ऑक्टोबर
शनिवार, १ ऑक्टोबर
“यहोवाचं मन कोण समजू शकलं आहे, की त्याने त्याला काही शिकवावं?” पण आपल्याला ख्रिस्ताचं मन समजलं आहे.—१ करिंथ. २:१६.
येशूला ओळखल्यामुळे आपण त्याच्यासारखा विचार करायला आणि वागायला शिकू. आणि आपण जितक्या चांगल्या प्रकारे येशूचे विचार जाणून घेऊ आणि त्याच्यासारखाच विचार करू तितकीच आपली त्याच्यासोबतची मैत्री घनिष्ठ होईल. आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? एका उदाहरणावर विचार करा. त्याने स्वतःचा फायदा पाहण्याऐवजी दुसऱ्यांना मदत करण्याबद्दल जास्त विचार केला. (मत्त. २०:२८; रोम. १५:१-३) अशी विचारसरणी असल्यामुळे तो त्याग करायला आणि इतरांना क्षमा करायला तयार होता. लोक त्याच्याबद्दल वाईट बोलायचे तेव्हा तो लगेच नाराज व्हायचा नाही. (योहा. १:४६, ४७) तसंच, लोकांनी बऱ्याच काळाआधी केलेल्या चुका लक्षात ठेवून तो त्यांच्याशी वागत नव्हता. (१ तीम. १:१२-१४) येशूने म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) तेव्हा स्वतःला विचारा: ‘येशूचं अनुकरण करून मी माझ्या भाऊबहिणींसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी, माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करत आहे का?’ टेहळणी बुरूज२०.०४ २४ ¶११
रविवार, २ ऑक्टोबर
ते माझ्या नावाचा आदर करतील.—यश. २९:२३.
आज पहिलं तर जगात असे बरेच लोक आहेत जे यहोवाच्या नावाला दोष लावत आहेत. पण यहोवाची बाजू मांडण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याच्याबद्दल हे सत्य सांगू शकता, की तो पवित्र, नीतिमान, चांगला आणि प्रेमळ आहे. तुम्ही दाखवून देऊ शकता, की तुम्हाला त्याचं शासन मान्य आहे. तसंच, यहोवाच योग्य पद्धतीने मानवांवर शासन करू शकतो आणि त्याचंच शासन सगळीकडे शांतीचं व आनंदाचं वातावरण आणू शकतं, हेही तुम्ही लोकांना सांगू शकता. (स्तो. ३७:९, ३७; १४६:५, ६, १०) आपण लोकांना बायबलमधली सत्यं शिकवतो तेव्हा यहोवालाच शासन करण्याचा अधिकार आहे यावर सहसा जोर देतो. हे खरं आहे की आपण लोकांना देवाच्या नियमांबद्दल आणि त्यांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे शिकवतो. पण आपला मुख्य उद्देश लोकांना आपल्या पित्यावर, म्हणजे यहोवावर प्रेम करायला आणि त्याला विश्वासू राहायला शिकवणं हा आहे. म्हणून लोकांना शिकवताना आपण यहोवाच्या सुंदर गुणांवर भर दिला पाहिजे. तसंच, यहोवा हे नाव असलेल्या देवाचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे लोकांना समजायला मदत केली पाहिजे. (यश. ६३:७) अशा प्रकारे शिकवल्यामुळे लोक यहोवाला एकनिष्ठ राहतील. तसंच, यामुळे ते यहोवावर प्रेम करतील आणि त्याच्या आज्ञांचंही पालन करतील. टेहळणी बुरूज२०.०६ ६ ¶१६; ७ ¶१९
सोमवार, ३ ऑक्टोबर
माणसाला तोंड कोणी दिलं? मी यहोवानेच नाही का?—निर्ग. ४:११.
मानवी मेंदूची रचना अगदी अद्भुत आहे. बाळ आईच्या गर्भात असतं तेव्हा त्याच्या मेंदूची रचना जशी व्हायला हवी तशी होऊ लागते. प्रत्येक मिनटाला हजारो नवीन पेशी तयार होत असतात. संशोधकांच्या मते एका मेंदूत जवळपास शंभर अब्ज खास पेशी असतात ज्यांना न्यूरॉन्स म्हणतात. आणि यांना व्यवस्थित रीत्या एकत्रित करण्यात आलेलं असतं. मेंदूचं वजन जवळपास दीड किलो असतं. मेंदू किती अद्भुत रीत्या काम करतो याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याला मिळालेली बोलण्याची क्षमता. आपण जेव्हा बोलतो तेव्हा नेमकं काय घडत असतं याचा जरा विचार करा. आपण बोलतो तेव्हा आपला मेंदू आपल्या जिभेच्या, घशाच्या, ओठांच्या, जबड्याच्या आणि छातीच्या जवळपास शंभर स्नायूंना नियंत्रित करत असतो. एखादा शब्द व्यवस्थित उच्चारण्यासाठी हे स्नायू विशिष्ट क्रमाने कार्य करतात. भाषा बोलण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल संशोधकांनी एक माहिती प्रकाशित केली आहे. त्यात असं सांगितलं आहे की नवीन जन्मलेलं बाळ शब्दांमधला फरक ओळखू शकतं आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकतं. हा अभ्यास अनेक संशोधक मानत असलेल्या गोष्टीला दुजोरा देतो. ते मानतात की आपल्यामध्ये भाषा ओळखण्याची आणि शिकण्याची क्षमता आहे. तेव्हा, यात काहीच शंका नाही की बोलण्याची क्षमता ही आपल्याला देवाकडून मिळालेली एक देणगी आहे! टेहळणी बुरूज२०.०५ २२-२३ ¶८-९
मंगळवार, ४ ऑक्टोबर
खरा पाया असलेल्या अशा शहराची तो वाट पाहत होता, ज्याची रचना आणि बांधकाम करणारा देव आहे.—इब्री ११:१०.
अब्राहाम ऊर शहरात होता तेव्हा तो एक आरामदायी जीवन जगत होता. पण ते आरामदायी जीवन सोडून द्यायला तो आनंदाने तयार झाला. का? “कारण, खरा पाया असलेल्या शहराची तो वाट पाहत होता.” (इब्री ११:८-१०, १६ ) अब्राहाम ज्या शहराची वाट पाहत होता ते देवाचं राज्य आहे. हे राज्य येशू ख्रिस्त आणि १,४४,००० अभिषिक्त ख्रिश्चनांनी मिळून बनलेलं आहे. प्रेषित पौल या राज्याला “जिवंत देवाचे शहर, अर्थात स्वर्गीय यरुशलेम” असं म्हणतो. (इब्री १२:२२; प्रकटी. ५:८-१०; १४:१) याच राज्यासाठी प्रार्थना करायला येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं होतं. देवाचं हे राज्य यावं आणि देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायला त्याने त्यांना शिकवलं. (मत्त. ६:१०) देवाच्या राज्याबद्दलची एकूण एक माहिती अब्राहामला होती का? नाही. बायबल म्हणतं, की बऱ्याच शतकांपर्यंत ही माहिती एक “पवित्र रहस्य” होती. (इफिस. १:८-१०; कलस्सै. १:२६, २७) पण आपल्या संततीपैकी काही जण पुढे राजे होतील हे अब्राहामला पक्कं माहीत होतं. कारण यहोवाने त्याला तसं अभिवचनच दिलं होतं.—उत्प. १७:१, २, ६. टेहळणी बुरूज२०.०८ २-३ ¶२-४
बुधवार, ५ ऑक्टोबर
ख्रिस्तासोबत ऐक्यात राहून पुढे चालत राहा. त्याच्यात मुळावलेले व्हा आणि वाढत जा. तसंच विश्वासात स्थिर व्हा.—कलस्सै. २:६, ७.
आपण धर्मत्यागी शिकवणी नाकारल्या पाहिजेत. ख्रिस्ती मंडळीची सुरुवात झाली तेव्हापासून सैतानाने नेहमीच ख्रिश्चनांचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यांतला फरक ओळखायला आपण शिकलं पाहिजे. यहोवावरचा आपला विश्वास कमजोर करण्यासाठी आणि भाऊबहिणींवर असलेलं आपलं प्रेम कमी करण्यासाठी आपले विरोधी इंटरनेट किंवा सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरवू शकतात. पण या गोष्टींमागे सैतानाचा हात आहे हे कधीही विसरू नका. आणि अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. (१ योहा. ४:१, ६; प्रकटी. १२:९) सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी येशूवर असलेला आपला भरवसा आपण वाढवला पाहिजे. तसंच, देव आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा उपयोग करत आहे यावर आपला भरवसा असला पाहिजे. याशिवाय, यहोवा आपल्या संघटनेचं मार्गदर्शन करण्यासाठी विश्वासू आणि बुद्धिमान दासाचाच उपयोग करत आहे यावरही आपला भरवसा असला पाहिजे. (मत्त. २४:४५-४७) पण हे आपण कसं करू शकतो? त्यासाठी आपण बायबलचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. असं केल्यामुळे आपला विश्वास अशा एका झाडासारखा होईल ज्याची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात. पौलने आजच्या दैनिक वचनात असंच काहीसं म्हटलं. टेहळणी बुरूज२०.०७ २३-२४ ¶११-१२
गुरुवार, ६ ऑक्टोबर
माणूस फक्त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.—१ शमु. १६:७.
आपण अपरिपूर्ण असल्यामुळे बऱ्याचदा आपण फक्त जे दिसतं त्यावरूनच इतरांबद्दल मत बनवतो. (योहा. ७:२४) पण डोळ्यांना जे दिसतं त्यावरून आपल्याला एका व्यक्तीबद्दल सगळीच माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ, एखादा डॉक्टर कितीही हुशार आणि अनुभवी असला, तरी रुग्णाकडे नुसतं पाहून त्याला जास्त माहिती मिळणार नाही. रुग्णाला याआधी झालेले आजार, त्याचा स्वभाव किंवा त्याला नेमका काय त्रास होत आहे हे जाणून घेण्यासाठी त्या डॉक्टरला रुग्णाचं बोलणं लक्ष देऊन ऐकावं लागेल. रुग्णाच्या शरीराची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर कदाचित त्याला एक्स-रे काढायलाही सांगेल. हे सगळं केलं नाही, तर डॉक्टर रुग्णावर कदाचित चुकीचा उपचार करेल. त्याचप्रमाणे, फक्त वरवर बघून आपण भाऊबहिणींना पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही. एक व्यक्ती म्हणून ते कसे आहेत हे समजण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. इतरांच्या मनात काय चाललं आहे हे आपण कधीही जाणून घेऊ शकतं नाही. पण आपण यहोवाचं अनुकरण करायचा पुरेपूर प्रयत्न करू शकतो. तो आपल्या उपासकांचं लक्ष देऊन ऐकतो. तो त्यांची परिस्थिती आणि त्यांना जीवनात आलेले अनुभव लक्षात घेतो. तसंच, तो त्यांच्याशी दयाळूपणे वागतो. टेहळणी बुरूज२०.०४ १४-१५ ¶१-३
शुक्रवार, ७ ऑक्टोबर
स्वतःबद्दल समंजसपणे विचार करा.—रोम. १२:३.
एक गर्विष्ठ व्यक्ती समंजसपणा दाखवत नाही. त्यामुळे आपण नम्रता विकसित केली पाहिजे. गर्विष्ठ लोक भांडखोर आणि अहंकारी असतात. ते आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःला आणि इतरांना दुखावतात. जर त्यांनी काळजी घेतली नाही तर सैतान त्यांची मनं आंधळी आणि भ्रष्ट करेल. (२ करिंथ. ४:४; ११:३) एक नम्र व्यक्ती समंजस असते. आपण खूप महत्त्वाचे आहोत असं ती स्वतःबद्दल विचार करत नाही; तर इतर जण बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्यापेक्षा चांगले आहेत हे ती मान्य करते. (फिलिप्पै. २:३) तसंच, देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो ही गोष्ट तिला माहीत असते. (१ पेत्र ५:५) यहोवाने आपला विरोध करावा अशी आपली मुळीच इच्छा नाही. आणि म्हणून आपण समंजस असणं गरजेचं आहे. नम्र राहण्यासाठी आपण बायबलचा सल्ला लागू केला पाहिजे. बायबल म्हणतं: “आपले जुने व्यक्तिमत्त्व त्याच्या वाईट सवयींसहित काढून टाका” आणि “देवाकडील नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करा.” येशूच्या व्यक्तिमत्त्वाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं जवळून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—कलस्सै. ३:९, १०; १ पेत्र २:२१. टेहळणी बुरूज२०.०७ ७ ¶१६-१७
शनिवार, ८ ऑक्टोबर
शरीर एक असलं, तरी बरेच अवयव असतात.—१ करिंथ. १२:१२.
यहोवाच्या मंडळीचा भाग असणं आपल्यासाठी किती मोठा बहुमान आहे! कारण जेव्हा आपण मंडळीत आपल्या भाऊबहिणींसोबत यहोवाची उपासना करतो तेव्हा आपण शांती आणि आनंद अनुभवत असतो. मंडळीत तुमचंही महत्त्वाचं स्थान आहे का? प्रेषित पौलने मंडळीची तुलना मानवी शरीराशी केली. आणि मंडळीतल्या प्रत्येक सदस्याची तुलना शरीराच्या अवयवांशी केली. (रोम. १२:४-८; १ करिंथ. १२:१२-२७; इफिस. ४:१६) पौलने दिलेल्या उदाहरणातून आपण हे शिकतो, की आपल्यापैकी प्रत्येकाचं यहोवाच्या कुटुंबात एक महत्त्वाचं स्थान आहे. त्या उदाहरणात पौलने सुरुवातीला असं म्हटलं: “ज्याप्रमाणे आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत, पण ते सर्व एकाच प्रकारचे कार्य करत नाहीत; त्याचप्रमाणे, आपणसुद्धा पुष्कळ असलो, तरी ख्रिस्तासोबतच्या ऐक्यात एक शरीर असून एकमेकांना जोडलेले अवयव आहोत.” (रोम. १२:४, ५) इथे पौलला काय म्हणायचं होतं? त्याला हेच म्हणायचं होतं, की आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीत वेगळी भूमिका निभावत असला तरी प्रत्येक जण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे. टेहळणी बुरूज२०.०८ २० ¶१-२, ४
रविवार, ९ ऑक्टोबर
यहोवाने त्याला विचारलं, ‘तू हे कसं करशील?’—१ राजे २२:२१.
आईवडिलांनो, नम्रतेच्या बाबतीत तुम्ही यहोवाच्या उदाहरणाचं कसं अनुकरण करू शकता? एखादं काम कसं करायचं त्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलांचं मत घेऊ शकता. आणि ते योग्य वाटत असेल तर त्यानुसार काम करा. यहोवाने धीर दाखवण्याच्या बाबतीतही एक सुंदर उदाहरण मांडलं. त्याचे काही निर्णय त्याच्या काही सेवकांना योग्य वाटले नाही आणि त्याबद्दल त्यांनी त्याला आदराने प्रश्न विचारले तेव्हा त्याने धीराने त्यांचं ऐकलं. उदाहरणार्थ, यहोवाने जेव्हा सदोम आणि गमोराचा नाश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अब्राहामने यहोवापुढे आपल्या चिंता व्यक्त केल्या, आणि यहोवाने त्या धीराने ऐकून घेतल्या. (उत्प. १८:२२-३३) तसंच, अब्राहामची पत्नी सारा हिच्याशी यहोवा कशा प्रकारे वागला याचाही विचार करा. सारा तिच्या म्हातारपणात गरोदर राहील असं अभिवचन यहोवाने तिला दिलं तेव्हा ती हसली. पण त्यामुळे यहोवा तिच्यावर चिडला नाही. (उत्प. १८:१०-१४) उलट, तो तिच्याशी आदराने वागला. पालकांनो आणि मंडळीतल्या वडिलांनो, तुम्ही यहोवाच्या उदाहरणातून काय शिकू शकता? तुम्ही घेतलेला एखादा निर्णय तुमच्या मुलांना किंवा मंडळीतल्या काहींना पटत नाही तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते? त्या वेळी, आपलंच म्हणणं खरं आहे हे पटवून द्यायची तुम्ही घाई करता का? की तुम्ही त्यांचीही बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करता? अशा वेळी तुम्ही जर यहोवाचं अनुकरण केलं, तर तुमच्या कुटुंबाला आणि मंडळीला नक्कीच फायदा होईल. टेहळणी बुरूज२०.०८ १० ¶७-९
सोमवार, १० ऑक्टोबर
दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.—२ करिंथ. १२:९.
आपण सत्यात आलो तेव्हा सुरुवातीला कदाचित इतरांकडून शिकून घ्यायला आपण खूप उत्सुक होतो. कारण आध्यात्मिक दृष्टीने आपण तान्ह्या बाळासारखे होतो आणि आपल्याला अजून खूप काही शिकायचं होतं. (१ करिंथ. ३:१, २) पण आता आपली मनोवृत्ती कशी आहे? आपण जर बऱ्याच वर्षांपासून सत्यात असलो आणि आपल्याकडे भरपूर अनुभव असेल तर आपण कदाचित इतरांकडून मदत स्वीकारायला तयार नसू; खासकरून अशा व्यक्तीकडून जी आपल्यानंतर सत्यात आली आहे. पण यहोवा आपल्या भाऊबहिणींद्वारेच आपल्याला धीर आणि बळ देत असतो. (रोम. १:११, १२) त्यामुळे आपल्याला जर यहोवाकडून सामर्थ्य मिळवायचं असेल, तर भाऊबहिणींकडून मिळणारी मदत आपण आनंदाने स्वीकारली पाहिजे. एक व्यक्ती कोणत्या संस्कृतीची आहे, ती किती शिकलेली आहे, तिच्याकडे किती पैसा आहे किंवा ती किती ताकदवान आहे हे महत्त्वाचं नसतं. पण ती जर नम्र असेल आणि यहोवावर विसंबून राहत असेल, तर ती अनेक चांगल्या गोष्टी करू शकते. तेव्हा आपण (१) यहोवावर विसंबून राहू या, (२) बायबलमध्ये दिलेल्या व्यक्तींच्या उदाहरणांतून शिकू या, आणि (३) आपले भाऊबहीण देत असलेली मदत स्वीकारू या. आपण जर असं केलं, तर यहोवा नक्कीच आपल्याला सामर्थ्यशाली करेल, मग आपल्याला कितीही कमजोर वाटत असलं तरीही. टेहळणी बुरूज२०.०७ १४ ¶२; १९ ¶१८-१९
मंगळवार, ११ ऑक्टोबर
तुमच्यापैकी प्रत्येकाने अशीच मेहनती वृत्ती पुढेही दाखवावी, म्हणजे तुम्ही आळशी बनणार नाही, तर विश्वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात, त्यांचं अनुकरण करणारे व्हाल.—इब्री ६:११, १२.
सत्यात नसलेल्या नातेवाइकांना साक्ष देताना धीर दाखवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. अशा वेळी उपदेशक ३:७ मध्ये दिलेलं तत्त्व आपल्याला मदत करेल. त्यात म्हटलं आहे: “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” आपण जर आपली वागणूक चांगली ठेवली, तर काहीही न बोलता आपण त्यांना साक्ष देऊ शकू. पण त्यासोबतच, संधी मिळेल तेव्हा आपण त्यांना सत्याबद्दल सांगितलंही पाहिजे. (१ पेत्र ३:१, २) हे खरं आहे, की आपण आवेशाने प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम केलं पाहिजे. पण ते करत असताना आपण सगळ्यांशी, अगदी आपल्या नातेवाइकांशीही धीराने वागलं पाहिजे. धीर दाखवण्याच्या बाबतीत आपण बायबल काळातल्या आणि आपल्या काळातल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांतून बरंच काही शिकू शकतो. जसं की, दुष्टाईचा अंत कधी होईल याची हबक्कूक वाट पाहत असला तरी त्याने धीर धरला. ही गोष्ट त्याच्या शब्दांतून दिसून येते. त्याने म्हटलं: “मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन.” (हब. २:१) तसंच, प्रेषित पौलला आपलं सेवाकार्य पूर्ण करायची आणि स्वर्गातलं जीवन मिळवायची मनापासून इच्छा होती. पण म्हणून त्याने घाई केली नाही, तर तो धीराने “आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष” देत राहिला.—प्रे. कार्ये २०:२४. टेहळणी बुरूज२०.०९ ११-१२ ¶१२-१४
बुधवार, १२ ऑक्टोबर
येशूने कधीही देवाचं स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.—फिलिप्पै. २:६.
यहोवानंतर जर कोणाकडे सर्वात जास्त अधिकार असेल तर तो येशूकडे आहे. तरीही त्याने स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा श्रेष्ठ समजलं नाही. यहोवाचे सेवक येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करतात आणि ते नम्रपणे यहोवाची सेवा करतात. अशा प्रेमळ गुणामुळेच यहोवाच्या लोकांची ओळख होते. (लूक ९:४८; योहा. १३:३५) मंडळीतल्या समस्या वडील व्यवस्थित हाताळत नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय कराल? तक्रार करण्याऐवजी तुम्ही नम्रता दाखवली पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्यांच्या अधीन राहिलं पाहिजे. (इब्री १३:१७) स्वतःला विचारा: ‘मला ज्या समस्या दिसतात त्या खरंच इतक्या मोठ्या किंवा गंभीर आहेत का की त्या सोडवल्या गेल्याच पाहिजेत? त्या सोडवण्याची ही योग्य वेळ आहे का? त्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे का? तक्रार करून मी मंडळीत एकी निर्माण करतोय की इतरांचं लक्ष वेधून घेतोय?’ यहोवासाठी क्षमतांपेक्षा नम्रता आणि कौशल्यांपेक्षा एकी जास्त महत्त्वाची आहे. म्हणून नम्रपणे यहोवाची होता होईल तितकी सेवा करा. यामुळे मंडळीत एकी वाढेल.—इफिस. ४:२, ३. टेहळणी बुरूज२०.०७ ४-५ ¶९-११
गुरुवार, १३ ऑक्टोबर
येशू त्यांना म्हणाला: “घाबरू नका! जा आणि माझ्या भावांना ही बातमी सांगा.—मत्त. २८:१०.
काही विश्वासू स्त्रियांनी “स्वतःच्या संपत्तीतून येशूची” सेवा केली. त्यांनी केलेल्या या सेवेबद्दल येशूने मनापासून त्यांची कदर केली. (लूक ८:१-३) त्याने त्यांना देवाच्या वचनातली महत्त्वाची सत्यंही सांगितली. जसं की, येशूने त्या स्त्रियांना आधीच सांगितलं होतं, की त्याचा मृत्यू होईल आणि नंतर त्याचं पुनरुत्थानही केलं जाईल. (लूक २४:५-८) तसंच, पुढे येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी त्याने प्रेषितांसोबतच या स्त्रियांनाही तयार केलं. (मार्क ९:३०-३२; १०:३२-३४) आणि लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, येशूला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याचे प्रेषित पळून गेले. पण ज्या स्त्रियांनी त्याची सेवा केली होती त्यांच्यापैकी काही स्त्रिया त्याच्या मृत्यूच्या वेळी शेवटपर्यंत त्याच्याजवळ होत्या. (मत्त. २६:५६; मार्क १५:४०, ४१) येशूचं पुनरुत्थान झाल्यावर त्याला पाहण्याची संधी, सगळ्यात आधी विश्वासू स्त्रियांना मिळाली. मग त्याने त्या स्त्रियांना आपलं पुनरुत्थान झाल्याची बातमी प्रेषितांना कळवायला सांगितली. (मत्त. २८:५, ९, १०) तसंच, इ.स.३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेव्हा शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला त्या वेळी त्यांच्यामध्ये स्त्रियाही असाव्यात. त्यामुळे तिथे असलेल्या सगळ्यांना वेगवेगळ्या भाषेत “देवाच्या अद्भुत” गोष्टी सांगण्याची संधी मिळाली.—प्रे. कार्ये १:१४; २:२-४, ११. टेहळणी बुरूज२०.०९ २३ ¶११-१२
शुक्रवार, १४ ऑक्टोबर
स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.—१ तीम. ४:१६.
शिष्य बनवण्याचं काम हे जीवन वाचवण्याचं काम आहे! असं का म्हणता येईल? मत्तय २८:१९, २० या वचनांमध्ये येशूने काय आज्ञा दिली त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “जा आणि . . . लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या.” बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे? कारण आपल्याला जर आपला जीव वाचवायचा असेल, तर बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. पण जीव वाचवण्यासाठी किंवा सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी एका व्यक्तीने हे मान्य केलं पाहिजे, की येशूने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं आणि त्याचं पुनरुत्थान झालं. म्हणूनच प्रेषित पेत्र इतर ख्रिश्चनांना असं म्हणाला: ‘आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचं जीवन वाचवत आहे.’ (१ पेत्र ३:२१) त्यामुळे, जेव्हा एक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेतो तेव्हा त्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, की शिष्य बनवण्याचं काम हे जीवन वाचवण्याचं काम आहे. शिष्य बनवण्यासाठी आपण आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवलं पाहिजे. (२ तीम. ४:१, २) असं करणं का गरजेचं आहे? कारण येशूने अशी आज्ञा दिली, की “जा आणि . . . लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . शिकवा.” प्रेषित पौलनेही म्हटलं, या कामात “टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.” टेहळणी बुरूज२०.१० १४ ¶१-२
शनिवार, १५ ऑक्टोबर
आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.—लूक ५:१०.
येशूचा शिष्य, पेत्र हा ‘माणसं धरण्याचं’ काम, म्हणजेच प्रचाराचं काम खूप आवडीने करायला शिकला. आणि यहोवाच्या मदतीने तो या कामात खूप कुशल बनला. (प्रे. कार्ये २:१४, ४१) प्रचाराचं काम करायचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे? यहोवावरचं आपलं प्रेम. आपल्याला कदाचित वाटेल, की आपण हे काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही. पण यहोवावरचं आपलं प्रेमच या भावनेवर मात करायला आपल्याला मदत करू शकतं. पेत्रच्या बाबतीत काय झालं याचा विचार करा. आपला शिष्य होण्याचं आमंत्रण देताना येशू त्याला म्हणाला: “घाबरू नकोस.” (लूक ५:८-११) पण, पेत्र का घाबरला होता? येशूचा शिष्य झाल्यामुळे आपल्यासोबत काय होईल याची त्याला भीती वाटत होती का? नाही. खरंतर, येशूने नुकताच एक चमत्कार करून त्यांना भरपूर मासे पकडायला मदत केली होती. तो चमत्कार पाहून पेत्र चकित झाला, आणि येशूसोबत काम करायची आपली योग्यता नाही असं त्याला वाटलं. आणि त्यामुळे तो घाबरला. पेत्रसारखंच तुम्हालाही भीती वाटू शकते. प्रचारक बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील या विचाराने तुम्हाला भीती वाटू शकते, कमीपणाची भावना येऊ शकते. पण जर तुम्ही यहोवावरचं, येशूवरचं आणि लोकांवरचं आपलं प्रेम वाढवलं, तर तुम्हालासुद्धा येशूने दिलेलं आमंत्रण आनंदाने स्वीकारता येईल.—मत्त. २२:३७, ३९; योहा. १४:१५. टेहळणी बुरूज२०.०९ ३ ¶४-५
रविवार, १६ ऑक्टोबर
म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना शिकवा.—मत्त. २८:१९, २०.
“सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना शोधायला आपण आपला वेळ, शक्ती आणि पैसा आनंदाने खर्च करतो. (प्रे. कार्यं १३:४८) असं करून आपण येशूचंच अनुकरण करत असतो. त्याने म्हटलं होतं: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे.” (योहा. ४:३४; १७:४) तसंच सोपवलेलं काम पूर्ण करायची आपलीसुद्धा मनापासून इच्छा आहे. (योहा. २०:२१) आणि आपल्यासोबत इतर सगळ्यांनी, अगदी अक्रियाशील झालेल्यांनीसुद्धा, हे काम धीराने करत राहावं असं आपल्याला वाटतं. (मत्त. २४:१३) हे खरं आहे, की येशूने दिलेलं काम पूर्ण करणं सोपं नाही. पण या कामात आपण एकटे नाही. कारण येशूने आपल्याला अभिवचन दिलं आहे, की तो आपल्यासोबत असेल. तसंच, या कामात आपण “देवाचे सहकारी” म्हणून काम करतो. शिवाय, आपण “ख्रिस्तासोबत” मिळूनही हे काम करत असतो. (१ करिंथ. ३:९; २ करिंथ. २:१७) त्यामुळे आपण ते नक्कीच पूर्ण करू शकतो. खरंच, हे काम करण्याचा आणि इतरांनाही ते करायला मदत करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे!—फिलिप्पै. ४:१३. टेहळणी बुरूज२०.११ ७ ¶१९-२०
सोमवार, १७ ऑक्टोबर
येशू बुद्धीने आणि शरीराने वाढत गेला. तसंच, देवाच्या आणि माणसांच्या कृपेतही तो वाढत गेला.—लूक २:५२.
सहसा पालक जे निर्णय घेतात, त्यांचा पुढे मुलांच्या जीवनावर परिणाम होतो. पालकांनी जर चुकीचे निर्णय घेतले तर त्यांचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण तेच जर त्यांनी योग्य निर्णय घेतले तर मुलांवर चांगला परिणाम होऊ शकतो. आणि मुलं पुढे आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतील. पण, मुलांनी स्वतःसुद्धा चांगले निर्णय घेतले पाहिजेत. आणि यहोवाची सेवा करण्याच्या निर्णयापेक्षा आणखी चांगला निर्णय कोणता असू शकतो! (स्तो. ७३:२८) येशूच्या आईवडिलांची, म्हणजे योसेफ आणि मरीया यांची अशी इच्छा होती, की पुढे जाऊन त्यांच्या मुलांनी यहोवाची सेवा करावी. आणि जीवनात त्यांनी जे काही निर्णय घेतले त्यांवरून दिसून आलं, की यहोवाची सेवा करणं त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. (लूक २:४०, ४१, ५२) तसंच, येशूनेसुद्धा आपल्या जीवनात योग्य निर्णय घेतले. त्यामुळे त्याच्यासाठी यहोवाची जी इच्छा होती ती त्याला पूर्ण करता आली. (मत्त. ४:१-१०) येशू मोठा होऊन दयाळू, विश्वासू आणि धैर्यवान माणूस बनला. कोणत्या पालकाला असं वाटणार नाही, की आपलाही मुलगा असाच असावा? अशा मुलाबद्दल त्यांना नक्कीच खूप अभिमान आणि आनंद वाटेल. टेहळणी बुरूज२०.१० २६ ¶१-२
मंगळवार, १८ ऑक्टोबर
तू नेहमी पुढे पाहत राहा.—नीति. ४:२५.
पुढे दिलेल्या तीन उदाहरणांचा विचार करा. एका वयस्कर बहिणीला तिच्या तरुणपणाचे दिवस आठवतात. आज जरी तिचं वय झालं असलं, तरी तिच्याने होईल तितकी ती यहोवाची सेवा करत आहे. (१ करिंथ. १५:५८) तसंच, ती दररोज स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला नवीन जगात पाहते. आणखी एका बहिणीला आठवतं, की मंडळीतल्या एका व्यक्तीने तिचं मन दुखावलं होतं. पण त्या गोष्टीचा राग ती मनात बाळगत नाही. (कलस्सै. ३:१३) तिसरं उदाहरण म्हणजे, एका भावाला त्याने पूर्वी केलेल्या चुका आठवतात. पण आता तो यहोवाला विश्वासू राहायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. (स्तो. ५१:१०) या तिन्ही उदाहरणांमध्ये कोणती गोष्ट सारखी आहे? तिघांनाही त्यांच्या जीवनात पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवतात. पण त्यांवरच ते विचार करत बसत नाहीत, तर भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांचा ते विचार करतात. हे करणं इतकं का महत्त्वाचं आहे? एक व्यक्ती जर चालताना सतत मागे पाहत राहिली, तर तिला पुढे चालत राहणं कठीण जाईल. आपल्या सेवेच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं. आपण जर घडून गेलेल्या गोष्टी सतत आठवत राहिलो, तर यहोवाची सेवा करत राहणं आपल्याला कठीण जाईल.—लूक ९:६२. टेहळणी बुरूज२०.११ २४ ¶१-३
बुधवार, १९ ऑक्टोबर
त्याला तुच्छ लेखून तो त्याच्यावर हसू लागला.—१ शमु. १७:४२.
शक्तिशाली योद्धा गल्याथ याच्या नजरेत दावीद कमजोर होता. गल्याथ हा उंच आणि धिप्पाड होता. त्याला युद्धाचं प्रशिक्षण मिळालं होतं आणि त्याच्याकडे हत्यारंही होती. पण गल्याथच्या तुलनेत दावीद खूप लहान होता. त्याला युद्धाचं प्रशिक्षण मिळालं नव्हतं आणि त्याच्याकडे हत्यारंही नव्हती. पण तो यहोवावर विसंबून होता. आणि यहोवाने दावीदला, गल्याथला हरवण्यासाठी लागणारी ताकद दिली. (१ शमु. १७:४१-४५, ५०) दावीदला आणखी एका समस्येला तोंड द्यावं लागलं. त्या समस्येमुळे त्याला कमजोर झाल्यासारखं वाटलं असेल. यहोवाने शौलला इस्राएलचा राजा म्हणून नियुक्त केलं होतं. दावीदने एकनिष्ठपणे त्याची सेवा केली. सुरुवातीला दावीदबद्दल शौलला फार आदर वाटायचा. पण नंतर गर्वामुळे तो दावीदचा हेवा करू लागला. तो त्याच्याशी खूप वाईट वागू लागला. इतकंच नाही, तर त्याने त्याला मारून टाकण्याचाही प्रयत्न केला. (१ शमु. १८:६-९, २९; १९:९-११) शौल दावीदशी वाईट वागत असला, तरी यहोवाने नेमलेल्या राजाचा दावीद आदर करत राहिला. (१ शमु. २४:६) तो यहोवावर विसंबून राहिला. कारण त्याला या गोष्टीची खातरी होती, की कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी यहोवा त्याला बळ देईल.—स्तो. १८:१ आणि उपरीलेखन. टेहळणी बुरूज२०.०७ १७ ¶११-१३
गुरुवार, २० ऑक्टोबर
अंताच्या समयी दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाशी लढाई करेल.—दानी. ११:४०.
उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांच्याबद्दलच्या भविष्यवाणीचा बहुतेक भाग पूर्ण झाला आहे. त्यामुळे उरलेला भागसुद्धा नक्की पूर्ण होईल हे आपण खातरीने म्हणू शकतो. दानीएल पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात दिलेली भविष्यवाणी समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे, देवाच्या लोकांसोबत थेटपणे संबंध असलेल्या राजांचा आणि सरकारांचाच यात उल्लेख करण्यात आला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत देवाच्या लोकांची संख्या फार कमी आहे. तरीसुद्धा ही सरकारं देवाच्या लोकांचा छळ का करतात? कारण सैतान आणि त्यांच्या समर्थकांचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे यहोवा आणि येशूची सेवा करणाऱ्या लोकांचा नाश करणं. (उत्प. ३:१५; प्रकटी. ११:७; १२: १७) तसंच, दानीएलने केलेली भविष्यवाणी आणि बायबलमध्ये दिलेल्या इतर भविष्यवाण्यांचा मेळ बसणंही गरजेचं आहे. खरंतर, दानीएलने केलेली भविष्यवाणी अचूक रीत्या समजून घेण्यासाठी बायबलमध्ये दिलेल्या इतर भविष्यवाण्यांसोबत त्याची तुलना करणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२०.०५ २ ¶१-२
शुक्रवार, २१ ऑक्टोबर
मेलेल्यांना कसं उठवलं जाईल? ते कोणत्या प्रकारच्या शरीराने उठतील?—१ करिंथ. १५:३५.
मेल्यानंतर माणसाचं काय होतं याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण याबद्दल बायबल काय शिकवतं? माणूस मरतो तेव्हा त्याचं शरीर कुजून नष्ट होतं. पण ज्या देवाने शून्यातून हे विश्व उभं केलं तो त्या व्यक्तीला जिवंत करू शकतो. (उत्प. १:१; २:७) त्यासाठी देवाला त्याच शरीरात तिला जिवंत करायची गरज पडत नाही. तर देवाला योग्य वाटतं तसं शरीर देऊन तो त्या व्यक्तीला जिवंत करू शकतो. हे समजावण्यासाठी प्रेषित पौलने जमिनीत पेरल्या जाणाऱ्या बीचं उदाहरण वापरलं. जमिनीत पेरलेलं बी वाढून पुढे त्याचं एक रोपटं तयार होतं. वाढलेलं हे रोपटं पेरलेल्या बीपेक्षा खूप वेगळं असतं. हे उदाहरण वापरून पौलने समजावलं, की आपला निर्माणकर्ता त्याला “योग्य [वाटेल]” तसं शरीर देऊन मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकतो. पौलने पुढे म्हटलं, की “जे स्वर्गात आहेत त्यांचं शरीर पृथ्वीवर राहणाऱ्यांपेक्षा वेगळं असतं.” कोणत्या अर्थाने? पृथ्वीवर राहणाऱ्यांचं शरीर हाडामांसाचं, तर स्वर्गात राहणाऱ्यांचं शरीर अदृश्य असतं; जसं की स्वर्गदूतांचं शरीर अदृश्य असतं.—१ करिंथ. १५:३६-४१. टेहळणी बुरूज२०.१२ १० ¶७-९
शनिवार, २२ ऑक्टोबर
मी कधीपर्यंत असा चिंतेत राहू? कधीपर्यंत दररोज मनात दुःख बाळगू?—स्तो. १३:२.
आपल्या सगळ्यांनाच शांत, सुरळीत आयुष्य जगायला आवडतं. चिंता, समस्या या कोणालाही नको असतात. पण तरीसुद्धा काही वेळा आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो. आणि त्यामुळे दावीद राजासारखंच आपणसुद्धा यहोवाला, आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रश्न विचारू. चिंतेची कारणं वेगवेगळी असू शकतात; जसं की, बेइमानी आणि अनैतिक कामं करण्याचा दबाव; वाढती महागाई आणि वाढते अपराध. या गोष्टी आपण टाळू शकत नाही. कारण, आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे लोक बायबलच्या तत्त्वांप्रमाणे जीवन जगत नाहीत. शिवाय, लोक ‘जगाच्या व्यवस्थेच्या चिंतांमुळे’ यहोवाची सेवा करणार नाहीत हे या जगाच्या देवाला, सैतानाला माहीत आहे. (मत्त. १३:२२; १ योहा. ५:१९) आणि त्यामुळेच आज जगात इतक्या चिंता आणि समस्या आहेत. टेहळणी बुरूज२१.०१ २ ¶१, ३
रविवार, २३ ऑक्टोबर
जो कोणी आपल्या बांधवाचा द्वेष करतो तो खुनी आहे आणि तुम्हाला माहीत आहे की खुनी असलेल्या कोणत्याही माणसात सर्वकाळाचं जीवन राहत नाही.—१ योहा. ३:१५.
आपण आपल्या भाऊबहिणींचा कधीही द्वेष करू नये असा सल्ला प्रेषित योहानने आपल्याला दिला. आपण हा सल्ला पाळला नाही, तर सैतान सहज आपल्याला चुकीचं वागायला लावू शकतो. (१ योहा. २:११) हीच गोष्ट पहिल्या शतकाच्या शेवटी घडली. त्या वेळी, सैतान देवाच्या लोकांमध्ये द्वेष उत्पन्न करायचा आणि फूट पाडायचा खूप प्रयत्न करत होता. याचा परिणाम असा झाला, की योहानने आपली पत्रं लिहिली तोपर्यंत सैतानासारखी मनोवृत्ती दाखवणारी माणसं ख्रिस्ती मंडळीत शिरली होती. उदाहरणार्थ, दियत्रफेस हा एका मंडळीमध्ये फूट पाडत होता. (३ योहा. ९, १०) नियमन मंडळाने पाठवलेल्या वडिलांशी तो आदराने वागत नव्हता. इतकंच नाही, तर त्याला न आवडणाऱ्या लोकांना जर कोणी पाहुणचार दाखवला तर त्याला तो मंडळीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं हे वागणं खरंच किती दुष्ट होतं! आजसुद्धा सैतान देवाच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि त्यांच्यामध्ये फूट पाडायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे सैतानाला आपण कधीच ती संधी देऊ नये. टेहळणी बुरूज२१.०१ ११ ¶१४
सोमवार, २४ ऑक्टोबर
त्यांचं साक्ष देण्याचं कार्य संपल्यावर, जंगली पशू त्यांच्याशी लढाई करेल आणि त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना ठार मारेल.—प्रकटी. ११:७.
पहिल्या महायुद्धात देवाच्या ज्या सेवकांनी युद्धात भाग घेतला नाही, त्यांचा जर्मन आणि ब्रिटन सरकारने छळ केला. आणि प्रचारात पुढाकार घेणाऱ्या बांधवांना अमेरिकेच्या सरकारने तुरुंगात टाकलं. प्रकटीकरण ११:७-१० या वचनांत भविष्यवाणी केली होती की देवाच्या लोकांचा छळ होईल. आणि या सगळ्या घटनांवरून कळतं की ही भविष्यवाणी पूर्ण झाली. मग १९३३ पासून आणि खासकरून दुसऱ्या महायुद्धात उत्तरेच्या राजाने देवाच्या लोकांचा क्रूरपणे छळ केला. जेव्हा नात्झी लोकांनी जर्मनीवर राज्य करायला सुरू केलं, तेव्हा हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी देवाच्या लोकांच्या कामावर बंदी आणली. उत्तरेच्या राजाने जवळपास १,५०० यहोवाच्या सेवकांना मारून टाकलं आणि हजारो सेवकांना छळछावण्यांमध्ये पाठवलं. या घटनेबद्दल दानीएलने आधीच भविष्यवाणी केली होती. उत्तरेच्या राजाने आपल्या प्रचारकार्यावर बंदी आणली. आणि असं करून त्याने ‘पवित्रस्थान भ्रष्ट’ केलं. तसंच त्याने “नित्याचे बलीहवन” म्हणजेच नियमितपणे केलं जाणारं काम बंद केलं. (दानी. ११:३०ख, ३१क) इतकंच काय तर हिटलरने प्रण घेतला होता की तो जर्मनीतून देवाच्या लोकांचा संपूर्ण नाश करेल. टेहळणी बुरूज२०.०५ ६ ¶१२-१३
मंगळवार, २५ ऑक्टोबर
भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा. एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.—रोम. १२:१०.
आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला आपुलकी असेल, तर आपण त्यांच्याशी चढाओढ करण्याचा प्रयत्न करणार नाही. योनाथान दावीदशी कसा वागला ते आठवा. दावीदऐवजी स्वतः राजा बनण्यासाठी त्याने त्याच्याशी चढाओढ केली नाही. (१ शमु. २०:४२) आपण सगळेच योनाथानचं अनुकरण करू शकतो. भाऊबहिणींच्या कौशल्यांमुळे किंवा क्षमतांमुळे आपण त्यांची ईर्ष्या करू नये. उलट आपण ‘नम्रतेने त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे.’ (फिलिप्पै. २:३) हे नेहमी लक्षात असू द्या, की मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं असतं आणि त्यामुळे मंडळीला मदतच होते. आपण जर नम्र असलो, तर भाऊबहिणींमधल्या या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतील आणि त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येईल. (१ करिंथ. १२:२१-२५) आपण एकमेकांना आपुलकी दाखवतो तेव्हा मंडळीतली एकता वाढते आणि सगळे आनंदाने यहोवाची सेवा करू शकतात. आपण खरोखर येशूचे शिष्य आहोत हे दिसून येतं. आणि हीच गोष्ट चांगल्या मनाच्या लोकांना खऱ्या उपासनेकडे आकर्षित करते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, “जो खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे” त्याची आपण स्तुती करतो.—२ करिंथ. १:३. टेहळणी बुरूज२१.०१ २४ ¶१४; २५ ¶१६
बुधवार, २६ ऑक्टोबर
तुम्ही जगाचा भाग नाही. यामुळेच जग तुमचा द्वेष करतं.—योहा. १५:१९.
आज काही लोक यहोवाच्या साक्षीदारांचा आदर करत नाहीत आणि त्यांची थट्टा करतात. कारण त्यांना असं वाटत की आपण मूर्ख आणि कमजोर आहोत. पण ते आपल्याबद्दल असा विचार का करतात? कारण जगातले लोक जसं वागतात तसं आपण वागत नाही. त्या लोकांना असे लोक आवडतात जे गर्विष्ठ, उद्धट आणि बंडखोर वृत्तीचे आहेत. पण याउलट आपण नम्र आणि आज्ञाधारक राहण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय आपण राजकारणात भाग घेत नाही आणि सैन्यात भरती होत नाही. यामुळेच ते आपल्याला तुच्छ लेखतात. (रोम. १२:२) जगातले लोक आपल्याला कमजोर समजत असले तरी यहोवा आपल्याकडून मोठमोठ्या गोष्टी साध्य करून घेत आहे. मानव इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नव्हतं असं मोठं प्रचारकार्य तो आपल्याकडून साध्य करून घेत आहे. आज त्याचे सेवक असं साहित्य प्रकाशित करत आहेत ज्याचं सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतर आणि वितरण होत आहे. याशिवाय, ते बायबलचा उपयोग करून लाखो लोकांना आपलं जीवन सुधारायला मदत करत आहेत. या सर्व गोष्टींचं श्रेय यहोवालाच जातं. टेहळणी बुरूज२०.०७ १५ ¶५-६
गुरुवार, २७ ऑक्टोबर
पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करतोय.—योहा. १४:३१.
येशू नेहमी यहोवाच्या अधीन राहतो. पण याचा अर्थ असा नाही, की तो बुद्धिमान नाही किंवा त्याच्याकडे काही कौशल्यं नाहीत. पृथ्वीवर असताना येशूची शिकवण्याची पद्धत सोपी आणि स्पष्ट होती. यावरून दिसून येतं, की तो खूप बुद्धिमान आहे. (योहा. ७:४५, ४६) यहोवाला माहीत होतं, की येशू आपल्या कामात खूप कुशल आहे. म्हणूनच या संपूर्ण विश्वाची सृष्टी करताना यहोवाने येशूला आपल्यासोबत घेतलं. (नीति. ८:३०; इब्री १:२-४) आणि इतकंच नाही, तर येशूचं पुनरुत्थान झाल्यापासून यहोवाने “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार” त्याला दिला आहे. (मत्त. २८:१८) पण येशू आपल्या कामात इतका कुशल असला, तरी मार्गदर्शनासाठी तो यहोवावर विसंबून राहतो. कारण त्याचं आपल्या पित्यावर प्रेम आहे. पतींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवाने पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहायला सांगितलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की यहोवा स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी महत्त्व देतो. कारण येशूसोबत राज्य करण्यासाठी स्वतः यहोवाने पुरुषांसोबत स्त्रियांचीही निवड केली आहे. (गलती. ३:२६-२९) यहोवाने येशूला अधिकार देऊन दाखवून दिलं, की त्याला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. त्याच प्रकारे एक समंजस पती आपल्या पत्नीला काही अधिकार देईल. टेहळणी बुरूज२१.०२ १०-११ ¶१३-१४
गुरुवार, २८ ऑक्टोबर
ज्यांनी धीराने संकटं सोसली ते धन्य!—याको. ५:११.
देवाचं वचन एका आरशासारखं आहे. आपण कुठे कमी पडतो हे पाहायला आणि त्यात सुधारणा करायला ते आपल्याला मदत करतं. (याको. १:२३-२५) उदाहरणार्थ, आपल्याला कदाचित पटकन राग येत असेल. पण देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की आपल्याला त्यात सुधारणा करायची गरज आहे. यहोवाच्या मदतीने आपण शांत राहायला आणि आपल्या रागावर ताबा मिळवायला शिकू. त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे विचार करता येईल आणि योग्य निर्णय घेता येतील. (याको. ३:१३) खरंच, बायबलचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे! काही वेळा आपल्या हातून चूक होते तेव्हाच आपण धडा शिकतो. पण बुद्धी मिळवण्याचा चांगला मार्ग म्हणजे इतरांनी केलेल्या चांगल्या कामातून आणि त्यांनी केलेल्या चुकांतून शिकणं. म्हणूनच याकोब आपल्याला अब्राहाम, राहाब, ईयोब आणि एलिया यांसारख्या लोकांच्या उदाहरणांतून शिकायचं प्रोत्साहन देतो. (याको. २:२१-२६; ५:१०, ११, १७, १८) यहोवाच्या या विश्वासू सेवकांनी अशा काही परीक्षांचा सामना केला ज्यांमुळे त्यांच्या जीवनातला आनंद नाहीसा होऊ शकला असता. पण यहोवाच्या मदतीने ते धीराने या परीक्षांचा सामना करू शकले. आपणसुद्धा यहोवाच्या मदतीने तेच करू शकतो. टेहळणी बुरूज२१.०२ २९-३० ¶१२-१३
शनिवार, २९ ऑक्टोबर
आपसात चर्चा केल्याने योजना सफल होतात, कुशल मार्गदर्शनाने लढाई लढ.—नीति. २०:१८.
बायबल अभ्यास चालवताना विद्यार्थ्याला देवाचं वचन समजावून सांगण्याची मुख्य जबाबदारी, अभ्यास चालवणाऱ्या भावाची किंवा बहिणीची असते. जर त्याने तुम्हाला बायबल अभ्यासासाठी बोलवलं, तर तुमची जबाबदारी त्यांना साथ देण्याची आणि मदत करण्याची आहे. (उप. ४:९, १०) ती मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? बायबल अभ्यासासाठी तयारी करा. सर्वातआधी शिक्षकाला विद्यार्थ्याबद्दल थोडी माहिती विचारा. जसं की: “त्याच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहेत? त्याचे धार्मिक विश्वास काय आहेत? कोणत्या अध्यायातून तुम्ही अभ्यास करणार आहात? या अध्यायातून विद्यार्थ्याला नेमकं काय शिकवायचंय? बायबल अभ्यासाच्या वेळेस अशा काही गोष्टी आहेत का ज्या मी बोलल्या पाहिजेत किंवा नाही बोलल्या पाहिजेत? विद्यार्थ्याला प्रगती करण्यासाठी मी कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?” हे खरं आहे, की शिक्षक विद्यार्थ्याची खासगी माहिती देणार नाही. पण तो जी काही माहिती देईल, त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्याला मदत करू शकाल. जॉय नावाची एक मिशनरी बहीण म्हणते: “या माहितीमुळे माझ्यासोबत येणारा प्रचारक विद्यार्थ्याला समजून घेऊ शकतो आणि त्याला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल याचा विचार करू शकतो.” टेहळणी बुरूज२१.०३ ९ ¶५-६
रविवार, ३० ऑक्टोबर
जगाने तुमचा द्वेष केला, तरी तुमचा द्वेष करण्याआधी त्याने माझा द्वेष केलाय, हे विसरू नका.—योहा. १५:१८.
आपण देवाच्या नैतिक स्तरांनुसार जगतो त्यामुळे काही वेळा हे जग आपला द्वेष करतं. देवाच्या स्तरांमध्ये आणि जगाच्या स्तरांमध्ये जमीनआसमानाचा फरक आहे. उदाहरणार्थ, ज्या अनैतिक कामांमुळे देवाने सदोम आणि गमोराचा नाश केला होता, त्या कामांना आज जग उघडपणे मान्यता देतं. (यहू. ७) पण या बाबतींत आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे जीवन जगतो. म्हणून अनेक जण आपली थट्टा करतात आणि आपल्याला जुन्या विचारांचे समजतात. (१ पेत्र ४:३, ४) द्वेष होत असतानाही यहोवाची सेवा करत राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यहोवावरचा मजबूत विश्वास. आपला हा विश्वास एका ढालीसारखं काम करतो. तो ‘त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवून टाकू शकतो.’ (इफिस. ६:१६) पण विश्वासासोबतच आपल्याला आणखी एका गुणाची गरज आहे. तो म्हणजे, प्रेम. कारण प्रेम “लगेच चिडत नाही.” प्रेम सगळं काही सहन करतं. (१ करिंथ. १३:४-७, १३) यहोवावरचं, आपल्या भाऊबहिणींवरचं आणि शत्रूंवरचं प्रेम आपल्याला द्वेष होत असतानाही यहोवाची सेवा करायला मदत करू शकतं. टेहळणी बुरूज२१.०३ २१ ¶३-४
सोमवार, ३१ ऑक्टोबर
लगेच रागावू नकोस, कारण राग मूर्खांच्या मनात राहतो.—उप. ७:९.
भाऊबहिणींवर आपलं प्रेम असेल, तर काही गोष्टी आपण करणार नाही. उदाहरणार्थ, कोणी काही बोललं तर ती गोष्ट आपण लगेच मनाला लावून घेणार नाही. येशूच्या जीवनातली एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, की सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांना त्याचं मांस खावं लागेल आणि त्याचं रक्त प्यावं लागेल. (योहा. ६:५३-५७) हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी अनेकांना इतका धक्का बसला की ते त्याला सोडून गेले. पण त्याचे प्रेषित मात्र त्याला एकनिष्ठ राहिले. खरंतर, येशूने जे म्हटलं होतं ते प्रेषितांनाही कळलं नव्हतं, आणि कदाचित त्यांनासुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं असेल. पण तो जे काही म्हणाला ते चुकीचं आहे असा विचार करून त्यांनी त्याचं वाईट मानून घेतलं नाही, तर त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. कारण त्यांना माहीत होतं, की येशू कधीच काही चुकीचं बोलू शकत नाही. (योहा. ६:६०, ६६-६९) यावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकतो. ती म्हणजे, आपले भाऊबहीण आपल्याला काही बोलले, तर आपण त्यांचं बोलणं लगेच मनाला लावून घेऊ नये; तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजावून सांगायची संधी त्यांना दिली पाहिजे.—नीति. १८:१३. टेहळणी बुरूज२१.०१ ११ ¶१३