वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es23 पृ. १३६-१४८
  • डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
  • उपशिर्षक
  • शुक्रवार, १ डिसेंबर
  • शनिवार, २ डिसेंबर
  • रविवार, ३ डिसेंबर
  • सोमवार, ४ डिसेंबर
  • मंगळवार, ५ डिसेंबर
  • बुधवार, ६ डिसेंबर
  • गुरुवार, ७ डिसेंबर
  • शुक्रवार, ८ डिसेंबर
  • शनिवार, ९ डिसेंबर
  • रविवार, १० डिसेंबर
  • सोमवार, ११ डिसेंबर
  • मंगळवार, १२ डिसेंबर
  • बुधवार, १३ डिसेंबर
  • गुरुवार, १४ डिसेंबर
  • शुक्रवार, १५ डिसेंबर
  • शनिवार, १६ डिसेंबर
  • रविवार, १७ डिसेंबर
  • सोमवार, १८ डिसेंबर
  • मंगळवार, १९ डिसेंबर
  • बुधवार, २० डिसेंबर
  • गुरुवार, २१ डिसेंबर
  • शुक्रवार, २२ डिसेंबर
  • शनिवार, २३ डिसेंबर
  • रविवार, २४ डिसेंबर
  • सोमवार, २५ डिसेंबर
  • मंगळवार, २६ डिसेंबर
  • बुधवार, २७ डिसेंबर
  • गुरुवार, २८ डिसेंबर
  • शुक्रवार, २९ डिसेंबर
  • शनिवार, ३० डिसेंबर
  • रविवार, ३१ डिसेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
es23 पृ. १३६-१४८

डिसेंबर

शुक्रवार, १ डिसेंबर

ती माझा आवाज ऐकतील.—योहा. १०:१६.

शिष्यांसोबत आपलं किती जवळचं नातं आहे हे समजावून सांगण्यासाठी येशूने स्वतःची तुलना एका चांगल्या मेंढपाळाशी आणि शिष्यांची तुलना मेंढरांशी केली. (योहा. १०:१४) आणि ही तुलना योग्यच आहे. कारण मेंढरं आपल्या मेंढपाळाला ओळखतात आणि त्याच्या आवाजाला लगेच प्रतिसाद देतात. ही गोष्ट एका पर्यटकाने प्रत्यक्ष अनुभवली. तो म्हणाला, “एकदा आम्हाला काही मेंढरांचे फोटो घ्यायचे होते आणि त्यासाठी आम्ही त्यांना जवळ बोलवायचा खूप प्रयत्न करत होतो. पण ते काही येत नव्हते. कारण ते आमचा आवाज ओळखत नव्हते. पण मग एक छोटा मुलगा आला. तो त्यांचा मेंढपाळ होता. त्याने फक्‍त हाक मारायचा उशीर की ती लगेच त्याच्या मागे आली.” या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला येशूच्या शब्दांची आठवण होते. आपल्या मेंढरांबद्दल, म्हणजेच शिष्यांबद्दल तो असं म्हणाला: “ती माझा आवाज ऐकतील.” पण येशू तर स्वर्गात आहे. मग आपण त्याचा आवाज कसा ऐकू शकतो? येशूने शिकवलेल्या गोष्टी आपण जीवनात लागू करतो तेव्हा खरंतर आपण त्याचा आवाज ऐकत असतो.—मत्त. ७:२४, २५. टेहळणी बुरूज२१.१२ १६ ¶१-२

शनिवार, २ डिसेंबर

सगळ्यांनीच पाप केलं आहे आणि ते देवाचे गौरवशाली गुण दाखवण्यात कमी पडतात.—रोम. ३:२३.

प्रेषित पौल आधी ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा उद्धट स्वभावाचा माणूस होता. पण नंतर त्याला कळलं, की हे चुकीचं होतं आणि म्हणून त्याने स्वतःमध्ये बदल केले. (१ तीम. १:१२-१६) यहोवाच्या मदतीने तो एक नम्र, प्रेमळ आणि दयाळू वडील बनला. पण आपल्या कमतरतांवर विचार करत बसण्याऐवजी यहोवा आपल्याला माफ करेल या गोष्टीवर त्याने भरवसा ठेवला. (रोम. ७:२१-२५) त्याने स्वतःबद्दल कधीच अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत. उलट स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण उत्पन्‍न करण्यासाठी त्याने मेहनत घेतली. आणि आपली सेवा पूर्ण करण्यासाठी तो नम्रपणे यहोवावर विसंबून राहिला. (१ करिंथ. ९:२७; फिलिप्पै. ४:१३) वडील अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांनी आपल्या चुका मान्य कराव्यात आणि स्वतःमध्ये सुधारणा करून, ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वं विकसित करत राहावं अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. (इफिस. ४:२३, २४) त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास करून स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि गरज असेल त्या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे. असं केल्यामुळे आनंदी राहायला आणि वडील या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण करायला यहोवा त्यांना मदत करेल.—याको. १:२५. टेहळणी बुरूज२२.०३ २९-३० ¶१३-१५

रविवार, ३ डिसेंबर

दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.—मत्त. ७:१.

आपल्या एखाद्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल आपण चुकीचं मत बनवलं होतं असं जर आपल्या लक्षात आलं तर आपण काय केलं पाहिजे? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करायला सांगितलं आहे. (याको. २:८) त्यासोबतच आपण यहोवाला कळकळून प्रार्थनाही केली पाहिजे. आणि या बाबतीत त्याने आपली मदत करावी अशी विनंती केली पाहिजे. पण प्रार्थना करण्यासोबतच आपण त्याप्रमाणे वागलंही पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्‍तीबद्दल आपण चुकीचं मत बनवलं होतं तिच्याशी आपण बोललं पाहिजे, तिच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. आपण तिच्यासोबत सेवाकार्य करू शकतो किंवा तिला आपल्या घरी जेवायला बोलवू शकतो. यामुळे आपल्याला तिला आणखी चांगल्या प्रकारे ओळखता येईल आणि यहोवा आणि येशूप्रमाणेच तिच्यातले चांगले गुण पाहता येतील. यावरून हेच दिसून येईल, की “दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या,” असा जो सल्ला आपल्या मेंढपाळाने दिला आहे, तो आपण पाळत आहोत. मेंढरं जशी आपल्या मेंडपाळाचं ऐकतात, तसं आपणही आपल्या मेंढपाळाचं, येशूचं ऐकलं पाहिजे. त्यामुळे आपण ‘लहान कळपातले’ असो किंवा ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असो, आपण सगळ्यांनीच आपल्या मेंढपाळाचं ऐकलं पाहिजे.—लूक १२:३२; योहा. १०:११, १४, १६. टेहळणी बुरूज२१.१२ १९ ¶११; २१ ¶१७-१८

सोमवार, ४ डिसेंबर

वडीलधाऱ्‍यांनी दिलेला हा सल्ला त्याने धुडकावून लावला.—१ राजे १२:८.

रहबाम इस्राएलचा राजा बनला तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका गोष्टीची विनंती केली. त्याच्या वडिलांनी, म्हणजे शलमोन राजाने लोकांवर कामाचा जो भार लादला होता तो कमी करायची विनंती केली. हे ऐकून, रहबामने सुरुवातीला एक चांगली गोष्ट केली. त्याने वडीलधाऱ्‍या माणसांचा सल्ला घेतला. तेव्हा ते त्याला म्हणाले, की ‘तू या लोकांची विनंती मान्य करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलंस, तर ते आयुष्यभर तुझे सेवक होऊन राहतील.’ (१ राजे १२:३-७) पण असं दिसतं, की रहबामला त्यांचा सल्ला पटला नाही. म्हणून ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला होता, त्यांचा सल्ला त्याने घेतला. त्यांनी त्याला लोकांवरचा कामाचा भार आणखी वाढवायचा सल्ला दिला. (१ राजे १२:९-११) रहबामने खरंतर यहोवाला मी कोणत्या सल्ल्याप्रमाणे काम करू असं विचारायला हवं होतं. उलट, ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला त्यांचा सल्ला त्याने ऐकला. यामुळे रहबामला आणि इस्राएली लोकांना त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागले. आपल्या बाबतीत काय? आपल्यालाही नेहमीच आपल्याला आवडतील असे सल्ले मिळणार नाहीत. पण ते जर देवाच्या वचनावर आधारित असतील तर आपण ते स्वीकारले पाहिजेत. टेहळणी बुरूज२२.०२ ९ ¶६

मंगळवार, ५ डिसेंबर

तरुणांची ताकद हेच त्यांचं वैभव आहे.—नीति. २०:२९.

जो नम्र असतो आणि ज्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते तो आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्‍यांच्या अनुभवाकडे नाही, तर त्यांच्या क्षमतांकडे लक्ष देतो. तसंच, तो त्यांच्याशी स्पर्धा करत नाही, तर त्यांच्यासोबत मिळून काम करतो. वयस्कर बांधव आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्‍या बांधवांना यहोवाचा आशीर्वादच मानतात. कारण मंडळीतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात असते. शिवाय, आपल्या भाऊबहिणींची सेवा करण्याची इच्छाही त्यांच्यात असते. आणि म्हणूनच वयस्कर भाऊबहिणींना त्यांचा खूप अभिमान वाटतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांकडून आनंदाने मदत स्वीकारण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण बायबलमधल्या नामीचं आहे. जेव्हा तिचा मुलगा वारला तेव्हा तिने आपल्या सुनेला, रूथला माहेरी जाण्याची विनंती केली. पण रूथने नकार दिला आणि ती नामीसोबत बेथलेहेमला गेली. तिथे तिने नामीला खूप मदत केली आणि तिची काळजी घेतली. आणि नामीनेही ती मदत आनंदाने स्वीकारली. (रूथ १:७, ८, १८) त्यामुळे दोघींना किती फायदा झाला हे आपल्याला माहीतच आहे. (रूथ ४:१३-१६) नामीप्रमाणेच आज वयस्कर भाऊबहीणसुद्धा इतरांची मदत आनंदाने स्वीकारतात. टेहळणी बुरूज२१.०९ १०-११ ¶९-११

बुधवार, ६ डिसेंबर

तुमचं काम आणि . . . तुम्ही दाखवलेलं प्रेम विसरून जायला देव अन्यायी नाही.—इब्री ६:१०.

आपल्या प्रेमळ पित्यालाही आपल्यापैकी प्रत्येकाच्या परिस्थितीची जाणीव आहे. कदाचित तुम्ही तुमच्या भाऊबहिणींपेक्षा यहोवाची जास्त सेवा करू शकत असाल. किंवा तुमच्या वयामुळे, तब्येतीमुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे इतर जण करतात तितकं तुम्ही करू शकत नसाल. पण यामुळे निराश होऊ नका. (गलती. ६:४) कारण यहोवा तुमचं काम कधीच विसरणार नाही. जर तुम्ही योग्य हेतूने यहोवाची सेवा करायचा होता होईल तितका प्रयत्न करत असाल, तर यहोवाला यामुळे नक्कीच आनंद होईल. यहोवाच्या सेवेत तुम्हाला काय करायची इच्छा आहे हे यहोवा पाहू शकतो. आणि तुमच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्या उपासनेत तुम्ही जे काही करू शकता त्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी असावं, असं त्याला वाटतं. यहोवाच्या सेवकांना समस्या येतात तेव्हा तो त्यांना मदत करतो, ही गोष्ट माहीत असल्यामुळेसुद्धा आपल्याला मनाची शांती मिळते. (यश. ४१:९, १०) तर चला आपण नेहमी आनंदाने आपल्या प्रेमळ पित्याची, यहोवाची उपासना करत राहू या, कारण तोच सगळ्या सृष्टीकडून गौरव आणि सन्मान मिळवण्यासाठी योग्य आहे!—प्रकटी. ४:११. टेहळणी बुरूज२२.०३ २४ ¶१६; २५ ¶१८

गुरुवार, ७ डिसेंबर

मी लगेच तुझ्या आज्ञा पाळतो; मी उशीर करत नाही.—स्तो. ११९:६०.

आपल्याला येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायची इच्छा आहे, पण येशूच्या उदाहरणाचं पूर्णपणे अनुकरण करता आलं नाही, म्हणून आपण निराश होणार नाही. (याको. ३:२) एखादी कला शिकताना विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाच्या कलेची हुबेहूब नक्कल करता येत नाही. पण तो आपल्या चुकांमधून शिकत जातो आणि आपल्या शिक्षकाचं होता होईल तितक्या जवळून अनुकरण करायचा प्रयत्न करतो. आणि असं करून तो आपली कला सुधारत राहतो. अगदी तसंच, बायबलच्या आपल्या अभ्यासातून आपण जे काही शिकतो त्याप्रमाणे जर आपण काम करत राहिलो आणि आपल्या चुका सुधारत राहिलो, तर आपल्याला येशूचं आणखी जवळून अनुकरण करता येईल. (स्तो. ११९:५९) आज जगातले बहुतेक लोक खूप स्वार्थी आहेत. पण यहोवाचे लोक अगदी वेगळे आहेत. येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचा आपल्या मनावर प्रभाव पडल्यामुळे आपण त्याच्यासारखं निःस्वार्थी बनायचा प्रयत्न करतो. (१ पेत्र २:२१) आपण जर येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचं अनुकरण करायचा होता होईल तितका प्रयत्न केला, तर यहोवाला खूश केल्याचा आनंद आपल्याला मिळेल. टेहळणी बुरूज२२.०२ २४ ¶१६; २५ ¶१८

शुक्रवार, ८ डिसेंबर

त्यांतल्या काही गोष्टी समजायला कठीण आहेत.—२ पेत्र ३:१६.

आज यहोवा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या लोकांना मार्गदर्शन पुरवत आहे. त्यातला एक मार्ग म्हणजे त्याच्या वचनाद्वारे म्हणजेच बायबलद्वारे. यहोवा आपल्याला जे शिकवत आहे त्यावर मनन करण्यासाठी आपण वेळ काढला तर आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं आणि आपलं प्रचाराचं काम पूर्ण करणं शक्य होईल. (१ तीम. ४:१५, १६) आज यहोवा आपल्याला ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारेही’ मार्गदर्शन पुरवत आहे. (मत्त. २४:४५) काही वेळा बुद्धिमान दासाने दिलेला सल्ला आपल्याला पूर्णपणे समजत नाही. जसं की, हे बांधव कदाचित आपल्याला एखाद्या नैसर्गिक विपत्तीचा सामना कसा करावा याबद्दल काही खास सूचना देतील. पण आपल्याला कदाचित असं वाटेल, की अशा प्रकारची विपत्ती आपल्या भागात येण्याची शक्यता कमी आहे. आपल्याला दिलं जाणारं मार्गदर्शन व्यावहारिक नाही असं आपल्याला वाटलं, तर आपण काय केलं पाहिजे? आपण वाचलेल्या बायबलमधल्या अहवालांचा विचार करा. काही वेळा देवाच्या लोकांना असं मार्गदर्शन देण्यात आलं, जे मानवांच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक नव्हतं. पण त्याचं पालन केल्यामुळे त्यांचे जीव वाचले.—शास्ते ७:७; ८:१०. टेहळणी बुरूज२२.०३ १८-१९ ¶१५-१६

शनिवार, ९ डिसेंबर

बापा, मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो.—लूक २३:४६.

येशू पूर्ण खातरीने आजच्या वचनातले शब्द बोलला. आपलं भविष्य यहोवाच्या हातात आहे, हे येशूला माहीत होतं. आणि तो आपल्याला जिवंत करेल, याची त्याला पक्की खातरी होती. येशूच्या शब्दांतून आपण काय शिकू शकतो? हेच, की आपल्या जिवाला कितीही धोका असला, तरीही आपण नेहमी यहोवाला विश्‍वासू राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण “यहोवावर अगदी मनापासून भरवसा” ठेवला पाहिजे. (नीति. ३:५) १५ वर्षांच्या जोशुआचाच विचार करा. त्याला एक गंभीर आजार झाला होता. पण तरीही देवाच्या नियमाविरुद्ध असलेले उपचार घ्यायला त्याने नकार दिला. मृत्यूच्या काही वेळाआधी तो आपल्या आईला म्हणाला: “आई, तू मुळीच माझी काळजी करू नकोस. आता यहोवा माझी काळजी घेईल. मी पूर्ण खातरीने सांगू शकतो, की यहोवा मला नक्की जिवंत करेल. त्याने माझं मन पाहिलंय आणि माझं त्याच्यावर किती प्रेमए, हे त्याला माहितय.” आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला असं विचारलं पाहिजे, की ‘एखादा जीवघेणा प्रसंग माझ्या जीवनात आला आणि माझ्या विश्‍वासाची परीक्षा झाली, तर मी शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहीन का? आणि यहोवा मला जिवंत करेल असा भरवसा मी ठेवीन का?’ टेहळणी बुरूज२१.०४ १२-१३ ¶१५-१६

रविवार, १० डिसेंबर

जो दुसऱ्‍यांची तहान भागवतो, त्याचीही तहान भागवली जाईल.—नीति. ११:२५.

यहोवा त्याच्या लोकांना सेवाकार्याद्वारे ताकद देतो. लोक आपलं ऐकोत किंवा न ऐकोत आपण इतरांना प्रचार करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. परिस्थितीमुळे आपण सेवाकार्यात हवं तितकं करू शकत नाही, असं कदाचित काहींना वाटू शकतं. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर निराश होऊ नका. कारण तुम्ही जे काही करता ते किती मनापासून करता हे पाहून यहोवा खूश होतो. आपल्यापैकी काहींना प्रचार करायची खूप इच्छा आहे. पण ते घराबाहेर जाऊ शकत नाहीत हे यहोवाला माहीत आहे. अशा वेळी जे त्यांची काळजी घ्यायला येतात त्यांना, किंवा मग डॉक्टर आणि नर्सला प्रचार करण्यासाठी यहोवा त्यांना मदत करतो. पूर्वी आपण यहोवाची जितकी सेवा करत होतो तितकी आता करू शकत नाही असा जर आपण विचार केला, तर आपण निराश होऊ शकतो. पण आतासुद्धा यहोवा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो याचा जर आपण विचार केला, तर कोणत्याही समस्येचा धीराने सामना करायची ताकद आपल्याला मिळेल. आपण सत्याचं बी पेरतो, पण त्यापैकी कोणतं वाढेल आणि मूळ धरेल हे आपण सांगू शकत नाही.—उप. ११:६. टेहळणी बुरूज२१.०५ २४-२५ ¶१४-१७

सोमवार, ११ डिसेंबर

यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते करून तू त्याला तुच्छ का लेखलंस?—२ शमु. १२:९.

यहोवाने दावीद राजाला भरपूर धनसंपत्ती दिली होती, मानाचं पद दिलं होतं आणि त्याच्या अनेक शत्रूंवर विजय मिळवून दिला होता. त्याबद्दल दावीद म्हणाला, की यहोवाने त्याला इतके आशीर्वाद दिले, की तो त्यांचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. (स्तो. ४०:५) पण अशी एक वेळ आली की यहोवाने आपल्याला काय-काय दिलं आहे हे सगळं तो विसरून गेला. त्याला अनेक बायका होत्या. पण तरीसुद्धा त्याने दुसऱ्‍या माणसाच्या बायकोबद्दल मनात चुकीच्या इच्छा आणल्या. ती स्त्री उरीया हित्तीची बायको बथशेबा होती. त्याने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने उरीयाला मारून टाकण्याचा कटही रचला. (२ शमु. ११:२-१५) दावीद बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत होता. पण तरीसुद्धा त्याने लोभीपणा दाखवला आणि स्वतःवर बरीच दुःखं ओढवून घेतली. नंतर दावीदने आपली चूक कबूल केली आणि पश्‍चात्ताप केला. आणि यहोवाने त्याला माफ केलं. याबद्दल त्याने त्याचे खूप आभार मानले.—२ शमु. १२:७-१३. टेहळणी बुरूज२१.०६ १७ ¶१०

मंगळवार, १२ डिसेंबर

आमच्याजवळ पुरेशी पात्रता नाही. पण स्वतः देव आम्हाला ही पात्रता देतो.—२ करिंथ. ३:५.

आपण बायबल अभ्यास घेऊ शकत नाही असं कदाचित आपल्याला वाटत असेल. एखाद्याचा बायबल अभ्यास घेण्याआधी आपल्याला बायबलचं भरपूर ज्ञान असलं पाहिजे आणि आपण शिकवण्यात खूप निपुण असलं पाहिजे असा कदाचित आपण विचार करत असू. तुम्हाला जर असं वाटत असेल तर पुढे दिलेल्या तीन गोष्टींचा विचार करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही इतरांना शिकवू शकता असा भरवसा यहोवाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, शिकवायची आज्ञा येशूने आपल्याला दिली आहे. ही आज्ञा द्यायचा त्याला अधिकार आहे. (मत्त. २८:१८) तिसरी गोष्ट म्हणजे, यहोवा आणि इतर जण तुम्हाला मदत करू शकतात. यहोवाने जशी येशूला मदत केली तशी तो तुम्हालाही मदत करू शकतो. (योहा. ८:२८; १२:४९) याशिवाय, एखादा बायबल अभ्यास सुरू करायला आणि तो चालवायला तुम्ही तुमच्या क्षेत्र सेवा गटाच्या पर्यवेक्षकाला, एखाद्या अनुभवी पायनियरला किंवा प्रचारकाला मदत मागू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या बायबल अभ्यासाला जाऊ शकता. त्यामुळे एक चांगला शिक्षक व्हायला तुम्हाला मदत मिळेल. टेहळणी बुरूज२१.०७ ६ ¶१२

बुधवार, १३ डिसेंबर

जो सगळ्यात लहान गोष्टीत विश्‍वासू असतो, तो मोठ्या गोष्टींतही विश्‍वासू असतो. आणि जो सगळ्यात लहान गोष्टीत अनीतिमान असतो तो मोठ्या गोष्टींतही अनीतिमान असतो.—लूक १६:१०.

या दुष्ट जगाचा अंत जवळ येत असताना यहोवाच्या कार्य करायच्या पद्धतीवर आपल्याला भरवसा ठेवायची जास्त गरज आहे. असं का म्हणता येईल? कारण मोठ्या संकटाच्या वेळी आपल्याला कदाचित अशा सूचना मिळतील ज्या अगदीच विचित्र आणि तर्काला न पटणाऱ्‍या वाटतील. आणि आजच्या सारखंच त्या वेळीसुद्धा यहोवा आपल्याशी प्रत्यक्ष बोलणार नाही. संघटनेत नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन देईल. त्या वेळी हे मार्गदर्शन खरंच यहोवाकडून आहे का, की हे बांधव स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आहेत, अशी शंका घ्यायची किंवा टीका करायची ती मुळीच वेळ नसेल. मानवी इतिहासातल्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या काळात तुम्ही काय कराल? तुम्ही यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर भरवसा ठेवाल का? संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाला तुम्ही आत्ता कसं घेता, त्यावर या प्रश्‍नाचं उत्तर अवलंबून आहे. संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारून त्यावर लगेच काम करायची तुम्ही जर आत्ताच तयारी दाखवली, तर मोठ्या संकटाच्या वेळीही तुम्ही तेच कराल. टेहळणी बुरूज२२.०२ ६ ¶१५

गुरुवार, १४ डिसेंबर

मी तुमच्याशी काय बरोबरी करणार?—शास्ते ८:२.

गिदोन आणि त्याच्या ३०० माणसांनी यहोवाच्या मदतीने एक मोठं युद्ध जिंकलं होतं. पण या गोष्टीचा त्यांनी गर्व केला नाही. त्या वेळी, एफ्राईमची माणसं गिदोनची प्रशंसा करण्याऐवजी त्याच्याशी भांडायला लागली. करण त्यांना लढाईला बोलावण्यात आलं नव्हतं. (शास्ते ८:१) यहोवाच्या मदतीने एफ्राईमच्या माणसांनी किती मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या यांची गिदोनने त्यांना आठवण करून दिली. त्यामुळे त्यांचा “राग शांत झाला.” (शास्ते ८:३) देवाच्या लोकांमध्ये शांती टिकवून ठेवण्यासाठी गिदोनने नम्रता दाखवली. त्याने गर्व केला नाही. एफ्राईम वंशाच्या माणसांकडून आपण हे शिकतो, की स्वतःच्या नावापेक्षा यहोवाच्या नावाचा गौरव करण्याचा आपण जास्त विचार केला पाहिजे. तसंच, कुटुंबप्रमुख आणि मंडळीतले वडील गिदोनकडून एक महत्त्वाचा धडा शिकू शकतात. आपल्यामुळे एखाद्याला वाईट वाटलं तर त्याला तसं का वाटलं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. इतकंच नाही, तर त्याने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांबद्दल त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. असं करण्यासाठी नम्रता लागते. कारण आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्यापेक्षा आपसातली शांती टिकवून ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज२१.०७ १६-१७ ¶१०-१२

शुक्रवार, १५ डिसेंबर

आपण आपल्या प्रतिरूपाचा . . . माणूस निर्माण करू.—उत्प. १:२६.

यहोवाने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवलं आहे. याचा अर्थ, आपण यहोवासारखे गुण दाखवू शकतो. जसं की, प्रेम, करुणा, विश्‍वासूपणा आणि नीती. (स्तो. ८६:१५; १४५:१७) आपण स्वतःमध्ये हे गुण वाढवतो तेव्हा आपण यहोवाचा गौरव करत असतो आणि त्याचे आभारी आहोत हे दाखवत असतो. (१ पेत्र १:१४-१६) त्यामुळे यहोवाला आनंद होतो आणि आपणही आनंदी राहतो. शिवाय, आपल्यामध्ये यहोवासारखे गुण असल्यामुळे आपण त्याच्या कुटुंबात राहू शकतो. यहोवाने आपल्यासाठी ही सुंदर पृथ्वी बनवली. मानवांना बनवण्याच्या खूप आधीच यहोवाने त्यांना राहण्यासाठी पृथ्वी बनवली होती. (ईयो. ३८:४-६; यिर्म. १०:१२) त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने अनेक चांगल्या गोष्टी बनवल्या. यावरून दिसून येतं, की तो प्रेमळ आणि उदार आहे. (स्तो. १०४:१४, १५, २४) त्यानंतर, आपण बनवलेलं “सर्वकाही खूप चांगलं आहे” असं यहोवाने पाहिलं.—उत्प. १:१०, १२, ३१. टेहळणी बुरूज२१.०८ ३ ¶५-६

शनिवार, १६ डिसेंबर

पवित्र शक्‍तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता, आत्मसंयम.—गलती. ५:२२, २३.

आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचाराची आणि शिष्य बनवायची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (मत्त. २८:१९, २०; रोम. १०:१४) तुम्हाला या कामात निपुण व्हायचं आहे का? असेल, तर शिकवणे या माहितीपत्रकाचा अभ्यास करा आणि त्यातून शिकलेल्या गोष्टी लागू करण्यासाठी विशिष्ट ध्येयं ठेवा. एक असं ध्येय आहे जे आपण सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. ते म्हणजे, यहोवाला आवडतील असे गुण स्वतःमध्ये वाढवणं. (कलस्सै. ३:१२; २ पेत्र १:५-८) यहोवाच्या सेवेत जास्त करायची आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. पण आता कदाचित ते शक्य नसेल. नवीन जगात मात्र खऱ्‍या अर्थाने आपल्याला देवाची सेवा पूर्णपणे करता येईल. तोपर्यंत निराश न होता, आपल्याला यहोवासाठी जे काही करणं शक्य आहे ते करून आपण आपला आनंद वाढवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण आपल्या आनंदी देवाचा, यहोवाचा गौरव आणि स्तुती करत राहू. (१ तीम. १:११) तर मग, यहोवासाठी आपण जे काही करू शकतो त्यातून आपण आनंद मिळवू या. टेहळणी बुरूज२१.०८ २५ ¶१८-२०

रविवार, १७ डिसेंबर

देवाजवळ येणाऱ्‍याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे.—इब्री ११:६.

तुम्ही साक्षीदार कुटुंबात लहानाचे मोठे झाले असाल, तर तुम्ही लहानपणापासूनच यहोवाबद्दल शिकला असाल. जसं की, यहोवानेच सगळं काही निर्माण केलं आहे, त्याच्यामध्ये अनेक चांगले गुण आहेत आणि लवकरच तो पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवणार आहे. (उत्प. १:१; प्रे. कार्यं १७:२४-२७) पण आज अनेक लोक हे मानत नाहीत, की देव आहे किंवा त्याने सगळं काही बनवलं आहे. उलट ते असं मानतात, की सगळं काही आपोआप आलं आहे, आणि हळूहळू जटिल जीव उत्पन्‍न झाले. असं म्हणणारे काही जण तर खूप शिकलेले आहेत. ते असा दावा करतात, की विज्ञानाने बायबलला चुकीचं ठरवलं आहे. तसंच ते असंही म्हणतात, की निर्माणकर्त्याला मानणारे लोक कमी शिकलेले असतात आणि ते विचार न करता कोणत्याही गोष्टीवर विश्‍वास ठेवतात. आपण कितीही वर्षांपासून सत्यात असलो, तरी आपण आपला विश्‍वास सतत वाढवत राहिला पाहिजे. मग, मानवी “तत्त्वज्ञान आणि निरर्थक” गोष्टींमुळे आपली फसवणूक होणार नाही.—कलस्सै. २:८. टेहळणी बुरूज२१.०८ १४ ¶१-३

सोमवार, १८ डिसेंबर

यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी तूच योग्य आहेस.—प्रकटी. ४:११.

हाबेल, नोहा, अब्राहाम आणि ईयोब, यांच्या मनात यहोवाबद्दल प्रेम आणि आदर होता. यहोवाची आज्ञा पाळून, त्याच्यावर विश्‍वास ठेवून आणि त्याला बलिदानं अर्पण करून त्यांनी तो विश्‍वास आणि आदर दाखवला. त्यांनी यहोवाचा आदर करण्याचा होताहोईल तितका प्रयत्न केला आणि यहोवाने त्यांची उपासना स्वीकारली. मग अब्राहामच्या वंशजांना यहोवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं. या नियमशास्त्रात यहोवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करण्यासाठी सूचना होत्या. येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्यानंतर यहोवाच्या सेवकांनी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याची उपासना करावी, अशी यहोवा आता अपेक्षा करत नव्हता. (रोम. १०:४) कारण आता यहोवाच्या उपासकांनी एक नवीन नियम म्हणजे “ख्रिस्ताचा नियम” पाळायचा होता. (गलती. ६:२) यासाठी त्यांना खूपसारे नियम पाळायची गरज नव्हती. तर येशूच्या उदाहरणाप्रमाणे आणि शिकवणींप्रमाणे त्यांना वागायचं होतं. आजसुद्धा ख्रिस्ती यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी ख्रिस्ताचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि यामुळे त्यांना आनंद मिळतो.—मत्त. ११:२९. टेहळणी बुरूज२२.०३ २०-२१ ¶४-५

मंगळवार, १९ डिसेंबर

येशू बऱ्‍याचदा वेळ काढून एकांत ठिकाणी प्रार्थना करायला जायचा.—लूक ५:१६.

यहोवा आपल्या मुलांच्या प्रार्थना ऐकतो. येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अनेकदा यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने त्याची प्रत्येक प्रार्थना ऐकली. उदाहरणार्थ, १२ प्रेषितांची निवड करायचा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी येशूने यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने ती ऐकली. (लूक ६:१२, १३) तसंच, भयंकर त्रासात असताना येशूने केलेली प्रार्थनासुद्धा यहोवाने ऐकली. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशू खूप दुःखात होता आणि लवकरच त्याला खूप काही सोसावं लागणार होतं. त्या वेळी त्याने यहोवाला कळकळून प्रार्थना केली. तेव्हा यहोवाने येशूची प्रार्थना फक्‍त ऐकलीच नाही, तर एका स्वर्गदूताला पाठवून आपल्या प्रिय मुलाला धीरही दिला. (लूक २२:४१-४४) आजसुद्धा यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो आणि अगदी योग्य वेळी, योग्य पद्धतीने त्यांची उत्तरं देतो. (स्तो. ११६:१, २) भारतातल्या आपल्या एका बहिणीने हे स्वतः कसं अनुभवलं ते पाहू या. चिंतेमुळे बऱ्‍याच काळापासून ती खूप खचून गेली होती. म्हणून तिने यहोवाला कळकळून प्रार्थना केली. ती म्हणते, “मे २०१९ च्या ब्रॉडकास्टींगमध्ये हेच सांगितलं होतं, की आपण चिंतेचा आणि निराशेचा सामना कसा करू शकतो. याचीच तर मला खूप गरज होती. खरंच, यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं.” टेहळणी बुरूज२१.०९ २१-२२ ¶६-७

बुधवार, २० डिसेंबर

डोंगरांकडे पळून [जा].—लूक २१:२१.

पहिल्या शतकातल्या त्या ख्रिश्‍चनांना सगळं काही मागे सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करणं किती अवघड गेलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? यहोवा आपल्या दररोजच्या गरजा पूर्ण करेल असा विश्‍वास त्यांना ठेवायची गरज होती. त्यासाठी प्रेषित पौलने दिलेला सल्ला त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरला. रोमी सैनिकांनी यरुशलेमला वेढा घालायच्या पाच वर्षांआधी प्रेषित पौलने इब्री ख्रिश्‍चनांना असं म्हटलं: “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा. कारण त्याने म्हटलं आहे: ‘मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.’ म्हणूनच, आपण धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?’” (इब्री १३:५, ६) रोमी सैनिकांनी वेढा घालण्याआधी ज्या ख्रिश्‍चनांनी पौलच्या या सल्ल्याकडे लक्ष दिलं, त्यांना नवीन ठिकाणी साध्या जीवनशैलीशी जुळवून घेणं नक्कीच सोपं गेलं असेल. यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल याची त्यांना पक्की खातरी होती. टेहळणी बुरूज२२.०१ ४ ¶७, ९

गुरुवार, २१ डिसेंबर

[यहोवाची] दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.—स्तो. १४५:९.

दयाळू व्यक्‍ती म्हटलं, की एका प्रेमळ, सहानुभूती असणाऱ्‍या, उदार व्यक्‍तीचं चित्र आपल्या मनात तयार होतं. तसंच, तुम्हाला कदाचित येशूने सांगितलेल्या चांगल्या शोमरोनी माणसाची गोष्टही आठवली असेल. लुटारूंच्या हातात सापडलेल्या एका यहुदी माणसाशी हा शोमरोनी माणूस “दयाळूपणे वागला.” जखमी झालेल्या यहुदी माणसाला पाहून “त्याला कळवळा आला” आणि त्याची चांगली काळजी घेतली जाईल याची व्यवस्थाही त्याने केली. (लूक १०:२९-३७) येशूच्या या गोष्टीतून देवाच्या एका सुंदर गुणाबद्दल, दयेबद्दल आपल्याला शिकायला मिळतं. देवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो दररोज कितीतरी मार्गांनी आपल्याला दया दाखवतो. दया दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे, दया दाखवण्यासाठी जेव्हा योग्य कारण असतं, तेव्हा शिक्षा करण्यापासून आपले हात आवरणं. आणि ही गोष्ट लक्षात घेतली, तर असं म्हणता येईल की यहोवाने आपल्याला आत्तापर्यंत खूप दया दाखवली आहे. म्हणूनच स्तोत्रकर्त्यानेही म्हटलं की, “त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही.” (स्तो. १०३:१०) पण गरज असते तेव्हा यहोवा आपल्याला कडक शिस्तही लावतो. टेहळणी बुरूज२१.१० ८ ¶१-२

शुक्रवार, २२ डिसेंबर

तुझ्यावर असलेलं माझं एकनिष्ठ प्रेम कधीही नाहीसं होणार नाही.—यश. ५४:१०.

यहोवा फक्‍त आपल्या सेवकांनाच, म्हणजे ज्यांचं त्याच्यासोबत एक जवळचं नातं आहे, त्यांनाच एकनिष्ठ प्रेम दाखवतो. ही गोष्ट, दावीद राजाने आणि दानीएल संदेष्ट्याने जे म्हटलं त्यावरून दिसून येते. उदाहरणार्थ, दावीदने असं म्हटलं: “तुला ओळखणाऱ्‍यांना तू नेहमी एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा.” आणि “जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम. . . सर्वकाळ टिकून राहतं.” आणि दानीएलने असं म्हटलं: “हे खऱ्‍या देवा यहोवा, . . . तुझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्‍यांवर तू एकनिष्ठ प्रेम करतोस.” (स्तो. ३६:१०; १०३:१७; दानी. ९:४) यावरून दिसून, येतं की यहोवा आपल्या सेवकांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो. कारण ते त्याला ओळखतात, त्याची भीती बाळगतात, त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात. दुसऱ्‍या शब्दांत, जे यहोवाचे खरे उपासक आहेत त्यांनाच तो एकनिष्ठ प्रेम दाखवतो. हे खरं आहे, की यहोवा सर्व मानवांना जे प्रेम दाखवतो ते आपण त्याचे उपासक बनण्याआधीपासूनच अनुभवत आहोत. (स्तो. १०४:१४) पण त्याचे उपासक असल्यामुळे आज आपल्याला त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचाही फायदा होत आहे. टेहळणी बुरूज२१.११ ४ ¶८-९

शनिवार, २३ डिसेंबर

तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर.—मत्त. ४:१०.

कशीही परिस्थिती असली तरी वर दिलेल्या येशूच्या शब्दांप्रमाणे वागण्याचा आपला निश्‍चय आहे. आज ख्रिस्ती धर्मामध्ये बरेच प्रसिद्ध पाळक किंवा प्रवचन सांगणारे आहेत. आणि लोक त्यांना खूप मानतात. इतकं, की काही वेळा ते त्यांना देवाच्या जागीच बसवतात. चर्चमध्ये त्यांची प्रवचनं ऐकायला लोकांची गर्दी होते. लोक त्यांची मासिकं-पुस्तकं विकत घेतात आणि त्यांच्या कार्याला भरपूर दान देतात. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान असतो. त्यांना पाहून लोक इतके भारावून जातात की ते जणू येशूलाच पाहत आहेत असं त्यांना वाटतं. पण यहोवाच्या उपासकांमध्ये पाळक किंवा उपदेशक असा कोणताही प्रकार नाही. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांचा ते नक्कीच आदर करतात. पण “तुम्ही सगळे भाऊ आहात” असं जे येशूने शिकवलं होतं, ही गोष्ट ते नेहमी लक्षात ठेवतात. (मत्त. २३:८-१०) तसंच, ते कोणत्याही माणसाची उपासना करत नाहीत. मग तो धर्मगुरू असो किंवा राजकीय नेता असो. शिवाय, ते त्यांच्या कार्यालाही पाठिंबा देत नाहीत. उलट, निःपक्ष राहून ते जगातल्या गोष्टींमध्ये भाग घेत नाहीत. अशा सगळ्या कारणांमुळे स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवणाऱ्‍या जगातल्या इतर लोकांपासून ते वेगळे आहेत हे दिसून येतं.—योहा. १८:३६. टेहळणी बुरूज२१.१० २० ¶६-७

रविवार, २४ डिसेंबर

मी तुमचा देव यहोवा आहे. . . . माझ्याशिवाय तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.—निर्ग. २०:२, ३.

आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, तर यहोवासोबतच्या आपल्या नात्यामध्ये कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्‍ती येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण असा निश्‍चय केला पाहिजे, की आपण असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे यहोवाच्या पवित्र नावाचा अपमान होईल. (लेवी. १९:१२; यश. ५७:१५) यहोवाच्या आज्ञा पाळून इस्राएली लोकांनी दाखवून दिलं, की ते यहोवाला आपला देव मानतात. लेवीय १८:४ मध्ये म्हटलं आहे: “तुम्ही माझे न्याय-निर्णय पाळले पाहिजेत आणि माझ्या नियमांप्रमाणे चाललं पाहिजे. मी तुमचा देव यहोवा आहे.” आणि असे कितीतरी न्याय-निर्णय १९ व्या अध्यायात वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, वचन ५-८, २१, २२ यांमध्ये प्राण्यांच्या अर्पणांबद्दल सांगितलं आहे. यहोवाला दिल्या जाणाऱ्‍या या “पवित्र अर्पणाचा अनादर” होणार नाही, अशा प्रकारे इस्राएली लोकांनी ती अर्पणं द्यायची होती. ही वचनं वाचल्यावर आपल्याला यहोवाला खूश करायची आणि त्याला स्तुतीचं बलिदान द्यायची प्रेरणा मिळते.—इब्री १३:१५. टेहळणी बुरूज२१.१२ ५-६ ¶१४-१५

सोमवार, २५ डिसेंबर

आपल्या तारुण्यातल्या बायकोसोबत आनंदी राहा.—नीति. ५:१८.

जे यहोवावर विसंबून राहायला शिकले आहेत अशांकडून तरुण जोडपी बरंच काही शिकू शकतात. काही जोडपी वर्षानुवर्षं पूर्णवेळची सेवा करत आले आहेत. मग तरुण जोडप्यांना आपली ध्येयं ठरवताना अशा जोडप्यांशी बोलायला काय हरकत आहे? हासुद्धा यहोवावर भरवसा ठेवण्याचा एक मार्गच आहे. (नीति. २२:१७, १९) विवाह ही मानवांना यहोवाकडून मिळालेली एक खूप सुंदर गोष्ट आहे, हे लक्षात असू द्या. (मत्त. १९:५, ६) विवाहित जोडप्यांनी वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा असं त्याला वाटतं. म्हणून आपण आपल्या जीवनात काय करणार आहोत याचा तरुण जोडप्यांनी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात काय करत आहात याचं परिक्षण करून पाहा. यहोवाने तुमच्यासाठी बरंच काही केलं आहे. याबद्दल तुम्हाला कदर आहे, हे दाखवण्यासाठी तुम्ही तुमची सेवा वाढवू शकता. त्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. बायबलचा कोणता सल्ला किंवा मार्गदर्शन तुमच्या परिस्थितीला लागू होतं, हे पाहण्यासाठी बायबलचा अभ्यास करा. आणि तो सल्ला आपल्या जीवनात लागू करायचा प्रयत्न करा. यहोवाच्या सेवेला तुम्ही तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर तुम्ही नक्कीच आनंदी राहाल आणि तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील! टेहळणी बुरूज२१.११ १९ ¶१६, १८

मंगळवार, २६ डिसेंबर

आपण सगळेच बऱ्‍याच वेळा चुकतो.—याको. ३:२.

याकोबने स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला. येशूचा भाऊ असल्यामुळे किंवा मोठमोठ्या जबाबदाऱ्‍या असल्यामुळे, आपण कोणीतरी विशेष आहोत किंवा इतर भाऊबहिणींपेक्षा महत्त्वाचे आहोत, असा याकोबने कधीच विचार केला नाही. उलट त्याने त्यांना, ‘माझे प्रिय बांधव’ असं म्हणून आपण त्यांच्यातलेच एक आहोत हे दाखवून दिलं. (याको. १:१६, १९; २:५) शिवाय, आपण नेहमी बरोबर असतो, आपल्याकडून कधीच चुका होत नाहीत असं त्याने कधीच दाखवलं नाही. आपण काय शिकतो? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण सगळेच चुकतो. आपण कधीच असा विचार करू नये, की आपण ज्यांना शिकवतो त्यांच्यापेक्षा आपण खूप श्रेष्ठ आहोत. कारण आपण जर असं दाखवलं, की आपल्याकडून कधीच चुका होत नाहीत, तर त्यांना असं वाटेल, की यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागणं खूप कठीण आहे आणि आपल्याला ते कधीच जमणार नाही. पण आपण जर त्यांना सांगितलं, की आपल्यालाही सुरुवातीला स्वतःमध्ये बदल करायला कसं कठीण गेलं आणि ते बदल करायला यहोवाने कशी मदत केली, तर त्यांना हे कळेल की त्यांनाही ते जमू शकतं. टेहळणी बुरूज२२.०१ ११-१२ ¶१३-१४

बुधवार, २७ डिसेंबर

ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या.—फिलिप्पै. २:५.

आपण येशूसारखा विचार करायला शिकलं पाहिजे. कारण जितकं जास्त आपण असं करू, तितकं जास्त आपण त्याच्यासारखे वागू आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचं तितकंच जास्त अनुकरण करायला आपल्याला शक्य होईल. (इब्री १:३) कदाचित आपल्याला वाटेल, की ‘येशू तर परिपूर्ण आहे. मला कधीच त्याच्यासारखं होता येणार नाही.’ जर तुम्हालाही असं वाटत असेल तर या गोष्टी लक्षात घ्या. पहिली, यहोवाने आपल्याला अशा प्रकारे बनवलं आहे, की आपण त्याचे आणि येशूचे गुण दाखवू शकतो. म्हणून त्याच्या गुणांचं अनुकरण करायचा आपण प्रयत्न केला तर काही प्रमाणात का होईना, आपण तसं करण्यात नक्कीच यशस्वी होऊ. (उत्प. १:२६) दुसरी गोष्ट म्हणजे, देवाची पवित्र शक्‍ती ही या विश्‍वातली सगळ्यात ताकदवान शक्‍ती आहे. आणि पवित्र शक्‍तीच्या मदतीने तुम्ही अशा गोष्टी करू शकता, ज्या तुम्ही स्वतःच्या बळावर कधीच करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, पवित्र शक्‍तीद्वारे उत्पन्‍न होणारे गुण आपण पूर्णपणे दाखवावेत अशी यहोवा सध्या आपल्याकडून अपेक्षा करत नाही. खरंतर पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्या लोकांना परिपूर्ण होण्यासाठी आपल्या प्रेमळ पित्याने १,००० वर्षं राखून ठेवली आहेत. (प्रकटी. २०:१-३) आज तो आपल्याकडून फक्‍त इतकीच अपेक्षा करतो, की आपण मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहावं आणि आपल्याकडून होता होईल तितका प्रयत्न करावा. टेहळणी बुरूज२२.०३ ९ ¶५-६

गुरुवार, २८ डिसेंबर

हे यहोवा, माझ्या तोंडातून शब्द फुटण्याआधीच तुला तो माहीत असतो.—स्तो. १३९:४.

प्रार्थनेसोबतच बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि सभांना उपस्थित राहिल्यामुळेही यहोवासोबतचं आपलं नातं आपण आणखी घट्ट करू शकतो. पण बायबलचा मन लावून अभ्यास करण्यासाठी आणि सभांमध्ये लक्ष देऊन ऐकण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, ‘बायबलचा अभ्यास करताना किंवा सभांमध्ये लक्ष देऊन ऐकताना सहसा कोणत्या गोष्टींमुळे माझं मन विचलित होतं? फोनकॉलमुळे, मेसेजमुळे किंवा ई-मेलमुळे माझं लक्ष भरकटतं का?’ बायबलचा अभ्यास करताना किंवा सभेत असताना तुमचं लक्ष जर भरकटत असेल, तर यहोवाकडे मदत मागा. आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष एकाग्र करणं मुश्‍कील होऊ शकतं. पण ते करणं गरजेचं आहे. म्हणून यहोवाला प्रार्थना करा. तो तुम्हाला तुमच्या मनाचं आणि ‘विचारांचं’ संरक्षण करण्यासाठी त्याची शांती देईल.—फिलिप्पै. ४:६, ७. (तळटीप) टेहळणी बुरूज२२.०१ २९-३० ¶१२-१४

शुक्रवार, २९ डिसेंबर

बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक.—नीति. २२:१७.

उज्जीया राजानेही सल्ला स्वीकारला नाही. यहोवाच्या मंदिरातल्या ज्या भागात फक्‍त याजकांना जायची परवानगी होती, तिथे तो गेला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळायचा प्रयत्न केला. तेव्हा याजकांनी त्याला अडवून असं म्हटलं: “उज्जीया, यहोवासाठी धूप जाळणं हे तुझं काम नाही! फक्‍त याजकांनीच धूप जाळला पाहिजे.” मग उज्जीयाने काय केलं? त्याने जर नम्रपणे त्यांचा सल्ला ऐकला असता आणि लगेच मंदिरातून बाहेर आला असता, तर यहोवाने कदाचित त्याला माफ केलं असतं. पण उज्जीयाने त्यांचं ऐकलं नाही, उलट “उज्जीयाचा राग त्यांच्यावर खूप भडकला.” पण त्याने याजकांचा सल्ला का स्वीकारला नाही? त्याला बहुतेक असं वाटलं असावं, की आपण राजा असल्यामुळे वाटेल ते करू शकतो. त्याच्या अशा गर्विष्ठ वागण्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला आणि तो “मरेपर्यंत कुष्ठरोगीच राहिला.” (२ इति. २६:१६-२१) उज्जीयाच्या उदाहरणावरून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपल्याकडे कितीही मोठी जबाबदारी असली, तरी बायबलमधून दिलेला सल्ला आपण स्वीकारला पाहिजे; नाहीतर आपण यहोवाची मर्जी गमावून बसू. टेहळणी बुरूज२२.०२ ९ ¶७

शनिवार, ३० डिसेंबर

म्हणून पश्‍चात्ताप करा आणि मागे वळा, म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील. आणि खुद्द यहोवाकडून तुम्हाला तजेला मिळेल.—प्रे. कार्यं ३:१९.

एखाद्यावर जेव्हा त्याच्या ‘जुन्या व्यक्‍तिमत्त्वाचा’ प्रभाव असतो तेव्हा तो सहसा आपल्या शारीरिक इच्छांप्रमाणे विचार करतो आणि वागतो. (कलस्सै. ३:९) अशी व्यक्‍ती कदाचित स्वार्थी असेल, तिला लवकर राग येत असेल, दुसऱ्‍यांनी तिच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची ती कदर करत नसेल. तसंच, अशी व्यक्‍ती कदाचित गर्विष्ठपण असेल. कदाचित तिला अश्‍लील साहित्य पाहायला, तसंच ज्यात अनैतिक आणि हिंसक गोष्टी दाखवल्या जातात, असे चित्रपट पाहायला तिला आवडत असेल. अशा व्यक्‍तीमध्येही काही चांगले गुण नक्कीच असतील. आणि चुकीच्या गोष्टी बोलल्यावर किंवा केल्यावर तिला कदाचित त्याबद्दल वाईटही वाटत असेल. पण आपली विचारसरणी किंवा वागणूक बदलण्याची कदाचित तिला इच्छाच होत नसेल. (गलती. ५:१९-२१; २ तीम. ३:२-५) अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्यापैकी कोणीही आपल्या मनातले सगळेच वाईट विचार आणि इच्छा पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. त्यामुळे आपण सगळेच कधीकधी असं काहीतरी बोलून जातो किंवा करतो, ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. (यिर्म. १७:९; याको. ३:२) पण जेव्हा आपण जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकतो, तेव्हा आपण एक वेगळी व्यक्‍ती बनतो. शारीरिक इच्छांप्रमाणे असलेले विचार आणि सवयी आपल्यावर पूर्वीसारखं नियंत्रण करत नाहीत. उलट आपण त्यांच्यावर ताबा मिळवतो.—यश. ५५:७. टेहळणी बुरूज२२.०३ ३ ¶४-५

रविवार, ३१ डिसेंबर

नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.—फिलिप्पै. २:३.

वडिलांनो, भाऊबहिणींमध्ये असलेले चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करा. मंडळीतला प्रत्येक जण अपरिपूर्ण जरी असला, तरी त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये बरेच चांगले गुण आहेत ज्यांची आपण कदर करू शकतो. हे खरं आहे, की वडिलांना मंडळीतल्या भाऊबहिणींच्या विचारसरणीत सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी मदत करावी लागते. म्हणून ते पौलसारखंच त्यांच्या बारीकसारीक चुकांकडे लक्ष देत नाहीत. ते नेहमी लक्षात ठेवतात, की भाऊबहिणींचं यहोवावर प्रेम आहे. तेही यहोवाची सेवा करत आहेत आणि योग्य ते करण्यासाठी ते स्वतःमध्ये बदल करायला तयार आहेत. अशा प्रकारे वडील जेव्हा इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मंडळीमध्ये प्रेम आणि एकता वाढते. नेहमी लक्षात ठेवा, की यहोवा तुमच्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करत नाही. तुम्ही फक्‍त त्याला विश्‍वासू राहावं असं त्याला वाटतं. (१ करिंथ. ४:२) तुम्हीही त्याच्या सेवेत जे काही करायचा प्रयत्न करत आहात त्याची तो कदर करतो या गोष्टीची नेहमी खातरी बाळगा. यहोवाला माहीत आहे, की “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात.” म्हणूनच “तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम” तो कधीच विसरणार नाही.—इब्री ६:१०. टेहळणी बुरूज२२.०३ ३१ ¶१९, २१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा