वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es22 पृ. ४२-५३
  • एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
  • उपशिर्षक
  • शुक्रवार, १ एप्रिल
  • शनिवार, २ एप्रिल
  • रविवार, ३ एप्रिल
  • सोमवार, ४ एप्रिल
  • मंगळवार, ५ एप्रिल
  • बुधवार, ६ एप्रिल
  • गुरुवार, ७ एप्रिल
  • शुक्रवार, ८ एप्रिल
  • शनिवार, ९ एप्रिल
  • रविवार, १० एप्रिल
  • सोमवार, ११ एप्रिल
  • मंगळवार, १२ एप्रिल
  • बुधवार, १३ एप्रिल
  • गुरुवार, १४ एप्रिल
  • स्मारकविधीची तारीख
    सूर्यास्तानंतर
    शुक्रवार, १५ एप्रिल
  • शनिवार, १६ एप्रिल
  • रविवार, १७ एप्रिल
  • सोमवार, १८ एप्रिल
  • मंगळवार, १९ एप्रिल
  • बुधवार, २० एप्रिल
  • गुरुवार, २१ एप्रिल
  • शुक्रवार, २२ एप्रिल
  • शनिवार, २३ एप्रिल
  • रविवार, २४ एप्रिल
  • सोमवार, २५ एप्रिल
  • मंगळवार, २६ एप्रिल
  • बुधवार, २७ एप्रिल
  • गुरुवार, २८ एप्रिल
  • शुक्रवार, २९ एप्रिल
  • शनिवार, ३० एप्रिल
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
es22 पृ. ४२-५३

एप्रिल

शुक्रवार, १ एप्रिल

आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या.—रोम. १५:४.

तुम्ही सध्या एखाद्या समस्येचा सामना करत आहात का? कदाचित मंडळीत एखाद्याने तुमचं मन दुखावलं असेल. (याको. ३:२) साक्षीदार असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी किंवा शाळेत तुमची थट्टा केली जात असेल. (१ पेत्र ४:३, ४) किंवा कुटुंबातले लोक तुम्हाला सभांना किंवा प्रचाराला जाऊ देत नसतील. (मत्त. १०:३५, ३६) आणि एखादी समस्या खूपच कठीण असेल तर यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं, असंही तुम्हाला कदाचित वाटेल. पण हार मानू नका. कारण समस्या कोणतीही असली, तरी यहोवा तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला बुद्धी देईल आणि त्या समस्येचा धीराने सामना करायला बळ देईल. यहोवाच्या अनेक सेवकांनी बऱ्‍याच मोठमोठ्या समस्यांचा धीराने सामना केला. ते त्यांचा सामना कसा करू शकले याची सविस्तर माहिती यहोवाने आपल्यासाठी बायबलमध्ये दिली आहे. आणि तीच गोष्ट लिहायची प्रेरणा त्याने प्रेषित पौलला दिली. त्यांचे हे अहवाल वाचून आपल्याला खूप धीर आणि बळ मिळू शकतं. पण त्यासाठी बायबलचं फक्‍त वाचन करणं पुरेसं नाही; तर आपण जे काही वाचतो ते आपल्या मनाला भिडलं पाहिजे आणि आपली विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०३ १४ ¶१-२

शनिवार, २ एप्रिल

शेतांकडे पाहा. ती पिकली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत.—योहा. ४:३५.

ज्या लोकांना तुम्ही आनंदाचा संदेश सांगता त्यांना तुम्ही कापणीसाठी तयार असलेल्या पिकांप्रमाणे समजता का? जर समजत असाल तर तुम्ही पुढे दिलेल्या तीन गोष्टी कराल. पहिली, तुम्ही तातडीने प्रचारकार्य कराल. कापणीसाठी कमी वेळ उरला आहे, त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवणार नाही. दुसरी, लोक संदेशाला चांगला प्रतिसाद देत आहेत, हे पाहून तुम्हाला आनंद होईल. बायबल म्हणतं की “हंगामाच्या उत्सवसमयी” लोक आनंदी असतात. (यश. ९:३) आणि तिसरी, तुम्ही प्रत्येक व्यक्‍तीबद्दल विचार कराल की तो पुढे जाऊन येशूचा शिष्य होऊ शकतो आणि म्हणून, तुम्ही लोकांना संदेशात आवड निर्माण होईल अशा प्रकारे आपली प्रस्तावना मांडाल. शोमरोनी कधीच येशूचे शिष्य बनू शकत नाहीत असा येशूच्या काही अनुयायांनी विचार केला असावा. पण येशूने तसा विचार केली नाही. आपणही आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल असा विचार केला पाहिजे की ते पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात. या बाबतीत प्रेषित पौलने आपल्यासाठी चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्याने लोकांच्या विश्‍वासाबद्दल जाणून घेतलं, त्यांची आवड काय आहे हे त्याने समजून घेतलं, आणि ते पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात असा त्याने त्यांच्याबद्दल विचार केला. टेहळणी बुरूज२०.०४ ८-९ ¶३-४

रविवार, ३ एप्रिल

कबर आणि विनाशाचं ठिकाण यहोवापासून लपलेलं नाही, मग माणसांची मनं त्याच्यापासून कशी लपलेली असतील?—नीति. १५:११.

एखाद्याच्या वागण्याबद्दल लगेच मत बनवण्यापेक्षा आपण त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आपल्याला सगळ्यात चांगल्या प्रकारे जर कोणी समजून घेऊ शकतं तर तो फक्‍त यहोवा आहे. यहोवा ज्या दृष्टिकोनातून इतरांना पाहतो त्याप्रमाणे तुम्हालाही पाहता यावं यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करा. तसंच, त्यांना करूणा किंवा दया कशी दाखवायची हे समजण्यासाठीसुद्धा त्याच्याकडे मदत मागा. आपण फक्‍त काही भाऊबहिणींनाच दया दाखवली पाहिजे असं आपण म्हणू शकत नाही. कारण सगळ्यांनाच योना, एलीया, हागार आणि लोट यांच्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. खरंतर, आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी स्वतःच्या चुकांमुळे समस्या आल्या आहेत. त्यामुळे आपण एकमेकांना सहानुभूती दाखवावी अशी यहोवा आपल्याकडून करत असलेली अपेक्षा योग्य आहे. (१ पेत्र ३:८) आपण जेव्हा यहोवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा जगभरात पसरलेल्या वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या भाऊबहिणींमध्ये असलेली एकता मजबूत होत जाते. तेव्हा आपण इतरांशी वागताना नेहमी त्यांचं ऐकून घेण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याचा निर्धार करू या! टेहळणी बुरूज२०.०४ १८-१९ ¶१५-१७

सोमवार, ४ एप्रिल

ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसलं आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला.—१ पेत्र २:२१.

यहोवाच्या आज्ञा पाळण्याच्या बाबतीत येशूने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्यामुळे यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे येशूच्या पावलांचं शक्य तितक्या जवळून अनुकरण करणं. (योहा. ८:२९) सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आपल्याला याची पक्की खातरी असली पाहिजे, की यहोवा हा सत्याचा देव आहे; म्हणजे, त्याचं वचन बायबल यात त्याने जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे याची आपल्याला खातरी असली पाहिजे. तसंच, येशू हाच मसीहा आहे याचीही आपल्याला खातरी असली पाहिजे. कारण येशूला देवाच्या राज्याचा राजा म्हणून निवडण्यात आलं आहे यावर आज अनेक जण शंका घेतात. योहानने आपल्या पत्रांत ख्रिश्‍चनांना ‘फसवणूक करणाऱ्‍यांबद्दल’ इशारा दिला. यहोवा आणि येशू यांच्याबद्दल असलेल्या सत्यावर ज्यांचा पूर्णपणे विश्‍वास नव्हता अशांना ते सहज फसवतील असं योहान म्हणाला. (२ योहा. ७-११) त्याने लिहिलं: “येशू हा ख्रिस्त आहे ही गोष्ट जो नाकारतो तो जर खोटारडा नाही, तर मग कोण आहे?” (१ योहा. २:२२) फसवणूक करणाऱ्‍यांपासून स्वतःचं संरक्षण करण्याचा एकच मार्ग आहे; तो म्हणजे, देवाच्या वचनाचा अभ्यास करणं. त्यामुळे आपण यहोवाला आणि येशूला ओळखू शकतो. (योहा. १७:३) तेव्हाच आपल्याला पक्की खातरी होईल की आपण जे मानतो तेच सत्य आहे. टेहळणी बुरूज२०.०७ २१ ¶४-५

मंगळवार, ५ एप्रिल

आपल्या भावासमोर अडखळण्यासारखं काहीही न ठेवायचा आपण निश्‍चय करू या.—रोम. १४:१३.

आपल्यासोबत धावणाऱ्‍या भाऊबहिणींना आपल्यामुळे “अडखळण” होऊ नये म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो. नेहमी आपल्याच इच्छेप्रमाणे झालं पाहिजे असा हट्ट धरण्याऐवजी, शक्य असेल तेव्हा आपण त्यांच्या आवडीनिवडींना मान दिला पाहिजे. (रोम. १४:१९-२१; १ करिंथ. ८:९, १३) खरोखरच्या शर्यतीत धावणाऱ्‍यांमध्ये आणि आपल्यामध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. ते फक्‍त स्वतःसाठी बक्षीस मिळवायचा प्रयत्न करत असतात. ते फक्‍त स्वतःचाच विचार करतात. त्यामुळे ते इतर धावकांना धक्का मारून पुढे जायचा प्रयत्न करतात. पण आपण मात्र आपल्या भाऊबहिणींशी स्पर्धा करत नाही. (गलती. ५:२६; ६:४) उलट, जास्तीत जास्त लोकांना आपल्यासोबत अंतिम रेषा पार करून जीवनाचं बक्षीस मिळवायला मदत करणं हे आपलं ध्येय आहे. म्हणून देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या सल्ल्याचं आपण पालन करायचा प्रयत्न करतो. तो सल्ला असा आहे: “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.” (फिलिप्पै. २:४) आपली शर्यत पूर्ण केल्यावर आपल्याला एक बक्षीस नक्कीच मिळेल असं यहोवाने आश्‍वासन दिलं आहे. ते बक्षीस म्हणजे स्वर्गात किंवा पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन. ही यहोवाची एक प्रेमळ भेट आहे. टेहळणी बुरूज२०.०४ २८ ¶१०; २९ ¶१२

बुधवार, ६ एप्रिल

जे मोठ्या संकटातून बाहेर येतात ते हेच आहेत.—प्रकटी. ७:१४.

लाखो विश्‍वासू ख्रिस्ती “मोठ्या संकटातून” वाचतील आणि नवीन जगात प्रवेश करतील. तिथे ते मरण पावलेल्या लाखो लोकांचं पुनरुत्थान होताना पाहतील. हा मृत्यूवर एक विजय असेल. तो किती आनंदाचा क्षण असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? (प्रे. कार्यं २४:१५) शेवटी, जे पूर्णपणे यहोवाला विश्‍वासू राहतील ते आदामपासून मिळालेल्या मृत्यूवरही विजय मिळवतील. आणि त्यानंतर ते कायम जिवंत राहतील. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात पौलने पुनरुत्थानाबद्दल जे काही म्हटलं त्यामुळे आज आपल्याला खूप सांत्वन मिळतं. याबद्दल आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत! म्हणून पौलने सांगितल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त “प्रभूचं काम” करत राहू या. (१ करिंथ. १५:५८) हे काम करण्यात जर आपण मनापासून मेहनत घेतली, तर भविष्यात मिळणाऱ्‍या आनंदी जीवनाची आपण आशा बाळगू शकतो. ते जीवन किती चांगलं असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्या वेळी आपल्याला जाणीव होईल, की प्रभूच्या सेवेत आपण केलेली मेहनत वाया गेली नाही. टेहळणी बुरूज२०.१२ १३ ¶१६-१७

गुरुवार, ७ एप्रिल

त्यांची सैन्यं, घोड्यावर बसलेला स्वार आणि त्याचं सैन्य यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी एकत्र झाली.—प्रकटी. १९:१९.

असं दिसून येतं की यहेज्केल ३८:१०-२३; दानीएल २:४३-४५; ११:४४–१२:१ आणि प्रकटीकरण १६:१३-१६,२१ या भविष्यवाण्यांमध्ये सारख्याच गोष्टींचं वर्णन केलं आहे. यावरून आपण म्हणू शकतो की पुढे दिलेल्या घटना घडतील. मोठं संकट सुरू होण्याच्या काही काळानंतर ‘सबंध पृथ्वीवरील राजे’ राष्ट्रांचा एक समूह तयार करतील. (प्रकटी. १६:१३, १४) बायबलमध्ये या राष्ट्रांच्या समूहाला “मागोग देशातील गोग” असं म्हटलं आहे. (यहे. ३८:२) राष्ट्रांचा हा समूह देवाच्या लोकांवर एक शेवटचा मोठा हल्ला करेल. या काळाविषयीच्या दृष्टान्तात योहानने पाहिलं की खूप मोठ्या गारांचा पाऊस देवाच्या लोकांच्या शत्रूंवर पडत आहे. हा गारांचा पाऊस यहोवाचे लोक देणार असलेला कठोर न्यायाचा संदेश असू शकतो. या संदेशामुळे मागोगचा गोग देवाच्या लोकांवर हल्ला करेल आणि पृथ्वीवरून त्यांचा पूर्णपणे नाश करण्याचा प्रयत्न करेल.—प्रकटी. १६:२१. टेहळणी बुरूज२०.०५ १४-१५ ¶१३-१४

शुक्रवार, ८ एप्रिल

तुम्ही पापी असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला कळतं, तर मग जे स्वर्गातल्या पित्याकडे मागतात त्यांना तो पवित्र शक्‍ती देणार नाही का?—लूक ११:१३.

देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला एक भेट म्हणून दिला आहे. त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे. आज देवाचा पवित्र आत्मा कोणत्या गोष्टी साध्य करत आहे त्यावर विचार केल्यानेही आपली त्याच्याबद्दल कदर वाढू शकते. स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही . . . पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत माझ्याविषयी साक्ष द्याल.” (प्रे. कार्ये १:८) पवित्र आत्म्याच्या मदतीमुळे आज जगभरात जवळपास ८५ लाख लोक यहोवाचे उपासक बनले आहेत. तसंच, यामुळे आज देवाच्या लोकांमध्ये शांती आणि एकता आहे. कारण देवाचा पवित्र आत्मा आपल्याला चांगले गुण विकसित करायला मदत करतो. ते गुण म्हणजे “प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता आणि आत्मसंयम.” हे गुण म्हणजे पवित्र “आत्म्याचे फळ.” (गलती. ५:२२, २३) खरंच, पवित्र आत्मा ही एक मौल्यवान संपत्ती आहे. टेहळणी बुरूज२०.०५ २८ ¶१०; २९ ¶१३

शनिवार, ९ एप्रिल

मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे, त्यामुळे पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे होतं.—१ करिंथ. १५:२१.

नवीन जगात पुनरुत्थान झालेल्या आपल्या जवळच्या लोकांना आपण ओळखू शकू असं म्हणता येईल. असं म्हणण्याची बरीच कारणं आपल्याजवळ आहेत. जसं की, प्राचीन काळात यहोवाने ज्या लोकांचं पुनरुत्थान केलं होतं, त्यांचा विचार करा. यहोवाने जेव्हा त्यांचं पुनरुत्थान केलं तेव्हा त्यांचा मृत्यू होण्याआधी ते जसे दिसायचे, बोलायाचे आणि विचार करायचे तसंच यहोवाने त्यांना पुन्हा घडवलं. यावरून दिसून येतं की भविष्यातलं पुनरुत्थानही असंच असेल. आपल्याला हेही माहीत आहे की येशूने मृत्यूची तुलना झोपेशी आणि पुनरुत्थानाची तुलना मेलेल्यांना झोपेतून उठवण्याशी केली. (मत्त. ९:१८, २४; योहा. ११:११-१३) एक व्यक्‍ती झोपण्याआधी जशी बोलते, जशी दिसते उठल्यानंतरही तिच्या या गोष्टींमध्ये काहीच बदल झालेला नसतो. तसंच तिच्या विचारांमध्येही काही बदल झालेला नसतो. लाजरचाच विचार करा. त्याला मरून चार दिवस झाले होते. आणि त्याचं शरीर कुजायला लागलं होतं. पण येशूने जेव्हा लाजरला पुन्हा जिवंत केलं तेव्हा त्याच्या बहिणींनी त्याला लगेच ओळखलं. आणि लाजरनेही त्यांना ओळखलंच असेल.—योहा. ११:३८-४४; १२:१, २. टेहळणी बुरूज२०.०८ १४ ¶३; १६ ¶८

रविवार, १० एप्रिल

तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्‍याकडून मिळतं.—प्रकटी. ७:१०.

अभिषिक्‍त जन आणि दुसरी मेंढरं यांच्या आशा जरी वेगवेगळ्या असल्या, तरी यहोवाच्या नजरेत ते सारखेच आहेत. यहोवा दोन्ही गटांवर तितकंच प्रेम करतो. शेवटी या दोन्ही गटांसाठी त्याने एकच किंमत दिली; त्याने आपल्या प्रिय मुलाचं बलिदान दिलं. त्यामुळे दोन्ही गटांतल्या लोकांनी देवाला आणि ख्रिस्ताला एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. (स्तो. ३१:२३) शिवाय, हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवा प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे पवित्र शक्‍ती देतो; मग तो अभिषिक्‍त जनांपैकी असो किंवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी असो. यहोवाने आपल्या प्रत्येक सेवकाला भविष्यासाठी एक सुंदर आशा दिली आहे. (यिर्म. २९:११) आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याची आणि त्यांची स्तुती करण्याची संधी स्मारकविधीच्या वेळी आपल्याला मिळेल. खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी हा प्रसंग खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. टेहळणी बुरूज२१.०१ १८ ¶१६; १९ ¶१९

सोमवार, ११ एप्रिल

हे करत राहा.—१ करिंथ. ११:२५.

स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍यांपैकी बहुतेकांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे. मग तरीसुद्धा ते स्मारकविधीला का उपस्थित राहतात? आपण एखाद्या मित्राच्या लग्नाला का जातो याचा विचार करा. कारण आपलं त्या जोडप्यावर प्रेम असतं आणि आपल्याला त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं असतं. त्याचप्रमाणे दुसऱ्‍या मेंढरांतल्या लोकांचं येशूवर आणि अभिषिक्‍त जनांवर प्रेम असतं आणि त्यांना त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं असतं. म्हणून ते स्मारकविधीला उपस्थित राहतात. याशिवाय, येशूने दिलेल्या बलिदानाची कदर असल्यामुळेसुद्धा ते या विधीला उपस्थित राहतात. कारण त्या बलिदानामुळेच त्यांना भविष्यात या पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन मिळेल. दुसरी मेंढरं स्मराकविधीला उपस्थित का राहतात याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, येशूने तशी आज्ञाच दिली आहे. येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत या विधीची स्थापना केली तेव्हा त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.” (१ करिंथ. ११:२३-२६) म्हणून ते या विधीला उपस्थित राहतात. आणि जोपर्यंत अभिषिक्‍त जन पृथ्वीवर जिवंत आहेत तोपर्यंत ते हा विधी पाळत राहतील. टेहळणी बुरूज२१.०१ १७-१८ ¶१३-१४

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: दिवसा घडलेल्या घटना) योहान १२:१२-१९; मार्क ११:१-११

मंगळवार, १२ एप्रिल

देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं. हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.—१ योहा. ४:९.

खरं प्रेम दाखवायचं असेल तर ते कृतीतून दाखवलं पाहिजे. (याकोब २:१७, २६ पडताळून पाहा.) उदाहरणार्थ, यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे. (१ योहा. ४:१९) आणि आपलं हे प्रेम त्याने बायबलमध्ये सुंदर शब्दांतून व्यक्‍त केलं आहे. (स्तो. २५:१०; रोम. ८:३८, ३९) पण यहोवाचं आपल्यावर खरंच प्रेम आहे, याची खातरी फक्‍त त्याच्या शब्दांतून नाही तर त्याने आपल्यासाठी जे काही केलं त्यावरूनही मिळते. यहोवाने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक मुलगा दिला. (योहा. ३:१६) त्यामुळे त्याचं आपल्यावर प्रेम आहे याबद्दल मनात कोणतीही शंका उरत नाही. यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्याच्या बदल्यात त्यांच्यावर प्रेम करायची प्रेरणा आपल्याला मिळते. हे प्रेम आपण त्यांच्या आज्ञा पाळून दाखवू शकतो. (योहा. १४:१५; १ योहा. ५:३) येशूने आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की आपण एकमेकांवर प्रेम करावं. (योहा. १३:३४, ३५) पण आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे, हे आपण फक्‍त शब्दांतून नाही तर कृतीतूनही दाखवलं पाहिजे.—१ योहा. ३:१८ टेहळणी बुरूज२१.०१ ९ ¶६; १० ¶८

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १०: दिवसा घडलेल्या घटना) योहान १२:२०-५०

बुधवार, १३ एप्रिल

मी तर तुम्हाला मित्र म्हटलंय.—योहा. १५:१५.

ज्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आलं आहे, त्यांना देवाच्या राज्याचे सहराजे म्हणून सर्वकाळासाठी येशूसोबत राहण्याची आशा आहे. ते प्रत्यक्ष येशूसोबत असतील; म्हणजेच ते त्याला पाहतील, त्याच्याशी बोलतील आणि त्याच्यासोबत वेळ घालवतील. (योहा. १४:२, ३) ज्यांना पृथ्वीवर राहण्याची आशा आहे त्यांच्यावरही येशू प्रेम करेल आणि त्यांच्याकडे लक्ष देईल. जरी येशूला ते पाहू शकत नसले तरी त्याच्यासोबतचं त्यांचं नातं दिवसेंदिवस घनिष्ठ होत जाईल आणि यहोवा व येशूने दिलेल्या जीवनाचा ते सर्वकाळ आनंद घेतील! (यश. ९:६, ७) येशूचं आमंत्रण स्वीकारून आपण त्याचे मित्र बनतो तेव्हा आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतात. जसं की, त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्याला मदत करत आहे हे आज आपल्याला जाणवतं. तसंच, आपल्याला सर्वकाळ जगण्याची आशा मिळाली आहे. आणि येशूसोबत मैत्री केल्यामुळे आपल्याला जो सर्वात मोठा आशीर्वाद मिळेल तो म्हणजे त्याच्या पित्यासोबत, यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातं. येशूचे मित्र म्हटलं जाणं हा आपल्यासाठी खरंच किती मोठा बहुमान आहे! टेहळणी बुरूज२०.०४ २५ ¶१५-१६

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ११: दिवसा घडलेल्या घटना) लूक २१:१-३६

गुरुवार, १४ एप्रिल

ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.—१ करिंथ. १५:२२.

प्रेषित पौलने करिंथमधल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पत्र लिहिलं होतं. त्यांचं स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाणार होतं. आणि त्यांना, “पवित्र जन होण्यासाठी ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने” पवित्र करण्यात आलं होतं. याशिवाय, “जे ख्रिस्ती लोक मरण पावले” होते त्यांचासुद्धा पौलने आपल्या पत्रात उल्लेख केला. (१ करिंथ. १:२; १५:१८; २ करिंथ. ५:१७) पौलने लिहिलेल्या दुसऱ्‍या एका पत्रात त्याने म्हटलं: जे “[येशूसारखाच] मृत्यू झाल्यामुळे . . . त्याच्यासोबत एक” झाले आहेत, ते “त्याच्यासारखं पुनरुत्थान होण्याद्वारेही . . . त्याच्यासोबत एक” होतील. (रोम. ६:३-५) येशूचं अदृश्‍य शरीरात पुनरुत्थान झालं आणि तो स्वर्गात गेला. ख्रिस्ताच्या सर्व अभिषिक्‍त शिष्यांच्या बाबतीतही असंच होईल. पौलने आपल्या पत्रात म्हटलं, की ख्रिस्त हा “मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.” (१ करिंथ. १५:२०) कारण येशू हा पहिलाच होता ज्याला अदृश्‍य शरीर देऊन उठवण्यात आलं होतं आणि ज्याला सर्वकाळाचं जीवन देण्यात आलं होतं. टेहळणी बुरूज२०.१२ ५-६ ¶१५-१६

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १२: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २६:१-५, १४-१६; लूक २२:१-६

स्मारकविधीची तारीख
सूर्यास्तानंतर
शुक्रवार, १५ एप्रिल

आपण सदासर्वकाळ प्रभूसोबत राहू.—१ थेस्सलनी. ४:१७.

आज जेव्हा अभिषिक्‍त जनांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना लगेच स्वर्गाच्या जीवनासाठी उठवलं जातं. याचा पुरावा आपल्याला १ करिंथकर १५:५१, ५२ मध्ये दिलेल्या प्रेषित पौलच्या शब्दांवरून मिळतो. ख्रिस्ताच्या या भावांचं पुनरुत्थान होतं तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन स्वर्गात काय करतील? येशू त्यांना म्हणतो: “जो विजय मिळवेल आणि शेवटपर्यंत माझ्या कार्यांचं अनुकरण करेल, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. मला माझ्या पित्याकडून जसा अधिकार मिळाला आहे तसा तोसुद्धा लोहदंडाने लोकांवर अधिकार चालवेल आणि मातीच्या भांड्यांप्रमाणे त्यांचा चुराडा करेल.”—प्रकटी. २:२६, २७. टेहळणी बुरूज२०.१२ १२ ¶१४-१५

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १३: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २६:१७-१९; मार्क १४:१२-१६; लूक २२:७-१३ (निसान १४: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) योहान १३:१-५; १४:१-३

शनिवार, १६ एप्रिल

ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे.—१ करिंथ. १५:२०.

येशूला “पहिलं फळ” म्हणण्याद्वारे पौलला असं म्हणायचं होतं, की येशूनंतर इतरांचंही स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाणार होतं. येशूप्रमाणेच, पुढे त्याच्या प्रेषितांना आणि इतर अभिषिक्‍त शिष्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जाणार होतं. (१ करिंथ. १५:१८) पौलने करिंथकरांना पत्र लिहिलं, तेव्हा प्रेषितांचं आणि ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त शिष्यांचं पुनरुत्थान व्हायला अजून सुरुवात झाली नव्हती. उलट, त्यांचं पुनरुत्थान भविष्यात होईल असं पौलने म्हटलं. त्याने म्हटलं: “प्रत्येकाला त्याच्या योग्य क्रमाप्रमाणे: ख्रिस्त, जो पहिलं फळ आहे. त्यानंतर, जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या उपस्थितीदरम्यान उठवले जातील.” (१ करिंथ. १५:२३; १ थेस्सलनी. ४:१५, १६) आज आपण ख्रिस्ताच्या “उपस्थितीदरम्यान” जगत आहोत. यावरून दिसून येतं, की प्रेषितांना आणि इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गातल्या जीवनाच्या प्रतिफळासाठी आणि ‘येशूसारखं पुनरुत्थान होऊन त्याच्यासोबत एक’ होण्यासाठी त्याच्या उपस्थितीपर्यंत थांबावं लागणार होतं.—रोम. ६:५. टेहळणी बुरूज२०.१२ ५ ¶१२; ६ ¶१६-१७

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १४: दिवसा घडलेल्या घटना) योहान १९:१-४२

रविवार, १७ एप्रिल

शरीर नाशवंत स्थितीत पेरलं जातं आणि अविनाशीपणात उठवलं जातं.—१ करिंथ. १५:४२.

प्रेषित पौल इथे अशा लोकांबद्दल बोलत होता, ज्यांना “अदृश्‍य शरीर” देऊन स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जातं. (१ करिंथ. १५:४३, ४४) पृथ्वीवर असताना येशूचं हाडामांसाचं शरीर होतं. पण त्याला मृत्यूतून जिवंत करण्यात आलं, तेव्हा तो “जीवन देणारा अदृश्‍य प्राणी बनला.” म्हणजे, त्याला एक अदृश्‍य शरीर देण्यात आलं आणि तो स्वर्गात गेला. तसंच, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाही अदृश्‍य शरीरात उठवलं जातं. ही गोष्ट समजावण्यासाठी पौल म्हणाला: “ज्याप्रमाणे आपण मातीपासून बनवलेल्याच्या स्वरूपात आहोत, त्याचप्रमाणे आपण स्वर्गातून आलेल्याच्या स्वरूपात असू.” (१ करिंथ. १५:४५-४९) आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की येशूचं पुनरुत्थान हाडामांसाच्या शरीरात झालं नाही. पौल म्हणाला: “मांस आणि रक्‍त देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही.” (१ करिंथ. १५:५०) प्रेषितांचं आणि इतर अभिषिक्‍त जनांचं पुनरुत्थानही हाडामांसाच्या नाशवंत शरीरात होणार नव्हतं. टेहळणी बुरूज२०.१२ ११ ¶१०-१२

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १५: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २७:६२-६६ (निसान १६: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) योहान २०:१

सोमवार, १८ एप्रिल

अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे?—१ करिंथ. १५:५५.

देवाने पहिल्या शतकातल्या येशूच्या काही शिष्यांना स्वर्गातल्या जीवनाच्या आशेबद्दल लिहायची प्रेरणा दिली. जसं की, प्रेषित योहानने असं लिहिलं: “आपण आता देवाची मुलं आहोत, पण पुढे आपण कसे असू हे अजून प्रकट झालेलं नाही. त्याला प्रकट करण्यात येईल तेव्हा आपण त्याच्यासारखेच होऊ इतकं मात्र आपल्याला माहीत आहे.” (१ योहा. ३:२) या वचनावरून दिसून येतं, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचं जेव्हा अदृश्‍य शरीरात पुनरुत्थान होईल तेव्हा स्वर्गातलं त्यांचं जीवन कसं असेल हे त्यांना माहीत नाही. पण एक गोष्ट त्यांना नक्की माहीत आहे. ती म्हणजे, ते यहोवाला पाहतील. स्वर्गातल्या जीवनाच्या पुनरुत्थानाबद्दलची थोडीफार माहिती प्रेषित पौलने आपल्याला दिली आहे. जसं की, भविष्यात येशू जेव्हा “सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा” करेल, आणि त्यासोबतच “शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा” करेल, तेव्हा अभिषिक्‍त जनसुद्धा त्याच्यासोबत असतील. शेवटी, येशू आणि त्याच्यासोबत राज्य करणारे सगळ्या गोष्टी यहोवाच्या अधीन करतील आणि ते स्वतःसुद्धा यहोवाच्या अधीन होतील. (१ करिंथ. १५:२४-२८) खरंच, तो क्षण किती आनंदाचा असेल! टेहळणी बुरूज२०.१२ ८ ¶२

स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १६: दिवसा घडलेल्या घटना) योहान २०:२-१८

मंगळवार, १९ एप्रिल

नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे, अशी मी आशा बाळगतो.—प्रे. कार्यं २४:१५.

ज्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा नाही अशा विश्‍वासू ख्रिश्‍चनांनासुद्धा पुनरुत्थानाची आशा आहे. असं का म्हणता येईल? कारण बायबल म्हणतं, की प्रेषित पौलचं आणि अभिषिक्‍त जनांचं “पहिलं पुनरुत्थान” होईल. (फिलिप्पै. ३:११) जर अभिषिक्‍त जनांचं पहिलं पुनरुत्थान होणार असेल, तर याचा अर्थ यानंतर आणखी एक पुनरुत्थान होईल. आणि याच पुनरुत्थानाबद्दल ईयोब बोलत होता. आणि आपल्याला याची आशा आहे असा त्याचा विश्‍वास होता. (ईयो. १४:१५) येशू जेव्हा सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा करेल, तेव्हा त्याच्यासोबत स्वर्गात ते अभिषिक्‍त जनसुद्धा असतील ज्यांना ‘ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान उठवलं जातं.’ तसंच, ‘शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यूसुद्धा नाहीसा केला जाईल.’ तर स्पष्टच आहे, की ज्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जाईल त्यांची, वारशाने मिळालेल्या मृत्यूपासून कायमची सुटका होईल. (१ करिंथ. १५:२३-२६) पण ज्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा नाही त्यांच्याबद्दल काय? त्यांना कोणती आशा आहे हे प्रेषित पौलने आजच्या वचनात सांगितलं आहे. अनीतिमान लोक तर स्वर्गात जाऊ शकत नाहीत. तर मग स्पष्टच आहे, की आजच्या वचनात पौल भविष्यात पृथ्वीवर होणार असलेल्या पुनरुत्थानाबद्दल बोलत होता. टेहळणी बुरूज२०.१२ ६-७ ¶१८-१९

बुधवार, २० एप्रिल

ख्रिस्ताने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं.—गलती. २:२०.

आपण विचार करू, की ‘यहोवाने मला माफ केलंय हे मला कसं समजेल?’ तुम्ही हा प्रश्‍न विचारत आहात याचाच अर्थ यहोवाने तुम्हाला माफ केलं आहे. बऱ्‍याच वर्षांपूर्वी टेहळणी बुरूज मासिकात असं म्हटलं होतं: “सत्यात येण्याआधी तुम्हाला कदाचित एखादी वाईट सवय असेल. पण सत्यात आल्यानंतरही तुम्ही अधूनमधून त्या सवयीकडे वळत असाल. . . . यहोवा मला कधीच माफ करणार नाही, असा विचार करू नका. कारण तुम्ही असा विचार करावा हेच तर सैतानाला पाहिजे. केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला जर वाईट वाटत असेल, तुमची चिडचिड होत असेल, तर ती एक चांगली गोष्ट आहे. कारण त्यावरून दिसून येतं, की तुम्ही एक चांगली व्यक्‍ती आहात आणि यहोवा तुम्हाला माफ करेल. त्यामुळे नम्र असा आणि यहोवाला मनापासून प्रार्थना करा. त्याने तुम्हाला माफ करावं, तुम्हाला एक शुद्ध विवेक द्यावा आणि ही सवय सोडून द्यायला मदत करावी, अशी विनंती त्याच्याकडे करा.” ख्रिस्ती बनण्याआधी प्रेषित पौलने काही गंभीर चुका केल्या होत्या. त्या चुका त्याला आठवायच्या. (१ तीम. १:१२-१५) पण त्याला हे पक्कं माहीत होतं, की देवाने आपल्या मुलाचं बलिदान त्याच्यासाठी दिलं आहे. आणि त्या आधारावर तो आपल्याला माफ करतो. त्यामुळे पौलने स्वतःला नको तितका दोष दिला नाही. उलट, त्याने आपलं संपूर्ण लक्ष यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यावर लावलं. टेहळणी बुरूज२०.११ २७ ¶१४; २९ ¶१७

गुरुवार, २१ एप्रिल

तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.—याको. १:५.

आपल्याला मोहात पाडण्यासाठी सैतान अनेक गोष्टींचा वापर करतो. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी आपण कदाचित असा विचार करू की ‘यासाठी मला मंडळीतून बहिष्कृत केलं जाणार नाही. म्हणजेच ही काही एवढी गंभीर चूक नाही.’ पण असा विचार करणं अगदीच चुकीचं आहे. अशा वेळी आपण स्वतःला पुढे दिलेले प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘माझं मन भरकटावं म्हणून सैतान या गोष्टीचा वापर करत आहे का? मी जर चुकीच्या इच्छांना बळी पडलो तर त्यामुळे यहोवाच्या नावाची बदनामी होईल का? मी जर हे काम केलं तर मी यहोवाच्या आणखी जवळ जाईन की दूर जाईन?’ या प्रश्‍नांची तुम्हाला प्रामाणिक उत्तरं देता यावीत म्हणून बुद्धीसाठी यहोवाकडे विनंती करा. यामुळे तुमचं संरक्षण होईल. येशूसमोर जेव्हा परीक्षा आल्या तेव्हा त्याने ठामपणे म्हटलं “अरे सैताना! चालता हो!” (मत्त. ४:१०) अगदी तसंच तुमच्यासमोर प्रलोभनं आली तर तुम्हीसुद्धा त्यांचा ठामपणे विरोध करू शकाल. नेहमी लक्षात ठेवा, विभाजित झालेलं मन कसल्याही कामाचं नसतं. टेहळणी बुरूज२०.०६ १२-१३ ¶१६-१७

शुक्रवार, २२ एप्रिल

मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नका. तर स्वतःबद्दल समंजसपणे विचार करा.—रोम. १२:३.

आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे हे यहोवाला माहीत असतं, म्हणून नम्रपणे आपण त्याच्या आज्ञांचं पालन करतो. (इफिस. ४:२२-२४) आपल्यात जर नम्रतेचा गुण असेल तर आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा यहोवाच्या इच्छेला जीवनात जास्त महत्त्व देऊ. आणि इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजू. यामुळे आपलं यहोवासोबत आणि भाऊबहिणींसोबत नातं चांगलं राहील. (फिलिप्पै. २:३) आपण जर काळजी घेतली नाही तर आपणसुद्धा सैतानाच्या जगातल्या लोकांसारखंच गर्विष्ठ आणि स्वार्थी होऊ. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसोबत असंच काहीसं घडलं असावं म्हणून प्रेषित पौलने रोमकरांना असं लिहिलं: “मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की कोणीही स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नये, तर देवाने प्रत्येकाला जितका विश्‍वास दिला आहे, त्याप्रमाणे स्वतःबद्दल समंजसपणे विचार करा.” स्वतःबद्दल योग्य प्रमाणात विचार करणं चुकीचं नाही हे पौलने मान्य केलं. आपण जर नम्र असू तर आपण स्वतःला खूप जास्त महत्त्व देणार नाही, तर स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगू. टेहळणी बुरूज२०.०७ २ ¶१-२

शनिवार, २३ एप्रिल

देशात शांती होती. या काळात त्याच्याशी कोणीही युद्ध करायला आलं नाही.—२ इति. १४:६.

आसा राजाच्या दिवसांत जो शांतीचा काळ होता तो शेवटी संपला. कारण कूशमधून, म्हणजे इथियोपिया इथून जेरह नावाचा एक अधिकारी दहा लाख सैनिकांचं भलं मोठं सैन्य घेऊन यहूदावर हल्ला करायला आला. त्याला आणि त्याच्या सैन्याला असं वाटत होतं, की ते यहूदाला सहज हरवून टाकतील. हे खरं आहे, की आसानेसुद्धा आपलं सैन्य मजबूत केलं होतं. पण त्याचा भरवसा आपल्या सैन्यावर नाही, तर यहोवावर होता. त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “हे आमच्या देवा, परमेश्‍वरा, आमचं साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत.” (२ इति. १४:११) आसाच्या सैन्याच्या तुलनेत इथियोपियाचं सैन्य दुप्पट होतं. पण आसाला पूर्ण भरवसा होता, की यहोवा शक्‍तिशाली आहे आणि तो आपल्या लोकांचा बचाव करेल. आणि तसंच झालं. यहोवाच्या मदतीमुळे इथियोपियाचं सैन्य हरलं. (२ इति. १४:८-१३) भविष्यात आपल्या प्रत्येकासोबत नेमकं काय होईल हे आपल्याला माहीत नाही; पण यहोवाचे लोक जो शांतीचा काळ अनुभवत आहेत तो कायम राहणार नाही हे मात्र आपल्याला नक्की माहीत आहे. कारण येशूने आधीच सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत सर्व राष्ट्रं त्याच्या शिष्यांचा “द्वेष करतील.”—मत्त. २४:९. टेहळणी बुरूज२०.०९ १७-१८ ¶१४-१६

रविवार, २४ एप्रिल

मी ख्रिस्तासाठी अपमानाला तोंड देताना आनंद मानतो.—२ करिंथ. १२:१०.

आपल्यापैकी कोणालाही अपमान झालेला आवडत नाही. विरोधी आपला अपमान करतात तेव्हा आपल्याला इतकं वाईट वाटू शकतं की आपण निराश होऊ. (नीति. २४:१०) मग अशा वेळी आपण काय करू शकतो? प्रेषित पौलप्रमाणे अपमान होत असताना आपण आनंदी राहू शकतो. कारण जेव्हा आपला अपमान आणि विरोध केला जातो तेव्हा आपण येशूचे खरे शिष्य असल्याचं दिसून येतं. (१ पेत्र ४:१४) येशूने म्हटलं होतं की त्याच्या शिष्यांचा छळ केला जाईल. (योहा. १५:१८-२०) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसोबत असंच घडलं. त्या काळात लोकांवर ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता. म्हणून लोक ख्रिश्‍चनांना कमजोर आणि मूर्ख समजायचे. तसंच, पेत्र आणि योहान यांच्याप्रमाणेच इतर ख्रिश्‍चनही “अशिक्षित व साधारण” आहेत असं यहुदी लोक मानायचे. (प्रे. कार्ये ४:१३) अनेकांना वाटायचं की ख्रिस्ती लोक कमजोर आहेत. ते राजकारणात भाग घेत नसल्यामुळे सरकारची त्यांना साथ नाही. ते सैन्यात भरती होत नसल्यामुळे युद्ध लढण्याची किंवा स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. शिवाय, लोक त्यांना तुच्छही लेखायचे. अशा प्रकारे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा अपमान करण्यात आला, तेव्हा त्यांनी प्रचारकार्य करणं थांबवलं का? नाही. टेहळणी बुरूज२०.०७ १४-१५ ¶३-४

सोमवार, २५ एप्रिल

आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या, कारण प्रेम देवापासून आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.—१ योहा. ४:७.

प्रेषित योहानचं भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं आणि त्यांनी विश्‍वासात मजबूत राहावं अशी त्याची इच्छा होती. त्याने आपल्या तीन पत्रांमध्ये जो सल्ला दिला त्यातून त्याची काळजी आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. योहानप्रमाणेच, येशूसोबत राज्य करणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचंसुद्धा आपल्यावर प्रेम आहे आणि ते आपली काळजी करतात. हे जाणून आपल्याला खरंच खूप आनंद होतो! (१ योहा. २:२७) योहानने आपल्याला जो सल्ला दिला आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू या. आपण सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा, म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक पैलूत यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा पक्का निर्धार करू या. त्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी सत्य आहेत याची स्वतःला खातरी पटवून द्या.  येशूवर असलेला आपला भरवसा मजबूत करा. मानवी विचारधारेचा आणि धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींचा विरोध करा. दुहेरी जीवन जगू नका. तसंच, जे लोक चुकीच्या गोष्टी करण्याचा तुमच्यावर दबाव आणतात त्यांचं ऐकू नका. यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जगण्याचा प्रयत्न करा. भाऊबहीण आपलं मन दुखावतात तेव्हा त्यांना क्षमा करा. आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा. असं करून, आपण आपल्या भाऊबहिणींना विश्‍वासात मजबूत राहायला मदत करू शकतो. मग जीवनात कितीही समस्या आल्या तरी आपण सत्याच्या मार्गावर चालत राहू! टेहळणी बुरूज२०.०७ २४-२५ ¶१५-१७

मंगळवार, २६ एप्रिल

देवाला योग्य वाटलं त्याप्रमाणे त्याने शरीराचा प्रत्येक अवयव आपापल्या जागी ठेवला आहे.—१ करिंथ. १२:१८.

यहोवाने त्याच्या प्रत्येक सेवकाला मंडळीत एक महत्त्वाचं स्थान दिलं आहे. मंडळीतला हरएक सदस्य एक वेगळी भूमिका निभावत असला, तरी प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच एकमेकांची गरज आहे. प्रेषित पौलने हे स्पष्ट केलं, की यहोवाचा कोणताही सेवक दुसऱ्‍या सेवकाबद्दल “मला तुझी गरज नाही,” असा विचार करू शकत नाही. (१ करिंथ. १२:२१) मंडळीतली शांती टिकून राहावी अशी आपली इच्छा असेल तर आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि सोबत मिळून काम केलं पाहिजे. (इफिस. ४:१६) अशा प्रकारे एकत्र काम केल्यामुळे भाऊबहिणींचं आपसातलं प्रेम वाढेल आणि मंडळी मजबूत होईल. मंडळीतल्या सगळ्या वडिलांना यहोवाच्या पवित्र आत्म्याने नियुक्‍त केलं जातं. पण तरीही प्रत्येकाची कौशल्यं आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. (१ करिंथ. १२:१७) काहींना अलीकडेच वडील म्हणून नेमण्यात आलेलं असतं, आणि त्यामुळे बाकीच्या वडिलांइतका त्यांना फारसा अनुभव नसतो. तर असेही काही वडील असतात ज्यांना वाढत्या वयामुळे आणि आरोग्याच्या समस्यांमुळे जास्त काही करता येत नाही. असं असलं तरी कोणत्याही वडिलाने दुसऱ्‍या वडिलाबद्दल असा विचार करू नये की, “मला तुमची गरज नाही.” याउलट, प्रत्येक वडिलाने रोमकर १२:१० या वचनात दिलेल्या पौलच्या सल्ल्याप्रमाणे वागलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०८ २६ ¶१-२, ४

बुधवार, २७ एप्रिल

या जगाचं दृश्‍य बदलत आहे.—१ करिंथ. ७:३१.

जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावर चालत राहण्यासाठी यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन देतो. बायबलच्या एखाद्या शिकवणीबद्दल देवाची संघटना काही नवीन स्पष्टीकरण देते किंवा नैतिक स्तरांबद्दल काही मार्गदर्शन देते, तेव्हा आपण ते लगेच स्वीकारतो आणि लागू करतो. पण इतर गोष्टींच्या बाबतीत संघटना काही बदल करते आणि त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, तेव्हा काय? जसं की, ज्या सभागृहात आपण जायचो ते विकलं जातं तेव्हा. आपण यहोवासाठी काम करतो आणि यहोवा त्याची संघटना चालवतो ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली, तर आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो. (कलस्सै. ३:२३, २४) मंदिराच्या बांधकामासाठी दान देण्याच्या बाबतीत दावीद राजाने एक चांगलं उदाहरण मांडलं. त्याने म्हटलं: “तुला स्वखुशीने दान देणारा मी कोण? आणि माझे लोक तरी काय? कारण, आम्हाला सगळं काही तुझ्याकडूनच मिळालंय. आणि जे काही आम्ही तुला दिलंय, ते तूच आम्हाला दिलं आहेस.” (१ इति. २९:१४) आपणसुद्धा जेव्हा अनुदान देतो तेव्हा खरंतर यहोवाने आपल्याला जे दिलं आहे तेच त्याला देत असतो. असं असलं, तरी यहोवासाठी आपण जो वेळ, शक्‍ती आणि पैसा खर्च करतो, त्याची तो मनापासून कदर करतो.—२ करिंथ. ९:७. टेहळणी बुरूज२०.११ २२-२३ ¶१४-१६

गुरुवार, २८ एप्रिल

जो ढगांकडे पाहत राहतो, तो कापणी करणार नाही.—उप. ११:४.

आपण किती लोकांना सत्यात यायला मदत करतो यावरून आपलं यश ठरत नाही. (लूक ८:११-१५) तर आपण किती धीराने प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करत राहतो त्यावरून यहोवा आपलं यश मोजतो. असं का म्हणता येईल? कारण यहोवाने आणि त्याच्या मुलाने आपल्याला जे काम करायला सांगितलं आहे ते आपण करत असतो. (मार्क १३:१०; प्रे. कार्ये ५:२८, २९) प्रचार करण्याचं आणखी एक कारण म्हणजे या दुष्ट जगाचा अंत खूप वेगाने जवळ येत आहे. जो थोडाफार वेळ उरला आहे त्यात आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवायचा आहे. म्हणून उशीर करू नका! आणि प्रचाराचं हे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी जीवनात योग्य परिस्थिती येण्याची वाट पाहू नका. पाऊल उचलण्याची हीच वेळ आहे! प्रचारकार्याबद्दल आपली आवड वाढवा, बायबलचं ज्ञान वाढवा, धैर्यवान व्हा आणि स्वतःला शिस्त लावा. जगभरात प्रचाराचं काम करणाऱ्‍या ८० लाखांपेक्षा जास्त लोकांमध्ये सामील व्हा आणि यहोवाकडून मिळणारा आनंद अनुभवा. (नहे. ८:१०; लूक ५:१०) जोपर्यंत यहोवा हे काम थांबवायला सांगत नाही, तोपर्यंत त्यात पुरेपूर भाग घेण्याचा निश्‍चय करा. टेहळणी बुरूज२०.०९ ७ ¶१८-२०

शुक्रवार, २९ एप्रिल

जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव.—१ तीम. ६:२०.

आपण धनसंपत्तीमुळे किंवा जगातल्या इतर गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू देऊ नये. पैशाच्या फसव्या ताकदीमुळे यहोवावरचं आपलं प्रेम, देवाच्या वचनाबद्दल असलेली आपली कदर आणि बायबलबद्दल लोकांना सांगायची आपली इच्छा नाहीशी होऊ शकते. (मत्त १३:२२) यहोवाने आपल्याला ज्या मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत त्या जर आपल्याला जपून ठेवायच्या असतील, तर धोका दिसताच आपण लगेच पाऊल उचललं पाहिजे. त्यासाठी इंटरनेट वापरताना, चित्रपट किंवा टीव्हीवर कार्यक्रम पाहताना अचानाक एखादं अश्‍लील किंवा हिंसक दृश्‍य, किंवा धर्मत्यागाबद्दलची माहिती समोर आली, तर आपण लगेच कोणतं पाऊल उचलणार हे आपण आधीच ठरवलं पाहिजे. आपण जर आधीच तयारी केली असेल, तर धोका समोर आल्यावर आपल्याला लगेच पाऊल उचलता येईल. यामुळे यहोवाच्या नजरेत आपण शुद्ध राहू आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री टिकून ठेवू. (स्तो. १०१:३; १ तीम. ४:१२) यहोवाने आपल्याला बायबलमधली जी मौल्यवान सत्यं दिली आहेत आणि ही सत्यं इतरांना शिकवण्याचा जो बहुमान दिला आहे, या दोन्ही गोष्टी आपण जपून ठेवल्या पाहिजेत. आपण जर असं केलं तर आपला विवेक शुद्ध राहील, आपण अर्थपूर्ण जीवन जगू आणि इतरांना यहोवाबद्दल शिकवण्याचा आनंद आपल्याला मिळेल. टेहळणी बुरूज२०.०९ २९-३० ¶१६-१९

शनिवार, ३० एप्रिल

तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.—यश. ३०:२०.

तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का? असेल, तर तुमच्या बाप्तिस्म्याच्या वेळी तुम्ही सगळ्यांसमोर हे जाहीर केलं होतं, की यहोवावर तुमचा विश्‍वास आहे आणि त्याच्या संघटनेसोबत काम करायची तुमची इच्छा आहे. आज यहोवा ज्या प्रकारे त्याची संघटना चालवत आहे त्यातून त्याचं व्यक्‍तिमत्त्व, त्याचा उद्देश आणि त्याचे स्तर दिसून येतात. यहोवाच्या संघटनेतून दिसून येणाऱ्‍या त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या तीन पैलूंकडे लक्ष द्या. पहिला पैलू म्हणजे “देव भेदभाव करत नाही.” (प्रे. कार्ये १०:३४) मानवांवर असलेल्या प्रेमामुळेच त्याने “सर्वांच्या मोबदल्यात खंडणी म्हणून” आपल्या मुलाचं बलिदान दिलं. (१ तीम. २:६; योहा. ३:१६) यहोवा त्याच्या लोकांद्वारे सर्वांपर्यंत आनंदाचा संदेश पोचवत आहे. अशा प्रकारे, ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना यहोवा खंडणीचा फायदा घेण्याची, म्हणजेच आपला जीव वाचवण्याची संधी देतो. दुसरा पैलू म्हणजे, यहोवा सुव्यवस्थेचा आणि शांतीचा देव आहे. (१ करिंथ. १४:३३, ४०) त्यामुळे त्याचे सेवकही सुव्यवस्थितपणे आणि शांतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. तिसरा पैलू म्हणजे, यहोवा एक महान “शिक्षक” आहे. (यश. ३०:२१) म्हणूनच मंडळीत आणि सेवाकार्यात बायबलबद्दल शिकवायला त्याची संघटना इतकी मेहनत घेते. टेहळणी बुरूज२०.१० २० ¶१-३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा