जानेवारी
शनिवार, १ जानेवारी
बालपणापासून तुला पवित्र लिखाणांचं ज्ञान आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.—२ तीम. ३:१५.
तीमथ्यचा विश्वास शास्त्रवचनांतून शिकलेल्या गोष्टींवर आधारित होता. तीमथ्यप्रमाणे आपणसुद्धा बायबलचा अभ्यास केला पाहिजे आणि बायबलमध्ये यहोवाबद्दल जे काही सांगितलं आहे तेच खरं आहे याची स्वतःला खातरी पटवून दिली पाहिजे. सुरुवातीला आपण स्वतःला तीन महत्त्वाच्या सत्यांची खातरी पटवून दिली पाहिजे. पहिलं म्हणजे, यहोवा देव सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. (निर्ग. ३:१४, १५; इब्री ३:४; प्रकटी. ४:११) दुसरं म्हणजे, बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलं आहे आणि त्यातला संदेश मानवांसाठी आहे. (२ तीम. ३:१६, १७) तिसरं म्हणजे, यहोवाच्या लोकांचा एक संघटित गट आहे आणि ते येशूच्या नेतृत्वाखाली यहोवाची उपासना करतात; आणि हा गट यहोवाचे साक्षीदार या नावाने ओळखला जातो. (यश. ४३:१०-१२; योहा. १४:६; प्रे. कार्ये १५:१४) त्यासाठी बायबलचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं नाही. आपण जे मानतो तेच सत्य आहे याची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी आपल्या विचारशक्तीचा उपयोग करणं गरजेचं आहे.—रोम. १२:१. टेहळणी बुरूज२०.०७ १० ¶८-९
रविवार, २ जानेवारी
त्या टोळांना, ठार मारण्याचा नाही, तर लोकांना पाच महिने यातना द्यायचा अधिकार देण्यात आला.—प्रकटी. ९:५.
या भविष्यवाणीत सांगितलं आहे की झुंडींनी येणाऱ्या टोळांचे चेहरे माणसांच्या चेहऱ्यांसारखे होते आणि “त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काहीतरी होते.” (प्रकटी. ९:७) “ज्यांच्या [देवाच्या शत्रूंच्या] कपाळावर देवाचा शिक्का नाही” अशा लोकांना पाच महिने यातना देण्याचा अधिकार या टोळांना देण्यात आला. सहसा टोळ पाच महिने जगतात. (प्रकटी. ९:४) हे टोळ यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना सूचित करतात. हे अभिषिक्त सेवक धैर्याने सांगतात की देव या दुष्ट जगाचा न्याय करणार आहे. आणि जे लोक जगाचं समर्थन करतात ते ही गोष्ट ऐकून अस्वस्थ होतात. योएल २:७-९ या वचनांमध्ये सांगितलेले ‘टोळ’ आणि प्रकटीकरण पुस्तकातले ‘टोळ’ हे एक नसून वेगवेगळे आहेत, असा याचा अर्थ होतो का? हो. बायबल कधीकधी एकाच उदाहरणाचा वापर वेगवेगळ्या गोष्टी समजवण्यासाठी करतं. जसं की, प्रकटीकरण ५:५ यात येशूला “यहुदाच्या वंशातला सिंह” म्हटलं आहे, तर १ पेत्र ५:८ यात सैतान हा “गर्जणाऱ्या सिंहासारखा” आहे असं म्हटलं आहे. टेहळणी बुरूज२०.०४ ३ ¶८; ४ ¶१०
सोमवार, ३ जानेवारी
यहोवाची नजर सगळीकडे असते, तो चांगल्या आणि वाईट, सर्व लोकांना पाहतो.—नीति. १५:३.
सारायची दासी हागार हिचं अब्रामशी लग्न झाल्यावर ती मूर्खपणे वागली. तिला दिवस गेल्यावर ती सारायला तुच्छ लेखू लागली, कारण सारायला मूलबाळ नव्हतं. परिस्थिती इतकी बिघडली की सारायने हागारला घरातून हाकलून दिलं. (उत्प. १६:४-६) अपरिपूर्ण असल्यामुळे कदाचित आपण विचार करू की हागारसारख्या गर्विष्ठ स्त्रीसोबत जे झालं ते योग्यच होतं. पण यहोवाने हागारबद्दल असा विचार केला नाही. उलट त्याने आपल्या देवदूताला तिच्याकडे पाठवलं. त्या देवदूताने तिला भेटून योग्य प्रकारे विचार करायला मदत केली आणि तिला आशीर्वादही दिला. हागारला जाणीव झाली की यहोवाचं तिच्याकडे लक्ष होतं आणि तिच्या परिस्थितीबद्दल त्याला सगळं माहीत होतं. ही गोष्ट तिच्या मनाला भिडली, म्हणूनच तिने त्याला “पाहणारा देव” आणि ‘मला पाहणारा’ असं म्हटलं. (उत्प. १६:७-१३) यहोवाने हागारच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या? हागारच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल आणि तिला ज्या परिस्थितीतून जावं लागलं होतं त्याची त्याला पूर्ण कल्पना होती. हागारने सारायचा अनादर केला याकडे यहोवाने दुर्लक्ष केलं नाही. पण त्याच वेळी त्याने हागारच्या भावना आणि तिची परिस्थिती समजून घेतली आणि यामुळे तो तिच्याशी दयाळूपणे वागला. टेहळणी बुरूज२०.०४ १६ ¶८-९
मंगळवार, ४ जानेवारी
मी धाव पूर्ण केली आहे.—२ तीम. ४:७.
प्रेषित पौलने म्हटलं, की सर्व खरे ख्रिस्ती एका शर्यतीत धावत आहेत. (इब्री १२:१) आपण तरुण असो किंवा वयस्कर, आपलं आरोग्य चांगलं असो किंवा नसो, आपल्या सर्वांना धीराने धावून ही शर्यत पूर्ण करणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे यहोवाने आपल्यासाठी ठेवलेलं बक्षीस आपल्याला मिळवता येईल. (मत्त. २४:१३) पौलने स्वतः यशस्वीपणे ही “धाव पूर्ण केली.” म्हणूनच, तो धाव पूर्ण करण्याबद्दल आत्मविश्वासाने बोलू शकला. (२ तीम. ४:७, ८) पण पौल नेमकं कोणत्या धावेबद्दल किंवा शर्यतीबद्दल बोलत होता? प्रेषित पौल कधीकधी महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्यासाठी प्राचीन ग्रीसमध्ये होणाऱ्या खेळांचं उदाहरण द्यायचा. (१ करिंथ. ९:२५-२७; २ तीम. २:५) बऱ्याचदा त्याने ख्रिस्ती जीवनाची तुलना धावण्याच्या शर्यतीशी केली. (१ करिंथ. ९:२४; फिलिप्पै. २:१६) एखादी व्यक्ती आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेते तेव्हा ती या शर्यतीत धावायला सुरुवात करते. (१ पेत्र ३:२१) आणि जेव्हा यहोवा त्या व्यक्तीला सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस देईल, तेव्हा तिने या शर्यतीची अंतिम रेषा पार केली आहे असं म्हणता येईल.—मत्त. २५:३१-३४, ४६; २ तीम. ४:८. टेहळणी बुरूज२०.०४ २६ ¶१-३
बुधवार, ५ जानेवारी
देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.—इफिस. ६:१३.
“प्रभू विश्वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल.” (२ थेस्सलनी. ३:३) तर यहोवा आपलं संरक्षण कसं करतो? सैतानाच्या हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी यहोवाने आपल्याला संपूर्ण शस्त्रसामग्री दिली आहे. (इफिस. ६:१३-१७) ही शस्त्रसामग्री खूप मजबूत आहे. पण आपण जर त्यातलं प्रत्येक शस्त्रं घातलं आणि सतत त्याचा वापर केला तरच आपलं संरक्षण होईल. उदाहरणार्थ, सत्याचा पट्टा बायबलमध्ये जी सत्यं दिली आहेत, त्यांना सूचित करतो. आपण हा पट्टा आपल्या कंबरेला का बांधला पाहिजे? कारण सैतान “खोटेपणाचा बाप” आहे. (योहा. ८:४४) तो हजारो वर्षांपासून खोटं बोलत आला आहे आणि ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवत’ आहे. (प्रकटी. १२:९) पण बायबलमधली सत्यं त्याच्या जाळ्यात अडकण्यापासून आपल्याला वाचवतात. तर मग, सत्याचा हा पट्टा आपण कसा बांधू शकतो? यहोवाबद्दल सत्य शिकून, ‘पवित्र शक्तीने आणि सत्याने’ त्याची उपासना करून आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागून आपण हा पट्टा बांधू शकतो.—योहा. ४:२४; इफिस. ४:२५; इब्री १३:१८. टेहळणी बुरूज२१.०३ २६-२७ ¶३-५
गुरुवार, ६ जानेवारी
तो ‘सुंदर देशातही’ शिरेल.—दानी. ११:४१.
या देशाची सर्वात खास गोष्ट काय होती? इथे खरी उपासना केली जायची. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून हा ‘सुंदर देश’ कोणत्याही एका ठिकाणाला सूचित करत नाही. असं आपण का म्हणू शकतो? कारण आज यहोवाचे लोक संपूर्ण पृथ्वीवर पसरले आहेत. यामुळे आजच्या काळात हा “देश” यहोवाचे लोक करत असलेल्या खऱ्या उपासनेशी संबंधित कामांना सूचित करतो. जसं की, सभांना जाणं आणि प्रचार काम करणं. शेवटच्या दिवसांत उत्तरेचा राजा बऱ्याचदा ‘सुंदर देशात’ शिरला आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी उत्तरेचा राजा बनला. जर्मनीच्या नात्झी सरकारने देवाच्या लोकांचा छळ केला आणि अनेकांना मारून टाकलं. असं करून उत्तरेचा राजा ‘सुंदर देशात’ शिरला. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियत संघ उत्तरेचा राजा बनला. देवाच्या लोकांचा छळ करून आणि त्यांना त्यांच्या देशातून बाहेर काढून हा राजा ‘सुंदर देशात’ शिरला. टेहळणी बुरूज२०.०५ १३ ¶७-८
शुक्रवार, ७ जानेवारी
जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याशी त्याची जवळची मैत्री असते, तो त्यांना आपला करार कळवतो.—स्तो. २५:१४.
प्राचीन काळातल्या अशा काही सेवकांचा विचार करा जे देवाचे मित्र बनले. त्यांपैकी एक म्हणजे अब्राहाम. त्याने देवावर मजबूत विश्वास असल्याचं दाखवलं. अब्राहामचा मृत्यू झाल्याच्या हजार वर्षांच्या नंतरही यहोवाने त्याला “माझा मित्र” असं म्हटलं. (यश. ४१:८) याचाच अर्थ, एखाद्याचा मृत्यू झाला तरी यहोवा त्याला त्याचा जवळचा मित्र समजतो. यहोवा अब्राहामला आजही विसरलेला नाही. (लूक २०:३७, ३८) ईयोबसुद्धा यहोवाचा एक विश्वासू सेवक होता. स्वर्गात सर्व स्वर्गदूत एकत्र जमले असताना यहोवाने ईयोबबद्दल म्हटलं की तो “सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा” आहे. (ईयो. १:६-८) दानीएलसुद्धा यहोवाचा एक विश्वासू सेवक होता. त्याने जवळपास ८० वर्षं एका मूर्तिपूजक राष्ट्रात यहोवाची विश्वासूपणे सेवा केली. यामुळेच तीन वेळा स्वर्गदूतांनी त्याला म्हटलं की तो देवासाठी “परमप्रिय” आहे. (दानी. ९:२३; १०:११, १९) यहोवा आपल्या प्रिय मित्रांचं पुनरुत्थान करण्यासाठी आतुर आहे याची आपण खातरी बाळगू शकतो.—ईयो. १४:१५. टेहळणी बुरूज२०.०५ २७ ¶३-४
शनिवार, ८ जानेवारी
मला तुझे कायदे शिकव.—स्तो. ११९:६८.
एक चांगला विद्यार्थी कदाचित देवाचे नीतिनियम शिकेल आणि त्याला ते आवडतीलही. पण त्याचं देवावर प्रेम असणं खूप गरजेचं आहे. त्याचं देवावर प्रेम असेल तरच तो त्याच्या आज्ञांचं पालन करेल. आदाम आणि हव्वा यांच्या बाबतीत काय घडलं ते आठवा. हव्वाला देवाचे नीतिनियम माहीत होते, पण तिचं देवावर प्रेम नव्हतं. आणि आदामचंही देवावर प्रेम नव्हतं. त्यामुळे त्यांनी देवाची आज्ञा मोडली. (उत्प. ३:१-६) म्हणून लोकांना फक्त देवाचे नीतिनियम आणि स्तर शिकवणं पुरेसं नाही, तर आपण त्यांना देवावर प्रेम करायलाही शिकवलं पाहिजे. यहोवाचे नीतिनियम आणि स्तर चांगले आहेत आणि ते आपल्याच फायद्यासाठी आहेत. (स्तो. ११९:९७, १११, ११२) पण जोपर्यंत आपल्या बायबल विद्यार्थ्यांना हे समजणार नाही की यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्याने आपल्याला नियम दिले आहेत, तोपर्यंत यहोवाचे नियम चांगले आहेत आणि आपल्याच फायद्याचे आहेत हे त्यांना पटणार नाही. त्यामुळे अभ्यास चालवताना आपण आपल्या विद्यार्थ्याला असं विचारू शकतो, की ‘तुम्हाला काय वाटतं अमुक एक गोष्ट करा किंवा अमुक एक गोष्ट करू नका असं यहोवा का म्हणतो? यावरून यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?’ आपण जर आपल्या विद्यार्थ्यांना यहोवाबद्दल विचार करायला आणि त्याच्या नावावर मनापासून प्रेम करायला मदत केली, तर आपण त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. मग आपले विद्यार्थी फक्त देवाच्या नियमांवरच नाही, तर देवावरही प्रेम करतील. आणि यामुळे त्यांचा विश्वास वाढेल आणि कठीण परीक्षांचा सामना करण्यासाठी त्यांना मदत होईल.—१ करिंथ. ३:१२-१५. टेहळणी बुरूज२०.०६ १० ¶१०-११
रविवार, ९ जानेवारी
प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं.—याको. १:१९.
यहोवाकडे परत यायला एखाद्याला वेळ लागू शकतो, म्हणून आपल्याला धीर दाखवण्याची गरज आहे. एकेकाळी अक्रियाशील झालेले अनेक जण म्हणतात की मंडळीतले वडील आणि इतर जण त्यांना वारंवार येऊन भेटल्यामुळे ते पुन्हा एकदा यहोवाची सेवा करू लागले. दक्षिणपूर्व आशिया इथे राहणारी नॅन्सी नावाची बहीण म्हणते: “मंडळीतल्या एका बहिणीने मला खूप मदत केली. एका मोठ्या बहिणीसारखं तिने माझ्यावर प्रेम केलं. आधी आम्ही एकत्र जे आनंदाचे क्षण घालवले होते त्यांची तिने मला आठवण करून दिली. मी तिच्याजवळ आपलं मन मोकळं करायचे तेव्हा ती धीराने ऐकून घ्यायची आणि गरज पडल्यावर ती मला सल्लाही द्यायची. मला जेव्हा-जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा-तेव्हा मदत करून तिने दाखवून दिलं की ती माझी खरी मैत्रीण आहे.” आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून दुखावलो जातो, तेव्हा जणू आपल्याला एक जखम होते. आणि ती जखम भरून काढण्यासाठी सहानुभूती एका गुणकारी औषधासारखं काम करू शकते. अक्रियाशील झालेले काही जण कदाचित अनेक वर्षांआधी मंडळीतल्या एखाद्या व्यक्तीकडून दुखावले गेले असतील. आणि त्या गोष्टीचा राग अजूनही त्यांच्या मनात असेल. त्यामुळे त्यांना यहोवाकडे परत यायची इच्छा होत नाही. तर असेही काही असतील ज्यांना असं वाटत असेल की त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे. अशा वेळी त्यांना कदाचित अशा एका व्यक्तीची गरज असेल जी त्यांचं धीराने ऐकून घेईल आणि त्यांच्या भावना समजून घेईल. टेहळणी बुरूज२०.०६ २६ ¶१०-११
सोमवार, १० जानेवारी
तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.—१ योहा. २:१४.
तुम्ही जितक्या वेळा मोहाचा प्रतिकार कराल तितकं तुम्हाला योग्य ते करणं सोपं जाईल. लक्षात असू द्या की लैंगिकतेबद्दल जगाचा चुकीचा दृष्टिकोन हा सैतानाकडून आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जगातल्या लोकांसारखा दृष्टिकोन बाळगायचं टाळता तेव्हा खरंतर तुम्ही “त्या दुष्टावर विजय” मिळवत असता. योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा हक्क यहोवाला आहे ही गोष्ट आपण मान्य करतो. आणि म्हणून आपण योग्य ते करण्याचाच प्रयत्न करतो. पण आपल्याकडून कधी पाप घडलं तर आपण प्रार्थनेत यहोवाकडे ते कबूल केलं पाहिजे. (१ योहा. १:९) आणि जर आपल्या हातून कधी गंभीर पाप घडलं तर आपण मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली पाहिजे. कारण यहोवाने त्यांना आपली काळजी घेण्यासाठी नेमलं आहे. (याको. ५:१४-१६) पण पापाची क्षमा मिळाल्यानंतर आपण सतत स्वतःला दोष देत राहू नये. का बरं? कारण आपल्या प्रेमळ पित्याने आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी आपल्या पुत्राचं खंडणी बलिदान दिलं आहे. यहोवा म्हणतो की आपण जर मनापासून पश्चात्ताप केला तर तो आपल्याला माफ करेल. आणि त्याने जर तसं म्हटलं आहे तर तो नक्कीच तसं करेल. त्यामुळे शुद्ध विवेकाने यहोवाची सेवा करत राहणं आपल्याला शक्य होतं.—१ योहा. २:१, २, १२; ३:१९, २०. टेहळणी बुरूज२०.०७ २२-२३ ¶९-१०
मंगळवार, ११ जानेवारी
जीवनाचा उगम तुझ्याजवळ आहे.—स्तो. ३६:९.
सुरुवातीला संपूर्ण विश्वात यहोवा एकटाच होता. पण त्यामुळे तो दुःखी होता असं नाही. आनंदी राहण्यासाठी त्याला कोणाच्याही सोबतीची गरज नव्हती. पण एक प्रेमळ देव असल्यामुळे यहोवाची इच्छा होती की इतरांनाही जीवन मिळावं आणि त्यांनी जीवनाचा आनंद घ्यावा. म्हणूनच त्याने सृष्टी घडवली. (१ योहा. ४:१९) सगळ्यात आधी यहोवाने आपल्या मुलाला, म्हणजे येशूला घडवलं. मग येशूद्वारे त्याने इतर “सर्व गोष्टी” निर्माण केल्या. त्यामध्ये देवदूतसुद्धा होते. (कलस्सै. १:१६) येशूला आपल्या पित्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा त्याला खूप आनंद झाला. (नीति. ८:३०) यहोवाने आणि त्याच्या कुशल कारागिराने, म्हणजे येशूने आकाश आणि पृथ्वी बनवली तेव्हा देवदूतांनी ते प्रत्यक्ष पहिलं. ते पाहून देवदूतांना खूप आनंद झाला. त्यांनी आपला आनंद कसा व्यक्त केला? देवाने बनवलेली पृथ्वी पाहून देवदूतांनी “जयजयकार केला.” (ईयो. ३८:७) पुढे यहोवाने बनवलेली प्रत्येक गोष्ट पाहून, खासकरून मानवांची निर्मिती पाहून देवदूतांनी अशाच प्रकारे आपला आनंद व्यक्त केला असेल यात काही शंका नाही. (नीति. ८:३१) यहोवाने निर्माण केलेल्या या प्रत्येक गोष्टीतून त्याचं प्रेम आणि त्याची बुद्धी दिसून आली.—स्तो. १०४:२४; रोम. १:२०. टेहळणी बुरूज२०.०८ १४ ¶१-२
बुधवार, १२ जानेवारी
माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.—मत्त. २४:९.
यहोवाने आपल्याला अशा प्रकारे बनवलं आहे, की आपण इतरांवर प्रेम करू शकतो. त्याच वेळी इतरांनी आपल्यावर प्रेम करावं अशी इच्छाही त्याने आपल्याला दिली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आपला द्वेष करते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि काही वेळा भीतीही वाटते. एक भाऊ म्हणतो: “साक्षीदार असल्यामुळे सैनिक मला मारायचे, माझा अपमान करायचे आणि मला धमकवायचे. तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि अपमानित झाल्यासारखं वाटायचं.” खरंच, लोक आपला द्वेष करतात तेव्हा खूप वाईट वाटतं. पण ते आपल्याशी असं वागतील हे येशूने आधीच सांगितलं होतं. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. हे जग आपला द्वेष करतं, कारण येशूसारखंच आपणसुद्धा या जगाचा भाग नाही. (योहा. १५:१७-१९) आणि त्यामुळे, आपण जरी मानवी सरकारांचा आदर करत असलो, तरी आपण त्यांची उपासना करत नाही. तसंच, आपण राजकारणात भाग घेत नाही, झेंडावंदन करत नाही किंवा राष्ट्रगीत गात नाही. आपण फक्त आणि फक्त यहोवाची उपासना करतो. तसंच, मानवांवर राज्य करायचा अधिकार फक्त त्यालाच आहे, हे आपण मानतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा देतो. पण सैतान आणि त्याची “संतती” मात्र या गोष्टीचा विरोध करते. (उत्प. ३:१-५, १५) याशिवाय, देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्यांचा अंत करेल आणि या राज्याचा विरोध करणाऱ्यांचा ते नाश करेल, हे आपण लोकांना सांगतो. (दानी. २:४४; प्रकटी. १९:१९-२१) नम्र मनाच्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण दुष्टांसाठी मात्र ही वाईट बातमी आहे. टेहळणी बुरूज२१.०३ २० ¶१-२
गुरुवार, १३ जानेवारी
आपण देवापासून आहोत हे आपल्याला माहीत आहे.—१ योहा. ५:१९.
यहोवाच्या मंडळीत ख्रिस्ती बहिणींना महत्त्वाचं स्थान आहे. त्यांनी बुद्धी, विश्वास, आवेश, धैर्य आणि उदारता असे गुण दाखवण्याच्या बाबतीत आणि चांगली कामं करण्याच्या बाबतीत खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. (लूक ८:२,३; प्रे. कार्ये १६:१४,१५; रोम. १६:३,६; फिलिप्पै. ४:३; इब्री ११:११,३१,३५) आपल्या मंडळ्यांमध्ये अनेक वयस्कर भाऊबहीणसुद्धा आहेत. वाढत्या वयामुळे त्यांना बऱ्याच आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तरीही हे वयस्कर भाऊबहीण होता होईल तितकं सेवाकार्य करण्याचा प्रयत्न करतात. आणि इतरांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. खरंच, ते आपल्यासाठी आणि यहोवासाठी खूप मौल्यवान आहेत. (नीति. १६:३१) आपल्या मंडळीतल्या लहान मुलांचा आणि तरुणांचाही विचार करा. त्यांनाही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. कारण ते सैतानाच्या प्रभावाखाली असलेल्या जगात राहत आहेत. आणि त्यांच्या मनावर चुकीच्या विचारांचा प्रभाव पडतो. पण तरीही आपली मुलं सभांमध्ये चांगली उत्तरं देतात, सेवाकार्यात सहभाग घेतात आणि धैर्याने आपल्या विश्वासाची बाजू मांडतात. हे पाहून आपल्या सगळ्यांनाच खूप प्रोत्साहन मिळतं. तर मुलांनो, हे कधीही विसरू नका, की यहोवाच्या मंडळीत तुमचं एक महत्त्वाचं स्थान आहे.—स्तो. ८:२. टेहळणी बुरूज२०.०८ २१-२२ ¶९-११
शुक्रवार, १४ जानेवारी
लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवतोय.—मत्त. १०:१६.
आपण जेव्हा प्रचार करायला सुरुवात करतो आणि साक्षीदार म्हणून स्वतःची ओळखी करून देऊ लागतो, तेव्हा आपल्या जीवनात वादळं येऊ शकतात. जसं की, कुटुंबातले सदस्य आपला विरोध करू शकतात, आपले मित्र आपली थट्टा करू शकतात किंवा मग लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करू शकतात. तुम्ही तुमचं धैर्य कसं वाढवू शकता? सर्वातआधी, असा भरवसा ठेवा की आजसुद्धा येशू स्वर्गातून प्रचारकार्याचं मार्गदर्शन करत आहे. (योहा. १६:३३; प्रकटी. १४:१४-१६) त्यानंतर, तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं जे वचन यहोवाने दिलं आहे त्यावरचा तुमचा विश्वास वाढवा. (मत्त. ६:३२-३४) तुमचा विश्वास जितका वाढेल, तितकंच तुमचं धैर्यही वाढेल. तुम्ही बायबलचा अभ्यास सुरू केल्याचं आणि साक्षीदारांच्या सभांना जात असल्याचं तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगितलं, तेव्हा तुम्ही खूप मोठा विश्वास दाखवला. याशिवाय, यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमच्या वागण्यात आणि जीवनशैलीत बरेच बदल केले असतील, यात शंका नाही. हे सगळं करून तुम्ही हेच दाखवलं, की देवावर तुमचा किती विश्वास आहे आणि तुम्ही किती धैर्यवान आहात! असंच धैर्य जर तुम्ही पुढेही दाखवत राहिलात, तर ‘यहोवा तुमच्याबरोबर आहे’ याची खातरी तुम्हाला पटेल.—यहो. १:७-९. टेहळणी बुरूज२०.०९ ५ ¶११-१२
शनिवार, १५ जानेवारी
यहोवाने त्याला त्याच्या सगळ्या शत्रूंपासून विसावा दिला होता.—२ इति. १४:६.
आसा राजाचं खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. कारण त्याने वेळेचा विचारपूर्वक उपयोग केला आणि तो पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिला. त्याने फक्त कठीण काळातच नाही, तर शांतीच्या काळातही यहोवाची सेवा केली. लहानपणापासूनच “आसाचे मन . . . परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.” (१ राजे १५:१४) यहूदातल्या खोट्या उपासनेला पूर्णपणे थांबवून त्याने दाखवून दिलं, की तो यहोवाची अगदी मनापासून सेवा करत आहे. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं, की “त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ मोडले व अशेरा मूर्ती” नष्ट केल्या. (२ इति. १४:३, ५) तसंच, त्याने आपल्या आजीला, माका हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण, ती लोकांना एका विशिष्ट मूर्तीची उपासना करायचं प्रोत्साहन देत होती. (१ राजे १५:११-१३) आसाने मूर्ती तर नष्ट केल्याच, पण त्यासोबतच त्याने यहूदाच्या लोकांना पुन्हा यहोवाची उपासना करायला मदत केली. म्हणून यहोवाने आसाला आणि यहूदाच्या लोकांना भरपूर आशीर्वाद दिले. बायबल म्हणतं, की आसा राज्य करत होता त्या वेळी दहा वर्षं “देशात स्वास्थ्य होते,” म्हणजे देशात शांतीचा काळ होता.—२ इति. १४:१, ४, ६. टेहळणी बुरूज२०.०९ १४ ¶२-३
रविवार, १६ जानेवारी
तीमथ्य, जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव.—१ तीम. ६:२०.
आपल्याला एखादी मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवायची असते, तेव्हा आपण सहसा ती एखाद्या व्यक्तीकडे देतो किंवा बँकेत ठेवतो. आपल्याला माहीत असतं, की आपली वस्तू हरवणार नाही किंवा चोरीला जाणार नाही, तर ती सुरक्षित राहील. प्रेषित पौलने तीमथ्यला आठवण करून दिली, की त्याला मौल्यवान असं काहीतरी मिळालं आहे. ते म्हणजे, मानवांसाठी देवाचा जो उद्देश आहे त्याबद्दलचं अचूक ज्ञान. याशिवाय, तीमथ्यला प्रचाराचं काम करण्याचाही बहुमान मिळाला होता. (२ तीम. ४:२, ५) म्हणून पौलने तीमथ्यला असं प्रोत्साहन दिलं, की त्याला जे काही देण्यात आलं आहे ते त्याने जपून ठेवावं. तीमथ्यप्रमाणेच, आपल्यालाही काही मौल्यवान गोष्टी देण्यात आल्या आहेत. यहोवाने आपल्याला बायबलमधल्या सत्यांचं अचूक ज्ञान दिलं आहे. ही सत्यं मौल्यवान आहेत, कारण या सत्यांमुळे आपल्याला यहोवासोबत चांगलं नातं जोडता येतं आणि जीवनात खरा आनंद मिळवता येतो. तसंच, जेव्हा आपण ही सत्यं स्वीकारतो आणि त्यांनुसार जीवन जगतो, तेव्हा खोट्या शिकवणींतून आणि अनैतिक जीवनशैलीतून आपण मुक्त होतो.—१ करिंथ. ६:९-११. टेहळणी बुरूज२०.०९ २६ ¶१-३
सोमवार, १७ जानेवारी
तुमच्यामध्ये असताना आम्ही तुमच्यासाठी कशा प्रकारे काम केलं, हे तर तुम्हाला माहीतच आहे.—१ थेस्सलनी. १:५.
बायबलमधली सत्यं शिकवताना तुम्ही ती उत्साहाने आणि पूर्ण खातरीने शिकवली पाहिजेत. त्यामुळे ती सत्यं तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत आणि त्यांवर तुमचा किती विश्वास आहे, हे तुमच्या विद्यार्थ्याला दिसेल. ते पाहून त्यालाही शिकत असलेल्या गोष्टींबद्दल उत्साह वाटेल, आणि त्याची शिकण्याची आवड आणखी वाढेल. बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे तुम्हाला स्वतःला कसा फायदा झाला, हेसुद्धा तुम्ही आपल्या विद्यार्थ्याला सांगू शकता. त्यामुळे तो हे समजू शकेल, की बायबल आपल्यालाही व्यावहारिक रितीने मदत करू शकतं. बायबल अभ्यास करत असताना आपल्या विद्यार्थ्याला अशा भाऊबहिणींचे अनुभव सांगा ज्यांनी त्याच्यासारख्याच समस्यांचा सामना केला आणि त्यांवर मात केली. किंवा अभ्यासासाठी तुम्ही अशा एका प्रचारकाला सोबत घेऊन जाऊ शकता ज्याच्या चांगल्या उदाहरणामुळे विद्यार्थ्याला फायदा होऊ शकतो. तुमच्या विद्यार्थ्याला हे समजायला मदत करा, की बायबलची तत्त्वं आपल्या जीवनात लागू करणं किती महत्त्वाचं आहे. विद्यार्थी जर विवाहित असेल तर त्याचा जोडीदारही अभ्यासाला बसतो का? नसेल, तर तुम्ही त्या जोडीदाराला अभ्यासासाठी विचारू शकता. विद्यार्थी जे काही शिकत आहे त्याबद्दल त्याला आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलायचं प्रोत्साहन द्या.—योहा. १:४०-४५. टेहळणी बुरूज२०.१० १६ ¶७-९
मंगळवार, १८ जानेवारी
त्या आज्ञा तुम्ही आपल्या मुलांच्या मनावर बिंबवा.—अनु. ६:७.
योसेफ आणि मरीया, येशूला अशा प्रकारे वाढवू शकले ज्यामुळे त्याला पुढे जाऊन देवाची स्वीकृती मिळाली. कारण यहोवाने पालकांना जे मार्गदर्शन दिलं होतं ते त्यांनी पाळलं. (अनु. ६:६, ७) योसेफ आणि मरीया यांचं यहोवावर गाढ प्रेम होतं. आणि आपल्या मुलांनाही यहोवावर तितकंच प्रेम करायला शिकवणं हे त्यांचं ध्येय होतं. योसेफ आणि मरीयाने आपल्या मुलांसोबत मिळून यहोवाची उपासना करायची निवड केली. ते दर आठवडी नासरेथमधल्या सभास्थानात उपासना करायला जायचे. आणि दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमला जायचे. (लूक २:४१; ४:१६) यरुशलेमला जात असताना ते कदाचित येशूला आणि आपल्या इतर मुलांना यहोवाच्या लोकांच्या इतिहासाबद्दल सांगत असतील. तसंच, शास्त्रवचनांत ज्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे, त्यांपैकी काही ठिकाणांना त्यांनी जाता-जाता भेटही दिली असेल. पुढे जसजसं त्यांचं कुटुंब वाढत गेलं तसतसं योसेफ आणि मरीयाला आपल्या मुलांसोबत मिळून अशा रीतीने यहोवाची उपासना करणं कदाचित सोपं गेलं नसेल. पण तरीसुद्धा त्यांनी तसं केलं. आणि याचे फायदे त्यांना पाहायला मिळाले. एक कुटुंब म्हणून यहोवाच्या उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्यामुळे ते आध्यात्मिक रित्या मजबूत राहिले. टेहळणी बुरूज२०.१० २८ ¶८-९
बुधवार, १९ जानेवारी
यहोवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, आणि न्याय-निर्णय इस्राएलमध्ये शिकवण्यासाठी एज्राने आपलं मन तयार केलं होतं.—एज्रा ७:१०.
जेव्हा तुम्हाला एखाद्या बायबल अभ्यासासाठी बोलवलं जातं, तेव्हा तुम्ही बायबल अभ्यासाची चांगली तयारी करून जाऊ शकता. डॅनिएल नावाचा एक खास पायनियर म्हणतो: “जेव्हा माझ्यासोबत येणारा प्रचारक चांगली तयारी करून येतो तेव्हा मला खूप छान वाटतं. कारण त्यामुळे त्याला चर्चेत चांगला सहभाग घेता येतो. याशिवाय, तुम्ही दोघांनी अभ्यासाची चांगली तयारी केली आहे हे तुमच्या विद्यार्थ्याच्या लक्षात येईल आणि त्यालाही तसंच करायचं प्रोत्साहन मिळेल.” तुम्हाला जर बायबल अभ्यासाची चांगली तयारी करून जाणं शक्य नसेल, तर निदान मुख्य मुद्दे लक्षात घेण्यासाठी थोडा वेळ द्या. बायबल अभ्यासाचा महत्त्वाचा भाग म्हणजे, प्रार्थना. त्यामुळे शिक्षकाने जर तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली तर प्रार्थनेत काय बोलायचं याचा आधीच विचार करा. त्यामुळे विद्यार्थ्याची गरज लक्षात ठेवून तुम्ही प्रार्थना करू शकाल. (स्तो. १४१:२) जपानमध्ये राहणारी हॅना, बायबल अभ्यास करत होती, तेव्हा तिच्या शिक्षिकेसोबत येणाऱ्या बहिणीने केलेल्या प्रार्थना तिला आठवतात. हॅना म्हणते: “तिची यहोवासोबत किती जवळची मैत्री आहे हे मला तिच्या प्रार्थनांवरून समजायचं. तिच्यासारखंच मलासुद्धा यहोवासोबत जवळची मैत्री करायची होती. प्रार्थनेत ती माझ्या नावाचा उल्लेख करायची तेव्हा तर मला खूप छान वाटायचं.” टेहळणी बुरूज२१.०३ ९-१० ¶७-८
गुरुवार, २० जानेवारी
हिंमत धर! तुला रोममध्येसुद्धा साक्ष द्यावी लागेल.—प्रे. कार्यं २३:११.
येशूने प्रेषित पौलला आश्वासन दिलं होतं, की तो सुरक्षितपणे रोमला पोचेल. पण यरुशलेममधल्या काही यहुद्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकायचा कट रचला होता. जेव्हा रोमी सेनापती क्लौद्य लुसिया याला या कटाबद्दल समजलं, तेव्हा त्याने पौलला मदत केली. त्याने लगेच, सैनिकांच्या एका मोठ्या गटाला असा हुकूम दिला, की त्यांनी पौलला सुरक्षितपणे कैसरीयाला न्यावं. तिथे पोचल्यावर राज्यपाल फेलिक्सनेसुद्धा “पौलला हेरोदच्या वाड्यात पहाऱ्याखाली ठेवायचा हुकूम दिला.” त्यामुळे जे यहुदी पौलच्या जिवावर टपले होते, ते त्याचं काहीच बरंवाईट करू शकले नाहीत. (प्रे. कार्यं २३:१२-३५) फेलिक्सच्या जागी फेस्त राज्यपाल बनला होता. पण यहुद्यांना खूश करण्यासाठी फेस्त पौलला म्हणाला: “यरुशलेमला जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?” पौलला मात्र माहीत होतं, की तो जर यरुशलेमला गेला, तर तिथे कदाचित त्याला मारून टाकलं जाईल. म्हणून तो फेस्तला म्हणाला: “मी कैसराकडे न्याय मागतो!” मग फेस्त पौलला म्हणाला: “तू कैसराकडे न्याय मागितला आहेस, म्हणून तू कैसराकडे जाशील.” लवकरच पौल रोमला पोचणार होता. तिथे, त्याच्या जिवावर टपलेल्या शत्रूंपासून तो खूप लांब असणार होता.—प्रे. कार्यं २५:६-१२. टेहळणी बुरूज२०.११ १३ ¶४; १४ ¶८-१०
शुक्रवार, २१ जानेवारी
आपलं मन आपल्याला दोष देऊ शकतं.—१ योहा. ३:१९.
आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी दोषीपणाची भावना येते. जसं की, सत्य शिकण्याआधी केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे काहींना दोषी वाटतं. तर असेही काही जण आहेत ज्यांना सत्यात आल्यानंतर केलेल्या चुकांमुळे दोषी वाटतं. (रोम. ३:२३) आपल्या सर्वांनाच योग्य ती करायची इच्छा आहे. पण “आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो.” (याको. ३:२; रोम. ७:२१-२३) आणि आपलं मन आपल्याला दोष देतं तेव्हा आपल्याला ते मुळीच आवडत नाही. पण त्यामुळे एक फायदा होतो. तो कोणता? या भावनेमुळे आपण आपल्या चुका सुधारतो आणि त्या पुन्हा न करण्याचा निश्चय करतो. (इब्री १२:१२, १३) पण कधीकधी असं होऊ शकतं, की आपण स्वतःला नको तितका दोष देऊ. म्हणजे आपण जरी पश्चाताप केला असला आणि यहोवाने जरी आपल्याला माफ केलं असलं, तरी आपण स्वतःला दोष देत राहू. पण स्वतःला नको तितका दोष देणं आपल्यासाठी चांगलं नाही. (स्तो. ३१:१०; ३८:३, ४) त्यापासून आपण सावध असलं पाहिजे. कारण यहोवाने आपल्याला माफ केल्यानंतरही आपण जर स्वतःला दोष देत राहिलो आणि त्याची सेवा करायचं सोडून दिलं, तर सैतानाला किती आनंद होईल याचा विचार करा.—२ करिंथकर २:५-७, ११ पडताळून पाहा. टेहळणी बुरूज२०.११ २७ ¶१२-१३
शनिवार, २२ जानेवारी
खरंच, मी उगाचच माझं हृदय शुद्ध ठेवलं आणि निर्दोषतेने आपले हात धुतले.—स्तो. ७३:१३.
हे स्तोत्र लिहिणारा एक लेवी होता. त्याला दुष्ट आणि गर्विष्ठ लोकांचा हेवा वाटू लागला. त्यांच्यासारखं त्याला वाईट कामं करायची इच्छा होती असं नाही; पण इतकी वाईट कामं करूनही ते श्रीमंत होत आहेत असं वाटल्यामुळे त्याला त्यांचा हेवा वाटू लागला. (स्तो. ७३:२-९, ११-१४) त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते ऐशआरामाचं जीवन जगत आहेत आणि त्यांना कसलीही चिंता नाही असं त्याला वाटलं. या लेवीला आपल्या मनातून हेव्याची आणि निराशेची भावना काढून टाकण्यासाठी सगळ्या गोष्टींबद्दल यहोवासारखा विचार करायची गरज होती. आणि तेच त्याने केलं. त्यामुळे त्याचं मन शांत झालं आणि गमावलेला आनंद त्याने परत मिळवला. तो म्हणाला: “[यहोवाशिवाय] या पृथ्वीवर मला आणखी काहीही नको.” (स्तो. ७३:२५) त्याचप्रमाणे, दुष्ट लोक कितीही श्रीमंत आणि आनंदी वाटत असले तरी आपण कधीच त्यांचा हेवा करू नये. कारण ते फक्त वरवर आनंदी वाटतात आणि त्यांचा तो आनंद जास्त काळ टिकणारा नसतो. (उप. ८:१२, १३) आपण जर अशा लोकांचा हेवा केला तर आपण निराश होऊ आणि हळूहळू यहोवापासून दूर जाऊ. तुम्हाला कधी त्या लेव्यासारखं वाटलं, तर निराशेवर मात करण्यासाठी त्याने जे केलं तेच करा. देवाकडून मिळणारा प्रेमळ सल्ला पाळा आणि त्याच्या लोकांमध्ये राहा. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त यहोवावर तुमचं प्रेम असेल, तर तुम्हाला खरा आनंद मिळेल. आणि तुम्ही ‘खऱ्या जीवनाकडे’ जाणाऱ्या मार्गावर चालत राहाल.—१ तीम. ६:१९. टेहळणी बुरूज२०.१२ १९ ¶१४-१६
रविवार, २३ जानेवारी
समस्या अशी असते, की प्रार्थना करायची गरज आहे हे माहीत असूनही, कशासाठी प्रार्थना करावी हे आपल्याला कळत नाही. पण, जेव्हा आपण कण्हतो आणि आपल्याला शब्दही उच्चारता येत नाहीत, तेव्हा पवित्र शक्ती स्वतः आपल्यासाठी विनंती करते.—रोम. ८:२६.
प्रार्थनेत यहोवाला आपल्या चिंता सांगताना त्याचे आभार मानायला विसरू नका. यहोवाने आजपर्यंत आपल्यासाठी किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांचा विचार करा आणि त्याबद्दल त्याचे आभार माना; अगदी समस्यांचा सामना करत असतानाही. पण तुम्हाला कधी तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी नेमके शब्द सुचत नसतील, तर निराश होऊ नका. कारण तुम्ही फक्त एवढं जरी म्हटलं, की ‘यहोवा प्लीज मला मदत कर!’ तरी तो तुमची प्रार्थना ऐकेल. (२ इति. १८:३१) स्वतःच्या बुद्धीवर नाही, तर यहोवाकडून मिळणाऱ्या बुद्धीवर विसंबून राहा. यशया संदेष्ट्याच्या काळात, यहूदाच्या लोकांना अशी भीती होती, की अश्शूरचे लोक आपल्यावर हल्ला करून विजय मिळवतील. त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी इजिप्तकडे मदत मागितली. (यश. ३०:१, २) पण यहोवाने त्यांना बजावून सांगितलं, की त्यांनी जर इजिप्तवर भरवसा ठेवला तर त्याचे परिणाम खूप भयंकर होतील. (यश. ३०:७, १२, १३) तसंच, यहोवाने यशयाद्वारे त्यांना हेसुद्धा सांगितलं, की खऱ्या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. तो म्हणाला: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.”—यश. ३०:१५ख. टेहळणी बुरूज२१.०१ ३-४ ¶८-९
सोमवार, २४ जानेवारी
ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. ते १,४४,००० इतके होते.—प्रकटी. ७:४.
ख्रिस्ताचे अभिषिक्त बांधव शेवटपर्यंत विश्वासू राहिल्यामुळे त्यांना स्वर्गात त्याच्यासोबत राजे आणि याजक म्हणून सेवा करायचं प्रतिफळ मिळेल. (प्रकटी. २०:६) १,४४,००० अभिषिक्त जनांना त्यांचं स्वर्गातलं प्रतिफळ मिळेल तेव्हा यहोवा, येशू आणि स्वर्गदूत या सगळ्यांना खूप आनंद होईल. १,४४,००० जणांबद्दल सांगितल्यावर प्रेषित योहानला दृष्टान्तात हर्मगिदोनमधून वाचणारा “एक मोठा लोकसमुदाय” दिसतो. १,४४,००० जणांपेक्षा मोठ्या लोकसमुदायतल्या लोकांची संख्या इतकी जास्त आहे, की कोणालाही ती मोजता येणार नाही. (प्रकटी. ७:९, १०) त्यांनी “शुभ्र झगे” घातले आहेत. याचा अर्थ सैतानाच्या जगात त्यांनी स्वतःला “निष्कलंक” ठेवलं आहे. आणि ते देवाला आणि ख्रिस्ताला विश्वासू राहिले आहेत. (याको. १:२७) यहोवाने आणि कोकराने, म्हणजे येशूने त्यांना वाचवलं आहे अशी ते मोठ्याने घोषणा करतात. तसंच, त्यांच्या हातांत खजुराच्या फांद्या आहेत. याचा अर्थ, येशू हा यहोवाने नेमलेला राजा आहे, असं ते आनंदाने मान्य करतात.—योहान १२:१२, १३ पडताळून पाहा. टेहळणी बुरूज२१.०१ १६ ¶६-७
मंगळवार, २५ जानेवारी
तुझी नम्रता मला महान बनवते.—२ शमु. २२:३६.
मस्तक या नात्याने यहोवा आणि येशू आपल्या अधिकाराचा वापर कसा करतात याचं अनुकरण करून एक पुरुष चांगला कुटुंबप्रमुख बनू शकतो. जसं की, त्यांच्यातला नम्रतेचा गुण आपण पाहू या. अख्ख्या विश्वात सगळ्यात बुद्धिमान कोणी असेल तर तो यहोवा आहे. पण तरीसुद्धा तो आपल्या सेवकांची मतं ऐकतो. (उत्प. १८:२३, २४, ३२) याशिवाय, यहोवा परिपूर्ण असला, तरी तो आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. उलट, आपण अपरिपूर्ण आहोत ही गोष्ट लक्षात ठेवून तो आपल्याला मदत करतो. (स्तो. ११३:६, ७) म्हणूनच बायबलमध्ये यहोवाला “सहायक” असं म्हटलं आहे. (स्तो. २७:९; इब्री १३:६) दावीद राजाने हे कबूल केलं, की यहोवा नम्र असल्यामुळेच त्याने त्याला मदत केली आणि म्हणून तो आपल्या कामात यशस्वी झाला. आता येशूच्या उदाहरणाचा विचार करा. तो जरी आपल्या शिष्यांचा प्रभू आणि गुरू होता, तरी त्याने त्यांचे पाय धुतले. येशू स्वतः असं म्हणाला: “जसं मी तुमच्यासाठी केलं, तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुमच्यासमोर आदर्श ठेवलाय.” (योहा. १३:१२-१७) येशूकडे भरपूर अधिकार होता, पण इतरांनी आपली सेवा करावी अशी अपेक्षा त्याने कधीही केली नाही. उलट, त्याने नेहमीच इतरांची सेवा केली.—मत्त. २०:२८. टेहळणी बुरूज२१.०२ ३-४ ¶८-१०
बुधवार, २६ जानेवारी
तरुणांची ताकद हेच त्यांचं वैभव आहे.—नीति. २०:२९.
तरुण भावांनो, तुमच्याकडे शक्ती आहे, स्फूर्ती आहे. त्यामुळे तुम्ही मंडळीसाठी खूप काही करू शकता. तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘सहायक सेवक बनून मी भाऊबहिणींना मदत करू शकतो.’ पण ही जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात, तुमच्याकडे अनुभव नाही असं कदाचित काहींना वाटत असेल. असं असलं, तरी तुम्ही मंडळीत इतरांचा भरवसा आणि आदर मिळवण्यासाठी आत्ताही बरंच काही करू शकता. तरुण भावांनो, तुमच्याकडे असं काही कौशल्य आहे का, ज्याचा मंडळीतल्या भाऊबहिणींना उपयोग होऊ शकतो? आम्हाला माहीत आहे, तुमच्यापैकी अनेकांकडे अशी कौशल्यं आहेत. जसं की, मोबाईल आणि कंप्यूटर कसा वापरायचा याचं तुम्हाला चांगलं ज्ञान आहे. या कौशल्यांचा वापर तुम्ही मंडळीतल्या काही वयस्कर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी करू शकता. वैयक्तिक अभ्यास किंवा सभांची तयारी करण्यासाठी ते मोबाईल किंवा टॅबचा चांगल्या प्रकारे वापर कसा करू शकतात हे तुम्ही त्यांना शिकवू शकता. तुम्ही जे काही कराल त्यातून यहोवाचं मन आनंदी करा. टेहळणी बुरूज२१.०३ २ ¶१, ३; ७ ¶१८
गुरुवार, २७ जानेवारी
प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५.
पत्नी जरी पतीपेक्षा जास्त शिकलेली असली, तरी कौटुंबिक उपासनेत आणि कुटुंबाच्या इतर आध्यात्मिक गोष्टींत पुढाकार घ्यायची जबाबदारी ही पतीचीच आहे. (इफिस. ६:४) कुटुंबाची आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यात पती जरी पुढाकार घेत असला, तरी आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःसुद्धा मेहनत घेतली पाहिजे या गोष्टीची एका पत्नीला जाणीव असते. आणि त्यासाठी वैयक्तिक अभ्यास करण्याकरता आणि मनन करण्याकरता तिने वेळ काढला पाहिजे. त्यामुळे तिच्या मनात यहोवाबद्दलचं प्रेम आणि आदर टिकून राहील. आणि आनंदाने आपल्या पतीच्या अधीन राहायला तिला मदत होईल. आपल्या पतीच्या अधीन राहून स्त्रिया दाखवून देतात, की यहोवावर त्यांचं खूप प्रेम आहे. ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या अधीन राहत नाहीत, त्यांच्या तुलनेत या स्त्रिया जास्त सुखी आणि समाधानी असतात. याशिवाय, तरुण मुला-मुलींसाठी त्या एक चांगलं उदाहरण मांडतात. आणि फक्त कुटुंबातच नाही, तर मंडळीतसुद्धा त्या प्रेमाचं आणि शांतीचं वातावरण टिकवून ठेवतात. (तीत २:३-५) आज यहोवाच्या विश्वासू सेवकांमध्ये स्त्रियांची संख्या सगळ्यात जास्त आहे.—स्तो. ६८:११. टेहळणी बुरूज२१.०२ १३ ¶२१-२३
शुक्रवार, २८ जानेवारी
देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.—याको. ४:८.
धैर्य आणि धीर दाखवण्याच्या बाबतीत प्रेषित पौलने खूप चांगलं उदाहरण मांडलं. काही वेळा आपल्या परीक्षांमुळे त्याला खूप कमजोर असल्यासारखं वाटलं. पण यहोवावर विसंबून राहिल्यामुळे त्या परीक्षांचा धीराने सामना करायची ताकद त्याला मिळाली. (२ करिंथ. १२:८-१०; फिलिप्पै. ४:१३) आपणसुद्धा नम्रपणे यहोवाकडे मदत मागितली, तर तो आपल्यालाही ताकद आणि धैर्य देईल. (याको. ४:१०) यहोवासोबतची मैत्री घट्ट करा आणि आपला आनंद टिकवून ठेवा. आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा यहोवा आपल्याला शिक्षा देत आहे असा आपण कधीही विचार करू नये. याबद्दल येशूचा शिष्य याकोब म्हणतो: “संकट येतं, तेव्हा ‘देव माझी परीक्षा घेतोय,’ असं कोणी म्हणू नये. कारण कोणीही वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही आणि तोसुद्धा वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही.” (याको. १:१३) या गोष्टीवर जर आपला पक्का विश्वास असेल, तर यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होईल. यहोवाने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना परीक्षांचा सामना करायला मदत केली. आणि बायबल म्हणतं, की यहोवा “कधीही बदलत नाही.” (याको. १:१७) त्यामुळे तो आज आपल्यालाही नक्कीच मदत करेल. म्हणून बुद्धी मिळवण्यासाठी आणि आपला विश्वास आणि धैर्य वाढवण्यासाठी यहोवाकडे कळकळून विनंती करा. तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल. टेहळणी बुरूज२१.०२ ३१ ¶१९-२१
शनिवार, २९ जानेवारी
लोखंड जसं लोखंडाला धार लावतं, तसाच एक माणूस आपल्या मित्राला सुधारतो.—नीति. २७:१७.
आपला बायबल विद्यार्थी सभांना येऊ लागतो तेव्हा त्याच्याशी आपुलकीने वागा. (फिलिप्पै. २:४) त्याने आपल्या जीवनात बरेच बदल केले आहेत हे पाहून तुम्हाला किती आनंद होत आहे हे तुम्ही त्याला सांगू शकता. त्याचा बायबल अभ्यास कसा चालला आहे, त्याचे घरचे लोक कसे आहेत किंवा त्याचं काम कसं चाललं आहे, अशा गोष्टी तुम्ही त्याला विचारू शकता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा; ती म्हणजे, त्याला असे प्रश्न विचारू नका ज्यांमुळे त्याला अवघडल्यासारखं वाटेल. अशा प्रकारे त्याची विचारपूस करून तुम्ही त्याच्याशी मैत्री करू शकता. यामुळे त्याला प्रगती करून बाप्तिस्मा घ्यायला मदत होईल. विद्यार्थी जेव्हा प्रगती करू लागतो आणि आपल्या जीवनात बदल करू लागतो, तेव्हा त्याला याची जाणीव होऊ द्या, की तो आता मंडळीचा एक भाग आहे. त्यासाठी तुम्ही त्याचा पाहुणचार करू शकता. (इब्री १३:२) जेव्हा एखादा बायबल विद्यार्थी प्रचारक बनतो तेव्हा तुम्ही त्याला आपल्यासोबत सेवाकार्यासाठी बोलवू शकता. ब्राझील देशात राहणारा जीएगो नावाचा एक प्रचारक म्हणतो: “बऱ्याच भावांनी मला त्यांच्यासोबत सेवाकार्य करायला बोलवलं. यामुळे मी त्यांना आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकलो. आणि मला खूप काही शिकायला मिळालं. शिवाय, माझी यहोवा आणि येशूसोबतची मैत्री आणखी घट्ट झाली.” टेहळणी बुरूज२१.०३ १२ ¶१५-१६
रविवार, ३० जानेवारी
वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका.—रोम. १२:१७.
येशूने आपल्याला शत्रूंवर प्रेम करायला सांगितलं. (मत्त. ५:४४, ४५) पण ते इतकं सोपं नाही. मग कोणती गोष्ट आपल्याला शत्रूंवर प्रेम करायला मदत करू शकते? देवाची पवित्र शक्ती! पवित्र शक्तीच्या मदतीने आपण स्वतःमध्ये प्रेम, सहनशीलता, दयाळूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम हे गुण विकसित करू शकतो. (गलती. ५:२२, २३) ते आपल्याला द्वेष होत असतानाही यहोवाची सेवा करत राहायला मदत करू शकतात. सत्यात असलेल्या पतीने, पत्नीने, मुलाने किंवा शेजाऱ्याने हे गुण दाखवल्यामुळे त्यांचा विरोध करणाऱ्यांची मनं बदलली आहेत; आणि त्यांनी विरोध करायचं थांबवलं आहे. त्यांच्यापैकी अनेक जण तर सत्यातसुद्धा आले आहेत. म्हणून जर तुमचा द्वेष करणाऱ्यांवर प्रेम करणं तुम्हाला कठीण जात असेल, तर पवित्र शक्तीच्या मदतीसाठी प्रार्थना करा. (लूक ११:१३) आणि आपण यहोवाचं ऐकलं तर आपलं नेहमीच भलं होईल असा भरवसा बाळगा. (नीति. ३:५-७) लोक आपला द्वेष करतात तेव्हा खूप त्रास होतो, खूप दुःख होतं. पण प्रेमामध्ये त्यांची मनं जिंकण्यायची जबरदस्त ताकद आहे. आणि आपला विरोध करणाऱ्यांवर आपण प्रेम करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. पण जर विरोध करणारे आपला द्वेष करतच राहिले तर काय? अगदी तेव्हासुद्धा आपण आनंदी राहू शकतो. टेहळणी बुरूज२१.०३ २३ ¶१३; २४ ¶१५, १७
सोमवार, ३१ जानेवारी
असंख्य लोक असलेल्या एका शक्तिशाली राष्ट्राने माझ्या देशावर हल्ला केलाय.—योए. १:६.
या वचनात योएल, भविष्यात होणाऱ्या एका सैन्याच्या हल्ल्याबद्दल सांगत होता. (योए. २:१, ८, ११) यहोवाने सांगितलं की तो त्याच्या ‘महासैन्याचा’ (बाबेलच्या सैन्याचा) वापर करून, आज्ञा न मानणाऱ्या इस्राएली लोकांना शिक्षा करेल. (योए. २:२५) हल्ला करणारे “उत्तरेकडून” येतील असं जे म्हटलं आहे ते अगदी योग्य आहे, कारण बाबेलचं सैन्य हे इस्राएलवर उत्तरेकडून हल्ला करणार होतं. (योए. २:२०) या सैन्याची तुलना सुव्यवस्थित असलेल्या टोळांच्या झुंडीशी केली आहे. त्यांच्याबद्दल योएल म्हणतो, “ते आपआपल्या वाटेने जातात . . . ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, . . . ते चढून घरांत शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.” (योए. २:८, ९) तुम्ही कल्पना करू शकता का, की हे दृश्य कसं होतं? ते सैन्य सगळीकडे होतं. कोणीही त्यांच्यापासून लपू शकलं नाही, किंवा त्यांच्या तावडीतून कोणीही सुटू शकलं नाही. टोळांप्रमाणे बाबेलच्या (किंवा खास्द्यांच्या) सैन्याने इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमवर हल्ला केला. खास्द्यांच्या राजाबद्दल बायबल म्हणतं: “त्याने तरुणांवर किंवा कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही.”—२ इति. ३६:१७. टेहळणी बुरूज२०.०४ ५ ¶११-१२