वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. १२९-१४२
  • नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • सोमवार, १ नोव्हेंबर
  • मंगळवार, २ नोव्हेंबर
  • बुधवार, ३ नोव्हेंबर
  • गुरुवार, ४ नोव्हेंबर
  • शुक्रवार, ५ नोव्हेंबर
  • शनिवार, ६ नोव्हेंबर
  • रविवार, ७ नोव्हेंबर
  • सोमवार, ८ नोव्हेंबर
  • मंगळवार, ९ नोव्हेंबर
  • बुधवार, १० नोव्हेंबर
  • गुरुवार, ११ नोव्हेंबर
  • शुक्रवार, १२ नोव्हेंबर
  • शनिवार, १३ नोव्हेंबर
  • रविवार, १४ नोव्हेंबर
  • सोमवार, १५ नोव्हेंबर
  • मंगळवार, १६ नोव्हेंबर
  • बुधवार, १७ नोव्हेंबर
  • गुरुवार, १८ नोव्हेंबर
  • शुक्रवार, १९ नोव्हेंबर
  • शनिवार, २० नोव्हेंबर
  • रविवार, २१ नोव्हेंबर
  • सोमवार, २२ नोव्हेंबर
  • मंगळवार, २३ नोव्हेंबर
  • बुधवार, २४ नोव्हेंबर
  • गुरुवार, २५ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २६ नोव्हेंबर
  • शनिवार, २७ नोव्हेंबर
  • रविवार, २८ नोव्हेंबर
  • सोमवार, २९ नोव्हेंबर
  • मंगळवार, ३० नोव्हेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. १२९-१४२

नोव्हेंबर

सोमवार, १ नोव्हेंबर

इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.—फिलिप्पै. २:३.

आज हुशार किंवा शिक्षित मानले जाणारे पुष्कळ लोक स्वतःला महत्त्व देण्याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याची थट्टा करतात. त्यांचं म्हणणं आहे की जर आपण इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं तर ते आपला फायदा उचलतील. पण खरं पाहता सैतानाच्या जगाने आत्मकेंद्रित मनोवृत्तीला बढावा दिल्यामुळे काय परिणाम झाले आहेत? स्वार्थी लोक आनंदी आहेत का? त्यांची कुटुंबं सुखी आहेत का? त्यांचे भरवशालायक मित्र आहेत का? त्यांचं देवासोबत एक घनिष्ठ नातं आहे का? तुमच्या पाहण्यात जे आलं असेल त्यावरून तुम्हाला काय वाटतं, कोणत्या बुद्धीमुळे चांगले परिणाम घडून आले आहेत, जगाच्या की देवाच्या वचनात दिलेल्या? (१ करिंथ. ३:१९) नावाजलेल्या बुद्धिमान लोकांच्या सल्ल्यानुसार वागणारे लोक, हरवलेल्या प्रवाशासारखे आहेत जो योग्य दिशेसाठी अशा सहप्रवाशाला विचारतो जो स्वतःदेखील हरवला आहे. येशूच्या काळात ज्यांना बुद्धिमान किंवा सुज्ञ मानलं जायचं त्यांच्याबद्दल त्याने म्हटलं: “ते आंधळे असून इतरांना मार्ग दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्‍या आंधळ्याला मार्ग दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.” (मत्त. १५:१४) यावरून स्पष्टच होतं की देवाच्या नजरेत जगाची बुद्धी मूर्खपणाची आहे. टेहळणी बुरूज१९.०५ २४-२५ ¶१४-१६

मंगळवार, २ नोव्हेंबर

ते . . . त्याच्या निवडलेल्या लोकांना . . . गोळा करतील.—मत्त. २४:३१.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांची संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. मग यामुळे आपल्याला चिंता व्हावी का? मुळीच नाही. “जे आपले आहेत त्यांना यहोवा ओळखतो.” (२ तीम. २:१९) स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणारे खरोखर अभिषिक्‍त आहेत की नाही हे यहोवाला माहीत आहे, पण जे बांधव स्मारकविधीच्या वेळी त्यांची मोजणी करतात त्यांना ही गोष्ट माहीत नाही. त्यामुळे या संख्येत अशांचाही समावेश आहे, ज्यांना वाटतं की ते अभिषिक्‍त आहेत पण खरंतर ते अभिषिक्‍त नाहीत. उदाहरणार्थ, काही जण आधी स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करायचे पण नंतर त्यांनी ते करण्याचं थांबवलं. इतर काही जणांना मानसिक किंवा भावनात्मक समस्या असल्यामुळे ते असं मानायचे की ते स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करतील. तेव्हा हे स्पष्टच होतं, की आज पृथ्वीवर किती अभिषिक्‍त जन उरले आहेत हे आपण सांगू शकत नाही. येशू जेव्हा अभिषिक्‍त जनांना पृथ्वीवरून घेऊन जाण्यासाठी येईल तेव्हा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत अभिषिक्‍त ख्रिस्ती असतील. बायबल म्हणतं की शेवटच्या दिवसांत पृथ्वीवर कमी अभिषिक्‍त जन उरतील. (प्रकटी. १२:१७) पण मोठं संकट सुरू होईल तेव्हा या पृथ्वीवर नेमके किती अभिषिक्‍त जन असतील त्याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही. टेहळणी बुरूज२०.०१ २९-३० ¶११-१३

बुधवार, ३ नोव्हेंबर

देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.—योहा. ३:१६.

यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे दाखवण्यासाठी येशूने अशा एका मुलाचा दाखला दिला जो आपल्या पित्याला सोडून निघून गेला होता. (लूक १५:११-३२) आपला मुलगा परत येईल ही आशा त्या पित्याने कधीच सोडली नाही. मुलगा घरी परत आला तेव्हा त्याने त्याचं आनंदाने स्वागत केलं. त्याच प्रकारे, आपण यहोवापासून दूर गेलो असलो पण नंतर आपण पश्‍चात्ताप दाखवला, तर आपण खातरी बाळगू शकतो की आपला प्रेमळ पिता आपलं आनंदाने स्वागत करेल. आदाममुळे झालेलं सर्व नुकसान आपला पिता भरून काढेल. आदामने बंड केल्यानंतर यहोवाने ठरवलं की तो मानवजातीतून १,४४,००० जणांना दत्तक म्हणून घेईल आणि ते स्वर्गात येशूसोबत राजे व याजक या नात्याने सेवा करतील. नवीन जगात येशू आणि त्याचे सहराजे आज्ञाधारक मानवांना परिपूर्ण बनण्यासाठी मदत करतील. ते यहोवाला एकनिष्ठ आहेत की नाही याची शेवटची परीक्षा त्यांनी विश्‍वासूपणे पार केल्यावर देव त्यांना सर्वकाळाचं जीवन देईल. पृथ्वी जेव्हा देवाच्या परिपूर्ण मुलांनी भरून जाईल तेव्हा त्याला खूप समाधान वाटेल. खरंच, तो खूप आनंदाचा काळ असेल! टेहळणी बुरूज२०.०२ ६-७ ¶१७-१९

गुरुवार, ४ नोव्हेंबर

तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्‍या मनोवृत्तीत तुम्ही सतत नवीन होत जावे.—इफिस. ४:२३.

आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की, ‘ख्रिस्ती बनण्यासाठी मी केलेले बदल फक्‍त वरवरचे आहेत की मनापासून आहेत?’ आपलं आतलं व्यक्‍तिमत्त्व बदलणं खूप महत्त्वाचं आहे. मत्तय १२:४३-४५ या वचनांनुसार आपल्याला काय करण्याची गरज आहे याबद्दल येशूने सांगितलं. या वचनांतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे आपण मनातून चुकीचे विचार काढणंच पुरेसं नाही, तर त्याजागी देवाला मान्य असलेले विचार भरणंही गरजेचं आहे. आपण आतून ज्या प्रकारची व्यक्‍ती आहोत त्यात बदल करणं खरंच शक्य आहे का? देवाचं वचन सांगतं: “देवाच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेले, तसेच खरे नीतिमत्त्व आणि एकनिष्ठता यांवर आधारित असलेले नवे व्यक्‍तिमत्त्व तुम्ही धारण करावे.” (इफिस. ४:२४) यावरून स्पष्ट आहे की आतून बदल करणं शक्य आहे. पण हे सोपं नाही. आपण फक्‍त चुकीच्या इच्छांचा आणि कार्यांचा प्रतिकार करणंच पुरेसं नाही तर आपल्या “विचारांना दिशा देणाऱ्‍या मनोवृत्तीत” बदल करणंही गरजेचं आहे. यांमध्ये आपली इच्छा, मनोवृत्ती आणि प्रेरणा यांत बदल करणंही सामील आहे आणि यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. टेहळणी बुरूज१९.०६ ९-१० ¶६-७

शुक्रवार, ५ नोव्हेंबर

आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत.—उत्प. १९:१३.

यहोवाने लोटला व त्याच्या कुटुंबाला द्या दाखवली आणि त्यांना वाचवण्यासाठी देवदूतांना पाठवलं. पण लोट “दिरंगाई” करू लागला. त्या देवदूतांना त्याला व त्याच्या कुटुंबाला हात धरून शहराबाहेर आणावं लागलं. (उत्प. १९:१५, १६) मग देवदूतांनी त्यांना डोंगरांकडे पळून जायला सांगितलं. पण यहोवाची आज्ञा पाळण्याऐवजी लोटने जवळच्या एका नगरांत जाण्याची इच्छा दर्शवली. (उत्प. १९:१७-२०) हे सर्व होत असतानाही यहोवाने धीराने लोटचं ऐकलं आणि त्याला त्या नगरात जाऊ दिलं. पण नंतर त्या नगरात राहण्याची भीती वाटत असल्यामुळे तो डोंगराळ भागात जाऊन राहू लागला. हा तोच भाग होता जिथे यहोवाने त्याला सुरुवातीला जायला सांगितलं होतं. (उत्प. १९:३०) यहोवाने लोटच्या बाबतीत खरंच किती धीर दाखवला! लोटसारखंच कदाचित आपल्या आध्यात्मिक कुटुंबातला एखादा सदस्य चुकीचे निर्णय घेईल आणि यामुळे त्याच्यावर संकट ओढवू शकतं. असं झालं तर आपली प्रतिक्रिया काय असणार? आपण कदाचित लगेच म्हणू की तो त्याच्या चुकीच्या निर्णयांचे फळ भोगत आहे आणि हे कदाचित खरंदेखील असेल. (गलती. ६:७) पण, अशा वेळी आपण यहोवाचं अनुकरण केलं पाहिजे आणि त्याने लोटला जशी मदत केली तशी मदत आपण त्या सदस्याला दिली पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०६ २०-२१ ¶३-५

शनिवार, ६ नोव्हेंबर

यहोवा मला साहाय्य करतो; मी भिणार नाही.—इब्री १३:६.

विरोधक जेव्हा आपल्या उपासनेवर बंदी घालतात तेव्हा त्यांची इच्छा असते की आपण घाबरून जावं आणि यहोवाची सेवा बंद करावी. बंदी आणण्यासोबतच, ते आपल्याबद्दल अफवा पसरवू शकतात, आपल्या घराची झडती घेण्यासाठी अधिकाऱ्‍यांना पाठवू शकतात, आपल्याला कोर्टात खेचू शकतात किंवा आपल्यापैकी काहींना तुरुंगात टाकू शकतात. आपल्यापैकी काहींना तुरुंगात टाकण्यात यश आल्यामुळे त्यांना वाटू शकतं की आपण घाबरून जाऊ. आपण जर त्यांच्या भीतीला बळी पडलो तर आपण कदाचित स्वतःच आपल्या उपासनेवर ‘बंदी’ आणू. आपल्याला लेवीय २६:३६, ३७ या वचनांत सांगितलेल्या लोकांसारखं बनण्याची मुळीच इच्छा नाही. भीतीमुळे आपण यहोवाची सेवा थांबवणार नाही किंवा कमी करणार नाही. आपण पूर्णपणे यहोवावर भरवसा ठेवतो आणि भयभीत होत नाही. (यश. २८:१६) आपण मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना करतो. आपल्याला माहीत आहे की यहोवाच्या मदतीमुळे सर्वात शक्‍तिशाली सरकारसुद्धा आपल्याला विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करण्यापासून रोखू शकत नाही. विरोधामुळे आपण घाबरून जात नाही, याउलट यहोवाची सेवा करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होऊ शकतो. टेहळणी बुरूज१९.०७ ९-१० ¶६-७

रविवार, ७ नोव्हेंबर

वचनाची घोषणा कर.—२ तीम. ४:२.

सेवाकार्यात तुम्हाला यश मिळत नसेल तरी हार न मानता अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा जे भविष्यात येशूचे शिष्य बनू शकतात. लक्षात असू द्या, येशूने शिष्य बनवण्याच्या कामाची तुलना मासेमारीशी केली. मासे पकडणाऱ्‍यांना लगेच मासे मिळत नाहीत तर त्यांना कदाचित बरेच तास मेहनत करावी लागते. बऱ्‍याचदा तर ते रात्री उशीरापर्यंत काम करतात किंवा अगदी पहाटे मासे पकडायला जातात. कधीकधी तर त्यांना समुद्रात दूरवर प्रवास करावा लागतो. (लूक ५:५) त्याच प्रकारे, काही प्रचारक योग्य मनाच्या लोकांना शोधण्यासाठी धीराने बरेच तास खर्च करतात आणि मेहनत घेतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेळी जावं लागतं. असं का? त्यांना जास्तीत जास्त लोक भेटावेत म्हणून ते असं करतात. अशा प्रकारे भरपूर मेहनत घेणाऱ्‍या प्रचारकांना यश मिळतं. त्यांना आपल्या संदेशात आवड दाखवणारे लोक भेटतात. तुम्ही दिवसाच्या अशा वेळी किंवा अशा ठिकाणी प्रचार करू शकता का जेव्हा लोक भेटण्याची शक्यता जास्त असते? बायबल अभ्यास घेताना धीर दाखवणं का गरजेचं आहे? बायबल विद्यार्थ्याने फक्‍त बायबलच्या शिकवणी जाणून घ्याव्यात आणि त्यांवर प्रेम करावं एवढीच आपली इच्छा नाही. आपण त्याला बायबलच्या लेखकावर, यहोवावर प्रेम करायला शिकवणंही गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१९.०७ १८-१९ ¶१४-१५

सोमवार, ८ नोव्हेंबर

[मी] मागच्या गोष्टी विसरून पुढे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी झटत आहे.—फिलिप्पै. ३:१३.

आपल्यापैकी काहींना पूर्वी केलेल्या पापांमुळे आजही दोषीपणाची भावना सतावत असेल. यांवर आपण कशी मात करू शकतो? ख्रिस्ताने दिलेलं खंडणी बलिदान याविषयावर वैयक्‍तिक अभ्यास केल्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते. आपण या प्रोत्साहनदायक विषयाबद्दल अभ्यास, मनन आणि प्रार्थना केली तर अनावश्‍यकपणे येणाऱ्‍या दोषीपणाच्या भावनेवर आपण मात करू शकू. आपल्याला यहोवाने केव्हाच माफ केलं असेल, पण आपण कदाचित स्वतःला अजूनही शिक्षा करत असू. अशा भावनेवरसुद्धा आपल्याला मात करायला मदत होईल. पौलकडून आपण आणखी एक धडा शिकू शकतो. यहोवाची सेवा वाढवण्यासाठी काहींनी अशी नोकरी सोडली ज्यामुळे पुढे जाऊन ते श्रीमंत होऊ शकले असते. आपल्याबाबतीतही जर असं असेल तर आपणही मागे सोडलेल्या गोष्टी विसरल्या पाहिजेत. आपण पैसे कमवण्याची संधी सोडली नसती तर आपल्याकडे आज अनेक गोष्टी असत्या असा विचार करण्याचं आपण टाळलं पाहिजे. (गण. ११:४-६; उप. ७:१०) “मागच्या गोष्टी” यांमध्ये कदाचित अशा गोष्टीही असू शकतात ज्या आपण साध्य केल्या आहेत किंवा अशा परीक्षा ज्यांना आपण यशस्वीपणे तोंड दिलं आहे. हे खरं आहे, की यहोवाने पूर्वी आपल्याला ज्या प्रकारे मदत केली त्यावर विचार केल्यामुळे आपलं त्याच्यासोबतचं नातं घनिष्ठ होऊ शकतं. पण यामुळे आपण असा विचार करू नये की आता यहोवासाठी आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही.—१ करिंथ. १५:५८. टेहळणी बुरूज१९.०८ ३ ¶५-६

मंगळवार, ९ नोव्हेंबर

प्रार्थना करत राहा.—१ थेस्सलनी. ५:१७.

आपण कुठूनही आणि कोणत्याही वेळी यहोवाला प्रार्थना करू शकतो. आपली प्रार्थना लक्ष देऊन ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. आपल्याला या गोष्टीची जाणीव होते तेव्हा त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम आणखी वाढतं. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने असं म्हटलं, की “मी परमेश्‍वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.” (स्तो. ११६:१) आपला पिता आपल्या प्रार्थना फक्‍त ऐकतच नाही तर त्यांचं उत्तरही देतो. याबद्दल प्रेषित योहानने म्हटलं की देवाच्या “इच्छेनुसार असलेले काहीही आपण मागितले तरी तो आपले ऐकतो.” (१ योहा. ५:१४, १५) पण हेही खरं आहे की कदाचित यहोवा आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या प्रार्थनांचं उत्तर देणार नाही. आपल्यासाठी सर्वात चांगलं काय आहे हे त्याला माहीत आहे. म्हणून कधीकधी आपण प्रार्थनेत मागितलेल्या सर्वच गोष्टी तो आपल्याला देत नाही किंवा उत्तरासाठी आपण थांबावं अशी त्याची इच्छा असते. (२ करिंथ. १२:७-९) यहोवा आपल्या गरजा पुरवतो. यहोवाने आज्ञा दिली आहे की एका कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि हीच गोष्ट तो स्वतःसुद्धा करतो. (१ तीम. ५:८) तो आपल्या मुलांना जगण्यासाठी लागणाऱ्‍या सर्व गोष्टी पुरवतो. आपण अन्‍न, वस्त्र आणि निवारा यांबद्दल चिंता करू नये अशी त्याची इच्छा आहे. (मत्त. ६:३२, ३३; ७:११) एक प्रेमळ पिता असल्यामुळे यहोवा भविष्यातही आपल्या सर्व गरजा नक्कीच पूर्ण करेल! टेहळणी बुरूज२०.०२ ५ ¶१०-१२

बुधवार, १० नोव्हेंबर

तेव्हा एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल.—योहा. १०:१६.

स्वर्गातल्या जीवनाची आशा असणारे सर्वच अभिषिक्‍त ख्रिस्ती “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” नाहीत. (मत्त. २४:४५-४७) पहिल्या शतकाप्रमाणे यहोवा आणि येशू आजसुद्धा काही बांधवांचा उपयोग करून बऱ्‍याच लोकांना आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहेत किंवा शिकवत आहेत. पहिल्या शतकात ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं लिहिण्यासाठी फक्‍त काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचाच वापर करण्यात आला होता. आजही देवाच्या सेवकांना “योग्य वेळी अन्‍न पुरवण्यासाठी” फक्‍त काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जबाबदारी देण्यात आली आहे. यहोवाने ठरवलं आहे की तो जास्तीत जास्त लोकांना पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन देईल आणि येशूसोबत राज्य करण्यासाठी काहींना स्वर्गातलं जीवन देईल. यहोवा आपल्या सर्व सेवकांना, म्हणजे “यहूदी” आणि “दहा जण” यांना प्रतिफळ देतो. यहोवाने त्या सर्वांना सारखेच नियम दिले आहेत आणि त्यांनी ते पाळणं गरजेचं आहे. तसंच त्यांनी विश्‍वासू आणि नम्र राहणंही गरजेचं आहे. (जख. ८:२३) त्यासोबतच, सर्वांनी एकतेने सेवा करण्याचा आणि मंडळीत शांती टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. आपण जसजसं अंताच्या जवळ जात आहोत, तसतसं आपण यहोवाची सेवा करत राहू या आणि “एक कळप” या नात्याने ख्रिस्ताचं अनुकरण करत राहू या. टेहळणी बुरूज२०.०१ ३१ ¶१५-१६

गुरुवार, ११ नोव्हेंबर

जरी एखादा . . . वचनाचे पालन करणारा नसला, तरी त्याने एकाही शब्दाशिवाय केवळ आपल्या . . . वागणुकीमुळे, अर्थात, . . . शुद्ध आचरण आणि . . . मनापासून दाखवत असलेला आदर पाहून विश्‍वासात यावे.—१ पेत्र ३:१, २.

आपण आपल्या नातेवाइकांना आनंदाचा संदेश स्वीकारण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. पण आपण त्यांना बायबलच्या संदेशाबद्दल विचार करण्याचं आणि त्याला प्रतिसाद देण्याचं प्रोत्साहन मात्र नक्कीच देऊ शकतो. (२ तीम. ३:१४, १५) चांगलं उदाहरण मांडा. सहसा आपण जे बोलतो त्याकडे नाही, तर आपण जे करतो त्याकडे आपल्या नातेवाइकांचं जास्त लक्ष असतं. नातेवाइकांना मदत करत राहा. यहोवाने आपल्यासमोर चांगलं उदाहरण मांडलं आहे. लोकांनी आनंदाच्या संदेशाला प्रतिसाद द्यावा आणि त्यांना जीवन मिळावं यासाठी यहोवा आपल्या लोकांना वारंवार संधी देत आहे. (यिर्म. ४४:४) प्रेषित पौलने तीमथ्यला इतरांना नेहमी मदत करत राहण्यासाठी सांगितलं. असं का? कारण असं केल्याने त्याचा आणि त्याचं ऐकणाऱ्‍यांचा जीव वाचणार होता. (१ तीम. ४:१६) आपलं नातेवाइकांवर प्रेम असल्यामुळे आपली इच्छा असते की त्यांनी बायबलच्या सत्याबद्दल शिकून घ्यावं. टेहळणी बुरूज१९.०८ १४ ¶२; १६-१७ ¶८-९

शुक्रवार, १२ नोव्हेंबर

झाकलेल्या प्रेमापेक्षा, उघड शब्दताडण बरे.—नीति. २७:५.

एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे एखादी व्यक्‍ती आपल्याला सल्ला देते तर याचा अर्थ आपल्याकडून कदाचित अशी काहीतरी चूक झाली आहे ज्याची आपल्याला जाणीव नाही. अशा वेळी कदाचित आपण सल्ला लगेच नाकारू. तसंच, सल्ला देणाऱ्‍याबद्दल किंवा ज्या प्रकारे सल्ला देण्यात आला त्याबद्दल कदाचित टीका करू. पण आपण नम्र असलो तर योग्य मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करू. नम्र व्यक्‍ती दिलेल्या सल्ल्याची कदर करते. उदाहरणार्थ, विचार करा की तुम्ही ख्रिस्ती सभेमध्ये आहात. भाऊबहीणींशी बोलल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण तुम्हाला जरा बाजूला घेऊन म्हणतो की तुमच्या दातात काहीतरी अडकलं आहे. यात काही शंका नाही की हे ऐकून तुम्हाला नक्कीच अवघडल्यासारखं वाटेल. पण त्या व्यक्‍तीने तुम्हाला त्याबद्दल सांगितलं म्हणून तुम्ही तिचे आभार मानणार नाही का? खरंतर, तुम्हाला असंही वाटेल की आधीच कुणीतरी याबद्दल सांगितलं असतं तर बरं झालं असतं! त्याचप्रमाणे, आपल्याला गरज असताना जर एका भावाने किंवा बहिणीने धैर्य दाखवून सल्ला दिला, तर त्या वेळी आपण नम्रपणे त्यांच्याबद्दल कदर बाळगली पाहिजे. कारण आपण त्या व्यक्‍तीला आपला शत्रू नाही तर मित्र समजतो.—नीति. २७:६; गलती. ४:१६. टेहळणी बुरूज१९.०९ ५ ¶११-१२

शनिवार, १३ नोव्हेंबर

माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको.—नीति. ६:२०.

यहोवाने आईला कुटुंबात एक आदरणीय भूमिका दिली आहे आणि तिला आपल्या मुलांवर काही प्रमाणात अधिकारही दिला आहे. तसं पाहायला गेलं तर एक आई जशी बोलते आणि वागते त्याचा जबरदस्त प्रभाव मुलांवर आयुष्यभर राहू शकतो. (नीति. २२:६) येशूची आई, मरीया हिच्याकडून एक आई काय शिकू शकते? मरीयाला शास्त्रवचनांबद्दल सखोल समज होती. ती मनापासून यहोवाचा आदर करायची आणि त्याच्यासोबत तिचं घनिष्ठ नातं होतं. ती स्वेच्छेने यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायला व त्याच्या अधीन राहायला तयार होती, मग यामुळे तिच्या जीवनात खूप मोठे बदल झाले तरीही. (लूक १:३५-३८, ४६-५५) आज एक आई अनेक बाबतीत मरीयाचं अनुकरण करू शकते. ते कसं? अनुकरण करण्याचा पहिला मार्ग म्हणजे, वैयक्‍तिक बायबल अभ्यास करणं आणि स्वतः यहोवाला प्रार्थना करून त्याच्यासोबतची मैत्री टिकवून ठेवणं. दुसरा मार्ग म्हणजे, यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्या जीवनात बदल करणं. टेहळणी बुरूज१९.०९ १८ ¶१७-१९

रविवार, १४ नोव्हेंबर

पाहा! . . . एक मोठा लोकसमुदाय.—प्रकटी. ७:९.

देवाने प्रेषित योहानला भविष्याबद्दल एक रोमांचक दृष्टान्त दाखवला. त्यात देवाच्या अभिषिक्‍त दासांवर शेवटचा शिक्का मारेपर्यंत, देवदूतांना मोठ्या संकटाचे विनाशकारी वारे अडवून धरायला सांगितलं होतं. (प्रकटी. ७:१-३) अभिषिक्‍तांच्या या गटात १,४४,००० जण असतील आणि ते येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. (लूक १२:३२; प्रकटी. ७:४) मग योहानने आणखी एका गटाचा उल्लेख केला. तो इतका मोठा होता की योहानने “पाहा!” असं म्हटलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याला खूप आश्‍चर्य झालं आणि म्हणून त्याने असा शब्द वापरला. त्याने नेमकं काय पाहिलं? त्याने म्हटलं: “सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही मनुष्याला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय . . . राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा असलेला मला दिसला.” (प्रकटी. ७:९-१४) योहानला हे जाणून नक्कीच आनंद झाला असेल की भविष्यात देवाची योग्य पद्धतीने उपासना करणारे लाखो लोक असतील! या दृष्टान्तामुळे योहानचा विश्‍वास मजबूत झाला असेलच. पण आपण या शेवटच्या दिवसांत जगत आहोत म्हणून या दृष्टान्तामुळे आपला विश्‍वास तर आणखीनच मजबूत व्हायला हवा. आपल्या काळात लाखो लोक यहोवाची उपासना करत आहेत आणि त्यांना मोठं संकट पार करून या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे. टेहळणी बुरूज१९.०९ २६ ¶२-३

सोमवार, १५ नोव्हेंबर

त्यांच्यावर अचानक नाश येईल, आणि त्यातून त्यांची सुटका होणारच नाही.—१ थेस्सलनी. ५:३.

कल्पना करा, बायबलमध्ये भाकीत केलेली “शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा राष्ट्रांनी नुकतीच केली आहे. अशा वेळी ते कदाचित गर्वाने म्हणतील, की ‘जगात कधी घडलं नाही ते आता घडलं आहे; संपूर्ण जगात शांतीचं वातावरण प्रस्थापित झालं आहे!’ पण त्यांना माहीत नाही की पुढे जे घडणार आहे ते त्यांना थांबवता येणार नाही. मोठ्या बाबेलचा नाश हा ठरलेला आहे! (प्रकटी. १७:५, १५-१८) कारण देव “आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात” घालेल. कोणता विचार असेल तो? खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश करण्याचा विचार. त्यात ख्रिस्ती धर्मजगताचाही समावेश होतो. देव आपला विचार, “दहा शिंगे” असलेल्या गडद लाल रंगाच्या जंगली पशूच्या मनात घालेल. दहा शिंगे ही सर्व राजकीय सरकारांना सूचित करतात. ती दहा शिंगे “जंगली पशू” म्हणजे संयुक्‍त राष्ट्रसंघाचं समर्थन करतात. (प्रकटी. १७:३, ११-१३; १८:८) राजकीय शक्‍तींनी खोट्या धर्मावर हल्ला करणं हे मोठ्या संकटाची सुरुवात झाल्याचं चिन्ह असेल. खरंच, हे सगळं अचानक घडेल आणि इतकं भयानक असेल की संपूर्ण पृथ्वीवर याचा परिणाम दिसून येईल. टेहळणी बुरूज१९.१० १४ ¶१, ३

मंगळवार, १६ नोव्हेंबर

इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणारा दियत्रफेस आम्ही सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची कदर करत नाही.—३ योहा. ९.

पहिल्या शतकातल्या मंडळीत जे बांधव पुढाकार घ्यायचे, त्यांचा दियत्रफेस हेवा करायचा. त्याला मंडळीत सगळ्यांपेक्षा “वरचढ” व्हायचं होतं म्हणून तो प्रेषित योहानची आणि इतर जबाबदार बांधवांची बदनामी करत होता. (३ योहा. १०) आपण कदाचित दियत्रफेससारखं वागणार नाही. पण आपल्याला हवी असलेली जबाबदारी इतरांना मिळते तेव्हा आपल्या मनात त्यांच्याबद्दल ईर्ष्या येऊ शकते. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की ही जबाबदारी आपण त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. ईर्ष्या ही एका विषारी रोपट्याप्रमाणे आहे. एकदा का ईर्ष्येचं बी आपल्या मनात रूजलं तर ते काढून टाकणं कठीण जाऊ शकतं. हेवा, गर्व आणि स्वार्थ अशा नकारात्मक भावनांमुळे ईर्ष्येला खतपाणी मिळतं. तसंच, ईर्ष्येमुळे प्रेम, दया आणि करूणा यांसारख्या चांगल्या गुणांची वाढ खुंटते. म्हणूनच जेव्हा ईर्ष्या आपल्या मनात मूळ धरू लागते तेव्हाच आपण ती उपटून टाकली पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०२ १५ ¶६-७

बुधवार, १७ नोव्हेंबर

माझ्या शरीरात एक काटा . . . ठेवण्यात आला आहे.—२ करिंथ. १२:७.

या वचनात प्रेषित पौलला म्हणायचं होतं की त्याच्या जीवनात एक वेदनादायक समस्या होती. आपल्या पायात काटा रुतल्यावर जशी आपल्याला खूप वेदना होते, तशीच एखादी वेदनादायक समस्या त्याच्या जीवनात होती. त्याने त्या समस्येबद्दल म्हटलं, की जणू “सैतानाचा एक दूत, [त्याच्या] तोंडात मारत” आहे. सैतान किंवा दुष्ट स्वर्गदूतांनी कदाचित पौलवर थेटपणे समस्या आणल्या नसतील, म्हणजेच त्यांनी त्याच्या शरीरात थेटपणे काटा रुतवला नसेल. पण त्या दुष्ट आत्मिक प्राण्यांनी जेव्हा पौलच्या शरीरात “काटा” पाहिला असेल तेव्हा तो आणखी खोलवर रुतवण्याचा, म्हणजेच त्याची समस्या आणखी वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. मग अशा वेळी पौलने काय केलं? पौलची सुरुवातीला इच्छा होती की यहोवाने त्याच्या शरीरातून तो “काटा” काढून टाकावा. तो म्हणतो: “तो काटा काढून टाकण्यासाठी मी तीन वेळा प्रभूला [यहोवाला] विनंती केली.” पण, पौलने अनेक वेळा प्रार्थना करूनदेखील तो काटा त्याच्या शरीरातून निघाला नाही. मग याचा अर्थ असा होतो का की यहोवाने त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नाही? त्याने नक्कीच त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं! यहोवाने त्याच्या समस्या दूर केल्या नाहीत, पण त्याला त्या सहन करण्याची ताकद दिली. यहोवाने त्याला म्हटलं: “माझी अपार कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे, कारण दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.” (२ करिंथ. १२:८, ९) खरंतर, यहोवाच्या मदतीमुळेच पौल आनंदी राहू शकला आणि मनाची शांती टिकवून ठेवू शकला.—फिलिप्पै. ४:४-७. टेहळणी बुरूज१९.११ ९ ¶४-५

गुरुवार, १८ नोव्हेंबर

तू केवळ तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच पवित्र सेवा कर.—मत्त. ४:१०.

यहोवाने आपल्याला घडवलं आहे आणि जीवन दिलं आहे म्हणून आपण फक्‍त त्याचीच उपासना केली पाहिजे. (प्रकटी. ४:११) हे जरी खरं असलं तरी एक धोका आहे. आपल्या मनात यहोवाबद्दल प्रेम आणि आदर असला तरी आपण फक्‍त त्याचीच उपासना करण्यापासून चुकू शकतो. बायबलनुसार यहोवाला समर्पित असणं म्हणजे त्याच्याबद्दल मनात सखोल प्रेम असणं. आणि यहोवावर मनापासून प्रेम करणं म्हणजे फक्‍त त्याचीच उपासना करणं. यामुळे आपण कोणत्याही व्यक्‍तीला किंवा गोष्टीला यहोवाची जागा घेऊ देणार नाही. यहोवावर असलेलं आपलं प्रेम आंधळं नाही. असं का? कारण आपण यहोवाबद्दल अनेक गोष्टी शिकून घेतल्या आहेत. त्याचे सुंदर गुण आपल्याला खूप आवडतात. यहोवाला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही हे आपल्याला माहीत आहे आणि त्यांबद्दल आपल्यालाही त्याच्यासारखंच वाटतं. यहोवाचा मानवांसाठी असलेला उद्देश आपल्याला माहीत आहे आणि आपण त्याच्या स्तरांनुसार जीवन जगतो. त्याने आपल्याला त्याच्याशी मैत्री करण्याची संधी दिली आहे आणि हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. (स्तो. २५:१४) आपल्या सृष्टिकर्त्याबद्दल शिकत असलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे आपण त्याच्या आणखी जवळ येतो.—याको. ४:८. टेहळणी बुरूज१९.१० २६ ¶१-३

शुक्रवार, १९ नोव्हेंबर

मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.—नीति. १७:१७.

आज आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, अनेकांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवांमुळे दुःख भोगावं लागतं. अशी परिस्थिती उद्‌भवल्यावर आपण भाऊबहिणींना आपल्या घरी राहायला बोलवू शकतो. तसंच, इतर जण त्यांना आर्थिक मदत करू शकतात. आपल्याला या गोष्टी करणं शक्य नसल्या तरी आपण सगळेच आपल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना मात्र नक्कीच करू शकतो. आपले भाऊबहीण निराश झाल्याचं आपल्याला कळतं, तेव्हा आपण काय बोलावं किंवा करावं हे कदाचित त्या वेळी आपल्याला सुचणार नाही. पण असं असलं तरी आपण सगळेच मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या मित्राला वेळ देऊ शकतो. तो आपल्याशी बोलत असतो तेव्हा आपण त्याचं लक्ष देऊन ऐकू शकतो. तसंच, आपण त्याला एखादं सांत्वन देणारं आपलं आवडतं वचनही सांगू शकतो. (यश. ५०:४) मित्रांना आपली गरज असते, तेव्हा आपण त्यांच्यासोबत असणं, हीच खरंतर त्या वेळी खूप महत्त्वाची गोष्ट असते. आपण आजच आपल्या भाऊबहिणींसोबत एक घनिष्ठ नातं जोडण्याचा आणि ते टिकवून ठेवण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. मैत्रीचे हे संबंध फक्‍त या व्यवस्थेच्या अखेरपर्यंतच नाही तर अनंतकाळापर्यंत टिकून राहतील! टेहळणी बुरूज१९.११ ७ ¶१८-१९

शनिवार, २० नोव्हेंबर

परमेश्‍वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल तर त्याचा विधी असा.—लेवी. ७:११.

यहोवा देवावर मनापासून प्रेम असल्यामुळे एक व्यक्‍ती स्वेच्छेने हे बलिदान द्यायची. बलिदान अर्पण करणारी व्यक्‍ती, तिच्या कुटुंबातले सदस्य आणि याजक त्या प्राण्याचं मांस खाऊ शकत होते. पण बलिदान देण्यात आलेल्या प्राण्याचे काही अवयव आणि भाग फक्‍त यहोवासाठी राखून ठेवण्यात यायचे. ते भाग कोणते होते? यहोवाच्या नजरेत त्या प्राण्याची चरबी हा त्याचा सर्वोत्तम भाग होता. त्याने आज्ञा दिली होती की बलिदान म्हणून देण्यात आलेल्या प्राण्याचे काही महत्त्वाचे अवयव, जसं की गुरदे त्याच्यासाठी राखून ठेवण्यात यावे. (लेवी. ३:६, १२, १४-१६) म्हणून जेव्हा एखादी इस्राएली व्यक्‍ती यहोवाला स्वखुशीने प्राण्याचे महत्त्वाचे अवयव आणि चरबी अर्पण करायची तेव्हा त्याला खूप आनंद व्हायचा. अशा प्रकारचं बलिदान देण्याद्वारे ती व्यक्‍ती दाखवायची की यहोवाला आपलं सर्वोत्तम देण्याची तिची इच्छा आहे. येशू ख्रिस्तानेही यहोवाप्रती प्रेम असल्यामुळे संपूर्ण मनाने त्याची सेवा केली आणि अशा प्रकारे आपलं सर्वोत्तम त्याला अर्पण केलं. (योहा. १४:३१) यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात येशूला आनंद मिळायचा. (स्तो. ४०:८) येशूला पूर्ण मनाने सेवा करताना पाहून यहोवाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. टेहळणी बुरूज१९.११ २२-२३ ¶९-१०

रविवार, २१ नोव्हेंबर

सातवा दिवस परमेश्‍वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय.—निर्ग. ३१:१५.

बायबल म्हणतं की सहा दिवस काम केल्यावर देवाने पृथ्वीवर निर्मिती करायचं काम थांबवलं. (उत्प. २:२) पण यहोवाला काम करायला आवडतं आणि तो इतर बाबतीत आजही “काम करत आहे.” (योहा. ५:१७) यहोवाने सहा दिवस काम करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली आणि हीच गोष्ट त्याने इस्राएली लोकांनाही करायला सांगितली. त्याने त्यांना प्रत्येक सातव्या दिवशी विश्रांती घ्यायला सांगितलं. देवाने म्हटलं की शब्बाथ हा इस्राएल आणि त्याच्यामध्ये असलेल्या एका गोष्टीचं चिन्ह आहे. (निर्ग. ३१:१२-१४) त्या दिवशी काम करण्याची सर्वांनाच म्हणजे मुलांना, दासांना, तसंच प्राण्यांनासुद्धा मनाई होती. (निर्ग. २०:१०) यामुळे लोकांना आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळायचा. पण येशूच्या काळात अनेक धार्मिक नेत्यांनी शब्बाथाच्या दिवसात अशा नियमांचा समावेश केला ज्यांचं पालन करणं लोकांना खूप कठीण जायचं. त्यांचं म्हणणं होतं की शब्बाथाच्या दिवशी कणसे मोडून खाणं किंवा एका आजारी व्यक्‍तीला बरं करणं या गोष्टीही नियमाविरुद्ध आहेत. (मार्क २:२३-२७; ३:२-५) असा दृष्टिकोन देवाच्या विचारसरणीनुसार नव्हता आणि येशूने ही गोष्ट देवाच्या इच्छेनुसार चालणाऱ्‍या लोकांना सांगितली. टेहळणी बुरूज१९.१२ ३-४ ¶८-९

सोमवार, २२ नोव्हेंबर

देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करा.—इफिस. ५:१.

आपण यहोवाच्या गुणांबद्दल जितकं शिकत जाऊ, तितकं आपल्याला त्याच्या गुणांचं चांगल्या प्रकारे अनुकरण करता येईल. दावीद आपल्या स्वर्गीय पित्याला चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे, इतरांशी वागताना तो यहोवाच्या गुणांचं अनुकरण करू शकला. दावीदचं यहोवासोबत एक चांगलं नातं होतं आणि त्यामुळे तो इस्राएली लोकांचा आवडता राजा बनू शकला. तसंच, एक राजा कसा असला पाहिजे हे इस्राएली राजांना सांगण्यासाठीही यहोवाने दावीदच्या उदाहरणाचा वापर केला. (१ राजे १५:११; २ राजे १४:१-३) यावरून आपण काय शिकतो? आपण देवाचं “अनुकरण” केलं पाहिजे. आपण यहोवाच्या गुणांचं अनुकरण करतो तेव्हा आपण त्याची प्रिय मुलं असल्याचं सिद्ध करत असतो. (इफिस. ४:२४) आपण यहोवाबद्दल शिकायचं कधीही थांबवणार नाही. (उप. ३:११) आपल्याला यहोवाबद्दल किती माहीत आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपण त्या माहितीचा उपयोग कसा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण जर शिकलेली माहिती लागू केली आणि आपल्या प्रेमळ पित्याचं अनुकरण केलं तर तो आपल्या आणखी जवळ येत राहील. (याको. ४:८) आपल्या वचनाद्वारे तो अशी खातरी देतो की त्याला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतात त्यांचा तो कधीही त्याग करणार नाही. टेहळणी बुरूज१९.१२ २० ¶२०; २१ ¶२१, २३

मंगळवार, २३ नोव्हेंबर

हृदय सर्वात कपटी आहे.—यिर्म. १७:९.

याकोबचं आपल्या सगळ्याच मुलांवर प्रेम होतं, पण योसेफवर त्याचा सर्वात जास्त जीव होता. यामुळे योसेफच्या भावांना कसं वाटलं? ते त्याच्यावर जळू लागले आणि त्याचा द्वेष करू लागले. त्यामुळे त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकलं आणि आपल्या वडिलांना खोटं सांगितलं, की एका जंगली प्राण्याने त्यांच्या आवडत्या मुलाला मारून टाकलं. योसेफच्या भावांनी मनात ईर्ष्या बाळगल्यामुळे त्यांच्या कुटुंबातली शांती भंग झाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना खूप दुःख दिलं. (उत्प. ३७:३, ४, २७-३४) बायबलमध्ये अशा वाईट गुणांचा उल्लेख आहे, ज्यांना “शरीराची कामे” म्हणण्यात आलं आहे. आणि या वाईट गुणांमुळे एक व्यक्‍ती देवाच्या राज्याची वारस बनू शकत नाही. याच गुणांमध्ये ईर्ष्येचासुद्धा समावेश आहे. (गलती. ५:१९-२१) ईर्ष्या ही एका अशा झाडासारखी आहे ज्याला वैर, भांडणं आणि रागाने भडकणं ही विषारी फळं लागतात. योसेफच्या भावांच्या उदाहरणातून आपल्याला समजतं की ईर्ष्येमुळे कुटुंबातली चांगली नाती तुटू शकतात आणि शांतीसुद्धा भंग होऊ शकते. हे खरं आहे की आपण योसेफच्या भावांसारखं कधीही वागणार नाही, पण आपण सगळे अपरिपूर्ण आहोत आणि आपलं मन धोका देणारं आहे. यामुळे कधीकधी आपल्या मनात ईर्ष्येची भावना येऊ शकते. टेहळणी बुरूज२०.०२ १४ ¶१-३

बुधवार, २४ नोव्हेंबर

नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.—फिलिप्पै. २:३.

एकदा यहोवाने मोशेला दिलेल्या पवित्र आत्म्यातून काही काढून, दर्शनमंडपाजवळ उभे असलेल्या इस्राएली वडीलजनांना दिला. मग थोड्याच वेळात मोशेला कळलं की दोन वडीलजन दर्शनमंडपाजवळ गेले नव्हते, पण त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला होता आणि ते संदेष्ट्यांप्रमाणे वागू लागले होते. ही गोष्ट पाहिल्यावर यहोशवाने मोशेला सांगितलं की त्याने त्यांना संदेश सांगण्यापासून थांबवावं. तेव्हा मोशेने काय केलं? यहोवाने या दोन वडिलांना हा बहुमान दिला म्हणून मोशेने त्यांचा हेवा केला नाही. उलट, त्याने नम्रता दाखवली आणि त्यांना बहुमान मिळाल्यामुळे तो आनंदी झाला. (गण. ११:२४-२९) आपण मोशेकडून काय शिकू शकतो? कदाचित तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल आणि एखादी जबाबदारी किंवा काम तुम्हाला खूप आवडत असेल. तुम्हाला कधी या जबाबदारीसाठी दुसऱ्‍या एका बांधवाला प्रशिक्षण द्यायला सांगण्यात आलं आहे का? जर तुम्ही मोशेप्रमाणे नम्र असाल, तर तुम्ही दुसऱ्‍या बांधवाला ही जबाबदारी हाताळण्यासाठी प्रशिक्षण द्यायला कचरणार नाही. तसंच, यामुळे तुमचं महत्त्व कमी होईल असाही तुम्ही विचार करणार नाही. उलट आपल्या बांधवाला मदत करण्यात तुम्हाला आनंदच होईल. टेहळणी बुरूज२०.०२ १५ ¶९; १७ ¶१०-११

गुरुवार, २५ नोव्हेंबर

मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.—नीति. १२:२५.

आजारपणामुळे आपण भावनिक रीत्या खचून जाऊ शकतो. आपल्या दुर्बलता इतरांच्या लक्षात येतात किंवा मदतीसाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं तेव्हा आपल्या दयनीय स्थितीमुळे आपल्याला अवघडल्यासारखं वाटू शकतं. इतरांना जरी आपल्या आजारपणाबद्दल माहीत नसलं तरी आपल्या मनात नकारात्मक भावना येऊ शकतात. कारण आधी ज्या गोष्टी आपण करायचो त्यांपैकी काही गोष्टी आता आपल्याला जमत नसतील. असं असलं तरी अशा दुःखद प्रसंगी यहोवा आपल्याला प्रोत्साहन देतो. हे तो कसं करतो? यहोवाने बायबलमध्ये दिलासा देणारे शब्द लिहून ठेवले आहेत. यामुळे आपल्याला कळतं की आपण जरी आजारी असलो तरी आपण त्याच्या नजरेत मौल्यवान आहोत. (स्तो. ३१:१९; ४१:३) यहोवा त्याच्या प्रेरित वचनातून आपल्याला आजारपणामुळे येणाऱ्‍या नकारात्मक भावनांशी लढा द्यायला मदत करेल. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे यहोवाला माहीत आहे याची खातरी बाळगा. तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला योग्य दृष्टिकोन बाळगता यावा यासाठी यहोवाला कळकळून प्रार्थना करा. यहोवाकडून सांत्वन मिळावं यासाठी बायबल वाचा. बायबलमधल्या अशा वचनांवर लक्ष केंद्रित करा, ज्यांवरून आपल्याला कळतं की यहोवा आपल्या सेवकांना मौल्यवान लेखतो. असं करत असताना तुम्हाला दिसून येईल की जे यहोवाला विश्‍वासू राहतात त्यांच्यावर त्याचं प्रेम असतं.—स्तो. ८४:११. टेहळणी बुरूज२०.०१ १५-१६ ¶९-१०; १७ ¶१२

शुक्रवार, २६ नोव्हेंबर

वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे अनुकरण कर.—३ योहा. ११.

इसहाक श्रीमंत होता, म्हणून पलिष्टी लोक त्याचा हेवा करायचे. (उत्प. २६:१२-१४) इसहाक ज्या विहिरींवर आपल्या कळपांना आणि गुराढोरांना पाणी पाजायचा त्या विहिरीसुद्धा त्यांनी बुजवून टाकल्या. (उत्प. २६:१५, १६, २७) पलिष्टी लोकांप्रमाणे, आजही काही लोक त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांचा हेवा करतात. त्यांना दुसऱ्‍यांकडे असलेल्या गोष्टींचा मोह होतो. तसंच, इतरांकडे असलेल्या गोष्टी त्यांनी गमवाव्यात असंही या लोकांना वाटतं. बरेच लोक येशूची प्रशंसा करायचे म्हणून यहुदी धर्मगुरू त्याचा हेवा करायचे. (मत्त. ७:२८, २९) येशू देवाच्या वतीने बोलायचा आणि तो सत्य शिकवायचा. तरीही हे यहुदी धर्मगुरू येशूबद्दल अफवा पसरवायचे आणि त्याची बदनामी करायचे. (मार्क १५:१०; योहा. ११:४७, ४८; १२:१२, १३, १९) या अहवालातून आपण कोणता धडा शिकू शकतो? मंडळीतल्या भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांमुळे सगळे त्यांच्यावर प्रेम करतात, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल मनात ईर्ष्या बाळगणं टाळलं पाहिजे. याउलट, आपण त्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण केलं पाहिजे.—१ करिंथ. ११:१. टेहळणी बुरूज२०.०२ १५ ¶४-५

शनिवार, २७ नोव्हेंबर

त्याला अथवा तिला प्राणदंड करावा.—एस्ते. ४:११.

कल्पना करा, तुम्ही जवळपास २,५०० वर्षांआधी पारस या देशात राहत आहात. आणि त्या देशातल्या राजाशी तुम्हाला बोलायचं आहे. पण परवानगीशिवाय तुम्ही राजाशी बोलू शकत नाही, कारण तसं केलं तर तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा होईल. आपल्यासाठी खरंच ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे की यहोवा त्या पारसच्या राजासारखा नाही! आपण कोणत्याही वेळी त्याच्याशी बोलू शकतो. खरंतर त्याची अशी इच्छा आहे की आपण मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलावं. उदाहरणार्थ यहोवाला महान सृष्टिकर्ता, सर्वसमर्थ आणि सर्वोच्च अधिकारी अशा मोठ्या पदव्या असल्या, तरी त्याला वाटतं की आपण त्याच्याशी बोलताना ‘पिता’ या शब्दाचा वापर करावा. (मत्त. ६:९) कारण आपलं यहोवासोबत जवळचं नातं असावं असं त्याला वाटतं आणि हे जाणून आपल्याला खरंच खूप आनंद होतो! यहोवाला पिता म्हणून हाक मारणं अगदी योग्य आहे. कारण त्यानेच सर्वांना जीवन, श्‍वास आणि इतर सर्व गोष्टी दिल्या आहेत. (प्रे. कार्ये १७:२४, २५) तो आपला पिता असल्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण त्याचं ऐकावं. जर आपण त्याचं ऐकलं तर आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतील. (इब्री १२:९) त्या आशीर्वादांपैकी एक म्हणजे भविष्यात तो आपल्या सेवकांना पृथ्वीवर किंवा स्वर्गात सर्वकाळाचं जीवन देईल. टेहळणी बुरूज२०.०२ २ ¶१-३

रविवार, २८ नोव्हेंबर

लोकांना शिष्य करा.—मत्त. २८:१९.

बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी मदत करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. (इफिस. ४:१३) जेव्हा एखादी व्यक्‍ती आपल्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार होते तेव्हा तिला मुख्यतः हे जाणून घ्यायची इच्छा असते की त्या अभ्यासातून तिला कसा फायदा होणार आहे. पण जसजसं तिचं यहोवावर प्रेम वाढत जातं, तसतसं ती इतरांना आणि मंडळीतल्या लोकांना मदत करण्याबद्दल विचार करू लागते. (मत्त. २२:३७-३९) त्यामुळे योग्य वेळ आल्यावर आपल्या विद्यार्थ्याला सांगायला कचरू नका की राज्याच्या कामाला आर्थिक रीत्या हातभार लावणं हा आपल्यासाठी एक बहुमान आहे. समस्या उद्‌भवतात तेव्हा काय करावं हे विद्यार्थ्याला शिकवा. कल्पना करा, तुमचा विद्यार्थी एक बाप्तिस्मारहित प्रचारक आहे आणि तो येऊन तुम्हाला सांगतो की मंडळीतल्या एका व्यक्‍तीने त्याचं मन दुखावलं आहे. मग अशा वेळी कोणा एकाची बाजू घेण्याऐवजी बायबलमध्ये काय सल्ला दिला आहे हे त्याला समजायला मदत करा. तो एकतर बांधवाला किंवा बहिणीला क्षमा करून, झालं गेलं विसरू शकतो. किंवा त्याला असं करणं शक्य नसलं तर तो त्यांच्याशी प्रेमळपणे व दयाळूपणे बोलू शकतो. पण त्यांच्याशी बोलताना मात्र त्याचा उद्देश ‘आपल्या भावाला मिळवणं’ हा असला पाहिजे. (मत्तय १८:१५ पडताळून पाहा.) विद्यार्थ्याने काय बोलावं याची तयारी करण्यासाठी तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०१ ५-६ ¶१४-१५

सोमवार, २९ नोव्हेंबर

मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; . . . तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.—स्तो. ३२:५.

यहोवा आपल्याला क्षमा करतो याची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आपण केलेल्या चुकांसाठी प्रार्थना केली पाहिजे, ताडन स्वीकारलं पाहिजे आणि त्याच चुका पुन्हा न घडाव्यात यासाठी मेहनत घेतली पाहिजे. या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण पुन्हा मनाची शांती मिळवू शकतो. हे जाणून आपल्याला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं की “जे भग्न हृदयाचे आहेत त्यांच्याजवळ यहोवा असतो, आणि जे पश्‍चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांना तो तारतो.” (स्तो. ३४:१८, पं. र. भा.) आपण अंताच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत त्यामुळे आपल्या चिंतेची कारणं दिवसेंदिवस वाढतच जाणार. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा यहोवाकडून मदत मिळवण्यासाठी थोडाही उशीर करू नका. बायबलचा मनापासून अभ्यास करा. हन्‍ना, प्रेषित पौल आणि राजा दावीद यांच्या उदाहरणातून शिका. आपल्याला चिंता का वाटते याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्या स्वर्गीय पित्याकडे मदत मागा. (स्तो. १३९:२३) आपलं ओझं, आपल्या समस्या यहोवावर टाका; खासकरून अशा समस्या ज्या सोडवणं तुमच्या हातात नाही. तुम्ही जर असं केलं तर तुम्हीसुद्धा स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाला म्हणू शकाल की “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”—स्तो. ९४:१९. टेहळणी बुरूज२०.०२ २४ ¶१७; २५ ¶२०-२१

मंगळवार, ३० नोव्हेंबर

संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहे.—२ तीम. ३:१६.

“देवाच्या प्रेरणेने” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ ‘देवाने श्‍वास फुंकला’ असा होतो. देवाने पवित्र आत्म्याचा वापर करून बायबल लेखकांच्या मनात जणू आपले विचार ‘फुंकले’. आपण बायबल वाचतो आणि त्यातल्या माहितीवर मनन करतो तेव्हा देवाचं मार्गदर्शन आपल्या मनात जातं. त्या प्रेरित विचारांमुळे आपल्याला देवाच्या इच्छेनुसार आपल्या जीवनात बदल करण्याची प्रेरणा मिळते. (इब्री ४:१२) पण पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपण नियमितपणे बायबल वाचन करण्यासोबतच, त्यात दिलेल्या माहितीबद्दल खोलवर विचार करण्यासाठी वेळही काढला पाहिजे. आपण असं केलं तर देवाच्या वचनांत दिलेल्या गोष्टींचा आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर प्रभाव होईल. तसंच, आपण भाऊबहिणींसोबत देवाची उपासना केली पाहिजे. (स्तो. २२:२२) यहोवाचा आत्मा सभांमध्ये उपस्थित असतो. (प्रकटी. २:२९) आपण आपल्या भाऊबहिणींसोबत उपासना करण्यासाठी एकत्र येतो तेव्हा आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाच्या वचनांवर आधारित असलेली राज्यगीते गातो. तसंच, पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त झालेले बांधव बायबलवर आधारित मार्गदर्शन देतात तेही आपण ऐकतो. पण पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपण सभेत उत्तरं देण्याची तयारी करणं महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज१९.११ ११ ¶१३-१४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा