डिसेंबर
गुरुवार, १ डिसेंबर
शंका घेणारा वाऱ्याने इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातल्या लाटेसारखा आहे.—याको. १:६.
काही वेळा बायबलमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत, किंवा आपण विचार केला होता त्याप्रमाणे कदाचित यहोवाने आपल्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नसेल. त्यामुळे आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकतात. या शंकांकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपला विश्वास कमजोर होऊ शकतो आणि यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. (याको. १:७, ८) इतकंच नाही, तर भविष्याबद्दलची आपली आशाही अंधूक होऊ शकते. प्रेषित पौलने आपल्या विश्वासाची तुलना जहाजाच्या नांगरासोबत केली. (इब्री ६:१९) समुद्रात वादळ येतं तेव्हा नांगरामुळे जहाज एका ठिकाणी स्थिर राहतं. ते भरकटत जाऊन खडकांवर आदळत नाही. पण जहाजाला जोडणारी नांगराची साखळी मजबूत असेल तरच फायदा आहे. त्या साखळीला जर गंज लागला तर ती कमजोर होऊन तुटू शकते. त्याचप्रमाणे आपल्या मनात शंका असतील तर देवाच्या अभिवचनांवरचा आपला विश्वास कमजोर होऊन नाहीसा होऊ शकतो. आणि विश्वास जर नाहीसा झाला तर आशाही उरणार नाही. आणि त्यामुळे आपण कधीही आनंदी राहू शकत नाही. टेहळणी बुरूज२१.०२ ३० ¶१४-१५
शुक्रवार, २ डिसेंबर
अब्राहामने यहोवावर विश्वास ठेवला.—याको. २:२३.
अब्राहामने आणि त्याच्या कुटुंबाने ऊर शहर सोडलं तेव्हा तो ७० पेक्षा जास्त वर्षांचा असावा. (उत्प. ११:३१–१२:४) जवळपास १०० वर्षं त्याने कनान देशात प्रवास केला आणि तो ठिकठिकाणी तंबूंमध्ये राहिला. शेवटी १७५ वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला. (उत्प. २५:७) पण जो कनान देश त्याच्या वंशजांना द्यायचं अभिवचन यहोवाने दिलं होतं, ते पूर्ण होताना त्याने पाहिलं नाही. आणि ज्या “शहराची,” म्हणजे देवाच्या राज्याची तो वाट पाहत होता ते स्थापन होईपर्यंत तो जिवंत राहिला नाही. पण तरीसुद्धा, अब्राहामबद्दल बायबल म्हणतं, की तो “म्हातारा होऊन सुखाने मरण पावला.” (उत्प. २५:८) अब्राहामसमोर अनेक अडचणी आल्या, पण तरीसुद्धा त्याने यहोवावर आपला विश्वास टिकवून ठेवला. तसंच, यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होईपर्यंत तो धीराने वाट पाहत राहिला. अब्राहाम धीराने वाट का पाहू शकला? कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात यहोवाने त्याचं संरक्षण केलं होतं आणि त्याला एका मित्रासारखं वागवलं होतं. (उत्प. १५:१; यश. ४१:८; याको. २:२२) अब्राहामसारखंच आपणसुद्धा खरा पाया असलेल्या शहराची वाट पाहत आहोत. (इब्री ११:१०) फरक इतकाच आहे, की आपण ते स्थापन होण्याची वाट पाहत नाही. कारण १९१४ मध्येच देवाचं राज्य स्थापन झालं आणि स्वर्गात त्याचं शासन सुरूही झालं आहे. (प्रकटी. १२:७-१०) मग कोणत्या अर्थाने आपण त्या शहराची वाट पाहत आहोत? त्या ‘शहराने,’ म्हणजेच देवाच्या राज्याने पृथ्वीवर आपलं शासन सुरू करावं याची आपण वाट पाहत आहोत. टेहळणी बुरूज२०.०८ ४ ¶११-१२
शनिवार, ३ डिसेंबर
माणसाच्या मनातले विचार खोल पाण्यासारखे असतात, पण समंजस माणूस ते बाहेर काढतो.—नीति. २०:५.
दुसऱ्यांचं लक्ष देऊन ऐकण्यासाठी आपण नम्र असलं पाहिजे आणि धीर दाखवला पाहिजे. यामुळे आपल्याला कमीतकमी तीन फायदे होतील. पहिला म्हणजे, आपण लोकांबद्दल लगेचच चुकीचं मत बनवणार नाही. दुसरा म्हणजे, त्यांना नेमकं कसं वाटतं आणि ते विशिष्ट गोष्टी का करतात हे आपल्याला जाणून घेता येईल आणि त्यांच्याशी आणखी दयाळूपणे वागणं आपल्याला शक्य होईल. तिसरा म्हणजे, आपण आपल्या भावाला बोलू देतो तेव्हा त्याला स्वतःच्या भावना आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होऊ शकते. बऱ्याचदा असं होतं, की जोपर्यंत आपण आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत नाही तोपर्यंत त्या आपल्यालाही नीट समजलेल्या नसतात. आपल्या काही भाऊबहिणींना त्यांच्या भावनांबद्दल इतरांशी बोलणं कठीण जातं. त्यांच्या जीवनात आलेले अनुभव, त्यांची संस्कृती किंवा त्यांचा स्वभाव यांमुळे असं होऊ शकतं. कदाचित त्यांना आपल्याशी मोकळेपणाने बोलायला वेळ लागेल; पण ते त्यांच्या मनातलं बोलतील तेव्हाच आपल्याला त्यांच्या खऱ्या भावना कळतील. जर आपण त्यांच्याशी यहोवाप्रमाणे धीराने वागलो तर काही काळाने ते त्यांचं मन आपल्याजवळ मोकळं करतील. आणि जेव्हा ते असं करतील, तेव्हा आपण त्यांचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०४ १५-१६ ¶६-७
रविवार, ४ डिसेंबर
तू जिवंत माणसं धरणारा होशील.—लूक ५:१०.
मासे सहसा अशा ठिकाणी असतात जिथलं पाणी त्यांच्यासाठी चांगलं असतं आणि जिथे त्यांना भरपूर अन्न मिळतं. ही गोष्ट मासेमारी करणाऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. याशिवाय, दिवसाच्या कोणत्या वेळी मासे पकडायचे हेसुद्धा त्याला माहीत असणं गरजेचं आहे. मासे पकडण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती याबद्दल पॅसिफिक बेटावर राहणाऱ्या एक साक्षीदार भावाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. एकदा त्या भावाने एका मिशनरी बांधवाला त्याच्यासोबत मासेमारी करायला बोलवलं. तेव्हा मिशनरी बांधव त्याला म्हणाला: “ठीक आहे, उद्या सकाळी नऊ वाजता भेटू.” त्यावर त्या भावाने त्याला म्हटलं: “तुम्हाला कदाचित माहीत नसेल; पण आम्ही आमच्या सोयीच्या वेळी मासे पकडायला जात नाही, तर ज्या वेळी समुद्रात जास्त मासे मिळू शकतात त्या वेळी जातो.” त्याचप्रमाणे, पहिल्या शतकातले येशूचे शिष्यही अशा वेळी आणि अशा ठिकाणी प्रचार करायचे, जिथे त्यांना सगळ्यात जास्त लोक भेटण्याची शक्यता होती. जसं की, त्यांनी मंदिरात आणि सभास्थानात; तसंच बाजारात आणि घरोघरी जाऊन प्रचार केला. (प्रे. कार्ये ५:४२; १७:१७; १८:४) अगदी तसंच, आपल्या क्षेत्रातले लोक सहसा कोणत्या वेळी घरी असतात किंवा कोणत्या ठिकाणी जास्त लोक भेटू शकतात, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्या वेळेत बदल करायला आपण तयार असलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला त्यांना प्रचार करता येईल.—१ करिंथ. ९:१९-२३. टेहळणी बुरूज२०.०९ ४ ¶८-९
सोमवार, ५ डिसेंबर
आपण नेहमी खरं बोलावं आणि ख्रिस्त जो आपलं मस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावं.—इफिस. ४:१५.
येशूसोबत मैत्री करण्याचा एक मार्ग म्हणजे, संघटनेने केलेल्या व्यवस्थेला पाठिंबा देणं. आपल्यावर देखरेख करण्यासाठी ज्यांना नेमण्यात आलं आहे त्यांना आपण सहकार्य करतो तेव्हा मंडळीचं मस्तक, येशू याच्यासोबत आपली मैत्री घट्ट होते. (इफिस. ४:१६) उदाहरणार्थ, आता आपण सगळ्या राज्य सभागृहांचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी काही ठिकाणी दोन मंडळ्यांना एक करण्यात आलं आहे. या व्यवस्थेमुळे संघटनेला मिळालेल्या अनुदानाची बरीच बचत करणं शक्य झालं आहे. पण या बदलांमुळे काही प्रचारकांना नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं आहे. या विश्वासू भाऊबहिणींनी कदाचित बरीच वर्षं एखाद्या मंडळीत सेवा केली असेल आणि त्यामुळे तिथल्या भाऊबहिणींसोबत त्यांचं खूप जवळचं नातं असेल. पण आता त्यांना एका नवीन मंडळीत जाऊन सेवा करायला सांगण्यात आलं असेल. येशूचे हे विश्वासू शिष्य या व्यवस्थेला मनापासून सहकार्य देत आहेत हे पाहून त्याला किती आनंद होत असेल! टेहळणी बुरूज२०.०४ २४ ¶१४
मंगळवार, ६ डिसेंबर
दक्षिणेचा राजा त्याला शिंगं मारेल.—दानी. ११:४०; तळटीप.
जगातलं सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनण्यासाठी उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा एकमेकांशी लढत राहतात. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियत संघ युरोपमधल्या बऱ्याचशा भागावर अधिकार गाजवू लागला. म्हणून दक्षिणेच्या राजाने इतर देशांसोबत मिळून त्यांचं सैन्य उत्तरेच्या राजाविरुद्ध आणायचं ठरवलं. यासाठी त्यांनी एक संघटना तयार केली. त्यांनी या संघटनेला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे नाव दिलं. उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांनी सर्वात शक्तिशाली सैन्य बनवण्यासाठी बराच पैसाही खर्च केला. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका इथे होणाऱ्या लढायांमध्येही त्यांनी एकमेकांच्या शत्रूंना साथ दिली. अलीकडच्या काही वर्षांत रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा जगभरात दबदबा वाढला आहे. ते कंप्युटर प्रोग्राम्सद्वारेही दक्षिणेच्या राजासोबत लढत आहेत. या दोन्ही राजांनी एकमेकांवर असा आरोप लावला आहे, की त्यांनी एकमेकांच्या आर्थिक आणि राजनैतिक व्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी घातक कंप्युटर प्रोग्राम्सचा वापर केला आहे. तसंच, दानीएलने भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे उत्तरेचा राजा देवाच्या लोकांवर हल्ला करतच आहे.—दानी. ११:४१. टेहळणी बुरूज२०.०५ १३ ¶५-६
बुधवार, ७ डिसेंबर
मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन. मी स्वतः त्यांची काळजी घेईन.—यहे. ३४:११.
“अंगावर पाजणारी स्त्री आपल्या बाळाला कधी विसरू शकते का?” असा प्रश्न यहोवाने यशया संदेष्ट्याच्या दिवसांत आपल्या लोकांना विचारला. त्याने पुढे असंही म्हटलं: “एक वेळ आई आपल्या बाळाला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही.” (यश. ४९:१५) यहोवा सहसा स्वतःची तुलना आईसोबत करत नाही. पण या प्रसंगी मात्र त्याने केली. आपल्या सेवकांवर आपलं किती प्रेम आहे हे यहोवाला दाखवायचं होतं. आणि त्यासाठी त्याने आईचं आपल्या बाळासोबत असलेल्या घनिष्ठ नात्याचा उपयोग केला. जॅस्मीन नावाची एक बहीण म्हणते: “तुम्ही तुमच्या बाळाला दूध पाजता तेव्हा त्याच्यासोबत तुमचं आयुष्यभरासाठी एक खास नातं जोडलं जातं.” अनेक स्त्रियांना आपल्या बाळाबद्दल अगदी असंच वाटतं. यहोवाचं एक जरी मूल सभांना आणि प्रचाराला जायचं सोडून देतं, तेव्हा त्याला त्याची काळजी वाटू लागते. अक्रियाशील झालेले आपले अनेक प्रिय भाऊबहीण मंडळीत परत येतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो! त्यांनी परत यावं अशी यहोवाची इच्छा आहे आणि आपलीही तीच इच्छा आहे.—१ पेत्र २:२५. टेहळणी बुरूज२०.०६ १८ ¶१-३
गुरुवार, ८ डिसेंबर
न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावा. कारण दिसत असलेल्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण न दिसणाऱ्या गोष्टी सर्वकाळाच्या आहेत.—२ करिंथ. ४:१८.
देवाने दिलेल्या सर्वच देणग्या आपण पाहू शकत नाही. खरंतर सर्वात मौल्यवान देणग्या या न दिसणाऱ्या आहेत. डोंगरावरच्या उपदेशात येशूने म्हटलं, की पृथ्वीवरच्या धनापेक्षा स्वर्गात साठवलेली संपत्ती ही कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. मग त्याने म्हटलं: “जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.” (मत्त. ६:१९-२१) आपण ज्या गोष्टी मौल्यवान समजू त्या गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्नही करू. देवासोबत एक चांगलं नातं जोडून आपण स्वर्गात आपल्यासाठी “संपत्ती” साठवतो. येशूने म्हटलं की अशा संपत्तीचा कधीही नाश होत नाही किंवा ती चोरीला जात नाही. प्रेषित पौल आपल्याला “न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष” लावण्याचं प्रोत्साहन देतो. (२ करिंथ. ४:१७, १८) या न दिसणाऱ्या गोष्टी संपत्तीप्रमाणे आहेत. यात अशा आशीर्वादांचा समावेश होतो जे आपल्याला देवाच्या राज्यात मिळणार आहेत. तर या न दिसणाऱ्या संपत्तीबद्दल आपण कदर असल्याचं दाखवतो का? टेहळणी बुरूज२०.०५ २६ ¶१-२
शुक्रवार, ९ डिसेंबर
माझे शब्द गवतावर पडणाऱ्या रिमझिम पावसासारखे असतील.—अनु. ३२:२.
मोशेने इस्राएली लोकांना शिकवलेल्या गोष्टींमुळे त्यांचा विश्वास वाढला आणि त्यांना प्रोत्साहन मिळालं. आपण जेव्हा लोकांना शिकवतो तेव्हा त्यांच्या मनावरसुद्धा असाच परिणाम व्हावा यासाठी आपण काय करू शकतो? आपण जेव्हा घरोघरचं किंवा सार्वजनिक साक्षकार्य करतो, तेव्हा आपण बायबलमधून लोकांना देवाचं नाव यहोवा आहे हे दाखवू शकतो. तसंच आपण त्यांना आपलं साहित्य, आपले व्हिडिओ आणि वेबसाईटवर असलेली माहिती दाखवून यहोवाच्या नावाचा गौरव करू शकतो. याशिवाय आपण कामावर, शाळेत किंवा प्रवास करत असताना आपल्या प्रिय देवाबद्दल लोकांशी बोलू शकतो. यहोवा आपल्यासाठी आणि या पृथ्वीसाठी किती चांगल्या गोष्टी करणार आहे हे आपण त्यांना सांगू शकतो. या गोष्टी ऐकल्यावर कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या लक्षात येईल की यहोवा किती प्रेमळ आहे. आपण जेव्हा इतरांना आपल्या प्रेमळ देवाबद्दलचं सत्य सांगतो तेव्हा त्याचं नाव पवित्र करायला मदत करत असतो. त्यांना देवाबद्दल खोट्या गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत हे आपण त्यांना समजून घ्यायला मदत करत असतो. आपण त्यांना बायबलमधून जे काही शिकवतो त्यामुळे त्यांना खूप तजेला मिळू शकतो.—यश. ६५:१३, १४. टेहळणी बुरूज२०.०६ १० ¶८-९
शनिवार, १० डिसेंबर
माझ्याकडे परत या, म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन.—मला. ३:७.
ज्यांना यहोवाकडे परत यायची इच्छा आहे त्यांना मदत करण्यासाठी आपल्यात कोणते गुण असणं गरजेचं आहे? येशूने घर सोडून गेलेल्या उधळ्या मुलाचं जे उदाहरण सांगितलं त्यातून आपण काय शिकू शकतो याकडे लक्ष द्या. (लूक १५:१७-२४) तो मुलगा शेवटी कसा भानावर आला आणि त्याने घरी परतण्याचा निर्णय कसा घेतला हे येशूने त्या उदाहरणात समजावलं. मुलगा घरी परत आला तेव्हा वडील धावत त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला प्रेमाने मिठी मारली. असं करून त्यांनी दाखवून दिलं की त्यांचं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. मुलाने जे काही केलं होतं त्याबद्दल त्याचं मन त्याला खात होतं. आणि मुलगा म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही असंही त्याला वाटत होतं. त्याने आपल्या भावना वडिलांना सांगितल्या तेव्हा वडिलांना त्याचा कळवळा आला. वडिलांनी त्याच्यासाठी अशा काही गोष्टी केल्या ज्यांवरून मुलाला खातरी पटली की आपल्या वडिलांचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे. त्यांनी त्याला आपला प्रिय मुलगा म्हणून स्वीकारलं. हे दाखवून देण्यासाठी वडिलांनी आपल्या मुलाकरता सर्वात चांगल्या कपड्यांची व्यवस्था केली आणि एक मोठी मेजवानीही ठेवली. यहोवा, येशूने दिलेल्या त्या उदाहरणातल्या पित्यासारखा आहे. अक्रियाशील झालेल्या आपल्या भाऊबहिणींवर त्याचं अजूनही प्रेम आहे आणि त्यांनी त्याच्याकडे परत यावं अशी त्याची इच्छा आहे. यहोवाचं अनुकरण करण्याद्वारे आपण त्यांना त्याच्याकडे परत यायला मदत करू शकतो. आणि यासाठी आपल्याला धीर, सहानुभूती आणि प्रेम दाखवण्याची गरज आहे. टेहळणी बुरूज२०.०६ २५ ¶८-९
रविवार, ११ डिसेंबर
मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्या अर्थाने माझे शिष्य ठराल. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.—योहा. ८:३१, ३२.
येशूने म्हटलं की काही जण “आनंदाने” सत्य स्वीकारतील, पण परीक्षा आल्यावर त्यांचा विश्वास कमजोर होऊ शकतो. (मत्त. १३:३-६, २०, २१) येशूचे शिष्य बनल्यावर आपल्या जीवनात समस्या येतील असा विचार त्यांनी कदाचित केला नसेल. (मत्त. १६:२४) त्याऐवजी त्यांना कदाचित असं वाटलं असेल की त्यांच्या जीवनात कधीच समस्या येणार नाहीत किंवा देव त्यांच्या सर्व समस्या काढून टाकेल. पण या दुष्ट जगात राहत असताना आपल्या जीवनात समस्या या येतीलच. परिस्थिती बदलल्यामुळे काही काळासाठी आपण आपला आनंद गमावू शकतो. (स्तो. ६:६; उप. ९:११) आपल्या बऱ्याच भाऊबहिणींना या गोष्टीची खातरी आहे की त्यांच्याकडे सत्य आहे. असं का म्हणता येईल? एखाद्या बांधवाने त्यांचं मन दुखावलं किंवा एखादी गंभीर चूक केली तरी त्यांचा विश्वास डळमळत नाही. (स्तो. ११९:१६५) उलट, प्रत्येक परीक्षेनंतर त्यांचा विश्वास आणखी मजबूत होत जातो. (याको. १:२-४) तुमचाही विश्वास इतकाच मजबूत आहे का? टेहळणी बुरूज२०.०७ ८ ¶१; ९ ¶४-५
सोमवार, १२ डिसेंबर
तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी.—याको. १:५.
तुम्ही बायबलमधून जे काही वाचणार आहात त्यातून तुम्हाला कसा फायदा होईल हे समजून घ्यायला यहोवाला मदत मागा. उदाहरणार्थ, एखाद्या समस्येचा सामना कसा करायचा याबद्दल बायबलमध्ये दिलेली तत्त्वं शोधायला यहोवाने तुम्हाला मदत करावी अशी विनंती त्याच्याकडे करा. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवाने आपल्याला कल्पना करायची एक अद्भुत क्षमता दिली आहे. तुम्ही जर बायबलमधून एखाद्या व्यक्तीचा अहवाल वाचत असाल तर तुम्हीच ती व्यक्ती आहात अशी कल्पना करा. ती काय पाहते, तिला कसं वाटतं आणि तिच्या आसपास काय घडत आहे, हे सगळं डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे त्या अहवालातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. त्यानंतर मनन करा. मनन करणं म्हणजे तुम्ही जे काही वाचता त्याचा खोलवर विचार करणं आणि ती माहिती कशी लागू करता येईल हे समजून घेणं. त्यामुळे, एखाद्या विषयाबद्दल तुम्ही आधी जे वाचलं होतं आणि त्याच विषयाबद्दल आता जे वाचलं आहे, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते तुम्हाला कळेल. आणि त्यामुळे त्या विषयाबद्दलची तुमची समज आणखी वाढेल. मनन करणं, हे एखादं जिगसॉ कोडं सोडवण्यासारखं आहे. नेमकं चित्र काय आहे हे समजण्यासाठी त्या चित्राचे वेगवेगळे तुकडे एकमेकांना जोडण्याची गरज असते. त्याचप्रमाणे एखादा विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्या विषयाबद्दल तुम्ही जी माहिती वाचली आहे ती एकमेकांशी जोडण्याची गरज आहे. यालाच मनन करणं म्हणतात. टेहळणी बुरूज२१.०३ १५ ¶३-५
मंगळवार, १३ डिसेंबर
देवाचे मी आभार मानतो. आणि रात्रंदिवस त्याला याचना करताना न चुकता तुझी आठवण करतो.—२ तीम. १:३.
प्रेषित पौल असा विचार करू शकला असता, की आपण ख्रिस्ती बनलो नसतो, तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. आपण तुरुंगात नसतो. आशिया प्रांतातले जे भाऊ त्याला सोडून गेले, त्यांच्याबद्दल तो मनात राग बाळगू शकला असता. आणि आपल्या इतर मित्रांवरचा त्याचा भरवसा उडू शकला असता. पण त्याने असं काहीच केलं नाही. उलट, त्याने आपल्या मित्रांवर भरवसा ठेवला आणि यहोवा आपल्याला नक्की प्रतिफळ देईल असा विश्वास बाळगला. मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही आपण यहोवाच्या नावाचा महिमा कसा करू शकतो आणि इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो याचाच तो विचार करत होता. तसंच, नेहमी प्रार्थना करून तो यहोवावर विसंबून राहिला. याशिवाय, जे भाऊ त्याला सोडून गेले होते त्यांचा विचार करून तो निराश झाला नाही. उलट, ज्या भावांनी त्याला आधार दिला आणि वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली त्यांचे त्याने मनापासून आभार मानले. आणि तुरुंगात असतानाही तो देवाच्या वचनाचा अभ्यास करत राहिला. (२ तीम. ३:१६, १७; ४:१३) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा आणि येशूचं आपल्यावर प्रेम आहे याची त्याला खातरी होती. टेहळणी बुरूज२१.०३ १८ ¶१७-१८
बुधवार, १४ डिसेंबर
जसं जंगली गवत गोळा करून जाळून टाकलं जातं, तसंच या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला घडेल.—मत्त. १३:४०.
दुसऱ्या शतकादरम्यान ख्रिस्ती मंडळीत बरेच खोटे ख्रिस्ती येऊ लागले. त्यांनी खोट्या धर्मातल्या शिकवणी शिकवल्या आणि देवाच्या वचनातलं सत्य लपवलं. तेव्हापासून ते १८७० पर्यंत या पृथ्वीवर देवाच्या लोकांचा एक संघटित गट नव्हता. खोटे ख्रिस्ती शेतातल्या जंगली गवताप्रमाणे वाढत चालले होते. त्यामुळे खऱ्या ख्रिश्चनांना ओळखणं कठीण होतं. (मत्त. १३:३६-४३) दुसऱ्या शतकापासून ते १८७० पर्यंत ज्या राजांनी किंवा सरकारांनी राज्य केलं त्यांपैकी कोणीच दानीएलच्या ११ व्या अध्यायात सांगितलेल्या उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या राजाची जागा घेऊ शकत नव्हतं. असं आपण का म्हणू शकतो? कारण यादरम्यान देवाच्या लोकांचा संघटित असा कोणताच गट नव्हता, ज्यावर ते हल्ला करू शकत होते. पण १८७० नंतर उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांची ओळख पटली. टेहळणी बुरूज२०.०५ ३ ¶५
गुरुवार, १५ डिसेंबर
एका राष्ट्राने माझ्या देशावर हल्ला केलाय.—योए. १:६.
टोळांच्या पीडेमुळे इस्राएल उद्ध्वस्त होईल अशी योएलने भविष्यवाणी केली होती. हे टोळ इस्राएलमधलं सर्व पीक आणि धान्य उद्ध्वस्त करून टाकतील. (योए. १:४) आतापर्यंत आपली अशी समज होती की ही भविष्यवाणी लाक्षणिक अर्थाने यहोवाच्या लोकांना लागू होते. कारण झुंडीने येणाऱ्या टोळांना जसं कोणी थांबवू शकत नाही, तसं यहोवाच्या लोकांना आवेशाने प्रचार करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तसंच, आपली अशीही समज होती, की या प्रचारकार्याचा धार्मिक पुढाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या “देशावर” किंवा लोकांवर असा जबरदस्त परिणाम होईल की ते गोंधळून जातील. पण आपण जर मागची-पुढची वचनं वाचली, म्हणजेच संपूर्ण भविष्यवाणीचा विचार केला तर आपल्याला जाणवेल की या भविष्यवाणीचा वेगळा अर्थ होतो व आपली समज सुधारण्याची गरज आहे. झुंडीने येणाऱ्या टोळांबद्दल यहोवाने काय अभिवचन दिलं याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं, की मी “उत्तरेकडून आलेल्या [टोळांना] तुम्हापासून घालवून . . . देईन.” (योए. २:२०) जर टोळ, यहोवाच्या साक्षीदारांना जे येशूच्या आज्ञेचं पालन करून प्रचार आणि शिष्य बनवण्याचं काम करतात यांना सूचित करत असतं, तर यहोवा त्यांना घालवून देण्याबद्दल अभिवचन का देईल? (यहे. ३३:७-९; मत्त. २८:१९, २०) तर हे स्पष्टच आहे, की यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांना नाही, तर अशा गोष्टीला किंवा व्यक्तीला घालवत आहे जिच्याकडून त्याच्या लोकांना धोका आहे. टेहळणी बुरूज२०.०४ २-३ ¶३-५
शुक्रवार, १६ डिसेंबर
तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी.—याको. १:५.
यहोवा आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर देत नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय करावं? याकोबने म्हटलं त्याप्रमाणे आपण देवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आपण सारखंसारखं त्याच्याकडे बुद्धी मागितली तरी तो आपल्यावर चिडत नाही किंवा आपल्याला रागवत नाही. परीक्षांचा सामना करण्यासाठी आपण देवाकडे बुद्धी मागतो तेव्हा तो ती “उदारपणे” आपल्याला देतो. (स्तो. २५:१२, १३) आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा यहोवाला खूप वाईट वाटतं. म्हणून आपल्याला मदत करायला तो नेहमी तयार असतो. आणि या जाणिवेमुळे आपल्याला खूप आनंद होतो. पण यहोवा आपल्याला बुद्धी कशी देतो? त्याच्या वचनाद्वारे. (नीति. २:६) ती बुद्धी मिळवण्यासाठी आपण बायबलचा आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास केला पाहिजे. पण आपण फक्त अभ्यास करू नये, तर त्याप्रमाणे आपण वागलंही पाहिजे. याकोबने म्हटलं: “फक्त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.” (याको. १:२२) बायबलमध्ये दिलेला सल्ला आपण जीवनात लागू करतो तेव्हा आपण शांती राखण्याचा आणि इतरांशी समजूतदारपणे वागण्याचा प्रयत्न करतो. तसंच, आपण आणखी दयाळू बनतो. (याको. ३:१७) या गुणांमुळे आपल्याला कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल. टेहळणी बुरूज२१.०२ २९ ¶१०-११
शनिवार, १७ डिसेंबर
प्रत्येक अवयव योग्य प्रकारे कार्य करतो, तेव्हा शरीराची वाढ होते.—इफिस. ४:१६.
मंडळीतले भाऊबहीण एखाद्याला प्रगती करायला मदत करतात तेव्हा त्याला बाप्तिस्मा घ्यायला मदत होते. तर मग, प्रत्येक प्रचारक नवीन लोकांना मंडळीचा भाग बनायला कशी मदत करू शकतो? एक पायनियर बहीण म्हणते: “असं म्हणतात, की एका मुलाला वाढवण्यासाठी संपूर्ण गावाचा हातभार लागतो. शिष्य बनवण्याच्या बाबतीतही तेच म्हटलं जाऊ शकतं. एखाद्याला सत्यात आणण्यासाठी संपूर्ण मंडळीचा हातभार लागतो.” एखाद्या मुलाला जबाबदार व्यक्ती बनवण्यासाठी त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांची, मित्रांची आणि शिक्षकांची एक मोलाची भूमिका असते. ते मुलाला सतत प्रोत्साहन देतात आणि जीवनातले महत्त्वाचे धडे शिकवतात. अगदी त्याच प्रकारे, मंडळीतले प्रचारकसुद्धा विद्यार्थ्यांना प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करू शकतात. ते त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात, सल्ले देऊ शकतात किंवा आपल्या स्वतःच्या चांगल्या उदाहरणातून त्याला शिकवू शकतात. (नीति. १५:२२) मंडळीतले इतर भाऊबहीण बायबल विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी पुढे येतात, तेव्हा त्याचा अभ्यास चालवणाऱ्या प्रचारकाने काय केलं पाहिजे? त्याने ती मदत आनंदाने स्वीकारली पाहिजे. कारण विद्यार्थ्याला प्रगती करायला अनेक जण हातभार लावू शकतात. टेहळणी बुरूज२१.०३ ८ ¶१-३
रविवार, १८ डिसेंबर
“आपल्यामध्ये पाप नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत.—१ योहा. १:८.
आपण सर्वांनीच दुहेरी जीवन जगण्यापासून सावध असलं पाहिजे; मग आपण तरुण असोत किंवा वृद्ध. प्रेषित योहानने म्हटलं की सत्याच्या मार्गावर चालत असताना आपण अनैतिक जीवन जगू नये. (१ योहा. १:६) आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे काही करतो ते यहोवा पाहतो. म्हणून यहोवाला आनंद होईल असंच जीवन आपण जगलं पाहिजे. आपण गुप्तपणे करत असलेल्या गोष्टी लोकांना दिसत नसल्या तरी यहोवाला त्या दिसतात. (इब्री ४:१३) पापाबद्दल असलेला जगाचा दृष्टिकोन आपण टाळला पाहिजे. योहानच्या दिवसांत धर्मत्यागी लोक असा दावा करत होते की एक व्यक्ती जाणूनबुजून पाप करत राहू शकते आणि त्याच वेळी यहोवासोबतची मैत्रीही टिकवून ठेवू शकते. असाच विचार करणाऱ्या लोकांमध्ये आज आपण राहत आहोत. आज अनेक जण देवावर विश्वास असल्याचा दावा करतात, पण पापाबद्दल यहोवाचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र त्यांना मान्य नसतो. खासकरून लैंगिक संबंधाबद्दल. या बाबतीत यहोवाने मानवांसाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. पण जगातले काही लोक असा विचार करतात, की आपल्याला या मर्यादा पाळण्याची गरज नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण करू शकतो, जसं जगायचं आहे तसं जगू शकतो. टेहळणी बुरूज२०.०७ २२ ¶७-८
सोमवार, १९ डिसेंबर
कार्यांतून आणि अगदी खऱ्या मनाने प्रेम करा.—१ योहा. ३:१८.
आपल्या ख्रिस्ती बहिणींना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांच्या बाजूने बोलता का? एका परिस्थितीचा विचार करा. सत्यात एकटीच असलेली एक बहीण बऱ्याचदा सभांना उशिरा येते आणि सभा संपली की लगेच निघून जाते. तसंच, ती क्वचितच आपल्या मुलांना सभांना घेऊन येते. आणि हे काही प्रचारकांच्या लक्षात येतं, तेव्हा ते आपसात तिची टीका करतात. त्यांना असं वाटतं, की तिने सत्यात नसलेल्या आपल्या पतीशी स्पष्टपणे बोलून मुलांना सभांना घेऊन आलं पाहिजे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की ती बहीण तिच्या परीने होता होईल तितका प्रयत्न करत आहे. तिला कदाचित तिच्या पतीच्या कामानुसार आपल्या वेळेत फेरबदल करावा लागत असेल. किंवा मुलांच्या बाबतीतही ती स्वतःच निर्णय घेऊ शकत नसेल. पण तुम्ही जर या बहिणीची प्रशंसा केली आणि ती किती मेहनत घेत आहे, याबद्दल इतरांशी बोललात तर तिच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या टीकात्मक गोष्टी तुम्ही थांबवू शकाल. आपण अशा बहिणींची काळजी घ्यावी, अशी यहोवाची इच्छा आहे हे मंडळीतल्या वडिलांना माहीत असतं. (याको. १:२७) त्यामुळे ते येशूचं अनुकरण करून समजूतदारपणे वागतात. ते नियम पाळण्यावर अडून राहत नाहीत, तर परिस्थिती समजून घेतात आणि प्रेमाने वागतात. (मत्त. १५:२२-२८) जेव्हा वडील बहिणींना मदत करण्यासाठी मेहनत घेतात तेव्हा यहोवा आणि त्याची संघटना आपल्यावर किती प्रेम करते याची बहिणींना जाणीव होते. टेहळणी बुरूज२०.०९ २४-२५ ¶१७-१९
मंगळवार, २० डिसेंबर
काय घडेल हे देवाने नबुखद्नेस्सर राजाला प्रकट केलंय.—दानी. २:२८.
दानीएल संदेष्टा खूप नम्र होता. मार्गदर्शनासाठी त्याने नेहमी यहोवाकडे मदत मागितली. उदाहरणार्थ, नबुखद्नेस्सरच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी यहोवाने दानीएलचा उपयोग केला, तेव्हा त्या गोष्टीचं श्रेय त्याने स्वतः घेतलं नाही. उलट त्याने सर्व श्रेय आणि सन्मान यहोवाला दिला. (दानी. २:२६-२८) यातून आपण काय शिकतो? मंडळीतल्या भाऊबहिणींना जर आपली भाषणं आवडत असतील किंवा सेवाकार्यात आपल्याला चांगले अनुभव येत असतील, तर त्याचं सगळं श्रेय यहोवाला द्यायला आपण कधीच विसरू नये. आपण हे मान्य केलं पाहिजे की यहोवाच्या मदतीशिवाय आपण हे सगळं करूच शकलो नसतो. (फिलिप्पै. ४:१३) आपण जेव्हा अशी मनोवृत्ती दाखवतो तेव्हा आपण येशूचंही अनुकरण करत असतो. येशू नेहमी यहोवावर विसंबून राहिला. (योहा. ५:१९, ३०) त्याने कधीही आपल्या स्वर्गातल्या पित्याचा अधिकार बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच फिलिप्पैकर २:६ मध्ये येशूबद्दल असं म्हटलं आहे, की “त्याने कधीही देवाचे स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.” उलट, येशूने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवली आणि आपल्या पित्याच्या अधिकाराचा आदर केला. टेहळणी बुरूज२०.०८ १०-११ ¶१२-१३
बुधवार, २१ डिसेंबर
अशा प्रकारे धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल.—१ करिंथ. ९:२४.
जीवनाच्या शर्यतीत धावणाऱ्या काहींच्या जीवनात अशा काही समस्या आहेत, ज्या इतरांना दिसत नाहीत आणि कदाचित कोणी त्या समजूही शकणार नाही. जर तुम्ही शारीरिक समस्यांचा सामना करत असाल आणि इतर जण तुमची परिस्थिती समजून घेत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल, तर मफीबोशेथच्या उदाहरणामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं. (२ शमु. ४:४) तो अपंग होता आणि दावीद राजाने त्याच्याबद्दल चुकीचं मत बनवून त्याच्यावर अन्याय केला. तरी त्याने चुकीचा विचार केला नाही; उलट, त्याच्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यांबद्दल त्याला कदर होती. आधी दावीद त्याच्याशी किती दयाळूपणे वागला होता, हे तो विसरला नाही. (२ शमु. ९:६-१०) त्यामुळे, जेव्हा दावीदने त्याच्यावर अन्याय केला तेव्हा त्याने परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करायचा प्रयत्न केला. दावीदच्या चुकीमुळे त्याने मनात राग बाळगला नाही आणि त्यासाठी यहोवाला दोष दिला नाही. यहोवाने नियुक्त केलेल्या राजाला पाठिंबा कसा देता येईल यावर त्याने लक्ष केंद्रित केलं. (२ शमु. १६:१-४; १९:२४-३०) मफीबोशेथच्या चांगल्या उदाहरणातून आपण शिकावं म्हणून यहोवाने त्याच्याबद्दल आपल्या वचनात लिहून ठेवलं.—रोम. १५:४. टेहळणी बुरूज२०.०४ २६ ¶३; ३० ¶१८-१९
गुरुवार, २२ डिसेंबर
आम्ही देवाचे सहकारी आहोत.—१ करिंथ. ३:९.
मंडळीमध्ये काही जणांना मिशनरी, खास पायनियर किंवा नियमित पायनियर म्हणून नेमलं जातं. त्यांनी प्रचारकार्याला आणि शिष्य बनवण्याच्या कामाला पूर्ण वेळेचं करियर बनवलं आहे. पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्या बऱ्याच जणांकडे पैसा किंवा इतर गोष्टी कमी असल्या, तरी यहोवाने त्यांना अनेक आशीर्वाद दिले आहेत. (मार्क १०:२९, ३०) अशा भाऊबहिणींची आपण मनापासून कदर करतो. आणि ते मंडळीचे भाग आहेत यासाठी आपण यहोवाचे खूप आभारी आहोत. पण मंडळीतल्या नियुक्त बांधवांना आणि पूर्ण वेळेच्या सेवकांनाच फक्त मंडळीत महत्त्वाचं स्थान आहे का? मुळीच नाही. आनंदाचा संदेश सांगणारा प्रत्येक प्रचारक देवासाठी आणि मंडळीसाठी खूप महत्त्वाचा आहे. (रोम. १०:१५; १ करिंथ. ३:६-८) कारण लोकांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनवणं हा मंडळीचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. (मत्त. २८:१९, २०; १ तीम. २:४) आणि मंडळीतला प्रत्येक प्रचारक, मग त्याचा बाप्तिस्मा झालेला असो किंवा नसो, प्रचारकार्याला आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न करतो.—मत्त. २४:१४. टेहळणी बुरूज२०.०८ २१ ¶७-८
शुक्रवार, २३ डिसेंबर
जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.—मत्त. २८:२०.
आपण जेव्हा समस्यांचा सामना करत असतो तेव्हा आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे येशू आपल्याला मदत करतो. येशूच्या या शब्दांमुळे आपल्याला खूप धीर मिळतो. कारण, जीवनातल्या काही समस्यांचा सामना करणं आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं. जसं की, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं दुःख आपल्याला फक्त काही दिवस नाही, तर बरीच वर्षं सोसावं लागू शकतं. किंवा काहींना वाढत्या वयामुळे येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर असेही काही आहेत ज्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो. असं असलं, तरी अशा समस्यांचा आपण धीराने सामना करू शकतो. कारण आपल्याला माहीत आहे, की येशू नेहमी आपल्यासोबत आहे; अगदी आपल्या दुःखाच्या काळातसुद्धा. (मत्त. ११:२८-३०) बायबल आपल्याला हे आश्वासन देतं, की आज यहोवा त्याच्या स्वर्गदूतांद्वारे आपल्याला मदत करतो. (इब्री १:७, १४) उदाहरणार्थ, आपण जेव्हा प्रत्येक “राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना” राज्याचा “आनंदाचा संदेश” सांगतो, तेव्हा स्वर्गदूत आपल्याला मदत करतात, आपलं मार्गदर्शन करतात.—मत्त. २४:१३, १४; प्रकटी. १४:६. टेहळणी बुरूज२०.११ १३-१४ ¶६-७
शनिवार, २४ डिसेंबर
माणसाच्या मनातले विचार खोल पाण्यासारखे असतात, पण समंजस माणूस ते बाहेर काढतो.—नीति. २०:५.
आपला विद्यार्थी जे काही शिकत आहे ते तो बायबलमधून शिकत आहे, हे त्याने समजून घ्यावं अशी आपली इच्छा आहे. (१ थेस्सलनी. २:१३) हे समजण्यासाठी आपण त्याला कशी मदत करू शकतो? त्यासाठी बायबलची वचनं नेहमी तुम्हीच समजावून सांगण्याऐवजी विद्यार्थ्यालाही काही वचनं समजवायला सांगा. अशा प्रकारे शिकत असलेल्या गोष्टींबद्दल त्याला बोलायचं प्रोत्साहन द्या. तसंच, बायबलची वचनं तो आपल्या जीवनात कशी लागू करू शकतो, याचा विचार करायलाही त्याला मदत करा. त्यासाठी त्याला असे प्रश्न विचारा ज्यांमुळे वाचलेल्या वचनांबद्दल तो काय विचार करतो आणि त्याला काय वाटतं, हे त्याला सांगता येईल. (लूक १०:२५-२८) जसं की, त्याला असं विचारा: “या वचनांतून तुम्हाला यहोवाचा कोणता गुण दिसून येतो?” “तुम्ही बायबलमधून आत्ताच जे सत्य शिकलात त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?” “तुम्ही जे काही शिकलात त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?” विद्यार्थ्याला बायबलचं किती ज्ञान आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्याला जे काही माहीत आहे ते त्याच्यासाठी किती मोलाचं आहे आणि ते तो किती लागू करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. शिकवताना बायबलचा चांगला उपयोग करा. तुम्हाला जर तुमचं शिकवण्याचं कौशल्य वाढवायचं असेल, तर तुम्ही नम्र असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.१० १५ ¶५-६
रविवार, २५ डिसेंबर
सकाळीच बी पेर आणि संध्याकाळपर्यंत आपल्या हाताला विश्रांती देऊ नकोस.—उप. ११:६.
प्रचाराचं काम पूर्ण व्हायला उशीर होणार नाही. ठरलेल्या वेळी ते नक्की पूर्ण होईल. कारण यहोवा प्रत्येक गोष्ट वेळेवर करतो. नोहाच्या दिवसांत काय झालं त्याचा विचार करा. जलप्रलय कधी येईल याची वेळ यहोवाने जवळजवळ १२० वर्षांआधीच ठरवली होती. याच्या बऱ्याच वर्षांनंतर त्याने नोहाला तारू बांधायला सांगितलं. तेव्हापासून ४० किंवा ५० वर्षांपर्यंत नोहा तारू बांधायला आणि लोकांना प्रचार करायला मेहनत घेत राहिला. लोक त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देत नव्हते. पण तरीही यहोवाने जोपर्यंत तारवात जायला सांगितलं नाही, तोपर्यंत तो लोकांना प्रचार करत राहिला. मग ठरवलेल्या वेळी यहोवाने तारवाचं दार बंद केलं. (उत्प. ६:३; ७:१, २, १६) लवकरच अशी वेळ येईल जेव्हा यहोवा आपल्याला प्रचाराचं काम बंद करायला सांगेल. मग तो सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करेल आणि एक नवीन जग आणेल जिथे फक्त यहोवाच्या आज्ञा पाळणारेच लोक राहतील. पण तोपर्यंत नोहा आणि इतरांप्रमाणे आपण ‘आपल्या हाताला विश्रांती देणार नाही.’ तर आपण प्रचाराच्या कामावर आपलं लक्ष लावू, धीर धरू आणि यहोवावर आणि त्याच्या अभिवचनांवर आपला विश्वास मजबूत करत राहू. टेहळणी बुरूज२०.०९ १३ ¶१८-१९
सोमवार, २६ डिसेंबर
सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थितपणे होऊ द्या.—१ करिंथ. १४:४०.
मस्तक कोण आहे हे स्पष्टपणे माहीत नसतं, तर यहोवाच्या कुटुंबात गोंधळ माजला असता आणि कोणीही आनंदी नसतं. उदाहरणार्थ, कुटुंबात शेवटी निर्णय कोण घेईल आणि त्यांप्रमाणे काम केलं जातं की नाही याची खातरी कोण करेल, हे कोणालाही माहीत नसतं. कुटुंबात शांती आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून यहोवाने पुरुषाला कुटुंबाचं मस्तक असण्याचा अधिकार दिला आहे. मग बरेच पती आपल्या पत्नीचा छळ का करतात? कारण ते यहोवाने कुटुंबासाठी दिलेल्या स्तरांचं पालन करत नाहीत. त्याऐवजी ते आपल्या रूढी-परंपरांनुसार आपल्या पत्नीशी वागतात. काही वेळा स्वतःच्या स्वार्थासाठीही ते आपल्या पत्नीशी वाईट वागतात. जसं की, आपण काही कमजोर नाही हे दाखवण्यासाठी ते आपल्या पत्नीवर क्रूरपणे हक्क गाजवतात. ते असा विचार करतात, की आपण आपल्या पत्नीला आपल्यावर प्रेम करायची जबरदस्ती तर करू शकत नाही, पण तिला आपल्या धाकात नक्कीच ठेवू शकतो. त्यामुळे ती आपल्या ताब्यात राहील. पुरुषाच्या अशा विचारसरणीमुळे आणि वागण्यामुळे स्त्रियांना जो आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि ही गोष्ट यहोवाने जे सांगितलं आहे त्याच्या अगदी विरोधात आहे.—इफिस. ५:२५, २८. टेहळणी बुरूज२१.०२ ३ ¶६-७
मंगळवार, २७ डिसेंबर
आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.—१ पेत्र ५:७.
एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल, तर मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. त्यामुळे, “सर्व [मानवी] समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” तुम्हाला मिळेल. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवा त्याच्या पवित्र शक्तीद्वारे तुम्हाला ही शांती देईल आणि त्यामुळे तुमचं अस्वस्थ मन शांत होईल. (गलती. ५:२२) यहोवाला प्रार्थना करताना त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करा. तुमची समस्या नेमकी काय आहे, तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे स्पष्टपणे त्याला सांगा. एखादी समस्या सोडवणं शक्य असेल, तर योग्य निर्णय घेण्यासाठी देवाकडे बुद्धी मागा आणि त्या निर्णयांप्रमाणे काम करण्यासाठी त्याच्याकडे बळही मागा. पण एखाद्या समस्येबद्दल तुम्ही काहीच करू शकत नसाल, तर त्याबद्दल जास्त चिंता वाटू नये म्हणून यहोवाला मदत मागा. तुमच्या प्रार्थना नेमक्या आणि स्पष्ट असल्या, तर यहोवा त्या प्रार्थनांची उत्तरं कशी देतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. पण बऱ्याचदा प्रार्थना करूनही जर तुम्हाला लगेच तिचं उत्तर मिळालं नाही, तर निराश होऊ नका. प्रार्थना करत राहा. कारण स्पष्टपणे प्रार्थना करण्यासोबतच तुम्ही सतत प्रार्थना करत राहावी असं यहोवाला वाटतं.—लूक ११:८-१०. टेहळणी बुरूज२१.०१ ३ ¶६-७
बुधवार, २८ डिसेंबर
येशू त्यांना म्हणाला: “सगळेच जण हा निर्णय घेतात असं नाही, तर ज्यांना ती देणगी मिळाली आहे तेच असा निर्णय घेतात.”—मत्त. १९:११.
ख्रिस्ती मंडळीत विवाहित जोडपी आणि कुटुंबं तर आहेतच, पण त्यासोबत असे अनेक भाऊबहीण आहेत ज्याचं लग्न झालेलं नाही. अशा अविवाहित भाऊबहिणींबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे? त्यांच्याबद्दल येशूने जसा विचार केला तसाच आपणही केला पाहिजे. येशूने अविवाहित राहून सेवाकार्य पूर्ण करण्यावर आपलं लक्ष लावलं आणि त्यासाठी आपला वेळ दिला. ख्रिस्ती बनण्यासाठी एखाद्याने लग्न केलं पाहिजे किंवा त्याने अविवाहित राहिलं पाहिजे असं कधीच त्याने शिकवलं नाही. पण काही ख्रिस्ती लग्न न करण्याचा निर्णय घेतील हे मात्र येशू म्हणाला होता. (मत्तय १९:१२ या वचनासाठी असलेली हिंदी ‘अध्ययन नोट’ पाहा.) येशूने अविवाहित लोकांचा आदर केला. लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत ते कमी महत्त्वाचे आहेत किंवा त्यांचं जीवन अपूर्ण आहे असा त्याने विचार केला नाही. येशूप्रमाणेच प्रेषित पौलनेसुद्धा अविवाहित राहून यहोवाची सेवा केली. पण एखाद्या ख्रिश्चनाने लग्न करणं चुकीचं आहे असं त्याने कधीच शिकवलं नाही. कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे हे त्याला माहीत होतं. टेहळणी बुरूज२०.०८ २७-२८ ¶७-८
गुरुवार, २९ डिसेंबर
देव प्रेम आहे,—१ योहा. ४:१६.
प्रेषित योहान खूप मोठं आयुष्य जगला. आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याला अनेक चांगले अनुभव आले. पण त्यासोबतच, त्याला अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. या समस्यांमुळे त्याचा विश्वास कमजोर होऊ शकला असता. पण येशूच्या आज्ञा पाळायचा त्याने होता होईल तितका प्रयत्न केला. भाऊबहिणींवर प्रेम करायची जी आज्ञा येशूने दिली होती तीसुद्धा त्याने पाळली. त्यामुळे त्याला याची पूर्ण खातरी होती, की यहोवा आणि येशूचं त्याच्यावर प्रेम आहे, आणि कोणत्याही परीक्षेचा सामना करायचं बळ ते आपल्याला देतील. (योहा. १४:१५-१७; १५:१०) योहान शेवटपर्यंत आपल्या शब्दांतून आणि कृतीतून भाऊबहिणींवर प्रेम करत राहिला. सैतान किंवा सैतानाच्या जगातली कुठलीच गोष्ट त्याला असं करण्यापासून रोखू शकली नाही. योहानप्रमाणेच आज आपण सैतानाच्या जगात राहत आहोत. आपल्याला माहीत आहे, की सैतान अतिशय दुष्ट असून त्याला कोणाबद्दलही प्रेम नाही. (१ योहा. ३:१, १०) त्याची अशी इच्छा आहे की आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करू नये. पण आपण त्याला संधी दिली तरच तो तसं करू शकेल. त्यामुळे, आपण भाऊबहिणींवर प्रेम करायचा, ते प्रेम शब्दांतून व्यक्त करायचा आणि कृतीतून दाखवायचा ठाम निश्चय करू या. मग, यहोवाच्या कुटुंबाचा भाग असल्याचं समाधान आणि आनंद आपल्याला मिळेल.—१ योहा. ४:७. टेहळणी बुरूज२१.०१ १३ ¶१८-१९
शुक्रवार, ३० डिसेंबर
देव धीर देतो.—रोम. १५:५.
सैतानाच्या या जगात जीवन जगणं खूप कठीण आहे. आणि काही वेळा तर काय करावं तेही आपल्याला कळत नाही. (२ तीम. ३:१) पण आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे यहोवाला माहीत आहे. आणि गरज असेल तेव्हा तो त्याच्या शक्तिशाली “उजव्या हाताने” आपल्याला आधार देईल असं वचन देतो. (यश. ४१:१०, १३) त्यामुळे आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो, की यहोवा आपल्याला नक्की मदत करेल, आणि कोणत्याही समस्येचा सामना करायचं बळ त्याच्या वचनातून आपल्याला देईल. त्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटवरचे व्हिडिओ पाहू शकता, बायबल उताऱ्यांचे नाट्यवाचन ऐकू शकता आणि “त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा” हे पुस्तक वाचू शकता. पण त्याआधी यहोवाला प्रार्थना करा. आणि तुम्हाला लागू करता येतील असे मुद्दे शोधायला त्याने मदत करावी अशी विनंती त्याला करा. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही वाचत आहात तिच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करा. यहोवाच्या या विश्वासू सेवकाने आपली समस्या सोडवण्यासाठी काय केलं, आणि यहोवाने त्याला कशी मदत केली, यावर मनन करा. मग त्या अहवालातून तुम्ही जे काही शिकलात ते लागू करा. तसंच, यहोवाने आतापर्यंत तुमच्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. आणि इतरांना प्रोत्साहन आणि आधार देऊन त्याबद्दल कदर असल्याचं दाखवा. टेहळणी बुरूज२१.०३ १९ ¶२२-२३
शनिवार, ३१ डिसेंबर
मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत.—स्तो. १२७:३.
तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही जर आता बाळाचा विचार करत असाल, तर स्वतःला असं विचारा: ‘यहोवावर आणि त्याच्या वचनावर आपलं प्रेम आहे का? आपण नम्र आहोत का? एका अनमोल जिवाची आपण चांगली काळजी घेऊ असा भरवसा यहोवाला आपल्याबद्दल आहे का?’ (स्तो. १२७:४) आणि तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मेहनत करणं किती महत्त्वाचं आहे, हे मी माझ्या मुलांना शिकवतो का?’ (उप. ३:१२, १३) ‘शारीरिक आणि नैतिक धोक्यांपासून मी माझ्या मुलांचं होता होईल तितकं संरक्षण करतो का?’ (नीति. २२:३) हे खरं आहे, की तुम्ही तुमच्या मुलांचं सगळ्याच समस्यांपासून संरक्षण करू शकत नाही. पण जीवनात येणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही त्यांना तयार करू शकता. त्यासाठी बायबल कशी मदत करतं हे त्यांना प्रेमळपणे शिकवत राहा. (नीति. २:१-६) उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य यहोवाला सोडून देतो, तेव्हा यहोवाला एकनिष्ठ राहणं का महत्त्वाचं आहे हे तुमच्या मुलांना बायबलमधून शिकवा. (स्तो. ३१:२३) किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या दुःखाचा सामना करण्यासाठी आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं, हे आपल्या मुलांना दाखवा.—२ करिंथ. १:३, ४; २ तीम. ३:१६. टेहळणी बुरूज२०.१० २७ ¶७