वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es23 पृ. ६५-७७
  • जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
  • उपशिर्षक
  • गुरुवार, १ जून
  • शुक्रवार, २ जून
  • शनिवार, ३ जून
  • रविवार, ४ जून
  • सोमवार, ५ जून
  • मंगळवार, ६ जून
  • बुधवार, ७ जून
  • गुरुवार, ८ जून
  • शुक्रवार, ९ जून
  • शनिवार, १० जून
  • रविवार, ११ जून
  • सोमवार, १२ जून
  • मंगळवार, १३ जून
  • बुधवार, १४ जून
  • गुरुवार, १५ जून
  • शुक्रवार, १६ जून
  • शनिवार, १७ जून
  • रविवार, १८ जून
  • सोमवार, १९ जून
  • मंगळवार, २० जून
  • बुधवार, २१ जून
  • गुरुवार, २२ जून
  • शुक्रवार, २३ जून
  • शनिवार, २४ जून
  • रविवार, २५ जून
  • सोमवार, २६ जून
  • मंगळवार, २७ जून
  • बुधवार, २८ जून
  • गुरुवार, २९ जून
  • शुक्रवार, ३० जून
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
es23 पृ. ६५-७७

जून

गुरुवार, १ जून

एक गरीब विधवा आली आणि तिने फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी दानपात्रात टाकली.—मार्क १२:४२.

एका विधवेची परिस्थिती इतकी वाईट आहे, की रोजच्या गरजा भागवण्याइतके पैसेही तिच्याकडे नाहीत. तरी ती एका दानपात्राकडे जाते आणि तिच्याकडे असलेली दोन छोटी नाणी हळूच त्यात टाकते. ती नाणी टाकल्यावर कदाचित त्यांचा आवाजही आला नसेल. तिने किती दान दिलं आहे, हे येशूला माहीत आहे. तिने दानपात्रात दोन लेप्टा नाणी टाकली आहेत. त्या काळात या नाण्यांचं मोल सगळ्यात कमी होतं. तितक्या पैशात तर सर्वात कमी किमतीची एक चिमणीसुद्धा विकत घेता येत नव्हती. त्या विधवेने केलेली ही गोष्ट येशूच्या मनाला खूप भिडते. त्यामुळे तो आपल्या शिष्यांना बोलवतो आणि तिच्याकडे त्यांचं लक्ष वेधतो. तो त्यांना म्हणतो: “दानपात्रांत पैसे टाकणाऱ्‍या सगळ्यांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.” पुढे तो असंही म्हणतो: “त्या सगळ्यांनी [खासकरून श्रीमंतांनी] त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून टाकलं. पण ती इतकी गरीब असूनही तिने पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकलं.” (मार्क १२:४३, ४४) त्या दिवशी आपल्याकडचे सगळे पैसे दानपात्रात टाकून त्या गरीब विधवेने हेच दाखवलं, की यहोवा आपली काळजी घेईल यावर तिचा पूर्ण भरवसा आहे.—स्तो. २६:३. टेहळणी बुरूज२१.०४ ६ ¶१७-१८

शुक्रवार, २ जून

तुम्ही तर संपूर्ण यरुशलेम शहरात तुमच्या शिकवणी पसरवल्या आहेत.—प्रे. कार्यं ५:२८.

पृथ्वीवर असताना येशूने प्रचार करायचं कधीच थांबवलं नाही. कधी ना कधी लोक आपलं ऐकतील या आशेने तो प्रचार करत राहिला. आणि आपल्या शिष्यांनीही तेच करावं अशी त्याची इच्छा होती. (योहा. ४:३५, ३६) येशू सोबत होता तोपर्यंत शिष्यांनी खूप आवेशाने प्रचार केला. (लूक १०:१, ५-११, १७) पण येशूला अटक करून ठार मारण्यात आलं, तेव्हा मात्र त्यांचा आवेश काही काळासाठी कमी झाला. (योहा. १६:३२) त्यामुळे पुनरुत्थान झाल्यावर येशूने त्यांना प्रचारकार्याकडे आपलं लक्ष लावायचं प्रोत्साहन दिलं. याचा परिणाम असा झाला, की येशू स्वर्गात गेल्यानंतर शिष्य इतक्या आवेशाने प्रचार करू लागले, की त्यांच्या शत्रूंनी आजच्या वचनातले शब्द म्हटले. पहिल्या शतकात ख्रिश्‍चनांनी केलेल्या प्रचारकार्याचं येशूने मार्गदर्शन केलं आणि यहोवाने त्यांच्या कामावर आशीर्वाद दिला. याचं एक उदाहरण म्हणजे, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जवळजवळ ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्यं २:४१) पुढेही शिष्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. (प्रे. कार्यं ६:७) पण शेवटल्या दिवसांत याहून मोठ्या प्रमाणात लोक आपला संदेश ऐकतील असं येशूने आधीच सांगितलं होतं.—योहा. १४:१२; प्रे. कार्यं १:८. टेहळणी बुरूज२१.०५ १४ ¶१-२

शनिवार, ३ जून

ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही तो माणूस सुखी!—मत्त. ११:६.

तुम्हाला सत्य सापडल्याची पहिल्यांदा जाणीव झाली तो क्षण तुम्हाला आठवतो का? तुम्हाला वाटलं, की तुमच्यासारखंच इतरांनाही या गोष्टी शिकायला खूप आवडेल. कारण बायबलच्या या शिकवणींमुळे त्यांना आत्ता एक आनंदी जीवन आणि भविष्यासाठी एक सुंदर आशा मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं. (स्तो. ११९:१०५) आणि म्हणून बायबलमधून शिकलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाइकांना खूप उत्साहाने सांगू लागलात. पण मग काय झालं? तुम्हाला वाटलं होतं तसं मुळीच झालं नाही. तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत. आपण सांगत असलेला संदेश लोक ऐकत नाहीत तेव्हा आपल्याला मुळीच आश्‍चर्य वाटायला नको. कारण येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याचंसुद्धा अनेकांनी ऐकलं नाही. आपल्याला देवाचा पाठिंबा आहे हे सिद्ध करणारे कितीतरी चमत्कार त्याने केले होते. पण तरीसुद्धा लोकांनी त्याला नाकारलं. जसं की, त्याने लाजरला जिवंत केलं ही गोष्ट त्याचा विरोध करणारे यहुदी धर्मगुरूसुद्धा नाकारू शकले नाहीत. पण तरीही तो मसीहा असल्याचं त्यांनी मान्य केलं नाही. त्यांनी तर येशूला आणि लाजरला मारून टाकायचाही प्रयत्न केला.—योहा. ११:४७, ४८, ५३; १२:९-११. टेहळणी बुरूज२१.०५ २ ¶१-२

रविवार, ४ जून

एकत्र येणं सोडू [नका], तर एकमेकांना प्रोत्साहन देत [राहा].—इब्री १०:२५.

शक्यतो एकही सभा चुकवू नका. कारण तिथे तुम्हाला जे काही शिकायला मिळेल त्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटेल. शिवाय, भाऊबहिणींसोबतची तुमची ओळखही आणखी वाढेल. मंडळीत ज्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल त्यांच्याशी मैत्री करा. मग ते कोणत्याही संस्कृतीचे किंवा वयाचे असले तरीही. कारण बायबल म्हणतं, “म्हाताऱ्‍या माणसांजवळ बुद्धी” असते. (ईयो. १२:१२) तसंच, वयस्कर लोकसुद्धा तरुण भाऊबहिणींकडून खूप काही शिकू शकतात. दावीद आणि योनाथानचाच विचार करा. दावीद योनाथानपेक्षा खूप लहान होता. पण तरीसुद्धा ते खूप चांगले मित्र बनले. (१ शमु. १८:१) त्यांच्या जीवनात अनेक समस्या आल्या, तरी त्यांनी एकमेकांना यहोवाची सेवा करायला मदत केली. (१ शमु. २३:१६-१८) आयरिन नावाची बहीण सध्या एकटीच सत्यात आहे. ती म्हणते, “आपल्या आईवडिलांची आणि भावंडांची कमी भरून काढण्यासाठी यहोवा मंडळीतल्या भाऊबहिणींचा उपयोग करू शकतो.” तुमचे मित्र तुम्हाला धीर द्यायला आणि मदत करायला नेहमी तयार आहेत. पण त्यासाठी तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगितली पाहिजे. तरच ते तुम्हाला मदत करू शकतील. टेहळणी बुरूज२१.०६ १०-११ ¶९-११

सोमवार, ५ जून

जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही, तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.—मत्त. १८:३५.

येशूने आपल्या शिष्यांना एका राजाचं आणि त्याच्या दासाचं उदाहरण दिलं. त्या दासाने राजाकडून खूप मोठं कर्ज घेतलं होतं. पण तो ते फेडू शकला नाही. म्हणून राजाने त्याचं सगळं कर्ज माफ केलं. या दासाने मात्र दुसऱ्‍या दासाला माफ केलं नाही. त्याला तर त्याने खूप छोटं कर्ज दिलं होतं. तरीसुद्धा त्याने ते माफ केलं नाही. राजाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने त्या निर्दयी दासाला तुरुंगात टाकलं. त्या निर्दयी दासाने जे केलं त्याचा त्याला स्वतःलाच नाही तर इतरांनाही त्रास झाला. एकतर त्याने त्या दुसऱ्‍या दासाला त्याचं पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकलं. आणि दुसरं म्हणजे, त्याचं हे वागणं इतर दासांनी पाहिलं तेव्हा त्यांनाही खूप त्रास झाला. बायबल म्हणतं, “इतर दासांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं.” (मत्त. १८:३०, ३१) अगदी तसंच, आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. एखादा आपल्याशी वाईट वागला आणि आपण त्याला माफ केलं नाही तर काय होऊ शकतं? एक म्हणजे, आपण जेव्हा त्याला माफ करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्याशी प्रेमाने वागत नाही तेव्हा आपण त्याचं मन दुखावतो. दुसरं म्हणजे, आपण त्या व्यक्‍तीशी नीट वागत नाही हे पाहून मंडळीतल्या इतरांनाही वाईट वाटतं. टेहळणी बुरूज२१.०६ २२ ¶११-१२

मंगळवार, ६ जून

पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा [तो] नाश [करेल].—प्रकटी. ११:१८.

मानवांना अशा प्रकारे बनवलं आहे, की ते देवाचं अनुकरण करू शकतात. पण सैतान त्यांना अनैतिक कामं करायला लावतो. नोहाच्या काळात “यहोवा देवाने पाहिलं, की पृथ्वीवर माणसांचा दुष्टपणा फार वाढला आहे.” आणि त्यामुळे “पृथ्वीवर मानवाला निर्माण केल्याचा यहोवाला पस्तावा झाला आणि त्याला मनापासून वाईट वाटलं.” (उत्प. ६:५, ६, ११) त्यानंतर जगाची परिस्थिती चांगली झाली का? मुळीच नाही. उलट, आज स्त्री-पुरुष आणि समलैंगिक लोक सर्व प्रकारची अनैतिक कामं करत आहेत. ते पाहून सैतानाला खूप आनंद होतो. (इफिस. ४:१८, १९) आणि खासकरून यहोवाची उपासना करणारे लोक अशी कामं करतात तेव्हा तर त्याला आणखीनच आनंद होतो. सैतानाच्या अधिकाराखाली “माणसाने माणसावर अधिकार गाजवून त्याचं नुकसान केलं आहे.” (उप. ८:९) त्यासोबतच त्याने पृथ्वीचं आणि प्राण्यांचंही नुकसान केलं आहे. यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे माणूस त्यांची काळजी घेत नाही. (उत्प. १:२८) याचा काय परिणाम झाला आहे? काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे, की माणूस आज जे काही करत आहे त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये प्राण्यांच्या आणखी दहा लाख जाती नाहीशा होऊ शकतात. टेहळणी बुरूज२१.०७ १२ ¶१३-१४

बुधवार, ७ जून

[यहोवा] मोठ्या मनाने क्षमा करेल.—यश. ५५:७.

देवाच्या काही सेवकांच्या बाबतीत असं होतं, की पूर्वी केलेल्या चुका ते विसरूच शकत नाहीत. त्यांचं मन सतत त्यांना दोष देत राहतं. आणि या दोषीपणाच्या भावनेमुळे त्यांना असं वाटतं, की आपण कितीही पश्‍चात्ताप केला, यहोवाला कितीही माफी मागितली, तरी तो आपल्याला माफ करणार नाही. तुम्हालाही असं वाटत असेल, तर यहोवा तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवायला किती उत्सुक आहे, हे जाणून तुम्हाला खूप दिलास मिळेल. यामुळे तुम्हाला शुद्ध विवेकाने आणि आनंदाने यहोवाची सेवा करायला मदत होऊ शकते. कारण ‘येशूचं रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.’ (१ योहा. १:७) तेव्हा आपल्यातल्या काही कमतरतांमुळे आपण जर निराश होत असू, तर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तीला माफ करायला यहोवा नेहमी तयार असतो. देवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा आणि क्षमेचा एकमेकांशी किती जवळचा संबध आहे ते स्तोत्रकर्ता दावीदने सांगितलं. तो म्हणाला: “कारण आकाश पृथ्वीपेक्षा जितकं उंच आहे, तितकंच त्याचं भय मानणाऱ्‍यांसाठी, त्याचं एकनिष्ठ प्रेम मोठं आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.”—स्तो. १०३:११, १२. टेहळणी बुरूज२१.११ ५-६ ¶१२-१३

गुरुवार, ८ जून

तिची मुलं उठून तिची स्तुती करतात; तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो.—नीति. ३१:२८.

एका ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीला मान दिला पाहिजे. (१ पेत्र ३:७) तिला वेळ देऊन, तिची काळजी घेऊन आणि तिचा आदर करून तो हे करू शकतो. ती जे करू शकत नाही ते तिने करावं अशी अपेक्षा तो ठेवत नाही. इतर स्त्रियांसोबत तो तिची तुलना करत नाही. नाहीतर काय होऊ शकतं यासाठी रोझा नावाच्या एका बहिणीच्या अनुभवाकडे लक्ष द्या. तिचा पती सत्यात नाही आणि तो सारखा इतर स्त्रियांसोबत तिची तुलना करतो. तो तिला इतकं घालूनपाडून बोलतो, की आपण काहीच कामाचे नाही असं रोझाला वाटतं. “त्यामुळे मला सतत स्वतःला याची आठवण करून द्यावी लागते, की यहोवाचं माझ्यावर खूप प्रेम आहे,” असं ती म्हणते. पण एक ख्रिस्ती पती कधीच असा वागत नाही. तो आपल्या पत्नीला मान देतो. कारण यामुळे तिच्यासोबतचं आणि यहोवासोबतचं आपलं नातं आणखी चांगलं होईल हे त्याला माहीत असतं. एक ख्रिस्ती पती नेहमी आपल्या पत्नीबद्दल चांगलं बोलतो. तसंच, त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हे तो तिला सांगतो. टेहळणी बुरूज२१.०७ २२ ¶७-८

शुक्रवार, ९ जून

मी धीराने वाट पाहीन.—मीखा ७:७.

आपण एखाद्याची खूप वाट पाहत असतो, आणि तो यायला उशीर करतो तेव्हा आपण नाराज होतो का? पण त्या माणसाला यायला उशीर का होत आहे याचं कारण जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण त्याची वाट पाहायला तयार नसणार का? नीतिवचनं १३:११ म्हणतं: “झटपट मिळवलेली संपत्ती कमी होत जाते, पण जो हळूहळू साठवतो, त्याची संपत्ती वाढत जाईल.” या वचनातून आपण काय शिकतो? हेच की कोणतंही काम घाईघाईने नाही, तर काळजीपूर्वक आणि धीराने करणं नेहमी चांगलं असतं. नीतिवचनं ४:१८ यात म्हटलं आहे, “नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो; दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखा तो असतो.” या शब्दांवरून दिसून येतं, की यहोवा टप्प्याटप्प्याने आपल्या लोकांना त्याचा उद्देश कळवतो. पण हे वचन अशा व्यक्‍तीच्या बाबतीतही लागू केलं जाऊ शकतं, जी आपल्या जीवनात बदल करते आणि प्रगती करून यहोवासोबत जवळचं नातं जोडते. पण प्रगती करण्यासाठी आणि यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी वेळ लागतो. या बाबतीत घाई करता येत नाही. टेहळणी बुरूज२१.०८ ८ ¶१, ३-४

शनिवार, १० जून

मी जाईन! मला पाठव!—यश. ६:८.

लवकरच या जगाचा अंत होणार आहे. पण त्याआधी आपल्याकडे भरपूर काम आहे. (मत्त. २४:१४; लूक १०:२; १ पेत्र ५:२) त्यासाठी अनेक जण आपलं सेवाकार्य वाढवत आहेत. काहींनी पायनियर बनायचं, तर काहींनी बेथेलमध्ये किंवा बांधकाम प्रकल्पांवर काम करायचं ध्येय ठेवलं आहे. आणि असे कितीतरी भाऊ आहेत ज्यांनी मंडळीमध्ये सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलं आहे. (१ तीम. ३:१, ८) यहोवाची सेवा करण्यासाठी स्वतःहून पुढे येणाऱ्‍या या सगळ्या भाऊबहिणींना पाहून त्याला खरंच किती आनंद होत असेल! (स्तो. ११०:३) पण यहोवाच्या सेवेतलं एखादं ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून तुम्ही निराश आहात का? असाल, तर यहोवाला प्रार्थना करा, आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतं ते त्याला सांगा. (स्तो. ३७:५-७) तसंच, तुम्हाला कुठे सुधारणा करायची गरज आहे हे अनुभवी भावांना विचारा, आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांप्रमाणे काम करा. असं केल्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करता येईल. टेहळणी बुरूज२१.०८ २० ¶१; २१ ¶४

रविवार, ११ जून

यहोवा . . . आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.—स्तो. ३७:२८.

हन्‍ना नावाची संदेष्टी विधवा होती आणि ८४ वर्षांची असतानाही तिने मंदिरात जायचं सोडलं नव्हतं. असं म्हणा, ती जणू न चुकता सभेला उपस्थित राहायची. आणि त्यामुळे यहोवाने तिला खूप मोठा आशीर्वाद दिला. तिला बाळ येशूला पाहायचा बहुमान मिळाला. (लूक २:३६-३८) आजच्या काळातही, वयस्कर भाऊबहिणींची चांगली उदाहरणं पाहायला मिळतात. आणि त्यांच्यामुळे, वयाने लहान असलेल्यांना खूप प्रोत्साहन मिळतं. यहोवाच्या संघटनेत त्यांना कोणकोणते चांगले अनुभव आले त्यांबद्दल आपण त्यांना विचारलं आणि ते सांगत असताना शांतपणे त्यांचं ऐकलं, तर आपल्याला नक्कीच त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. खरंच, यहोवासाठी आणि त्याच्या संघटनेसाठी आपले वयस्कर भाऊबहीण खूप महत्त्वाचे आहेत. यहोवाने त्यांना आणि त्याच्या संघटनेला वेगवेगळ्या मार्गांनी कशा प्रकारे आशीर्वादित केलं आहे हे त्यांनी स्वतः पाहिलं आहे. ते आपल्या चुकांमधून शिकत गेले. आपले हे वयस्कर भाऊबहीण जणू ‘बुद्धीचा झराच’ आहेत. म्हणून त्यांच्याकडून होता होईल तितकं शिका. (नीति. १८:४) त्यामुळे तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. टेहळणी बुरूज२१.०९ ३ ¶४; ४ ¶७-८; ५ ¶११, १३

सोमवार, १२ जून

जो सगळ्यात लहान, तो हजार होईल, आणि जो सगळ्यात छोटा, तो शक्‍तिशाली राष्ट्र बनेल.—यश. ६०:२२.

यशयाने म्हटल्याप्रमाणे “राष्ट्रांचं दूध,” यहोवाच्या साक्षीदारांसाठी उपलब्ध करून दिलं जात आहे. (यश. ६०:५, १६) याचा यहोवाच्या लोकांना खूप उपयोग होत आहे. त्यामुळे सत्यात येणाऱ्‍या मौल्यवान भाऊबहिणींच्या कौशल्यांमुळे आणि क्षमतांमुळे आज २४० देशांमध्ये प्रचाराचं काम केलं जात आहे आणि १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशनं तयार केली जात आहेत. या शेवटल्या दिवसांत राष्ट्रांना हालवलं जात असल्यामुळे लोकांवर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यांना हे ठरवायचं आहे, की ते कोणाला पाठिंबा देतील; देवाच्या राज्याला, की या दुष्ट जगातल्या सरकारांना? आज यहोवाचे लोक ज्या देशांमध्ये राहतात, तिथल्या कायद्यांचं ते पालन करतात, पण कोणत्याही राजकीय गोष्टींमध्ये ते सहभाग घेत नाहीत. (रोम. १३:१-७) कारण देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्यांचा अंत करेल हे त्यांना माहीत आहे. आणि ते राज्य या जगाचा भाग नाही, हे ते ओळखतात.—योहा. १८:३६, ३७. टेहळणी बुरूज२१.०९ १७-१८ ¶१३-१४

मंगळवार, १३ जून

त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा.—स्तो. ६२:८.

तुमची जवळची व्यक्‍ती जेव्हा यहोवाला सोडून देते, तेव्हा तुम्हाला तुमचा आणि कुटुंबातल्या इतर लोकांचा विश्‍वास मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता? रोज बायबल वाचा, त्यावर मनन करा आणि नियमितपणे सभांना हजर राहा. याचा जोॲनाला कसा फायदा झाला ते पाहा. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने सत्य सोडून दिलं होतं. पण ती म्हणते, “मी जेव्हा बायबलमध्ये अबीगईल, एस्तेर, ईयोब, योसेफ आणि येशू अशा लोकांबद्दल वाचते, तेव्हा माझं मन खूप शांत होतं. त्यांच्या उदाहरणामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि मनातून नकारात्मक विचार काढायला मदत होते.” जेव्हा निराश करणारे विचार तुमच्या मनात येतात तेव्हा प्रार्थना करायचं सोडू नका. आपल्या परिस्थितीबद्दल यहोवा जसा विचार करतो तसा विचार करायला त्याच्याकडे मदत मागा. तसंच, ‘सखोल समज देण्यासाठी आणि ज्या मार्गाने आपण गेलं पाहिजे तो मार्ग दाखवण्यासाठी’ त्याला विनंती करा. (स्तो. ३२:६-८) तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे कदाचित तुम्हाला यहोवाला सांगता येणार नाही. पण यहोवाला तुमचं दुःख समजतं. तुम्ही त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करावं असं त्याला वाटतं.—निर्ग. ३४:६; स्तो. ६२:७. टेहळणी बुरूज२१.०९ २८ ¶९-१०

बुधवार, १४ जून

हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय. तुम्ही त्याचं ऐका.—मत्त. १७:५.

इ.स. ३२ च्या वल्हांडण सणानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तीन प्रेषितांनी एक रोमांचक दृष्टान्त पाहिला. एका उंच डोंगरावर असताना त्यांच्यासमोर येशूचं रूप बदललं. “त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी दिसू लागले.” (मत्त. १७:१-४) प्रेषितांनी देवाचा आवाज ऐकला. देवाने त्यांना म्हटलं: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय. तुम्ही त्याचं ऐका.” हे तीन प्रेषित ज्या प्रकारे जीवन जगले त्यावरून दिसून आलं, की त्यांनी येशूचं ऐकलं. आपल्यालाही तेच करायचं आहे. आज यहोवा ‘मंडळीच्या मस्तकाद्वारे’ म्हणजे येशूद्वारे प्रेमाने आपलं मार्गदर्शन करत आहे. याबद्दल आपण खरंच किती आभारी आहोत! (इफिस. ५:२३) पेत्र, याकोब आणि योहान या प्रेषितांप्रमाणेच आपणसुद्धा त्याचं ऐकायचा ठाम निश्‍चय केला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला आत्ता आणि भविष्यातही भरपूर आशीर्वाद मिळतील. टेहळणी बुरूज२१.१२ २२ ¶१; २७ ¶१९

गुरुवार, १५ जून

मी तुला योग्य प्रमाणात शिस्त लावीन.—यिर्म. ३०:११.

करिंथ मंडळीतल्या एका माणसाचे आपल्या वडिलांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. म्हणून प्रेषित पौलने करिंथकरांना त्या व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृत करायला सांगितलं. कारण त्या माणसाच्या अनैतिक कामाचा मंडळीतल्या इतरांवरसुद्धा परिणाम होत होता. काहींना तर असंही वाटत होतं, की तो जे करत आहे ते काही गंभीर पाप नाही! (१ करिंथ. ५:१, २, १३) काही काळानंतर पौलला हे समजलं, की त्या माणसाने खरा पश्‍चात्ताप दाखवला होता. पौलने मंडळीतल्या वडिलांना सांगितलं, की “तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या, नाहीतर तो दुःखात बुडून जाईल.” पौलला त्या व्यक्‍तीची दया आली. त्याला असं वाटत होतं, की तो दुःखात बुडून कदाचित असा विचार करेल की आपल्याला माफी मिळणारच नाही. पण त्याने असा विचार करून आशाच सोडून द्यावी असं पौलला वाटत नव्हतं. (२ करिंथ. २:५-८, ११) यहोवासारखंच मंडळीतले वडीलसुद्धा प्रेमापोटीच दया दाखवतात. जेव्हा चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला शिस्त लावण्याची गरज असते तेव्हा ते त्याला जरूर शिस्त लावतात. पण दया दाखवण्यासाठी योग्य कारण असतं तेव्हा ते तिला तितकीच दयासुद्धा दाखवतात. त्यांनी जर तिची चूक सुधारली नाही, तर ते दयाळूपणाचं ठरणार नाही. उलट त्या व्यक्‍तीला चुकीचं काम करत राहायची सूट मिळेल. टेहळणी बुरूज२१.१० ११-१२ ¶१२-१५

शुक्रवार, १६ जून

तू बदला घेऊ नकोस किंवा . . . मनात राग बाळगू नकोस.—लेवी. १९:१८.

आपण दुखावलेल्या भावनांची तुलना जखमेसोबत करू शकतो. काही जखमा एकदम किरकोळ असतात, तर काही खोल असतात. उदाहरणार्थ, भाजी चिरताना कधीकधी आपलं बोट थोडंसं कापतं. आपल्याला ते दुखत असतं, पण एकदोन दिवसांत जखम लगेच भरून येते. आणि ती कुठे होती हेही आपल्याला कळत नाही. कधीकधी मनावरच्या जखमासुद्धा अशाच किरकोळ असतात. उदाहरणार्थ, काही वेळा आपल्या जवळची व्यक्‍ती असं काहीतरी करते किंवा बोलून जाते जे आपल्या मनाला लागतं. पण आपण ते जास्त मनाला लावून घेत नाही. पण कधीकधी शरीरावर झालेली एखादी जखम खूप खोल असते. त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जाऊन टाके घालावे लागतात आणि बॅन्डेज लावावं लागतं. पण आपण जर ते बॅन्डेज काढून जखमेला सारखंसारखं हात लावत राहिलो तर ती जखम आणखी चिघळते. मनावर झालेल्या जखमेच्या बाबतीतसुद्धा असंच होऊ शकतं. एखाद्याने आपलं मन कदाचित खूप दुखावलं असेल. पण आपण जर त्याच गोष्टीचा सतत विचार करत बसलो आणि त्या व्यक्‍तीबद्दल मनात राग धरला, तर आपल्यालाच त्रास होऊ शकतो. त्याऐवजी आजच्या वचनातला सल्ला पाळणं किती चांगलं आहे! टेहळणी बुरूज२१.१२ १२ ¶१५

शनिवार, १७ जून

तू आपल्या भावाचा न्याय का करतोस?—रोम. १४:१०.

समजा एखाद्या वडिलाला असं वाटलं, की एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा पेहराव बरोबर नाही. तर त्या व्यक्‍तीशी बोलण्याआधी त्यांनी स्वतःला हे विचारलं पाहिजे: ‘सल्ला देण्यासाठी माझ्याकडे खरंच बायबलवर आधारित एखादं ठोस कारण आहे का?’ आपण आपली मतं इतरांवर कधीच लादत नाही. त्यामुळे सल्ला देण्याआधी वडील दुसऱ्‍या एखाद्या वडिलाशी किंवा एखाद्या अनुभवी प्रचारकाशी बोलू शकतात आणि त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे विचारू शकतात. आणि मग सोबत मिळून ते पेहरावाबद्दल पौलने दिलेल्या सल्ल्यावर विचार करू शकतात. (१ तीम. २:९, १०) एका ख्रिस्ती व्यक्‍तीचा पेहराव कसा असला पाहिजे याबद्दल पौलने कोणतेही नियम दिले नाहीत. तर तो कसा शालीन आणि सभ्य असला पाहिजे याबद्दल त्याने काही तत्त्वं दिली. एक ख्रिस्ती व्यक्‍ती या तत्त्वांना धरून आपल्या आवडीनिवडींप्रमाणे पेहराव करू शकते ही गोष्ट त्याला माहीत होती. म्हणून वडिलांनी त्या व्यक्‍तीचा पेहराव शालीन आणि सभ्य आहे का याचा विचार केला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की एखाद्या गोष्टीबद्दल दोन ख्रिस्ती व्यक्‍ती वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात. आणि हे दोन्हीही निर्णय बरोबर असू शकतात. म्हणून काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याबद्दल आपण स्वतःचं मत आपल्या भाऊबहिणींवर लादू नये. टेहळणी बुरूज२२.०२ १६ ¶९-१०

रविवार, १८ जून

एकमेकांशी प्रेमाने आणि दयेने वागा.—जख. ७:९.

एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची अनेक कारणं आपल्याकडे आहेत. त्यांपैकी काही नीतिवचनं या पुस्तकात दिली आहेत. जसं की: “एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा कधीही सोडू नकोस . . . . मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेत तुला सखोल समज असलेला म्हणून ओळखलं जाईल आणि तुझ्यावर त्यांची कृपा होईल.” “एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो.” आणि ‘जो नीतीने आणि एकनिष्ठ प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन मिळतं.’ (नीति. ३:३, ४; ११:१७, तळटीप; २१:२१) या नीतिवचनांत एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची तीन कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण म्हणजे, एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान ठरतो. दुसरं म्हणजे, एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपल्या स्वतःला फायदा होतो. जसं की, इतरांसोबत आपली चांगली मैत्री होते. आणि तिसरं कारण म्हणजे, एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने वागल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक आशीर्वाद आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल. खरंच, यहोवाने सांगितल्याप्रमाणे ‘एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने वागण्याची’ अशी बरीच कारणं आपल्याकडे आहेत. टेहळणी बुरूज२१.११ ८ ¶१-२

सोमवार, १९ जून

आमचा विश्‍वास वाढव.—लूक १७:५.

तुमच्यावर पूर्वी किंवा आता आलेल्या परीक्षांवरून तुम्हाला जर जाणवलं, की तुमच्यामध्ये विश्‍वासाची कमतरता आहे तर निराश होऊ नका. उलट, आपला विश्‍वास वाढवायची ही एक संधी आहे असं समजा. जीवनात मोठ्या समस्या येतात तेव्हा यहोवाला कळकळीची प्रार्थना करा. तो आपल्या घरच्या लोकांचा आणि मंडळीतल्या भाऊबहिणींचा वापर करून आपल्याला मदत करेल हे लक्षात ठेवा. समस्यांचा सामना करण्यासाठी जर आत्ता तुम्ही यहोवाची मदत घेतली, तर भविष्यात येणाऱ्‍या संकटांचा सामना करायलाही तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. आपल्या शिष्यांना कुठे विश्‍वास वाढवायची गरज आहे हे येशूने त्यांना दाखवून दिलं. पण भविष्यात येणाऱ्‍या संकटांना ते यशस्वीपणे तोंड देतील याबद्दल त्याला मुळीच शंका नव्हती. (योहा. १४:१; १६:३३) उलट, भक्कम विश्‍वासामुळेच एक मोठा लोकसमुदाय येणाऱ्‍या संकटातून वाचेल अशी त्याला पक्की खातरी होती. (प्रकटी. ७:९, १४) तुमचा विश्‍वास वाढवण्यासाठी तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिलात, तर यहोवाच्या अपार कृपेने तुम्ही नक्कीच त्यांपैकी एक असाल!—इब्री १०:३९. टेहळणी बुरूज२१.११ २५ ¶१८-१९

मंगळवार, २० जून

यहोवाची भीती बाळगणाऱ्‍यांभोवती त्याचा स्वर्गदूत छावणी करतो.—स्तो. ३४:७.

आज यहोवाने चमत्कारिकपणे आपलं संरक्षण करावं अशी आपण अपेक्षा करत नाही. पण आपल्याला माहीत आहे, की जे यहोवावर भरवसा ठेवतात त्यांचा आता जरी मृत्यू झाला, तरी त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल. लवकरच अशी वेळ येईल जेव्हा यहोवा आपलं संरक्षण करू शकतो या गोष्टीवर आपला किती भरवसा आहे याची परीक्षा होईल. त्या वेळी मागोगचा गोग, म्हणजेच राष्ट्रांचा समूह देवाच्या लोकांवर हल्ला करेल. आणि आपल्याला असं वाटेल, की आपला जीव धोक्यात आहे. पण यहोवा आपलं संरक्षण करू शकतो आणि तो ते करेल, अशी पक्की खातरी आपल्याला असण्याची गरज आहे. त्या वेळी राष्ट्रांना असं वाटेल, की आपण अशा मेंढरांसारखे आहोत ज्यांचं रक्षण करणारं कोणी नाही. (यहे. ३८:१०-१२) आपल्याकडे कोणतंही शस्त्र नसेल, युद्ध कसं लढायचं ते आपल्याला माहीत नसेल. त्यामुळे राष्ट्रांना असं वाटेल, की ते सहज आपला नाश करू शकतात. पण आपल्या विश्‍वासाच्या डोळ्यांनी आपल्याला जे दिसेल ते त्यांना दिसणार नाही. आपल्याला दिसेल, की यहोवाचे लाखो-करोडो स्वर्गदूत आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्याभोवती छावणी देत आहेत. पण राष्ट्रांचा देवावर विश्‍वास नसल्यामुळे त्यांना हे दिसणार नाही. यहोवाचं स्वर्गातलं सैन्य आपल्या मदतीसाठी येईल, तेव्हा राष्ट्रांना खरंच किती जबरदस्त धक्का बसेल!—प्रकटी. १९:११, १४, १५. टेहळणी बुरूज२२.०१ ६ ¶१२-१३

बुधवार, २१ जून

संपूर्ण बंधुसमाजावर प्रेम करा.—१ पेत्र २:१७.

यहोवासाठी त्याचे सगळेच सेवक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींना तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि आपल्याकडून त्यांचं मन दुखावलं जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. असं काही आपल्याकडून झालं आहे हे आपल्या लक्षात आलं, तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू नये. आणि असा विचार करू नये, की त्या व्यक्‍तीने आपल्याला माफ करावं आणि झालं गेलं ते विसरून जावं. पण एखाद्याला पटकन वाईट का वाटू शकतं? काही जण ज्या वातावरणात वाढले आहेत त्यामुळे त्यांना कदाचित स्वतःबद्दल खूप कमीपणा वाटत असेल. तर काही जण सत्यात नवीन असतात. कोणी आपलं मन दुखावलं तर आपण त्यांना माफ केलं पाहिजे ही गोष्ट शिकायला त्यांना वेळ लागू शकतो. कारण काहीही असो, आपसातली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे. तसंच, जी व्यक्‍ती प्रत्येक छोटीमोठी गोष्ट मनाला लावून घेते तिने हे ओळखलं पाहिजे की हे चांगलं नाही; आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. असं केल्यामुळे ती आनंदी राहील आणि इतरांसोबत तिचं नातंही चांगलं असेल. टेहळणी बुरूज२१.०६ २१ ¶७

गुरुवार, २२ जून

यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे; प्रामाणिकपणे त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.—स्तो. १४५:१८.

येशूला तुमच्या भावना कळतात. आपण दुःखी असतो आणि आपला एखादा जवळचा मित्र आपल्याला धीर देतो, आणि खासकरून असा मित्र ज्याने आपल्यासारख्याच समस्यांचा सामना केला आहे, तर आपल्याला किती बरं वाटतं! येशू अशाच एका मित्रासारखा आहे. आपण खचून जातो आणि आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा आपल्याला कसं वाटतं हे त्याला कळतं. आपण कितपत सहन करू शकतो हे त्याला माहीत आहे. त्यामुळे “गरज असेल तेव्हा” तो नक्कीच आपल्या मदत करेल. (इब्री ४:१५, १६) गेथशेमाने बागेत यहोवाने एका स्वर्गदूताद्वारे पुरवलेली मदत येशूने स्वीकारली. त्याचप्रमाणे आज यहोवा आपल्याला जी काही मदत पुरवतो ती आपण स्वीकारली पाहिजे. मग ती मदत कोणत्याही मार्गाने असो. जसं की, प्रकाशनांतून, व्हिडिओतून आणि भाषणांतून किंवा मग ख्रिस्ती वडील आणि आपले भाऊबहीण आपल्याला भेटायला येतात त्यातून. (लूक २२:३९-४४) यहोवा तुम्हाला शांती देईल. परीक्षेत असताना आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्याला ‘सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली त्याची शांती’ देतो.—फिलिप्पै. ४:६, ७. टेहळणी बुरूज२२.०१ १८-१९ ¶१७-१९

शुक्रवार, २३ जून

‘प्रेषितांनी घेतलेले निर्णय त्यांनी सांगितले.’—प्रे. कार्यं १६:४.

यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं. पण पृथ्वीवर आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने ज्या बांधवांना नेमलं आहे त्यांच्यावर भरवसा ठेवणं काही वेळा आपल्याला कठीण जाऊ शकतं. यहोवाच्या संघटनेत ज्यांना अधिकार देण्यात आला आहे, ते खरंच यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात, की स्वतःच्या मनाप्रमाणे, असा प्रश्‍न कदाचित आपल्याला पडेल. त्यामुळे आपण जर या बांधवांवर भरवसा ठेवला नाही, तर यहोवावर आपला भरवसा आहे असं म्हणता येणार नाही. आज यहोवा ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्या संघटनेच्या पृथ्वीवरच्या भागाचं नेतृत्व करत आहे. (मत्त. २४:४५) पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाप्रमाणे हा ‘दास’ जगभरातल्या देवाच्या लोकांची देखरेख करतो आणि मंडळीतल्या वडिलांना मार्गदर्शन पुरवतो. मग वडील मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मंडळीत काम करतात. आज आपण संघटनेकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन करतो, तेव्हा हेच दाखवत असतो की यहोवावर आपलाही पूर्ण भरवसा आहे. टेहळणी बुरूज२२.०२ ४ ¶७-८

शनिवार, २४ जून

आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये.—गलती. ६:९.

आपण यहोवाचे साक्षीदार आहोत याचा आपल्याला खूप अभिमान आहे! आणि “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्यांना सत्यात यायला जेव्हा आपण मदत करतो, तेव्हा आपल्यालाही येशूसारखाच खूप आनंद होतो. येशूच्या शिष्यांनी जेव्हा प्रचारकार्यात त्यांना किती चांगले अनुभव आले हे त्याला सांगितलं, तेव्हा “त्याला खूप आनंद झाला” होता. (प्रे. कार्यं १३:४८; लूक १०:१, १७, २१) पौलने तीमथ्यलाही असा सल्ला दिला, की “स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असं केल्याने तू स्वतःला आणि जे तुझं ऐकतात त्यांनाही वाचवशील.” (१ तीम. ४:१६) यावरून कळतं, की प्रचाराचं काम हे स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याचं काम आहे. देवाच्या राज्याचे नागरिक असल्यामुळे आपण स्वतःकडे सतत लक्ष देत असतो. त्यासाठी आनंदाच्या संदेशाला शोभेल आणि यहोवाची स्तुती होईल, असं आपण वागतो. (फिलिप्पै. १:२७) तसंच, आपण आपल्या ‘शिक्षणाकडेही सतत लक्ष’ देत असतो. त्यासाठी आपण प्रचारकार्याची चांगली तयारी करतो आणि आपल्या कामावर देवाचा आशीर्वाद राहावा म्हणून त्याला प्रार्थनाही करतो. टेहळणी बुरूज२१.१० २४ ¶१-२

रविवार, २५ जून

देवाकडून असलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला.—कलस्सै. ३:१०.

नवीन व्यक्‍तिमत्त्व म्हणजे आपल्या वागण्या-बोलण्यात यहोवाच्या गुणांचं अनुकरण करणं. आपल्याला जर नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करायचं असेल, तर देवाच्या पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण आपण स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे देवाची पवित्र शक्‍ती आपल्या विचारांवर, भावनांवर आणि आपल्या कार्यांवर प्रभाव करू लागते. नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करणाऱ्‍याचं यहोवावर आणि त्याच्या लोकांवर प्रेम असतं. (मत्त. २२:३६-३९) त्याला वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करावा लागला, तरी तो आनंदाने यहोवाची सेवा करत राहतो. (याको. १:२-४) तो नेहमी शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो. (मत्त. ५:९) तसंच, तो नेहमी इतरांशी सहनशीलतेने आणि दयाळूपणे वागतो. (कलस्सै. ३:१३) चांगल्या गोष्टी करायला त्याला आवडतं आणि तो त्या नेहमी करत राहतो. (लूक ६:३५) आपल्या स्वर्गीय पित्यावर त्याचा किती मजबूत विश्‍वास आहे हे त्याच्या जीवनातून दिसून येतं. (याको. २:१८) कोणी त्याला चीड आणायचा प्रयत्न केला तरी तो सौम्यपणे उत्तर देतो. आणि वाईट गोष्टी करायचा मोह होतो तेव्हा तो आत्मसंयम दाखवतो. (१ करिंथ. ९:२५, २७; तीत ३:२) नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपण गलतीकर ५:२२, २३ या वचनांत आणि बायबलच्या इतर वचनांत सांगितलेले सगळे गुण स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. टेहळणी बुरूज२२.०३ ८-९ ¶३-४

सोमवार, २६ जून

तुम्हीही माझं अनुकरण करा.—१ करिंथ. ११:१.

प्रेषित पौलसारखंच मंडळीतले वडीलसुद्धा घरोघरच्या प्रचारकार्यातच नाही तर इतर वेळीही देवाच्या राज्याचा संदेश सांगू शकतात. (इफिस. ६:१४, १५) पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून, ते प्रचारकार्यात साहाय्यक सेवकांना आणि इतरांना प्रशिक्षण देऊ शकतात. (१ पेत्र ५:१, २) पण वडिलांनी मंडळीच्या किंवा संघटनेच्या इतर कामांमध्ये इतकं व्यस्त असू नये, की ज्यामुळे त्यांना प्रचारकार्यासाठी वेळ मिळणार नाही. (मत्त. २८:१९, २०) म्हणून प्रचारकार्यात आणि इतर जबाबदाऱ्‍यांमध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी ते कदाचित काही जबाबदाऱ्‍यांना नाही म्हणू शकतात. कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याआधी वडील प्रार्थनापूर्वक विचार करू शकतात, की ‘जबाबदारी स्वीकारल्यानंतर मला जास्त महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ देता येईल का? जसं की, कौटुंबिक उपासना करणं, प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेणं आणि मुलांना प्रचारकार्याचं प्रशिक्षण देणं?’ तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की जेव्हा तुम्ही जास्त महत्त्वाच्या गोष्टी करता याव्यात म्हणून काही जबाबदाऱ्‍यांना नाही म्हणता तेव्हा यहोवा ते समजून घेतो. टेहळणी बुरूज२२.०३ २७ ¶४, ७; २८ ¶८

मंगळवार, २७ जून

जे शरीर नष्ट करतात, पण जीवन नष्ट करू शकत नाहीत त्यांना घाबरू नका.—मत्त. १०:२८.

तुम्ही बायबलचा अभ्यास करत होता तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती ते आठवा. तुम्हाला वाटलं असेल, की तुम्ही घरोघर जाऊन कधीच प्रचार करू शकणार नाही. किंवा मग, आपल्या घरातले लोक किंवा आपले मित्र आपला विरोध करतील अशी भीती कदाचित तुमच्या मनात होती. त्यामुळे जर तुमच्या विद्यार्थ्यालाही असंच वाटत असेल तर त्याची भीती समजण्यासारखी आहे. भीती वाटणं साहजिक आहे असं येशूनेही म्हटलं. पण भीतीमुळे आपण यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ नये असंही येशूने शिष्यांना सांगितलं. (मत्त. १०:१६, १७, २७) शिकत असलेल्या गोष्टींबद्दल इतरांशी बोलायला विद्यार्थ्याला मदत करा. येशूने आपल्या शिष्यांना प्रचार करायला पाठवलं तेव्हा कदाचित त्यांना भीती वाटली असेल. पण कुणाला प्रचार करायचा आणि काय बोलायचं हे येशूने त्यांना शिकवलं आणि त्यांच्या मनातली भीती नाहीशी केली. (मत्त. १०:५-७) येशूसारखंच तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला कशी मदत करू शकता? विद्यार्थी बायबलबद्दल कोणाकोणाशी बोलू शकतो, याचा विचार करायला त्याला मदत करा. जसं की, बायबलमधून शिकलेल्या एखाद्या गोष्टीचा कुणाला फायदा होऊ शकतो याचा विचार करायला त्याला सांगा. मग ती गोष्ट सोप्या पद्धतीने कशी सांगता येईल, याची तयारी करायला विद्यार्थ्याला मदत करा. टेहळणी बुरूज२१.०६ ६ ¶१५-१६

बुधवार, २८ जून

मी सर्व राष्ट्रांना हलवीन आणि सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तू येतील.—हाग्ग. २:७.

“काही क्षणातच दुकानं आणि जुन्या इमारती धडाधड कोसळू लागल्या.” “सगळीकडे भीती पसरली होती . . . लोक म्हणत होते, की हे सगळं फक्‍त एक-दोन मिनिटंच चालू होतं. पण माझ्यासाठी तो कधीही न संपणारा अनुभव होता.” २०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या भयंकर भूकंपातून वाचलेल्या काहींनी असं म्हटलं. पण सध्या या क्षणाला आपण एका वेगळ्याच प्रकारच्या भूकंपाचे धक्के अनुभवत आहोत. ते धक्के जगातल्या सगळ्या राष्ट्रांना बसत आहेत. त्याबद्दल हाग्गय संदेष्ट्याने असं म्हटलं: “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘थोड्याच काळात, मी पुन्हा एकदा आकाश व पृथ्वी हालवीन.’” (हाग्ग. २:६) हाग्गय संदेष्ट्याने राष्ट्रांना हालवण्याबाबत जे म्हटलं होतं, ते खरोखरच्या भूकंपासारखं नाही. कारण भूकंपामुळे फक्‍त नुकसानच होतं. पण राष्ट्रांना हालवल्यामुळे चांगले परिणाम घडून येतात. याबद्दल यहोवा स्वतः म्हणतो, “मी सर्व राष्ट्रांना हलवीन आणि सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तू येतील आणि मी हे मंदिर माझ्या वैभवाने भरून टाकीन.” टेहळणी बुरूज२१.०९ १४ ¶१-३

गुरुवार, २९ जून

माझ्या परीक्षांमध्येही माझ्यासोबत राहिलेले तुम्हीच आहात.—लूक २२:२८.

एखाद्याशी मैत्री करण्यासाठी त्याच्यासोबत नेहमी बोलणं आणि आपल्याला कसं वाटतं हे त्याला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तरच ती मैत्री घट्ट होऊ शकते. यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट करण्यासाठी आपण हेच केलं पाहिजे. प्रार्थनेत आपण जेव्हा यहोवाला आपल्या भावना, आपले विचार आणि आपल्या चिंता सांगतो, तेव्हा आपण हेच दाखवतो की त्याच्यावर आपला भरवसा आहे आणि आपल्यावर त्याचं प्रेम आहे याची आपल्याला जाणीव आहे. (स्तो. ९४:१७-१९; १ योहा. ५:१४, १५) यासोबतच भाऊबहिणींसोबत वेळ घालवा. कारण आपले भाऊबहीण हे यहोवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. (याको. १:१७) यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला मंडळीतल्या भाऊबहिणींद्वारे मदत करतो. हे भाऊबहीण आपल्यावर “नेहमी प्रेम” करतात. (नीति. १७:१७) प्रेषित पौलने कलस्सैकरांना जे पत्र लिहिलं होतं त्यात त्याने अशा काही भाऊबहिणींचा उल्लेख केला ज्यांनी त्याला खूप मदत केली. त्यांच्याबद्दल तो म्हणतो, की “त्यांनी मला खूप सांत्वन दिलं.” (कलस्सै. ४:१०, ११) यहोवाने येशूलासुद्धा त्याच्या काही मित्रांद्वारे आणि स्वर्गदूतांद्वारे मदत केली, आणि त्यासाठी येशूने यहोवाचे खूप आभार मानले. (लूक २२:४३) मंडळीतल्या एखाद्या प्रौढ भावाशी किंवा बहिणीशी आपण आपल्या समस्यांबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की आपला विश्‍वास कमजोर आहे. उलट त्यामुळे आपलं संरक्षणच होतं. टेहळणी बुरूज२१.०४ २४-२५ ¶१४-१६

शुक्रवार, ३० जून

प्रेम सगळं सहन करतं, सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं, सगळ्या गोष्टींची आशा धरतं, सगळ्या बाबतींत धीर धरतं.—१ करिंथ. १३:७.

एखाद्या भावाच्या किंवा बहिणीच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तर आपण काय केलं पाहिजे? अशा वेळी आपण शांती टिकवायचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं हे आपण यहोवाला सांगितलं पाहिजे. त्या भावासाठी किंवा बहिणीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्या गुणांमुळे यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो ते गुण आपल्यालाही दिसावेत यासाठी आपण त्याच्याकडे मदत मागितली पाहिजे. (लूक ६:२८) त्यांनी केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला कठीण जात असेल तर अशा वेळी आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांनी मुद्दाम आपलं मन दुखावलं आहे असा आपण कधीच विचार करू नये. (मत्त. ५:२३, २४) ते आपल्याशी असं का वागले हे जेव्हा ते आपल्याला सांगतात तेव्हा आपण त्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. एवढं करूनसुद्धा समोरची व्यक्‍ती मतभेद मिटवायला तयार नसेल तर बायबल म्हणतं, की तिचं “सहन करत राहा,” तिच्याशी धीराने वागा. (कलस्सै. ३:१३) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्‍तीबद्दल आपण मनात राग ठेवू नये. नाहीतर यहोवासोबतचं आपलं नातं बिघडेल. इतरांचं वागणं-बोलणं आपण कधीच मनाला लावून घेऊ नये. असं करून आपण दाखवून देऊ, की दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवावर आपलं सगळ्यात जास्त प्रेम आहे.—स्तो. ११९:१६५. टेहळणी बुरूज२१.०६ २३ ¶१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा