मे
रविवार, १ मे
तो त्यांच्या आज्ञेत राहिला.—लूक २:५१.
लहान असताना येशूने आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहायची निवड केली. आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्याला जास्त माहीत आहे, असा विचार करून त्याने कधीच त्यांचं म्हणणं टाळलं नाही. कुटुंबातला मोठा मुलगा असल्यामुळे साहजिकच त्याच्यावर काही जबाबदाऱ्या आल्या. त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याने खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या. जसं की, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता याव्यात, म्हणून त्याने आपल्या वडिलांकडून सुतारकाम शिकून घेतलं. येशूचा जन्म किती अद्भुत रीतीने झाला होता आणि त्याच्याबद्दल देवाचा संदेश सांगणाऱ्यांनी काय म्हटलं होतं, हे सगळं त्याच्या पालकांनी नक्कीच त्याला सांगितलं असेल. (लूक २:८-१९, २५-३८) पण येशूने तेवढ्यावरच समाधान मानलं नाही. त्याने स्वतःसुद्धा शास्त्रवचनांचा अभ्यास केला. तो देवाच्या वचनाचा चांगला अभ्यास करायचा असं आपण का म्हणू शकतो? कारण बायबल म्हणतं, की तो फक्त १२ वर्षांचा होता तेव्हा यरुशलेममधले धर्मगुरू “त्याच्या समजबुद्धीमुळे आणि त्याच्या उत्तरांमुळे अगदी थक्क झाले होते.” (लूक २:४६, ४७) आणि इतक्या लहान वयात त्याने स्वतःला याची खातरी पटवून दिली होती, की यहोवाच त्याचा पिता आहे.—लूक २:४२, ४३, ४९. टेहळणी बुरूज२०.१० २९-३० ¶१३-१४
सोमवार, २ मे
ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला.—१ करिंथ. १५:१२.
येशूचं पुनरुत्थान झालं होतं या गोष्टीवरच्या विश्वासावरच खरंतर आपली आशा आधारित आहे. पुनरुत्थाबद्दल लिहिताना प्रेषित पौलने खरोखर घडलेल्या तीन घटनांचा सुरुवातीला उल्लेख केला: (१) “ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला.” (२) “त्याला पुरण्यात आलं.” (३) “शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, तिसऱ्या दिवशी त्याला उठवण्यात आलं.” (१ करिंथ. १५:३, ४) मसीहाबद्दल यशया संदेष्ट्याने आधीच सांगितलं होतं, की “त्याला जिवंतांच्या देशातून छाटून टाकण्यात” येईल, आणि “दुष्टांच्या कबरेत त्याची कबर नेमण्यात” येईल. पण याशिवाय आणखी एक गोष्ट घडणार होती. त्याबद्दल यशयाने पुढे म्हटलं, की मसीहा “अनेकांच्या पापांचं ओझं” वाहील. येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं तेव्हा त्याने आपल्या पापांचं ओझं वाहिलं. (यश. ५३:८, ९, १२; मत्त. २०:२८; रोम. ५:८) तर मग येशूचा मृत्यू होणं, त्याला पुरलं जाणं आणि त्याला उठवलं जाणं या गोष्टींमुळे आपल्याला कोणती आशा मिळते? पाप आणि मृत्यूतून सुटका मिळण्याची आशा, आणि आपली जी जवळची माणसं आज आपल्यात नाहीत त्यांना पुन्हा भेटण्याची आशा. टेहळणी बुरूज२०.१२ २-३ ¶४-६; ५ ¶११
मंगळवार, ३ मे
शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवायला कोणाजवळ कारण असेल, तर ते माझ्याजवळ आहे. जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल, की त्याच्याजवळ शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवायचं कारण आहे, तर माझ्याकडे आणखी जास्त कारणं आहेत.—फिलिप्पै. ३:४.
प्रेषित पौल सहसा यहुदी सभास्थानात जाऊन प्रचार करायचा. उदाहरणार्थ, थेस्सलनीका इथल्या सभास्थानात असताना “तीन शब्बाथ तो [यहुदी लोकांशी] शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला.” (प्रे. कार्ये १७:१, २) पौल आत्मविश्वासाने सभास्थानात बोलायचा. तो स्वतः एक यहुदी होता. (प्रे. कार्ये २६:४, ५) आणि म्हणून तो यहुदी लोकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत होता. त्यामुळे तो त्यांना आत्मविश्वासाने प्रचार करू शकला. (फिलिप्पै. ३:५) छळ करणाऱ्यांच्या दबावामुळे पौलला आधी थेस्सलनीका आणि मग बिरुया ही ठिकाणं सोडावी लागली. नंतर तो अथेन्स इथे आला. मग तो परत “सभास्थानात यहुद्यांशी व देवाची उपासना करणाऱ्या इतर लोकांशी . . . तर्क करू लागला.” (प्रे. कार्ये १७:१७) पण नंतर बाजारात प्रचार करताना पौलला वेगळे लोक भेटले. हे लोक सभास्थानातल्या लोकांसारखे नव्हते. त्यांपैकी काही तत्त्वज्ञानी तर इतर काही विदेशी लोक होते. त्यांना पौलचा संदेश ही “नवीन शिकवण” वाटली. त्यांनी त्याला म्हटलं: “आम्ही कधीच ऐकल्या नव्हत्या अशा गोष्टी तू आम्हाला सांगत आहेस.”—प्रे. कार्ये १७:१८-२०. टेहळणी बुरूज२०.०४ ९ ¶५-६
बुधवार, ४ मे
योग्य ते करायची माझी इच्छा असते, तेव्हा मला स्वतःमध्ये वाईटच दिसतं.—रोम. ७:२१.
एखाद्या कमतरतेवर मात करण्यासाठी जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल, तर निराश होऊ नका, स्वतःला दोष देऊ नका. हे नेहमी लक्षात ठेवा, की आपल्यापैकी कोणीही स्वतःच्या बळावर यहोवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकत नाही. आपल्या सगळ्यांनाच यहोवाच्या अपार कृपेची गरज आहे आणि ती आपल्याला खंडणी बलिदानामुळेच मिळू शकते. (इफिस. १:७; १ योहा. ४:१०) तसंच, आपण मंडळीतल्या भाऊबहिणींची मदत घेऊ शकतो. आपण जेव्हा निराश असतो तेव्हा आपण आपल्या भाऊबहिणींकडे आपलं मन मोकळं करू शकतो. ते धीराने आपलं ऐकतील आणि दिलासा देणाऱ्या त्यांच्या शब्दांमुळे आपल्याला बरं वाटेल. (नीति. १२:२५; १ थेस्सलनी. ५:१४) नायजीरियामध्ये राहणाऱ्या जॉय नावाच्या एका बहिणीनेसुद्धा निराशेवर मात केली. ती म्हणते: “भाऊबहीण नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. त्यांनी मला खूप बळ दिलं आणि त्यांच्याद्वारेच यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. निराशेत असलेल्या व्यक्तीला धीर कसा द्यायचा हेसुद्धा मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं.” पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, आपल्याला प्रोत्साहनाची गरज कधी आहे हे नेहमीच आपल्या भाऊबहिणींना कळणार नाही. त्यामुळे आपण स्वतःहून एखाद्या अनुभवी भावाशी किंवा बहिणीशी बोललं पाहिजे आणि त्यांची मदत घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज२०.१२ २३-२४ ¶७-८
गुरुवार, ५ मे
मी तर तुम्हाला मित्र म्हटलंय.—योहा. १५:१५.
कोणासोबतही घनिष्ठ मैत्री करण्याचं पहिलं पाऊल म्हणजे त्याच्यासोबत वेळ घालवणं. तुम्ही एकमेकांशी बोलता, एकमेकांना आपले विचार आणि अनुभव सांगता तेव्हा तुमच्यात मैत्री होते. पण येशूसोबत जवळची मैत्री करणं आपल्याला काही अडथळ्यांमुळे कठीण जाऊ शकतं. एक म्हणजे आपण त्याला कधीच भेटलो नाही. पहिल्या शतकातल्या बऱ्याच ख्रिश्चनांना याच अडथळ्याचा सामना करावा लागला. असं असलं तरी प्रेषित पेत्रने म्हटलं: “तुम्ही ख्रिस्ताला कधीच पाहिलेले नसूनही तुमचे त्याच्यावर प्रेम आहे. आता जरी तुम्हाला तो दिसत नसला, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता.” (१ पेत्र १:८) तेव्हा, जरी आपण येशूला कधी भेटलो नसलो तरी आपण त्याचे चांगले मित्र बनू शकतो. तसंच, आपण येशूसोबत बोलू शकत नाही. कारण प्रार्थना करताना आपण यहोवाशी बोलतो. हे खरं आहे, की आपण येशूच्या नावाने प्रार्थना करतो पण आपण त्याच्याशी बोलत नाही. आणि आपण त्याला प्रार्थना करावी अशी त्याची इच्छाही नाही. पण का? कारण प्रार्थना हा उपासनेचा भाग आहे आणि आपण उपासना फक्त यहोवाचीच केली पाहिजे. (मत्त. ४:१०) असं असलं तरी आपण येशूवर प्रेम करू शकतो. टेहळणी बुरूज२०.०४ २० ¶१-३
शुक्रवार, ६ मे
देव तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल.—१ पेत्र ५:१०.
खरोखरच्या शर्यतीत धावणाऱ्यांना थकवा आणि शारीरिक वेदना यांसारख्या आव्हानांवर मात करावी लागते. पण यासाठी त्यांना फक्त आपल्या प्रशिक्षणावर आणि ताकदीवर अवलंबून राहावं लागतं. खरंतर, त्या धावकांप्रमाणेच आपल्यालाही जीवनाच्या शर्यतीत धावण्यासाठी प्रशिक्षण मिळतं. पण आपल्याजवळ आणखीन एक अशी गोष्ट आहे जी त्यांच्याकडे नाही. ती म्हणजे, यहोवाकडून मिळणारं अमर्याद सामर्थ्य. आपण यहोवावर अवलंबून राहिलो, तर तो वचन देतो की तो आपल्याला प्रशिक्षणासोबतच ताकदही देईल! प्रेषित पौललाही पुष्कळ आव्हानांचा सामना करावा लागला. जसं की, त्याला बऱ्याच वेळा अपमान आणि छळ सहन करावा लागला. यासोबतच, आपण कमजोर आहोत असं कधीकधी त्याला वाटायचं. शिवाय, त्याला अशा एका समस्येचा सामना करावा लागला, जिला त्याने ‘शरीरातला काटा’ म्हटलं. (२ करिंथ. १२:७) पण अशा प्रकारची आव्हानं आली, तेव्हा हार मानण्याऐवजी, ही यहोवावर अवलंबून राहण्याची संधी आहे असा त्याने विचार केला. (२ करिंथ. १२:९, १०) अशी मनोवृत्ती ठेवल्यामुळे यहोवाने त्याला सगळ्या परीक्षांचा यशस्वीपणे सामना करायला मदत केली. टेहळणी बुरूज२०.०४ २९ ¶१३-१४
शनिवार, ७ मे
पित्याने आणल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.—योहा. ६:४४.
आपल्याला एक न दिसणारी मौल्यवान देणगी मिळाली आहे. ती म्हणजे, यहोवा, येशू आणि स्वर्गदूत यांच्यासोबत काम करण्याची संधी. (२ करिंथ. ६:१) आपण सेवाकार्य करण्याद्वारे त्यांच्यासोबत काम करत असतो. पौलने स्वतःबद्दल आणि जे या कामात भाग घेतात त्यांच्याबद्दल म्हटलं: “आपण देवाचे सहकारी आहोत.” (१ करिंथ. ३:९) सेवाकार्यात भाग घेतल्याने आपण येशूचेही सहकारी बनतो. असं आपण का म्हणू शकतो? कारण येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना आज्ञा दिली, की “सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा” तेव्हा त्याने हेही म्हटलं होतं की “मी नेहमी तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:१९, २०) स्वर्गदूतांबद्दल काय? तेही आपल्यासोबत काम करत आहेत का? आपण जेव्हा “पृथ्वीवर राहणाऱ्यांना . . . सर्वकाळाचा आनंदाचा संदेश” सांगतो तेव्हा स्वर्गदूत आपलं मार्गदर्शन करत असतात. (प्रकटी. १४:६) या मदतीमुळे आपल्याला काय करणं शक्य झालं आहे? प्रचारकार्यामुळे राज्याचं बी काही चांगल्या मनाच्या लोकांमध्ये रुजत आहे आणि ते वाढत आहे. (मत्त. १३:१८, २३) सत्याचं बी कोणामुळे वाढत आहे आणि फलदायी बनत आहे? याचं उत्तर येशू आजच्या वचनात देतो. टेहळणी बुरूज२०.०५ ३० ¶१४-१५
रविवार, ८ मे
यापुढे या जगाच्या व्यवस्थेचं अनुकरण करू नका.—रोम. १२:२.
आज घटस्फोटामुळे लाखो कुटुंबं विस्कटली आहेत. एका घरात राहणारी माणसंसुद्धा एकमेकांशी परक्यांसारखी वागतात. याबद्दल एका कुटुंब-सल्लागाराने असं म्हटलं: “कुटुंबातला प्रत्येक जण एकमेकांशी बोलण्याऐवजी कंप्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतो; किंवा मग, व्हिडिओ गेम्स खेळण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे एका छताखाली राहूनसुद्धा ते एकमेकांना नीट ओळखत नाहीत.” एकमेकांवर प्रेम न करणाऱ्या जगातल्या लोकांसारखं आपल्याला व्हायचं नाही. याउलट, आपल्या कुटुंबातल्या लोकांबद्दल आणि मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला आपुलकी असली पाहिजे. (रोम. १२:१०) आपुलकी म्हणजे, कुटुंबातल्या लोकांबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि आपलेपणा. असाच जिव्हाळा आणि आपलेपणा मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दलही आपल्याला वाटला पाहिजे. आपण अशी आपुलकी दाखवतो तेव्हा मंडळीतली एकता टिकवून राहते.—मीखा २:१२. टेहळणी बुरूज२१.०१ २० ¶१-२
सोमवार, ९ मे
मला तुझ्या नावाचं एकाग्र मनाने भय बाळगायला शिकव.—स्तो. ८६:११; तळटीप.
ज्या स्पोर्ट्स टीममध्ये एकी असते तिची मॅच जिंकण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या इच्छा, विचार यहोवाची सेवा करण्यावर एकाग्र असतील, तर तुमचं मन त्या यशस्वी टीमसारखं असू शकतं. पण तुमचं मन एकाग्र असावं अशी सैतानाची मुळीच इच्छा नाही. उलट त्याची अशी इच्छा आहे की तुमचे विचार, इच्छा आणि भावना या यहोवाच्या स्तरांच्या विरोधात असाव्यात. पण यहोवाची सेवा करायची असेल तर आपलं मन एकाग्र किंवा पूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे. (मत्त. २२:३६-३८) तेव्हा सैतानाला तुमचं मन विभाजित करू देऊ नका! दावीदप्रमाणे तुम्हीसुद्धा यहोवाला अशी प्रार्थना करू शकता: “मला तुझ्या नावाचं एकाग्र मनाने भय बाळगायला शिकव.” आणि या प्रार्थनेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. देवाच्या नावाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही दररोज जे काही निर्णय घ्याल, मग ते लहान असोत किंवा मोठे त्यांवरून हे दाखवून द्या की तुम्हाला यहोवाच्या पवित्र नावाबद्दल गाढ आदर आणि भय आहे. यामुळे यहोवाच्या नावाचा गौरवच होईल. (नीति. २७:११) मग मीखा संदेष्ट्याप्रमाणेच आपल्यालाही असं म्हणता येईल: “आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालत जाऊ.”—मीखा ४:५, पं.र.भा. टेहळणी बुरूज२०.०६ १३ ¶१७-१८
मंगळवार, १० मे
अनेकांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी तो मोठ्या संतापाने निघेल.—दानी. ११:४४.
उत्तरेचा राजा आणि जगातली इतर सरकारं जेव्हा देवाच्या लोकांवर हल्ला करतील तेव्हा सर्वशक्तिमान देवाचा क्रोध भडकेल आणि यामुळे हर्मगिदोनचं युद्ध सुरू होईल. (प्रकटी. १६:१४, १६) त्या वेळी मागोगचा गोग, जो उत्तरेचा राजा आणि इतर राष्ट्रांनी मिळून बनलेला आहे याचा शेवट होईल आणि त्याला कोणी “साहाय्य करणार नाही. (दानी. ११:४५) उत्तरेचा राजा आणि इतर सरकारं यांचा नाश कसा होईल आणि आपल्याला कसं वाचवलं जाईल यांबद्दल दानीएल १२:१ यात सांगितलं आहे. या वचनाचा काय अर्थ होतो? मीखाएल हे नाव स्वर्गात राज्य करणाऱ्या आपल्या राजाचं, म्हणजेच येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे. स्वर्गात १९१४ या वर्षी देवाचं राज्य स्थापन झाल्यापासून तो देवाच्या लोकांच्या वतीने “उभा” आहे. लवकरच तो आणखी एका अर्थाने, “उभा” राहील. हर्मगिदोनच्या युद्धात देवाच्या शत्रूंचा नाश करून तो असं करेल. दानीएलच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे की असा “कष्टाचा समय” येईल जो इतिहासात कधीच आला नाही.—प्रकटी. ६:२; ७:१४. टेहळणी बुरूज२०.०५ १५ ¶१५-१७
बुधवार, ११ मे
इश्माएली लोक योसेफला इजिप्तला घेऊन आले.—उत्प. ३९:१.
इजिप्तमध्ये एक गुलाम असल्यामुळे आणि नंतर कैदेत असल्यामुळे योसेफ आपली परिस्थिती बदलण्यासाठी काहीच करू शकत नव्हता. मग निराश करणाऱ्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याने काय केलं? आपण काय करू शकत नाही यावर तो विचार करत बसला नाही; तर दिलेली कामं तो प्रामाणिकपणे करत राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करण्याचा त्याने नेहमी प्रयत्न केला. त्यामुळे योसेफ जे काही करायचा त्यावर यहोवाचा आशीर्वाद असायचा. (उत्प. ३९:२१-२३) योसेफच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं, की आजचं जग काही वेगळं नाही. ते खूप वाईट आहे आणि लोक आपल्याशी अन्यायाने वागू शकतात. मंडळीतली एखादी व्यक्तीसुद्धा आपलं मन दुखावू शकते. पण यहोवा आपला मजबूत खडक आणि आश्रय आहे हे जर आपण लक्षात ठेवलं, तर आपण कधीच निराश होणार नाही आणि यहोवाची सेवा करायचं सोडून देणार नाही. (स्तो. ६२:६, ७; १ पेत्र ५:१०) शिवाय, आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की योसेफ जेव्हा फक्त सतराएक वर्षांचा होता तेव्हा यहोवाने त्याला ती स्वप्नं दाखवली होती. यावरून दिसून येतं, की यहोवाचा त्याच्या तरुण सेवकांवर खूप भरवसा आहे. आज अनेक तरुण योसेफसारखेच आहेत; त्यांचाही यहोवावर मजबूत विश्वास आहे. यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे काहींना तर अन्याय सोसावा लागला आणि तुरुंगातही जावं लागलं.—स्तो. ११०:३. टेहळणी बुरूज२०.१२ १६ ¶३; १७ ¶५, ७
गुरुवार, १२ मे
त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना फटके मारले आणि येशूच्या नावाने न बोलण्याची त्यांना आज्ञा दिली.—प्रे. कार्यं ५:४०.
प्रेषित पेत्र आणि योहान यांनी येशूबद्दल शिकवल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला. पण ही गोष्ट त्यांनी सन्मानाची समजली. (प्रे. कार्ये ४:१८-२१; ५:२७-२९,४१,४२) त्यांचा अपमान करण्यात आला तेव्हा त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही. विरोधकांच्या तुलनेत पाहिलं तर त्या नम्र ख्रिश्चनांनी मानवजातीच्या भल्यासाठी खूप काही केलं होतं. जसं की, त्यांच्यापैकी काहींनी देवाच्या प्रेरणेने बायबलची पुस्तकं लिहिली. आणि या पुस्तकांमुळे आजही लाखो लोकांना मदत आणि आशा मिळत आहे. तसंच, ज्या राज्याबद्दल त्यांनी प्रचार केला होता ते स्वर्गात स्थापित झालं आहे, आणि लवकरच ते संपूर्ण मानवजातीवर राज्य करेल. (मत्त. २४:१४) याउलट, प्राचीन काळातल्या ज्या शक्तिशाली रोमी सरकारने ख्रिश्चनांचा छळ केला होता त्याचं अस्तित्व केव्हाच मिटून गेलं आहे. तसंच, ज्या विश्वासू ख्रिश्चनांचा छळ करण्यात आला होता ते आज स्वर्गात राजे म्हणून राज्य करत आहेत. पण त्यांच्या विरोधकांचा मात्र मृत्यू झाला आहे. आणि भविष्यात जरी त्यांचं पुनरुत्थान झालं तरी त्यांना त्याच राज्याच्या अधिकाराखाली राहावं लागेल ज्याचा त्यांनी विरोध केला होता.—प्रकटी. ५:१०. टेहळणी बुरूज२०.०७ १५ ¶४
शुक्रवार, १३ मे
खरा पाया असलेल्या अशा शहराची अब्राहाम वाट पाहत होता, ज्याची रचना आणि बांधकाम करणारा देव आहे.—इब्री ११:१०.
देवाच्या अभिवचनांवर अब्राहामचा इतका विश्वास होता, की जो देवाच्या राज्याचा राजा होणार होता, त्या अभिषिक्ताला किंवा मसीहाला तो जणू प्रत्यक्ष पाहू शकत होता. आणि म्हणूनच येशू त्याच्या काळातल्या यहुद्यांना असं म्हणाला: “तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या आशेने खूप आनंदित झाला आणि त्याने तो पाहिला व त्याला आनंद झाला.” (योहा. ८:५६) यावरून एक गोष्ट स्पष्ट होते; ती म्हणजे, अब्राहामला हे पक्कं माहीत होतं, की आपल्या वंशजांपैकी काही जण देवाच्या राज्यात राज्य करतील. आणि यहोवा आपलं हे अभिवचन पूर्ण करेपर्यंत तो वाट पाहायला तयार होता. देवाने ज्या “शहराची,” किंवा राज्याची रचना केली त्याची अब्राहाम वाट पाहत होता हे त्याने कसं दाखवून दिलं? एक म्हणजे, पृथ्वीवरच्या कोणत्याही राज्याचा तो नागरिक बनला नाही. तो कुठल्याही एका ठिकाणी स्थायिक झाला नाही. आणि कोणत्याही मानवी राजाला त्याने कधीही आपला पाठिंबा दिला नाही. तर, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत राहिला. याशिवाय, त्याने स्वतःचं राज्य उभं करण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. याउलट, तो यहोवाच्या आज्ञा पाळत राहिला आणि त्याचं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत राहिला. या सगळ्या गोष्टींतून अब्राहामने दाखवून दिलं, की त्याचा यहोवावर मजबूत विश्वास आहे. टेहळणी बुरूज२०.०८ ३ ¶४-५
शनिवार, १४ मे
जो मेला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आलं आहे.—रोम. ६:७.
यहोवाने हे अभिवचन दिलं आहे, की ख्रिस्ताच्या शासनकाळात “मी रोगी आहे” असं कोणीही म्हणणार नाही. (यश. ३३:२४) त्यामुळे, ज्यांना जिवंत केलं जाईल त्यांचं शरीर सुदृढ असेल. पण ते लगेच परिपूर्ण होणार नाहीत. कारण तसं जर झालं तर त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र कदाचित त्यांना ओळखू शकणार नाहीत. असं दिसतं, की ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनकाळादरम्यान संपूर्ण मानवजात हळूहळू परिपूर्ण होत जाईल. मग हजार वर्षांच्या शेवटी, येशू पित्याला राज्य परत करेल. तोपर्यंत राज्याने देवाचा उद्देश पूर्ण केलेला असेल; आणि संपूर्ण मानवजातीला परिपूर्ण करण्याचा देवाचा जो उद्देश होता तोही पूर्ण झालेला असेल. (१ करिंथ. १५:२४-२८; प्रकटी. २०:१-३) तुमचे जवळचे लोक तुम्हाला पुन्हा भेटतील तो क्षण किती सुंदर असेल याची कल्पना करा. तुम्ही कदाचित आनंदाने नाचाल किंवा आनंदाने तुमचे डोळे भरून येतील! तुम्ही कदाचित इतके आनंदी व्हाल की यहोवाची स्तुती करण्यासाठी तुम्ही गीत गाल! आपल्या प्रियजनांचं पुनरुत्थान केल्यामुळे आपल्या प्रेमळ पित्याबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल आपल्या मनात नक्कीच खूप प्रेम दाटून येईल. टेहळणी बुरूज२०.०८ १६ ¶९-१०
रविवार, १५ मे
प्रत्येकाला देवाकडून एक खास देणगी मिळालेली आहे, कोणाला या प्रकारची, तर कोणाला दुसऱ्या प्रकारची.—१ करिंथ. ७:७.
प्रेषित पौलने ख्रिश्चनांना अविवाहित राहून यहोवाची सेवा करण्याचं प्रोत्साहन दिलं. (१ करिंथ. ७:८, ९) यावरून दिसून येतं, की पौलने अविवाहित लोकांना कमी लेखलं नाही. उलट मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याने एका अविवाहित बांधवाला, म्हणजेच तीमथ्यला निवडलं. (फिलिप्पै. २:१९-२२) यावरून स्पष्ट होतं, की एखाद्या बांधवाला जबाबदारी सोपवताना त्याचं लग्न झालं आहे की नाही याचा विचार करणं चुकीचं ठरेल. (१ करिंथ. ७:३२-३५, ३८) ख्रिश्चनांनी लग्न केलं पाहिजे किंवा त्यांनी अविवाहित राहिलं पाहिजे असं येशूने आणि प्रेषित पौलने कधीच शिकवलं नाही. मग, लग्न करण्याच्या बाबतीत आणि अविवाहित राहण्याच्या बाबतीत आपण कसा विचार केला पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर १ ऑक्टोबर २०१२ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात मिळतं. त्यात असं म्हटलं आहे: “खरंच, लग्न करणं आणि अविवाहित राहणं या दोन्ही गोष्टी देवाकडून मिळालेल्या देणग्या आहेत. . . . आपलं लग्न झालं नाही म्हणून अविवाहित जणांना लाज वाटावी किंवा त्यांनी दुःखी व्हावं अशी यहोवाची इच्छा नाही.” ही गोष्ट लक्षात घेऊन आपण मंडळीतल्या अविवाहित भाऊबहिणींचा आदर केला पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०८ २८ ¶८-९
सोमवार, १६ मे
त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, फक्त पित्याला माहीत आहे.—मत्ती. २४:३६.
काही देशांमध्ये लोक खूप आनंदाने आपला संदेश ऐकतात. जणू त्याचीच ते वाट पाहत होते! तर इतर देशांमध्ये लोकांना बायबलबद्दल किंवा देवाबद्दल बोलायला आवडत नाही. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल काय? लोक आपलं ऐकोत किंवा न ऐकोत, जोपर्यंत यहोवा आपल्याला हे काम थांबवायला सांगत नाही, तोपर्यंत आपण ते करत राहावं अशी त्याची इच्छा आहे. प्रचाराचं काम कधी थांबवायचं याची वेळ यहोवाने आधीच ठरवली आहे. “त्यानंतर अंत येईल.” (मत्त. २४:१४) शेवटल्या दिवसांत लोक कसे असतील आणि कोणत्या घटना घडतील हे येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. आणि यामुळे प्रचाराच्या कामावरून त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं हे येशूला माहीत होतं. म्हणून त्याने त्यांना “जागृत राहा” असं म्हटलं. (मत्त. २४:४२) नोहाच्या दिवसांत अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्यांमुळे लोकांनी नोहाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आज अशाच गोष्टी आपल्या काळातसुद्धा आहेत, ज्यांमुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. (मत्त. २४:३७-३९; २ पेत्र २:५) म्हणून, यहोवाने आपल्याला जे प्रचाराचं काम दिलं आहे त्यावर आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०९ ८ ¶१-२, ४
मंगळवार, १७ मे
ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्या सगळ्यांचा छळ केला जाईल.—२ तीम. ३:१२.
सैतान आज “अतिशय क्रोधित” झाला आहे. त्यामुळे आपण जर असा विचार केला, की ‘सैतानाच्या या क्रोधाचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,’ तर आपण स्वतःचीच फसवणूक करत असू. (प्रकटी. १२:१२) लवकरच, आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची परीक्षा होणार आहे. कारण, “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट” येणार आहे. (मत्त. २४:२१) त्या वेळी कदाचित आपल्या घरचेच लोक आपला विरोध करतील. तसंच, आपल्या प्रचाराच्या कामावर बंदीही येऊ शकते. (मत्त. १०:३५, ३६) अशा वेळी तुम्ही काय कराल? आसासारखंच तुम्हीसुद्धा मदतीसाठी आणि संरक्षणासाठी यहोवावर भरवसा ठेवाल का? (२ इति. १४:११) पुढे येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवा आज आपल्याला तयार करत आहे. तो आपला विश्वास मजबूत करत आहे. त्यासाठी तो विश्वासू आणि बुद्धिमान दासाचा उपयोग करून आपल्याला “योग्य वेळी” आध्यात्मिक अन्न पुरवत आहे. (मत्त. २४:४५) पण यहोवावरचा आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतः मेहनत घेतली पाहिजे.—इब्री १०:३८, ३९. टेहळणी बुरूज२०.०९ १८ ¶१६-१८
बुधवार, १८ मे
राजाचं मन यहोवाच्या हातात पाटांच्या पाण्यासारखं असतं. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.—नीति. २१:१.
एखादी गोष्ट जर यहोवाच्या उद्देशाप्रमाणे असेल, तर ती तो अधिकाऱ्यांकडूनसुद्धा करवून घेऊ शकतो. आणि त्यासाठी तो आपल्या पवित्र शक्तीचा उपयोग करतो. ज्याप्रमाणे, लोक पाटाचं पाणी पाहिजे त्या दिशेला वळवू शकतात, अगदी त्याचप्रमाणे यहोवासुद्धा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी पवित्र शक्तीचा उपयोग करून अधिकाऱ्यांचं मन पाहिजे तसं वळवू शकतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा अधिकारपदावर असलेले लोक असे निर्णय घेतात ज्यांमुळे यहोवाच्या लोकांना फायदाच होतो. (एज्रा ७:२१, २५, २६ पडताळून पाहा.) आपण काय करू शकतो? ज्या वेळी “राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी” आपल्या उपासनेच्या बाबतीत काही निर्णय घेतात, त्या वेळी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. (१ तीम. २:१, २; नहे. १:११) तसंच, पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांप्रमाणेच आपण तुरुंगात असलेल्या आपल्या भाऊबहिणींसाठीही देवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे.—प्रे. कार्यं १२:५; इब्री १३:३. टेहळणी बुरूज२०.११ १५ ¶१३-१४
गुरुवार, १९ मे
सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या.—मत्त. २८:१९.
बाप्तिस्मा घेऊन शिष्य बनलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत जर आपण बायबल अभ्यास केला असेल, तर आपल्याला खरंच किती आनंद होतो! (१ थेस्सलनी. २:१९, २०) तिच्या आध्यात्मिक प्रगतीवरून आणि तिने घेतलेल्या बाप्तिस्म्यावरून हे दिसून येतं, की तुम्ही आणि मंडळीतल्या इतर सदस्यांनी तिला मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे बाप्तिस्मा घेतलेले हे नवीन शिष्य फक्त तुमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण मंडळीसाठी जिवंत “शिफारसपत्रे” आहेत, असं म्हणता येईल. (२ करिंथ. ३:१-३) गेल्या चार वर्षांत दर महिन्याला जगभरात जवळजवळ १ कोटी बायबल अभ्यास चालवण्यात आले. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. याच काळात, दरवर्षी जवळजवळ २,८०,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. पण उरलेल्या त्या लाखो बायबल विद्यार्थ्यांबद्दल काय? त्यांना बाप्तिस्मा घ्यायला आपण कशी मदत करू शकतो? जोपर्यंत यहोवा लोकांना सत्यात यायला वेळ आणि संधी देत आहे, तोपर्यंत त्यांना लवकरात लवकर प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला, आपण होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. कारण आता वेळ फार कमी उरला आहे.—१ करिंथ. ७:२९क; १ पेत्र ४:७. टेहळणी बुरूज२०.१० ६ ¶१-२
शुक्रवार, २० मे
देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.—याको. ४:६.
शौलने यहोवाचं ऐकलं नाही. याबद्दल शमुवेल संदेष्ट्याने त्याला विचारलं तेव्हा त्याने आपली चूक मान्य केली नाही. उलट, आपण असं का केलं याची त्याने कारणं दिली. आणि आपण काही मोठी चूक केलेली नाही हे दाखवायचा आणि इतरांना दोषी ठरवायचा त्याने प्रयत्न केला. (१ शमु. १५:१३-२४) याआधीसुद्धा शौलने अशीच वृत्ती दाखवली होती. (१ शमु. १३:१०-१४) तो इतका गर्विष्ठ बनला की तो आपली विचारसरणी बदलायला तयार नव्हता. त्यामुळे यहोवाने त्याला ताडन दिलं आणि नाकारलं. आपल्याला नक्कीच शौलसारखं व्हायचं नाही. त्यामुळे आपण स्वतःला असे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘बायबलमधला हा सल्ला मला लागू होत नाही असाच मी सहसा विचार करतो का? मी जे काही करतोय ते इतकं चुकीचं नाहीए असं मला वाटतं का? माझ्या चुकांसाठी मी दुसऱ्यांना दोषी ठरवतो का?’ यांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असेल, तर आपण आपल्या विचारसरणीत आणि वृत्तीत बदल केला पाहिजे. नाहीतर आपण इतके गर्विष्ठ होऊ की यहोवा आपल्याला नाकारेल, आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री तुटेल. टेहळणी बुरूज२०.११ २० ¶४-५
शनिवार, २१ मे
आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या महान निर्माणकर्त्याला आठव, कारण पुढे दुःखाचे दिवस येतील आणि अशी वर्षं येतील जेव्हा तू म्हणशील: “माझ्या जीवनात काहीच आनंद नाही.”—उप. १२:१.
मुलांनो, तुम्ही कोणाची सेवा कराल हे ठरवा. यहोवा कोण आहे, त्याची इच्छा काय आहे आणि तुम्ही ती कशी पूर्ण करू शकता याची तुम्ही स्वतःला खातरी पटवून दिली पाहिजे. (रोम. १२:२) मग तुम्हाला जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तो म्हणजे, यहोवाची सेवा करायचा निर्णय. (यहो. २४:१५) तुम्ही जर नियमितपणे बायबलचं वाचन केलं आणि त्याचा अभ्यास केला, तर यहोवावरचं तुमचं प्रेम वाढत जाईल आणि त्याच्यावरचा तुमचा विश्वास मजबूत होत जाईल. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या. सैतानाचं जग असं शिकवतं, की तुम्ही जर तुमच्या क्षमतांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला, तर तुम्ही आनंदी राहाल. पण खरं काय ते आपल्याला माहीत आहे. जे लोक जगात यशस्वी होण्यावर आपलं लक्ष लावतात, ते “स्वतःला अनेक दुःखांनी भोसकून” घेतात. (१ तीम. ६:९, १०) याउलट, तुम्ही जर यहोवाचं ऐकलं आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर तुम्हाला सुज्ञतेने वागता येईल आणि जीवनात आनंदी राहता येईल.—यहो. १:८. टेहळणी बुरूज२०.१० ३०-३१ ¶१७-१८
रविवार, २२ मे
मला देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवण्यात आलंय.—लूक ४:४३.
पहिल्या शतकात, येशूने जो संदेश सांगितला त्यामुळे सर्व लोकांना एक आशा मिळाली. त्याने त्याच्या शिष्यांना “पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत” साक्ष द्यायची आज्ञा दिली. (प्रे. कार्ये १:८) पण ते हे काम स्वतःच्या बळावर करू शकणार नव्हते; त्यासाठी त्यांना ‘सहायकाची,’ म्हणजेच पवित्र आत्म्याची गरज होती. आणि येशूने त्यांना तो आत्मा द्यायचं वचन दिलं होतं. (योहा. १४:२६; जख. ४:६) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते लगेच प्रचार करू लागले आणि हजारो लोकांनी आनंदाचा संदेश स्वीकारला. (प्रे. कार्ये २:४१; ४:४) पुढे शिष्यांना जेव्हा विरोधाचा सामना करावा लागला तेव्हा ते घाबरले नाही, तर त्यांनी मदतीसाठी यहोवाला अशी प्रार्थना केली: “तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहण्यासाठी तुझ्या सेवकांना बळ दे.” त्यानंतर ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि “देवाचे वचन धैर्याने सांगू लागले.”—प्रे. कार्ये ४:१८-२०, २९, ३१. टेहळणी बुरूज२०.१० २१ ¶४-५
सोमवार, २३ मे
ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला आणि शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, त्याला उठवण्यात आलं.—१ करिंथ. १५:३, ४.
यहोवाने येशूला जिवंत केलं होतं असं आपण खातरीने का म्हणू शकतो? येशूचं पुनरुत्थान झाल्यावर अनेकांनी त्याला पाहिलं आणि त्याबद्दल इतरांना सांगितलं. (१ करिंथ. १५:५-७) येशूला कोणीकोणी पाहिलं त्याबद्दल प्रेषित पौल आपल्या पत्रात सांगतो. सगळ्यात आधी तो प्रेषित पेत्रचा (केफाचा) उल्लेख करतो. पेत्रने येशूला पाहिलं हे इतर काही शिष्यांनीही सांगितलं. (लूक २४:३३, ३४) पौल असंही म्हणतो, की येशू “१२ प्रेषितांना दिसला.” त्यानंतर तो एकाच वेळी पाचशेहून जास्त बांधवांना दिसला. कदाचित हे तेव्हा घडलं असेल, जेव्हा ते गालीलमध्ये एकत्र जमले होते. या घटनेबद्दल आपल्याला मत्तय २८:१६-२० मध्ये वाचायला मिळतं. पुढे येशूचा भाऊ याकोब याला तो दिसला, असंही पौल सांगतो. खरंतर, येशू हाच मसीहा आहे या गोष्टीवर पूर्वी याकोबचा विश्वास नव्हता; पण पुन्हा जिवंत झालेल्या येशूला पाहिल्यावर मात्र त्याला खातरी पटली. (योहा. ७:५) विशेष म्हणजे, इ.स. ५५ च्या आसपास पौलने जेव्हा हे पत्र लिहिलं, तेव्हा ज्या लोकांनी पुनरुत्थान झालेल्या येशूला पाहिलं होतं त्यांच्यापैकी अनेक जण जिवंत होते. त्यामुळे ज्या लोकांना येशूच्या पुनरुत्थानाबद्दल शंका होती, ते यांच्यापैकी कोणाशीही बोलून आपली शंका दूर करू शकत होते. टेहळणी बुरूज२०.१२ ३ ¶५, ७-८
मंगळवार, २४ मे
तो अंथरुणाला खिळलेला असताना यहोवा त्याला सांभाळेल.—स्तो. ४१:३.
आपण आजारी असतो, आणि खासकरून बऱ्याच काळापासून आजारी असतो तेव्हा आपण निराश होऊ शकतो. अशा वेळी आपण यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. यहोवा चमत्कार करून आपला आजार बरा करणार नाही; पण त्याचा सामना करण्यासाठी लागणारी शक्ती तो नक्कीच आपल्याला देईल आणि आपलं सांत्वन करेल. (स्तो. ९४:१९) तसंच, तो भाऊबहिणींना आपल्याला मदत करायला प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे ते आपल्या घरातली काही कामं करायला, काही खरेदी करायला आपल्याला मदत करतील आणि आपल्यासोबत प्रार्थनाही करतील. याशिवाय, यहोवा बायबलमधल्या दिलासा देणाऱ्या गोष्टीही आपल्या लक्षात आणून देऊ शकतो; जसं की, नवीन जगातली सुंदर आशा, दुःख आणि आजारपण नसलेलं परिपूर्ण जीवन. (रोम. १५:४) पण आपण सेवाकार्यात हवा तितका सहभाग घेऊ शकत नाही असं आपल्याला वाटू शकतं. लॉरल नावाच्या बहिणीचाच विचार करा. एका आजारामुळे तिला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे श्वास घेण्यासाठी तिला ३७ वर्षं एका मशीनमध्ये पडून राहावं लागलं. याशिवाय, तिला कॅन्सर झाला, त्वचेचे गंभीर आजार झाले आणि तिच्यावर अनेक ऑपरेशन करण्यात आले. पण यामुळे तिने प्रचार करायचं सोडलं नाही. तिच्या उपचारासाठी तिच्या घरी येणाऱ्या नर्सेसना आणि इतर लोकांना ती साक्ष द्यायची. आणि अशा प्रकारे तिने जवळजवळ १७ लोकांना सत्यात यायला मदत केली. टेहळणी बुरूज२०.१२ २४ ¶९; २५ ¶१२
बुधवार, २५ मे
यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?—स्तो. ११८:६.
इ.स. ५६ च्या आसपास एका जमावाने प्रेषित पौलला यरुशलेममधल्या मंदिराबाहेर ओढत नेलं आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी त्याची खूप वाईट दशा केली. आणि त्याच अवस्थेत दुसऱ्या दिवशी पौलला यहुदी न्यायसभेसमोर नेण्यात आलं. (प्रे. कार्यं २१:३०-३२; २२:३०; २३:६-१०) त्या वेळी पौलने कदाचित असा विचार केला असेल, की ‘मला आणखी किती काळ हे सगळं सोसावं लागेल?’ त्यामुळे त्याला मदतीची खूप गरज होती. पौलला कशी मदत मिळाली? पौलला अटक करण्यात आलं त्या रात्री “प्रभू” येशू त्याच्याजवळ उभा राहून त्याला म्हणाला: “हिंमत धर! कारण माझ्याबद्दल तू जशी यरुशलेममध्ये अगदी पूर्णपणे साक्ष देत आहेस, तशीच तुला रोममध्येसुद्धा द्यावी लागेल.” (प्रे. कार्यं २३:११) खरंच, पौलला किती योग्य वेळी प्रोत्साहन मिळालं होतं! पौलने यरुशलेममध्ये जी साक्ष दिली होती, त्याबद्दल येशूने त्याची प्रशंसा केली. तसंच, येशूने त्याला असंही अभिवचन दिलं, की तो सुरक्षितपणे रोमला पोचेल. आणि तिथेही तो आणखी मोठ्या प्रमाणात साक्ष देईल. हे आश्वासन मिळाल्यामुळे पौलला खरंच किती बरं वाटलं असेल! एका बाळाला जसं आपल्या वडिलांच्या कुशीत सुरक्षित वाटतं, अगदी तसंच त्याला वाटलं असेल. टेहळणी बुरूज२०.११ १२ ¶१; १३ ¶३-४
गुरुवार, २६ मे
ही खातरीलायक आणि पक्की आशा आपल्याकडे आहे.—इब्री ६:१९.
देवाच्या राज्याबद्दलची आशा “आपल्या जिवासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.” नांगर जसं जहाजाला समुद्रात स्थिर राहायला मदत करतं, तसंच आपली आशाही आपल्याला कठीण प्रसंगांत पाय घट्ट रोवून स्थिर उभं राहायला मदत करू शकते. म्हणून, एका सुंदर भविष्याची जी अभिवचनं यहोवाने आपल्याला दिली आहेत त्यांवर मनन करा. त्या नवीन जगात कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा भीती आपल्याला त्रास देणार नाही. (यश. ६५:१७) दुःखाचं नावसुद्धा तिथे राहणार नाही. अशा शांतिमय नवीन जगात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. (मीखा ४:४) या सुंदर आशेबद्दल इतरांना सांगितल्यामुळे आपली आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर राहील. म्हणून प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात होता होईल तितका सहभाग घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला “शेवटपर्यंत तुमची आशा दृढपणे टिकवून” ठेवता येईल. (इब्री ६:११) या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतशा आपल्या समस्या आणि चिंता आणखी वाढतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. पण त्या कठीण प्रसंगांचा सामना करताना आपल्याला शांत राहायला आणि स्वतःवर नाही, तर यहोवावर भरवसा ठेवायला नक्की जमेल. तर मग आपण आपल्या कामांतून दाखवू, की यहोवाने दिलेल्या पुढील अभिवचनावर आपला पूर्ण भरवसा आहे: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.”—यश. ३०:१५. टेहळणी बुरूज२१.०१ ६-७ ¶१७-१८
शुक्रवार, २७ मे
यहोवा दयाळू आहे.—स्तो. १०३:८.
स्तोत्र १०३:८ या वचनामध्ये यहोवाच्या एका गुणाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणजे दया. या गुणामुळे आपण यहोवाकडे आकर्षित होतो. (निर्ग. ३४:६) यहोवा आपल्या चुका माफ करून आपल्याला दया दाखवतो. (स्तो. ५१:१) पण दया दाखवणं म्हणजे फक्त माफ करणं इतकंच नाही. एखाद्या व्यक्तीला आपण दुःखात पाहतो तेव्हा आपल्याला तिची दया येते. आणि त्यामुळे आपण लगेच तिला मदत करायला पुढे येतो. एका आईलासुद्धा आपल्या बाळाबद्दल असंच वाटतं. त्याला त्रासात पाहून तिचा जीव कळवळतो आणि ती लगेच त्याच्या मदतीला धावून जाते. पण आपल्याला त्रासात पाहून यहोवाचा जीव एका आईपेक्षा जास्त कळवळतो. (यश. ४९:१५) त्याला आपली दया येते आणि म्हणून तो आपल्याला मदतही करतो. (स्तो. ३७:३९; १ करिंथ. १०:१३) यहोवाप्रमाणेच, आपणसुद्धा दया दाखवली पाहिजे. भाऊबहिणींनी आपलं मन दुखावलं तर त्याबद्दल राग न बाळगता, आपण मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली पाहिजे. (इफिस. ४:३२) याशिवाय आणखी एका महत्त्वाच्या मार्गाने आपण दया दाखवू शकतो. तो म्हणजे, जेव्हा आपले भाऊबहीण संकटात असतात तेव्हा आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. असं करून आपण त्यांना आपुलकी दाखवत असतो, आणि यहोवाचंच अनुकरण करत असतो.—इफिस. ५:१. टेहळणी बुरूज२१.०१ २१ ¶५
शनिवार, २८ मे
ख्रिस्ताने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.—१ पेत्र २:२१.
कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असताना कुटुंबप्रमुखाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, त्याने आपल्या कामात इतकं बुडून जाऊ नये, की कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्याकडे आणि कुटुंबाचं मार्गदर्शन करण्याकडे त्याचं दुर्लक्ष होईल. यहोवा आपल्या भल्यासाठीच आपल्याला शिकवतो आणि शिस्त लावतो. (इब्री १२:७-९) आपल्या पित्याप्रमाणेच येशूसुद्धा आपल्याला प्रेमाने शिकवतो आणि आपलं मार्गदर्शन करतो. (योहा. १५:१४, १५) आणि गरज पडल्यावर तो आपल्याला कडक सल्लाही देतो, पण तोसुद्धा प्रेमाने. (मत्त. २०:२४-२८) कारण आपण अपरिपूर्ण आहोत आणि चुका करण्याकडे आपला कल असतो याची त्याला जाणीव आहे. (मत्त. २६:४१) यहोवा आणि येशूप्रमाणेच एक कुटुंबप्रमुख हे नेहमी लक्षात ठेवतो, की त्याच्या कुटुंबातले सदस्य अपरिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात तेव्हा तो त्यांच्यावर ‘संतापत’ नाही. (कलस्सै. ३:१९, तळटीप) याउलट, आपणसुद्धा अपरिपूर्ण आहोत हे तो लक्षात ठेवतो. आणि गलतीकर ६:१ यात दिलेलं तत्त्व लागू करून तो त्यांना “सौम्यतेने सुधारण्याचा प्रयत्न” करतो. येशूसारखंच स्वतःच्या उदाहरणातून शिकवणं नेहमी चांगलं असतं याची त्याला जाणीव असते. टेहळणी बुरूज२१.०२ ६-७ ¶१६-१८
रविवार, २९ मे
श्वास घेणारा प्रत्येक जीव याहची स्तुती करो.—स्तो. १५०:६.
यहोवाने आपल्या मुलाचं बलिदान देऊन मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला आणि जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवेल त्याला विकत घेतलं आहे. (मार्क १०:४५; प्रे. कार्यं २०:२८; १ करिंथ. १५:२१, २२) येशूने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं. त्यामुळे यहोवाने त्याला मंडळीचं मस्तक म्हणून निवडलं हे योग्यच आहे. मस्तक या नात्याने येशूला लोकांसाठी, कुटुंबांसाठी आणि संपूर्ण मंडळीसाठी नियम बनवण्याचा आणि ते पाळले जातात याची खातरी करण्याचा अधिकार आहे. (गलती. ६:२) पण येशू फक्त नियम बनवत नाही, तर तो आपल्या प्रत्येकावर प्रेम करतो आणि आपल्या प्रत्येकाची चांगली काळजीही घेतो. (इफिस. ५:२९) ख्रिस्ताने मंडळीत पुढाकार घेण्यासाठी ज्यांना अधिकार दिला आहे, त्यांच्या अधीन राहून ख्रिस्ती बहिणी दाखवून देतात की त्या ख्रिस्ताचा आदर करतात. तसंच, मंडळीतले भाऊ ख्रिस्ती बहिणींचा आदर करतात तेव्हा ते दाखवतात, की यहोवाने त्यांना जो अधिकार दिला आहे त्याचा ते चांगल्या प्रकारे वापर करतात. यहोवाने इतरांना आपल्यावर अधिकार दिला आहे, ही गोष्ट जेव्हा मंडळीतले सगळेच जण समजून घेतात आणि त्या व्यवस्थेचा आदर करतात, तेव्हा मंडळीतली शांती टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे आपल्या स्वर्गातल्या पित्याचा, यहोवाचा गौरव होतो. टेहळणी बुरूज२१.०२ १८-१९ ¶१४-१७
सोमवार, ३० मे
दावीदने यहोवाला विचारलं.—१ शमु. ३०:८.
शौलपासून आपला जीव वाचवण्यासाठी दावीद आणि त्याची माणसं पलिष्ट्यांच्या प्रदेशात राहत होती. त्या वेळी ते आपल्या बायका-मुलांना मागे सोडून एका युद्धावर गेले होते. तेव्हा काही शत्रूंनी त्यांची घरंदारं लुटली आणि त्यांच्या बायका-मुलांना बंदी बनवून नेलं. दावीदला हे समजलं तेव्हा तो असा विचार करू शकला असता, की ‘मी अनेक युद्धं लढली आहेत आणि मी एक शूर योद्धा आहे. त्यामुळे मी सहज त्यांना शत्रूंच्या हातून सोडवू शकतो.’ पण दावीदने तसं केलं नाही. त्याने यहोवाकडे मदत मागितली. त्याने यहोवाला विचारलं, की “मी लुटारूंच्या टोळीचा पाठलाग करू का?” यहोवाने त्याला तसं करायची परवानगी दिली आणि आपल्या लोकांना सोडवून आणण्यात तो यशस्वी होईल अशी शाश्वतीही दिली. (१ शमु. ३०:७-१०) तरुण भावांनो, या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता? निर्णय घेण्याआधी इतरांचा सल्ला घ्या. आपल्या आईवडिलांशी बोला. तुम्ही मंडळीतल्या वडिलांचाही सल्ला घेऊ शकता. यहोवाला या वडिलांवर भरवसा आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांच्यावर भरवसा ठेवू शकता. यहोवाच्या नजरेत ते मंडळीसाठी “भेटी” आहेत. (इफिस. ४:८) त्यांच्या विश्वासाचं अनुकरण केल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. टेहळणी बुरूज२१.०३ ४-५ ¶१०-११
मंगळवार, ३१ मे
कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू [शकत नाही].—रोम. ८:३८, ३९.
येशूने म्हटलं होतं, की आपण जर शिकलेल्या गोष्टी लागू केल्या नाहीत तर आपण अशा माणसासारखे आहोत जो वाळूवर आपलं घर बांधतो. घर बांधण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. पण तिचा काहीच उपयोग होत नाही. कारण जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस येतो तेव्हा त्याचं घर वाहून जातं. (मत्त. ७:२४-२७) त्याचप्रमाणे आपण जर शिकलेल्या गोष्टी लागूच केल्या नाहीत, तर आपली सगळी मेहनत वाया जाईल. कारण जेव्हा आपल्यासमोर परीक्षा येतील, आपला छळ होईल तेव्हा त्यांचा सामना करण्याइतपत आपला विश्वास मजबूत नसेल. पण तेच जर आपण शिकलेल्या गोष्टी लागू केल्या तर आपल्याला जीवनात योग्य निर्णय घेता येतील, मनाची शांती मिळेल आणि आपला विश्वास आणखी मजबूत होईल. (यश. ४८:१७, १८) परीक्षेत शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू राहण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावर विसंबून राहिलं पाहिजे. आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करत राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाची महिमा कसा करता येईल याचा आपण सतत विचार केला पाहिजे. मग, आपण हा भरवसा ठेवू शकतो, की यहोवा कधीच आपल्याला सोडून देणार नाही आणि आपल्यावरचं त्याचं प्रेम कोणत्याही गोष्टीमुळे नाहीसं होणार नाही.—इब्री १३:५, ६. टेहळणी बुरूज२१.०३ १५ ¶६; १८ ¶२०