वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. ६७-७९
  • जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ जून
  • बुधवार, २ जून
  • गुरुवार, ३ जून
  • शुक्रवार, ४ जून
  • शनिवार, ५ जून
  • रविवार, ६ जून
  • सोमवार, ७ जून
  • मंगळवार, ८ जून
  • बुधवार, ९ जून
  • गुरुवार, १० जून
  • शुक्रवार, ११ जून
  • शनिवार, १२ जून
  • रविवार, १३ जून
  • सोमवार, १४ जून
  • मंगळवार, १५ जून
  • बुधवार, १६ जून
  • गुरुवार, १७ जून
  • शुक्रवार, १८ जून
  • शनिवार, १९ जून
  • रविवार, २० जून
  • सोमवार, २१ जून
  • मंगळवार, २२ जून
  • बुधवार, २३ जून
  • गुरुवार, २४ जून
  • शुक्रवार, २५ जून
  • शनिवार, २६ जून
  • रविवार, २७ जून
  • सोमवार, २८ जून
  • मंगळवार, २९ जून
  • बुधवार, ३० जून
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. ६७-७९

जून

मंगळवार, १ जून

तिची सवत तिला मनस्वी चिडवी, तेणेकरून ती कुढत राही.—१ शमु. १:६.

संदेष्टा शमुवेलच्या आईला, हन्‍नाला काही कठीण समस्यांचा सामना करावा लागला. बऱ्‍याच वर्षांपर्यंत तिला मूल होत नव्हतं. (१ शमु. १:२) त्या काळी, बरेच इस्राएली लोक असा विचार करायचे की एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल, तर याचा अर्थ तिच्यावर देवाचा आशीर्वाद नाही. आणि एका स्त्रीसाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट होती. यामुळे हन्‍ना खूपच निराश होती. (उत्प. ३०:१, २) दुःखात भर म्हणजे, तिच्या नवऱ्‍याला दुसरी बायको होती. तिचं नाव होतं पनिन्‍ना आणि तिला मुलं होती. यामुळे ती हन्‍नाला टोमणे मारायची. हन्‍नाला या समस्यांना तोंड देणं कठीण गेलं. ती इतकी निराश झाली की “ती रडे व काही खात नसे.” तिचं मन खूपच कटू झालं होतं. (१ शमु. १:७, १०) मग, अशा परिस्थितीत हन्‍नाला कुठून दिलासा मिळाला? हन्‍नाने यहोवाला प्रार्थना करून आपलं मन मोकळं केलं. प्रार्थना केल्यानंतर तिने आपल्या परिस्थितीबद्दल महायाजक एलीला सांगितलं. यावर एली तिला म्हणाला, “सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.” याचा काय परिणाम झाला? हन्‍नाने “परत जाऊन अन्‍न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:१७, १८) खरंच, प्रार्थनेमुळे हन्‍नाचं मन शांत झालं. टेहळणी बुरूज२०.०२ २१ ¶४-५

बुधवार, २ जून

तुमचे बोलणे नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्याप्रमाणे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल.—कलस्सै. ४:६.

लवकरच यहोवा या व्यवस्थेचा नाश करणार आहे. फक्‍त “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असणाऱ्‍या लोकांना वाचवलं जाईल. (प्रे. कार्ये १३:४८) तर मग आपल्याला असं वाटणं स्वाभाविकच आहे की आपल्या नातेवाइकांनीसुद्धा सत्यात यावं आणि आपल्यासोबत यहोवाची सेवा करावी. आपला प्रेमळ पिता यहोवा याची अशी इच्छा नाही की “कोणाचाही नाश व्हावा . . . तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असे त्याला वाटते.” (२ पेत्र ३:९) आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण आनंदाचा संदेश सांगतो तेव्हा एकतर तो योग्य किंवा अयोग्य पद्धतीने सांगितला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, अनोळखी लोकांना प्रचार करताना कदाचित आपण विचारपूर्वक बोलू. पण आपल्या नातेवाइकांना प्रचार करताना आपण कदाचित मागचा पुढचा विचार न करता बोलू. आपण पहिल्यांदा आपल्या नातेवाइकांना ज्या प्रकारे सत्य सांगितलं त्याबद्दल विचार करून आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना वाईट वाटू शकतं. आपण त्यांना त्या वेळी वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं, तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटू शकतं. आपल्या नातेवाइकांशी बोलताना आपण प्रेषित पौलने आजच्या वचनात दिलेला सल्ला लक्षात ठेवला पाहिजे. आपण असं केलं नाही, तर संदेशाबद्दल उत्सुकता निर्माण होण्याऐवजी त्यांचं मन दुखावलं जाईल. टेहळणी बुरूज१९.०८ १४-१५ ¶३-५

गुरुवार, ३ जून

[ख्रिस्ताने] तुमच्याकरता एक आदर्श घालून दिला, यासाठी की तुम्ही त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करावे.—१ पेत्र २:२१.

देवाच्या पुत्राबद्दल पुढे दिलेली सत्यं शिकल्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? संपूर्ण विश्‍वात यहोवानंतर कोणी श्रेष्ठ असेल तर तो येशू आहे. त्याने स्वखुशीने त्याचं जीवन आपल्यासाठी खंडणी म्हणून दिलं. आपण आपल्या कार्यांद्वारे खंडणीवर विश्‍वास असल्याचं दाखवतो तेव्हा आपल्याला पापांची क्षमा मिळू शकते, आपली देवासोबत मैत्री होऊ शकते आणि आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं. (योहा. ३:१६) येशू हा आपला महायाजक आहे. त्याची इच्छा आहे की खंडणीमुळे आपल्याला फायदा व्हावा आणि देवासोबत आपलं घनिष्ठ नातं असावं. (इब्री ४:१५; ७:२४, २५) यहोवाने येशूला आपल्या राज्याचा राजा म्हणून नेमलं आहे. यहोवा आपलं नाव पवित्र करण्यासाठी, दुष्टाईचा अंत करण्यासाठी आणि येणाऱ्‍या नंदनवनात मानवांना कायम टिकणारे आशीर्वाद देण्यासाठी येशूचा उपयोग करेल. (मत्त. ६:९, १०; प्रकटी. ११:१५) येशू आपला आदर्श आहे आणि आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. त्याने त्याचं संपूर्ण जीवन देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिलं आणि असं करून त्याने आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं. (योहा. ४:३४) बायबलमध्ये येशूबद्दल दिलेलं सत्य तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्ही देवाच्या पुत्रावर प्रेम करू लागता. ते प्रेम तुम्हाला तुमचं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी प्रेरित करतं; येशूनेही तेच केलं होतं. टेहळणी बुरूज२०.०३ १० ¶१२-१३

शुक्रवार, ४ जून

प्रार्थना करत राहा.—१ थेस्सलनी. ५:१७.

येशूने पृथ्वीवर असताना आपल्या शेवटच्या दिवशी अनेकदा प्रार्थना केली. त्याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ कोणत्या गोष्टी केल्या जाव्यात हे त्याने शिष्यांना दाखवलं तेव्हा त्यांना भाकर आणि द्राक्षारस देण्याआधी त्याने प्रार्थना केली. (१ करिंथ. ११:२३-२५) तसंच, ज्या ठिकाणी शेवटचा वल्हांडणाचा सण साजरा करण्यात आला तिथून निघण्याआधीही येशूने आपल्या शिष्यांसोबत प्रार्थना केली. (योहा. १७:१-२६) नंतर रात्री तो आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने इथे पोचला, तेव्हादेखील त्याने बऱ्‍याचदा प्रार्थना केली. (मत्त. २६:३६-३९, ४२, ४४) इतकंच काय तर येशूचे शेवटचे शब्ददेखील एक प्रार्थनाच होती. (लूक २३:४६) पृथ्वीवर असताना शेवटच्या दिवशी ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या त्यांबद्दल येशूने यहोवाला प्रार्थना केली. येशू परीक्षेचा सामना करू शकला याचं एक कारण म्हणजे त्याने प्रार्थनेत यहोवाकडे मदत मागितली. पण याउलट, त्याचे शिष्य त्या रात्री सतत प्रार्थना करण्यात कमी पडले. याचा काय परिणाम झाला? त्या रात्री जेव्हा त्यांना परीक्षांचा सामना करावा लागला तेव्हा त्यांचं धैर्य खचलं. (मत्त. २६:४०, ४१, ४३, ४५, ५६) यावरून आपल्याला समजतं, की आपण येशूचं अनुकरण केलं आणि ‘प्रार्थना करत राहिलो’ तरच परीक्षेच्या वेळी आपण विश्‍वासात टिकून राहू शकू. टेहळणी बुरूज१९.०४ ९ ¶४-५

शनिवार, ५ जून

मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.—मला. ३:६.

यहोवाला भूतविद्येची घृणा वाटते. यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं: “आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” (अनु. १८:१०-१२) आज ख्रिस्ती यहोवाने दिलेल्या नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. पण भूतविद्येबद्दल यहोवाच्या भावना बदलेल्या नाहीत हे आपल्याला माहीत आहे. सैतान भूतविद्येचा उपयोग करून लोकांचं नुकसान करतो, त्यामुळे यहोवा त्याबद्दल आपल्याला सावध करतो. सैतान भूतविद्येचा उपयोग करून खोट्या शिकवणी पसरवतो. त्यातलीच एक शिकवण म्हणजे मृत लोक दुसऱ्‍या एका ठिकाणी जिवंत आहेत. (उप. ९:५) भूतविद्येचा वापर करून सैतान लोकांना धाकात ठेवतो आणि त्यांना यहोवापासून दूर नेतो. सैतानाचं मुख्य ध्येय हेच आहे की भूतविद्या करणाऱ्‍या लोकांनी यहोवावर नाही, तर दुष्टात्म्यांवर भरवसा ठेवावा. टेहळणी बुरूज१९.०४ २१ ¶५-६

रविवार, ६ जून

तू जर वाईट काम करत असशील तर भीती बाळग.—रोम. १३:४.

मुलांचं लैंगिक शोषण हे खूप गंभीर पाप आहे. मुलांचं शोषण करणारी व्यक्‍ती त्यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्‌वस्त करून टाकते. मुलं सहसा अशा व्यक्‍तीवर विश्‍वास ठेवतात, पण ती व्यक्‍ती याचा फायदा उचलून त्यांचं शोषण करते. ती त्या मुलांचा विश्‍वासघात करते. यामुळे त्यांना असुरक्षित वाटू लागतं. अशा प्रकारच्या घृणित पापापासून मुलांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसंच, ज्यांच्यावर असा अन्याय झाला आहे त्यांना सांत्वन आणि मदत पुरवणंही खूप गरजेचं आहे. (१ थेस्सलनी. ५:१४) मंडळीतील एखादी व्यक्‍ती जेव्हा मुलांचं लैंगिक शोषण करते, तेव्हा ती मंडळीवर कलंक आणते. (मत्त. ५:१६; १ पेत्र २:१२) जे लोक पश्‍चात्ताप न करता गंभीर पाप करत राहतात आणि मंडळीच्या नावावर कलंक लावतात अशांना आपण मंडळीत कधीच राहू देत नाही. मंडळीतल्या एखाद्याने जर कायद्याचं उल्लंघन केलं, जसं की मुलांचं लैंगिक शोषण, तर मग तो सरकारी अधिकाऱ्‍यांविरुद्ध पाप करत आहे असा त्याचा अर्थ होईल. (प्रेषितांची कार्ये २५:८ पडताळून पाहा.) हे खरं आहे की मंडळीतल्या वडिलांना देशाच्या कायद्यानुसार इतरांना शिक्षा देण्याचा हक्क नाही. पण वडील कधीच मुलांचं शोषण करणाऱ्‍या व्यक्‍तीला कायद्यानुसार होणाऱ्‍या शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. टेहळणी बुरूज१९.०५ ९ ¶४-७

सोमवार, ७ जून

या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे.—१ करिंथ. ३:१९.

यहोवा देव आपला महान शिक्षक असल्यामुळे आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. (यश. ३०:२०, २१) आपल्याला “सर्व बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज” होण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते देवाचं वचन आपल्याला पुरवतं. (२ तीम. ३:१७) बायबलच्या शिकवणींनुसार चालल्याने आपण ‘जगाच्या बुद्धीला’ बढावा देणाऱ्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ बनतो. (स्तो. ११९:९७-१००) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, जगाची बुद्धी सहसा शारीरिक इच्छांना बढावा देत असल्यामुळे ती लोकांना हवीहवीशी वाटते. त्यामुळे आपल्यावर जगातल्या लोकांसारखा विचार करण्याचा आणि त्यांच्याप्रमाणे वागण्याचा दबाव येतो. अशा वेळी यांचा विरोध करायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. म्हणूनच बायबल म्हणतं, की “मानवी परंपरांनुसार व जगाच्या प्राथमिक गोष्टींनुसार असलेले तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा.” (कलस्सै. २:८) शेवटच्या काळाबद्दल बायबलमध्ये आधीच सांगण्यात आलं होतं की लोक “चैनीची आवड असलेले” बनतील. (२ तीम. ३:४) आज लैंगिक संबंधांतून होणारा भयंकर रोग, जसं की एड्‌स जगभरात पसरला आहे. या सर्व गोष्टींवरून दिसून येतं की जग ज्याला चांगली जीवनशैली म्हणतं ती खरंच किती मूर्खपणाची आहे.—२ पेत्र २:१९. टेहळणी बुरूज१९.०५ २१ ¶१-२; २२ ¶४-५

मंगळवार, ८ जून

सैतानाच्या डावपेचांविरुद्ध स्थिर उभे राहा.—इफिस. ६:११.

सैतानाने इस्राएली लोकांना विश्‍वास करायला लावला की शेतीच्या उत्पन्‍नात भरभराट हवी असेल तर त्यांना मूर्तिपूजा करणाऱ्‍या लोकांसारख्या विधी पाळाव्या लागतील. कनानी लोक विश्‍वास करायचे की विशिष्ट विधी पाळल्या तरच त्यांचा देव पाऊस पाडेल. ज्या इस्राएली लोकांचा यहोवावर विश्‍वास नव्हता, त्यांना वाटत होतं की बआल दैवताची उपासना करणं हा दुष्काळ टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्यांनी बआल या खोट्या दैवतासाठी मूर्तीपूजक लोकांसारख्या विधी पाळायला सुरुवात केली. सैतानाने त्यांना अनैतिक इच्छा पूर्ण करण्याचा बढावाही दिला. मूर्तिपूजा करणारी राष्ट्रं अतिशय घृणित अनैतिक गोष्टी करून त्यांच्या दैवतांची उपासना करायचे. अशा प्रकारच्या अनैतिक उपासनेत स्त्री आणि पुरुष मंदिरात वेश्‍याव्यवसाय करायचे. समलैंगिकता आणि इतर अनैतिक गोष्टी फक्‍त खपवूनच घेतल्या जात नव्हत्या तर त्या अगदी सर्वसामान्य झाल्या होत्या. (अनु. २३:१७, १८; १ राजे १४:२४) अशा गोष्टी केल्यामुळे त्यांचा देव पाऊस पाडेल आणि यामुळे शेतीच्या उत्पन्‍नात वाढ होईल, असा विश्‍वास मूर्तिपूजा करणारे लोक करायचे. बरेचसे इस्राएली लोक या अनैतिक कार्यांकडे आकर्षित झाले आणि यामुळे त्यांनी खोट्या दैवतांची उपासना करण्याचा निर्णय घेतला. टेहळणी बुरूज१९.०६ २ ¶३; ४ ¶७-८

बुधवार, ९ जून

तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.—इब्री ६:१०.

बेथेल सेवा आणि इतर पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्या हजारो भाऊबहिणींना नवीन नेमणूक देण्यात आली आहे. या विश्‍वासू भाऊबहिणींना आपली आवडती नेमणूक सोडणं खूप कठीण जाऊ शकतं. तुम्हीही त्यांच्यापैकी एक असाल तर या बदलाशी जुळवून घ्यायला कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? दररोज बायबलचं वाचन करण्याद्वारे आणि त्यावर मनन करण्याद्वारे यहोवाच्या जवळ राहा. तसंच, तुमच्या नवीन मंडळीत प्रचार कार्यात पुरेपूर सहभाग घ्या. आधी इतकी सेवा करणं शक्य नसलं, तरी जे लोक विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहतात त्यांना तो नेहमी आठवणीत ठेवतो. तुमचं राहणीमान साधं ठेवा. सैतानाच्या जगातल्या चिंतांना तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येऊ देऊ नका. (मत्त. १३:२२) यहोवाची सेवा न करणारे लोक, तुमचे नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला सैतानाच्या जगात भरपूर पैसा कमवण्याचा सल्ला देतील. पण अशा दबावांना बळी पडू नका. (१ योहा. २:१५-१७) याऐवजी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा. तो तुमच्या आध्यात्मिक, भावनिक आणि भौतिक गरजा “योग्य वेळी” पूर्ण करेल.—इब्री ४:१६; १३:५, ६. टेहळणी बुरूज१९.०८ २० ¶४; २१-२२ ¶७-८

गुरुवार, १० जून

तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.—स्तो. ५५:२२.

तुम्ही तणावाचा सामना करत आहात का? आपल्याला होणारा भावनिक त्रास यहोवा समजू शकतो, हे जाणून आपल्याला खरंच खूप दिलासा मिळतो! त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि तो आपले विचार व भावनादेखील समजू शकतो. (स्तो. १०३:१४; १३९:३, ४) आपण यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिलो, तर तो आपल्याला तणावाचा सामना करण्यासाठी नक्कीच मदत करेल. तणावामुळे आपण नकारात्मक विचार करायला लागू शकतो आणि यामुळे आपण निराश होऊ शकतो. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर नेहमी लक्षात असू द्या की तणावाचा सामना करण्यासाठी यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. तो तुम्हाला कशी मदत करेल? आपल्या समस्या, आपल्याला कसं वाटतं हे आपण त्याला सांगावं अशी त्याची इच्छा आहे. आणि आपल्याला त्याच्या वचनातून हमी मिळते की मदतीसाठी केलेल्या प्रार्थनांचं उत्तर तो आपल्याला देईल. (स्तो. ५:३; १ पेत्र ५:७) म्हणून आपल्या समस्यांबद्दल वारंवार यहोवाला प्रार्थनेत सांगा. अर्थात, तो आपल्याशी आज थेटपणे बोलत नाही. पण त्याचं वचन बायबल आणि त्याची संघटना यांच्याद्वारे तो आपल्याशी संवाद साधतो. बायबलमधल्या अहवालांमुळे आपल्याला सांत्वन आणि आशा मिळू शकते. तसंच, आपले बंधुभगिनीही आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतात.—रोम. १५:४; इब्री १०:२४, २५. टेहळणी बुरूज१९.०६ १६ ¶७-८

शुक्रवार, ११ जून

माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.—मत्त. २४:९.

छळाचा सामना करताना आपण यहोवासमोर “आपले मनोगत पाण्यासारखे” ओतले पाहिजे आणि आपल्या प्रेमळ पित्याला मनातल्या सर्व चिंता आणि भीती सांगितली पाहिजे. (विलाप. २:१९) तुम्ही जितकं जास्त या प्रकारे प्रार्थना कराल, तितकं जास्त तुम्हाला यहोवाच्या जवळ आल्यासारखं वाटेल. (रोम. ८:३८, ३९) देवाच्या राज्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल पक्की खात्री बाळगा. (गण. २३:१९) या आशीर्वादांबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर सैतानाला आणि त्याच्या साथीदारांना आपल्याला घाबरवणं सोपं जाईल. (नीति. २४:१०; इब्री २:१५) देवाच्या राज्याबद्दलची अभिवचनं आणि ती का खरी ठरतील यांवर अभ्यास करण्यासाठी वेळ काढा. यामुळे आपल्याला कशी मदत होईल? स्टॅनली जोन्स याच्यासोबत काय घडलं ते लक्षात घ्या. आपल्या विश्‍वासामुळे त्याला सात वर्षांसाठी तुरुंगवास सोसावा लागला. त्या वेळी त्याला विश्‍वासू राहायला कशामुळे मदत झाली? तो म्हणतो: “देवाचं राज्य आणि ते भविष्यात काय साध्य करेल यांबद्दल मला माहीत होतं. त्याबद्दल माझ्या मनात कधीच शंका आली नाही आणि त्यामुळे मला कोणीच यहोवापासून दूर करू शकलं नाही.” जर तुम्हाला देवाच्या अभिवचनांवर पक्का भरवसा असेल तर तुम्ही कोणत्याही भीतीला बळी पडणार नाही.—नीति. ३:२५, २६. टेहळणी बुरूज१९.०७ २ ¶१; ३ ¶६-७

शनिवार, १२ जून

कोणत्याही शहरात किंवा गावात गेल्यावर तिथे कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तिथून निघेपर्यंत त्याच्याकडेच मुक्काम करा.—मत्त. १०:११.

शिष्य बनवण्याचं काम इतकं महत्त्वाचं का आहे? कारण फक्‍त येशूचे शिष्य देवाचे मित्र बनू शकतात. तसंच, जे लोक ख्रिस्ताचं अनुकरण करतात ते आता चांगलं जीवन जगू शकतात आणि भविष्यात त्यांना अनंतकाळापर्यंत जगण्याचीही आशा आहे. (योहा. १४:६; १७:३) येशूने आपल्यावर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पण हे काम आपण आपल्या बळावर करत नाही. प्रेषित पौलने स्वतःबद्दल आणि जवळच्या काही सहविश्‍वासू बांधवांबद्दल म्हटलं: “आपण देवाचे सहकारी आहोत.” (१ करिंथ. ३:९) खरंच, यहोवा आणि येशू यांनी अपरिपूर्ण मानवांना किती मोठा बहुमान दिला आहे! तसंच, शिष्य बनवण्याच्या कामातूनसुद्धा आपल्याला भरपूर आनंद मिळू शकतो. आपण जेव्हा चांगली मनोवृत्ती बाळगणाऱ्‍या लोकांना “शोधून” काढतो, तेव्हा आपण शिष्य बनवण्यासाठी पहिलं पाऊल उचलतो. आपल्याला प्रचारात भेटणाऱ्‍या सर्व लोकांना आपण साक्ष देतो तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने यहोवाचे साक्षीदार असल्याचं दाखवून देतो. येशूने दिलेल्या प्रचार करण्याच्या आज्ञेचं पालन करून आपण खरे ख्रिस्ती असल्याचं सिद्ध करत असतो. टेहळणी बुरूज१९.०७ १५ ¶३-५

रविवार, १३ जून

ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीवाचे ते रक्षण करते.—उप. ७:१२.

बरेचसे लोक पहिल्यांदा बायबलमधल्या व्यावहारिक सल्ल्यांमुळे आकर्षित झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये राहणारी एक बहीण चीनी भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करते. ती म्हणते: “मी लोकांशी मैत्रीपूर्वक बोलते आणि त्यांचं लक्ष देऊन ऐकते. जर मला कळलं की कोणी नुकतंच इथे राहायला आलं आहे तर मी विचारते: ‘नवीन जागी तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला नोकरी मिळाली का? इथले लोक तुमच्याशी नीट वागतात का?’” यामुळे मग कधीकधी मला बायबल शिकवणींबद्दल सांगायची एक संधी मिळते. त्यानंतर जर योग्य वाटलं तर ती बहीण असंही म्हणते: “लोकांसोबत चांगले नातेसंबंध बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तुम्हाला काय वाटतं? बायबलमध्ये एक चांगला सल्ला दिला आहे तो मी तुम्हाला दाखवू का? इथे म्हटलं आहे: ‘वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.’ तुम्हाला काय वाटतं हा सल्ला आपल्याला इतरांशी जुळवून घ्यायला मदतीचा ठरेल का?” (नीति. १७:१४, ईझी-टू-रीड व्हर्शन) अशा प्रकारे चर्चा केल्यामुळे आपल्याला अशा लोकांना ओळखता येईल ज्यांना आणखी शिकून घ्यायची इच्छा आहे. टेहळणी बुरूज१९.०७ २३ ¶१३

सोमवार, १४ जून

जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.—उप. ४:१०.

ज्या बांधवांना नवीन नेमणूक मिळाली आहे, तुम्ही त्यांना आणि त्यांच्या परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ते कदाचित स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्‍तीच्या आजारपणामुळे चिंतित असतील किंवा कुटुंबातल्या व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे दुःखी असतील. अथवा ते बोलून दाखवत नसले, तरी आधीच्या नेमणुकीतल्या मित्रांची त्यांना आठवण येत असल्यामुळे ते कदाचित निराश असतील. त्यांच्या जीवनात झालेल्या या बदलांशी जुळवून घ्यायला त्यांना वेळ लागू शकतो आणि अशा वेळी त्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना येत असल्यामुळे ते गोंधळून जाऊ शकतात. तुम्ही अशा भाऊबहिणींसोबत प्रचार केला आणि त्यांना आधार दिला तर त्यांना नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत होईल. बरीच वर्षं दुसऱ्‍या देशात सेवा करणारी एक बहीण म्हणते: “माझ्या आधीच्या नेमणुकीत मी दररोज अनेक बायबल अभ्यास घ्यायचे. पण माझ्या नवीन नेमणुकीत, मला प्रचारात साधं बायबलमधून वाचणं किंवा व्हिडिओ दाखवणंही खूप कठीण गेलं. पण इथले भाऊबहीण मला त्यांच्यासोबत पुनर्भेटीसाठी आणि स्टडीसाठी घेऊन गेले. यामुळे मला सेवेबद्दल सकारात्मक विचार करायला मदत झाली. नवीन क्षेत्रात लोकांशी संभाषण कसं सुरू करायचं हे मी शिकले. मला मिळालेल्या मदतीमुळे मी पुन्हा आनंदाने सेवा करू लागले.” टेहळणी बुरूज१९.०८ २२ ¶१०; २४ ¶१३-१४

मंगळवार, १५ जून

मी युवदीयाला विनंती करतो आणि सुंतुखेलाही विनंती करतो, की प्रभूमध्ये एक मनाचे असा.—फिलिप्पै. ४:२.

युवदीया आणि सुंतुखे यांच्यासारखं, आपल्या बंधुभगिनींच्या अपरिपूर्णतेकडे लक्ष दिल्यामुळे आपल्याला त्यांच्यावर प्रेम करणं कठीण जाऊ शकतं. आपण सगळेच दररोज चुका करत असतो. आपण जर इतरांच्या कमतरतांबद्दलच विचार करत राहिलो तर आपल्याला त्यांच्यावर प्रेम करणं कठीण जाईल. उदाहरणार्थ, राज्य सभागृहाची साफसफाई करताना एक बांधव आपल्याला मदत करण्यासाठी विसरला तर आपल्याला चीड येऊ शकते. त्यानंतर आपण त्याने केलेल्या इतर चुकांची यादी बनवू लागलो, तर आपल्याला आणखी जास्त चीड येईल आणि त्या बांधवाबद्दल आपलं प्रेम कमी होईल. तुम्ही जर अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर एका गोष्टीचा विचार करणं योग्य राहील. ती म्हणजे, यहोवाला आपल्या आणि आपल्या बंधुभगिनींच्या कमतरता माहीत आहेत. पण तरी तो आपल्यावर आणि त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणूनच आपण यहोवाचं अनुकरण करण्याची आणि आपल्या बंधुभगिनींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. आपण आपल्या बंधुभगिनींबद्दल प्रेम वाढवण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा आपल्यातलं ऐक्य आणखीनच वाढत जातं.—फिलिप्पै. २:१, २. टेहळणी बुरूज१९.०८ ९-१० ¶७-८

बुधवार, १६ जून

परमेश्‍वर . . . दीनाकडे लक्ष देतो.—स्तो. १३८:६.

यहोवा नम्र लोकांवर प्रेम करतो. जे लोक मनापासून नम्र आहेत तेच यहोवासोबत वैयक्‍तिक नातं जोडू शकतात. याउलट, यहोवा “गर्विष्ठाला दुरून ओळखतो.” आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की आपण यहोवाला खूश करावं आणि त्याचं प्रेम अनुभवावं. म्हणून नम्रता हा गुण विकसित करण्याची आपल्याकडे बरीचशी चांगली कारणं आहेत. नम्र असणं म्हणजे मनापासून लीन असणं आणि इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजणं. नम्र व्यक्‍तीमध्ये गर्विष्ठपणा नसतो. बायबलनुसार नम्र व्यक्‍तीला जाणीव असते की यहोवा कितीतरी पटीने तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तसंच, सर्व जण कोणत्या न्‌ कोणत्या बाबतीत तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हेही तिला माहीत असतं. (फिलिप्पै. २:३, ४) काही लोक नम्र आहेत असं आपल्याला वाटू शकतं पण मुळात ते तसे नसतात. कदाचित ते बोलके नसतील किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना इतरांशी आदराने आणि सभ्यतेने वागायला शिकवल्यामुळे ते तसे वागत असतील. पण मुळात पाहिलं तर ते खूप गर्विष्ठ असू शकतात. आणि आज नाहीतर उद्या त्यांचं खरं व्यक्‍तीमत्व समोर येईल.—लूक ६:४५. टेहळणी बुरूज१९.०९ २ ¶१, ३-४

गुरुवार, १७ जून

जे . . . आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.—२ थेस्सलनी. १:८.

आपल्या “प्रभू येशूविषयीचा आनंदाचा संदेश” यात येशूने शिकवलेली सर्व सत्यं यांचा समावेश होतो. आपण ही सत्यं जीवनात लागू करण्याद्वारे दाखवतो की आपण आनंदाचा संदेश मानतो. आनंदाचा संदेश मानणं यात देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देणं, देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगणं आणि देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणं या गोष्टी सामील आहेत. (मत्त. ६:३३; २४:१४) तसंच, यात ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी पूर्ण करण्यात साहाय्य करणंही सामील आहे. (मत्त. २५:३१-४०) दुसऱ्‍या मेंढरांनी पुरवलेल्या मदतीबद्दल लवकरच ते त्यांना प्रतिफळ देतील. (योहा. १०:१६) ते कसं? हर्मगिदोनचं युद्ध सुरू होण्याआधी सर्व १,४४,००० जण स्वर्गात असतील. देवाची आत्मिक मुलं म्हणून त्यांना अमर जीवन दिलं जाईल. त्यानंतर ते स्वर्गातल्या सैन्याचे भाग असतील. गोगचा नाश करण्यात आणि मेंढरांसमान असलेल्या मोठ्या लोकसमुदायाचं संरक्षण करण्यात त्यांचा वाटा असेल. (प्रकटी. २:२६, २७; ७:९, १०) मोठ्या लोकसमुदायाला खरंच खूप आनंद होईल, कारण त्यांनी यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांना साथ दिली होती. टेहळणी बुरूज१९.०९ १२-१३ ¶१६-१८

शुक्रवार, १८ जून

तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल.—मत्त. ११:२९.

येशूने आपल्याला सोपवलेलं काम विश्रांती किंवा तजेला देणारं का आहे? कारण आपल्याकडे सर्वोत्तम देखरेख करणारे आहेत. यहोवा हा सर्वोच्च अधिकारी आहे, असं असलं तरी तो निर्दयी किंवा क्रूरपणे वागत नाही. तर याउलट तो आपल्या कामाची कदर करतो. (इब्री ६:१०) तसंच, आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला शक्‍तीही देतो. (२ करिंथ. ४:७; गलती. ६:५, तळटीप) आपण इतरांसोबत कसं वागलं पाहिजे याबाबतीत आपला राजा, येशू याचं आपल्यासमोर सर्वात चांगलं उदाहरण आहे. (योहा. १३:१५) आणि आपली काळजी करणारे वडील, “महान मेंढपाळ” येशू याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. (इब्री १३:२०; १ पेत्र ५:२) ते आपल्याला मार्गदर्शन देताना आणि आपलं संरक्षण करताना आपल्याशी सौम्यतेने वागतात, आपल्याला प्रोत्साहन देतात आणि धैर्य दाखवतात. तसंच, आपल्याकडे सर्वात चांगले मित्र आहेत. जिवापाड प्रेम करणारे मित्र आणि आपल्याला मिळालेलं अर्थपूर्ण काम हे जगात इतर कोणाकडे नाही. जरा विचार करा, आपण अशा लोकांसोबत काम करतो ज्यांचे नैतिक स्तर उच्च दर्जाचे आहेत, तरीपण ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. तर ते इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतात. ते आपल्याला फक्‍त त्यांच्यासोबत काम करणारे म्हणून नाही तर त्यांचे मित्रही समजतात. त्यांचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की ते आपल्यासाठी त्यांचा जीवसुद्धा द्यायला तयार असतात. टेहळणी बुरूज१९.०९ २० ¶१; २३ ¶१२-१४

शनिवार, १९ जून

तुम्ही मात्र अंधारात नाही; त्यामुळे, दिवसाच्या प्रकाशाने चोराला गाठावे तसा तो दिवस तुम्हाला गाठणार नाही.—१ थेस्सलनी. ५:४.

प्रेषित पौलने आपल्या पत्रात ‘यहोवाच्या दिवसाचा’ उल्लेख केला. (१ थेस्सलनी. ५:१-६) या ठिकाणी हा वाक्यांश ज्या अर्थाने वापरला आहे तो एका कालावधीला सूचित करतो. हा कालावधी, मोठ्या बाबेलवर म्हणजे जगभरातल्या खोट्या धर्माच्या साम्राज्यावर हल्ला होईल, तेव्हा सुरू होईल आणि हर्मगिदोनच्या युद्धाने संपेल. (प्रकटी. १६:१४, १६; १७:५) पौलने पुढे म्हटलं, “आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये तर जागे व सावध” राहिलं पाहिजे. आपण निष्पक्ष राहिलं पाहिजे आणि कोणत्याही राजनैतिक गोष्टींमध्ये सहभाग घेण्याचं टाळलं पाहिजे. कारण आपण या गोष्टींमध्ये सहभाग घेतला, तर याचा अर्थ आपण “जगाचा भाग” आहोत असा होईल. (योहा. १५:१९) आपल्याला ही पक्की खातरी आहे की देवाचं राज्यच या जगात शांती आणू शकतं. याशिवाय, आपण इतरांनाही “जागे” राहायला मदत केली पाहिजे. या जगात कोणकोणत्या घटना घडणार आहेत, याबद्दल बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण इतरांना सांगितल्या पाहिजेत. एकदा मोठं संकट सुरू झालं की यहोवाची उपासना करण्याची संधी लोकांकडे नसेल, कारण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे आताच प्रचार करणं खूप महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज१९.१० ८ ¶३; ९ ¶५-६

रविवार, २० जून

तू ग्रंथ लिहिण्याचा पाट घे; आणि . . . इस्राएल, यहूदा . . . यांविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यांवर लिहून काढ.—यिर्म. ३६:२.

गुंडाळीत संदेश लिहिण्याचं काम संपल्यावर त्यांना तो लोकांना जाऊन सांगायचा होता. अशा वेळी यिर्मयाला आपल्या मित्रावर, बारूखवर भरवसा ठेवावा लागणार होता, कारण तो संदेश लोकांना जाऊन सांगायची जबाबदारी बारूखवर सोपवण्यात आली होती. (यिर्म. ३६:५, ६) बारूखने धैर्याने ही धोकेदायक नेमणूक पूर्ण केली. बारूखला दिलेलं काम त्याने पूर्ण केलं आणि मंदिरात जाऊन लोकांसमोर ती गुंडाळी वाचली. हे समजल्यावर यिर्मयाला बारूखचा किती अभिमान वाटला असेल! (यिर्म. ३६:८-१०) यहूदाच्या राजदरबाऱ्‍यांना बारूखने सांगितलेल्या संदेशाबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी बारूखला ती गुंडाळी त्यांनाही मोठ्याने वाचून दाखवायला सांगितली. (यिर्म. ३६:१४, १५) मग राजदरबाऱ्‍यांनी यिर्मयाने सांगितलेल्या गोष्टी यहोयाकीम राजाला सांगायचं ठरवलं. यिर्मयाने गुंडाळीत जे लिहिलं होतं ते जेव्हा यहोयाकीम राजाला वाचून दाखवण्यात आलं तेव्हा तो भयंकर चिडला. त्याने ती गुंडाळी जाळून टाकण्याचा आणि यिर्मया व बारूख यांना अटक करण्याचा आदेश दिला. पण यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली आणि बारूखला दिली. मग यिर्मयाने बारूखला यहोवाचा संदेश पुन्हा सांगायला सुरुवात केली आणि “यहूदाचा राजा यहोयाकीम याने जो ग्रंथ [गुंडाळी] अग्नीत जाळून टाकला होता त्यातली सर्व वचने” बारूखने गुंडाळीवर लिहून काढली.—यिर्म. ३६:२६-२८, ३२. टेहळणी बुरूज१९.११ ३-४ ¶४-६

सोमवार, २१ जून

देव स्वतः तुम्हाला उत्साहित करतो आणि तुम्ही . . . कार्य करावे म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करण्याची ताकदही देतो.—फिलिप्पै. २:१३.

यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी जे आवश्‍यक आहे ते बनू शकतो. उदाहरणार्थ, यहोवा एक शिक्षक, सांत्वन करणारा आणि सुवार्तिक बनला आहे. तसंच, त्याने अशा इतर भूमिकाही घेतल्या आहेत. (यश. ४८:१७; २ करिंथ. ७:६; गलती. ३:८) असं असलं तरी तो त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी बऱ्‍याचदा मानवांचा उपयोग करतो. (मत्त. २४:१४; २८:१९, २०; २ करिंथ. १:३, ४) यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही बनावं लागतं, त्यासाठी तो आपल्याला बुद्धि आणि शक्‍ती देऊ शकतो. अनेक विद्वानांच्या मते यहोवाच्या नावाचा अर्थ असा होतो, की आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाला जे बनण्याची गरज आहे ते तो बनू शकतो किंवा मानवांना जे बनण्याची गरज आहे ते तो त्यांना बनायला लावू शकतो. यहोवाच्या सेवेत आपला उपयोग व्हावा अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. पण काहींच्या मनात अशी शंका येऊ शकते की ‘यहोवा आपला उपयोग करत आहे का?’ काहींना वाटू शकतं की वाढतं वय, बदलती परिस्थिती किंवा कौशल्यांची कमतरता यांमुळे सेवेत जितकं करायची इच्छा आहे तितकं आपण करू शकत नाही. पण दुसरीकडे पाहता, यहोवाच्या सेवेत आपण जे करत आहोत तितकं पुरेसं आहे आणि आता आणखी जास्त करण्याची गरज नाही असंही काहींना वाटू शकतं. टेहळणी बुरूज१९.१० २० ¶१-२

मंगळवार, २२ जून

पैशाचे प्रेम हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे.—१ तीम. ६:१०.

आपण भौतिक गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलो तर आपला विश्‍वास कमी होईल आणि यामुळे आपण यहोवाची सेवा कमी प्रमाणात करायला लागू. प्रेषित पौलने म्हटलं: “कोणताही सैनिक जगाच्या व्यवहारांत स्वतःला गुरफटून घेत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात भरती केले त्याला खूश करता यावे.” (२ तीम. २:४) खरंतर रोमी सैनिकांना इतर कोणतंही काम किंवा व्यवसाय करण्यास सक्‍त मनाई होती. आपणही त्या सतर्क आणि चांगल्या सैनिकांसारखंच असलं पाहिजे. आपले सेनापती यहोवा आणि येशू यांना खूश करणं ही आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. सैतानाच्या जगात आपल्याला ज्या गोष्टी मिळू शकतात, त्या सर्वांपेक्षा जास्त महत्त्व आपण यहोवाची पसंती मिळवायला दिलं पाहिजे. यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याजवळ पुरेसा वेळ आणि शक्‍ती आहे याची आपण खातरी केली पाहिजे. तसंच, आपली विश्‍वासाची ढाल आणि देवाकडून मिळणारी इतर शस्त्रसामग्री चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठीही आपण नियमितपणे वेळ काढला पाहिजे. आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे. असं का? प्रेषित पौलने आपल्याला ताकीद दिली की “ज्यांना कसेही करून श्रीमंत व्हायचे आहे” ते “विश्‍वासापासून भरकटले आहेत.”—१ तीम. ६:९, १०. टेहळणी बुरूज१९.११ १७ ¶१२, १४-१५

बुधवार, २३ जून

त्यांच्यावर अचानक नाश येईल.—१ थेस्सलनी. ५:३.

“यहोवाचा दिवस” येण्याआधी “शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा होईल. (१ थेस्सलनी. ५:१-६) १ थेस्सलनीकाकर ५:२ मध्ये उल्लेख केलेला “यहोवाचा दिवस” हा मोठ्या संकटाला सूचित करतो. (प्रकटी. ७:१४) मोठं संकट सुरू होणार आहे हे आपल्याला कसं कळेल? बायबल आपल्याला सांगतं की तेव्हा एक खूप अनपेक्षित घोषणा केली जाईल. ही घोषणा आपल्यासाठी एक चिन्ह असेल की मोठं संकट आता सुरू होणार आहे. “शांती आहे, सुरक्षा आहे!” हीच ती भविष्यवाणीत सांगितलेली घोषणा असेल. यात धार्मिक पुढारीही सहभाग घेतील का? कदाचित. पण ही घोषणा खोटी असेल आणि याचा उगम दुरात्म्यांकडून असेल. ही घोषणा मानवी इतिहासात आतापर्यंत कधीही न झालेल्या मोठ्या संकटाच्या आधी करण्यात येईल. पण ती लोकांसाठी धोक्याची ठरेल कारण या खोट्या घोषणेमुळे लोकांना सुरक्षित वाटू लागेल. त्याबद्दल बायबल सांगतं की “गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश येईल.” मग त्या वेळी यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचं काय होईल? यहोवाचा दिवस अचानक आला आहे हे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटेल. पण याबद्दल आधीच माहीत असल्यामुळे ते या घटनेसाठी तयार असतील. टेहळणी बुरूज१९.०९ ९ ¶७-८

गुरुवार, २४ जून

सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . शोधण्याचा समय व गमावण्याचा समय . . . असतो.—उप. ३:१, ६.

निर्णय घेताना विशिष्ट ध्येय ठेवा. विशिष्ट ध्येय ठेवल्यामुळे सुरू केलेली गोष्ट लवकरात लवकर पूर्ण करणं सोपं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही नियमितपणे बायबल वाचण्याचं ध्येय ठेवलं असेल. पण जर तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन व्यवस्थितपणे केलं नाही तर तुम्हाला तुमच्या योजनेनुसार काम करता येणार नाही. कदाचित मंडळीतले वडील भाऊबहिणींची जास्त वेळा मेंढपाळ भेट घेण्याचं ठरवतील. पण कालांतराने त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी ठरवल्याप्रमाणे कार्य केलेलं नाही. मग अशा वेळी त्यांना जर यशस्वी व्हायचं असेल तर ते स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतात: “आपण अशा भाऊबहिणींची यादी बनवली आहे का ज्यांना मेंढपाळ भेटीमुळे जास्त मदत होईल? त्यांना भेट देण्यासाठी आपण एक विशिष्ट वेळ ठरवली आहे का?” तसंच, अवाजवी अपेक्षा ठेवू नका. आपल्यापैकी कोणाकडेही ठरवलेल्या सर्वच गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारा वेळ, साधनं किंवा ताकद नाही. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि स्वतःबद्दल वाजवी दृष्टिकोन ठेवा. एखादी ठरवलेली गोष्ट तुमच्या अवाक्याबाहेर आहे असं जाणवल्यावर तुम्हाला घेतलेला निर्णय कदाचित बदलावा लागेल. टेहळणी बुरूज१९.११ २९ ¶११-१२

शुक्रवार, २५ जून

जे मोठ्या संकटातून बाहेर येतात ते हेच आहेत, आणि त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.—प्रकटी. ७:१४.

नवीन जगात जीवन कसं असेल याबद्दल यशया ६५:२१-२३ या वचनांमध्ये सांगितलं आहे. या वचनांमधून आपल्याला कळतं की आपल्या सर्वांकडे भरपूर काम असेल. देवाचे लोक अर्थपूर्ण आणि आनंद मिळणारं काम करतील. हजार वर्षांच्या काळाच्या शेवटी “सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्‍त केली जाईल आणि तिला देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य मिळेल.” (रोम. ८:२१) इस्राएली लोकांनी काम आणि विश्रांती यांमध्ये संतुलन राखावं यासाठी यहोवाने व्यवस्था केली होती. यहोवाचा दृष्टिकोन बदललेला नाही आणि त्यामुळे ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यातही तो आपल्या लोकांना काम आणि विश्रांती यांमध्ये संतुलन राखायला मदत करेल. तेव्हा यहोवाची उपासना करण्यासाठी वेळ देणं गरजेचं असेल. आज आनंदी राहण्यासाठी यहोवाची उपासना करणं गरजेचं आहे आणि नवीन जगातही हेच खरं असेल. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात सर्व विश्‍वासू सेवकांकडे आनंददायी काम असेल आणि ते सर्व मिळून यहोवाची उपासना करतील. टेहळणी बुरूज१९.१२ १२ ¶१५; १३ ¶१७-१८

शनिवार, २६ जून

ज्या गोष्टी मी तुला सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.—अनु. ६:६, ७.

“बिंबव” या शब्दाचा अर्थ ‘एखादी गोष्ट पुन्हापुन्हा सांगून किंवा शिकवून मनात ठसवणे’ असा होतो. असं करण्यासाठी आईवडिलांनी आपल्या लहान मुलांना नियमितपणे वेळ देणं गरजेचं आहे. कधीकधी मुलांना एकच गोष्ट अनेक वेळा सांगावी लागते आणि यामुळे आईवडील कदाचित निराश होतील. पण या गोष्टीला त्यांनी एक संधी म्हणून पाहायला हवं; एक अशी संधी ज्यामुळे ते मुलांना देवाचं वचन समजवण्यासाठी आणि जीवनात लागू करण्यासाठी मदत करू शकतील. म्हणून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे जाणून घ्या. स्तोत्र १२७ यात मुलांची तुलना बाणांशी केली आहे. (स्तो. १२७:४) बाण वेगवेगळ्या आकाराचे आणि धातूंपासून बनवले असल्यामुळे ते एकसारखे नसतात, त्याच प्रकारे मुलंसुद्धा एकसारखी नसतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक मुलाला कसं प्रशिक्षण द्यायचं हे आईवडिलांना ठरवावं लागतं. इझरायलमध्ये राहणाऱ्‍या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांना यहोवाची सेवा करण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली याबद्दल ते सांगतात: “आम्ही आमच्या दोन्ही मुलांचा एकत्र बायबल अभ्यास घेतला नाही, तर प्रत्येकाचा वेगवेगळा घेतला.” पण याच पद्धतीने अभ्यास घेणं गरजेचं किंवा शक्य आहे की नाही, हे प्रत्येक कुटुंबप्रमुखाने ठरवायला हवं. टेहळणी बुरूज१९.१२ २६-२७ ¶१८-२०

रविवार, २७ जून

ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.—मत्त. ७:१२.

आपण जेव्हा कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा इतरांकडून व्यावहारिक मार्गांनी मदत मिळणं ही खरंच खूप दिलासा देणारी गोष्ट असते. रायन नावाच्या बांधवाचा विचार करा. त्याच्या वडिलांचा एका भयानक अपघातात मृत्यू झाला. तो म्हणतो: “आपण कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा दररोजची कामं करणंही अशक्य वाटू लागतं. पण जेव्हा कोणीतरी आपल्याला व्यावहारिक मार्गांनी मदत करतं, मग ती थोड्या प्रमाणात का असेना, त्यामुळे आपल्याला खूप सांत्वन मिळतं.” तेव्हा, नेहमी लक्षात असू द्या की आपण जरी लहान गोष्टींद्वारे इतरांना मदत केली तरी त्यांना खूप सांत्वन मिळू शकतं. पहिल्या शतकातला मार्क हा त्याच्या नेमणुकींमध्ये खूप व्यस्त होता. असं असलं तरी प्रेषित पौलला दिलासा देण्यासाठी मार्कने वेळ काढला. आणि त्यामुळे पौलला माहीत होतं की तो मार्ककडे निःसंकोचपणे मदत मागू शकत होता. अँजेलाच्या परिस्थितीचा विचार करा. तिच्या आजीला क्रूरपणे मारण्यात आलं होतं. त्या वेळी ज्या लोकांनी तिचं सांत्वन केलं त्यांच्याबद्दल तिला खूप कदर वाटते. ती म्हणते: “जेव्हा मित्रांना आपल्याला मनापासून मदत करायची इच्छा असते, तेव्हा त्यांच्याशी बोलणं आपल्याला सोपं जातं. यामुळे कळतं की ते अगदी निःसंकोचपणे आपल्याला मदत करायला तयार आहेत.” आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी भाऊबहिणींना व्यावहारिक मार्गांनी मदत करायला आणि त्यांना सांत्वन द्यायला तयार असतो असं इतरांचं माझ्याबद्दल मत आहे का?’ टेहळणी बुरूज२०.०१ ११-१२ ¶१४-१६

सोमवार, २८ जून

जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूच्या प्याल्यातून पितो तो . . . दोषी ठरेल.—१ करिंथ. ११:२७.

या वचनात सांगितल्याप्रमाणे एका अभिषिक्‍त व्यक्‍तीकडून स्मारकविधीच्या प्रतिकांचं सेवन “अयोग्य प्रकारे” कसं होऊ शकतं? जर ती व्यक्‍ती त्या प्रतिकांचं सेवन करत असेल पण यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगत नसेल तर तिच्या हातून प्रतिकांचं सेवन अयोग्य प्रकारे होऊ शकतं. (इब्री ६:४-६; १०:२६-२९) अभिषिक्‍त जनांना जाणीव आहे, की “ख्रिस्त येशूद्वारे देवाने [त्यांना] दिलेल्या वरील बोलावण्याचे बक्षीस” मिळवायचं असेल तर त्यांनी विश्‍वासू राहणं खूप महत्त्वाचं आहे. (फिलिप्पै. ३:१३-१६) यहोवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना गर्विष्ठ बनायला नाही तर नम्र राहायला मदत करतो. (इफिस. ४:१-३; कलस्सै. ३:१०, १२) त्यामुळे अभिषिक्‍त जन स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. त्यांना माहीत आहे की यहोवा त्यांना इतर सेवकांपेक्षा जास्त पवित्र आत्मा देत नाही. तसंच, बायबल सत्यांविषयी त्यांना इतरांपेक्षा जास्त समजतं असंही ते मानत नाही. त्यासोबतच, ते इतर कोणाला कधीच सांगणार नाही की ‘आता तूसुद्धा अभिषिक्‍त झाला आहेस आणि स्मारकविधीच्या प्रतिकांचं सेवन करू शकतोस.’ याउलट अभिषिक्‍त ख्रिस्ती नम्रपणे मान्य करतात की फक्‍त यहोवाच लोकांना स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवू शकतो. टेहळणी बुरूज२०.०१ २७-२८ ¶४-५

मंगळवार, २९ जून

देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.—याको. ४:८.

यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्याशी मैत्री करावी आणि त्याच्याशी बोलावं. तो आपल्याला “प्रार्थना करत” राहण्याचं प्रोत्साहन देतो आणि त्या ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. (रोम. १२:१२) एखादी व्यक्‍ती खूप व्यस्त किंवा थकलेली असेल तर ती कदाचित आपलं ऐकून घेणार नाही, पण यहोवा आपलं नेहमी ऐकतो. आपण बायबल आणि बायबल समजण्यासाठी उपलब्ध असलेली प्रकाशनं वाचतो, तेव्हा आपणही त्याचं ऐकत असतो. तसंच, ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देण्याद्वारेसुद्धा आपण त्याचं ऐकत असतो. आपण यहोवाशी नियमितपणे बोललो आणि त्याचं ऐकलं तर आपलं त्याच्यासोबतचं नातं घनिष्ठ होईल. यहोवाची इच्छा आहे की प्रार्थना करताना आपण त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करावं. (स्तो. ६२:८) आपण स्वतःला प्रश्‍न विचारू शकतो: ‘माझी प्रार्थना वरवरची किंवा इतरांनी केलेल्या प्रार्थनांची नक्कल असते की ती मनापासून आणि स्वतःच्या शब्दात मांडलेली असते?’ यात काहीच शंका नाही की तुमचं यहोवावर मनापासून प्रेम आहे आणि त्याच्यासोबत नातं टिकवून ठेवायची तुमची इच्छा आहे. पण यासाठी तुम्ही नियमितपणे त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. तेव्हा, ज्या गोष्टी तुम्ही कोणाला सांगू शकत नाही त्या गोष्टी त्याला सांगा. तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे आनंद होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे चिंता होते त्या त्याला सांगा. तुम्ही यहोवाकडे मदत मागू शकता याची खातरी बाळगा. टेहळणी बुरूज२०.०२ ९ ¶४-५

बुधवार, ३० जून

तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा.—१ पेत्र ५:२.

यहोवाने मंडळीतल्या वडिलांवर आपल्या लोकांची काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नहेम्या यहोवाच्या लोकांशी जसा वागला त्याचं परीक्षण केल्यामुळे वडील खूपकाही शिकू शकतात. यहूदाचा प्रांताधिपती म्हणजे राज्यपाल या नात्याने नहेम्याकडे खूप अधिकार होते. (नहे. १:११; २:७, ८; ५:१४) नहेम्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा जरा विचार करा. त्याला समजलं की यहुदी लोक मंदिरात, यहोवाचा अनादर करणाऱ्‍या काही गोष्टी करत होते. आणि ते यहोवाच्या नियमानुसार लेव्यांना अनुदानही देत नव्हते. तसंच, यहुदी शब्बाथाचा नियम पाळत नव्हते आणि काही पुरुषांनी तर विदेशी स्त्रियांशी लग्नही केलं होतं. राज्यपाल नहेम्याला ही कठीण समस्या सोडवावी लागणार होती. (नहे. १३:४-३०) नहेम्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून देवाच्या सेवकांवर आपले विचार लादले नाहीत. याउलट, त्याने मनापासून प्रार्थना करून यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं आणि लोकांना यहोवाचे नियम शिकवले. (नहे. १:४-१०; १३:१-३) नहेम्याने नम्रपणे लोकांसोबत मिळून काम केलं. यरुशलेमच्या पडलेल्या भिंतीची पुनर्बांधणी करण्यासाठी त्याने लोकांना मदतसुद्धा केली.—नहे. ४:१५. टेहळणी बुरूज१९.०९ १६ ¶९-१०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा