वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es22 पृ. १९-३०
  • फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ फेब्रुवारी
  • बुधवार, २ फेब्रुवारी
  • गुरुवार, ३ फेब्रुवारी
  • शुक्रवार, ४ फेब्रुवारी
  • शनिवार, ५ फेब्रुवारी
  • रविवार, ६ फेब्रुवारी
  • सोमवार, ७ फेब्रुवारी
  • मंगळवार, ८ फेब्रुवारी
  • बुधवार, ९ फेब्रुवारी
  • गुरुवार, १० फेब्रुवारी
  • शुक्रवार, ११ फेब्रुवारी
  • शनिवार, १२ फेब्रुवारी
  • रविवार, १३ फेब्रुवारी
  • सोमवार, १४ फेब्रुवारी
  • मंगळवार, १५ फेब्रुवारी
  • बुधवार, १६ फेब्रुवारी
  • गुरुवार, १७ फेब्रुवारी
  • शुक्रवार, १८ फेब्रुवारी
  • शनिवार, १९ फेब्रुवारी
  • रविवार, २० फेब्रुवारी
  • सोमवार, २१ फेब्रुवारी
  • मंगळवार, २२ फेब्रुवारी
  • बुधवार, २३ फेब्रुवारी
  • गुरुवार, २४ फेब्रुवारी
  • शुक्रवार, २५ फेब्रुवारी
  • शनिवार, २६ फेब्रुवारी
  • रविवार, २७ फेब्रुवारी
  • सोमवार, २८ फेब्रुवारी
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२२
es22 पृ. १९-३०

फेब्रुवारी

मंगळवार, १ फेब्रुवारी

नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.—फिलिप्पै. २:३.

आपल्या भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न करा. सभांच्या आधी आणि नंतर त्यांच्याशी बोला, त्यांच्यासोबत प्रचारकार्य करा आणि शक्य असेल तर त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला कदाचित कळेल की जी बहीण मिळून-मिसळून वागत नाही असं तुम्हाला वाटायचं, ती खरंतर खूप लाजाळू आहे; एखादा श्रीमंत भाऊ खरंतर पैशाच्या मागे धावत नाही, उलट तो खूप उदार आहे; किंवा सभांना नेहमी उशिरा येणाऱ्‍या कुटुंबाला खरंतर विरोधाचा सामना करावा लागत आहे. (ईयो. ६:२९) हे खरं आहे की आपण दुसऱ्‍यांच्या जीवनात “लुडबुड” करू नये. (१ तीम. ५:१३) पण, आपल्या भाऊबहिणींच्या परिस्थितीबद्दल आणि त्यांना जीवनात आलेल्या अनुभवांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेणं शक्य होईल. एखाद्या बांधवाच्या काही सवयींमुळे आपल्याला चीड येऊ शकते. अशा वेळी आपण त्यांच्या पार्श्‍वभूमीबद्दल, ते कोणत्या परिस्थितीत वाढले आहेत याबद्दल जाणून घेतलं तर ते तसे का वागतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. हे खरं आहे की भाऊबहिणींना चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. पण जेव्हा तुम्ही ‘आपलं मन मोठं करा’ हा बायबलमधला सल्ला लागू करता, तेव्हा तुम्ही यहोवाचं अनुकरण करता. कारण यहोवा “सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम करतो.”—१ तीम. २:३,४; २करिंथ. ६:११-१३. टेहळणी बुरूज२०.०४ १६-१७ ¶१०-१२

बुधवार, २ फेब्रुवारी

कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.—योहा. १५:१३.

आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री येशूने शिष्यांना पुन्हा याची आठवण करून दिली, की त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं. कारण त्याला माहीत होतं, की असं निःस्वार्थ प्रेमच त्यांना एकत्र राहायला आणि जगाचा द्वेष सहन करायला मदत करेल. थेस्सलनीका मंडळीचाच विचार करा. ती मंडळी तयार झाली तेव्हापासूनच त्यातल्या भाऊबहिणींचा छळ होत होता. पण तरीसुद्धा ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहिले आणि एकमेकांवर प्रेम करत राहिले. (१ थेस्सलनी. १:३, ६, ७) त्यांनी पुढेही असंच प्रेम करत राहावं, उलट ते “जास्तीत जास्त” करावं असं प्रोत्साहन पौलने त्यांना दिलं. (१ थेस्सलनी. ४:९, १०) कारण हे प्रेमच त्यांना निराश झालेल्यांचं सांत्वन करायची आणि दुर्बळांना आधार द्यायची प्रेरणा देणार होतं. (१ थेस्सलनी. ५:१४) पौलने दिलेला हा सल्ला त्यांनी नक्कीच पाळला असं म्हणता येईल. कारण जवळपास एका वर्षानंतर पौलने त्यांना जे दुसरं पत्र लिहिलं त्यात त्याने असं म्हटलं: ‘तुमच्यापैकी प्रत्येकाचं एकमेकांवरचं प्रेम वाढत आहे.’ (२ थेस्सलनी. १:३-५) त्यांच्यातल्या या प्रेमामुळेच ते संकटांचा आणि छळाचा धीराने सामना करू शकले. टेहळणी बुरूज२१.०३ २२ ¶११

गुरुवार, ३ फेब्रुवारी

आपण आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.—इब्री १२:१.

आपल्याला जर सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस मिळवायचं असेल, तर आपण ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर धावलं पाहिजे किंवा ख्रिस्ती जीवनशैलीप्रमाणे जगलं पाहिजे. (प्रे. कार्ये २०:२४; १ पेत्र २:२१) पण, आपण ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावर धावू नये अशी सैतानाची आणि त्याचं अनुकरण करणाऱ्‍यांची इच्छा आहे. त्यांना वाटतं, की आपण त्यांच्यासोबत आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीप्रमाणे जगावं. (१ पेत्र ४:४) आपण ज्या प्रकारे जीवन जगतो, त्याची ते टिंगल करतात. तसंच, ते ज्या मार्गावर चालत आहेत तोच जास्त चांगला आहे आणि त्यावर चालल्याने स्वातंत्र्य मिळतं असं ते म्हणतात. पण हे साफ खोटं आहे! (२ पेत्र २:१९) खरंच, जीवनात योग्य मार्ग निवडणं खूप महत्त्वाचं आहे! पण सैतानाची इच्छा आहे, की आपण सर्वांनी “जीवनाकडे” नेणाऱ्‍या अडचणीच्या रस्त्यावर धावायचं सोडून द्यावं. आज जगातल्या बहुतेक लोकांप्रमाणे आपणही पसरट रस्त्यावर जावं असं त्याला वाटतं. या रस्त्यावर बरेच लोक आहेत आणि त्यावर चालणं सोपं आहे. पण शेवटी तो “नाशाकडे” नेतो. (मत्त. ७:१३, १४) म्हणून, योग्य मार्गावरून न भरकटता त्यावर धावत राहण्यासाठी आपण यहोवावर भरवसा ठेवून त्याचं ऐकलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०४ २६ ¶१; २७ ¶५, ७

शुक्रवार, ४ फेब्रुवारी

मी अशी विनंती करतो, की याचना, प्रार्थना, इतरांच्या वतीने विनवण्या केल्या जाव्यात. हे यासाठी, की आपल्याला देवाला पूर्णपणे विश्‍वासू राहून, शांतपणे जीवन जगता यावं.—१ तीम. २:१, २.

अलीकडच्या काही वर्षांत रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्रंही ‘वैभवी देशात’ शिरले आहेत. (दानी. ११:४१) २०१७ मध्ये आजच्या या उत्तरेच्या राजाने देवाच्या लोकांच्या कार्यावर बंदी आणली आणि आपल्या काही भाऊबहिणींना तुरुंगातसुद्धा टाकलं. त्याने आपल्या प्रकाशनांवर आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन यावरही बंदी आणली. तसंच, नंतर त्या राजाने आपलं रशियातलं शाखा कार्यालय, राज्य सभागृहं आणि संमेलनगृहंही जप्त केली. त्याच्या या कार्यांमुळे २०१८ मध्ये नियमन मंडळाने रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्रं उत्तरेचा राजा आहे असं म्हटलं. पण जगातली सरकारं देवाच्या लोकांचा छळ करत असली तरी ते त्यांच्याविरुद्ध लढणार नाहीत किंवा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणार नाहीत. ते बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचं पालन करून, “उच्च पदांवर असलेले अधिकारी” याच्यासाठी प्रार्थना करतात. खासकरून ते आपल्या उपासनेच्या स्वातंत्र्याशी संबंधित निर्णय घेतात तेव्हा. टेहळणी बुरूज२०.०५ १४ ¶९

शनिवार, ५ फेब्रुवारी

स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.—१ तीम. ४:१६.

पालकांनो! बायबल जे शिकवतं तेच सत्य आहे याची तुमच्या मुलांना खातरी पटण्यासाठी देवासोबत त्यांचं एक वैयक्‍तिक नातं असणं, आणि बायबल जे शिकवतं तेच सत्य आहे याची त्यांना स्वतःला खातरी असणंही गरजेचं आहे. तुम्हाला जर आपल्या मुलांना देवाबद्दलचं सत्य शिकवायचं असेल, तर तुम्ही स्वतः बायबलचा चांगला अभ्यास करणारे आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन करणारे असलं पाहिजे. मगच तुम्ही आपल्या मुलांना या गोष्टी करायला शिकवू शकाल. ज्या प्रकारे तुम्ही आपल्या बायबल विद्यार्थ्याला बायबल अभ्यासाची साधनं वापरायला शिकवता, अगदी त्याच प्रकारे तुम्ही आपल्या मुलांनासुद्धा ही साधनं वापरायला शिकवली पाहिजे. यामुळे मुलं यहोवावर प्रेम करायला शिकतील. तसंच, आज यहोवा विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचा उपयोग करून आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो यावरचा त्यांचा भरवसाही वाढेल. (मत्त. २४:४५-४७) म्हणून आपल्या मुलांना बायबलची मूलभूत सत्यं शिकवण्यावरच समाधान मानू नका; तर त्यांचं वय आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांना ‘देवाच्या गहन गोष्टीही’ शिकवा. यामुळे देवावरचा त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होईल.—१ करिंथ. २:१०. टेहळणी बुरूज२०.०७ १०-११ ¶१०, १२-१३

रविवार, ६ फेब्रुवारी

यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते, पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.—नीति. ३:३२.

अपरिपूर्ण मानवांपैकी असे किती आहेत जे यहोवाचे जवळचे मित्र आहेत? असे लाखो लोक आहेत. येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे त्यांना देवासोबत मैत्री करणं शक्य होतं. यामुळे यहोवा आपल्याला त्याचे मित्र बनू देतो आणि आपण त्याला आपलं जीवन समर्पित करू शकतो. जेव्हा आपण ही पावलं उचलतो तेव्हा लाखो समर्पित ख्रिश्‍चनांप्रमाणे या विश्‍वातल्या सर्वोच्च अधिकाऱ्‍याचे आपण जवळचे मित्र बनतो! देवासोबतच्या मैत्रीची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? अब्राहाम आणि ईयोब यहोवाला शंभरपेक्षा जास्त वर्षं विश्‍वासू राहिले. या दुष्ट जगात आपणसुद्धा त्यांच्यासारखंच शेवटच्या श्‍वासापर्यंत विश्‍वासू राहिलं पाहिजे. दानीएलप्रमाणे आपणही आपल्या जीवनापेक्षा देवासोबतच्या मैत्रीला जास्त मौल्यवान समजलं पाहिजे. (दानी. ६:७, १०, १६, २२) देवाच्या मदतीने आपण कोणत्याही परीक्षेचा सामना करू शकतो आणि त्याच्यासोबत मैत्रीचं नातं टिकवून ठेवू शकतो.—फिलिप्पै. ४:१३. टेहळणी बुरूज२०.०५ २७ ¶५-६

सोमवार, ७ फेब्रुवारी

मला तुझ्या नावाचं एकाग्र मनाने भय बाळगायला शिकव.—स्तो. ८६:११; तळटीप.

एकदा दावीद राजा आपल्या महालाच्या छतावर फिरत होता, तेव्हा त्याला एका दुसऱ्‍या माणसाची स्त्री अंघोळ करताना दिसली. या बाबतीत देवाचा स्तर काय आहे हे त्याला माहीत होतं. “आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको,” असं नियमशास्त्रात सांगितलं आहे हे त्याला माहीत होतं. (निर्ग. २०:१७) पण तरीसुद्धा तो बघत राहिला. त्याचं मन यहोवाला खूश करण्यावर एकाग्र राहिलं नाही तर ते त्या स्रीकडे, बथशेबाकडे भरकटू लागलं. खरंतर दावीदने नेहमीच यहोवावर प्रेम केलं होतं, त्याचं भय बाळगलं होतं. पण या प्रसंगी त्याने काही चुकीच्या गोष्टी केल्या. तो यहोवाचा उपासक असल्यामुळे यहोवाचं नाव बदनाम झालं. याशिवाय, त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि निरपराध लोकांवर भयंकर संकट ओढवलं. (२ शमु. ११:१-५, १४-१७; १२:७-१२) यहोवाने दावीदला शिक्षा केली तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली. आणि तो पुन्हा एकदा यहोवासोबत आधीसारखं चांगलं नातं जोडू शकला. (२ शमु. १२:१३; स्तो. ५१:२-४, १७) आपलं मन भरकटू दिल्यामुळे जे संकट आणि दुःख दावीदवर ओढवलं ते तो कधीच विसरला नाही. म्हणूनच स्तोत्र ८६:११ मध्ये दावीदने देवाकडे अशी विनंती केली, “मला तुझ्या नावाचं एकाग्र मनाने भय बाळगायला शिकव.” मग यहोवाने दावीदला त्याचं मन एकाग्र करायला मदत केली का? हो नक्कीच केली. कारण बायबल पुढे म्हणतं की “दावीद याचे मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे” होते.—१ राजे ११:४; १५:३. टेहळणी बुरूज२०.०६ ११ ¶१२-१३

मंगळवार, ८ फेब्रुवारी

प्रेमाच्या दोरांनी मी त्यांना ओढत राहिलो.—होशे. ११:४; तळटीप.

यहोवाला आपल्या लोकांबद्दल जे प्रेम वाटतं त्याची तुलना बायबलमध्ये एका दोरीसोबत करण्यात आली आहे. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. अशी कल्पना करा, की तुम्ही एका खोल खड्ड्यात पडला आहात. तो इतका खोल आहे, की तुम्हाला स्वतःहून त्यातून बाहेर येणं शक्य नाही. त्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे; तो म्हणजे, कोणीतरी तुमच्याकडे दोरी फेकावी आणि तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढावं. आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्यापासून दूर गेलेल्या इस्राएली लोकांना यहोवा प्रेमळपणे आपल्याकडे ‘ओढत राहिला.’ आज ज्यांनी यहोवाची सेवा करायचं थांबवलं आहे, आणि जे समस्यांनी व चिंतांनी दबून गेले आहेत त्यांच्याबद्दल यहोवाला असंच वाटतं. ते जणू एका खोल खड्ड्यात पडले आहेत. यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना समजावं अशी त्याची इच्छा आहे. तसंच, त्यांना प्रेमाच्या दोरांनी आपल्याजवळ आणावं असंही त्याला वाटतं. आणि त्यासाठी तो तुमचा उपयोग करू शकतो. अक्रियाशील झालेल्या लोकांना याचं आश्‍वासन देणं खूप गरजेचं आहे, की यहोवाचं आणि आपलंसुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे. टेहळणी बुरूज२०.०६ २७ ¶१२-१३

बुधवार, ९ फेब्रुवारी

जो माणूस धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी!—याको. १:१२.

स्तेफनची हत्या झाली तेव्हा अनेक ख्रिस्ती यरुशलेम सोडून “यहूदीया आणि शोमरोनच्या प्रदेशांत विखुरले गेले.” आणि काही जण तर कुप्र आणि अंत्युखियाला पळून गेले. (प्रे. कार्यं ७:५८–८:१; ११:१९) त्या ख्रिश्‍चनांना किती समस्यांचा सामना करावा लागला असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण तरी, ते जिथे कुठे गेले तिथे त्यांनी आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला. आणि त्यामुळे संपूर्ण रोमी साम्राज्यात अनेक मंडळ्या तयार झाल्या. (१ पेत्र १:१) पण एवढ्यावरच त्यांच्या समस्या संपल्या नाहीत. पुढे त्यांना आणखी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. जसं की, इ. स. ५० च्या आसपास रोमी सम्राट क्लौद्य याने सगळ्या यहुद्यांना रोम सोडून जायचा हुकूम दिला. त्यामुळे, जे यहुदी ख्रिस्ती बनले होते त्यांना आपली घरंदारं सोडून दुसरीकडे राहायला जावं लागलं. (प्रे. कार्यं १८:१-३) पुढे इ. स. ६१ च्या जवळपास प्रेषित पौलने असं लिहिलं, की अनेक भाऊबहिणींचा चारचौघांत अपमान करण्यात आला, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांची मालमत्ता लुटण्यात आली. (इब्री १०:३२-३४) याशिवाय, इतर लोकांप्रमाणेच ख्रिश्‍चनांनाही गरिबीचा आणि आजारपणाचा सामना करावा लागला.—रोम. १५:२६; फिलिप्पै. २:२५-२७. टेहळणी बुरूज२१.०२ २६-२७ ¶२-४

गुरुवार, १० फेब्रुवारी

आपला फार कमी वेळ उरला आहे हे ओळखून सैतान खूप क्रोधित होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.—प्रकटी. १२:१२.

आपण जर आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली तर सैतान आणि त्याला साथ देणारे कधीच आपल्याला सत्याच्या मार्गावर चालत राहण्यापासून रोखू शकणार नाहीत. (२ योहा. ८, ९) जग आपला द्वेष करेल ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. (१ योहा. ३:१३) योहानने म्हटलं: “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहा. ५:१९) या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतसा सैतानाचा राग आणखी वाढत आहे. धर्मत्यागी लोकांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टी आणि अनैतिकता यांसारख्या छुप्या मार्गांनीच सैतान आपल्यावर हल्ला करत नाही, तर तो उघडपणेसुद्धा आपल्यावर हल्ला करतो; जसं की, क्रूरपणे केलेला छळ. आपलं प्रचारकार्य बंद करण्यासाठी आणि आपला विश्‍वास कमजोर करण्यासाठी सैतानाजवळ खूप कमी वेळ आहे हे त्याला माहीत आहे. त्यामुळे काही देशांत आपल्या कार्यावर पूर्णपणे किंवा काही प्रमाणात बंदी घालण्यात आली आहे या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. असं असलं तरी त्या देशांतले आपले भाऊबहीण विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. ते दाखवून देत आहेत की सैतानाने यहोवाच्या सेवकांवर कितीही हल्ले केले तरी ते यहोवाला विश्‍वासू राहू शकतात. टेहळणी बुरूज२०.०७ २४ ¶१२-१३

शुक्रवार, ११ फेब्रुवारी

देवाचं दान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचं जीवन हे आहे.—रोम. ६:२३.

या सुंदर पृथ्वीवर मानवांनी सर्वकाळ जगावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा होती. पण आदाम आणि हव्वाने यहोवाची आज्ञा मोडली. त्यामुळे ते पापी बनले आणि त्यांनी सर्वकाळाचं जीवन गमावलं. आणि हीच गोष्ट पुढे सर्व मानवजातीच्या बाबतीत घडली. (रोम. ५:१२) यासाठी यहोवाने कोणतं पाऊल उचललं? पाप आणि मृत्यूतून मानवांची सुटका करण्यासाठी त्याने लगेच एक व्यवस्था केली. (उत्प. ३:१५) ती व्यवस्था म्हणजे त्याने आपल्या मुलाचं, येशूचं बलिदान द्यायचं ठरवलं. या व्यवस्थेमुळे यहोवाची सेवा करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन मिळू शकणार होतं. (योहा. ३:१६; १ करिंथ. १५:२१, २२) यहोवा आपल्या मुलाद्वारे लाखो लोकांचं पुनरुत्थान एकाच वेळी करणार नाही, अशी अपेक्षा आपण करू शकतो. कारण अचानक इतके लोक जिवंत होऊन आले तर पृथ्वीवर गोंधळ माजू शकतो. आणि बायबल म्हणतं, यहोवा कधीच अव्यवस्थितपणे काही करत नाही. त्याला माहीत आहे, की शांती टिकवून ठेवण्यासाठी सगळं काही व्यवस्थित होणं गरजेचं आहे.—१ करिंथ. १४:३३. टेहळणी बुरूज२०.०८ १४ ¶३ १५ ¶५

शनिवार, १२ फेब्रुवारी

स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.—१ तीम. ४:१६.

आपल्या बायबल विद्यार्थ्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. ती म्हणजे, त्याने पुढे जाऊन एक साक्षीदार म्हणून यहोवाची सेवा करावी यासाठी आपण त्याच्यासोबत बायबल अभ्यास करतो. एक प्रामाणिक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेण्यासाठी टप्प्याटप्याने प्रगती करतो. सर्वातआधी, तो यहोवाबद्दल शिकून घेतो आणि त्याच्यावर प्रेम करायला, त्याच्यावर विश्‍वास ठेवायला शिकतो. (योहा. ३:१६; १७:३) मग, यहोवासोबत आणि मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत तो जवळची मैत्री करतो. (इब्री १०:२४, २५; याको. ४:८) काही काळाने, तो आपल्या वाईट सवयी सोडून देतो आणि केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करतो. (प्रे. कार्ये ३:१९) तसंच, शिकत असलेल्या गोष्टींवर त्याचा विश्‍वास असल्यामुळे तो त्यांबद्दल इतरांना सांगतो. (२ करिंथ. ४:१३) मग तो यहोवाला आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो. (१ पेत्र ३:२१; ४:२) बाप्तिस्म्याचा तो दिवस सर्वांसाठी खरंच किती आनंदाचा दिवस असतो! विद्यार्थी जेव्हा बाप्तिस्मा घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रगती करत असतो, तेव्हा त्याची मनापासून आणि भरभरून प्रशंसा करा. आणि पुढेही अशीच प्रगती करत राहण्याचं त्याला प्रोत्साहन द्या. टेहळणी बुरूज२०.१० १७-१८ ¶१२-१३

रविवार, १३ फेब्रुवारी

पायाने जर म्हटलं, की “मी हात नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,” तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही.—१ करिंथ. १२:१५.

तुम्ही जर स्वतःची तुलना मंडळीतल्या इतर भाऊबहिणींशी केली तर ‘मंडळीत माझं काहीच स्थान नाही’ असं कदाचित तुम्हाला वाटेल. मंडळीतले काही जण कदाचित चांगले शिक्षक असतील, चांगले नियोजक असतील, किंवा ते खूप चांगल्या प्रकारे इतरांचं सांत्वन करत असतील, त्यांना प्रोत्साहन देत असतील. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल, की मी त्यांच्याइतकं चांगलं काम करू शकत नाही. यावरून दिसून येतं, की तुम्ही नम्र आहात आणि तुम्हाला तुमच्या मर्यादांची जाणीव आहे. (फिलिप्पै. २:३) पण यासोबतच तुम्ही सावधही असलं पाहिजे. कारण तुम्ही जर सतत स्वतःची तुलना इतरांशी आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांशी करत राहाल, तर तुम्ही निराश व्हाल. प्रेषित पौलने उल्लेख केला त्याप्रमाणे कदाचित तुम्हालाही असं वाटेल, की मंडळीत माझं काहीच स्थान नाही. यहोवाने पहिल्या शतकात काही ख्रिश्‍चनांना पवित्र आत्म्याची कृपादानं दिली होती. म्हणजेच त्यांना काही खास क्षमता दिल्या होत्या. पण त्या सगळ्यांना एकसारखीच कृपादानं मिळाली नव्हती, ती वेगवेगळी होती. (१ करिंथ. १२:४-११) पण प्रत्येक व्यक्‍ती त्याच्यासाठी महत्त्वाची होती. आज पवित्र आत्म्याची अशी कृपादानं आपल्याला मिळत नाहीत. पण यातून आपण एक गोष्ट शिकतो. ती म्हणजे, आज आपल्याजवळ एकसारखीच कौशल्यं नसली, तरीही आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवासाठी महत्त्वाचा आहे. टेहळणी बुरूज२०.०८ २२-२३ ¶१३-१५

सोमवार, १४ फेब्रुवारी

यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.—स्तो. ११८:६.

धैर्य वाढवण्यासाठी आणि धाडसी होण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा यहोवा नक्की तुमची प्रार्थना ऐकेल. तो तुम्हाला कधीच सोडून देणार नाही. (प्रे. कार्ये ४:२९, ३१) तो नेहमी तुमच्या पाठीशी आहे. याशिवाय, समस्यांवर मात करण्यासाठी आणि जीवनात बदल करण्यासाठी यहोवाने तुम्हाला कशी मदत केली याचाही विचार करा. ज्या देवाने आपल्या लोकांना लाल समुद्र पार करायला मदत केली, तो तुम्हाला ख्रिस्ताचा शिष्य व्हायला मदत करणार नाही का? नक्कीच करेल! (निर्ग. १४:१३) आजच्या वचनात स्तोत्रकर्त्याने जसा भरवसा दाखवला तसाच भरवसा तुम्हीसुद्धा बाळगू शकता. यहोवा नवीन प्रचारकांनाही धैर्य वाढवण्यासाठी मदत करू शकतो. टोमोयो नावाच्या बहिणीचा अनुभव विचारात घ्या. तिने जेव्हा घरोघरचं प्रचारकार्य करायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्याच घरात एक बाई तिला ओरडून म्हणाली: “मला यहोवाच्या साक्षीदारांसोबत काहीच बोलायचं नाहीए.” आणि तिने तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला. तेव्हा टोमोयो घाबरली नाही. उलट, ती आपल्यासोबत असलेल्या बहिणीला म्हणाली: “तू ऐकलंस ती काय बोलली? मी एक शब्दही बोलले नाही, तरी तिने लगेच ओळखलं की मी यहोवाची साक्षीदार आहे. याचा मला खूप आनंद होतोय.” आज टोमोयो एक नियमित पायनियर म्हणून सेवा करत आहे. टेहळणी बुरूज२०.०९ ६ ¶१३-१४

मंगळवार, १५ फेब्रुवारी

आसाने आपला देव यहोवा याच्या नजरेत जे चांगलं आणि योग्य तेच केलं.—२ इति. १४:२.

आसा लोकांना म्हणाला, की यहोवाने “आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” (२ इति. १४:६, ७) पण, शांतीचा हा काळ मौजमजा करण्याचा किंवा निवांत राहण्याचा काळ आहे असा त्याने विचार केला नाही. याउलट, त्याने देशात शहरं, शहराच्या भिंती, बुरूज आणि शहराचे दरवाजे बांधायला सुरुवात केली. तो यहूदाच्या लोकांना म्हणाला: “देश आपल्या हाती आहे.” आसाला काय म्हणायचं होतं? हेच, की देवाने दिलेल्या या देशात शत्रूंची भीती नसल्यामुळे त्यांना कुठेही येण्या-जाण्याची आणि बांधकाम करण्याची मोकळीक आहे. त्याने लोकांना या शांतीच्या काळाचा चांगला वापर करण्याचं प्रोत्साहन दिलं. आसाने या शांतीच्या काळाचा उपयोग आपलं सैन्य मजबूत करण्यासाठीही केला. (२ इति. १४:८) याचा अर्थ असा होतो का, की त्याचा यहोवावर भरवसा नव्हता? नाही. भविष्यात शत्रूंचा हल्ला होऊ शकतो याची त्याला जाणीव होती. म्हणून राजा या नात्याने त्याने आपल्या राज्यातल्या लोकांना स्वतःचं संरक्षण करायचं प्रशिक्षण दिलं. तसंच, देशातला हा शांतीचा काळ कदाचित नेहमीच टिकून राहणार नाही, हेही त्याला माहीत होतं. आणि पुढे तसंच झालं. टेहळणी बुरूज२०.०९ १५ ¶४-५

बुधवार, १६ फेब्रुवारी

लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.—१ करिंथ. ४:६.

एका ख्रिस्ती वडिलाला मंडळीची काळजी असते. आणि त्यामुळे देवाच्या मेंढरांचं रक्षण करण्यासाठी आपण नियम बनवले पाहिजेत असा तो कदाचित विचार करेल. पण काही बाबतींत एका ख्रिस्ती वडिलाच्या आणि एका कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्‍या वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, मंडळीत न्याय करण्याची जबाबदारी यहोवाने ख्रिस्ती वडिलांना दिली आहे. मंडळीतली एखादी व्यक्‍ती चुकीचं काम करत असेल आणि त्याबद्दल ती पश्‍चाताप करत नसेल, तर तिला मंडळीतून काढून टाकण्याची जबाबदारी यहोवाने वडिलांना दिली आहे. (१ करिंथ. ५:११-१३) दुसरीकडे पाहता, यहोवाने कुटुंबप्रमुखांना असे काही अधिकार दिले आहेत जे मंडळीतल्या वडिलांना दिलेले नाहीत. उदाहरणार्थ, यहोवाने कुटुंबप्रमुखांना आपल्या कुटुंबासाठी नियम बनवण्याची आणि ते नियम पाळले जातात याची खातरी करण्याची जबाबदारी दिली आहे. (रोम. ७:२) जसं की, आपल्या मुलांनी संध्याकाळी किती वाजायच्या आत घरी आलं पाहिजे हे ठरवायचा अधिकार कुटुंबप्रमुखाला आहे. आणि मुलांनी जर तो नियम मोडला तर त्यांना शिस्त लावायचा अधिकारसुद्धा त्याला आहे. (इफिस. ६:१) पण आपल्या कुटुंबासाठी नियम बनवताना एका कुटुंबप्रमुखाने आपल्या पत्नीशीसुद्धा बोललं पाहिजे. कारण शेवटी ते दोघं “एकदेह आहेत.”—मत्त. १९:६. टेहळणी बुरूज२१.०२ १६-१८ ¶१०-१३

गुरुवार, १७ फेब्रुवारी

बुद्धी पोवळ्यांपेक्षाही मौल्यवान आहे; तुला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीशी तिची तुलना करता येणार नाही.—नीति. ३:१५.

बायबलमधली सत्यं मौल्यवान असण्याचं एक कारण म्हणजे, या सत्यांचं ज्ञान यहोवा फक्‍त “योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” नम्र लोकांनाच देतो. (प्रे. कार्ये १३:४८) हे नम्र लोक मान्य करतात, की बायबलमधल्या सत्यांची समज मौल्यवान खजिन्यासारखी आहे. (नीति. ३:१३) तसंच, ते हेही मान्य करतात, की ही सत्यं आपण स्वतःहून समजू शकत नाही. म्हणून आज यहोवा ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्याला ही सत्यं शिकवतो. (मत्त. ११:२५; २४:४५) यहोवाने आपल्याला आणखी एक गोष्ट दिली आहे. ती म्हणजे, त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलचं सत्य इतरांना शिकवण्याचा बहुमान. (मत्त. २४:१४) आपण लोकांना जो संदेश सांगतो तो खूप मौल्यवान आहे. कारण त्या संदेशामुळे लोकांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनता येतं आणि त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. (१ तीम. ४:१६) आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे कमी किंवा जास्त सेवाकार्य करत असू, पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे, आज आपल्या काळात केल्या जाणाऱ्‍या सगळ्यात महत्त्वाच्या कामाला आपण हातभार लावत आहोत. (१ तीम. २:३, ४) यहोवासोबत मिळून काम करणं हा खरंच किती मोठा बहुमान आहे!—१ करिंथ. ३:९. टेहळणी बुरूज२०.०९ २६-२७ ¶४-५

शुक्रवार, १८ फेब्रुवारी

आमची बांधवांशी भेट झाली आणि त्यांनी आग्रह केल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मुक्काम केला.—प्रे. कार्यं २८:१४.

प्रेषित पौल जेव्हा रोमला चालला होता, तेव्हा त्या प्रवासादरम्यान यहोवाने अनेकदा ख्रिस्ती भाऊबहिणींद्वारे त्याला मदत केली. उदाहरणार्थ, पौल रोमला जायला निघाला तेव्हा अरिस्तार्ख आणि लूक या दोघांनीही त्याच्यासोबत जायचं ठरवलं. पण पौलला जसं येशूकडून आश्‍वासन मिळालं होतं, की तो रोमला सुरक्षितपणे पोचेल, तसं आश्‍वासन या दोघांना मिळाल्याचं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. तरीसुद्धा ते आपला जीव धोक्यात घालून पौलसोबत जायला तयार झाले. पुढे जेव्हा समुद्रात वादळ आलं, तेव्हाच त्यांना हे समजलं की त्यांचा जीव वाचेल. ते सीदोनला पोचल्यावर “पौलच्या मित्रांना त्याची कळजी घेता यावी,” म्हणून यूल्यने “त्याला त्यांच्याकडे जायची परवानगी दिली.” (प्रे. कार्यं २७:१-३) पुढे पुत्युला शहरात पोचल्यावर पौलला आणि त्याच्या सोबत्यांना बांधव भेटले आणि या बांधवांच्या आग्रहावरून त्यांनी “सात दिवस त्यांच्याकडे मुक्काम केला.” प्रवासात भेटलेल्या या भाऊबहिणींनी पौलची आणि त्याच्या सोबत्यांची चांगली काळजी घेतली. त्या वेळी, पौलनेसुद्धा त्यांना प्रोत्साहन देणारे अनेक अनुभव सांगितले असतील. आणि ते ऐकून त्या भाऊबहिणींना नक्कीच खूप आनंद झाला असेल.—प्रेषितांची कार्यं १५:२, ३ पडताळून पाहा. टेहळणी बुरूज२०.११ १५-१६ ¶१५-१७

शनिवार, १९ फेब्रुवारी

देवाची भक्‍ती आताच्या जीवनाचं आणि येणाऱ्‍या जीवनाचंही अभिवचन देते.—१ तीम. ४:८.

पालकांनो, तुमचं यहोवावर मनापासून प्रेम आहे हे तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तुमच्या मुलांना दिसू द्या. हे नेहमी लक्षात असू द्या, की तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवणं यापेक्षा मौल्यवान भेट तुम्ही त्यांना देऊ शकत नाही. तसंच, तुम्ही त्यांना नियमितपणे यहोवाची उपासना करण्याचा महत्त्वाचा धडाही शिकवू शकता. दुसऱ्‍या शब्दांत, तुम्ही त्यांना नियमितपणे बायबल अभ्यास करायला, प्रार्थना करायला, सभांना जायला आणि प्रचार करायला शिकवू शकता. (१ तीम. ६:६) हे खरं आहे, की तुम्ही त्यांच्या भौतिक गरजाही पूर्ण केल्या पाहिजेत. (१ तीम. ५:८) पण हे कधीही विसरू नका, की या जगाच्या नाशापासून वाचण्यासाठी आणि नवीन जगात जाण्यासाठी भौतिक गोष्टी नाही, तर यहोवासोबत असलेलं त्यांचं जवळचं नातंच त्यांना मदत करेल. (यहे. ७:१९) आज अनेक ख्रिस्ती पालक असे निर्णय घेतात ज्यांमुळे त्यांच्या मुलांना यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत होते. हे पाहून खरंच खूप आनंद होतो! कारण अशा कुटुंबांमध्ये वाढलेली मुलं मोठी झाल्यावरही या चांगल्या सवयी सोडून देत नाहीत. उलट, आपल्या आईवडिलांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवल्या याचा त्यांना खूप आनंद होतो.—नीति. १०:२२. टेहळणी बुरूज२०.१० २८-२९ ¶१०-११

रविवार, २० फेब्रुवारी

तुला नक्कीच असं काही होणार नाही.—मत्त. १६:२२.

प्रेषित पेत्र कधीकधी अशा काही गोष्टी बोलायचा किंवा करायचा, ज्यांचा नंतर त्याला पस्तावा व्हायचा. उदाहरणार्थ, येशूने जेव्हा आपल्या प्रेषितांना सांगितलं, की त्याला बराच छळ सोसावा लागेल आणि शेवटी त्याला ठार मारलं जाईल, तेव्हा पेत्र त्याला रागावून आजच्या वचनातले शब्द म्हणाला. (मत्त. १६:२१-२३) नंतर जेव्हा लोकांचा एक जमाव येशूला अटक करायला आला, तेव्हा पेत्र अविचारीपणे वागला; त्याने महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला. या वेळी पुन्हा येशूने त्याची चूक सुधारली. (योहा. १८:१०, ११) आणखी एका प्रसंगी पेत्र बढाई मारत म्हणाला, की इतर सगळे प्रेषित जरी येशूला सोडून गेले तरी तो त्याला कधीच सोडून जाणार नाही. (मत्त. २६:३३) पण त्याचा हा आत्मविश्‍वास फार काळ टिकला नाही. कारण नंतर त्याच रात्री लोकांच्या भीतीने त्याने तीन वेळा येशूला नाकारलं. त्यामुळे तो इतका निराश झाला की “तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.” (मत्त. २६:६९-७५) आता येशू आपल्याला कधीच माफ करणार नाही असा त्याने विचार केला असेल. हे खरं आहे, की पेत्र निराश झाला होता. पण तो इतकाही निराश झाला नाही, की त्याने यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं. उलट, नंतर तो सावरला आणि इतर प्रेषितांसोबत यहोवाची सेवा करत राहिला.—योहा. २१:१-३; प्रे. कार्यं १:१५, १६. टेहळणी बुरूज२०.१२ २० ¶१७-१८

सोमवार, २१ फेब्रुवारी

पतींनो आपल्या पत्नींसोबत विचारशीलपणे राहा. त्या स्त्रिया असल्यामुळे, जास्त नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या.—१ पेत्र ३:७.

एका कुटुंबप्रमुखाची नम्रता बऱ्‍याच मार्गांनी दिसून येते. उदाहरणार्थ, आपल्या बायको-मुलांकडून कधीच कुठली चूक होऊ नये अशी तो अपेक्षा करत नाही. त्यांची मतं त्याच्यापेक्षा वेगळी असली, तरी तो ती ऐकून घेतो आणि त्यांवर विचार करतो. आणखी एका मार्गाने पतीची नम्रता दिसून येते. घरातली कामं करायला त्याला कमीपणा वाटत नाही; मग ही कामं बायकांची आहेत असं त्याच्या समाजातले लोक मानत असले तरीही. अशा समाजात राहणाऱ्‍या पतीसाठी हे खूप कठीण असू शकतं. याबद्दल रेचल नावाची एक बहीण असं म्हणते: “मी ज्या समाजातून आले आहे तिथे जर नवऱ्‍याने आपल्या बायकोला भांडी घासायला किंवा घर साफ करायला मदत केली, तर तो बायकोचा बैल आहे असं त्याचे नातेवाईक आणि शेजारपाजारचे लोक म्हणतात. तो बायकोच्या तालावर नाचणारा आहे असा ते विचार करतात.” तुमच्या समाजातले लोकसुद्धा असाच विचार करत असतील, तर ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, की येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. हे काम खरंतर घरातल्या दासाचं असायचं. येशूप्रमाणेच, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याकडे एक चांगला कुटुंबप्रमुख लक्ष देत नाही. उलट, तो आपल्या बायको-मुलांना आनंदी ठेवण्याकडे लक्ष देतो. टेहळणी बुरूज२१.०२ २ ¶३; ४ ¶११

मंगळवार, २२ फेब्रुवारी

एक गोष्ट मात्र नक्की: मी मागच्या गोष्टी विसरून पुढे असलेल्या गोष्टी मिळवायला झटत आहे आणि बक्षीस मिळवायचा कसोशीने प्रयत्न करत आहे.—फिलिप्पै. ३:१३, १४.

चांगल्या आठवणी मनात जपून ठेवायची क्षमता यहोवानेच आपल्याला दिली आहे. पण त्या आठवणींमध्ये आपण अडकून राहू नये. कारण पूर्वी आपलं जीवन कितीही चांगलं असलं, तरी नवीन जगातलं आपलं जीवन त्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगलं असेल. कोणी आपलं मन दुखावलं तर आपण त्यांना माफ केलं पाहिजे. त्यामुळे आनंदाने यहोवाची सेवा करत राहायला आपल्याला मदत होईल. पूर्वी केलेल्या चुकांबद्दल आपण स्वतःला नको तितका दोष देऊ नये; नाहीतर आपण आनंदाने यहोवाची सेवा करू शकणार नाही. प्रेषित पौलप्रमाणे आपण हे मान्य केलं पाहिजे, की यहोवाने आपल्याला माफ केलं आहे. (१ तीम. १:१२-१५) यहोवाने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशा दिली आहे. आपण जेव्हा नवीन जगात असू तेव्हा पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवून आपण दुःखी होणार नाही. कारण त्या काळाबद्दल बायबल म्हणतं: “जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत.” (यश. ६५:१७) जरा विचार करा: आपल्यापैकी काही जण अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आले आहेत, आणि आता ते वयस्कर झाले आहेत. पण नवीन जगात ते पुन्हा तरुण होतील. (ईयो. ३३:२५) म्हणून भाऊबहिणींनो, नेहमी पुढे पाहत राहा. सतत जुन्या गोष्टींचा विचार करत बसण्याऐवजी नवीन जगावर आपली नजर ठेवा! टेहळणी बुरूज२०.११ २४ ¶४; २९ ¶१८-१९

बुधवार, २३ फेब्रुवारी

एक मोठा लोकसमुदाय मला दिसला. ते लोक मोठ्याने अशी घोषणा करत होते: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्‍याकडून मिळतं.”—प्रकटी. ७:९, १०.

भविष्यात यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण कसं करेल? मोठ्या संकटादरम्यान तो दोन मार्गांनी त्यांचं संरक्षण करेल. पहिला मार्ग, पृथ्वीवरचे राजे मोठ्या बाबेलचा, म्हणजे खोट्या धर्माच्या साम्राज्याचा नाश करतील, तेव्हा यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांचं संरक्षण करेल. (प्रकटी. १७:१६-१८; १८:२, ४) दुसरा मार्ग, यहोवा हर्मगिदोनात सैतानाच्या जगाच्या उरलेल्या भागाचा नाश करेल तेव्हासुद्धा तो आपल्या लोकांचं संरक्षण करेल. (प्रकटी. १६:१४, १६) यहोवासोबत आपलं मजबूत नातं असलं, तर सैतान कधीच आपलं कायमचं नुकसान करू शकणार नाही. उलट, त्याचाच कायमचा नाश होईल. (रोम. १६:२०) म्हणून यहोवाने दिलेली सगळी शस्त्रसामग्री आपण घालू या आणि तिचा वापर करत राहू या. तसंच, सैतानाच्या आणि या जगाच्या विरोधात असलेली लढाई एकट्यानेच लढण्याऐवजी आपण भाऊबहिणींची मदत घेऊ या आणि त्यांनाही मदत करत राहू या. याशिवाय, आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहू या. या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला बळ देईल आणि आपलं संरक्षण करेल.—यश. ४१:१०. टेहळणी बुरूज२१.०३ ३० ¶१६-१७

गुरुवार, २४ फेब्रुवारी

तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्‍तिशाली व्हाल.—यश. ३०:१५.

आपण यहोवावर विश्‍वास असल्याचं कसं दाखवू शकतो? तो देत असलेलं मार्गदर्शन लागू करून. कठीण परिस्थितीत शांत राहणं आणि यहोवावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारी कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये आहेत. त्यांचा अभ्यास करा. आणि तीव्र विरोध होत असतानाही देवाच्या सेवकांना शांत राहायला कशी मदत झाली त्याचा विचार करा. उदाहरणार्थ, यहुद्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा प्रेषितांना आपलं प्रचार काम थांबायचा आदेश दिला, तेव्हा प्रेषित घाबरले नाहीत. उलट ते धैर्याने म्हणाले: “आम्ही माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे.” (प्रे. कार्यं ५:२९) त्यांना फटके मारण्यात आले तरी ते घाबरले नाहीत. कारण, यहोवा आपल्या बाजूने आहे आणि आपण घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे तो खूश आहे, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे ते प्रचार करत राहिले. (प्रे. कार्यं ५:४०-४२) आता स्तेफनचा विचार करा. मृत्यूच्या अगदी जवळ असतानाही तो शांत राहिला. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं, की “तेव्हा त्याचा चेहरा एखाद्या स्वर्गदूताच्या चेहऱ्‍यासारखा” दिसत होता. (प्रे. कार्यं ६:१२-१५) यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या आपल्या निर्णयावर यहोवा खूश आहे याची त्याला खातरी होती आणि म्हणून तो इतका शांत राहू शकला. टेहळणी बुरूज२१.०१ ४ ¶१०-११

शुक्रवार, २५ फेब्रुवारी

त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.—प्रकटी. ७:१४.

याचा अर्थ त्यांचा विवेक शुद्ध आहे आणि यहोवा त्यांच्यावर खूश आहे. (यश. १:१८) त्या सगळ्यांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला आहे. तसंच, येशूच्या बलिदानावर त्यांचा मजबूत विश्‍वास आहे आणि यहोवासोबत त्यांचं जवळचं नातं आहे. (योहा. ३:३६; १ पेत्र ३:२१) त्यामुळेच पृथ्वीवर “रात्रंदिवस [देवाची] पवित्र सेवा” करायला ते योग्य ठरतात. (प्रकटी. ७:१५) आजसुद्धा ते अशा प्रकारे सेवा करत आहेत. ते प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम आवेशाने करत आहेत. कारण त्यांच्यासाठी देवाचं राज्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. (मत्त. ६:३३; २४:१४; २८:१९, २०) मोठ्या संकटातून वाचणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायाला याची पक्की खातरी आहे, की यहोवा पुढेही त्यांची काळजी घेत राहील. कारण “राजासनावर जो बसला आहे तो त्यांच्यावर आपला तंबू पसरवेल,” असं बायबल म्हणतं. मग दुसऱ्‍या मेंढरांतले लोक जे अभिवचन पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत होते ते शेवटी पूर्ण होईल. ते अभिवचन म्हणजे: “[देव] त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.”—प्रकटी. २१:३, ४. टेहळणी बुरूज२१.०१ १६ ¶९-१०

शनिवार, २६ फेब्रुवारी

मी माझी पवित्र शक्‍ती सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन. आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील.—प्रे. कार्यं २:१७.

आपल्या सगळ्यांसाठी यहोवाच्या कुटुंबाचा भाग असणं एक आनंदाची गोष्ट आहे. आणि यहोवाने मस्तक म्हणून इतरांना आपल्यावर जो अधिकार दिला आहे त्याचा आपण मनापासून आदर करतो. बायबल म्हणतं की यहोवा पुरुषांइतकंच स्त्रियांनाही मौल्यवान समजतो. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं, की यहोवाने पहिल्या शतकात स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही पवित्र शक्‍ती दिली. यामुळे ते मोठमोठे चमत्कार करू शकले. जसं की, ते वेगवेगळ्या भाषा बोलू शकले. (प्रे. कार्यं २:१-४, १५-१८) आणि त्या दोघांनाही ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी पवित्र शक्‍तीने निवडण्यात आलं आहे. (गलती. ३:२६-२९) तसंच, पुरुषांसोबत स्त्रियांनाही या पृथ्वीवर सर्वकाळ जीवन जगण्याची आशा आहे. (प्रकटी. ७:९, १०, १३-१५) शिवाय, प्रचार करण्याची आणि शिष्य बनवण्याची जबाबदारी ही दोघांनाही देण्यात आली आहे. (मत्त. २८:१९, २०) जसं की, प्रेषितांची कार्यं या पुस्तकात प्रिस्किल्ला नावाच्या बहिणीबद्दल सांगितलं आहे. तिने आपल्या पतीसोबत, म्हणजे अक्विलासोबत अपुल्लो नावाच्या एका खूप शिकलेल्या माणसाला शास्त्रवचनांतलं सत्य चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत केली.—प्रे. कार्यं १८:२४-२६. टेहळणी बुरूज२१.०२ १४ ¶१, ४

रविवार, २७ फेब्रुवारी

स्वतःकडे आणि पूर्ण कळपाकडे लक्ष द्या. देवाच्या मंडळीची मेंढपाळांप्रमाणे काळजी घ्या.—प्रे. कार्यं २०:२८.

प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामात कुशल बनण्यासाठी प्रचारकांना प्रशिक्षणाची गरज असते. वडिलांनो, प्रचारकांना हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे. जर एखाद्याला तुमच्यासमोर बायबल अभ्यास घ्यायला भीती वाटत असेल, तर तुम्ही तो अभ्यास घेऊ शकता. खरंच, शिक्षकाला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळीतले वडील खूप काही करू शकतात. (१ थेस्सलनी. ५:११) सध्या आपल्याकडे एकही बायबल अभ्यास नसला, तरी एखाद्याला प्रगती करायला आपण नक्कीच मदत करू शकतो. एखाद्या प्रचारकासोबत त्याच्या बायबल अभ्यासाला जाण्याआधी आपण अभ्यासाची चांगली तयारी करून जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अधूनमधून काही मुद्दे सांगता येतील. पण त्याच वेळी आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, की शिकवण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकाची आहे. आपण फक्‍त त्याला मदत करत आहोत किंवा साथ देत आहोत. तसंच, बायबल विद्यार्थी जेव्हा सभांना येऊ लागतो तेव्हा आपण त्याच्याशी मैत्री करू शकतो. आणि आपल्या चांगल्या वागण्यातून त्याला शिकवू शकतो. याशिवाय, मंडळीतले वडील विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ काढू शकतात. तसंच, ते शिक्षकाला प्रशिक्षण देऊ शकतात आणि त्याच्या कामाची आपल्या शब्दांतून कदर व्यक्‍त करू शकतात. खरंच, एखाद्याला यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला मदत करण्यात आपलाही हातभार लागला या जाणिवेमुळे आपल्या सगळ्यांनाच खूप आनंद मिळतो. टेहळणी बुरूज२१.०३ १३ ¶१८-१९

सोमवार, २८ फेब्रुवारी

जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याशी त्याची जवळची मैत्री असते.—स्तो. २५:१४.

दावीदने आपल्या कामातून दाखवलं, की तो एक जबाबदार आणि भरवशालायक व्यक्‍ती आहे. उदाहरणार्थ, तरुण असताना आपल्या वडिलांच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी तो खूप मेहनत घ्यायचा. हे काम सोपं नव्हतं. त्यात धोकेसुद्धा होते. याबद्दल शौल राजाला त्याने एकदा असं सांगितलं: “तुमचा हा सेवक आपल्या वडिलांची मेंढरं चारायचा, तेव्हा एकदा एक सिंह कळपातलं मेंढरू घेऊन गेला; आणि आणखी एकदा एक अस्वल कळपातलं मेंढरू घेऊन गेलं. तेव्हा मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना मारलं आणि त्यांच्या तोंडातून मेंढरांना सोडवलं.” (१ शमु. १७:३४, ३५) दावीदला माहीत होतं, की मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. दावीदप्रमाणेच तरुण भाऊसुद्धा दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊ शकतात. दावीदने तरुणपणापासूनच यहोवासोबत जवळची मैत्री केली होती. दावीदसाठी देवासोबतची ही मैत्री त्याच्या धैर्यापेक्षा आणि वीणा वाजवण्याच्या कौशल्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाची होती. त्याच्यासाठी यहोवा फक्‍त एक देव नव्हता, तर सगळ्यात जवळचा मित्रही होता. तरुण भावांनो, तुम्हीसुद्धा यहोवासोबत आपली मैत्री घट्ट करू शकता. आणि ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. टेहळणी बुरूज२१.०३ ३ ¶४-५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा