वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es22 पृ. ८८-१००
  • ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
  • उपशिर्षक
  • सोमवार, १ ऑगस्ट
  • मंगळवार, २ ऑगस्ट
  • बुधवार, ३ ऑगस्ट
  • गुरुवार, ४ ऑगस्ट
  • शुक्रवार, ५ ऑगस्ट
  • शनिवार, ६ ऑगस्ट
  • रविवार, ७ ऑगस्ट
  • सोमवार, ८ ऑगस्ट
  • मंगळवार, ९ ऑगस्ट
  • बुधवार, १० ऑगस्ट
  • गुरुवार, ११ ऑगस्ट
  • शुक्रवार, १२ ऑगस्ट
  • शनिवार, १३ ऑगस्ट
  • रविवार, १४ ऑगस्ट
  • सोमवार, १५ ऑगस्ट
  • मंगळवार, १६ ऑगस्ट
  • बुधवार, १७ ऑगस्ट
  • गुरुवार, १८ ऑगस्ट
  • शुक्रवार, १९ ऑगस्ट
  • शनिवार, २० ऑगस्ट
  • रविवार, २१ ऑगस्ट
  • सोमवार, २२ ऑगस्ट
  • मंगळवार, २३ ऑगस्ट
  • बुधवार, २४ ऑगस्ट
  • गुरुवार, २५ ऑगस्ट
  • शुक्रवार, २६ ऑगस्ट
  • शनिवार, २७ ऑगस्ट
  • रविवार, २८ ऑगस्ट
  • सोमवार, २९ ऑगस्ट
  • मंगळवार, ३० ऑगस्ट
  • बुधवार, ३१ ऑगस्ट
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
es22 पृ. ८८-१००

ऑगस्ट

सोमवार, १ ऑगस्ट

माझ्यापासून वेगळं होऊन तुम्ही काहीही करू शकत नाही.—योहा. १५:५.

येशूसोबत ज्यांची घनिष्ठ मैत्री आहे फक्‍त त्यांनाच खंडणी बलिदानाचे फायदे अनुभवता येतील. येशूने म्हटलं होतं की तो “आपल्या मित्रांसाठी आपला प्राण” देईल. (योहा. १५:१३) येशू पृथ्वीवर येण्याआधी जे विश्‍वासू लोक होऊन गेले, त्यांना त्याच्याबद्दल शिकून घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत मैत्री करावी लागेल. पण सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी या लोकांनासुद्धा त्यांचं पुनरुत्थान झाल्यानंतर येशूसोबत एक घनिष्ठ नातं जोडावं लागेल. (योहा. १७:३; प्रे. कार्ये २४:१५; इब्री ११:८-१२, २४-२६, ३१) आज आपल्याजवळ येशूसोबत प्रचाराचं आणि शिकवण्याचं आनंद देणारं काम करण्याची संधी आहे. पृथ्वीवर असताना येशूने लोकांना शिकवलं. आणि स्वर्गात गेल्यावरही तो मंडळीचं मस्तक या नात्याने प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामाचं नेतृत्व करत आहे. त्याच्याबद्दल आणि पित्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना शिकवण्यासाठी आपण जी मेहनत घेत आहोत, ती तो पाहतो आणि तिची कदर करतो. खरंतर, आपण यहोवा आणि येशू यांच्या मदतीनेच हे काम साध्य करू शकतो.—योहा. १५:४. टेहळणी बुरूज२०.०४ २२ ¶७-८

मंगळवार, २ ऑगस्ट

हे दोन्ही राजे एकाच मेजावर बसून एकमेकांशी खोटं बोलतील.—दानी. ११:२७.

“उत्तरेचा राजा” इस्राएलच्या उत्तर भागांवर राज्य करणाऱ्‍या राजाला सूचित करायचा आणि “दक्षिणेचा राजा” इस्राएलच्या दक्षिण भागांवर राज्य करणाऱ्‍या राजाला सूचित करायचा. (दानी. १०:१४) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापर्यंत इस्राएलमध्ये राहणारे लोक देवाचे लोक होते. पण त्यानंतर यहोवाने स्पष्ट केलं की येशूचे विश्‍वासू शिष्यच आपले लोक असतील. त्यामुळे दानीएलच्या ११ व्या अध्यायात दिलेली भविष्यवाणी इस्राएल राष्ट्राबद्दल नसून ख्रिस्ताच्या अनुयायांबद्दल आहे. (प्रे. कार्ये २:१-४; रोम. ९:६-८; गलती. ६:१५, १६) तसंच, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांनी किंवा सरकारांनी उत्तरेच्या राजाची आणि दक्षिणेच्या राजाची भूमिका घेतली. असं असलं तरीही या राजांमध्ये काही गोष्टी समान होत्या. पहिली गोष्ट, हे राजे अशा देशांवर राज्य करत होते जिथे देवाचे बरेचसे लोक राहत होते किंवा ज्यांचा त्यांनी छळ केला होता. दुसरी गोष्ट, ते देवाच्या लोकांसोबत ज्या पद्धतीने वागले त्यावरून दिसून आलं की ते खरा देव, यहोवा याचा द्वेष करत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्यात सर्वात शक्‍तिशाली कोण हे सिद्ध करण्यासाठी हे दोन राजे एकमेकांशी लढत राहिले. टेहळणी बुरूज२०.०५ ३ ¶३-४

बुधवार, ३ ऑगस्ट

मला जे व्हायचं आहे, ते मी होईन.—निर्ग. ३:१४.

यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते तो करू शकतो. इतकंच काय, तर यहोवा आपल्या अपरिपूर्ण सेवकांनासुद्धा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, किंवा त्यांना त्याची सेवा करता यावी यासाठी जे गरजेचं आहे ते व्हायला लावू शकतो. (यश. ६४:८) अशा प्रकारे यहोवा त्याची इच्छा पूर्ण करतो, आणि कोणतीच गोष्ट त्याला त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. (यश. ४६:१०, ११) स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याने आपल्यासाठी जे काही केलं आहे आणि आपल्याला जे काही करायला मदत केली आहे, त्यावर मनन केल्यामुळे आपली त्याच्याबद्दलची कदर वाढू शकते. उदाहरणार्थ, सृष्टीतल्या ज्या अद्‌भुत गोष्टी यहोवाने निर्माण केल्या आहेत, त्यांवर आपण खोलवर विचार करतो तेव्हा आपण अगदी चकित होतो! (स्तो. ८:३, ४) तसंच, त्याची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून त्याने ज्या प्रकारे आपल्याला मदत केली आहे त्यावर विचार केल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल गाढ आदर वाटतो. खरंच, यहोवा हे नाव ऐकून आपल्या मनात त्याच्याबद्दल आदरयुक्‍त भय निर्माण होतं. त्या नावात बऱ्‍याच गोष्टी गोवलेल्या आहेत. त्यात आपल्या पित्याचं व्यक्‍तिमत्त्व, त्याने जे काही केलं आहे, आणि भविष्यात तो जे काही करणार आहे या सगळ्या गोष्टी गोवलेल्या आहेत.—स्तो. ८९:७, ८. टेहळणी बुरूज२०.०६ ९ ¶६-७

गुरुवार, ४ ऑगस्ट

देवच सगळ्यांना जीवन, श्‍वास आणि इतर सगळ्या गोष्टी देतो.—प्रे. कार्यं १७:२५.

ऑक्सिजनमुळे मानवांना आणि प्राण्यांना जगणं शक्य होतं. एका अहवालानुसार आपल्याला व प्राण्यांना दरवर्षी कोट्यवधी टन ऑक्सिजनची गरज पडते आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर टाकला जातो. असं असलं तरीही वातावरणातला ऑक्सिजन कधीच संपत नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड असला तरी वातावरणातला समतोल कधीच बिघडत नाही. हे कशामुळे शक्य होतं? कारण यहोवाने लहानमोठी अशी अनेक झाडं बनवली आहेत जे कार्बन-डाय-ऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन-चक्र ज्या प्रकारे काम करतं त्यावर मनन केल्यामुळे आजच्या दैनिक वचनातले शब्द खरे असल्याची खातरी पटते. आपल्या अनोख्या ग्रहाबद्दल आणि त्यावर असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? (स्तो. ११५:१६) यासाठी आपण यहोवाने बनवलेल्या गोष्टींवर मनन करू शकतो. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला प्रत्येक दिवशी ज्या चांगल्या गोष्टी देतो त्याबद्दल आपण त्याचे आभार मानण्यासाठी प्रेरित होऊ. तसंच, आपला परिसर शक्य तितका स्वच्छ ठेवण्याद्वारेही आपण दाखवून देऊ शकतो की आपल्याला पृथ्वीबद्दल कदर आहे. टेहळणी बुरूज२०.०५ २२ ¶५, ७

शुक्रवार, ५ ऑगस्ट

तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन अपवित्र केलेलं माझं महान नाव मी नक्कीच पवित्र करीन.—यहे. ३६:२३.

यहोवाच्या नावावर दोष लावण्यात आला तेव्हा त्याने ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे हाताळली. त्याने विचारपूर्वक, न्यायीपणे आणि धीराने काम केलं. तसंच, त्याने अनेक वेळा आपली अपार शक्‍ती दाखवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक कामातून आपला मुख्य गुण, प्रेम दाखवला आहे. (१ योहा. ४:८) यहोवाने आपलं नाव पवित्र करण्यासाठी आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत आणि आजही तो करत आहे. सैतान आजही यहोवाच्या नावाला कलंक लावत आहे. देव शक्‍तिशाली, न्यायी, बुद्धिमान आणि प्रेमळ आहे की नाही अशी शंका तो लोकांच्या मनात निर्माण करतो. उदाहरणार्थ, देव नाही असा तो लोकांना विश्‍वास करायला लावतो. आणि जर त्यांचा देवावर विश्‍वास असला तर तो लोकांना असं मानायला लावतो, की देवाचे नियम सोपे नाहीत. इतकंच काय, तर तो लोकांना असाही विश्‍वास करायला लावतो, की यहोवा खूप क्रूर आहे आणि तो लोकांना नरकाग्नीत जाळतो. लोक जेव्हा या खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवतात, तेव्हा ते यहोवाचं शासन नाकारतात. यहोवा जोपर्यंत सैतानाचा नाश करत नाही, तोपर्यंत तो तुम्हाला यहोवाच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न करत राहील. पण असं करण्यात तो यशस्वी होईल का? टेहळणी बुरूज२०.०६ ५ ¶१३-१५

शनिवार, ६ ऑगस्ट

ग्रीक किंवा यहुदी, सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, विदेशी किंवा स्कुथी, दास किंवा स्वतंत्र माणूस, असा भेदभाव नाही; त्याऐवजी, ख्रिस्तच सर्वांमध्ये सर्वकाही आहे.—कलस्सै. ३:११.

अनेक मंडळ्यांमध्ये असे काही भाऊबहीण असतील जे नवीन भाषा शिकून घ्यायला खूप मेहनत घेत असतील. त्यांना आपले विचार व्यक्‍त करणं कठीण जात असेल. पण ते नवीन भाषा कशा प्रकारे बोलतात याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचं यहोवावर किती प्रेम आहे आणि त्याची सेवा करण्यासाठी ते किती मेहनत घेत आहेत, याकडे लक्ष द्या. आपण त्यांचे हे चांगले गुण पाहिले, तर आपल्याला त्यांचा खूप आदर वाटेल आणि आपण त्यांची मनापासून कदर करू. त्यांना आपली भाषा नीट बोलता येत नाही, म्हणून ‘आम्हाला तुमची गरज नाही,’ असा आपण त्यांच्याबद्दल कधीच विचार करणार नाही. (१ करिंथ. १२:२१) यहोवाने त्याच्या मंडळीत आपल्यापैकी प्रत्येकाला एक महत्त्वाचं स्थान दिलं आहे, आणि हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे. आपण स्त्री असो किंवा पुरूष, आपलं लग्न झालेलं असो किंवा नसो, आपण तरुण असो किंवा वृद्ध, एखादी भाषा आपल्याला चांगली येत असो किंवा नसो, आपण सगळेच यहोवासाठी आणि एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहोत. (रोम. १२:४, ५; कलस्सै. ३:१०) त्यामुळे यहोवाच्या मंडळीत आपलं महत्त्वाचं स्थान आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवू या आणि मंडळीतल्या प्रत्येतक व्यक्‍तीचा आदर करू या. टेहळणी बुरूज२०.०८ ३१ ¶२०-२२

रविवार, ७ ऑगस्ट

त्यांच्यापैकी काही माणसांनी विश्‍वास ठेवला आणि ते त्याच्यासोबत सामील झाले.—प्रे. कार्यं १७:३४.

अथेन्स शहर हे मूर्तिपूजा, लैंगिक अनैतिकता आणि खोटं धार्मिक तत्त्वज्ञान या गोष्टींनी भरलेलं होतं. तरीही प्रेषित पौलने असा विचार केला नाही की तिथले लोक कधीच येशूचे शिष्य बनू शकत नाहीत. तसंच त्यांनी त्याचा अपमान केला तरी त्याने त्यांना प्रचार करणं थांबवलं नाही. पौल आधी “देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट मनुष्य” होता तरीही तो येशूचा शिष्य बनला. (१ तीम. १:१३) जसा येशूने पौलबद्दल विचार केला की तो त्याचा शिष्य बनू शकतो, तसा पौलनेही अथेन्सच्या लोकांबद्दल विचार केला की तेसुद्धा पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात. आणि पौलच्या अपेक्षेप्रमाणे अथेन्सचे काही लोक येशूचे शिष्य बनले. (प्रे. कार्ये ९:१३-१५) पहिल्या शतकात सर्व प्रकारचे लोक येशूचे शिष्य बनले. पौलने ग्रीसमधल्या करिंथ शहरातल्या लोकांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने म्हटलं की त्या मंडळीतले काही सदस्य एकेकाळी गुन्हेगार होते किंवा खूपच वाईट अशी अनैतिक जीवनशैली जगत होते. त्याने पुढे असंही म्हटलं: “तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आले आहे.” (१ करिंथ. ६:९-११) असे लोक पुढे जाऊन आपल्या जीवनात बदल करू शकतात आणि येशूचे शिष्य बनू शकतात असा विचार तुम्ही त्यांच्याबद्दल केला असता का? टेहळणी बुरूज२०.०४ १२ ¶१५-१६

सोमवार, ८ ऑगस्ट

पुरे झालं! आता माझा जीव घेऊन टाक.—१ राजे १९:४.

यहोवाची सेवा करण्याचे काही फायदे आहेत का, असं जर एखाद्याला वाटत असेल तर वडिलांनी त्याच्याबद्दल लगेच चुकीचं मत बनवू नये. त्याला दोषी ठरवण्याऐवजी तो असं का बोलतो किंवा वागतो हे वडिलांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे समजून घेतल्यामुळे वडिलांना त्याला बायबलमधून अशी वचनं दाखवता येतील ज्यांमुळे त्याला प्रोत्साहन मिळेल. एलीया संदेष्ट्याचा विचार करा. आपला जीव वाचवण्यासाठी तो ईजबेल राणीपासून पळ काढत होता. (१ राजे १९:१-३) त्याला असं वाटत होतं, की आपल्या सेवेचा काहीच फायदा नाही. आणि त्यामुळे त्याला त्याचा जीव नकोसा झाला. (१ राजे १९:१०) पण यामुळे यहोवा त्याच्यावर रागावला नाही. उलट यहोवाने त्याला याचं आश्‍वासन दिलं, की तो एकटा नाही. तसंच, यहोवाने त्याला सामर्थ्य देण्याचं आणि आणखी बरंच काम करण्यासाठी त्याचा वापर करण्याचंही आश्‍वासन दिलं. शिवाय, एलीयाला ज्या गोष्टींची चिंता वाटत होती त्या गोष्टी यहोवाने प्रेमळपणे ऐकून घेतल्या आणि त्याला नवीन नेमणुकाही दिल्या. (१ राजे १९:११-१६, १८) यातून आपण काय शिकू शकतो? आपण सर्वांनीच, खासकरून वडिलांनी यहोवाच्या मेंढरांशी प्रेमळपणे वागलं पाहिजे. आपल्या मनात खूप राग आहे किंवा यहोवा आपल्याला कधीच क्षमा करणार नाही, असं एखादी व्यक्‍ती वडिलांना सांगते तेव्हा त्यांनी तिचं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. तसंच, यहोवासाठी ती खूप मौल्यवान आहे या गोष्टीचंही त्यांनी तिला आश्‍वासन दिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०६ २१-२२ ¶१३-१४

मंगळवार, ९ ऑगस्ट

खरा मित्र नेहमी प्रेम करतो.—नीति. १७:१७.

आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आणि मित्रांच्या सहवासाचा आनंद घ्यावा असं यहोवाला वाटतं. (स्तो. १३३:१) येशूलाही मित्र होते. (योहा. १५:१५) बायबल आपल्याला खरे मित्र असण्याच्या फायद्यांबद्दल सांगतं. (नीति. १८:२४) तसंच बायबल आपल्याला हेही सांगतं की आपण एकटं-एकटं राहू नये. (नीति. १८:१) अनेकांना असं वाटतं की सोशल मीडिया अनेक मित्र बनवण्याचा आणि एकटेपणा घालवण्याचा चांगला मार्ग आहे. सोशल मीडिया म्हणजे असे ॲप्स किंवा वेबसाईट्‌स ज्यांवर लोक आपले फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस टाकतात. पण सोशल मीडियाचा वापर करताना आपण सावध राहिलं पाहिजे. काही अहवालांवरून दिसून आलं आहे, की जे लोक सोशल मीडियावर टाकलेले फोटो पाहण्यात आणि मेसेज वाचण्यात बराच वेळ घालवतात ते शेवटी निराश होतात, आणि त्यांना एकटेपणा जाणवतो. पण असं का होतं? याचं एक कारण असं असू शकतं की लोक सहसा आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर टाकतात. ते स्वतःचे, आपल्या मित्रांचे आणि ज्या ठिकाणी ते फिरायला गेले असतील त्या ठिकाणांचे सर्वात चांगले फोटो सोशल मीडियावर टाकतात. आणि ते फोटो पाहणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला कदाचित वाटेल की, ‘यांच्या तुलनेत माझं जीवन किती बोरिंग आहे.’ टेहळणी बुरूज२०.०७ ५-६ ¶१२-१३

बुधवार, १० ऑगस्ट

प्रेषित आणि वडील या विषयावर चर्चा करायला एकत्र जमले.—प्रे. कार्यं १५:६.

१ ऑक्टोबर १९८८ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात काय म्हटलं आहे त्याकडे लक्ष द्या: “मंडळीतले वडील हे ओळखतात, की एखादी समस्या हाताळण्यासाठी किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी ते सर्व एकत्र येतात तेव्हा येशू पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यापैकी कोणत्याही वडिलाला बायबलमधलं एखादं तत्त्व किंवा सल्ला सांगण्यासाठी मदत करू शकतो. (प्रे. कार्ये १५:७-१५) पवित्र आत्मा सगळ्याच वडिलांना मदत करतो, फक्‍त एकाला नाही.” जो वडील इतर वडिलांचा आदर करतो तो वडिलांच्या सभेत नेहमी पहिलं बोलायची घाई करत नाही. तो स्वतःच बोलत राहत नाही, तर इतर वडिलांनाही बोलायची संधी देतो. आणि ‘मी जे म्हणतो तेच खरंय’ असा तो विचार करत नाही. याउलट, तो आपलं मत नम्रपणे मांडतो. तसंच, तो इतर वडिलांचं म्हणणंही लक्ष देऊन ऐकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतर वडिलांशी चर्चा करताना तो बायबलच्या तत्त्वांकडे आणि विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने दिलेल्या मार्गदर्शनाकडे सगळ्यांचं लक्ष वेधतो. (मत्त. २४:४५-४७) अशा प्रकारे जर वडील एकमेकांशी प्रेमळपणे वागले आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला, तर देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर राहील आणि त्यांना योग्य निर्णय घ्यायला मदत करेल.—याको. ३:१७, १८. टेहळणी बुरूज२०.०८ २७ ¶५-६

गुरुवार, ११ ऑगस्ट

बऱ्‍याने वाइटाला जिंकत राहा.—रोम. १२:२१.

प्रेषित पौलचे शत्रू त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने शक्‍तिशाली होते. बऱ्‍याचदा अधिकाऱ्‍यांनी त्याला मारहाण करण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. पौलचे काही मित्र त्याच्याशी वाईट वागले. तसंच, ख्रिस्ती मंडळीतल्या काही जणांनी त्याचा विरोध केला. (२ करिंथ. १२:११; फिलिप्पै. ३:१८) पण पौलने हार मानली नाही. विरोध होत असतानाही तो प्रचार करत राहिला. भाऊबहिणींनी त्याला साथ दिली नाही तरी तो त्यांना मदत करत राहिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत तो देवाला विश्‍वासू राहिला. (२ तीम. ४:८) तो हे यासाठी करू शकला कारण तो स्वतःच्या क्षमतांवर नाही, तर यहोवावर विसंबून राहिला. तुम्हाला अपमानाचा किंवा छळाचा सामना करावा लागतो का? लोकांना यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल शिकवण्याद्वारे आपण बऱ्‍याने वाइटाला जिंकतो. आणि हाच आपला उद्देश असला पाहिजे. तो साध्य करण्यासाठी आपण लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून देऊ शकतो, आणि आपल्याशी वाईट वागणाऱ्‍या लोकांसोबत आदराने व दयेने वागू शकतो. तसंच आपण सगळ्यांशीच, अगदी आपल्या विरोधकांशीसुद्धा चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू शकतो.—मत्त. ५:४४; १ पेत्र ३:१५-१७. टेहळणी बुरूज२०.०७ १७-१८ ¶१४-१५

शुक्रवार, १२ ऑगस्ट

तुझी नम्रता मला महान बनवते.—२ शमु. २२:३६.

यहोवा एक नम्र देव आहे. वर दिलेल्या दावीदच्या शब्दांवरून दिसून येतं, की यहोवा खूप नम्र आहे ही गोष्ट दावीदनेसुद्धा मान्य केली. (स्तो. १८:३५) हे शब्द लिहिताना दावीदच्या मनात कदाचित तो दिवस असावा, जेव्हा शमुवेल संदेष्टा इस्राएलच्या पुढच्या राजाला नियुक्‍त करण्यासाठी त्याच्या घरी आला होता. आठ भावांपैकी दावीद सगळ्यात लहान होता. पण तरीही यहोवाने त्यालाच शौलच्या जागी राजा होण्यासाठी निवडलं. (१ शमु. १६:१, १०-१३) एका स्तोत्रकर्त्याला यहोवाबद्दल जसं वाटलं, तसंच दावीदलाही नक्कीच वाटलं असेल. त्या स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल असं म्हटलं: “जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांस धुळीतून उठवतो, दरिद्र्‌यास उकिरड्यावरून उचलतो; आणि त्यांना अधिपतींच्या . . . पंक्‍त्‌तीस बसवतो.” (स्तो. ११३:६-८) आपण अपरिपूर्ण असूनही यहोवा आपल्याशी जसं वागतो, त्यावरून दिसून येतं की तो नम्र आहे. तो आपली उपासना तर स्वीकारतोच, पण त्यासोबतच तो आपल्याला त्याचे मित्रही मानतो. (स्तो. २५:१४) आपल्याला त्याच्याशी मैत्री करता यावी म्हणून सर्वात आधी त्याने पाऊल उचललं. त्याने आपल्या पापांसाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं. खरंच, यहोवा किती प्रेमळ आणि दयाळू देव आहे! टेहळणी बुरूज२०.०८ ८ ¶१-३

शनिवार, १३ ऑगस्ट

कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची ] इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.—२ पेत्र ३:९.

या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी यहोवाने एक विशिष्ट दिवस ठरवला आहे. (मत्त. २४:३६) पण अधीर होऊन तो त्याआधी या दुष्ट जगाचा नाश करणार नाही. मृत लोकांचं पुनरुत्थान करण्याची तो आतुरतेने वाट पाहत आहे. पण म्हणून त्याने अंत लगेच आणला नाही, तर तो धीर धरतो. (ईयो. १४:१४, १५) मृत लोकांना जिवंत करण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत आहे. (योहा. ५:२८) यहोवा दाखवत असलेल्या धीराबद्दल त्याचे आभार मानण्याची किती कारणं आपल्याकडे आहेत, याचा विचार करा: यहोवाच्या धीरामुळे अनेकांना, अगदी आपल्यालासुद्धा पश्‍चात्ताप करण्याची संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे यहोवा दाखवत असलेल्या धीराची आपण कदर केली पाहिजे. आपण ती कशी दाखवू शकतो? आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना शोधायचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. तसंच, आपण त्यांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची उपासना करायलाही मदत केली पाहिजे. (प्रे. कार्ये १३:४८) मग आपल्यासारखंच त्यांनाही यहोवाच्या धीराचा फायदा होईल. टेहळणी बुरूज२०.०८ १८ ¶१७

रविवार, १४ ऑगस्ट

हे यहोवा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटेने चालायला मला शिकव.—स्तो. २५:४.

आपल्या विद्यार्थ्याने यहोवाबद्दल शिकावं अशी आपली इच्छा आहे. पण तितकंच पुरेसं नाही. शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्याच्या मनापर्यंतही पोचल्या पाहिजेत. तरंच तो त्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करायला तयार होईल. येशूने लोकांना बऱ्‍याच गोष्टी शिकवल्या. लोकांनाही त्याच्याकडून शिकायला आवडायचं आणि ते त्याचे शिष्य बनायचे, कारण तो जे काही शिकवायचा ते त्यांच्या मनापर्यंत पोचायचं. (लूक २४:१५, २७, ३२) तेच तुम्हीही केलं पाहिजे. तुमच्या विद्यार्थ्याला हे समजणं खूप गरजेचं आहे, की यहोवा एक खरी व्यक्‍ती आहे आणि आपण त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. तसंच, यहोवा आपला पिता, आपला देव आणि आपला मित्र होऊ शकतो हेही तुमच्या विद्यार्थ्याने समजणं गरजेचं आहे. (स्तो. २५:५) त्यासाठी बायबल अभ्यास घेताना यहोवाच्या सुंदर गुणांकडे विद्यार्थ्याचं लक्ष वेधा; मग तुम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करत असला तरीही. (निर्ग. ३४:५, ६; १ पेत्र ५:६, ७) यहोवा किती प्रेमळ आहे, कनवाळू आणि दयाळू आहे हे समजायला विद्यार्थ्याला मदत करा. येशूने म्हटलं होतं, की आपला देव यहोवा याच्यावर प्रेम करणं हीच सगळयात पहिली आणि महत्त्वाची आज्ञा आहे. (मत्त. २२:३७, ३८) त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला मदत करा. टेहळणी बुरूज२०.१० १० ¶१२

सोमवार, १५ ऑगस्ट

येशूचं मार्थावर, तिच्या बहिणीवर आणि लाजरवर प्रेम होतं.—योहा. ११:५.

येशू सर्व स्त्रियांशी आदाराने वागायचा. (योहा. ४:२७) आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणाऱ्‍या स्त्रियांबद्दल तर त्याला खास आदर होता. अशांना येशूने आपल्या बहिणी मानलं. तसंच, आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य कोणकोण आहेत हे सांगताना त्याने पुरुषांसोबत त्यांचाही उल्लेख केला. (मत्त. १२:५०) त्यांच्यासोबत त्याची चांगली मैत्रीही होती. मरीया आणि मार्था या दोघींशी येशूची किती चांगली मैत्री होती याचा विचार करा. असं दिसून येतं, की या दोघी बहिणी अविवाहित होत्या. (लूक १०:३८-४२) येशूचं वागणं-बोलणं इतकं चांगलं होतं, की त्या मनमोकळेपणे त्याच्याशी बोलू शकत होत्या. उदाहरणार्थ, एक शिष्य म्हणून त्याच्या पायाजवळ बसायला मरीयाला मुळीच संकोच वाटला नाही. आणि मरीया आपल्याला कामात मदत करत नाही, याची येशूला तक्रार करायला मार्थालाही संकोच वाटला नाही. त्या प्रसंगी येशूने त्या दोघींना काही महत्त्वाचे धडे शिकायला मदत केली. तसंच, इतर प्रसंगीही त्यांना भेट देऊन येशूने दाखवून दिलं, की त्याला त्यांची आणि त्यांचा भाऊ, लाजर याची काळजी आहे. (योहा. १२:१-३) म्हणूनच जेव्हा लाजर खूप आजारी पडला तेव्हा मरीया आणि मार्था येशूकडे मदत मागू शकल्या.—योहा. ११:३. टेहळणी बुरूज२०.०९ २० ¶३; २१ ¶६

मंगळवार, १६ ऑगस्ट

देवाचं राज्य लगेचच प्रकट होणार आहे असा त्यांचा समज होता.—लूक १९:११.

येशूचे शिष्य अशी आशा करत होते, की देवाचं राज्य “लगेचच प्रकट” होईल आणि ते जुलमी रोमी शासनापासून आपली सुटका करेल. आज आपणसुद्धा त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा देवाचं राज्य जगातली दुष्टाई काढून एक नीतिमान नवीन जग आणेल. (२ पेत्र ३:१३) पण त्यासाठी यहोवाने ठरवलेली वेळ येईपर्यंत आपल्याला वाट पाहण्याची आणि धीर धरण्याची गरज आहे. यहोवाने नोहाला तारू बांधण्यासाठी आणि “नीतिमत्त्वाचा प्रचारक” म्हणून सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. असं करून यहोवाने धीर दाखवला. (२ पेत्र २:५; १ पेत्र ३:२०) तसंच, यहोवाने सदोम आणि गमोरा या शहरांतल्या दुष्ट लोकांचा नाश करायचं ठरवलं, तेव्हा अब्राहामने त्याला एकापाठोपाठ एक अनेक प्रश्‍न विचारले. त्या वेळी यहोवाने धीराने त्याचं ऐकलं. (उत्प. १८:२०-३३) याशिवाय, वारंवार यहोवाला सोडून इतर दैवतांची उपासना करणाऱ्‍या इस्राएल राष्ट्राच्या बाबतीतही यहोवाने कितीतरी शतकांपर्यंत धीर दाखवला. (नहे. ९:३०, ३१) यहोवाच्या धीराचा पुरावा आजही आपल्याला पाहायला मिळतो. ज्या लोकांना तो आपल्याकडे आकर्षित करतो त्या “सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा” म्हणून तो वेळ देत आहे. (२ पेत्र ३:९; योहा. ६:४४; १ तीम. २:३, ४) यहोवाचं हे उदाहरण आपल्याला प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करत असताना धीर दाखवायला मदत करू शकतं. टेहळणी बुरूज२०.०९ १० ¶८-९

बुधवार, १७ ऑगस्ट

सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.—प्रे. कार्यं २४:१५.

यहोवा जेव्हा लोकांचं पुनरुत्थान करेल तेव्हा मृत्यू होण्याआधी त्यांचं जसं व्यक्‍तिमत्त्व होतं ते तसंच राहील. मृत्यू होण्याआधीच्या त्यांच्या सगळ्या आठवणीही तशाच असतील. आणि त्यासाठी यहोवा आज काय करत आहे त्याचा विचार करा. यहोवाचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की आपण जे काही बोलतो, करतो किंवा आपले जे विचार आहेत, भावना आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे तो बारकाईने लक्ष देतो. म्हणजे मृत्यूआधी आपल्या ज्या आठवणी होत्या, आपलं जे व्यक्‍तिमत्त्व होतं ते तसंच ठेवून त्याला आपलं पुनरुत्थान करता येईल. आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवा किती चांगल्या प्रकारे ओळखतो हे दावीद राजाला माहीत होतं. (स्तो. १३९:१-४) यहोवा आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखतो हे समजल्यामुळे आपल्याला कसं वाटलं पाहिजे? यहोवा आपल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतो या विचाराने आपल्याला भीती वाटली पाहिजे का? मुळीच नाही. कारण हे नेहमी लक्षात असू द्या की यहोवाला आपली खूप काळजी आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्यासाठी मौल्यवान आहे. आपल्या जीवनात कोणकोणत्या गोष्टी घडतात याकडे तो बारकाईने लक्ष देतो. खरंच, ही गोष्ट किती दिलासा देणारी आहे! आपण कधीच असा विचार करू नये की आपण एकटे आहोत. प्रत्येक क्षणी तो आपल्या सोबत असतो आणि आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो.—२ इति. १६:९. टेहळणी बुरूज२०.०८ १७ ¶१३-१४

गुरुवार, १८ ऑगस्ट

मी तुला सखोल समज देईन आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे तो तुला दाखवीन.—स्तो. ३२:८.

यहोवाला आपल्या लोकांना शिकवायला खूप आवडतं. कारण त्याची अशी इच्छा आहे, की आपण त्याला जाणून घ्यावं, त्याच्यावर प्रेम करावं आणि सर्वकाळ जगावं. जर यहोवाने आपल्याला शिकवलं नसतं, तर या सगळ्या गोष्टी शक्यच झाल्या नसत्या. (योहा. १७:३) यहोवाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना शिकवण्यासाठी मंडळीचा उपयोग केला. (कलस्सै. १:९,१०) तसंच, येशूने जो “सहायक,” म्हणजे पवित्र आत्मा द्यायचं वचन दिलं होतं, तो मिळाल्यामुळेही शिष्यांना मदत झाली. (योहा. १४:१६) पवित्र आत्म्याने त्यांना देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत केली. तसंच, येशूने शिकवलेल्या आणि केलेल्या सगळ्या गोष्टी आठवणीत आणून द्यायलाही आत्म्याने त्यांना मदत केली. या सगळ्या गोष्टी पुढे शुभवर्तमानाच्या पुस्तकांत लिहिण्यात आल्या. या माहितीमुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास मजबूत झाला, आणि यहोवावरचं, येशूवरचं आणि एकमेकांवरचं त्यांचं प्रेमही वाढलं. यहोवाने हे आधीच सांगितलं होतं, की “शेवटच्या दिवसांत” सर्व राष्ट्रांतले लोक त्याच्याकडून शिकण्यासाठी त्याच्या ‘डोंगराकडे’ येतील; म्हणजेच, खऱ्‍या उपासकांसोबत मिळून त्याची उपासना करतील. (यश. २:२, ३) आज ही भविष्यवाणी पूर्ण होत असल्याचं आपण पाहत आहोत. टेहळणी बुरूज२०.१० २४ ¶१४-१५

शुक्रवार, १९ ऑगस्ट

समजशक्‍ती असलेला माणूस चांगलं मार्गदर्शन मिळवतो.—नीति. १:५.

एखाद्या भावाने किंवा बहिणीने प्रेमळपणे दिलेला सल्ला स्वीकारणं एखाद्याला कठीण का वाटू शकतं? गर्वामुळे. कारण गर्विष्ठ लोकांना सहसा अशाच गोष्टी ऐकायला आवडतात, ज्या त्यांना ऐकायच्या असतात. आणि म्हणून जे खरं आहे त्याकडे ते पाठ फिरवतात. (२ तीम. ४:३, ४) आपल्याला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही असं त्यांना वाटतं. कारण आपण कोणीतरी खास आहोत आणि इतरांपेक्षा बुद्धिमान आहोत, अशी त्यांची समजूत असते. पण प्रेषित पौलने म्हटलं: “काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल, तर तो स्वतःलाच फसवत आहे.” (गलती. ६:३) तसंच, शलमोन राजानेही ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजावली. तो म्हणाला: “सल्ला न मानणाऱ्‍या वृद्ध आणि मूर्ख राजापेक्षा, गरीब आणि बुद्धिमान तरुण चांगला!” (उप. ४:१३) सल्ला स्वीकारण्याच्या बाबतीत पेत्रने एक चांगलं उदाहरण मांडलं. एकदा पौलने सगळ्यांसमोर त्याची चूक सुधारली आणि त्याला कडक शब्दांत सल्ला दिला. (गलती. २:११-१४) पौलने ज्या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी पेत्रला सल्ला दिला, त्या गोष्टीचा तो राग मानू शकला असता. पण पेत्र समजूतदारपणे वागला. त्याने पौलचा सल्ला स्वीकारला आणि त्याच्याबद्दल त्याने मनात राग बाळगला नाही. उलट, नंतर त्याने त्याला आपला “प्रिय बांधव” असं म्हटलं.—२ पेत्र ३:१५. टेहळणी बुरूज२०.११ २१ ¶९, ११-१२

शनिवार, २० ऑगस्ट

शिष्य करा आणि शिकवा.—मत्त. २८:१९, २०.

विद्यार्थ्याला आध्यात्मिक प्रगती करायला कशामुळे मदत होईल? सभांना उपस्थित राहिल्यामुळे. कारण, सभांमध्ये तो जे काही ऐकेल त्यामुळे त्याचं ज्ञान वाढेल, त्याचा विश्‍वास मजबूत होईल आणि यहोवावरचं त्याचं प्रेम वाढेल. (प्रे. कार्यं १५:३०-३२) तसंच, एक प्रचारक आपल्या विद्यार्थ्याला हेही सांगू शकतो, की यहोवावरचं प्रेम वाढवल्यामुळे त्याला देवाच्या आज्ञा पाळायला कशी मदत झाली. (२ करिंथ. ७:१; फिलिप्पै. ४:१३) आणि मंडळीतल्या वेगवेगळ्या भाऊबहिणींशी ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्याला खूप काही शिकायला मिळतं. देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करायच्या आज्ञेचं पालन कसं करायचं हे त्याला त्यांच्या चांगल्या उदाहरणांतून शिकायला मिळतं. (योहा. १३:३५; १ तीम. ४:१२) विद्यार्थ्याला अशा भाऊबहिणींकडूनही शिकायला मिळतं जे त्याच्यासारख्याच समस्यांचा सामना करत आहेत. यावरून त्याला समजेल, की येशूचा शिष्य बनण्यासाठी जे काही बदल करायची गरज आहे ते करणं शक्य आहे. (अनु. ३०:११) मंडळीतला प्रत्येक जण अशा वेगवेगळ्या मार्गांनी बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिक प्रगती करायला मदत करू शकतो.—मत्त. ५:१६. टेहळणी बुरूज२०.११ ५ ¶१०-१२

रविवार, २१ ऑगस्ट

मीसुद्धा इफिसमध्ये हिंस्र प्राण्यांशी लढलो.—१ करिंथ. १५:३२.

इफिसमध्ये प्रेषित पौल खरोखरच हिंस्र प्राण्यांशी लढला असेल आणि त्याबद्दलच तो इथे बोलत असावा. (२ करिंथ. १:८; ४:१०; ११:२३) किंवा मग, तो त्या यहुद्यांबद्दल आणि त्या लोकांबद्दल बोलत असावा जे त्याचा विरोध करत होते आणि त्याच्याशी ‘हिंस्र प्राण्यांसारखं’ वागत होते. (प्रे. कार्यं १९:२६-३४; १ करिंथ. १६:९) अशा प्रकारे पौलने अनेक जीवघेण्या संकटांचा सामना केला. पण तरीही तो भविष्याकडे आशेने पाहत राहिला. (१ करिंथ. १५:३०, ३१; २ करिंथ. ४:१६-१८) आज आपण एका धोकादायक काळात जगत आहोत. आपले काही भाऊबहीण गुन्हेगारीचे शिकार बनले आहेत. इतर काही जण अशा ठिकाणी राहतात जिथे सतत युद्धं होत असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका आहे. तर असेही काही भाऊबहीण आहेत जे अशा देशांमध्ये राहतात जिथे आपल्या कामावर बंधनं आहेत किंवा त्यावर पूर्णपणे बंदी आहे. आपण पकडले गेलो, तर आपल्याला तुरुंगवास होईल, नाहीतर मारून टाकलं जाईल हे त्यांना माहीत आहे. पण तरीही ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करतात. या सगळ्या भाऊबहिणींचं आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे. त्यांना याची पक्की खातरी आहे, की आज आपला जीव जरी गेला तरी भविष्यात यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करेल आणि असं जीवन देईल जे आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगलं असेल. टेहळणी बुरूज२०.१२ ९ ¶३-४

सोमवार, २२ ऑगस्ट

आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचं असं शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे. तुम्ही देवाची अशी इमारत आहात, जिचं तो बांधकाम करत आहे.—१ करिंथ. ३:९.

तुम्ही अशा क्षेत्रात प्रचार करत आहात का जिथे बहुतेक लोक तुमचा संदेश ऐकत नाहीत, किंवा ते घरी भेटत नाहीत? आणि यामुळे तुम्ही निराश होता का? अशा क्षेत्रात काम करत असताना आनंदी राहण्यासाठी किंवा आपला आनंद वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी सेवाकार्याबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तो आपण कसा ठेवू शकतो? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण देवाच्या नावाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल लोकांना सांगण्यासाठी प्रचार करतो. येशूने हे स्पष्टपणे सांगितलं होतं, की खूप कमी लोक त्याचे शिष्य बनतील. (मत्त. ७:१३, १४) आपण सेवाकार्यात असतो, तेव्हा आपल्याला यहोवा, येशू आणि स्वर्गदूतांसोबत काम करण्याचा बहुमान मिळतो. (मत्त. २८:१९, २०; प्रकटी. १४:६, ७) यहोवा अशाच लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतो ज्यांना त्याची सेवा करायची इच्छा असते. (योहा. ६:४४) म्हणून आज जरी एखाद्या व्यक्‍तीने आपला संदेश ऐकला नाही, तरी आपण निराश होऊ नये. कदाचित पुढच्या वेळी ती आपला संदेश ऐकेल. दीपा नावाची बहीण म्हणते: “आपल्यावर वार करण्यासाठी सैतान एका शक्‍तिशाली हत्याराचा वापर करतो; ते हत्यार म्हणजे निराशा.” पण सैतानाच्या कोणत्याही हत्यारापेक्षा यहोवा देव कितीतरी शक्‍तिशाली आहे. टेहळणी बुरूज२०.१२ २६ ¶१८-१९; २७ ¶२१

मंगळवार, २३ ऑगस्ट

आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या, कारण प्रेम देवापासून आहे.—१ योहा. ४:७.

कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या अनेक भाऊबहिणींना पूर्ण वेळेची नोकरी करावी लागते. पण असं असलं तरी ते जमेल त्या मार्गाने देवाच्या संघटनेला मदत करतात. जसं की, एखादी विपत्ती कोसळते तेव्हा काही जण मदतकार्यात हातभार लावतात. तर इतर काही जण बांधकाम प्रकल्पांवर काम करतात. आणि जगभरात चाललेल्या कामासाठी तर सगळेच जण आनंदाने दान देतात. देवावर आणि इतरांवर प्रेम असल्यामुळेच ते हे करतात. याशिवाय, आपण सर्व दर आठवडी सभांना उपस्थित राहून आणि त्यांत सहभाग घेऊन भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं दाखवतो. आपण थकलेलो असलो, तरी सभांना जातो. आपल्याला भीती वाटत असली, तरी आपण उत्तरं देतो. आणि आपल्या सगळ्यांनाच काही ना काही समस्या असली, तरी सभेच्या आधी किंवा नंतर आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो. (इब्री १०:२४, २५) खरंच, आपले भाऊबहीण जे काही करतात त्याची आपण मनापासून कदर करतो. टेहळणी बुरूज२१.०१ १० ¶११

बुधवार, २४ ऑगस्ट

आपण अहंकारी होऊ नये.—गलती. ५:२६.

गर्विष्ठ लोकांना इतरांची प्रशंसा करणं कठीण जातं. कारण इतरांनी आपली प्रशंसा करावी अशी त्यांची अपेक्षा असते. असे लोक सहसा स्वतःची तुलना इतरांसोबत करतात, आणि आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. गर्विष्ठ लोक सहसा इतरांना प्रशिक्षण देत नाहीत किंवा त्यांच्यावर जबाबदाऱ्‍याही सोपवत नाहीत. कारण एखादं काम चांगलं व्हायचं असेल, तर ते आपणच केलेलं बरं असं त्यांना वाटतं. गर्विष्ठ लोक सहसा इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्‍यांना यश मिळतं तेव्हा त्यांना आनंद होत नाही. आपल्याला जर असं जाणवलं, की आपल्यामध्ये गर्वाची भावना आहे तर आपण मदतीसाठी कळकळून यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. हा वाईट गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग होऊ नये म्हणून आपली विचारसरणी बदलण्यासाठी आपण यहोवाला मदत मागितली पाहिजे. (रोम. १२:२) नम्रतेच्या बाबतीत यहोवाने आपल्यासमोर जे सुंदर उदाहरण मांडलं आहे त्याबद्दल आपण किती आभारी आहोत! (स्तो. १८:३५) तो आपल्या सेवकांशी ज्या प्रकारे वागतो त्यातून त्याची नम्रता दिसून येते. आणि आपणही तसंच वागायचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच, जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून नम्रपणे देवासोबत चालले अशांच्या उदाहरणाचंही आपण अनुकरण केलं पाहिजे. आपण नेहमी यहोवाचा सन्मान आणि गौरव केला पाहिजे. कारण तोच त्यासाठी योग्य आहे.—प्रकटी. ४:११. टेहळणी बुरूज२०.०८ १२-१३ ¶१९-२०

गुरुवार, २५ ऑगस्ट

जे लग्न करतील त्यांना शारीरिक दुःखं सहन करावी लागतील.—१ करिंथ. ७:२८.

विवाहाची व्यवस्था ही यहोवाकडून असलेली एक परिपूर्ण व्यवस्था आहे. पण आज मानव अपरिपूर्ण आहेत. (१ योहा. १:८) म्हणून विवाहित जोडप्यांना त्यांच्या जीवनात बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटलं आहे, की “त्यांना शारीरिक दुःखं सहन करावी लागतील.” पतीने आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक, भावनिक आणि रोजच्या गरजा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा यहोवा त्याच्याकडून करतो. (१ तीम. ५:८) पण पत्नीनेसुद्धा आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या कामातून वेळ काढला पाहिजे. तिने दररोज बायबलचं वाचन केलं पाहिजे, त्यावर मनन केलं पाहिजे आणि यहोवाला मनापासून प्रार्थना केली पाहिजे. या गोष्टी करणं तिला कठीण वाटू शकतं. पत्नींना घरातली भरपूर कामं असतात. असं असलं, तरी त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी वेळातून वेळ काढणं महत्त्वाचं आहे. कारण यहोवाची अशी इच्छा आहे, की आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यासोबत असलेलं आपलं नातं घट्ट करावं. (प्रे. कार्यं १७:२७) एका पत्नीला आपल्या पतीच्या अधीन राहणं कठीण का जाऊ शकतं, याची बरीच कारणं असू शकतात. पण बायबल पतीचा आदर करायला का सांगतं याची कारणं तिने समजून घेतली, तर त्याच्या अधीन राहायला तिला सोपं जाईल. टेहळणी बुरूज२१.०२ ८-९ ¶३, ६-७

शुक्रवार, २६ ऑगस्ट

तुमच्या विश्‍वासाची अशी पारख झाल्यामुळे धीर उत्पन्‍न होतो.—याको. १:३.

परीक्षांची तुलना एखादा धातू मजबूत करण्याच्या प्रक्रियेशी केली जाऊ शकते. धातू धगधगत्या आगीत तापवून नंतर थंड केला जातो तेव्हा तो आणखी मजबूत होतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा परीक्षांचा धीराने सामना करतो, तेव्हा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. म्हणूनच याकोबने असं म्हटलं: “धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या म्हणजे तुम्ही सर्व बाबतींत परिपूर्ण ठराल.” (याको. १:४) परीक्षांमुळे आपला विश्‍वास मजबूत होताना आपण पाहतो तेव्हा आपण आनंदाने त्या सहन करतो. पण आपला हा आनंद कोणत्या काही गोष्टींमुळे हरवू शकतो, हेसुद्धा याकोबने आपल्या पत्रात सांगितलं. एक गोष्ट म्हणजे, काय करावं कळत नाही तेव्हा. परीक्षांचा सामना करत असताना आपण नेहमी असेच निर्णय घेतले पाहिजेत ज्यांमुळे यहोवाचं मन आनंदी होईल, आपल्या भाऊबहिणींचं भलं होईल आणि आपल्याला यहोवाला विश्‍वासू राहायला मदत होईल. (यिर्म. १०:२३) असे योग्य निर्णय घेण्यासाठी आणि विरोधकांना काय उत्तर द्यायचं ते सुचण्यासाठी आपल्याला बुद्धीची गरज असते. कारण अशा वेळी काय करायचं हे जर आपल्याला समजलं नाही, तर आपण लगेच निराश होऊ आणि आपला आनंद गमावून बसू. टेहळणी बुरूज२१.०२ २८ ¶७-९

शनिवार, २७ ऑगस्ट

एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.—१ पेत्र १:२२.

या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. तो आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि आपण जर त्याला एकनिष्ठ राहिलो तर आपल्यावरचं त्याचं हे प्रेम कधीही कमी होणार नाही. (रोम. ८:३८, ३९) “जिवापाड” या शब्दासाठी ग्रीक भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ असा होतो, की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करणं. काही वेळा भाऊबहिणींना आपुलकी दाखवण्यासाठी आपल्यालासुद्धा खूप प्रयत्न करावे लागतील. जसं की, कोणी आपलं मन दुखावलं तर आपण प्रेमाने त्यांचं सहन करत राहिलं पाहिजे. आणि आपल्यातली शांती आणि एकता टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं पाहिजे. (इफिस. ४:१-३) आपण त्यांच्या चुकांकडे लक्ष देणार नाही. उलट, आपण त्यांच्याकडे यहोवाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू. (१ शमु. १६:७; स्तो. १३०:३) भाऊबहिणींना आपुलकी दाखवणं नेहमीच सोपं नसतं. खासकरून आपल्याला त्यांच्या चुका दिसतात तेव्हा. असं दिसतं, की पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्‍चनांचीसुद्धा हीच समस्या होती. जसं की, युवदीया आणि सुंतुखे या दोन बहिणी. प्रेषित पौलने त्यांना असा सल्ला दिला: “प्रभूमध्ये एक मनाच्या असा.”—फिलिप्पै. ४:२, ३. टेहळणी बुरूज२१.०१ २२-२३ ¶१०-११

रविवार, २८ ऑगस्ट

मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही खंबीर आहात आणि देवाचं वचन तुमच्यामध्ये टिकून राहतं आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.—१ योहा. २:१४.

तुम्हा तरुण भावांची वयस्कर भाऊबहीण मनापासून कदर करतात. कारण तुम्ही त्यांच्यासोबत “खांद्याला खांदा” लावून यहोवाची सेवा करता. (सफ. ३:९) तुम्ही ज्या आवेशाने आणि उत्साहाने दिलेलं काम करता ते पाहून त्यांना खूप आनंद होतो. त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. तरुण भावांनो, यहोवा तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यावर भरवसा ठेवतो हे कधीही विसरू नका. शेवटच्या काळात तरुणांची एक मोठी सेना त्याची सेवा करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येईल, हे त्याने आधीच सांगितलं होतं. (स्तो. ११०:१-३) त्याला माहीत आहे, की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि होता होईल तितकी त्याची सेवा करायची तुमची इच्छा आहे. त्यामुळे इतरांशी धीराने वागा आणि हिंमत सोडू नका. तुमच्याकडून चूक होते, तेव्हा जो सल्ला दिला जातो तो यहोवाकडून आहे असा विचार करा, आणि तो स्वीकारा. (इब्री १२:६) तुम्हाला जी काही जबाबदारी मिळते ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही करता त्यातून यहोवाचं मन आनंदी करा.—नीति. २७:११. टेहळणी बुरूज२१.०३ ७ ¶१७-१८

सोमवार, २९ ऑगस्ट

संकटाच्या काळात तू निराश झालास, तर तुझी शक्‍ती कमी पडेल.—नीति. २४:१०, तळटीप.

निराशेची भावना वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते; जसं की, स्वतःच्या चुकांमुळे, कमतरतांमुळे किंवा आजारपणामुळे. तसंच, यहोवाच्या सेवेत हवी असलेली नेमणूक मिळाली नाही म्हणून आपण निराश होऊ शकतो. याशिवाय, आपल्याला कदाचित अशा क्षेत्रात काम करावं लागत असेल, जिथले बहुतेक लोक आपला संदेश ऐकत नाहीत आणि यामुळेही आपण निराश होऊ शकतो. आपण सगळेच बऱ्‍याचदा चुका करतो आणि आपल्यात काही कमतरताही असतात. त्यामुळे आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपण फार वाईट आहोत आणि यहोवा त्याच्या नवीन जगात आपल्याला जाऊ देणार नाही. पण असा विचार करणं खूप चुकीचं आहे. बायबल म्हणतं, की येशू ख्रिस्ताला सोडून सगळ्या मानवांनी “पाप केलं आहे.” (रोम. ३:२३) असं असलं तरी, यहोवा आपल्या चुका काढत नाही आणि आपल्याकडून चुका होऊच नये अशी अपेक्षाही तो करत नाही. उलट, तो आपला प्रेमळ पिता आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे. तसंच, तो आपल्याशी फार धीराने वागतो. आपण आपल्या कमतरतांवर आणि कमीपणाच्या भावनेवर मात करण्यासाठी किती प्रयत्न करतो, हे तो पाहतो आणि आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो.—रोम. ७:१८, १९. टेहळणी बुरूज२०.१२ २२ ¶१-३

मंगळवार, ३० ऑगस्ट

बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की नेहमी आनंदी राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा.—२ करिंथ. १३:११.

आपण सगळेच एका अर्थाने प्रवास करत आहोत. आणि शेवटी, आपल्या सगळ्यांना नवीन जगात पोचायचं आहे. ते असं जग असेल जिथे यहोवा प्रेमाने आपल्यावर राज्य करेल. म्हणून जीवनाकडे जाणाऱ्‍या या रस्त्यावर चालत राहण्यासाठी आपण दररोज प्रयत्न करतो. पण येशूने म्हटलं, की हा रस्ता छोटा आहे. त्यामुळे त्यावर चालत राहणं काही वेळा कठीण जाऊ शकतं. (मत्त. ७:१३, १४) तसंच, आपण अपरिपूर्णही आहोत. त्यामुळे या मार्गावरून सहज आपली पावलं भरकटू शकतात. (गलती. ६:१) जीवनाकडे जाणाऱ्‍या या छोट्या रस्त्यावर चालत राहायचं असेल, तर आपण आपल्या विचारांमध्ये, वृत्तीमध्ये आणि वागण्यामध्ये सुधारणा करायला तयार असलं पाहिजे. प्रेषित पौल आपल्याला “स्वतःमध्ये सुधारणा” करत राहायचा सल्ला देतो. पण स्वतःच्या विचारांचं आणि भावनांचं परीक्षण करणं सोपं नसतं. कारण आपलं हृदय धोका देणारं आहे. ते आपल्याला कोणत्या मार्गावर नेईल, हे आपण सांगू शकत नाही. (यिर्म. १७:९) आणि आपण खोटे तर्क करून सहज स्वतःची फसवणूक करू शकतो. (याको. १:२२) म्हणून स्वतःचं परीक्षण करण्यासाठी आपण देवाचं वचन वाचलं पाहिजे. ते आपल्याला आपल्या “हृदयातले विचार आणि हेतू” समजून घ्यायला मदत करतं.—इब्री ४:१२, १३. टेहळणी बुरूज२०.११ १८ ¶१-३

बुधवार, ३१ ऑगस्ट

एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.—रोम. १२:१०.

आपण जेव्हा नम्र असतो आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतो तेव्हा आपण आनंदी असतो. असं का म्हणता येईल? कारण काही गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही याची आपल्याला जाणीव असते आणि म्हणून आपण इतरांची मदत घेतो. ते जेव्हा आपल्याला मदत करतात तेव्हा आपण आनंदी होतो आणि त्यांचे आभार मानतो. हे समजण्यासाठी, येशूने ज्या दहा कुष्ठरोग्यांना बरं केलं होतं तो प्रसंग आठवा. त्या दहा जणांपैकी फक्‍त एक जण येशूचे आभार मानायला परत त्याच्याकडे आला. कारण येशूच्या मदतीशिवाय या भयंकर रोगातून आपली सुटका होऊच शकली नसती याची त्या माणसाला जाणीव होती. आणि म्हणून त्याने येशूचे आभार मानले आणि देवाची स्तुती केली. (लूक १७:११-१९) जे लोक नम्र असतात आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात त्यांचं सहसा इतरांसोबत चांगलं जमतं आणि त्यांना अनेक मित्र असतात. कारण, ते इतरांच्या चांगल्या गुणांची मनापासून कदर करतात आणि त्यांच्यावर भरवसा ठेवतात. तसंच, इतर जण जेव्हा एखादी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतात तेव्हा त्यांना आनंद होतो आणि ते लगेच त्यांची प्रशंसा करतात. टेहळणी बुरूज२०.०८ १२ ¶१७-१८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा