ऑक्टोबर
शुक्रवार, १ ऑक्टोबर
परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.—२ इति. १६:९.
यहोवा त्याच्या लोकांचं आजदेखील संरक्षण करत आहे याचे अनेक पुरावे आपल्याजवळ आहेत. जरा विचार करा: आपण पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत प्रचारकार्य करतो आणि लोकांना सत्याबद्दल शिकवतो. (मत्त. २८:१९, २०) प्रचारामुळे आपण सैतानाच्या दुष्ट कार्यांचा पर्दाफाश करतो. यामुळे साहजिकच सैतानाने आपलं प्रचारकार्य पूर्णपणे थांबवलं पाहिजे. पण आजपर्यंत त्याला तसं करणं जमलं नाही, यावरूनच कळतं की यहोवा आपलं संरक्षण करत आहे. म्हणून आपल्याला दुष्टात्म्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जर यहोवाला विश्वासू राहिलो, तर दुष्टात्मे आपलं कायमचं नुकसान कधीच करू शकणार नाहीत. पण आपण सर्वांनीच दुष्टात्म्यांचा प्रतिकार केला पाहिजे आणि यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. आपण असं केलं, तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील आणि सैतान आपली दिशाभूल करू शकणार नाही. तसंच, दुष्टात्म्यांच्या भीतीमुळे यहोवाची सेवा करण्याचं आपण सोडून देणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घनिष्ठ करता येईल. शिष्य याकोबने म्हटलं: “सैतानाचा विरोध करा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल. देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”—याको. ४:७, ८. टेहळणी बुरूज१९.०४ २४ ¶१५; २५ ¶१८
शनिवार, २ ऑक्टोबर
पोटचे फळ त्याची देणगी आहे.—स्तो. १२७:३.
तुमची मुलं यहोवाने तुम्हाला “दिलेले धन आहे.” यामुळे त्यांना सुरक्षित ठेवणं ही प्रामुख्याने तुमची जबाबदारी आहे. मुलांचं शोषण होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता? पहिलं म्हणजे, शोषण का आणि कशा प्रकारचे लोक करतात याबद्दल माहिती घ्या. सहसा कशा प्रकारचे लोक मुलांचं शोषण करतात आणि मुलांना भुलवण्यासाठी ते काय करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. संभाव्य धोक्यांबद्दल सतर्क राहा. (नीति. २२:३; २४:३) सहसा असं पाहण्यात आलं आहे की मुलांचा ज्या लोकांवर भरवसा असतो असे ओळखीचे लोकच त्यांचं शोषण करतात. दुसरं म्हणजे, मुलांसोबत चांगला संवाद ठेवा. (अनु. ६:६, ७; याको. १:१९) नेहमी लक्षात असू द्या की सहसा मुलं शोषणाबद्दल सांगायला कचरतात. आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी भीती त्यांच्या मनात असू शकते. किंवा शोषण करणाऱ्या व्यक्तीने कदाचित मुलाला, ‘कोणाला सांगू नको’ असं धमकावलंही असेल. तुम्हाला जर जाणवलं की मुलं जरा वेगळी वागत आहेत, तर प्रेमळपणे प्रश्न विचारून त्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच, मुलं आपलं मन मोकळं करताना त्यांचं धीराने ऐका. तिसरं म्हणजे, मुलांना शिकवा. कोणी जर त्यांना चुकीच्या उद्देशाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय बोलावं व करावं हे त्यांना शिकवा. टेहळणी बुरूज१९.०५ १३ ¶१९-२२
रविवार, ३ ऑक्टोबर
प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.—नीति. १६:५.
यहोवाला गर्विष्ठ लोकांचा वीट का येतो? याचं एक कारण म्हणजे, स्वतःविषयी प्रमाणाबाहेर प्रेम विकसित करणारे आणि अशा विचाराला बढावा देणारे लोक खरंतर सैतानासारखीच गर्विष्ठ वृत्ती बाळगतात. देवाने ज्याला सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी वापरलं त्या येशूने आपल्याला दंडवत करावा आणि आपली उपासना करावी असा विचार सैतानाच्या मनात आला. यावरून कळतं की सैतान किती गर्विष्ठ बनला असेल. (मत्त. ४:८, ९; कलस्सै. १:१५, १६) गर्वाने फुगलेले लोक दाखवून देतात की त्यांच्या मते ते बुद्धिमान असले, तरी खरं पाहता ते देवाच्या नजरेत मूर्ख आहेत. (१ करिंथ. ३:१९) पण बायबल आपल्याला स्वतःविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचं प्रोत्साहन देतं. त्यात म्हटलं आहे की काही प्रमाणात स्वतःवर प्रेम करणं चुकीचं नाही. येशूने म्हटलं: “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” याचा अर्थ, आपण आपल्या गरजांकडे वाजवी प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. (मत्त. १९:१९) असं असलं तरी, बायबल शिकवतं की आपण इतरांपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहोत असा विचार आपण करू नये. याउलट त्यात म्हटलं आहे: “भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”—फिलिप्पै. २:३; रोम. १२:३. टेहळणी बुरूज१९.०५ २४ ¶१३-१४
सोमवार, ४ ऑक्टोबर
यापुढे या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.—रोम. १२:२.
तुम्ही जेव्हा सत्य स्वीकारलं आणि यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्हाला किती बदल करावे लागले होते याचा जरा विचार करा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना यहोवाची सेवा करण्यासाठी चुकीच्या गोष्टी सोडाव्या लागल्या होत्या. (१ करिंथ. ६:९-११) खरंच, आपण यहोवाचे किती आभारी आहोत की त्याच्या मदतीने आपण वाईट सवयींवर मात करू शकलो! आता आणखी काही बदल करण्याची गरज नाही असा आपण विचार करू नये. आपण जरी बाप्तिस्मा घेण्याआधी गंभीर पाप करण्याचं सोडून दिलं असलं, तरी आतादेखील आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. पुन्हा त्या पापांकडे नेणारा कोणताही मोह टाळण्यासाठी आपल्याला सतत मेहनत घेण्याची गरज आहे. यासाठी आपण दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे, या जगाचं “अनुकरण करू नका” म्हणजेच आपण त्याद्वारे प्रभावीत होऊ नये. दुसरी म्हणजे, आपल्याला आपली “विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर” करावे लागेल. रूपांतर करणं म्हणजे आपण बाहेरून कसं दिसतो फक्त ते बदलणं नाही, तर आपलं व्यक्तिमत्त्व आतून आणि बाहेरून बदलणं. त्यासाठी आपण आपली मनोवृत्ती, भावना आणि इच्छा यांत पूर्णपणे बदल केला पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०६ ९ ¶४-६
मंगळवार, ५ ऑक्टोबर
हे परमेश्वरा, . . . तू माझे साहाय्य व समाधान केले आहे.—स्तो. ८६:१७.
दुःखाचा सामना करत असताना मंडळीतल्या सभांना हजर राहिल्यामुळे आपल्याला पुन्हा बळ मिळू शकतं. सभेत असताना आपण यहोवाला आपलं “साहाय्य व समाधान” करण्याची आणखी संधी देत असतो. तिथे तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा, त्याचं वचन आणि त्याचे लोक यांद्वारे बळ देतो. “एकमेकांना प्रोत्साहन” देण्याची संधी आपल्याला सभांमुळे मिळते. (रोम. १:११, १२) सोफीया नावाची बहीण म्हणते, “यहोवा आणि भाऊबहिणींमुळे मला सहन करण्याची ताकद मिळाली. मंडळीतल्या सभा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मी सेवाकार्यात आणि आपल्या मंडळीत जितका जास्त सहभाग घेते, तितकंच मला तणावाचा आणि चिंतेचा चांगल्या प्रकारे सामना करायला सोपं जातं.” निराश झाल्यावर लक्षात असू द्या की यहोवा भविष्यात आपल्या तणावाचा कायमस्वरूपी अंत तर करेलच, पण त्यासोबतच तो आजही आपल्याला तणावाचा सामना करण्यासाठी मदत पुरवतो. नैराश्य आणि आशाहीन वाटणं या भावनांवर मात करण्यासाठी तो आपल्यात “इच्छा निर्माण करतो आणि . . . ताकदही देतो.”—फिलिप्पै. २:१३. टेहळणी बुरूज१९.०६ १९ ¶१७-१८
बुधवार, ६ ऑक्टोबर
जाऊन माझ्या बांधवांना ही बातमी सांगा म्हणजे ते गालीलात जातील आणि तिथे ते मला पाहतील.—मत्त. २८:१०.
येशूला त्याच्या शिष्यांना नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन द्यायचं होतं, म्हणून पुनरुत्थानानंतर त्याने सर्वात आधी त्याच्या सर्व शिष्यांना भेटण्याची योजना केली. येशू त्याच्या शिष्यांना भेटला तेव्हा त्याने त्यांना अशा एका महत्त्वपूर्ण कामाबद्दल सांगितलं, जे ते पहिल्या शतकात पूर्ण करणार होते. हे तेच काम होतं जे आज आपणही करत आहोत. येशूने त्यांना म्हटलं: “म्हणून, जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि . . . मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” (मत्त. २८:१९, २०) येशूची इच्छा आहे की त्याच्या सर्व शिष्यांनी प्रचारकार्य करावं. पण ही आज्ञा त्याने फक्त त्याच्या ११ विश्वासू प्रेषितांना दिली नाही. असं आपण खातरीने का म्हणू शकतो? कारण गालीलच्या डोंगरावर जेव्हा शिष्य बनवण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा फक्त प्रेषितच तिथे उपस्थित नव्हते. त्या स्वर्गदूताने त्या स्त्रियांना काय सांगितलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं होतं: “तुम्ही त्याला [गालीलमध्ये] पाहाल.” (मत्त. २८:७) याचाच अर्थ त्या विश्वासू स्त्रियाही तिथे उपस्थित होत्या. टेहळणी बुरूज२०.०१ २-३ ¶१-४
गुरुवार, ७ ऑक्टोबर
तुम्ही जगाचा भाग नाही; तर मी तुम्हाला जगातून निवडून घेतलं आहे. याच कारणामुळे, जग तुमचा द्वेष करतं.—योहा. १५:१९.
आपल्याला छळाचा सामना का करावा लागेल याबद्दल येशूने समजावलं. त्याने म्हटलं की आपण जगाचा भाग नसल्यामुळे आपला द्वेष केला जाईल. आपला छळ होतो तेव्हा यहोवाचा आशीर्वाद आपल्यावर नाही असा याचा अर्थ होत नाही. उलट, आपण योग्य तेच करत असल्याचं दिसून येतं! विरोध करणारे, सर्वसमर्थ देव यहोवा याच्या उपासनेवर बंदी आणू शकत नाहीत. बऱ्याच जणांनी असं करण्याचा प्रयत्न केला आहे पण ते अपयशी ठरले आहेत. दुसऱ्या महायुद्धात काय झालं यावर विचार करा. त्या वेळी बऱ्याचशा देशातल्या सरकारांनी देवाच्या लोकांचा तीव्रपणे छळ केला. यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर जर्मनीच्या नात्झी दलाने बंदी घातली होती. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर देशांतल्या सरकारांनीही आपल्या कामावर बंदी घातली होती. असं असलं तरी काय घडलं याकडे लक्ष द्या. १९३९ मध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा जगभरात ७२,४७५ प्रचारक होते. पण एका रिपोर्टनुसार १९४५ मध्ये युद्धाच्या शेवटी यहोवाच्या आशीर्वादामुळे प्रचारकांची संख्या १,५६,२९९ इतकी झाली. प्रचारकांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त वाढली होती! टेहळणी बुरूज१९.०७ ९ ¶४-५
शुक्रवार, ८ ऑक्टोबर
तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.—योहा. १३:३५.
तुम्ही सध्या कोणाचा बायबल अभ्यास घेत नसला तरी तुम्ही इतर मार्गांनी शिष्य बनवण्याच्या कामात मदत करू शकता. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती पहिल्यांदा राज्य सभागृहात येते तेव्हा तुम्ही तिचं स्वागत करू शकता आणि तिला मदत करू शकता. असं केल्यामुळे लोकांना खात्री पटेल की प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे. सभांमध्ये उत्तरं देऊन, मग ती कमी शब्दांत का असेना तुम्ही त्या व्यक्तीला तिचा विश्वास मनापासून व्यक्त करायला शिकवाल. तसंच, तुम्ही नवीन प्रचारकाला तुमच्यासोबत सेवाकार्यात घेऊन जाऊ शकता आणि त्याला लोकांसोबत वचनांतून तर्क करायला शिकवू शकता. असं केल्याने तुम्ही त्याला ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी मदत करत असाल. (लूक १०:२५-२८) आज बऱ्याच बंधुभगिनींवर अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि यामुळे ते व्यस्त असतात. असं असलं तरी ते बायबल अभ्यास घेण्यासाठी वेळ काढतात आणि यामुळे त्यांना खूप आनंद मिळतो. टेहळणी बुरूज१९.०७ १७ ¶११, १३
शनिवार, ९ ऑक्टोबर
मागच्या गोष्टी विसरून पुढे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी झटत असताना, मी . . . बक्षीस मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.—फिलिप्पै. ३:१३, १४.
प्रेषित पौलने पूर्वी मिळालेल्या यशामुळे किंवा आधी केलेल्या चुकांमुळे स्वतःचं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. याउलट, त्याने म्हटलं की “पुढे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी झटत” राहायचं असेल, म्हणजे शर्यत यशस्वीपणे पूर्ण करायची असेल तर “मागच्या गोष्टी” विसरणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या काही गोष्टींमुळे पौलचं लक्ष विचलित होऊ शकत होतं? पहिली गोष्ट, ख्रिस्ती बनण्याआधी त्याने यहुदी लोकांमध्ये खूप नाव कमवलं होतं, तरी त्याने त्या गोष्टींना “केरकचरा” समजलं. (फिलिप्पै. ३:३-८) दुसरी गोष्ट, त्याने सुरुवातीला ख्रिश्चनांचा छळ केल्यामुळे त्याच्या मनात दोषीपणाची भावना यायची, पण तरी त्याने यहोवाची सेवा करायचं सोडलं नाही. आणि तिसरी गोष्ट, त्याने असा विचार केला नाही की यहोवाच्या सेवेत आपण खूपकाही केलं आहे आणि आता आणखी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. पौलला तुरुंगात टाकण्यात आलं, फटके मारण्यात आले, दगडमार करण्यात आला, त्याचं जहाज फुटलं, त्याला अन्न-वस्त्रांची कमतरता होती, तरीही त्याने चांगल्या प्रकारे सेवाकार्य केलं. (२ करिंथ. ११:२३-२७) पौलला पूर्वी यश मिळालं आणि दुःख-त्रासही सहन करावा लागला, तरीदेखील यहोवाची सेवा करत राहणं गरजेचं आहे हे त्याला माहीत होतं. हीच गोष्ट आपल्या बाबतीतही खरी आहे. टेहळणी बुरूज१९.०८ ३ ¶५
रविवार, १० ऑक्टोबर
लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवत आहे.—मत्त. १०:१६.
आपले बरेचसे बांधव अशा देशांत राहतात जिथे ते सार्वजनिक रीत्या किंवा घरोघरचं प्रचारकार्य करू शकत नाही. म्हणून ते इतर मार्गांनी आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्याच्या संधी शोधतात. (मत्त. १०:१७-२०) अशाच एका देशामध्ये एका विभागीय पर्यवेक्षकाने प्रचारकांना सल्ला दिला, की प्रत्येकाने त्यांच्या नातेवाइकांना, शेजाऱ्यांना, शाळासोबत्यांना, सहकर्मचाऱ्यांना आणि ओळखीच्या लोकांना त्यांचं ‘प्रचाराचं क्षेत्र’ समजावं. मग दोन वर्षांच्या आतच त्या विभागातल्या मंडळ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. आपण कदाचित अशा देशात राहत असू जिथे आपण मोकळेपणे प्रचार करू शकतो. असं असलं तरी या आवेशी भाऊबहिणींकडून आपण एक मौल्यवान धडा शिकू शकतो. तो म्हणजे, सेवाकार्यात भाग घेण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेणं. यहोवा तुम्हाला कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी लागणारी शक्ती देईल असा भरवसा बाळगा. (फिलिप्पै. २:१३) या अत्यंत महत्त्वाच्या काळात जगत असताना, जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत याची आपण खातरी करत राहू या आणि निर्दोष राहू या. तसंच आपण इतरांसाठी अडखळण ठरण्याचं टाळू या आणि नीतिमत्त्वाचं फळही विकसित करत राहू या. असं केल्यामुळे आपलं प्रेम वाढत जाईल आणि आपला प्रेमळ पिता, यहोवा याचा गौरव होईल. टेहळणी बुरूज१९.०८ १३ ¶१७-१८
सोमवार, ११ ऑक्टोबर
चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.—उप. १०:७.
सहसा आपल्याला अशा लोकांसोबत वेळ घालवायला आवडत नाही ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायचं असतं आणि जे इतरांचा सल्ला ऐकून घेत नाहीत. याउलट, आपल्याला अशा भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला आवडतं जे “एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा व नम्रता” दाखवतात. (१ पेत्र ३:८) आपल्याला नम्र लोकांसोबत राहायला आवडतं. आणि आपण नम्र असलो तरच इतरांनाही आपल्यासोबत राहायला आवडेल. नम्र असल्यामुळे आपल्याला जीवन जगणंसुद्धा सोपं जातं. खरंतर, कधीकधी आपल्याला अशा गोष्टी घडताना दिसतात ज्या आपल्याला योग्य वाटत नाहीत. एखाद्यावर अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं. कधीकधी ज्यांच्याकडे कौशल्यं असतात त्यांची नेहमीच प्रशंसा होते असं नाही आणि ज्यांच्याकडे कमी कौशल्यं असतात त्यांना कधीकधी बराच मान दिला जातो. असं असलं तरी शलमोन राजाने मान्य केलं की आपल्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टींमुळे चिंतित होण्यापेक्षा आपण आपलं जीवन जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. (उप. ६:९) नम्रता असल्यामुळे आपण असा विचार करणार नाही की सगळं आपल्याच इच्छेप्रमाणे असावं, तर याऐवजी आपण जीवन आहे तसं स्वीकारू. टेहळणी बुरूज१९.०९ ४-५ ¶९-१०
मंगळवार, १२ ऑक्टोबर
वडिलांनो, [आपल्या मुलांना] . . . यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवत राहा.—इफिस. ६:४.
ज्या लोकांकडे काही प्रमाणात अधिकार असतात त्यांच्याकडे इतरांना मदत करायची संधी असते. हीच गोष्ट वडिलांच्या बाबतीतही खरी आहे. यहोवाने कुटुंबाचा प्रमुख म्हणून पित्यावर जबाबदारी सोपवली आहे. आणि देवाची इच्छा आहे त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं, मार्गदर्शन द्यावं आणि त्यांना शिस्त लावावी. (१ करिंथ. ११:३) पण त्यांनी असा विचार करू नये की ते आपल्या मनाप्रमाणे त्यांच्या अधिकाराचा वापर करू शकतात. यहोवाने कुटुंबाची रचना केली आहे. यामुळे एक पिता आपल्या कुटुंबातल्या लोकांशी जसं वागतो याचा त्याला यहोवाला जाब द्यावा लागेल. (इफिस. ३:१४, १५) देवाचं मन आनंदित होईल अशाच पद्धतीने कुटुंबप्रमुखांनी आपल्या अधिकाराचा वापर केला तर ते यहोवाला अधीनता दाखवत असतील. यहोवाने तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करू नका. आपली चूक कबूल करा आणि इतरांनी बायबलमधून दिलेला सल्ला स्वीकारा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही दाखवलेल्या नम्रतेसाठी तुमचं कुटुंब तुमचा आदर करेल. तुमच्या कुटुंबासोबत प्रार्थना करताना आपल्या भावना अगदी मनमोकळेपणाने यहोवाला सांगा. तुम्हाला यहोवाच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची किती गरज आहे हे तुमच्या कुटुंबाला पाहू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवा. (अनु. ६:६-९) तुमचं चांगलं उदाहरण हे तुमच्या कुटुंबासाठी एक मौल्यवान भेटवस्तू ठरू शकते. टेहळणी बुरूज१९.०९ १५ ¶८; १७ ¶१४; १८ ¶१६
बुधवार, १३ ऑक्टोबर
[मार्क] आल्यास तुम्ही त्याचे स्वागत करावे.—कलस्सै. ४:१०.
मार्कला इतरांची सेवा करण्यात आनंद मिळायचा. प्रेषित पौल आणि प्रेषित पेत्र जेव्हा त्यांची नेमणूक पार पाडत होते, तेव्हा मार्कने अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून काम केलं. तसंच, त्याने त्यांच्या इतर गरजांसाठी जसं की अन्न विकत घेणं, राहण्यासाठी ठिकाण शोधणं आणि इतर गोष्टींसाठी त्यांना मदत केली. (प्रे. कार्ये १३:२-५; १ पेत्र ५:१३) पौलने मार्कबद्दल म्हटलं की देवाच्या सेवेत तो त्याचा “सहकारी” आहे आणि तो त्याच्यासाठी ‘धीर देणारा साहाय्यक’ ठरला. (कलस्सै. ४:११, तळटीप पाहा.) मार्क पौलचा जवळचा मित्र बनला. उदाहरणार्थ, इ. स. ६५ मध्ये पौलला शेवटच्या वेळी रोममध्ये कैद करण्यात आलं तेव्हा त्याने तीमथ्यला दुसरं पत्र लिहिलं. त्या पत्रात पौलने तीमथ्यला सांगितलं की त्याने मार्कला त्याच्यासोबत घेऊन यावं. (२ तीम. ४:११) पौलला मार्कने केलेल्या विश्वासू सेवेबद्दल कदर होती आणि यामुळे त्याने त्या महत्त्वाच्या प्रसंगी मार्कला बोलवून घेतलं. मार्कने बऱ्याच मार्गांनी पौलला मदत केली, जसं की अन्न आणून देणं किंवा लिखाणासाठी गुंडाळ्या व शाई आणून देणं. पौलला मिळालेल्या मदतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे त्याला शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे मृत्युदंड मिळणार होता तोपर्यंत धीर धरण्यासाठी मदत झाली. टेहळणी बुरूज२०.०१ ११ ¶१२-१३
गुरुवार, १४ ऑक्टोबर
माझ्याकडे या.—मत्त. ११:२८.
आपण असं जीवन निवडलं आहे ज्यात त्याग आणि मेहनत करणं सामील आहे. येशूने आपल्याला इशारा दिला होता की आपला छळ केला जाईल. असं असलं तरी यहोवा आपल्याला कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी बळ देईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. आपण जितका जास्त धीर धरू तितकं जास्त आपण ताकदवान होऊ. (याको. १:२-४) आपण अशीही अपेक्षा बाळगू शकतो की यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल, येशू आपली काळजी घेईल आणि आपले भाऊबहीण आपल्याला प्रोत्साहन देतील. (मत्त. ६:३१-३३; योहा. १०:१४; १ थेस्सलनी. ५:११) येशूने “रक्तस्रावाचा आजार” असलेल्या स्त्रीला ज्या दिवशी बरं केलं त्याच दिवशी तिला तजेला मिळाला. (लूक ८:४३-४८) पण येशूची विश्वासू शिष्या बनल्यावरच तिला सर्वकाळ टिकणारा तजेला मिळणार होता. तुम्हाला काय वाटतं तिने काय केलं असेल? तिने जर येशूचं जू स्वीकारलं असेल तर तिला स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याचा बहुमान मिळाला असेल. खरंच हा किती मोठा आशीर्वाद आहे! तिने येशूच्या मागे जाण्यासाठी केलेले कोणतेही त्याग या आशीर्वादापुढे काहीच नव्हते. आपली आशा स्वर्गात राहण्याची असो अथवा पृथ्वीवरची, आपल्याला या गोष्टीचा खूप आनंद असेल की आपण “माझ्याकडे या!” हे येशूचं आमंत्रण स्वीकारलं. टेहळणी बुरूज१९.०९ २५ ¶२१-२२
शुक्रवार, १५ ऑक्टोबर
सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.—नीति. २४:३.
दावीदच्या माणसांनी एका श्रीमंत इस्राएली माणसाकडून, नाबालकडून मदत मागितली होती. दावीदची माणसं नाबालच्या मेंढरांचं अरण्यात रक्षण करायची, त्यामुळे त्यांना नाबालकडे थोडं अन्न मागायला संकोच वाटला नाही. पण स्वार्थी नाबालने त्यांना मदत करायला नकार दिला. ही गोष्ट कळल्यावर दावीदला राग आला आणि त्याने ठरवलं की तो नाबाल आणि त्याच्या घराण्यातल्या सगळ्या पुरुषांना मारून टाकेल. (१ शमु. २५:३-१३, २२) पण नाबालची बायको अबीगईल सुज्ञ होती. ती धैर्याने दावीदकडे गेली आणि त्याच्या पाया पडून त्याला विनंती करू लागली की त्याने नाबाल आणि त्याच्या माणसांचा खून करून सूड घेऊ नये आणि रक्तदोषी होऊ नये. तिने समजबुद्धी दाखवत दावीदला सुचवलं की त्याने सर्व गोष्टी यहोवावर सोपवाव्यात. अबीगईल नम्रपणे बोलल्यामुळे आणि तिने समजबुद्धी दाखवल्यामुळे दावीद प्रभावित झाला. त्याला जाणीव झाली की त्याला मदत करायला यहोवानेच तिला पाठवलं आहे. (१ शमु. २५:२३-२८, ३२-३४) अबीगईलने यहोवाला आवडणारे गुण विकसित केल्यामुळे ती यहोवासाठी उपयोगी ठरली. तिच्यासारखंच समजबुद्धी आणि सुज्ञता विकसित करणाऱ्या ख्रिस्ती बहिणींचा यहोवा उपयोग करू शकतो. तो त्यांना आपल्या कुटुंबांना आणि मंडळीतल्या इतरांना मजबूत करायला मदत करू शकतो.—तीत २:३-५. टेहळणी बुरूज१९.१० २३ ¶१०
शनिवार, १६ ऑक्टोबर
माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत म्हणून तिच्यामधून बाहेर या!—प्रकटी. १८:४.
आपला खोट्या धर्माशी काहीएक संबंध नाही याची सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी खातरी करून घेतली पाहिजे. सत्य शिकण्याआधी एक बायबल विद्यार्थी कदाचित खोट्या धर्माचा सदस्य असेल. त्याने पूर्वी त्याच्या धर्माशी संबंधित किंवा इतर कार्यांमध्ये भाग घेतला असेल अथवा त्याने त्या किंवा त्यांसारख्या संस्थांना अनुदान दिलं असेल. पण बायबल विद्यार्थ्याला बाप्तिस्मारहित प्रचारक बनण्याआधी त्याने खोट्या धर्माशी सर्व संबंध तोडणं गरजेचं आहे. त्याने चर्चला राजीनामा दिला पाहिजे किंवा तो जर खोट्या धर्माशी संबंधित असलेल्या संस्थेचा सदस्य असेल तर त्याने त्यांना कळवलं पाहिजे की यापुढे तो त्यांचा सदस्य राहणार नाही. एका खऱ्या ख्रिश्चनाने खातरी करून घेतली पाहिजे की त्याचं काम कोणत्याही प्रकारे खोट्या धर्माशी संबंधित नाही. (२ करिंथ. ६:१४-१७) आपण याबाबतीत इतकी ठाम भूमिका का घेतो? कारण आपल्याला देवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या धार्मिक संस्थेच्या कामांमध्ये आणि पापांमध्ये सहभागी व्हायचं नाही.—यश. ५२:११. टेहळणी बुरूज१९.१० १२ ¶१६-१७
रविवार, १७ ऑक्टोबर
परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, . . . तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.—स्तो. १०३:८, ९.
यिर्मयाने १ आणि २ राजे व यिर्मया ही नावं असलेली पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं लिहिल्यामुळे त्याला पाहायला मिळालं असेल की यहोवा अपरिपूर्ण लोकांवर अपार दया करतो. उदाहरणार्थ, अहाब राजाने वाईट कार्यं केली पण त्याने पुढे जाऊन पस्तावा दाखवला तेव्हा यहोवाने त्याला माफ केलं आणि तो जिवंत असेपर्यंत त्याचं घराणं नष्ट होऊ दिलं नाही. (१ राजे २१:२७-२९) तसंच, यिर्मयाला हेही माहीत होतं की अहाब राजापेक्षा मनश्शे राजाने जास्त वाईट कार्यं केली होती. पण त्याने पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्यालाही माफ केलं. (२ राजे २१:१६, १७; २ इति. ३३:१०-१३) या अहवालांमुळे यिर्मयाला नक्कीच यहोवाकडून धीराचा आणि दयेचा गुण शिकायला मिळाला असेल. बारूखचं काही काळासाठी आपल्या नेमणुकीवरून लक्ष विचलित झालं तेव्हा यिर्मया त्याच्याशी कसा वागला याकडे लक्ष द्या. बारूख काही बदलणार नाही असं यिर्मयाने लगेच त्याच्याबद्दल मत बनवलं नाही. तर त्याने बारूखला देवाचा त्याच्यासाठी काय संदेश आहे हे प्रेमळपणे पण स्पष्ट शब्दांत सांगितलं.—यिर्म. ४५:१-५. टेहळणी बुरूज१९.११ ६ ¶१४-१५
सोमवार, १८ ऑक्टोबर
तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.—इब्री ६:१०.
लेवीय पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं की एक इस्राएली व्यक्ती “उपकारस्तुतीच्या” उद्देशाने शांत्यर्पण देऊ शकत होती. (लेवी. ७:११-१३, १६-१८) त्या व्यक्तीला हे बलिदान देण्याची सक्ती नव्हती, तर तिची देण्याची इच्छा असल्यामुळे ती यहोवाला हे बलिदान अर्पण करायची. आपण यहोवाची स्वखुशीने करत असलेली सेवा ही शांत्यर्पणांसारखीच आहे. यावरून दिसून येतं की आपल्याला यहोवाबद्दल किती कदर वाटते. यहोवावर मनापासून प्रेम असल्यामुळे आपण त्याला आपलं सर्वोत्तम देतो. त्याच्यावर आणि त्याच्या तत्त्वांवर मनापासून प्रेम करणाऱ्या लाखो विश्वासू उपासकांना सेवा करताना पाहून यहोवाला खरंच किती आनंद होत असेल! यहोवा फक्त आपण करत असलेली सेवाच पाहत नाही, तर त्यामागची भावनादेखील पाहतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही वृद्ध आहात आणि आता सेवेत आधीसारखं सहभाग घेणं तुम्हाला शक्य नाही, तर यहोवा तुमची परिस्थिती आणि मर्यादा जाणतो याची खातरी बाळगा. तुम्हाला कदाचित वाटेल की तुम्ही खूप कमी सेवा करत आहात, पण यहोवा तुमच्या मनात त्याच्याप्रती किती प्रेम आहे हे पाहतो. आणि त्या प्रेमाने प्रेरित होऊन तुम्ही शक्य तितकी सेवा करता तेव्हा त्याला आनंद होतो. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुमचं सर्वोत्तम देता तेव्हा तो तुमची सेवा स्वीकारतो. टेहळणी बुरूज१९.११ २२ ¶९; २३ ¶११-१२
मंगळवार, १९ ऑक्टोबर
एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.—मार्क ६:३१.
कामाच्या बाबतीत आपण संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. शलमोन राजाने प्रेरित होऊन लिहिलं: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.” त्याने म्हटलं की रोप लावण्याचा, बांधण्याचा, रडण्याचा, हसण्याचा, नाचण्याचा आणि इतर कामं करण्याचा एक उचित काळ असतो. (उप. ३:१-८) तर हे स्पष्टच आहे की काम आणि आराम या जीवनातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. येशूचा या दोन्ही बाबतीत संतुलित दृष्टिकोन होता. एकदा प्रेषित प्रचाराच्या दौऱ्यावरून परत आले, पण त्यानंतर ते इतके व्यस्त झाले की “त्यांना जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता.” म्हणून येशूने त्यांना आजच्या वचनातले शब्द म्हटले. (मार्क ६:३०-३४) येशूला आणि त्याच्या शिष्यांना नेहमीच हवा तसा आराम मिळत नव्हता, पण तरी येशूला याची जाणीव होती की त्यांना आरामाची गरज आहे. कधीकधी आपल्या रोजच्या नित्यक्रमातून आपल्याला थोडासा विसावा किंवा बदल हवा असतो. ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आपल्याला देवाने प्राचीन काळात त्याच्या लोकांसाठी केलेल्या व्यवस्थेवरून कळते. यहोवाने त्यांना प्रत्येक आठवडी शब्बाथाचा दिवस पाळण्याचा नियम दिला होता. आज आपण मोशेच्या नियमाधीन नसलो तरी त्यात शब्बाथाविषयी जे म्हटलं आहे त्यातून आपण फायदा मिळवू शकतो. टेहळणी बुरूज१९.१२ ३ ¶६-७
बुधवार, २० ऑक्टोबर
कधीही चिंता करू नका.—मत्त. ६:३१.
यहोवाने अभिवचन दिलं आहे की तो आपल्या विश्वासू सेवकांची काळजी घेईल आणि असं करणं तो त्याचं कर्तव्य समजतो. (स्तो. ३१:१-३) तसंच, यहोवा आपल्या सेवकांना त्याच्या कुटुंबाचे सदस्य समजतो. जर त्याने आपली काळजी घेतली नाही तर आपल्याला खूप दुःख होईल आणि आपण निराश होऊ हे यहोवाला माहीत आहे. तो आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करेल असं अभिवचन तो आपल्याला देतो. आणि कोणतीही गोष्ट त्याचं अभिवचन पूर्ण करण्यापासून त्याला रोखू शकत नाही! (मत्त. ६:३०-३३; २४:४५) यहोवा आपली अभिवचनं का पूर्ण करतो हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा आपल्याला आर्थिक समस्यांचा धैर्याने सामना करणं शक्य होतं. पहिल्या शतकाच्या ख्रिश्चनांचा विचार करा. यरुशलेमच्या मंडळीला तीव्र छळाचा सामना करावा लागला तेव्हा “प्रेषितांशिवाय बाकी सर्व जण . . . विखुरले गेले.” (प्रे. कार्ये ८:१) विचार करा की त्यामुळे काय झालं असेल! ख्रिश्चनांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यांना आपलं घर आणि नोकरीधंदा गमावावा लागला. पण यहोवाने त्यांना सोडलं नाही आणि त्यांनीही आपला आनंद गमावला नाही. (प्रे. कार्ये ८:४; इब्री १३:५, ६; याको. १:२, ३) यहोवाने त्या विश्वासू ख्रिश्चनांना मदत केली आणि तो आज आपल्यालाही मदत करेल.—स्तो. ३७:१८, १९. टेहळणी बुरूज२०.०१ १७-१८ ¶१४-१५
गुरुवार, २१ ऑक्टोबर
परमेश्वर . . . दीनाकडे लक्ष देतो.—स्तो. १३८:६.
जेव्हा दावीदने आपल्या वडिलांच्या मेंढरांना सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंज्यातून सोडवलं, तेव्हा यहोवा या हिंस्र प्राण्यांसोबत लढायला आपल्याला मदत करत आहे हे दावीदने ओळखलं. दावीदने महाकाय गल्याथला हरवलं तेव्हाही यहोवा त्याला मदत करत आहे हे तो स्पष्टपणे पाहू शकला. (१ शमु. १७:३७) दावीद जेव्हा दुष्ट राजा शौल याच्या तावडीतून सुटला तेव्हासुद्धा त्याला जाणीव झाली की यहोवाने त्याचा जीव वाचवला. (स्तो. १८, उपरी लेखन) एका गर्विष्ठ व्यक्तीने या सर्व गोष्टींचं श्रेय स्वतः घेतलं असतं. पण दावीद नम्र असल्यामुळे तो हे ओळखू शकला की यहोवा त्याला मदत करत आहे. आपण यातून काय शिकू शकतो? यहोवा आपल्याला मदत करतो एवढंच ओळखणं पुरेसं नाही, तर तो आपल्याला केव्हा आणि कशी मदत करतो हेही जाणणं गरजेचं आहे. आपण जर नम्र असलो तर आपल्याला समजेल की सर्वच गोष्टी आपण स्वतःच्या बळावर करू शकत नाही तर त्या करण्यासाठी यहोवा आपल्याला सक्षम बनवतो. यहोवा प्रत्येक वेळी मदत करत असल्याचं आपण अनुभवतो तेव्हा आपलं त्याच्यासोबत असलेलं नातं आणखी मजबूत होत जातं. टेहळणी बुरूज१९.१२ २० ¶१८-१९
शुक्रवार, २२ ऑक्टोबर
जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.—नीति. ३:१२.
यहोवाने आपल्याला मौल्यवान लेखण्याची आपल्याकडे बरीचशी कारणं आहेत. ती म्हणजे, त्याने आपल्याला स्वतःकडे आकर्षित केलं आहे आणि आनंदाच्या संदेशाला आपण कसा प्रतिसाद दिला हेही त्याने पाहिलं आहे. (योहा. ६:४४) जसजसं आपण यहोवाच्या जवळ जायला सुरुवात केली, तसतसं तोही आपल्याजवळ येऊ लागला. (याको. ४:८) यहोवा आपल्याला मौल्यवान लेखत असल्यामुळे तो आपल्याला शिकवण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्च करतो. आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे माहीत असण्यासोबतच, आपण स्वतःमध्ये कोणते सुधार करू शकतो हेही त्याला माहीत आहे. तसंच, त्याचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्याला शिस्तसुद्धा लावतो. खरंच, यहोवा आपल्याला मौल्यवान लेखतो याचे हे किती ठोस पुरावे आहेत! काही जणांनी दावीद राजाला कमी लेखलं तरी त्याला जाणीव होती की यहोवा त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला मदतही करतो. यामुळे दावीद योग्य दृष्टिकोन ठेवून समस्यांचा सामना करू शकला. (२ शमु. १६:५-७) जेव्हा आपण निराश होतो किंवा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा यहोवा परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आपल्याला मदत करतो. आणि त्याच्या मदतीने आपण उंच ‘भिंतींसारख्या’ समस्यांना पार करू शकतो. (स्तो. १८:२७-२९) आपल्याला जेव्हा यहोवाचा पाठिंबा असतो तेव्हा त्याची सेवा आनंदाने करण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही.—रोम. ८:३१. टेहळणी बुरूज२०.०१ १५ ¶७-८
शनिवार, २३ ऑक्टोबर
मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.—मत्त. २८:२०.
तुम्ही एखाद्याचा बायबल अभ्यास घेता तेव्हा प्रार्थना करून सुरूवात करा. नियमित अभ्यास सुरू झाल्याच्या काही आठवड्यांतच म्हणजे लवकरात लवकर, बायबल अभ्यासाआधी आणि नंतर प्रार्थना करणं योग्य राहील. देवाच्या पवित्र आत्म्यामुळे आपल्याला त्याचं वचन समजायला मदत होते या गोष्टीची जाणीव आपण विद्यार्थ्याला करून द्यायला हवी. काही प्रचारक प्रार्थनेचं महत्त्व सांगण्याआधी याकोब १:५ हे वचन वाचून त्यावर चर्चा करतात. त्यात म्हटलं आहे: “तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असल्यास त्याने ती देवाजवळ मागत राहावी.” त्यानंतर प्रचारक विद्यार्थ्याला विचारू शकतो, ‘आपण देवाजवळ बुद्धी कशी मागू शकतो?’ आणि सहसा असं होतं की विद्यार्थी याचं उत्तर ‘देवाकडे प्रार्थना करून’ असं देतो. अशा प्रकारे विद्यार्थी मान्य करतो की प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. प्रार्थना कशी करायची हे तुमच्या विद्यार्थ्याला शिकवा. विद्यार्थ्याने मनापासून केलेली प्रार्थना यहोवाला ऐकण्याची इच्छा आहे हे त्याला समजायला मदत करा. आपल्या वैयक्तिक प्रार्थनांमध्ये आपण यहोवाला मनमोकळेपणाने आपल्या भावना सांगू शकतो; अशा भावना ज्या कदाचित आपण इतर कोणालाही सांगणार नाही. शिवाय, आपल्याला माहीत आहे की आपण आपले विचार आणि भावना यहोवाला सांगण्याआधीच त्याला ते माहीत आहेत.—स्तो. १३९:२-४. टेहळणी बुरूज२०.०१ २ ¶३; ५ ¶११-१२
रविवार, २४ ऑक्टोबर
एखाद्याच्या इच्छेवर किंवा त्याच्या प्रयत्नांवर नाही, तर . . . देवावर हे अवलंबून आहे.—रोम. ९:१६.
अभिषिक्त जनांना केव्हा निवडायचं हे यहोवा ठरवतो. (रोम. ८:२८-३०) येशूचं पुनरुत्थान झाल्यावर यहोवाने अभिषिक्त जनांना निवडायला सुरू केलं. असं दिसून येतं की पहिल्या शतकात सगळे खरे ख्रिस्ती अभिषिक्त होते. मग त्यानंतर बरीच वर्षं अनेकांनी ख्रिस्ती असण्याचा दावा केला पण ते येशूचे खरे शिष्य नव्हते. असं असलं तरी त्या वर्षांदरम्यान यहोवाने काही खऱ्या ख्रिश्चनांना अभिषिक्त केलं. ते येशूने उदाहरणात सांगितलेल्या गव्हाप्रमाणे होते ज्यांची वाढ जंगली गवतासोबत होणार होती. (मत्त. १३:२४-३०) शेवटच्या दिवसांमध्ये यहोवाने अशा लोकांना निवडण्याचं काम सुरू ठेवलं आहे जे १,४४,००० जणांपैकी असणार आहेत. म्हणून यहोवाने जर त्यांपैकी काहींना अंत येणाच्या फक्त काही काळाआधी निवडलं तरी आपण त्याच्या निर्णयाबद्दल शंका घेणार नाही. (रोम. ९:११क) येशूने एका उदाहरणात सांगितलेल्या मजुरांसारखं वागण्याचं आपण टाळलं पाहिजे. त्यांचा मालक शेवटच्या तासाला काम करायला आलेल्या मजुरांशी जसा वागला त्याबद्दल ते कुरकुर करू लागले.—मत्त. २०:८-१५. टेहळणी बुरूज२०.०१ ३० ¶१४
सोमवार, २५ ऑक्टोबर
पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील.—यश. ६५:१४.
यहोवा एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याची इच्छा आहे की त्याच्या कुटुंबाने आनंदी राहावं. आपल्याला कठीण समस्यांचा सामना करावा लागत असला, तरी आनंदी राहण्याची आज आपल्याकडे बरीच कारणं आहेत. जसं की, आपला स्वर्गीय पिता आपल्यावर खूप प्रेम करतो याची आपल्याला पक्की खातरी आहे. तसंच, आपल्याकडे देवाचं वचन बायबल याचं अचूक ज्ञान आहे. (यिर्म. १५:१६) आणि आपण अशा एका खास कुटुंबाचे भाग आहोत ज्याचे सदस्य यहोवावर, त्याच्या उच्च नैतिक स्तरांवर आणि एकमेकांवर प्रेम करतात. (स्तो. १०६:४, ५) आपण आनंदी राहू शकतो कारण आपल्याला पक्की आशा आहे की भविष्यात आपल्याला आताच्या तुलनेत एक चांगलं जीवन मिळेल. आपल्याला माहीत आहे की यहोवा सर्व दुष्ट लोकांना काढून टाकेल आणि त्याच्या सरकाराद्वारे तो संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवेल. आपल्या मरण पावलेल्या प्रियजनांना पुन्हा जिवंत केलं जाईल तेव्हा आपण त्यांना पुन्हा भेटू ही सुंदर आशासुद्धा आपल्याकडे आहे. (योहा. ५:२८, २९) खरंच किती आनंद देणारे क्षण असतील ते! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेले सर्व जण आपल्या प्रेमळ पित्याचा गौरव, स्तुती आणि उपासना करतील. कारण या सर्व गोष्टी मिळण्याचा त्यालाच हक्क आहे! टेहळणी बुरूज२०.०२ १३ ¶१५-१६
मंगळवार, २६ ऑक्टोबर
तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे.—स्तो. ५१:४.
तुमच्या हातून जर गंभीर पाप घडलं असेल तर ते लपवून ठेवू नका. याउलट प्रार्थनेत यहोवाजवळ आपलं पाप कबूल करा. यामुळे तुमची चिंता दूर होईल आणि तुमचा विवेकही तुम्हाला दोषी ठरवणार नाही. पण यहोवासोबत तुम्हाला पुन्हा मैत्री करायची असेल तर तुम्हाला प्रार्थनेव्यतिरिक्त आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्हाला ताडन स्वीकारण्याची गरज आहे. यहोवाने जेव्हा नाथानद्वारे राजा दावीदला बथशेबासोबत केलेलं त्याचं पाप लक्षात आणून दिलं, तेव्हा त्याने कारणं दिली नाहीत किंवा घडलेली चूक इतकी काही मोठी नव्हती असंही म्हटलं नाही. त्याने लगेच मान्य केलं की त्याने फक्त बथशेबाच्या नवऱ्याविरूद्ध पाप केलं नाही, तर यहोवाविरूद्ध पाप केलं आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट होती. यहोवाकडून मिळालेलं ताडन दावीदने स्वीकारलं आणि यहोवाने त्याला माफ केलं. (२ शमु. १२:१०-१४) जर आपल्या हातून गंभीर पाप घडलं असेल, तर यहोवाने आपली देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या वडिलांशी आपण बोललं पाहिजे. (याको. ५:१४, १५) आपली चूक आपण कबूल केली पाहिजे आणि स्वतःला योग्य ठरवण्याचं टाळलं पाहिजे. आपल्याला मिळालेलं ताडन आपण जितक्या लवकर स्वीकारू आणि त्यानुसार कार्य करू, तितक्या लवकर आपण पुन्हा आनंद आणि शांती मिळवू. टेहळणी बुरूज२०.०२ २४-२५ ¶१७-१८
बुधवार, २७ ऑक्टोबर
सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.—जख. ८:२३.
‘यहुदी माणूस’ अभिषिक्त ख्रिश्चनांना सूचित करतो. आणि “दहा जण” अशा लोकांना सूचित करतं ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळाच्या जीवनाची आशा आहे. त्यांना माहीत आहे की यहोवाने अभिषिक्त ख्रिश्चनांच्या या गटाला निवडलं आहे. तसंच, त्यांच्यासोबत मिळून यहोवाची सेवा करणं हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे असंही त्यांना वाटतं. आज पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक अभिषिक्त व्यक्तीचं नाव माहीत करून घेणं शक्य नसलं, तरी वचनात सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असणारे लोक अभिषिक्त जनांसोबत ‘जाऊ शकतात.’ ते कसं? आजचं वचन याचं उत्तर देतं. या वचनात एका यहुदी माणसाचा उल्लेख केला आहे याकडे लक्ष द्या. पण “तुम्हाबरोबर” असं जे म्हटलं आहे, त्यावरून असं कळतं हे फक्त एका माणसाला नाही अनेकांना सूचित करतं. म्हणजेच तो यहुदी माणूस अभिषिक्त जनांच्या संपूर्ण समूहाला सूचित करतो. जे अभिषिक्त नाहीत ते यहोवाची सेवा अभिषिक्त जनांसोबत मिळून करतात. असं असलं तरी ते अभिषिक्त जनांना त्यांचे प्रमुख समजत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा प्रमुख येशू आहे.—मत्त. २३:१०. टेहळणी बुरूज२०.०१ २६ ¶१-२
गुरुवार, २८ ऑक्टोबर
तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.—योहा. १३:३५.
येशूने म्हटलं की त्याच्या शिष्यांनी जर इतरांवर त्याच्यासारखं प्रेम केलं, तर सर्व लोकांना स्पष्टपणे दिसून येईल की ते त्याचे शिष्य आहेत. ही गोष्ट पहिल्या शतकात जितकी खरी होती तितकी आजही आहे. त्यामुळे इतरांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे; मग तसं करणं कठीण वाटत असलं तरीही. आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की ‘जे भाऊबहीण कठीण परिस्थितीतही इतरांवर प्रेम करत राहिले त्यांच्या उदाहरणांवरून मला काय शिकता येईल?’ आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला इतरांवर जिवापाड प्रेम करणं कठीण जातं. असं असलं तरी आपण ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे. येशूने शिकवलं की आपल्याविरुद्ध जर एखाद्या भाऊबहिणीला तक्रार असेल तर त्यांच्यासोबत समेट करणं महत्त्वाचं आहे. (मत्त. ५:२३, २४) त्याने या गोष्टीवर जोर दिला की आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल तर आपण इतरांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. भाऊबहिणीसोबत जेव्हा समेट करण्याचा आपण होता होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण आपण नाराज राहिलो आणि समेट करण्यासाठी पाऊल उचललं नाही तर यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही.—१ योहा. ४:२०. टेहळणी बुरूज२०.०३ २४ ¶१-४
शुक्रवार, २९ ऑक्टोबर
सत्याचा संदेश आणि खोटेपणाचा संदेश यांतला फरक आपण ओळखू शकतो.—१ योहा. ४:६.
“खोटेपणाचा बाप” म्हणजे सैतान याने आदाम आणि हव्वाच्या काळापासूनच लोकांना फसवलं आहे. (योहा. ८:४४) त्याने अनेक खोट्या शिकवणी पसरवल्या आहेत. त्यांपैकी काही म्हणजे मृत्यूबद्दल आणि मृत्यूनंतरच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या खोट्या शिकवणी. आणि या शिकवणींवर अनेक प्रचलित प्रथा आणि अंधविश्वास आधारलेले आहेत. मृत्यूबद्दल सैतान पसरवत असलेल्या खोट्या शिकवणींवर अनेक लोक का विश्वास ठेवतात? कारण मृत्यूबद्दल लोकांच्या काय भावना आहेत हे सैतान जाणतो आणि त्याचाच तो फायदा उचलतो. आपल्याला सर्वकाळ जगता यावं अशी आपली रचना करण्यात आली होती आणि आपल्यापैकी कोणालाच मरण नको असतं. (उप. ३:११) आपण मृत्यूला आपला शत्रू समजतो. (१ करिंथ. १५:२६) सैतानाने कितीही हातपाय मारले तरी मृत्यूबद्दलचं सत्य काही लपलेलं नाही. खरंतर, कधी नव्हे इतक्या लोकांना आज बायबलमध्ये दिलेल्या मृत जणांच्या स्थितीबद्दल आणि त्यांच्यासाठी असलेल्या आशेबद्दल माहीत झालं आहे. आणि ते याबद्दल इतरांना सांगतही आहेत. (उप. ९:५, १०; प्रे. कार्ये २४:१५) या खऱ्या शिकवणींमुळे आपल्याला सांत्वन मिळतं आणि नको त्या भीतींपासून आणि शंकांपासून दूर राहायला मदत होते. टेहळणी बुरूज१९.०४ १४ ¶१; १५ ¶५-६
शनिवार, ३० ऑक्टोबर
एकमेकांची ओझी वाहत राहा; अशा रीतीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.—गलती. ६:२.
यहोवा देवाचं आपल्या उपासकांवर प्रेम आहे. तो आधीही त्यांच्यावर प्रेम करायचा आणि पुढेही करत राहणार. त्याला न्यायसुद्धा प्रिय आहे. (स्तो. ३३:५) यामुळे आपण दोन गोष्टींची खातरी बाळगू शकतो: (१) आपल्या सेवकांवर कोणी अन्याय केला तर यहोवाला दुःख होतं. (२) तो वचन देतो की त्याच्या सेवकांवर होत असलेला अन्याय तो थांबवेल आणि अन्याय करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा करेल. देवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना दिलेलं नियमशास्त्र प्रेमावर आधारलेलं होतं. यामुळे लोकांना न्यायाने वागण्याचं प्रोत्साहन मिळायचं आणि खासकरून जे स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हते अशांना न्याय मिळायचा. (अनु. १०:१८) यहोवाचं आपल्या उपासकांवर गाढ प्रेम आहे हे त्या नियमशास्त्रातून दिसून आलं. ख्रिस्ती मंडळी इ.स. ३३ मध्ये स्थापित झाली तेव्हा मोशेचं नियमशास्त्र संपुष्टात आलं. मग याचा अर्थ, प्रेमावर आधारलेल्या आणि न्यायाला बढावा देणाऱ्या नियमशास्त्रामुळे जो फायदा व्हायचा तो आता ख्रिस्ती लोकांना होणार नव्हता का? मुळीच नाही! खरंतर, ख्रिस्ती लोकांना आता एक नवा नियम मिळाला होता. तो म्हणजे, “ख्रिस्ताचा नियम.” येशूने आपल्या अनुयायांना नियमांची सूची लिहून दिली नाही, तर त्याने त्यांना जीवनासाठी आवश्यक असलेल्या आज्ञा व सूचना दिल्या आणि तत्त्वंही दिली. ‘ख्रिस्ताच्या नियमात’ येशूच्या सर्व शिकवणींचा समावेश होतो. टेहळणी बुरूज१९.०५ २ ¶१-३
रविवार, ३१ ऑक्टोबर
सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव . . . आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो.—२ करिंथ. १:३, ४.
मानवांमध्ये सांत्वन मिळवण्याची उपजत गरज असते. तसंच, त्यांच्यात इतरांचं सांत्वन करण्याची अद्भुत क्षमताही असते. एका उदाहरणाचा विचार करा. एक लहान मुलगा खेळता-खेळता पडतो आणि त्याला लागतं. तो रडत-रडत आपल्या आईजवळ जातो. त्याची आई ती जखम लगेच बरी तर करू शकत नाही, पण ती त्याचं सांत्वन नक्की करते. त्याला काय झालं हे ती विचारते, त्याचे अश्रू पुसते, त्याच्याशी प्रेमाने बोलते, त्याला जवळ घेते आणि कदाचित त्याच्या जखमेवर औषधही लावते. यामुळे काही वेळातच त्याचं रडणं थांबतं आणि तो पुन्हा खेळू लागतो. त्याची जखमही काही दिवसांत बरी होते. पण कधीकधी मुलांच्या कोवळ्या मनावर खूप खोलवर जखम होते आणि बऱ्याच काळापर्यंत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. काही मुलांचं लैंगिक शोषण केलं जातं. यांपैकी काहींचं एकदाच तर इतरांचं बऱ्याच वर्षांपर्यंत शोषण केलं जातं. पण दोन्ही बाबतीत या शोषणामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळा शोषण करणारा पकडला जातो आणि त्याला शिक्षा होते. पण काही वेळा तो पकडला जात नाही आणि त्याला त्याच्या दुष्कर्माची काहीच शिक्षा होत नाही. आणि जरी अशा व्यक्तीला शिक्षा झाली तरी त्या मुलाला बऱ्याच वर्षांपर्यंत, कदाचित मोठं झाल्यावरही त्या भावनिक छळाचा सामना करावा लागू शकतो. टेहळणी बुरूज१९.०५ १४ ¶१-२