नोव्हेंबर
बुधवार, १ नोव्हेंबर
त्या सगळ्यांना यहोवा शिकवेल.—योहा. ६:४५.
यहोवा आपल्याला आणखीनही काही मार्गांनी मदत करतो. जसं की, प्रचार करताना कोणी आपल्यावर रागवलं, आपल्यावर ओरडलं तर शांत राहायला तो आपल्याला मदत करतो. घरमालकाशी बोलताना योग्य वचन आठवायला तो आपल्याला मदत करतो. इतकंच नाही, तर ज्या क्षेत्रात लोक आपला संदेश ऐकत नाहीत त्या क्षेत्रात प्रचार करत राहायलाही तो आपल्याला शक्ती देतो. (यिर्म. २०:७-९) सेवाकार्य कसं करायचं याचं प्रशिक्षण देऊनही यहोवा आपल्याला चांगुलपणा दाखवतो. जसं की, प्रचारकार्यात लोकांशी कसं बोलायचं याबद्दलचे व्हिडिओ सभांमध्ये दाखवले जातात आणि त्यांप्रमाणे आपण लोकांशी बोलावं असं प्रोत्साहन आपल्याला दिलं जातं. सुरुवातीला एखादी नवीन पद्धत वापरायला आपल्याला भीती वाटू शकते. पण तरीसुद्धा आपण ती वापरतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं, की ही पद्धत खूप चांगली आहे. तसंच, सभांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये आपल्याला हे सुचवलं जातं, की साक्ष द्यायच्या ज्या पद्धती आपण आतापर्यंत वापरल्या नाहीत, त्या आपण वापरून पाहाव्यात. हेसुद्धा कदाचित आपल्याला कठीण वाटू शकतं. पण आपण त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो, तेव्हा यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो. टेहळणी बुरूज२१.०८ २७ ¶५-६
गुरुवार, २ नोव्हेंबर
वेळेचा चांगला उपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.—इफिस. ५:१६.
करिंथ मंडळीला प्रेषित पौलने पत्र लिहिलं आणि त्यांना कडक शब्दात सल्ला दिला. आणि हे पत्र पाठवल्यानंतर त्याने तीतला त्या मंडळीत पाठवलं. जेव्हा त्याला समजलं, की मंडळीतल्या भाऊबहिणींनी त्याचा सल्ला स्वीकारला आहे, तेव्हा त्याला नक्कीच खूप आनंद झाला असेल. (२ करिंथ. ७:६, ७) आज वडीलसुद्धा पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवू शकतात. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, भाऊबहिणींशी चांगलं बोलता यावं म्हणून ते सभेला थोडं लवकर येऊ शकतात. एखाद्या भावाला किंवा बहिणीला हवं असलेलं प्रोत्साहन देण्यासाठी काही मिनिटंच हवी असतात. (रोम. १:१२) तसंच, पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून वडील भाऊबहिणींचा विश्वास वाढण्यासाठी बायबलची काही वचनं त्यांना दाखवू शकतात. आणि यहोवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव त्यांना करून देऊ शकतात. ते वेळोवेळी त्यांची प्रशंसा करतात. जेव्हा-जेव्हा त्यांना भाऊबहिणींना सल्ला देण्याची गरज पडते, तेव्हा ते तो देवाच्या वचनाच्या आधारावर देतात. तसंच, भाऊबहिणींना सल्ला स्वीकारता यावा म्हणून ते तो स्पष्टपणे पण सौम्यतेने देण्याचा प्रयत्न करतात.—गलती. ६:१. टेहळणी बुरूज२२.०३ २८-२९ ¶११-१२
शुक्रवार, ३ नोव्हेंबर
आमची ही संपत्ती मातीच्या भांड्यांत आहे. हे यासाठी, की आमच्याजवळ असलेलं असाधारण सामर्थ्य आमचं स्वतःचं नसून, देवाचं आहे हे दिसून यावं.—२ करिंथ. ४:७.
आज यहोवा त्याच्या सेवकांना विश्वासूपणे सेवा करत राहण्यासाठी “असाधारण सामर्थ्य” देतो. हे तो वेगवेगळ्या मार्गांनी करतो. पहिला मार्ग म्हणजे प्रार्थना. इफिसकर ६:१८ यात प्रेषित पौल आपल्याला “प्रत्येक प्रसंगी” देवाला प्रार्थना करायचं प्रोत्साहन देतो. आपण असं केलं, तर यहोवा नक्कीच आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला ताकद देईल. कधीकधी आपण चिंतेत इतके बुडून जातो, की प्रार्थनेत नेमकं काय म्हणायचं हेच आपल्याला सुचत नाही. पण अशा वेळीही आपण प्रार्थना करावी अशी यहोवाची इच्छा आहे. (रोम. ८:२६, २७) दुसरा मार्ग म्हणजे बायबल. ताकद आणि सांत्वन मिळण्यासाठी पौल नेहमी शास्त्रवचनं वाचायचा. आज आपणही तेच केलं पाहिजे. (रोम. १५:४) आपण बायबल वाचतो आणि त्यावर मनन करतो तेव्हा यहोवा आपल्याला हे समजायला मदत करतो, की बायबलचा सल्ला आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो.—इब्री ४:१२. टेहळणी बुरूज२१.०५ २२ ¶८-१०
शनिवार, ४ नोव्हेंबर
[देव] तुम्हाला उत्साहित करतो . . . तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करायची ताकदही देतो.—फिलिप्पै. २:१३.
लोकांना शिकवायचं काम खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहे. पण ते सोपं नाही. आपल्यासमोर अनेक समस्या येऊ शकतात. परिस्थितीमुळे आपल्याला हवं तितकं करता येत नसेल. उदाहरणार्थ, आपल्यापैकी काहींचं वय झालं असेल किंवा काहींची तब्येत चांगली नसेल. तुमचीही अशीच समस्या आहे का? असेल तर हे लक्षात असू द्या की आपण फोनवरून बायबल अभ्यास घ्यायला शिकलो आहोत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या सोयीनुसार बायबल अभ्यास सुरू करू शकता आणि तो चालवू शकता. याचा आणखी एक फायदा आहे. काहींना बायबल अभ्यास करायचा असतो. पण आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा कदाचित त्यांना अभ्यास करायला वेळ नसेल. त्यांना कदाचित अगदी सकाळी किंवा रात्री उशीरा वेळ असेल. मग अशा वेळी तुम्ही फोनवरून त्यांच्यासोबत बायबल अभ्यास कराल का? जसं निकदेम रात्रीच्या वेळी येशूकडे आला तेव्हा त्याने त्याला शिकवलं.—योहा. ३:१, २. टेहळणी बुरूज२१.०७ ५ ¶१०-११
रविवार, ५ नोव्हेंबर
हे लोक तोंडाने माझा आदर करतात, ओठांनी माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.—यश. २९:१३.
येशूचे शिष्य उपास करत नाहीत हे पाहून बाप्तिस्मा देणाऱ्या योहानच्या शिष्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्या वेळी येशूने त्यांना समजावून सांगितलं, की तो जिवंत आहे तोपर्यंत त्यांना उपास करायची गरज नाही. (मत्त. ९:१४-१७) पण तरीसुद्धा परूशी लोकांनी त्याला नाकारलं. कारण तो त्यांच्या रूढी-परंपरा पाळत नव्हता. त्याने शब्बाथाच्या दिवशी आजारी लोकांना बरं केलं तेव्हा त्यांना खूप राग आला. (मार्क ३:१-६; योहा. ९:१६) एकीकडे ते शब्बाथ पाळायच्या मोठमोठ्या गोष्टी करत होते; पण दुसरीकडे मंदिरात व्यापार करणाऱ्या लोकांबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं. त्याबद्दल येशूने त्यांना फटकारलं तेव्हा ते खूप भडकले. (मत्त. २१:१२, १३, १५) आणि नासरेथच्या सभास्थानात येशू प्रचार करत होता तेव्हा तिथले लोक तर आणखीनच भडकले. कारण जुन्या काळातली उदाहरणं देऊन त्याने त्यांना दाखवून दिलं, की ते किती स्वार्थी आहेत आणि त्यांच्यात विश्वासाची किती कमी आहे. (लूक ४:१६, २५-३०) लोकांच्या अपेक्षेप्रमाणे येशू वागला नाही त्यामुळे अनेकांनी त्याला नाकारलं. टेहळणी बुरूज२१.०५ ५-६ ¶१३-१४
सोमवार, ६ नोव्हेंबर
त्याच्या डावपेचांबद्दल आपण अंधारात आहोत, असं नाही.—२ करिंथ. २:११.
बायबलमध्ये अशा काही लोकांची उदाहरणं दिली आहेत जे गर्वाच्या आणि लोभाच्या पाशांत अडकले होते. लोभ हा शब्द ऐकताच सहसा सैतानाचं वाईट उदाहरण आपल्या लक्षात येतं. सुरुवातीला तो यहोवाचा एक स्वर्गदूत होता आणि त्याच्याकडे बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. पण त्यात तो समाधानी नव्हता. सगळ्यांनी यहोवाची उपासना करण्याऐवजी आपली उपासना करावी असं सैतानाला वाटत होतं. आपणसुद्धा त्याच्यासारखंच व्हावं, म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी असू नये असं त्याला वाटतं. ही गोष्ट त्याने सर्वात आधी हव्वाच्या बाबतीत केली. यहोवाने आदाम आणि हव्वाला सगळं काही दिलं होतं. त्यांना खाण्यापिण्याची कसलीच कमी नव्हती. फक्त एका झाडाचं फळ सोडून, ते ‘बागेतल्या सगळ्या झाडांची फळं पोटभर खाऊ शकत होते.’ (उत्प. २:१६) पण तरी मना केलेल्या झाडाचं फळ खाल्ल्यामुळे हव्वाला आणखी बरेच फायदे मिळतील असा सैतानाने तिला विचार करायला लावला. आपल्याकडे आहे त्यात हव्वा समाधानी नव्हती. तिला आणखी जास्त पाहिजे होतं. पुढे तिने काय केलं ते आपल्याला माहीतच आहे. तिने पाप केलं आणि शेवटी तिचा मृत्यू झाला.—उत्प. ३:६, १९. टेहळणी बुरूज२१.०६ १४ ¶२-३; १७ ¶९
मंगळवार, ७ नोव्हेंबर
फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका आणि तिच्यावर अधिकार चालवा.—उत्प. १:२८.
आदाम आणि हव्वाने मुलांना जन्म द्यावा आणि पृथ्वीची काळजी घ्यावी अशी यहोवाची इच्छा होती. त्यांनी जर देवाचं ऐकलं असतं आणि त्याच्या उद्देशाप्रमाणे काम केलं असतं, तर ते आणि त्यांची मुलं कायम यहोवाच्या कुटुंबात राहिले असते. आदाम आणि हव्वा यहोवाच्या कुटुंबातले महत्त्वाचे सदस्य होते. यहोवाने बनवलेल्या पहिल्या मानवाबद्दल दावीदने स्तोत्र ८:५ मध्ये असं म्हटलं, “तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट घातलास.” हे खरं आहे, की मानवांना स्वर्गदूतांसारखी शक्ती, बुद्धी आणि क्षमता दिलेली नाही. (स्तो. १०३:२०) पण मानवांमध्ये आणि स्वर्गदूतांमध्ये फारसा फरक नाही. यहोवाने मानवांना स्वर्गदूतांपेक्षा फक्त ‘काहीसं कमी बनवलं आहे.’ दुःखाची गोष्ट म्हणजे, आदाम आणि हव्वाने यहोवाचं ऐकलं नाही. आणि त्यामुळे ते त्याच्या कुटुंबात राहू शकले नाहीत. आणि याचे भयंकर परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागले. पण मानवांसाठी असलेला यहोवाचा उद्देश बदललेला नाही. मानवांनी त्याचं ऐकावं आणि कायमसाठी त्याची मुलं व्हावं असं त्याला वाटतं. टेहळणी बुरूज२१.०८ २-३ ¶२-४
बुधवार, ८ नोव्हेंबर
“सैन्याच्या बळाने नाही किंवा माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्तीने हे सगळं घडून येईल,” असं . . . यहोवा म्हणतो.—जख. ४:६.
आज यहोवाच्या बऱ्याच उपासकांना विरोधाचा सामना करावा लागतो. काही साक्षीदार अशा देशांमध्ये राहतात जिथे आपल्या कामावर बंदी आहे. तिथे आपल्या भाऊबहिणींना कधीकधी अटक केली जाते आणि “राज्यपालांच्या आणि राजांच्या समोर” नेलं जातं. यामुळे त्या अधिकाऱ्यांना साक्ष मिळते. (मत्त. १०:१७, १८) पण विरोध नेहमी सरकारी अधिकाऱ्यांकडून होतो असं नाही. काही साक्षीदार अशा देशांमध्ये राहतात जिथे त्यांना उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून विरोधाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरचे लोक, त्यांना कसंही करून यहोवाची उपासना करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतात. (मत्त. १०:३२-३६) पण विरोध होत असतानाही जेव्हा आपले भाऊबहीण यहोवाची उपासना करत राहतात, तेव्हा बऱ्याच वेळा त्यांच्या कुटुंबातले सदस्य त्यांना विरोध करायचं सोडून देतात. आणि अशीही काही उदाहरणं आहेत, ज्यात पूर्वी तीव्र विरोध करणारे घरचे सदस्यच नंतर साक्षीदार बनले आणि आवेशाने यहोवाची सेवा करू लागले. म्हणून जर तुम्हीही विरोधाचा सामना करत असाल तर निराश होऊ नका, उलट धैर्याने यहोवाची सेवा करत राहा. कारण यहोवा आणि त्याची सामर्थ्यशाली पवित्र शक्ती तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. टेहळणी बुरूज२२.०३ १६ ¶८
गुरुवार, ९ नोव्हेंबर
यहोवावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनो, वाईट गोष्टींचा द्वेष करा.—स्तो. ९७:१०.
बायबलमध्ये सांगितलं आहे, की “गर्विष्ठ नजर, खोटं बोलणारी जीभ, [आणि] निर्दोष रक्त सांडणारे हात,” यांसारख्या गोष्टींची यहोवाला घृणा वाटते. (नीति. ६:१६, १७) तसंच, ‘हिंसक आणि कपटी लोकांचीही यहोवाला घृणा वाटते.’ (स्तो. ५:६) यहोवाला अशा प्रवृत्तींचा आणि वाईट कामांचा इतका तिटकारा आहे, की नोहाच्या काळात त्याने सगळ्या दुष्ट लोकांचा नाश केला. कारण त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर हिंसाचार माजवला होता. (उत्प. ६:१३) मलाखी संदेष्ट्याद्वारेही यहोवाने सांगितलं, की जे आपल्या लग्नाच्या जोडीदाराला धोका देतात आणि चुकीच्या कारणांवरून घटस्फोट घेतात अशा लोकांची त्याला घृणा वाटते. त्यांची उपासना तो मुळीच स्वीकारत नाही आणि अशा वाईट वागणुकीचा तो त्यांच्याकडून हिशोब घेईल. (मला. २:१३-१६; इब्री १३:४) यहोवाची इच्छा आहे, की आपण ‘वाइटाचा द्वेष करावा.’ (रोम. १२:९) या ठिकाणी, “द्वेष” असं भाषांतर केलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचा अर्थ, एखाद्या गोष्टीबद्दल किळस किंवा खूप जास्त घृणा वाटणं असा होतो. त्यामुळे यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी करण्याचा विचारही आपल्याला असाच किळसवाणा वाटला पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०३ ४-५ ¶११-१२
शुक्रवार, १० नोव्हेंबर
त्याची वाट पाहत राहणारे सर्व आनंदी असतात.—यश. ३०:१८.
लवकरच आपला स्वर्गीय पिता त्याच्या राज्याद्वारे आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल. जे यहोवाची वाट पाहतात त्यांना आता आणि नवीन जगात त्याच्याकडून भरपूर आशीर्वाद मिळतील. देवाचे लोक नवीन जगात जातील तेव्हा आजच्यासारख्या चितांचा आणि समस्यांचा त्यांना पुन्हा कधीच सामना करावा लागणार नाही. अन्यायाचा अंत झालेला असेल आणि दुःखही नसेल. (प्रकटी. २१:४) आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता करावी लागणार नाही, कारण तिथे सगळं काही भरपूर असेल. (स्तो. ७२:१६; यश. ५४:१३) खरंच, तो किती सुंदर काळ असेल! त्या नवीन जगात राहण्यासाठी यहोवा आत्तापासूनच आपल्याला तयार करत आहे. तो आपल्याला वाईट सवयी सोडून देण्यासाठी आणि स्वतःमध्ये चांगले गुण वाढवण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे निराश होऊन यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ नका. कारण एक सुंदर जीवन आपली वाट पाहत आहे. यहोवा आपला उद्देश पूर्ण करेपर्यंत आपण धीराने वाट पाहू या आणि आनंदाने त्याची सेवा करत राहू या. टेहळणी बुरूज२१.०८ १३ ¶१७-१९
शनिवार, ११ नोव्हेंबर
चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.—इब्री १३:१६.
यहूदीयामधले ख्रिश्चन जर प्रेषित पौलच्या पत्रात दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागले असतील आणि एकमेकांना मदत करत राहिले असतील, तर पुढे अचानक आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्यांना नक्कीच जास्त सोपं गेलं असेल. कारण पौलचं हे पत्र मिळाल्याच्या काही काळानंतरच यहूदीयामधल्या ख्रिश्चनांना आपली घरंदारं, उद्योगधंदे आणि सत्यात नसलेले नातेवाईक सोडून ‘डोंगरांकडे पळून जावं’ लागलं. (मत्त. २४:१६) आणि अशा वेळी त्यांनी एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं होतं. आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आपले भाऊबहीण नेहमीच स्वतःहून आपल्याला सांगणार नाहीत. इतरांना तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलता येईल असा स्वभाव ठेवा. तुम्हाला असे काही भाऊबहीण नक्कीच माहीत असतील, जे इतरांना मदत करायला केव्हाही तयार असतात. ते कधीच असं दाखवत नाहीत, की आपल्यामुळे त्यांना त्रास होतो. गरज पडेल तेव्हा ते लगेच आपल्या मदतीला धावून येतील अशी आपल्याला खातरी असते. आपल्यालाही त्यांच्यासारखंच व्हायला आवडेल, नाही का? टेहळणी बुरूज२२.०२ २३-२४ ¶१३-१५
रविवार, १२ नोव्हेंबर
तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र शक्तीमुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून [ठेवा].—इफिस. ४:३.
अलीकडच्या वर्षांमध्ये बऱ्याच मंडळ्यांना एकत्र करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या मंडळ्या आता वेगळ्या विभागांमध्ये किंवा सर्किटमध्ये आहेत. आपल्यालाही जर एखाद्या नवीन मंडळीत जायला सांगितलं, तर नातेवाइकांना आणि मित्रांना सोडून जाणं आपल्याला कदाचित कठीण जाऊ शकतं. एखाद्या प्रचारकाला कुठे नेमलं जावं याबद्दल मंडळीतल्या वडिलांना थेट देवाकडून मार्गदर्शन मिळतं का? नाही. आणि यामुळेच वडिलांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण वडील अशा प्रकारचे निर्णय घेतात, तेव्हा यहोवा त्यांच्यावर भरवसा ठेवतो आणि म्हणून आपणही त्यांच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. मंडळीत वडिलांनी घेतलेले निर्णय आपल्या मनासारखे नसले, तरीसुद्धा आपण त्या निर्णयांप्रमाणे का वागलं पाहिजे? कारण असं केल्यामुळे मंडळीतली शांती आणि एकता टिकून राहते. मंडळीतले सगळेच जण जेव्हा वडिलांनी घेतलेल्या निर्णयांना पाठिंबा देतात, तेव्हा मंडळीची वाढ होते. (इब्री १३:१७) सगळ्यात मुख्य म्हणजे आपली काळजी घेण्यासाठी यहोवा ज्यांच्यावर भरवसा ठेवतो, त्यांना सहकार्य केल्यामुळे आपण खरंतर यहोवावरच भरवसा असल्याचं दाखवत असतो.—प्रे. कार्यं २०:२८. टेहळणी बुरूज२२.०२ ४-५ ¶९-१०
सोमवार, १३ नोव्हेंबर
सार्वजनिक वाचन, मार्गदर्शन देणं आणि शिकवणं यांत स्वतःला वाहून घे.—१ तीम. ४:१३.
भावांनो, तुमचा बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचायची, भाषण द्यायची आणि शिकवायची कला वाढवू शकता. यासाठी तुम्ही मेहनत घेतली, तर मंडळीला खूप फायदा होईल. (१ तीम. ४:१५) म्हणून वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा, या माहितीपत्रकातल्या प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्याचं आणि त्यावर काम करण्याचं ध्येय ठेवा. प्रत्येक वेळी एकेका मुद्द्याचा अभ्यास करा, घरी त्याचा चांगला सराव करा आणि त्याप्रमाणे भाषण देण्याचा प्रयत्न करा. तसंच, तुम्ही मंडळीतल्या सहायक सल्लागाराकडून किंवा ‘बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेत असलेल्या’ वडिलांकडून सल्ला घेऊ शकता. (१ तीम. ५:१७) या माहितीपत्रकातले मुद्दे लागू करण्यासोबतच श्रोत्यांचा विश्वास वाढवायचा आणि त्यांना कार्य करायला प्रोत्साहन द्यायचाही प्रयत्न करा. यामुळे तुमचा आणि तुमचं ऐकणाऱ्यांचाही आनंद वाढेल. टेहळणी बुरूज२१.०८ २४ ¶१७
मंगळवार, १४ नोव्हेंबर
नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.—फिलिप्पै. २:३.
आपण जर इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं, तर ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त कौशल्यं आणि क्षमता आहेत त्यांच्याशी आपण स्पर्धा करणार नाही. उलट त्यांच्याकडे या गोष्टी आहेत याचा आपल्याला आनंद होईल. खासकरून ते आपल्या कौशल्यांचा वापर यहोवाच्या सेवेसाठी करत असतील तर. त्यामुळे मंडळीत शांती आणि एकता टिकून राहील. ईर्ष्येपासून दूर राहण्यासाठी आपण हे ओळखलं पाहिजे, की आपण सगळ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे आपण हे कधीच दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही, की बाकी सगळ्यांपेक्षा आपण फार कुशल आहोत. उलट ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त क्षमता आहेत, कौशल्यं आहेत त्यांच्याकडून शिकून घेण्याचा आपण प्रयत्न करू. उदाहरणार्थ, एखादा भाऊ चांगली भाषणं देत असेल, तर तो भाषणांची तयारी कशी करतो हे आपण त्याला विचारू शकतो. एखादी बहीण चांगला स्वयंपाक करत असेल, तर आपण तिच्याकडून तो शिकू शकतो. टेहळणी बुरूज२१.०७ १६ ¶८-९
बुधवार, १५ नोव्हेंबर
[यहोवा] कधीच अन्याय करत नाही.—अनु. ३२:४.
गणना पुस्तकात आपण अशा एका इस्राएली व्यक्तीबद्दल वाचतो, ज्याने शब्बाथाच्या दिवशी लाकडं गोळा केली म्हणून यहोवाने त्याला मृत्युदंड दिला. याच्या अनेक शतकांनंतर शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकात आपण असं वाचतो, की दावीद राजाने व्यभिचार आणि खून करूनसुद्धा यहोवाने त्याला माफ केलं. (गण. १५:३२, ३५; २ शमु. १२:९, १३) त्यामुळे आपल्याला कदाचित असा प्रश्न पडेल, की एका व्यक्तीने एक छोटीशी चूक केली तरी यहोवाने त्याला मृत्युदंड दिला, आणि दावीदने तर इतकं मोठं पाप केलं तरीसुद्धा यहोवाने त्याला कसं काय माफ केलं? एखाद्या अहवालाबद्दल बायबल नेहमीच सगळी माहिती देतं असं नाही. उदाहरणार्थ, दावीदबद्दल आपल्याला हे माहीत आहे, की त्याने जे काही केलं होतं त्याबद्दल त्याने मनापासून पश्चात्ताप केला. (स्तो. ५१:२-४) पण शब्बाथाचा नियम मोडणाऱ्या त्या इस्राएली माणसाबद्दल काय म्हणता येईल? तो कसा होता? केलेल्या चुकीबद्दल त्याला पश्चात्ताप झाला होता का? याआधीसुद्धा त्याने देवाचा नियम मोडला होता का? बऱ्याच वेळा सांगूनसुद्धा त्याने तीच चूक पुन्हा केली होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बायबल देत नाही. पण तरीसुद्धा यहोवाबद्दल आत्तापर्यंत आपल्याला जितकं माहीत आहे, त्यावरून एका गोष्टीचा आपण भरवसा ठेवू शकतो. ती म्हणजे, यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं, कारण ‘त्याचे सर्व मार्ग नीतिमान असतात.’—स्तो. १४५:१७. टेहळणी बुरूज२२.०२ २-३ ¶३-४
गुरुवार, १६ नोव्हेंबर
जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.—नीति. ११:२.
स्वतःच्या मर्यादांची जाणीव असणारी व्यक्ती, आपण काय करू शकतो आणि काय नाही हे ओळखून त्याप्रमाणे काम करते. त्यामुळे ती जे काही करते त्यातून तिला आनंद मिळतो. मर्यादांची जाणीव असलेल्या व्यक्तीची तुलना आपण सायकल चालवणाऱ्याशी करू शकतो. रस्त्याला चढ असेल तर सायकल चालवणारा शक्यतो खाली उतरून रस्ता चालत पार करायचा प्रयत्न करेल. पण चालत असल्यामुळे त्याचा वेग जरी कमी झाला, तरी तो थांबत नाही. तो पुढे जात राहतो. त्याचप्रमाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेली व्यक्ती वयामुळे येणाऱ्या मर्यादा ओळखून आपल्या कामाचा वेग कमी करते. पण वेग कमी असला, तरी ती थांबत नाही. ती यहोवाची आणि इतरांची सेवा करत राहते. (फिलिप्पै. ४:५) बायबल काळातल्या बर्जिल्ल्यचं उदाहरण घ्या. तो ८० वर्षांचा होता तेव्हा दावीद राजाने त्याला आपल्या दरबारात सल्लागार म्हणून काम करण्यासाठी बोलवलं. पण बर्जिल्ल्यने हे काम स्वीकारलं नाही. कारण त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. म्हणून त्याने आपल्याऐवजी किम्हाम नावाच्या एका तरुण व्यक्तीला घ्यावं अशी विनंती केली. (२ शमु. १९:३५-३७) आजसुद्धा बर्जिल्ल्यप्रमाणेच वयस्कर बांधव आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बांधवांना सेवा करायची संधी देतात. टेहळणी बुरूज२१.०९ १० ¶६-७
शुक्रवार, १७ नोव्हेंबर
मुलगा कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाही माहीत नाही. तसंच, पिता कोण आहे हे मुलाशिवाय, आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.—लूक १०:२२.
काहींच्या बाबतीत असं घडलं असेल, की त्यांच्या वडिलांनी कधीच त्यांच्यावर प्रेम केलं नसेल. ते नेहमीच त्यांच्याशी कठोरपणे वागले असतील. आणि म्हणून यहोवा एक प्रेमळ पिता आहे ही गोष्ट स्वीकारणं त्यांना कठीण जातं. पण आपल्याला कसं वाटतं आणि त्यामागचं कारण काय हे यहोवा समजून घेतो ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! आपण त्याच्याशी जवळचं नातं जोडावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणूनच त्याचं वचन आपल्याला म्हणतं, की “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याको. ४:८) यहोवा आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि तो आपला सगळ्यात चांगला पिता होईल असं म्हणतो. यहोवाशी जवळचं नातं जोडायला येशू आपल्याला मदत करू शकतो. कारण येशू यहोवाला खूप जवळून ओळखतो आणि त्याच्यामध्ये यहोवासारखेच गुण आहेत. म्हणून त्याने म्हटलं, “ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.” (योहा. १४:९) एका मोठ्या भावाप्रमाणे येशू आपल्याला हे शिकवतो, की आपण आपल्या पित्याचा आदर कसा करू शकतो, आणि त्याचं कसं ऐकू शकतो. तसंच, आपल्यामुळे पित्याचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी आपण कशी घेऊ शकतो, हेसुद्धा येशू आपल्याला शिकवतो. पण यहोवा किती प्रेमळ आहे हे येशूने खासकरून स्वतःच्या जीवनातून दाखवून दिलं. टेहळणी बुरूज२१.०९ २१ ¶४-५
शनिवार, १८ नोव्हेंबर
तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा.—१ पेत्र ५:२.
यहोवाचे लोक एकत्र मिळून त्याची उपासना करत आहेत. मंडळी शुद्ध ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी यहोवाने वडिलांवर सोपवली आहे. एखाद्या ख्रिश्चनाने जर एखादं गंभीर पाप केलं, तर त्या व्यक्तीला मंडळीत ठेवावं की नाही हे वडिलांनी ठरवावं अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. या बाबतीत बऱ्याच गोष्टी लक्षात घेताना वडिलांना हेही पाहावं लागतं, की केलेल्या चुकीबद्दल त्या व्यक्तीला खरंच पस्तावा होत आहे का? आपल्याला पस्तावा होत आहे असं तो म्हणत असला तरी त्याच्या वागण्यावरून काय दिसतं? त्याने जे केलं त्याचा त्याला खरंच तिरस्कार वाटतो का? आणि अशी चूक पुन्हा करायची नाही असं त्याने मनाशी ठरवलं आहे का? ही चूक जर वाईट संगतीमुळे झाली असेल, तर ती संगत सोडून द्यायला तो तयार आहे का? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करताना वडील प्रार्थना करतात, तसंच बायबलमधली वचनं आणि तत्त्वं विचारात घेतात. याशिवाय, चूक करणाऱ्या व्यक्तीला आपल्या चुकीबद्दल खरंच कसं वाटतं हेसुद्धा ते पाहतात. आणि त्यानंतरच तिला मंडळीत ठेवायचं की नाही, हा निर्णय घेतात. काही वेळा अशा व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृतसुद्धा करावं लागतं.—१ करिंथ. ५:११-१३. टेहळणी बुरूज२२.०२ ५ ¶११-१२
रविवार, १९ नोव्हेंबर
देवाकडून असलेलं नवीन व्यक्तिमत्त्व घाला.—कलस्सै. ३:१०.
आपण यहोवाला आवडेल अशा प्रकारची व्यक्ती बनावं अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. मग आपला बाप्तिस्मा होऊन काही दिवस झालेले असोत किंवा बरीच वर्षं. पण यहोवाला आवडेल अशी व्यक्ती बनण्यासाठी चुकीचे विचार आपण टाळले पाहिजेत आणि योग्य प्रकारे विचार करायला शिकलं पाहिजे. का बरं? कारण सहसा आपण जसा विचार करतो त्याप्रमाणेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. आपण जर सतत शारीरिक इच्छांबद्दल विचार करत राहिलो, तर आपण चुकीच्या गोष्टी बोलू आणि आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडतील. (इफिस. ४:१७-१९) पण तेच जर आपण चांगल्या गोष्टींवर विचार करत राहिलो, तर यहोवाला आवडेल अशा प्रकारे बोलणं आणि वागणं आपल्याला शक्य होईल. (गलती. ५:१६) तरी, आपल्या मनात कधीच वाईट विचार येणार नाहीत असं नाही. पण त्या वाईट विचारांप्रमाणे वागायचं की नाही हे आपल्या हातात आहे. बाप्तिस्मा घेण्याआधी, आपण यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी बोलणं आणि त्यांप्रमाणे वागणं सोडून दिलं पाहिजे. जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकण्यासाठी हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. पण खऱ्या अर्थाने यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर आपण नवीन व्यक्तिमत्त्व विकसित केलं पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०३ ८ ¶१-२
सोमवार, २० नोव्हेंबर
या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे शुद्ध असल्याचं दाखवून दिलं.—२ करिंथ. ७:११.
गंभीर पाप केलेल्या व्यक्तीला खरंच पश्चात्ताप आहे का हे ओळखणं खरंतर वडिलांसाठी खूप कठीण आहे. कारण एखाद्याच्या मनात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यावरून त्यांना जे काही दिसतं, त्यावरूनच त्यांना हे ओळखावं लागतं, की त्या व्यक्तीला खरंच पस्तावा आहे की नाही. त्यामुळे वडिलांना हे बघावं लागेल, की त्याने त्याच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि वागण्यामध्ये खरंच बदल केले आहेत की नाहीत. आणि हे बदल करण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो. बहिष्कृत व्यक्तीला जर खरंच पश्चात्ताप झाला असेल तर ती सभांना नियमितपणे येईल. वडिलांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे ती नियमितपणे प्रार्थना आणि बायबल अभ्यास करेल. आणि ज्या गोष्टींमुळे तिच्या हातून ते पाप घडलं त्या गोष्टींपासून ती दूर राहायचा प्रयत्न करेल. देवासोबत आपलं नातं पुन्हा जोडण्यासाठी तिने जर मनापासून प्रयत्न केला, तर ती या गोष्टीची खातरी बाळगू शकते, की यहोवा तिला क्षमा करेल. आणि वडील त्या व्यक्तीला पुन्हा मंडळीत येण्यासाठी मदत करतील. टेहळणी बुरूज२१.१० ६ ¶१६-१८
मंगळवार, २१ नोव्हेंबर
तुम्ही आपल्यासाठी कोरलेली मूर्ती बनवू नका. वर आकाशातल्या, खाली पृथ्वीवरच्या . . . कशाचीही प्रतिमा आपल्यासाठी बनवू नका. त्यांच्यासमोर वाकू नका.—निर्ग. २०:४, ५.
येशूचं यहोवावर खूप प्रेम होतं. म्हणून त्याने स्वर्गात आणि पृथ्वीवर असतानाही फक्त आणि फक्त यहोवाचीच उपासना केली. (लूक ४:८) आणि त्याने आपल्या शिष्यांनाही तसंच करायला शिकवलं. पण उपासना करण्यासाठी येशूने आणि त्याच्या शिष्यांनी कधीच मूर्तींचा वापर केला नाही. कारण देव अदृश्य आहे, त्यामुळे कोणीही त्याची मूर्ती किंवा प्रतिमा बनवू शकत नाही. (यश. ४६:५) मग लोक ज्यांना संत म्हणतात त्यांच्याबद्दल काय? आपण त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा बनवून उपासना करू शकतो का? यहोवाने ज्या दहा आज्ञा दिल्या होत्या, त्यांतली दुसरी आज्ञा आपल्याला आजच्या वचनात वाचायला मिळते. यावरून आपल्याला समजतं, की ज्यांना यहोवाला खूश करायची इच्छा आहे, ते उपासनेत मूर्तींचा उपयोग करत नाहीत. पहिल्या शतकातले ख्रिस्ती फक्त देवाचीच उपासना करायचे असं इतिहासकार म्हणतात. त्या ख्रिश्चनांप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदारसुद्धा उपासनेत प्रतिमांचा किंवा मूर्तींचा वापर करत नाहीत. टेहळणी बुरूज२१.१० १९-२० ¶५-६
बुधवार, २२ नोव्हेंबर
घराच्या छतावर असलेल्या माणसाने आपल्या घरातून काही वस्तू घ्यायला खाली येऊ नये.—मत्त. २४:१७.
येशूने यहूदामध्ये राहणाऱ्या पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना सांगितलं, की अशी एक वेळ येईल जेव्हा ते ‘यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहतील.’ (लूक २१:२०-२४) आणि जेव्हा असं घडेल, तेव्हा त्यांना डोंगराकडे पळून जायचं होतं. त्यामुळे त्यांचा जीव वाचणार होता. पण त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार होती. काही वर्षांआधी टेहळणी बुरूज अंकात याबद्दल असं म्हटलं होतं: त्यांनी आपली शेतं आणि सामान-सुमानासह आपली घरं सोडून दिली. यहोवाचं संरक्षण व पाठिंबा याची खातरी बाळगून, त्यांनी महत्त्वपूर्ण वाटत असलेल्या सर्व गोष्टींऐवजी यहोवाच्या उपासनेला पहिलं स्थान दिलं. त्या अंकात पुढे असं म्हटलं होतं: “येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला अशा परीक्षांचा सामना करावा लागेल, ज्यांवरून हे दिसून येईल की आपल्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे? भौतिक गोष्टी, की यहोवाला विश्वासू राहिल्यामुळे मिळणारं तारण? अंत येईल तेव्हा आपल्याला कदाचित कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि बरेच त्यागही करावे लागतील. पण आपण काहीही करायला तयार असलं पाहिजे.” टेहळणी बुरूज२२.०१ ४ ¶७-८
गुरुवार, २३ नोव्हेंबर
हे देवा, तुझं एकनिष्ठ प्रेम किती अनमोल आहे!—स्तो. ३६:७.
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले त्याच्या काही काळानंतर यहोवाने मोशेला आपल्या नावाबद्दल आणि गुणांबद्दल असं म्हटलं: “यहोवा, यहोवा, दयाळू, करुणामय आणि सहनशील देव; एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला. हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा; चुका, अपराध आणि पाप क्षमा करणारा.” (निर्ग. ३४:६, ७) आपल्या सुंदर गुणांबद्दल सांगताना यहोवाने त्याच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल एक खास गोष्ट सांगितली. ती कोणती होती? मोशेला स्वतःबद्दल सांगताना यहोवा फक्त असं म्हणाला नाही, की तो एकनिष्ठ प्रेम दाखवणारा देव आहे. तर त्याने असं म्हटलं, की तो “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला” देव आहे. बायबलमध्ये आणखी सहा वेळा आपल्याला हे शब्द वाचायला मिळतात. (गण. १४:१८; नहे. ९:१७; स्तो. ८६:१५; १०३:८; योए. २:१३; योना ४:२) पण या सर्व ठिकाणी हे शब्द मानवांच्या बाबतीत नाही, तर फक्त यहोवाच्या बाबतीत वापरण्यात आले आहेत. यावरून दिसून येतं, की यहोवाने एकनिष्ठ प्रेमावर खूप भर दिला आहे. टेहळणी बुरूज२१.११ २-३ ¶३-४
शुक्रवार, २४ नोव्हेंबर
आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.—मत्त. ६:२५.
प्रेषित पेत्र आणि त्याची पत्नी यांच्याकडून आज विवाहित जोडपी बरंच काही शिकू शकतात. पेत्र पहिल्यांदा येशूला भेटला त्याच्या जवळपास सहा महिन्यांनंतर किंवा कदाचित एका वर्षांनंतर त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार होता. आपलं घर चालवण्यासाठी पेत्र मासेमारीचा व्यवसाय करायचा. त्यामुळे येशूने जेव्हा त्याला आपल्यासोबत पूर्णवेळ सेवाकार्य करायला बोलवलं, तेव्हा पेत्रला आपल्या कुटुंबाचा विचार करावा लागणार होता. (लूक ५:१-११) पेत्रने येशूसोबत पूर्णवेळ प्रचारकार्य करायचा निर्णय घेतला. त्याने घेतलेल्या या निर्णयाला त्याच्या पत्नीने नक्कीच पाठिंबा दिला असेल. कारण बायबलमध्ये सांगितलं आहे, की येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर निदान काही काळासाठी तरी पेत्रच्या पत्नीने त्याच्यासोबत प्रवास केला. (१ करिंथ. ९:५) ज्याअर्थी पेत्र ख्रिस्ती पती-पत्नींना मनमोकळेपणाने सल्ला देऊ शकला, त्याअर्थी त्याच्या पत्नीचं इतरांसमोर नक्कीच एक चांगलं उदाहरण असावं. (१ पेत्र ३:१-७) यावरून स्पष्टपणे दिसून येतं, की यहोवाच्या अभिवचनावर पेत्र आणि त्याच्या पत्नीचा पूर्ण भरवसा होता. त्यांना माहीत होतं, की राज्याच्या कामाला आपण जीवनात पहिलं स्थान दिलं, तर यहोवा नक्कीच आपला सांभाळ करेल.—मत्त. ६:३१-३४. टेहळणी बुरूज२१.११ १८ ¶१४
शनिवार, २५ नोव्हेंबर
तुम्हीही माझं अनुकरण करा.—१ करिंथ. ११:१.
प्रेषित पौलचं आपल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. त्यांच्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. (प्रे. कार्यं २०:३१) म्हणून मंडळीतले भाऊबहीणसुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करायचे. एकदा तर इफिसमधल्या वडिलांना जेव्हा कळलं, की पौलची आणि आपली आता भेट होणार नाही, तेव्हा “ते सगळे खूप रडू लागले.” (प्रे. कार्यं २०:३७) आज आपल्या मेहनती वडिलांचंही आपल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम आहे. आणि त्यांची मदत करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. (फिलिप्पै. २:१६, १७) पण काही वेळा त्यांना वेगवेगळ्या आव्हानांनाही तोंड द्यावं लागतं. मग अशा आव्हानांवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट त्यांना मदत करू शकते? मंडळीतले वडील पौलच्या उदाहरणावर विचार करू शकतात. (१ करिंथ. ११:१) पौल काही स्वर्गदूत नव्हता, ज्याला सगळं काही जमत होतं. तो आपल्यासारखाच एक अपरिपूर्ण व्यक्ती होता. योग्य त्या गोष्टी करायला काही वेळा त्यालाही संघर्ष करावा लागायचा. (रोम. ७:१८-२०) त्याला बऱ्याच समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. पण असं असतानाही, भाऊबहिणींसाठी मेहनत घ्यायचं त्याने थांबवलं नाही आणि सेवेतला आपला आनंद कमी होऊ दिला नाही. आज मंडळीतले वडीलसुद्धा त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात आणि सेवेतला आपला आनंद टिकवून ठेवू शकतात. टेहळणी बुरूज२२.०३ २६ ¶१-२
रविवार, २६ नोव्हेंबर
तुम्ही माझे शब्बाथ पाळले पाहिजेत. मी तुमचा देव यहोवा आहे.—लेवी. १९:३.
लेवीय १९:३ मध्ये शब्बाथ पाळण्याची आज्ञा दिली आहे. नियमशास्त्राच्या अधीन नसल्यामुळे आज आपल्याला ती आज्ञा पाळायची गरज नाही. पण इस्राएली लोक शब्बाथ कसा पाळायचे आणि त्यापासून त्यांना कसा फायदा व्हायचा, यातून आपण बरंच काही शिकू शकतो. शब्बाथाच्या दिवशी इस्राएली लोकांना आपल्या रोजच्या कामातून विश्रांती घ्यायची होती आणि आपलं सगळं लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे लावायचं होतं. आणि म्हणूनच येशूसुद्धा प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी आपल्या गावातल्या सभास्थानात जायचा आणि देवाचं वचन वाचायचा. (निर्ग. ३१:१२-१५; लूक ४:१६-१८) तर मग लेवीय १९:३ मध्ये शब्बाथ पाळण्याची जी आज्ञा दिली आहे, त्यावरून आज आपण काय शिकू शकतो? हेच, की आपल्या रोजच्या कामातून आपण काही वेळ आध्यात्मिक गोष्टींसाठी बाजूला काढला पाहिजे. या बाबतीत तुम्हाला काही सुधारणा करायची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही जर नियमितपणे आपल्या रोजच्या कामातून आध्यात्मिक गोष्टींसाठी थोडा वेळ बाजूला काढला, तर यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घट्ट होईल. आणि पवित्र असण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२१.१२ ५ ¶१३
सोमवार, २७ नोव्हेंबर
मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलोय.—लूक ५:३२.
पृथ्वीवर असताना येशूने सगळ्या प्रकारच्या लोकांसोबत वेळ घालवला. त्याने श्रीमंत आणि अधिकारपदावर असलेल्या लोकांसोबत बसून जेवण केलं. पण त्याच वेळी त्याने गरीब आणि लाचार लोकांसोबतही भरपूर वेळ घालवला. इतकंच नाही, तर लोक ज्यांना “पापी” समजत होते त्यांच्याशी तो खूप दयाळूपणे वागला. पण काही घमेंडी लोकांना येशूचं हे वागणं आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याला नाकारलं. त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारलं, की “तुम्ही जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत का खातापिता?” त्यावर येशूने त्यांना आजच्या वचनातले शब्द म्हटले. (लूक ५:२९-३१) मसीहा येण्याच्या खूप आधीच यशया संदेष्ट्याने सांगितलं होतं, की जगातले लोक त्याला स्वीकारणार नाहीत. त्याच्याबद्दल त्याने अशी भविष्यवाणी केली: “त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि लोकांनी त्याला टाळलं, . . . त्याचा चेहरा जसा काय आमच्यापासून लपलेला होता. त्याला तुच्छ समजण्यात आलं, आणि आम्ही त्याची काहीच किंमत केली नाही.” (यश. ५३:३) तर लोक मसीहाला टाळतील असं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे लोक येशूला नाकारतील हे पहिल्या शतकातल्या यहुद्यांना माहीत असायला हवं होतं. टेहळणी बुरूज२१.०५ ८-९ ¶३-४
मंगळवार, २८ नोव्हेंबर
यहोवा त्याला त्याच्या आजारातून उठवेल.—याको. ५:१५.
पहिल्या शतकाल्या काही ख्रिश्चनांची समस्या अशी होती, की दिलेला सल्ला ते लगेच लागू करत नव्हते. (याको. १:२२) काही जण श्रीमंतांच्या पुढे-पुढे करणारे होते. (याको. २:१-३) तर असेही काही जण होते ज्यांचा आपल्या जिभेवर ताबा नव्हता. (याको. ३:८-१०) या गोष्टी खूप गंभीर होत्या. त्यामुळे आपण जर त्या भाऊबहिणींच्या लक्षात आणून दिल्या, तर ते नक्की बदलतील असा विचार याकोबने केला. त्यामुळे त्याने सडेतोडपणे, पण तितक्याच प्रेमाने त्यांना सल्ला दिला. आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी वडिलांकडे ती मागावी असं प्रोत्साहनही त्याने त्यांना दिलं. (याको. ५:१३, १४) आपण काय शिकतो? आपण समंजस असलं पाहिजे आणि इतर जण स्वतःमध्ये बदल करतील असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांना कदाचित बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे बदल करायला कठीण जात असेल. (याको. ४:१-४) उदाहरणार्थ, काहींना आपल्या वाईट सवयी कायमच्या सोडून देण्यासाठी आणि स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण उत्पन्न करण्यासाठी वेळ लागू शकतो. पण त्यांना कुठे बदल करायची गरज आहे हे दाखवण्याचं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. तसंच ते कधीच बदलणार नाहीत असा विचार आपण करू नये. उलट, यहोवा नम्र मनाच्या लोकांना त्याच्याकडे यायला मदत करेल आणि त्यांना स्वतःमध्ये बदल करायची ताकद देईल असा भरवसा आपण ठेवला पाहिजे.—याको. ४:१०. टेहळणी बुरूज२२.०१ ११ ¶११-१२
बुधवार, २९ नोव्हेंबर
जो गरिबाच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतो, तो स्वतः हाक मारेल तेव्हा त्याला कोणीही उत्तर देणार नाही.—नीति. २१:१३.
आपण सर्वांनीच यहोवासारखा दयाळूपणा दाखवला पाहिजे. नाहीतर यहोवा आपल्या प्रार्थना ऐकणार नाही. आणि यहोवाने असं करावं असं आपल्यापैकी कोणालाच वाटत नाही. म्हणून आपण कोणाशीही कठोरपणे वागू नये. दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींच्या ‘आक्रोशाकडे’ आपण कधीच दुर्लक्ष करू नये. तर पुढे दिलेला सल्ला आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे: “जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही.” (याको. २:१३) दयेची आपल्यालाच किती गरज आहे, हे जर आपण लक्षात ठेवलं, तर इतरांना दया दाखवायला आपल्याला कठीण जाणार नाही. चूक केलेली व्यक्ती जेव्हा पश्चात्ताप करून पुन्हा मंडळीत येते, तेव्हा खासकरून तिला दया दाखवण्याची जास्त गरज असते. बायबलमध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांनी दया दाखवली. त्यामुळे आपल्याला कठोरपणे न वागता इतरांना दया दाखवण्यासाठी मदत होते. टेहळणी बुरूज२१.१० १२ ¶१६-१७
गुरुवार, ३० नोव्हेंबर
मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत इथेच बसा.—मत्त. २६:३६.
आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री आपलं सेवाकार्य संपवताना, येशूने आपल्या पित्याशी एकांतात बोलण्यासाठी एक शांत ठिकाण शोधलं. त्यासाठी तो गेथशेमाने बागेत गेला. त्याच वेळी येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते गेथशेमाने बागेत आले तेव्हा खूप उशीर झाला होता. कदाचित मध्यरात्र उलटून गेली होती. येशूने आपल्या शिष्यांना, “माझ्यासोबत जागे राहा,” असं सांगितलं आणि प्रार्थना करण्यासाठी तो पुढे गेला. (मत्त. २६:३७-३९) पण तो प्रार्थना करत असताना शिष्य झोपी गेले. ते पाहून येशू त्यांना म्हणाला: “जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.” (मत्त. २६:४०, ४१) पण शिष्य किती थकलेले आहेत आणि ते किती तणावाखाली आहेत हे येशूला माहीत होतं. ही गोष्ट लक्षात घेऊन तो म्हणाला: “मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.” त्यानंतर आणखी दोन वेळा तो प्रार्थना करायला गेला, आणि त्या वेळीसुद्धा त्याचे शिष्य प्रार्थना करण्याऐवजी झोपलेले आहेत असं त्याने पाहिलं.—मत्त. २६:४२-४५. टेहळणी बुरूज२२.०१ २८ ¶१०-११