वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. ४२-५४
  • एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • गुरुवार, १ एप्रिल
  • शुक्रवार, २ एप्रिल
  • शनिवार, ३ एप्रिल
  • रविवार, ४ एप्रिल
  • सोमवार, ५ एप्रिल
  • मंगळवार, ६ एप्रिल
  • बुधवार, ७ एप्रिल
  • गुरुवार, ८ एप्रिल
  • शुक्रवार, ९ एप्रिल
  • शनिवार, १० एप्रिल
  • रविवार, ११ एप्रिल
  • सोमवार, १२ एप्रिल
  • मंगळवार, १३ एप्रिल
  • बुधवार, १४ एप्रिल
  • गुरुवार, १५ एप्रिल
  • शुक्रवार, १६ एप्रिल
  • शनिवार, १७ एप्रिल
  • रविवार, १८ एप्रिल
  • सोमवार, १९ एप्रिल
  • मंगळवार, २० एप्रिल
  • बुधवार, २१ एप्रिल
  • गुरुवार, २२ एप्रिल
  • शुक्रवार, २३ एप्रिल
  • शनिवार, २४ एप्रिल
  • रविवार, २५ एप्रिल
  • सोमवार, २६ एप्रिल
  • मंगळवार, २७ एप्रिल
  • बुधवार, २८ एप्रिल
  • गुरुवार, २९ एप्रिल
  • शुक्रवार, ३० एप्रिल
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. ४२-५४

एप्रिल

गुरुवार, १ एप्रिल

मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो.—नीति. १७:१७.

अरिस्तार्ख मासेदोनियात असलेल्या थेस्सलनीका या शहरातला होता. तो प्रेषित पौलचा एक विश्‍वासू मित्र होता हे त्याने आपल्या कार्यांवरून दाखवून दिलं. पौल तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर असताना इफिसमध्ये गेला तेव्हा त्याने पहिल्यांदा अरिस्तार्खचा उल्लेख केला. अरिस्तार्ख जेव्हा पौलसोबत होता तेव्हा लोकांच्या एका जमावाने त्याला घेरलं. (प्रे. कार्ये १९:२९) पण नंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्याने स्वतःच्या सुरक्षेची चिंता केली नाही. तो खरंतर पौलला सोडून जाऊ शकला असता पण तरी तो त्याच्यासोबत राहिला. मग काही महिन्यांनंतर पौल ग्रीसमध्ये असताना विरोधक त्याला मारण्याची संधी शोधत होते, तेव्हासुद्धा अरिस्तार्ख त्याला सोडून गेला नाही. (प्रे. कार्ये २०:२-४) इ.स. ५८ दरम्यान पौलला कैदी म्हणून रोमला पाठवण्यात आलं तेव्हाही अरिस्तार्ख त्याच्यासोबत होता. या लांबच्या प्रवासादरम्यान त्यांचं जहाज फुटलं तेव्हा त्या दोघांनी या समस्येचा धीराने सामना केला. (प्रे. कार्ये २७:१, २, ४१) रोममध्ये पोहोचल्यावर पौल कैदेत होता तेव्हाही अरिस्तार्ख त्याच्यासोबत काही काळासाठी कैदेत असावा. (कलस्सै. ४:१०) अरिस्तार्ख आपल्यासोबत आहे यामुळे पौलला नक्कीच प्रोत्साहन आणि सांत्वन मिळालं असेल यात काहीच शंका नाही. आपणही अरिस्तार्खसारखं आपल्या भाऊबहिणींसोबत एकनिष्ठ राहू शकतो. परिस्थिती चांगली असते फक्‍त तेव्हाच नाही तर ‘विपत्काली’ म्हणजेच दुःखाच्या प्रसंगीही आपण त्यांना एकनिष्ठ राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२०.०१ ९ ¶४-५

शुक्रवार, २ एप्रिल

जो कोणी पहिल्या पुनरुत्थानाचा वाटेकरी होतो तो सुखी व पवित्र आहे.—प्रकटी. २०:६.

अभिषिक्‍त झालेल्या व्यक्‍तीला वाटू शकतं की हा मौल्यवान आशीर्वाद मिळवण्यासाठी ती योग्य नाही. असं असलं तरी यहोवाने तिला निवडलं आहे याबद्दल तिच्या मनात थोडीपण शंका नसते. खरंतर, भविष्यातल्या आशेबद्दल विचार केल्यावर त्या व्यक्‍तीचं मन आनंदाने भरून जातं आणि तिला यहोवाबद्दल कृतज्ञता वाटते. (१ पेत्र १:३, ४) मग याचा अर्थ असा होतो का की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना मरण्याची इच्छा आहे? प्रेषित पौल या प्रश्‍नाचं उत्तर देतो. त्याने अभिषिक्‍तांच्या शरीराची तुलना एका तंबूसोबत केली. त्याने म्हटलं: “खरे पाहता, या तंबूमध्ये असलेले आपण ओझ्याखाली दबून जातो आणि कण्हतो, कारण आपल्याला हे काढून टाकायचे नाही, पण ते दुसरे घालायचेही आहे, यासाठी की जे मरणारे आहे त्याला जीवनाने कायमचे गिळून टाकावे.” (२ करिंथ. ५:४) याचा अर्थ असा होत नाही, की या ख्रिश्‍चनांना पृथ्वीवरच्या जीवनाचा कंटाळा आला आहे आणि म्हणून त्यांना लवकरच मरावंसं वाटतं. तर याच्या अगदी उलट ते जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात आणि प्रत्येक दिवशी त्यांना आपल्या कुटुंबासोबत व मित्रांसोबत यहोवाची सेवा करण्याची इच्छा असते. आज जरी ते आपल्या जीवनात या सर्व गोष्टी करत असले, तरी ते भविष्यात मिळणाऱ्‍या त्यांच्या सुंदर आशेला नेहमी लक्षात ठेवतात.—१ करिंथ. १५:५३; २ पेत्र १:४; १ योहा. ३:२, ३. टेहळणी बुरूज२०.०१ २३ ¶१२-१३

शनिवार, ३ एप्रिल

यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो.—इब्री १२:६.

यहोवा आपल्याला प्रशिक्षण देतो. आणि प्रशिक्षण देताना आपला प्रेमळ पिता आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा सुधारतो. असं तो बऱ्‍याच मार्गांनी करतो. उदाहरणार्थ, आपण बायबलमध्ये एखादा वृत्तांत वाचतो किंवा सभांमध्ये जे ऐकतो त्यामुळे आपल्याला जाणवतं की आपल्या विचारांत आणि कार्यांत आपल्याला बदल करण्याची गरज आहे. तसंच, आपल्याला ज्या मदतीची गरज आहे ती आपल्याला वडिलांकडूनही मिळू शकते. यहोवा आपल्याला कोणत्याही मार्गांनी मदत करत असला तरी त्याचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला सुधारतो. (यिर्म. ३०:११) कठीण प्रसंगाचा सामना करत असताना यहोवा आपल्याला मदत करतो. जसं एक मानवी पिता कठीण परिस्थितीत आपल्या मुलांना मदत करतो, तसंच आपला स्वर्गीय पिताही आपल्याला कठीण परीक्षेत टिकून राहण्यासाठी मदत करतो. आपलं त्याच्यासोबतचं नातं धोक्यात येऊ नये म्हणून तो त्याचा पवित्र आत्मा देऊन आपल्याला मदत करतो. (लूक ११:१३) आपण जेव्हा निराश किंवा चिंतित असतो तेव्हाही यहोवा आपल्याला मदत करतो. उदाहरणार्थ, त्याने आपल्याला भविष्यासाठी एक सुंदर आशा दिली आहे. या आशेमुळे आपल्याला समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी मदत होते. म्हणून लक्षात असू द्या, की आपल्याला कोणत्याही परीक्षेचा सामना करावा लागला तरी आपल्याला झालेलं नुकसान यहोवा पूर्णपणे भरून काढेल. आपल्या समस्या क्षणिक आहेत पण यहोवा जे आशीर्वाद देतो ते कायम टिकणारे आहेत.—२ करिंथ. ४:१६-१८. टेहळणी बुरूज२०.०२ ५ ¶१४-१५

रविवार, ४ एप्रिल

आपल्यात असणारी ईर्ष्या करण्याची प्रवृत्ती सतत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची लालसा धरायला लावते.—याको. ४:५.

आपण ईर्ष्येवर नक्कीच मात करू शकतो! योसेफच्या भावांबद्दल विचार करा. त्यांनी योसेफला गुलाम म्हणून विकल्यानंतर, बऱ्‍याच वर्षांनी त्यांची इजिप्तमध्ये पुन्हा भेट झाली. योसेफने स्वतःची ओळख करून देण्याआधी आपल्या भावांची परीक्षा घेतली की ते खरंच बदलले आहेत की नाही. त्यासाठी त्याने आपल्या सगळ्या भावांना जेवायला बोलवलं आणि सर्वात लहान भावाला, बन्यामिनला इतरांपेक्षा जास्त जेवण दिलं. (उत्प. ४३:३३, ३४) पण तरीही बाकीच्या भावांनी बन्यामिनचा हेवा केला नाही. याउलट, बन्यामिनबद्दल आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांना मनापासून काळजी होती हे दिसून आलं. (उत्प. ४४:३०-३४) योसेफच्या भावांनी आपल्या मनातून ईर्ष्या काढून टाकल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबात पुन्हा शांती आणू शकले. (उत्प. ४५:४, १५) त्याचप्रमाणे, जर आपण आपल्या मनातून ईर्ष्या मुळासकट काढून टाकली तर आपल्याला आपल्या कुटुंबात आणि मंडळीत शांती टिकवून ठेवता येईल. यहोवाची इच्छा आहे की आपण ईर्ष्येवर मात करावी आणि शांती टिकवून ठेवावी. आपण जर नम्र आणि समाधानी राहिलो व इतरांबद्दल कदर बाळगली तर आपल्या मनात ईर्ष्येला जागाच उरणार नाही. टेहळणी बुरूज२०.०२ १९ ¶१७-१८

सोमवार, ५ एप्रिल

मी परमेश्‍वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.—स्तो. ११६:१.

यहोवाप्रमाणे आपलंही त्याच्यावर प्रेम आहे हे आपण त्याला प्रार्थना करण्याद्वारे दाखवू शकतो. तुम्ही जसजसं यहोवाला तुमच्या चिंता सांगाल आणि त्याने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल त्याचे आभार मानाल तसतसं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढत जाईल. यहोवा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देतो हे जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा तुमचं त्याच्यासोबतचं नातं मजबूत होईल. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो याची तुम्हाला खातरी होईल. पण यहोवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही. तसंच, एखादी गोष्ट तो विशिष्ट प्रकारे का करतो आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हेही तुम्ही माहीत करून घेतलं पाहिजे. ही सर्व माहिती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या वचनाचा, बायबलचा अभ्यास करणं. म्हणून बायबलची कदर करायला शिका. यहोवाबद्दलचं सत्य आणि त्याचा आपल्यासाठी काय उद्देश आहे याबद्दलची माहिती फक्‍त बायबलमध्येच दिली आहे. नियमितपणे बायबलचं वाचन करण्याद्वारे, साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्याआधी तयारी करण्याद्वारे आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याद्वारे तुम्ही हे दाखवू शकता की तुम्हाला देवाच्या वचनाची कदर आहे. (स्तो. ११९:९७, ९९; योहा. १७:१७) तुम्ही वैयक्‍तिक बायबल वाचनाचा आराखडा बनवला आहे का? आणि त्यानुसार तुम्ही बायबल वाचन करता का? टेहळणी बुरूज२०.०३ ५ ¶८-९

मंगळवार, ६ एप्रिल

त्याला दररोज जे कोणी भेटायचे त्यांच्याशी तो शास्त्रवचनांतून तर्क करू लागला.—प्रे. कार्ये १७:१७.

तुम्हाला जास्त चालणं शक्य नसेल, तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बसून ये-जा करणाऱ्‍या लोकांना प्रचार करू शकता. तुम्ही अनौपचारिक रीत्या, पत्रांद्वारे किंवा फोनद्वारेही साक्ष देऊ शकता. बऱ्‍याच प्रचारकांना आपल्या आरोग्यामुळे किंवा इतर समस्यांमुळे घरोघरच्या प्रचारकार्यात भाग घेता येत नसला, तरीही ते या मार्गांद्वारे प्रचारकार्याचा आनंद घेतात. तुम्हाला आजारपण किंवा शारीरिक समस्या असल्या तरीही तुम्ही तुमची सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. पौलने म्हटलं: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.” (फिलिप्पै. ४:१३) एका मिशनरी दौऱ्‍यादरम्यान तो आजारी पडला तेव्हा त्याला याच शक्‍तीची गरज होती. त्याने गलतीकरांना म्हटलं: “माझ्या आजारामुळेच मला पहिल्यांदा तुम्हाला आनंदाचा संदेश घोषित करण्याची संधी मिळाली होती.” (गलती. ४:१३) त्याचप्रमाणे, आपल्या शारीरिक समस्यांमुळे आपल्यालाही आनंदाचा संदेश सांगण्याची संधी मिळू शकते. जसं की आपण डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय मदत पुरवणाऱ्‍या इतर लोकांना प्रचार करू शकतो कारण घरोघरचं प्रचारकार्य करताना यांपैकी बरेचसे लोक घरी नसतात. टेहळणी बुरूज१९.०४ ४-५ ¶१०-११

बुधवार, ७ एप्रिल

ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सर्वांचा छळ केला जाईल.—२ तीम. ३:१२.

२०१८ सालच्या अहवालानुसार २,२३,००० पेक्षा जास्त प्रचारक अशा देशांतले आहेत जिथे आपल्या कार्यावर बंदी किंवा तीव्र प्रमाणात प्रतिबंध आहेत. हे ऐकून आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना छळाचा सामना करावा लागेल हे अपेक्षित आहे. आपण कुठेही राहत असलो तरी, यहोवाच्या उपासनेवर सरकार अचानक आणि अनपेक्षितपणे बंदी घालू शकतं. सरकार आपल्या उपासनेवर बंदी घालतं तेव्हा आपल्या मनात असा चुकीचा विचार येऊ शकतो की आपल्यावर देवाचा आशीर्वाद नाही. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की छळ होत असल्याचा अर्थ यहोवा आपल्यावर नाखूश आहे असा होत नाही. प्रेषित पौलचं उदाहरण लक्षात घ्या. देव पौलवर नक्कीच खूश होता. त्याला ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातली १४ पत्रं लिहिण्याचा बहुमान मिळाला. तसंच, त्याला प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात आलं. असं असलं तरी त्याला तीव्र छळाचा सामना करावा लागला. (२ करिंथ. ११:२३-२७) प्रेषित पौलच्या उदाहरणावरून आपण शिकतो की यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना छळाला सामोरं जाऊ देतो. टेहळणी बुरूज१९.०७ ८ ¶१, ३

गुरुवार, ८ एप्रिल

आपली लढाई . . . आकाशांतील दुष्ट आत्मिक शक्‍तींबरोबर आहे.—इफिस. ६:१२.

यहोवा त्याच्या सेवकांप्रती असलेली काळजी वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त करतो. त्यांपैकी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तो आपल्याला शत्रूंचा प्रतिकार करण्यासाठी मदत करतो. सैतान आणि त्याचे दुष्टात्मे हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. यहोवा या शत्रूंबद्दल आपल्याला सावध करतो आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला हवी ती मदत पुरवतो. (इफिस. ६:१०-१३) आपण जेव्हा यहोवाची मदत स्वीकारतो आणि त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहतो, तेव्हा आपण सैतानाचा प्रतिकार करण्यात यशस्वी होतो. आपणदेखील प्रेषित पौलसारखाच भरवसा बाळगू शकतो. त्याने म्हटलं: “जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभा राहू शकेल?” (रोम. ८:३१) खरे ख्रिस्ती असल्यामुळे आपण सैतान आणि दुष्टात्म्यांवर जास्त लक्ष केंद्रित करत नाही. याउलट आपण यहोवाबद्दल शिकण्यावर आणि त्याची सेवा करण्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो. (स्तो. २५:५) असं असलं तरी, सैतान कोणते डावपेच वापरतो ते जाणून घेणं गरजेचं आहे. असं का? कारण ते जाणून घेतल्यामुळे तो आपल्याला फसवू शकणार नाही.—२ करिंथ. २:११. टेहळणी बुरूज१९.०४ २० ¶१-२

शुक्रवार, ९ एप्रिल

प्रत्येकाने ऐकण्यास उत्सुक व बोलण्यात संयमी असावे.—याको. १:१९.

एखाद्या दुःखी व्यक्‍तीचं सांत्वन करताना आपण तिचं लक्षपूर्वक ऐकतो का? लक्षपूर्वक ऐकणं म्हणजे काहीही न बोलता फक्‍त शांत बसून राहणं नाही. बंधुभगिनींचं ऐकून घेताना आपण त्यांना प्रेम आणि आपुलकी दाखवू शकतो. आपल्याला त्यांच्याबद्दल कसं वाटतं हे आपण विचारपूर्वक निवडलेल्या शब्दांतून दाखवू शकतो. त्यांचं ऐकून घेतल्यावर आपण कदाचित म्हणू शकतो: “ऐकून खरंच खूप वाईट वाटलं.” त्यांच्या भावना आपल्याला पूर्णपणे समजल्या आहेत याची खातरी करून घेण्यासाठी तुम्ही कदाचित त्यांना काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, “मला थोडंफार समजलंय तुम्हाला काय म्हणायचं ते, पण कशामुळे तुम्हाला असं वाटतंय?” किंवा “तुमचं ऐकल्यावर मला असं जाणवलं की . . . , बरोबर बोलतोय ना मी?” अशा प्रकारे बोलल्यामुळे समोरच्याला याची खातरी मिळेल की तुम्ही लक्ष देऊ ऐकत आहात आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. (१ करिंथ. १३:४, ७) पण आपण नेहमी “बोलण्यात संयमी” असणं गरजेचं आहे. समोरची व्यक्‍ती बोलत असताना मधेच तिचं बोलणं तोडू नका, किंवा तिचे विचार सुधारू नका. धीर दाखवा! तिने समस्या कशी सोडवावी याबद्दल सल्ले देण्याऐवजी, आपण तिला दया आणि आपुलकी दाखवली पाहिजे.—१ पेत्र ३:८. टेहळणी बुरूज१९.०५ १७-१८ ¶१५-१७

शनिवार, १० एप्रिल

पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केले व तिच्यासाठी स्वतःला अर्पण केले, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नींवर प्रेम करा.—इफिस. ५:२५.

ख्रिस्त जसं मंडळीवर प्रेम करतो तसंच कुटुंबात पतीने आपल्या पत्नीवर प्रेम केलं पाहिजे. (इफिस. ५:२८, २९) ख्रिस्ताने दाखवलेल्या आत्मत्यागी प्रेमाचं अनुकरण करून पती स्वतःच्या नाही तर पत्नीच्या गरजा आणि आवडीनिवडी यांचा विचार करेल. पण काही पुरुषांना असं प्रेम दाखवणं कठीण जातं. कारण ते अशा संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले असतात जिथे इतरांशी प्रेमाने आणि न्यायाने वागण्याचा अभाव असतो. आणि त्यांना आपल्या वाईट सवयी सुधारणं कदाचित कठीण जाऊ शकतं. पण ख्रिस्ताचा नियम पाळण्यासाठी त्यांनी हे बदल करणं आवश्‍यक आहेत. आत्मत्यागी प्रेम दाखवणारा पती आपल्या पत्नीचा आदर कमावतो. आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करणारा पिता कधीच आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांना इजा पोचवणार नाही. (इफिस. ४:३१) याउलट, आपल्या मुलांना सुरक्षित वाटेल अशा मार्गांनी तो आपलं प्रेम आणि आपुलकी व्यक्‍त करतो. अशा पित्यावर मुलं प्रेम करतात आणि त्याच्यावर त्यांचा भरवसादेखील असतो. टेहळणी बुरूज१९.०५ ६ ¶२१

रविवार, ११ एप्रिल

यहोवा त्याला त्याच्या पित्याचे अर्थात दावीदचे सिंहासन देईल, आणि राजा या नात्याने तो याकोबच्या घराण्यावर सदासर्वकाळ राज्य करेल.—लूक १:३२, ३३.

गब्रीएल देवदूताच्या या शब्दांबद्दल मरीया काय विचार करत असेल? येशू हा हेरोद राजाची जागा घेईल किंवा हेरोदचं राजपद पुढे चालवेल असा विचार मरीयाने कदाचित केला असेल का? येशू जर हेरोद राजाच्या जागी राजा बनला तर मरीया ही राजमाता म्हणून ओळखली जाईल आणि तिचं कुटुंब राजमहालात राहील असा तिने विचार केला का? मरीयाने येशूला त्याच्या राज्यात एखादी खास पदवी मिळावी म्हणून विनंती केल्याचं आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही. मरीया ही अतिशय नम्र होती. बायबल आणि आपले ख्रिस्ती प्रकाशनं वाचण्याचा मुख्य उद्देश देवासोबत एक चांगलं नातं जोडणं आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच, “आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत” आणि देवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्याला कोणते बदल केले पाहिजेत हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचीही आपली इच्छा आहे. (याको. १:२२-२५; ४:८) प्रत्येक वेळी अभ्यास सुरू करण्याआधी आपण देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करायला हवी. आपल्याला वाचलेल्या माहितीचा फायदा व्हावा आणि कोणकोणते बदल करण्याची गरज आहे हे स्पष्टपणे समजावं यासाठी आपण कळकळून विनंती केली पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०५ ३१ ¶१८-१९

सोमवार, १२ एप्रिल

मी दुःखीत . . . आहे.—१ शमु. १:१५.

कधीकधी आपल्यावर एकापाठोपाठ एक अनेक समस्या येतात. पुढील उदाहरणांवर विचार करा. जॉन नावाच्या बांधवाला मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाचा गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. त्यात भर म्हणजे जवळपास १९ वर्षं एकत्र राहिल्यानंतर त्याची पत्नी अचानक त्याला सोडून गेली. यामुळे तो खूप खचून गेला. या काळातच त्याच्या दोन मुलींनी यहोवाची सेवा करण्याचंही सोडून दिलं. बॉब आणि लिन्डा नावाच्या जोडप्याला वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्या दोघांची नोकरी अचानक सुटली आणि यामुळे त्यांना आपलं घर गमवावं लागलं. हे सर्व घडत असतानाच लिन्डाला हृदयाचा एक घातक आजार झाला आणि यासोबतच संधीवाताच्या त्रासामुळे तिची रोग प्रतिरोधक शक्‍तीही कमी होऊ लागली. तणावात असताना आपल्याला कसं वाटतं हे यहोवा पूर्णपणे समजतो याची आपण खात्री बाळगू शकतो. तसंच, समस्यांचा सामना करण्यासाठी त्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे. (फिलिप्पै. ४:६, ७) बायबलमध्ये तणावाचा सामना करावा लागणाऱ्‍या देवाच्या सेवकांचे अनेक अहवाल आहेत. तसंच, अशा कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी यहोवाने या सेवकांना कशी मदत केली हेदेखील त्यात सांगितलं आहे. टेहळणी बुरूज१९.०६ १४ ¶२-३

मंगळवार, १३ एप्रिल

मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.—नीति. १७:१७.

आपल्या जोडीदाराला गमावलेल्या बंधुभगिनींना आपण व्यावहारिक रीत्या मदत करतो, तेव्हा आपण त्यांच्याप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्‍त करत असतो. एकटं असल्यामुळे आता त्यांना चांगल्या मित्रांची खूप गरज असते. तुम्ही त्यांचे मित्र आहात हे तुम्ही कसं दाखवू शकता? तुम्ही त्यांना घरी जेवायला बोलवू शकता. तुम्ही कदाचित एकत्र मिळून काही मनोरंजन करू शकता किंवा सेवेत त्यांच्यासोबत जाऊ शकता. तसंच, काही वेळा तुम्ही त्यांना तुमच्या कौटुंबिक उपासनेसाठीही बोलवू शकता. असं केल्यामुळे तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल. कारण बायबल आपल्याला सांगतं की यहोवा “भग्नहृदयी लोकांच्या” जवळ असतो आणि तो “विधवांचा” रक्षक आहे. (स्तो. ३४:१८; ६८:५) लवकरच देवाचं राज्य पृथ्वीवर राज्य करू लागेल आणि तेव्हा “पूर्वीच्या कष्टांचा विसर” पडेल. “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत” अशा काळाची आपण सर्वच खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. (यश. ६५:१६, १७) पण तो दिवस येईपर्यंत आपण एकमेकांना मदत करत राहू या. आणि आपल्या शब्दांद्वारे व कार्यांद्वारे दाखवू या की आपलं आपल्या आध्यात्मिक कुटुंबावर खूप प्रेम आहे.—१ पेत्र ३:८. टेहळणी बुरूज१९.०६ २५ ¶१८-१९

बुधवार, १४ एप्रिल

यहोवा मला साहाय्य करतो; मी भिणार नाही.—इब्री १३:६.

खूप वर्षांआधी एका टेहळणी बुरूजमध्ये म्हटलं होतं: “जी व्यक्‍ती देवाला खूप चांगल्या रीतीने ओळखते ती छळ होत असताना त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवेल.” हे शब्द किती खरे आहेत! छळाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपण यहोवावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे. (मत्त. २२:३६-३८; याको. ५:११) यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडण्याच्या हेतूने बायबलचं दररोज वाचन करा. (याको. ४:८) बायबलचं वाचन करताना यहोवाच्या प्रेमळ गुणांवर लक्ष केंद्रित करा. त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे त्याच्या शब्दांतून आणि कार्यांतून समजण्याचा प्रयत्न करा. (निर्ग. ३४:६) काही लोकांना कोणाकडूनच प्रेम मिळालेलं नसल्यामुळे, यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना समजणं कठीण जाऊ शकतं. जर तुमच्या बाबतीतही हे खरं असेल तर यहोवाने तुमच्यावर वेगवेगळ्या मार्गांनी दया आणि कृपा कशी केली आहे याची रोज एक यादी बनवा. (स्तो. ७८:३८, ३९; रोम. ८:३२) तुमच्या अनुभवामुळे आणि देवाच्या वचनात वाचलेल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे यहोवाने तुमच्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही त्या लिहून काढू शकाल. यहोवाच्या कार्यांबद्दल तुम्ही जितकी जास्त कदर बाळगाल तितकंच तुमचं यहोवासोबत नातं घनिष्ठ होईल.—स्तो. ११६:१, २. टेहळणी बुरूज१९.०७ २-३ ¶४-५

गुरुवार, १५ एप्रिल

आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवणारे आहोत असे नाही, तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत, कारण तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्‍वासामुळे.—२ करिंथ. १:२४.

इतरांसाठी वैयक्‍तिक निर्णय घेण्याचा अधिकार यहोवाने आपल्याला दिलेला नाही. जो कोणी अनावश्‍यक नियम बनवतो तो बांधवांच्या सुरक्षेसाठी नाही, तर बांधवांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवण्यासाठी तसं करतो. सैतान, यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचा छळ करत राहील. (१ पेत्र ५:८; प्रकटी. २:१०) सैतान आणि त्याचे साथीदार आपल्या उपासनेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला भीती वाटली तरी आपण यहोवाची सेवा कधीच सोडणार नाही! (अनु. ७:२१) यहोवा आपल्यासोबत आहे आणि आपल्या कार्यावर बंदी आली तरी तो आपल्याला मदत करत राहील. (२ इति. ३२:७, ८) पहिल्या शतकातल्या बांधवांप्रमाणे आपलाही निर्धार पक्का असला पाहिजे. त्यांनी अधिकाऱ्‍यांना म्हटलं होतं: “आम्ही देवापेक्षा तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. पण आमच्याविषयी विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.”—प्रे. कार्ये ४:१९, २०. टेहळणी बुरूज१९.०७ १३ ¶१८-२०

शुक्रवार, १६ एप्रिल

मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.—नीति. २०:५.

प्रचारात भेटणारे लोक अमुक विचार का करतात किंवा त्यांना जे वाटतं त्यामागचं काय कारण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रेषित पौल यहुदी लोकांमध्ये लहानाचा मोठा झाला. यहुदी नसलेल्या लोकांना म्हणजे ज्यांना यहोवाबद्दल किंवा शास्त्रवचनांबद्दल खूप कमी किंवा काहीच माहीत नव्हतं, अशांना प्रचार करण्यासाठी त्याला आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करावे लागले असतील. आपल्या क्षेत्रातल्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी आपल्यालाही कदाचित संशोधन करावं लागेल. (१ करिंथ. ९:२०-२३) आपला हेतू “योग्य” लोकांना शोधून काढणं हा आहे. (मत्त. १०:११) लोकांनी आपलं ऐकावं यासाठी आपण त्यांना त्यांचं मत सांगण्याचं प्रोत्साहन देतो आणि ते बोलत असताना त्यांचं लक्ष देऊन ऐकतो. इंग्लंडमध्ये राहणारा एक बांधव काही विषयांवर लोकांचं मत विचारतो जसं की, आनंदी कुटुंबासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, मुलांचं संगोपन कसं करावं किंवा अन्यायाचा धीराने सामना कसा करावा. मग समोरच्याचं मत ऐकून घेतल्यावर तो म्हणतो, “बघा इथे २,००० वर्षांपूर्वी दिलेल्या या सल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” मग तो ‘बायबल’ हा शब्द न वापरता समोरच्याला आपल्या मोबाईलमधून आधीच निवडून ठेवलेली वचनं वाचून दाखवतो. टेहळणी बुरूज१९.०७ २१-२२ ¶७-८

शनिवार, १७ एप्रिल

आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, यातूनच देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो.—रोम. ५:८.

आपण देवावर किती प्रेम केलं पाहिजे? येशूने एका परूश्‍याला या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. त्याने म्हटलं: “तू आपला देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर.” (मत्त. २२:३६, ३७) आपल्याला देवाची उपासना अर्धवट मनाने करण्याची इच्छा नाही. याउलट, त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम दररोज वाढत जावं अशी आपली इच्छा आहे. देवावर प्रेम करण्यासाठी आपल्याला त्याला ओळखण्याची गरज आहे. बायबल म्हणतं: “जो प्रेम करत नाही, त्याला देवाची ओळख झालेली नाही, कारण देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) पौलने म्हटलं की आपण “सत्याचे अचूक ज्ञान व पूर्ण समज” मिळवली तर देवावर असलेलं आपलं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. (फिलिप्पै. १:९) आपण बायबल अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल सर्वच माहीत नव्हतं, तरी आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो. मग आपण जसजसं यहोवाबद्दल शिकत गेलो, तसतसं आपलं त्याच्यावरचं प्रेम आणखी वाढत गेलं. म्हणून यात काहीच शंका नाही की आपण नियमितपणे बायबल वाचन आणि मनन करणं खूप महत्त्वाचं आहे.—फिलिप्पै. २:१६. टेहळणी बुरूज१९.०८ ९ ¶४-५

रविवार, १८ एप्रिल

एकट्यापेक्षा दोघे बरे.—उप. ४:९.

तुम्हाला नवीन नेमणूक जिथे मिळाली तिथे तुम्हाला नवीन मित्र बनवावे लागतील. लक्षात असू द्या, मित्र बनवण्यासाठी आपण स्वतः आधी एक चांगला मित्र असणं गरजेचं आहे. यहोवाच्या सेवेतले तुमचे अनुभव इतरांना सांगा. यामुळे यहोवाच्या सेवेत तुम्हाला मिळालेला आनंद ते पाहू शकतील. तुमच्या विवाहसोबत्याच्या आजारपणामुळे तुम्हाला जर पूर्ण वेळेची सेवा सोडावी लागली, तर त्याला दोष देऊ नका. आणि जर तुमच्या आजारपणामुळे तुम्हाला सेवा सोडावी लागली, तर स्वतःला दोषी ठरवू नका. तुमच्यामुळे तुमच्या सोबत्याला सेवा सोडावी लागत आहे असा नकारात्मक विचार करू नका. नेहमी आठवणीत ठेवा की तुम्ही “एकदेह” आहात आणि लग्न करताना तुम्ही यहोवासमोर एकमेकांना सर्व प्रसंगात साथ देण्याचं वचन दिलं होतं. (मत्त. १९:५, ६) पूर्ण वेळेची सेवा सोडावी लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे मूल होणं. तुमच्या बाबतीत जर असं झालं तर त्या मुलाला दोष देऊ नका. याउलट त्याला याची जाणीव करून द्या की तुमच्या नेमणुकीपेक्षा तो तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही त्याला देवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट समजता याची तुमच्या मुलाला जाणीव करून द्या. (स्तो. १२७:३-५) तसंच, तुम्हाला पूर्ण वेळेच्या सेवेत मिळालेले चांगले अनुभव त्याला सांगा. असं केल्यामुळे तुमच्यासारखंच त्यालादेखील यहोवाची पूर्ण वेळेची सेवा करण्याचं प्रोत्साहन मिळेल. टेहळणी बुरूज१९.०८ २२ ¶१०-११

सोमवार, १९ एप्रिल

त्या मोठ्या वेश्‍येवर न्यायदंड कसा बजावला जाईल ते मी तुला दाखवतो.—प्रकटी. १७:१.

मोठ्या बाबेलने, म्हणजे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याने, देवाच्या नावावर कलंक लावला आहे. तिने लोकांना देवाबद्दल खोट्या गोष्टी शिकवल्या आहेत. जगातील राजकीय नेत्यांसोबत संबंध जोडून तिने एका अर्थी व्यभिचार केला आहे. खोट्या धर्माने आपल्या शक्‍तीचा गैरवापर करून आपल्या सदस्यांचा छळ केला आहे आणि त्यांची संपत्ती लुटली आहे. तसंच, मोठ्या बाबेलने बऱ्‍याच लोकांना जिवे मारलं आहे आणि यात देवाच्या काही विश्‍वासू सेवकांचाही समावेश होतो. (प्रकटी. १८:२४; १९:२) “गडद लाल रंगाच्या जंगली” पशूच्या दहा शिंगांचा उपयोग करून यहोवा ‘मोठ्या वेश्‍येचा’ विनाश करेल. हा लाक्षणिक जंगली पशू संयुक्‍त राष्ट्राला सूचित करतो. त्या पशूचे दहा शिंग या संघटनेला समर्थन देणाऱ्‍या सध्याच्या राजकीय शक्‍तींना सूचित करतात. देवाच्या नियुक्‍त वेळी या राजकीय शक्‍ती लाक्षणिक बाबेलवर, म्हणजेच खोट्या धर्मावर हल्ला करतील. ते “तिला उद्ध्‌वस्त व नग्न करतील” आणि तिची संपत्ती लुटून घेतील. तसंच, ती किती दुष्ट होती याबद्दल ते इतरांना सांगतील. (प्रकटी. १७:३, १६) हा विनाश अचानक, जणू एका दिवसात येईल आणि यामुळे तिचं समर्थन करणाऱ्‍या लोकांना मोठा धक्का बसेल. कारण तिने बऱ्‍याच वेळा गर्वाने असं म्हटलं आहे: “माझ्या वाट्याला कधीही दुःख येणार नाही.”—प्रकटी. १८:७, ८. टेहळणी बुरूज१९.०९ १० ¶१०-११

मंगळवार, २० एप्रिल

माझं जू आपल्या खांद्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका.—मत्त. ११:२९.

येशूने सर्वांना त्याच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं आहे आणि देवाची मनापासून सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीला तो कधीही नाकारणार नाही. (योहा. ६:३७, ३८) यहोवाने येशूवर जे काम सोपवलं आहे त्या कामात सहभाग घेण्याचा बहुमान सर्व ख्रिश्‍चनांना मिळाला आहे. आपण खातरी बाळगू शकतो की येशू हे काम पूर्ण करण्यासाठी आपली मदत करायला नेहमी तयार असेल. (मत्त. २८:१८-२०) फक्‍त नम्र लोक येशूकडे आकर्षित झाले. (मत्त. १९:१३, १४; लूक ७:३७, ३८) असं का? परूशी आणि येशू यांच्यात किती फरक होता याचा जरा विचार करा. ते धर्मपुढारी खूप कठोर आणि गर्विष्ठ होते. (मत्त. १२:९-१४) पण याच्या अगदी उलट, येशू प्रेमळ आणि नम्र होता. परूश्‍यांना वाटायचं की समाजात आपलं मोठं नाव असावं. तसंच, त्यांना आपल्या श्रेष्ठ पदव्यांचा खूप गर्वही होता. पण येशूने अशा वृत्तीचा विरोध केला. त्याच्या शिष्यांनी नम्र असावं आणि इतरांना मदत करावी असं त्याने सांगितलं. (मत्त. २३:२, ६-११) परूशी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून लोकांना धाकात ठेवायचे. (योहा. ९:१३, २२) पण येशूने लोकांना मदत करून आणि सौम्य शब्दांचा वापर करून तजेला दिला. तर मग येशूकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? टेहळणी बुरूज१९.०९ २० ¶१; २१ ¶७-८; २३ ¶९

बुधवार, २१ एप्रिल

देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.—याको. ४:८.

सभांमुळे आपल्याला यहोवासोबत नातं घनिष्ठ करायला मदत होते. सभांना हजर राहिल्यामुळे आपण भविष्यात येणाऱ्‍या छळाचा किती धीराने सामना करू हे दिसून येतं. (इब्री १०:२४, २५) असं का म्हणता येईल? आपण जर आज लहानसहान गोष्टींमुळे सभा चुकवत असू तर भविष्यात सरकार आपल्या सभांवर बंदी आणेल तेव्हा आपण काय करू? याउलट, आपण जर आज सभांना नियमितपणे हजर राहण्याचा पक्का निर्धार केला, तर पुढे विरोधक आपल्याला एकत्र भेटण्यापासून रोखतील तेव्हा आपण त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही. सभांबद्दल प्रेम विकसित करण्याची हीच वेळ आहे! आपल्याला जर सभांना जायची आवड असेल तर कोणताही विरोध, मग सरकारने बंदी आणली तरी आपण माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करू. (प्रे. कार्ये ५:२९) आपली आवडती वचनं तोंडपाठ करा. (मत्त. १३:५२) तुमची स्मरणशक्‍ती कदाचित इतकी चांगली नसेल पण यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचा वापर करून तुम्हाला वचनं आठवणीत ठेवायला मदत करू शकतो. (योहा. १४:२६) त्या वचनांमुळे तुम्हाला यहोवासोबतचं नातं घनिष्ठ ठेवायला आणि विश्‍वासूपणे धीर धरायला मदत होईल. टेहळणी बुरूज१९.०७ ३ ¶५; ४ ¶८-९

गुरुवार, २२ एप्रिल

शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल हे लक्षात ठेव.—२ तीम. ३:१.

तुमचा जन्म १९१४ नंतर झाला असेल तर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य या जगाच्या व्यवस्थेच्या “शेवटच्या दिवसांत” घालवलं आहे असं म्हणता येईल. आपण सर्वांनीच येशूने भाकीत केलेल्या या शेवटच्या दिवसांमधल्या घटनांबद्दल ऐकलं असेल. त्या घटनांपैकी काही घटना म्हणजे युद्ध, दुष्काळ, भूकंप, रोगांच्या साथी, वाढती अनीती आणि यहोवाच्या लोकांचा छळ. (मत्त. २४:३, ७-९, १२; लूक २१:१०-१२) प्रेषित पौलने सांगितलं होतं, की या काळातले लोक कसे असतील. आणि ही गोष्टही पूर्ण होताना आपण पाहिली असेल. यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला पक्की खातरी आहे की आपण “शेवटल्या दिवसात” जगत आहोत. (मीखा ४:१) १९१४ पासून बरीच वर्षं सरली आहेत. त्यामुळे आता आपण म्हणू शकतो की आपण शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात येऊन पोहोचलो आहोत. अंत इतका जवळ आहे हे माहीत असल्यामुळे आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायला हवीत: शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात कोणकोणत्या घटना घडतील? या घटना घडणार आहेत तोपर्यंत आपण काय करत राहावं अशी यहोवाची अपेक्षा आहे? टेहळणी बुरूज१९.१० ८ ¶१-२

शुक्रवार, २३ एप्रिल

पण जो शेवटपर्यंत धीर धरतो त्यालाच वाचवलं जाईल.—मत्त. २४:१३, तळटीप.

आपली परिस्थिती कशीही असो चांगली किंवा वाईट, आपलं धीर धरणं त्यावर अवलंबून नाही. तर यहोवावर निर्भर राहिल्यामुळे आपल्याला धीर धरणं शक्य होतं. (रोम. १२:१२) आजच्या वचनात येशूने दिलेल्या अभिवचनाचा असा अर्थ होतो, की आपल्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागलं तरी आपण विश्‍वासू राहणं गरजेचं आहे. आपण आज धीराने सर्व परीक्षांचा सामना केला तर मोठं संकट येण्याआधी आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल. धीर धरण्यासाठी जसं आपल्याला यहोवावर अवलंबून राहावं लागतं, तसं धैर्यासाठीही आपण त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आपण यहोवावर आणखी जास्त विसंबून राहायला कसं शिकू शकतो? देवाच्या वचनाचा दररोज अभ्यास करण्याद्वारे आणि यहोवाने लोकांना प्राचीन काळात कसं वाचवलं यावर मनन करण्याद्वारे आपण असं करू शकतो. (स्तो. ६८:२०; २ पेत्र २:९) मोठ्या संकटादरम्यान राष्ट्रं आपल्यावर हल्ला करतील तेव्हा आपल्याला कधी नव्हे इतकं यहोवावर विसंबून राहावं लागेल आणि धैर्यवान व्हावं लागेल. (स्तो. ११२:७, ८; इब्री १३:६) आज आपण यहोवावर विसंबून राहिलो तर गोगचा हल्ला होईल तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी लागणारं धैर्य आपल्याजवळ असेल. कारण यहोवाच्या प्रेमळ हाताखाली आपण नेहमी सुरक्षित राहू याची आपल्याला खात्री आहे.—१ करिंथ. १३:८. टेहळणी बुरूज१९.१० १८ ¶१५-१६

शनिवार, २४ एप्रिल

सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.—१ योहा. ५:१९.

सैतानाचं या जगाच्या व्यवस्थेवर नियंत्रण आहे. या जगातल्या गोष्टींचा वापर तो मानवांना फसवण्यासाठी करतो. ते कसं? मानवांच्या नैसर्गिक इच्छा आणि शारीरिक कमतरता यांना लक्षात ठेवून तो आपल्याला मोहात पाडण्याचा व भुलवण्याचा प्रयत्न करतो. (इफिस. २:१-३) कारण आपण यहोवाची पूर्ण मनाने सेवा करू नये आणि त्याच्याबद्दल असलेलं आपलं प्रेम कमी व्हावं हाच सैतानाचा उद्देश आहे. प्रेषित पेत्रने सैतानाच्या जगाच्या अंताबद्दल आणि नवीन जगाबद्दल सांगितल्यानंतर असं म्हटलं की “प्रिय बांधवांनो, या गोष्टींची वाट पाहत असताना, तुम्ही त्याला शेवटी निष्कलंक, निर्दोष व शांतीत असल्याचे आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.” (२ पेत्र ३:१४) आपण जेव्हा या सल्ल्याचं पालन करून नैतिक आणि आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, तेव्हा आपण दाखवून देतो की आपण फक्‍त यहोवाचीच उपासना करत आहोत. आपण यहोवाऐवजी इतर गोष्टींना जीवनात पहिलं स्थान द्यावं यासाठी सैतान आणि त्याचं जग आपल्यावर सतत दबाव टाकत राहील. (लूक ४:१३) पण आपल्याला कितीही समस्यांचा सामना करावा लागला, तरी आपण कोणत्याही व्यक्‍तीला किंवा गोष्टीला यहोवाची जागा घेऊ देणार नाही. आपण यहोवाला त्याच्या हक्काची गोष्ट देण्याचा निर्धार केला पाहिजे. आणि ती गोष्ट म्हणजे फक्‍त त्याचीच उपासना करणं! टेहळणी बुरूज१९.१० २७ ¶४; ३१ ¶१८-१९

रविवार, २५ एप्रिल

माझ्या पापामुळे मी खिन्‍न आहे.—स्तो. ३८:१८.

काही गोष्टींबद्दल चिंता करणं योग्य आहे. उदाहरणार्थ, यहोवा आणि येशू यांचं मन आनंदित करण्याबद्दल आपल्याला चिंता वाटू शकते. (१ करिंथ. ७:३२) आपल्या हातून एखादं गंभीर पाप घडलं, तर यहोवासोबतची मैत्री पुन्हा जोडण्यासाठी आपण चिंतित असू शकतो. आपल्या जोडीदाराला खूश करण्याबद्दलही आपण नेहमी विचार करतो. तसंच, आपल्या कुटुंबाची आणि बांधवांची काळजी घेण्याबद्दलही आपल्याला चिंता असते. (१ करिंथ. ७:३३; २ करिंथ. ११:२८) दुसरीकडे पाहता, अवाजवी चिंता केल्यामुळे आपण खाणंपिणं, कपडेलत्ते यांबद्दल सतत विचार करत असू. (मत्त. ६:३१, ३२) आणि ही चिंता दूर करण्यासाठी मग आपण जास्त भौतिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू. आपण असं होऊ दिलं तर यहोवावरचा आपला विश्‍वास कमी होईल आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री धोक्यात येईल. (मार्क ४:१९; १ तीम. ६:१०) याशिवाय, आपण कदाचित इतरांची पसंती मिळवण्याचा वाजवीपेक्षा जास्त विचार करू. यहोवाला कोणत्या गोष्टींमुळे दुःख होतं हा विचार करण्याऐवजी आपल्या मनात कदाचित अशी भीती निर्माण होईल की लोक आपली थट्टा करतील किंवा आपला छळ करतील. या धोक्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आणि चिंतेचा सामना करण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थनेत विश्‍वास आणि धैर्य मागितलं पाहिजे.—नीति. २९:२५; लूक १७:५. टेहळणी बुरूज१९.११ १५ ¶६-७

सोमवार, २६ एप्रिल

तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असल्यास त्याने ती देवाजवळ मागत राहावी . . . कारण देव . . . सर्वांना उदारपणे बुद्धी देतो.—याको. १:५.

काही महत्त्वाचे निर्णय आपण कधीच बदलणार नाही. उदाहरणार्थ, नेहमी यहोवाची सेवा करत राहण्याचा आणि आपल्या विवाहसोबत्याला विश्‍वासू राहण्याचा आपण ठाम निर्धार केला आहे. (मत्त. १६:२४; १९:६) पण इतर काही निर्णय असे आहेत ज्यांमध्ये आपल्याला फेरबदल करण्याची गरज पडू शकते. का? कारण परिस्थिती नेहमी बदलत असते. कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला सर्वात चांगले निर्णय घ्यायला मदत होऊ शकते? बुद्धीसाठी प्रार्थना करा. काही बाबतीत आपल्या सर्वांनाच “बुद्धीची गरज” असते. म्हणून आपण निर्णय घेतो तेव्हा आणि घेतलेला निर्णय बदलावा लागतो तेव्हा, आपल्याला यहोवावर विसंबून राहणं गरजेचं आहे. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. सखोल संशोधन करा. देवाचं वचन वाचा, यहोवाच्या संघटनेने पुरवलेली प्रकाशनं वाचा आणि तुम्हाला सुज्ञ सल्ला देतील अशा लोकांशी बोला. (नीति. २०:१८) काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी संशोधन करणं गरजेचं आहे. जसं की, नोकरी बदलण्याआधी किंवा दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जाण्याआधी आपल्याला संशोधन करावं लागेल. तसंच, यहोवाची सेवा करण्यासोबतच स्वतःचा खर्च भागवायला मदत होईल, असं शिक्षण निवडण्याआधीही आपल्याला संशोधन करावं लागेल. टेहळणी बुरूज१९.११ २७ ¶६-८

मंगळवार, २७ एप्रिल

माझी किती दयनीय स्थिती आहे! मरणाच्या अधीन असलेल्या माझ्या या शरीरापासून कोण माझी सुटका करेल?—रोम. ७:२४.

आनंदाची गोष्ट म्हणजे यहोवाने आपल्यासाठी पापापासून सुटका मिळवण्याची एक तरतूद केली. ही सुटका मिळणं येशूमुळे शक्य झालं. येशू पृथ्वीवर येण्याच्या ७०० पेक्षा जास्त वर्षांआधी संदेष्टा यशयाने मोठ्या प्रमाणात होणाऱ्‍या या सुटकेबद्दल भाकीत केलं होतं. या सुटकेचे फायदे, इस्राएली लोकांना सुटकेच्या वर्षात मिळणाऱ्‍या फायद्यांपेक्षा खूप जास्त असणार होते. यशयाने म्हटलं: “प्रभु परमेश्‍वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्‍तता” मिळावी यासाठी मला पाठवले आहे. (यश. ६१:१) ही भविष्यवाणी कोणाविषयी होती? येशूने आपलं सेवाकार्य सुरू केलं तेव्हा सुटकेबद्दल असलेल्या त्या महत्त्वाच्या भविष्यवाणीची पूर्णता व्हायला सुरुवात झाली. एकदा येशू आपल्या गावात, नासरेथमध्ये असलेल्या सभास्थानात गेला आणि तिथे त्याने जमलेल्या यहुदी लोकांसमोर यशयाने लिहून ठेवलेली तीच भविष्यवाणी वाचली. येशूने त्या भविष्यवाणीमधले शब्द स्वतःवर लागू केले.—लूक ४:१६-१९. टेहळणी बुरूज१९.१२ ९-१० ¶६-८

बुधवार, २८ एप्रिल

इतका विरोध होत असूनही तुम्हाला देवाविषयीचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या साहाय्याने धैर्य एकवटले.—१ थेस्सलनी. २:२.

छळाचा सामना करण्यासाठी तुम्हाला धैर्याची गरज पडेल. जर तुम्हाला जाणवलं की तुम्हाला धैर्य विकसित करण्याची गरज आहे तर तुम्ही काय करू शकता? नेहमी लक्षात असू द्या की खरं धैर्य हे तुमच्या क्षमतांवर, बळावर किंवा तुमच्या अंगकाठीवर अवलंबून नसतं. दावीदचा विचार करा. त्याने अगदी तरुण वयात गल्याथचा सामना केला. गल्याथच्या तुलनेत दावीद खूपच लहान आणि कमजोर होता. एखाद्या सैनिकासारखं तो युद्धासाठी सज्ज नव्हता. त्याच्याकडे तर तलवारसुद्धा नव्हती. पण तरीही तो खूप धैर्यवान होता. त्या मगरूर गल्याथशी लढण्यासाठी दावीद धैर्याने धावून गेला. दावीद इतकं धैर्य कशामुळे दाखवू शकला? त्याला पक्का विश्‍वास होता की यहोवा त्याच्यासोबत आहे. (१ शमु. १७:३७, ४५-४७) आपल्या तुलनेत गल्याथ किती मोठा आहे यावर दावीदने लक्ष केंद्रित केलं नाही, तर गल्याथ यहोवाच्या तुलनेत किती छोटा आहे याचा दावीदने विचार केला. आपण या अहवालातून काय शिकतो? यहोवा आपल्यासोबत आहे या गोष्टीची पक्की खात्री असल्यामुळे आपल्याला धैर्य मिळतं. तसंच, आपले विरोधक यहोवाच्या तुलनेत अगदीच क्षुल्लक आहेत यावर विचार केल्यामुळेही आपल्याला धैर्य मिळतं.—२ इति. २०:१५; स्तो. १६:८. टेहळणी बुरूज१९.०७ ५ ¶११-१३

गुरुवार, २९ एप्रिल

हेच माझे सहकारी आहेत आणि त्यांनी माझ्या मनाला खूप सांत्वन दिले आहे.—कलस्सै. ४:११.

तुखिक हा प्रेषित पौलचा एकनिष्ठ मित्र होता. (प्रे. कार्ये २०:४) इ.स. ५५ च्या आसपास पौलने जेव्हा यहूदीयामधल्या बांधवांची मदत करण्यासाठी दान गोळा करण्याची व्यवस्था केली, तेव्हा या महत्त्वाच्या कामात मदत करण्यासाठी त्याने तुखिकची निवड केली असावी. (२ करिंथ. ८:१८-२०) नंतर पौलला पहिल्यांदा रोममध्ये कैद करण्यात आलं तेव्हा तुखिकने त्याच्यासाठी संदेश पोहोचवण्याचं काम केलं. पौलने आशियातल्या बांधवांना प्रोत्साहनदायक संदेश आणि पत्रं लिहिली, तेव्हा तुखिकने ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. (कलस्सै. ४:७-९) तुखिक नेहमी पौलला विश्‍वासू राहिला. (तीत ३:१२) पण पहिल्या शतकातले सर्वच ख्रिस्ती तुखिकसारखे भरवशालायक नव्हते. इ.स. ६५ च्या दरम्यान पौलला जेव्हा दुसऱ्‍यांदा कैद करण्यात आलं तेव्हा त्याने म्हटलं की आशिया प्रांतातले बरेच ख्रिस्ती बांधव विरोधकांच्या भीतीमुळे त्याच्यासोबत संगती करायचं टाळत होते. (२ तीम. १:१५) पण याच्या अगदी उलट तुखिक हा भरवशालायक मित्र होता आणि म्हणून पौलने त्याला आणखी एक नेमणूक दिली. (२ तीम. ४:१२) खरंच, पौलने नक्कीच या गोष्टीची कदर केली असेल की त्याच्याकडे तुखिकसारखा भरवशालायक मित्र होता! टेहळणी बुरूज२०.०१ १० ¶७-८

शुक्रवार, ३० एप्रिल

देवाने त्या गोष्टी . . . आपल्याला प्रकट केल्या आहेत.—१ करिंथ. २:१०.

तुम्ही कदाचित विचार कराल की तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे खरंच अभिषिक्‍त करण्यात आलं आहे का? असं असेल तर पुढे दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विचार करा: यहोवाची इच्छा पूर्ण करावी असं तुम्हाला मनापासून वाटतं का? प्रचार कार्यासाठी तुमच्यामध्ये खूप आवेश आहे असं तुम्हाला जाणवतं का? यहोवाच्या मदतीमुळे प्रचारकार्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळाले आहेत असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला बायबलमधून “देवाच्या गहन” गोष्टींचा शोध घ्यायला आवडतं का? इतरांना यहोवाबद्दल शिकवणं ही तुमची एक महत्त्वाची जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं का? यहोवाने तुम्हाला अनेक विशिष्ट मार्गांनी मदत केली आहे हे तुम्ही अनुभवलं आहे का? जर तुम्ही या सर्व प्रश्‍नांचं उत्तर ‘हो’ असं दिलं असेल, तर याचा अर्थ असा होतो का की तुम्हाला स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात आलं आहे? नाही! याचा अर्थ असा होत नाही. असं का म्हणता येईल? कारण देवाच्या सर्वच सेवकांना असं वाटू शकतं. खरंतर, तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आलं आहे की नाही, अशी शंका जर तुमच्या मनात असेल तर या शंकेमुळेच सिद्ध होतं की तुम्हाला अभिषिक्‍त करण्यात आलेलं नाही. कारण, अभिषिक्‍त जनांना पक्की खातरी असते की यहोवाने त्यांना अभिषिक्‍त केलं आहे! टेहळणी बुरूज२०.०१ २३ ¶१४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा