मे
शनिवार, १ मे
मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे . . . आम्हाला शिकवावे.—शास्ते १३:८.
मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवताना आईवडील कोणत्या गोष्टी करू शकतात? मानोहा सारखंच यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा. आणि आपल्या उदाहरणातून शिकवा. तुम्ही जे बोलता ते महत्त्वाचं असतं, पण तुम्ही जी कार्यं करता त्यांचा तुमच्या मुलांवर जास्त प्रभाव होऊ शकतो. योसेफ आणि मरीया यांनी नक्कीच येशूसमोर आणि आपल्या इतर मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं. आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योसेफ खूप मेहनत करायचा. तसंच, तो आपल्या कुटुंबाला यहोवावर प्रेम करायचंही प्रोत्साहन द्यायचा. (अनु. ४:९, १०) तो “दरवर्षी” वल्हांडण सणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाला यरुशलेमला घेऊन जायचा. (लूक २:४१, ४२) त्या काळातल्या काही कुटुंबप्रमुखांनी कदाचित असा विचार केला असेल की आपल्या संपूर्ण कुटुंबाला अशा प्रवासाला नेण्यामागे आपला भरपूर वेळ जाईल आणि ते गैरसोयीचं व खर्चीक असेल. पण योसेफला आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर होती आणि हीच गोष्ट त्याने आपल्या मुलांनाही शिकवली. मरीयालासुद्धा वचनांची चांगली समज होती. आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून तिने आपल्या मुलांना देवाच्या वचनावर प्रेम करायला नक्कीच शिकवलं असणार. टेहळणी बुरूज१९.१२ २४-२५ ¶९-१२
रविवार, २ मे
मी शारीरिक आणि पापाला विकलेला असा आहे.—रोम. ७:१४.
आदामने यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा त्याला आणि सर्व मानवांना समस्यांचा सामना करावा लागला. या समस्येला यहोवाने ज्या प्रकारे हाताळलं त्यावरून आपल्याला त्याचं प्रेम दिसून येतं. आदामने आपल्या स्वर्गीय पित्याची आज्ञा मोडली तेव्हा तो आणि संपूर्ण मानवजात देवाच्या आनंदी कुटुंबाचा भाग राहिली नाही. (रोम. ५:१२) असं असलं तरी संपूर्ण मानवजातीला या समस्येतून सोडवण्यासाठी यहोवाने एक उपाय काढला. यहोवाने आदामला शिक्षा दिली पण आदामपासून येणाऱ्या संततीला त्याने तसंच सोडलं नाही तर तिला एक आशा दिली. आदामने आज्ञा मोडल्यानंतर त्याने लगेच अभिवचन दिलं की तो त्याच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या लोकांना पुन्हा त्याच्या कुटुंबाचा भाग बनवेल. (उत्प. ३:१५; रोम. ८:२०, २१) हे करण्यासाठी यहोवाने आपल्या प्रिय मुलाची, येशूची खंडणी दिली. आपल्या प्रिय मुलाला आपल्यासाठी देऊन यहोवाने हे सिद्ध केलं की तो आपल्यावर खूप प्रेम करतो. (योहा. ३:१६) तो सर्वात चांगला पिता आहे. तो आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपल्या भौतिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो. तो आपल्याला प्रशिक्षण देतो आणि मदतही करतो. भविष्यात तो आपल्यासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी करेल. आपला पिता आपल्यावर प्रेम करतो आणि आपली काळजी घेतो हे जाणून आपलं मन खरंच आनंदाने भरून जातं! टेहळणी बुरूज२०.०२ ६ ¶१६-१७; ७ ¶२०
सोमवार, ३ मे
माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.—स्तो. ९४:१९.
तुम्हाला कधी एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंता वाटली आहे का? कदाचित एखाद्याच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही चिंतित असाल. किंवा तुमच्याच वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही चिंतित असाल. उदाहरणार्थ, तुमच्या हातून चूक घडली आहे आणि तुम्हाला चिंता वाटत आहे की यहोवा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि त्यात भर म्हणजे, तुम्ही असाही विचार करत असाल की एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला खूप जास्त चिंता वाटते, म्हणजेच तुमच्यात विश्वासाची कमतरता आहे आणि तुम्ही एक वाईट व्यक्ती आहात. असं असेल तर, आता आपण बायबलमधली काही उदाहरणं पाहू या. संदेष्टा शमुवेलची आई हन्ना हिचा देवावर भक्कम विश्वास होता. पण जेव्हा तिच्या घरातली व्यक्ती तिच्याशी वाईट वागली तेव्हा ती खूप निराश झाली. (१ शमु. १:७) प्रेषित पौलचा विश्वास खूप मजबूत होता पण सर्व मंडळ्यांची काळजी असल्यामुळे त्याला ‘चिंता’ वाटली. (२ करिंथ. ११:२८) दावीद राजाचा यहोवावर खूप विश्वास होता आणि यामुळे यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. (प्रे. कार्ये १३:२२) असं असलं तरी दावीदने केलेल्या चुकांमुळे त्याचं मन त्याला खात होतं आणि तो अनेकदा निराश झाला. (स्तो. ३८:४) यहोवाने या तिन्ही सेवकांना सांत्वन आणि दिलासा दिला. टेहळणी बुरूज२०.०२ २० ¶१-२
मंगळवार, ४ मे
जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल तर त्याने स्वतःला नाकारावं.—मत्त. १६:२४.
तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पण करता तेव्हा तुम्ही त्याला मनापासून प्रार्थना करून म्हणता, की ‘मी आजपासून संपूर्ण आयुष्य तुझी सेवा करेन.’ यहोवाला तुमचं जीवन समर्पित करण्याद्वारे खरंतर तुम्ही स्वतःला ‘नाकारता.’ त्यानंतर तुम्ही यहोवाचे होता आणि यहोवाचा तुमच्यावर अधिकार असणं हा एक खूप मोठा बहुमान आहे. (रोम. १४:८) तुम्ही त्याला म्हणता की, ‘मी आजपासून स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी जगेन.’ समर्पण हे तुम्ही देवाला दिलेलं वचन आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. हे वचन देण्यासाठी यहोवा आपल्यावर दबाव आणत नाही. पण जेव्हा आपण त्याला वचन देतो तेव्हा आपण ते पूर्णही करावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (स्तो. ११६:१२, १४) तुम्ही जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करता तेव्हा ही गोष्ट फक्त तुम्हाला आणि यहोवाला माहीत असते. पण बाप्तिस्मा हा सहसा संमेलनात किंवा अधिवेशनात इतरांसमोर घेतला जातो. तुम्ही बाप्तिस्मा घेण्याद्वारे दाखवून देता की तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे. बाप्तिस्मा घेतल्यामुळे इतरांना दिसून येतं की तुम्ही यहोवा देवावर पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्तीने प्रेम करता. तसंच, त्यांना हेही कळतं की तुम्ही संपूर्ण आयुष्य त्याची सेवा करण्याचा पक्का निर्धार केला आहे.—मार्क १२:३०. टेहळणी बुरूज२०.०३ ९ ¶४-५
बुधवार, ५ मे
कोणीही तुम्हाला बहकवू नये म्हणून सांभाळा.—२ थेस्सलनी. २:३.
सैतान यहोवाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. प्रेषितांच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्या काहींनी खोट्या शिकवणी पसरवायला सुरुवात केल्या. (प्रे. कार्ये २०:२९, ३०) या धर्मत्यागी लोकांनी एकमात्र खऱ्या देवाची ओळख अस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, बायबलच्या प्रतींमध्ये त्यांनी देवाच्या नावाचा वापर करण्याचं थांबवलं आणि त्या जागी “प्रभू” असा शब्द वापरला. याचा काय परिणाम झाला? देवाचं वैयक्तिक नाव काढून त्या जागी “प्रभू” हे नाव घातल्यामुळे बायबल वाचकांना, यहोवा हा शास्त्रवचनातल्या इतर ‘प्रभूंपेक्षा’ कसा वेगळा आहे हे समजून घेणं कठीण झालं. (१ करिंथ. ८:५) तसंच त्यांनी यहोवा आणि येशू या दोघांसाठी एकच शब्द म्हणजे, “प्रभू” हा शब्द वापरला. यामुळे ती दोघं एक नसून वेगवेगळी आहेत आणि त्यांच्या भूमिकाही वेगवेगळ्या आहेत हे समजून घेणंही कठीण झालं. (योहा. १७:३) यामुळे देवाच्या वचनात नसलेल्या त्रैक्याच्या शिकवणीची सुरुवात झाली. म्हणून आज बऱ्याच लोकांना वाटतं की देवाला ओळखणं शक्य नाही. पण खरंच हा किती चुकीचा विचार आहे!—प्रे. कार्ये १७:२७. टेहळणी बुरूज१९.०६ ५ ¶११
गुरुवार, ६ मे
आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर.—२ तीम. ४:५.
आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे प्रचारकार्यात आपलं कौशल्य वाढवणं. (नीति. १:५; १ तीम. ४:१३, १५) यहोवाने आपल्याला त्याचे “सहकारी” बनण्याची संधी दिली आहे आणि हा आपल्यासाठी खरंच एक मोठा बहुमान आहे! (१ करिंथ. ३:९) “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची [आपण] नेहमी खातरी करून” घेतली आणि सेवाकार्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला “हर्षाने परमेश्वराची सेवा” करता येईल. (फिलिप्पै. १:१०; स्तो. १००:२) देवाचे सेवक या नात्याने आपण खातरी बाळगू शकतो, की आपल्यात कोणत्याही कमतरता असल्या किंवा आपल्याला कोणत्याही समस्या आल्या तरी आपली सेवा पूर्ण करण्यासाठी लागणारी शक्ती यहोवा आपल्याला नक्कीच देईल. (२ करिंथ. ४:१, ७; ६:४) आपल्या परिस्थितीनुसार आपण प्रचारकार्यात कमी किंवा जास्त प्रमाणात भाग घेत असलो, तरी पूर्ण जिवाने केलेल्या सेवेमुळे आपण “आनंदी” होऊ शकतो. (गलती. ६:४) आपण सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करतो तेव्हा आपण यहोवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम असल्याचं दाखवतो कारण बायबल असं म्हणतं: “असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.”—१ तीम. ४:१६. टेहळणी बुरूज१९.०४ ६ ¶१५; ७ ¶१७
शुक्रवार, ७ मे
सबंध पृथ्वीवरील लोकांना फसवणाऱ्या . . . सैतान म्हटलेल्या त्या जुन्या सापाला खाली फेकण्यात आले.—प्रकटी. १२:९.
सैतान आणि दुष्टात्मे लोकांची दिशाभूल करण्यासाठी मुख्यतः भूतविद्येचा उपयोग करतात. जे लोक यात सहभाग घेतात त्यांना असं वाटतं की देवाने त्यांना अलौकिक शक्ती दिली आहे. पण त्यांच्या कार्यांना पाठिंबा देणारा देव नसून, सैतान आणि त्याचे दुष्टात्मे असतात. उदाहरणार्थ, काही लोक दावा करतात की ते ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून भविष्य पाहू शकतात. इतर काही लोक असं भासवतात की ते मृत लोकांशी बोलू शकतात. तर काही जण जादूटोण्याचा उपयोग करून इतरांवर करणी करतात. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन इथल्या १८ देशांमध्ये घेतलेल्या एका सर्वेनुसार प्रत्येकी ३ पैकी १ जण जादूटोणा, भूतविद्या किंवा वशीकरण यांवर भरवसा ठेवतो. तसंच, तितक्याच लोकांचा असादेखील भरवसा आहे की मृत लोकांच्या आत्म्यासोबत संवाद साधणं शक्य आहे. आफ्रिका खंडातल्या १८ देशांमध्ये अशा प्रकारचाच एक सर्वे घेण्यात आला होता. त्यात असं दिसून आलं की अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचा भूतविद्येवर भरवसा आहे. आपण कोणत्याही देशात राहत असलो तरी आपण भूतविद्येपासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१९.०४ २०-२१ ¶३-४
शनिवार, ८ मे
तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्ये करणारा . . . कोणीही असणार नाही, याची काळजी घ्या.—इब्री १२:१६.
यहोवा देव सर्व प्रकारच्या दुष्टाईचा द्वेष करतो. (स्तो. ५:४-६) त्यामुळे त्याला लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल किती तिरस्कार असेल याची आपण कल्पना करू शकतो. मुलांचं शोषण हे खूप घृणित आणि किळसवाणं पाप आहे. यहोवाचं अनुकरण करून आपणही मुलांच्या लैंगिक शोषणाचा द्वेष करतो आणि ख्रिस्ती मंडळीत अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याला कधीच खपवून घेत नाही. (रोम. १२:९) मुलांचं कोणत्याही प्रकारे केलं जाणारं शोषण हे “ख्रिस्ताचा नियम” याच्या अगदी विरुद्ध आहे! (गलती. ६:२) येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टी आणि त्याने आपल्यासाठी जे उदाहरण मांडलं ते प्रेमावर आधारलेलं असून न्यायाला प्रोत्साहन देतं. खरे ख्रिस्ती या नियमाचं पालन करत असल्यामुळे ते मुलांशी प्रेमाने आणि त्यांना सुरक्षित वाटेल अशा प्रकारे व्यवहार करतात. पण याच्या अगदी उलट, मुलांचं शोषण हे एक स्वार्थी आणि चुकीचं कृत्य आहे. यामुळे मुलांना वाटू शकतं की ते असुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर कोणीच प्रेम करत नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे खऱ्या ख्रिश्चनांवरही याचा परिणाम झाला आहे. यामागचं कारण काय आहे? “दुष्ट व फसवी माणसे” आज सर्व ठिकाणी आहेत आणि यातील काही लोक मंडळीत येण्याचाही प्रयत्न करू शकतात. (२ तीम. ३:१३) यासोबतच, मंडळीचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या काहींनी, त्यांच्या अनैसर्गिक शारीरिक इच्छांना बळी पडून लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं आहे. टेहळणी बुरूज१९.०५ ८ ¶१-३
रविवार, ९ मे
नीतिमान मनुष्याने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.—याको. ५:१६.
मनात कमीपणाची भावना असल्यामुळे कदाचित एखाद्या व्यक्तीला वाटू शकतं की ती यहोवाला प्रार्थना करू शकत नाही. अशा व्यक्तीला सांत्वन देण्यासाठी आपण तिच्यासोबत प्रार्थना करू शकतो. असं करत असताना तिचं वैयक्तिक नाव घेणं फायद्याचं ठरेल. प्रार्थनेत आपण यहोवाला सांगू शकतो की त्या व्यक्तीवर आपलं आणि मंडळीचंही किती प्रेम आहे. यहोवाने त्या व्यक्तीला एक शांत मन आणि सांत्वन द्यावं यासाठी आपण प्रार्थनेत विनंती करू शकतो. अशा प्रकारे प्रार्थना केल्यामुळे त्या व्यक्तीला खूप सांत्वन मिळू शकतं. बोलण्याआधी विचार करा. अविचारीपणे बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. याउलट प्रेमळ शब्दांमुळे मनावरच्या जखमा भरून निघू शकतात. (नीति. १२:१८) बोलताना तुम्हाला सांत्वनदायक शब्द वापरता यावेत म्हणून यहोवाकडे मदत मागा. नेहमी लक्षात असू द्या की कोणत्याही शब्दांपेक्षा बायबलमध्ये दिलेले यहोवाचे शब्द मनावर जास्त प्रभाव पाडू शकतात. (इब्री ४:१२) इतरांना सांत्वन देण्याद्वारे आपण त्यांना यहोवाचं त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची आठवण करून देतो. आणि आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यहोवा हा न्याय करणारा देव आहे. कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार त्याच्यापासून लपून राहू शकत नाही. यहोवा सर्व काही पाहू शकतो आणि पश्चात्ताप न करणाऱ्यांना तो त्यांच्या चुकांची शिक्षा नक्की देईल.—गण. १४:१८. टेहळणी बुरूज१९.०५ १८ ¶१८; १९ ¶१९, २१
सोमवार, १० मे
मानवी परंपरांनुसार . . . असलेले तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा.—कलस्सै. २:८.
आपल्याला यहोवाच्या विरोधात नेण्याची सैतानाची इच्छा आहे. हे साध्य करण्यासाठी तो आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत फेरबदल करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सैतानाचा हाच हेतू आहे की आपलं मन त्याच्या कैदेत यावं आणि आपण त्याच्यासारखा विचार करावा. आपल्याला ज्या गोष्टींचं आकर्षण वाटतं त्यांचा वापर करून तो आपल्याला त्याच्या मागे चालायला लावतो. अशा प्रकारे तो आपल्याला भुलवण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न करतो. (कलस्सै. २:४) सैतानाकडून भुलवलं जाणं हा खरंच आपल्यासाठी एक मोठा धोका आहे का? हो नक्कीच! हे लक्षात असू द्या, की पौलने कलस्सैकर २:८ मध्ये लिहिलेला इशारा अविश्वासू लोकांसाठी नव्हता, तर त्याने तो अशा ख्रिश्चनांसाठी लिहिला होता जे पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झाले होते. (कलस्सै. १:२, ५) त्या वेळी त्या ख्रिश्चनांसमोर सैतानाकडून आपली फसवणूक होण्याचा धोका होता. पण आज आपल्यासमोर तर आणखी मोठा धोका आहे. (१ करिंथ. १०:१२) असं का म्हणता येईल? कारण सैतानाला या पृथ्वीवर फेकून देण्यात आलं आहे आणि तो देवाच्या विश्वासू सेवकांना भुलवण्यासाठी भरपूर खटाटोप करत आहे. (प्रकटी. १२:९, १२, १७) तसंच, आपण अशा काळात जगत आहोत जिथे दुष्ट व फसवी माणसं “अधिकाधिक वाईट” होत चालली आहेत.—२ तीम. ३:१, १३. टेहळणी बुरूज१९.०६ २ ¶१-२
मंगळवार, ११ मे
हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर.—१ राजे १९:४.
ईजबेल राणीने एलीयाला जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा तो खूप घाबरला. यामुळे तो बैर-शेबा या ठिकाणी पळून गेला. तो इतका जास्त निराश झाला होता की “आपला प्राण जाईल तर बरे” असं त्याला वाटलं. त्याच्या मनात अशा भावना का आल्या? एलीया अपरिपूर्ण होता आणि तोही “आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य होता.” (याको. ५:१७) तणावामुळे आणि खूप थकून गेल्यामुळे त्याला कदाचित असं वाटलं असावं. एलीयाने विचार केला की खऱ्या उपासनेला वाढवण्यासाठी त्याने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत आणि त्याच्या प्रयत्नांचा इस्राएली लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. तसंच त्याला वाटलं की संपूर्ण इस्राएलमध्ये यहोवाची उपासना करणारा आता तो एकटाच उरला आहे. (१ राजे १८:३, ४, १३; १९:१०, १४) यहोवाने एलीयाच्या भावना समजून घेतल्या. एलीयाने आपल्या भावना यहोवासमोर व्यक्त केल्या तेव्हा तो त्याच्यावर रागावला नाही. याऐवजी यहोवाने त्याला विश्वासात स्थिर व्हायला मदत केली. (१ राजे १९:५-७) नंतर, यहोवाने आपली अद्भुत शक्ती दाखवून प्रेमळपणे एलीयाचे चुकीचे विचार सुधारले. मग यहोवाने एलीयाला सांगितलं की इस्राएलमध्ये अजूनही असे ७,००० लोक आहेत ज्यांनी बआलची उपासना नाकारली आहे. (१ राजे १९:११-१८) आपलं एलीयावर खूप प्रेम आहे हे यहोवाने व्यावहारिक मार्गांनी दाखवलं. टेहळणी बुरूज१९.०६ १५-१६ ¶५-६
बुधवार, १२ मे
वडील माणसांच्या अधीन राहा. . . . एकमेकांशी नम्रतेने वागत जा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो.—१ पेत्र ५:५.
आपण नेहमी दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं पाहिजे. आपण जर भरवशालायक आणि जबाबदार बांधवांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं तर आपल्याला अनावश्यक समस्या टाळता येतील. उदाहरणार्थ, बंदी असलेल्या एका देशात जबाबदार बांधवांनी प्रचारकांना असं मार्गदर्शन दिलं की त्यांनी सेवाकार्यात छापील साहित्यं देऊ नये. तरीपण, त्या क्षेत्रातल्या एका पायनियर बांधवाने मार्गदर्शनाचं पालन केलं नाही आणि लोकांना साहित्यं दिली. याचा काय परिणाम झाला? त्या बांधवाचं आणि इतर काहींचं अनौपचारिक साक्षकार्य संपल्यावर काही वेळेतच तिथे पोलीस आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारले. खरंतर, अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला होता आणि साक्षीदारांनी लोकांना वाटलेली साहित्यं त्यांनी गोळा केली. या अनुभवातून आपण काय शिकतो? एखादं मार्गदर्शन आपल्याला पटत नसलं तरीसुद्धा आपण त्याचं पालन केलं पाहिजे. यहोवाने नेतृत्व करणाऱ्या बांधवांना नेमलं आहे आणि जेव्हा आपण त्यांना सहकार्य देतो तेव्हा यहोवाचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असतो.—इब्री १३:७, १७. टेहळणी बुरूज१९.०७ १२ ¶१७
गुरुवार, १३ मे
ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने जीवन जगू इच्छिणाऱ्या सर्वांचा छळ केला जाईल.—२ तीम. ३:१२.
आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री प्रभू येशूने म्हटलं होतं, की जे कोणी त्याचे शिष्य बनण्याचं निवडतील त्यांचा द्वेष केला जाईल. (योहा. १७:१४) तेव्हापासून ते आजपर्यंत यहोवाच्या विश्वासू साक्षीदारांचा त्यांच्या विरोधकांकडून छळ केला जात आहे. त्यामुळे हे अपेक्षितच आहे की जसजसा या जगाच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ येईल, तसतसं आपले विरोधक जास्त प्रमाणात आपला छळ करतील. (मत्त. २४:९) तर मग, छळाचा सामना करण्यासाठी आपण आताच तयारी कशी करू शकतो? आपल्यासोबत कायकाय घडू शकतं त्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला विचार करण्याची गरज नाही. कारण आपण जर असं केलं तर आपण चिंता आणि भीती यांमुळे भारावून जाऊ. आपण कदाचित इतके घाबरून जाऊ की छळ होण्याआधीच आपण यहोवाची सेवा करण्याचं सोडून देऊ. (नीति. १२:२५; १७:२२) आपला “शत्रू सैतान” भीतीला आपल्याविरुद्ध एका प्रभावशाली शस्त्राप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ५:८, ९) त्यामुळे, आत्ताच यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करणं महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज१९.०७ २ ¶१-३
शुक्रवार, १४ मे
म्हणून, जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.—मत्त. २८:१९.
येशूचं पुनरुत्थान झाल्यावर त्याने त्याच्या प्रेषितांना गालीलच्या एका डोंगरावर भेटायला बोलवलं. ते जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा येशू काय सांगणार याची त्यांना उत्सुकता लागली होती. (मत्त. २८:१६) हा तोच प्रसंग असावा जेव्हा येशू “एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला.” (१ करिंथ. १५:६) येशूने त्याच्या शिष्यांना तिथे का बोलवलं होतं? येशूला त्यांना एक रोमांचक कामगिरी सोपवायची होती. त्याबद्दल त्याने म्हटलं: “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.” (मत्त. २८:१८-२०) येशूच्या ज्या शिष्यांनी त्याचे शब्द ऐकले ते शिष्य नंतर पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीचे भाग बनले. त्या मंडळीचं मुख्य ध्येय जास्तीत जास्त लोकांना येशूचे शिष्य बनवणं हे होतं. आज संपूर्ण जगात खऱ्या ख्रिश्चनांच्या बऱ्याच मंडळ्या आहेत आणि या मंडळ्यांचं मुख्य ध्येयसुद्धा हेच आहे. टेहळणी बुरूज१९.०७ १४ ¶१-२
शनिवार, १५ मे
पृथ्वीच . . . सदा कायम राहते.—उप. १:४.
नोर्वेमध्ये असलेले एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणतात, की देवाविषयी बोलायला तयार नसलेले लोक सहसा जगातल्या परिस्थितींबद्दल बोलायला तयार असतात. लोकांना आपली ओळख करून दिल्यावर ते विचारतात: “आपलं भविष्य चांगलं असेल का? ते आपल्यासाठी कोण घडवून आणेल? नेते, वैज्ञानिक की आणखी कोणीतरी, तुम्हाला काय वाटतं?” उत्तर लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर ते उज्ज्वल भविष्याबद्दल असलेलं एखादं वचन वाचतात किंवा बोलून दाखवतात. पृथ्वी कायमस्वरूपी टिकेल आणि चांगले लोक त्यावर नेहमीसाठी राहतील या बायबलमधल्या अभिवचनामुळे काहींच्या मनात आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. (स्तो. ३७:२९) आपण लोकांना भेटतो तेव्हा त्यांच्याशी बोलताना वेगवेगळ्या प्रस्तावनांचा वापर केला पाहिजे. असं का? कारण एकाला जे आवडेल ते दुसऱ्या कदाचित आवडणार नाही. देव किंवा बायबल या विषयांवर काहींना चर्चा करायला हरकत नसते. पण इतर काहींशी दुसऱ्या विषयांवर बोललं तर ते आपला संदेश ऐकून घेतात. दोन्ही बाबतींत आपण सर्व लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (रोम. १:१४-१६) योग्य गोष्टींवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनात सत्याचं बी यहोवाच वाढवतो.—१ करिंथ. ३:६, ७. टेहळणी बुरूज१९.०७ २२-२३ ¶१०-११
रविवार, १६ मे
जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रेम केले, तर एकमेकांवर प्रेम करण्याचे आपलेही कर्तव्य आहे.—१ योहा. ४:११.
देवाचं आपल्यावर असलेलं अपार प्रेम आपल्याला बांधवांवर प्रेम करण्याची प्रेरणा देतं. (१ योहा. ४:२०, २१) आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करणं खूप सोपं आहे असं कदाचित आपल्याला वाटेल. कारण आपण सगळे एकाच देवाची उपासना करतो आणि त्याच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. येशूचं आपल्यावर अपार प्रेम असल्यामुळे त्याने त्याचं जीवन आपल्यासाठी दिलं. याबाबतीत आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करतो. पण, असं असलं तरी आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा पाळणं कधीकधी कठीण वाटू शकतं. युवदीया आणि सुंतुखे या आवेशी बहिणींनी प्रेषित पौलसोबत यहोवाच्या सेवेत मेहनत घेतली होती. असं असलं तरी त्यांच्यात काही मतभेद झाले आणि दुरावा निर्माण झाला. युवदीया आणि सुंतुखे ज्या मंडळीत होत्या, त्या मंडळीला पत्र लिहिताना पौलने त्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला आणि त्यांना “एका मनाचे” असण्याचा सल्ला दिला. (फिलिप्पै. ४:२, ३) पौलला संपूर्ण मंडळीलाही पुढील सल्ला देणं गरजेचं वाटलं. त्याने म्हटलं: “कुरकुर व वादविवाद न करता सर्व गोष्टी करत जा.”—फिलिप्पै. २:१४. टेहळणी बुरूज१९.०८ ९ ¶६-७
सोमवार, १७ मे
एकमेकांची ओझी वाहत राहा.—गलती. ६:२.
पूर्ण वेळेच्या सेवकांना आपली सेवा करत राहण्यासाठी बऱ्याच मंडळ्या आणि भाऊबहिणी आपआपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतात. ही खरंच प्रशंसेची गोष्ट आहे. पूर्ण वेळेच्या सेवकांना ते आर्थिक किंवा इतर गोष्टी देऊन मदत करतात किंवा दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या आईवडिलांची काळजी घेण्याद्वारे ते त्यांना मदत करतात. जर पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्यांना तुमच्या मंडळीत नेमण्यात आलं, तर त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करू नका. त्यांनी काहीतरी चूक केली असेल किंवा सेवेत ते कमी पडले म्हणून त्यांना इथे नेमण्यात आलं असा विचार करू नका. याऐवजी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना मदत करा. त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या सेवेबद्दल त्यांची प्रशंसा करा. कदाचित आजारपणामुळे त्यांना पूर्वीइतकी सेवा करणं शक्य नसेल, तरीदेखील त्यांना मदत करत राहा. त्यांच्याशी मैत्री करा. पूर्ण वेळेची सेवा केल्यामुळे त्यांना मिळालेलं प्रशिक्षण, ज्ञान आणि अनुभव त्यातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा. नवीन नेमणूक मिळालेल्या भाऊबहिणींना सुरुवातीला तुमच्या मदतीची गरज पडू शकते. घर किंवा नोकरी शोधण्यासाठी आणि इतर गरजेच्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता. टेहळणी बुरूज१९.०८ २३-२४ ¶१२-१३
मंगळवार, १८ मे
हे गोगा, . . . मी राष्ट्रांदेखत तुझ्याद्वारे आपली पवित्रता प्रगट करीन.—यहे. ३८:१६.
गोगला आपल्या “मांसमय भुजांचा” आधार असेल, म्हणजे तो आपल्या सैन्याच्या ताकदीवर भरवसा ठेवेल. (२ इति. ३२:८) आपण मात्र आपल्या यहोवा देवावर भरवसा ठेवू. पण ही गोष्ट राष्ट्रांना मूर्खपणाची वाटेल. असं का? कारण एके काळी खूप शक्तिशाली असलेल्या मोठ्या बाबेलचे देव तिला “जंगली पशू” आणि त्याच्या “दहा शिंगे” यांपासून वाचवू शकले नाही. (प्रकटी. १७:१६) म्हणून गोगला म्हणजे राष्ट्रांना वाटेल की ते आपला अगदी सहज रीत्या नाश करू शकतील. गोग “अभ्राने देश झाकावा” तसा यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल. पण त्याच्या लवकरच लक्षात येईल की तो स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे. प्राचीन काळातल्या फारोला जसं कळलं तसं गोगलाही कळेल की तो यहोवाच्या विरोधात लढत आहे. (निर्ग. १४:१-४; यहे. ३८:३,४,१८,२१-२३) ख्रिस्त व त्याचं स्वर्गातलं सैन्य देवाच्या वतीने लढेल आणि राष्ट्रं आणि त्यांच्या सैन्यांचा पूर्णपणे नाश करेल. (प्रकटी. १९:११,१४,१५) पण यहोवाच्या मुख्य शत्रूबद्दल, सैतानाबद्दल काय? तो राष्ट्रांशी खोटं बोलला आणि त्याने त्यांना हर्मगिदोनच्या लढाईत देवाच्या लोकांवर हल्ला करायला लावला. येशू त्याला आणि दुरात्म्यांना “अथांग डोहात टाकून” देईल आणि त्यांना तिथे हजार वर्षांसाठी कैद करण्यात येईल.—प्रकटी. २०:१-३. टेहळणी बुरूज१९.०९ ११-१२ ¶१४-१५
बुधवार, १९ मे
त्याची वाट पाहा; तो येईलच.—हब. २:३.
यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत आणि हे स्वाभाविक आहे. पण आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायला उशीर होत आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपला उत्साह कमी होऊ शकतो. इतकंच काय, तर आपण कदाचित निराशही होऊ. (नीति. १३:१२) असंच काहीसं जवळपास १९१४ च्या सुरुवातीला घडलं. त्या वेळी अनेक अभिषिक्त ख्रिश्चनांना वाटलं होतं, की ते त्याच वर्षी स्वर्गात जातील. पण असं घडलं नाही तेव्हा या विश्वासू सेवकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? त्यांनी जीवनाच्या शर्यतीत धावण्याचं सोडून दिलं नाही. कारण त्यांचं लक्ष प्रतिफळ मिळवण्यावर नाही तर विश्वासूपणे देवाची इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित होतं. त्यांनी धीराने धावत राहण्याचा पक्का निर्धार केला होता. यात काहीच शंका नाही, की आपण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा यहोवाच्या नावावर लागलेला कलंक मिटेल, राज्य करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे हे सिद्ध होईल आणि त्याने दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण होतील. यहोवाने ठरवलेल्या वेळी हे सगळं नक्कीच पूर्ण होईल याची आपण पक्की खातरी बाळगू शकतो. पण तोपर्यंत अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे या गोष्टीमुळे निराश होऊ नका किंवा आपला आवेश कमी करू नका, तर यहोवाच्या सेवेत व्यस्त राहा. टेहळणी बुरूज१९.०८ ४-५ ¶९-१०
गुरुवार, २० मे
मी सौम्य मनाचा आणि नम्र आहे.—मत्त. ११:२९.
स्वतःला विचारा: ‘इतर जण मला एक सौम्य आणि नम्र व्यक्ती म्हणून ओळखतात का? मी इतरांना मदत करण्यासाठी लहानसहान कामं करायला तयार असतो का? मी इतरांशी दयाळूपणे वागतो का?’ येशूच्या शिष्यांना त्याच्यासोबत काम करताना आनंद मिळावा म्हणून येशूने एक शांतीपूर्ण वातावरण तयार केलं आणि त्याच्या शिष्यांना प्रशिक्षण देताना त्याला खूप आनंद व्हायचा. (लूक १०:१, १९-२१) येशूने त्याच्या शिष्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तो त्यांचं मत ऐकून घेण्यासाठी तयार असायचा. (मत्त. १६:१३-१६) ज्या प्रकारे, नर्सरित किंवा बागेत ठेवलेल्या रोपांचं, ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांची काळजी घेतली जाते आणि यामुळे त्यांच्या वाढीसाठी मदत होते, त्याच प्रकारे येशूच्या सहवासात राहून शिष्यांची एका अर्थी वाढ होत होती. येशूने शिकवलेल्या गोष्टी ते चांगल्या प्रकारे शिकू शकले आणि त्यामुळे त्यांनी चांगली फळं दिली म्हणजे ते चांगली कामं करू शकले. तुम्हालाही काही प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत का? असं असेल तर स्वतःला पुढील प्रश्न विचारा: ‘मी घरात किंवा कामाच्या ठिकाणी इतरांशी कसं वागतो? मी शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो का? मी इतरांना प्रश्न विचारण्याचं प्रोत्साहन देतो का? मी इतरांचं मत ऐकून घ्यायला तयार असतो का?’ आपल्याला परूश्यांसारखं बनण्याची अजिबात इच्छा नाही. प्रश्न विचारणाऱ्या लोकांचा ते तिरस्कार करायचे आणि त्यांच्यापेक्षा वेगळं मत असलेल्या लोकांचा ते छळ करायचे.—मार्क ३:१-६; योहा. ९:२९-३४. टेहळणी बुरूज१९.०९ २० ¶१; २३ ¶९-११
शुक्रवार, २१ मे
“शांती आहे, सुरक्षा आहे!” असे जेव्हा ते म्हणत असतील तेव्हा एकाएकी, . . . त्यांच्यावर अचानक नाश येईल.—१ थेस्सलनी. ५:३.
राष्ट्रांना आपसांत चांगले संबंध स्थापित करायचे असतात तेव्हा कधीकधी जगभरातले नेते यांसारख्याच शब्दांचा वापर करतात. पण बायबलमध्ये दिलेली “शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा त्यांपेक्षा वेगळी असेल. असं का? कारण असं घडेल तेव्हा लोकांना वाटेल की जगातल्या नेत्यांना या संपूर्ण पृथ्वीवर शांती आणण्यात आणि तिला सुरक्षित बनवण्यात यश मिळालं आहे. पण खरं पाहिलं तर, “मोठं संकट” सुरू झाल्यावर “अचानक नाश” येईल. (मत्त. २४:२१) जगातले शासक ही घोषणा कोणत्या कारणांमुळे आणि कशा प्रकारे करतील हे आपल्याला माहीत नाही. तसंच, याबद्दल अनेक घोषणा केल्या जातील की फक्त एकच मोठी घोषणा होईल हेही आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला एक गोष्ट मात्र पक्की माहीत आहे, की मानवी शासक कधीच शांती आणू शकणार नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या अशा कोणत्याही घोषणेला आपण फसू नये. कारण बायबल म्हणतं की ही घोषणा “यहोवाचा दिवस” सुरू होण्याचा इशारा असेल!—१ थेस्सलनी. ५:२. टेहळणी बुरूज१९.१० ८-९ ¶३-४
शनिवार, २२ मे
त्या वेळी [तुझे लोक] मुक्त होतील.—दानी. १२:१.
हर्मगिदोनच्या युद्धाने जगाच्या व्यवस्थेचा शेवट होईल. पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही. असं का? कारण ही देवाची लढाई असेल आणि आपल्याला लढावं लागणार नाही. (नीति. १:३३; यहे. ३८:१८-२०; जख. १४:३) यहोवाने आज्ञा दिल्यावर येशू लगेच देवाच्या सैन्याला सोबत घेऊन लढायला सज्ज होईल. पुनरुत्थान झालेले अभिषिक्त जन आणि लाखो स्वर्गदूत त्याच्यासोबत असतील. ते एकत्र मिळून सैतान, त्याचे दुरात्मे आणि पृथ्वीवरची त्याची सैन्यं यांच्या विरुद्ध लढतील. (प्रकटी. ६:२; १७:१४) यहोवाने आपल्याला असा भरवसा दिला आहे, की “तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) यहोवाच्या विश्वासू उपासकांचा “मोठा लोकसमुदाय” हा सुखरूप “मोठ्या संकटातून बाहेर” येईल. त्यानंतर मोठा लोकसमुदाय त्याची पवित्र सेवा करतच राहील. (प्रकटी. ७:९, १३-१७) भविष्यात आपला बचाव नक्की होईल आणि असा विश्वास ठेवण्यासाठी बायबलमध्ये बरीच कारणं दिली आहेत. आपल्याला माहीत आहे, की “परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो.” (स्तो. ३१:२३) यहोवा आपलं पवित्र नाव उंचावेल तेव्हा त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि त्याची स्तुती करणाऱ्यांसाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस असेल!—यहे. ३८:२३. टेहळणी बुरूज१९.१० १८-१९ ¶१७-१८
रविवार, २३ मे
मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो.—नीति. १७:१७.
आपण जसजसं अंताच्या जवळ जात आहोत तसतसं आपल्याला कठीण परीक्षांना तोंड द्यावं लागू शकतं. (२ तीम. ३:१) उदाहरणार्थ, पूर्व आफ्रिकेतल्या एका देशात झालेल्या निवडणुकीनंतर सर्वत्र अशांती आणि हिंसेचं वातावरण पसरलं होतं. सगळीकडे लोक मारामारी करत असल्यामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापर्यंत आपल्या भाऊबहिणींना मोकळेपणे बाहेर फिरणं मुश्किल झालं होतं. मग अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांना कुठून मदत मिळाली? काही जण दूरवर सुरक्षित असलेल्या ठिकाणी आपल्या भाऊबहिणींच्या घरी राहायला गेले. याबद्दल एका बांधवाने म्हटलं: “अशा परिस्थितीत आपल्या भाऊबहिणींसोबत असताना मला जाणवलं की खरंच मला किती चांगले मित्र मिळाले आहेत. यामुळे आम्हाला एकमेकांना प्रोत्साहन देणं शक्य झालं.” मोठं संकट सुरू होईल तेव्हा आपल्यावर प्रेम करणारे मित्र आपल्यासोबत असतील याचा आपल्याला आनंद असेल. (प्रकटी. ७:१४) त्यामुळे आताच मैत्रीचं नातं मजबूत करणं खूप गरजेचं आहे. (१ पेत्र ४:७, ८) का? कारण, आपले शत्रू खोटी आणि चुकीची माहिती पसरवून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. ते आपल्याला एकमेकांविरुद्ध जाण्यासाठी प्रवृत्त करतील. पण ते यात यशस्वी होणार नाहीत. आपल्यातल्या प्रेमळ नात्याचे बंध ते कधीच तोडू शकणार नाहीत. टेहळणी बुरूज१९.११ २ ¶१-२; ७ ¶१९
सोमवार, २४ मे
तुम्ही त्या दुष्टाचे सर्व जळते बाण विझवू शकाल.—इफिस. ६:१६.
सैतान हा “खोटेपणाचा बाप आहे” आणि तो त्याच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांचा उपयोग करून यहोवा आणि बांधवांबद्दल अफवा पसरवतो. (योहा. ८:४४) उदाहरणार्थ, धर्मत्यागी लोक यहोवाच्या संघटनेबद्दल अफवा पसरवतात आणि आपल्या शिकवणींमध्ये फेरबदल करून खोट्या गोष्टी पसरवतात. या खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी ते वेबसाईट्स, टिव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांचा उपयोग करतात. या अफवा सैतानाच्या जळत्या बाणांचाच एक भाग आहेत. आपल्याला जर कोणी अशा खोट्या गोष्टी सांगत असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण लगेच त्यांचं ऐकण्याचं थांबवलं पाहिजे. असं का? कारण आपला यहोवावर आणि आपल्या बांधवांवर पूर्ण भरवसा आहे. आपण धर्मत्यागी लोकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधणार नाही. तसंच, आपला विश्वास कमकुवत होऊ नये म्हणून आपण त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करणार नाही; मग आपल्याला त्यांचं म्हणणं जाणून घेण्याची उत्सुकता वाटत असली तरीही. धर्मत्यागी लोक आपल्याबद्दल जे खोटं पसरवतात ते ऐकण्याचा किंवा त्यावर चर्चा करण्याचा मोह तुम्ही टाळला आहे का? टाळला असेल तर ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे, कारण सैतान इतर हत्यारांचा उपयोग करूनही आपला विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. टेहळणी बुरूज१९.११ १५ ¶८; १६ ¶११
मंगळवार, २५ मे
परमेश्वर हृदय पाहतो.—१ शमु. १६:७.
निर्णय घेताना आपल्या हेतूंचं परीक्षण करा. आपण सर्व गोष्टींत प्रामाणिक असावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो आपण कोणत्या हेतूने घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या हेतूंबद्दल आपण स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असलं पाहिजे. आपण प्रामाणिक राहिलो नाही तर आपल्या निर्णयांवर टिकून राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. कल्पना करा, एक तरुण बांधव रेग्युलर पायनियरिंग करण्याचा निर्णय घेतो. पण काही काळानंतर त्याला त्याचे तास पूर्ण करणं कठीण जाऊ लागतं आणि सेवाकार्यातला त्याचा आनंद कमी होऊ लागतो. हे कशामुळे घडलं असावं? त्याला सुरुवातीला वाटलं असावं की यहोवाचं मन आनंदित करणं हा त्याचा पायनियरिंग करण्याचा मुख्य हेतू आहे. पण खरंतर त्याचा मुख्य हेतू आईवडिलांना किंवा इतरांना खूश करणं हा असावा. एका अशा बायबल विद्यार्थ्याचा विचार करा ज्याने आपल्या धुम्रपानाच्या व्यसनावर मात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला त्याला खूप अवघड जात असलं तरी तो एक-दोन आठवड्यांसाठी सिगरेट पीत नाही. पण नंतर त्याला सिगरेट पिण्याचा मोह आवरत नाही आणि तो पुन्हा धुम्रपान करतो. पण शेवटी तो आपल्या सवयीवर मात करण्यात यशस्वी होतो. यहोवावर असलेल्या प्रेमामुळे आणि त्याचं मन आनंदित करण्याची इच्छा असल्यामुळे त्याला आपली वाईट सवय सोडायला मदत होते!—कलस्सै. १:१०; ३:२३. टेहळणी बुरूज१९.११ २७ ¶९; २९ ¶१०
बुधवार, २६ मे
ख्रिस्ताविषयीच्या आनंदाच्या संदेशाला शोभेल अशा नागरिकांसारखे आचरण करा.—फिलिप्पै. १:२७, तळटीप.
प्रेषित पौलला पक्की खातरी होती की तो शर्यत पूर्ण करून आपलं ध्येय गाठेल. एक अभिषिक्त ख्रिस्ती या नात्याने त्याला देवाने “दिलेल्या वरील बोलावण्याचे बक्षीस” मिळण्याची आशा होती. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला “कसोशीने प्रयत्न” करत राहावं लागेल याची त्याला जाणीव होती. (फिलिप्पै. ३:१४) पौलने एक चांगलं उदाहरण वापरून फिलिप्पैकरांना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मदत केली. पौलने फिलिप्पैकरांना त्यांच्या स्वर्गातल्या नागरिकत्वाची आठवण करून दिली. (फिलिप्पै. ३:२०) त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं का होतं? त्या काळात रोमी नागरिकत्व असणं ही खूप बहुमानाची गोष्ट समजली जायची. पण अभिषिक्त ख्रिश्चनांकडे त्यापेक्षाही जास्त चांगलं नागरिकत्व होतं आणि त्यामुळे त्यांना बरेच फायदे मिळणार होते. स्वर्गातल्या नागरिकत्वाच्या तुलनेत रोमी नागरिकत्वाचं मोल खूप कमी होतं. आज अभिषिक्त जण स्वर्गातलं कायमस्वरूपाचं जीवन मिळवण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करताना कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांचं खरंच आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे! टेहळणी बुरूज१९.०८ ६ ¶१४-१५
गुरुवार, २७ मे
जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्त केलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल.—योहा. ८:३६.
ही मुक्तता किंवा सुटका बऱ्याच बाबतीत इस्राएली लोकांना योबेल वर्षात मिळणाऱ्या सुटकेपेक्षा श्रेष्ठ होती. (लेवी. २५:८-१२) उदाहरणार्थ, योबेल वर्षात मुक्त झालेला दास, कदाचित परिस्थितीमुळे पुन्हा दास्यात जाऊ शकत होता आणि कालांतराने वय झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालाच असता. पण येशूने लोकांसाठी केलेला सुटकेचा प्रबंध हा सदासर्वकाळ टिकणारा आहे. इ.स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांना आणि इतर विश्वासू स्त्री-पुरुषांना अभिषिक्त केलं. यहोवाने त्यांना दत्तक घेतलं आणि आपली मुलं म्हणून स्वीकारलं. यामुळे त्यांचं पुढे जाऊन स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान होणार होतं आणि ते येशूसोबत राज्य करणार होते. (रोम. ८:२, १५-१७) नासरेथमधल्या सभास्थानात येशूने केलेल्या सुटकेच्या घोषणेचा सर्वात आधी या स्त्री-पुरुषांनाच फायदा झाला. (लूक ४:१६-१९, २१) हे स्त्री-पुरुष आता खोट्या शिकवणींपासून आणि यहुदी धार्मिक पुढाऱ्यांच्या मानवी परंपरांपासून मुक्त झाले होते. यासोबतच, पापाच्या घातक परिणामांपासून मुक्त होण्यासाठी आता देवाने त्यांच्यासाठी एक तरतूद केली होती. इ.स. ३३ मध्ये ख्रिस्ताच्या अनुयायांना अभिषिक्त करण्याद्वारे या लाक्षणिक सुटकेच्या वर्षाची सुरुवात झाली. आणि या लाक्षणिक वर्षाचा शेवट ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी होईल. टेहळणी बुरूज१९.१२ ११ ¶११-१२
शुक्रवार, २८ मे
वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.—१ करिंथ. १५:३३.
पालकांनो चांगली मैत्री निवडण्यासाठी आपल्या मुलांना मदत करा. आपली मुलं कोणाशी मैत्री करतात आणि आपला वेळ कसा घालवतात हे आई आणि वडील या दोघांनाही माहीत असायला हवं. तसंच, त्यांना हे माहीत असणंही गरजेचं आहे की आपली मुलं सोशल मिडिया आणि मोबाईल फोन या माध्यमांद्वारे कोणाशी बोलतात. कारण मुलं ज्यांच्याशी मैत्री करतात त्याचा त्यांच्या विचारांवर आणि कार्यांवर प्रभाव होऊ शकतो. अनेक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी अशा बऱ्याच संधी तयार केल्या आहेत, ज्यामुळे त्यांना आवेशी ख्रिश्चनांसोबत संगती करता येईल. उदाहरणार्थ, कोट-दि-वार या ठिकाणी राहणारे एनडेनी आणि बोमीन यांनी अनेक वेळा आपल्या घरी विभागीय पर्यवेक्षकांना राहायला बोलवलं. एनडेनी म्हणतात: “यामुळे आमच्या मुलावर चांगला परिणाम झाला. त्याने पायनियरींग सुरू केली आणि आता तो अधूनमधून विभागीय पर्यवेक्षक म्हणूनही सेवा करतो.” आईवडील जितक्या लवकर आपल्या मुलांना प्रशिक्षण देतील तितकं मुलांसाठी ते फायद्याचं ठरेल. (नीति. २२:६) तीमथ्यचंच उदाहरण घ्या. त्याची आई युनीके आणि आजी लोईस यांनी त्याला “बालपणापासून” प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती.—२ तीम. १:५; ३:१५. टेहळणी बुरूज१९.१२ २५ ¶१४; २६ ¶१६-१७
शनिवार, २९ मे
एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपल्याला धरून राहतो.—नीति. १८:२४.
भरवशालायक मित्र बना. उदाहरणार्थ, आपल्या भाऊबहिणींना गरज असते तेव्हा आपण त्यांना फक्त मदत करण्याचं वचन देणार नाही, तर व्यावहारिक मार्गांनी मदतही करू. (मत्त. ५:३७; लूक १६:१०) गरज असलेल्या भाऊबहिणींना जेव्हा कळतं की आपण त्यांना खरंच मदत करायला तयार आहोत तेव्हा त्यांना खूप सांत्वन मिळतं. असं आपण का म्हणू शकतो? याबद्दल एक बहीण म्हणते: “ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत करण्याचं वचन दिलं आहे, ती खरंच वेळेवर तुम्हाला मदत करेल की नाही, या गोष्टीची चिंता करायची तुम्हाला गरज नसते.” परीक्षेचा किंवा निराशेचा सामना करणाऱ्या व्यक्तीने जर एखाद्या विश्वासू मित्राकडे तिचं मन मोकळं केलं तर तिला सांत्वन मिळू शकतं. पण एक भरवशालायक मित्र बनण्यासाठी आणि समोरच्याने त्याचं मन आपल्याजवळ मोकळं करण्यासाठी आपल्याला धीराचा गुण विकसित करणं गरजेचं आहे. झॉना नावाच्या बहिणीचा विचार करा. तिचे पती तिला सोडून गेले तेव्हा तिने तिच्या भावना तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितल्या. असं केल्यामुळे तिला खूप सांत्वन मिळालं. ती म्हणते: “मी सारखी-सारखी त्यांना एकच गोष्ट सांगायचे, पण प्रत्येक वेळी त्यांनी धीर धरला आणि माझं ऐकून घेतलं.” तुम्हीही एक चांगले मित्र बनू शकता पण त्यासाठी तुम्हाला इतरांचं लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२०.०१ १०-११ ¶९-११
रविवार, ३० मे
आपल्या आईच्या गर्भापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होईल.—लूक १:१५.
बायबलमध्ये अशा अनेक विश्वासू सेवकांची उदाहरणं आहेत ज्यांना पवित्र आत्मा मिळाला होता. पण तरीही, त्यांना स्वर्गात जगण्याची आशा नव्हती. दावीदला पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन मिळालं होतं. (१ शमु. १६:१३) यहोवाबद्दल गहन गोष्टी समजण्यासाठी आणि बायबलचे काही भाग लिहिण्यासाठी पवित्र आत्म्याने त्याला मदत केली. (मार्क १२:३६) असं असलं तरी प्रेषित पेत्रने म्हटलं: “दावीद स्वर्गात गेला नाही.” (प्रे. कार्ये २:३४) बाप्तिस्मा देणारा योहानसुद्धा “पवित्र आत्म्याने परिपूर्ण” झाला होता. (लूक १:१३-१६) येशूने म्हटलं की योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी आलेलं नाही. पण त्याने पुढे असंही म्हटलं की योहान त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करणार नाही. (मत्त. ११:१०, ११) यहोवाने त्याच्या या सेवकांना आश्चर्यकारक कामं करण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा दिला, पण या पवित्र आत्म्याचा वापर त्याने त्यांना अभिषिक्त करण्यासाठी केला नाही. मग याचा अर्थ असा होतो का की हे सेवक कमी विश्वासू होते? नाही. तर याचा अर्थ असा आहे की यहोवा त्यांना पृथ्वीवर नंदनवनात पुन्हा जिवंत करेल.—योहा. ५:२८, २९; प्रे. कार्ये २४:१५. टेहळणी बुरूज२०.०१ २५ ¶१५
सोमवार, ३१ मे
आधी त्याने आपल्यावर प्रेम केले, म्हणून आपण प्रेम करतो.—१ योहा. ४:१९.
यहोवाने आपल्याला त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग बनण्याचं आमंत्रण दिलं आहे. हे कुटुंब अशा सदस्यांनी बनलेलं आहे ज्यांनी देवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे आणि जे त्याच्या मुलाच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवतात. आपलं कुटुंब एक आनंदी कुटुंब आहे. कारण, आज आपल्या जीवनाला अर्थ आहे आणि भविष्यात आपल्याला सर्वकाळच्या जीवनाची आशा आहे; मग ती स्वर्गात असो किंवा पृथ्वीवर. यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आपण त्याच्या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी त्याने खूप मोठा त्याग केला आहे. (योहा. ३:१६) त्याने “किंमत देऊन” आपल्याला विकत घेतलं आहे. (१ करिंथ. ६:२०) खंडणीमुळे आपल्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडणं शक्य झालं. विश्वातल्या सगळ्यात महान व्यक्तीला, पिता म्हणण्याचा सन्मान आपल्याला मिळाला आहे. आणि यहोवा हा सर्वात चांगला पिता आहे. एका बायबल लेखकाप्रमाणे आपल्याही मनात प्रश्न येऊ शकतो की “यहोवाने माझ्यासाठी जे सारे केले आहे, त्याची फेड करण्यासाठी मला आता त्याला कोणते अर्पण वाहता येईल?” (स्तो. ११६:१२, सुबोधभाषांतर) खरंतर, यहोवाने केलेल्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. तरीही त्याने दाखवलेल्या प्रेमामुळे आपण त्याच्यावर प्रेम करतो. टेहळणी बुरूज२०.०२ ८ ¶१-३