जुलै
शुक्रवार, १ जुलै
स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.—मत्त. २८:१८.
आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळावं यासाठी आपण येशूसोबत मैत्री करणं गरजेचं आहे. प्रार्थनेच्या शेवटी फक्त इतकंच म्हणणं पुरेसं नाही की ‘ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो.’ तर आपण ओळखलं पाहिजे की आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्यात यहोवा येशूचा कसा वापर करत आहे. येशूने त्याच्या प्रेषितांना म्हटलं: “माझ्या नावाने तुम्ही जी काही विनंती कराल ती मी पूर्ण करेन.” (योहा. १४:१३) यहोवा जरी आपली प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर देतो तरी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार त्याने येशूला दिला आहे. यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्याआधी पाहतो की आपण येशूने दिलेला सल्ला लागू केला आहे की नाही. उदाहरणार्थ, येशूने म्हटलं होतं: “जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करेल; पण, जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.” (मत्त. ६:१४, १५) तेव्हा, हे खूप महत्त्वाचं आहे की यहोवा आणि येशू ज्या प्रकारे लोकांशी प्रेमळपणे वागतात, त्याच प्रकारे आपणसुद्धा त्यांच्यासोबत वागलं पाहिजे! टेहळणी बुरूज२०.०४ २१ ¶६
शनिवार, २ जुलै
तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून जिवंत देवाकडे वळावं, म्हणून आम्ही तुम्हाला एक आनंदाचा संदेश सांगतोय.—प्रे. कार्यं १४:१५.
लोकांना कोणत्या विषयांमध्ये आवड आहे हे आधी प्रेषित पौलने समजून घेतलं आणि त्यानुसार त्याने त्याच्या प्रस्तावनेत फेरबदल केला. उदाहरणार्थ, लुस्त्रमध्ये प्रचार करताना पौलला जाणवलं की तिथल्या लोकांना शास्त्रवचनांचं कमी किंवा काहीच ज्ञान नाही. म्हणून त्यांच्यासोबत बोलताना त्यांना समजेल अशा प्रकारे पौलने तर्क केला. फलदायी ऋतू, अन्नधान्य आणि आनंदी जीवन या विषयांबद्दल तो त्यांच्याशी बोलला. ऐकणारे सहजपणे समजू शकतील अशा शब्दांचा आणि उदाहरणांचा त्याने वापर केला. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांची काय आवड आहे हे चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करा. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर तिला कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता? परिस्थितीचं निरीक्षण करा. कदाचित ती व्यक्ती बागेत काम करत असेल, पुस्तक वाचत असेल, गाडी दुरुस्त करत असेल किंवा दुसरं एखादं काम करत असेल. अशा वेळी योग्य वाटत असल्यास तुम्ही त्या कामाबद्दल बोलून चर्चा सुरू करू शकता. (योहा. ४:७) तसंच व्यक्तीच्या कपड्यांवरूनही तिच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला समजतील. जसं की, ती कोणत्या देशातली आहे, काय काम करते किंवा तिला कोणता खेळ आवडतो. टेहळणी बुरूज२०.०४ ११ ¶११-१२
रविवार, ३ जुलै
आपल्या सगळ्या चिंता देवावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.—१ पेत्र ५:७.
तीव्र चिंतेमुळे काही भाऊबहिणींना चारचौघांमध्ये असताना भीती आणि संकोच वाटतो. भरपूर लोकांमध्ये वावरणं त्यांना कठीण वाटू शकतं. पण तरीही ते मंडळीच्या सभांना, संमेलनांना आणि अधिवेशनांना जायचं सोडत नाहीत. तसंच, अनोळखी लोकांशी बोलणं त्यांना अवघड वाटतं, तरीही ते सेवाकार्यात इतरांशी बोलतात. तुम्हीही अशा परिस्थितीत असाल, तर धीर धरा. तुम्ही एकटे नाही. बऱ्याच भाऊबहिणींना अशा समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही मनापासून जे प्रयत्न करता त्यांमुळे यहोवाला आनंद होतो. तुम्ही हार मानली नाही यावरूनच कळतं, की त्याचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुम्हाला लागणारी ताकद तो देत आहे. (फिलिप्पै. ४:६, ७) शारीरिक किंवा भावनिक समस्या असूनही तुम्ही यहोवाची सेवा करत असाल, तर तुम्ही खातरी बाळगू शकता की यहोवा तुमच्यावर नक्कीच खूश आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शारीरिक समस्या आहेत. पण तरीही आपण जीवनाच्या शर्यतीत धीराने धावत आहोत. (२ करिंथ. ४:१६) यहोवाच्या मदतीने आपण सर्व जण नक्कीच ही शर्यत पूर्ण करू! टेहळणी बुरूज२०.०४ ३१ ¶२०-२१
सोमवार, ४ जुलै
देवाचे अदृश्य गुण, त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतात.—रोम. १:२०.
ज्या प्रकारे देवाने पृथ्वी घडवली आहे, त्यावरून आपल्याला कळतं की तो खूप बुद्धिमान आहे. (इब्री ३:४) आपली पृथ्वी खूप खास आहे. कारण मानवांना जगता येईल असं योग्य वातावरण इथे आहे. अंतराळात असलेल्या पृथ्वीची तुलना आपण महासागरात असलेल्या एका होडीशी करू शकतो. पण लोकांनी भरलेल्या एका होडीमध्ये आणि पृथ्वीमध्ये काही फरक आहेत. कल्पना करा, एका होडीतल्या लोकांना काही सूचना देण्यात येतात. त्यांना सांगितलं जातं की त्यांनी ऑक्सिजन, अन्न व पाणी स्वतः उत्पन्न करावं आणि कुठलाही केरकचरा होडीबाहेर फेकू नये. मग, तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीत ते किती काळ जगू शकतील? नक्कीच, ते जास्त काळ जगणार नाहीत. याउलट, पृथ्वीमध्ये अशी क्षमता आहे की त्यावर कोट्यवधी लोक जगू शकतात. आपल्याला लागणारं ऑक्सिजन, अन्न आणि पाणी पृथ्वीमधून मिळतं. आणि या जीवनावश्यक गोष्टींचा साठा कधीच संपत नाही. तसंच, कोट्यवधी लोकांमुळे मोठ्या प्रमाणात केरकचरा उत्पन्न होत असला, तरी ही पृथ्वी खूप सुंदर आहे आणि मानवांना राहण्यासारखी आहे. पण हे कसं शक्य आहे? कारण यहोवाने पृथ्वीची रचना करताना अशा काही प्रक्रिया घालून दिल्या आहेत ज्यांमुळे केरकचऱ्याचं रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये होतं. टेहळणी बुरूज२०.०५ २० ¶३-४
मंगळवार, ५ जुलै
तुम्ही मुळीच मरणार नाही.—उत्प. ३:४.
ही गोष्ट बोलून, यहोवा खोटं बोलत आहे असंच फक्त सैतान सुचवत नव्हता, तर तो सरळसरळ त्याच्या नावाची निंदा करत होता. आणि असं करून तो दियाबल किंवा निंदक बनला. (१ तीम. २:१४) हव्वा पूर्णपणे फसली आणि तिने सैतानावर विश्वास ठेवला. तिने यहोवापेक्षा सैतानावर जास्त भरवसा ठेवला. यामुळे तिने आपल्या जीवनात सर्वात चुकीचा निर्णय घेतला. तिने यहोवाची आज्ञा मोडायचं ठरवलं. तिने मनाई केलेलं फळ खाल्लं आणि त्यानंतर ते आदामलासुद्धा दिलं. (उत्प. ३:६) हव्वाने सैतानाला काय उत्तर द्यायला हवं होतं याबद्दल जरा विचार करा. ‘मला माहीत नाही तू कोण आहेस. पण मी माझ्या पित्याला, यहोवाला ओळखते. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्यावर पूर्ण भरवसा आहे. आदाम आणि माझ्याकडे जे काही आहे ते सर्व आम्हाला यहोवाने दिलं आहे. त्याच्याबद्दल अशी वाईट गोष्ट तू बोलूच कसा शकतोस. चालता हो इथून!’ समजा असं उत्तर जर तिने दिलं असतं तर यहोवाला आपल्या मुलीबद्दल, हव्वाबद्दल किती अभिमान वाटला असता! (नीति. २७:११) पण हव्वाचं यहोवावर एकनिष्ठ प्रेम नव्हतं. शिवाय, आदामही यात कमी पडला. आदाम आणि हव्वा यांचं आपल्या पित्यावर प्रेम नव्हतं. आणि म्हणून सैतानाने जेव्हा यहोवाच्या नावावर दोष लावला तेव्हा ते त्याच्या बाजूने बोलू शकले नाहीत. टेहळणी बुरूज२०.०६ ४ ¶१०-११
बुधवार, ६ जुलै
आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना आहे.—स्तो. ६८:११.
आपल्या बहिणी यहोवाच्या सेवेत जी मेहनत घेतात त्यासाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. जसं की, त्या बांधकाम प्रकल्पांवर काम करतात, नवीन भाषा शिकून गरज असेल त्या भाषेच्या गटांना मदत करतात आणि बेथेलमध्ये सेवा करतात. तसंच, नैसर्गिक विपत्तीच्या वेळी त्या मदतकार्यात हातभार लावतात, भाषांतराच्या कामात मदत करतात, पायनियर आणि मिशनरी म्हणून सेवा करतात. त्यासोबतच ख्रिस्ती पत्नी आपल्या पतींना साथ देतात. त्यामुळे या बांधवांना मंडळीतल्या आणि संघटनेतल्या आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणं शक्य होतं. हे बांधव “माणसांच्या रूपात देणग्या” आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी ते बऱ्याच गोष्टी करतात. पण जर या बांधवांना आपल्या पत्नीची साथ नसती, तर त्यांना आपल्या जबाबदऱ्या पार पाडणं कठीण गेलं असतं. (इफिस. ४:८) प्रचारकार्य करणाऱ्यांमध्ये स्त्रियांची एक “मोठी सेना” आहे. प्रचाराच्या कामात त्या सहसा खूप कुशल असतात आणि मोठ्या आनंदाने हे काम करतात. या गोष्टीची वडिलांना जाणीव असते. तसंच, तरुण बहिणींना काही समस्या असतात तेव्हा प्रौढ बहिणी त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकतात, हेसुद्धा वडील मान्य करतात. (तीत २:३-५) खरंच, आपल्या या बहिणींची कदर करणं, त्यांची प्रशंसा करणं किती गरजेचं आहे! टेहळणी बुरूज२०.०९ २३ ¶१३-१४
गुरुवार, ७ जुलै
या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या पित्याची इच्छा नाही.—मत्त. १८:१४.
जे लोक पूर्वी यहोवाची सेवा करायचे, पण काही काळापासून त्यांनी यहोवाच्या लोकांसोबत संगती करायचं सोडून दिलं आहे अशांना यहोवा कधीच विसरत नाही. तसंच, त्यांनी केलेली सेवाही तो विसरत नाही. (इब्री ६:१०) यहोवा आपल्या लोकांची कशी काळजी घेतो हे समजण्यासाठी यशया संदेष्ट्याने एका सुंदर उदाहरणाचा वापर केला. यशयाने म्हटलं: “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्यांस संभाळून नेईल.” (यश. ४०:११) महान मेंढपाळ यहोवा याच्या कळपातून एखादं मेंढरू भरकटतं तेव्हा त्याला कसं वाटतं? या प्रश्नाचं उत्तर येशूने आपल्या शिष्यांना जे म्हटलं त्यावरून मिळतं. त्याने म्हटलं: “तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरं असली आणि त्यांपैकी जर एक मेंढरू वाट चुकलं, तर तो नव्याण्णव मेंढरांना तसंच डोंगरावर सोडून त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जाणार नाही का? आणि जर त्याला ते सापडलं, तर मी तुम्हाला खातरीने सांगतो, की वाट न चुकलेल्या नव्याण्णव मेंढरांपेक्षा त्याला त्या एका मेंढराबद्दल जास्त आनंद होईल.”—मत्त. १८:१२, १३. टेहळणी बुरूज२०.०६ १९-२० ¶८-९
शुक्रवार, ८ जुलै
जर एखादा माणूस मंडळीत देखरेख करायला पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो.—१ तीम. ३:१.
यहोवाची सेवा करणं हा आपल्यासाठी बहुमान आहे, मग ती कुठल्याही प्रकारची सेवा असो. (स्तो. २७:४; ८४:१०) एखादा बांधव यहोवाच्या सेवेत जास्त करण्याची तयारी दाखवतो तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण संघटनेत एखादी जबाबदारी मिळाल्यावर आपण खूप महत्त्वाची व्यक्ती बनलो आहोत असा त्या बांधवाने विचार करू नये. (लूक १७:७-१०) त्याऐवजी त्याने नम्रपणे इतरांची सेवा केली पाहिजे. (२ करिंथ. १२:१५) बायबलमध्ये अशा काही लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा श्रेष्ठ समजलं. त्यांपैकी एक म्हणजे दियत्रफेस. त्याने मंडळीत इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न केला. (३ योहा. ९) आणखी एक उदाहरण म्हणजे उज्जीया. तो खूप गर्विष्ठ होता. त्याने असं काम करण्याचा प्रयत्न केला जे करण्यासाठी यहोवाने त्याला नेमलं नव्हतं. (२ इति. २६:१६-२१) अबशालोम यानेही अशीच मनोवृत्ती दाखवली. त्याला राजा बनण्याची इच्छा होती. म्हणून लोकांची मनं जिंकण्यासाठी त्याने त्यांच्यावर प्रेम असण्याचा दिखावा केला. (२ शमु. १५:२-६) बायबलमधल्या या उदाहरणांवरून स्पष्ट होतं, की जे लोक प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर यहोवा खूश नसतो. (नीति. २५:२७) कारण जे लोक गर्विष्ठ असतात आणि इतरांची प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जीवनात शेवटी समस्याच निर्माण होतात.—नीति. १६:१८. टेहळणी बुरूज२०.०७ ४ ¶७-८
शनिवार, ९ जुलै
प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५.
काही ख्रिस्ती कुटुंबांना युद्धामुळे, दुष्काळामुळे, नोकरी नसल्यामुळे किंवा यांसारख्या इतर समस्यांमुळे आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहायला जावं लागतं. म्हणून मग त्यांच्या मुलांना त्या देशातल्या भाषेतून शिक्षण घ्यावं लागतं. तसंच, आईवडिलांनाही नोकरी मिळवण्यासाठी तिथली भाषा शिकावी लागते. त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या भाषेतली एखादी मंडळी किंवा गट आहे का? असेल, तर त्यांनी कोणत्या मंडळीत गेलं पाहिजे? त्या देशातल्या भाषेच्या मंडळीत, की स्वतःच्या भाषेतल्या मंडळीत? आपल्या कुटुंबाने कोणत्या भाषेच्या मंडळीत जावं हा निर्णय कुटुंबप्रमुखाने घेतला पाहिजे. हे ठरवताना, आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणत्या भाषेची मंडळी योग्य राहील, याचा त्याने विचार करावा. हा एक वैयक्तिक निर्णय असल्यामुळे कुटुंबप्रमुख जो काही निर्णय घेईल त्याचा आपण आदर केला पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? त्या कुटुंबाचं आपल्या मंडळीत स्वागत करून आणि त्यांच्याशी प्रेमाने वागून.—रोम. १५:७. टेहळणी बुरूज२०.०८ ३० ¶१७-१८
रविवार, १० जुलै
देवाने जगातल्या दुर्बल गोष्टींना निवडलं.—१ करिंथ. १:२७.
आपल्याला जर यहोवाकडून सामर्थ्य मिळवायचं असेल तर आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे? आपण आपल्या ताकदीवर, शिक्षणावर, संस्कृतीवर किंवा पैशांवर घमेंड करू नये. या गोष्टींमुळे आपण यहोवाच्या कामी येत नाही. खरंतर, यहोवाचे बरेचसे सेवक हे मानवी दर्जानुसार “बुद्धिमान, शक्तिशाली व उच्च घराण्यातले” नाहीत. (१ करिंथ. १:२६) म्हणून, वर सांगितलेल्या गोष्टी जरी तुमच्याकडे नसल्या तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता. लक्षात असू द्या, की जगात एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टींमुळे महत्त्व मिळतं त्या गोष्टी तुमच्याकडे नसतात तेव्हा तुम्हाला यहोवाची ताकद अनुभवायला मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही मानत असलेली एखादी गोष्ट चुकीची आहे असं कोणी म्हणतं तेव्हा घाबरून जाऊ नका, तर यहोवाकडे प्रार्थना करा. तो तुम्हाला आपल्या विश्वासाची बाजू मांडण्यासाठी लागणारं धैर्य देईल. (इफिस. ६:१९, २०) तसंच, एखाद्या गंभीर आजाराचा सामना करत असतानाही यहोवाची सेवा करता यावी म्हणून ताकदीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करा. यहोवा प्रत्येक वेळी तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो हे तुम्ही पाहाल तेव्हा तुमचा विश्वास आणखी मजबूत होईल आणि तुम्ही सामर्थ्यवान व्हाल. टेहळणी बुरूज२०.०७ १६ ¶९
सोमवार, ११ जुलै
आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.—मत्त. ६: ३३.
जीवनात देवाच्या राज्याला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं असेल, तर आपण अब्राहामसारखं असलं पाहिजे. देवाला खूश करण्यासाठी त्याने आनंदाने अनेक त्याग केले. (मार्क १०:२८-३०; इब्री ११:८-१०) जीवनात कोणत्याच समस्या येणार नाहीत असा विचार करू नका. जे लोक आपलं संपूर्ण आयुष्य यहोवाची सेवा करण्यासाठी देतात त्यांनासुद्धा समस्यांचा सामना करावा लागतो. (याको. १:२; १ पेत्र ५:९) भविष्यातल्या आपल्या आशेबद्दल विचार करत राहण्याची कितीतरी कारणं आज आपल्याकडे आहेत. जगातल्या घडामोडी स्पष्टपणे दाखवून देतात, की आपण शेवटल्या काळाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. देवाच्या राज्यात आपल्याला जे अनेक आशीर्वाद मिळतील त्यांपैकी एक म्हणजे, आपल्या प्रिय जनांना पुन्हा जिवंत केलं जाईल. त्या वेळी यहोवा अब्राहामलाही त्याच्या विश्वासाचं आणि धीराचं प्रतिफळ देईल. यहोवा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत करेल. त्यांचं स्वागत करायला तुम्ही तिथे असाल का? अब्राहामसारखंच तुम्ही जर देवाच्या राज्यासाठी जीवनात त्याग करायला तयार असाल, समस्या असतानाही यहोवाला विश्वासू राहाल आणि देवाच्या राज्याची धीराने वाट पाहात राहाल, तर त्यांचं स्वागत करायला तुम्ही नक्कीच तिथे असाल!—मीखा ७:७. टेहळणी बुरूज२०.०८ ५-६ ¶१३-१४; ७ ¶१७
मंगळवार, १२ जुलै
मरणापर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.—प्रकटी. २:१०.
आपल्या शत्रूंनी जरी आपल्याला मारून टाकलं, तरी यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करू शकतो ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. तसंच, त्यांच्या कोणत्याही प्रयत्नामुळे यहोवासोबत असलेली आपली मैत्री तुटू शकणार नाही याची आपल्याला पक्की खातरी आहे. (रोम. ८:३५-३९) पुनरुत्थानाच्या आशेमुळे यहोवाची बुद्धी दिसून येते. कारण, या आशेमुळे आपण सैतानाच्या धमक्यांना मुळीच घाबरत नाही आणि आपल्या मनात मृत्यूची भीती राहत नाही. उलट, यहोवाला विश्वासू राहण्याचं धैर्य आपल्याला मिळतं. विरोधकांनी जर तुम्हाला मारून टाकण्याची धमकी दिली, तर यहोवा तुमचं पुनरुत्थान करेल यावर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवाल का? तुम्ही यहोवावर भरवसा ठेवाल की नाही याची तुम्ही खातरी कशी करू शकता? त्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता. जसं की, ‘मी दररोज जे छोटे-छोटे निर्णय घेतो त्यावरून यहोवावर माझा भरवसा आहे हे दिसून येतं का?’ (लूक १६:१०) ‘मी जर माझ्या जीवनात देवाच्या राज्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं, तर यहोवा माझ्या रोजच्या गरजा पूर्ण करेल यावर माझा भरवसा आहे का? आणि, मी ज्या प्रकारे माझा वेळ आणि पैसा खर्च करतो त्यावरून माझा हा भरवसा दिसून येतो का?’ (मत्त. ६:३१-३३) या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला “हो” अशी देता आली, तर भविष्यात तुमच्यासमोर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार असाल.—नीति. ३:५, ६. टेहळणी बुरूज२०.०८ १७-१८ ¶१५-१६
बुधवार, १३ जुलै
देवाच्या पसंतीला उतरलेला; लाज वाटायचं कोणतंही कारण नसलेला; आणि सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारा कामकरी बनायचा आटोकाट प्रयत्न कर.—२ तीम. २:१५.
आपल्याला देवाच्या वचनाचा उपयोग करण्यात कुशल होण्याची गरज आहे. कुशल होण्याचे काही मार्ग आपण सभांमध्ये शिकू शकतो. पण बायबलमधली सत्यं किती मौल्यवान आहेत, हे जर आपल्याला इतरांना पटवून द्यायचं असेल, तर आपण स्वतःसुद्धा बायबलचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. बायबलचा अभ्यास करून आपण आपला विश्वास मजबूत केला पाहिजे. त्यासाठी बायबलचं फक्त वरवर वाचन करणं पुरेसं नाही, तर बायबलची वचनं चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणि ती लागू करण्यासाठी आपण वाचलेल्या गोष्टींवर मनन आणि संशोधनही केलं पाहिजे. (१ तीम. ४:१३-१५) मग इतरांना शिकवण्यासाठी आपल्याला बायबलचा उपयोग करता येईल. पण शिकवताना, वचनं नुसतीच वाचणं पुरेसं नाही. तर आपल्याला ती त्यांना समजावून सांगता आली पाहिजेत आणि ती कशी लागू करता येतील हेसुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणून, इतरांना शिकवताना बायबलचा कुशलपणे उपयोग करायचा असेल, तर आपण त्याचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे.—२ तीम. ३:१६, १७. टेहळणी बुरूज२०.०९ २८ ¶१२
गुरुवार, १४ जुलै
येशूकडे बारकाईने लक्ष द्या, म्हणजे तुम्ही थकून जाऊन हार मानणार नाही.—इब्री १२:३.
आपल्याला मदत करण्यासाठी आज यहोवा काय-काय करत आहे याचा जर आपण विचार केला, तर प्रचाराच्या कामावर आपण लक्ष लावू शकतो. आज यहोवा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून भरपूर आध्यात्मिक अन्न पुरवत आहे. जसं की, छापील व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशनं, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि JW ब्रॉडकास्टिंग. तसंच, आपल्या वेबसाईबद्दलही विचार करा: आज १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये ती उपलब्ध आहे. (मत्त. २४:४५-४७) प्रचाराच्या कामावर लक्ष लावण्यासाठी आणखी एक गोष्ट आपल्याला मदत करते. ती म्हणजे, येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करणं. येशूने कोणत्याही गोष्टीमुळे प्रचाराच्या कामावरून आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. (योहा. १८:३७) जसं की, सैतानाने त्याला “जगातली सर्व राज्ये व त्यांचे वैभव” देण्याचं आमीष दाखवलं, तेव्हा तो त्या मोहाला बळी पडला नाही. तसंच, लोकांनी त्याला राजा बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही तो त्या प्रलोभनाला बळी पडला नाही. (मत्त. ४:८, ९; योहा. ६:१५) याशिवाय, त्याने कधीच धनसंपत्ती मिळवण्याचा विचार केला नाही, किंवा तीव्र विरोधाला तो घाबरला नाही. (लूक ९:५८; योहा. ८:५९) आपल्या विश्वासाची परीक्षा होते तेव्हा प्रेषित पौलने आजच्या वचनात दिलेला सल्ला आपण पाळला तर प्रचाराच्या कामावर लक्ष लावायला आपल्याला मदत होईल.—इब्री १२:३. टेहळणी बुरूज२०.०९ ९-१० ¶६-७
शुक्रवार, १५ जुलै
जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तसं तुम्हीही माझं अनुकरण करा.—१ करिंथ. ११:१.
आपल्या मंडळीत मेहनत करणाऱ्या अनेक बहिणी आहेत, याचा आपल्याला खूप आनंद होतो. त्या सभांमध्ये आणि सेवाकार्यात भाग घेतात. काही बहिणी राज्य सभागृहातल्या दुरुस्तीच्या कामात हातभार लावतात. तसंच, त्यांना भाऊबहिणींची काळजी आहे, हे त्या आपल्या कामांतून दाखवतात. पण आपल्या या बहिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसं की, त्यांच्यापैकी काही जणी वयस्कर आईवडिलांची काळजी घेतात, तर काही घरच्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करतात. आणि अशाही काही बहिणी आहेत ज्या नोकरी करून आपल्या मुलांना एकट्यानेच सांभाळतात. आपण आपल्या मंडळीतल्या बहिणींची काळजी का घेतली पाहिजे? कारण, आज जगात सहसा स्त्रियांची काळजी घेतली जात नाही. जो आदर त्यांना मिळाला पाहिजे, तो बऱ्याचदा त्यांना दिला जात नाही. याशिवाय, बायबल आपल्याला स्त्रियांची काळजी घ्यायचं आणि त्यांना मदत करायचं प्रोत्साहन देतं. उदाहरणार्थ, प्रेषित पौलने रोममधल्या मंडळीला सांगितलं, की त्यांनी फीबी या बहिणीचं स्वागत करावं आणि “तिला जे काही साहाय्य लागेल ते” द्यावं. (रोम. १६:१, २) पौल अशा एका संस्कृतीतून आला होता जिथे स्त्रियांना खूप तुच्छ लेखायचे. पण ख्रिस्ती बनल्यानंतर तो येशूसारखाच स्त्रियांशी आदराने आणि प्रेमाने वागला. टेहळणी बुरूज२०.०९ २० ¶१-२
शनिवार, १६ जुलै
लोकांना शिष्य करा आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.—मत्त. २८:१९, २०.
आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याच्या मनात इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याची आवड निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्याला व्यावहारिक मार्गांनी मदत करण्यासाठी आपण त्याला काही प्रश्न विचारू शकतो. जसं की: “बायबलच्या शिकवणी जीवनात लागू केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झालाय? तुम्हाला जसा फायदा झाला तसाच इतरांनाही व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? मग त्या लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?” (नीति. ३:२७; मत्त. ९:३७, ३८) येशूने आपल्याला काय करायला सांगितलं ते आठवा. त्याने म्हटलं: “मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञा पाळायला शिकवणंही येतं. त्या म्हणजे, देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करणं. या दोन्ही आज्ञांचा प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामाशी खूप जवळचा संबंध आहे. (मत्त. २२:३७-३९) खरंतर, प्रेमामुळेच आपल्याला प्रचार करायची प्रेरणा मिळते. पण प्रचारकार्य करण्याच्या विचाराने काही विद्यार्थ्यांना भीती वाटू शकते. आणि हे समजण्यासारखं आहे. पण आपण त्यांना आश्वासन देऊ शकतो, की यहोवाच्या मदतीने ते हळूहळू आपल्या भीतीवर मात करतील.—स्तो. १८:१-३; नीति. २९:२५. टेहळणी बुरूज२०.११ ३ ¶६-८
रविवार, १७ जुलै
आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायचं सोडलं नाही.—कलस्सै. १:९.
बायबल अभ्यासाची तयारी करताना आपल्या विद्यार्थ्यासाठी आणि त्याला कशी मदत करता येईल यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा. बायबलमधली माहिती विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोचवता यावी म्हणून यहोवाकडे मदतीसाठी विनंती करा. हे नेहमी लक्षात ठेवा, की तुम्हाला विद्यार्थ्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करायची आहे. तसंच, बायबल विद्यार्थ्यानेसुद्धा यहोवाचं ऐकलं पाहिजे आणि त्याच्याशी बोललं पाहिजे. त्यामुळे त्याला खूप फायदा होऊ शकतो. यहोवाचं ऐकण्यासाठी त्याने दररोज बायबल वाचलं पाहिजे. (यहो. १:८; स्तो. १:१-३) आणि यहोवाशी बोलण्यासाठी त्याने दररोज प्रार्थना केली पाहिजे. त्यासाठी, प्रत्येक वेळी बायबल अभ्यासाच्या सुरुवातीला आणि शेवटी, विद्यार्थ्यासोबत आणि विद्यार्थ्यासाठी मनापासून प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना ऐकून विद्यार्थी मनापासून प्रार्थना करायला शिकेल. तसंच, येशू ख्रिस्ताच्या नावाने यहोवा देवाला प्रार्थना कशा करायच्या हेसुद्धा तो शिकेल. (मत्त. ६:९; योहा. १५:१६) दररोज बायबल वाचल्यामुळे (यहोवाचं ऐकल्यामुळे) आणि प्रार्थना केल्यामुळे (यहोवाशी बोलल्यामुळे) विद्यार्थ्याला यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडायलं किती मदत होईल, याचा विचार करा.—याको. ४:८. टेहळणी बुरूज२०.१० ८ ¶८; ९ ¶१०-११
सोमवार, १८ जुलै
तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र शक्तीमुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवा.—इफिस. ४:३.
पहिल्या शतकाप्रमाणेच आजसुद्धा यहोवाच्या संघटनेत सुव्यवस्था आणि शांती दिसून येते. (प्रे. कार्ये १६:४, ५) उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वतःच्याच देशातल्या किंवा दुसऱ्या एखाद्या देशातल्या मंडळीत गेलात, आणि तिथे टेहळणी बुरूज अभ्यासाला उपस्थित राहिलात, तर तुम्हाला तिथे वेगळं काही वाटणार नाही. कारण, सभेत कोणत्या लेखावर चर्चा केली जाणार आहे आणि ती चर्चा कशी केली जाणार आहे, हे तुम्हाला माहीत असतं. जगभरातल्या बांधवांमधली ही एकता फक्त देवाच्या पवित्र आत्म्यामुळेच शक्य होते. (सफ. ३:९) त्यामुळे स्वतःला विचारा: ‘मी मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो का? नेतृत्व करणाऱ्या बांधवांचं मी ऐकतो का? इतर जण माझ्यावर भरवसा ठेवू शकतात का, खासकरून मंडळीत माझ्यावर जबाबदाऱ्या असतात तेव्हा? मी सगळं काही वेळेवर करतो का? मदत करायला आणि सेवा करायला मी पुढे येतो का?’ (याको. ३:१७) या बाबतींत कुठे सुधारणा करायची गरज आहे असं जर तुम्हाला जाणवलं, तर पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करा. तुम्ही जितका स्वतःमध्ये बदल कराल, तितकंच मंडळीतले भाऊबहीण तुमच्यावर प्रेम करतील आणि तुमच्या कामाची कदर करतील. टेहळणी बुरूज२०.१० २३ ¶१२-१३
मंगळवार, १९ जुलै
फक्त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.—याको. १:२२.
देवाचं वचन एका आरशासारखं आहे. (याको. १:२३-२५) दररोज सकाळी घराबाहेर पडण्याआधी आपण सगळेच आरशात आपला चेहरा पाहतो. आपल्या चेहऱ्याला काही लागलं तर नाही ना, केस विसकटले तर नाहीत ना, हे आपण पाहतो. अगदी तसंच, आपण रोज बायबल वाचतो तेव्हा आपल्या विचारसरणीत आणि वृत्तीत कुठे काही बदल करायची गरज आहे का, ते आपल्या लक्षात येतं. बरेच भाऊबहीण दररोज घराबाहेर पडण्याआधी सकाळीच दैनिक वचन वाचतात. आणि त्यातून मिळालेल्या सल्ल्यावर विचार करतात. मग दिवसभरात वेगवेगळ्या मार्गांनी ते तो सल्ला लागू करायचा प्रयत्न करतात. आपणही तसंच करायचा प्रयत्न करू शकतो. याशिवाय, आपण दररोज देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. ही गोष्ट साधी वाटत असल्यामुळे कदाचित काहींचं त्याकडे दुर्लक्ष होईल. पण हे करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे जीवनाकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर चालत राहायला आपल्याला मदत होईल. ज्याप्रमाणे एक एक्स-रे मशीन शरीराचे आतले भाग पाहायला मदत करते, त्याचप्रमाणे देवाचं वचन आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत, हे पाहायला आपल्याला मदत करतं. आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला सल्ले देतं. पण आपल्याला जर बायबलमधून किंवा जबाबदार बांधवांकडून मिळणाऱ्या सल्ल्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपण नम्र असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.११ १८ ¶३; २० ¶८
बुधवार, २० जुलै
मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि शिष्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली.—प्रे. कार्यं १६:५.
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना अनेकदा छळाचा सामना करावा लागला. पण अधूनमधून त्यांनी शांतीचा काळही अनुभवला. त्या काळाचा ख्रिश्चनांनी कसा वापर केला? ते विश्वासू ख्रिस्ती आवेशाने आनंदाचा संदेश सांगत राहिले. प्रेषितांची कार्ये या पुस्तकात त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे, की “ते यहोवाचं भय मानून चालत होते.” म्हणजेच, ते प्रचाराचं काम करत राहिले आणि त्यामुळे “त्यांची संख्या वाढत गेली.” यावरून दिसून येतं, की शांतीच्या काळात त्यांनी जो आवेश दाखवला त्यासाठी यहोवाने त्यांना आशीर्वाद दिले. (प्रे. कार्ये ९:२६-३१) पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मिळेल त्या संधीचा वापर केला. उदाहरणार्थ, इफिसमध्ये असताना प्रेषित पौलला या गोष्टीची जाणीव झाली, की त्याच्यासाठी “संधीचे एक मोठे दार” उघडण्यात आले आहे. त्यामुळे इफिसमध्येच थांबून त्याने प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम केलं. (१ करिंथ. १६:८, ९) ख्रिश्चनांनी “यहोवाच्या वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित” करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. (प्रे. कार्ये १५:३०-३५) याचा काय परिणाम झाला? याचं उत्तर आजचं दैनिक वचन आपल्याला देतं. टेहळणी बुरूज२०.०९ १६ ¶६-८
गुरुवार, २१ जुलै
मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे.—१ करिंथ. १५:२१.
आदामने जेव्हा पाप केलं तेव्हा त्याने स्वतःवर आणि त्याच्या वंशजांवर मृत्यू आणला. आणि त्याच्या पापाचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. पण याच्या अगदी उलट, देवाने आपल्या मुलाला जिवंत केल्यामुळे आपल्याला किती सुंदर आशा मिळते याचा विचार करा! प्रेषित पौलने म्हटलं: “पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे,” म्हणजे येशूद्वारे होतं. पुढे तो म्हणतो: “कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.” (१ करिंथ. १५:२२) पौलने म्हटलं: “आदाममुळे सगळे मरत आहेत.” याचा काय अर्थ होतो? हाच, की आदामपासून त्याच्या वंशजांना वारशाने पाप आणि अपरिपूर्णता मिळाली आहे आणि त्यामुळे ते सगळे मरतात. (रोम. ५:१२) पण येशूच्या खंडणी बलिदानामुळे पुढे त्यांना जिवंत केलं जाण्याची आशा आहे. आदामला मात्र ही आशा नाही; येशूच्या खंडणी बलिदानाचा त्याला फायदा होणार नाही. कारण तो परिपूर्ण होता आणि त्याने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली. आज जे लोक जाणूनबुजून पाप करतात त्यांना आदामसारखीच शिक्षा मिळेल. भविष्यात जेव्हा “मनुष्याचा मुलगा” न्याय करायला येईल तेव्हा ‘बकऱ्यांसारखी’ मनोवृत्ती दाखवणाऱ्या या लोकांचा तो “सर्वकाळासाठी नाश” करेल.—मत्त. २५:३१-३३, ४६; इब्री ५:९. टेहळणी बुरूज२०.१२ ५ ¶१३-१४
शुक्रवार, २२ जुलै
यहोवा नम्र लोकांकडे लक्ष देतो.—स्तो. १३८:६.
आपल्याला मंडळीत एखादी जबाबदारी मिळत नाही तेव्हा आपण विश्वासू स्वर्गदूतांच्या उदाहरणाचा विचार केला पाहिजे. एकदा, दुष्ट राजा अहाब याला कसं फसवता येईल याबद्दल यहोवाने स्वर्गदूतांना विचारलं. तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी काही ना काही सुचवलं. मग यहोवाने एका स्वर्गदूताची कल्पना विचारात घेतली, आणि त्याची ही कल्पना यशस्वी होईल असं म्हटलं. (१ राजे २२:१९-२२) पण त्यामुळे इतर विश्वासू स्वर्गदूत निराश झाले का? त्यांनी असा विचार केला का, की ‘कल्पना सुचवून आम्ही उगाचच आमचा वेळ वाया घालवला?’ मुळीच नाही. कारण स्वर्गदूत नम्र आहेत आणि सगळा गौरव यहोवाला गेला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. (शास्ते १३:१६-१८; प्रकटी. १९:१०) हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवाचे साक्षीदार असण्याचा आणि त्याच्या राज्याबद्दल प्रचार करण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे. शिवाय, आपण आपल्या नेमणुकांमुळे नाही; तर आपल्या नम्रतेमुळे यहोवाच्या आणि आपल्या भाऊबहिणींच्या नजेरत मौल्यवान ठरतो. त्यामुळे नेहमी नम्र राहण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. तसंच, बायबलमध्ये यहोवाच्या ज्या अनेक नम्र सेवकांची उदाहरणं दिली आहेत, त्यांवर मनन करा. आणि जमेल त्या मार्गाने आपल्या भाऊबहिणींची आनंदाने सेवा करा.—१ पेत्र ५:५. टेहळणी बुरूज२०.१२ २६ ¶१६-१७
शनिवार, २३ जुलै
तारणाचा टोप आणि पवित्र शक्तीची तलवार, म्हणजे देवाचं वचन स्वीकारा.—इफिस. ६:१७.
तारणाचा टोप म्हणजे यहोवाने आपल्याला दिलेली आशा. ही आशा अशी आहे, की आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागलो, तर तो आपल्याला भविष्यात सर्वकाळाचं जीवन देईल आणि आपला मृत्यू जरी झाला तरी तो आपलं पुनरुत्थान करेल. (१ थेस्सलनी. ५:८; १ तीम. ४:१०; तीत १:१, २) आपली आशा आपल्या विचारांचं रक्षण करते. ही आशा आपल्याला समस्यांमुळे निराश न होता देवाच्या अभिवचनांवर लक्ष लावायला मदत करते. तर मग, तारणाचा हा टोप आपण कसा घालू शकतो? प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत यहोवासारखा विचार करून. जसं की, धनसंपत्तीच्या बाबतीत. आपण नाश होणाऱ्या धनावर नाही तर देवावर आपली आशा ठेवू. (स्तो. २६:२; १०४:३४; १ तीम. ६:१७) पवित्र शक्तीची तलवार म्हणजे देवाचं वचन, बायबल. या तलवारीत सर्व प्रकारचा खोटेपणा उघड करण्याची ताकद आहे. तसंच, खोट्या शिकवणींपासून आणि वाईट सवयींपासून लोकांची सुटका करण्याचीही ताकद तिच्यात आहे. (२ करिंथ. १०:४, ५; २ तीम. ३:१६, १७; इब्री ४:१२) बायबलचा चांगला अभ्यास करून आणि संघटनेकडून मिळाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन आपण ही तलवार चांगल्या प्रकारे वापरायला शिकू शकतो.—२ तीम. २:१५. टेहळणी बुरूज२१.०३ २७ ¶४; २८-२९ ¶१०-११
रविवार, २४ जुलै
देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूबद्दल साक्ष दिल्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.—प्रकटी. १:९.
प्रचार केल्यामुळे कैदेत असतानासुद्धा प्रेषित योहानने इतरांचा विचार केला. उदाहरणार्थ, त्याने प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिलं. आणि “लवकरच घडणार असलेल्या गोष्टी” भाऊबहिणींना कळाव्यात म्हणून ते पुस्तक मंडळ्यांना पाठवलं. (प्रकटी. १:१) आणि कदाचित कैदेतून सुटल्यानंतर त्याने शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिलं. याशिवाय, भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्याने तीन पत्रंही लिहिली. अशा प्रकारे योहानने स्वतःचा नाही, तर इतरांचा विचार केला. आपणसुद्धा त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. आपण आपला वेळ आणि शक्ती ज्या प्रकारे खर्च करू त्यावरून दिसून येईल, की इतरांवर आपलं किती प्रेम आहे. सैतानाचं हे जग आपल्याला सतत हे सांगत असतं, की आपण आपला सगळा वेळ आणि शक्ती भरपूर पैसा आणि मोठं नाव कमवण्यात खर्च करावी. पण जगभरातले आपले भाऊबहीण आपला जास्तीत जास्त वेळ इतरांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आणि त्यांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी खर्च करतात. टेहळणी बुरूज२१.०१ १० ¶९-१०
सोमवार, २५ जुलै
योनाथान दावीदवर जिवापाड प्रेम करू लागला.—१ शमु. १८:१.
योनाथान दावीदची ईर्ष्या करू शकला असता. कारण शौल राजाचा मुलगा असल्यामुळे पुढचा राजा होण्याचा हक्क त्याचाच होता. (१ शमु. २०:३१) पण योनाथान नम्र आणि यहोवाला एकनिष्ठ होता. त्यामुळे यहोवाने दावीदला राजा म्हणून निवडलं तेव्हा त्याने ती गोष्ट आनंदाने स्वीकारली. तसंच, तो दावीदलाही एकनिष्ठ राहिला. या गोष्टीला शौलचा भयंकर विरोध असतानाही योनाथानने शेवटपर्यंत दावीदला साथ दिली. (१ शमु. २०:३२-३४) दावीदबद्दल आपुलकी असल्यामुळे योनाथानने कधीच त्याचा हेवा केला नाही. योनाथान स्वतः एक कुशल तिरंदाज आणि एक शूर योद्धा होता. त्याच्याबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दल लोक असं म्हणायचे, की “ते गरुडांपेक्षा वेगवान, आणि सिंहांपेक्षा बलवान होते.” (२ शमु. १:२२, २३) त्यामुळे आपण केलेल्या पराक्रमांची योनाथान सहज शेखी मारू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. दावीदने केलेल्या मोठमोठ्या कामांमुळे त्याने त्याचा कधीच हेवा केला नाही किंवा त्याच्याशी चढाओढ करायचाही प्रयत्न केला नाही. उलट दावीद किती धैर्यवान आहे आणि यहोवावर त्याचा किती भरवसा आहे, या गोष्टीचं त्याला नेहमीच कौतुक वाटलं. खरंतर, दावीदने गल्याथला ठार मारलं त्यानंतरच योनाथानला तो आवडू लागला, आणि पुढे त्यांच्यात आपुलकीची मैत्री निर्माण झाली. टेहळणी बुरूज२१.०१ २१ ¶६; २२ ¶८-९
मंगळवार, २६ जुलै
प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे.—१ करिंथ. ११:३.
आपण सगळे येशू ख्रिस्ताच्या अधीन आहोत. तो एक परिपूर्ण मस्तक आहे. एका ख्रिस्ती बहिणीचं लग्न होतं, तेव्हा तिचा पती तिचं मस्तक बनतो. तो अपरिपूर्ण असल्यामुळे त्याला अधीन राहणं तिला कधीकधी कठीण जाऊ शकतं. जेव्हा ती एखाद्याशी लग्न करायचा विचार करते तेव्हा तिने स्वतःला असे काही प्रश्न विचारले पाहिजेत: ‘मी ज्या भावाशी लग्न करायचा विचार करते तो एक चांगला कुटुंबप्रमुख होईल असं का म्हणता येईल? तो त्याच्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो का? नसेल, तर लग्नानंतर माझी आध्यात्मिकता टिकवून ठेवायला मला तो मदत करेल हे मी कशावरून म्हणू शकते?’ पण यासोबतच एका बहिणीने स्वतःला हेही प्रश्न विचारले पाहिजेत: ‘माझ्यामध्ये असे कोणते गुण आहेत ज्यांमुळे लग्नानंतर आम्हा दोघांनाही फायदा होईल? मी सहनशील आणि मोठ्या मनाची आहे का? यहोवासोबत माझी घनिष्ठ मैत्री आहे का?’ (उप. ४:९, १२) एका बहिणीने जर लग्नआधी चांगले निर्णय घेतले, तर लग्नानंतर तिचं वैवाहिक जीवन सुखी आणि यशस्वी होईल. आपल्या पतीच्या अधीन राहण्याच्या बाबतीत आज आपल्या बऱ्याच बहिणींनी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्यासाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०२ ८ ¶१-२
बुधवार, २७ जुलै
मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर.—प्रे. कार्यं १६:९.
अलीकडच्या काही वर्षांत, बऱ्याच भाऊबहिणींनी आपली सेवा वाढवण्यासाठी आणि प्रचारकांची जास्त गरज असलेल्या मंडळीत जाऊन सेवा करण्यासाठी एक नवीन भाषा शिकायचं ठरवलं आहे. यहोवाची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलेला असतो. नवीन भाषा चांगल्या प्रकारे शिकून घ्यायला त्यांना कदाचित बरीच वर्षं लागू शकतात. पण या संपूर्ण काळात ते वेगवेगळ्या मार्गांनी मंडळीला मदत करत असतात. त्यांच्या चांगल्या गुणांमुळे आणि अनुभवामुळे मंडळीतले भाऊबहीण विश्वासात आणखी मजबूत होतात. जीवनात अनेक त्याग करणाऱ्या अशा भाऊबहिणींची आपण मनापासून कदर करतो. वडिलांनी असा विचार करू नये, की एखाद्या बांधवाला मंडळीत बोलली जाणारी भाषा नीट येत नाही म्हणून तो वडील किंवा सहायक सेवक बनू शकत नाही. याउलट, या जबाबदाऱ्यांसाठी बायबलमध्ये ज्या पात्रता दिल्या आहेत त्यांच्या आधारावर वडिलांनी निर्णय घ्यावा.—१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९. टेहळणी बुरूज२०.०८ २९-३० ¶१५-१६
गुरुवार, २८ जुलै
माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना.—याको. १:२.
लोकांना वाटतं, की आपलं आरोग्य चांगलं असेल, आपल्याकडे भरपूर पैसा असेल आणि आपलं कुटुंब सुखी असेल तरच आपण आनंदी राहू शकतो. पण याकोबने आपल्या पत्रात एका वेगळ्या प्रकारच्या आनंदाबद्दल लिहिलं. त्याने ज्या आनंदाबद्दल लिहिलं तो खरंतर देवाच्या पवित्र शक्तीचा एक पैलू आहे. तो आनंद जीवनातल्या परिस्थितींवर अवलंबून नाही. (गलती. ५:२२) आपण यहोवाचं मन आनंदी करत आहोत आणि येशूप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहोत, या जाणिवेमुळे एक ख्रिस्ती व्यक्ती खऱ्या अर्थाने आनंदी होते. (लूक ६:२२, २३; कलस्सै. १:१०,११) आपला आनंद कंदिलातल्या ज्योतीसारखा आहे. कंदिलाच्या आत असल्यामुळे वारा किंवा पाऊस आला तरी ती विझत नाही, तर ती जळत राहते. अगदी तसंच, आपल्या जीवनात कोणतीही समस्या आली तरी आपला आनंद टिकून राहतो. मग ती समस्या आरोग्याची असो किंवा पैशाची. कुटुंबातल्या लोकांनी किंवा इतरांनी आपली थट्टा केली किंवा आपला विरोध केला, तरीही आपण आनंदी राहतो. आणि प्रत्येक वेळी आपल्या आनंदाची ज्योत आणखी प्रखर होते. आपल्या विश्वासामुळे आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा हेच सिद्ध होतं, की आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत. (मत्त. १०:२२; २४:९; योहा. १५:२०) आणि म्हणूनच याकोब आजच्या वचनातले शब्द लिहू शकला. टेहळणी बुरूज२१.०२ २७ ¶६
शुक्रवार, २९ जुलै
दिलासा देणाऱ्या शब्दांमुळे मनाला आनंद होतो.—नीति. १२:२५.
संकटाच्या काळात शांत राहणं आणि यहोवावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे असं सांगणारी कितीतरी वचनं बायबलमध्ये आहेत. बायबल वाचताना अशी वचनं तुम्हाला सापडली, तर ती तोंडपाठ करायचा प्रयत्न करा. त्यासाठी, तुम्ही ती मोठ्याने वाचू शकता किंवा ती लिहून पुन्हापुन्हा वाचू शकता. यहोशवालासुद्धा असाच सल्ला देण्यात आला होता. यहोवाने त्याला सांगितलं होतं, की यशस्वी होण्यासाठी आणि सुज्ञपणे वागण्यासाठी त्याने नियमशास्त्राचं नियमितपणे वाचन करून त्यावर मनन करावं. त्यामुळे कठीण परिस्थितींत घाबरून न जाता, धाडसाने देवाच्या लोकांचं नेतृत्व करायला त्याला खूप मदत झाली. (यहो. १:८, ९) बायबलमधली अनेक वचनं तुम्हालाही कठीण परिस्थितींत मन शांत ठेवायला मदत करू शकतात. (स्तो. २७:१-३; नीति. ३:२५, २६) याशिवाय, सभांमध्ये ऐकायला मिळाणाऱ्या भाषणांमुळे, भाऊबहिणींच्या उत्तरांमुळे आणि त्यांच्याशी बोलल्यामुळे आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं. (इब्री १०:२४, २५) तसंच, मंडळीतल्या आपल्या मित्रांना आपल्या चिंता सांगितल्यामुळेही मन खूप हलकं होऊ शकतं. टेहळणी बुरूज२१.०१ ६ ¶१५-१६
शनिवार, ३० जुलै
विश्वासू जनांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव.—१ तीम. ४:१२.
तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा हेच दिसून आलं, की यहोवावर तुमचा पूर्ण भरवसा आहे. आणि यहोवालाही तुमच्या या निर्णयामुळे आनंद झाला. पण पुढेही यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात मोठमोठे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा तुम्ही नक्कीच यहोवावर भरवसा ठेवत असाल. पण इतर निर्णयांबद्दल काय? जसं की, मनोरंजनाची किंवा नोकरीची निवड करताना, किंवा जीवनात कोणती ध्येयं ठेवायची हे ठरवताना. या गोष्टींच्या बाबतीतही निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता यहोवावर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी बायबलची तत्त्वं विचारात घ्या आणि त्यांप्रमाणे काम करा. (नीति. ३:५, ६) असं केल्यामुळे यहोवाला आनंद होईल आणि मंडळीतले भाऊबहीणही तुमचा आदर करतील. तरुण भावांनो, आमच्यासारखेच तुम्हीसुद्धा अपरिपूर्ण आहात. त्यामुळे काही वेळा तुमच्याकडूनही चुका होऊ शकतात. पण त्यामुळे यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ नका. तुमच्याने होईल तितकी सेवा करा. टेहळणी बुरूज२१.०३ ६ ¶१४-१५
रविवार, ३१ जुलै
त्याने सिंहाच्या जबड्यातून माझी सुटका केली.—२ तीम. ४:१७.
यहोवाची सेवा करत असल्यामुळे तुमच्या कुटुंबातले लोक तुमचा विरोध करत आहेत का? किंवा तुम्ही अशा देशात राहत आहात का जिथे आपल्या कामावर काही प्रमाणात किंवा पूर्णपणे बंदी आहे? तसं असेल, तर २ तीमथ्य १:१२-१६ आणि ४:६-११, १७-२२ या वचनांतून तुम्हाला खूप धीर मिळू शकतो. प्रेषित पौल तुरुंगात होता तेव्हा त्याने ही वचनं लिहिली होती. बायबलमधील ही वचनं वाचण्याआधी यहोवाकडे प्रार्थना करा आणि तुमच्या समस्येबद्दल तुम्हाला कसं वाटतं हे स्पष्टपणे त्याला सांगा. मग तिचा सामना करण्यासाठी मदत करतील अशी तत्त्वं लक्षात आणून देण्यासाठी यहोवाकडे विनंती करा. ख्रिस्ती बनल्यामुळे पौलचा छळ होईल हे यहोवाने त्याला आधीच सांगितलं होतं. (प्रे. कार्यं २१:११-१३) पण यहोवाने त्याला मदतही केली. ती कशी? त्याने त्याच्या प्रार्थनांची उत्तरं दिली आणि त्याला शक्ती दिली. तसंच, जे प्रतिफळ मिळवण्यासाठी पौलने इतकी मेहनत केली होती, ते त्याला नक्की मिळेल अशी शाश्वतीही यहोवाने त्याला दिली. आणि पौलच्या विश्वासू मित्रांद्वारे यहोवाने त्याला वेगवेगळ्या मार्गांनी मदत केली. टेहळणी बुरूज२१.०३ १७-१८ ¶१४-१५, १९