ऑगस्ट
रविवार, १ ऑगस्ट
ज्याने मला पाठवलं तो माझ्यासोबत आहे; त्याने मला एकटं सोडलं नाही.—योहा. ८:२९.
येशूचा छळ झाला तेव्हाही त्याचं मन शांत होतं, कारण त्याला माहीत होतं की तो यहोवाचं मन आनंदित करत आहे. यहोवाची आज्ञा पाळणं कठीण वाटत असलं तरी तो आज्ञाधारक राहिला. त्याचं आपल्या पित्यावर प्रेम होतं आणि त्याने जीवनात यहोवाच्या सेवेला सर्वात जास्त महत्त्व दिलं. पृथ्वीवर येण्याआधी तो देवासोबत “कुशल कारागीर” म्हणून काम करत होता. (नीति. ८:३०) आणि पृथ्वीवर असताना त्याने आवेशाने इतरांना आपल्या पित्याबद्दल शिकवलं. (मत्त. ६:९; योहा. ५:१७) हे कार्य केल्यामुळे येशूला खूप आनंद झाला. (योहा. ४:३४-३६) यहोवाची आज्ञा पालन केल्याने आणि “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” राहिल्याने आपण येशूचं अनुकरण करतो. (१ करिंथ. १५:५८) आपण जेव्हा प्रचारकार्यात “स्वतःला पूर्णपणे वाहून” घेतो तेव्हा समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण नकारात्मक विचार करत नाही. (प्रे. कार्ये १८:५) उदाहरणार्थ, सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांच्या जीवनात आपल्यापेक्षाही मोठ्या समस्या असतात. ते यहोवावर प्रेम करायला शिकतात आणि त्याचे सल्ले लागू करतात तेव्हा त्यांचं जीवन सुधारतं आणि ते आनंदी बनतात. हे जेव्हा आपण प्रत्येक वेळी पाहतो तेव्हा आपल्याला पक्की खात्री पटते की यहोवाला आपली काळजी आहे. टेहळणी बुरूज१९.०४ १०-११ ¶८-९
सोमवार, २ ऑगस्ट
जादूटोणा करणाऱ्या पुष्कळ लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांसमोर जाळून टाकली.—प्रे. कार्ये १९:१९.
या लोकांनी भूतविद्येचा प्रतिकार करण्यासाठी शक्य ते केलं. त्यांच्या पुस्तकांची किंमत खूप जास्त होती. पण तरी ती पुस्तकं दुसऱ्या कोणाला देण्याचा किंवा विकण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. तर त्यांनी ती पुस्तकं नष्ट केली. त्यांच्या नजरेत यहोवाचं मन आनंदित करण्याचं मोल, हे त्या पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त होतं. पहिल्या शतकातील या ख्रिश्चनांचं आपण कसं अनुकरण करू शकतो? जादूटोण्याशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्याकडे असेल तर आपण ती नष्ट केली पाहिजे. यात गंडेदोरे, ताईत किंवा इतर वस्तू सामील असू शकतात. सहसा लोक दुष्टात्म्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अशा गोष्टी घालतात किंवा त्या घरात ठेवतात. (१ करिंथ. १०:२१) तुम्ही करत असलेल्या मनोरंजनाचं काळजीपूर्वक परीक्षण करा. स्वतःला पुढील प्रश्न विचारा: ‘मी जे मनोरंजन करतो त्याचा भूतविद्येशी संबंध आहे का?’ मनोरंजनाची निवड करताना यहोवाला ज्या गोष्टीची घृणा वाटते अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याचा पक्का निर्धार करा. देवासमोर “शुद्ध विवेक राखण्याचा” आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.—प्रे. कार्ये २४:१६. टेहळणी बुरूज१९.०४ २२-२३ ¶१०-१२
मंगळवार, ३ ऑगस्ट
त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे.—याको. ५:१४.
मंडळीतल्या वडिलांना जेव्हा कळतं की एखाद्याने गंभीर पाप केलं आहे तेव्हा त्यांना काळजीपूर्वक विचार करावा लागतो. देवाच्या नावावर कोणत्याही प्रकारचा कलंक लागू नये ही वडिलांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते. (लेवी. २२:३१, ३२; मत्त. ६:९) यासोबतच बंधुभगिनींच्या आध्यात्मिकतेचीही त्यांना खूप काळजी असते. ज्या बंधुभगिनींवर अत्याचार झाला आहे अशांना मदत करायची त्यांची मनापासून इच्छा असते. यासोबतच गंभीर पाप करणारा मंडळीतला असेल, तर यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध पुन्हा जोडण्यासाठीही वडील त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात यासाठी त्या व्यक्तीने आधी मनापासून पश्चात्ताप दाखवणं खूप गरजेचं आहे. (याको. ५:१४, १५) आपल्या चुकीच्या इच्छांना बळी पडून गंभीर पाप करणारा ख्रिस्ती आध्यात्मिक रीत्या आजारी असतो. म्हणजेच यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध आता कमकुवत झालेला असतो. वडिलांची तुलना आपण एका डॉक्टरसोबत करू शकतो. वडील “आजारी” व्यक्तीला म्हणजेच ज्या व्यक्तीने पाप केलं आहे तिला आध्यात्मिक रीत्या बरं करण्याचा प्रयत्न करतात. बायबलमधून दिलेल्या ताडनेमुळे तिला यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध पुन्हा सुधारण्यास मदत मिळते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती घडलेल्या पापाबद्दल मनापासून पश्चात्ताप दाखवते.—प्रे. कार्ये ३:१९; २ करिंथ. २:५-१०. टेहळणी बुरूज१९.०५ १० ¶१०-११
बुधवार, ४ ऑगस्ट
देव स्वतः तुम्हाला उत्साहित करतो आणि तुम्ही . . . कार्य करावे म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करण्याची ताकदही देतो.—फिलिप्पै. २:१३.
यहोवा आपल्याला कार्य करण्याची इच्छा देऊ शकतो. आपल्याला कदाचित जाणवेल की मंडळीत किंवा मंडळीच्या बाहेर एखादं काम पूर्ण करायला मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो, की ‘मदत करण्यासाठी मी काय करू शकतो?’ किंवा आपल्याला एखादी कठीण नेमणूक मिळाली असेल आणि आपल्या मनात शंका येईल की आपण ती नीट पूर्ण करू का? अथवा बायबलचा काही भाग वाचल्यानंतर आपल्या मनात विचार येऊ शकतो की ‘इतरांना मदत करण्याबाबतीत ही वचनं मी कशी लागू करू शकतो?’ जेव्हा यहोवा पाहतो की आपण इतरांना मदत करण्याचा विचार करत आहोत तेव्हा तो आपल्याला कार्य करण्याची इच्छा देऊ शकतो आणि ती पूर्ण करायला मदतही करू शकतो. यहोवा आपल्याला कार्य करण्याची ताकदही देऊ शकतो. (यश. ४०:२९) आपल्याकडे जी कौशल्यं आहेत त्यात आणखी निपुण बनण्यासाठी यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊ शकतो. (निर्ग. ३५:३०-३५) एखादं काम कसं करावं हे यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला शिकवू शकतो. एखादी नेमणूक कशी पूर्ण करावी याबद्दल जर मनात शंका असेल तर मदत मागायला कचरू नका. तसंच, आपल्या उदार पित्याजवळ “असाधारण सामर्थ्य” मागण्यासाठीही मनात संकोच बाळगू नका.—२ करिंथ. ४:७; लूक ११:१३. टेहळणी बुरूज१९.१० २१ ¶३-४
गुरुवार, ५ ऑगस्ट
लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे [असतील].—२ तीम. ३:२.
हे जग स्वार्थी मनोवृत्तीला बढावा देतं याचं आपल्याला जरादेखील आश्चर्य होत नाही. एका संदर्भात म्हटलं आहे की १९७० च्या दशकात “यशस्वी जीवन कसं जगता येईल याविषयावर असलेली पुस्तकं मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागली.” काही पुस्तकांमध्ये म्हटलं होतं की “तुम्ही स्वतःला बदलण्याची किंवा तुमच्यात काही उणीवा आहेत असा विचार करण्याची गरज नाही.” उदाहरणार्थ, त्यांपैकी एका पुस्तकात असं म्हटलं होतं, की “स्वतःवर प्रेम करा कारण फक्त तुम्हीच जगातली सर्वात सुंदर, रोमांचक आणि मौल्यवान व्यक्ती आहात.” या पुस्तकात, एका व्यक्तीने कसं वागावं हे तिने स्वतः ठरवलं पाहिजे आणि तिला जे योग्य व सोयीस्कर वाटतं तेच तिने केलं पाहिजे असंदेखील म्हटलं होतं. अशी वाक्य तुम्हाला ऐकल्यासारखी वाटतात का? सैतानाने हव्वाला असंच काहीतरी करायला प्रवृत्त केलं होतं. ती ‘देवासारखी बरेवाईट जाणणारी’ बनू शकते असं त्याने म्हटलं. (उत्प. ३:५) आज बऱ्याच लोकांना वाटतं की ते त्यांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहेत आणि बरोबर काय व चूक काय याबद्दल त्यांना कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही; अगदी देवाचीसुद्धा नाही. जसं की, आज लग्नाबद्दल असलेला लोकांचा दृष्टिकोन. टेहळणी बुरूज१९.०५ २३ ¶१०-११
शुक्रवार, ६ ऑगस्ट
मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो.—स्तो. ३८:६.
काही प्रसंगांमध्ये दावीद राजाला तीव्र तणावाचा सामना करावा लागला. त्याला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं याचा विचार करा. त्याने केलेल्या चुकांमुळे त्याच्या मनात दोषीपणाची भावना होती. (स्तो. ४०:१२) त्याचा प्रिय मुलगा अबशालोम याने त्याच्याविरुद्ध बंड केलं आणि यामुळे नंतर अबशालोमचा मृत्यू झाला. (२ शमु. १५:१३, १४; १८:३३) दावीदच्या एका खूप जवळच्या मित्राने त्याचा विश्वासघात केला. (२ शमु. १६:२३–१७:२; स्तो. ५५:१२-१४) दावीदने रचलेल्या बऱ्याच स्तोत्रांमध्ये आपल्याला त्याच्या मनातल्या निराशेच्या भावना दिसून येतात. पण यासोबतच त्याचा यहोवावर असलेला खंबीर विश्वासही आपल्याला पाहायला मिळतो. (स्तो. ३८:५-१०; ९४:१७-१९) नंतर, एक स्तोत्रकर्ता दुष्ट लोकांची चांगली जीवनशैली पाहून त्यांचा हेवा करू लागला होता. तो “देवाच्या पवित्रस्थानात” सेवा करायचा आणि तो कदाचित आसाफच्या वंशातला होता. या स्तोत्रकर्त्याला तणावाचा सामना करावा लागला आणि यामुळे तो निरुत्साही व असमाधानी झाला. देवाची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दलही त्याच्या मनात शंका उत्पन्न झाल्या.—स्तो. ७३:२-५, ७, १२-१४, १६, १७, २१. टेहळणी बुरूज१९.०६ १७ ¶१२-१३
शनिवार, ७ ऑगस्ट
आपल्याला त्याचे [सैतानाचे] डावपेच माहीत नाहीत, असे नाही.—२ करिंथ. २:११.
सैतान आपल्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करायला बढावा देतो. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी मदत होईल अशी कौशल्यं शिकण्याची आपली नैसर्गिक इच्छा असते. (१ तीम. ५:८) ही कौशल्यं आपण सहसा शाळेत असताना मन लावून अभ्यास करताना शिकतो. पण आपण सावध असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच देशातल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना फक्त व्यावहारिक ज्ञानच नाही तर त्यासोबत मानवी तत्त्वज्ञानही शिकवलं जातं. विद्यार्थ्यांना देवाच्या अस्तित्वावर शंका घ्यायला आणि बायबलचा अनादर करायला प्रवृत्त केलं जातं. जीवनाची सुरुवात उत्क्रांतीनेच झाली असा सर्व बुद्धिमान लोक विश्वास करतात असं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. (रोम. १:२१-२३) अशी शिकवण ‘देवाच्या बुद्धीच्या’ विरोधात आहे. (१ करिंथ. १:१९-२१; ३:१८-२०) सैतानाचं जग “तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी” यांद्वारे तुम्हाला कैद करणार नाही असा पक्का निर्धार करा. (कलस्सै. २:८) सैतान वापरत असलेल्या कुयुक्त्यांपासून नेहमी स्वतःचं संरक्षण करा. (१ करिंथ. ३:१८) यहोवा कोण आहे आणि तुम्ही त्याची उपासना कशी करावी याबद्दल सैतान आपला दृष्टिकोन बदलू पाहतो, पण त्याला तसं करू देऊ नका. यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जीवन जगा. तसंच, यहोवाच्या मार्गदर्शनांकडे दुर्लक्ष होईल अशा सैतानाच्या कुयुक्त्यांनाही फसू नका. टेहळणी बुरूज१९.०६ ५ ¶१३; ७ ¶१७
रविवार, ८ ऑगस्ट
मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.—मत्त. २८:२०.
तुम्ही कोणताही विषय निवडला तरी तुम्ही ज्या लोकांशी बोलणार आहात त्यांच्याबद्दल विचार करा. बायबल खरंच काय शिकवतं हे जाणून घेतल्यामुळे त्यांना कसा फायदा होऊ शकतो याविषयी कल्पना करा. लोकांशी बोलताना त्यांचं लक्ष देऊन ऐकणं आणि त्यांच्या मताचा आदर करणं महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकाल आणि ते आपला संदेश ऐकतील याची शक्यताही जास्त असेल. एखाद्याचा बायबल अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला कदाचित त्याच्या पुनर्भेटींसाठी वेळ द्यावा लागेल आणि मेहनत करावी लागेल. असं का? कारण आपण पुनर्भेट करू तेव्हा कदाचित घरमालक घरी नसतील किंवा आपल्याशी बोलायला त्यांना वेळ नसेल. तसंच घरमालक बायबल अभ्यास करायला लगेच तयार होणार नाही, यामुळेही आपल्याला बऱ्याच वेळा त्यांची पुनर्भेट घ्यावी लागेल. लक्षात असू द्या, की एका रोपट्याला नियमितपणे पाणी घातलं तर त्याची वाढ लवकर होण्याची शक्यता जास्त असते. त्याच प्रकारे, आपण एका आस्थेवाईक व्यक्तीसोबत नियमितपणे देवाच्या वचनावर चर्चा केली तर यहोवा आणि येशूवर असलेलं त्याचं प्रेम आणखी वाढण्याची शक्यता आहे. टेहळणी बुरूज१९.०७ १४ ¶१; १५-१६ ¶७-८
सोमवार, ९ ऑगस्ट
मनुष्याच्या पुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुम्हाला एकटं पाडतात, तुमचा अपमान करतात आणि दुष्ट म्हणून तुमची बदनामी करतात तेव्हा तुम्ही सुखी आहात.—लूक ६:२२.
येशूला इथे काय म्हणायचं होतं? त्याला असं म्हणायचं नव्हतं, की लोक ख्रिश्चनांचा द्वेष करतात तेव्हा त्यांना ते आवडतं. याऐवजी आपल्याला कशी वागणूक मिळेल याबद्दल तो सांगत होता. येशूसारखंच आपणही या जगाचे भाग नाही. आपण येशूच्या शिकवणींनुसार जीवन जगतो आणि त्याने सांगितलेल्या संदेशाचा प्रचार करतो. यामुळे सर्व लोक आपला द्वेष करतात. (योहा. १५:१८-२१) आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं आहे. यहोवावर प्रेम करत असल्यामुळे लोक जर आपला द्वेष करत असतील, तर मग आपल्याला वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. लोकांना आपण आवडत नसलो तर याचा अर्थ असा मुळीच होत नाही की आपली काहीच किंमत नाही. आपल्याविरुद्ध छळाची लाट कधी उसळेल किंवा आपल्या कामावर पूर्णपणे बंदी कधी घालण्यात येईल हे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही. पण आपण यहोवासोबतचा आपला नातेसंबंध घनिष्ठ करून येणाऱ्या संकटांसाठी आताच तयारी करू शकतो. तसंच, धैर्य विकसित करण्याद्वारे आणि लोकांच्या भीतीवर मात करण्याद्वारेही आपण तयारी करू शकतो. आपण आज जी काही तयारी करू त्यामुळे आपल्याला भविष्यात विश्वासात टिकून राहायला मदत होईल. टेहळणी बुरूज१९.०७ ६ ¶१७-१८; ७ ¶२१
मंगळवार, १० ऑगस्ट
देवाजवळ येणाऱ्याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे.—इब्री ११:६.
आपण देवधर्म न मानणाऱ्या वेगवेगळ्या लोकांसोबत बायबल अभ्यास करतो त्या वेळी देव अस्तित्वात आहे यावर त्यांचा विश्वास वाढत राहिला पाहिजे. तसंच, आपण त्यांना बायबलवर विश्वास वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे. असं करण्यासाठी कदाचित आपल्याला काही मुद्दे वारंवार सांगावे लागतील. अभ्यास घेताना प्रत्येक वेळी आपल्याला बायबल हे देवाचं वचन आहे याच्या पुराव्यांवर चर्चा करावी लागू शकते. यासाठी आपण त्यांना बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांची पूर्णता, वैज्ञानिक व ऐतिहासिक दृष्ट्या असलेली अचूकता किंवा त्यातले सुज्ञ व्यावहारिक सल्लेही दाखवू शकतो. लोक देवधर्म मानणारे असले किंवा नसले, तरी त्यांना ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी मदत करून आपण त्यांच्यावर आपलं प्रेम असल्याचं दाखवत राहिलं पाहिजे. (१ करिंथ. १३:१) देवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपलं त्याच्यावर प्रेम असावं अशी त्याची इच्छा आहे, या गोष्टी लोकांना शिकवणं हे आपलं मुख्य ध्येय आहे. धर्माबद्दल ज्यांना थोडीफार किंवा काहीच आवड नव्हती असे हजारो लोक दर वर्षी देवावर प्रेम करायला शिकल्यामुळे बाप्तिस्मा घेत आहेत. तेव्हा, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा व सर्व लोकांवर प्रेम करा आणि त्यांच्यात वैयक्तिक आस्था घ्या. तसंच, त्यांचं लक्षपूर्वक ऐका आणि त्यांना समजून घ्या. तुमच्या उदाहरणावरून त्यांना ख्रिस्ताचा शिष्य बनायला शिकवा. टेहळणी बुरूज१९.०७ २४ ¶१६-१७
बुधवार, ११ ऑगस्ट
चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका, कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.—इब्री १३:१६.
यरुशलेमची भिंत दुरुस्त करण्यात आली तेव्हा यहोवाने त्या कामात इतर लोकांसोबत शल्लूमच्या मुलींचाही उपयोग केला. (नहे. २:२०; ३:१२) त्यांचे वडील अधिकाराच्या पदावर असले, तरी त्या मुली हे कठीण आणि धोक्याचं काम करायला तयार होत्या. (नहे. ४:१५-१८) आज आपल्या काळातही बऱ्याच बहिणींना स्वेच्छेने एका खास प्रकारची पवित्र सेवा करण्यात आनंद मिळतो. ती सेवा म्हणजे, यहोवाच्या कामासाठी समर्पित केलेल्या इमारतींचं बांधकाम आणि दुरुस्तीचं काम. या बहिणींचं कौशल्य, उत्साह आणि विश्वासूपणा या गोष्टींमुळेच हे काम यशस्वी होऊ शकतं. यहोवाने तबीथा हिला खासकरून विधवांसाठी ‘चांगली कामं आणि दान’ करायला प्रेरित केलं. (प्रे. कार्ये ९:३६) तिने मनापासून उदारता आणि दया दाखवल्यामुळे बऱ्याच जणांनी तिच्या मृत्यूच्या वेळी शोक केला. पण प्रेषित पेत्रने तिचं पुनरुत्थान केलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. (प्रे. कार्ये ९:३९-४१) आपण तबीथाकडून काय शिकतो? तरुण असो वा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष, आपण आपल्या भाऊबहिणींना बऱ्याच व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतो. टेहळणी बुरूज१९.१० २३ ¶११-१२
गुरुवार, १२ ऑगस्ट
कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी, जेणेकरून . . . तुम्ही निर्दोष राहाल आणि इतरांसाठी अडखळण ठरणार नाही.—फिलिप्पै. १:१०.
आपण एखाद्या व्यक्तीसाठी अडखळण कसं ठरू शकतो? पुढे दिलेल्या परिस्थितीची कल्पना करा. एक बायबल विद्यार्थी बऱ्याच मेहनतीने आपल्या दारू पिण्याच्या सवयीवर ताबा मिळवतो. त्याला जाणीव होते की त्याने दारू पिण्याचं पूर्णपणे टाळलं पाहिजे. तो आपल्या जीवनात बदल करतो आणि बाप्तिस्मा घेतो. नंतर एक बांधव त्याला आणि इतर बंधुभगिनींना आपल्या घरी जेवायला बोलवतो. तो त्या बांधवाला दारू पिण्याचा आग्रह करतो. तो म्हणतो: “तुझ्यामध्ये आत्मसंयम असेल तर तुला थोडी घ्यायला काहीच हरकत नाही!” आपण कल्पना करू शकतो की दारू पिण्याच्या सवयीवर ताबा मिळवलेल्या बांधवाने हा चुकीचा सल्ला ऐकला, तर त्याला पुन्हा दारू पिण्याचं व्यसन लागू शकतं. आणि ही खरंच खूप दु:खाची गोष्ट ठरेल. आजच्या वचनात दिलेला सल्ला वेगवेगळ्या मार्गांनी लागू करण्यासाठी ख्रिस्ती सभांमुळे आपल्याला मदत होते. यहोवासाठी कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत हे सभांमधून आपल्याला समजतं. आणि निर्दोष राहण्यासाठी शिकलेल्या गोष्टी कशा लागू करायच्या हेही आपण तिथे शिकतो. याशिवाय, सभांमुळे देवावर आणि आपल्या बांधवांवर असलेलं आपलं प्रेम वाढत जातं. जर देवावर आणि बांधवांवर आपलं मनापासून प्रेम असेल, तर आपण कोणासाठीही अडखळण न ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टेहळणी बुरूज१९.०८ १० ¶९; ११ ¶१३-१४
शुक्रवार, १३ ऑगस्ट
प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे; इतकेच काय, तर प्रेषित म्हणवून घेण्याचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.—१ करिंथ. १५:९.
आपल्याला वाटेल की आत्मविश्वास बाळगणारे आणि आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करणारे लोक गर्विष्ठ असतात, पण हे खरं नाही. (योहा. १:४६, ४७) आपण लाजाळू असलो किंवा नसलो तरी आपल्या सगळ्यांनाच नम्रता विकसित करण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. प्रेषित पौलच्या उदाहरणाचा विचार करा. एका नंतर एक बऱ्याच शहरांमध्ये नवीन मंडळ्या सुरू करण्यासाठी यहोवाने प्रेषित पौलचा मोठ्या प्रमाणात वापर केला. येशूच्या इतर प्रेषितांच्या तुलनेत त्याने जास्त शहरांमध्ये जाऊन प्रचार केला असावा. पण असं असलं तरी त्याने इतर बांधवांपेक्षा स्वतःला जास्त महत्त्व दिलं नाही. पौलने प्रामाणिकपणे मान्य केलं की त्याचं यहोवासोबत असलेलं चांगलं नातं, हे त्याच्या गुणांमुळे किंवा सेवेत साध्य केलेल्या गोष्टींमुळे नाही तर यहोवाच्या अपार कृपेमुळे आहे. (१ करिंथ. १५:१०) नम्रतेच्या बाबतीत पौलचं आपल्यासमोर खरंच किती चांगलं उदाहरण आहे! करिंथ मंडळीतले काही जण स्वतःला पौलपेक्षा श्रेष्ठ समजत होते, पण असं असूनसुद्धा पौलने त्या मंडळीला पत्र लिहिलं तेव्हा त्याने स्वतःबद्दल बढाई मारली नाही.—२ करिंथ. १०:१०. टेहळणी बुरूज१९.०९ ३ ¶५-६
शनिवार, १४ ऑगस्ट
तर मग, आपल्याला आध्यात्मिक जीवन देणाऱ्या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिले पाहिजे?—इब्री १२:९.
यहोवाच्या अधीन राहायला कठीण वाटण्याचं एक कारण म्हणजे आपण अपरिपूर्ण आहोत आणि वारशाने आपल्याला पाप मिळालं आहे. यामुळे आपल्यात बंडखोर वृत्ती आहे. आदाम आणि हव्वा यांनी देवाविरुद्ध बंड केलं, मनाई केलेलं फळ खाल्लं आणि स्वतःसाठी चांगल्या-वाइटाचे स्तर ठरवले. (उत्प. ३:२२) आज जगात पाहिलं तर बरेच लोक यहोवाला नाकारतात आणि आदाम-हव्वासारखं चांगलं काय आणि वाईट काय हे स्वतः ठरवतात. यहोवाला जाणणाऱ्या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनाही, पूर्णपणे त्याच्या अधीन राहणं कठीण वाटू शकतं. प्रेषित पौललाही हा अनुभव आला. (रोम. ७:२१-२३) पौलप्रमाणे आपल्याला यहोवाच्या नजरेत जे चांगलं ते करण्याची इच्छा आहे. पण यासाठी आपल्याला वाईट करण्याच्या आपल्या इच्छेला सतत लढा देत राहायला हवं. आपण ज्या संस्कृतीत आणि लोकांमध्ये लहानाचे मोठे झालो आहोत त्यांचा आपल्या विचारांवर प्रभाव असतो. या कारणामुळेही आपल्याला यहोवाच्या अधीन राहणं कठीण वाटू शकतं. बरेच मानवी विचार यहोवाच्या इच्छेविरुद्ध आहेत. आणि सहसा लोक जसा विचार करतात तशा विचारांच्या विरुद्ध विचार करण्यासाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागू शकतो. टेहळणी बुरूज१९.०९ १५ ¶४-६
रविवार, १५ ऑगस्ट
जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांना दे, . . . आणि ये, माझा शिष्य हो.—मार्क १०:२१.
आपल्याकडे असलेली शक्ती मर्यादित आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टींसाठी आपली शक्ती वापरतो याबद्दल आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, धनसंपत्ती मिळवण्यासाठी कदाचित आपण आपली बरीचशी शक्ती घालवत असू. येशूने याबाबतीत एका तरुण श्रीमंत माणसाला काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्या श्रीमंत माणसाने येशूला विचारलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?” तो एक चांगला माणूस होता. असं का म्हणता येईल? कारण मार्कच्या शुभवर्तमानात त्याच्याबद्दल असा विशिष्ट उल्लेख करण्यात आला आहे की येशूने “प्रेमाने त्याच्याकडे पाहिले”. येशूने त्या तरुण अधिकाऱ्याला आजच्या वचनात असलेलं निमंत्रण दिलं. ते ऐकून तो माणूस खूप दुःखी झाला. असं दिसून येतं की एकीकडे त्या माणसाला येशूचा शिष्य बनण्याची इच्छा होती पण दुसरीकडे त्याला त्याची “बरीच मालमत्ता” सोडून द्यायची इच्छा नव्हती. (मार्क १०:१७-२२) यामुळे त्याने येशूचं जू स्वीकारलं नाही आणि तो त्याच्याजवळ असलेल्या “धनाची” गुलामी करत राहिला. (मत्त. ६:२४) तुम्ही अशा परिस्थितीत असता तर तुम्ही कोणती निवड केली असती? आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो त्याचं वेळोवेळी परीक्षण करणं गरजेचं आहे. असं का? आपण आपल्या शक्तीचा वापर सुज्ञपणे करत आहोत, याची खातरी करून घेण्यासाठी. टेहळणी बुरूज१९.०९ २४ ¶१७-१८
सोमवार, १६ ऑगस्ट
सर्व राष्ट्रांत आधी राज्याविषयीच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाणं गरजेचं आहे.—मार्क १३:१०.
प्रचाराचं कार्य आता पूर्ण झालं आहे असं जोपर्यंत यहोवा म्हणत नाही, तोपर्यंत आपण प्रचार करत राहिला पाहिजे. यहोवा देवाला आणि येशू ख्रिस्ताला जाणून घेण्यासाठी लोकांकडे आज किती वेळ उरला आहे? (योहा. १७:३) हे आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे पक्कं माहीत आहे, की मोठं संकट सुरू होईपर्यंत “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असणाऱ्या प्रत्येकाकडे आनंदाचा संदेश स्वीकारण्याची आणि यहोवाची सेवा करण्याची संधी आहे. (प्रे. कार्ये १३:४८) वेळ निघून जायच्या आत आपण या लोकांना कशी मदत करू शकतो? लोकांना सत्य शिकवण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, त्या सर्व यहोवा आपल्याला त्याच्या संघटनेद्वारे पुरवतो. जसं की, प्रत्येक आठवडी आपल्याला आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेत प्रशिक्षण दिलं जातं. पहिल्या भेटीत आणि पुनर्भेटीत आपण काय बोलावं हे आपल्याला या सभेमुळे शिकायला मिळतं. आणि संदेशात आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या चांगल्या चर्चेनंतर तुम्ही तिला एखादी पत्रिका किंवा नियतकालिक दिलं, तर तिच्याशी पुन्हा भेट होईपर्यंत तिला त्यातून आणखी माहिती मिळवता येईल. प्रत्येक महिन्यादरम्यान राज्याचा प्रचार जास्तीत जास्त करण्यात व्यस्त राहणं, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. टेहळणी बुरूज१९.१० ९ ¶७; १० ¶९-१०
मंगळवार, १७ ऑगस्ट
चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका, कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.—इब्री १३:१६.
यहोवाने यरुशलेममध्ये राहणाऱ्या शिमोन नावाच्या विश्वासू वृद्ध माणसाला सांगितलं की मसीहाला पाहण्याआधी त्याचा मृत्यू होणार नाही. या अभिवचनामुळे शिमोनला नक्कीच दिलासा मिळाला असेल कारण तो बऱ्याच वर्षांपासून मसीहाची वाट पाहत होता. यहोवाने शिमोनला त्याच्या विश्वासाचं आणि धीराचं प्रतिफळ दिलं. एक दिवस देवाच्या “पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो मंदिरात आला” आणि तिथे त्याने बाळ येशूला पाहिलं. ते बाळ पुढे जाऊन ख्रिस्त बनेल अशी भविष्यवाणी करण्यासाठी यहोवाने शिमोनचा उपयोग केला. (लूक २:२५-३५) हे खरं आहे, की येशूने त्याचं सेवाकार्य सुरू केलं तोपर्यंत शिमोन कदाचित जगू शकला नाही, पण तो या गोष्टीसाठी कृतज्ञ होता की यहोवाने त्याचा उपयोग केला. आणि भविष्यातही त्याला भरपूर आशीर्वाद मिळतील. नवीन जगात शिमोन बघू शकेल की येशूच्या राज्यामुळे लोकांना किती फायदा झाला आहे! (उत्प. २२:१८) यहोवा आपलाही उपयोग करून घेतो यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत! टेहळणी बुरूज१९.१० २२ ¶७; २३ ¶१२
बुधवार, १८ ऑगस्ट
सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.—नीति. ४:२३.
आपल्याकडे जास्त पैसे असो किंवा कमी, आपण आपल्या मनाचं रक्षण केलं पाहिजे. हे आपण कसं करू शकतो? भौतिक गोष्टींबद्दल प्रेम विकसित न करण्याद्वारे. यहोवाच्या सेवेपेक्षा तुमच्या नोकरीला किंवा कामाला महत्त्वाचं स्थान देऊ नका. तुमच्या बाबतीत हे घडत आहे हे तुम्हाला कसं कळू शकतं? स्वतःला पुढे दिलेले प्रश्न विचारा: ‘मी सभांमध्ये किंवा प्रचारात असताना सतत माझ्या कामाबद्दल विचार करतो का? भविष्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे असावेत या विचारामुळे मी सतत चिंता करत बसतो का? पैसा आणि भौतिक गोष्टींमुळे माझ्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होत आहेत का? यहोवाची सेवा जास्तीत जास्त करण्यासाठी मी कमी दर्जाचं समजलं जाणारं काम करायला तयार आहे का?’ (१ तीम. ६:९-१२) या प्रश्नांवर विचार करत असताना हे लक्षात असू द्या की यहोवा तुमच्यावर प्रेम करतो आणि जे फक्त त्याचीच उपासना करतात त्यांना तो पुढे दिलेलं अभिवचन देतो: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” आणि म्हणूनच प्रेषित पौलने म्हटलं, की “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा.”—इब्री १३:५, ६. टेहळणी बुरूज१९.१० २९ ¶१०
गुरुवार, १९ ऑगस्ट
तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो.—नीति. २७:१७.
आपण भाऊबहिणींसोबत काम करतो तेव्हा आपल्यालाही त्यांच्यातले चांगले गुण पाहण्याची संधी मिळते. यामुळे आपण त्यांना चांगल्या प्रकारे ओळखू लागतो आणि त्यांच्याशी आपल्याला एक घनिष्ठ नातं जोडायला मदत होते. उदाहरणार्थ, प्रचारात असताना तुम्ही तुमच्या मित्राला आपल्या विश्वासाबद्दल धैर्याने तर्क करताना पाहता किंवा यहोवा व त्याच्या उद्देशाबद्दल मनापासून बोलताना पाहता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच तुमचा मित्र आणखी प्रिय वाटू लागतो. २३ वर्षांची ॲडलीन हिने तिच्या एका मैत्रिणीला, कॅन्डीसला अशा क्षेत्रात सोबत प्रचारकार्य करायला विचारलं जिथे प्रचाराचं जास्त काम झालं नव्हतं. ॲडलीन म्हणते: “आम्हाला आणखी आवेशाने प्रचार करायचा होता. तसंच, सेवाकार्यातून आनंद मिळवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहनाचीही खूप गरज होती.” त्या दोघींना सोबत मिळून काम केल्याने कसा फायदा झाला? ॲडलीन म्हणते: “प्रत्येक दिवशी संध्याकाळी प्रचार झाल्यावर आम्ही एकमेकांना आपला अनुभव सांगायचो. लोकांसोबत चर्चा करताना कोणत्या गोष्टी आम्हाला आवडल्या आणि यहोवा आम्हाला सेवाकार्यात कसं मार्गदर्शन देत आहे याबद्दलही आम्ही बोलायचो. आम्हाला या चर्चा खूप आवडायच्या आणि यामुळे आम्ही एकमेकांना आणखी जवळून ओळखू लागलो.” टेहळणी बुरूज१९.११ ५ ¶१०-११
शुक्रवार, २० ऑगस्ट
विश्वासाची मोठी ढाल हाती घ्या.—इफिस. ६:१६.
प्राचीन काळात, सैनिक जर आपल्या ढालीशिवाय परत आला, तर ती खूप लज्जेची गोष्ट समजली जायची. रोमी इतिहासकार टॅसिटस यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं: “एका सैनिकाने जर आपली ढाल युद्धात गमावली, तर ती खूप लाजिरवाणी गोष्ट समजली जायची.” यामुळे सैनिक नेहमी आपल्या ढालीला घट्ट धरून ठेवायचे. आपल्याला आपली ढाल घट्ट धरून ठेवायची असेल, तर आपल्याला नियमितपणे सभांना हजर राहावं लागेल. तसंच, यहोवाच्या नावाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगत राहावं लागेल. (इब्री १०:२३-२५) यासोबतच आपल्याला दररोज बायबलचं वाचन करावं लागेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यातला सल्ला लागू करावा लागेल. (२ तीम. ३:१६, १७) आपण असं करत राहिलो तर सैतानाच्या कोणत्याही हत्यारांमुळे आपलं कायमचं नुकसान होणार नाही. (यश. ५४:१७) “विश्वासाची मोठी ढाल” आपलं रक्षण करेल. यामुळे आपल्याला नेहमी बांधवांसोबत मिळून धैर्याने सेवा करता येईल. तसंच, विश्वास मजबूत ठेवण्यासाठी आपण दररोज जे युद्ध लढत आहोत तेही जिंकायला आपल्याला मदत होईल. आणि येशू जेव्हा सैतान व त्याच्या प्रभावाखाली असणाऱ्या लोकांविरुद्ध लढाई जिंकेल, तेव्हा त्याच्या बाजूने असण्याचा मोठा बहुमान आपल्याला मिळेल.—प्रकटी. १७:१४; २०:१०. टेहळणी बुरूज१९.११ १९ ¶१८-१९
शनिवार, २१ ऑगस्ट
वाऱ्याला मारत असल्याप्रमाणे मी ठोसे मारत नाही.—१ करिंथ. ९:२६.
तुम्ही तुमची योजना लिहून काढली तर तुम्हाला त्यानुसार काम करणं सोपं जाईल. (१ करिंथ. १४:४०) उदाहरणार्थ, मंडळीच्या वडिलांनी एकत्र मिळून घेतलेल्या निर्णयांची नोंद करण्यासाठी ते एका वडिलांना सांगतात. एखादं काम करायला कोणाला नेमण्यात आलं आहे आणि ते कधीपर्यंत पूर्ण केलं जावं या माहितीचीही नोंद केली जाते. वडील जेव्हा त्यांच्या कामांची अशी यादी बनवतात तेव्हा त्यांना ठरवल्यानुसार काम करणं सोपं जातं. तुम्हीही तुमच्या दररोजच्या कामांबाबतीत त्यांचं अनुकरण करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला दररोज कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याची तुम्ही एक यादी बनवू शकता. आणि महत्त्वाच्या गोष्टी यादीच्या सुरुवातीला लिहू शकता. असं केल्यामुळे सुरू केलेलं काम तुम्हाला पूर्ण तर करता येईलच, पण त्यासोबत ते कमी वेळेत पूर्ण करणंही तुम्हाला शक्य होईल. पण त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. योजनेनुसार काम करण्यासाठी आणि ते काम पूर्ण करण्यासाठी मेहनत लागते. (रोम. १२:११) प्रेषित पौलने तीमथ्यला एक चांगला शिक्षक बनण्यासाठी जिवापाड मेहनत घ्यायला आणि चिकाटीने प्रयत्न करत राहायला सांगितलं. पौलचा हा सल्ला आपण इतर आध्यात्मिक ध्येयांबाबतीतही लागू करू शकतो.—१ तीम. ४:१३, १६. टेहळणी बुरूज१९.११ २९-३० ¶१५-१६
रविवार, २२ ऑगस्ट
मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले.—निर्ग. ३३:११.
इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामीतून बाहेर काढण्यात मोशेने पुढाकार घ्यावा असं जेव्हा त्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्याला आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. आणि म्हणून त्याने यहोवाला वारंवार सांगितलं की तो हे काम करण्याच्या योग्यतेचा नाही. पण यहोवाने मोशेला जे उत्तर दिलं त्यातून त्याच्याप्रती असलेली यहोवाची दया दिसून आली. त्याने मोशेच्या भावना समजून घेतल्या आणि त्याला मदत केली. (निर्ग. ४:१०-१६) याचा काय परिणाम झाला? फारोला न्यायाचा कठोर संदेश सांगणं मोशेला शक्य झालं. मग मोशेने पाहिलं की यहोवाने त्याच्या शक्तीचा वापर करून इस्राएली लोकांना वाचवलं आणि फारोचा व त्याच्या सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश केला. (निर्ग. १४:२६-३१; स्तो. १३६:१५) इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर काढल्यानंतर ते वारंवार मोशेकडे काही गोष्टींसाठी कुरकुर करू लागले. असं असलं तरी मोशेने पाहिलं की गुलामीतून सोडवलेल्या आपल्या लोकांबद्दल यहोवा किती धीर दाखवत आहे. (स्तो. ७८:४०-४३) यहोवाने इस्राएली लोकांचा नाश करण्याचा आपला निर्णय बदलावा अशी मोशेने त्याला विनंती केली तेव्हा त्याने त्याचं ऐकलं. यावरून यहोवा किती नम्र आहे हे मोशेला समजलं. (निर्ग. ३२:९-१४) इस्राएली लोकांना गुलामीतून सोडवल्यानंतर मोशेचं यहोवासोबत असलेलं नातं आणखी घनिष्ठ झालं. तो जणू यहोवाला पाहू शकत होता.—इब्री ११:२७. टेहळणी बुरूज१९.१२ १७ ¶७-९
सोमवार, २३ ऑगस्ट
तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. तुम्ही त्याला तिथे पाहाल.—मत्त. २८:७.
येशूचे बहुतेक शिष्य गालीलचे होते. त्यामुळे त्याला इतक्या मोठ्या जमावाला यरुशलेममध्ये कोणाच्यातरी घरी भेटण्याऐवजी गालीलच्या डोंगरावर भेटणं जास्त सोयीचं होतं. तसंच, येशूचं पुनरुत्थान झाल्यावर तो आधीच यरुशलेममध्ये ११ प्रेषितांना एका खोलीत भेटला होता. जर त्याला फक्त त्याच्या प्रेषितांनाच प्रचाराची आणि शिष्य बनवण्याची आज्ञा द्यायची असती, तर त्याने ती त्यांना तिथेच दिली असती. पण येशूने तसं न करता त्याच्या प्रेषितांना, त्या स्त्रियांना आणि इतरांना गालीलमध्ये एकत्र भेटायला सांगितलं. (लूक २४:३३, ३६) येशूने शिष्य बनवण्याची आज्ञा दिली तेव्हा ती फक्त पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांसाठीच नव्हती. हे आपण कशावरून म्हणू शकतो? येशूने आपल्या अनुयायांना दिलेल्या निर्देशनाच्या शेवटी त्याने म्हटलं: “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:१९, २०) आज शिष्य बनवण्याचं काम अगदी आवेशाने चालू आहे. प्रत्येक वर्षी जवळपास तीन लाख लोक बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार व येशू ख्रिस्ताचे शिष्य बनत आहेत आणि ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे! टेहळणी बुरूज२०.०१ २ ¶१; ३ ¶५-६
मंगळवार, २४ ऑगस्ट
[त्याने] आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली.—स्तो. १३६:२३.
तरुण असूनही गंभीर आजार झाला आहे. वय वाढत चाललं आहे, आणि बरेच प्रयत्न करूनही दुसरी नोकरी मिळत नाही. वृद्ध असल्यामुळे यहोवाची सेवा आधीसारखी करता येत नाही. तुम्ही वर दिलेल्या परिस्थितींपैकी कोणत्या एका परिस्थितीचा सामना करत असाल तर तुम्हाला कदाचित वाटेल की ‘मी आता काहीच कामाचा नाही.’ अशा परिस्थितींमुळे आपण आपला आनंद आणि आत्मसन्मान गमावू शकतो. तसंच, यहोवासोबतचा आणि इतरांसोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. जीवनाबद्दल जगातल्या लोकांचा दृष्टिकोन सैतानासारखा आहे. सैतानाने मानवांना कधीही मौल्यवान लेखलं नाही. सैतान हव्वाशी निर्दयीपणे वागला आणि तिला सांगितलं की देवाची आज्ञा मोडल्यामुळे तिला स्वातंत्र्य मिळेल. पण त्याला माहीत होतं की असं केल्याने तिला मृत्युदंडाची शिक्षा होईल. सैतानाने नेहमी या जगाला आपल्या ताब्यात ठेवलं आहे. म्हणून जेव्हा या जगाचे पुढारी मानवांच्या जीवनाला क्षुल्लक लेखतात आणि त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत तेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. पण याउलट यहोवाची इच्छा आहे की आपण स्वतःला कमी लेखू नये तर मौल्यवान लेखावं. तसंच, तो आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करायला मदत करतो, ज्यांमुळे आपल्यात कमीपणाची भावना येऊ शकते.—रोम. १२:३. टेहळणी बुरूज२०.०१ १४ ¶१-४
बुधवार, २५ ऑगस्ट
तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नको, देशील तर आमच्या हातून मरशील.—यिर्म. ११:२१.
कमीतकमी चाळीस वर्षं यिर्मया अविश्वासू लोकांमध्ये राहिला. त्याच्या गावातले म्हणजे अनाथोथ इथे राहणारे काही नातेवाईक आणि शेजारीही कदाचित तिथे होते. (यिर्म. १२:६) असं असलं तरी तो सर्वांपासून दूर एकटा राहिला नाही, तर त्याने आपल्या भावना त्याचा विश्वासू सचिव बारूख याला सांगितल्या. त्याला त्या वेळी कसं वाटलं हे आपल्यालाही माहीत आहे कारण त्याच्या भावना आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. (यिर्म. ८:२१; ९:१; २०:१४-१८; ४५:१) बारूखने यिर्मयाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी लिहिल्या. आणि या काळादरम्यान बारूख आणि यिर्मया यांच्यातलं प्रेम वाढलं आणि ते एकमेकांचा आदर करायला शिकले. (यिर्म. २०:१, २; २६:७-११) अनेक वर्षं यिर्मयाने धैर्याने इस्राएली लोकांना यरुशलेम शहराचं काय होईल हे सांगितलं. (यिर्म. २५:३) मग पुढे यहोवाने आपल्या लोकांना पस्तावा करण्यासाठी आणखी एक संधी दिली तेव्हा त्याने यिर्मयाला त्या इशाऱ्याबद्दल एका गुंडाळीवर लिहायला सांगितलं. (यिर्म. ३६:१-४) यिर्मया आणि बारूख यांनी सोबत मिळून देवाने दिलेलं काम पूर्ण केलं. याला काही महिने लागले असावेत आणि यात काहीच शंका नाही, की त्या संपूर्ण काळादरम्यान त्या दोघांमध्ये विश्वास वाढवणारं संभाषण नक्कीच झालं असणार! टेहळणी बुरूज१९.११ २-३ ¶३-४
गुरुवार, २६ ऑगस्ट
जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नमवलं जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावलं जाईल.—मत्त. २३:१२.
आपण अभिषिक्त भाऊबहिणींना कशी वागणूक दिली पाहिजे? एखाद्याला खूप जास्त महत्त्व देणं चुकीचं ठरेल, मग तो ख्रिस्ताचा बांधव असला तरीही. (मत्त. २३:८-११) बायबल म्हणतं की आपण वडिलांच्या “विश्वासाचे अनुकरण” केलं पाहिजे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण कोणा व्यक्तीला आपला पुढारी बनवावं. (इब्री १३:७) हे खरं आहे की काही जणांना आपण “दुप्पट मान देण्यास योग्य समजले” पाहिजे असं बायबल म्हणतं. पण ते अभिषिक्त आहेत म्हणून नाही, तर ते “चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात” आणि “बोलण्याच्या व शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात” म्हणून. (१ तीम. ५:१७) आपण जर अभिषिक्त जनांना खूप जास्त महत्त्व दिलं किंवा त्यांची प्रशंसा केली तर त्यांना अवघडल्यासारखं वाटेल. इतकंच काय तर आपल्या अशा वागणुकीमुळे ते गर्विष्ठही बनतील. (रोम. १२:३) आणि आपल्यापैकी कोणालाच असं काही करायची इच्छा नाही, ज्यामुळे ख्रिस्ताच्या अभिषिक्त बांधवाकडून अशी गंभीर चूक होईल.—लूक १७:२. टेहळणी बुरूज२०.०१ २९ ¶८
शुक्रवार, २७ ऑगस्ट
बाहेरच्या . . . गोष्टींसोबतच, सर्व मंडळ्यांची चिंतादेखील . . . माझ्या मनाला पोखरत असते.—२ करिंथ. ११:२८.
प्रेषित पौल बऱ्याच गोष्टींमुळे चिंतित होता. आपल्या भाऊबहिणींना समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे तो खूप चिंतित होता. (२ करिंथ. २:४) विरोधकांनी त्याला मारलं आणि तुरुंगातही टाकलं. त्यासोबतच, त्याला इतर समस्यांमुळेही चिंता होती. जसं की, त्याला “हलाखीच्या परिस्थितीत” काही दिवस काढावे लागले. (फिलिप्पै. ४:१२) इतकंच काय तर समुद्रप्रवास करताना त्याचं जहाज तीन वेळा फुटलं. आपण कल्पना करू शकतो की त्या परिस्थितीत तो किती चिंतित झाला असेल! (२ करिंथ. ११:२३-२७) मग पौलला या सर्व चिंतांचा सामना करण्यासाठी कुठून मदत मिळाली? भाऊबहिणींना समस्यांचा सामना करावा लागला, तेव्हा पौलला चिंता वाटली पण त्याने स्वतःहून त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या नाहीत. पौलला जाणीव होती की तो स्वतः सर्वकाही करू शकत नाही. त्यामुळे मंडळीतल्या भाऊबहिणींना साहाय्य करण्यासाठी त्याने इतर भरवशालायक बांधवांची, जसं तीमथ्य आणि तीत, यांची मदत घेतली. त्या बांधवांनी केलेल्या मदतीमुळे पौलची चिंता नक्कीच कमी झाली असेल.—फिलिप्पै. २:१९, २०; तीत १:१, ४, ५. टेहळणी बुरूज२०.०२ २३ ¶११-१२
शनिवार, २८ ऑगस्ट
मुलांनो, . . . आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा.—इफिस. ६:१.
यहोवा आपला पिता असल्यामुळे आपण त्याच्या आज्ञेत राहावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण त्याच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे कारण तो आपला निर्माणकर्ता, आपल्या गरजा पुरवणारा आणि कोणत्याही मानवी पित्यापेक्षा सर्वात बुद्धिमान आहे. पण त्याच्या आज्ञांचं पालन करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम. (१ योहा. ५:३) यहोवावर प्रेम करण्याची आपल्याजवळ बरीच कारणं असली तरी तो आपल्याला असं करण्याची बळजबरी करत नाही. यहोवाने आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे आपण त्याच्या आज्ञेत राहण्याची निवड करतो, तेव्हा त्याला आनंद होतो. आपल्या मुलांनी सुरक्षित राहावं अशी आईवडिलांची इच्छा असल्यामुळे ते त्यांच्या सुरक्षेसाठी नियम बनवतात. मुलं जेव्हा त्यांचं पालन करतात तेव्हा ते आईवडिलांचा आदर करत असल्याचं आणि त्यांच्यावर भरवसा असल्याचं दाखवतात. आईवडिलांच्या आज्ञांचं पालन करणं जर इतकं महत्त्वाचं आहे तर विचार, की आपण आपल्या स्वर्गीय पित्याने ठरवलेले स्तर माहीत करून घेणं आणि त्यांचं पालन करणं किती जास्त महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे आपण यहोवाला दाखवून देतो की आपलं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि आपण त्याचा मनापासून आदर करतो. आणि यामुळे आपल्याला फायदाही होतो. (यश. ४८:१७, १८) याच्या उलट, जे यहोवाला आणि त्याच्या स्तरांना नाकारतात ते स्वतःचं नुकसान करून घेतात.—गलती. ६:७, ८. टेहळणी बुरूज२०.०२ ९-१० ¶८-९
रविवार, २९ ऑगस्ट
आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या; आपल्या दासीचे बोलणे ऐका.—१ शमु. २५:२४.
जेव्हा आपल्याला कळतं की एखादी व्यक्ती गंभीर चूक करण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा आपण अबीगईलसारखं धैर्य दाखवून त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. (स्तो. १४१:५) अशा वेळी आपण आदराने बोलण्यासोबतच स्पष्टपणेसुद्धा बोललं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला सल्ल्याची गरज असते तेव्हा तो प्रेमळपणे देण्याद्वारे आपण दाखवून देतो की आपण तिचे खरे मित्र आहोत. (नीति. २७:१७) मंडळीत एखाद्या व्यक्तीने चुकीचं पाऊल उचललं असेल तर तिच्याशी बोलण्यासाठी खासकरून वडिलांनी धैर्य दाखवण्याची गरज आहे. (गलती. ६:१) वडिलांना जाणीव असते की तेसुद्धा अपरिपूर्ण आहेत आणि त्यांनाही कधी ना कधी सल्ल्याची गरज पडू शकते. पण यामुळे ते असा विचार करत नाहीत की ज्या व्यक्तीला सुधारण्याची गरज आहे तिला त्यांनी सल्ला देऊ नये. याउलट ते तिला मदत करतात. (२ तीम. ४:२; तीत १:९) सल्ला देताना ते आपल्या बोलण्याच्या देणगीचा कुशलपणे वापर करून तिला समजवतात आणि तिच्याशी धीराने वागतात. त्यांचं त्या व्यक्तीवर प्रेम असल्यामुळे ते तिला मदत करण्याचा प्रयत्न करतात. (नीति. १३:२४) पण या सर्वांपेक्षा यहोवाला सन्मान देणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ते देवाच्या स्तरांचं समर्थन करतात आणि वाईट प्रभावापासून मंडळीचं संरक्षण करतात.—प्रे. कार्ये २०:२८. टेहळणी बुरूज२०.०३ २० ¶८-९
सोमवार, ३० ऑगस्ट
जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्ती मिळते.—फिलिप्पै. ४:१३.
इस्राएली लोकांना गुलामीतून सोडवण्यासाठी यहोवाने मोशेचा वापर केला. त्याने त्याला तारणकर्ता बनण्यासाठी मदत केली. पण यहोवाने त्याचा उपयोग कधी केला? मोशेला “मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण” देण्यात आलं आणि आता तो कोणतंही काम करण्यासाठी तयार झाला आहे असं त्याला वाटलं तेव्हा यहोवाने त्याचा उपयोग करून घेतला का? नाही. (प्रे. कार्ये ७:२२-२५) यहोवाने मोशेला आधी एक नम्र व्यक्ती बनायला आणि त्याच्या रागावर ताबा मिळवायला मदत केली आणि त्यानंतरच त्याने त्याचा उपयोग केला. (प्रे. कार्ये ७:३०, ३४-३६) यहोवाने मोशेला मिसरच्या शक्तिशाली राजाशी बोलायचं धैर्य दिलं. (निर्ग. ९:१३-१९) यावरून आपण पाहू शकतो, की यहोवा फक्त अशा लोकांचाच वापर करतो जे त्याच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि ताकद मिळवण्यासाठी त्याच्यावर अवलंबून राहतात. प्राचीन काळापासून यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी त्याच्या सेवकांचा उपयोग केला आहे. तो तुम्हाला काय बनायला मदत करेल? तुम्ही त्याच्या सेवेत किती मेहनत घ्यायला तयार आहात यावर हे अवलंबून आहे. (कलस्सै. १:२९) तुम्ही जर स्वतःला उपलब्ध करून दिलं तर यहोवा तुम्हाला एक आवेशी प्रचारक, निपुण शिक्षक, कुशल कारागीर, प्रभावी सांत्वन करणारा, भरवशालायक मित्र किंवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जे बनण्याची गरज आहे ते बनायला मदत करू शकतो. टेहळणी बुरूज१९.१० २१ ¶५; २५ ¶१४
मंगळवार, ३१ ऑगस्ट
मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे.—योहा. १५:१५.
यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी चांगले मित्र आपल्याला मदत करतात. चांगले मित्र बनवण्यासाठी आधी आपण स्वतः एक चांगला मित्र असणं गरजेचं आहे. (मत्त. ७:१२) उदाहरणार्थ, बायबल सांगतं की आपण आपला वेळ आणि शक्ती इतरांना मदत करण्यासाठी आणि खासकरून जे “गरजू” आहेत अशांना मदत करण्यासाठी वापरावी. (इफिस. ४:२८) आपण जेव्हा आपलं लक्ष इतरांना मदत करण्यावर केंद्रित करतो तेव्हा आपण जास्त आनंदी राहू शकतो. (प्रे. कार्ये २०:३५) समस्यांचा सामना करण्यासाठी आपले मित्र आपल्याला मदत करतात आणि यामुळे आपल्याला मनाची शांती टिकवून ठेवायला मदत होते. ईयोब आपल्या समस्यांबद्दल बोलत असताना जसं अलीहूने त्याचं ऐकलं, तसंच आपण आपल्या चिंता व्यक्त करतो तेव्हा आपले मित्रही धीराने ऐकतात. (ईयो. ३२:४) मित्रांनी आपल्यासाठी निर्णय घ्यावेत अशी आपण अपेक्षा करणार नाही, तर त्यांनी दिलेल्या बायबलच्या सल्ल्याचं पालन करून आपण सुज्ञता दाखवू शकतो. (नीति. १५:२२) दावीदने नम्रता दाखवत आपल्या मित्रांकडून मदत स्वीकारली. त्याच प्रकारे, आपणही गर्व न बाळगता गरजेच्या वेळी मित्रांनी पुरवलेली मदत नम्रतेने स्वीकारली पाहिजे. (२ शमु. १७:२७-२९) खरे मित्र यहोवाकडून मिळालेली एक देणगीच आहे!—याको. १:१७. टेहळणी बुरूज१९.०४ ११ ¶१२; १२ ¶१४-१५