वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es23 पृ. ५४-६५
  • मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
  • उपशिर्षक
  • सोमवार, १ मे
  • मंगळवार, २ मे
  • बुधवार, ३ मे
  • गुरुवार, ४ मे
  • शुक्रवार, ५ मे
  • शनिवार, ६ मे
  • रविवार, ७ मे
  • सोमवार, ८ मे
  • मंगळवार, ९ मे
  • बुधवार, १० मे
  • गुरुवार, ११ मे
  • शुक्रवार, १२ मे
  • शनिवार, १३ मे
  • रविवार, १४ मे
  • सोमवार, १५ मे
  • मंगळवार, १६ मे
  • बुधवार, १७ मे
  • गुरुवार, १८ मे
  • शुक्रवार, १९ मे
  • शनिवार, २० मे
  • रविवार, २१ मे
  • सोमवार, २२ मे
  • मंगळवार, २३ मे
  • बुधवार, २४ मे
  • गुरुवार, २५ मे
  • शुक्रवार, २६ मे
  • शनिवार, २७ मे
  • रविवार, २८ मे
  • सोमवार, २९ मे
  • मंगळवार, ३० मे
  • बुधवार, ३१ मे
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२३
es23 पृ. ५४-६५

मे

सोमवार, १ मे

ज्याने . . . सहन केलं त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या.—इब्री १२:३.

येशूला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी यहोवाने शुभवर्तमानाची चार पुस्तकं बायबलमध्ये दिली आहेत. त्यांमध्ये येशूच्या जीवनाबद्दल आणि सेवाकार्याबद्दल माहिती दिली आहे. येशू काय बोलला, त्याने काय केलं आणि त्याला कसं वाटलं, या सगळ्या गोष्टी त्यांत सांगितल्या आहेत. शुभवर्तमानाची ही चार पुस्तकं येशूच्या उदाहरणाकडे बारकाईने लक्ष द्यायला आपल्याला मदत करतात. आपण जितका जास्त या पुस्तकांचा अभ्यास करू तितकं जास्त आपण येशूला ओळखू. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करता येईल. येशूला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी शुभवर्तमानाच्या पुस्तकांचं फक्‍त वाचन करणं पुरेसं नाही; तर त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं आणि त्यांवर खोलवर मनन करणंही खूप महत्त्वाचं आहे. (यहोशवा १:८ तळटीप, पडताळून पाहा.) शुभवर्तमानाच्या पुस्तकांमधल्या घटनांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करा. एखादा अहवाल वाचताना त्यातल्या घटना पाहण्याचा, ऐकण्याचा आणि तुम्ही तिथे असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं, याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्या संघटनेच्या प्रकाशनांमध्ये संशोधन करा. टेहळणी बुरूज२१.०४ ४-५ ¶११-१३

मंगळवार, २ मे

आपण तर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो. तो यहुद्यांसाठी अडखळण्याचं कारण [आहे].—१ करिंथ. १:२३.

येशू पृथ्वीवर यायच्या कितीतरी शतकांआधी यहोवाने आपल्या वचनात सांगितलं होतं, की चांदीच्या ३० तुकड्यांसाठी मसीहाचा विश्‍वासघात केला जाईल. (जख. ११:१२, १३) तसंच, त्याच्या जवळच्या मित्रांपैकीच एक जण त्याचा विश्‍वासघात करेल असंही सांगितलं होतं. (स्तो. ४१:९) जखऱ्‍या संदेष्ट्यानेसुद्धा असं म्हटलं होतं: “मेंढपाळाला मार, आणि मेंढरांची पांगापांग होऊ दे.” (जख. १३:७) भविष्यवाण्यांमध्ये सांगितलेल्या या सगळ्या घटना येशूच्या बाबतीत पूर्ण होताना पाहून प्रामाणिक मनाच्या लोकांनी त्याला नक्कीच नाकारलं नसेल. उलट त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत झाला असेल. आजही हेच पाहायला मिळतं का? हो. आज आपल्या काळात असे काही लोक सत्य सोडून गेले आहेत ज्यांना बरेच लोक ओळखायचे. ते धर्मत्यागी बनले आणि इतरांनीही यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं म्हणून ते प्रयत्न करत आहेत. वृत्तपत्रं, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांवरून ते यहोवाच्या साक्षीदारांबद्दल चुकीची, नकारात्मक आणि खोटी माहिती पसरवतात. पण जे प्रामाणिक मनाचे असतात ते अशा माहितीवर विश्‍वास ठेवत नाहीत. कारण या गोष्टी घडतील असं बायबलमध्ये आधीच सांगितलं आहे हे त्यांना माहीत आहे.—मत्त. २४:२४; २ पेत्र २:१८-२२. टेहळणी बुरूज२१.०५ ११ ¶१२; १२-१३ ¶१८-१९

बुधवार, ३ मे

नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो; दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखा तो असतो.—नीति. ४:१८.

बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, की देवाचं अचूक ज्ञान हे काळानुसार वाढत जातं. (कलस्सै. १:९, १०) ‘दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखं’ देव हळूहळू सत्य प्रकट करतो. त्यामुळे आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. नियमन मंडळाला जेव्हा जाणवतं, की एखाद्या गोष्टीबद्दल आपली जी समज होती किंवा एखादी गोष्ट आपण ज्या पद्धतीने करत होतो, त्यामध्ये बदल करायची गरज आहे, तेव्हा ते लगेच तो बदल करतात. आज अनेक चर्चसुद्धा आपल्या शिकवणींमध्ये बदल करतात. पण हे बदल, ते आपल्या सदस्यांना खूश करण्यासाठी किंवा जगातल्या बदलत्या विचारसरणीशी जुळवून घेण्यासाठी करतात. यहोवाचे साक्षीदार मात्र देवासोबत आणखी जवळचं नातं जोडण्यासाठी आणि येशूने शिकवलेल्या पद्धतीने उपासना करण्यासाठी आपल्या शिकवणीत बदल करतात. (याको. ४:४) आपण हे बदल, जगातल्या लोकांच्या बदलत्या विचारसरणीनुसार नाही, तर शास्त्रवचनं आणखी चांगल्या प्रकारे समजल्यामुळे करतो. कारण सत्यावर आपलं प्रेम आहे.—१ थेस्सलनी. २:३, ४. टेहळणी बुरूज२१.१० २२ ¶१२

गुरुवार, ४ मे

आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या.—१ पेत्र ५:७.

तुम्हाला एकटंएकटं वाटतं तेव्हा तुम्ही काय करू शकता? यहोवा कशा प्रकारे तुम्हाला सांभाळतो याचा विचार करा. (स्तो. ५५:२२) त्यामुळे तुम्ही एकटे आहात असं कधीच तुम्हाला वाटणार नाही. ज्या भाऊबहिणींना समस्या आहेत त्यांना यहोवा कशी मदत करतो याचाही विचार करा. (१ पेत्र ५:९, १०) हरीश नावाचा एक भाऊ बऱ्‍याच वर्षांपासून एकटाच सत्यात आहे. तो म्हणतो, “प्रत्येक जण यहोवाची होईल तितकी सेवा करतो हे पाहून आमच्यासारख्यांना, जे एकटेच सत्यात आहेत खूप प्रोत्साहन मिळतं.” तसंच, नियमितपणे प्रार्थना करा, बायबल वाचा आणि सभांना उपस्थित राहा. तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे प्रार्थनेत यहोवाला सांगा. आपण नियमितपणे बायबल वाचणं आणि खासकरून अशा वृत्तान्तांवर मनन करणं महत्त्वाचं आहे, ज्यांतून दिसून येतं, की यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. काही भाऊबहीण दिलासा देणारी शास्त्रवचनं तोंडपाठ करतात. जसं की, स्तोत्र २७:१० आणि यशया ४१:१०. तर इतर काही जण सभांची तयारी करण्यासाठी किंवा बायबल वाचण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर करतात. त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवत नाही. टेहळणी बुरूज२१.०६ ९-१० ¶५-८

शुक्रवार, ५ मे

अचानक येणाऱ्‍या कोणत्याही संकटाला, . . . तू घाबरणार नाहीस.—नीति. ३:२५.

जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यामुळे तुम्ही दुःखातून सावरायचा प्रयत्न करत आहात का? तर मग, बायबलमध्ये दिलेल्या अशा लोकांचे अहवाल वाचा ज्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं. त्यामुळे, तुमच्या प्रिय व्यक्‍तीलाही पुन्हा जिवंत केलं जाईल यावरचा तुमचा विश्‍वास आणखी वाढेल. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्‍तीला बहिष्कृत केल्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात का? मग बायबलचा अभ्यास करून स्वतःला याची खातरी पटवून द्या, की यहोवा जेव्हा शिस्त लावतो तेव्हा ते आपल्या भल्यासाठीच असतं. तुमच्यासमोर कोणतीही समस्या असोत, तिचा वापर आपला विश्‍वास वाढवण्यासाठी करा. यहोवासमोर आपलं मन मोकळं करा. आणि एकटं-एकटं राहू नका, तर आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवा. (नीति. १८:१) तुमची समस्या आठवून तुम्हाला कदाचित खूप रडायला येत असेल. पण तरी यहोवाची सेवा करत राहा. (स्तो. १२६:५, ६) नियमितपणे सभांना जा, प्रचार कार्य करा आणि रोज बायबल वाचा. तसंच, पुढे यहोवा आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे त्यांवर विचार करत राहा. यहोवा कशा प्रकारे तुम्हाला मदत करत आहे हे जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा तुमचा विश्‍वास आणखी वाढेल. टेहळणी बुरूज२१.११ २३ ¶११; २४ ¶१७

शनिवार, ६ मे

त्याच प्रकारे, या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या पित्याची इच्छा नाही.—मत्त. १८:१४.

येशूचे शिष्य आणखी कोणत्या अर्थाने ‘लहान’ आहेत? आज जगात सहसा पैसा, नाव, सत्ता असलेल्या लोकांना जास्त महत्त्व दिलं जातं. पण येशूच्या शिष्यांकडे सहसा या गोष्टी नसतात. त्यामुळे जगाचे लोक त्यांना महत्त्व देत नाही. जगासाठी ते ‘लहान’ आहेत. (१ करिंथ. १:२६-२९) पण यहोवा त्यांच्याबद्दल तसा विचार करत नाही. येशू ‘या लहानांबद्दल’ का बोलला? कारण शिष्यांनी त्याला विचारलं होतं, “स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण” आहे. (मत्त. १८:१) त्या काळात यहुद्यांना, समाजात मानाचं पद हवं होतं. आणि लोकांनी त्यांना खूप महत्त्व द्यावं असंही त्यांना वाटत होतं. एका लेखकाने त्यांच्याबद्दल असं म्हटलं, की “आदर, मानसन्मान, मोठं नाव या गोष्टी त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या.” बहुतेक यहुदी असा विचार करायचे, की आपण इतरांपेक्षा फार श्रेष्ठ आहोत. येशूचे शिष्यही असाच विचार करायचे. त्यामुळे शिष्यांना आपली ही विचारसरणी बदलायला खूप मेहनत घ्यावी लागेल हे येशूला माहीत होतं. टेहळणी बुरूज२१.०६ २० ¶२; २१ ¶६, ८; २२ ¶९

रविवार, ७ मे

तेल आणि धूप यांमुळे जसा मनाला आनंद होतो, तसाच प्रामाणिक सल्ल्याने जुळलेल्या मैत्रीच्या गोड नात्यानेही होतो.—नीति. २७:९.

वडिलांसाठी प्रेषित पौलने एक चांगलं उदाहरण मांडलं. जेव्हा थेस्सलनीका इथल्या मंडळीतल्या लोकांना सल्ला देण्याची गरज होती, तेव्हा पौल त्यांना सल्ला द्यायला कचरला नाही. पण सल्ला देण्याआधी त्याने आपल्या पत्रात थेस्सलनीका इथल्या भाऊबहिणींनी विश्‍वासूपणे केलेल्या कार्याबद्दल, त्यांनी प्रेमळपणे घेतलेल्या परिश्रमांबद्दल आणि दाखवलेल्या धीराबद्दल त्यांची प्रशंसा केली. इतकंच नाही, तर त्याने त्यांची परिस्थिती समजून घेतली. त्यांना किती समस्यांचा आणि छळाचा सामना करावा लागत असेल याचा विचार केला. (१ थेस्सलनी. १:३; २ थेस्सलनी. १:४) शिवाय, त्याने त्यांना हेसुद्धा सांगितलं, की ते इतर भाऊबहिणींसाठी एक चांगलं उदाहरण आहेत. (१ थेस्सलनी. १:८, ९) पौलने त्यांचं केलेलं हे कौतुक ऐकून त्यांना किती आनंद झाला असेल. पौलचं तिथल्या भाऊबहिणींवर खरंच खूप प्रेम होतं. त्यामुळे आपल्या दोन्ही पत्रात पौलने थेस्सलनीकाकरांना जो सल्ला दिला, तो त्यांनी आनंदाने स्वीकारला.—१ थेस्सलनी. ४:१, ३-५, ११; २ थेस्सलनी. ३:११, १२. टेहळणी बुरूज२२.०२ १५ ¶६

सोमवार, ८ मे

तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही.—प्रकटी. २१:४.

सैतान धर्मगुरूंचा वापर करून यहोवावर असे खोटे आरोप लावतो, की तो क्रूर आहे आणि तोच माणसांवर दुःख आणतो. मुलांचा मृत्यू होतो तेव्हा काही जण तर असंही म्हणतात, की देवाला त्यांची गरज होती, म्हणून त्याने त्यांना नेलं. पण हे किती खोटं आहे! कारण आपल्याला माहीत आहे, की यहोवा एक प्रेमळ पिता आहे आणि तो असं कधीच करणार नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादा गंभीर आजार होतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा आपण कधीच यहोवाला दोष देणार नाही. उलट, आपल्याला असा भरवसा आहे, की एक दिवस तो सगळ्या आजाऱ्‍यांना बरं करेल आणि मृतांना जिवंत करेल. म्हणून यहोवा किती प्रेमळ आहे हे आपण लोकांना सांगतो. असं केल्यामुळे टोमणे मारणाऱ्‍या सैतानाला यहोवा उत्तर देऊ शकेल. (नीति. २७:११) यहोवा खूप दयाळू देव आहे. त्यामुळे त्याच्या सेवकांना छळामुळे, आजारपणामुळे किंवा अपरिपूर्णतेमुळे दुःख सहन करावं लागतं तेव्हा त्याला ते पाहवत नाही. (स्तो. २२:२३, २४) आपल्याला दुःखात पाहून त्यालाही दुःख होतं. म्हणूनच त्याला हे सगळं काढून टाकायचं आहे. आणि लवकरच तो तसं करणार आहे.—निर्गम ३:७, ८; यशया ६३:९ पडताळून पाहा. टेहळणी बुरूज२१.०७ ९-१० ¶९-१०

मंगळवार, ९ मे

तू त्याला गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट घातलास.—स्तो. ८:५.

यहोवाचं ऐकणाऱ्‍या मानवांना लवकरच एक खास आशीर्वाद मिळेल. तो म्हणजे, कायम त्याच्यावर प्रेम करायचा आणि त्याची उपासना करायचा आशीर्वाद! आदाम आणि हव्वाच्या चुकीच्या निर्णयामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या त्या सगळ्या येशू काढून टाकेल. तसंच, यहोवा लाखो लोकांना जिवंत करेल आणि त्यांना बागेसारख्या सुंदर पृथ्वीवर कायम जगण्याची संधी देईल. (लूक २३:४२, ४३) यहोवाची सेवा करणारे परिपूर्ण होतील तेव्हा दावीदने म्हटल्याप्रमाणे ते जणू काय “गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट” घालतील. तुम्ही जर ‘मोठ्या लोकसमुदायातले’ असाल तर तुम्ही नेहमी काय लक्षात ठेवलं पाहिजे? हेच, की तुम्हाला एक सुंदर आशा आहे. (प्रकटी. ७:९) यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही त्याच्या कुटुंबाचे सदस्य व्हावं असं त्याला वाटतं. त्यामुळे त्याला आवडतील अशा गोष्टी करायचा प्रयत्न करा. नेहमी त्याची अभिवचनं लक्षात ठेवा. आणि त्याची उपासना करायचा आणि गौरव करायचा जो बहुमान तुम्हाला मिळाला आहे त्याची कदर करा. टेहळणी बुरूज२१.०८ ७ ¶१८-१९

बुधवार, १० मे

जर आपण खचून गेलो नाही, तर . . . आपल्या पदरी पीक पडेल.—गलती. ६:९.

यिर्मया संदेष्ट्याने ४० पेक्षा जास्त वर्षं संदेश सांगितला. पण लोकांनी त्याचं ऐकलं नाही. उलट त्याचा विरोध केला. लोकांनी त्याचा इतका “अपमान आणि थट्टा” केली की तो निराश झाला आणि स्वतःला म्हणाला, की ‘मी यापुढे संदेश सांगणार नाही.’ (यिर्म. २०:८, ९) पण यिर्मयाने हार मानली नाही! मग कोणत्या गोष्टीने त्याला निराशेवर मात करायला आणि आनंदाने प्रचार करायला मदत केली? त्याने दोन गोष्टी लक्षात ठेवल्या. पहिली म्हणजे, तो जो संदेश सांगत होता तो ‘चांगल्या भविष्याबद्दल आणि आशेबद्दल’ होता. (यिर्म. २९:११) दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाने त्याला आपल्या वतीने संदेश सांगण्यासाठी निवडलं होतं. (यिर्म. १५:१६) आपणही निराशेने भरलेल्या या जगात आशेचा संदेश देतो. आणि आपण यहोवाचे साक्षीदार म्हणून त्याच्या नावाने ओळखले जातो. जेव्हा आपण या गोष्टी लक्षात ठेवतो, तेव्हा आपल्यालाही आनंदाने प्रचार करत राहायला मदत होईल; मग लोकांचा प्रतिसाद कसाही असला तरी! म्हणून जर विद्यार्थ्याला प्रगती करायला वेळ लागत असेल, तर निराश होऊन हार मानू नका. कारण शिष्य बनवण्याच्या कामात धीराने वाट पाहायची गरज आहे.—याको. ५:७, ८. टेहळणी बुरूज२१.१० २७ ¶१२-१३

गुरुवार, ११ मे

आपण प्रत्येक ओझं आणि सहज अडकवणारं पाप काढून टाकू या.—इब्री १२:१.

आपण कितीही वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी आपण आपला विश्‍वास मजबूत करत राहिला पाहिजे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे. नाहीतर, तो कमजोर होऊ शकतो. विश्‍वास हा न पाहिलेल्या गोष्टींच्या पुराव्यांवर आधारित असतो, हे लक्षात घ्या. पण आपण जे पाहू शकत नाही ते आपण सहज विसरू शकतो. त्यामुळे आपला विश्‍वास मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. पौलनेसुद्धा असं म्हटलं, की कमजोर विश्‍वास असं पाप आहे जे सहज आपल्याला अडकवतं. तर मग, आपण आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी काय करू शकतो? (२ थेस्सलनी. १:३) पहिली गोष्ट म्हणजे, पवित्र शक्‍तीसाठी यहोवाकडे वारंवार विनंती करा. कारण विश्‍वास असा गुण आहे जो पवित्र शक्‍ती आपल्याला वाढवायला मदत करते. (गलती. ५:२२, २३) आणि पवित्र शक्‍तीच्या मदतीशिवाय आपण निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास वाढवू शकत नाही आणि तो टिकवूनही ठेवू शकत नाही. म्हणून नेहमी यहोवाकडे पवित्र शक्‍ती मागा. तो ती तुम्हाला नक्की देईल. (लूक ११:१३) आपण यहोवाकडे अशीसुद्धा विनंती करू शकतो, की “आमचा विश्‍वास वाढव.” (लूक १७:५) दुसरी गोष्ट म्हणजे, बायबलचा नियमित अभ्यास करा.—स्तो. १:२, ३. टेहळणी बुरूज२१.०८ १८-१९ ¶१६-१८

शुक्रवार, १२ मे

पिकलेले केस मानाच्या मुकुटासारखे असतात.—नीति. १६:३१.

वयस्कर भाऊबहिणींकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. वयामुळे म्हणावी तितकी ताकद जरी त्यांच्यामध्ये नसली, तरी त्यांच्याकडे बऱ्‍याच वर्षांचा अनुभव आहे. आणि त्यांच्या या अनुभवाचा यहोवा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून घेतो. उदाहरणार्थ, बायबल अशा विश्‍वासू सेवकांबद्दल सांगतं ज्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यहोवाची सेवा केली. मोशेचंच उदाहरण घ्या. यहोवाचा संदेष्टा म्हणून सेवा करण्यासाठी आणि इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने त्याला निवडलं तेव्हा तो जवळजवळ ८० वर्षांचा होता. तसंच, दानिएलने आयुष्याची ९० पेक्षा जास्त वर्षं पार केल्यानंतर यहोवाने त्याला आपल्या वतीने बोलण्यासाठी निवडलं. आणि प्रेषित योहानलासुद्धा वयाची ९० वर्षं पार केल्यानंतर प्रकटीकरणाचं पुस्तक लिहायची प्रेरणा मिळाली. बायबलमध्ये ‘शिमोन नावाच्या एका नीतिमान आणि देवाची भीती बाळगणाऱ्‍या माणसाचा’ खूप थोडक्यात उल्लेख केला आहे. पण यहोवाचं त्याच्याकडे लक्ष होतं. आणि ‘ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय’ तो मरणार नाही असं यहोवाने त्याला सांगितलं होतं. तसंच, येशूबद्दल आणि त्याच्या आईबद्दल भविष्यवाणी करण्याचा बहुमानही त्याला मिळाला होता.—लूक २:२२; २५-३५. टेहळणी बुरूज२१.०९ ३-४ ¶५-७

शनिवार, १३ मे

हे यहोवा, माझं मन गर्विष्ठ नाही, . . . किंवा माझ्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी करण्याची, मी इच्छा बाळगत नाही.—स्तो. १३१:१.

आईवडिलांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. किंवा आपलं मूल जितकं करू शकतं त्यापेक्षा जास्त त्याच्याकडून अपेक्षा करू नये. कारण अशाने मुलं निराश होऊ शकतात. (इफिस. ६:४) संचिता नावाची एक बहीण म्हणते, “माझ्या आईला वाटायचं, की परीक्षेत मी १०० टक्के मिळवले पाहिजेत. पण माझ्यासाठी ते अशक्य होतं. आता शाळा सोडून बरीच वर्षं झाली आहेत. पण तरीसुद्धा, यहोवासाठी मी जी काही मेहनत घेते त्यामुळे तो खूश होत असेल का, असा प्रश्‍न काही वेळा मला पडतो.” दावीद म्हणतो, “मोठमोठ्या गोष्टी करण्याची; किंवा माझ्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी करण्याची, मी इच्छा बाळगत नाही.” दावीद नम्र होता. आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही याची त्याला जाणीव होती. या जाणिवेमुळे त्याचं मन शांत आणि स्थिर झालं. (स्तो. १३१:२) दावीदच्या या शब्दांतून आईवडील काय शिकू शकतात? हेच, की त्यांनी नम्र असलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःकडून आणि आपल्या मुलांकडूनसुद्धा जास्तीची अपेक्षा ठेवू नये. आपली मुलं काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन आईवडिलांनी त्यांना ध्येयं ठेवायला मदत केली पाहिजे. त्यामुळे मुलं ती ध्येयं गाठू शकतील आणि त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटणार नाही. टेहळणी बुरूज२१.०७ २१-२२ ¶५-६

रविवार, १४ मे

प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५.

यहोवाने प्रत्येकाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. याचाच अर्थ, यहोवाची उपासना करायची की नाही हे प्रत्येक जण स्वतः ठरवू शकतो. काही मुलांच्या बाबतीत असं घडलं आहे, की आईवडिलांचं चांगलं उदाहरण समोर नसतानाही त्यांनी यहोवाची उपासना करायची निवड केली. तर काहींच्या बाबतीत असं घडलं, की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सत्यात खूप चांगलं वाढवलं होतं. पण नंतर ती मुलं यहोवाला सोडून गेली. यावरून दिसून येतं, की यहोवाची सेवा करायचा निर्णय हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे. (यहो. २४:१५) त्यामुळे आईवडिलांनो, जेव्हा तुमचं मूल यहोवाला सोडून देतं तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. काही वेळा आई किंवा वडील यहोवाला आणि कुटुंबालाही सोडून देतात. (स्तो. २७:१०) असं घडतं तेव्हा मुलांवर फार वाईट परिणाम होतो. कारण मुलांचं आईवडिलांवर खूप प्रेम असतं. मुलांनो, जर तुमच्या आईला किंवा वडिलांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं असेल, तर यहोवालाही तुमचं दुःख समजतं याची खातरी तुम्ही बाळगू शकता. यहोवा तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही त्याला विश्‍वासू राहता याचा त्याला खूप आनंद होतो. याशिवाय, तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा, की तुमच्या आईने किंवा वडिलांनी जो निर्णय घेतला आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. टेहळणी बुरूज२१.०९ २७ ¶५-७

सोमवार, १५ मे

यहोवा ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो सुधारतो.—इब्री १२:६.

मंडळीतून बहिष्कृत केलेली व्यक्‍ती ही एका आजारी मेंढरासारखीच असते. तिच्यामुळे इतर मेंढरांमध्येही तो आजार पसरू शकतो. देवासोबतचं तिचं नातं कमजोर झाल्यामुळे ती एका अर्थाने आजारीच असते. (याको. ५:१४) आणि खरोखरच्या आजारासारखंच हा आजारसुद्धा तिच्यामुळे इतरांना होऊ शकतो. म्हणून काही वेळा अशा व्यक्‍तीला मंडळीपासून दूर ठेवणं गरजेचं असतं. तिला मंडळीतून बहिष्कृत केलं जातं, तेव्हा यहोवाला मंडळीतल्या इतर विश्‍वासू सदस्यांची काळजी आहे, हे दिसून येतं. तसंच, बहिष्कृत केलेल्या व्यक्‍तीलासुद्धा आपल्या गंभीर चुकांची जाणीव होते आणि पश्‍चात्ताप करायला मदत होते. पण ती व्यक्‍ती बहिष्कृत असली तरी मंडळीच्या सभांना येऊ शकते. तसंच, व्यक्‍तिगत अभ्यासासाठी ती मंडळीतून प्रकाशनं घेऊ शकते. आणि JW ब्रॉडकास्टिंगसुद्धा पाहू शकते. या सगळ्या गोष्टींमुळे ती देवासोबतचं आपलं नातं पुन्हा बळकट करू शकते. इतकंच नाही, तर ती स्वतःमध्ये बदल करत आहे, हे पाहून मंडळीतले वडीलसुद्धा वेळोवेळी तिला सल्ला आणि मार्गदर्शन देत असतात. त्यामुळे त्या व्यक्‍तीला पुन्हा एकदा मंडळीत साक्षीदार म्हणून स्वीकारलं जाऊ शकतं. टेहळणी बुरूज२१.१० १० ¶९, ११

मंगळवार, १६ मे

मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही.—मत्त. ७:२१.

पहिल्या शतकातली ख्रिस्ती मंडळी ज्या प्रकारे देवाची उपासना करायची, त्याच प्रकारे आज आपण करतो. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात प्रेषितांनी जी व्यवस्था घालून दिली होती, तशीच व्यवस्था आज आपल्यामध्ये दिसून येते. पहिल्या शतकाप्रमाणेच आज आपल्यातसुद्धा प्रवासी पर्यवेक्षक, ख्रिस्ती वडील आणि सहायक सेवक आहेत. (फिलिप्पै. १:१; तीत १:५) तसंच, लैंगिक संबंध आणि विवाह, रक्‍ताचा वापर आणि मंडळीच्या संरक्षणासाठी पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीला बहिष्कृत करण्याची व्यवस्था या गोष्टींच्या बाबतीत पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा जो दृष्टिकोन होता तोच आपलासुद्धा आहे. (प्रे. कार्यं १५:२८, २९; १ करिंथ. ५:११-१३; ६:९, १०; इब्री १३:४) बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, की देवाला मान्य असलेला विश्‍वास “एकच” आहे. (इफिस. ४:४-६) यहोवाचे लोक असल्याचा खूप मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे. आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकायला मिळालं, हासुद्धा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. त्यामुळे आपण जे मानतो तेच सत्य आहे याची आपण पक्की खातरी बाळगू शकतो! टेहळणी बुरूज२१.१० २२-२३ ¶१५-१७

बुधवार, १७ मे

तुम्ही फक्‍त आपल्या जागी स्थिर उभे राहा आणि यहोवा तुम्हाला कसं वाचवेल ते पाहा.—२ इति. २०:१७.

यहोशाफाटला एकदा एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अम्मोनी, मवाबी आणि सेईरच्या डोंगराळ प्रदेशातल्या लोकांचं एक भलंमोठं सैन्य त्याच्यावर चाल करून आलं. (२ इति. २०:१, २) मग यहोशाफाटने काय केलं? त्याने मदतीसाठी यहोवाकडे याचना केली. त्याने यहोवाला किती कळकळून प्रार्थना केली ते आपल्याला २ इतिहास २०:५-१२ मध्ये वाचायला मिळतं. स्वर्गातल्या आपल्या प्रेमळ पित्यावर त्याचा खरंच खूप भरवसा होता हे त्याच्या शब्दांवरून दिसून येतं. यहोवाने यहजिएल नावाच्या एक लेव्याचा वापर करून यहोशाफाटला आजच्या वचनातले शब्द म्हटले. यहोशाफाटने यहोवाच्या शब्दांवर भरवसा ठेवून, जसं सांगितलं होतं तसंच केलं. तो आणि त्याचे लोक शत्रूंचा सामना करायला गेले तेव्हा त्याने आपल्या सैन्यासमोर शूर योद्ध्यांना नाही, तर यहोवाची स्तुती करणाऱ्‍या लेव्यांना ठेवलं. त्या लेव्यांच्या हातांत कोणतंही शस्त्र नव्हतं. यहोशाफाटने दाखवलेला हा भरवसा यहोवाने वाया जाऊ दिला नाही. त्याने शत्रूच्या सैन्यांचा नाश केला.—२ इति. २०:१८-२३. टेहळणी बुरूज२१.११ १५-१६ ¶६-७

गुरुवार, १८ मे

यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच आमचा नाश झाला नाही, कारण त्याची दया कधीच संपत नाही.—विलाप. ३:२२.

आपल्यावर संकटं येतात तेव्हा यहोवा त्याच्यासोबतचं आपलं नातं जपायला आपल्याला मदत करतो. (२ करिंथ. ४:७-९) यहोवा कायम आपल्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहील याची खातरी आपण बाळगू शकतो. कारण स्तोत्रकर्त्याने असं म्हटलं: “यहोवाचं भय मानणाऱ्‍यांवर; त्याच्या एकनिष्ठ प्रेमाची आस धरणाऱ्‍यांवर त्याची नजर असते.” (स्तो. ३३:१८-२२) यहोवाचे सेवक बनण्याआधी आपण यहोवाचं ते प्रेम अनुभवलं, जे तो सगळ्याच मानवांना दाखवतो. पण त्याचे सेवक बनल्यानंतर आपण त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचाही अनुभव घेत आहोत. या एकनिष्ठ प्रेमामुळेच यहोवा आपल्याला आधार देतो आणि आपलं संरक्षण करतो. या प्रेमापोटीच तो कधीही आपली साथ सोडणार नाही. आणि आपल्याबद्दल असलेला त्याचा उद्देश तो जरूर पूर्ण करेल. कारण त्याच्यासोबतचं आपलं मैत्रीचं नातं कायम टिकून राहावं असं त्याला वाटतं. (स्तो. ४६:१, २, ७) त्यामुळे आपल्यासमोर कोणतीही परीक्षा आली, तरी यहोवा शेवटपर्यंत आपल्याला विश्‍वासू राहायचं बळ देईल, याची खातरी आपण बाळगू शकतो. टेहळणी बुरूज२१.११ ७ ¶१७-१८

शुक्रवार, १९ मे

एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.—कलस्सै. ३:१३.

तुम्ही पाहिलंच असेल, की कामावरच्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये, नातेवाइकांमध्ये किंवा कुटुंबामध्ये काही जण वर्षानुवर्षं मनात राग बाळगून असतात. योसेफच्या भावांच्या मनातसुद्धा अशाच प्रकारचा राग होता. आणि या द्वेषामुळेच पुढे जाऊन ते त्याच्याशी खूप वाईट वागले. (उत्प. ३७:२-८, २५-२८) पण योसेफ त्यांच्याशी तसं वागला नाही. पुढे जेव्हा त्याला मोठा अधिकार मिळाला तेव्हा तो त्यांचा बदला घेऊ शकत होता. पण त्याने दया दाखवली. त्यांच्याबद्दल त्याने मनात राग धरला नाही. उलट, लेवीय १९:१८ मध्ये दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो वागला. (उत्प. ५०:१९-२१) योसेफने आपल्या भावांबद्दल मनात राग धरला नाही किंवा बदला घेतला नाही. आणि असं करून त्याने आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण मांडलं. येशूने एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करायला सांगितलं. (मत्त. ६:९, १२) प्रेषित पौलनेसुद्धा ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका.”—रोम. १२:१९. टेहळणी बुरूज२१.१२ ११ ¶१३-१४

शनिवार, २० मे

त्याचं भय मानणाऱ्‍या सर्वांची इच्छा तो पूर्ण करतो; तो त्यांची मदतीची याचना ऐकून त्यांना सोडवतो.—स्तो. १४५:१९.

इ.स. ३३ च्या निसान १४ तारखेला रात्रीच्या वेळी येशू गेथशेमाने बागेत गेला. तिथे त्याने यहोवासमोर आपलं मन मोकळं केलं. (लूक २२:३९-४४) त्या वेळी येशूने ‘देवाला, आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना केल्या.’ (इब्री ५:७) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली? शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्याने त्याच्याकडे बळ मागितलं. आपल्या मुलाने केलेल्या कळकळीच्या याचना यहोवाने ऐकल्या आणि एका स्वर्गदूताला पाठवून त्याला बळ दिलं. येशूला माहीत होतं की अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या पित्याला विश्‍वासू राहून त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवण्याची एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. येशूने केलेल्या कळकळीच्या विनंत्या यहोवाने का ऐकल्या? कारण येशूसाठी आपल्या पित्याला एकनिष्ठ राहणं आणि त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. या गोष्टी आपल्यासाठीही तितक्याच महत्त्वाच्या असतील, तर मदतीसाठी आपण केलेल्या प्रार्थना यहोवा नक्की ऐकेल.—स्तो. १४५:१८. टेहळणी बुरूज२२.०१ १८ ¶१५-१७

रविवार, २१ मे

म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा, . . . बाप्तिस्मा द्या, [आणि] शिकवा.—मत्त. २८:१९, २०.

आपण राजकारणात भाग घेत नाही त्यामुळे अनेक जण आपला विरोध करतात. आपण मतदान करावं असं त्यांना वाटतं. पण आपल्याला माहीत आहे, की आपण जर एखाद्या मानवी नेत्याला निवडलं, तर आपण यहोवाला नाकारू. (१ शमु. ८:४-७) लोकांना असंही वाटत असेल की आपण शाळा, हॉस्पिटल बांधावेत किंवा दानधर्म करावं. पण जगाच्या समस्या सोडवण्याऐवजी आपण आपलं पूर्ण लक्ष प्रचारकार्यावर लावतो म्हणून लोक आपला संदेश ऐकत नाहीत. आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो? (मत्त. ७:२१-२३) आपण आपलं पूर्ण लक्ष येशूने दिलेलं काम पूर्ण करण्यावर लावलं पाहिजे. जगाच्या राजकीय आणि सामाजिक समस्या सोडवण्याच्या मागे आपण लागू नये. आपलं लोकांवर प्रेम नाही किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी नाही, असं नाही. पण आपल्याला माहीत आहे की लोकांना मदत करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे, त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवणं आणि यहोवासोबत जवळची मैत्री करायला मदत करणं. टेहळणी बुरूज२१.०५ ७ ¶१९-२०

सोमवार, २२ मे

शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल.—२ तीम. ३:१.

आज अनेक देशांचे राज्यकर्ते देवाची उपासना करायचा दावा तर करतात, पण आपल्या सत्तेचा आणि अधिकाराचा त्याग करायला ते तयार नसतात. त्यामुळे येशूच्या दिवसांत जसं झालं, तसंच आजही होत आहे. आज अनेक राज्यकर्ते येशूच्या शिष्यांचा छळ करत आहेत. आणि असं करून ते यहोवाच्या अभिषिक्‍ताचा, म्हणजे येशूचा विरोध करत आहेत. (प्रे. कार्यं ४:२५-२८) यहोवा त्यांच्याशी कसा वागतो? याबद्दल स्तोत्र २:१०-१२ मध्ये असं म्हटलं आहे, “म्हणून राजांनो, आता तरी शहाणे व्हा; पृथ्वीच्या न्यायधीशांनो, दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्या. यहोवाचं भय मानून त्याची सेवा करा, आनंदाने त्याच्याबद्दल आदर बाळगा. देवाच्या मुलाचा सन्मान करा, नाहीतर देव संतापेल आणि तुमचा नाश होईल, कारण देवाचा क्रोध लगेच भडकतो. त्याचा आश्रय घेणारे सुखी आहेत.” यहोवा खूप प्रेमळ आहे, त्यामुळे तो या विरोधकांना त्यांचं मन बदलण्याची आणि आपलं राज्य स्वीकारण्याची संधी देतो. पण वेळ खूप कमी उरला आहे. (यश. ६१:२) त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर सत्य शिकून घेतलं पाहिजे आणि यहोवाची उपासना करण्याची निवड केली पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०९ १५-१६ ¶८-९

मंगळवार, २३ मे

आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.—१ तीम. ६:८.

पौलला असं म्हणायचं होतं, की आपण आहे त्यात समाधानी असलं पाहिजे. (फिलिप्पै. ४:१२) आज आपल्यासाठीसुद्धा कोणत्याही भौतिक गोष्टी नाही, तर यहोवासोबत असलेलं आपलं नातं जास्त मोलाचं आहे. (हब. ३:१७, १८) इस्राएली लोकांनी ४० वर्षं ओसाड रानात काढल्यानंतर मोशे त्यांना काय म्हणाला त्याचा विचार करा. तो म्हणाला: “तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आशीर्वाद दिलाय . . . . या सबंध ४० वर्षांत तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत होता आणि तुम्हाला काहीच कमी पडलं नाही.” (अनु. २:७) या ४० वर्षांदरम्यान यहोवाने त्यांना खाण्यासाठी मान्‍ना दिला होता. तसंच, इजिप्त सोडताना जे कपडे त्यांच्याजवळ होते, ते या ४० वर्षांत कधीच जुने झाले नाहीत. (अनु. ८:३, ४) आपणही आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा पुरवत असलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचीही जर आपण मनापासून कदर केली, आणि त्यांना आशीर्वाद मानून त्यांबद्दल आभार मानले तर तो खूश होईल. टेहळणी बुरूज२२.०१ ५ ¶१०-११

बुधवार, २४ मे

यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून राहू नकोस.—नीति. ३:५.

पतींनो, तुमच्यावरही कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि घरच्यांना सांभाळण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही नक्कीच खूप मेहनत घेत असाल. पण जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेल, की ‘ही समस्या मी स्वतः सोडवू शकतो.’ पण अशा वेळी स्वतःच्या ताकदीवर विसंबून राहण्याची चूक करू नका. उलट, मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. इतकंच नाही, तर आपल्या पत्नीसोबत मिळून यहोवाला कळकळीची विनंती करा. तसंच, बायबलचा आणि संघटनेच्या प्रकाशनांचा अभ्यास करा आणि त्यातून मिळालेलं मार्गदर्शन आणि सल्ला लागू करा. बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा सगळ्यांनाच ते पटणार नाही. ‘जगात पैशाशिवाय काही चालत नाही. पैसा आहे, तर सगळं आहे,’ असंही ते म्हणतील. पण अशा वेळी यहोशाफाट राजाचं उदाहरण लक्षात ठेवा. (२ इति. २०:१-३०) तो यहोवावर विसंबून राहिला आणि ही गोष्ट त्याने आपल्या कामातून दाखवून दिली. यहोवाने आपल्या या विश्‍वासू सेवकाला सोडलं नाही, आणि तो तुम्हालाही सोडणार नाही.—स्तो. ३७:२८; इब्री १३:५. टेहळणी बुरूज२१.११ १५ ¶६; १६ ¶८

गुरुवार, २५ मे

देव . . . कधीच अन्याय करत नाही.—अनु. ३२:४.

आपल्याला यहोवाच्या प्रतिरूपा बनवलं आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय झालेला आपल्याला पाहवत नाही. (उत्प. १:२६) पण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याकडून कधीकधी अन्याय होऊ शकतो. आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपल्याला सगळं माहीत आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडून चूक होऊ शकते. उदाहरणार्थ, यहोवाने निनवेच्या लोकांना दया दाखवायचा निर्णय घेतला तेव्हा तो योनाला आवडला नाही. (योना ३:१०–४:१) पण खरंतर काय घडलं? निनवेच्या १,२०,००० पेक्षा जास्त लोकांनी पश्‍चाताप केला आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला! खरंच, यहोवाला नाही तर योनाला आपल्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज होती. यहोवाला त्याच्या निर्णयांबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. हे खरं आहे, की पूर्वी यहोवाने आपल्या काही निर्णयांबद्दल त्याच्या सेवकांना चिंता व्यक्‍त करू दिल्या. (उत्प. १८:२५; योना ४:२, ३) आणि काही वेळा तर त्याने त्याबद्दल स्पष्टीकरणही दिलं. (योना ४:१०, ११) पण यहोवाला कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याला आपल्याला विचारायची गरज नाही.—यश. ४०:१३, १४; ५५:९. टेहळणी बुरूज२२.०२ ३-४ ¶५-६

शुक्रवार, २६ मे

तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याने सगळ्यात लहान झालं पाहिजे. आणि पुढाकार घेणाऱ्‍याने इतरांची सेवा केली पाहिजे.—लूक २२:२६.

आपण “इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ” समजतो तेव्हा आपण स्वतःला “लहान” समजतो. (फिलिप्पै. २:३) आपण नेहमी असं वागलो तर आपण इतरांचं मन दुखावणार नाही. आपण इतरांमधल्या चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येकामध्ये आपल्यापेक्षा काही ना काही चांगलं आहे हे आपल्या लक्षात येईल. पौलने करिंथकरांना असा सल्ला दिला, “तुमच्यामध्ये विशेष असं काय आहे? खरंतर, तुमच्याजवळ असं काय आहे, जे तुम्हाला देण्यात आलेलं नाही? मग, जर तुम्हाला ते देण्यात आलं आहे, तर तुम्ही ते स्वतःच्या बळावर मिळवल्यासारखी बढाई का मारता?” (१ करिंथ. ४:७) या सल्ल्यावर आपणसुद्धा विचार केला पाहिजे. इतरांनी आपली वाहवा करावी अशी अपेक्षा आपण करू नये, किंवा आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू नये. जसं की, एखादा भाऊ चांगली भाषणं देत असेल किंवा एखादी बहीण भरपूर बायबल अभ्यास घेत असेल तर त्यांनी याचं सगळं श्रेय यहोवाला दिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०६ २२ ¶९-१०

शनिवार, २७ मे

बी पेर आणि . . . आपल्या हाताला विश्रांती देऊ नकोस.—उप. ११:६.

आजकाल लोकांना घरी भेटणं खूप कठीण झालं आहे. कारण बरेच लोक अशा ठिकाणी किंवा अशा बिल्डींगमध्ये राहतात जिथे आपल्याला जायची परवानगी नसते; तर काही ठिकाणी घरोघर जाऊन साक्षकार्य करणं शक्य असतं, पण फार कमी लोक घरी भेटतात. आणि अशीही काही गावं आहेत जिथे खूप कमी लोक राहतात. एका घरापासून दुसऱ्‍या घरापर्यंत जाण्यासाठी प्रचारकांना खूप प्रवास करावा लागतो. आणि इतका प्रवास करून गेल्यावरही घरमालक घरी भेटेलच याची काही शाश्‍वती नसते. अशा समस्या आपल्यासमोर असतील तर आपण निराश होऊन प्रचार करायचं सोडून देऊ नये. वेगवेगळ्या वेळी लोकांना भेटायचा प्रयत्न करा. लोक सहसा घरी असतात अशा वेळी जर आपण प्रचारकार्य केलं, तर आपल्याला जास्तीत जास्त लोक भेटू शकतात. कारण लोक कितीही वेळ बाहेर असले तरी शेवटी ते घरी येतातच! त्यामुळे बरेच भाऊबहीण दुपारी किंवा संध्याकाळी प्रचारकार्य करतात. कारण त्या वेळी बरेच लोक घरी असतात. शिवाय, त्या वेळी लोक सहसा निवांत असतात आणि बोलायला तयार असतात. टेहळणी बुरूज२१.०५ १५ ¶५, ७

रविवार, २८ मे

ते माझी उपासना करत असले, तरी ती व्यर्थ आहे कारण ते माणसांच्या आज्ञा, देवाचे सिद्धान्त म्हणून शिकवतात.—मार्क ७:७.

आजही हेच पाहायला मिळतं का? हो. यहोवाचे साक्षीदार वाढदिवस, न्यू-ईयर किंवा नाताळ यांसारखे सणवार आणि परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे अनेकांना त्यांचा खूप राग येतो. तर इतर काही जण यहोवाच्या साक्षीदारांवर यामुळे रागवतात कारण ते देशभक्‍तीच्या कार्यक्रमांमध्ये आणि बायबलवर आधारित नसलेल्या अंत्यविधीच्या प्रथांमध्ये भाग घेत नाहीत. साक्षीदारांबद्दल राग बाळगणाऱ्‍या या लोकांना मनापासून असं वाटत असेल की ते ज्या प्रकारे देवाची उपासना करतात ती त्याला मान्य आहे. पण बायबलमध्ये स्पष्टपणे दिलेल्या शिकवणी पाळण्याऐवजी त्यांनी जर मानवी परंपरा पाळल्या, तर ते देवाला कधीच खूश करू शकणार नाहीत. (मार्क ७:८, ९) आपण अडखळू नये म्हणून काय करू शकतो? आपण यहोवावर, त्याने दिलेल्या नीति-नियमांवर आणि तत्त्वांवर असलेलं आपलं प्रेम वाढवू शकतो. (स्तो. ११९:९७, ११३, १६३-१६५) यामुळे यहोवाला न आवडणाऱ्‍या रूढी-परंपरा आपण पाळणार नाही. खरंतर, यहोवापेक्षा जास्त कुठल्याच गोष्टीवर आपण प्रेम करणार नाही. टेहळणी बुरूज२१.०५ ६ ¶१५-१६

सोमवार, २९ मे

सगळ्या बाबतींत सावध राहा, संकटात धीर धर, प्रचारकाचं काम कर.—२ तीम. ४:५.

आपण प्रेषित पौलचा हा सल्ला कसा लागू करू शकतो? बायबलचा नियमितपणे अभ्यास करून, प्रार्थना करून आणि यहोवाने दिलेल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवून आपण आपला विश्‍वास मजबूत केला पाहिजे. (२ तीम. ४:४) आपला विश्‍वास जर मजबूत असेल, तर यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सांगितलेल्या नकारात्मक गोष्टी ऐकून आपण घाबरून जाणार नाही. (यश. २८:१६) तसंच, यहोवावर, बायबलवर आणि आपल्या भाऊबहिणींवर जर आपलं प्रेम असेल, तर सत्य सोडून गेलेल्या लोकांमुळे आपण अडखळणार नाही. पहिल्या शतकात अनेक जण येशूमुळे अडखळले आणि त्यांनी त्याला नाकारलं. पण असेही अनेक जण होते ज्यांनी त्याला स्वीकारलं. जसं की, यहुदी न्यायसभेचा एक सदस्य आणि ‘याजकांपैकी बरेच जण.’ (प्रे. कार्यं ६:७; मत्त. २७:५७-६०; मार्क १५:४३) तसंच, आजसुद्धा लाखो लोक येशूचे शिष्य बनले आहेत. कारण शास्त्रवचनांत दिलेली सत्यं त्यांना माहीत आहेत आणि त्यांवर त्यांचं प्रेम आहे. आणि बायबलमध्ये म्हटलं आहे: “तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्‍यांना खूप शांती मिळते; ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत.”—स्तो. ११९:१६५. टेहळणी बुरूज२१.०५ १३ ¶२०-२१

मंगळवार, ३० मे

दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.—२ करिंथ. १२:९.

प्रेषित पौलला याची जाणीव होती, की त्याने यहोवाच्या सेवेत जे काही केलं ते स्वतःच्या नाही, तर देवाच्या ताकदीमुळेच केलं. पौलला छळाचा, तुरुंगवासाचा आणि इतर समस्यांचा सामना करावा लागला, तरी त्याने आपलं सेवाकार्य पूर्ण केलं. हे तो देवाच्या पवित्र शक्‍तीमुळेच करू शकला. पौलसोबत सेवा करणारा तीमथ्य, तरुण होता. त्यालासुद्धा देवाच्या ताकदीवर विसंबून राहावं लागलं. कारण पौल जेव्हा दूरदूरच्या मिशनरी दौऱ्‍यांवर जायचा तेव्हा तीमथ्यसुद्धा त्याच्यासोबत असायचा. याशिवाय, पौल तीमथ्यला मंडळ्यांना प्रोत्साहन द्यायलाही पाठवायचा. (१ करिंथ. ४:१७) पण आपण ही जबाबदारी सांभाळू शकणार नाही असं कदाचित तीमथ्यला वाटलं असेल. आणि म्हणून कदाचित पौल त्याला म्हणाला, “तुझ्या तरुण वयामुळे तुला कोणीही तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे.” (१ तीम. ४:१२) तसंच, या काळात तीमथ्य सारखा आजारी पडायचा. म्हणजे एका अर्थाने त्याच्याही शरीरात एक काटा होता. (१ तीम. ५:२३) पण तीमथ्यला माहीत होतं, की यहोवा त्याला प्रचार करण्यासाठी आणि आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी त्याची पवित्र शक्‍ती देईल.—२ तीम. १:७. टेहळणी बुरूज२१.०५ २१ ¶६-७

बुधवार, ३१ मे

आपल्या मेंढरांची चांगली काळजी घे.—नीति. २७:२३.

सल्ला देण्याच्या बाबतीत याकोब १:१९ मध्ये दिलेलं तत्त्व आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे याकोबने म्हटलं: “प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं; लगेच रागावू नये.” एखाद्या वडिलाला कदाचित असं वाटेल, की आपल्याला त्या व्यक्‍तीची सगळी परिस्थिती माहीत आहे. पण खरंच तसं आहे का? नीतिवचनं १८:१३ मध्ये जे सांगितलं आहे त्याकडे लक्ष द्या. तिथं म्हटलं आहे: “जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो, त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.” त्यामुळे थेट त्या व्यक्‍तीशी बोलूनच त्याची परिस्थिती काय आहे, हे समजून घेणं चांगलं आहे. एखाद्याला सल्ला देण्याआधी वडिलांनी त्याचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. एक वडील कदाचित विचारतील: “कसं चाललंय, सगळं ठिकए ना?” आपले भाऊबहीण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे वडिलांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यांना मदत करणं आणि प्रोत्साहन देणं सोपं जाईल. चांगला सल्ला देण्यासाठी फक्‍त काही वचनं दाखवणं किंवा काही गोष्टी सुचवणं पुरेसं नाही; तर आपल्या भाऊबहिणींना हे जाणवलं पाहिजे, की आपल्याला त्यांची काळजी आहे, आपण त्यांना समजून घेतो आणि आपल्याला त्यांना मदत करायची इच्छा आहे. टेहळणी बुरूज२२.०२ १७ ¶१४-१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा