वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. १०४-११६
  • सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • बुधवार, १ सप्टेंबर
  • गुरुवार, २ सप्टेंबर
  • शुक्रवार, ३ सप्टेंबर
  • शनिवार, ४ सप्टेंबर
  • रविवार, ५ सप्टेंबर
  • सोमवार, ६ सप्टेंबर
  • मंगळवार, ७ सप्टेंबर
  • बुधवार, ८ सप्टेंबर
  • गुरुवार, ९ सप्टेंबर
  • शुक्रवार, १० सप्टेंबर
  • शनिवार, ११ सप्टेंबर
  • रविवार, १२ सप्टेंबर
  • सोमवार, १३ सप्टेंबर
  • मंगळवार, १४ सप्टेंबर
  • बुधवार, १५ सप्टेंबर
  • गुरुवार, १६ सप्टेंबर
  • शुक्रवार, १७ सप्टेंबर
  • शनिवार, १८ सप्टेंबर
  • रविवार, १९ सप्टेंबर
  • सोमवार, २० सप्टेंबर
  • मंगळवार, २१ सप्टेंबर
  • बुधवार, २२ सप्टेंबर
  • गुरुवार, २३ सप्टेंबर
  • शुक्रवार, २४ सप्टेंबर
  • शनिवार, २५ सप्टेंबर
  • रविवार, २६ सप्टेंबर
  • सोमवार, २७ सप्टेंबर
  • मंगळवार, २८ सप्टेंबर
  • बुधवार, २९ सप्टेंबर
  • गुरुवार, ३० सप्टेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. १०४-११६

सप्टेंबर

बुधवार, १ सप्टेंबर

माझा पिता आतापर्यंत काम करत आहे आणि मीसुद्धा काम करत राहतो.—योहा. ५:१७.

यहोवा आणि येशू यांनी मेहनती असण्याबद्दल आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. पण याचा अर्थ असा होतो का की आपल्याला विश्रांती घेण्याची गरज नाही? मुळीच नाही! यहोवा कधीही थकत नाही, म्हणून त्याला आपल्यासारखी विश्रांती घ्यायची गरज नाही. पण बायबल म्हणतं की आकाश आणि पृथ्वी निर्माण केल्यानंतर त्याने “काम थांबवले व विश्रांती घेतली.” (निर्ग. ३१:१७, मराठी कॉमन लँग्वेज) मग याचा काय अर्थ होतो? यहोवाने निर्मिती करणं थांबवलं आणि घडवलेल्या सृष्टीकडे पाहण्यासाठी त्याने वेळ काढला व त्याला संतुष्टी मिळाली. येशूनेही पृथ्वीवर असताना खूप मेहनत केली. पण असं असलं तरी त्याने आराम करण्यासाठी वेळ काढला आणि आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेतला. (मत्त. १४:१३; लूक ७:३४) बायबल आपल्याला प्रोत्साहन देतं की आपण देवाचे सेवक या नात्याने कामाचा आनंद घ्यावा. देवाच्या सेवकांनी आळशी नसून मेहनती असावं अशी त्याची इच्छा आहे. (नीति. १५:१९) म्हणूनच कदाचित तुम्ही नोकरी-व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करता. तसंच, ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने प्रचारकार्यात सहभाग घेण्याची जबाबदारीही तुमच्यावर आहे. असं असलं तरी तुम्हाला पुरेशी विश्रांती घेणंसुद्धा गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१९.१२ २ ¶२; ३ ¶४-५

गुरुवार, २ सप्टेंबर

ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसले आणि . . . तुमच्याकरता एक आदर्श घालून दिला, यासाठी की तुम्ही त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करावे.—१ पेत्र २:२१.

दुष्टात्म्यांबद्दल गोष्टी सांगण्याचं टाळा. याबाबतीत आपण येशूचं अनुकरण केलं पाहिजे. पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता आणि त्याला सैतान व दुष्टात्मे यांबद्दल बरीच माहिती होती. पण पृथ्वीवर आल्यावर त्याने दुष्टात्म्यांनी केलेल्या कार्यांबद्दल लोकांना सांगितलं नाही. येशू लोकांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी आला होता, सैतानाबद्दल नाही. येशूचं अनुकरण करून आपणही इतरांना दुष्टात्म्यांबद्दल गोष्टी सांगण्याचं टाळलं पाहिजे. याऐवजी आपण आपल्या मनात चांगल्या विचारांना, म्हणजेच सत्याला जागा दिली पाहिजे. (स्तो. ४५:१) दुष्टात्म्यांना घाबरू नका. आजच्या जगात आपल्यासोबत वाईट गोष्टी घडू शकतात. अपघात, आजारपण किंवा मृत्यू या गोष्टी आपल्यावर अचानक येऊ शकतात. पण या सर्व गोष्टींसाठी दुष्टात्मे जबाबदार आहेत असा आपण विचार करू नये. बायबल आपल्याला सांगतं की “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उप. ९:११, पं.र.भा.) यहोवाने वेळोवेळी दाखवून दिलं आहे की तो दुष्टात्म्यांपेक्षा खूप जास्त शक्‍तिशाली आहे. टेहळणी बुरूज१९.०४ २३-२४ ¶१३-१४

शुक्रवार, ३ सप्टेंबर

जे काही अधिकार आहेत, ते देवानेच नेमले आहेत.—रोम. १३:१.

देशाच्या कायद्याचं पालन करून वडील मुलांच्या शोषणाच्या आरोपांबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवतात का? हो. ज्या देशांमध्ये असे नियम आहेत, त्या ठिकाणी वडील त्यांचं पालन करून मुलांच्या शोषणाबद्दल लावलेल्या कोणत्याही आरोपांविषयी अधिकाऱ्‍यांना कळवतात. अशा प्रकारचे नियम देवाच्या नियमांच्या विरोधात नाहीत. (प्रे. कार्ये ५:२८, २९) यामुळे वडिलांना अशा एखाद्या आरोपाबद्दल समजल्यावर ते लगेच शाखा कार्यालयाकडून मदत घेतात आणि मग कायद्यानुसार जे गरजेचं आहे ते करतात. शोषणाला बळी पडलेली मुलं, त्यांचे आईवडील आणि या घटनेबद्दल ज्यांना माहिती आहे त्या सर्वांना वडील स्पष्टपणे सांगतात की या आरोपांबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना सांगण्याचा अधिकार त्या सर्वांकडे आहे. पण मुलांचं शोषण करणारा मंडळीतला असला आणि याबद्दल समाजात इतरांना समजलं तर? ज्या बांधवाने याबद्दल सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवलं तो असं करण्याद्वारे देवाच्या नावावर कलंक लावत आहे का? मुळीच नाही. उलट जो मुलांच्या शोषणासारखं गंभीर पाप करतो खरंतर तोच देवाच्या नावावर कलंक लावत असतो. टेहळणी बुरूज१९.०५ १० ¶१३-१४

शनिवार, ४ सप्टेंबर

या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे.—१ करिंथ. ३:१९.

पती आणि पत्नीने एकमेकांना आदर दिला पाहिजे आणि त्यांनी लग्नात एकमेकांना दिलेलं वचन पाळलं पाहिजे असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. विवाहसोबत्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचा दृढ निश्‍चय केला पाहिजे असं त्यात प्रोत्साहन देण्यात आलं आहे. बायबल म्हणतं: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्प. २:२४) याच्या विपरीत जगाच्या बुद्धीमुळे प्रभावीत झालेल्या लोकांचं दुसरंच मत आहे. त्यांच्यानुसार विवाहसोबत्याने स्वतःच्याच गरजांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. घटस्फोटावर आधारित असलेल्या एका पुस्तकात म्हटलं आहे, की “काही देशांत लग्न करताना जोडपी, ‘आम्ही मरेपर्यंत एकमेकांना साथ देऊ’ अशी लोकांसमोर शपथ घेतात. पण बऱ्‍याच लोकांनी या शपथेच्या शब्दांत बदल केले आहेत. ते म्हणतात ‘आमचं एकमेकांवर प्रेम असेपर्यंत आम्ही एकमेकांना साथ देऊ.’” विवाह हे कायमस्वरुपाचं बंधन नाही असं लोकांना वाटत असल्यामुळे अगणित कुटुंबं विस्कळीत झाली आहेत आणि यामुळे बऱ्‍याच लोकांना भावनिक रीत्या इजा पोहोचल्या आहेत. यात काहीच शंका नाही की विवाहाचा अनादर करणारा जगाचा दृष्टिकोन खरंच मूर्खपणाचा आहे. टेहळणी बुरूज१९.०५ २३ ¶१२

रविवार, ५ सप्टेंबर

यापुढे या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.—रोम. १२:२.

पौल काही ख्रिश्‍चनांबद्दल चिंतित होता. कारण सैतानाच्या जगातल्या हानीकारक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव झाला होता. (इफिस. ४:१७-१९) हीच गोष्ट आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत घडू शकते. सैतान या जगाचा शासक असल्यामुळे तो वेगवेगळ्या युक्त्यांचा उपयोग करून आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. त्यातली एक युक्‍ती म्हणजे स्वतःला महत्त्व देण्याची किंवा प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा. या इच्छेचा वापर करून तो आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तसंच, तो आपली पार्श्‍वभूमी, संस्कृती आणि आपलं शिक्षण यांमधल्या काही विशिष्ट पैलूंचा उपयोग करून आपल्याला त्याच्यासारखा विचार करायला लावतो. आपल्या मनात असलेल्या “भक्कम बुरुजांसारख्या” गोष्टी उलथून टाकणं शक्य आहे का? (२ करिंथ. १०:४) पाहा, पौल याचं कशा प्रकारे उत्तर देतो: “सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो आणि प्रत्येक विचाराला कैदी बनवून ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो.” (२ करिंथ. १०:५) खरंच, आपण यहोवाच्या मदतीने आपल्या मनात रुजलेले चुकीचे विचार काढू शकतो. टेहळणी बुरूज१९.०६ ८ ¶१-३

सोमवार, ६ सप्टेंबर

माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे.—स्तो. ७३:२८.

हन्‍ना, दावीद आणि स्तोत्रकर्ता हे तिघंही अतिशय दुःखी होते. पण मदतीसाठी ते यहोवावर विसंबून राहिले. त्यांनी यहोवाला कळकळून प्रार्थना केली आणि आपल्या चिंता त्याला सांगितल्या. ते इतक्या तणावात का आहेत याची कारणं त्यांनी यहोवासमोर मनमोकळेपणे मांडली. आणि अशा परिस्थितीतही त्यांनी यहोवाच्या मंदिरात जायचं थांबवलं नाही. (१ शमु. १:९, १०; स्तो. ५५:२२; ७३:१७; १२२:१) यहोवाने या सर्वांच्या प्रार्थनेचं प्रेमळपणे उत्तर दिलं. हन्‍नाला मनःशांती मिळाली. (१ शमु. १:१८) दावीदने म्हटलं: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्‍वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.” (स्तो. ३४:१९) आणि प्रार्थना केल्यानंतर त्या स्तोत्रकर्त्याला वाटलं की यहोवाने त्याचा “उजवा हात धरला आहे” आणि तो त्याला प्रेमळपणे सुधारत आहे. (स्तो. ७३:२३, २४) या उदाहरणांवरून आपण काय शिकतो? कधीकधी आपल्या जीवनात अशा समस्या येतील ज्यामुळे आपण तणावात असू. पण तणावाचा सामना करण्यासाठी आपल्याला यहोवाकडून मदत हवी असेल तर पुढील तीन गोष्टी करणं गरजेच्या आहेत. यहोवाने इतरांना कशी मदत केली यावर आपल्याला मनन करावं लागेल, प्रार्थनेत यहोवावर विसंबून राहावं लागेल आणि त्याच्या इच्छेनुसार कार्य करावं लागेल.—स्तो. १४३:१, ४-८. टेहळणी बुरूज१९.०६ १७ ¶१४-१५

मंगळवार, ७ सप्टेंबर

न्यायनीतीने वागल्यामुळे जरी तुम्हाला दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही सुखी आहात.—१ पेत्र ३:१४.

लोक आपल्याबद्दल जे बोलतात किंवा आपल्याशी जसा व्यवहार करतात त्यामुळे आपल्याला कधीही यहोवाचे साक्षीदार असण्याची लाज वाटू नये. (मीखा ४:५) यरुशलेममधल्या प्रेषितांच्या उदाहरणावर विचार करा. येशूला ठार मारल्यानंतर यहुदी धार्मिक पुढारी त्यांचाही खूप द्वेष करायचे. आणि याची प्रेषितांना जाणीव होती. (प्रे. कार्ये ५:१७, १८, २७, २८) असं असलं तरीही, ते दररोज मंदिरात जाऊन शिकवायचे आणि आपली ओळख येशूचे शिष्य म्हणून करून द्यायचे. (प्रे. कार्ये ५:४२) ते घाबरून गेले नाहीत. आपल्यालाही लोकांच्या भीतीवर मात करायचं असेल, तर आपण नेहमी सर्वांसमोर आपली ओळख यहोवाचे साक्षीदार म्हणून करून दिली पाहिजे. हे आपण कामावर, शाळेत आणि राहतो त्या ठिकाणी करू शकतो. (प्रे. कार्ये ४:२९; रोम. १:१६) प्रेषित आपला आनंद का टिकवून ठेवू शकले? लोक त्यांचा द्वेष का करत आहेत यामागचं कारण त्यांना माहीत होतं. आणि यहोवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे होणाऱ्‍या छळाला त्यांनी आदराची गोष्ट समजली. (लूक ६:२३; प्रे. कार्ये ५:४१; १ पेत्र २:१९-२१) योग्य ते करण्यासाठी आपला द्वेष केला जात आहे हे माहीत असल्यामुळे, आपण लोकांच्या भीतीला कधीच आपल्या सेवेच्या आड येऊ देणार नाही. टेहळणी बुरूज१९.०७ ७ ¶१९-२०

बुधवार, ८ सप्टेंबर

शब्बाथाच्या दिवशी चांगलं काम करणं नक्कीच नियमानुसार योग्य आहे.—मत्त. १२:१२.

येशू आणि त्याच्या यहुदी अनुयायांनी शब्बाथाचा नियम पाळला, कारण ते मोशेच्या नियमाधीन होते. पण येशूने आपल्या बोलण्यातून आणि कार्यातून दाखवून दिलं, की शब्बाथाच्या दिवशी इतरांना मदत करून दया दाखवण्यात काहीच हरकत नाही. (मत्त. १२:९-११) लोकांना मदत करणं किंवा त्यांना दया दाखवणं या गोष्टींमुळे शब्बाथाच्या नियमाचं उल्लंघन होतं असा विचार येशू करत नव्हता. देवाने लोकांना शब्बाथाच्या दिवशी विश्रांती घ्यायला सांगण्यामागचं कारण काय होतं, हे येशूने केलेल्या कार्यांवरून दिसून आलं. देवाचे लोक त्यांच्या रोजच्या कामातून विश्रांती घ्यायचे त्यामुळे ते देवाच्या उपासनेवर लक्ष केंद्रित करू शकले. येशू ज्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला तिथे शब्बाथाच्या दिवशी नक्कीच देवाची उपासना केली जायची. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये म्हटलं आहे की येशू आपल्या नगरात म्हणजे नासरेथमध्ये होता तेव्हा “शब्बाथाच्या दिवशी तो आपल्या रिवाजाप्रमाणे सभास्थानात गेला आणि वाचायला उभा राहिला.” (लूक ४:१५-१९) शिवाय, शब्बाथाच्या नियमाबद्दल शिष्यांच्या मनात खूप आदर होता. त्यांना येशूच्या मृत शरीराला लावण्यासाठी सुगंधी मसाले आणि सुवासिक तेल तयार करायचं होतं. पण शब्बाथाचा दिवस मध्येच आल्यामुळे त्यांनी ती तयारी थांबवली.—लूक २३:५५, ५६. टेहळणी बुरूज१९.१२ ४ ¶१०

गुरुवार, ९ सप्टेंबर

तुम्ही कोणतीही आशा नसलेले होता.—इफिस. २:१२.

प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधण्याच्या कामात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती मदत करत आहे. लोकांना शोधण्याच्या या कामाची तुलना आपण एका हरवलेल्या मुलाला शोधण्याच्या कामाशी करू शकतो. ते कसं? एका सत्य घटनेचा विचार करा. एकदा एक तीन वर्षांचा मुलगा हरवला. जवळजवळ ५०० लोक त्या मुलाला शोधत होते. त्या मुलाला हरवून जवळपास वीस तास झाल्यावर शेवटी एका व्यक्‍तीला तो मक्याच्या शेतात सापडला. लोकांनी त्या व्यक्‍तीचं कौतुक केलं. पण त्या व्यक्‍तीने त्या मुलाला शोधून काढण्याचं श्रेय घेतलं नाही. त्याने म्हटलं: “खरंतर, बऱ्‍याचशा लोकांच्या प्रयत्नांमुळे हा मुलगा सापडला आहे.” आज बरेचसे लोक त्या हरवलेल्या मुलाप्रमाणेच आहेत. त्यांच्याकडे आशा नाही आणि त्यांना मदत हवी आहे. ऐंशी लाखांपेक्षा जास्त लोक एकत्र मिळून अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला कदाचित बायबल अभ्यास करायला तयार असणारी व्यक्‍ती इतक्या सहजपणे भेटणार नाही. पण त्याच क्षेत्रात इतर प्रचारकांना कदाचित अशी व्यक्‍ती भेटेल जी देवाच्या वचनातली सत्यं शिकून घ्यायला तयार असेल. एका बांधवाला किंवा बहिणीला जेव्हा अशी एखादी व्यक्‍ती भेटते जी पुढे जाऊन ख्रिस्ताचा शिष्य बनते त्या वेळी आपल्या सर्वांनाच आनंद होतो. कारण आपणही त्या शोधकामात भाग घेतलेला असतो. टेहळणी बुरूज१९.०७ १६-१७ ¶९-१०

शुक्रवार, १० सप्टेंबर

मी . . . बक्षीस मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.—फिलिप्पै. ३:१४.

आपण धीराने धावणं का गरजेचं आहे याची प्रेषित पौलने फिलिप्पैच्या मंडळीला आठवण करून दिली. मंडळीची सुरुवात झाल्यापासूनच तिथल्या बांधवांना विरोधाचा सामना करावा लागला. इ.स. ५० मध्ये पौल आणि सीला यांना देवाकडून “मासेदोनियात” जाण्याचं निर्देशन मिळाल्यामुळे ते आनंदाचा संदेश सांगण्यासाठी फिलिप्पै इथे पोहोचले. (प्रे. कार्ये १६:९) तिथे त्यांना लुदिया नावाची स्त्री भेटली. ती पौलचं बोलणं “लक्ष देऊन ऐकत होती” आणि आनंदाचा संदेश “स्वीकारण्यासाठी यहोवाने तिचे अंतःकरण पूर्णपणे उघडले.” (प्रे. कार्ये १६:१४) त्यानंतर तिने लवकरच आपल्या घराण्यासोबत बाप्तिस्मा घेतला. पण सैतान शांत बसला नाही, त्याने लगेच छळ सुरू केला. शहरातल्या माणसांनी पौल आणि सीला यांना अधिकाऱ्‍यांपुढे नेलं आणि ते गोंधळ माजवत आहेत असा खोटा आरोप त्यांच्यावर लावला. यामुळे मग पौल आणि सीला यांना फटके मारण्यात आले, तुरुंगात टाकण्यात आलं आणि नंतर त्यांना शहर सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं. (प्रे. कार्ये १६:१६-४०) इतकं सर्व झाल्यावरही त्यांनी हिंमत हारली का? नाही! आणि नवीनच सुरू झालेल्या तिथल्या मंडळीतल्या भाऊबहिणींबद्दल काय? त्यांनीसुद्धा सर्वकाही अगदी धीराने सहन केलं. खरंच, त्यांचंही उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे! यात काहीच शंका नाही की पौल आणि सीला यांच्या चांगल्या उदाहरणामुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं होतं. टेहळणी बुरूज१९.०८ २ ¶१-२

शनिवार, ११ सप्टेंबर

नीतिमत्त्वाच्या फळाने तुम्ही भरून जावे.—फिलिप्पै. १:११.

‘नीतिमत्त्वाचं फळ’ यात देवावर आणि त्याच्या लोकांवर असलेलं प्रेम सामील आहे हे स्पष्टच आहे. तसंच, येशूबद्दल आणि आपल्या आशेबद्दल इतरांना सांगणं हेदेखील यात सामील आहे. आपण जेव्हा सगळ्यात महत्त्वाच्या कामात म्हणजे शिष्य बनवण्याच्या कामात भरपूर मेहनत घेतो तेव्हा आपण ‘नीतिमत्त्वाचं फळ’ उत्पन्‍न करत असतो. (मत्त. २८:१८-२०) आपली परिस्थिती कशीही असली तरी आपण प्रकाशाप्रमाणे चमकत राहू शकतो. आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी कधीकधी अडखळण वाटतात त्या गोष्टींमुळे आपल्याला प्रचार करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. उदाहरणार्थ, प्रेषित पौलने रोममध्ये एका घरात कैद असताना फिलिप्पैकरांना पत्र लिहिलं. तो कैदेत होता म्हणून त्याने प्रचारकार्य थांबवलं का? नाही. तो तिथल्या पहारेकऱ्‍यांना आणि त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांना प्रचार करत राहिला. पौलने अशा परिस्थितींतही आवेशाने प्रचार केला आणि यामुळे बांधवांना आत्मविश्‍वासाने आणि “निर्भयपणे देवाचे वचन” सांगण्याचं बळ मिळालं.—फिलिप्पै. १:१२-१४; ४:२२. टेहळणी बुरूज१९.०८ १२ ¶१५-१६

रविवार, १२ सप्टेंबर

देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हाला सन्मानित करेल.—१ पेत्र ५:६.

नम्रता विकसित करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे यहोवाचं मन आनंदित होतं. आणि हीच गोष्ट, आजच्या वचनातले शब्द लिहिताना प्रेषित पेत्रने स्पष्ट केली. पेत्रच्या या शब्दांवर, “मेरा चेला बन जा और मेरे पीछे हो ले” या पुस्तकातल्या अध्याय ३ आणि परिच्छेद २३ मध्ये चर्चा करण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे: “गर्व हा विषासारखा आहे आणि याचे परिणाम खूप भयानक होऊ शकतात. गर्विष्ठ व्यक्‍तीकडे कितीही कौशल्यं असली तरी यहोवासाठी ती व्यक्‍ती काहीच कामाची नसते. याउलट, नम्र व्यक्‍तीकडे कमी कौशल्यं असली तरी ती यहोवासाठी खूप मौल्यवान असते. . . . तुम्ही दाखवत असलेल्या नम्रतेसाठी यहोवा तुम्हाला आशीर्वाद देईल.” खरंच, यहोवाचं मन आनंदित करण्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही! (नीति. २३:१५) नम्रता विकसित केल्यामुळे यहोवाचं मन आनंदित तर होतंच पण त्यासोबत आपल्याला बरेचसे फायदेही होतात. आपण नम्र असल्यामुळे इतर जण आपल्याला पसंत करतात. हे समजण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडतं याबद्दल विचार करा.—मत्त. ७:१२. टेहळणी बुरूज१९.०९ ४ ¶८-९

सोमवार, १३ सप्टेंबर

प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्‍वराला वीट येतो.—नीति. १६:५.

मंडळीतले वडील भाऊबहिणींना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेऊ शकतात. आणि आपल्याला मिळालेल्या अधिकारामुळे ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणार नाहीत. याउलट, ते भाऊबहिणींशी दयाळूपणे वागतील. (१ थेस्सलनी. २:७, ८ ) ते नम्र असल्यामुळे आणि त्यांचं लोकांवर खरं प्रेम असल्यामुळे ते त्यांच्याशी सौम्यतेने बोलतील. ॲलेक्स नावाचे बांधव बऱ्‍याच वर्षांपासून मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत. ते म्हणतात: “वडील जेव्हा दयाळू आणि प्रेमळ स्वभावाचे असतात तेव्हा भाऊबहिणींच्या मनाला या गोष्टी भिडतात. या गुणांमुळे त्यांना वडिलांना सहकार्य देण्याचं प्रोत्साहन मिळतं.” टोनी नावाचे बांधवही अनेक वर्षांपासून मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत. ते म्हणतात: “मी फिलिप्पैकर २:३ मध्ये दिलेला सल्ला लागू करण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजण्यासाठी सतत मेहनत घेतो. यामुळे मला एका हुकूमशहासारखं वागण्याचं टाळायला मदत होते.” यहोवा जसा नम्र आहे तसं वडिलांनीही नम्र असणं गरजेचं आहे. यहोवा या विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी असला तरी तो “कंगालांस धुळींतून” उठवण्यासाठी “लवतो” किंवा खाली वाकतो. (स्तो. १८:३५; ११३:६, ७) पण याउलट यहोवा गर्विष्ठ आणि उद्धट लोकांची घृणा करतो. टेहळणी बुरूज१९.०९ १६-१७ ¶११-१२

मंगळवार, १४ सप्टेंबर

माझं जू आपल्या खांद्यावर घ्या.—मत्त. ११:२९.

येशूचं जू आपल्या खांद्यावर असताना, आपल्याला तजेला मिळवायचा असेल तर आपण योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपण यहोवाचं काम करत आहोत त्यामुळे यहोवा सांगेल त्या पद्धतीनेच ते करणं गरजेचं आहे. आपण कामकरी आहोत आणि यहोवा आपला मालक आहे. (लूक १७:१०) आपण जर त्याचं काम आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला येशूचं जू वाहणं कठीण जाईल. पण आपण जर यहोवाचं काम त्याच्या पद्धतीने केलं तर आपल्या अवाक्याबाहेर असलेल्या गोष्टीही करणं आपल्याला शक्य होईल. तसंच, आपण यहोवाच्या मार्गदर्शनांचं पालन केलं तर आपण कुठल्याही समस्येवर मात करू शकू. हे लक्षात असू द्या की यहोवाची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही त्याला थांबवू शकत नाही! (रोम. ८:३१; १ योहा. ४:४) आपला प्रेमळ पिता यहोवा याच्या नावाचा गौरव करणं हाच आपला उद्देश आहे. पहिल्या शतकात जे लोक लोभी व स्वार्थी होते ते आपला आनंद जास्त काळापर्यंत टिकवून ठेवू शकले नाहीत आणि त्यांनी येशूचं जू वाहण्याचं सोडून दिलं. (योहा. ६:२५-२७, ५१, ६०, ६६; फिलिप्पै. ३:१८, १९) याच्या अगदी उलट, जे लोक देवावर आणि शेजाऱ्‍यावर निःस्वार्थ प्रेम करत होते त्यांनी पृथ्वीवर असताना आयुष्यभर आनंदाने येशूचं जू वाहिलं आणि त्यांना स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याची आशा होती. त्या लोकांसारखंच आपणही योग्य हेतू बाळगून येशूचं जू वाहिलं तर आपल्यालाही आनंदी राहता येईल. टेहळणी बुरूज१९.०९ २० ¶१; २४-२५ ¶१९-२०

बुधवार, १५ सप्टेंबर

तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल.—योहा. ८:३२.

खोट्या धर्माच्या शिकवणींपासून तुम्हाला मिळालेल्या सुटकेबद्दल विचार करा. यामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळाले आहेत. हे स्वातंत्र्य असल्याचा आपल्या सर्वांनाच आनंद आहे. भविष्यात तुम्ही आणखी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्‍या सुटकेची आशा ठेवू शकता. लवकरच येशू खोट्या धर्माचा आणि दुष्ट राजकीय शक्‍तींचा नाश करेल. त्या विनाशातून यहोवाची उपासना करणारा “मोठा लोकसमुदाय” वाचेल. मग यहोवा या लोकसमुदायाला पृथ्वीवरील नंदनवनात अनेक आशीर्वाद देईल. (प्रकटी. ७:९, १४) लाखो लोकांचं पुनरुत्थान केलं जाईल आणि त्यांनादेखील आदामच्या पापामुळे झालेल्या वाईट परिणामांपासून सुटका मिळवायची संधी दिली जाईल. (प्रे. कार्ये २४:१५) हजार वर्षांच्या शासनकाळात येशू आणि त्याचे सहराजे मानवजातीला शारीरिक आणि आध्यात्मिक रीत्या परिपूर्ण बनण्यासाठी मदत करतील. हा हजार वर्षांचा काळ देवाचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी असेल, आणि हा इस्राएलमध्ये असलेल्या सुटकेच्या वर्षासारखाच असेल. या काळाच्या शेवटी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणारे लोक परिपूर्ण बनतील आणि पापापासून पूर्णपणे मुक्‍त होतील. टेहळणी बुरूज१९.१२ १२-१३ ¶१४-१६

गुरुवार, १६ सप्टेंबर

बर्णबा त्याला मदत करण्यासाठी पुढे आला.—प्रे. कार्ये ९:२७.

पहिल्या शतकात योसेफ (बर्णबा) नावाच्या उदार व्यक्‍तीने स्वतःला यहोवाच्या सेवेत उपलब्ध करून दिलं. (प्रे. कार्ये ४:३६, ३७) शौल ख्रिस्ती बनल्यानंतरही बरेच बांधव त्याला घाबरायचे कारण त्याने आधी ख्रिस्ती मंडळ्यांचा छळ केला होता. पण बर्णबाने शौलचं सांत्वन केलं आणि त्याला मदत केली. (प्रे. कार्ये ९:२१, २६-२८) याच्या काही काळानंतर, यरुशलेमच्या वडिलांना दूरवर असलेल्या सूरियातल्या अंत्युखियात राहणाऱ्‍या बांधवांना प्रोत्साहन देण्याची गरज भासली. मग यासाठी त्यांनी कोणाला पाठवलं? त्यांनी इतर कोणाला नाही तर बर्णबाला पाठवलं आणि बांधवांची ही निवड योग्यच होती. आपल्याला माहीत आहे की बर्णबाने “त्या सर्वांना दृढनिश्‍चयाने प्रभूला जडून राहण्याचे प्रोत्साहन दिले.” (प्रे. कार्ये ११:२२-२४) तेव्हासारखंच आजही यहोवा आपल्याला आपल्या भाऊबहिणींसाठी “सांत्वनाचा पुत्र” बनायला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या प्रिय व्यक्‍तीला ज्यांनी मृत्यूत गमावलं आहे त्यांना मदत करायला यहोवा आपला उपयोग करू शकतो. किंवा आजारी अथवा निराश झालेल्या व्यक्‍तीला भेटून किंवा त्यांना फोन करून प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी तो आपल्याला प्रेरित करू शकतो. बर्णबासारखंच तुम्हीही यहोवाला तुमचा उपयोग करू द्याल का?—१ थेस्सलनी. ५:१४. टेहळणी बुरूज१९.१० २२ ¶८

शुक्रवार, १७ सप्टेंबर

जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात.—नीति. १७:९.

आपण आपल्या मित्रांसोबत काम करतो, तेव्हा कधीकधी आपल्याला फक्‍त त्यांचे चांगले गुणच दिसत नाहीत, तर त्यांच्या कमतरताही दिसतात. या आव्हानावर मात करण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करू शकते? खरं पाहता, आपण आपल्या भाऊबहिणींकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू शकत नाही. म्हणून आपली त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाल्यावर आपण ती मैत्री टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आपल्या मित्रांनी चुका केल्या तर आपण त्यांना देवाच्या वचनातून स्पष्ट शब्दांत पण प्रेमळपणे सल्ला देऊ शकतो. (स्तो. १४१:५) आणि जर त्यांनी आपलं मन दुखावलं तर आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. एकदा का आपण त्यांना माफ केलं तर भविष्यात तो विषय त्यांच्याकडे किंवा इतरांकडे पुन्हा काढण्याचा आपण प्रयत्न करू नये. या कठीण काळात आपण आपल्या भाऊबहिणींच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असं केल्यामुळे आपली त्यांच्यासोबत असलेली मैत्री आणखी घनिष्ठ होईल. आणि असं करणं आज महत्त्वाचं आहे कारण मोठ्या संकटादरम्यान आपल्याला आपल्या जवळच्या मित्रांची साथ लागणारच! टेहळणी बुरूज१९.११ ६ ¶१३, १६

शनिवार, १८ सप्टेंबर

सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि . . . मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.—मत्त. २८:१९, २०.

बायबल अभ्यास चालवताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं ध्येय विद्यार्थ्याला येशूने “आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी” पाळायला शिकवणं आणि त्याला शिष्य बनवणं हे आहे. लोकांनी यहोवाची सेवा करण्याची निवड करणं आणि त्याच्या राज्याचं समर्थन करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण त्यांना समजायला मदत करतो. याचा अर्थ, आपण लोकांना प्रोत्साहन देतो की त्यांनी शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू कराव्यात, यहोवाला आपलं जीवन समर्पित करावं आणि बाप्तिस्मा घ्यावा. त्यांनी असं केलं, तर यहोवाचा दिवस आल्यावर त्यांचा बचाव होईल. (१ पेत्र ३:२१) या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला फार कमी वेळ उरला आहे. म्हणून जे लोक बदल करायला तयार नाहीत आणि ज्यांना यहोवाचे सेवक बनायची इच्छा नाही अशांना आपण वेळ देणार नाही आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करत राहणार नाही. (१ करिंथ. ९:२६) कारण आपलं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. उशीर होण्याआधी आपल्याला अशा बऱ्‍याच लोकांना राज्याचा संदेश सांगायचा आहे ज्यांना त्याबद्दल अजून काहीही माहीत नाही. टेहळणी बुरूज१९.१० ११-१२ ¶१४-१५

रविवार, १९ सप्टेंबर

तो धूप परमेश्‍वरासमोर अग्नीवर . . . घालावा.—लेवी. १६:१३.

प्रायश्‍चित्ताच्या दिवशी संपूर्ण इस्राएल राष्ट्र एकत्र यायचं आणि प्राण्यांचं बलिदान अर्पण करायचं. या बलिदानांमुळे इस्राएली लोकांना आठवण व्हायची की त्यांना पापापासून सुटका मिळवण्याची गरज आहे. सर्वात आधी मुख्य याजक जळत्या निखाऱ्‍यांवर पवित्र धूप टाकायचा. यामुळे ती संपूर्ण खोली सुगंधित व्हायची. त्यावरून आपण काय शिकू शकतो? यहोवाचे विश्‍वासू उपासक त्याला ज्या प्रार्थना करतात त्यांची तुलना बायबल, धूपाशी करतं. (स्तो. १४१:२; प्रकटी. ५:८) परमपवित्र स्थानात मुख्य याजक मनात गहिरा आदर बाळगून यहोवासमोर यायचा. त्याच प्रकारे आपण जेव्हा प्रार्थनेत यहोवाशी बोलतो, तेव्हा आपणही मनात गहिरा आदर बाळगला पाहिजे. संपूर्ण विश्‍वाचा निर्माणकर्ता आपल्याला त्याच्याशी बोलायची संधी देतो यासाठी आपण मनापासून कदर बाळगली पाहिजे. एक लहान मूल आपल्या पित्याशी जसं निःसंकोच बोलू शकतं तसंच आपणही यहोवाशी बोलू शकतो. (याको. ४:८) यहोवा आपल्याला त्याचे जवळचे मित्र समजतो. (स्तो. २५:१४) यहोवाने आपल्याला जी संधी दिली आहे ती आपण कधीही गमावू नये; त्याचं मन दुखावेल असं काहीही आपण करू नये. टेहळणी बुरूज१९.११ २०-२१ ¶३-५

सोमवार, २० सप्टेंबर

हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.—स्तो. १०४:२४.

तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी बहुतेक लोक कामाबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगतात? अनेक देशांत लोक आधीच्या तुलनेत आज जास्त मेहनत घेऊन काम करत आहेत आणि कामाला जास्त वेळ देत आहेत. खूप जास्त काम करणारे लोक इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे सहसा विश्रांती घ्यायला, कुटुंबाला वेळ द्यायला किंवा देवाबद्दल शिकून घ्यायला वेळ नसतो. (उप. २:२३) दुसरीकडे पाहता, काही लोकांना काम करायलाच आवडत नाही आणि ते काम न करण्याचे बहाणे शोधतात. (नीति. २६:१३, १४) कामाबद्दल जगाचा दृष्टिकोन असंतुलित आहे. पण यहोवा आणि येशू ख्रिस्त यांचा याबद्दलचा दृष्टिकोन जगापेक्षा कसा वेगळा आहे याकडे लक्ष द्या. यात काहीच शंका नाही की यहोवा देवाला काम करायला आवडतं. येशूने त्याबद्दल म्हटलं: “माझा पिता आतापर्यंत काम करत आहे आणि मीसुद्धा काम करत राहतो.” (योहा. ५:१७) जरा कल्पना करा, यहोवाने असंख्य आत्मिक प्राणी आणि अफाट विश्‍व यांची निर्मिती केली तेव्हा त्याने किती मोठ्या प्रमाणात काम केलं असेल! तसंच, यहोवाने पृथ्वीवर निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीला आपण पाहतो तेव्हादेखील आपल्याला त्याच्या आश्‍चर्यकारक कामाचा पुरावा मिळतो. टेहळणी बुरूज१९.१२ २ ¶१-२

मंगळवार, २१ सप्टेंबर

दावीद हा मला माझ्या मनासारखा मनुष्य मिळाला आहे.—प्रे. कार्ये १३:२२.

पण दावीद यहोवाशी इतकं घनिष्ठ नातं कसं जोडू शकला? सृष्टीचं परीक्षण केल्यामुळे दावीद यहोवाविषयी शिकला. तरुण असताना दावीद बराच वेळ त्याच्या वडिलांच्या मेंढरांची राखण करण्यात घालवायचा. कदाचित तेव्हाच त्याने यहोवाच्या सृष्टीवर मनन करायला सुरू केलं असेल. उदाहरणार्थ, दावीद रात्रीच्या वेळी जेव्हा आकाशातल्या असंख्य ताऱ्‍यांकडे बघायचा तेव्हा त्याला त्या ताऱ्‍यांपलीकडेही काही दिसलं असेल का? नक्कीच. तारे निर्माण करणाऱ्‍या सृष्टिकर्त्याचे सुंदर गुण त्याला दिसले असतील. (स्तो. १९:१, २) तसंच, मानवांची रचना ज्या अद्‌भुत पद्धतीने करण्यात आली त्यावर विचार केल्यामुळे दावीदला यहोवाच्या सृष्टीतून त्याची बुद्धीही दिसून आली. (स्तो. १३९:१४) यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींवर दावीदने मनन केलं तेव्हा त्याला जाणीव झाली की तो यहोवाच्या तुलनेत खूप लहान आहे. (स्तो. १३९:६) आपण यातून कोणता धडा शिकू शकतो? यहोवाने झाडं, फुलं, प्राणी आणि मानव यांची रचना केली आहे. तेव्हा यांवर मनन करण्यासाठी आपण दररोज थोडा वेळ काढला पाहिजे. असं केल्याने प्रत्येक दिवशी आपल्याला यहोवाबद्दल बऱ्‍याच गोष्टी शिकता येतील. (रोम. १:२०) आणि यहोवावरचं आपलं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत जात आहे हेही आपल्याला जाणवेल. टेहळणी बुरूज१९.१२ १९-२० ¶१५-१७

बुधवार, २२ सप्टेंबर

विश्‍वासानेच, मोशेने मोठा झाल्यानंतर स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणवून घेण्यास नकार दिला.—इब्री ११:२४.

मोशेने शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य केलं. मोशे जेव्हा चाळीस वर्षांचा होता तेव्हा त्याने “फारोच्या मुलीचा मुलगा” म्हणवून घेण्यापेक्षा देवाच्या लोकांसोबत राहण्याची निवड केली. मोशेने त्याच्या मोठ्या अधिकाराच्या पदाचा त्याग केला. इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते. त्यांना पाठिंबा दिल्यामुळे फारोला खूप राग येईल हे मोशेला माहीत होतं. फारो हा खूप शक्‍तिशाली राजा होता आणि इजिप्तचे लोक त्याला देव मानायचे. खरंच मोशेचा विश्‍वास भक्कम होता! त्याचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. आणि अशा प्रकारचा भरवसा कायम टिकणाऱ्‍या नात्याचा पाया असतो. (नीति. ३:५) या उदाहरणातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? मोशेप्रमाणेच आपल्यालाही जीवनात काही निर्णय घ्यावे लागतात. जसं की, आपण देवाची उपासना करणार का आणि त्याच्या लोकांसोबत संगती करण्याचा निर्णय घेणार का? देवाची सेवा करण्यासाठी कदाचित आपल्याला त्याग करावे लागतील. तसंच, यहोवाला न ओळखणाऱ्‍या लोकांच्या विरोधाचा सामनाही करावा लागेल. पण आपण आपल्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवला, तर तो आपल्याला साहाय्य करेल अशी खातरी आपण बाळगू शकतो. टेहळणी बुरूज१९.१२ १७ ¶५-६

गुरुवार, २३ सप्टेंबर

परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्‍वास फुंकला.—उत्प. २:७.

आपल्याला जरी मातीपासून बनवलं असलं तरी यहोवा आपल्याला क्षुल्लक लेखत नाही, तर त्या मातीपेक्षा कित्येक पटीने मौल्यवान लेखतो. यहोवा आपल्याला मौल्यवान का लेखतो याची आता आपण काही कारणं पाहू या. त्याने मानवांना अशा प्रकारे निर्माण केलं आहे की आपण त्याचे गुण प्रदर्शित करू शकतो. (उत्प. १:२७) असं करून देवाने पृथ्वीवरच्या इतर सृष्टीपेक्षा आपल्याला श्रेष्ठ बनवलं आहे. तसंच, त्याने पृथ्वीची आणि प्राण्यांची देखरेख करण्याचा अधिकारही आपल्याला दिला आहे. (स्तो. ८:४-८) आदामने पाप केलं तरी यहोवाने मानवांना नेहमीच मौल्यवान लेखलं. इतकं की त्याने आपल्या पापांसाठी त्याच्या प्रिय पुत्राला, येशूला खंडणी म्हणून पृथ्वीवर पाठवलं. (१ योहा. ४:९, १०) यहोवा आदामच्या पापामुळे मरण पावलेल्या “नीतिमान आणि अनीतिमान” लोकांचं येशूच्या खंडणीच्या आधारावर पुनरुत्थान करेल. (प्रे. कार्ये २४:१५) बायबल सांगतं की आपण देवाच्या नजरेत मौल्यवान आहोत. मग आपण आजारी, गरीब किंवा वयोवृद्ध असलो तरीही.—प्रे. कार्ये १०:३४, ३५. टेहळणी बुरूज२०.०१ १५ ¶५-६

शुक्रवार, २४ सप्टेंबर

तुम्ही दुसऱ्‍याच्या कारभारात लुडबुड न . . . करण्याचा नेहमी प्रयत्न करा.—१ थेस्सलनी. ४:११.

एका व्यक्‍तीला स्वर्गातल्या जीवनाची आशा आपल्या कुटुंबाकडून वारशाने मिळत नाही, तर ती देवाकडून मिळते. (१ थेस्सलनी. २:१२) म्हणून आपण त्यांच्या नातेवाइकांना किंवा कुटुंबातल्या लोकांना असे काही प्रश्‍न विचारणार नाही ज्यामुळे त्यांचं मन दुखावेल. जसं की, आपण अभिषिक्‍त बांधवाच्या पत्नीला असं विचारणार नाही की तिला पृथ्वीवर नंदनवनात आपल्या पतीशिवाय राहावं लागेल, त्याबद्दल तिला कसं वाटतं. कारण आपल्याला खातरी आहे की नवीन जगात यहोवा प्रत्येकाची “इच्छा” पूर्ण करेल. (स्तो. १४५:१६) अभिषिक्‍त जनांना जेव्हा आपण इतरांपेक्षा जास्त महत्त्व देत नाही तेव्हा आपण स्वतःचंसुद्धा संरक्षण करत असतो. कारण बायबल म्हणतं की काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चन कदाचित विश्‍वासात टिकून राहणार नाही. (मत्त. २५:१०-१२; २ पेत्र २:२०, २१) आपण “व्यक्‍तिपूजा” करण्याचं टाळलं पाहिजे; म्हणजे लोक ज्या प्रकारे सिनेतारकांना महत्त्व देतात तसं आपण कोणत्याही व्यक्‍तीला खूप जास्त महत्त्व देणार नाही. मग ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चन असोत, खूप वर्षांपासून यहोवाची सेवा करणारे सेवक असोत किंवा असे भाऊबहीण असोत ज्यांना बरेच जण ओळखतात. (यहू. १६, तळटीप) असे लोक पुढे अविश्‍वासू बनले किंवा मंडळी सोडून गेले, तरी आपला यहोवावरचा विश्‍वास कमी होणार नाही किंवा आपण त्याची सेवा करायचं सोडणार नाही. टेहळणी बुरूज२०.०१ २९ ¶९-१०

शनिवार, २५ सप्टेंबर

देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करा.—इफिस. ५:१.

यहोवाची “प्रिय मुले” या नात्याने आपण त्याचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. इतरांशी वागताना आपण प्रेम, दया आणि क्षमाशीलता या त्याच्या गुणांचं अनुकरण करतो. यहोवाबद्दल ज्यांना माहीत नाही ते जेव्हा आपली चांगलं वागणूक पाहतात तेव्हा त्यांना यहोवाबद्दल जाणून घेण्याची प्रेरणा मिळू शकते. (१ पेत्र २:१२) यहोवा ज्या प्रकारे आपल्यासोबत वागतो त्या प्रकारे ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांसोबत वागलं पाहिजे. आईवडील जेव्हा यहोवाचं अनुकरण करतात तेव्हा मुलांनाही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडावसं वाटेल. आपल्याला आपला स्वर्गीय पिता यहोवा, याच्याबद्दल अभिमान वाटतो आणि इतरांना त्याच्याबद्दल कळावं अशी आपली इच्छा आहे. आपल्याही भावना दावीद राजासारख्याच आहेत. त्याने म्हटलं: “प्रभुविषयीचाच अभिमान माझ्या मनी वसेल.” (स्तो. ३४:२, मराठी कॉमन लॅंग्वेज) पण आपला स्वभाव लाजाळू असेल आणि आपण यहोवाबद्दल इतरांना सांगायला कचरत असू तर काय? आपण धाडसी कसं बनू शकतो? खरंतर, आपण इतरांना यहोवाबद्दल सांगतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो आणि यामुळे इतरांना फायदाही होतो. या गोष्टींवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला धाडसाने यहोवाबद्दल इतरांना सांगण्याची प्रेरणा मिळते. आपण खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्याला लागणारं धैर्य नक्कीच देईल. त्याने पहिल्या शतकातल्या बांधवांना धैर्यवान व्हायला मदत केली, त्याच प्रकारे तो आज आपल्यालाही मदत करेल.—१ थेस्सलनी. २:२. टेहळणी बुरूज२०.०२ ११ ¶१२-१३

रविवार, २६ सप्टेंबर

जा आणि . . . शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या.—मत्त. २८:१९.

बायबलचा अभ्यास करणारे अनेक लोक प्रगती करून बाप्तिस्मा घेतात. पण नियमितपणे बायबल अभ्यास करत असलेले काही बायबल विद्यार्थी शिष्य बनायला कचरतात. त्यांना बायबल अभ्यास करायला आवडतं पण ते बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करत नाहीत. आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनात लागू कराव्यात आणि ख्रिस्ताचं शिष्य बनावं असं आपल्याला मनापासून वाटतं आणि म्हणून आपण त्यांना मदतही करतो. यहोवाची इच्छा आहे की लोकांनी त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याची सेवा करावी. म्हणून आपला उद्देश आपल्या बायबल विद्यार्थ्यांना हे समजायला मदत करणं आहे की यहोवाचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तो प्रत्येक व्यक्‍तीची काळजी करतो. बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाला ‘अनाथांचा पिता आणि विधवांची काळजी घेणारा’ समजावं म्हणून आपण त्यांना मदत करतो. (स्तो. ६८:५) त्यांना जेव्हा जाणीव होईल की देवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे तेव्हा तेही त्याच्यावर प्रेम करू लागतील. म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांना हे समजायला मदत करा की त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी आपल्या प्रेमळ पित्याची इच्छा आहे. आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तो त्यांना मदत करायला तयार आहे हेही त्यांना समजवा. टेहळणी बुरूज२०.०१ ३ ¶७-८

सोमवार, २७ सप्टेंबर

तू दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा मी ऐकले, तेव्हा मला खूप आनंद झाला.—फिले. ७.

प्रेषित पौल नम्र असल्यामुळे त्याला जाणीव होती की त्याला मदतीची गरज आहे. म्हणून त्याने त्याच्या मित्रांकडून मदत घेतली आणि त्याला प्रोत्साहन मिळालं. समस्येत असताना तो अशी चिंता करत बसला नाही की इतर जण त्याला कमजोर समजतील. (कलस्सै. ४:७-११) आपल्याला मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज आहे हे जेव्हा आपण मान्य करतो, तेव्हा आपले भाऊबहीण आनंदाने आपली मदत करतील. पौलला माहीत होतं की शास्त्रवचनांतून त्याला सांत्वन मिळेल. (रोम. १५:४) तसंच, कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी त्याला त्यांतून योग्य मार्गदर्शन मिळेल हेही त्याला माहीत होतं. (२ तीम. ३:१५, १६) रोममध्ये पौलला जेव्हा दुसऱ्‍यांदा कैद करण्यात आलं तेव्हा त्याला वाटलं की त्याचा मृत्यू आता जवळ आला आहे. त्याने लगेच तीमथ्यला बोलावून घेतलं आणि सोबत “गुंडाळ्या” आणायला सांगितल्या. (२ तीम. ४:६, ७, ९, १३) असं का? कारण वैयक्‍तिक अभ्यासासाठी पौलला त्यांचा उपयोग होणार होता. या गुंडाळ्या हिब्रू शास्त्रवचनांचा भाग असाव्यात. आपण पौलचं अनुकरण करून नियमितपणे बायबलचा अभ्यास केला पाहिजे. मग कोणत्याही परीक्षेचा सामना करावा लागला तरी यहोवा त्याच्या वचनांद्वारे आपल्याला दिलासा देईल. टेहळणी बुरूज२०.०२ २३-२४ ¶१४-१५

मंगळवार, २८ सप्टेंबर

तुमचे दोष काढले जाऊ नयेत म्हणून इतरांचे दोष काढण्याचं सोडून द्या.—मत्त. ७:१.

अलीफज, बिल्दद आणि सोफर या तिघांनी ईयोबला कशी मदत करता येईल याबद्दल जराही विचार केला नव्हता. उलट, ईयोबने काहीतरी चुकीचं केलं आहे हे कसं सिद्ध करता येईल याचाच ते विचार करत होते. ते ज्या गोष्टी बोलले त्यांपैकी काही गोष्टी खऱ्‍या होत्या. पण ईयोबबद्दल आणि यहोवाबद्दल ते जे काही बोलले त्यापैकी बहुतेक गोष्टी क्रूर आणि खोट्या होत्या. ईयोब खूप वाईट माणूस आहे असा आरोप त्यांनी लावला. (ईयो. ३२:१-३) हे पाहून यहोवाने काय केलं? त्याला त्या तिघांचा खूप राग आला. यहोवाने त्या तिघांना मूर्ख म्हटलं आणि सांगितलं की त्यांनी ईयोबला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगावी. (ईयो. ४२:७-९) अलीफज, बिल्दद आणि सोफर यांच्या वाईट उदाहरणावरून आपण बऱ्‍याच गोष्टी शिकतो. पहिली गोष्ट म्हणजे, आपण कधीही आपल्या भाऊबहिणींना दोषी ठरवू नये. (मत्त. ७:२-५) त्याऐवजी, काहीही बोलण्याआधी आपण त्यांचं नीट ऐकून घेतलं पाहिजे. तरच आपल्याला त्यांची परिस्थिती नीट समजून घेता येईल. (१ पेत्र ३:८) दुसरी गोष्ट, आपलं बोलणं प्रेमळ आणि खरं असलं पाहिजे. (इफिस. ४:२५) आणि तिसरी गोष्ट, आपण एकमेकांशी जे काही बोलतो त्याकडे यहोवा बारकाईने लक्ष देतो. टेहळणी बुरूज२०.०३ २२-२३ ¶१५-१६

बुधवार, २९ सप्टेंबर

प्रत्येक प्रसंगी . . . प्रार्थना . . . करत राहा.—इफिस. ६:१८.

आपण इतरांना यहोवाबद्दल शिकवत असतो तेव्हा सहसा आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. उदाहरणार्थ, यहोवा आपल्याला योग्य मनोवृत्ती असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतो, तेव्हा यहोवाची लोकांप्रती असलेली दया आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. (योहा. ६:४४; प्रे. कार्ये १३:४८) बायबल विद्यार्थी त्यांच्या वाईट सवयी सोडतात आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करतात तेव्हा आपल्याला देवाच्या वचनात किती शक्‍ती आहे हे दिसून येतं. (कलस्सै. ३:९, १०) तसंच, लोकांना देवाबद्दल शिकता यावं आणि त्यांचा जीव वाचावा यासाठी यहोवा आपल्याला त्यांच्याकडे पुष्कळ वेळा पाठवतो. यावरून यहोवा त्यांच्याप्रती किती धीर दाखवत आहे याचा आपल्याला पुरावा मिळतो. (रोम. १०:१३-१५) आपण जरी बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असू, पण तरी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीला आपण गृहीत न धरता नेहमी मौल्यवान लेखलं पाहिजे. यहोवासोबत असलेल्या मैत्रीची कदर करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याला प्रार्थना करणं. मैत्री घनिष्ठ होण्यासाठी आपसात चांगलं संभाषण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रार्थना करून देवाशी एक जवळचं नातं जोडा आणि आपल्या मनातल्या भावना त्याला सांगायला कचरू नका. टेहळणी बुरूज१९.१२ १९ ¶११, १३-१४

गुरुवार, ३० सप्टेंबर

तुमच्या पापांची क्षमा केली आहे.—१ योहा. २:१२.

या गोष्टीवर विचार केल्याने खरंच खूप सांत्वन मिळतं. येशू देवाच्या राज्याचा राजा या नात्याने सैतान आणि त्याच्या व्यवस्थेमुळे झालेलं नुकसान भरून काढेल. (यश. ६५:१७; १ योहा. ३:८; प्रकटी. २१:३, ४) खरंच, यामुळे आपल्याला एक सुंदर आशा मिळते. येशूने सोपवलेलं काम जरी कठीण असलं, तरी तो आपल्यासोबत आहे आणि या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटापर्यंत तो आपल्याला मदत करत राहील. (मत्त. २८:१९, २०) यामुळे आपल्याला खूप धैर्य मिळतं. सांत्वन, आशा आणि धैर्य या गोष्टी मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कठीण परीक्षा येतात तेव्हा आपण मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकतो? यासाठी येशूने ज्या गोष्टी केल्या त्या आपण केल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, परिस्थिती कशीही असो नेहमी प्रार्थना करत राहा. दुसरी गोष्ट, कठीण वाटत असलं तरी यहोवाच्या आज्ञांचं पालन करा आणि आवेशाने प्रचार करत राहा. तिसरी गोष्ट, परीक्षेचा सामना करत असताना आपल्या मित्रांची मदत स्वीकारा. या गोष्टी केल्याने देवाची शांती तुमच्या मनाचे रक्षण करेल. (फिलिप्पै. ४:६, ७) आणि तुम्हीसुद्धा कुठल्याही परीक्षेत येशूप्रमाणे विजयी ठराल!—योहा. १६:३३. टेहळणी बुरूज१९.०४ १३ ¶१६-१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा