वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es22 पृ. १२४-१३५
  • नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ नोव्हेंबर
  • बुधवार, २ नोव्हेंबर
  • गुरुवार, ३ नोव्हेंबर
  • शुक्रवार, ४ नोव्हेंबर
  • शनिवार, ५ नोव्हेंबर
  • रविवार, ६ नोव्हेंबर
  • सोमवार, ७ नोव्हेंबर
  • मंगळवार, ८ नोव्हेंबर
  • बुधवार, ९ नोव्हेंबर
  • गुरुवार, १० नोव्हेंबर
  • शुक्रवार, ११ नोव्हेंबर
  • शनिवार, १२ नोव्हेंबर
  • रविवार, १३ नोव्हेंबर
  • सोमवार, १४ नोव्हेंबर
  • मंगळवार, १५ नोव्हेंबर
  • बुधवार, १६ नोव्हेंबर
  • गुरुवार, १७ नोव्हेंबर
  • शुक्रवार, १८ नोव्हेंबर
  • शनिवार, १९ नोव्हेंबर
  • रविवार, २० नोव्हेंबर
  • सोमवार, २१ नोव्हेंबर
  • मंगळवार, २२ नोव्हेंबर
  • बुधवार, २३ नोव्हेंबर
  • गुरुवार, २४ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २५ नोव्हेंबर
  • शनिवार, २६ नोव्हेंबर
  • रविवार, २७ नोव्हेंबर
  • सोमवार, २८ नोव्हेंबर
  • मंगळवार, २९ नोव्हेंबर
  • बुधवार, ३० नोव्हेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
es22 पृ. १२४-१३५

नोव्हेंबर

मंगळवार, १ नोव्हेंबर

जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो, त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.—नीति. १८:१३.

योनाच्या परिस्थितीबद्दल आपल्याला सगळं काही माहीत नसल्यामुळे कदाचित आपण असा विचार करू की योना भरवशालायक नव्हता. तो अविश्‍वासू होता असाही कदाचित आपण विचार करू. त्याला निनवेला जाऊन न्यायदंडाचा संदेश घोषित करायची आज्ञा स्वतः यहोवाने दिली होती. पण तसं करण्याऐवजी योना एका जहाजात बसून उलट दिशेने, यहोवाच्या “दृष्टिआड” जायला निघाला. (योना १:१-३) ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही योनाला आणखी एक संधी दिली असती का? कदाचित नाही. पण यहोवाने त्याला पुन्हा एकदा संधी दिली. (योना ३:१, २) योना खरोखर कसा होता हे त्याने यहोवाला केलेल्या प्रार्थनेवरून दिसून येतं. (योना २:१, २, ९) तो नक्कीच यहोवाला बऱ्‍याच वेळा प्रार्थना करत असेल. पण त्याने माशाच्या पोटातून केलेल्या प्रार्थनेवरून कळतं, की तो पळून गेला असला तरी त्याच्यात पुष्कळ चांगले गुण होते. त्याच्या शब्दांवरून दिसून येतं, की तो नम्र, उपकारांची जाणीव ठेवणारा आणि यहोवाच्या आज्ञा पाळणारा माणूस होता. म्हणूनच, यहोवाने फक्‍त योनाच्या चुकीकडे लक्ष दिलं नाही. तर, त्याने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि पुढेही संदेष्टा म्हणून त्याचा वापर केला! यावरून दिसतं की, एखाद्याला सल्ला देण्याआधी वडिलांनी त्याचं “ऐकून” घेणं किती महत्त्वाचं आहे! टेहळणी बुरूज२०.०४ १५ ¶४-६

बुधवार, २ नोव्हेंबर

पौल त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला. आणि शास्त्रवचनांच्या आधारावर स्पष्ट करून त्यांना पटवून देत राहिला.—प्रे. कार्यं १७:२, ३.

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ताबद्दलच्या शिकवणी स्वीकारल्या आणि देवाचं वचन समजून घेण्यासाठी ते पवित्र आत्म्यावर विसंबून राहिले. या शिकवणी शास्त्रवचनावर आधारित आहेत हे स्वतःला पटवून देण्यासाठी त्यांनी संशोधन केलं. (प्रे. कार्ये १७:११, १२; इब्री ५:१४) त्यांनी आपला विश्‍वास फक्‍त भावनांच्या आधारावर वाढवला नाही. किंवा भाऊबहिणींच्या सहवासात चांगलं वाटतं म्हणून त्यांनी यहोवाची सेवा केली नाही, तर यहोवाबद्दल अचूक ज्ञान मिळवून त्यांनी आपला विश्‍वास वाढवला. (कलस्सै. १:९, १०) बायबलमधली सत्यं कधीही बदलत नाहीत. (स्तो. ११९:१६०) एखाद्या भावाने किंवा बहिणीने आपलं मन दुखावलं किंवा गंभीर पाप केलं तेव्हाही बायबलची सत्यं बदलत नाहीत. जेव्हा आपल्यासमोर समस्या येतात तेव्हासुद्धा ती बदलत नाहीत. म्हणून बायबलची सत्यं आपण चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजेत, आणि ती खरी आहेत याची आपल्याला खातरी असली पाहिजे. आपला विश्‍वास जर बायबलच्या सत्यांवर आधारलेला असेल, तर परीक्षा येतात तेव्हा तो डळमळणार नाही. ज्या प्रकारे वादळी समुद्रात नांगर एका नावेला एका ठिकाणी खिळवून ठेवतो, अगदी त्याच प्रकारे आपला विश्‍वास टिकून राहील. टेहळणी बुरूज२०.०७ ९ ¶६-७

गुरुवार, ३ नोव्हेंबर

त्याने आम्हाला लोकांकडे जाऊन प्रचार करायचा आणि पूर्ण साक्ष द्यायचा आदेश दिला.—प्रे. कार्यं १०:४२.

येशूच्या अभिषिक्‍त भावांना केलेलं सहकार्य हे येशूलाच केल्यासारखं आहे असा तो विचार करतो. (मत्त. २५:३४-४०) अभिषिक्‍त भावांना सहकार्य करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे, येशूने सांगितलेल्या शिष्य बनवण्याच्या कामात मनापासून सहभाग घेणं. (मत्त. २८:१९, २०) ख्रिस्ताचे भाऊ ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ मदतीनेच जगभरात मोठ्या प्रमाणावर चाललेलं प्रचाराचं काम पूर्ण करू शकतात. (योहा. १०:१६) तुम्ही दुसऱ्‍या मेंढरांपैकी एक असाल तर प्रत्येक वेळी प्रचारकार्यात भाग घेताना, तुम्ही फक्‍त अभिषिक्‍त भावांवरच नाही तर येशूवरसुद्धा प्रेम असल्याचं दाखवत असता. यहोवा आणि येशू जगभरात चाललेल्या राज्याच्या कामाचं मार्गदर्शन करत आहेत. त्या कामाला आपण आर्थिक रीत्या हातभार लावण्याद्वारे यहोवा आणि येशूसोबत मैत्री करतो. (लूक १६:९) जसं की, जगभरात चाललेल्या कामासाठी, तसंच एखाद्या आपत्तीमुळे ज्या भाऊबहिणींचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत पुरवण्यासाठीही आपण दान देऊ शकतो. शिवाय, आपल्या मंडळीच्या खर्चांसाठी आणि अडचणीत असलेल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठीसुद्धा आपण दान देऊ शकतो.—नीति. १९:१७. टेहळणी बुरूज२०.०४ २४ ¶१२-१३

शुक्रवार, ४ नोव्हेंबर

तो आपल्या वाडवडिलांच्या देवाचा सन्मान करणार नाही. त्याच्या ऐवजी तो किल्ल्यांच्या देवाचा गौरव करेल.—दानी. ११:३७, ३८.

भविष्यवाणीत सांगितल्यानुसार “वाडवडिलांच्या देवाचा सन्मान” नसल्याचं उत्तरेच्या राजाने कसं दाखवलं? सोव्हियत संघाने धर्मांचा नाश करायचा, असं ठरवलं. आणि म्हणून त्याने पूर्वीपासून असलेल्या धार्मिक संघटनांचा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न केला. खरंतर १९१८ पासूनच सोव्हियत संघाने शाळेत नास्तिकवादाची शिकवण शिकवण्याचा आदेश दिला होता. उत्तरेच्या राजाने “किल्ल्यांच्या देवाचा गौरव” कसा केला? सोव्हियत संघाने आपलं सैन्य मजबूत करण्यासाठी अमाप पैसा खर्च केला. तसंच, त्याने हजारो आण्विक शस्त्रं बनवून आपली ताकद वाढवली. उत्तरेच्या राजाने आणि दक्षिणेच्या राजाने इतकी शस्त्रं जमवली आहेत की ते करोडो लोकांना मारून टाकू शकतात. उत्तरेच्या राजाने आणि दक्षिणेच्या राजाने एकत्र मिळून एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. त्यांनी उद्ध्‌वस्त करणाऱ्‍या “अमंगलाची” म्हणजेच घृणास्पद गोष्टीची स्थापना केली आहे. ती घृणास्पद गोष्ट म्हणजे संयुक्‍त राष्ट्र संघ.—दानी. ११:३१. टेहळणी बुरूज२०.०५ ६-७ ¶१६-१७

शनिवार, ५ नोव्हेंबर

तुझा भाऊ हरवला होता आणि आता सापडलाय.—लूक १५:३२.

अक्रियाशील झालेल्यांना शोधण्यासाठी कोण मदत करू शकतं? मंडळीतले वडील, पायनियर, प्रचारक, त्या व्यक्‍तीच्या कुटुंबातले सदस्य असे सगळेच त्या व्यक्‍तीला शोधून काढण्यासाठी मदत करू शकतात. तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक अक्रियाशील झाला आहे का? किंवा घरोघरचं साक्षकार्य करताना, सार्वजनिक साक्षकार्य करताना तुमची एखाद्या अक्रियाशील व्यक्‍तीशी भेट झाली आहे का? तर मग तुम्ही त्या व्यक्‍तीला समजावून सांगू शकता, की मंडळीच्या वडिलांनी तिची भेट घ्यावी अशी जर तिची इच्छा असेल तर ती तिचा पत्ता आणि फोन नंबर आपल्याला देऊ शकते, म्हणजे आपल्याला ती माहिती पुढे मंडळीतल्या वडिलांना देता येईल. थॉमस नावाचे एक वडील म्हणतात: “सर्वात आधी मी प्रचारकांना विचारतो, की त्यांना असं कोणी माहीत आहे का ज्यांनी सभांना यायचं बंद केलं आहे. तसंच, सध्या ते कुठे राहतात हेही मी त्यांना विचारतो. मग अक्रियाशील भाऊबहिणींना भेटल्यावर मी त्यांना त्यांच्या मुलांबद्दल आणि इतर नातेवाइकांबद्दल विचारतो. यांच्यापैकी काही जण आपल्या मुलांना सभांना घेऊन यायचे. कदाचित त्यांची ही मुलं एकेकाळी प्रचारकही असतील. त्यामुळे यहोवाकडे परत यायला आपण त्यांनासुद्धा मदत करू शकतो.” टेहळणी बुरूज२०.०६ २४ ¶१; २५ ¶६-७.

रविवार, ६ नोव्हेंबर

मी याहची कार्यं आठवीन; तू फार पूर्वी केलेल्या पराक्रमांची मी आठवण करीन.—स्तो. ७७:११.

पृथ्वीवर असलेल्या सर्व सजीवांपैकी फक्‍त मानवांमध्येच नैतिक धडे शिकण्याची क्षमता आहे. जीवनात घडलेल्या घटना आणि अनुभव यांवरून मानव खूप काही शिकू शकतात. यामुळे मानवांना त्यांच्या स्तरांमध्ये आणि विचारसरणीमध्ये चांगले बदल करता येतात. (१ करिंथ. ६:९-११; कलस्सै. ३:९, १०) त्यासोबतच ते चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी त्यांच्या विवेकाला प्रशिक्षित करू शकतात. (इब्री ५:१४) आपण प्रेम, करूणा आणि दया दाखवायला शिकू शकतो. तसंच, यहोवासारखं चांगल्या गोष्टींवर प्रेम करायला आणि वाईट गोष्टींचा द्वेष करायलाही आपण शिकू शकतो. यहोवाने आपल्याला गोष्टी आठवणीत ठेवण्याची देणगी दिली आहे. याबद्दल कदर बाळगण्याचा एक मार्ग म्हणजे त्याने आपल्याला केलेली मदत आणि दिलेलं सांत्वन याची नेहमी आठवण ठेवणं. यामुळे तो भविष्यातही आपल्याला मदत करेल यावर आपला भरवसा वाढतो. (स्तो. ७७:१२; ७८:४, ७) देवाने दिलेल्या देणगीबद्दल कदर बाळगण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इतरांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण ठेवणं आणि त्याबद्दल कृतज्ञ असणं. शोधकर्त्यांच्या मते इतरांच्या उपकारांची जाणीव ठेवणारे लोक सहसा जास्त आनंदी असतात. टेहळणी बुरूज२०.०५ २३ ¶१२-१३

सोमवार, ७ नोव्हेंबर

तुमचा देव यहोवा याच्या वैभवशाली आणि विस्मयकारक नावाचं भय माना.—अनु. २८:५८.

मोशेसोबत एकदा काय घडलं याचा विचार करा. तो खडकाच्या मोठ्या भेगेत लपला होता आणि यहोवाचं तेज समोरून जात होतं. ते पाहून त्याला कसं वाटलं असेल याचा जरा विचार करा. खरंच, कोणत्याही मानवासाठी हा एक अनोखाच अनुभव असला असेल! त्या वेळी देवदूताने म्हटलेले शब्द मोशेने ऐकले. त्याने म्हटलं: “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, आणि प्रेमदया व सत्य यात उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे.” (निर्ग ३३:१७-२३; ३४:५-७, पं.र.भा.) पुढे आजच्या वचनातले शब्द बोलताना मोशेने जेव्हा यहोवाचं नाव वापरलं, तेव्हा त्याला ही घटना नक्कीच आठवली असेल. आपण जेव्हा यहोवा या नावाचा विचार करतो, तेव्हा आपण त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचाही विचार केला पाहिजे. आपण त्याची शक्‍ती, बुद्धी, न्याय आणि प्रेम या गुणांवर विचार केला पाहिजे. त्याच्या या आणि इतर गुणांवर विचार केल्यामुळे, आपल्या मनात त्याच्याबद्दल आणखी आदर वाढेल.—स्तो. ७७:११-१५. टेहळणी बुरूज२०.०६ ८-९ ¶३-४

मंगळवार, ८ नोव्हेंबर

तू मात्र, ज्या गोष्टी शिकलास आणि ज्यांबद्दल तुला खातरी पटवून देण्यात आली, त्यांचं पालन करत राहा.—२ तीम. ३:१४.

येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, की त्यांचं आपसात प्रेम असेल तर त्यावरून इतरांना दिसून येईल की ते त्याचे शिष्य आहेत. (योहा. १३:३४, ३५) पण आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपल्याला आणखीही काही गोष्टी करण्याची गरज आहे. आपला विश्‍वास फक्‍त भाऊबहिणींच्या ख्रिस्ती प्रेमावरच आधारित नसला पाहिजे. असं आपण का म्हणू शकतो? कारण आपला विश्‍वास फक्‍त या प्रेमावर आधारित असला, तर तो लगेच कमजोर होऊ शकतो. उदाहरणार्थ, मंडळीत वडील असलेला एखादा भाऊ किंवा एखादी पायनियर बहीण गंभीर चूक करते तेव्हा कदाचित आपण यहोवाची सेवा करणं सोडून देऊ. मंडळीतली एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावते किंवा ती धर्मत्यागी बनते आणि आपण जे काही मानतो ते चुकीचं आहे असं ती म्हणते तेव्हासुद्धा कदाचित आपण यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ. त्यामुळे आपला विश्‍वास मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी यहोवासोबत आपलं नातं घनिष्ठ असलं पाहिजे. आपला विश्‍वास यहोवासोबतच्या नात्याऐवजी दुसऱ्‍यांच्या वागण्यावर अवलंबून असेल, तर तो मजबूत नसेल. कारण ज्याप्रमाणे घर बांधण्यासाठी फक्‍त रेती पुरेशी नसते तर सिमेंट, विटा यांसारख्या मजबूत आणि टिकाऊ गोष्टीही गरजेच्या असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्‍वास वाढवण्यासाठी आपल्याला यहोवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल जे काही वाटतं तितकंच पुरेसं नाही, तर बायबलचा सखोल अभ्यास करणं, शिकत असलेल्या गोष्टी समजून घेणं आणि संशोधन करणंही खूप महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे आपण यहोवाबद्दल जे शिकतो त्याची आपल्याला पक्की खातरी होईल.—रोम. १२:२. टेहळणी बुरूज२०.०७ ८ ¶२-३

बुधवार, ९ नोव्हेंबर

दुर्बलांना मदत करा.—प्रे. कार्यं २०:३५.

अनेक अनुभव दाखवून देतात, की ज्यांना यहोवाकडे परत येण्याची इच्छा आहे अशा अक्रियाशील जणांना शोधून काढण्यासाठी देवदूत आपली मदत करत आहेत. (प्रकटी. १४:६) उदाहरणार्थ, एक्क्‌वाडॉरमध्ये राहणारे सिल्वीयो नावाचे बांधव, यहोवाला कळकळून प्रार्थना करत होते की मंडळीत परत येण्यासाठी कोणीतरी त्यांना मदत करावी. ते प्रार्थना करतच होते इतक्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली! दोन वडील त्यांना भेटायला आले होते. त्यांनी त्याच भेटीपासून त्याला यहोवाकडे परत येण्यासाठी लागणारी मदत द्यायला सुरू केली. आध्यात्मिक रीत्या कमजोर झालेल्यांना यहोवाकडे परत येण्यासाठी मदत केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. साल्वडोर नावाचे पायनियर बांधव अक्रियाशील झालेल्यांना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतात. ते म्हणतात, “अक्रियाशील झालेले भाऊबहीण यहोवाकडे परत आलेले पाहून मला इतका आनंद होतो की मला माझे अश्रू आवरत नाहीत. यहोवाने सैतानाच्या जगातून आपल्या प्रिय मेंढराला वाचवलं, आणि या कार्यात यहोवासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होतो.” तुम्ही जर अक्रियाशील झाला असाल तर या गोष्टीची खातरी बाळगा, की यहोवाचं तुमच्यावर अजूनही प्रेम आहे. तुमच्या परत येण्याची तो वाट पाहत आहे. आणि तुम्ही परत याल तेव्हा तो तुमचं आनंदाने स्वागत करेल. टेहळणी बुरूज२०.०६ २९ ¶१६-१८

गुरुवार, १० नोव्हेंबर

तुम्ही तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.—यश. ३०:२०.

यहोवा आपला महान “शिक्षक” असल्यामुळे आपल्याला शिकवण्यासाठी त्याने बायबलमध्ये अनेक लोकांची उदाहरणं दिली आहेत. (यश. ३०:२१) त्यांच्यापैकी अनेकांनी देवाला आवडणारे चांगले गुण दाखवले. त्या उदाहरणांवर मनन केल्यामुळे आपण बरंच काही शिकू शकतो. पण, ज्यांनी असे चांगले गुण दाखवले नाही त्यांच्या बाबतीत जे घडलं त्याचं परीक्षण केल्यामुळेही आपण बरेच धडे घेऊ शकतो. (स्तो. ३७:३७; १ करिंथ. १०:११) शौल राजाच्या बाबतीत काय घडलं त्याचा विचार करा. सुरुवातीला तो खूप नम्र होता. त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. आणि त्यामुळे जेव्हा त्याला एक मोठी जबाबदारी दिली जात होती, तेव्हा ती घ्यायला तो कचरला. (१ शमु. ९:२१; १०:२०-२२) पण राजा बनल्यानंतर मात्र तो गर्विष्ठ बनला. आणि त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्या करण्याचा त्याला अधिकार नव्हता. एकदा शमुवेल संदेष्ट्याची वाट पाहत असताना शौल खूप अधीर झाला आणि त्याने स्वतःच होमार्पण दिलं. खरंतर, असं करण्याचा त्याला अधिकार नव्हता. आणि त्यामुळे शौल यहोवाच्या नजरेतून पडला. आणि शेवटी त्याने आपलं राज्यपदही गमावलं. (१ शमु. १३:८-१४) शौलच्या उदाहरणातून आपण हा धडा शिकतो, की ज्या गोष्टी करण्याचा आपल्याजवळ अधिकार नाही, त्या आपण करू नये. टेहळणी बुरूज२०.०८ १० ¶१०-११

शुक्रवार, ११ नोव्हेंबर

प्रभूच्या सेवेत जे तुमचं नेतृत्व करतात आणि तुम्हाला शिकवतात त्यांचा आदर करा.—१ थेस्सलनी. ५:१२.

हे खरं आहे की यहोवाने येशूद्वारे मंडळीला “माणसांच्या रूपात देणग्या” दिल्या आहेत. (इफिस. ४:८) या देणग्या म्हणजे, नियमन मंडळाचे सदस्य, नियमन मंडळाचे सहायक, शाखा समितीचे सदस्य, विभागीय पर्यवेक्षक, बायबल प्रशालांमध्ये शिकवणारे, मंडळीतले वडील आणि सहायक सेवक. या बांधवांना यहोवाच्या कळपाची काळजी घेण्यासाठी आणि मंडळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केलं जातं. (१ पेत्र ५:२, ३) या बांधवांना वेगवेगळया जबाबदऱ्‍या पार पाडण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केलं जातं. शरीराचे वेगवेगळे भाग संपूर्ण शरीरासाठी काम करतात. जसं की, आपले हात आणि पाय. अगदी तसंच, पवित्र आत्म्याने नियुक्‍त केलेले बांधव संपूर्ण मंडळीच्या फायद्यासाठी खूप मेहनत घेतात. भाऊबहिणींकडून प्रशंसा मिळवण्यासाठी नाही, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते इतकी मेहनत घेतात. (१ थेस्सलनी. २:६-८) असे निःस्वार्थ आणि प्रौढ बांधव दिल्याबद्दल आपण यहोवाचे खूप आभारी आहोत. टेहळणी बुरूज२०.०८ २१ ¶५-६

शनिवार, १२ नोव्हेंबर

जा आणि शिष्य करा.—मत्त. २८:१९.

आपण प्रचार का करतो याचं एक कारण म्हणजे, आज लोक “जखमी झालेले व भरकटलेले” आहेत, आणि त्यामुळे त्यांना राज्याबद्दलचं सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. (मत्त. ९:३६) शिवाय, सगळ्या प्रकारच्या लोकांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं आणि त्यांचं तारण व्हावं, अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) आपल्या प्रचारकार्यामुळे किती चांगले परिणाम घडू शकतात याचा जर आपण विचार केला, तर हे काम करायची प्रेरणा आपल्याला मिळेल. प्रचार करण्याद्वारे आपण लोकांचा जीव वाचवतो. (रोम. १०:१३-१५; १ तीम. ४:१६) आपल्याजवळ प्रचारासाठी लागणारी योग्य साधनं असणं गरजेचं आहे. आणि ती कशी वापरायची हेसुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. प्रचार कसा करायचा याबद्दल येशूने शिष्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. जसं की, प्रचाराला जाताना सोबत काय घ्यायचं, कुठे प्रचार करायचा आणि लोकांशी काय बोलायचं. (मत्त. १०:५-७; लूक १०:१-११) आज आपल्या संघटनेने आपल्याला प्रचारासाठी लागणारी ‘शिकवण्याची साधनं’ दिली आहेत आणि ती खूप प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. ही साधनं कशी वापरायची याचं प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं. या प्रशिक्षणामुळे आपला आत्मविश्‍वास आणि शिकवण्याचं कौशल्य वाढतं.—२ तीम. २:१५. टेहळणी बुरूज२०.०९ ४ ¶६-७, १०

रविवार, १३ नोव्हेंबर

माझी मुलं सत्याच्या मार्गावर चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही.—३ योहा. ४.

प्रेषित योहानने अनेकांना सत्य शिकायला मदत केली होती. ते ख्रिस्ती अजूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत हे जाणून त्याला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो का? त्याच्यासाठी ते विश्‍वासू ख्रिस्ती त्याच्या मुलांसारखेच होते. त्यांच्यासमोर अनेक समस्या होत्या आणि त्यांचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी योहान खूप मेहनत घेत होता. त्याच प्रकारे आपली मुलं किंवा आपण ज्यांना सत्य शिकायला मदत केली आहे, ते जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करतात आणि त्याची सेवा करत राहतात तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो. (३ योहा. ३) इ.स. ९८ मध्ये यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे योहानला तीन पत्रं लिहिण्याची प्रेरणा दिली. विश्‍वासू ख्रिश्‍चनांना येशूवरचा आपला विश्‍वास टिकवून ठेवण्याचं आणि सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी ही पत्रं लिहिण्यात आली. योहानला ख्रिश्‍चनांची खूप काळजी वाटत होती. कारण त्या वेळी मंडळीत ख्रिस्तविरोधी शिरले होते आणि त्यांच्या खोट्या शिकवणींचा ख्रिश्‍चनांवर वाईट परिणाम होत होता. (१ योहा. २:१८, १९, २६) हे धर्मत्यागी लोक देवावर विश्‍वास असल्याचा दावा करत होते, पण त्याच्या आज्ञा मात्र पाळत नव्हते. टेहळणी बुरूज२०.०७ २० ¶१-३

सोमवार, १४ नोव्हेंबर

देवावर विश्‍वास ठेवा आणि माझ्यावरही विश्‍वास ठेवा.—योहा. १४:१.

आपण जो संदेश सांगतो तो खरा असल्याचा आपल्याला विश्‍वास आहे. कारण बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनांवर आपला भरवसा आहे. (स्तो. ११९:४२; यश. ४०:८) तसंच, बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या आपल्या दिवसांत पूर्ण झाल्याचंही आपण पाहिलं आहे. आणि लोक जेव्हा बायबलची तत्त्वं लागू करतात तेव्हा त्यांच्या जीवनात कसा बदल होतो हेसुद्धा आपण पाहिलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो आणि जास्तीत जास्त लोकांना आनंदाचा संदेश सांगायची आपल्याला प्रेरणा मिळते. तसंच, आनंदाचा संदेश देणाऱ्‍या यहोवा देवावर आणि त्याने ज्याला आपल्या राज्याचा राजा म्हणून निवडलं आहे त्या येशू ख्रिस्तावर आपला विश्‍वास आहे. म्हणून आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली, तरी यहोवा आपल्याला सामर्थ्य देईल आणि आपलं संरक्षण करेल याची आपल्याला खातरी आहे. (स्तो. ४६:१-३) तसंच, आपल्याला याचीही खातरी आहे की यहोवाकडून मिळालेल्या अधिकाराचा आणि शक्‍तीचा उपयोग करून आज येशू स्वर्गातून प्रचारकार्याचं मार्गदर्शन करत आहे. (मत्त. २८:१८-२०) विश्‍वासामुळे आपल्याला खातरी मिळते, की यहोवा आपल्या मेहनतीवर नक्की आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज२०.०९ १२ ¶१५-१७

मंगळवार, १५ नोव्हेंबर

तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलंय. तिला जे करता आलं ते तिने केलं.—मार्क १४:६, ८.

काही वेळा एखाद्या समस्येचा सामना करत असताना बहिणींना आपल्या बाजूने बोलणारं कोणीतरी हवं असतं. (यश. १:१७) उदाहरणार्थ, एखाद्या विधवा किंवा घटस्फोट झालेल्या बहिणीला अशी काही कामं करण्यासाठी कोणाची तरी मदत लागू शकते जी कामं आधी तिचे पती करायचे. किंवा एखाद्या वयस्कर बहिणीला डॉक्टरांसोबत बोलण्यासाठी मदत लागू शकते. एखादी पायनियर बहीण संघटनेशी संबंधित एखादं काम करत असेल आणि त्यामुळे तिला कदाचित इतर पायनिरांइतकं प्रचारकार्यात भाग घेता येत नसेल. अशा वेळी काही जण कदाचित तिची टीका करत असतील. त्या वेळीही तिला आपल्या बाजूने बोलणाऱ्‍या व्यक्‍तीची गरज पडू शकते. येशूचं उदाहरण विचारात घ्या. देवाची उपासना करण्याऱ्‍या स्त्रियांबद्दल इतरांना गैरसमज होत आहे, असं येशूला वाटलं तेव्हा तो लगेच त्यांच्या बाजूने बोलला. उदाहरणार्थ, मार्थाने जेव्हा येशूजवळ मरीयाची तक्रार केली तेव्हा तो मरीयाच्या बाजूने बोलला. (लूक १०:३८-४२) तसंच, जेव्हा लोकांना वाटलं की मरीयाने चुकीचा निर्णय घेतला आहे आणि त्याबद्दल ते तिची टीका करू लागले तेव्हासुद्धा येशू तिच्या बाजूने बोलला. (मार्क १४:३-९) मरीयाने असं का केलं हे येशूने समजून घेतलं आणि त्याने तिची प्रशंसा केली. तसंच, येशूने असंही म्हटलं, “जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल तिथे तिथे” तिने केलेल्या या चांगल्या कामाची आठवण केली जाईल. टेहळणी बुरूज२०.०९ २४ ¶१५-१६

बुधवार, १६ नोव्हेंबर

तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा. देखरेख करणारे या नात्याने नाइलाजाने नाही, तर देवासमोर स्वखुषीने सेवा करा.—१ पेत्र ५:२.

एखादं मेंढरू कळपापासून भरकटू शकतं हे एका चांगल्या मेंढपाळाला माहीत असतं. म्हणून, जेव्हा एखादं मेंढरू कळपापासून दूर जातं तेव्हा मेंढपाळ त्याच्याशी कठोरपणे वागत नाही. देवाचे काही सेवक थोड्या काळासाठी त्याच्यापासून भरकटले, तेव्हा त्याने त्यांना कशी मदत केली याचा विचार करा. यहोवाने योना संदेष्ट्याला निनवेला जायला सांगितलं तेव्हा त्याने त्याचं ऐकलं नाही. पण म्हणून योना काहीच कामाचा नाही असं यहोवाने लगेच त्याच्याबद्दल मत बनवलं नाही. एका चांगल्या मेंढपाळाप्रमाणे यहोवाने त्याचा जीव वाचवला आणि त्याला आपली नेमणूक पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकदही दिली. (योना २:७; ३:१, २) नंतर, प्रत्येक माणसाचा जीव किती मोलाचा आहे हे योनाला समजावण्यासाठी यहोवाने भोपळ्याच्या वेलाचा वापर केला. (योना ४:१०, ११) यातून काय शिकायला मिळतं? अक्रियाशील झालेल्यांबद्दल वडील लगेच हार मानत नाहीत. याउलट, एखादं मेंढरू कळपापासून का भरकटलं हे समजून घेण्याचा वडील प्रयत्न करतात. आणि ते जेव्हा परत यहोवाकडे येतं तेव्हा वडील त्याच्याशी प्रेमळपणे वागतात आणि त्याची काळजी घेतात. टेहळणी बुरूज२०.०६ २०-२१ ¶१०-१२

गुरुवार, १७ नोव्हेंबर

त्यांना थोडी मदत केली जाईल.—दानी. ११:३४.

१९९१ मध्ये, जेव्हा सोव्हियत संघ कोसळला तेव्हा त्याच्या अधिकाराखाली असलेल्या देवाच्या लोकांना काही काळासाठी स्वातंत्र्य मिळालं. दानीएलने या स्वातंत्र्याला “थोडी मदत” असं म्हटलं. यामुळे त्यांना मोकळेपणाने प्रचार करता आला. आणि लवकरच सोव्हियत संघाच्या अधिकाराखाली असलेल्या देशांमधल्या प्रचारकांची संख्या लाखोंच्या घरात गेली. काही वर्षांनी रशिया आणि त्याची मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा बनली. एका सरकाराने, उत्तरेचा राजा किंवा दक्षिणेचा राजा बनण्यासाठी तीन गोष्टी करणं गरजेचं होतं. त्या म्हणजे (१) हे सरकार अशा देशावर राज्य करेल जिथे बरेचसे देवाचे लोक राहत असतील किंवा ते त्यांचा छळ करेल. (२) आपल्या कार्यांद्वारे ते दाखवेल की ते यहोवाचा आणि त्याच्या लोकांचा शत्रू आहे. (३) आणि ते सरकार दुसऱ्‍या राजाशी लढत राहील. रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी त्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्‍या देवाच्या लाखो लोकांच्या प्रचारकार्यावर बंदी आणली आणि त्यांचा छळ केला. यावरून दिसून आलं की ते यहोवाचा आणि त्याच्या लोकांचा द्वेष करतात. आणि ते दक्षिणेच्या राजापेक्षा, म्हणजे ब्रिटन-अमेरिका महासत्ता याच्यापेक्षा शक्‍तिशाली बनण्याचा प्रयत्न करत आहेत. टेहळणी बुरूज२०.०५ १२-१३ ¶३-४

शुक्रवार, १८ नोव्हेंबर

तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.—१ तीम. ४:१६.

आपण जर लोकांना चांगल्या प्रकारे शिकवलं तरच ते शिष्य बनतील. म्हणून आपण आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवत राहिलं पाहिजे. आज आपण लाखो लोकांसोबत बायबल अभ्यास करत आहोत. आपण बायबलमधून जे काही शिकवतो ते आपल्याला खूप आवडतं. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला खूप काही बोलावंसं वाटू शकतं. पण कोणताही अभ्यास घेताना आपणच जास्त बोलू नये. मग तो टेहळणी बुरूज अभ्यास असो, मंडळीचा बायबल अभ्यास असो किंवा आपण एखाद्यासोबत करत असलेला बायबल अभ्यास असो. अभ्यास घेणाऱ्‍याने बायबलला बोलू दिलं पाहिजे. त्यासाठी त्याने आत्मसंयम बाळगण्याची गरज आहे. म्हणजे बायबलच्या एखाद्या वचनाबद्दल किंवा विषयाबद्दल त्याला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगण्याचा त्याने प्रयत्न करू नये. (योहा. १६:१२) तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्हाला बायबलचं किती ज्ञान होतं आणि आता किती आहे याचा विचार करा. बाप्तिस्म्याच्या वेळी तुम्हाला बायबलच्या फक्‍त मूलभूत शिकवणी माहीत होत्या. (इब्री ६:१) पण आज तुम्हाला जितकं माहीत आहे, ते शिकण्यासाठी तुम्हाला बरीच वर्षं लागली. त्यामुळे नवीन विद्यार्थ्याला सगळं काही एकाच वेळी शिकवण्याचा प्रयत्न करू नका. टेहळणी बुरूज२०.१० १४-१५ ¶२-४

शनिवार, १९ नोव्हेंबर

हाच तो सुतारकाम करणारा मरीयाचा मुलगा आहे.—मार्क ६:३.

यहोवाने येशूसाठी खूप चांगल्या पालकांची निवड केली. (मत्त. १:१८-२३; लूक १:२६-३८) असं आपण का म्हणू शकतो? कारण, मरीयाचं यहोवावर आणि त्याच्या वचनावर खूप प्रेम होतं. हे तिने मनापासून व्यक्‍त केलेल्या भावनांवरून दिसून येतं. (लूक १:४६-५५) तसंच, यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनाचं योसेफने ज्या प्रकारे पालन केलं, त्यावरून दिसून येतं की त्याचंही देवावर खूप प्रेम होतं आणि त्याला खूश करायची त्याची मनापासून इच्छा होती. (मत्त. १:२४) लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, यहोवाने येशूसाठी श्रीमंत पालकांची निवड केली नाही. येशूच्या जन्मानंतर योसेफ आणि मरीयाने जे बलिदान अर्पण केलं त्यावरून आपल्याला कळतं की ते गरीब होते. (लूक २:२४) त्यांचं राहणीमान खूप साधं असावं; खासकरून, त्यांचं कुटुंब वाढलं तेव्हा. कारण, बायबल म्हणतं, की त्यांना कमीत-कमी सात-आठ मुलं होती. (मत्त. १३:५५, ५६) हे खरं आहे, की यहोवाने काही विशिष्ट धोक्यांपासून येशूचं संरक्षण केलं. पण त्याच्यासमोर येणाऱ्‍या सगळ्याच समस्या देवाने काढून टाकल्या नाहीत. (मत्त. २:१३-१५) उदाहरणार्थ, येशूला घरच्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी सुरुवातीला त्याला मसीहा म्हणून स्वीकारलं नाही. (मार्क ३:२१; योहा. ७:५) तसंच, त्याला आपल्या वडिलांच्या, म्हणेजच योसेफच्या मृत्यूचं दुःखही सहन करावं लागलं. टेहळणी बुरूज२०.१० २६-२७ ¶४-६

रविवार, २० नोव्हेंबर

मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.—इब्री १३:५.

एखाद्या समस्येचा सामना करत असताना आपण एकटेच आहोत, आपल्याला मदत करणारा कोणीच नाही, असं कधी तुम्हाला वाटलं आहे का? अनेकांना असं वाटलं आहे; अगदी यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनासुद्धा. (१ राजे १९:१४) तुम्हाला जर कधी असं वाटलं, तर यहोवाचं हे अभिवचन नेहमी लक्षात ठेवा: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” त्यामुळे आपण पूर्ण भरवशाने असं म्हणू शकतो, की “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.” (इब्री १३:५, ६) प्रेषित पौलने हे शब्द इ.स. ६१ च्या आसपास, यहूदीयामध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना लिहिले होते. त्याच्या या शब्दांमुळे आपल्याला स्तोत्र ११८:५-७ या वचनांत लिहिलेल्या शब्दांची आठवण होते. स्तोत्रकर्त्याप्रमाणेच, पौलला याची खातरी होती, की यहोवा त्याला साहाय्य करेल. कारण यहोवाने त्याला अनेकदा मदत केली होती. उदाहरणार्थ, पौलने इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिलं त्याच्या दोन वर्षांआधी, तो जेव्हा जहाजाने प्रवास करत होता तेव्हा समुद्रात अचानक एक मोठं वादळ आलं. (प्रे. कार्यं २७:४, १५, २०) त्या संपूर्ण प्रवासादरम्यान आणि त्याआधीसुद्धा यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी पौलला मदत केली. टेहळणी बुरूज२०.११ १२ ¶१-२

सोमवार, २१ नोव्हेंबर

“पूर्वीचे दिवस आजच्यापेक्षा चांगले होते,” असं म्हणू नकोस.—उप. ७:१०.

आजच्यापेक्षा पूर्वीचे दिवस चांगले होते असा सतत विचार करणं चुकीचं का आहे? कारण त्यामुळे पूर्वीच्या दिवसांतल्या फक्‍त चांगल्या गोष्टी आपल्याला आठवतील. पण ज्या वाईट गोष्टी आपल्याला सोसाव्या लागल्या होत्या त्यांचा कदाचित आपल्याला विसर पडेल. इस्राएली लोकांचाच विचार करा. इजिप्त देश सोडल्यानंतर ते लगेच हे विसरून गेले, की तिथे त्यांना किती कष्ट करावे लागले होते. याउलट, तिथे आपल्याला किती चांगल्या-चांगल्या गोष्टी खायला मिळायच्या याचीच ते आठवण करत राहिले. ते म्हणायचे: “इजिप्तमध्ये कसे फुकटात मासे खायला मिळायचे, याची आम्हाला खूप आठवण येते; कलिंगड, कांदे, लसूण, काकड्याही खायला मिळायच्या!” (गण. ११:५) पण या सगळ्या गोष्टी त्यांना खरंच “फुकटात” खायला मिळायच्या का? नाही. त्यासाठी त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. तिथे त्यांना गुलामी करावी लागायची आणि त्यांच्यावर खूप जुलूम केले जायचे. (निर्ग. १:१३, १४; ३:६-९) पण तरीही, हे सगळे कष्ट ते विसरून गेले आणि त्यांना जुन्या दिवसांची ओढ वाटू लागली. यहोवाने नुकत्याच त्यांच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या विसरून ते जुने दिवस आठवू लागले. त्यांचं हे वागणं यहोवाला मुळीच आवडलं नाही.—गण. ११:१०. टेहळणी बुरूज२०.११ २४-२५ ¶५-६

मंगळवार, २२ नोव्हेंबर

यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो; निराश असलेल्यांना तो वाचवतो.—स्तो. ३४:१८, तळटीप.

बायबल म्हणतं, की “माणसाचं आयुष्य, फक्‍त काही काळाचं आणि दुःखाने भरलेलं असतं.” (ईयो. १४:१) हे किती खरं आहे! या छोट्या आणि समस्यांनी भरलेल्या आयुष्याचा विचार करून, आपण सगळेच कधी ना कधी निराश होतो. बायबलच्या काळात यहोवाच्या अनेक सेवकांनासुद्धा असंच वाटलं होतं. काहींना तर आपलं जीवनही नकोसं झालं होतं. (१ राजे १९:२-४; ईयो. ३:१-३, ११; ७:१५, १६) पण यहोवाने नेहमी त्यांना धीर आणि बळ दिलं. त्यांच्या उदाहरणांतून आज आपल्याला धीर मिळावा आणि काहीतरी शिकायला मिळावं, म्हणून हे अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आले आहेत. (रोम. १५:४) याकोबचा मुलगा योसेफ याचा विचार करा. एका क्षणातच त्याचं आयुष्य बदलून गेलं. कालपर्यंत जो आपल्या वडिलांचा लाडका होता, तो आता एक गुलाम बनला होता. (उत्प. ३७:३, ४, २१-२८; ३९:१) पुढे पोटीफरच्या बायकोने त्याच्यावर असा खोटा आरोप लावला, की तो तिचा बलात्कार करायचा प्रयत्न करत होता. आणि पोटीफरने खरं काय आहे याची चौकशी न करताच योसेफला तुरुंगात टाकलं. तिथे त्याला साखळ्यांनी बांधण्यात आलं. (उत्प. ३९:१४-२०; स्तो. १०५:१७, १८) या सगळ्या कारणांमुळे योसेफ नक्कीच खूप निराश झाला असेल. टेहळणी बुरूज२०.१२ १६-१७ ¶१-४

बुधवार, २३ नोव्हेंबर

तुझं नाव पवित्र मानलं जावो.—मत्त. ६:९.

प्रार्थना करताना ही विनंती सर्वात महत्त्वाची असली पाहिजे असं येशूने म्हटलं. येशूच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय होता? त्याला असं म्हणायचं होतं, की यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटवला जावो किंवा त्याला शुद्ध केलं जावो. पण काहींच्या मनात असा प्रश्‍न येईल: ‘यहोवाचं नाव तर पवित्रच आहे. मग त्याचं नाव पवित्र करण्याचा नेमका काय अर्थ होतो?’ या प्रश्‍नाचं उत्तर जाणण्याआधी आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, की एखाद्या व्यक्‍तीच्या नावात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. नावाचं महत्त्व फक्‍त कागदावर लिहिण्यापुरतं किंवा फक्‍त हाक मारण्यापुरतं मर्यादित आहे का? बायबल म्हणतं: “पुष्कळ धनापेक्षा नावलौकिक . . . उत्तम आहे.” (नीति. २२:१, पं.र.भा.; उप. ७:१) नावाला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण एका व्यक्‍तीच्या नावावरून चारचौघांत तिची काय ओळख आहे हे समजतं. तेव्हा एका व्यक्‍तीचं नाव कसं लिहिलं जातं किंवा उच्चारलं जातं यापेक्षा, लोक जेव्हा तिचं नाव ऐकतात किंवा पाहतात तेव्हा ते तिच्याबद्दल काय विचार करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक जेव्हा यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवतात तेव्हा खरंतर ते इतरांना त्याच्याबद्दल वाईट विचार करायला लावत असतात. आणि असं केल्यामुळे ते त्याचं नाव बदनाम करायचा प्रयत्न करत असतात. टेहळणी बुरूज२०.०६ २-३ ¶५-७

गुरुवार, २४ नोव्हेंबर

मी खरंच खूप अस्वस्थ झालोय. हे यहोवा, मला सांग, मी अजून किती वाट पाहू?—स्तो. ६:३.

कधीकधी काही समस्यांचा आपण नको तितका विचार करतो आणि चिंतेत बुडून जातो. आपण असा विचार करतो, ‘मला माझ्या कमाईतून माझं घर तर चालवता येईल ना? मी जर आजारी पडलो आणि माझी नोकरी गेली तर काय होईल?’ किंवा मग, ‘मोहात पडून माझ्या हातून पाप घडलं तर?’ याशिवाय, ‘भविष्यात जेव्हा देवाच्या लोकांवर हल्ला होईल तेव्हा मी यहोवाला विश्‍वासू राहीन का,’ अशीही आपल्याला काळजी वाटू शकते. आणि मग, ‘या गोष्टींबद्दल काही प्रमाणात चिंता करणं चुकीचं आहे का,’ असा प्रश्‍न आपल्याला पडू शकतो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं: “चिंता करायचं सोडून द्या.” (मत्त. ६:२५) येशूला असं म्हणायचं होतं का, की आपण कधीच कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये? नाही, त्याला तसं म्हणायचं नव्हतं. कारण बायबलमध्ये अशा कितीतरी विश्‍वासू सेवकांची उदाहरणं आहेत ज्यांना काही गोष्टींची चिंता वाटली. पण त्यामुळे यहोवा त्यांच्यावर रागावला नाही. (१ राजे १९:४) म्हणून येशूने जेव्हा म्हटलं, की “चिंता करायचं सोडून द्या,” तेव्हा तो खरंतर आपल्याला दिलासा देत होता. त्याला असं म्हणायचं होतं, की आपल्या गरजांची आपण इतकीसुद्धा चिंता करू नये, की देवाच्या सेवेला आपण जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊ शकणार नाही. टेहळणी बुरूज२१.०१ २-३ ¶४-५

शुक्रवार, २५ नोव्हेंबर

स्त्रीचं मस्तक पुरुष आहे.—१ करिंथ. ११:३.

एक पुरूष आपल्या बायको-मुलांशी कसा वागतो याबद्दल त्याला यहोवा आणि येशू या दोघांनाही हिशोब द्यावा लागेल. (१ पेत्र ३:७) कुटुंबाचं मस्तक असल्यामुळे यहोवाला आपल्या मुलांसाठी नियम बनवण्याचा आणि मुलं ते नियम पाळतात की नाही याची खातरी करण्याचा अधिकार आहे. (यश. ३३:२२) आणि येशू, ख्रिस्ती मंडळीचा मस्तक असल्यामुळे त्यालाही मंडळीसाठी नियम बनवण्याचा आणि ते नियम पाळले जातात की नाही याची खातरी करण्याचा अधिकार आहे. (गलती. ६:२; कलस्सै. १:१८-२०) यहोवा आणि येशू यांच्याप्रमाणेच एका ख्रिस्ती कुटुंबाच्या मस्तकाला आपल्या कुटुंबासाठी नियम बनवण्याचा अधिकार आहे. (रोम. ७:२; इफिस. ६:४) पण त्याच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत. जसं की, आपल्या कुटुंबासाठी तो जे काही नियम बनवतो ते त्याने स्वतःच्या मनाप्रमाणे बनू नयेत, तर ते बायबलच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजेत. (नीति. ३:५, ६) तसंच, जे त्याच्या कुटुंबाचे सदस्य नाहीत अशांसाठी नियम बनवण्याचा त्याला अधिकार नाही. (रोम. १४:४) याशिवाय, मुलं मोठी झाल्यावर काही कारणामुळे वेगळी राहतात, तेव्हा मस्तक म्हणून त्यांच्यावर त्याचा अधिकार राहत नाही. असं असलं, तरी आपल्या वडिलांबद्दल मुलांच्या मनात खूप आदर असतो.—मत्त. १९:५. टेहळणी बुरूज२१.०२ २-३ ¶३-५

शनिवार, २६ नोव्हेंबर

स्वतःच्या माणसांच्या गरजा पुरवत राहा.—१ तीम. ५:८.

एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण करून हेच दाखवतो, की त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रेम आहे. पण त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की कुटुंबाच्या फक्‍त रोजच्या गरजा पूर्ण करणं पुरेसं नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करणंही महत्त्वाचं आहे. (मत्त. ५:३) वधस्तंभावर शेवटचा श्‍वास घेत असताना येशूने मरीयाची काळजी घेतली जाईल याची खातरी केली. भयंकर वेदना होत असतानाही त्याने प्रेषित योहानला आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितलं. (योहा. १९:२६, २७) एका कुटुंबप्रमुखावर अनेक जबाबदाऱ्‍या असू शकतात. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्याला नोकरी करावी लागत असेल. आणि यहोवाच्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून नोकरीच्या ठिकाणी त्याला प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करावं लागत असेल. (इफिस. ६:५, ६; तीत २:९, १०) तसंच, तो जर एक वडील किंवा सहायक सेवक असेल, तर मंडळीत त्याला काही जबाबदाऱ्‍याही असू शकतात. जसं की, भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं आणि प्रचारकार्यात पुढाकार घेणं. पण हे सगळं करत असताना त्याने आपल्या कुटुंबासोबत नियमितपणे बायबलचा अभ्यास करणंही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबाला शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रितीने सुदृढ ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि त्यासाठी तो जे काही करतो त्याबद्दल त्याच्या कुटुंबातले सदस्य त्याची मनापासून कदर करतात.—इफिस. ५:२८, २९; ६:४. टेहळणी बुरूज२१.०१ १२ ¶१५, १७

रविवार, २७ नोव्हेंबर

सद्‌गुणी बायको आपल्या घरच्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवते.—नीति. ३१:२७.

बायबल म्हणतं, की एक चांगली आणि कुशल पत्नी बरीच कामं करते. उदाहरणार्थ, ती घरातली कामं पाहते, जमिनीची खरेदी-विक्री करते आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी व्यवसायही करते. (नीति. ३१:१५, १६, १८) एक चांगला पती आपल्या पत्नीला मोलकरीण समजत नाही. किंवा तिला आपलं मत मांडण्याचा हक्क नाही असाही तो विचार करत नाही. उलट तो तिच्यावर भरवसा ठेवतो आणि तिचं म्हणणं ऐकूनही घेतो. (नीति. ३१:११, २६) जर पती अशा प्रकारे आपल्या पत्नीशी वागला, तर त्याची पत्नी आनंदाने त्याच्या अधीन राहील. येशूने बरीच मोठमोठी कामं केली. तरी त्याला यहोवाच्या अधीन राहणं कमीपणाचं वाटलं नाही. (१ करिंथ. १५:२८; फिलिप्पै. २:५, ६) त्याचप्रमाणे एक कुशल पत्नी आपल्या पतीच्या अधीन राहण्याला कमीपणाचं समजणार नाही. आपल्या पतीवर प्रेम असल्यामुळे ती नेहमी त्याला साथ देते. पण आपल्या पतीला साथ देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं यहोवावर प्रेम आहे आणि ती त्याचा आदर करते. पण जर एखादा पती आपल्या पत्नीला बायबलच्या नियमांविरुद्ध किंवा तत्त्वांविरुद्ध काही करायला सांगत असेल तर काय? अशा वेळी एक ख्रिस्ती बहीण आपल्या पतीचं ऐकणार नाही. टेहळणी बुरूज२१.०२ ११ ¶१४-१५; १२ ¶१९

सोमवार, २८ नोव्हेंबर

संकटामुळे धीर उत्पन्‍न होतो.—रोम. ५:३.

यहोवावरच्या प्रेमामुळे त्याच्या सेवकांना छळाचा सामना करायला नेहमीच मदत झाली आहे. उदाहरणार्थ, यहुदी उच्च न्यायालयाने प्रेषितांना प्रचारकार्य थांबवायची आज्ञा दिली, तेव्हा यहोवावरच्या प्रेमामुळेच ते ‘माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळू शकले.’ (प्रे. कार्यं ५:२९; १ योहा. ५:३) अशा अतूट प्रेमामुळे आजसुद्धा अनेक भाऊबहिणींना क्रूर आणि शक्‍तिशाली सरकारांकडून छळ होत असतानाही यहोवाला विश्‍वासू राहायचं बळ मिळतं. आणि द्वेष होत असतानाही ते निराश होत नाहीत, उलट आनंदी होतात. (प्रे. कार्यं ५:४१; रोम. ५:४, ५) कुटुंबातलेच लोक आपला विरोध करतात तेव्हा आपल्या विश्‍वासाची सगळ्यात मोठी परीक्षा होऊ शकते. आपण सत्य शिकू लागतो, तेव्हा कुटुंबातल्या काही लोकांना कदाचित असं वाटेल, की आपली फसवणूक केली जात आहे. तर काहींना असं वाटेल, की आपल्याला वेड लागलं आहे. (मार्क ३:२१ पडताळून पाहा.) आपल्याला रोखण्यासाठी ते काहीपण करू शकतात. पण त्यांच्या या अशा वागण्याचं आपल्याला मुळीच आश्‍चर्य वाटू नये. कारण येशूने सांगितलंच होतं, की “माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू होतील.”—मत्त. १०:३६. टेहळणी बुरूज२१.०३ २१ ¶६-७

मंगळवार, २९ नोव्हेंबर

प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं.—याको. १:१९.

तुम्ही एखाद्या प्रचारकासोबत त्याच्या बायबल अभ्यासाला जाता तेव्हा शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं बोलणं लक्ष देऊन ऐका. तेव्हाच तुम्हाला कळेल, की कधी आणि काय बोलायचं. मग बोलण्याआधी विचार करा आणि जास्त बोलू नका. तसंच, शिक्षक जर एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगत असेल तर मधेच बालू नका किंवा वेगळ्याच विषयावर चर्चा सुरू करू नका. तर ज्या विषयावर चर्चा सुरू आहे तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी थोडक्यात बोला किंवा एक छोटंसं उदाहरण द्या किंवा प्रश्‍न विचारा. काही वेळा तुम्हाला वाटेल, की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. पण तुम्ही नुसतीच विद्यार्थ्याची प्रशंसा जरी केली आणि त्याच्याबद्दल आपुलकी जरी दाखवली, तरी प्रगती करायला त्याला खूप मदत होईल. विद्यार्थ्याला मदत होणार असेल तर तुम्ही सत्यात कसे आलात, एखाद्या समस्येचा तुम्ही कसा सामना केला किंवा यहोवाची मदत तुम्ही कशी अनुभवली, हे थोडक्यात विद्यार्थ्याला सांगा. (स्तो. ७८:४, ७) विद्यार्थ्याला आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुमच्या अनुभवामुळे खूप प्रोत्साहन मिळू शकतं. टेहळणी बुरूज२१.०३ १० ¶९-१०

बुधवार, ३० नोव्हेंबर

सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.—मत्त. २८:१९.

सेवाकार्यात मिळालेल्या यशाचं श्रेय आपण खरंतर कोणाला दिलं पाहिजे? पौलने करिंथच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं. त्यात त्याने म्हटलं, “मी लावले, अपुल्लोने पाणी घातले, पण देव वाढवत राहिला, त्यामुळे, लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे.” (१ करिंथ. ३:६, ७) पौलप्रमाणे आपणसुद्धा सेवाकार्यात मिळालेल्या यशाचं श्रेय यहोवालाच दिलं पाहिजे. देव, ख्रिस्त आणि स्वर्गदूत ‘यांच्यासोबत’ काम करण्याच्या संधीबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? (२ करिंथ. ६:१) प्रत्येक संधीचा वापर करून आवेशाने इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याद्वारे आपण असं करू शकतो. “देवाचे सहकारी” या नात्याने आपण फक्‍त बी पेरणार नाही तर त्याला पाणीही घालू. जेव्हा एखादी व्यक्‍ती संदेशात आवड दाखवते, तेव्हा आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने आपण किंवा दुसऱ्‍या एखाद्या प्रचारकाने तिची भेट घ्यावी. बायबल अभ्यास सुरू झाल्यावर यहोवा तिला आपल्या विचारांत बदल करायला मदत करत आहे हे पाहून आपल्याला खूप आनंद होईल. टेहळणी बुरूज२०.०५ ३० ¶१४, १६-१८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा