वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. ७९-९१
  • जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • गुरुवार, १ जुलै
  • शुक्रवार, २ जुलै
  • शनिवार, ३ जुलै
  • रविवार, ४ जुलै
  • सोमवार, ५ जुलै
  • मंगळवार, ६ जुलै
  • बुधवार, ७ जुलै
  • गुरुवार, ८ जुलै
  • शुक्रवार, ९ जुलै
  • शनिवार, १० जुलै
  • रविवार, ११ जुलै
  • सोमवार, १२ जुलै
  • मंगळवार, १३ जुलै
  • बुधवार, १४ जुलै
  • गुरुवार, १५ जुलै
  • शुक्रवार, १६ जुलै
  • शनिवार, १७ जुलै
  • रविवार, १८ जुलै
  • सोमवार, १९ जुलै
  • मंगळवार, २० जुलै
  • बुधवार, २१ जुलै
  • गुरुवार, २२ जुलै
  • शुक्रवार, २३ जुलै
  • शनिवार, २४ जुलै
  • रविवार, २५ जुलै
  • सोमवार, २६ जुलै
  • मंगळवार, २७ जुलै
  • बुधवार, २८ जुलै
  • गुरुवार, २९ जुलै
  • शुक्रवार, ३० जुलै
  • शनिवार, ३१ जुलै
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. ७९-९१

जुलै

गुरुवार, १ जुलै

आपल्या विनंत्या देवाला कळवा.—फिलिप्पै. ४:६.

इतर जण जेव्हा आपल्याशी कठोरपणे बोलतात किंवा आपल्याला वाईट वागणूक देतात तेव्हा आपल्याला चिंता वाटू शकते. आणि आपल्याला खासकरून जास्त वाईट तेव्हा वाटतं, जेव्हा दुखावणारी व्यक्‍ती आपल्या जवळची असते. अशा वेळेस चिंतांचा सामना करण्यासाठी बायबलमध्ये दिलेल्या हन्‍नाच्या उदाहरणातून आपण बरंच काही शिकू शकतो. कारण तिची सवत तिला सारखी टोमणे मारायची. (१ शमु. १:१२) हन्‍नासारखंच आपणही यहोवाशी बराच वेळ बोलू शकतो आणि आपल्या चिंता आणि भीती त्याला सांगू शकतो. आपली प्रार्थना अलंकारिक भाषेत किंवा व्याकरणानुसार अगदीच व्यवस्थित मांडलेली असावी हे गरजेचं नाही. कधीकधी आपल्या दुःखाबद्दल आणि तणावाबद्दल सांगताना आपल्या डोळ्यांतून अश्रू येऊ शकतात. पण यहोवाला आपल्या प्रार्थनांचा कधीच कंटाळा येणार नाही. आपल्या समस्यांबद्दल प्रार्थना करण्यासोबतच आपण फिलिप्पैकर ४:६, ७ मध्ये दिलेला सल्ला लक्षात ठेवला पाहिजे. या वचनांत प्रेषित पौलने खासकरून म्हटलं की आपण प्रार्थनेत यहोवाचे आभार व्यक्‍त केले पाहिजेत. यहोवाचे आभार मानण्याची आपल्याजवळ बरीच कारणं आहेत. त्यासोबतच त्याने आपल्याला जीवन दिलं, सुंदर सृष्टी बनवली, आपल्यावर एकनिष्ठ प्रेम केलं आणि आपल्या सर्वांना सुंदर आशा दिली. या सगळ्या गोष्टींबद्दलही आपण त्याचे आभार मानू शकतो. टेहळणी बुरूज२०.०२ २१ ¶३; २२ ¶६

शुक्रवार, २ जुलै

बोलण्याचा समय असतो.—उप. ३:७.

आपल्याला बोलता येणं ही देवाकडून मिळालेली देणगी आहे. (निर्ग. ४:१०, ११; प्रकटी. ४:११) या देणगीचा चांगला वापर कसा करावा हे समजण्यासाठी बायबल आपल्याला मदत करतं. यहोवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल बोलायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे. (मत्त. २४:१४; रोम. १०:१४) असं करून आपण येशूचं अनुकरण करतो. येशू पृथ्वीवर येण्याच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे त्याला त्याच्या पित्याबद्दलचं सत्य इतरांना सांगायचं होतं. (योहा. १८:३७) पण आपण जेव्हा हे सत्य इतरांना सांगतो तेव्हा आपण ते कसं सांगतो हेसुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यहोवाबद्दल इतरांशी बोलताना आपण “सौम्यतेने आणि मनापासून आदर” दाखवून बोललं पाहिजे. तसंच, त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि विश्‍वासाला धक्का लागणार नाही या गोष्टीचीही आपण काळजी घेतली पाहिजे. (१ पेत्र ३:१५) या सर्व गोष्टी केल्या तर आपण त्यांच्याशी बोलण्यासोबतच त्यांना शिकवण्याचा आणि कदाचित त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करत असू. एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला सल्ल्याची गरज असल्याचं मंडळीतल्या वडिलांना जाणवतं तेव्हा त्यांनी तो सल्ला देण्यासाठी कचरू नये. हे स्पष्टच आहे की ज्या व्यक्‍तीला सल्ला दिला जात आहे तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून वडील तिच्याशी बोलण्यासाठी योग्य वेळ निवडतील. टेहळणी बुरूज२०.०३ १८-१९ ¶२-४

शनिवार, ३ जुलै

प्रार्थना करत राहा.—मत्त. २६:४१.

आपण कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकतो? “आमचा विश्‍वास वाढव” अशी प्रार्थना आपण यहोवाला करू शकतो. (लूक १७:५; योहा. १४:१) पण आपल्या सर्वांना विश्‍वासाची गरज का आहे? कारण जो कोणी येशूचा शिष्य बनतो त्याच्यावर सैतान परीक्षा आणतो. (लूक २२:३१) विश्‍वासामुळे आपल्याला कशी मदत होते? हे खरं आहे की परीक्षेत आपण आपल्या परीने शक्य ते करू. पण त्यानंतर विश्‍वासामुळेच सर्व चिंता यहोवावर सोपवण्यासाठी आपल्याला मदत होते. आपल्या क्षमतेपलीकडे असलेली गोष्ट यहोवा चांगल्या प्रकारे हाताळू शकतो याची आपण पक्की खात्री बाळगली तर आपलं मन शांत राहू शकेल. (१ पेत्र ५:६, ७) आपल्यावर कोणतीही परीक्षा आली तरी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला मनाची शांती टिकवून ठेवायला मदत होते. रॉबर्ट नावाचे वडील ८० वर्षांचे आहेत आणि ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. ते म्हणतात: “फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांमुळे मला जीवनातल्या अनेक समस्यांना तोंड द्यायला मदत झाली आहे. मला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आणि काही वेळासाठी मी वडील असण्याची जबाबदारीही गमावली होती.” मग रॉबर्ट यांना मनाची शांती टिकवून ठेवायला कुठून मदत मिळाली? ते म्हणतात: “मला चिंता वाटू लागल्यावर मी लगेच प्रार्थना करायचो. माझ्या मते, मी जितक्या जास्त वेळा आणि कळकळीने प्रार्थना करायचो तितकं माझं मन शांत असल्याचं मी अनुभवायचो.” टेहळणी बुरूज१९.०४ ९-१० ¶५-७

रविवार, ४ जुलै

एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?—उत्प. ३९:९.

मुलांचं लैंगिक शोषण हे देवाविरुद्ध पाप आहे. जेव्हा एक व्यक्‍ती दुसऱ्‍याविरुद्ध पाप करते तेव्हा ती यहोवाविरुद्धही पाप करत असते. यहोवाने इस्राएल राष्ट्राला जे नियम दिले होते त्यातल्या एका नियमाचा विचार करा. नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं की जर एका व्यक्‍तीने आपल्या शेजाऱ्‍याकडे चोरी केली किंवा त्याला फसवलं तर तो “परमेश्‍वराविरूद्ध विश्‍वासघात” करत आहे. (लेवी. ६:२-४) यावरून आपल्याला कळतं, की मुलांचं लैंगिक शोषण करणारी मंडळीतली व्यक्‍ती देवाचा विश्‍वासघात करत आहे. कारण तिने त्या मुलाला फसवलं आहे. त्या लहान मुलाच्या भरवशाचा फायदा उचलून या व्यक्‍तीने त्याचं शोषण केलं आहे. यामुळे त्या मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना येते. मुलांचं शोषण करणारी व्यक्‍ती यहोवाच्या नावावर कलंक लावते. यामुळेच आपण अशा कृत्याचा तिरस्कार केला पाहिजे, कारण ते देवाविरुद्ध गंभीर पाप आहे. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांमधील लेखांमध्ये सांगण्यात आलं आहे की पीडित लोक भावनिक रीत्या कसं सावरू शकतात आणि इतर जण अशांना मदत व प्रोत्साहन कसं देऊ शकतात. शिवाय पालक मुलांचं संरक्षण कसं करू शकतात हे सांगणारेदेखील काही लेख आहेत. मुलांचं लैंगिक शोषण यासारखं गंभीर पाप जर मंडळीत घडलं तर ते कशा प्रकारे हाताळावं याबद्दल वडिलांना शास्त्रवचनीय प्रशिक्षण आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मंडळी अशा गंभीर पापाला ज्या प्रकारे हाताळते त्या प्रक्रियेची संघटना वेळोवेळी उजळणीदेखील करत असते. टेहळणी बुरूज१९.०५ ९ ¶८-९

सोमवार, ५ जुलै

जिवंतांकरता मेलेल्यांना विचारावे काय?—यश. ८:१९.

देवाचं वचन धारदार तलवारीप्रमाणे आहे. ते सैतानाच्या खोट्या शिकवणींचा पर्दाफाश करतं. (इफिस. ६:१७) उदाहरणार्थ, मृत व्यक्‍ती जिवंत लोकांशी संभाषण करू शकते ही शिकवण खोटी आहे असं देवाचं वचन दाखवून देतं. (स्तो. १४६:४) तसंच, फक्‍त यहोवाच आपल्याला भरवशालायक भविष्य सांगू शकतो हेही त्यात सांगितलं आहे. (यश. ४५:२१; ४६:१०) देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास केल्याने आणि त्यावर मनन केल्याने, दुष्टात्मे पसरवत असलेल्या गोष्टींचा द्वेष करायला आणि त्या नाकारायला आपल्याला सोपं जाईल. म्हणून भूतविद्येशी संबंधित कोणतंही कार्य करू नका. खरे ख्रिस्ती या नात्याने आपण कधीच भूतविद्येच्या कोणत्याही प्रकारात सहभाग घेणार नाही. उदाहरणार्थ, आपण भूतविद्या करणाऱ्‍या लोकांकडे जाणार नाही किंवा इतर मार्गांनी मृत लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. मृत लोक कुठेतरी जिवंत आहेत अशा विश्‍वासावर आधारित असलेल्या अंत्यविधीच्या कोणत्याही प्रथा पाळण्याचं आपण पूर्णपणे टाळतो. तसंच, आपण भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषविद्येचा उपयोग करत नाही. अशा सर्व गोष्टी खूप हानीकारक आहेत कारण यामुळे आपण थेट सैतान आणि दुष्टात्म्यांच्या संपर्कात येऊ शकतो. टेहळणी बुरूज१९.०४ २१-२२ ¶८-९

मंगळवार, ६ जुलै

देवाने त्यांच्याच मनाच्या वासनांनुसार त्यांना अशुद्धपणाच्या स्वाधीन केले.—रोम. १:२४.

या जगाच्या बुद्धीनुसार चालणारे लोक बायबलच्या नैतिक स्तरांविषयी म्हणतात की ते व्यावहारिक नाहीत. असं करून ते त्यांची थट्टा करतात. असे लोक कदाचित विचारतील, ‘देवाने आपल्याला लैंगिक इच्छा दिली आहे तर मग तो आपल्याला ती इच्छा पूर्ण करू नका असं का सांगेल?’ खरंतर ते लोक एक चुकीची धारणा बाळगतात. ती म्हणजे ‘मानवाने आपल्या मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण केलीच पाहिजे.’ पण बायबलमध्ये असं सांगितलेलं नाही. उलट, त्यात म्हटलं आहे की आपण आपल्या प्रत्येक इच्छेच्या आहारी जाऊ नये. जे चुकीचं आहे त्याला लढा देण्याची क्षमता आपल्यात आहे. (कलस्सै. ३:५) तसंच, मानवांना त्यांच्या योग्य लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवाने त्यांना विवाहाची व्यवस्था देणगी म्हणून दिली आहे. (१ करिंथ. ७:८, ९) जगाच्या बुद्धीच्या अगदी उलट बायबलमध्ये लैंगिक संबंधाबद्दल योग्य दृष्टिकोन दिला आहे. त्यात म्हटलं आहे की लैंगिक संबंधामुळे आनंद मिळू शकतो. (नीति. ५:१८, १९) असं असलं तरी बायबल म्हणतं: “तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर, पवित्रतेने व आदराने नियंत्रण ठेवता आले पाहिजे. . . . लोभीपणाने, अनियंत्रित लैंगिक वासनेच्या आहारी जाऊ नका.”—१ थेस्सलनी. ४:४, ५. टेहळणी बुरूज१९.०५ २२-२३ ¶७-९

बुधवार, ७ जुलै

तू तुफानासारखा चालून येशील, . . . तू, तुझे सर्व सेनासमूह व तुझ्यासोबत अनेक राष्ट्रांचे लोक, असे तुम्ही सर्व याल.—यहे. ३८:९.

यहोवा राष्ट्रांना त्याच्या लोकांचा विनाश करू देणार नाही. कारण आज यहोवाचे सेवक अभिमानाने इतरांना त्याच्या नावाबद्दल सांगतात आणि ‘मोठ्या बाबेलमधून निघा’ या त्याने दिलेल्या आज्ञेचं मनापासून पालन करतात. (प्रे. कार्ये १५:१६, १७; प्रकटी. १८:४) तसंच, तिच्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्यांनी बरेच त्याग केले आहेत आणि मेहनत घेतली आहे. त्यामुळे यहोवाच्या सेवकांवर “तिच्या कोणत्याही पीडा” येणार नाहीत. असं असलं तरी, यानंतर घडणाऱ्‍या घटनांमुळे त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा होईल. (यहे. ३८:२, ८) खोट्या धर्माच्या संघटनांचा संपूर्ण विनाश झाल्यानंतर, पृथ्वीवर फक्‍त एकच धर्म उरेल. फक्‍त यहोवाचे सेवक त्याची सेवा करत राहतील. पण हे पाहून सैतान खूप क्रोधित होईल. त्यामुळे तो “अशुद्ध प्रेरित वचने” वापरून राष्ट्रांच्या समूहाला यहोवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी प्रेरित करेल. (प्रकटी. १६:१३, १४) राष्ट्रांच्या या समूहाला “मागोगचा गोग” असं म्हटलं आहे. राष्ट्रांचा हा समूह यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल तेव्हा हर्मगिदोनच्या युद्धाला सुरुवात होईल.—प्रकटी. १६:१६. टेहळणी बुरूज१९.०९ ११ ¶१२-१३

गुरुवार, ८ जुलै

बुद्धिवंतांचे तर्क व्यर्थ आहेत.—१ करिंथ. ३:२०.

प्राचीन काळात सैतानाने खोट्या धर्माचा वापर करून इस्राएली लोकांना अनैतिक गोष्टी करण्याचा बढावा दिला. आजही तो हेच करत आहे. खोटा धर्म अनैतिक आचरण फक्‍त खपवूनच घेत नाही तर त्याला बढावाही देतो. याचा परिणाम म्हणजे, देवाची उपासना करण्याचा दावा करणाऱ्‍या अनेकांनी त्याचे नैतिक स्तर पाळण्याचं सोडून दिलं आहे. प्रेषित पौलने रोमकरांना लिहिलेल्या पत्रांत याचे काय परिणाम झाले हे अगदी स्पष्टपणे सांगितलं. (रोम. १:२८-३१) “अनुचित कामे” यांत सर्व प्रकारची लैंगिक अनैतिकता आणि समलैंगिकता यांचा समावेश होतो. (रोम. १:२४-२७, ३२; प्रकटी. २:२०) त्यामुळे बायबलमध्ये दिलेल्या स्पष्ट शिकवणींना जडून राहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे! मानवी तत्त्वज्ञान यहोवाच्या स्तरांना फक्‍त नाकारतच नाही तर त्यांचा विरोधही करतं. ते देवाच्या आत्म्याच्या पैलूला बढावा देण्याऐवजी “शरीराची कामे” यांना बढावा देतं. (गलती. ५:१९-२३) यामुळे गर्व आणि उद्धटपणा निर्माण होतो आणि याचा परिणाम म्हणजे लोक “स्वतःवर प्रेम करणारे” बनतात. (२ तीम. ३:२-४) पण, देवाच्या सेवकांना नम्रतेचा जो गुण विकसित करायचं प्रोत्साहन दिलं जातं त्याच्या अगदी उलट या गोष्टी आहेत.—२ शमु. २२:२८. टेहळणी बुरूज१९.०६ ५-६ ¶१२-१४

शुक्रवार, ९ जुलै

मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.—नीति. १७:१७.

एलीयाने अतिशय कठीण काळात यहोवाची सेवा केली आणि त्याला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. यहोवाने एलीयाला सांगितलं की त्याने आपल्या काही जबाबदाऱ्‍या अलीशाला द्याव्यात. असं करण्याद्वारे यहोवाने एलीयाला एक चांगला मित्र दिला. यामुळे एलीयाला तणावाचा आणि निराशेचा सामना करताना मदत मिळणार होती. यावरून आपण शिकतो की एका भरवशालायक मित्राला आपल्या भावना सांगितल्यामुळे, तो आपल्याला तणावाचा सामना करण्यासाठी मदत करू शकतो. (२ राजे २:२) तुमचा असा एकही मित्र नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर यहोवाला प्रार्थना करा; तो तुम्हाला एखाद्या प्रौढ ख्रिस्ती बांधवाशी किंवा बहिणीशी मैत्री करायला मदत करू शकतो. यामुळे तुम्हाला भावनिक रीत्या आधार मिळेल. यहोवाने एलीयाला तणावाचा सामना करण्यासाठी आणि बऱ्‍याच वर्षांपर्यंत विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी मदत केली. एलीयाच्या उदाहरणावरून आपल्याला आशा मिळते. आपल्याही जीवनात कदाचित असा काळ येऊ शकतो जेव्हा आपण खूप तणावात असू आणि यामुळे आपण भावनिक व शारीरिक रीत्या थकून जाऊ. पण अशा काळातही आपण यहोवावर विसंबून राहिलो तर त्याची सेवा करत राहण्यासाठी तो आपल्याला बळ देईल.—यश. ४०:२८, २९. टेहळणी बुरूज१९.०६ १५ ¶४; १६ ¶९-१०

शनिवार, १० जुलै

मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.—नीति. २९:२५.

देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश इतरांना सांगण्याद्वारे आपण आज धैर्य उत्पन्‍न करू शकतो. असं का म्हणता येईल? कारण प्रचारामुळे आपण यहोवावर भरवसा ठेवायला शिकतो आणि माणसांची भीतीही आपल्यातून निघून जाते. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला जसं बळ मिळतं, तसंच घरोघरचं, सार्वजनिक ठिकाणी, अनौपचारिक रीत्या आणि व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य केल्यामुळे आपलं धैर्य वाढतं. आपण आज जर प्रचार करण्यासाठी धैर्य विकसित केलं, तर भविष्यात आपल्या कामावर बंदी असतानाही आपण धैर्याने प्रचार करत राहण्यासाठी तयार असू. (१ थेस्सलनी. २:१, २) धैर्य दाखवणाऱ्‍या विश्‍वासू बहिणीच्या उदाहरणावरून आपण खूप काही शिकू शकतो. नॅन्सी यूवान या बहिणीची उंची ५ फुटापेक्षा कमी होती, पण कोणीही तिला सहजासहजी घाबरवू शकत नव्हतं. तिला प्रचारकाम थांबवायला सांगण्यात आलं होतं, पण तिने तसं करण्यापासून साफ नकार दिला. यामुळे तिला चीन देशात २० पेक्षा जास्त वर्षं तुरुंगात काढावे लागले. ज्या अधिकाऱ्‍यांनी तिची चौकशी केली होती, ते म्हणाले की त्यांच्या देशातली “ती सर्वात हट्टी व्यक्‍ती” आहे. टेहळणी बुरूज१९.०७ ५ ¶१३-१४

रविवार, ११ जुलै

जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.—मत्त. २८:१९.

काही लोक बायबलची सत्यं शिकण्यासाठी उत्सुक असतात. पण बरेचसे लोक पहिल्यांदा संदेश ऐकल्यावर तशीच उत्सुकता दाखवत नाहीत. यामुळे आपल्याला त्यांच्या मनात बायबल संदेशाविषयी आवड निर्माण करावी लागेल. सेवाकार्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला चांगली तयारी करणं गरजेचं आहे. लोकांच्या मनात आवड निर्माण होईल असे विशिष्ट विषय निवडा. मग तुम्ही त्या विषयाची सुरुवात कशी कराल हे ठरवा. उदाहरणार्थ, तुम्ही घरमालकाला विचारू शकता, “आम्ही एका विषयावर तुमचं मत जाणून घेऊ शकतो का? आज जगात पाहिलं तर कुटुंबात प्रेम कमी होत चाललं आहे. तुम्हाला काय वाटतं, कुटुंबातली नाती मजबूत कशी होऊ शकतात?” मग तुम्ही मत्तय ७:१२ किंवा कलस्सैकर ३:१८, १९ या वचनांवर त्यांच्याशी चर्चा करू शकता. अथवा तुम्ही एखाद्या व्यक्‍तीला विचारू शकता: “मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा सर्वात उत्तम मार्ग कुठला आहे, तुम्हाला काय वाटतं?” यानंतर अनुवाद ६:६, ७ या वचनांवर चर्चा करा. आपण लोकांना येशूचे शिष्य बनण्यासाठी मदत करतो तेव्हा आपल्याला नक्कीच खूप आनंद होतो. टेहळणी बुरूज१९.०७ १५ ¶४, ६-७

सोमवार, १२ जुलै

मानव आपणासाठी देव बनवेल काय? असल्या वस्तु तर देव नाहीत.—यिर्म. १६:२०.

एका बांधवाला पूर्वेकडच्या देशातल्या अशा लोकांना प्रचार करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे ज्यांचा देवा-धर्मावर विश्‍वास नाही. तो म्हणतो: “‘मी देवाला मानत नाही’ असं सहसा लोक म्हणतात तेव्हा त्याचा असा अर्थ असतो, की लोक ज्या पारंपरिक पद्धतीने देवाची उपासना करतात ती त्यांना मान्य नसते. म्हणून मी त्यांच्याशी सहमत होत म्हणतो, की बरेच देव हे मानवांनी घडवलेले आहेत आणि खरे नाहीत. मग मी सहसा यिर्मया १६:२० हे वचन वाचतो आणि विचारतो: ‘खरा देव आणि मानवांनी बनवलेला देव यांतला फरक आपण कसा ओळखू शकतो?’ त्यांचं उत्तर मी लक्ष देऊन ऐकतो आणि त्यानंतर मी यशया ४१:२३ हे वचन वाचतो. त्यात म्हटलं आहे: ‘पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहा असे आम्ही समजू.’ मग त्यानंतर, यहोवाने भविष्याबद्दल कसं आधीपासूनच सांगितलं आहे याचं एक उदाहरण मी देतो.” आणखी एक बांधव म्हणतो: “मी लोकांना बायबलमधून सुज्ञ सल्ले, पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या आणि विश्‍वाला नियंत्रित करणारे नैसर्गिक नियम यांची काही उदाहरणं दाखवतो. मग मी त्यांच्याशी तर्क करतो की या गोष्टींवरून आपल्याला एक खरोखरचा आणि सुज्ञ निर्माणकर्ता असल्याचा पुरावा कसा मिळतो. जेव्हा समोरची व्यक्‍ती, देव अस्तित्वात असल्याचं मान्य करू लागते तेव्हा मी तिला बायबल, यहोवाबद्दल काय म्हणतं ते दाखवतो.” टेहळणी बुरूज१९.०७ २३-२४ ¶१४-१५

मंगळवार, १३ जुलै

कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.—फिलिप्पै. १:१०.

या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये यहोवाच्या नावाला पवित्र करणं, त्याचा उद्देश पूर्ण होणं आणि मंडळीतली शांती व एकता टिकून ठेवणं या गोष्टी सामील आहेत. (मत्त. ६:९, १०; योहा. १३:३५) या गोष्टी आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या आहेत हे जेव्हा आपण दाखवतो, तेव्हा यहोवावर आपलं प्रेम आहे हे आपण सिद्ध करत असतो. प्रेषित पौलने असंही म्हटलं की आपण “निर्दोष” राहिलं पाहिजे. याचा अर्थ आपण परिपूर्ण असावं असा होत नाही. आपण प्रेम वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहिलो आणि महत्त्वपूर्ण गोष्टींची खातरी करत राहिलो तर यहोवा आपल्याला निर्दोष समजेल. इतरांचं यहोवासोबत असलेलं नातं बिघडेल असं काहीही न करण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपलं प्रेम दाखवत असतो. इतरांसाठी अडखळण न होणं हा सल्ला खरंच आपल्यासाठी एक इशारा आहे. आपण इतरांसाठी कसं अडखळण ठरू शकतो? आपण ज्या प्रकारच्या मनोरंजनाची, कपड्यांची आणि नोकरीची निवड करतो त्यामुळे आपण इतरांसाठी अडखळण ठरू शकतो. आपण करत असलेल्या गोष्टी कदाचित यहोवाच्या नजरेत चुकीच्या नसतील. पण आपल्या निवडीमुळे एखाद्याचा विवेक दुखावला जात असेल किंवा त्याच्यासाठी ती निवड अडखळण ठरत असेल तर ही खूप गंभीर गोष्ट आहे.—मत्त. १८:६. टेहळणी बुरूज१९.०८ १० ¶९-११

बुधवार, १४ जुलै

जे मोठ्या संकटातून बाहेर येतात ते हेच आहेत, आणि त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.—प्रकटी. ७:१४.

१९३५ सालापासून यहोवाच्या साक्षीदारांची अशी समज आहे, की योहानच्या दृष्टान्तातला मोठा लोकसमुदाय हा विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेला आहे आणि त्यांना पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा आहे. (प्रकटी. ७:९, १०) मोठ्या संकटातून वाचण्यासाठी, या लोकसमुदायाला ख्रिस्ताचं हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी यहोवाबद्दल शिकून घ्यावं लागेल. हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी “घडणार असलेल्या या सगळ्या गोष्टींतून” त्यांना वाचण्यासाठी मजबूत विश्‍वास दाखवावा लागेल. (लूक २१:३४-३६) मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना आपल्या आशेबद्दल भरपूर आनंद आहे. त्यांना स्पष्टपणे समजलं आहे की आपल्या विश्‍वासू सेवकांनी स्वर्गात सेवा करायची की पृथ्वीवर हे फक्‍त यहोवाच ठरवू शकतो. अभिषिक्‍तजन आणि मोठा लोकसमुदाय या दोघांना ही जाणीव आहे की त्यांना मिळणारं प्रतिफळ हे यहोवाच्या अपार कृपेमुळे शक्य झालं आहे. ही अपार कृपा त्याने येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाची तरतूद करण्याद्वारे दाखवली आहे.—रोम. ३:२४. टेहळणी बुरूज१९.०९ २८ ¶१०; २९ ¶१२-१३

गुरुवार, १५ जुलै

परमेश्‍वराविषयींचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.—नहे. ८:१०.

तुम्हाला एखादी नवीन नेमणूक मिळाली आहे का? असेल, तर ती यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुमची नेमणूक बदलली म्हणजे तुमच्या आधीच्या नेमणुकीत तुमचं काम चांगलं नव्हतं किंवा आता कोणी तुमची कदर करत नाही, असा चुकीचा विचार करू नका. यहोवा आजही तुम्हाला कशी मदत करत आहे यावर आपलं लक्ष केंद्रित करा आणि प्रचार करत राहा. पहिल्या शतकातल्या विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या उदाहरणाचं अनुकरण करा. ते कोणत्याही ठिकाणी असले तरी ते “सबंध देशात वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करत गेले.” (प्रे. कार्ये ८:१, ४) प्रचार करत राहण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेता त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, सरकारने काही पायनियरांना एका देशातून काढून टाकलं तेव्हा ते अशा देशात जाऊन सेवा करू लागले, जिथे त्यांच्या भाषेत प्रचारकांची खूप गरज होती. आणि तिथे गेल्यावर काही महिन्यांतच ते प्रचार करत असलेल्या भाषेचे अनेक नवीन गट तयार झाले. आपला आनंद यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर अवलंबून असला पाहिजे. तेव्हा, आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर यहोवासोबत आपलं नातं घनिष्ठ असलं पाहिजे. आणि आपण बुद्धी, मार्गदर्शन आणि मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. लक्षात असू द्या, की आधीच्या नेमणुकीत तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यायचा आणि म्हणून तुम्हाला ती नेमणूक प्रिय होती. त्यामुळे तुम्हाला सध्या मिळालेली नेमणूकही मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, मग यहोवा तुम्हाला ही नेमणूकसुद्धा तितकीच प्रिय समजायला मदत करेल.—उप. ७:१०. टेहळणी बुरूज१९.०८ २४-२५ ¶१५-१६

शुक्रवार, १६ जुलै

तर मग, आपल्याला आध्यात्मिक जीवन देणाऱ्‍या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिले पाहिजे?—इब्री १२:९.

यहोवा देव आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपण त्याच्या अधीन राहिलं पाहिजे. आपल्यासाठी काय योग्य आहे याचे स्तर ठरवण्याचा अधिकार त्याला आहे. (प्रकटी. ४:११) पण फक्‍त याच कारणामुळे आपण त्याच्या अधीन राहत नाही, तर राज्य करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे यामुळेही आपण त्याच्या अधीन राहतो. मानव इतिहासात पाहिल्यावर आपल्याला कळतं की मानवांवर राज्य करणारे अनेक शासक किंवा राजे होऊन गेले. पण त्यांच्या तुलनेत यहोवा हाच सर्वात बुद्धिमान, प्रेमळ, दयाळू आणि कृपाळू राजा आहे. (निर्ग. ३४:६; रोम. १६:२७; १ योहा. ४:८) सर्व बाबतींत यहोवाची आज्ञा पाळण्यासाठी पुरेपूर मेहनत घेण्याद्वारे आपण यहोवाच्या अधीन राहतो. तसंच, चांगलं काय आणि वाईट काय हे स्वतः ठरवण्याच्या इच्छेचा प्रतिकार करण्याद्वारेही आपण यहोवाच्या अधीन राहतो. (नीति. ३:५) यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल आपण जितकं जास्त शिकत जातो तितकं जास्त आपल्याला त्याच्या अधीन राहणं सोपं जातं. असं का? कारण त्याची सर्व कार्यं याच गुणांवर आधारित आहेत. (स्तो. १४५:९) आपण जितकं जास्त यहोवाबद्दल शिकत जाऊ तितकं आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम वाढत जाईल. आणि यहोवावर प्रेम असल्यामुळे, काय करावं आणि काय करू नये यांबद्दल आपल्याला नियमांच्या सूचीची गरज पडणार नाही. टेहळणी बुरूज१९.०९ १४ ¶१, ३

शनिवार, १७ जुलै

माझं जू वाहायला सोपं व माझं ओझं हलकं आहे.—मत्त. ११:३०.

सैतान आज लोकांवर अशी ओझी लादतो जी ते उचलू शकत नाहीत. उदाहरणार्थ, यहोवा आपलं पाप कधीच माफ करणार नाही आणि आपण त्याच्या प्रेमाच्या लायकीचे नाही, असा लोकांनी विश्‍वास करावा ही सैतानाची इच्छा आहे. अशा खोट्या शिकवणींच्या ओझ्यांमुळे लोक दबून जातात आणि हताश होतात. (योहा. ८:४४) आपण जेव्हा येशूकडे ‘येतो’ तेव्हा आपल्या पापांची क्षमा होते. (मत्त. ११:२८) खरंतर, यहोवा आपल्या सर्वांवर मनापासून प्रेम करतो. (रोम. ८:३२, ३८, ३९) आज आपल्याला जीवनात जे ओझं वाहायला लागतं ते येशूने आपल्याला वाहायला सांगितलेल्या ओझ्यापेक्षा वेगळं आहे. उदाहरणार्थ, काम करून थकूनभागून घरी आल्यावर आपण फक्‍त दमूनच जात नाही, तर आपल्याला समाधानही वाटत नाही. पण याच्या अगदी उलट, यहोवाची आणि येशूची सेवा केल्यामुळे आपल्याला खूप समाधान वाटतं. आपण कदाचित थकून गेलेलो असू आणि त्या दिवशी संध्याकाळी मंडळीची सभा असेल तर तेव्हा कधीकधी आपल्याला सभेला जाण्यासाठी स्वतःवरच सक्‍ती करावी लागेल. पण सभेनंतर घरी परतल्यावर बऱ्‍याचदा आपल्याला ताजंतवानं आणि उत्साहित वाटतं. आपण प्रचार करतो आणि वैयक्‍तिक बायबल अभ्यास करतो त्याबाबतीतही ही गोष्ट तितकीच खरी आहे. आपण या गोष्टी करण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा आपल्याला तजेला आणि नवीन स्फूर्ती मिळते. टेहळणी बुरूज१९.०९ २० ¶१; २३-२४ ¶१५-१६

रविवार, १८ जुलै

रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा दिवस येत आहे.—१ थेस्सलनी. ५:२.

तो “दिवस” यायला थोडाच काळ राहिला आहे आणि म्हणून यहोवाची इच्छा आहे की आपण प्रचारकार्यात व्यस्त राहावं. आपण “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” आहोत की नाही याची आपण नेहमी खातरी करून घेतली पाहिजे. (१ करिंथ. १५:५८) शेवटच्या दिवसांत कोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडतील त्याबद्दल सांगताना येशूने हेही म्हटलं, की “तसंच, सर्व राष्ट्रांत आधी राज्याविषयीच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाणं गरजेचं आहे.” (मार्क १३:४, ८, १०; मत्त. २४:१४) जरा विचार करा, प्रत्येक वेळी तुम्ही प्रचाराला जाता, तेव्हा खरंतर तुम्ही बायबलमधली ही भविष्यवाणी पूर्ण करण्यात हातभार लावत असता. प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त लोक राज्याचा आनंदाचा संदेश ऐकत आहेत. उदाहरणार्थ, शेवटच्या दिवसांत जगभरात प्रचारकांच्या संख्येत किती वाढ झाली आहे त्याबद्दल विचार करा. १९१४ मध्ये ४३ देशांत ५,१५५ प्रचारक होते आणि आज २४० देशांत जवळपास ८५ लाख प्रचारक आहेत! पण असं असलं तरी आपलं काम अजून संपलेलं नाही. मानवजातीच्या सर्व समस्यांवर देवाचं राज्य हा एकमेव उपाय आहे आणि त्याबद्दल आपण प्रचार करत राहिला पाहिजे.—स्तो. १४५:११-१३. टेहळणी बुरूज१९.१० ८ ¶३; ९-१० ¶७-८

सोमवार, १९ जुलै

सर्व प्रकारच्या उदारतेसाठी तुम्हाला सर्व गोष्टींत समृद्ध केले जात आहे, आणि यामुळे आम्ही देवाला आभार व्यक्‍त करतो.—२ करिंथ. ९:११.

यहोवाने दावीद राजाला मदत करण्यासाठी बर्जिल्ल्यचा उपयोग केला. दावीद आणि त्याचे लोक अबशालोमपासून पळत होते तेव्हा ते “भुकेले” व “तान्हले” होते. अशा वेळी बर्जिल्ल्यने त्यांना मदत केली. तो वृद्ध होता तरी त्याने दावीद आणि त्याच्या सेवकांना मदत करण्यासाठी इतर काही जणांप्रमाणेच स्वतःचा जीव धोक्यात घातला. आता आपलं वय झालं आहे आणि म्हणून आपण यहोवासाठी उपयोगाचे नाही असा विचार बर्जिल्ल्यने केला नाही. याउलट, त्याच्याकडे ज्या गोष्टी होत्या त्यातून त्याने देवाच्या सेवकांना उदारपणे मदत केली. (२ शमु. १७:२७-२९) यावरून आपण काय शिकतो? आपलं वय कितीही असो, यहोवा आपल्या क्षेत्रात किंवा दुसऱ्‍या देशात राहणाऱ्‍या भाऊबहिणींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपला उपयोग करू शकतो. (नीति. ३:२७, २८; १९:१७) आपण प्रत्यक्षपणे त्यांना मदत करू शकत नसलो तरी जगभरात चाललेल्या कामासाठी दान देऊन आपण त्यांना मदत करू शकतो. मग गरजेच्या वेळी आणि ठिकाणी त्या दानाचा उपयोग आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो.—२ करिंथ. ८:१४, १५. टेहळणी बुरूज१९.१० २१ ¶६

मंगळवार, २० जुलै

जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपल्याला धरून राहतो.—नीति. १८:२४.

आपल्याला आधी कोणी दुखावलं असेल तर मनमोकळेपणे आपल्या भावना इतरांना सांगणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. (नीति. १८:१९) किंवा आपल्याला वाटेल की जवळचे मित्र बनवायला माझ्याकडे वेळ आणि ताकद नाही. असं असलं तरी आपण हार मानू नये. आपल्या भाऊबहिणींनी परीक्षेच्या काळादरम्यान आपली साथ द्यावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आजच त्यांच्यासोबत घनिष्ठ मैत्री करणं गरजेचं आहे. असं करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्याला जे वाटतं आणि आपण जे विचार करतो ते त्यांना सांगणं. (१ पेत्र १:२२) येशू आपल्या मित्रांसोबत मनमोकळेपणाने बोलायचा. असं करण्याद्वारे त्याने त्यांच्यावर भरवसा असल्याचं दाखवून दिलं. (योहा. १५:१५) आपणही त्याचं अनुकरण करू शकतो. आपला आनंद, चिंता आणि निराश करणाऱ्‍या गोष्टी आपण आपल्या मित्रांना सांगू शकतो. तसंच, कोणी आपल्याशी बोलत असेल तेव्हा त्याचं आपण लक्ष देऊन ऐकू शकतो. आणि असं केल्याने आपल्याला जाणवेल की आपलेही बरेचसे विचार, भावना आणि ध्येयं आपल्या मित्रांसारखेच आहेत. आपण जेव्हा आपले विचार आणि भावना आपल्या मित्रांना सांगतो आणि ते बोलत असताना त्यांचं लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा आपली मैत्री बहरते.—नीति. २७:९. टेहळणी बुरूज१९.११ ४ ¶८-९

बुधवार, २१ जुलै

प्रभू परमेश्‍वर असे म्हणतो.—यहे. २:४.

मोठ्या संकटाच्या दरम्यान आपण प्रचार करत असलेल्या संदेशात बदल होईल. आता आपण राज्याच्या आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत आहोत आणि शिष्य बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्या वेळी आपला संदेश गारांसारखा असेल. गारांचा मार जसा जोरात आणि थेट लागतो तसा आपला संदेश असेल. (प्रकटी. १६:२१) आपण सैतानाच्या जगाचा लवकरच नाश होणार आहे असा कदाचित प्रचार करू. पण आपण तेव्हा नक्की काय प्रचार करू आणि कशा पद्धतीने करू हे आपल्याला कालांतराने कळेल. मग त्या वेळी, आपण ज्या पद्धतींचा उपयोग करत होतो त्याच पद्धतींचा उपयोग करू का, की आणखी दुसऱ्‍या पद्धतींचा? हे आता आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला कोणत्याही पद्धतीने प्रचार करावा लागला तरी एक गोष्ट खातरीने म्हणता येईल. ती म्हणजे आपल्याला यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश धैर्याने सांगण्याचा बहुमान मिळेल! (यहे. २:३-५) आपल्या संदेशामुळे राष्ट्रं संतापतील आणि आपलं प्रचारकार्य कायमचं बंद करण्याचा प्रयत्न करतील. पण आता जसं आपण सेवाकार्य करताना यहोवावर विसंबून राहतो, तसं आपल्याला त्या वेळीही त्याच्यावर विसंबून राहावं लागेल. देव आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद देईल अशी आपण पक्की खातरी बाळगू शकतो.—मीखा ३:८. टेहळणी बुरूज१९.१० १६ ¶८-९

गुरुवार, २२ जुलै

काही जण विश्‍वासापासून भरकटले आहेत.—१ तीम. ६:१०.

“भरकटले आहेत” या शब्दांवरून आपल्याला समजतं की आपण गरज नसलेल्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलो, तर आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. यामुळे आपण “अनेक मूर्खपणाच्या व घातक इच्छांना बळी” पडू शकतो. (१ तीम. ६:९) पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की सैतान या इच्छांचा उपयोग आपला विश्‍वास कमी करण्यासाठी करतो. समजा आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत आणि आपण हवी ती गोष्ट विकत घेऊ शकतो. मग ज्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज नाही त्या विकत घेणं पूर्णपणे चुकीचं ठरेल का? नाही. पण अशा परिस्थितीत पुढील प्रश्‍नांवर विचार करा: एखादी वस्तू विकत घेण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे असले, तरी ती वस्तू वापरण्यासाठी व चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी माझ्याजवळ खरंच पुरेसा वेळ आणि शक्‍ती आहे का? तसंच, त्या वस्तू मला खूपच प्रिय वाटू लागतील का? येशूने एकदा एका तरुणाला आपली सेवा वाढवण्याचा सल्ला दिला, पण त्याने तो नाकारला. भौतिक गोष्टींवर असलेल्या प्रेमामुळे आपणही कदाचित त्या तरुणासारखंच सेवा वाढवण्याच्या संधी नाकारू. (मार्क १०:१७-२२) असं करण्यापेक्षा एक साधं जीवन जगणं जास्त चांगलं आहे. यामुळे आपण आपला मौल्यवान वेळ आणि शक्‍ती यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करू शकतो. टेहळणी बुरूज१९.११ १७-१८ ¶१५-१६

शुक्रवार, २३ जुलै

उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात.—नीति. २१:५.

देव तुम्हाला तुमच्या एखाद्या निर्णयानुसार “कार्य करण्याची” ताकद देऊ शकतो. (फिलिप्पै. २:१३) त्यामुळे, तुम्हाला कार्य करण्याची ताकद मिळावी म्हणून देवाकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला वेळ लागत आहे असं वाटत असलं तरी प्रार्थना करत राहा. येशूने म्हटलं होतं की “मागत राहा म्हणजे तुम्हाला [पवित्र आत्मा] दिलं जाईल.” (लूक ११:९, १३) त्यासोबतच योजना बनवा. कोणतंही काम सुरू करण्याआधी तुम्ही एक चांगली योजना बनवणं आणि त्या योजनेनुसार काम करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घेता तेव्हा तो पूर्ण करण्यासाठी जी विशिष्ट पावलं उचलावी लागतील त्यांची एक यादी बनवा. एखादं मोठं काम साध्य करायचं असल्यास त्याची छोट्या-छोट्या कामांमध्ये विभागणी करा. मग तुम्ही जसजसं एक-एक काम पूर्ण करत जाल, तसतसं तुम्ही बरचसं काम पूर्ण केलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. प्रेषित पौलने भाऊबहिणींना सांगितलं की तो करिंथमध्ये पोहोचल्यावर दान गोळा करण्याऐवजी, त्यांनी “दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी” दान बाजूला काढून ठेवावं. (१ करिंथ. १६:२) एखाद्या कामाची लहान कामांमध्ये विभागणी केली तर आपल्याला त्याचं दडपणही येणार नाही. टेहळणी बुरूज१९.११ २९ ¶१३-१४

शनिवार, २४ जुलै

ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्‍वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाही.—स्तो. ९:१०.

यहोवाचं नाव, त्याने जे म्हटलं व त्याची कार्यं माहीत असल्यामुळे आपण त्याला ओळखतो असं आपल्याला वाटू शकतं. पण यहोवाला जवळून ओळखण्यासाठी आपल्याला आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे. आपण यहोवाबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल शिकत राहिलं पाहिजे. यामुळेच आपल्याला कळेल की तो एखादी गोष्ट का बोलतो व करतो. तसंच आपल्याला हेदेखील समजायला मदत होईल की आपण जे विचार आणि कार्यं करतो ते त्याला आवडतात की नाही. आणि एकदा का आपल्याला यहोवाची इच्छा समजली की मग आपण शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य केलं पाहिजे. आपल्याला यहोवाची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे काही लोक कदाचित आपली थट्टा करतील. आणि आपण जेव्हा सभांना जायला लागतो तेव्हा तर ते विरोधही करतील. पण अशा परिस्थितीत आपण यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही. खरंतर यहोवावर भरवसा ठेवणं हे त्याच्यासोबत कायम टिकणाऱ्‍या मैत्रीचा पाया घालण्याची सुरुवात आहे. पण आपण त्याला खरंच इतकं जवळून ओळखू शकतो का? हो नक्कीच! टेहऴणी बुरूज१९.१२ १६-१७ ¶३-४

रविवार, २५ जुलै

संतती ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे.—स्तो. १२७:३.

आईवडिलांना कधीकधी आपल्या मुलांना शिकवणं कठीण वाटू शकतं. पण त्यांनी लक्षात ठेवायला हवं की मुलं ही यहोवाने दिलेली भेट आहे. तो आईवडिलांना मदत करायला नेहमी तयार असतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो. तसंच, तो त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर बायबल, ख्रिस्ती प्रकाशनं आणि मंडळीतल्या अनुभवी पालकांच्या उदाहरणाद्वारे व त्यांनी दिलेल्या सल्ल्यांद्वारे देतो. असं म्हटलं जातं की मुलांना वाढवणं हा २० वर्षांचा प्रकल्प आहे. यादरम्यान आईवडील आपल्या मुलांना खूपकाही देतात. पण त्यांपैकी सर्वात मौल्यवान गोष्टी म्हणजे आपला वेळ, प्रेम आणि बायबल आधारित प्रशिक्षण या आहेत. हे खरं आहे की आईवडील देत असलेल्या प्रशिक्षणाला प्रत्येक मूल वेगवेगळं प्रतिसाद देईल. असं असलं तरी पुष्कळ मुलं यहोवावर प्रेम करायला शिकले आहेत कारण त्यांचे आईवडील यहोवावर प्रेम करणारे होते. त्या मुलांना आशियामध्ये राहणाऱ्‍या जोॲना-मे यांच्यासारखं वाटतं. त्या म्हणतात: “माझ्या आईबाबांनी मला यहोवावर प्रेम करायला शिकवलं यांबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. त्यांनी मला फक्‍त जीवनच दिलं नाही, तर एक अर्थपूर्ण जीवन दिलं आहे.” (नीति. २३:२४, २५) खरंतर, आपल्या लाखो भाऊबहिणींच्याही याच भावना आहेत! टेहळणी बुरूज१९.१२ २७ ¶२१-२२

सोमवार, २६ जुलै

देवाकडून मिळणाऱ्‍या या सांत्वनाद्वारे आपल्यालाही इतरांचे, कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत सांत्वन करता यावे.—२ करिंथ. १:४.

कोणत्या भाऊबहिणींना मदतीची आणि सांत्वनाची गरज आहे हे ओळखणं इतकं कठीण नाही. आपल्याला इतरांना मदत करण्याची भीती वाटत असली तरी आपण त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजे. उदाहरणार्थ, सांत्वनाची गरज असलेल्या व्यक्‍तीशी काय बोलावं किंवा तिला कशी मदत करावी हे माहीत नसल्यामुळे आपल्याला भीती वाटू शकते. तरी आपल्याला काळजी आहे हे दाखवण्याद्वारे आपण चांगले सांत्वन देणारे बनू शकतो. आपण जसजसं जगाच्या अंताच्या जवळ जात आहोत, तसतसं जगाची परिस्थिती आणखी खराब होत जाईल आणि जीवन जगणंही कठीण होत जाईल. (२ तीम. ३:१३) तसंच, वारशाने मिळालेलं पाप आणि अपरिपूर्णता यांमुळे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला पुढेही सांत्वनाची गरज असेल. प्रेषित पौल त्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत परीक्षांचा धीराने सामना करू शकला. याचं एक कारणं म्हणजे, ख्रिस्ती बांधवांकडून त्याला मिळालेलं सांत्वन. त्यांच्या या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करून आपणही आपल्या भाऊबहिणींना विश्‍वासात टिकून राहण्यासाठी मदत करू शकतो.—१ थेस्सलनी. ३:२, ३. टेहळणी बुरूज२०.०१ १२-१३ ¶१७-१९

मंगळवार, २७ जुलै

जे प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणवतात त्यांची तू परीक्षा घेतली.—प्रकटी. २:२.

अभिषिक्‍त जन आपल्याला खास वागणूक मिळाली पाहिजे अशी अपेक्षा करत नाहीत. (फिलिप्पै. २:२, ३) त्यांना हे माहीत आहे की यहोवाने त्यांना अभिषिक्‍त केलं तेव्हा त्याबद्दल त्याने सर्वांना कळू दिलं नाही. म्हणून जर इतरांनी त्यांच्या अभिषिक्‍त होण्याबद्दल त्यांच्यावर लगेच विश्‍वास ठेवला नाही, तर याचं त्यांना आश्‍चर्य वाटत नाही. कारण बायबल म्हणतं की देवाने एखाद्याला खास जबाबदारी दिली, असं जर कोणी म्हटलं तर त्याच्यावर लगेच विश्‍वास ठेवू नका. आणि ही गोष्ट अभिषिक्‍त जनांना माहीत आहे. तसंच, लोकांनी आपल्याकडे विशेष लक्ष द्यावं असंही एका अभिषिक्‍त व्यक्‍तीला वाटणार नाही. त्यामुळे ते ज्या कोणाला भेटतात त्यांना, ‘मी अभिषिक्‍त आहे’ असं सांगणार नाहीत. त्यासोबतच, ते अभिषिक्‍त असल्याची बढाईही मारणार नाही. (१ करिंथ. ४:७, ८) तसंच, अभिषिक्‍त झाल्याच्या आपापल्या अनुभवांबद्दल चर्चा करण्यासाठी किंवा बायबलचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक खासगी समूह तयार करता यावा म्हणून ते इतर अभिषिक्‍त जनांना शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. (गलती. १:१५-१७) अभिषिक्‍त जनांनी असं केलं तर ख्रिस्ती मंडळीत एकोपा राहणार नाही. तसंच, ते पवित्र आत्म्याच्या विरोधात कार्यं करत असतील जो देवाच्या लोकांमध्ये शांती आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो.—रोम. १६:१७, १८. टेहळणी बुरूज२०.०१ २८ ¶६-७

बुधवार, २८ जुलै

या गोष्टी घडू लागल्यावर डोकं वर करून ताठ उभे राहा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.—लूक २१:२८.

एक वेळ अशी येईल जेव्हा लोकांचा राग आपल्यावर भडकेल. कारण त्यांच्या धर्मांचा नाश झाला असेल. आणि यहोवाचे साक्षीदार अजूनही आपल्या देवाची उपासना करत आहेत हे समजल्यावर ते खूप संतापतील. आपण फक्‍त कल्पना करू शकतो की त्या वेळी सर्वत्र कसा गोंधळ माजलेला असेल. ते आपला राग कोणत्या न कोणत्या मार्गांनी व्यक्‍त करतील, जसं की इंटरनेटद्वारे. राष्ट्रं आणि त्यांचा शासक सैतान आपला द्वेष करतील, कारण आपलाच धर्म काय तो त्या वेळी शाबूत असेल. या पृथ्वीवरून सर्व धर्मांचा नाश करण्याचं त्यांचं ध्येय ते पूर्ण करू शकले नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल आणि म्हणून ते त्यांचं सर्व लक्ष आपल्यावर केंद्रित करतील. हीच ती वेळ असेल जेव्हा राष्ट्रं मागोगचा गोग ही भूमिका घेतील. ती सर्व एकत्र येतील आणि यहोवाच्या लोकांवर हल्ला करायला आपल्या संपूर्ण शक्‍तीचा वापर करतील. (यहे. ३८:२, १४-१६) मोठ्या संकटादरम्यान काय होणार याबद्दल सविस्तर माहिती नसल्यामुळे आपल्याला कदाचित चिंता वाटेल. पण एक गोष्ट आपल्याला नक्कीच माहीत आहे. ती म्हणजे, आपल्याला मोठ्या संकटाला घाबरण्याची गरज नाही, कारण त्या वेळी आपला जीव वाचवण्यासाठी गरजेची असलेली निर्देशनं यहोवा आपल्याला देईल.—स्तो. ३४:१९. टेहळणी बुरूज१९.१० १६-१७ ¶१०-११

गुरुवार, २९ जुलै

हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत.—स्तो. ४०:५.

आपल्याला यहोवाबद्दल कदर आहे असा फक्‍त आपण विचारच करत नाही, तर आपल्या शब्दांद्वारे आणि कार्यांद्वारे व्यक्‍तही करतो. यावरून दिसून येतं की आपण जगातल्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहोत. कारण आज आपण अशा लोकांमध्ये राहत आहोत ज्यांना देवाने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींची कदर नाही. खरंतर, लोक उपकारांची जाण न ठेवणारे असतील हे ‘शेवटच्या दिवसांतलं’ एक चिन्ह आहे. (२ तीम. ३:१, २) आणि आपल्याला त्यांच्यासारखं वागण्याची बिलकूल इच्छा नाही! यहोवाची इच्छा आहे की त्याच्या सर्व उपासकांमध्ये ऐक्य असावं. खरंतर, आपसातलं प्रेम हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३५) आपल्याही भावना स्तोत्रकर्त्याप्रमाणे आहेत. त्याने म्हटलं: “पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तो. १३३:१) आपलं भाऊबहिणींवर प्रेम असतं तेव्हा आपलं यहोवावर प्रेम असल्याचं दिसून येतं. (१ योहा. ४:२०) आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आपण अशा कुटुंबाचे भाग आहोत ज्यात भाऊबहीण “एकमेकांशी प्रेमाने” वागतात व “कोमलतेने सहानुभूती” दाखवतात.—इफिस. ४:३२. टेहळणी बुरूज२०.०२ ९ ¶६-७

शुक्रवार, ३० जुलै

परमेश्‍वराने हन्‍नेवर अनुग्रह केला.—१ शमु. २:२१.

हन्‍ना ज्या समस्यांमुळे चिंतित होती त्या सर्व लगेच दूर झाल्या नाहीत. तिची परिस्थिती आहे तशीच होती. तिला अजूनही पनिन्‍नासोबत एकाच घरात राहावं लागत होतं. तसंच, पनिन्‍नाचं वागणं-बोलणं आता बदललं होतं असंही बायबलमध्ये सांगितलेलं नाही. हन्‍नाला पुढेही पनिन्‍नाचं खोचक बोलणं सहन करत राहावं लागलं. पण या वेळी मात्र हन्‍ना तिच्या बोलण्यामुळे खचून गेली नाही तर तिने आपल्या मनाची शांती टिकवून ठेवली. हन्‍ना हे कसं करू शकली? तिला भरवसा होता की यहोवाने तिची प्रार्थना ऐकली आहे आणि म्हणून तिने चिंता करायचं सोडून दिलं. खरंतर, तिने यहोवाला तिचं सांत्वन करू दिलं. काही काळानंतर यहोवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि तिला मुलं झाली. (१ शमु. १:२, ६, ७, १७-२०) आपल्या समस्या दूर झाल्या नाहीत तरी आपण मनाची शांती पुन्हा मिळवू शकतो. आपण कळकळून यहोवाला प्रार्थना केली आणि सभांना नियमितपणे हजर राहिलो तर याचा अर्थ आपल्या समस्या लगेचच दूर होतील असं नाही; काही समस्या कदाचित आहेत तशाच राहतील. पण हन्‍नाच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला मिळतं, की आपल्या बेचैन मनाला दिलासा देण्यापासून कोणतीच गोष्ट यहोवाला रोखू शकत नाही. तो आपल्याला कधीच विसरणार नाही आणि आज न्‌ उद्या तो आपल्या विश्‍वासूपणाचं प्रतिफळ नक्कीच देईल.—इब्री ११:६. टेहळणी बुरूज२०.०२ २२ ¶९-१०

शनिवार, ३१ जुलै

ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल.—नीति. ९:९.

भाऊबहिणींनी योग्य निर्णय घ्यावेत म्हणून मंडळीतले वडील त्यांना बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांची आठवण करून देतात. त्यांनी वेळीच असं करणं का गरजेचं आहे? एलीच्या उदाहरणाचा विचार करा. महायाजक एलीला दोन मुलं होती आणि त्यांच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. पण त्या मुलांना यहोवाबद्दल काहीच आदर नव्हता. याजक म्हणून निवासमंडपात सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. असं असलं तरी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला, यहोवासाठी केल्या जाणाऱ्‍या अर्पणांचा घोर अनादर केला आणि निर्लज्जपणे अनैतिक कामं केली. (१ शमु. २:१२-१७, २२) नियमशास्त्राप्रमाणे एलीच्या मुलांना मृत्युदंडाची शिक्षा मिळायला हवी होती. पण त्यांना कडक शब्दात ताडन देण्याऐवजी एलीने त्यांना सौम्यपणे सल्ला दिला आणि निवासमंडपात सेवा करू दिली. (अनु. २१:१८-२१) या परिस्थितीला एलीने ज्या प्रकारे हाताळलं त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं? त्याने एलीला म्हटलं: “तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करत आहेस?” यहोवाने ठरवलं की एलीच्या दोन्ही दुष्ट मुलांना तो मृत्युदंड देईल.—१ शमु. २:२९, ३४. टेहळणी बुरूज२०.०३ १९ ¶४-५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा