जुलै
शनिवार, १ जुलै
ज्यांना या शिक्षेमुळे वळण लागतं त्यांच्यासाठी ती पुढे नीतिमत्त्वाचं शांतिदायक फळ उत्पन्न करते.—इब्री १२:११.
बहिष्कृत करणं हा यहोवाच्या व्यवस्थेचा भाग आहे. या व्यवस्थेमुळे बहिष्कृत झालेल्या व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते. आणि यामुळे त्याला आणि इतरांनाही फायदा होतो. एखाद्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय बरोबर नाही असं काही जण म्हणतील. पण लक्षात ठेवा, की असं म्हणणारे लोक सहसा विषयाची एकच बाजू मांडत असतात. त्यामुळे आपण हा भरवसा ठेवला पाहिजे, की वडिलांनी जो काही निर्णय घेतला तो बायबलची तत्त्वं लक्षात ठेवूनच घेतला आहे. शिवाय, वडील “यहोवासाठी न्याय” करतात, हेसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. (२ इति. १९:६) बहिष्कृत करण्याच्या बाबतीत वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला आपण पाठिंबा देतो, तेव्हा खरंतर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला यहोवाकडे परत यायला मदत करत असतो. एलिझाबेथ म्हणते, “माझ्या मुलासोबत असलेले सगळे संबंध तोडून देणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण नंतर जेव्हा तो यहोवाकडे परत आला तेव्हा त्याने म्हटलं, की माझ्या बाबतीत वडिलांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. त्यामुळे त्याला खूप काही शिकायला मिळालं.” टेहळणी बुरूज२१.०९ २८-२९ ¶११-१२
रविवार, २ जुलै
त्याला तिथे एक गरीब विधवाही दिसली. ती फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी दानपात्रात टाकत होती.—लूक २१:२.
त्या गरीब विधवेचा विचार करा. तिलासुद्धा इतरांप्रमाणे जास्त दान द्यायची इच्छा होती यात काही शंका नाही. पण आपल्या परिस्थितीप्रमाणे तिला जे काही देता आलं ते तिने यहोवाला दिलं. तिचं हे दान यहोवाच्या नजरेत खूप मोलाचं आहे, हे येशूला माहीत होतं. यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो हा, की आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने यहोवाची सेवा करतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. (मत्त. २२:३७; कलस्सै. ३:२३) हे तत्त्व आपल्या उपासनेच्या बाबतीतही लागू होतं. सभांसाठी आणि प्रचारकार्यासाठी आपण जमेल तितका वेळ आणि शक्ती खर्च करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. गरीब विधवेच्या अहवालातून शिकलेला धडा तुम्ही कसा लागू करू शकता? त्यासाठी मंडळीतल्या विशिष्ट भाऊबहिणींचा विचार करा. कदाचित तुमच्या मंडळीत अशी एखादी वयस्कर बहीण असेल जिला आपल्या तब्येतीमुळे पूर्वीइतकी सेवा करता येत नसेल. आणि या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असेल. आपण काहीच कामाचे नाही, असाही ती विचार करत असेल. तेव्हा तुम्ही तिला जाणीव करून देऊ शकता, की यहोवा तिच्या मेहनतीची कदर करतो. टेहळणी बुरूज२१.०४ ६ ¶१७, १९-२०
सोमवार, ३ जुलै
जो माणूस धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी! कारण परीक्षा पार केल्यावर त्याला जीवनाचा मुकुट मिळेल.—याको. १:१२.
या दुष्ट जगाचा अंत केव्हा करायचा हे यहोवाला माहीत आहे. त्याने दाखवलेल्या धीरामुळे मोठ्या लोकसमुदायातल्या लाखो लोकांना गोळा करणं शक्य झालं आणि आज ते त्याची उपासना करत आहेत. यहोवाच्या धीरामुळे ते जन्माला येऊ शकले, त्याच्यावर प्रेम करू शकले आणि त्याला आपलं जीवन समर्पण करू शकले. आणि त्यासाठी ते यहोवाचे खूप आभारी आहेत. शेवटपर्यंत धीर धरणाऱ्या या लाखो लोकांना यहोवा भरभरून आशीर्वाद देईल. त्या वेळी हे दिसून येईल, की धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाने घेतलेला निर्णय योग्यच होता. सैतानाने इतकं दुःख आणि समस्या निर्माण केल्या, तरीसुद्धा यहोवाने स्वतःवर त्यांचा परिणाम होऊ दिला नाही. तो नेहमी “आनंदी” राहतो. (१ तीम. १:११) यहोवा लवकरच आपल्या नावाची बदनामी दूर करणार आहे, त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करणार आहे, दुष्टाईचा आणि आपल्या सगळ्या समस्यांचा अंत करणार आहे. तोपर्यंत आपणसुद्धा धीराने आणि आनंदाने त्या दिवसाची वाट पाहू या. टेहळणी बुरूज२१.०७ १३ ¶१८-१९
मंगळवार, ४ जुलै
नासरेथमधून कधी काही चांगलं येऊ शकतं का?—योहा. १:४६.
पहिल्या शतकात अनेकांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्यासाठी तो फक्त एका गरीब सुताराचा मुलगा होता. शिवाय, येशू नासरेथचा राहणारा होता. आणि लोकांच्या मते ते एक छोटंसंच शहर होतं. येशूचा शिष्य नथनेल हासुद्धा सुरुवातीला या शहराबद्दल म्हणाला होता, की “नासरेथमधून कधी काही चांगलं येऊ शकतं का?” त्याच्या मनात मीखा ५:२ मधली भविष्यवाणी असावी ज्यात सांगितलं होतं, की मसीहाचा जन्म बेथलेहेममध्ये होईल, नासरेथमध्ये नाही. यशया संदेष्ट्याने सांगितलं होतं, की “[मसीहा] कोण आहे, कुठला आहे?” हे येशूचे शत्रू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. (यश. ५३:८) त्या माहीत करून घेण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला असता, तर येशूचा जन्म बेथलेहेममध्ये झाला आहे आणि तो दावीद राजाचा वंशज आहे हे त्यांना समजलं असतं. (लूक २:४-७) खरंतर, मीखा ५:२ मध्ये सांगितलं होतं, त्याप्रमाणे येशूचा जन्म बेथलेहेममध्येच झाला होता. मग तरीसुद्धा लोकांनी त्याला का नाकारलं? कारण खरं काय आहे हे जाणून न घेताच त्यांनी त्याच्याबद्दल आपलं मत बनवलं होतं. आणि त्यामुळे मसीहा म्हणून त्यांनी त्याला नाकारलं. टेहळणी बुरूज२१.०५ २-३ ¶४-६
बुधवार, ५ जुलै
नीतिमान माणसाने . . . माझं ताडन केलं, तरी ते माझ्या डोक्यावर तेल ओतण्यासारखं असेल.—स्तो. १४१:५.
बायबलमध्ये अशा लोकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी सल्ला स्वीकारला आणि त्यामुळे देवाने त्यांना आशीर्वाद दिला. ईयोबचंच उदाहरण घ्या. तो देवाचा विश्वासू सेवक असला, तरी तो काही परिपूर्ण नव्हता. तो कठीण परिस्थितीतून जात असताना त्याच्या तोंडून काही चुकीच्या गोष्टी निघाल्या. त्यामुळे अलीहू आणि यहोवाने कडक शब्दांत त्याची चूक सुधारली. मग ईयोबने काय केलं? तो म्हणाला, ‘मी अशा गोष्टींबद्दल बोललो ज्यांबद्दल मला काहीच कळत नाही. म्हणून मी आपले शब्द मागे घेतो आणि धूळराखेत बसून पश्चात्ताप करतो.’ (ईयो. ४२:३-६, १२-१७) त्याने आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या अलीहूचा सल्ला स्वीकारला आणि नम्र असल्याचं दाखवून दिलं. (ईयो. ३२:६, ७) कधीकधी आपल्याला सल्ला दिला जातो, तेव्हा आपल्याला असं वाटू शकतं, की ‘मला याची गरज नाही.’ किंवा सल्ला देणारा आपल्यापेक्षा लहान असल्यामुळे सल्ला स्वीकारणं आपल्याला कठीण वाटू शकतं. पण अशा वेळीही आपण ईयोबसारखं नम्र असलो, तर आपल्याला सल्ला स्वीकारायला मदत होईल. खरंच, आपल्या सगळ्यांनाच पवित्र शक्तीचे गुण वाढवायची आणि सेवाकार्यात प्रगती करत राहायची गरज आहे. टेहळणी बुरूज२२.०२ ११ ¶८; १२ ¶१२
गुरुवार, ६ जुलै
तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.—योहा. १३:३५.
मंडळीतलं प्रेमाचं आणि शांतीचं वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे कुणालाही एकटं वाटणार नाही. त्यासाठी आपण जे काही करतो आणि बोलतो त्यामुळे खरंच खूप फरक पडतो. तर मग, जे लोक सत्यात एकटे आहेत त्यांना मंडळीत आपलेपणा वाटावा म्हणून तुम्ही काय करू शकता? नवीन लोकांशी स्वतःहून मैत्री करा. नवीन लोक जेव्हा मंडळीत येतात तेव्हा प्रेमाने त्यांचं स्वागत करा. (रोम. १५:७) पण त्यांच्याशी चांगली मैत्री करण्यासाठी फक्त ‘नमस्ते,’ ‘आपलं नाव काय?’ इतकंच म्हणणं पुरेसं नाही. तर हळूहळू आपुलकीने त्यांची विचारपूस करा आणि त्यांना जाणून घ्या. पण असं करताना त्यांना अवघडल्यासारखं वाटेल असे प्रश्न विचारू नका. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कसं वाटतं हे सांगणं काहींना कठीण जातं. त्यामुळे त्यांना खूपसारे प्रश्न विचारून बोलायला लावू नका. तर विचार करून प्रश्न विचारा. जसं की, ‘तुम्हाला सत्याबद्दल कसं कळलं?’ आणि ते बोलत असताना लक्ष देऊन त्यांचं ऐका. टेहळणी बुरूज२१.०६ ११ ¶१३-१४
शुक्रवार, ७ जुलै
ती माझा आवाज ऐकतील आणि तेव्हा एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल.—योहा. १०:१६.
आपण सगळे ‘एका मेंढपाळाच्या’ मार्गदर्शनाखाली “एक कळप” होऊन यहोवाची सेवा करत आहोत याचा आपल्याला खूप आनंद आहे. यहोवा की मरजी पूरी करने के लिए संगठित या पुस्तकाच्या १६५ पानावर असं म्हटलं आहे: “भाऊबहिणींमधल्या एकतेचा आनंद घेत असताना ती एकता टिकवून ठेवण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे.” त्यासाठी “यहोवा जसं आपल्या भाऊबहिणींना पाहतो तसंच आपणही पाहिलं पाहिजे.” यहोवासाठी प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्यासाठीसुद्धा आपले भाऊबहीण खूप महत्त्वाचे असले पाहिजेत. त्यांना मदत करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आपण जे काही करतो ते यहोवा पाहतो आणि त्याची खूप कदर करतो. (मत्त. १०:४२) आपलं आपल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर “ठेच लागण्यासारखं किंवा अडखळण्यासारखं काहीही न ठेवायचा आपण निश्चय करू या.” (रोम. १४:१३) आपण त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजू या. त्यांना मनापासून क्षमा करू या. त्यांचं वागणं कधीच आपण मनाला लावून घेऊ नये. उलट, “शांतीसाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.”—रोम. १४:१९. टेहळणी बुरूज२१.०६ २४ ¶१६-१७
शनिवार, ८ जुलै
वाढवणारा देवच . . . आहे.—१ करिंथ. ३:७.
जर आपण बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास केला, तसंच बायबलमधून आणि संघटनेकडून मिळालेला सल्ला जीवनात लागू केला, तर आपण हळूहळू ख्रिस्तासारखे गुण स्वतःमध्ये विकसित करू शकू. शिवाय, आपण देवालाही चांगल्या प्रकारे ओळखू लागू. येशूने म्हटलं: “पेरलेलं बी अंकुरतं आणि चांगलं वाढतं. पण हे नेमकं कसं घडलं हे त्याला [म्हणजे बी पेरणाऱ्याला] कळत नाही. हळूहळू, जमीन आपोआप पीक देते; आधी अंकुर, मग कणीस आणि शेवटी कणसात भरलेला दाणा.” (मार्क ४:२७, २८) इथे “बी” आपल्या संदेशाला सूचित करतं. या उदाहरणातून येशूला हेच सांगायचं होतं, की ज्याप्रमाणे एक रोपटं हळूहळू वाढतं, अगदी त्याचप्रमाणे संदेश ऐकणारासुद्धा हळूहळू स्वतःच्या जीवनात बदल करतो. हेच आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो. जसजशी त्यांना यहोवाची ओळख होऊ लागते, तसतसे ते आपल्या जीवनात अनेक चांगले बदल करू लागतात. (इफिस. ४:२२-२४) पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की पेरलेलं बी वाढवण्याचं काम यहोवा करतो. टेहळणी बुरूज२१.०८ ८-९ ¶४-५
रविवार, ९ जुलै
मनातल्या इच्छांमागे धावण्यापेक्षा, जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद घेणं कधीही चांगलं.—उप. ६:९.
आनंद कसा मिळवता येईल हे आजच्या वचनात सांगितलं आहे. “जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद” घेणारी व्यक्ती, तिच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी असते. याच्या अगदी उलट, ‘मनातल्या इच्छांमागे धावणारी’ व्यक्ती अशा गोष्टींच्या मागे लागते ज्या मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे ती कधीच समाधानी नसते. यावरून आपल्याला हेच शिकायला मिळतं, की आनंदी राहण्यासाठी आपण आपल्याकडे जे आहे त्यावर लक्ष दिलं पाहिजे, आणि पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवली पाहिजेत. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहणं खरंच शक्य आहे का? अनेकांना वाटतं, की ते शक्य नाही. कारण माणसांना सतत नवीननवीन गोष्टी मिळवायची आवड असते. पण बायबल म्हणतं, की आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहू शकतो. ते कसं? हे जाणून घेण्यासाठी मत्तय २५:१४-३० यामध्ये येशूने जे उदाहरण दिलं त्यावर विचार करा. त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण आनंदी कसं राहू शकतो आणि आपला आनंद आणखी कसा वाढवू शकतो. टेहळणी बुरूज२१.०८ २१ ¶५-६
सोमवार, १० जुलै
मी एका उंच आणि पवित्र ठिकाणी राहत असलो, तरी मी दुःखी आणि खचून गेलेल्यांसोबतही असतो.—यश. ५७:१५.
यहोवा “दुःखी आणि खचून” गेलेल्यांची खूप काळजी घेतो. आपल्या भाऊबहिणींना फक्त मंडळीतल्या वडिलांनीच नाही, तर आपण सगळ्यांनी धीर दिला पाहिजे. त्यासाठी आपल्या वागण्याबोलण्यातून आपण हे दाखवलं पाहिजे, की आपल्याला त्यांची खूप काळजी आहे. यहोवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची आपण त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. (नीति. १९:१७) तसंच, आपण नेहमी नम्र असलं पाहिजे. आपण स्वतःच्या क्षमतांची बढाई मारू नये, इतरांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करू नये. नाहीतर आपण त्यांच्यामध्ये ईर्ष्येची भावना निर्माण करू. उलट आपण आपल्या क्षमतांचा आणि ज्ञानाचा उपयोग एकमेकांना धीर देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी केला पाहिजे. (१ पेत्र ४:१०, ११) येशू ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांशी वागला त्यावरून इतरांशी कसं वागायचं हे आपण शिकतो. येशू हा पृथ्वीवर होऊन गेलेला सगळ्यात महान पुरुष होता. पण तरी तो “प्रेमळ आणि नम्र” होता. (मत्त. ११:२८-३०) त्याने सोपी भाषा आणि रोजच्या जीवनातली उदाहरणं वापरून लोकांना शिकवलं. त्यामुळे तो जे शिकवायचा ते सामान्य लोकांना लगेच कळायचं.—लूक १०:२१. टेहळणी बुरूज२१.०७ २३ ¶११-१२
मंगळवार, ११ जुलै
आपल्या वडीलधाऱ्यांना विचारा, म्हणजे ते तुम्हाला सांगतील.—अनु. ३२:७.
वयस्कर भाऊबहिणींकडून शिकण्यासाठी स्वतःहून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा. त्यांना नीटसं दिसत नसलं, ते जास्त चालू-फिरू शकत नसले किंवा फारसं बोलू शकत नसले, तरी मनाने ते अजूनही तरुण आहेत. आणि यहोवाच्या नजरेत त्यांनी एक “चांगलं नाव” कमावलं आहे. (उप. ७:१) यहोवासाठी ते किती महत्त्वाचे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांचा आदर करा. बायबल काळातल्या अलीशासारखी मनोवृत्ती दाखवा. अगदी शेवटपर्यंत त्याला एलीयासोबत राहायचं होतं. तीन वेळा तो एलीयाला म्हणाला, “मी तुमची साथ सोडणार नाही.” (२ राजे २:२, ४, ६) वयस्कर भाऊबहिणींशी ओळख वाढवण्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांना प्रश्न विचारा. (नीति. १:५; २०:५; १ तीम. ५:१, २) तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू शकता: “तरुण असताना तुम्हाला कशी खातरी पटली, की हेच सत्य आहे?” “तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी घडल्या ज्यांमुळे तुम्ही यहोवाच्या आणखी जवळ आलात?” “आनंदाने यहोवाची सेवा करत राहायला कोणती गोष्ट तुम्हाला मदत करते?” (१ तीम. ६:६-८) आणि मग, ते सांगत असताना त्यांचं लक्ष देऊन ऐका. टेहळणी बुरूज२१.०९ ५ ¶१४; ७ ¶१५
बुधवार, १२ जुलै
देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो स्वतः तुम्हाला उत्साहित करतो. आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करावं, म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करायची ताकदही देतो.—फिलिप्पै. २:१३.
आपण प्रचाराच्या आणि शिकवायच्या आज्ञेचं मनापासून पालन करतो तेव्हा आपण दाखवून देतो की देवावर आपलं प्रेम आहे. (१ योहा. ५:३) याचा विचार करा, यहोवावर प्रेम असल्यामुळेच तुम्ही घरोघरचं प्रचारकार्य करायला तयार झालात. हे करणं सोपं होतं का? कदाचित नाही. तुम्ही पहिल्यांदा प्रचाराला गेला तेव्हा तुम्हाला भीती वाटली का? नक्कीच वाटली असेल. पण हे काम येशूने दिलं आहे हे माहीत असल्यामुळे तुम्ही ते केलं. आणि पुढे जसजसं तुम्ही हे काम करत गेला तसतसं तुम्हाला ते सोपं वाटू लागलं. पण बायबल अभ्यास चालवण्याबद्दल काय? त्या विचारानेच तुम्हाला भीती वाटते का? असेल तर त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. आणि ‘मला एकतरी बायबल अभ्यास घ्यायचा आहे,’ हे त्याला सांगा. तो नक्कीच तुमच्या मनातली भीती घालवेल आणि बायबल अभ्यास चालवायचं धैर्य तुम्हाला देईल. टेहळणी बुरूज२१.०७ ३ ¶७
गुरुवार, १३ जुलै
त्यांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करवून घ्यावी.—प्रकटी. १३:१६.
प्राचीन काळात गुलामाच्या शरीरावर एक कायमची खूण केली जायची. यावरून त्याचा मालक कोण आहे हे समजायचं. अगदी तसंच, आजसुद्धा सगळ्यांकडून अशी अपेक्षा केली जाईल, की त्यांनीही एका अर्थाने स्वतःच्या कपाळावर आणि हातावर खूण करून घ्यावी; म्हणजे आपल्या विचारांतून आणि कामांतून हे दाखवून द्यावं, की ते आजच्या सरकारांना पाठिंबा देतात आणि तेच त्यांचे खरे मालक आहेत. मग आपण स्वतःवर ही खूण करून घेऊ का? आणि जगातल्या सरकारांना पाठिंबा देऊ का? जे ही खूण करून घेणार नाहीत त्यांना अनेक संकटांचा आणि धोक्याचा सामना करावा लागेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं म्हटलं आहे, की ज्या व्यक्तीवर ही खूण आहे ‘त्या व्यक्तीशिवाय कोणीही खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही.’ (प्रकटी. १३:१७) पण जे लोक प्रकटीकरण १४:९, १० मध्ये सांगितलेली खूण स्वतःवर करून घेतात त्यांच्या बाबतीत देव काय करेल हे देवाच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे ही खूण करून घेण्याऐवजी ते आपल्या हातावर “मी यहोवाचा आहे,” असं लिहितील. (यश. ४४:५) आपण पूर्णपणे यहोवाला एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याची हीच वेळ आहे. जर आपण यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर तोही आनंदाने म्हणेल, की ‘आपण त्याचे आहोत.’ टेहळणी बुरूज२१.०९ १८ ¶१५-१६
शुक्रवार, १४ जुलै
लोखंड जसं लोखंडाला धार लावतं, तसाच एक माणूस आपल्या मित्राला सुधारतो.—नीति. २७:१७.
इतरांच्या मदतीने आपण आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. प्रेषित पौलने तीमथ्यला प्रचार कसा करायचा आणि इतरांना कसं शिकवायचं हे सांगितलं. आणि तीमथ्यने या पद्धती इतरांना शिकवाव्यात असं प्रोत्साहन पौलने त्याला दिलं. (१ करिंथ. ४:१७) तीमथ्यप्रमाणे आपणसुद्धा मंडळीतल्या इतर अनुभवी प्रचारकांकडून शिकू शकतो. त्यासोबतच, आपण जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. कारण त्याच्या पवित्र शक्तीच्या मदतीशिवाय आपण काहीच साध्य करू शकत नाही. (स्तो. १२७:१; लूक ११:१३) तुम्हाला नेमकी कशाबद्दल मदत हवी आहे हे यहोवाला स्पष्टपणे सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही त्याला अशी प्रार्थना करू शकता, की ‘ज्या व्यक्तीला तुझ्याबद्दल जाणून घ्यायची आणि शिकायची इच्छा आहे अशी व्यक्ती मला प्रचारात भेटू दे.’ आपण वैयक्तिक अभ्यासासाठीसुद्धा वेळ काढला पाहिजे. बायबल म्हणतं, “देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे,” याची आपण स्वत:ला खातरी पटवून दिली पाहिजे. (रोम. १२:२) वैयक्तिक अभ्यासामुळे आपण देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे प्रचारात आपण पूर्ण आत्मविश्वासाने त्याच्याबद्दल लोकांना सांगू शकतो. टेहळणी बुरूज२१.०५ १८ ¶१४-१६
शनिवार, १५ जुलै
प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही.—१ करिंथ. १५:५८.
समजा तुमचा एक बायबल विद्यार्थी आहे. त्याने प्रगती करावी म्हणून तुम्ही त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेता, त्याच्यासाठी यहोवाला प्रार्थनासुद्धा करता. पण तो प्रगती करत नाही. त्यामुळे तुम्हाला तो बायबल अभ्यास बंद करावा लागत असेल तर काय? किंवा तुम्ही कधी बाप्तिस्म्यापर्यंत पोचायला कोणालाही मदत करू शकला नसाल तर काय? मग याचा अर्थ असा होता का, की तुम्हीच कुठंतरी कमी पडत आहात आणि तुमच्या सेवाकार्यावर यहोवाचा आशीर्वाद नाही? आपण सेवाकार्यात कितपत यशस्वी आहोत, हे यहोवा कोणत्या गोष्टींवरून ठरवतो याकडे लक्ष द्या. हार न मानता आपण प्रचाराचं काम किती मेहनतीने करतो हे यहोवा पाहतो. लोक आपलं ऐकोत किंवा न ऐकोत, आपण जेव्हा प्रचाराचं काम मेहनतीने आणि यहोवावरच्या प्रेमामुळे करत राहतो, तेव्हा आपलं काम त्याच्या नजरेत यशस्वी ठरतं. पौलने म्हटलं: “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम विसरून जायला देव अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) म्हणून आपण घेत असलेल्या मेहनतीचा जरी चांगला परिणाम दिसून आला नाही, तरी आपण घेतलेल्या परिश्रमांना आणि दाखवत असलेल्या प्रेमाला यहोवा लक्षात ठेवतो. तसंच, प्रेषित पौलने आजच्या वचनात जे म्हटलं होतं तेही आपण लक्षात ठेवू शकतो. टेहळणी बुरूज२१.१० २५ ¶४-६
रविवार, १६ जुलै
पित्याने मला जे दिले आहेत, ते सगळे माझ्याकडे येतील आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी कधीही दूर करणार नाही.—योहा. ६:३७.
येशू आपल्या शिष्यांशी नेहमी प्रेमाने आणि समजुतीने वागला. प्रत्येकाची क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळी आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे ते सगळे एकसारख्या जबाबदाऱ्या हाताळू शकत नाहीत किंवा सेवेत एकसारखं काम करू शकत नाहीत याची त्याला जाणीव होती. पण प्रत्येक जण मनापासून जे काही करत होता त्याची त्याने कदर केली. ही गोष्ट त्याने सांगितलेल्या एका उदाहरणातून दिसून येते. त्या उदाहरणातल्या मालकाने आपल्या प्रत्येक दासाला “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” काम सोपवलं. एका दासाने दुसऱ्या दासापेक्षा जास्त व्यापार केला. पण मालकाने दोघांच्या मेहनतीची प्रशंसा केली. तो दोघांना, “शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा!” असं म्हणाला. (मत्त. २५:१४-२३) येशू आपल्याशीसुद्धा तितक्याच प्रेमाने आणि समजुतीने वागतो. आपल्या प्रत्येकाची क्षमता आणि परिस्थिती वेगळी आहे हे त्याला माहीत आहे. आणि त्यामुळे आपण मनापासून जे काही करतो त्याची तो खूप कदर करतो. आपणसुद्धा इतरांशी असंच वागलं पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०७ २३ ¶१२-१४
सोमवार, १७ जुलै
मी माझ्या प्रभूवर हात उचलणार नाही.—१ शमु. २४:१०.
दावीद राजा नेहमीच दयाळूपणे वागला असं नाही. उदाहरणार्थ, तो नाबालशी कसा वागला याचा विचार करा. नाबाल एक उद्धट स्वभावाचा माणूस होता. त्याने दावीद आणि त्याच्या माणसांना अन्नसामग्री दिली नाही. उलट त्याने दावीदचा अपमान केला. हे ऐकून दावीद इतका भडकला, की त्याने नाबालला आणि त्याच्या घराण्यातल्या सगळ्या माणसांना ठार मारायचं ठरवलं. पण नाबालची बायको समंजस होती. तिने लगेच दावीदला आणि त्याच्या लोकांना जे हवं होतं ते दिलं. आणि त्यामुळे दावीद एका मोठ्या रक्तदोषापासून वाचला. (१ शमु. २५:९-२२, ३२-३५) दावीद राजा जेव्हा खूप चिडला होता, तेव्हा नाबाल आणि त्याच्या सर्व लोकांना ठार मारावं, असं त्याला वाटत होतं. तसंच, नाथानने सांगितलेल्या गोष्टीतल्या श्रीमंत माणसालासुद्धा मृत्युदंड द्यावा असं त्याला वाटत होतं. तुम्ही विचार कराल, की दावीदसारखा इतका चांगला आणि प्रेमळ माणूस इतकी कठोर शिक्षा कशी काय देऊ शकतो? त्या वेळी दावीदची परिस्थिती काय होती ते लक्षात घ्या. त्याने जे पाप केलं होतं त्यामुळे त्याचा विवेक त्याला बोचत होता. यावरून दिसून येतं, की यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर झालेलं असतं, तेव्हा आपण इतरांशी कठोरपणे वागतो. त्यांना दया दाखवत नाही. टेहळणी बुरूज२१.१० १२ ¶१७-१८; १३ ¶२०
मंगळवार, १८ जुलै
तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे.—१ पेत्र १:१६.
आजच्या वचनातल्या शब्दांवरून दिसून येतं, की पवित्र असण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे, आणि आपण त्याचं अनुकरण करू शकतो. तसंच, आपण आपल्या सगळ्या वागणुकीत पवित्र असू शकतो. खरंतर, या बाबतीत आपण पवित्र असलंच पाहिजे. पण ही गोष्ट आपल्याला अशक्य वाटेल, कारण आपण अपरिपूर्ण आहोत. प्रेषित पेत्रचंच उदाहरण घ्या. त्याने अनेक चुका केल्या, पण त्याचं उदाहरण दाखवून देतं, की आपण ‘पवित्र होऊ’ शकतो. अनेकांना वाटतं, की पवित्र किंवा धार्मिक लोक साधू-संतांसारखा वेगळा पोषाख करणारे आणि धीरगंभीर चेहऱ्याचे असतात. पण हे चुकीचं आहे. कारण यहोवा पवित्र आहे आणि तरीसुद्धा बायबल म्हणतं, की तो एक ‘आनंदी देव’ आहे. (१ तीम. १:११) शिवाय, जे त्याची उपासना करतात तेसुद्धा आनंदी असतात. (स्तो. १४४:१५) येशू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अशा लोकांचा धिक्कार केला जे इतरांपेक्षा वेगळा पोषाख करायचे आणि लोकांसमोर धार्मिकतेचा आव आणायचे. (मत्त. ६:१; मार्क १२:३८) पण पवित्रतेबद्दलचा आपला दृष्टिकोन फार वेगळा आहे. आपला दृष्टिकोन बायबलमध्ये पवित्रतेबद्दल जे म्हटलं आहे त्यानुसार आहे. आणि आपल्याला खातरी आहे, की आपला प्रेमळ देव आपल्याला कधीच अशी आज्ञा देणार नाही, जी आपण पाळू शकत नाही. टेहळणी बुरूज२१.१२ २ ¶१, ३
बुधवार, १९ जुलै
तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने . . . प्रेम करा.—मार्क १२:३०.
यहोवाने आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्यांपैकी सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, आपण त्याची उपासना करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो. आपण त्याच्या आज्ञांचं पालन करतो तेव्हा आपण दाखवतो, की आपलं त्याच्यावर प्रेम आहे. (१ योहा. ५:३) त्याने दिलेल्या आज्ञांपैकी एक आज्ञा म्हणजे, आपण लोकांना शिष्य बनवावं आणि त्यांना बाप्तिस्मा द्यावा. (मत्त. २८:१९) आणखी एक आज्ञा अशी आहे, की आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. (योहा. १३:३५) जे लोक त्याच्या आज्ञांचं पालन करतात, त्यांना तो आपल्या कुटुंबात राहू देतो. (स्तो. १५:१, २) इतरांवर प्रेम करा. प्रेम हा यहोवाचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. (१ योहा. ४:८) आपण त्याला ओळखतसुद्धा नव्हतो तेव्हापासून तो आपल्यावर प्रेम करतो. (१ योहा. ४:९, १०) त्याच्यासारखंच आपणसुद्धा इतरांवर प्रेम केलं पाहिजे. (इफिस. ५:१) याचा एक सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, वेळ आहे तोपर्यंत आपण लोकांना यहोवाबद्दल शिकून घ्यायला मदत केली पाहिजे. (मत्त. ९:३६-३८) त्यामुळे यहोवाच्या कुटुंबाचे सदस्य बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्यांना समजेल. टेहळणी बुरूज२१.०८ ५-६ ¶१३-१४
गुरुवार, २० जुलै
यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.—योहा. १५:१३.
येशूचं त्याच्या पित्यावर मनापासून प्रेम असल्यामुळे त्याने त्याच्यासाठी आणि आपल्यासाठीही बरेच त्याग केले. (योहा. १४:३१) लोकांवर त्याचं किती मनापासून प्रेम आहे हे त्याने पृथ्वीवर असताना वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून दिलं. काही लोक त्याचा विरोध करायचे तरीसुद्धा तो नेहमी सर्वांशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांवर प्रेम असल्यामुळे त्याने देवाच्या राज्याबद्दल त्यांना शिकवलं. (लूक ४:४३, ४४) तसंच, पापी लोकांच्या हातून एक यातनादायक मृत्यू सहन करून देवाबद्दल आणि मानवजातीबद्दल त्याच्या मनात किती निःस्वार्थ प्रेम होतं हे त्याने दाखवून दिलं. असं करून त्याने आपल्या सगळ्यांसाठी कायमच्या जीवनाचा मार्ग मोकळा केला. आपल्या स्वर्गीय पित्यावर आपलं प्रेम असल्यामुळेच आपण समर्पण करून बाप्तिस्मा घेतला. आणि येशूप्रमाणेच लोकांशी चांगलं वागून यहोवावरचं आपलं प्रेम आपण दाखवू शकतो. म्हणूनच प्रेषित योहानने म्हटलं की ‘जो आपल्या भावावर प्रेम करत नाही तो न पाहिलेल्या देवावर प्रेम करूच शकत नाही.’—१ योहा. ४:२०. टेहळणी बुरूज२२.०३ १० ¶८-९
शुक्रवार, २१ जुलै
तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला. वेळेचा चांगला उपयोग करा.—इफिस. ५:१५, १६.
यहोवासोबत वेळ घालवायला आपल्याला आवडत असलं, तरी सध्याच्या धावपळीच्या जीवनात त्यासाठी म्हणावा तितका वेळ आपल्याला मिळत नाही. कारण नोकरी, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि इतर आवश्यक कामांमध्ये आपला बराच वेळ जातो. त्यामुळे प्रार्थना, अभ्यास किंवा मनन या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच नाही असं आपल्याला वाटू शकतं. आणखी एका गोष्टीमध्ये आपला नकळत वेळ जाऊ शकतो. आपण जर काळजी घेतली नाही तर आपला बराचसा वेळ अशा गोष्टींमध्ये जाऊ शकतो, ज्या मुळात चुकीच्या नाहीत. पण त्यांमुळे यहोवासाठी आपल्याजवळ वेळच उरणार नाही. उदाहरणार्थ मनोरंजन आणि अशाच इतर गोष्टी. अधून-मधून आपण सगळेच मनोरंजनासाठी वेळ काढतो आणि ते गरजेचंसुद्धा आहे. पण काही वेळा या गोष्टीतच आपला इतका वेळ जाऊ शकतो, की त्यामुळे आध्यात्मिक गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच उरणार नाही. म्हणून या गोष्टींसाठी आपण किती वेळ देतो, याचा विचार करणं गरजेचं आहे.—नीति. २५:२७; १ तीम. ४:८. टेहळणी बुरूज२२.०१ २६ ¶२-३
शनिवार, २२ जुलै
तुमच्यामध्ये राहणारा विदेशी तुमच्यासाठी तुमच्याच देशाच्या रहिवाशासारखा असावा आणि तुम्ही त्याच्यावर स्वतःसारखंच प्रेम करावं.—लेवी. १९:३४.
यहोवाने जेव्हा इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की तुम्ही आपल्या सोबत्यावर प्रेम करा तेव्हा त्यांना फक्त आपल्या देशातल्या किंवा वंशातल्या लोकांवर प्रेम करायचं नव्हतं. तर त्यांच्यामध्ये राहणाऱ्या विदेशी लोकांवरही त्यांना प्रेम करायचं होतं. लेवीय १९:३३, ३४ मध्ये ही गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. एखाद्या विदेश्याला त्यांनी स्वतःच्या देशाच्या रहिवाशासारखं वागवायचं होतं आणि त्याच्यावर स्वतःसारखंच प्रेम करायचं होतं. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांनी गरिबांना आणि विदेश्यांना आपल्या शेतातलं उरलेलं पीक गोळा करू द्यायचं होतं. (लेवी. १९:९, १०) विदेश्यांवर प्रेम करायचा हा सल्ला आज आपल्यालाही लागू होतो. (लूक १०:३०-३७) आज लाखो लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी काही जण आपल्या जवळपाससुद्धा राहत असतील. अशा लोकांसोबत आपण प्रेमाने आणि आदराने वागणं खूप महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज२१.१२ १२ ¶१६
रविवार, २३ जुलै
यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.—स्तो. ३४:१०.
दावीदसारखंच आपण मदतीसाठी नेहमी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आणि जितकं जास्त आपण हे करू, तितकी जास्त आपल्याला याची खातरी होईल, की भविष्यात तो आपलं संरक्षण करू शकतो. कधी कधी संमेलनाला आणि अधिवेशनाला जाण्यासाठी आपल्याला सुट्टी हवी असते. किंवा मग, सगळ्या सभांना हजर राहण्यासाठी किंवा सेवाकार्यात जास्त वेळ घालवण्यासाठी आपल्याला कामाच्या वेळेत बदल करून हवा असतो. अशा वेळी आपल्या बॉसशी बोलण्यासाठी यहोवावर विसंबून राहण्याची आणि त्याच्यावर भरवसा ठेवण्याची गरज असते. पण जर बॉसने तुमची विनंती मान्य केली नाही आणि तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागली, तर काय? अशा वेळी यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार आणि आपल्या सर्व गरजा तो पूर्ण करेल असा भरवसा आपण ठेवू का? (इब्री १३:५) पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्या अनेकांनी हे अनुभवलं आहे, की मदतीची गरज होती तेव्हा यहोवाने त्यांना कशी मदत केली. खरंच, यहोवा त्याच्या सेवकांना कधीच सोडत नाही! भविष्यात काय होईल याचा विचार करून आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण यहोवा आपल्यासोबत आहे. आपण आपल्या जीवनात देवाच्या राज्याला पहिल्या स्थानी ठेवलं, तर यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही. टेहळणी बुरूज२२.०१ ७ ¶१६-१७
सोमवार, २४ जुलै
तुम्ही माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी न्याय करता.—२ इति. १९:६.
वडिलांवर असलेल्या आपल्या भरवशाची कशा प्रकारे परीक्षा होऊ शकते? अशी कल्पना करा, की मंडळीतून बहिष्कृत झालेली व्यक्ती आपला जवळचा नातेवाईक किंवा मित्र आहे. अशा वेळी आपल्याला कदाचित असं वाटू शकतं, की वडिलांनी सगळ्याच गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत. किंवा आपल्या मनात असाही प्रश्न येऊ शकतो, की वडिलांनी घेतलेला हा निर्णय खरंच योग्य आहे का? यहोवानेही असाच निर्णय घेतला असता का? पण आपल्या मनात अशा शंका आल्या तरीसुद्धा, वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की बहिष्कृत करणं ही खरंतर यहोवाने घालून दिलेली एक प्रेमळ व्यवस्था आहे. ही व्यवस्था मंडळीच्या आणि चूक करणाऱ्या व्यक्तीच्या भल्यासाठीच आहे. कारण पश्चाताप न करणाऱ्या व्यक्तीला जर मंडळीत राहू दिलं, तर त्याचा मंडळीतल्या इतरांवर वाईट परिणाम होऊ शकतो. (गलती. ५:९) तसंच, आपण किती मोठी चूक केली आहे, हेसुद्धा त्या व्यक्तीला कधीच कळणार नाही. आणि यहोवासोबत पुन्हा नातं जोडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायची गरज आहे, असंही त्याला वाटणार नाही. (उप. ८:११) एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत करायचं की नाही, हे ठरवताना वडील आपली जबाबदारी खूप गंभीरपणे घेतात याची आपण खातरी बाळगू शकतो. टेहळणी बुरूज२२.०२ ५-६ ¶१३-१४
मंगळवार, २५ जुलै
तो गवताची वाकलेली काडी तोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही.—मत्त. १२:२०.
बायबलमधून दिलेला सल्ला एखाद्याला पटत नाही, तेव्हा खासकरून वडिलांना त्यांच्याशी प्रेमाने आणि धीराने वागण्याची गरज आहे. एक व्यक्ती दिलेला सल्ला लगेच स्वीकारत नाही किंवा त्याप्रमाणे काम करत नाही असं दिसतं, तेव्हा वडिलांनी तिच्यावर रागवू नये किंवा चिडू नये. यासाठी वडिलांनी त्या व्यक्तीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला सल्ला का दिला जात आहे हे त्या व्यक्तीला समजण्यासाठी आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी यहोवाने तिला मदत करावी अशी प्रार्थना वडिलांनी केली पाहिजे. ज्या भावाला सल्ला देण्यात आला आहे, त्याला त्यावर विचार करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे वडील जर त्याच्याशी प्रेमाने आणि धीराने वागले, तर सल्ला कशा प्रकारे दिला जात आहे याकडे नाही, तर काय सल्ला दिला जात आहे याकडे लक्ष द्यायला त्याला मदत होईल. शिवाय, सल्ला हा नेहमी यहोवाच्या वचनावरच आधारित असला पाहिजे. आपला सल्ला फक्त चांगलाच नाही, तर ऐकणाऱ्याला ‘आनंद देणाराही’ असला पाहिजे.—नीति. २७:९. टेहळणी बुरूज२२.०२ १८ ¶१७; १९ ¶१९
बुधवार, २६ जुलै
अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं.—नीति. १३:१२.
काही वेळा असं होतं, की एखाद्या समस्येवर किंवा एखाद्या वाईट सवयीवर मात करायला मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करतो. आणि यहोवा आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर देईल असं आपल्याला वाटतं. पण तसं नेहमीच होत नाही. असं का होतं? मनापासून केलेल्या आपल्या प्रार्थनांवरून त्याला समजतं, की आपला त्याच्यावर किती भरवसा आहे! (इब्री ११:६) तसंच, आपण जेव्हा त्याला प्रार्थना करतो तेव्हा आपण त्या प्रार्थनेप्रमाणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे काम करतो का, हेसुद्धा तो पाहतो. (१ योहा. ३:२२) त्यामुळे एखादी वाईट सवय सोडण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागतो तेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि धीर धरला पाहिजे. येशूने जे म्हटलं होतं त्यावरूनसुद्धा हे दिसून येतं, की काही प्रार्थनांची आपल्याला लगेच उत्तरं मिळणार नाहीत. त्याने म्हटलं: “मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो मागतो त्याला दिलं जातं, जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं.”—मत्त. ७:७, ८. टेहळणी बुरूज२१.०८ ८ ¶१; १० ¶९-१०
गुरुवार, २७ जुलै
तुझ्या नियमशास्त्रावर माझं मनापासून प्रेम आहे! दिवसभर मी त्यावर मनन करतो.—स्तो. ११९:९७.
निर्माणकर्त्यावरचा तुमचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी बायबलचा अभ्यास केला पाहिजे. (यहो. १:८) तसंच, बायबलमधल्या भविष्यवाण्या कशा प्रकारे खऱ्या ठरल्या आणि त्यांबद्दल वेगवेगळ्या लेखकांनी दिलेली माहिती एकमेकांशी कशी जुळते याकडेही लक्ष द्या. त्यामुळे, एका प्रेमळ आणि बुद्धिमान देवाने आपल्याला निर्माण केलं आहे आणि त्यानेच आपल्या काही सेवकांना बायबल लिहायची प्रेरणा दिली यावरचा तुमचा विश्वास आणखी वाढेल. (२ तीम. ३:१४; २ पेत्र १:२१) बायबलचा अभ्यास करताना त्यात दिलेले सल्ले किती उपयोगी आहेत त्याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, बायबलमध्ये फार आधीच सांगितलं होतं, की पैशाचं प्रेम वाईट असतं आणि त्यामुळे पुष्कळ दुःख वाट्याला येतं. (१ तीम. ६:९, १०; नीति. २८:२०; मत्त. ६:२४) त्यामुळे बायबलमध्ये जो सल्ला दिला आहे, की आपण पैशांवर प्रेम करू नये तो किती योग्य आहे! बायबलमधल्या आणखी कोणत्या सल्ल्यामुळे तुम्हाला फायदा झाला आहे याचा विचार करा. बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांचा आपण जितका विचार करतो तितकं आपल्या लक्षात येईल, की आपला निर्माणकर्ता खूप प्रेमळ आहे आणि तो नेहमी आपल्या भल्याचा विचार करतो. म्हणूनच त्याच्या सल्ल्यांवर आपण भरवसा ठेवू शकतो. (याको. १:५) आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहतो.—यश. ४८:१७, १८. टेहळणी बुरूज२१.०८ १७-१८ ¶१२-१३
शुक्रवार, २८ जुलै
तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम विसरून जायला देव अन्यायी नाही.—इब्री ६:१०.
वयस्कर भाऊबहीण ही खातरी बाळगू शकतात की त्यांनी आयुष्यभर विश्वासूपणे केलेली सेवा यहोवा कधीच विसरणार नाही. तुम्ही आतापर्यंत आवेशाने प्रचाराचं काम करत राहिलात. तुमच्यावर अनेक सकंटं आली, दुःखद प्रसंगही आले; पण हे सगळं तुम्ही धीराने सहन केलं. तुम्ही बायबलच्या स्तरांनुसार वागलात, जबाबदाऱ्यांचं ओझं वाहिलं आणि इतरांना प्रशिक्षण दिलं. इतकंच नाही, तर वेगाने पुढे जाणाऱ्या यहोवाच्या संघटनेसोबत चालत राहण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न केला. शिवाय, पूर्ण-वेळची सेवा करणाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहनही दिलं. या सगळ्या गोष्टींतून तुम्ही यहोवाला विश्वासू असल्याचं दाखवलं आणि म्हणून तो तुमच्यावर जिवापाड प्रेम करतो. यहोवा वचन देतो, की “तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.” (स्तो. ३७:२८) आणि “तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हाला सांभाळून नेईन,” असं तो म्हणतो. (यश. ४६:४) म्हणून असा कधीच विचार करू नका, की ‘आपलं वय झालंय, त्यामुळे आता संघटनेत आपलं काहीच महत्त्व नाही.’ उलट, यहोवासाठी तुम्ही अजूनही खूप मौल्यवान आहात. टेहळणी बुरूज२१.०९ ३ ¶४
शनिवार, २९ जुलै
यहोवाने त्याचं भय मानणाऱ्यांवर दया केली आहे.—स्तो. १०३:१३.
यहोवा सगळ्यात बुद्धिमान असल्यामुळे दया दाखवतो. बायबल म्हणतं, की “वरून येणारी बुद्धी ही . . . दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण” असते. (याको. ३:१७) एका प्रेमळ पित्यासारखंच यहोवाला हे माहीत आहे, की आपल्या मुलांना, म्हणजे आपल्या सेवकांना दया दाखवली तर त्यांचं भलंच होईल. (यश. ४९:१५) आपण अपरिपूर्ण असलो, तरी देवाच्या दयेमुळेच आपल्याला एक सुंदर आशा मिळते. यहोवा अतिशय बुद्धिमान आहे. त्यामुळे दया कधी दाखवायची आणि कधी नाही हे त्याला चांगलं माहीत आहे. त्याला आपल्यामध्ये दया दाखवण्याचं एक छोटसं कारण जरी दिसलं, तरी तो लगेच दया दाखवतो. पण एखादी व्यक्ती जर मनापासून पश्चात्ताप करत नसेल, तर मात्र तो तिला दया दाखवत नाही. यातूनसुद्धा यहोवाची बुद्धी दिसून येते. यहोवा दयाळू जरी असला, तरी तो चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष करतो असं नाही. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा मंडळीतला एक भाऊ किंवा बहीण जाणूनबुजून पाप करत आहे. अशा वेळी मंडळीने काय करावं याबद्दल पौलने म्हटलं: “अशा माणसाची संगत सोडून द्या.” (१ करिंथ. ५:११) म्हणून पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत केलं जातं. मंडळीतल्या भाऊबहिणींचं संरक्षण करण्यासाठी आणि यहोवाच्या स्तरांना आदर दाखवण्यासाठी असं करणं खूप गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२१.१० ९-१० ¶७-८
रविवार, ३० जुलै
आनंदाने देणारा देवाला आवडतो.—२ करिंथ. ९:७.
राज्याच्या कामासाठी आपण दान देतो तेव्हा आपण यहोवाची उपासना करत असतो. इस्राएली लोकांना असं सांगण्यात आलं होतं, की त्यांनी यहोवासमोर जाताना कधीही रिकाम्या हाती जाऊ नये. (अनु. १६:१६) तर त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहोवासाठी काही भेट आणायची होती. असं करून यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केलं होतं त्याबद्दल ते कदर दाखवू शकत होते. मग, आज यहोवा आपल्यासाठी जे काही करत आहे त्याबद्दल आपण आपली कदर कशी दाखवू शकतो? आपल्या मंडळीला आणि जगभरातल्या कामाला जमेल तसा आर्थिक हातभार लावून आपण हे करू शकतो. याबद्दल प्रेषित पौलने म्हटलं होतं: “एखाद्याला दान देण्याची जर खरंच उत्सुकता असेल, तर त्याचं दान मान्य केलं जाईल. त्याच्याकडे जे नाही त्याची अपेक्षा केली जात नाही. तर त्याच्याकडे जे आहे, त्याप्रमाणे तो जे काही देईल ते मान्य केलं जाईल.” (२ करिंथ. ८:४, १२) आपण यहोवाला जे काही देतो मग ते अगदी थोडंसंच असलं तरीसुद्धा तो त्या दानाची कदर करतो.—मार्क १२:४२-४४. टेहळणी बुरूज२२.०३ २४ ¶१३
सोमवार, ३१ जुलै
निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.—१ थेस्सलनी. ५:१४.
भाऊबहिणींना तोंड द्याव्या लागणाऱ्या प्रत्येक समस्यांना वडील सोडवू शकत नाहीत. तरीसुद्धा आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी वडिलांना जे काही करता येईल ते त्यांनी करावं असं यहोवाला वाटतं. मग इतर गोष्टींमध्ये व्यस्त असतानाही वडील या गोष्टींसाठी कसा वेळ काढू शकतात? पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करा. आपल्या भाऊबहिणींची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पौल नेहमी तयार असायचा. आज वडीलसुद्धा प्रेषित पौलच्या या उदाहरणाचं अनुकरण करून मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रेम आणि आपुलकी दाखवू शकतात. (१ थेस्सलनी. २:७) मंडळीतल्या भाऊबहिणींवर आपलं आणि यहोवाचं किती प्रेम आहे या गोष्टीची जाणीव पौलने त्यांना करून दिली. (२ करिंथ. २:४; इफिस. २:४, ५) त्याने भाऊबहिणींना आपल्या मित्रासारखं समजलं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. तो त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलला. त्याने आपल्या चिंता आणि कमतरता त्यांना सांगितल्या. आणि असं करून त्याचा त्यांच्यावर किती भरवसा आहे, हे त्याने दाखवलं. (२ करिंथ. ७:५; १ तीम. १:१५) पण पौलने आपल्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या भाऊबहिणींना मदत करायचा प्रयत्न केला. टेहळणी बुरूज२२.०३ २८ ¶९-१०