वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es23 पृ. ११२-१२४
  • ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
  • उपशिर्षक
  • रविवार, १ ऑक्टोबर
  • सोमवार, २ ऑक्टोबर
  • मंगळवार, ३ ऑक्टोबर
  • बुधवार, ४ ऑक्टोबर
  • गुरुवार, ५ ऑक्टोबर
  • शुक्रवार, ६ ऑक्टोबर
  • शनिवार, ७ ऑक्टोबर
  • रविवार, ८ ऑक्टोबर
  • सोमवार, ९ ऑक्टोबर
  • मंगळवार, १० ऑक्टोबर
  • बुधवार, ११ ऑक्टोबर
  • गुरुवार, १२ ऑक्टोबर
  • शुक्रवार, १३ ऑक्टोबर
  • शनिवार, १४ ऑक्टोबर
  • रविवार, १५ ऑक्टोबर
  • सोमवार, १६ ऑक्टोबर
  • मंगळवार, १७ ऑक्टोबर
  • बुधवार, १८ ऑक्टोबर
  • गुरुवार, १९ ऑक्टोबर
  • शुक्रवार, २० ऑक्टोबर
  • शनिवार, २१ ऑक्टोबर
  • रविवार, २२ ऑक्टोबर
  • सोमवार, २३ ऑक्टोबर
  • मंगळवार, २४ ऑक्टोबर
  • बुधवार, २५ ऑक्टोबर
  • गुरुवार, २६ ऑक्टोबर
  • शुक्रवार, २७ ऑक्टोबर
  • शनिवार, २८ ऑक्टोबर
  • रविवार, २९ ऑक्टोबर
  • सोमवार, ३० ऑक्टोबर
  • मंगळवार, ३१ ऑक्टोबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
es23 पृ. ११२-१२४

ऑक्टोबर

रविवार, १ ऑक्टोबर

ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही तो माणूस सुखी!—मत्त. ११:६.

आपण जे काही शिकवतो ते पूर्णपणे बायबलवर आधारित असतं. पण असं असूनही अनेक जण आपला संदेश ऐकत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं, की आपली उपासना करण्याची पद्धत खूपच साधी आहे आणि त्यांना जे ऐकायला आवडतं ते आपण शिकवत नाही. आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो? रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलने असं म्हटलं: “वचन ऐकल्यावरच विश्‍वास ठेवला जातो; आणि ख्रिस्ताबद्दल प्रचार केल्यावरच वचन ऐकलं जातं.” (रोम. १०:१७) तर विश्‍वास वाढवण्यासाठी आपण शास्त्रवचनांचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला बायबलवर आधारित नसलेल्या धार्मिक विधी पाळायची गरज नाही; मग त्या कितीही आकर्षक वाटत असल्या तरीही. म्हणूनच बायबलचं अचूक ज्ञान घेऊन आपण आपला विश्‍वास मजबूत केला पाहिजे. कारण “विश्‍वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे.” (इब्री ११:१, ६) आपण जे काही शिकत आहोत तेच सत्य आहे याची खातरी पटण्यासाठी आपल्याला स्वर्गातून कोणत्याही चिन्हाची गरज नाही; त्यासाठी बायबलच्या शिकवणींचा काळजीपूर्वक अभ्यास करणं पुरेसं आहे. अशा अभ्यासामुळे सत्याबद्दल असलेल्या आपल्या कोणत्याही शंका दूर होतील. टेहळणी बुरूज२१.०५ ४-५ ¶११-१२

सोमवार, २ ऑक्टोबर

माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे खरंतर आनंदाच्या संदेशाच्या वाढीला हातभारच लागला आहे.—फिलिप्पै. १:१२.

प्रेषित पौलला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याला मारहाण करण्यात आली, दगडमार करण्यात आला आणि तुरुंगात टाकण्यात आलं. अशा वेळी खासकरून त्याला ताकदीची फार गरज होती. (२ करिंथ. ११:२३-२५) तसंच, कधीकधी निराशेचा सामना करण्यासाठीही त्याला खूप प्रयत्न करावे लागले. (रोम. ७:१८, १९, २४) याशिवाय, त्याला आरोग्याचीही समस्या होती. ती समस्या त्याच्या शरीरात रुतवण्यात आलेल्या एका काट्यासारखी होती. तो काढून टाकण्यासाठी त्याने अनेकदा देवाला विनंती केली. (२ करिंथ. १२:७, ८) पौलला जरी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, तरी यहोवाने त्याला त्याची सेवा पूर्ण करण्यासाठी ताकद दिली. त्यामुळे पौल कायकाय करू शकला त्याचा विचार करा. त्याला जेव्हा रोममध्ये एका घरात कैद करण्यात आलं होतं, तेव्हा त्याने यहुदी धर्मगुरूंना, आणि कदाचित रोमी अधिकाऱ्‍यांनाही प्रचार केला. (प्रे. कार्यं २८:१७; फिलिप्पै. ४:२१, २२) तसंच, त्याने सम्राटाच्या अंगरक्षक दलातल्या अनेकांना आणि त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांनाही प्रचार केला. (प्रे. कार्यं २८:३०, ३१; फिलिप्पै. १:१३) आणि त्याच काळात, पौलने देवाच्या प्रेरणेने अनेक पत्रं लिहिली ज्यांचा आजपर्यंत खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खूप फायदा होतो. टेहळणी बुरूज२१.०५ २१ ¶४-५

मंगळवार, ३ ऑक्टोबर

“लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.” हे यासाठी, की तुम्ही गर्वाने फुगू नये.—१ करिंथ. ४:६.

यहूदाचा राजा उज्जीया याने बऱ्‍याच चांगल्या गोष्टी केल्या होत्या. त्याने अनेक युद्धं जिंकली, मोठमोठी शहरं बांधली, आणि शेतीच्या कामांत बरेच बदल घडवून आणले. आणि “खऱ्‍या देवाच्या आशीर्वादाने त्याची भरभराट झाली.” (२ इति. २६:३-७, १०) पण बायबल म्हणतं की, “शक्‍तिशाली झाल्यावर त्याचं मन गर्वाने फुगलं आणि हेच त्याच्या नाशाचं कारण ठरलं.” मंदिरात फक्‍त याजक धूप जाळू शकतात हे आधीच यहोवाने सांगितलं होतं. पण उज्जीया राजा अधिकार नसताना मंदिरात धूप जाळण्यासाठी गेला. याजकांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने काही त्यांचं ऐकलं नाही. ही गोष्ट यहोवाला आवडली नाही आणि त्याने त्याला शिक्षा दिली. त्याला कुष्ठरोग झाला. (२ इति. २६:१६-२१) उज्जीया राजाप्रमाणे आपल्यामध्येही गर्व येऊ शकतो का? आणि त्याच्याप्रमाणेच आपल्याकडूनही चुकीच्या गोष्टी होऊ शकतात का? जर आपण स्वतःबद्दल जास्त विचार करत राहिलो तर असं होऊ शकतं. म्हणूनच आपल्याकडे ज्या क्षमता आहेत आणि मंडळीत ज्या जबाबदाऱ्‍या आपल्याला मिळतात त्या यहोवानेच दिलेल्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. (१ करिंथ. ४:७) आपण गर्विष्ठ बनलो तर यहोवा त्याच्या कामात आपला कधीच उपयोग करणार नाही. टेहळणी बुरूज२१.०६ १६ ¶७-८

बुधवार, ४ ऑक्टोबर

दुष्ट स्वर्गदूत तुमच्या अधीन करण्यात आले आहेत यामुळे आनंदी होऊ नका. तर, स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत यामुळे आनंदी व्हा.—लूक १०:२०.

येशूला माहीत होतं, की त्याच्या शिष्यांना प्रचारकार्यात नेहमीच चांगले अनुभव येणार नाहीत. शिवाय, त्या दिवशी ज्यांनी शिष्यांचं ऐकलं होतं, त्यांपैकी शेवटी किती जण शिष्य बनले हे आपल्याला माहीत नाही. येशूच्या शिष्यांना हे समजणं गरजेचं होतं, की लोक आपल्या संदेशाला चांगला प्रतिसाद देतात तेव्हा आपल्याला आनंद तर होतोच. पण आपण घेत असलेल्या मेहनतीमुळे यहोवा खूश आहे या जाणिवेमुळे आपल्याला सगळ्यात जास्त आनंद झाला पाहिजे. आपण हार न मानता प्रचारकार्य करत राहिलो तर आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. जेव्हा आपण मनापासून राज्याचं बी पेरायचा आणि त्याची मशागत करायचा प्रयत्न करतो, तेव्हा देवाच्या पवित्र शक्‍तीला आपण आपल्या जीवनात कार्य करू देतो. त्यामुळे एका अर्थाने आपण ‘पवित्र शक्‍तीसाठीच पेरणी’ करत असतो. म्हणून आपण जरी एखाद्या व्यक्‍तीला बाप्तिस्मा घ्यायला मदत करू शकलो नाही, तरी आपण खचून जाऊ नये. उलट, हिंमत न हारता आपण प्रचारकार्य करत राहिलं पाहिजे. आपण जर असं केलं तर यहोवा वचन देतो, की तो आपल्याला सर्वकाळाचं जीवन देईल.—गलती. ६:७-९. टेहळणी बुरूज२१.१० २६ ¶८-९

गुरुवार, ५ ऑक्टोबर

येशूला त्यांचा कळवळा आला, . . . मग तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.—मार्क ६:३४.

एकदा येशू आणि त्याचे शिष्य बराच वेळ प्रचार केल्यामुळे थकले होते. त्यामुळे विश्रांती घेण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी जायला निघाले. पण लोकांनी त्यांना जाताना पाहिलं आणि ते त्यांच्या आधीच तिथे पोचले. त्यांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. आणि खूप थकलेला असतानाही तो त्यांना “बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.” येशूने स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहिलं. त्यामुळे ते किती दुःखी आहेत आणि त्यांना आशेची किती गरज आहे हे त्याच्या लक्षात आलं, आणि त्याने त्यांना मदत केली. आजसुद्धा लोकांची परिस्थिती अशीच आहे. ते वरवर कितीही आनंदी, समाधानी वाटत असले, तरी त्यांच्या जीवनात अनेक समस्या आहेत आणि त्यांना आशेची खूप गरज आहे. त्यांचं मार्गदर्शन करणारा कुणीही ‘मेंढपाळ नसल्यामुळे ते हरवलेल्या मेंढरांसारखे’ आहेत. प्रेषित पौलने म्हटलं की, “असे लोक कोणतीही आशा नसलेले आणि . . . देवाशिवाय” आहेत. (इफिस. २:१२) आपल्या क्षेत्रातल्या लोकांना देवाबद्दल जाणून घेण्याची किती गरज आहे, याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आणि दया वाटेल. आणि त्यामुळे आपल्याला त्यांना मदत करावीशी वाटेल. त्यांना मदत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करणं. टेहळणी बुरूज२१.०७ ५ ¶८

शुक्रवार, ६ ऑक्टोबर

आपण अहंकारी किंवा . . . एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे होऊ नये.—गलती. ५:२६.

एक अंहकारी व्यक्‍ती खूप गर्विष्ठ आणि स्वार्थी असते. ईर्ष्या करणाऱ्‍याला दुसऱ्‍याकडे असलेली गोष्ट हवी असते आणि तो ती गोष्ट त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतो. यावरून दिसून येतं, की जो माणूस एखाद्याची ईर्ष्या करतो तो त्याचा द्वेष करतो. अहंकार आणि ईर्ष्या या गुणांची तुलना पेट्रोलमध्ये असलेल्या कचऱ्‍याशी केली जाऊ शकते. असं पेट्रोल विमानात भरलं तर ते उड्डाण करेल खरं, पण इंजिनमध्ये कचरा अडकल्यामुळे काही वेळाने ते अचानक बंद पडून दुर्घटना होऊ शकते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्‍तीमध्ये अहंकार आणि ईर्ष्या असेल, तर काही काळासाठी ती यहोवाची सेवा करेल खरं, पण पुढे तिचं वाईट होऊ शकतं. (नीति. १६:१८) ती कदाचित यहोवाची सेवा करायचं सोडून देईल आणि त्यामुळे तिचं स्वतःचं आणि इतरांचंही नुकसान होऊ शकतं. अहंकारापासून दूर राहण्यासाठी पौलने दिलेला सल्ला आपण लागू केला पाहिजे. त्याने असा सल्ला दिला, “भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”—फिलिप्पै. २:३. टेहळणी बुरूज२१.०७ १५-१६ ¶६-८

शनिवार, ७ ऑक्टोबर

आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश हा तुम्हाला फक्‍त शब्दांनीच देण्यात आला नाही, तर सामर्थ्याने आणि पवित्र शक्‍तीने आणि पूर्ण खातरीने देण्यात आला.—१ थेस्सलनी. १:५.

काहींना असं वाटतं की जो पंथ सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं देतो, तोच खरा ख्रिस्ती धर्म असला पाहिजे; अगदी अशा प्रश्‍नांची उत्तरंसुद्धा ज्यांची उत्तरं बायबलमध्ये दिलेली नाहीत. पण अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? प्रेषित पौलचंच उदाहरण घ्या. त्याने आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींना “सगळ्या गोष्टींची खातरी करा,” असं म्हटलं. पण त्याने असंही मान्य केलं, की अशा बऱ्‍याचशा गोष्टी आहेत, ज्या त्याला अजून समजलेल्या नाहीत. (१ थेस्सलनी. ५:२१) तो म्हणाला: “आपल्याजवळ असलेलं ज्ञान अपूर्ण आहे.” पुढे तो असंही म्हणाला, की “आपल्याला धातूच्या आरशात अंधूक दिसतं,” तशा बऱ्‍याच गोष्टी आपल्याला अजूनही अस्पष्ट आहेत. (१ करिंथ. १३:९, १२) जसं पौलला सगळ्याच गोष्टी समजल्या नाहीत, तसंच आपल्यालाही सगळ्याच गोष्टी समजणार नाहीत. पण त्याला मात्र पवित्र शास्त्रातल्या मूलभूत गोष्टी समजल्या होत्या. आणि आपण जे मानतो ते सत्य आहे, हे पटण्यासाठी तेवढ्या गोष्टी त्याला पुरेशा होत्या. देवाची उपासना करण्यासाठी येशूने आपल्याला एक पद्धत घालून दिली होती. आज यहोवाचे साक्षीदार त्याच पद्धतीने उपासना करत आहेत की नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे मानतो तेच सत्य आहे याची आपल्याला खातरी पटेल. टेहळणी बुरूज२१.१० १८-१९ ¶२-४

रविवार, ८ ऑक्टोबर

५० वर्षांचा झाल्यावर त्याने . . . निवृत्त व्हावं.—गण. ८:२५.

वयस्कर भाऊबहिणींनो, तुम्ही पूर्ण-वेळच्या सेवेत असोत किंवा नसोत, इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही खूप काही करू शकता. त्यासाठी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्या आणि नवीन ध्येय ठेवा. तसंच, तुम्ही काय करू शकत नाही याचा नाही, तर तुम्ही काय करू शकता यावर विचार करा. दावीद राजाला यहोवासाठी मंदिर बांधायची मनापासून इच्छा होती. पण यहोवाने त्याला सांगितलं, की हे मंदिर तो नाही, तर त्याचा मुलगा शलमोन बांधेल. त्या वेळी दावीदने असा विचार केला नाही, की शलमोन तर “वयाने लहान आहे व त्याला अनुभवसुद्धा नाही”, त्यामुळे मंदिर बांधण्याचं काम आपणच चांगलं करू शकतो. (१ इति. २९:१) उलट, त्याने देवाचं म्हणणं ऐकलं आणि मंदिर बांधायच्या कामाला आपला पूर्ण पाठिंबा दिला. (१ इति. १७:४; २२:५) कारण दावीदला हे माहीत होतं, की मंदिराचं बांधकाम हे त्याच्या वयामुळे किंवा अनुभवामुळे नाही, तर फक्‍त यहोवाच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळेच शक्य होऊ शकतं. आज वयस्कर बांधवांच्या जबाबदाऱ्‍या जरी बदलल्या, तरी दावीदप्रमाणेच ते आवेशाने सेवा करत राहतात. आणि जे काम पूर्वी ते स्वतः करायचे ते आता तरुण बांधव करत असले, तरी ते आपलं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतील याची त्यांना खातरी आहे. कारण यहोवा त्यांना मदत करेल आणि त्यांच्या कामावर आशीर्वाद देईल हे ते ओळखतात. टेहळणी बुरूज२१.०९ ९ ¶४; १० ¶५, ८

सोमवार, ९ ऑक्टोबर

तो नम्र लोकांना नीतीच्या मार्गाने नेतो, तो नम्र लोकांना आपला मार्ग शिकवतो.—स्तो. २५:९.

यहोवाच्या सेवेत आपण ध्येयं ठेवली तर आपल्या जीवनाला दिशा मिळेल आणि आपण आनंदी राहू. पण त्यासाठी आपल्याला गाठता येतील अशीच ध्येयं आपण ठेवली पाहिजेत. इतरांनी जी ध्येयं ठेवली तीच ध्येयं ठेवायची गरज नाही. नाहीतर आपली निराशा होऊ शकते. (लूक १४:२८) आपण सगळे यहोवाच्या कुटुंबातले सदस्य आहोत. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे असलो तरी आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्यासाठी खूप मोलाचा आहे. आपण इतर लोकांपेक्षा चांगले होतो म्हणून यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आणलं नाही, तर त्याने आपलं मन पाहिलं. त्याने पाहिलं की आपण नम्र आहोत, त्याच्याकडून शिकायला आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार आहोत, म्हणून त्याने आपल्याला त्याच्याकडे आणलं. तुम्ही मनापासून त्याची सेवा करता तेव्हा त्याला खूप आनंद होतो याची तुम्ही खातरी बाळगू शकता. तुम्ही आतापर्यंत जो धीर आणि विश्‍वास दाखवला त्यावरून दिसून येतं, की तुमचं मन चांगलं आणि प्रामाणिक आहे. (लूक ८:१५) त्यामुळे यहोवासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करत राहा. मग तुम्हाला “स्वतःच्या कामांमुळे” आनंद मिळेल.—गलती. ६:४. टेहळणी बुरूज२१.०७ २४ ¶१५; २५ ¶२०

मंगळवार, १० ऑक्टोबर

जो कोणी पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गापासून परत फिरवतो, तो त्याला मृत्यूपासून वाचवेल.—याको. ५:२०.

न्याय मिळेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागू शकते. उदाहरणार्थ, मंडळीतल्या एखाद्याने गंभीर चूक केली आहे असं वडिलांना कळतं तेव्हा ‘वरून येणाऱ्‍या बुद्धीसाठी’ ते प्रार्थना करतात. त्यामुळे या विषयाबद्दल यहोवा कसा विचार करतो हे समजायला त्यांना मदत होते. (याको. ३:१७) त्या व्यक्‍तीला आपल्या ‘चुकीच्या मार्गापासून परत फिरायला’ मदत करणं हा त्यांचा उद्देश असतो. (याको. ५:१९, २०) तसंच, ते मंडळीचं संरक्षण करायचा आणि चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीमुळे ज्यांची मनं दुःखावली गेली आहेत त्यांचं सांत्वन करायचा प्रयत्न करत असतात. (२ करिंथ. १:३, ४) आणि एखादा गंभीर अपराध हाताळताना नेमकं काय घडलं याबद्दल वडिलांना सगळी माहिती मिळवावी लागते, आणि त्यासाठी वेळ लागू शकतो. मग ते प्रार्थना करतात आणि चूक करणाऱ्‍याला देवाच्या वचनातून सल्ला देतात. तसंच, त्याला सुधारण्यासाठी ते त्याला “योग्य प्रमाणात” शिस्तही लावतात. (यिर्म. ३०:११) निर्णय घेताना वडील घाई करत नाहीत. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी यहोवाच्या पद्धतीने हाताळल्या जातात तेव्हा संपूर्ण मंडळीलाच फायदा होतो. टेहळणी बुरूज२१.०८ ११ ¶१२-१३

बुधवार, ११ ऑक्टोबर

तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, . . . तुमचे लोक माझे लोक होतील आणि तुमचा देव माझा देव होईल.—रूथ १:१६.

इस्राएलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे नामी, तिचा पती आणि तिची दोन्ही मुलं मवाब देशात राहायला गेली होती. पण तिथे नामीचा पती वारला. शिवाय तिथेच तिच्या दोन्ही मुलांचं लग्नही झालं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे ती दोन्ही मुलंही तिथेच वारली. (रूथ १:३-५) या दोन धक्कादायक घटनांमुळे नामी दुःखात पार बुडून गेली. ती इतकी निराश झाली, की यहोवा आपल्या विरुद्ध उठला आहे असं तिला वाटू लागलं. तिला नेमकं कसं वाटत होतं हे तिच्या शब्दांतूनच कळतं. ती म्हणाली: “यहोवाचा हात माझ्याविरुद्ध उठलाय.” ती असंही म्हणाली: “सर्वशक्‍तिमान देवाने मला फार दुःख दिलंय.” इतकंच नाही, तर ती असंपण म्हणाली: ‘यहोवाच माझा विरोधी झालाय आणि सर्वशक्‍तिमान देवानेच माझ्यावर संकटं आणलीत.’ (रूथ १:१३, २०, २१) “अत्याचार झाल्यामुळे कधीकधी बुद्धिमान माणूसही वेड्यासारखा वागू लागतो,” हे यहोवाला माहीत आहे. (उप. ७:७) त्याने रूथला, नामीला एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची प्रेरणा दिली. आणि रुथनेही खूप प्रेमाने आणि धीराने तिला मदत केली. तिने नामीला दुःखातून सावरायला आणि यहोवाचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे हे समजून घ्यायला मदत केली. टेहळणी बुरूज२१.११ ९ ¶९; १० ¶१०, १३

गुरुवार, १२ ऑक्टोबर

देवाजवळ मागत [राहा].—याको. १:५.

सध्या यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्यातच आपण समाधानी राहिलं पाहिजे का? दुसरी कोणतीही ध्येयं आपण ठेवू नयेत का? नाही, तसं मुळीच नाही. सेवाकार्यातलं कौशल्य वाढवण्यासाठी आणि भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आपण काही ध्येयं नक्कीच ठेवू शकतो. स्वतःचा विचार करण्याऐवजी आपण नम्र राहून इतरांना मदत करण्याचा विचार केला, तर आपल्याला ती ध्येयं पूर्ण करता येतील. (नीति. ११:२; प्रे. कार्यं २०:३५) यहोवाच्या सेवेत ठेवण्यासारखी बरीच ध्येयं आहेत. जसं की, सहायक किंवा नियमित पायनियरिंग करणं, बेथेलमध्ये किंवा बांधकाम प्रकल्पांवर काम करणं, एखादी नवीन भाषा शिकणं किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं. यांपैकी तुम्ही कोणती ध्येयं ठेवाल? तुम्हाला पूर्ण करता येतील अशी ध्येयं ओळखायला यहोवाकडे मदत मागा.—नीति. १६:३. टेहळणी बुरूज२१.०८ २३ ¶१४-१५

शुक्रवार, १३ ऑक्टोबर

[यहोवाचं] एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.—स्तो. १३६:१.

एकनिष्ठ प्रेम यहोवासाठी खूप महत्त्वाचं आहे. (होशे. ६:६) म्हणूनच मीखा संदेष्ट्याद्वारे त्याने आपल्याला असं प्रोत्साहन दिलं आहे, की आपण “एकनिष्ठ प्रेमावर प्रेम करावं.” (मीखा ६:८, तळटीप) पण त्यासाठी एकनिष्ठ प्रेम काय असतं ते आधी आपण समजून घेतलं पाहिजे. पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर यात “एकनिष्ठ प्रेम” हे शब्द जवळजवळ २३० वेळा आले आहेत. पण याचा काय अर्थ होतो? या भाषांतरात “बायबलची शब्दार्थसूची” दिली आहे. त्यात या शब्दांबद्दल असं म्हटलं आहे: “हिब्रू शब्द कसद याचं भाषांतर सहसा एकनिष्ठ प्रेम असं करण्यात आलं आहे. याचा अर्थ, असं प्रेम जे विश्‍वासूपणा, निष्ठा, जिव्हाळा आणि नेहमी साथ देण्याचा निश्‍चय यांनी प्रवृत्त झालेलं असतं. ‘एकनिष्ठ प्रेम’ हे शब्द सहसा देवाचं माणसांवर असलेल्या प्रेमाच्या बाबतीत वापरले जातात. पण लोकांचं एकमेकांवर असलेल्या प्रेमासाठीही ते वापरले जातात.” एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवापेक्षा चांगलं उदाहरण आणखी कुणाचंच नाही. म्हणूनच राजा दावीद म्हणू शकला: “हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाला भिडलंय, . . . हे देवा, तुझं एकनिष्ठ प्रेम किती अनमोल आहे!” (स्तो. ३६:५, ७) दावीदप्रमाणेच आपणही देवाच्या एकनिष्ठ प्रेमाची कदर करतो का? टेहळणी बुरूज२१.११ २ ¶१-२; ३ ¶४

शनिवार, १४ ऑक्टोबर

म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या.’—मत्त. ६:९.

यहोवाच्या कुटुंबात त्याचा “पहिला जन्मलेला” येशू आणि लाखो-करोडो स्वर्गदूत आहेत. (कलस्सै. १:१५; स्तो. १०३:२०) येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने लोकांना हे समजायला मदत केली, की यहोवा हा विश्‍वासू मानवांचासुद्धा ‘पिता’ आहे. म्हणूनच आपल्या शिष्यांशी बोलताना तो म्हणाला, की यहोवा ‘माझा पिता’ आणि ‘तुमचा पिता’ आहे. (योहा. २०:१७) आपण जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण आपल्या प्रेमळ भाऊबहिणींनी बनलेल्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनतो. (मार्क १०:२९, ३०) येशूसाठी यहोवा एक प्रेमळ पिता आहे. तो एखाद्या कठोर अधिकाऱ्‍यासारखा नाही. त्यामुळे येशू केव्हाही अगदी सहज आपल्या पित्याशी बोलू शकतो. यहोवाबद्दल आपल्यालासुद्धा असंच वाटावं अशी येशूची इच्छा आहे. त्या प्रार्थनेची सुरुवातच त्याने, “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या,” या शब्दांनी केली. इथे येशू, यहोवाला ‘सर्वशक्‍तिमान देव,’ ‘निर्माणकर्ता’ किंवा “सर्वकाळाचा राजा” असंही म्हणू शकला असता, आणि ते मुळीच चुकीचं ठरलं नसतं. कारण शास्त्रवचनांमध्ये यहोवासाठी हे शब्दसुद्धा वापरले आहेत. (उत्प. ४९:२५; यश. ४०:२८; १ तीम. १:१७) पण या शब्दांऐवजी येशूने “पिता” हा शब्द वापरला. यावरून दिसून येतं, की आपण यहोवाशी जवळचं नातं जोडावं असं येशूला वाटतं. टेहळणी बुरूज२१.०९ २० ¶१, ३

रविवार, १५ ऑक्टोबर

मनश्‍शेला समजलं, की यहोवा हाच खरा देव आहे.—२ इति. ३३:१३.

यहोवा मनश्‍शे राजालासुद्धा आपल्या संदेष्ट्यांद्वारे ताकीद देत राहिला. पण अहाबसारखंच मनश्‍शेनेसुद्धा आपलं मन कठोर केलं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी, “यहोवाने अश्‍शूरच्या राजांच्या सेनाधिकाऱ्‍यांना [यहूदावर] हल्ला करायला लावलं. त्यांनी मनश्‍शेला आकड्यांनी पकडलं आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला नेलं.” एक कैदी म्हणून परक्या देशात असताना आपण केलेल्या वाईट कामांवर त्याने खोलवर विचार केला असावा. तो यहोवासमोर, म्हणजे “त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर फार नम्र बनला”. इतकंच नाही, तर त्याने त्याच्याकडे “दयेची भीक मागितली” आणि तो त्याला “प्रार्थना करत राहिला.” (२ इति. ३३:१०-१२) काही काळानंतर यहोवाने मनश्‍शेची प्रार्थना ऐकली. कारण त्याच्या प्रार्थनांवरून यहोवाने पाहिलं, की त्याचं मन बदललं आहे. मनश्‍शेने जेव्हा त्याच्याकडे दयेची भीक मागितली तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं आणि त्याचं राज्यपद त्याला परत दिलं. राज्यपद परत मिळाल्यावर मनश्‍शेनेसुद्धा हे दाखवून दिलं, की त्याला मनापासून पश्‍चात्ताप झाला होता. टेहळणी बुरूज२१.१० ४ ¶१०-११

सोमवार, १६ ऑक्टोबर

एकापेक्षा दोघं चांगले, कारण त्यांच्या मेहनतीचं त्यांना चांगलं फळ मिळतं.—उप. ४:९.

अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांना आपला ओळखीचा परिसर सोडून एका नवीन ठिकाणी जाऊन राहावं लागणार होतं. इतकंच नाही, तर तंबू बनवण्याचा आपला व्यवसायही नव्याने सुरू करावा लागणार होता. करिंथ शहरात राहायला गेल्यानंतर अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी तिथल्या मंडळीतल्या भाऊ-बहिणींना खूप मदत केली. इतकंच नाही, तर प्रेषित पौलसोबत मिळून त्यांनी बांधवांना धीर आणि प्रोत्साहनही दिलं. नंतर त्यांनी गरज होती तिथे जाऊन प्रचाराचं काम केलं. (प्रे. कार्यं १८:१८-२१; रोम. १६:३-५) अशा प्रकारे जास्तीत जास्त यहोवाची सेवा केल्यामुळे त्या दोघांना खरंच किती आनंद मिळाला असेल! प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांच्याप्रमाणेच आजसुद्धा विवाहित जोडपी राज्याच्या कामाला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊ शकतात. या बाबतीत जीवनात कोणती ध्येयं ठेवायची हे लग्नाआधीच ठरवलेलं सगळ्यात चांगलं आहे. अशा प्रकारे त्यांनी जर एकत्र मिळून निर्णय घेतला आणि आध्यात्मिक ध्येयं गाठण्याचा प्रयत्न केला, तर यहोवा कशा प्रकारे मदत करतो हे त्यांना अनुभवायला मिळेल.—उप. ४:१२. टेहळणी बुरूज२१.११ १७ ¶११-१२

मंगळवार, १७ ऑक्टोबर

तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे . . . . मी तुमचा देव यहोवा आहे.—लेवी. १९:३.

हे स्पष्टच आहे, की आईवडिलांचा आदर करण्याची जी आज्ञा यहोवाने दिली आहे ती आपण पाळली पाहिजे. लेवीय १९:३ मध्ये आईवडिलांचा आदर करण्याची जी आज्ञा देण्यात आली आहे, त्याआधी काय म्हटलं आहे त्याकडे लक्ष द्या. तिथे म्हटलं आहे: “तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी तुमचा देव यहोवा पवित्र आहे.” (लेवी. १९:२) आईवडिलांचा आदर करण्याचा जो सल्ला यहोवाने दिला आहे, तो लक्षात घेऊन आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मी माझ्या आईवडिलांचा आदर करतो का?’ या बाबतीत पूर्वी आपण कुठे तरी कमी पडलो असं जर तुम्हाला जाणवलं, तर निराश होऊ नका. कारण अजूनही संधी आहे. पूर्वी तुम्ही जे केलं ते तर तुम्ही बदलू शकत नाही. पण इथून पुढे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा होईल तितका आदर करायचा निश्‍चय करू शकता. तुम्ही आता त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकता. किंवा मग त्यांना गरजेच्या वस्तू पुरवू शकता. त्यांना भावनिक आधार देऊ शकता. आणि यहोवाच्या जवळ राहायला आणि त्याची सेवा करत राहायला त्यांना मदत करू शकता. असं करून तुम्ही हे दाखवून देता, की तुम्ही लेवीय १९:३ मधली आज्ञा पाळत आहात. टेहळणी बुरूज२१.१२ ४-५ ¶१०-१२

बुधवार, १८ ऑक्टोबर

दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.—मत्त. ७:१.

दावीद राजाने आपल्या आयुष्यात काही गंभीर चुका केल्या होत्या. त्याने बथशेबाशी व्यभिचार केला होता आणि कट रचून तिच्या पतीचा खून केला होता. (२ शमु. ११:२-४, १४, १५, २४) यामुळे त्याने स्वतःलाच नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही खूप दुःख दिलं होतं. (२ शमु. १२:१०, ११) आणखी एका वेळी त्याने आपल्या सैन्यातल्या लोकांची संख्या मोजायची आज्ञा दिली. पण या गोष्टीचा शेवटी काय परिणाम झाला? जवळजवळ ७०,००० इस्राएली लोक एका साथीच्या रोगामुळे मेले. (२ शमु. २४:१-४, १०-१५) यहोवाने त्याला कधीच माफ करू नये असा तुम्ही विचार केला असता का? पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, यहोवाने त्याला माफ केलं! कारण दावीदने किती मनापासून पश्‍चात्ताप केला होता आणि आपल्या एकंदर आयुष्यात आपल्यावर किती विश्‍वास दाखवला होता हे यहोवाने पाहिलं. यहोवाला माहीत होतं, की दावीदचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपलं मन आनंदित करायची त्याची मनापासून इच्छा आहे. तर मग, यहोवा आपल्यामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी पाहतो हे जाणून तुम्हाला आनंद होत नाही का?—१ राजे ९:४; १ इति. २९:१०, १७. टेहळणी बुरूज२१.१२ १९ ¶११-१३

गुरुवार, १९ ऑक्टोबर

त्याच क्षणी त्याची दृष्टी परत आली आणि तो देवाचा गौरव करत येशूच्या मागे चालू लागला.—लूक १८:४३.

येशूनेसुद्धा शारीरिक मर्यादा असलेल्या लोकांना दया दाखवली. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानला येशूने काय निरोप दिला ते आठवा. त्याने म्हटलं: “आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहात आहेत. लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत. बहिऱ्‍यांना ऐकू येतंय, मेलेल्यांना जिवंत केलं जातंय.” येशूने केलेल्या या चमत्कारांसाठी ‘लोकांनी देवाची स्तुती केली.’ (लूक ७:२०-२२) येशूप्रमाणे आपणसुद्धा शारीरिक मर्यादा असलेल्यांशी दयाळूपणे वागायचा प्रयत्न करतो. आपणही त्यांच्याशी प्रेमाने, समजूतदारपणे आणि धीराने वागतो. हे खरं आहे, की यहोवाने आपल्याला चमत्कार करायची ताकद दिलेली नाही. तरीसुद्धा शारीरिक रितीने आणि आध्यात्मिक रितीने अंध असलेल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे. येणाऱ्‍या सुंदर नवीन जगात ते शारीरिक रितीने कसे पूर्णपणे सुदृढ असतील हा संदेश आपण त्यांना सांगतो. (लूक ४:१८) आणि आनंदाचा हा संदेश ऐकून कित्येक जण यहोवाची स्तुती करत आहेत. टेहळणी बुरूज२१.१२ ९ ¶५

शुक्रवार, २० ऑक्टोबर

ईयोबच्या धीराबद्दल तुम्ही ऐकलं आहे आणि शेवटी यहोवाने त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केलं . . . हेही तुम्ही पाहिलं आहे.—याको. ५:११.

याकोबने स्वतःच्या मनाचं शिकवलं नाही, तर शिकवताना नेहमी शास्त्रवचनांचा आधार घेतला. त्याने देवाच्या वचनाचा उपयोग करून लोकांना हे समजायला मदत केली, की जे ईयोबप्रमाणे यहोवाला एकनिष्ठ राहतात त्यांना तो नक्की प्रतिफळ देतो. हा मुद्दा शिकवण्यासाठी, याकोबने अगदी साध्या शब्दांचा आणि स्पष्टीकरणाचा उपयोग केला. आणि अशा प्रकारे त्याने स्वतःकडे नाही, तर यहोवाकडे लोकांचं लक्ष वेधलं. आपण काय शिकतो? आपण नेहमी साध्यासोप्या पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि शिकवताना बायबलचा वापर केला पाहिजे. आपल्याला बायबलचं किती ज्ञान आहे हे दाखवायचा आपण कधीच प्रयत्न करू नये. तर यहोवाची बुद्धी किती अफाट आहे आणि त्याला आपली किती काळजी आहे हे दाखवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. (रोम. ११:३३) त्यासाठी आपण जे काही शिकवतो ते नेहमी शास्त्रवचनांवर आधारित असलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या बायबल विद्यार्थ्याला एखादी समस्या असेल, तर आपण त्याला असं म्हणू नये, की ‘मी तुझ्या जागी असतो तर असं केलं असतं.’ याउलट, आपण त्याला बायबलमधल्या उदाहरणांवर विचार करायला, तसंच या विषयाबद्दल यहोवा कसा विचार करतो आणि त्याच्या भावना काय आहेत हे समजून घ्यायला मदत केली पाहिजे. त्यामुळे बायबल विद्यार्थी आपल्याला नाही, तर यहोवाला खूश करण्याचा नेहमी प्रयत्न करेल. टेहळणी बुरूज२२.०१ ११ ¶९-१०

शनिवार, २१ ऑक्टोबर

आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम कर.—लेवी. १९:१८.

आपण इतरांचं वाईट करू नये अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो. पण देव आपल्याकडून इतकीच अपेक्षा करत नाही. तर आपण त्यांच्यावर स्वतःसारखं प्रेम केलं पाहिजे. आणि आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर आपल्याला या आज्ञेप्रमाणे करणं महत्त्वाचं आहे. लेवीय १९:१८ मध्ये जी आज्ञा देण्यात आली आहे, त्यावर येशूनेसुद्धा कसा भर दिला ते पाहा. एकदा एका परूशी व्यक्‍तीने येशूला विचारलं: “नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा कोणती?” तेव्हा येशूने त्याला म्हटलं, की सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची आज्ञा ही की ‘तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.’ मग येशूने लेवीय १९:१८ मधले शब्द वापरून असं म्हटलं: “तिच्यासारखी दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखं प्रेम कर.’” (मत्त. २२:३५-४०) आपण वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना प्रेम दाखवू शकतो. एक मार्ग म्हणजे लेवीय १९:१८ मध्ये दिलेला सल्ला लागू करणं. तिथे म्हटलं आहे: “तू बदला घेऊ नकोस किंवा आपल्या भाऊबंदांबद्दल मनात राग बाळगू नकोस.” टेहळणी बुरूज२१.१२ १०-११ ¶११-१३

रविवार, २२ ऑक्टोबर

वादळाकडे पाहून तो घाबरला आणि बुडू लागला. तो ओरडून म्हणाला: “प्रभू, मला वाचव!”—मत्त. १४:३०.

येशूने लगेच आपला हात पुढे करून प्रेषित पेत्रला धरलं आणि त्याला वाचवलं. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? जोपर्यंत पेत्रचं संपूर्ण लक्ष येशूवर होतं तोपर्यंत तो खवळलेल्या समुद्राच्या पाण्यावरसुद्धा चालू शकत होता. पण वादळाकडे पाहताच भीतीने त्याच्या पोटात गोळा आला आणि तो बुडू लागला. (मत्त. १४:२४-३१) या घटनेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. पेत्र नावेतून उतरला आणि त्याने पाण्यावर पाऊल ठेवलं, तेव्हा आपलं लक्ष भरकटेल आणि आपण बुडायला लागू असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं. उलट त्याला असं वाटलं होतं की आपण थेट येशूपर्यंत चालत जाऊ. पण तसं घडलं नाही. कारण येशूकडे पाहत राहण्याऐवजी त्याचं लक्ष वादळाकडे गेलं आणि तो घाबरला. पेत्रला पाण्यावर चालत राहण्यासाठी विश्‍वासाची गरज होती. अगदी तसंच आज समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्यालाही विश्‍वासाची गरज आहे. पण यहोवावरून आणि त्याने दिलेल्या अभिवचनांवरून आपलं लक्ष भरकटलं, तर आपण आध्यात्मिक रितीने बुडू शकतो. त्यामुळे वादळासारख्या कोणत्याही समस्या आपल्या जीवनात आल्या, तरी आपलं लक्ष कायम यहोवावर आणि मदत करण्याच्या त्याच्या शक्‍तीवर असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२१.१२ १७-१८ ¶६-७

सोमवार, २३ ऑक्टोबर

मी तर तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे तुझ्या मंदिरात येईन.—स्तो. ५:७.

प्रार्थना, अभ्यास आणि मनन हे आपल्या उपासनेचाच एक भाग आहेत. आपण प्रार्थना करतो तेव्हा खरंतर आपण आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्‍या स्वर्गातल्या पित्यासोबत बोलत असतो. आणि आपण बायबलचा अभ्यास करतो तेव्हा या विश्‍वातल्या सगळ्यात बुद्धिमान व्यक्‍तीचं म्हणजे “देवाचं ज्ञान” घेत असतो. (नीति. २:१-५) आणि शेवटी, आपण यहोवाबद्दल शिकलेल्या गोष्टींवर मनन करतो तेव्हा आपण यहोवाच्या सुंदर गुणांवर, तसंच तो आपल्यासाठी आणि सर्व मानवांसाठी पुढे करणार असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींवर विचार करतो. वेळेचा चांगला उपयोग करण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग असूच शकत नाही. पण यहोवासोबत घालवण्यासाठी आपण जो काही वेळ काढतो त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल? शक्य असेल तर एक शांत जागा निवडा. येशूचंच उदाहरण घ्या. पृथ्वीवरचं आपलं सेवाकार्य सुरू करण्याआधी त्याने ४० दिवस ओसाड रानात घालवले. (लूक ४:१, २) तिथल्या शांत वातावरणात तो आपल्या पित्याला प्रार्थना करू शकला आणि आपल्यासाठी त्याची काय इच्छा आहे, यावर मनन करू शकला. यामुळे लवकरच येणाऱ्‍या परीक्षांना तोंड द्यायला तो तयार झाला. टेहळणी बुरूज२२.०१ २७-२८ ¶७-८

मंगळवार, २४ ऑक्टोबर

पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.—नीति. १५:२२.

कधीकधी असं होऊ शकतं, की मंडळीतला एखादा वडील किंवा एखादा अनुभवी भाऊ आपल्याला अशी एखादी गोष्ट दाखवून देईल ज्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. कोणी जर काळजीपोटी आणि प्रेमापोटी आपल्याला बायबलमधून सल्ला देत असेल, तर आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. हे खरं आहे, की थेटपणे दिलेला किंवा प्रत्यक्षपणे दिलेला सल्ला स्वीकारणं आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं. आणि अशा वेळी आपल्याला रागसुद्धा येऊ शकतो. असं का होतं? आपण अपरिपूर्ण आहोत हे आपल्याला माहीत असलं, तरी कोणी आपली विशिष्ट चूक दाखवून देतो तेव्हा मात्र आपल्याला त्याचं ऐकणं कठीण जाऊ शकतं. (उप. ७:९) अशा वेळी, आपण कदाचित सफाई देण्याचा प्रयत्न करू किंवा सल्ला देणाऱ्‍याच्या हेतूंवर शंका घेऊ. किंवा मग, त्याने आपल्याला ज्या पद्धतीने सल्ला दिला त्याचा कदाचित आपल्याला राग येईल. किंवा जो आपल्याला सल्ला देतोय त्याच्याच चुका दाखवायचा आपण प्रयत्न करू. आपण कदाचित असा विचार करू, ‘तो स्वतःच इतक्या चुका करतोय, त्याला काय अधिकार आहे मला सल्ला द्यायचा?’ शेवटी, त्याचा सल्ला पटत नसल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू आणि अशा व्यक्‍तीकडून सल्ला घ्यायचा प्रयत्न करू ज्याचा सल्ला आपल्याला आवडेल. टेहळणी बुरूज२२.०२ ८-९ ¶२-४

बुधवार, २५ ऑक्टोबर

तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्‍तिशाली व्हाल.—यश. ३०:१५.

नवीन जगात गेल्यानंतरही यहोवावर असलेल्या आपल्या भरवशाची परीक्षा होऊ शकते का? इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामीतून बाहेर आले, त्याच्या थोड्याच काळानंतर काय घडलं त्याचा विचार करा. इजिप्तमध्ये असताना ते जे वेगवेगळे अन्‍नपदार्थ खायचे त्यांची आठवण काढून काही जण कुरकुर करू लागले आणि यहोवा पुरवत असलेल्या मान्‍नाला तुच्छ लेखू लागले. (गण. ११:४-६; २१:५) नवीन जगात गेल्यानंतर आपल्या बाबतीतही असं होऊ शकतं का? कारण या दुष्ट जगाचा नाश झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पृथ्वी स्वच्छ करावी लागेल आणि हळूहळू पृथ्वीला नंदनवन बनवावं लागेल. सुरुवातीला आपल्याला भरपूर काम असेल. शिवाय जीवनही तितकं सोपं नसेल. त्या वेळी यहोवा आपल्याला जे काही पुरवेल त्याबद्दल आपण कुरकुर किंवा तक्रार करू का? यहोवाच्या तरतुदींबद्दल आपण जर आत्ताच कदर दाखवली तर पुढेही दाखवू. टेहळणी बुरूज२२.०२ ७ ¶१८-१९

गुरुवार, २६ ऑक्टोबर

[ते] एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय.”—जख. ८:२३.

जखऱ्‍या ८:२३ च्या भविष्यवाणीत ‘यहुदी माणूस,’ “तुमच्याबरोबर” आणि “तुमच्यासोबत” हे शब्द एकाच गटाला सूचित करतात. तो गट म्हणजे, पृथ्वीवर जिवंत असलेले अभिषिक्‍त जन. (रोम. २:२८, २९) आणि याच वचनात, सर्व राष्ट्रांमधून असणाऱ्‍या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या ज्या दहा माणसांबद्दल म्हटलं आहे, ते दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेल्या लोकांना सूचित करतात. पुढे या वचनात असं म्हटलं आहे, की ते “यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील.” याचा अर्थ, दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेले लोक अभिषिक्‍त जनांना कायम साथ देतील आणि त्यांच्यासोबत मिळून शुद्ध उपासना करतील. यहेज्केल ३७:१५-१९, २४, २५ मधली भविष्यवाणी यहोवाने अभिषिक्‍त जनांना आणि दुसऱ्‍या मेंढरांना एकत्र करून पूर्ण केली आहे. त्यांच्यातलं एकीचं हे बंधन अतूट आहे. या भविष्यवाणीत दोन काठ्यांबद्दल सांगितलं आहे. त्यात स्वर्गातल्या जीवनाची आशा असलेल्यांना ‘यहूदाची काठी’ असं म्हटलं आहे (या वंशातून इस्राएलचे राजे निवडले जायचे). आणि पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्यांना ‘एफ्राईमची काठी’ असं म्हटलं आहे. भविष्यवाणीनुसार यहोवा या दोन्ही काठ्या जोडून त्यांची एकच काठी करणार होता. दुसऱ्‍या शब्दांत, तो या दोन्ही गटांना एकत्र करणार होता. याचा अर्थ, ते एकाच राज्याच्या म्हणजे ख्रिस्त येशूच्या नेतृत्वाखाली एकत्र मिळून यहोवाची सेवा करणार होते.—योहा. १०:१६. टेहळणी बुरूज२२.०१ २२ ¶९-१०

शुक्रवार, २७ ऑक्टोबर

सांभाळा, लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून त्यांच्यासमोर चांगली कामं करू नका.—मत्त. ६:१.

येशूने अशा लोकांबद्दल सांगितलं जे गरिबांना दान द्यायचे, पण दुसऱ्‍यांनी आपल्याला पाहावं या उद्देशाने द्यायचे. अशा उद्देशाने केलेल्या चांगल्या कामांची यहोवाच्या नजरेत काहीच किंमत नाही. (मत्त. ६:२-४) जेव्हा आपण मनात कोणताही स्वार्थ न ठेवता चांगली कामं करतो, तेव्हाच आपण खऱ्‍या अर्थाने चांगुलपणा दाखवत असतो. म्हणून स्वतःला विचारा: ‘योग्य काय आहे ते मला माहीत आहे. पण मी त्याप्रमाणे खरंच वागतो का? चांगली कामं करण्यामागचा माझा हेतू काय असतो?’ यहोवा आजपर्यंत काम करत आला आहे आणि त्याची पवित्र शक्‍तीसुद्धा एक क्रियाशील शक्‍ती आहे. (उत्प. १:२) म्हणून आपणसुद्धा पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण दाखवत राहण्यासाठी काम करत राहिलं पाहिजे. येशूचा शिष्य याकोब याने म्हटलं: ‘विश्‍वास कार्यांशिवाय निर्जीव आहे.’ (याको. २:२६) पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या इतर सर्व गुणांच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट खरी आहे. जेव्हा आपण हे गुण दाखवतो, तेव्हा देवाची पवित्र शक्‍ती आपल्यामध्ये कार्य करत आहे, हे दिसून येतं. टेहळणी बुरूज२२.०३ ११-१२ ¶१४-१६

शनिवार, २८ ऑक्टोबर

ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.—१ पेत्र १:१५.

यहोवाची सेवा करण्यात आणि इतरांची सेवा करण्यात आपण बरंच काही करत असू. पण प्रेषित पेत्रने एका गोष्टीवर खास भर दिला. पवित्र राहण्याबद्दल प्रोत्साहन देत असताना त्याने असं म्हटलं: “तुम्ही उत्साहाने काम करण्यासाठी आपलं मन सज्ज करा.” (१ पेत्र १:१३) मग या कामात कोणत्या गोष्टी येतात? पेत्रने म्हटलं, की ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांनी ‘त्याच्या महान गुणांची संपूर्ण जगात घोषणा करावी.’ (१ पेत्र २:९) या कामात आज आपण त्यांना मदत करत आहोत. आपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं हे काम नियमितपणे आणि आवेशाने करत राहतो. (मार्क १३:१०) खरंच, या कामात सहभाग घेण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! आपण जेव्हा या कामात मनापासून सहभाग घेतो तेव्हा आपण दाखवतो, की यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर आपलं प्रेम आहे. तसंच, आपण दाखवतो, की “आपल्या सर्व वागणुकीत” आपल्याला ‘पवित्र व्हायची’ इच्छा आहे. टेहळणी बुरूज२१.१२ १३ ¶१८

रविवार, २९ ऑक्टोबर

तुम्ही ज्याला क्षमा करता, त्याला मीसुद्धा क्षमा करतो.—२ करिंथ. २:१०.

प्रेषित पौलने आपल्या भाऊबहिणींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. त्यांनी जरी चुका केल्या, तरी ते मुळात वाईट नाहीत या गोष्टीची त्याला जाणीव होती. त्याचं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम होतं आणि त्यांच्या चांगल्या गुणांकडे त्याने लक्ष दिलं. त्याला माहीत होतं, की योग्य ते करणं भाऊबहिणींना कठीण जात असलं तरी स्वतःमध्ये बदल करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठी त्यांना फक्‍त मदतीची गरज आहे. फिलिप्पै इथल्या दोन बहिणींमध्ये म्हणजे युवदीया आणि सुंतुखे यांच्यामध्ये वाद झाला तेव्हा पौलने काय केलं त्याचा विचार करा. (फिलिप्पै. ४:१-३) त्यांच्यात मतभेद असल्यामुळे त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. पण पौल त्यांच्यावर रागावला नाही किंवा त्याने त्यांची टीका केली नाही. तर त्याने त्यांच्यातले चांगले गुण पाहिले. पौलला माहीत होतं की या दोघींनीही बराच काळ विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली होती. आणि यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे हे पण त्याला माहीत होतं. म्हणून त्याने त्यांना आपसातले वाद मिटवण्याचं प्रोत्साहन दिलं. अशा प्रकारे भाऊबहिणींबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगल्यामुळे, त्याला आनंदी राहायला आणि भाऊबहिणींसोबत आपलं नातं टिकवून ठेवायला मदत झाली. टेहळणी बुरूज२२.०३ ३० ¶१६-१८

सोमवार, ३० ऑक्टोबर

यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; मनाने खचलेल्यांना तो वाचवतो.—स्तो. ३४:१८.

देवाकडून मिळणाऱ्‍या शांतीमुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत होते. लुसी नावाच्या एका बहिणीने ही गोष्ट कशी अनुभवली त्याचा विचार करा. ती म्हणते: “बऱ्‍याचदा मला फार एकटं-एकटं असल्यासारखं वाटतं. त्यामुळे यहोवाचं माझ्यावर प्रेमच नाहीए असं कधीकधी मला वाटतं. पण त्या वेळी मी लगेच यहोवाशी बोलते आणि मला कसं वाटतं ते त्याला सांगते. त्यानंतर मला खूप बरं वाटतं.” या बहिणीचा अनुभव दाखवतो, की प्रार्थना केल्यामुळे आपल्याला खरंच मनाची शांती मिळू शकते. (फिलिप्पै. ४:६, ७) आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवा आणि येशू आपल्याला त्या दुःखातून सावरायला मदत करतील. यहोवा आणि येशूला लोकांबद्दल दया वाटली. आपणही त्याच भावनेने लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगायचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला हे जाणून किती दिलासा मिळतो, की यहोवा आणि येशू या दोघांनाही आपली परिस्थिती माहीत आहे आणि आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहावं म्हणून त्यांना आपल्याला मदत करायची इच्छा आहे. लवकरच यहोवा आपल्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल,” आणि त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.—प्रकटी. २१:४. टेहळणी बुरूज२२.०१ १५ ¶७; १९ ¶१९-२०

मंगळवार, ३१ ऑक्टोबर

अरुंद दरवाजाने आत जा. कारण, नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे आणि त्यातून जाणारे बरेच आहेत.—मत्त. ७:१३.

येशूने दोन दरवाजांबद्दल सांगितलं; एक दरवाजाने आपण “पसरट” रस्त्याकडे जाऊ शकतो, तर दुसऱ्‍या दरवाजाने आपण “छोट्या” किंवा “चिंचोळ्या” रस्त्याकडे जाऊ शकतो. (मत्त. ७:१४) या दोन रस्त्यांशिवाय तिसरा पर्याय नसल्यामुळे आपल्याला हे ठरवावं लागेल, की आपण कोणत्या रस्त्याने जाणार. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं सर्वकाळाचं जीवन या निर्णयावर अवलंबून आहे. “पसरट” रस्त्याने जाणं सोपं असल्यामुळे बहुतेक लोक त्या रस्त्याने जायचं निवडत आहेत. आणि त्यांना पाहून बरेच लोक तेच करत आहेत. पण लोकांना हे समजत नाही, की खरंतर सैतान लोकांना या मार्गाने जायला लावतो. आणि हा मार्ग शेवटी नाशाकडे जातो. (१ करिंथ. ६:९, १०; १ योहा. ५:१९) “पसरट” रस्त्याच्या अगदी उलट दुसरा रस्ता आहे. तो “छोटा” किंवा “चिंचोळा” आहे. आणि येशूने म्हटल्याप्रमाणे फक्‍त थोड्याच लोकांना तो सापडतो. याचं कारण येशूने पुढच्याच वचनात दिलं. त्याने आपल्या शिष्यांना खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहायचा इशारा दिला.—मत्त. ७:१५. टेहळणी बुरूज२१.१२ २२-२३ ¶३-५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा