘वरिष्ठ अधिकारी’ हे शब्द अशा लोकांना उद्देशून वापरण्यात आले आहेत ज्यांना इतरांवर अधिकार आहे. ख्रिश्‍चनांनी या अधिकाऱ्‍यांच्या अधीन असलं पाहिजे. ते न्याय आणि सुव्यवस्था राखतात आणि काही वेळा यहोवाच्या साक्षीदारांचं संरक्षणसुद्धा करतात. (प्रकटी. १२:१६) म्हणून आपण त्यांना कर दिला पाहिजे आणि त्यांच्या अधीन राहून त्यांना आदर दिला पाहिजे अशी आज्ञा बायबल आपल्याला देतं. (रोम. १३:७) पण यहोवाने दिलेल्या अनुमतीमुळेच जगातल्या सरकारांचा आपल्यावर अधिकार आहे. येशूला जेव्हा रोमी राज्यपाल पंतय पिलात याच्यासमोर आणण्यात आलं, तेव्हा त्याने ही गोष्ट स्पष्ट केली. पिलातने जेव्हा येशूला म्हटलं, की तुझी सुटका करायचा किंवा तुला दंड द्यायचा अधिकार माझ्याजवळ आहे, तेव्हा येशूने म्हटलं: “देवाने तुम्हाला अधिकार दिला नसता, तर तुमचा माझ्यावर काहीच अधिकार नसता.” (योहा. १९:११) आजसुद्धा पिलातप्रमाणेच सगळ्या राजकीय अधिकाऱ्‍यांचा आणि मानवी शासकांचा अधिकार मर्यादित आहे. टेहळणी बुरूज२२.१० १४ ¶६

शनिवार, २० जानेवारी

थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील.​—स्तो. ३७:१०.

भविष्यात एक विश्‍वासू आणि बुद्धिमान राजा राज्य करेल त्या वेळेस परिस्थिती कशी असेल याबद्दल लिहायला दावीद राजाला देवाकडून प्रेरणा मिळाली. (स्तो. ३७:१०, ११, २९) येणाऱ्‍या नंदनवनाबद्दल लोकांना सांगताना आपण नेहमी स्तोत्र ३७:११ हे वचन वाचतो. आणि हे बरोबरच आहे कारण येशूनेसुद्धा डोंगरावरच्या प्रवचनात याच वचनातल्या शब्दांचा उल्लेख करून ते भविष्यात पूर्ण होतील असं सांगितलं होतं. (मत्त. ५:५) पण हे शब्द शलमोन राजाच्या काळातसुद्धा पूर्ण झाले. जेव्हा शलमोन राजा राज्य करत होता तेव्हा सगळीकडे शांती आणि भरभराट होती. यहोवाने सांगितलं होतं की त्या देशात ‘दूध आणि मध वाहील.’ आणि हेसुद्धा सांगितलं होतं, की “जर तुम्ही नेहमी माझ्या नियमांनुसार चालत राहिलात . . . [तर] मी देशात शांती आणीन आणि जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती वाटणार नाही.” (लेवी. २०:२४; २६:३, ६) यहोवाने दिलेली ही सगळी वचनं शलमोन राजाच्या काळात पूर्ण झाली. (१ इति. २२:९; २९:२६-२८) स्तोत्र ३७:१०, ११, २९ ची पूर्णता शलमोन राजाच्या काळातसुद्धा झाली आणि पुढे भविष्यातसुद्धा होईल. टेहळणी बुरूज२२.१२ १० ¶८

रविवार, २१ जानेवारी

जे [बुद्धीला] घट्ट धरून राहतात, त्यांना सुखी म्हटलं जाईल.​—नीति. ३:१८.

खरे ख्रिस्ती या नात्याने आपण सूचनांचं पालन केलं पाहिजे. बायबल असा सल्ला देतं: “कुशल मार्गदर्शनाने लढाई लढ; पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे विजय मिळतो.” (नीति. २४:६, तळटीप.) हे तत्त्व पाळल्यामुळे आपण प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात यशस्वी कसं होऊ शकतो याचा विचार करा. स्वतःच्या मनाप्रमाणे सेवाकार्य करण्याऐवजी संघटनेकडून ज्या काही सूचना मिळतात त्या पाळायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसंच, आपल्या सभांमध्ये जी भाषणं दिली जातात आणि जे भाग सादर केले जातात त्यांतून इतरांना आपण आणखी चांगल्या प्रकारे कसं शिकवू शकतो हे आपल्याला शिकायला मिळतं. याशिवाय, संघटनेने आपल्याला बरीच उपयुक्‍त साधनं पुरवली आहेत. जसं की, प्रकाशनं आणि व्हिडिओ. ही साधनं, बायबल काय सांगतं ते समजून घ्यायला लोकांना मदत करतात. देवाने त्याच्या वचनात आपल्याला बरेच सुज्ञ सल्ले दिले आहेत याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! हे सल्ले नसते तर विचार करा आपलं काय झालं असतं. तेव्हा देवाने दिलेल्या सुज्ञ सल्ल्यांप्रमाणे नेहमी वागायचा आपण ठाम निश्‍चय करू या.​—नीति. ३:१३-१७. टेहळणी बुरूज२२.१० २३ ¶१८-१९

सोमवार, २२ जानेवारी

तुझे शब्द माझ्या जिभेला गोड लागतात, ते माझ्या तोंडाला मधापेक्षाही गोड लागतात!​—स्तो. ११९:१०३.

जेव्हा आपण अन्‍न खातो आणि आपलं शरीर ते पचवतं तेव्हा आपल्याला त्यापासून पोषण मिळतं. त्याच प्रकारे जेव्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो आणि त्यावर मनन करतो तेव्हा आपला विश्‍वास मजबूत होतो. यहोवाची इच्छा आहे की आपण त्याचं वचन चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. यासाठी आपण प्रार्थना, वाचन आणि मनन केलं पाहिजे. बायबल वाचण्याआधी देवाचे विचार जाणून घेण्यासाठी आपलं मन तयार व्हावं म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. यानंतर आपण बायबलमधला काही भाग वाचू शकतो. मग थोडं थांबून आपण आत्ताच जे वाचलंय त्यावर मनन केलं पाहिजे, म्हणजेच खोलवर विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे काय होईल? आपण जितकं जास्त मनन करू तितकंच देवाचं वचन आपल्या मनात अगदी खोलपर्यंत जाईल. बायबल वाचणं आणि त्यावर मनन करणं का महत्त्वाचंय? कारण असं केल्यामुळे आज आपल्याला राज्याचा संदेश लोकांना सांगण्याचं बळ मिळतं. तसंच यामुळे भविष्यात लवकरच देवाचा कठोर न्यायाचा संदेश लोकांना सांगण्याचं धैर्यही आपल्याला मिळेल. शिवाय यहोवाच्या सुंदर गुणांवर मनन केल्यामुळे त्याच्यासोबतचं आपण नातं दिवसेंदिवस घट्ट होत जाईल. टेहळणी बुरूज२२.११ ६-७ ¶१६-१७

मंगळवार, २३ जानेवारी

तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.​—योहा. १३:३५.

येशूने दाखवून दिलं, की फक्‍त त्याचे शिष्यच नाहीत तर बाहेरचे लोकसुद्धा आपलं एकमेकांवरचं निःस्वार्थ प्रेम पाहून ओळखतील की आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत. आणि यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम खरंच खूप विशेष आहे. पण यहोवाचे साक्षीदार काही परिपूर्ण नाहीत. (१ योहा. १:८) त्यामुळे मंडळीतल्या लोकांना आपण जितकं जास्त ओळखायला लागतो तितकं जास्त त्यांच्यातल्या कमतरता आपल्याला दिसू लागतात. (रोम. ३:२३) आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, अशा कमतरता पाहूनच काहींनी यहोवाची सेवा करायचं सोडून दिलंय. येशूने आपल्या प्रेषितांवर प्रेम असल्याचं कसं दाखवलं? आणि आज आपण येशूच्या या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? या प्रश्‍नांवर आपणसुद्धा विचार केला पाहिजे. कारण असं केल्यामुळे एकमेकांचे दोष दिसत असतानाही त्यांच्यावर प्रेम करायला आपल्याला मदत होईल.​—इफिस. ५:२. टेहळणी बुरूज२३.०३ २६-२७ ¶२-४

बुधवार, २४ जानेवारी

जो एकनिष्ठ, त्याच्याशी तू एकनिष्ठपणे वागतोस.​—स्तो. १८:२५.

या जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे तशतशा मंडळीच्या आतून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात. या समस्यांमुळे यहोवला एकनिष्ठ राहणं आपल्याला कठीण वाटू शकतं. म्हणूनच आपण सर्व बाबतीत योग्यपणे विचार करायला शिकलं पाहिजे. जर मंडळीतलं कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं असं तुम्हाला वाटलं, तर मनात राग ठेवू नका. जर तुम्हाला ताडन देण्यात आलं असेल तर कदाचित तुम्हाला लाजल्यासारखं वाटेल. पण त्याचाच विचार करत राहण्याऐवजी तुम्हाला देण्यात आलेला सल्ला स्वीकारा आणि आवश्‍यक ते बदल करा. आणि जेव्हा यहोवाच्या संघटनेत झालेल्या बदलांमुळे तुमच्यावर परिणाम होतो तेव्हासुद्धा ते बदल मनापासून स्वीकारा आणि मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वागा. तुमच्या एकनिष्ठतेची परीक्षा होते तेव्हासुद्धा तुम्ही यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर असलेला तुमचा भरवसा टिकवून ठेवा तुम्ही शांत राहून स्पष्टपणे विचार केला पाहिजे आणि सर्व गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा आणि मंडळीतल्या भाऊबहिणींपासून दूर राहू नका. जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या, तरीसुद्धा सैतान कधीही तुम्हाला यहोवापासून किंवा त्याच्या संघटनेपासून दूर करू शकणार नाही.​—याको. ४:७. टेहळणी बुरूज२२.११ २४-२५ ¶१४-१६

गुरुवार, २५ जानेवारी

संपूर्ण बंधुसमाजावर प्रेम करा.​—१ पेत्र २:१७.

विपत्ती येण्याआधीच मंडळीतले वडील भाऊबहिणींना त्यासाठी तयार राहायला मदत करतात. विपत्ती येते तेव्हा सुरक्षित राहण्यासाठी आणि मंडळीतल्या वडिलांना संपर्क करण्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे, हे मंडळीतल्या सगळ्यांना माहीत आहे याची ते खातरी करतात. आपण काय करू शकतो? जर तुमच्या जवळच्या ठिकाणी एखादी विपत्ती आली, तर त्या ठिकाणी कशी मदत करता येईल याबद्दल तुम्ही वडिलांना विचारू शकता. विपत्तीमुळे ज्या भाऊबहिणींना आपलं घर सोडावं लागलंय किंवा जे भाऊबहीण विपत्ती मदत कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून आलेत, त्यांना तुम्ही आपल्या घरी राहण्यासाठी बोलवू शकता. तसंच ज्या भाऊबहिणींना खाण्यापिण्याच्या किंवा इतर वस्तूंची गरज आहे, त्यांना तुम्ही त्या पुरवू शकता. पण जर एखाद्या लांबच्या ठिकाणी विपत्ती आली असेल, तर तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? अशा वेळी तुम्ही तिथल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना करू शकता. (२ करिंथ. १:८-११) तसंच, विपत्ती मदतकार्यात आपलाही हातभार लागावा म्हणून जगभरात चाललेल्या कार्यासाठी तुम्ही दान देऊ शकता. (२ करिंथ. ८:२-५) जर तुम्हाला तिथं जाऊन मदत करणं शक्य असेल, तर स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तुम्ही वडिलांना विचारू शकता. जर तुम्हाला बोलवण्यात आलं तर जास्तीत जास्त मदत करता यावी म्हणून तुम्हाला प्रशिक्षणही देण्यात येईल. टेहळणी बुरूज२२.१२ २४ ¶८; २५ ¶११-१२

शुक्रवार, २६ जानेवारी

माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.​—१ करिंथ. १०:१३.

आजच्या दैनिक वचनातले हे शब्द करिंथ मंडळीतल्या भाऊबहिणींना उद्देशून लिहिण्यात आले होते. त्यांच्यापैकी काही जण आधी व्यभिचारी, समलिंगी आणि दारुडे होते. (१ करिंथ. ६:९-११) बाप्तिस्म्यानंतर त्यांना कोणत्याही चुकीच्या इच्छेविरुद्ध झगडावं लागलं नसेल, असं तुम्हाला वाटतं का? हे शक्य नाही. ते अभिषिक्‍त ख्रिस्ती असले तरीसुद्धा ते सगळे अपरिपूर्ण होते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी चुकीच्या इच्छेविरुद्ध नक्कीच झगडावं लागलं असेल. पण त्यांनी त्याच्यावर मात केली. चुकीच्या इच्छांवर कोणी ना कोणी आधी मात केली आहे हे समजल्यामुळे आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा ‘विश्‍वासात दृढ राहा, कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.’​—१ पेत्र ५:९. टेहळणी बुरूज२३.०१ १२ ¶१५

शनिवार, २७ जानेवारी

जगात तुमच्यावर संकटं येतील, पण हिंमत धरा! मी जगाला जिंकलंय.​—योहा. १६:३३.

येशूने यहोवाला विनंती केली, की त्याने त्याच्या अनुयायांना सांभाळावं. (योहा. १७:११) या गोष्टीमुळे आज आपल्याला खूप धैर्य मिळतं. कारण आपल्या कोणत्याही शत्रूपेक्षा यहोवा कितीतरी शक्‍तिशाली आहे. (१ योहा. ४:४) त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपत नाही. त्यामुळे आपण ही खातरी ठेवू शकतो, की आपण जर यहोवावर विसंबून राहिलो, तर आपल्याला आपल्या भीतीवर मात करता येईल आणि धैर्य दाखवता येईल. आपण एक यहोवाचे साक्षीदार आहोत हे सांगायला तुम्हाला कधीकधी अवघडल्यासारखं वाटतं का? इतर जण काय विचार करतील या भीतीने तुम्ही प्रचारक व्हायला किंवा बाप्तिस्मा घ्यायला मागेपुढे पाहता का? पण अशा गोष्टींमुळे योग्य ते करण्यापासून स्वतःला आवरू नका. त्याऐवजी यहोवाला मनापासून प्रार्थना करा आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी त्याने तुम्हाला धैर्य दाखवायला मदत करावी अशी त्याला विनंती करा. मग यहोवा तुमच्या प्रार्थनांचं कसं उत्तर देत आहे हे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला आणखी धैर्य दाखवायचं बळ मिळेल.​—यश. ४१:१०, १३. टेहळणी बुरूज२३.०१ २९ ¶१२; ३० ¶१४

रविवार, २८ जानेवारी

तुम्ही वाचलं नाही का?​—मत्त. १२:३.

आणखी एका वेळी शास्त्रवचनांबद्दल परूशी लोकांचा दृष्टिकोन किती चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी येशूने त्यांना विचारलं: “तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का?” (मत्त. १२:१-७) कारण तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांवर असा आरोप लावला होता, की त्यांनी शब्बाथाचा नियम मोडलाय. त्यांना उत्तर देताना येशूने शास्त्रवचनांतल्या दोन उदाहरणांचा आणि होशेय पुस्तकातल्या एका वचनाचा उल्लेख केला. अशा प्रकारे येशूने त्यांना दाखवून दिलं, की शब्बाथाचा नियम देण्यामागचा उद्देश त्यांना कळला नव्हता आणि त्यामुळे ते इतरांना दया दाखवत नव्हते. पण नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहीत असुनसुद्धा हे लोक त्याप्रमाणे का चालू शकले नाहीत? कारण ते स्वतःला इतरांपेक्षा खूप जास्त समजायचे आणि इतरांमध्ये चुका काढायच्या उद्देशानेच शास्त्रवचनं वाचायचे. आणि त्यामुळे ते जे काही वाचत होते त्याचा खरा अर्थ त्यांना कळत नव्हता. (मत्त. २३:२३; योहा. ५:३९, ४०) मत्तय १९:४-६, या वचनांमध्येसुद्धा येशूने परूश्‍यांना “तुम्ही वाचलं नाही का?” असाच प्रश्‍न विचारला होता. त्यांनी निर्मितीचा अहवाल बऱ्‍याचदा वाचला होता, ज्यात देवाने एका पुरुषाला आणि एका स्त्रीला लग्नाच्या बंधनात कसं बांधलं होतं याबद्दल सांगितलं आहे. पण लग्नाच्या व्यवस्थेबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे, याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. येशूच्या शब्दांवरून आपल्याला कळतं, की आपण योग्य मनोवृत्ती ठेवून बायबल वाचलं पाहिजे. परूश्‍यांसारखं आपण स्वतःला जास्त समजू नये किंवा इतरांमध्ये चुका काढण्याच्या उद्देशाने आपण बायबल वाचू नये; तर आपण प्रामाणिक असलं पाहिजे आणि शिकून घ्यायला नेहमी तयार असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०२ १२ ¶१२-१३

सोमवार, २९ जानेवारी

विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल.​—नीति. २:११.

यहोवाने इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र दिलं होतं, त्यात अशा बऱ्‍याच गोष्टी सांगितल्या होत्या ज्यांमुळे इस्राएली लोक घरामध्ये किंवा बाहेर काम करत असताना गंभीर अपघात टाळू शकत होते आणि आपल्या जिवाचं रक्षण करू शकत होते. (निर्ग. २१:२८, २९; अनु. २२:८) एखाद्याच्या हातून चुकूनसुद्धा दुसऱ्‍याचा जीव गेला, तर त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागायचे. (अनु. १९:४, ५) नियमशास्त्रात असं सांगितलं होतं, की एखाद्याच्या हातून चुकून जरी न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला तरी त्याला कठोर शिक्षा दिली जावी. (निर्ग. २१:२२, २३) यावरून कळतं की आपण अपघात टाळण्यासाठी आणि जिवाचं रक्षण करण्यासाठी नेहमी सावध असावं अशी यहोवाची इच्छा होती. घरी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला जीवनाबद्दल कदर आहे हे आपण दाखवत असतो. धारदार वस्तू, विषारी रसायनं, औषधं या गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या असतील तर इतरांना इजा होणार नाही अशा प्रकारे आपण त्या टाकून दिल्या पाहिजेत. शिवाय अशा गोष्टी लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. जसं की, आग पेटवताना, पाणी उकळताना किंवा इलेक्ट्रिक हत्यारं वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्या गोष्टी तशाच सोडून दिल्या नाही पाहिजेत. किंवा मग आपली पुरेशी झोप झाली नसेल, औषधं घेतल्यामुळे आपल्याला गुंगी येत असेल किंवा मद्य घेतलं असेल तर आपण गाडी चालवणार नाही. किंवा मग गाडी चालवत असताना आपण मोबाईलवर बोलणार नाही किंवा आपलं लक्ष विचलित होईल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. टेहळणी बुरूज२३.०२ २१-२२ ¶७-९

मंगळवार, ३० जानेवारी

तुम्ही तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.​—यश. ३०:२०.

यहोवाधीराने वागणारा, दयाळू आणि समजून घेणारा शिक्षक आहे. तो त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलं ते पाहतो. (स्तो. १३०:३) तो कधीच आपल्याकडून जास्त अपेक्षा करत नाही. त्याला आपल्या क्षमता माहीत आहेत. कारण त्याने आपल्या मेंदूची रचना केली आहे. आणि आपला मेंदू ही त्याने आपल्याला दिलेली एक अद्‌भुत भेट आहे. (स्तो. १३९:१४) आपल्या निर्माणकर्त्याची हीच इच्छा आहे, की आपण कायम शिकत राहावं आणि शिकण्याचा आनंद घेत राहावा. म्हणूनच बायबलची सत्यं शिकून घेण्यासाठी आपण आत्तापासूनच “तीव्र इच्छा उत्पन्‍न” केली पाहिजे. (१ पेत्र २:२) यासाठी तुम्ही गाठता येतील अशी काही ध्येयं ठेवू शकता. आणि नियमितपणे बायबल वाचन आणि त्याचा अभ्यास करू शकता. (यहो. १:८) यहोवाच्या आशीर्वादाने तुम्हाला वाचनाची गोडी लागेल आणि तुम्ही त्याच्याबद्दल जास्त शिकाल. पण फक्‍त ज्ञान घेणंच पुरेसं नाही; तर आपल्याला यहोवाबद्दल जास्तीत जास्त शिकूनही घेता आलं पाहिजे. तसंच, या ज्ञानामुळे त्याच्यावरचं आपलं प्रेम आणि विश्‍वास यांसारखे गुणही वाढवता आले पाहिजे. तरच या ज्ञानाचा आपल्याला फायदा होईल. (१ करिंथ. ८:१-३) म्हणून जसजसं तुम्ही यहोवाबद्दल शिकत जाल, तसतसा तुमचा विश्‍वास आणखी वाढावा अशी त्याला विनंती करा. (लूक १७:५) अशा प्रार्थनेचं तो नक्की उत्तर देतो. टेहळणी बुरूज२३.०३ १० ¶११, १३

बुधवार, ३१ जानेवारी

वेळेचा चांगला उपयोग करा.​—कलस्सै. ४:५.

यहुदी व्यवस्थेच्या अंताची वाट पाहत असताना येशूच्या शिष्यांनी नुसतंच बसून राहायचं नव्हतं. येशूने त्यांना एक महत्त्वाचं काम दिलं होतं. त्याने त्यांना “यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला सांगितलं होतं. (प्रे. कार्यं १:६-८) ही खरंच खूप मोठी जबाबदारी होती. आणि या कामात स्वतःला झोकून देऊन शिष्यांनी वेळेचा चांगला उपयोग केला. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपण आपल्या वेळेचा कसा उपयोग करतो याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्यापैकी कोणासोबतही “अनपेक्षित घटना” घडू शकतात. (उप. ९:११) आणि आपल्या जिवाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. यहोवाची इच्छा पूर्ण करून आणि त्याच्यासोबतची मैत्री आणखी घट्ट करून आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग करू शकतो. (योहा. १४:२१) तसंच, आपण ‘खंबीर आणि स्थिर राहून प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहिलं पाहिजे.’ (१ करिंथ. १५:५८) मग जेव्हा अंत येईल, मग तो आपल्या जीवनाचा असो किंवा या दुष्ट जगाचा असो, आपल्याला मुळीच पस्तावा होणार नाही.​—मत्त. २४:१३; रोम. १४:८. टेहळणी बुरूज२३.०२ १८ ¶१२-१४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा