मार्च
मंगळवार, १ मार्च
तुमचा द्वेष करतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात.—लूक ६:२२.
लोकांनी आपला द्वेष करावा अशी आपली मुळीच इच्छा नसते. तसंच, आपल्या विश्वासामुळे लोकांनी आपला छळ करावा अशीसुद्धा आपली इच्छा नसते. मग येशूने असं का म्हटलं, की लोक आपला द्वेष करतात तेव्हा आपण सुखी किंवा आनंदी राहू शकतो? याची तीन कारणं आहेत. पहिलं, द्वेष होत असतानाही आपण यहोवाची सेवा करतो, तेव्हा त्याला आनंद होतो. (१ पेत्र ४:१३, १४) दुसरं, आपल्या विश्वासाची पारख होऊन तो आणखी मजबूत होतो. (१ पेत्र १:७) आणि तिसरं, भविष्यात आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचं मौल्यवान बक्षीस मिळेल. (रोम. २:६, ७) येशूचं पुनरुत्थान झालं त्यानंतर लगेचच प्रेषितांनी येशूने सांगितलेला आनंद अनुभवला. त्यांना फटके मारण्यात आले आणि त्यांनी प्रचार करू नये अशी ताकीद देण्यात आली, तरीसुद्धा ते आनंदी होते. कारण त्यांना “येशूच्या नावासाठी अनादर करायच्या लायकीचं समजण्यात आलं” होतं. (प्रे. कार्यं ५:४०-४२) येशूवर त्यांचं इतकं प्रेम होतं, की शत्रूंच्या द्वेषाला ते जरासुद्धा घाबरले नाहीत. आणि या प्रेमामुळेच “आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.” आजसुद्धा बरेच भाऊबहीण समस्या असतानाही, विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. कारण आपण केलेलं काम आणि देवाच्या नावाबद्दल दाखवलेलं प्रेम तो कधीच विसरणार नाही, हे त्यांना माहीत आहे. टेहळणी बुरूज२१.०३ २५ ¶१८-१९
बुधवार, २ मार्च
त्याने माणसांना अनंतकाळाची जाणीव दिली आहे.—उप. ३:११.
अभिषिक्त ख्रिश्चनांना स्वर्गाच्या जीवनाची आशा जन्मापासूनच मिळते असं नाही; तर यहोवा ती आशा त्यांना देतो. आपल्या या आशेबद्दल ते मनन करतात, प्रार्थना करतात आणि ती पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहतात. स्वर्गातलं आपलं शरीर नेमकं कसं असेल याची ते कल्पनासुद्धा करू शकत नाहीत. (फिलिप्पै. ३:२०, २१; १ योहा. ३:२) पण तरीसुद्धा ते स्वर्गाच्या राज्यात राजे आणि याजक म्हणून सेवा करण्यासाठी आतुर आहेत. दुसरी मेंढरं पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कायम जगण्याची इच्छा जन्मापासूनच मानवांमध्ये असते. दुसरी मेंढरं त्या दिवसाची मोठ्या आनंदाने वाट पाहत आहेत, जेव्हा ते संपूर्ण पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करतील. ते घरं बांधायची, बगिचे लावायची आणि आपल्या मुलांसोबत एक परिपूर्ण आरोग्य अनुभवायची आतुरतेने वाट पाहत आहेत. (यश. ६५:२१-२३) याशिवाय, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करून डोंगर, जंगलं आणि समुद्र पाहायची, आणि यहोवाने निर्माण केलेल्या सगळया गोष्टींचं जवळून निरीक्षण करायची ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण सगळ्यात मोठा आनंद त्यांना या गोष्टीचा आहे, की भविष्यात यहोवासोबतचं त्यांचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत जाईल. टेहळणी बुरूज२१.०१ १८-१९ ¶१७-१८
गुरुवार, ३ मार्च
त्याने खऱ्या देवाचं मंदिर जाळून टाकलं, आणि सगळ्या मौल्यवान गोष्टींचा नाश केला.—२ इति. ३६:१९.
खास्द्यांनी हल्ला करून सर्व काही नष्ट केल्यानंतर लोकांनी ते पाहून म्हटलं: “तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे.” (यिर्म. ३२:४३) योएलने भविष्यवाणी केल्याच्या जवळपास २०० वर्षांनंतर यहोवाने यिर्मयाद्वारे या हल्ल्याबद्दल आणखी काहीतरी सांगितलं. त्याने म्हटलं की हल्ला करणारे, वाईट कामं करणाऱ्या एकेक इस्राएली व्यक्तीला शोधून काढतील आणि कोणीच त्यांच्या हातून सुटणार नाही. त्याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे की “परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणाऱ्यांस [मच्छीमारांना] बोलावीन, म्हणजे ते त्यांस पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकाऱ्यांस बोलावीन; म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारीतून त्यांस हुसकून काढून त्यांची शिकार करतील. . . . त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांस देईन.” म्हणजेच, पश्चात्ताप न करणारे इस्राएली लोक समुद्र, डोंगर किंवा रान अशा कुठल्याच ठिकाणी बाबेलच्या सैन्यापासून लपू शकणार नव्हते.—यिर्म. १६:१६, १८. टेहळणी बुरूज२०.०४ ५ ¶१२-१३
शुक्रवार, ४ मार्च
लोट उशीर करू लागला.—उत्प. १९:१६.
आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या प्रसंगी लोट यहोवाच्या आज्ञेचं पालन करण्यात उशीर करत होता. आपण कदाचित विचार करू की लोट यहोवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करत होता. पण यहोवाने त्याला मदत करायचं सोडलं नाही. कारण “परमेश्वराची करुणा” किंवा दया त्याच्यावर होती आणि म्हणून स्वर्गदूतांनी त्याच्या कुटुंबाचा हात धरून त्यांना नगराबाहेर आणून सोडलं. (उत्प. १९:१५, १६) बऱ्याचशा कारणांमुळे यहोवाने लोटला दया दाखवली असेल. लोटला कदाचित नगराबाहेर असलेल्या लोकांची भीती वाटत असावी आणि म्हणून तो निघायला उशीर करत होता. तसंच, इतर गोष्टींमुळेही त्याला भीती वाटत असावी. दोन राजे जवळच्याच खोऱ्यात डांबराने भरलेल्या खड्यात पडले हे लोटला कदाचित माहीत असावं. (उत्प. १४:८-१२) एक पती आणि पिता या नात्याने लोटला आपल्या कुटुंबाची काळजी होती. त्याचबरोबर, लोट श्रीमंत असल्यामुळे सदोममध्ये त्याचं एक भलंमोठं घर असावं. (उत्प. १३:५, ६) पण यहोवाच्या आज्ञेचं पालन करण्यात उशीर करण्याची ही काही रास्त कारणं नव्हती. तरीपण यहोवाने लोटच्या चुकांपलीकडे पाहिलं आणि त्याने त्याला एक “नीतिमान” माणूस म्हटलं.—२ पेत्र २:७, ८. टेहळणी बुरूज२०.०४ १८ ¶१३-१४
शनिवार, ५ मार्च
तुझे तरुण पहाटेच्या दवासारखे आहेत.—स्तो. ११०:३.
तरुण भावांनो, ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून पाहिलं आहे त्यांना कदाचित ही गोष्ट स्वीकारायला थोडा वेळ लागू शकतो, की तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही याची खातरी बाळगू शकता की यहोवा तुमचं फक्त बाहेरचं रूप पाहत नाही तर आतून तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तो पाहतो. (१ शमु. १६:७) दावीदच्या उदाहरणातून तुम्ही आणखी एक गोष्ट शिकू शकता. ती म्हणजे, यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. दावीदने यहोवासोबतची आपली मैत्री घट्ट करण्यासाठी त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं जवळून निरीक्षण केलं. सृष्टीतून निर्माणकर्त्याबद्दल काय शिकायला मिळतं यावर त्याने मनन केलं. (स्तो. ८:३, ४; १३९:१४; रोम. १:२०) याशिवाय दावीदप्रमाणेच तुम्ही मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे शाळेत कुणी तुमची थट्टा करत असेल तर तुम्ही काय करू शकता? या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रार्थनेत तुम्ही यहोवाला मदत मागू शकता. तसंच बायबलमध्ये, आपल्या प्रकाशमनांध्ये आणि वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये याबद्दल जे व्यावहारिक सल्ले दिले आहेत ते तुम्ही लागू करू शकता. समोर येणारी प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी यहोवा तुम्हाला कशी मदत करतो हे जेव्हा तुम्ही स्वतः पाहाल तेव्हा त्याच्यावरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. इतकंच नाही, तर तुम्ही यहोवावर भरवसा ठेवता हे जेव्हा इतर लोक पाहतील तेव्हा तेही तुमच्यावर भरवसा ठेवतील. टेहळणी बुरूज२१.०३ ४ ¶७
रविवार, ६ मार्च
प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने [यहोवाला ] आनंद होतो.—नीति. १५:८.
जवळच्या मित्रांना आपले विचार आणि भावना एकमेकांना सांगायला आवडतात. मग यहोवासोबतच्या मैत्रीबाबतीतही हे खरं आहे का? हो. यहोवा बायबलद्वारे आपले विचार आणि भावना आपल्याला सांगतो. आणि आपण त्याला प्रार्थना करून आपले विचार आणि भावना सांगू शकतो. एका प्रेमळ मित्राप्रमाणे यहोवा आपल्या प्रार्थना फक्त ऐकतच नाही तर त्यांचं उत्तरही देतो. कधीकधी त्यांचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं. तर काही वेळा एका विषयाबद्दल आपल्याला खूप वेळा प्रार्थना करावी लागू शकते. तरी आपण खातरी बाळगू शकतो की तो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपल्या प्रार्थनांचं उत्तर नक्की देईल. पण हेही खरं आहे की यहोवा आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही तर कदाचित वेगळं उत्तर देईल. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या परीक्षेचा सामना करत असू तर तो त्या परीक्षेतून आपल्याला बाहेर काढण्याऐवजी “ती सहन” करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देईल. (१ करिंथ. १०:१३) प्रार्थना या अमूल्य देणगीबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे “प्रार्थना करत राहा” या यहोवाने दिलेल्या सल्ल्याचं पालन करणं.—१ थेस्सलनी. ५:१७. टेहळणी बुरूज२०.०५ २७-२८ ¶७-८
सोमवार, ७ मार्च
जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल.—मत्त. २४:१३.
लांब अंतराच्या शर्यतीत भाग घेणारे, अडखळून पडू नये म्हणून धावत असताना नेहमी समोर लक्ष ठेवतात. आणि ते पडले तरी ते लगेच उठून पुन्हा धावू लागतात. कारण आपण कशामुळे पडलो याकडे लक्ष देण्याऐवजी, त्यांचं अंतिम रेषेकडे आणि बक्षिसाकडे लक्ष असतं. जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी बोलतो किंवा करतो. या चुकांमुळे आपण अडखळून पडू शकतो. किंवा आपल्यासोबत धावणाऱ्या इतरांच्या चुकांमुळे आपल्याला वाईट वाटू शकतं आणि यामुळे आपण अडखळू शकतो. असं होणं साहजिक आहे. आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत आणि आपण जीवनाकडे नेणाऱ्या अडचणीच्या रस्त्यावर धावत आहोत. त्यामुळे कधीकधी आपल्याला एकमेकांचा धक्का लागू शकतो आणि आपण “तक्रार” करू शकतो. (कलस्सै. ३:१३) पण आपण कशामुळे अडखळलो यावर लक्ष देण्याऐवजी आपली नजर बक्षिसावर असली पाहिजे आणि आपण पुढे धावत राहिलं पाहिजे. कारण जर आपण मनात राग धरून तिथेच बसून राहिलो, तर आपल्याला शर्यत पूर्ण करता येणार नाही आणि बक्षीसही मिळवता येणार नाही. शिवाय, जीवनाकडे नेणाऱ्या अडचणीच्या रस्त्यावर जे धावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही आपण अडथळा बनू. टेहळणी बुरूज२०.०४ २६ ¶१; २८ ¶८-९
मंगळवार, ८ मार्च
ते राज्य या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल, आणि फक्त तेच कायम टिकेल.—दानी. २:४४.
दानीएल संदेष्ट्याने एकानंतर एक येणाऱ्या अशा मानवी सरकारांचा उल्लेख केला ज्यांनी देवाच्या लोकांवर राज्य केलं किंवा त्यांचा छळ केला. त्या सरकारांची तुलना त्याने धातूंनी बनलेल्या एका मोठ्या पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांशी केली. त्या पुतळ्याची पावलं लोखंड आणि मातीच्या मिश्रणाने बनलेली होती. आणि ही पावलं शेवटच्या मानवी सरकाराला सूचित करतात. ही पावलं किंवा शेवटचं सरकार म्हणजे, ब्रिटन-अमेरिका महासत्ता. या भविष्यवाणीचा असा अर्थ होतो की, देवाचं सरकार सर्व मानवी सरकारांचा नाश करेल तेव्हासुद्धा ब्रिटन-अमेरिका महासत्ता राज्य करत असेल. प्रेषित योहाननेसुद्धा अशा महासत्तांबद्दल सांगितलं ज्यांनी देवाच्या लोकांवर राज्य केलं. योहानने पाहिलेल्या दृष्टान्तात जंगली पशूची सात डोकी सरकारांना सूचित करतात. आणि त्याचं सातवं डोकं ब्रिटन-अमेरिका महासत्तेला सूचित करतं. ही माहिती महत्त्वाची आहे, कारण या जंगली पशूला आठवं डोकं असल्याचं योहानला दिसलं नाही. जेव्हा ख्रिस्त आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य या जंगली पशूचं त्याच्या सातव्या डोक्यासोबत नाश करेल तेव्हासुद्धा हे सातवं डोकं राज्य करत असेल.—प्रकटी. १३:१, २; १७:१३, १४. टेहळणी बुरूज२०.०५ १४ ¶११-१२
बुधवार, ९ मार्च
देव प्रेम आहे.—१ योहा. ४:८.
या छोट्याशा वाक्यातून एक महत्त्वाचं सत्य आपल्या लक्षात येतं. ते म्हणजे, यहोवा जीवनाचा उगम तर आहेच, पण त्यासोबतच तो प्रेमाचाही उगम आहे. यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो! आणि त्याच्या प्रेमामुळेच आपल्याला आनंदी, समाधानी आणि सुरक्षित वाटतं. ख्रिश्चनांना एकमेकांवर प्रेम करायची आज्ञा देण्यात आली आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करायचं की नाही, याची निवड आपण करू शकत नाही. आपण ते केलंच पाहिजे. (मत्त. २२:३७-४०) यहोवाची ओळख झाल्यानंतर, येशूने दिलेली पहिली आज्ञा पाळणं आपल्याला कदाचित कठीण वाटणार नाही. कारण यहोवा परिपूर्ण आहे. तो आपल्याशी प्रेमाने वागतो आणि आपल्याला समजून घेतो. पण येशूने दिलेली दुसरी आज्ञा पाळणं आपल्याला कदाचित कठीण वाटू शकतं. कारण आपले सगळ्यात जवळचे शेजारी, म्हणजे आपले भाऊबहीण अपरिपूर्ण आहेत. आणि काही वेळा ते अशा काही गोष्टी बोलतील किंवा करतील ज्यांमुळे आपल्याला वाटेल की ते आपल्याला समजून घेत नाहीत आणि आपल्याशी प्रेमाने वागत नाहीत. अपरिपूर्ण माणसांच्या बाबतीत असं होऊ शकतं हे यहोवाला माहीत होतं. आणि म्हणून, आपण एकमेकांवर प्रेम का केलं पाहिजे आणि आपल्याला ते कसं करता येईल, हे लिहायची प्रेरणा यहोवाने बायबलच्या काही लेखकांना दिली. त्यांपैकीच एक लेखक होता प्रेषित योहान.—१ योहा. ३:११, १२. टेहळणी बुरूज२१.०१ ८ ¶१-२
गुरुवार, १० मार्च
सैतानाला तुमच्यावर विजय मिळवू देऊ नका.—२ करिंथ. २:११.
आपण नुकतीच यहोवाची सेवा करायला सुरुवात केलेली असो किंवा आपण अनेक वर्षांपासून त्याची सेवा करत असू, आपण सगळ्यांनीच स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘यहोवाच्या सेवेपासून माझं मन भरकटावं यासाठी सैतान जे काही प्रयत्न करतोय त्याचा मी विरोध करतोय का?’ उदाहरणार्थ, तुमच्या मनात अनैतिक विचार येतील असं एखादं चित्र तुम्ही टिव्हीवर किंवा इंटरनेटवर पाहिलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही कदाचित तुमच्या मनाला अशी समजूत घालाल, की हे चित्र किंवा चित्रपट काही अश्लील नाही. पण तुमचं मन विभाजित करण्यासाठी सैतानाने केलेला हा प्रयत्न असू शकतो का? त्या चित्राची तुलना एका कुऱ्हाडीशी केली जाऊ शकते. लाकडाचा मोठा ओंडका कापण्यासाठी सुरुवातीला कुऱ्हाडीने घाव घालून त्यावर छोटीशी चीर पाडली जाते. त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा-पुन्हा घाव घालून त्या ओंडक्याचे दोन तुकडे केले जातात. अगदी त्याचप्रमाणे, मनात अनैतिक विचार निर्माण करणारं ते चित्रसुद्धा आपलं मन विभाजित करू शकतं. सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे चित्र इतकं काही वाईट नाही. पण अशी चित्रं वारंवार पाहिल्यामुळे एखाद्याच्या हातून पाप घडू शकतं. आणि याचा परिणाम म्हणजे तो यहोवाला विश्वासू राहणार नाही. म्हणून तुमचं मन विभाजित होईल अशी कोणतीही गोष्ट तुमच्या मनात शिरू देऊ नका. यहोवाचं भय बाळगण्यासाठी आपलं मन एकाग्र करा. टेहळणी बुरूज२०.०६ ११-१२ ¶१४-१५
शुक्रवार, ११ मार्च
आपण, मजबूत नसलेल्यांच्या कमजोरपणाचा भार वाहिला पाहिजे.—रोम. १५:१.
अक्रियाशील झालेले भाऊबहीण सापडल्यावर त्यांना मदत करत राहणं आणि प्रोत्साहन देत राहणं खूप गरजेचं आहे. येशूने दिलेल्या उदाहरणातल्या उधळ्या मुलाला खूप काही सोसावं लागलं होतं. त्याचप्रमाणे, अक्रियाशील झालेल्या भाऊबहिणींनाही खूप काही सोसावं लागलं असेल. (लूक १५:१७-२४) आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कदाचित खूप वेळ लागू शकतो. याशिवाय, सैतानाच्या जगात राहिल्यामुळे त्यांचं यहोवासोबतचं नातंही कमजोर झालं असेल. त्यामुळे, यहोवावरचा त्यांचा विश्वास पुन्हा मजबूत करण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. येशूने सांगितलेल्या हरवलेल्या मेंढराच्या उदाहरणात, मेंढपाळाला आपलं हरवलेलं मेंढरू सापडतं तेव्हा तो कशा प्रकारे त्याला कळपात परत आणतो याचं वर्णन येशूने केलं. हरवलेलं मेंढरू शोधण्यासाठी मेंढपाळाने आधीच बराच वेळ खर्च केला होता आणि खूप मेहनत घेतली होती. पण त्याला जेव्हा दिसतं, की मेंढरू कमजोर झालं आहे आणि ते कळपापर्यंत स्वतःहून चालत येऊ शकत नाही, तेव्हा तो त्याला उचलून खांद्यावर घेतो आणि कळपात परत आणतो. (लूक १५:४, ५) अक्रियाशील झालेल्यांना पुन्हा एकदा यहोवाची सेवा करायची इच्छा असते. पण एखाद्या समस्येमुळे त्यांना ते करणं कठीण जात असेल. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला बराच वेळा द्यावा लागेल आणि मेहनत घ्यावी लागेल. यहोवाचा पवित्र आत्मा, त्याचं वचन बायबल आणि संघटनेने पुरवलेली प्रकाशनं यांच्या साहाय्याने आपण त्यांना पुन्हा यहोवासोबत नातं जोडायला मदत करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या अक्रियाशील व्यक्तीचा बायबल अभ्यास घ्यायला सांगितलं तर तुम्ही आनंदाने तयार व्हाल का? टेहळणी बुरूज२०.०६ २८ ¶१४-१५
शनिवार, १२ मार्च
तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.—योहा. १३:३५.
आपण नेहमी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. यावरून इतरांना दिसून येईल की आपण खरे ख्रिस्ती आहोत. पण प्रेमासोबतच आपल्याला “सत्याचे अचूक ज्ञान व पूर्ण समज” असली पाहिजे. (फिलिप्पै. १:९) नाहीतर आपण “चलाख माणसांकडून फसवले जाऊन, . . . प्रत्येक शिकवणीच्या वाऱ्याने इकडेतिकडे वाहवत” जाऊ. या शिकवणींमध्ये धर्मत्यागी लोकांच्या शिकवणीही येतात. (इफिस. ४:१४) पहिल्या शतकात येशूच्या शिष्यांपैकी अनेक जण त्याला सोडून गेले. पण प्रेषित पेत्र मात्र मोठ्या खातरीने म्हणाला, की “सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी” येशूकडे आहेत. (योहा. ६:६७, ६८) येशूने शिकवलेल्या सगळ्याच गोष्टी पेत्रला त्या वेळी समजल्या नव्हत्या. पण तरीसुद्धा तो विश्वासू राहिला, कारण येशू हाच ख्रिस्त आहे या गोष्टीची त्याला पक्की खातरी होती. बायबल जे काही शिकवतं त्याबद्दल आपणही आपली खातरी आणखी पक्की करत राहू शकतो. आपण जर असं केलं, तर आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी आपला विश्वास डळमळणार नाही. तसंच, आपल्याला इतरांनाही त्यांचा विश्वास मजबूत करायला मदत करता येईल.—२ योहा. १, २. टेहळणी बुरूज२०.०७ ८ ¶२; १३ ¶१८
रविवार, १३ मार्च
मुलांनो, आपण शब्दांनी किंवा फक्त तोंडाने नाही, तर कार्यांतून आणि अगदी खऱ्या मनाने प्रेम केलं पाहिजे.—१ योहा. ३:१८.
आपल्या भाऊबहिणींना सत्यात टिकून राहायला मदत करण्यासाठी आपण त्यांना कृतीतून प्रेम दाखवलं पाहिजे. (१ योहा. ३:१०, ११, १६, १७) जीवनात सगळं काही सुरळीत चाललेलं असतं फक्त तेव्हाच नाही तर समस्या येतात तेव्हासुद्धा आपण त्यांच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे. तुमच्या मंडळीत अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे? तुम्ही तिचं सांत्वन किंवा तिला व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकता का? किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वकाही गमावलेल्या आपल्या भाऊबहिणींना तुम्ही मदत करू शकता का? त्यांची घरं बांधायला किंवा राज्य सभागृहं बांधायला तुम्ही मदत करू शकता का? आपल्या भाऊबहिणींवर आपलं किती प्रेम आहे हे फक्त शब्दांतून नाही, तर कृतीतून दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो तेव्हा हे दाखवून देतो की आपण आपल्या स्वर्गात राहणाऱ्या पित्याचं अनुकरण करत आहोत. (१ योहा. ४:७, ८) प्रेम दाखवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे एकमेकांना क्षमा करणं. समजा मंडळीतली एखादी व्यक्ती आपल्याला दुखावते, पण नंतर माफीही मागते. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? झालं गेलं सगळं विसरून आपण त्यांना माफ केलं पाहिजे. असं करून आपण दाखवून देऊ की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे.—कलस्सै. ३:१३. टेहळणी बुरूज२०.०७ २४ ¶१४-१५
सोमवार, १४ मार्च
नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.—प्रे. कार्यं २४:१५.
आज जसं आपण एकेका व्यक्तीला शिकवतो तसंच पुनरुत्थान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला शिकवलं जाईल का? आजसारखंच त्या वेळी मंडळ्या असतील का? आणि नवीन लोकांना त्या मंडळ्यांमध्ये नेमलं जाईल का? आणि या नवीन लोकांना, पुढे ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेव्हाच मिळतील. पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. ती म्हणजे, ख्रिस्ताचं हजार वर्षांचं शासनकाळ संपेल तोपर्यंत “परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यश. ११:९) खरंच, हजार वर्षांदरम्यान आपल्याजवळ अशी बरीच कामं असतील ज्यांमुळे आपल्याला आनंद मिळेल! हजार वर्षांच्या त्या काळादरम्यान यहोवाला खूश करण्यासाठी त्याच्या सर्व सेवकांना सतत स्वतःमध्ये बदल करावे लागतील. त्यामुळे ते पुनरुत्थान झालेल्यांना सहानुभूती दाखवू शकतील. ते त्यांना स्वतःमध्ये बदल करायला मदत करतील. ते त्यांना त्यांच्या मनातले चुकीचे विचार आणि इच्छा काढून टाकायला, तसंच यहोवाच्या स्तरांनुसार जगायला मदत करतील. (१ पेत्र ३:८) त्या वेळी यहोवाचे लोकसुद्धा “तारण मिळवून” घेण्यासाठी स्वतःमध्ये बदल करत राहतील.—फिलिप्पै. २:१२. टेहळणी बुरूज२०.०८ १५-१६ ¶६-७
मंगळवार, १५ मार्च
प्रत्येकाने आपापल्या कामांचं परीक्षण करावं, दुसऱ्या कोणाशी तुलना करू नये.—गलती. ६:४.
आपण जर प्रेषित पौलने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे स्वतःच्या कार्यांचं परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, की आपल्यातसुद्धा अशा काही क्षमता आहेत ज्या इतरांमध्ये नाहीत. उदाहरणार्थ, मंडळीतले एखादे वडील कदाचित चांगली भाषणं देत नसतील, पण शिष्य बनवण्याच्या कामात ते कुशल असतील. किंवा कदाचित मंडळीतल्या इतर वडिलांप्रमाणे ते चांगले नियोजक नसतील. पण ते खूप प्रेमळ असतील, आणि त्यामुळे मंडळीतले भाऊबहीण बायबलमधून काही सल्ला हवा असेल तर अगदी सहज त्यांच्याकडे येत असतील. किंवा कदाचित पाहुणचार करण्याच्या बाबतीत मंडळीत त्यांचं एक चांगलं नाव असेल. (इब्री १३:२, १६) आपणसुद्धा आपल्या क्षमता ओळखल्या तर आपल्याला हे जाणवेल, की आपणही मंडळीसाठी काहीतरी करू शकतो. यामुळे आपल्यात कमीपणाची भावना येणार नाही, तर आपण आनंदी राहू. आणि इतर भाऊबहिणींमध्ये जरी आपल्यापेक्षा चांगली कौशल्यं असली, तरी आपल्याला त्यांचा हेवा वाटणार नाही. मंडळीत आपलं कोणतंही स्थान असो, आपण सगळ्यांनीच आपली सेवा आणि आपली कौशल्यं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०८ २३-२४ ¶१६-१८
बुधवार, १६ मार्च
कोणत्याही माणसाला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय, मला दिसला.—प्रकटी. ७:९.
१९३५ मध्ये अमेरिकेच्या वॉशिंगटन डी. सी. मध्ये एक अधिवेशन झालं. तिथे बंधू जे. एफ. रदरफर्ड यांनी एक भाषण दिलं. त्यांच्या भाषणाचा विषय होता “एक मोठा लोकसमुदाय.” ते ऐतिहासिक भाषण होतं. प्रकटीकरण ७:९ यात सांगितलेला “मोठा लोकसमुदाय” कोण आहे, हे बंधू रदरफर्ड यांनी आपल्या भाषणात समजावून सांगितलं. तोपर्यंत बायबल विद्यार्थ्यांना असं वाटत होतं, की मोठा लोकसमुदाय मानवांचा असा एक गट आहे जो स्वर्गात जाईल; पण त्या गटातले लोक येशूसोबत स्वर्गात राज्य करणार नाहीत, कारण अभिषिक्त ख्रिश्चनांपेक्षा ते कमी विश्वासू आहेत. बंधू रदरफर्ड यांनी शास्त्रवचनांतून हे समजावून सांगितलं, की मोठ्या लोकसमुदायाला स्वर्गाच्या जीवनाची आशा नाही. पण त्यातले लोक मोठ्या संकटातून वाचतील आणि पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगतील. (प्रकटी. ७:१४) या लोकांबद्दल येशूने म्हटलं: “माझी दुसरीही मेंढरं आहेत. ती या मेंढवाड्यातली नाहीत. मला त्यांनाही आणलं पाहिजे. ती माझा आवाज ऐकतील आणि तेव्हा एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल.” (योहा. १०:१६) ही दुसरी मेंढरं यहोवाचे विश्वासू सेवक आहेत, आणि त्यांना या पृथ्वीवर नंदनवनात सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा आहे.—मत्त. २५:३१-३३, ४६. टेहळणी बुरूज२१.०१ १४ ¶१-२
गुरुवार, १७ मार्च
माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील. पण जो शेवटपर्यंत धीर धरेल, त्यालाच वाचवलं जाईल.—मत्त. १०:२२.
आपल्याला आपलं प्रचाराचं काम धीराने करत राहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे. (मत्त. २८:१९, २०) स्वतःला शिस्त लावण्याचा गुण आपल्यात जन्मापासून नसतो. त्यामुळे एखादी गोष्ट करणं कठीण वाटतं, तेव्हा आपण सहसा ती टाळण्याचा प्रयत्न करतो. पण काही गोष्टी कठीण वाटत असल्या, तरी त्या करणं महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे. असं करण्यासाठी कोणता गुण आपल्याला मदत करेल? आत्मसंयम. आणि हा गुण विकसित करण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मदत करतो. (गलती. ५:२२, २३) स्वतःला शिस्त लावण्याच्या बाबतीत प्रेषित पौलचं एक चांगलं उदाहरण आहे. योग्य ते करण्यासाठी त्यालाही जणू आपल्या “शरीराला बुक्के” मारावे लागले असं तो म्हणतो. (१ करिंथ. ९:२५-२७) त्याने इतरांनाही स्वतःला शिस्त लावण्याचं आणि “सर्व गोष्टी योग्य पद्धतीने व सुव्यवस्थितपणे” करण्याचं प्रोत्साहन दिलं. (१ करिंथ. १४:४०) त्याच प्रकारे, आपणसुद्धा यहोवाच्या उपासनेशी संबंधित गोष्टी करायला स्वतःला शिस्त लावली पाहिजे. या गोष्टींमध्ये प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम नियमितपणे करणंही येतं.—प्रे. कार्ये २:४६. टेहळणी बुरूज२०.०९ ६-७ ¶१५-१७
शुक्रवार, १८ मार्च
सगळ्या राष्ट्रांत आधी राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.—मार्क १३:१०.
आज अनेक देशांमध्ये आपल्या कामावर कोणतीही बंदी नाही. तुम्हीही अशाच एखाद्या देशात राहत आहात का? असाल, तर स्वतःला विचारा: ‘मला मिळालेल्या या संधीचा मी कसा वापर करत आहे?’ हे शेवटले दिवस यहोवाच्या लोकांसाठी खूप रोमांचक आहेत. कारण कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर ते संपूर्ण जगात प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करत आहेत. आणि या कामात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत! तुम्ही शांतीच्या काळाचा चांगला वापर कसा करू शकता? (२ तीम. ४:२) आपल्या परिस्थितीचं परीक्षण करा. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जास्त प्रचारकार्य करण्यासाठी किंवा पायनियरिंग करण्यासाठी काही फेरबदल करू शकते का? ही वेळ, भरपूर पैसा किंवा धनसंपत्ती मिळवायची नाही. कारण मोठ्या संकटाच्या वेळी या गोष्टींचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. (नीति. ११:४; मत्त. ६:३१-३३; १ योहा. २:१५-१७) लोकांना आनंदाचा संदेश सांगता यावा आणि यहोवाबद्दल शिकवता यावं म्हणून बऱ्याच प्रचारकांनी एक नवीन भाषा शिकून घेतली आहे. आणि त्यांना हे काम करता यावं म्हणून यहोवाच्या संघटनेने आज १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशनं पुरवली आहेत. टेहळणी बुरूज२०.०९ १६ ¶९-११
शनिवार, १९ मार्च
एका चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढत राहा.—१ तीम. १:१८.
एक चांगला सैनिक एकनिष्ठ असतो. ज्यांच्यावर त्याचं प्रेम असतं आणि ज्या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात, त्यांचं संरक्षण करण्यासाठी तो आपल्या जिवाची परवा न करता लढतो. म्हणून, पौलने तीमथ्यला सुभक्ती विकसित करायचं प्रोत्साहन दिलं. (१ तीम. ४:७) कारण सुभक्ती विकसित करणं म्हणजे देवाबद्दल मनात प्रेमाची आणि निष्ठेची भावना वाढवणं. देवाबद्दल आपल्या मनात जितकी जास्त प्रेमाची आणि निष्ठेची भावना वाढत जाईल, तितकंच आपण सत्यात मजबूत होत जाऊ. (१ तीम. ४:८-१०; ६:६) युद्धासाठी नेहमी तयार असण्याकरता एका सैनिकाला स्वतःला शिस्तही लावावी लागते. पौलने तीमथ्यला चुकीच्या इच्छांवर मात करण्याचा, स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करण्याचा आणि ख्रिस्ती भाऊबहिणींसोबत एकत्र येण्याचा सल्ला दिला होता. (२ तीम. २:२२) या गोष्टी करण्यासाठी त्याला नक्कीच स्वतःला शिस्त लावावी लागली असेल. पण त्यामुळे तीमथ्य सैतानाच्या हल्ल्यांचा विरोध करू शकला. आपल्यालासुद्धा आपल्या चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी स्वतःला शिस्त लावावी लागेल. (रोम. ७:२१-२५) तसंच, आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करत राहण्यासाठी आणि चांगले गुण विकसित करत राहण्यासाठीही आपल्याला स्वतःला शिस्त लावावी लागेल. (इफिस. ४:२२, २४) याशिवाय, दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण थकून गेलेलो असतो, तेव्हा सभेला जाण्यासाठी आपल्याला कदाचित खूप प्रयत्न करावे लागतील.—इब्री १०:२४, २५. टेहळणी बुरूज२०.०९ २८ ¶९-११
रविवार, २० मार्च
मी तुझ्या कायद्यांचं नेहमी, अगदी शेवटपर्यंत पालन करण्याचा निश्चय केलाय.—स्तो. ११९:११२.
विद्यार्थ्याला समर्पण करून बाप्तिस्मा घ्यायला मदत करत असताना आपण धीर दाखवला पाहिजे. पण त्याला खरंच यहोवाची सेवा करायची इच्छा आहे का हेसुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. तो येशूच्या आज्ञांचं पालन करत आहे हे तुम्हाला दिसून येतं का? की तो फक्त माहिती घेण्यासाठी बायबल अभ्यास करत आहे? विद्यार्थी कशी प्रगती करत आहे याकडे वेळोवेळी लक्ष द्या. जसं की, त्याला यहोवाबद्दल कसं वाटतं हे तो बोलून दाखवतो का? तो यहोवाला प्रार्थना करतो का? (स्तो. ११६:१, २) त्याला बायबल वाचायला आवडतं का? (स्तो. ११९:९७) तो नियमितपणे सभांना येतो का? (स्तो. २२:२२) शिकलेल्या गोष्टींनुसार तो आपल्या जीवनात बदल करतो का? शिकत असलेल्या गोष्टी तो आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगतो का? (स्तो. ९:१) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याला यहोवाचा साक्षीदार व्हायची इच्छा आहे का? (स्तो. ४०:८) यांपैकी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत विद्यार्थी प्रगती करत नसेल, तर त्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्याबद्दल स्पष्टपणे, पण प्रेमाने त्याच्याशी बोला. टेहळणी बुरूज२०.१० १८ ¶१४-१५
सोमवार, २१ मार्च
ज्याने मला पाठवलं तो माझ्यासोबत आहे. त्याने मला एकटं सोडलं नाही, कारण मी नेहमी त्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो.—योहा. ८:२९.
येशूचा स्वर्गातला पिता यहोवा नेहमीच योग्य निर्णय घेतो. आणि त्याच्या पृथ्वीवरच्या पालकांनीसुद्धा योग्य निर्णय घेतले. पण मोठा झाल्यावर येशूला स्वतःच आपले निर्णय घ्यावे लागले. (गलती. ६:५) आपल्या सगळ्यांसारखंच त्यालाही निवड करायचं स्वातंत्र्य होतं. त्याला हवं असतं तर तो स्वतःचाच विचार करू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. त्याने यहोवासोबत एक चांगलं नातं टिकवून ठेवायची निवड केली. यहोवाच्या उद्देशात आपली काय भूमिका आहे हे समजल्यावर येशूने यहोवाची इच्छा पूर्ण करायची निवड केली. (योहा. ६:३८) बरेच लोक आपला द्वेष करतील हे त्याला माहीत होतं. आणि या गोष्टीचा विचार करून त्याला कदाचित वाईटही वाटलं असेल. पण तरीसुद्धा त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करायची निवड केली. इ.स. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला, त्यानंतर त्याने आपलं संपूर्ण लक्ष यहोवाकडून मिळालेली जबाबदारी पूर्ण करण्यावर लावलं. (इब्री १०:५-७) त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं तेव्हासुद्धा त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं.—योहा. १९:३०. टेहळणी बुरूज२०.१० २९ ¶१२; ३० ¶१५
मंगळवार, २२ मार्च
मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.—इब्री १३:५.
तुमच्या मंडळीत असा एखादा भाऊ किंवा बहीण आहे का, जी आजारामुळे किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे, किंवा मग दुसऱ्या एखाद्या समस्येमुळे दुःखी आहे? असेल, तर त्यांना धीर देण्यासाठी आपल्याला काय बोलता येईल किंवा काय करता येईल हे सुचवण्यासाठी आपण यहोवाला मदत मागू शकतो. आपल्या प्रेमळ शब्दांमुळे किंवा आपण केलेल्या मदतीमुळे त्यांना खरंच खूप धीर मिळू शकतो; कदाचित त्या भावाला किंवा बहिणीला त्याचीच गरज असेल. (१ पेत्र ४:१०) आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण यहोवा आपल्यासोबत आहे. तो आपल्याला येशू आणि स्वर्गदूतांद्वारे मदत करतो. तसंच, आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा कधीकधी अधिकाऱ्यांद्वारेसुद्धा आपल्याला मदत करू शकतो. याशिवाय, तो आपल्या भाऊबहिणींद्वारेही आपल्याला मदत करतो. आणि ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांनी स्वतः अनुभवली आहे. त्यामुळे प्रेषित पौलसारखंच आपणही पूर्ण भरवशाने असं म्हणू शकतो: “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?”—इब्री १३:६. टेहळणी बुरूज२०.११ १७ ¶१९-२०
बुधवार, २३ मार्च
तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.—यश. ३०:१५.
यहोवा आपल्यासोबत आहे याचा स्पष्ट पुरावा प्रेषितांकडे होता. कारण यहोवाने त्यांना चमत्कार करायची शक्ती दिली होती. (प्रे. कार्यं ५:१२-१६; ६:८) आज यहोवा आपल्याला चमत्कार करण्याची शक्ती देत नाही. पण त्याच्या वचनाद्वारे तो हे आश्वासन देतो, की नीतीने वागल्यामुळे आपल्याला दुःख जरी सोसावं लागलं तरी आपण आनंदी राहू शकतो. कारण आपण जेव्हा देवाची बाजू घेतो तेव्हा त्याला आनंद होतो आणि त्याची पवित्र शक्ती आपल्यावर असते. (१ पेत्र ३:१४; ४:१४) त्यामुळे भविष्यात जेव्हा आपला छळ केला जाईल तेव्हा आपण काय करू याचा आपण जास्त विचार करू नये. त्याऐवजी आपला छळ होईल तेव्हा यहोवा आपल्याला नक्की मदत करेल आणि वाचवेल यावरचा आपला भरवसा आज आपण मजबूत केला पाहिजे. तसंच, येशूने दिलेल्या अभिवचनावर आपण भरवसा ठेवला पाहिजे. त्याने म्हटलं होतं: “मी तुम्हाला असे शब्द आणि बुद्धी देईन, की तुमचे सगळे विरोधक एक झाले, तरी त्यांना तुमचा प्रतिकार करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला जमणार नाही.” त्याने पुढे असंही म्हटलं: “जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.” (लूक २१:१२-१९) शिवाय आपण हे कधीही विसरू नये, की जे लोक मृत्यूपर्यंत यहोवाला विश्वासू राहतात त्यांची छोट्यातली छोटी गोष्ट लक्षात ठेवून तो भविष्यात त्यांचं पुनरुत्थान करेल. टेहळणी बुरूज२१.०१ ४ ¶१२
गुरुवार, २४ मार्च
नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे, अशी मीसुद्धा देवाकडून आशा बाळगतो.—प्रे. कार्यं २४:१५.
पुनरुत्थानाबद्दल फक्त प्रेषित पौलच बोलला नाही, तर याआधी ईयोबसुद्धा बोलला होता. ईयोबला याची पूर्ण खातरी होती, की त्याच्या मृत्यूनंतर यहोवा त्याला विसरणार नाही. तो त्याला पुन्हा जिवंत करेल. (ईयो. १४:७-१०, १२-१५) पुनरुत्थानाची शिकवण ही आपल्या ‘प्राथमिक शिकवणींपैकी’ एक आहे. (इब्री ६:१, २) पौलने पुनरुत्थानाबद्दल जी चर्चा केली ती आपल्याला १ करिंथकरच्या १५ व्या अध्यायात वाचायला मिळते. त्यात त्याने जे लिहिलं त्यामुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना नक्कीच खूप दिलासा मिळाला असेल आणि आज आपल्यालाही मिळू शकतो. आपण कितीही वर्षांपासून पुनरुत्थानाची वाट पाहत असलो तरी, त्यावर चर्चा केल्यामुळे पुनरुत्थानाची आपली आशा आणखी पक्की होईल. येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला याची खातरी मिळते, की आपली जी जवळची माणसं आज आपल्यात नाहीत, त्यांना पुनरुत्थानाची आशा आहे. पौलने सुरुवातीला करिंथच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगितला, तेव्हा त्याने त्यांना येशूच्या पुनरुत्थानाबद्दलही सांगितलं होतं. (१ करिंथ. १५:१, २) पुढे तो म्हणाला, की एखाद्या ख्रिश्चनाचा जर येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास नसेल, तर त्याच्या विश्वासाला काहीच अर्थ नाही.—१ करिंथ. १५:१७. टेहळणी बुरूज२०.१२ २ ¶२-४
शुक्रवार, २५ मार्च
येशूचे शब्द पेत्रला आठवले आणि तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.—मत्त. २६:७५.
कोणत्या गोष्टींनी प्रेषित पेत्रला सावरायला मदत केली? एक म्हणजे, त्याला हे आठवलं असेल की त्याचा विश्वास खचू नये म्हणून येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. येशूने पेत्रसाठी मनापासून केलेली प्रार्थना यहोवाने ऐकली. नंतर जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं तेव्हा तो स्वतः पेत्रला भेटला; त्याला धीर देण्यासाठीच तो त्याला भेटला असेल. (लूक २२:३२; २४:३३, ३४; १ करिंथ. १५:५) तसंच, तो प्रसंगही आठवा जेव्हा प्रेषितांनी मासे धरण्यासाठी रात्रभर मेहनत करूनही त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. तेव्हा पुनरुत्थान झालेला येशू त्यांना भेटला. त्या वेळी येशूने पेत्रला आपल्यावरचं प्रेम व्यक्त करायची संधी दिली आणि त्याला आणखी जबाबदाऱ्या सोपवल्या. यावरून दिसून आलं, की आपल्या या प्रिय मित्राला येशूने माफ केलं होतं. (योहा. २१:१५-१७) येशू पेत्रशी ज्या प्रकारे वागला त्यावरून दिसून येतं, की येशूसुद्धा यहोवाप्रमाणेच खूप दयाळू आहे. त्यामुळे आपण जेव्हा चुका करतो, तेव्हा यहोवा आपल्याला माफ करणार नाही असा आपण कधीही विचार करू नये. कारण आपण असा विचार करावा हेच तर सैतानाला पाहिजे. उलट आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो, त्याला आपल्या कमतरतांची जाणीव आहे आणि आपल्याला माफ करायला तो नेहमी तयार असतो. (स्तो. १०३:१३, १४) आणि इतर जण आपलं मन दुखावतात, तेव्हा आपण त्यांच्याशी यहोवासारखंच दयाळूपणे वागलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.१२ २०-२१ ¶१७-१९
शनिवार, २६ मार्च
मी भरवसा ठेवीन.—स्तो. २७:३.
बायबलमध्ये अशा काही लोकांची उदाहरणं दिली आहेत ज्यांनी यहोवावर भरवसा ठेवला नाही. त्यांच्या उदाहरणांचं परीक्षण केल्यामुळे त्यांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतील. यहूदाचा राजा आसा याचाच विचार करा. आसा राजावर जेव्हा समस्या आल्या, तेव्हा त्याने यहोवाकडे मदत मागितली. पण नंतर मात्र तो मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिला नाही. त्याने स्वतःच्या बळावर आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. (२ इति. १६:१-३, १२) वरवर पाहिल्यावर आपल्याला कदाचित असं वाटेल, की आसा राजाने सीरियाच्या राजाकडून घेतलेल्या मदतीमुळे यहूदावरचं संकट टळलं. पण खरंतर यहूदामध्ये फार काळ शांती टिकून राहिली नाही. यहोवाने एका संदेष्ट्याद्वारे त्याला सांगितलं: “तू तुझा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी सीरियाच्या राजावर भरवसा ठेवलास, म्हणून सीरियाचा राजा तुझ्या हातून निसटून गेला.” (२ इति. १६:७) आसाने केलेल्या चुकांमधून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो? तो म्हणजे, आपण यहोवाच्या मदतीशिवाय स्वतःच्या समस्या सोडवू शकतो, असा फाजील आत्मविश्वास आपण कधीही बाळगू नये. कधीकधी परिस्थितीमुळे आपल्याला पटकन निर्णय घ्यावे लागले तरी आपण शांत राहून यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. योग्य निर्णय घ्यायला तो नक्कीच आपल्याला मदत करेल. टेहळणी बुरूज२१.०१ ६ ¶१३-१५
रविवार, २७ मार्च
यापुढे ते कधी भुकेले असणार नाहीत.—प्रकटी. ७:१६.
बिकट आर्थिक परिस्थिती, दंगली किंवा युद्धं यांमुळे आज यहोवाच्या लोकांपैकी काहींची उपासमार होत आहे. तर काहींना आपल्या विश्वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं आहे. पण मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना माहीत आहे, की या दुष्ट जगाच्या नशातून वाचल्यानंतर त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नसेल. खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल असेल. तसंच, त्यांना यहोवाकडून भरपूर शिक्षणही मिळेल. आणि यहोवा सैतानाच्या जगाचा नाश करेल, तेव्हा तो आपल्या जळजळीत क्रोधाची “झळ” मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना लागू देणार नाही. मग मोठ्या संकटातून वाचलेल्या लोकांना येशू, सर्वकाळाच्या “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांकडे घेऊन जाईल.” (प्रकटी. ७:१७) विचार करा: मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना किती सुंदर आशा आहे! ते कधीच मरणार नाहीत! (योहा. ११:२६) दुसऱ्या मेंढरांतल्या लोकांना जी सुंदर आशा आहे, त्याबद्दल ते यहोवाचे आणि येशूचे खूप आभारी आहेत. टेहळणी बुरूज२१.०१ १६-१७ ¶११-१२
सोमवार, २८ मार्च
प्रभू विश्वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि तुमचं संरक्षण करेल.—२ थेस्सलनी. ३:३.
आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशू या गोष्टीचा विचार करत होता, की आपल्या शिष्यांना पुढे कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल. शिष्यांवर प्रेम असल्यामुळे त्याने यहोवाला अशी विनंती केली: “त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ.” (योहा. १७:१४, १५) आपण स्वर्गात गेल्यानंतर सैतान यहोवाच्या प्रत्येक सेवकाचा छळ करेल, हे येशूला माहीत होतं. त्यामुळे आज आपल्याला यहोवाच्या संरक्षणाची कधी नव्हती इतकी गरज आहे. कारण सैतानाला स्वर्गातून काढून पृथ्वीवर फेकण्यात आलं आहे आणि ‘तो खूप क्रोधित झाला आहे.’ (प्रकटी. १२:१२) तो काहींना असा विचार करायला लावतो, की त्यांनी आपला छळ केला तर एकाअर्थी ते ‘देवाची पवित्र सेवा करत आहेत.’ (योहा. १६:२) आणि काही तर असे आहेत, की ते देवावर विश्वास ठेवत नाहीत, तरीसुद्धा ते आपला छळ करतात. कारण आपण त्यांच्यासारखं जगत नाही. लोकांनी कोणत्याही कारणासाठी आपल्याला छळलं तरी आपण घाबरणार नाही. का? याचं उत्तर आजच्या वचनात दिलं आहे. टेहळणी बुरूज२१.०३ २६ ¶१, ३
मंगळवार, २९ मार्च
कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही, जे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केलं आहे.—रोम. ८:३९.
यहोवा आपल्यासाठी जे काही करतो ते आपल्यावर प्रेम असल्यामुळे करतो. तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. आपल्यावर प्रेम असल्यामुळेच यहोवाने खंडणी बलिदानाची व्यवस्था केली. आणि येशूबद्दल म्हणायचं, तर त्याचंही आपल्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच त्याने आपल्यासाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं. (योहा. ३:१६; १५:१३) आपण जर यहोवाला आणि येशूला एकनिष्ठ राहिलो, तर कोणतीही गोष्ट आपल्याला त्यांच्या प्रेमापासून वेगळी करू शकणार नाही. (योहा. १३:१; रोम. ८:३५) त्याचप्रमाणे कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबासाठी जे काही करतो ते त्याने त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे केलं पाहिजे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर प्रेषित योहान आपल्याला देतो. त्याने म्हटलं: ‘जो आपल्या भावावर [किंवा कुटुंबावर] प्रेम करत नाही, तो न पाहिलेल्या देवावर प्रेम करूच शकत नाही.’ (१ योहा. ४:११, २०) ज्या पुरुषाचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे तो यहोवा आणि येशू यांच्याप्रमाणेच आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक, भावनिक आणि रोजच्या गरजा पूर्ण करेल. (१ तीम. ५:८) तसंच, तो आपल्या मुलांवर चांगले संस्कार करेल आणि गरज पडल्यावर त्यांना शिस्तही लावेल. याशिवाय, तो नेहमी असे निर्णय घेईल ज्यांमुळे यहोवाचा सन्मान होईल आणि त्याच्या कुटुंबाचं भलं होईल. टेहळणी बुरूज२१.०२ ५ ¶१२-१३
बुधवार, ३० मार्च
तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे, म्हणजे तो तुला सांभाळेल.—स्तो. ५५:२२.
पूर्वी आपण जे काही सोसलं त्यामुळे आपण स्वतःबद्दल वाईट विचार करतो याची आपल्या प्रेमळ पित्याला, यहोवाला जाणीव आहे. आणि आपल्यातले चांगले गुण आपल्याला जरी दिसत नसले, तरी यहोवाला ते दिसतात. (१ योहा. ३:१९, २०) आणखी एका परिस्थितीचा विचार करा. एक व्यक्ती कदाचित एखादी वाईट सवय सोडायचा खूप प्रयत्न करत असेल. पण पुन्हा तीच चूक केल्यामुळे ती निराश होते. आपल्यालाही असं वाटू शकतं, आणि असं वाटणं साहजिक आहे. (२ करिंथ. ७:१०) पण आपण स्वतःला नको तितका दोष देऊ नये. आणि असा टोकाचा विचार करू नये, की ‘आपण काहीच कामाचे नाही. यहोवा आपल्याला कधीच माफ करणार नाही.’ कारण हे खरं नाही. अशा विचारसरणीमुळे आपण कदाचित यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ. त्यामुळे निराश होण्याऐवजी, आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्याकडे माफी मागितली पाहिजे. (यश. १:१८) केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला खरंच वाईट वाटतं आणि ती चूक सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, हे पाहून यहोवा नक्कीच तुम्हाला माफ करेल. याशिवाय, मंडळीतल्या वडिलांशीही बोला. ते तुम्हाला यहोवासोबत पुन्हा एक जवळचं नातं जोडायला धीराने मदत करतील.—याको. ५:१४, १५. टेहळणी बुरूज२०.१२ २३ ¶५-६
गुरुवार, ३१ मार्च
वयस्कर स्त्रियांना आई समजा आणि तरुण स्त्रियांना आपल्या बहिणी समजा.—१ तीम. ५:२.
येशूने स्त्रियांचा आदर केला. येशूच्या काळात परूशी लोक स्त्रियांना खूप कमी समजायचे. शास्त्रवचनांबद्दल त्यांच्याशी बोलायची तर दूरची गोष्ट, चारचौघांतसुद्धा ते त्यांच्याशी बोलत नव्हते. पण येशू त्या परुशी लोकांसारखा नव्हता. उलट, तो आपल्या शिष्यांसोबत शास्त्रवचनांवर जशी चर्चा करायचा, तशीच तो स्त्रियांशीही करायचा. (लूक १०:३८, ३९, ४२) येशू वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराला जायचा तेव्हा त्याच्या शिष्यांशिवाय काही स्त्रियाही त्याच्यासोबत असायच्या. (लूक ८:१-३) इतकंच नाही तर आपलं पुनरुत्थान झालं आहे हे आपल्या शिष्यांना सांगण्याचा बहुमानही त्याने स्त्रियांना दिला. (योहा. २०:१६-१८) प्रेषित पौलनेसुद्धा स्त्रियांचा आदर केला. आणि त्याने तीमथ्यलाही आठवण करून दिली की त्याने स्त्रियांचा आदर करावा. पौलने ही गोष्ट मान्य केली की सर्वात आधी तीमथ्यच्या आईने आणि आजीने त्याला “पवित्र लिखाणांचं” ज्ञान दिलं. (२ तीम. १:५; ३:१४, १५) तसंच, पौलने रोमकरांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने बहिणींचा खास त्यांच्या नावाने उल्लेख केला आणि त्यांना आपला नमस्कार कळवला. आपल्या या ख्रिस्ती बहिणींनी यहोवाच्या सेवेत जी काही मेहनत घेतली होती त्याचा त्याने फक्त उल्लेख केला नाही, तर त्यासाठी त्यांचे मनापासून आभारही मानले.—रोम. १६:१-४, ६, १२; फिलिप्पै. ४:३. टेहळणी बुरूज२१.०२ १५ ¶५-६