ऑगस्ट
मंगळवार, १ ऑगस्ट
बापा, यांना क्षमा कर.—लूक २३:३४.
येशू कदाचित त्या रोमी सैनिकांबद्दल बोलत असावा ज्यांनी त्याच्या हातापायांना खिळे ठोकले होते. त्यांनी त्याच्यावर खूप अन्याय केला होता. पण तरीसुद्धा त्याने त्यांच्याबद्दल मनात राग बाळगला नाही. (१ पेत्र २:२३) आपणसुद्धा येशूसारखं इतरांना क्षमा करायला तयार असलं पाहिजे. (कलस्सै. ३:१३) आपले नातेवाईक किंवा इतर जण कदाचित आपला विरोध करतील. कारण आपण काय मानतो आणि आपण त्यांच्यासारखं जीवन का जगत नाही हे त्यांना समजत नसेल. त्यामुळे कदाचित ते आपल्याबद्दल खोटं बोलतील, इतरांसमोर आपला अपमान करतील, आपली प्रकाशनं फाडून टाकतील किंवा आपलं काही बरंवाईट करायची धमकीही देतील. पण अशा वेळी त्यांच्याबद्दल मनात राग बाळगण्याऐवजी आपण त्यांच्यासाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो. आणि त्याने त्यांना सत्य स्वीकारायला मदत करावी अशी त्याला विनंती करू शकतो. (मत्त. ५:४४, ४५) पण काही वेळा त्यांना माफ करणं आपल्याला कठीण वाटू शकतं; खासकरून त्यांनी आपल्याला फार वाईट वागणूक दिली असेल तर. पण आपण जर त्यांच्याबद्दल मनात राग धरला आणि त्यांना क्षमा केली नाही, तर आपल्यालाच त्रास होऊ शकतो. (स्तो. ३७:८) खरंच, आपण जेव्हा इतरांना मोठ्या मनाने क्षमा करतो, तेव्हा आपल्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींचा आपण स्वतःवर परिणाम होऊ देत नाही.—इफिस. ४:३१, ३२. टेहळणी बुरूज२१.०४ ८-९ ¶३-४
बुधवार, २ ऑगस्ट
त्यांनी कित्येकदा त्याचं मन दुखावलं!’—स्तो. ७८:४०.
तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं आहे का? असेल, तर अशा वेळी खरंच खूप दुःख होतं. यहोवाच्या स्वतःच्या कुटुंबातल्या काही स्वर्गदूतांनी जेव्हा त्याला सोडून दिलं तेव्हा त्याला किती दुःख झालं असेल याचा विचार करा! (यहू. ६) इतकंच नाही, तर ज्या इस्राएली लोकांवर यहोवाने जिवापाड प्रेम केलं ते वारंवार त्याच्या विरोधात गेले. तेव्हासुद्धा त्याला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना करा! (स्तो. ७८:४१) त्यामुळे तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं तेव्हा यहोवालाही खूप दुःख होतं. तसंच, तुम्हाला कसं वाटतं हे तो समजू शकतो. आणि त्यासाठी लागणारा धीर आणि दिलासा तो नक्की तुम्हाला देईल. जेव्हा कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी यहोवाला सोडून देते तेव्हा सहसा आईवडील स्वतःलाच दोष देतात. त्यांना वाटतं, की मुलांना सत्यात वाढवण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो. एक भाऊ म्हणतात: “मी स्वतःलाच दोष देत राहिलो. त्याबद्दल मला वाईट-वाईट स्वप्नं पडायची.” एका बहिणीलासुद्धा अशाच दुःखाचा सामना करावा लागला. ती म्हणते, “एक आई म्हणून मी कुठे चुकले ते मला कळत नाही. माझ्या मुलाला यहोवावर प्रेम करायला शिकवण्यात मीच कमी पडले असं मला वाटायचं.” टेहळणी बुरूज२१.०९ २६ ¶१-२, ४
गुरुवार, ३ ऑगस्ट
त्यांच्या लक्षात आलं, की खरंतर ते अशिक्षित आणि सर्वसाधारण आहेत.—प्रे. कार्यं ४:१३.
काहींना असं वाटतं, की यहोवाचे लोक बायबल शिकवू शकत नाहीत. कारण त्यांनी नामवंत धार्मिक प्रशालांमधून शिक्षण घेतलेलं नाही. पण त्यांनी खरं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिणाऱ्या लूकनेसुद्धा हेच केलं. त्याने ‘सगळ्या गोष्टींचा सुरुवातीपासून अचूकपणे शोध केला.’ कारण आपल्या वाचकांनी येशूबद्दल जे काही ऐकलं होतं, त्याची त्यांना “पूर्णपणे खातरी पटावी” असं त्याला वाटत होतं. (लूक १:१-४) बिरुयामध्ये राहणारे यहुदी लोकही लूकसारखेच होते. त्यांनी पहिल्यांदा येशूबद्दलचा संदेश ऐकला तेव्हा तो खरा आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी इब्री शास्त्रवचनांचं बारकाईने परीक्षण केलं. (प्रे. कार्यं १७:११) त्यांच्यासारखंच खरं काय आहे ते एका व्यक्तीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यहोवाचे लोक जे शिकवतात ते खरं आहे की नाही, हे पाहण्यासाठी तिनेसुद्धा शास्त्रवचनांचं बारकाईने परीक्षण केलं पाहिजे. त्यासोबतच, यहोवाच्या साक्षीदारांचा अलीकडचा इतिहासही तिने जाणून घेतला पाहिजे. तिने जर हे केलं, तर साक्षीदारांबद्दल सांगितल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींवर ती लगेच विश्वास ठेवणार नाही. टेहळणी बुरूज२१.०५ ३ ¶७-८
शुक्रवार, ४ ऑगस्ट
तुमची मनं मोठी करा.—२ करिंथ. ६:१३.
तुमच्या मंडळीत असं कुणी आहे का ज्यांना एकटेपणा जाणवतो? मग तुम्ही त्यांचा पाहुणचार कराल का? असे काही प्रसंग असतात जेव्हा भाऊबहिणींना आपली खूप गरज असते. जसं की, सत्यात नसलेले कुटुंबाचे सदस्य सणवार साजरे करतात तेव्हा आपल्या काही भाऊबहिणींना एकटं वाटू शकतं. तर काहींसाठी वर्षातले काही ठरावीक दिवस खूप कठीण जाऊ शकतात. जसं की, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो दिवस. अशा वेळी भाऊबहिणींसोबत आपण जर वेळ घालवला तर आपण दाखवून देऊ, की आपल्याला अगदी मनापासून त्यांची काळजी आहे. (फिलिप्पै. २:२०) आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या कारणांमुळे एकटेपणा जाणवू शकतो. पण आपल्याला कसं वाटतं हे यहोवाला कळतं. आणि सहसा आपल्या भाऊबहिणींद्वारे तो आपल्याला मदत करतो. (मत्त. १२:४८-५०) त्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यासाठी आपणही मंडळीतल्या भाऊबहिणींना मदत केली पाहिजे. आपण स्वतःला कधीच एकटं समजू नये. कारण यहोवा नेहमी आपल्यासोबत आहे. टेहळणी बुरूज२१.०६ १३ ¶१८-२०
शनिवार, ५ ऑगस्ट
जगातल्या लोकांमध्ये आपलं वागणं चांगलं ठेवा. हे यासाठी, की ते तुम्हाला वाईट म्हणून तुमच्यावर दोष लावत असले, तरी तुमची चांगली कामं स्वतः पाहिल्यामुळे, . . . ते देवाचा गौरव करतील.—१ पेत्र २:१२.
काही लोकांनी येशूचा संदेश ऐकला नाही. पण म्हणून तो निराश झाला नाही. तो प्रचार करत राहिला. कारण लोकांनी सत्य जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगायचं होतं. तसंच, सुरुवातीला काही जण आपला संदेश ऐकणार नाहीत, पण नंतर हेच लोक ऐकतील हेही त्याला माहीत होतं. त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करा. येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान त्याचा एकही भाऊ त्याचा शिष्य बनला नाही. (योहा. ७:५) पण त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या भावांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते ख्रिस्ती बनले. (प्रे. कार्यं १:१४) शेवटी कोण सत्य स्वीकारेल आणि यहोवाचा सेवक बनेल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण प्रचार करत राहिलं पाहिजे. काही जण आपला संदेश ऐकून लगेच सत्य शिकायला सुरुवात करतात; तर काही वेळ लावतात. आणि असेही काही लोक आहेत जे सुरुवातीला आपला संदेश ऐकत नाहीत, पण आपलं चांगलं वागणं पाहून ते सत्य शिकू लागतात आणि शेवटी ‘देवाचा गौरव करतात.’ टेहळणी बुरूज२१.०५ १८ ¶१७-१८
रविवार, ६ ऑगस्ट
जाताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.’—मत्त. १०:७.
येशूने आपल्या शिष्यांना राज्याच्या संदेशाचा प्रचार करायला सांगितलं आणि तो कसा करायचा हेसुद्धा दाखवलं. (लूक ८:१) त्याने त्यांना सांगितलं, की लोकांनी संदेश ऐकला तर काय करायचं आणि नाही ऐकला तर काय करायचं. (लूक ९:२-५) तसंच, प्रचाराचं हे काम किती मोठ्या प्रमाणात केलं जाईल हेसुद्धा त्याने सांगितलं. तो म्हणाला, “आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.” (मत्त. २४:१४; प्रे. कार्यं १:८) येशूने शिष्यांना फक्त प्रचार करायची आज्ञा दिली नाही, तर शिकवायचीही आज्ञा दिली होती. येशूने म्हटलं होतं, की हे महत्त्वाचं काम “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत,” म्हणजे आपल्या काळापर्यंत चालू राहील. (मत्त. २८:१८-२०) इतकंच नाही, तर त्याने प्रेषित योहानला दृष्टान्तात स्पष्टपणे सांगितलं, की त्याच्या सगळ्याच शिष्यांनी इतरांना यहोवाबद्दल शिकवलं पाहिजे.—प्रकटी. २२:१७. टेहळणी बुरूज२१.०७ २-३ ¶३-४
सोमवार, ७ ऑगस्ट
आपण अहंकारी किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्न करणारे किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे होऊ नये.—गलती. ५:२६.
आज जगात अनेक लोक सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. आपल्या या अशा वागण्यामुळे इतरांवर काय परिणाम होईल याचा ते जराही विचार करत नाहीत. याची काही उदाहरणं आपण पाहू या. काही बिझनेसमेन इतर बिझनेसमेनपेक्षा जास्त फायदा मिळवण्यासाठी वाटेल ते करतात. त्यामुळे इतरांचं कितीही नुकसान झालं तरीही त्यांना काही पर्वा नसते. स्पर्धा जिंकण्यासाठी काही खेळाडू इतर टीमच्या खेळाडूंना मुद्दाम इजा पोहचवतात. मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी काही विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात. पण अशा गोष्टी करणं किती चुकीचं आहे हे आपल्याला माहीत आहे. ही “शरीराची कामं” आहेत असं बायबल म्हणतं. (गलती. ५:१९-२१) अशी स्पर्धेची भावना नकळत मंडळीतल्या भाऊबहिणींमध्ये येऊ शकते का? या प्रश्नावर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धेच्या भावनेमुळे मंडळीतली एकता धोक्यात येऊ शकते. याबाबतीत आपण जर बायबल काळातल्या काही विश्वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांवर विचार केला तर ते चांगलं राहील; कारण ते या भावनेच्या आहारी गेले नाहीत. टेहळणी बुरूज२१.०७ १४ ¶१-२
मंगळवार, ८ ऑगस्ट
जो गरिबाला दया दाखवतो, तो सुखी आहे; संकटाच्या दिवशी यहोवा त्याला सोडवेल.—स्तो. ४१:१.
एकनिष्ठ प्रेम दुःखात असलेल्यांना मदत करायची प्रेरणा देतं. आपणही जेव्हा दुःखी, निराश भाऊबहिणींना पाहतो तेव्हा आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे. कारण आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि त्यांना मदत करायची आपली मनापासून इच्छा आहे. (नीति. १२:२५, तळटीप; २४:१०) प्रेषित पौलनेही हाच सल्ला आपल्याला दिला. तो म्हणाला: “निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनी. ५:१४) असं दिसून आलं आहे, की दुःखात असलेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला मदत करायचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यांचं धीराने ऐकणं आणि आपलं त्यांच्यावर प्रेम आहे याची त्यांना जाणीव करून देणं. दुःखात असलेल्या यहोवाच्या अशा प्रिय मेंढराकडे आपण लक्ष देतो तेव्हा यहोवा ते कधीच विसरत नाही. नीतिवचनं १९:१७ मध्ये म्हटलं आहे: “जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो; त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.” टेहळणी बुरूज२१.११ १० ¶११-१२
बुधवार, ९ ऑगस्ट
यहोवा किती चांगला आहे, याची पारख करून पाहा; त्याचा आश्रय घेणारा सुखी असतो!—स्तो. ३४:८.
येणाऱ्या दिवसांसाठी आपण आत्तापासूनच कसं तयार राहू शकतो? सध्या आपण आहे त्यात समाधानी असलं पाहिजे. आणि यहोवासोबत आपलं जवळचं नातं आहे, या गोष्टीचा आपल्याला सगळ्यात जास्त आनंद असला पाहिजे. म्हणून आपण जितकं जास्त यहोवाला जाणून घेऊ, तितकी जास्त आपल्याला याची खातरी पटेल, की भविष्यात मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करेल तेव्हा यहोवा नक्की आपलं संरक्षण करेल. यहोवा आपल्याला मदत करेल याची दावीदला इतकी खातरी का होती, हे आजच्या वचनातल्या शब्दांवरून समजतं. तो नेहमी यहोवावर विसंबून राहिला आणि यहोवानेही त्याला कधीच निराश केलं नाही. दावीद तरुण होता तेव्हा भयंकर दिसणाऱ्या, गल्याथ नावाच्या धिप्पाड पलिष्टी योद्ध्याला तो काय म्हणाला ते पाहा. तो म्हणाला: “आजच यहोवा तुला माझ्या हाती देईल.” (१ शमु. १७:४६) पुढे जेव्हा दावीद शौल राजाच्या सेवेत होता, तेव्हा शौलने त्याला कित्येक वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण यहोवा नेहमी त्याच्यासोबत होता. (१ शमु. १८:१२) अशा प्रकारे, दावीदने बऱ्याच वेळा यहोवाची मदत अनुभवली होती. त्यामुळे तो आत्ताही आपल्याला मदत करेल याची दावीदला पूर्ण खातरी होती. टेहळणी बुरूज२२.०१ ६ ¶१४-१५
गुरुवार, १० ऑगस्ट
देवाची सर्व मुलं जल्लोष करू लागली.—ईयो. ३८:७.
यहोवा जे काही करतो ते धीराने करतो. म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ तो घेतो. कारण त्यामुळे त्याच्या नावाचा गौरव होतो आणि इतरांनाही फायदा होतो. जसं की, मानवांसाठी त्याने पृथ्वी टप्प्याटप्प्याने कशी बनवली त्याचा विचार करा. बायबल याबद्दल म्हणतं, की यहोवाने “तिची लांबी-रुंदी” ठरवली, “तिचे खांब” बसवले आणि “तिच्या मुख्य दगडाची स्थापना” केली. (ईयो. ३८:५, ६) शिवाय, आपण जे काही बनवलं ते पाहण्यासाठी त्याने वेळ दिला. (उत्प. १:१०, १२) यहोवा जेव्हा एकएक नवीन गोष्ट बनवत होता तेव्हा स्वर्गदूतांना नक्कीच खूप आनंद झाला असेल. कारण बायबल म्हणतं, ते “जल्लोष” करू लागले. या सगळ्यांतून आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं? हेच की यहोवाने पृथ्वी, तारे आणि प्राणी बनवायला हजारो वर्षं घेतली. त्यानंतर, विचार करून बनवलेली प्रत्येक गोष्ट पाहिल्यावर तो म्हणाला: “सर्वकाही खूप चांगलं आहे.”—उत्प. १:३१. टेहळणी बुरूज२१.०८ ९ ¶६-७
शुक्रवार, ११ ऑगस्ट
शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा!—मत्त. २५:२३.
येशूच्या उदाहरणातला माणूस परदेशी जाण्याआधी आपल्या दासांना बोलवतो आणि व्यापार करण्यासाठी प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे तालान्त देतो. तो एकाला पाच, दुसऱ्याला दोन आणि तिसऱ्याला एक तालान्त देतो. पहिले दोन दास त्यावर आणखी पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण तिसरा दास त्या पैशाचं काहीच करत नाही. म्हणून मालक त्याला कामावरून काढून टाकतो. पहिल्या आणि दुसऱ्या दासासाठी मालकाने दिलेली जबाबदारी खूप महत्त्वाची होती. म्हणून ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. याचा परिणाम असा झाला की त्यांनी मालकाला दुप्पट तालान्त मिळवून दिले. हे पाहून त्यांच्या मालकाला खूप आनंद झाला. त्याने त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना आणखी जबाबदाऱ्या सोपवल्या. टेहळणी बुरूज२१.०८ २१ ¶७; २२ ¶९-१०
शनिवार, १२ ऑगस्ट
मी पुन्हा एकदा आकाश व पृथ्वी . . . हालवीन.—हाग्ग. २:६.
या शेवटच्या दिवसांत यहोवाने खूप सहनशीलता दाखवली आहे. कारण कोणाचाही नाश व्हावा असं त्याला वाटत नाही. (२ पेत्र ३:९) म्हणूनच त्याने सगळ्यांना पश्चात्ताप करायची संधी दिली आहे. पण यहोवा आणखी जास्त काळ सहन करणार नाही. जे लोक त्याने दिलेल्या संधीचा फायदा करून घेत नाहीत त्यांची स्थिती मोशेच्या काळातल्या फारोसारखी होईल. यहोवा फारोला म्हणाला, “आतापर्यंत मी माझा हात उगारून तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर भयानक पीडा आणली असती आणि या पृथ्वीवरून तुझा पूर्णपणे नाश केला असता. पण, तुला माझी ताकद दाखवण्यासाठी आणि माझं नाव संपूर्ण पृथ्वीवर जाहीर करण्यासाठी, मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.” (निर्ग. ९:१५, १६) शेवटी सर्व राष्ट्रांना हे मान्य करावंच लागेल, की यहोवा हाच खरा देव आहे. (यहे. ३८:२३) आजच्या वचनात हालवण्याबद्दल जे म्हटलं आहे ते कायमच्या नाशाला सूचित करतं. याचा अर्थ, जे फारोसारखे वागतात त्यांचा, म्हणजे जे यहोवाचा अधिकार स्वीकारत नाहीत त्यांचा कायमचा नाश केला जाईल. टेहळणी बुरूज२१.०९ १८-१९ ¶१७-१८
रविवार, १३ ऑगस्ट
आनंद साजरा करणाऱ्यांसोबत आनंद साजरा करा; रडणाऱ्यांसोबत रडा.—रोम. १२:१५.
एखाद्या जवळच्या व्यक्तीला बहिष्कृत केलं, म्हणून तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे का? पण जर मंडळीतले काही भाऊबहीण असं काही बोलून गेले ज्यामुळे तुम्हाला आणखीनच वाईट वाटलं तर काय? कधीकधी मंडळीतले काही जण मनाला लागेल असं काही तरी बोलून जातील. (याको. ३:२) कारण कदाचित अशा वेळी काय बोलायचं हे काही भाऊबहिणींना समजत नसेल. किंवा मग, ते नकळत असं काहीतरी बोलून जातील ज्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं. पण आपल्याला माहीत आहे, की आपण सगळेच चुका करतो. म्हणून प्रेषित पौलने दिलेला सल्ला आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याने म्हटलं: “काही तक्रार असली, तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१३) बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांना आधार देत राहा. अशा वेळी खासकरून त्यांना तुमच्या प्रेमाची आणि धीराची खूप गरज असते. (इब्री १०:२४, २५) कारण काहींना असं जाणवलं आहे, की कधीकधी मंडळीतले काही जण त्यांच्याशी बोलायचंच सोडून देतात, जणू काय त्यांनासुद्धा बहिष्कृत करण्यात आलं आहे. पण आपण असं कधीच करू नये. ज्यांचे आईवडील यहोवाला सोडून गेले आहेत, त्या मुलांना खासकरून प्रोत्साहनाची आणि धीराची खूप गरज असते. टेहळणी बुरूज२१.०९ २९ ¶१३-१४; ३० ¶१६
सोमवार, १४ ऑगस्ट
बुद्धिमान माणूस ऐकतो आणि आणखी शिकतो.—नीति. १:५.
आपण वयस्कर भाऊबहिणींशी बोलतो तेव्हा आपल्यालाही फायदा होतो आणि त्यांनाही फायदा होतो. (रोम. १:१२) वयस्कर भाऊबहिणींचे अनुभव ऐकल्यावर यहोवा आपल्या विश्वासू सेवकांची किती काळजी घेतो हे आपल्याला जाणवेल. शिवाय, वयस्कर भाऊबहिणींशी बोलण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्यांनाही खूप प्रेम आणि आपलेपणा जाणवतो. मग, यहोवाने त्यांना किती आशीर्वाद दिले याबद्दल ते आनंदाने तुम्हाला सांगतील. माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याचं सौंदर्य कमी होत जातं. पण जे विश्वासूपणे सेवा करत राहतात, त्यांचं सौंदर्य यहोवाच्या नजरेत दिवसेंदिवस वाढत जातं. (१ थेस्सलनी. १:२, ३) असं आपण का म्हणू शकतो? कारण पवित्र शक्तीच्या मदतीने त्यांनी स्वतःमध्ये अनेक सुंदर गुण वाढवलेले असतात. त्यामुळे या भाऊबहिणींना आपण जितकं जास्त जाणून घेऊ, त्यांचा आदर करू आणि त्यांच्याकडून शिकून घेऊ तितकेच जास्त ते आपल्यासाठी मौल्यवान ठरतील. मंडळीला मजबूत बनवायचं असेल, तर वयाने जे लहान आहेत त्यांनीच वयस्कर भाऊबहिणींची कदर केली पाहिजे, त्यांना मौल्यवान समजलं पाहिजे असं नाही. तर वयस्कर भाऊबहिणींनीसुद्धा त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांची कदर केली पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०९ ७ ¶१५-१८
मंगळवार, १५ ऑगस्ट
तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढायचं सोडून द्या. कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचा न्याय करता, त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल.—मत्त. ७:१, २.
आपण कधीही इतरांशी कठोरपणे वागू नये. तर यहोवासारखं सगळ्यांसोबत नेहमी दयाळूपणे वागलं पाहिजे. (इफिस. २:४) दया ही फक्त एक भावना नाही. तर ‘कृतीतून दाखवला जाणारा’ तो एक गुण आहे. तेव्हा आपल्या कुटुंबात, मंडळीत किंवा आजबाजूच्या लोकांमध्ये कोणाला मदतीची गरज आहे का ते पाहा, आणि त्यांना मदत करा. जसं की, कोणी जर त्रासात किंवा दुःखात असेल, तर तुम्ही त्यांना सांत्वन देऊ शकता. काहींना तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन किंवा इतर मार्गांनी मदत करू शकता. किंवा मग, मंडळीत परत घेण्यात आलेल्या व्यक्तीसोबत वेळ घालवून त्याला दिलासा देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतरांना सांत्वन देणारा आनंदाचा संदेश सांगू शकतो. (ईयो. २९:१२, १३; रोम. १०:१४, १५; याको. १:२७) अशा प्रकारे कोणाला मदतीची गरज आहे याकडे आपण जर लक्ष दिलं, तर आपण वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना दया दाखवू शकतो. आपण जेव्हा इतरांना दया दाखवतो, तेव्हा अपार दया करणाऱ्या आपल्या पित्याला, यहोवाला खरंच किती आनंद होत असेल! टेहळणी बुरूज२१.१० १३ ¶२०-२२
बुधवार, १६ ऑगस्ट
यहोवा माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीच कमी नाही.—स्तो. २३:१.
स्तोत्र २३ मध्ये दावीद काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करतो. जसं की, यहोवाला मेंढपाळ मानल्यामुळे मिळणारे भरपूर आशीर्वाद. यहोवा त्याला “नीतीच्या मार्गांवर चालवतो.” आणि चांगल्या-वाईट अशा सगळ्या काळात तो कायम त्याच्यासोबत असतो. दावीद हे मान्य करतो, की यहोवाच्या “हिरव्यागार कुरणात” चालत असताना जीवन सोपं नसेल. आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. काही वेळा आपल्याला निराशेचाही सामना करावा लागेल. अशा वेळी आपण जणू ‘काळोख्या दरीतून चालत आहोत’ असं आपल्याला वाटेल. याशिवाय आपल्याला शत्रूंचाही सामना करावा लागेल. पण दावीद म्हणतो, की यहोवा माझा मेंढपाळ असल्यामुळे ‘मला कशाचीही भीती वाटणार नाही.’ कोणत्या बाबतीत दावीदला ‘काहीच कमी पडलं नाही?’ त्याला आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत काहीच कमी पडलं नाही. आनंदी राहण्यासाठी त्याला भौतिक गोष्टींची गरज नव्हती. यहोवाने त्याला जे काही पुरवलं होतं, त्यात तो समाधानी होता. त्याच्यासाठी देवाचा आशीर्वाद आणि त्याच्याकडून मिळणारं संरक्षण सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. दावीदच्या या शब्दांवरून भौतिक गोष्टींबद्दल योग्य दृष्टिकोन असणं किती महत्त्वाचं आहे, ते आपल्याला समजतं. टेहळणी बुरूज२२.०१ ३-४ ¶५-७
गुरुवार, १७ ऑगस्ट
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.—१ करिंथ. ३:८.
प्राचीन काळापासून यहोवाच्या कित्येक सेवकांनी प्रचारकार्य केलं. पण लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. नोहाचंच उदाहरण घ्या. तो “नीतिमत्त्वाचा प्रचारक होता.” आणि त्याने अनेक वर्षं प्रचारकार्य केलं. (२ पेत्र २:५) लोक आपलं ऐकतील आणि आपल्याला प्रतिसाद देतील असं नोहाला नक्कीच वाटलं असेल. पण यहोवाने त्याला तसं काहीच सांगितलं नव्हतं. उलट, देवाने त्याला जहाज बांधताना फक्त एवढंच सांगितलं होतं, की “तू जहाजात जा आणि आपल्यासोबत आपली मुलं, बायको आणि आपल्या सुनांनाही घेऊन जा.” (उत्प. ६:१८) आणि ज्या आकाराचं जहाज यहोवाने त्याला बांधायला सांगितलं होतं, त्यावरून नोहाला हे कळलंच असेल की लोकांनी जरी आपल्याला प्रतिसाद दिला तरी तो खूप कमी असेल. (उत्प. ६:१५) आणि आपल्याला माहीतच आहे, त्या दुष्ट जगातल्या एकाही व्यक्तीने नोहाचं ऐकलं नाही. (उत्प. ७:७) मग यहोवाने असा विचार केला का, की नोहाने चांगल्या प्रकारे प्रचार केला नव्हता? नाही! उलट यहोवा त्याच्यावर खूश होता, कारण यहोवाने जे काम त्याला सांगितलं ते त्याने प्रामाणिकपणे पूर्ण केलं होतं.—उत्प. ६:२२. टेहळणी बुरूज२१.१० २६ ¶१०-११
शुक्रवार, १८ ऑगस्ट
मी गेले तेव्हा माझ्याकडे सगळं काही होतं, पण यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय.—रूथ १:२१.
विचार करा, नामीचे हे शब्द ऐकल्यावर रूथला कसं वाटलं असेल! कारण नामीला मदत करण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नव्हती. ती तिच्यासोबत रडली होती, तिने तिला दिलासा दिला होता आणि कितीतरी दिवस प्रवास करून ती इथपर्यंत तिच्यासोबत आली होती. आणि इतकं सगळं करूनसुद्धा नामी आता म्हणते, की “यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय.” बाजूलाच उभ्या असलेल्या रूथने तिच्यासाठी जे काही केलं होतं त्याचा तिने एका शब्दानेसुद्धा उल्लेख केला नाही. विचार करा, या गोष्टीचं रूथला किती वाईट वाटलं असेल! पण तरीसुद्धा तिने नामीची साथ सोडली नाही. (रूथ १:३-१८) रूथसोबत झालं तसं आपल्यासोबतही होऊ शकतं. दुःखात असलेल्या एखाद्या बहिणीला आपण खूप मदत केली असेल, पण ती असं काहीतरी बोलून जाईल ज्यामुळे आपल्याला कदाचित खूप वाईट वाटेल. पण आपण ते जास्त मनाला लावून घेऊ नये. उलट, तिला मदतीची गरज आहे हे ओळखून तिला साथ देत राहिलं पाहिजे, आणि तिला सांत्वन देता यावं म्हणून यहोवाकडे मदत मागीतली पाहिजे. (नीति. १७:१७) मदतीची गरज असलेली एखादी बहीण सुरुवातीला कदाचित लगेच आपली मदत स्वीकारणार नाही. पण तिच्याबद्दल आपल्याला एकनिष्ठ प्रेम असेल, तर आपण प्रयत्न करायचं सोडून देणार नाही.—गलती. ६:२. टेहळणी बुरूज२१.११ ११ ¶१७-१९
शनिवार, १९ ऑगस्ट
आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.—१ पेत्र १:१५.
बायबलमध्ये “पवित्र” आणि “पवित्रता” या शब्दांचा अर्थ, नैतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून शुद्ध असणं असा आहे. तसंच, यहोवाच्या सेवेसाठी वेगळं करणं असाही त्या शब्दांचा अर्थ होतो. दुसऱ्या शब्दांत, आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, तर आपलं वागणं-बोलणं नेहमी शुद्ध असलं पाहिजे, यहोवाला आवडेल अशा पद्धतीने आपण त्याची उपासना केली पाहिजे आणि त्याच्यासोबत आपलं एक जवळचं नातं असलं पाहिजे. आपल्यासारखी अपवित्र माणसं एका पवित्र देवासोबत जवळचं नातं जोडू शकतात ही कल्पनाच किती भारावून टाकणारी आहे! यहोवा सर्व बाबतींत शुद्ध आणि पवित्र आहे. हे आपल्याला सराफदूतांनी केलेल्या त्याच्या वर्णनातून दिसून येतं. हे स्वर्गदूत यहोवाच्या राजासनाच्या अगदी जवळ असतात. त्यांच्यापैकी काही जण घोषणा करतात: “सैन्यांचा देव यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!” (यश. ६:३) अर्थात, आपल्या पवित्र देवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी स्वर्गदूतांनी पवित्र असणं गरजेचं आहे आणि ते तसेच आहेत. टेहळणी बुरूज२१.१२ ३ ¶४-५
रविवार, २० ऑगस्ट
तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला. वेळेचा चांगला उपयोग करा.—इफिस. ५:१५, १६.
आयुष्यात पुढे काय करायचं असा प्रश्न तरुणांना नेहमी पडतो. एकीकडे शाळा-कॉलेजमधले शिक्षक आणि सत्यात नसलेले नातेवाईक त्यांना कदाचित चांगलं करिअर करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याचं प्रोत्साहन देतील. पण यासाठी सहसा भरपूर वेळ द्यावा लागतो. दुसरीकडे, आईवडील आणि मंडळीतले भाऊबहीण त्यांना यहोवाच्या सेवेला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायला सांगतील. मग अशा वेळी यहोवावर प्रेम करणाऱ्या तरुण व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकते? इफिसकर ५:१५-१७ ही वचनं वाचल्यामुळे आणि त्यांवर मनन केल्यामुळे तिला योग्य निर्णय घ्यायला मदत होऊ शकते. ही वचनं वाचल्यावर ती स्वतःला असं विचारू शकते: ‘मी काय करावं अशी “यहोवाची इच्छा” आहे? मी कोणता निर्णय घेतला तर यहोवाला आनंद होईल? कोणता निर्णय घेतल्यामुळे मला माझ्या वेळेचा सगळ्यात चांगला वापर करता येईल?’ हे कधीही विसरू नका, की सध्याचे “दिवस वाईट आहेत” आणि सैतानाच्या या जगाचा लवकरच नाश होणार आहे. टेहळणी बुरूज२२.०१ २७ ¶५
सोमवार, २१ ऑगस्ट
खरंतर त्याचे भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.—योहा. ७:५.
याकोब येशूचा शिष्य केव्हा बनला? पुनरुत्थान झाल्यानंतर येशू “याकोबला आणि मग सगळ्या प्रेषितांना दिसला.” (१ करिंथ. १५:७) त्या भेटीनंतर याकोबच्या जीवनाला एक नवीन वळण मिळालं आणि तो येशूचा शिष्य बनला. यरुशलेममध्ये माडीवरच्या खोलीत येशूचे शिष्य पवित्र शक्ती मिळण्याची वाट पाहत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये याकोबसुद्धा होता. (प्रे. कार्यं १:१३, १४) पुढे त्याला पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाचा सदस्य म्हणून सेवा करायची संधीसुद्धा मिळाली. (प्रे. कार्यं १५:६, १३-२२; गलती. २:९) आणि इ.स. ६२ च्या काही काळाआधी देवाने त्याला अभिषिक्त ख्रिश्चनांना पत्र लिहिण्याची प्रेरणा दिली. त्या पत्राचा आज आपल्या सगळ्यांनाच फायदा होतो, मग आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची. (याको. १:१) पहिल्या शतकातला यहुदी इतिहासकार योसिफस याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य याजक हन्नाचा मुलगा हनन्या (महायाजक) याच्या आदेशावरून याकोबला ठार मारण्यात आलं. पण पृथ्वीवरचं जीवन संपेपर्यंत याकोब यहोवाला विश्वासू राहिला. टेहळणी बुरूज२२.०१ ८ ¶३; ९ ¶५
मंगळवार, २२ ऑगस्ट
माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?—मत्त. २७:४६.
आजच्या वचनातून आपण एक गोष्ट ही शिकतो, की ज्या समस्यांमुळे आपल्या विश्वासाची परीक्षा होते, त्यांपासून यहोवाने आपलं संरक्षण करावं अशी अपेक्षा आपण करू नये. उलट, येशूप्रमाणे आपल्या विश्वासाची पूर्णपणे परीक्षा होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. आपल्याला कदाचित मृत्यूचाही सामना करावा लागेल. (मत्त. १६:२४, २५) पण आपण सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा यहोवा आपल्यावर येऊ देणार नाही हा भरवसा आपण ठेवू शकतो. (१ करिंथ. १०:१३) दुसरी गोष्ट आपण ही शिकतो, की येशूसारखाच आपल्यावरही अन्याय होऊ शकतो. (१ पेत्र २:१९, २०) आपण काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून लोक आपला विरोध करत नाहीत, तर आपण या जगाचे भाग नाही आणि आपण इतरांना सत्याबद्दल सांगतो म्हणून ते आपला विरोध करतात. (योहा. १७:१४; १ पेत्र ४:१५, १६) यहोवाने आपल्याला दुःख का सोसू दिलं याचं कारण येशूला समजलं होतं. पण परीक्षांचा सामना करणाऱ्या यहोवाच्या काही विश्वासू सेवकांना कधीकधी असा प्रश्न पडू शकतो, की यहोवाने ही संकटं आपल्यावर का येऊ दिली? (हब. १:३) पण म्हणून त्यांच्याबद्दल यहोवा कधीच असा विचार करत नाही, की त्यांच्यात विश्वासाची कमी आहे. त्यांना फक्त सांत्वनाची गरज आहे, हे त्याला माहीत आहे. आणि म्हणून तो त्यांच्याशी खूप दयाळूपणे आणि धीराने वागतो.—२ करिंथ. १:३, ४. टेहळणी बुरूज२१.०४ ११ ¶९-१०
बुधवार, २३ ऑगस्ट
माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या धूपाप्रमाणे असो.—स्तो. १४१:२.
जर आपण आपल्या जीवनात यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा प्रयत्न केला आणि जर आपल्या मनात यहोवाबद्दल प्रेम आणि आदर असेल, तर तो नक्कीच आपली उपासना स्वीकारेल. आपल्याला माहीत आहे की यहोवाच आपल्या उपासनेसाठी योग्य आहे. आणि आपल्याकडून होईल तितक्या चांगल्या प्रकारे आपण त्याची उपासना करावी अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. यहोवाची उपासना करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं. बायबलमध्ये आपल्या प्रार्थनांची तुलना उपासना मंडपात आणि नंतर मंदिरामध्ये जाळल्या जाणाऱ्या धूपाशी करण्यात आली आहे. हा धूप खूप काळजीपूर्वकपणे तयार केला जायचा. या धूपाच्या सुगंधामुळे यहोवाला आनंद व्हायचा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण यहोवाला मनापासून प्रार्थना करतो, मग ती साध्या शब्दात जरी असली, तरी “त्याला आनंद होतो.” (नीति. १५:८; अनु. ३३:१०) आपण प्रार्थनेत यहोवाबद्दल असलेलं आपलं प्रेम आणि आपली कदर व्यक्त करतो, तेव्हा त्याला नक्कीच आनंद होत असेल. आपण आपल्या चिंता आपल्या आशा-आकांक्षा त्याला सांगाव्यात अशी त्याची इच्छा आहे. म्हणून प्रार्थना करण्याआधी आपण काय बोलणार आहोत, याबद्दल थोडं थांबून तुम्ही विचार करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला आपल्या स्वर्गीय पित्यासाठी सगळ्यात चांगल्या प्रकारचा ‘धूप’ अर्पण करता येईल. टेहळणी बुरूज२२.०३ २० ¶२; २१ ¶७
गुरुवार, २४ ऑगस्ट
सध्या तुम्हाला संकटं सोसावी लागत असली, तरी जेव्हा प्रभू येशू स्वर्गातून आपल्या शक्तिशाली स्वर्गदूतांसोबत अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल, तेव्हा आमच्यासोबत तुम्हालाही सुटका मिळेल.—२ थेस्सलनी. १:७.
हर्मगिदोनच्या वेळी एखाद्याचा जीव वाचेल की नाही हे आपल्या हातात नाही, तर यहोवाच्या हातात आहे. (मत्त. २५:३४, ४१, ४६) पण त्या वेळी यहोवा जो काही निर्णय घेईल त्यावर आपण भरवसा ठेवू का, की आपण निराश होऊन यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ? म्हणून आत्ताच आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग पुढेही आपण तेच करू. देवाच्या नवीन जगात आपण किती आनंदी असू याची कल्पना करा. त्या वेळी खोट्या धर्माचं नावसुद्धा नसेल. आजपर्यंत लोकांवर जुलूम आणि अत्याचार करणारी लोभी व्यापारी आणि राजकीय व्यवस्था नाहीशी झालेली असेल. आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू नसेल. सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना हजार वर्षांसाठी कैद केलं जाईल. त्यांनी देवाविरुद्ध बंड केल्यामुळे निर्माण झालेले वाईट परिणाम नाहीसे झालेले असतील. (प्रकटी. २०:२, ३) खरंच, यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा आपण ठेवला याचा आपल्याला किती आनंद होईल! टेहळणी बुरूज२२.०२ ६-७ ¶१६-१७
शुक्रवार, २५ ऑगस्ट
जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात ते सुखी आहेत.—मत्त. ५:९.
येशूने शांती टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याने लोकांनाही आपसातले वाद मिटवण्याचं प्रोत्साहन दिलं. त्याने लोकांना शिकवलं, की यहोवाने त्यांची उपासना स्वीकारावी असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी आपल्या भावाशी समेट केला पाहिजे. (मत्त. ५:२३, २४) तसंच, आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून त्याच्या प्रेषितांमध्ये नेहमी वाद व्हायचे. पण येशूने त्यांना योग्यपणे विचार करायला बऱ्याच वेळा मदत केली. (लूक ९:४६-४८; २२:२४-२७) जर आपल्यालाही येशूप्रमाणे शांती टिकवून ठेवायची असेल, तर आपल्यामुळे वाद निर्माण होणार नाही फक्त इतकाच प्रयत्न करणं पुरेसं नाही. तर मतभेद होतात तेव्हा समेट करण्यासाठी पुढाकार घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तसंच, आपण आपल्या भाऊबहिणींनाही आपसातले वाद मिटवायचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. (फिलिप्पै. ४:२, ३; याको. ३:१७, १८) आपण स्वतःला हे प्रश्न विचारू शकतो: ‘इतरांशी समेट करणं मला खरंच महत्त्वाचं वाटतं का? त्यासाठी मी कुठपर्यंत प्रयत्न करायला तयार आहे? जेव्हा एखादा भाऊ किंवा बहीण माझं मन दुखावते, तेव्हा मी मनात त्यांच्याबद्दल राग बाळगतो का? समेट करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मी करतो का? की, मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याकडे जातो. आणि त्या व्यक्तीची चूक होती असं वाटत असलं, तरी मी हे करायला तयार असतो का?’ टेहळणी बुरूज२२.०३ १० ¶१०-११
शनिवार, २६ ऑगस्ट
घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.—प्रे. कार्यं २०:३५.
बायबलमध्ये खूप आधीच ही भविष्यवाणी केली होती, की यहोवाचे लोक त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या मुलाच्या नेतृत्वाखाली “स्वेच्छेने पुढे येतील.” (स्तो. ११०:३) आज ती भविष्यवाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. दरवर्षी यहोवाचे आवेशी सेवक लाखो-करोडो तास प्रचारकार्यात खर्च करतात. आणि हे काम ते स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या खर्चाने करतात. तसंच, ते आपल्या भाऊबहिणींना शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रितीने मदत करण्यासाठीही भरपूर वेळ देतात. याशिवाय, सभांचे भाग तयार करण्यासाठी आणि भाऊबहिणींना मेंढपाळ भेट देण्यासाठी जबाबदार बांधव कितीतरी तास खर्च करत असतात. पण हे सगळं ते का करतात? कारण यहोवावर आणि लोकांवर त्यांचं मनापासून प्रेम आहे. (मत्त. २२:३७-३९) स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करण्याच्या बाबतीत येशूने खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर मांडलं. त्याच्या या उदाहरणाचा अनुकरण करायचा आपण होता होईल तितका प्रयत्न करतो. (रोम. १५:१-३) आणि त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. टेहळणी बुरूज२२.०२ २० ¶१-२
रविवार, २७ ऑगस्ट
तू मजुराची मजुरी रात्रभर, दुसरा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.—लेवी. १९:१३.
प्राचीन इस्राएल राष्ट्रात बहुतेक लोक शेती करायचे. आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांना दिवसाच्या शेवटी त्यांची मजुरी दिली जायची. आणि जर त्याला त्याची मजुरी दिली नाही, तर त्याचं कुटुंब त्या दिवशी उपाशी राहायचं. म्हणून यहोवाने असं स्पष्ट केलं होतं, की ‘मजूर गरीब आहे आणि त्याच्या मजुरीवरच त्याचं जीवन चालतं.’ (अनु. २४:१४, १५; मत्त. २०:८) तसंच, आज सहसा नोकरी करणाऱ्या लोकांना दररोज नाही तर महिन्याच्या शेवटी पगार मिळतो. पण तरी लेवीय १९:१३ मधलं तत्त्व आजही तितकंच लागू होतं. आज काही जण त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षाही खूप कमी पगार देतात. कारण त्यांना माहीत असतं, की या लोकांना आहे त्या पगारात काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे एका अर्थाने ते मजुराची मजुरी आपल्याकडे अडवून ठेवत असतात. त्यामुळे ज्या ख्रिस्ती व्यक्तीचा व्यवसाय आहे आणि ज्याच्याकडे लोक नोकरी करतात, त्याने या गोष्टीकडे खासकरून लक्ष दिलं पाहिजे. त्याने आपल्याकडे नोकरी करणाऱ्या लोकांना योग्य तो पगार दिला पाहिजे. टेहळणी बुरूज२१.१२ १० ¶९-१०
सोमवार, २८ ऑगस्ट
मला तहान लागली आहे.—योहान १९:२८.
येशूने खूप काही सोसलं होतं. त्यामुळे साहजिकच त्याला खूप तहान लागली असेल. आणि ती भागवण्यासाठी तो हे शब्द बोलला. आपल्याला कशाची गरज आहे, हे इतरांना सांगणं चुकीचं आहे, असा येशूने कधीच विचार केला नाही. आपणही कधीच तसा विचार करू नये. आपण आत्तापर्यंत कदाचित कोणालाही मदत मागितली नसेल. पण जर आपल्याच्याने होत नसेल आणि आपल्याला इतरांच्या मदतीची गरज असेल, तर ती मागायला आपण मागेपुढे पाहू नये. उदाहरणार्थ, आपण जर वयस्कर किंवा आजारी असू, तर आपल्याला बाजारात किंवा डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आपण आपल्या भाऊबहिणींना मदत मागू शकतो. किंवा मग, आपण जर दुःखी किंवा निराश असू, तर आपण मंडळीतल्या एखाद्या वडिलाशी किंवा एखाद्या प्रौढ भावाशी किंवा बहिणीशी बोलू शकतो. त्यांच्या “दिलासा देणाऱ्या शब्दांमुळे” आपल्याला खूप धीर मिळू शकतो. (नीति. १२:२५) हे कधीही विसरू नका, की आपले भाऊबहीण आपल्यावर खूप प्रेम करतात. आणि “दुःखाच्या प्रसंगी” आपल्याला मदत करायची त्यांची इच्छा असते. (नीति. १७:१७) पण ते आपलं मन पाहू शकत नाहीत. म्हणून जोपर्यंत आपण स्वतःहून त्यांना मदत मागणार नाही, तोपर्यंत त्यांना कळणार नाही की आपल्याला मदतीची गरज आहे. टेहळणी बुरूज२१.०४ ११-१२ ¶११-१२
मंगळवार, २९ ऑगस्ट
दुःखाच्या प्रसंगी तू निराश झालास, तर तुझी शक्ती कमी पडेल.—नीति. २४:१०.
बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं आपल्यापैकी बऱ्याच जणांना कठीण जातं. उदाहरणार्थ, खास पूर्ण वेळेच्या सेवेत बरीच वर्षं सेवा केलेल्या काही भाऊबहिणींची नेमणूक बदलण्यात आली आहे. तर इतर काही जणांना बऱ्याच वर्षांपासून केलेली आणि मनापासून आवडणारी जबाबदारी वाढत्या वयामुळे सोडावी लागली आहे. असे बदल होतात तेव्हा वाईट वाटणं साहजिक आहे. पण जेव्हा आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपल्याला बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं सोपं जातं. आज यहोवा त्याच्या संघटनेत मोठमोठ्या गोष्टी घडवून आणत आहे. आणि त्याचे सहकारी म्हणून काम करण्याचा खास सुहक्क आपल्याला मिळालेला आहे. (१ करिंथ. ३:९) यहोवाचं आपल्यावर असलेलं प्रेम कधीच बदलणार नाही. म्हणून संघटनेत बदल होतो आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होतो तेव्हा हे का झालं, कशाला झालं यावर विचार करत बसू नका. “पूर्वीचे दिवस” आठवून दुःखी होण्यापेक्षा, झालेल्या बदलाची चांगली बाजू बघण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. (उप. ७:१०) कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू पाहा. असं केल्यामुळे आपली परिस्थिती बदलते तेव्हासुद्धा आपण आनंदी राहू शकतो आणि यहोवाची विश्वासाने सेवा करू शकतो. टेहळणी बुरूज२२.०३ १७ ¶११-१२
बुधवार, ३० ऑगस्ट
यहोवा, यहोवा, . . . हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा.—निर्ग. ३४:६, ७.
बायबल सांगतं, की लोक वेगवेगळ्या गोष्टींवर प्रेम करतात. जसं की, ‘शिक्षण,’ ‘ज्ञान,’ ‘बुद्धी’ आणि ‘जगातल्या गोष्टी.’ (नीति. १२:१; २९:३; १ योह. २:१५) पण एकनिष्ठ प्रेम मात्र अशा कोणत्याही गोष्टींवर किंवा वस्तूंवर दाखवलं जात नाही, तर फक्त लोकांना दाखवलं जातं. पण यहोवा सगळ्यांनाच एकनिष्ठ प्रेम दाखवतो असं नाही. ज्यांचं त्याच्यासोबत एक जवळचं नातं आहे फक्त त्यांनाच तो हे प्रेम दाखवतो. आपल्या या मित्रांना तो नेहमी एकनिष्ठ राहतो. त्यांच्यासाठी त्याने एका सुंदर भविष्याची योजना केली आहे. आणि तो कायम त्यांच्यावर प्रेम करत राहील. यहोवाने खरंतर सगळ्याच मानवांना प्रेम दाखवलं आहे. येशूने निकदेम नावाच्या एका माणसाला म्हटलं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”—योहा. ३:१, १६; मत्त. ५:४४, ४५. टेहळणी बुरूज२१.११ २ ¶३; ३ ¶६-७
गुरुवार, ३१ ऑगस्ट
जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.—लूक २१:१९.
आजच्या काळात जीवन जगणं खूप कठीण झालं आहे. आणि येणाऱ्या काळात तर ते आणखीनच कठीण होऊ शकतं. (मत्त. २४:२१) त्यामुळे या सगळ्या समस्या नाहीशा होतील, त्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या वेळी कोणत्याही समस्या आपल्याला आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच आपल्याला त्यांचा सामना करावा लागणार नाही. (यश. ६५:१६, १७) त्यामुळे आपल्याला धीर दाखवण्याची जास्त गरज आहे. कारण, “जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल,” असं येशूने म्हटलं होतं. (लूक २१:१९) समस्यांचा धीराने सामना करण्याच्या बाबतीत आपण इतरांकडून बरंच काही शिकू शकतो. धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. पण तुम्ही म्हणाल, की ‘यहोवाला धीर धरायची काय गरज आहे?’ जरा याचा विचार करा. हे संपूर्ण जग सैतानाच्या हातात आहे आणि त्यामुळे सगळीकडे समस्याच आहेत. यहोवाला हवं तर तो लगेच या समस्या सोडवू शकतो. पण तो तसं करत नाही. तो एका ठरवलेल्या दिवसाची वाट पाहत आहे. (रोम. ९:२२) सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी यहोवाने जी वेळ ठरवली आहे तोपर्यंत यहोवा धीर धरत आहे. टेहळणी बुरूज२१.०७ ८ ¶२-४