जून
बुधवार, १ जून
आम्ही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही द्यायला तयार होतो.—१ थेस्सलनी. २:८.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची मनापासून काळजी घेतली पाहिजे. पुढे जाऊन ते आपले भाऊबहीण बनतील असा आपण त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे. यहोवाची सेवा करण्यासाठी जगातले मित्र सोडून देणं आणि जीवनात बदल करणं हे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी सोपं नाही. एक चांगला शिक्षक आपल्या विद्यार्थ्याची मंडळीतल्या इतर भाऊबहिणींशी ओळख करून देतो. याचा विद्यार्थ्यावर चांगला परिणाम होतो. जसं की, त्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत होते, त्याला देवाच्या लोकांमध्ये चांगल्या संगतीचा आनंद घेता येतो आणि गरज पडल्यावर त्याला भाऊबहिणींकडून भावनिक रित्या मदत मिळते. आपल्या विद्यार्थ्याला मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत आपलेपणा वाटावा आणि त्याने त्यांना आपल्या कुटुंबासारखं समजावं अशी आपली इच्छा आहे. तसंच आपल्याला असंही वाटतं, की त्याने भाऊबहिणींमधलं प्रेम पाहावं आणि सगळ्यांशी मैत्री करावी. असं जर झालं, तर जगातले मित्र सोडायला त्याला कठीण जाणार नाही. (नीति. १३:२०) आणि त्याच्या आधीच्या मित्रांनी जरी त्याला सोडून दिलं, तरी यहोवाच्या मंडळीत आपल्याला चांगले मित्र मिळतील याची त्याला खातरी असेल.—मार्क १०:२९, ३०; १ पेत्र ४:४. टेहळणी बुरूज२०.१० १७ ¶१०-११
गुरुवार, २ जून
स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.—मत्त. २८:१८.
यहोवासोबत आपलं चांगलं नातं असावं असं जर आपल्याला वाटतं तर आपण येशूसोबत मैत्री करणं गरजेचं आहे. असं आपण का म्हणू शकतो? हे समजण्यासाठी दोन कारणांकडे लक्ष द्या. पहिलं, येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “तुम्ही माझ्यावर प्रेम केलं . . . म्हणून तो तुमच्यावर प्रेम करतो. (योहा. १६:२७) त्याने असंसुद्धा म्हटलं: “माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. १४:६) येशूसोबत मैत्री केल्याशिवाय यहोवासोबत नातं घनिष्ठ करणं हे जणू दाराचा वापर न करता घरात प्रवेश करण्यासारखं आहे. येशूने स्वतःबद्दल सांगताना अशाच एका उदाहरणाचा वापर करून म्हटलं: “मेंढरांसाठी असलेलं दार मी आहे.” (योहा. १०:७) दुसरं कारण म्हणजे येशूने आपल्या पित्याच्या गुणांचं हुबेहूब अनुकरण केलं. त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं: “ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.” (योहा. १४:९) तेव्हा यहोवाला जाणून घेण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे येशूच्या जीवनाबद्दल अभ्यास करणं. आपण जितकं जास्त येशूबद्दल शिकत जाऊ, तितकं जास्त आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढत जाईल. आणि येशूवरचं आपलं प्रेम वाढलं तर आपलं पित्यावरचंही प्रेम वाढत जाईल. टेहळणी बुरूज२०.०४ २१ ¶५-६
शुक्रवार, ३ जून
मी दुर्बलतेला तोंड देताना आनंद मानतो. कारण जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच मी ताकदवान होतो.—२ करिंथ. १२:१०.
तुम्ही अंथरुणाला खिळले आहात का किंवा तुम्हाला व्हीलचेअर वापरावी लागते का? तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे का किंवा तुमची नजर कमजोर झाली आहे का? तुम्हाला या समस्या असतील, तर तुमच्या मनात प्रश्न येईल, की ‘मी तरुण आणि निरोगी धावकांसोबत धावू शकेन का?’ पण हिंमत हारू नका, तुम्ही नक्कीच धावू शकाल! आज कित्येक वयस्क आणि आजारी भाऊबहीण जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावर धावत आहेत. पण ते स्वतःच्या बळावर असं करू शकत नाहीत. तर, ते यहोवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहतात; ते फोनवर ख्रिस्ती सभा ऐकतात किंवा सभांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहतात. तसंच ते डॉक्टर, नर्स किंवा नातेवाईक यांना आनंदाचा संदेश सांगून शिष्य बनवण्याच्या कामात सहभाग घेतात. तुमची इच्छा असूनही जर तुम्ही जास्त प्रमाणात यहोवाची सेवा करू शकत नसाल, तर निराश होऊ नका. तसंच, जीवनाची शर्यत तुम्हाला पूर्ण करता येणार नाही असाही विचार करू नका. कारण तुम्ही यहोवावर दाखवलेला विश्वास आणि आतापर्यंत केलेली त्याची सेवा तो कधीच विसरणार नाही. त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. खरंतर, आज तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज आहे, त्यामुळे तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. (स्तो. ९:१०) उलट तो तुमच्या अगदी जवळ राहील. टेहळणी बुरूज२०.०४ २९-३० ¶१६-१७
शनिवार, ४ जून
मी आनंदाच्या संदेशासाठी सर्वकाही करतो. हे यासाठी, की मला तो इतरांना सांगता यावा.—१ करिंथ. ९:२३.
एका धार्मिक व्यक्तीशी तुम्ही कोणत्या विषयांवर चर्चा करू शकता? कोणते समान विषय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती व्यक्ती कदाचित एकाच देवाची उपासना करत असेल, येशू हा मानवजातीचा तारणकर्ता आहे असा ती विश्वास करत असेल, किंवा आपण सर्व अशा वाईट काळात जगत आहोत ज्याचा लवकरच अंत होईल असं ती मानत असेल. बायबलचा संदेश तिला आवडेल अशा समान विषयांवर तिच्याशी बोला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लोक, त्यांचा धर्म शिकवत असलेल्या सर्वच गोष्टी मानत असतील असं नाही. घरमालकाचा धर्म कोणता आहे हे तुम्हाला समजलं तरीही तो स्वतः कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एक मिशनरी बांधव म्हणतो की काही लोकांचा त्रैक्याच्या शिकवणीवर विश्वास आहे असं ते मान्य करतात. पण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही मिळून एकच देव आहे असं ते कदाचित मानत नाहीत. तो म्हणतो, “लोकांशी बोलताना मी हे लक्षात ठेवतो की एक व्यक्ती आपल्या धर्मातल्या सर्वच शिकवणी मानत असेल असं नाही. यामुळे मला त्यांच्याशी समान विषयांवर बोलायला मदत होते.” तेव्हा लोकांचा नेमका विश्वास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने आपण प्रेषित पौलप्रमाणे “सर्व लोकांसाठी सर्वकाही” बनू शकतो.—१ करिंथ. ९:१९-२२. टेहळणी बुरूज२०.०४ १० ¶९-१०
रविवार, ५ जून
त्या वेळी तुझे लोक वाचतील; ज्यांची नावं पुस्तकात लिहिण्यात आली आहेत ते सगळे वाचतील.—दानी. १२:१.
दानीएल आणि योहान या दोघांनीही म्हटलं की मोठ्या संकटाच्या वेळी यहोवा आणि येशू ख्रिस्त आपल्या सेवकांना वाचवतील. म्हणून त्या वेळी काहीही घडलं तरी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. दानीएलने म्हटलं की ज्यांची नावं ‘पुस्तकात लिहिलेली सापडतील’ त्यांनाच वाचवलं जाईल. त्या पुस्तकात आपलंही नाव लिहिलं जावं यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण देवाचा कोकरा, येशू ख्रिस्त याच्यावर आपला भरवसा आहे हे सिद्ध केलं पाहिजे. (योहा. १:२९) आपण आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (१ पेत्र ३:२१) तसंच, यहोवाबद्दल इतरांना शिकून घ्यायला मदत करून आपण हे दाखवलं पाहिजे की आपण देवाच्या राज्याला साथ देत आहोत. यहोवावर आणि त्याच्या विश्वासू सेवकांच्या संघटनेवर भरवसा वाढवण्याची हीच वेळ आहे. तसंच, देवाच्या राज्याला साथ देण्याचीही हीच वेळ आहे. असं केल्यामुळे देवाचं राज्य उत्तरेच्या राजाचा आणि दक्षिणेच्या राजाचा नाश करेल तेव्हा आपल्याला वाचवलं जाईल. टेहळणी बुरूज२०.०५ १६ ¶१८-१९
सोमवार, ६ जून
हे यहोवा, तुझं नाव सर्वकाळाचं आहे.—स्तो. १३५:१३.
आदाम आणि हव्वा यांना देवाचं नाव यहोवा आहे हे माहीत होतं. तसंच, त्यांना त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा माहीत होत्या. जसं की, तो त्यांचा निर्माणकर्ता आहे आणि त्याने त्यांना जीवन, सुंदर घर व परिपूर्ण सोबती दिला आहे ही गोष्ट त्यांना माहीत होती. (उत्प. १:२६-२८; २:१८) पण यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केलं होतं त्याबद्दल त्यांनी विचार केला का? यहोवाबद्दल त्यांनी प्रेम आणि कदर वाढवली का? देवाच्या शत्रूने जेव्हा त्यांची परीक्षा घेतली तेव्हा त्यांनी काय केलं यावरून या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. सैतानाने सापाचा वापर करून हव्वाला असा प्रश्न विचारला: “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” (उत्प. २:१६, १७; ३:१) यहोवा खोटं बोलत आहे अशी शंका निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हव्वाला असा प्रश्न विचारला. देवाने आदाम-हव्वा यांच्यासाठी बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती. आणि ते त्यांची फळं खाऊ शकत होते. पण एका विशिष्ट झाडाविषयी यहोवाने म्हटलं होतं, की आदाम-हव्वाने त्याचं फळ खाऊ नये. (उत्प. २:९) त्यामुळे सैतानाने हव्वाला प्रश्न विचारला तेव्हा तिच्या मनात शंका निर्माण झाली, आणि तिला असं वाटू लागलं, की यहोवा हा उदार देव नाही. ‘देव आपल्याकडून कोणतीतरी चांगली गोष्ट लपवून ठेवत आहे का?’ असा विचार तिच्या मनात आला असेल. टेहळणी बुरूज२०.०६ ३ ¶८-९
मंगळवार, ७ जून
एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.—कलस्सै. ३:१३.
यहोवाचे काही सेवक मंडळीतल्या एखाद्या भावामुळे किंवा बहिणीमुळे दुखावले गेले आहेत. आणि यामुळे कदाचित ते यहोवापासून दूर गेले असतील. प्रेषित पौलने म्हटलं, की आपल्याला काही वेळा एखाद्या भावाविरुद्ध किंवा बहिणीविरुद्ध “तक्रार” असण्याचं काही रास्त कारण असू शकतं. किंवा आपल्यासोबत कदाचित अन्यायही झाला असेल. पण आपण जर सावध राहिलो नाही, तर आपण मनात राग बाळगू आणि हळूहळू यहोवाच्या लोकांपासून दूर जाऊ. दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या पाब्लो नावाच्या बांधवावर चुकीचं काम करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला; आणि यामुळे मंडळीतल्या त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. असं घडलं तेव्हा पाब्लो यांनी काय केलं? ते म्हणतात: “मला राग आला, आणि हळूहळू मी मंडळीपासून दूर गेलो.” एखाद्याने जर पूर्वी गंभीर पाप केलं असेल, तर बऱ्याच काळापर्यंत त्याचं मन कदाचित त्याला खात असेल. यहोवाचं आता आपल्यावर प्रेम नाही असंही कदाचित त्याला वाटेल. आपण केलेल्या गंभीर पापाबद्दल त्याने पश्चात्ताप केला असेल आणि त्याला क्षमाही करण्यात आली असेल. पण तरीसुद्धा त्याला असं वाटत असेल, की आपण देवाच्या लोकांमध्ये राहण्याच्या लायकीचे नाही. अशा भावनांचा सामना करत असलेल्या भाऊबहिणींबद्दल तुम्हाला कसं वाटतं? टेहळणी बुरूज२०.०६ १९ ¶६-७
बुधवार, ८ जून
शहाणा धोका पाहून लपतो.—नीति. २२:३.
आपल्याला धोकादायक परिस्थिती ओळखता आली पाहिजे आणि ती टाळण्यासाठी पाऊल उचलता आलं पाहिजे. (इब्री ५:१४) उदाहरणार्थ, करमणूक किंवा मनोरंजन निवडताना आपण समजबुद्धीचा वापर केला पाहिजे. कारण टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहसा अनैतिक गोष्टी दाखवल्या जातात. आपल्याला माहीत आहे, की अशा गोष्टी देवाला आवडत नाहीत. आणि या गोष्टींमुळे आपल्यावर आणि इतरांवरसुद्धा वाईट परिणाम होतो. तसंच, यहोवावरचं आपलं प्रेमही हळूहळू कमी होऊ शकतं. म्हणून, आपण अशा प्रकारचं मनोरंजन टाळलं पाहिजे. (इफिस. ५:५, ६) आपण आणखी एक धोका ओळखला पाहिजे. तो म्हणजे, धर्मत्यागी लोक पसरवत असलेल्या खोट्या गोष्टींचा धोका. धर्मत्यागी लोक आपल्या बांधवांबद्दल खोट्या गोष्टी पसरवण्याचा किंवा यहोवाच्या संघटनेबद्दल आपल्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. (१ तीम. ४:१, ७; २ तीम. २:१६) अशा चुकीच्या माहितीमुळे आपला विश्वास कमजोर होऊ शकतो. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कारण बायबल म्हणतं, की या धर्मत्यागी लोकांची “मने दूषित झाल्यामुळे आणि ते सत्यापासून दुरावल्यामुळे” चुकीची माहिती पसरवतात. आणि त्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे वाद घालणं आणि शब्दांवरून भांडणं करणं. (१ तीम. ६:४, ५) आपण त्यांच्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवावा आणि आपल्या बांधवांवर शंका घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. टेहळणी बुरूज२०.०९ २९ ¶१३, १५
गुरुवार, ९ जून
स्वतःचा नाही, तर दुसऱ्याचा फायदा पाहा.—१ करिंथ. १०:२४.
पती-पत्नींनी एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागलं पाहिजे. (इफिस. ५:३३) घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे असं बायबल आपल्याला सांगतं. (प्रे. कार्ये २०:३५) एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागायला कोणत्या गुणामुळे मदत होऊ शकते? नम्रता या गुणामुळे. नम्रता या गुणामुळे बऱ्याच ख्रिस्ती जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी राहणं शक्य झालं आहे. उदाहरणार्थ, स्टिवन नावाचे पती म्हणतात: “तुम्ही एकत्र मिळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. खासकरून समस्या येतात तेव्हा त्या तुम्ही एकत्र सोडवल्या पाहिजेत. माझ्यासाठी काय चांगलं आहे असा विचार करण्याऐवजी आपल्यासाठी काय चांगलं आहे असा विचार आपण केला पाहिजे.” त्याच्या पत्नीला, स्टेफनीलाही असंच वाटतं. ती म्हणते, “सतत भांडत राहणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला कोणालाच आवडत नाही. जेव्हा आमच्यात मतभेद होतो तेव्हा तो नेमका कशामुळे झाला हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. मग आम्ही एकत्र प्रार्थना करतो, संशोधन करतो आणि ती समस्या कशी सोडवता येईल त्यावर चर्चा करतो. एकमेकांशी भांडण्याऐवजी आम्ही एकत्र मिळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःपेक्षा आपल्या जोडीदाराचा जास्त विचार करणारे पती-पत्नी आनंदी असतात.” टेहळणी बुरूज२०.०७ ३-४ ¶५-६
शुक्रवार, १० जून
माझ्या राष्ट्रातल्या माझ्याच वयाच्या इतर बऱ्याच जणांपेक्षा मी यहुदी धर्मात पुष्कळ प्रगती करत होतो.—गलती. १:१४.
यहोवाची सेवा करत असताना आपण स्वतःच्या ताकदीवर किंवा क्षमतांवर अवलंबून राहू नये. प्रेषित पौल खूप शिकलेला होता. त्याने त्याच्या काळातल्या गमलियेल नावाच्या यहुदी पुढाऱ्याकडून शिक्षण घेतलं होतं. या शिक्षकाचा सर्व जण आदर करायचे. (प्रे. कार्ये ५:३४; २२:३) याशिवाय, पौलला एकेकाळी यहुदी समाजात प्रतिष्ठेचं स्थान होतं. (प्रे. कार्ये २६:४) या सगळ्या गोष्टींमुळे पौल सहज गर्विष्ठ बनू शकला असता. तो स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू शकला असता. पण त्याने तसं मुळीच केलं नाही. इतर जण पौलला ज्या गोष्टींमुळे महत्त्व देत होते, त्या त्याने आनंदाने मागे सोडून दिल्या. (फिलिप्पै. ३:८) येशू ख्रिस्ताचा शिष्य बनल्यामुळे पौलला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याच्याच राष्ट्रातल्या लोकांनी त्याचा द्वेष केला. (प्रे. कार्ये २३:१२-१४) तो रोमी नागरिक होता. पण तरी रोमी लोकांनी त्याला मारहाण केली आणि तुरुंगात टाकलं. (प्रे. कार्ये १६:१९-२४, ३७) याशिवाय, त्याला आपल्या कमतरतांचीही जाणीव होती, आणि योग्य ते करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. (रोम. ७:२१-२५) पण पौलने आपल्या समस्यांमुळे, विरोधकांमुळे किंवा कमतरतांमुळे हार मानली नाही. याउलट, त्याने आपल्या ‘दुर्बलतांमध्ये आनंद’ मानला. तो असं का करू शकला? कारण जेव्हा-जेव्हा तो दुर्बळ होता तेव्हा-तेव्हा त्याने यहोवाचं सामर्थ्य अनुभवलं.—२ करिंथ. ४:७; १२:१०. टेहळणी बुरूज२०.०७ १५-१६ ¶७-८
शनिवार, ११ जून
जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो यांहूनही मोठी कार्यं करेल.—योहा. १४:१२.
आज प्रचाराच्या कामावर लक्ष लावणं खूप महत्त्वाचं आहे. या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. येशूने आधीच सांगितलं होतं, की त्याचे शिष्य त्याच्या मृत्यूनंतर हे काम बऱ्याच काळापर्यंत आणि खूप मोठ्या प्रमाणावर करतील. आपलं पुनरुत्थान झाल्यावर येशूने एकदा एक मोठा चमत्कार करून त्याच्या काही शिष्यांना भरपूर मासे पकडायला मदत केली. त्यानंतर त्याने या गोष्टीवर भर दिला, की दुसऱ्या कोणत्याही कामापेक्षा प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. (योहा. २१:१५-१७) स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, की त्याने सुरू केलेलं प्रचाराचं काम फक्त इस्राएल देशापर्यंत सीमित राहणार नाही, तर ते संपूर्ण जगभरात केलं जाईल. (प्रे. कार्ये १:६-८) पुढे अनेक वर्षांनंतर, येशूने प्रेषित योहानला “प्रभूच्या दिवसात” काय होईल हे एका दृष्टान्ताद्वारे सांगितलं. त्या दृष्टान्तात योहानने एक रोमांचक घटना पाहीली. ती म्हणजे: एका देवदूताकडे “प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जातीच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश होता.” (प्रकटी. १:१०; १४:६) यावरून दिसून येतं, की आज जगभरात केलं जाणारं प्रचाराचं काम संपत नाही, तोपर्यंत आपण ते करत राहावं अशी यहोवाची इच्छा आहे. टेहळणी बुरूज२०.०९ ९ ¶५
रविवार, १२ जून
विश्वासानेच, अब्राहामने, त्याची परीक्षा घेण्यात आली तेव्हा इसहाकचं जवळजवळ अर्पण केलंच होतं.—इब्री ११:१७.
अब्राहामच्या कौटुंबिक जीवनातसुद्धा काही गंभीर समस्या निर्माण झाल्या. त्याची पत्नी सारा हिला मूल होत नव्हतं. आणि या गोष्टीचं दुःख अनेक वर्षं त्यांच्या मनात होतं. आपल्याला मुलं असावीत म्हणून शेवटी साराने, आपली दासी हागार ही बायको म्हणून अब्राहामला दिली. पण आपण गरोदर आहोत हे समजल्यावर हागार साराला तुच्छ लेखू लागली. त्या दोघींमधले संबंध इतके बिघडले की शेवटी हागार घर सोडून पळून गेली. (उत्प. १६:१-६) शेवटी सारा गरोदर राहिली आणि अब्राहामपासून तिला एक मुलगा झाला. अब्राहामने त्याचं नाव इसहाक ठेवलं. अब्राहामचं आपल्या दोन्ही मुलांवर, म्हणजे हागारपासून झालेल्या इश्माएलवर आणि इसहाकवर प्रेम होतं. पण इश्माएल इसहाकला छळत होता. त्यामुळे इश्माएला आणि हागारला घरातून घालवून देण्याशिवाय अब्राहामसमोर दुसरा पर्याय उरला नाही. (उत्प. २१:९-१४) पुढे अनेक वर्षांनंतर यहोवाने अब्राहामला इसहाकचं बलिदान द्यायला सांगितलं. (उत्प. २२:१, २; इब्री ११:१७-१९) या दोन्ही परिस्थितींत अब्राहामला हा भरवसा ठेवायचा होता, की यहोवाने त्याच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत जी अभिवचनं दिली होती ती तो नक्की पूर्ण करेल. टेहळणी बुरूज२०.०८ ४ ¶९-१०
सोमवार, १३ जून
देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्तिमत्त्व धारण करा. हे व्यक्तिमत्त्व खऱ्या नीतिमत्त्वावर आणि एकनिष्ठेवर आधारित आहे.—इफिस. ४:२४.
पुनरुत्थान झालेले लोक आपलं जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकतील आणि देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जीवन जगू लागतील, तेव्हा त्यांना किती आनंद होईल याचा जरा विचार करा. जे लोक आपल्या जीवनात असे बदल करतील त्यांना नंदनवनात कायम जगण्याची संधी मिळेल. पण जे लोक आपल्या जीवनात हे बदल करणार नाहीत त्यांना देव नंदनवनातली शांती भंग करू देणार नाही. खरंतर, अशा लोकांना तो तिथे राहूच देणार नाही. (यश. ६५:२०; योहा. ५:२८, २९) देवाच्या राज्यात त्याचे सर्व लोक नीतिसूत्रे १०:२२ यात दिलेले शब्द खरे ठरताना पाहतील. तिथं म्हटलं आहे: “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांवर काम करत असल्यामुळे ते आध्यात्मिक रितीने समृद्ध होतील. म्हणजेच, त्यांचं व्यक्तिमत्त्व दिवसेंदिवस ख्रिस्तासारखं होईल आणि ते परिपूर्ण होत जातील. (योहा. १३:१५-१७; इफिस. ४:२३) दिवसेंदिवस ते सुदृढ होत जातील आणि चांगले लोक बनतील. खरंच, त्या वेळी जीवन किती सुंदर असेल!—ईयो. ३३:२५. टेहळणी बुरूज२०.०८ १७ ¶११-१२
मंगळवार, १४ जून
दुसऱ्याच्या कारभारात लुडबुड करू नका.—१ थेस्सलनी. ४:११.
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की काही ख्रिश्चनांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि इतरही असे भाऊबहीण आहेत ज्यांना लग्न तर करायचं आहे, पण त्यांना योग्य जोडीदार मिळत नसेल. तर असेही काही आहेत ज्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यामुळे ते एकटे असतील. परिस्थिती कोणतीही असो, या भाऊबहिणींना असं विचारणं योग्य ठरेल का, की ‘तुम्ही लग्न का केलं नाही?’ किंवा ‘आम्ही तुमच्यासाठी स्थळ शोधावं का?’ मदत मागितलेली नसतानाही तुम्ही त्यांना स्थळं सुचवली तर त्यांना कसं वाटेल? (१ तीम. ५:१३) आपले काही भाऊबहीण अविवाहित आहेत म्हणून त्यांची कीव करण्याऐवजी आपण त्यांच्या चांगल्या गुणांची कदर केली पाहिजे. ते विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत याबद्दल जर आपण त्यांची प्रशंसा केली, तर त्यांना किती बरं वाटेल! त्यामुळे आपल्या अविवाहित भाऊबहिणींना असं कधीच वाटणार नाही की इतरांना आपली गरज नाही. (१ करिंथ. १२:२१) उलट, मंडळीतले सगळे जण आपला आदर करतात आणि मंडळीत आपलं एक महत्त्वाचं स्थान आहे हे त्यांना जाणवेल. टेहळणी बुरूज२०.०८ २८ ¶१०; २९ ¶१४
बुधवार, १५ जून
ख्रिस्त एकाच वेळी पाचशेहून जास्त बांधवांना दिसला.—१ करिंथ. १५:६.
नंतर पुनरुत्थान झालेला येशू प्रेषित पौललाही दिसला. (१ करिंथ. १५:८) पौल (शौल) जेव्हा दिमिष्कला चालला होता, तेव्हा त्याला येशूचा आवाज ऐकू आला आणि येशू स्वर्गात असल्याचा दृष्टान्त त्याला दिसला. (प्रे. कार्यं ९:३-५) पौलने अनुभवलेल्या या घटनेमुळेही हे सिद्ध झालं, की येशूचं पुनरुत्थान झालं होतं. (प्रे. कार्यं २६:१२-१५) पौलने जी घटना अनुभवली होती आणि जिच्याबद्दल इतरांना सांगितलं, त्याकडे काहींनी नक्कीच लक्ष दिलं असेल. कारण एकेकाळी तो ख्रिश्चनांचा छळ करायचा. पण येशूचं पुनरुत्थान झालं आहे याची जेव्हा त्याला स्वतःला खातरी पटली, तेव्हा ही गोष्ट इतरांना सांगण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्याने मारहाण, तुरुंगवास आणि समुद्रावरची संकटंही सोसली. (१ करिंथ. १५:९-११; २ करिंथ. ११:२३-२७) पौलला येशूच्या पुनरुत्थानाची इतकी खातरी पटली होती, की त्याबद्दलचा प्रचार करण्यासाठी तो आपला जीवही द्यायला तयार होता. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी जी साक्ष दिली त्यावरून आपल्याला याची खातरी पटत नाही का, की येशूचं पुनरुत्थान खरंच झालं होतं? आणि यामुळे पुनरुत्थानावरची आपली आशा आणखी पक्की होत नाही का? टेहळणी बुरूज२०.१२ ३ ¶८-१०
गुरुवार, १६ जून
तुम्ही [यहोवाला] शोधलं, तर तो तुम्हाला सापडेल.—२ इति. १५:२.
आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी सभांना नियमित उपस्थित राहतो का?’ आपण सभांना जातो तेव्हा आपल्याला यहोवाची सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि भाऊबहिणींकडून उत्तेजन मिळतं. (मत्त. ११:२८) तसंच, आपण स्वतःला असंही विचारू शकतो: ‘मी प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात पुरेपूर भाग घेण्याचा प्रयत्न करतो का? मी नियमितपणे बायबलचा अभ्यास करतो का? मी दर आठवडी माझ्या कुटुंबासोबत न चुकता कौटुंबिक उपासना करतो का?’ तुम्ही जर एकटे राहत असाल, तर स्वतःला विचारा: ‘कुटुंबासोबत मिळून उपासना करण्यासाठी जशी विशिष्ट वेळ ठरवली जाते, तशी मीसुद्धा उपासना करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवली आहे का?’ आपण स्वतःला हे प्रश्न का विचारले पाहिजेत? कारण बायबल म्हणतं, की माणूस कसा विचार करतो आणि त्याच्या मनात काय चाललं आहे याचं यहोवा परीक्षण करतो. आणि तेच आपण स्वतःही केलं पाहिजे. (१ इति. २८:९) आपल्याला जर असं जाणवलं, की आपली ध्येयं, मनोवृत्ती किंवा विचारसरणी यांत काही बदल करण्याची गरज आहे, तर ते बदल करण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी स्वतःला तयार करण्याची हीच वेळ आहे. टेहळणी बुरूज२०.०९ १८-१९ ¶१९-२०
शुक्रवार, १७ जून
तुमच्यापैकी जो आपल्या सगळ्या संपत्तीकडे पाठ फिरवत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही.—लूक १४:३३.
एका व्यक्तीला शिष्य होण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे येशूने उदाहरण देऊन सांगितलं. येशूने बुरूज बांधणाऱ्या एका माणसाचं आणि युद्धावर जाणाऱ्या एका राजाचं उदाहरण दिलं. त्याने म्हटलं, की बुरूज बांधणाऱ्याने “आधी बसून खर्चाचा हिशोब” लावला पाहिजे. तरच तो ते काम पूर्ण करू शकेल. तसंच, युद्धावर जाणाऱ्या राजानेसुद्धा “याविषयी आधी बसून विचार” केला पाहिजे, की आपलं सैन्य शत्रूचा सामना करू शकेल की नाही. (लूक १४:२७-३२) या उदाहरणांमधून येशूला हेच सांगायचं होतं, की आपला शिष्य होण्यासाठी एखाद्याला कायकाय करावं लागेल याचा त्याने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. ही गोष्ट आपल्या बायबल विद्यार्थ्यांना समजावी म्हणून आपण त्यांना दर आठवडी आपल्यासोबत बायबल अभ्यास करायचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? तुम्ही एक शिक्षक, म्हणजेच बायबल अभ्यास घेणारे आहात. म्हणून अभ्यास घेण्याआधी प्रत्येक वेळी चांगली तयारी करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याला लक्षात ठेवून तुम्हाला त्याला सोप्या आणि स्पष्ट शब्दांत माहिती कशी समजावून सांगता येईल याचा विचार करा. म्हणजे विद्यार्थ्याला ती माहिती समजेल आणि ती लागू करता येईल.—नहे. ८:८; नीति. १५:२८क. टेहळणी बुरूज२०.१० ७ ¶५; ८ ¶७
शनिवार, १८ जून
म्हणून, जा आणि लोकांना शिष्य करा आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.—मत्त. २८:१९, २०.
आपण नेमकं काय केलं पाहिजे हे येशूने अगदी स्पष्टपणे सांगितलं. त्याने आज्ञा केलेल्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना शिकवल्या पाहिजेत. पण येशूच्या आज्ञेतला एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याने असं नाही म्हटलं, की ‘मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवा.’ तर त्याने असं म्हटलं, की “मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” या विशिष्ट सूचनेचं पालन करण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्याला फक्त काय करायचं एवढंच शिकवू नये, तर ते कसं करायचं हेसुद्धा समजावून सांगितलं पाहिजे. (प्रे. कार्यं ८:३१) आपण जेव्हा एखाद्यासोबत बायबलचा अभ्यास करतो तेव्हा आपण त्याला देवाच्या आज्ञा, त्याचे स्तर आणि त्याची तत्त्वं शिकवत असतो. पण तेवढंच करणं पुरेसं नाही; तर शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू कशा करायच्या हेसुद्धा आपण त्याला शिकवलं पाहिजे. (योहा. १४:१५; १ योहा. २:३) आपल्याला ते कसं करता येईल? आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण त्याला दाखवू शकतो, की शिकलेल्या गोष्टी तो शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा इतर वेळी कशा लागू करू शकतो. तुम्ही विद्यार्थ्यासोबत प्रार्थना करू शकता. आणि यहोवाने आपल्या पवित्र शक्तीद्वारे विद्यार्थ्याचं मार्गदर्शन करावं अशी विनंती तुम्ही करू शकता.—योहा. १६:१३. टेहळणी बुरूज२०.११ २-३ ¶३-५
रविवार, १९ जून
“सैन्याच्या बळाने नाही किंवा माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्तीने हे सगळं घडून येईल,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.—जख. ४:६.
येशूच्या शिष्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ, त्या काळात शास्त्रवचनांच्या खूप कमी प्रती उपलब्ध होत्या. तसंच, आजच्यासारखं त्या वेळी बायबल अभ्यासासाठी कोणतंही साहित्य नव्हतं. शिवाय, शिष्यांना वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना प्रचार करायचा होता. पण इतक्या सगळ्या समस्या असतानाही शिष्यांनी आवेशाने प्रचार केला. आणि जे काम अशक्य वाटत होतं ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी सुमारे ३० वर्षांतच “आकाशाखालच्या सबंध सृष्टीत” आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला. (कलस्सै. १:६, २३) आजच्या काळात, यहोवा त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना बळ देत आहे. तो जास्त करून, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या त्याच्या वचनातून आपलं मार्गदर्शन करत आहे. त्यात आपल्याला येशूच्या सेवाकार्याबद्दल आणि त्याने त्याच्या शिष्यांना दिलेल्या आज्ञेबद्दल वाचायला मिळतं. (मत्त. २८:१९, २०) यहोवा भेदभाव करत नाही. त्याने आधीच हे सांगितलं होतं, की आनंदाचा संदेश “प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जातीच्या लोकांना” घोषित केला जाईल. (प्रकटी. १४:६, ७) कारण राज्याचा संदेश सगळ्या लोकांना ऐकायला मिळावा अशी त्याची इच्छा आहे. टेहळणी बुरूज२०.१० २१ ¶६-८
सोमवार, २० जून
नम्र असलेल्यांना तू वाचवतोस, पण गर्विष्ठांचा विरोध करतोस.—२ शमु. २२:२८.
“यहोवाच्या नियमशास्त्रावर” राजा दावीदचं मनापासून प्रेम होतं. (स्तो. १:१-३) यहोवा गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांना वाचवतो हे दावीदला माहीत होतं. त्यामुळे त्याने देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आपल्या विचारसरणीत बदल केला. त्याने म्हटलं: “मी यहोवाची स्तुती करीन, कारण त्याने मला सल्ला दिलाय. रात्रीच्या वेळीही माझ्या मनातले खोल विचार मला मार्गदर्शन करतात.” (स्तो. १६:७) आपले विचार जर चुकीचे असतील तर वाईट कामं करायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपण नम्र असलं पाहिजे आणि देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे आपली चुकीची विचारसरणी लगेच बदलली पाहिजे. देवाचं वचन जसं काय आपल्याला आवाज देऊन म्हणतं: “योग्य मार्ग हा आहे. यावर चाला.” या मार्गावरून आपली पावलं उजवीकडे किंवा डावीकडे भरकटू लागली, तर देवाचं वचन लगेच आपल्याला सावध करतं. (यश. ३०:२१) आणि यहोवा बायबलद्वारे जे काही सांगतो, ते जर आपण ऐकलं तर आपलं भलंच होईल. (यश. ४८:१७) जसं की, दुसऱ्याला आपली चूक सुधारावी लागेल आणि आपल्याला लाज वाटेल, अशी वेळ आपण स्वतःवर येऊ देणार नाही. आणि यहोवा आपल्याला त्याची मुलं समजून प्रेमाने आपल्याला सुधारतो, या जाणिवेमुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होईल.—इब्री १२:७. टेहळणी बुरूज२०.११ २० ¶६-७
मंगळवार, २१ जून
मेलेल्यांतून उठवण्याबद्दल ऐकताच त्यांच्यापैकी काही जण त्याची थट्टा करू लागले.—प्रे. कार्यं १७:३२.
अशा विचारसरणीचा करिंथमधल्या काही ख्रिश्चनांवरही परिणाम झाला असेल. (१ करिंथ. १५:१२) शिवाय, करिंथमध्ये असेही काही जण होते जे पुनरुत्थानाचा वेगळा अर्थ काढायचे. ते कदाचित असं मानायचे, की पापी असल्यामुळे आपण “मेलेल्या अवस्थेत” असतो. पण ख्रिस्ती बनल्यानंतर आपल्या पापांची क्षमा होते आणि त्या अर्थाने आपण “जिवंत” होतो. करिंथमधले हे लोक पुनरुत्थानाची शिकवण का मानत नव्हते याचं कारण कोणतंही असो, त्यांचा विश्वास व्यर्थ होता. कारण देवाने जर येशूचं पुनरुत्थानच केलं नाही, तर याचा अर्थ असा होईल, की खंडणी बलिदानही दिलं गेलं नाही आणि आपण सगळे अजूनही पापीच आहोत. त्यामुळे ज्यांनी पुनरुत्थानाची शिकवण नाकारली, त्यांना कोणतीही आशा नव्हती. (१ करिंथ. १५:१३-१९; इब्री ९:१२, १४) प्रेषित पौलने स्वतः येशूला दृष्टान्तात पाहिलं होतं. त्यामुळे त्याला याची पक्की खातरी होती, की “ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं [होतं].” पण येशूचं पुनरुत्थान हे आधी झालेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळं होतं. कारण ज्यांचं आधी पुनरुत्थान झालं होतं, ते नंतर पुन्हा मेले. पण येशूच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्याच्याबद्दल पौल म्हणाला: “तो मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.” येशूला पहिलं फळ का म्हटलं आहे? एक कारण म्हणजे, अदृश्य शरीरात पुनरुत्थान होणारा तो पहिला होता. आणि दुसरं म्हणजे, पुनरुत्थानानंतर मानवांपैकी स्वर्गात जाणारासुद्धा तो पहिला होता.—१ करिंथ. १५:२०; प्रे. कार्यं २६:२३; १ पेत्र ३:१८, २२. टेहळणी बुरूज२०.१२ ५ ¶११-१२
बुधवार, २२ जून
प्रेषितांनी आणि वडिलांनी घेतलेले निर्णय त्यांनी बांधवांना सांगितले.—प्रे. कार्यं १६:४.
पहिल्या शतकात, देवाच्या लोकांमध्ये सुव्यवस्था आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी यरुशलेममधल्या नियमन मंडळाने एकत्र मिळून काम केलं. (प्रे. कार्ये २:४२) उदाहरणार्थ, इ.स. ४९ च्या सुमारास सुंतेचा वादविषय समोर आला तेव्हा नियमन मंडळाने काय केलं त्याचा विचार करा. त्यांनी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने एकत्र मिळून त्या विषयावर चर्चा केली. ख्रिस्ती मंडळीतला हा वाद मिटला नसता, तर प्रचाराच्या कामात अडथळा निर्माण झाला असता. नियमन मंडळावर काम करणारे प्रेषित आणि वडीलजन यहुदी होते. पण त्यांनी यहुदी परंपरेचा किंवा यहुदी शिकवणींना उत्तेजन देणाऱ्या लोकांचा आपल्या निर्णयावर परिणाम होऊ दिला नाही. उलट, ते मार्गदर्शनासाठी देवाच्या वचनावर आणि पवित्र आत्म्यावर विसंबून राहिले. (प्रे. कार्ये १५:१, २, ५-२०, २८) याचा काय परिणाम झाला? यहोवाने त्यांच्या निर्णयावर आशीर्वाद दिला, बांधवांमधली शांती आणि एकी टिकून राहिली आणि प्रचाराचं काम वाढत गेलं. (प्रे. कार्ये १५:३०, ३१; १६:४, ५) आजच्या काळातसुद्धा, यहोवाच्या संघटनेने त्याच्या लोकांना सुव्यवस्था आणि शांती टिकवून ठेवायला मदत केली आहे. टेहळणी बुरूज२०.१० २२-२३ ¶११-१२
गुरुवार, २३ जून
देवाने माझ्या मुलाला, शलमोनला निवडलंय.—१ इति. २९:१.
कधीकधी आपल्याला यहोवाच्या सेवेत हवी असलेली नेमणूक मिळत नाही. याची बरीच कारणं असू शकतात; जसं की, वाढतं वय, आरोग्याच्या समस्या किंवा दुसरं काही कारण. आपल्या बाबतीत कधी असं घडलं तर दावीद राजाच्या उदाहरणातून आपण बरंच काही शिकू शकतो. देवाचं मंदिर बांधायची दावीदची मनापासून इच्छा होती. पण त्यासाठी यहोवाने दुसऱ्याची निवड केली. दावीदला हे कळलं तेव्हा यहोवाने ज्याची निवड केली होती, त्याला दावीदने पूर्ण पाठिंबा दिला. मंदिराच्या बांधकामासाठी त्याने खूप मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी दिली. खरंच, दावीदचं किती छान उदाहरण आपल्यासमोर आहे! (२ शमु. ७:१२, १३; १ इति. २९:३-५) फ्रान्समध्ये राहणाऱ्या ह्यूग नावाच्या भावाचा विचार करा. ते मंडळीत वडील म्हणून सेवा करत होते. पण आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना आपली जबाबदारी सोडून द्यावी लागली. आजारामुळे घरातली छोटीछोटी कामंसुद्धा ते करू शकत नव्हते. ते म्हणतात: “सुरुवातीला मी खूप निराश झालो आणि आपण काहीच कामाचे नाहीत असं मला वाटायचं. पण काही काळानंतर माझ्या लक्षात आलं, की ज्या गोष्टी आपण आता करू शकत नाही त्यांबद्दल दुःख करत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी यहोवाच्या सेवेत आपल्याला जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि तेच मी केलं. त्यामुळे मी आनंदी राहू शकलो. गिदोन आणि त्याच्यासोबतचे तिनशे पुरुष खूप दमले होते, पण तरीसुद्धा ते लढत राहिले. त्यांच्यासारखंच मीसुद्धा शेवटपर्यंत लढत राहीन!”—शास्ते ८:४. टेहळणी बुरूज२०.१२ २५ ¶१४-१५
शुक्रवार, २४ जून
एकमेकांवर प्रेम करत राहा.—१ योहा. ४:७.
आपल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकात प्रेषित योहानने अनेकदा प्रेमाचा उल्लेख केला. शुभवर्तमान लिहिणारे मत्तय, मार्क आणि लूक या तिघांनी मिळूनसुद्धा केला नाही, इतक्या वेळा त्याने प्रेमाचा उल्लेख केला. या पुस्तकांतून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपण जे काही करतो ते प्रेमापोटी केलं पाहिजे. (१ योहा. ४:१०, ११) ही गोष्ट शिकायला मात्र योहानला वेळ लागला. असं का म्हणता येईल याची काही उदाहरणं आपण पाहू या. तरुण असताना योहान नेहमीच इतरांशी प्रेमाने वागला असं नाही. एकदा येशू आणि त्याचे शिष्य शोमरोनमधून यरुशलेमला चालले होते. पण तिथल्या एका गावातल्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं नाही. तेव्हा योहानने स्वर्गातून आग बोलावून त्यांचा नाश करून टाकायच्या गोष्टी केल्या. (लूक ९:५२-५६) आणखी एका प्रसंगी योहान आणि याकोबच्या आईने आपल्या मुलांना देवाच्या राज्यात मानाचं स्थान द्यायची विनंती येशूकडे केली. असं दिसतं की योहान आणि योकोबच्या सांगण्यावरूनच तिने ती विनंती केली होती. ही गोष्ट जेव्हा इतर प्रेषितांना कळली तेव्हा ते त्या दोघांवर खूप चिडले. (मत्त. २०:२०, २१, २४) अशा प्रकारे योहान अनेकदा चुकला, पण तरीसुद्धा येशूचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही.—योहा. २१:७. टेहळणी बुरूज२१.०१ ८-९ ¶३-४
शनिवार, २५ जून
ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही.—रोम. १५:३.
यहोवाचे निर्णय नेहमी असे असतात ज्यांमुळे इतरांचं भलं होतं. उदाहरणार्थ, त्याने आपल्याला स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलं नाही. तर त्याच्यासारखंच आपल्यालाही जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून त्याने आपल्याला बनवलं. तसंच, आपल्याला पापाची क्षमा मिळावी म्हणून त्याने आपल्या मुलाचं बलिदान दिलं. हे करण्यासाठी कोणीही त्याला जबरदस्ती केली नव्हती. पण आपल्या भल्यासाठी त्याने स्वतःहून ही व्यवस्था केली. येशूनेही नेहमी असे निर्णय घेतले ज्यांमुळे इतरांचं भलं झालं. उदाहरणार्थ, एकदा येशू खूप थकला होता. त्याला आरामाची खूप गरज होती. पण आराम करण्याऐवजी त्याने लोकांना शिकवलं. (मार्क ६:३१-३४) कुटुंबातल्या सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेणं खूप मोठी जबाबदारी आहे हे एका चांगल्या कुटुंबप्रमुखाला माहीत असतं. आणि तो ही जबाबदारी गंभीरपणे घेतो. आपल्या कुटुंबासाठी निर्णय घेताना तो मागचा-पुढचा विचार न करता किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. याउलट, चांगले निर्णय घेण्यासाठी तो यहोवाच्या बुद्धीवर विसंबून राहतो. (नीति. २:६, ७) असं करून तो दाखवतो, की निर्णय घेताना तो स्वतःचा नाही, तर दुसऱ्यांचा विचार करतो. (फिलिप्पै. २:४) जर एका कुटुंबप्रमुखाने यहोवा आणि येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, तर तो नक्कीच एक चांगला कुटुंबप्रमुख बनेल. टेहळणी बुरूज२१.०२ ७ ¶१९-२१
रविवार, २६ जून
आसाने आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि योग्य तेच केलं.—२ इति. १४:२.
तरुण असताना आसा राजा नम्र आणि धाडसी होता. उदाहरणार्थ, आपल्या वडिलांनंतर तो राजा बनला तेव्हा त्याने देशातून सगळ्या मूर्ती काढून टाकायला सुरुवात केली. त्यासोबतच “त्याने यहूदाच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या देवाची, यहोवाची उपासना करायला आणि त्याच्या आज्ञा व नियमशास्त्र पाळायला सांगितलं.” (२ इति. १४:१-७) एकदा इथियोपियाचा जेरह दहा लाख सैनिक घेऊन यहूदावर हल्ला करायला आला तेव्हा आसाने यहोवाकडे मदत मागितली. त्याने अशी प्रार्थना केली: “हे यहोवा! तू कोणालाही मदत करू शकतोस, मग ते शक्तिशाली असोत किंवा कमजोर असोत. हे आमच्या देवा यहोवा! आम्हाला मदत कर, कारण आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवलाय.” आसाच्या या सुंदर शब्दांवरून दिसून येतं, की आपल्याला आणि आपल्या लोकांना वाचवण्याची शक्ती यहोवाकडे आहे यावर त्याला पूर्ण भरवसा होता. आणि म्हणूनच यहोवानेही “इथोपियाच्या सैन्याचा पराभव केला.” (२ इति. १४:८-१२) दहा लाख सैनिकांचा सामना करणं काही सोपं नव्हतं. पण यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आसा त्यांच्यावर विजय मिळवू शकला. टेहळणी बुरूज२१.०३ ५ ¶१२-१३
सोमवार, २७ जून
एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा.—रोम. १२:१०.
आपुलकी दाखवणाऱ्या कितीतरी लोकांची उदाहरणं बायबलमध्ये दिली आहेत. त्यातलंच एक उदाहरण योनाथान आणि दावीद यांचं आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल बायबल म्हणतं: “योनाथान व दावीद यांच्यात घट्ट मैत्री जुळली. योनाथान दावीदवर जिवापाड प्रेम करू लागला.” (१ शमु. १८:१) शौलच्या जागी राजा म्हणून दावीदचा अभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे शौल दावीदची ईर्ष्या करू लागला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करू लागला. पण शौलच्या मुलाने, म्हणजे योनाथानने दावीदला मारून टाकण्यासाठी आपल्या वडिलांना मुळीच साथ दिली नाही. उलट, योनाथान आणि दावीद यांनी आपली मैत्री टिकवून ठेवायची आणि एकमेकांना साथ द्यायची शपथ घेतली. (१ शमु. २०:४२) योनाथान आणि दावीद यांच्या मैत्रीच्या आड खरंतर बऱ्याच गोष्टी येऊ शकल्या असत्या. जसं की, त्या दोघांमध्ये वयाचं खूप अंतर होतं. योनाथान दावीदपेक्षा जवळजवळ तीस वर्षांनी मोठा होता. त्यामुळे तो असा विचार करू शकला असता, की ‘आपल्यात आणि दावीदमध्ये काहीच सारखं नाही. दावीद आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे. शिवाय त्याला अनुभवही कमी आहे. अशा व्यक्तीशी आपण कशी काय मैत्री करू शकतो?’ पण योनाथानने तसा विचार केला नाही. उलट, दावीदबद्दल त्याला खूप आदर होता. टेहळणी बुरूज२१.०१ २१-२२ ¶६-७
मंगळवार, २८ जून
माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना.—याको. १:२.
येशूने म्हटलं होतं, की जे त्याचे शिष्य बनतील ते खऱ्या अर्थाने आनंदी असतील. पण त्याच वेळी, त्यांना परीक्षांचा सामना करावा लागेल हेसुद्धा त्याने त्यांना सांगितलं होतं. (मत्त. १०:२२, २३; लूक ६:२०-२३) आपण येशूचे शिष्य आहोत याचा आपल्याला आनंद आहे. पण जर आपल्या घरातल्या लोकांनी आपला विरोध केला, सरकारने छळ केला आणि कामावर किंवा शाळेत इतरांनी आपल्यावर चुकीच्या गोष्टी करायचा दबाव आणला तर काय? त्या विचारांनी आपल्याला कदाचित भीती वाटू शकते. छळ किंवा विरोध होतो तेव्हा लोकांना सहसा आनंद होत नाही. पण बायबल आपल्याला सांगतं, की आपला छळ होतो तेव्हा आपण आनंदी असलं पाहिजे. उदाहरणार्थ, याकोबने आपल्या पुस्तकात असं लिहिलं, की संकटांचा सामना करत असताना आपण निराश होऊ नये, तर आनंदी असावं. (याको. १:२, १२) येशूनेही म्हटलं, की आपला छळ होतो तेव्हा आपण आनंदी असलं पाहिजे. (मत्त. ५:११) याकोबने यहोवाच्या प्रेरणेने आपल्या पत्रात ख्रिश्चनांना काही व्यावहारिक सल्ले दिले. त्या सल्ल्यांमुळे परीक्षांचा सामना करत असतानाही त्यांना आनंदी राहायला मदत होणार होती. टेहळणी बुरूज२१.०२ २६ ¶१-२; २७ ¶५
बुधवार, २९ जून
पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्या पोकळ संभाषणांपासून दूर राहा.—१ तीम. ६:२०.
तीमथ्यच्या काळातल्या काही ख्रिश्चनांना देवासोबत मिळून काम करण्याचा जो मोठा बहुमान मिळाला होता, त्याची त्यांनी कदर केली नाही. उदाहरणार्थ, देमास, फुगल, हर्मगनेस, हुमनाय, आलेक्सांद्र आणि फिलेत. (१ तीम. १:१९, २०; २ तीम. १:१५; २:१६-१८; ४:१०) हे सगळे एकेकाळी आध्यात्मिक रित्या मजबूत होते. पण देवाने त्यांना ज्या मौल्यवान गोष्टी दिल्या होत्या त्यांबद्दल त्यांना कदर राहिली नाही. यहोवाकडून मिळालेल्या मौल्यवान गोष्टी आपण सोडून द्याव्यात यासाठी सैतान काय करतो? तो काही युक्त्या वापरतो. जसं की टीव्ही, चित्रपट, इंटरनेट, पुस्तकं, वृत्तपत्रं आणि मासिकं यांसारख्या गोष्टींचा तो वापर करतो. यांचा वापर करून तो आपल्याला असा विचार करायला किंवा वागायला लावतो ज्यामुळे आपण यहोवाच्या आज्ञा मोडू आणि हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ. तसंच, आपण प्रचार करायचं सोडून द्यावं म्हणून तो लोकांकडून येणाऱ्या दबावाची आणि छळाची भीती आपल्या मनात घालतो. याशिवाय, आपण सत्य सोडून द्यावं, म्हणून धर्मत्यागी लोकांच्या शिकवणी ऐकायची भुरळही तो आपल्याला घालतो. आपण जर सावध राहिलो नाही, तर आपण हळूहळू सत्यापासून दूर जाऊ.—१ तीम. ६:२१. टेहळणी बुरूज२०.०९ २७ ¶६-८
गुरुवार, ३० जून
यहोवा माझी कृपेची याचना ऐकेल; यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल.—स्तो. ६:९.
तुमच्या एखाद्या मित्राने किंवा कुटुंबातल्या सदस्याने तुमचा विश्वासघात केला आहे का? असेल, तर दावीद राजाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. (२ शमु. १५:५-१४, ३१; १८:६-१४) दावीदचा हा अहवाल लक्षात ठेवून यहोवाला प्रार्थना करा. आणि तुमच्यासोबत जे घडलं त्याबद्दल तुम्हाला नेमकं कसं वाटतं ते यहोवाला स्पष्टपणे सांगा. (स्तो. ६:६-८) या सगळ्या गोष्टींमुळे दावीदला कसं वाटत असेल याची कल्पना करा. त्याचं अबशालोमवर जिवापाड प्रेम होतं आणि अहिथोफेलवर खूप विश्वास होता. पण या दोघांनी त्याचा विश्वासघात केला आणि त्याचं मन दुखावलं. इतकंच नाही, तर त्यांनी त्याला मारून टाकायचाही प्रयत्न केला. आपले बाकीचे मित्रंही त्याला मिळाले असतील असा विचार करून दावीदचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असता. आणि त्याला हवं असतं तर तो फक्त स्वतःचा विचार करून एकटाच देशातून पळून जाऊ शकला असता. किंवा तो पूर्णपणे निराश होऊ शकला असता. पण असं काहीच त्याने केलं नाही. उलट, त्याने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्या मित्रांची मदत घेतली. शिवाय, घेतलेल्या निर्णयांप्रमाणे त्याने लगेच काम केलं. त्याने यहोवावर आणि आपल्या मित्रांवर भरवसा ठेवला. टेहळणी बुरूज२१.०३ १५ ¶७-८; १७ ¶१०-११