मार्च
सोमवार, १ मार्च
‘स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा, आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका,’ . . . असे यहोवा म्हणतो.—२ करिंथ. ६:१७.
आपले नातेवाईक किंवा मित्र आपल्यावर बायबलच्या विरोधात असलेल्या मृत्यूशी संबंधित प्रथांमध्ये भाग घेण्याचा दबाव टाकतील. पण अशा प्रसंगाचा सामना करण्यासाठी यहोवा आणि त्याच्या वचनावर असलेलं आपलं प्रेम आपल्याला त्याची आज्ञा मानण्यासाठी बळ देईल. आपल्याला स्वतःविषयी लाज वाटावी म्हणून ते म्हणतील की तुम्हाला मृत व्यक्तीबद्दल आपुलकी आणि आदर नाही. आपल्या अशा वागण्यामुळे मृत व्यक्ती कोणत्या न् कोणत्या प्रकारे त्यांना त्रास देईल असंही कदाचित ते म्हणतील. कॅरिबियन देशात पुष्कळ लोक मानतात, की मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा “आत्मा” तिथेच राहतो आणि जिवंत असताना ज्या लोकांनी त्या व्यक्तीला छळलं असेल त्यांना तो शिक्षा करतो. एका संदर्भानुसार तो “‘आत्मा’ पूर्ण समाजावरही संकट आणू शकतो.” तसंच, आफ्रिकामध्ये एका ठिकाणी असलेल्या प्रथेनुसार, जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या घरचे आरसे झाकण्यात येतात आणि भिंतीवर त्या मृत व्यक्तीचा फोटो असेल तर तोदेखील भिंतीकडे फिरवण्यात येतो. यामागचं कारण म्हणजे काही लोक मानतात की त्या मृत व्यक्तीने स्वतःला पाहू नये. यहोवाचे सेवक या नात्याने आपण अशा काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही किंवा सैतान बढावा देत असलेल्या प्रथांमध्ये मुळीच भाग घेणार नाही!—१ करिंथ. १०:२१, २२. टेहळणी बुरूज१९.०४ १६ ¶११-१२
मंगळवार, २ मार्च
ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.—मत्त. ७:१२.
येशूने अशी तत्त्वं शिकवली ज्यामुळे त्याच्या अनुयायांना इतरांशी भेदभाव न करता वागणं शक्य होणार होतं. याचंच एक उदाहरण म्हणजे सुवर्ण नियम. आपल्याशी वागताना कोणीही आपल्यासोबत भेदभाव करू नये अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. म्हणून मग आपणही इतरांशी वागताना भेदभाव करण्याचं टाळलं पाहिजे. जर आपण भेदभाव केला तर तेही आपल्याशी तसंच वागतील. पण जर आपल्यासोबत अन्याय झाला असेल तर? अशा परिस्थितीत काय करावं हेही येशूने आपल्या अनुयायांना सांगितलं. त्याने त्यांना यहोवावर भरवसा ठेवायला शिकवलं. यहोवा “रात्रंदिवस त्याचा धावा करणाऱ्या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून” देतो. (लूक १८:६, ७) हे शब्द खरंतर एक अभिवचन आहे: या शेवटच्या दिवसांत आपल्याला ज्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं त्याबद्दल आपल्या न्यायी देवाला सर्वकाही माहीत आहे आणि त्याने ठरवलेल्या योग्य वेळी तो आपल्याला नक्की न्याय मिळवून देईल. (२ थेस्सलनी. १:६) येशूने शिकवलेली तत्त्वं लागू केली तर इतरांशी आपण न्यायीपणे वागू. या सैतानाच्या जगात आपल्यासोबत अन्याय झाला असेल तर यहोवा आपल्याला न्याय मिळवून देईल याची आपण खातरी बाळगू शकतो आणि यामुळे आपल्याला सांत्वन मिळतं. टेहळणी बुरूज१९.०५ ५ ¶१८-१९
बुधवार, ३ मार्च
तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार असा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असे करा.—१ पेत्र ३:१५.
तुम्ही कदाचित शाळेत शिकणारी एक व्यक्ती असाल, आणि तुमचे सर्व वर्गसोबती वाढदिवस साजरा करत असतील. तुम्ही त्यात का भाग घेत नाही हे तुम्हाला त्यांना बायबलमधून समजावून सांगावंसं वाटेल. पण तसं करणं तुम्हाला जमेल की नाही असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं. मग अशा परिस्थितीत तुमच्याजवळ अभ्यास करण्याची एक चांगली संधी आहे. अभ्यासादरम्यान तुम्ही दोन उद्देश लक्षात ठेवू शकता: (१) वाढदिवस साजरा करणं देवाला नापसंत आहे याची स्वतःला आणखी खातरी पटवून देणं आणि (२) सत्य समजून सांगण्याच्या कौशल्यात आणखी निपुण होणं. (मत्त. १४:६-११) तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘माझे वर्गसोबती वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणती कारणं देतात?’ मग आपल्या प्रकाशनांमधून लक्षपूर्वक संशोधन करा. मग तुम्हाला जाणवेल की तुमच्या विश्वासाबद्दल इतरांना सांगणं तुम्हाला वाटत होतं तितकं कठीण नाही. बरेच लोक फक्त यासाठी वाढदिवस साजरा करतात कारण त्यांना वाटतं की इतर सर्व जण वाढदिवस साजरा करतात. तुम्हाला संशोधन करताना फक्त एक किंवा दोन मुद्दे जरी सापडले, तरी एका प्रामाणिक मनाने प्रश्न विचारणाऱ्याला तुम्ही समाधानकारक उत्तर देऊ शकाल.—कलस्सै. ४:६. टेहळणी बुरूज१९.०५ २९ ¶१३
गुरुवार, ४ मार्च
एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करेन.—यश. ६६:१३.
संदेष्टा एलीया जेव्हा आपला जीव मुठीत घेऊन पळत होता, तेव्हा तो इतका निराश झाला की आपल्याला मरण यावं असं त्याला वाटलं. हे पाहून यहोवाने त्याला मदत करण्यासाठी एका सामर्थ्यशाली देवदूताला पाठवलं. त्या देवदूताने एलीयाला व्यावहारिक मार्गाने मदत केली. त्याने एलीयाला जेवण दिलं आणि ते खाण्यासाठी त्याला प्रेमाने आर्जवलं. (१ राजे १९:५-८) या अहवालावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो: कधीकधी व्यावहारिक रीतीने केलेली छोटी मदतही खूप प्रभावी ठरू शकते. निराश झालेल्या एखाद्या बांधवाला आपण जेवण देऊ शकतो, भेटवस्तू देऊ शकतो, किंवा आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम आणि काळजी आहे हे दाखवणारं एखादं पत्र किंवा कार्ड देऊ शकतो. यामुळे त्या बांधवाला खूप दिलासा मिळेल. आपल्याला कदाचित त्या बांधवाशी नाजूक विषयांवर बोलणं अवघड वाटत असेल, पण वरील व्यावहारिक मार्गांनी मदत करूनही आपण त्याला सांत्वन देऊ शकतो. यहोवाने एलीयाला होरेब पर्वतापर्यंतचा लांबचा प्रवास करण्यासाठी लागणारी शक्ती चमत्कारिक रीत्या दिली. त्यामुळे त्याचा जीव घेणाऱ्या लोकांपासून तो सुरक्षित राहू शकला. यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो? शोषणाला बळी पडलेल्यांना आपल्याला सांत्वन द्यायचं असेल, तर आधी त्यांना घरात किंवा राज्य सभागृहात सुरक्षित वाटण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१९.०५ १६ ¶११; १७ ¶१३-१४
शुक्रवार, ५ मार्च
संपूर्ण देश शोक करेल . . . नाथानचं घराणं शोक करेल.—जख. १२:१२, NW.
कल्पना करा, तुम्ही जखऱ्या पुस्तकाचा १२वा अध्याय वाचत आहात. त्यात मसीहाच्या मृत्यूबद्दलची भविष्यवाणी करण्यात आली आहे. (जख. १२:१०) मग तुम्हाला १२व्या वचनात “नाथानाचे घराणे” मसीहाच्या मृत्यूमुळे खूप दुःखी होतील आणि शोक करतील ही माहिती मिळते. त्या वचनातले शब्द पटकन वाचून पुढे जाण्याऐवजी थोडं थांबून स्वतःला प्रश्न विचारा: “नाथानचं घराणं आणि मसीहा यांच्यात काय संबंध आहे?” आता तुम्हाला गुप्तहेर ज्या प्रकारे खऱ्या माहितीचा शोध घेतो त्या प्रकारे काम करावं लागेल. यासाठी तुम्ही पवित्र शास्त्र का नयी दुनिया अनुवाद यात जखऱ्या १२:१२ हे वचन पाहू शकता. या वचनासाठी समासातल्या संदर्भात २ शमुवेल ५:१३, १४ आणि लूक ३:२३, ३१ ही वचनं दिली आहेत. २ शमुवेल ५:१३, १४ या वचनांत सांगितलं आहे की नाथान हा दावीदचाच एक मुलगा होता. तसंच, लूक ३:२३, ३१ यातून कळतं की येशू हा मरीयाद्वारे नाथानच्या वंशातून आला आहे. या माहितीमुळे तुमची उत्सुकता आणखी वाढते! येशू दावीदच्या वंशातून येणार होता हे तर तुम्हाला माहीत होतं. (मत्त. २२:४२) पण दावीदला तर २० पेक्षा जास्त मुलं होती. तेव्हा जखऱ्याने येशूच्या मृत्यूबद्दल शोक करण्यासंबंधी दिलेल्या माहितीत नाथानच्या घराण्याचा खास उल्लेख केला ही गोष्ट खरंच खूप लक्षवेधक नाही का? टेहळणी बुरूज१९.०५ ३० ¶१७
शनिवार, ६ मार्च
आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची उत्तम, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.—रोम. १२:२.
आपल्याला काय करण्याची गरज आहे? नियमितपणे अभ्यास. त्यामुळे, बायबलमधून शिकलेल्या गोष्टी सत्य आहेत यावर आपला पक्का विश्वास बसेल. आणि यहोवाचे स्तर योग्य आहेत याबद्दल आपल्या मनात तिळमात्र शंका उरणार नाही. मग मुळं खोलवर रुजलेल्या एका वृक्षाप्रमाणे आपणही मुळावलेले म्हणजेचं “विश्वासात स्थिर” असू. (कलस्सै. २:६, ७) लक्षात असू द्या, विश्वासात स्थिर होण्यासाठी प्रत्येकाला स्वतः मेहनत घ्यावी लागते. हे इतर कोणी आपल्यासाठी करू शकत नाही. तेव्हा, तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत सतत नवीन होत राहा. यासाठी सतत प्रार्थना करत राहा; यहोवाच्या पवित्र आत्म्याची मदत मागत राहा. मनन करा; आपल्या विचारांचं आणि हेतूचं परीक्षण करत राहा. चांगले मित्र निवडा; अशा लोकांसोबत मैत्री करा जे तुमच्या विचारसरणीत बदल करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. असं केल्याने तुम्हाला सैतानाच्या जगामुळे झालेल्या विषबाधेचा प्रभाव काढून टाकणं शक्य होईल आणि “सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात” उभ्या असलेल्या गोष्टी यशस्वी रीत्या उलथून टाकायला मदत होईल.—२ करिंथ. १०:५. टेहळणी बुरूज१९.०६ १३ ¶१७-१८
रविवार, ७ मार्च
आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना हीच आहे, की आपण अनाथ व विधवा यांची संकटात काळजी घ्यावी आणि स्वतःला या जगात निष्कलंक ठेवावे.—याको. १:२७.
जसं रूथ आपल्या सासूला, नामीला जडून राहिली तसंच आपल्याला आपल्या शोक करणाऱ्या बंधुभगिनींना सतत मदत करत राहण्याची गरज आहे. (रूथ १:१६, १७) पौला म्हणते: “माझे पती वारले, तेव्हा बऱ्याच जणांनी घरी येऊन मला मदत केली. मग काही काळानंतर सर्व जण आपआपल्या जीवनात व्यस्त झाले. पण या घटनेमुळे माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलं होतं. खरंतर दुःखात असलेल्या व्यक्तीला सतत मदतीची गरज पडते, मग ती काही महिन्यांपर्यंत किंवा काही वर्षांपर्यंतही असू शकते. आणि या गोष्टीची जाणीव इतरांना झाली तर खूप बरं होईल.” अर्थात प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. काही लोक लगेच आपली परिस्थिती स्वीकारून जीवनात पुढे वाटचाल करतात. पण इतर काहींच्या बाबतीत त्यांच्या जोडीदारासोबत केलेली प्रत्येक गोष्टीची आठवण ही त्यांना दुःख देऊन जाते. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे आपलं दुःख व्यक्त करते. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की अशा बंधुभगिनींना सांत्वन पुरवण्याचा बहुमान व जबाबदारी यहोवाने आपल्याला दिली आहे. टेहळणी बुरूज१९.०६ २४ ¶१६
सोमवार, ८ मार्च
माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.—स्तो. ३९:१.
बंदी असताना आपण “मौन धरण्याचा समय” ओळखला पाहिजे. (उप. ३:७) आपण गोपनीय माहिती सुरक्षित ठेवली पाहिजे. जसं की, आपल्या बंधुभगिनींची नावं, एकत्र येण्याचं ठिकाण, आपलं प्रचारकार्य कसं चालवलं जातं आणि आपल्याला आध्यात्मिक अन्न कसं पुरवलं जातं. ही माहिती आपण सरकारी अधिकाऱ्यांना देणार नाही. तसंच, आपल्या किंवा दुसऱ्या देशात राहणाऱ्या आपल्या मित्रांना व नातेवाइकांनाही सांगणार नाही. पण आपण जर ही माहिती त्यांना सांगितली तर आपण आपल्या बांधवांचा जीव धोक्यात घालत असू. लहान-सहान समस्यांमुळे आपसांत फूट पडू देऊ नका. एखाद्या घरात फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही हे सैतानाला माहीत आहे. (मार्क ३:२४, २५) सैतान आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी लढण्याऐवजी आपसांत लढत राहावं. अशा प्रकारच्या पाशात आपण पडू नये म्हणून अगदी प्रौढ ख्रिश्चनांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या बांधवासोबत असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपल्यात फूट पडणार नाही.—कलस्सै. ३:१३, १४. टेहळणी बुरूज१९.०७ ११-१२ ¶१४-१६
मंगळवार, ९ मार्च
[प्रभूचा दास] सर्वांशी सौम्यतेने वागणारा, शिकवण्याची योग्यता असलेला . . . असावा.—२ तीम. २:२४.
बऱ्याच वेळा आपण लोकांना काय सांगतो यामुळे नाही तर कसं सांगतो यामुळे ते आपला संदेश स्वीकारतात. आपण त्यांच्याशी प्रेमळपणे, विचारशीलपणे वागतो आणि त्यांच्यात मनापासून आस्था दाखवतो तेव्हा त्यांना या गोष्टी आवडतात. आपण आपलं मत त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाही, तर धर्माबद्दल त्यांचं मत काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच, आपण लोकांच्या भावनाही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपण प्रेषित पौलचं अनुकरण करून त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. पौल यहुदी लोकांशी बोलला तेव्हा त्याने त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क केला. पण अरीयपगमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानींशी बोलताना, तो त्यांना शास्त्रवचनांमधून काहीतरी सांगत आहे असं त्याने म्हटलं नाही. (प्रे. कार्ये १७:२, ३, २२-३१) आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटली जिचा बायबलवर विश्वास नाही तर तुम्ही तिच्याशी तर्क करताना थेट बायबलमधून सांगण्याचं किंवा ‘बायबल’ असा उल्लेख करण्याचं टाळू शकता. एखादी व्यक्ती इतरांसमोर असताना बायबलच्या प्रतीतून वाचायला कचरू शकते. अशा वेळी तुम्ही तिला बायबलची प्रत उघडून दाखवण्याऐवजी मोबाईल किंवा टॅबवरून वचनं दाखवू शकता. टेहळणी बुरूज१९.०७ २१ ¶५-६
बुधवार, १० मार्च
तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल.—अनु. ११:१६.
सैतानाने खूप चलाखीने इस्राएली लोकांना मूर्तिपूजा करण्याच्या मोहात पाडलं. त्यांना अन्नाची गरज आहे हे त्याला माहीत होतं आणि त्याने याच गोष्टीचा फायदा उचलला. इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात पोहोचल्यावर त्यांना शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागणार होता. इजिप्तमध्ये असताना ते नाईल नदीतल्या पाण्याचा वापर करून शेती करायचे. पण वचन दिलेल्या देशात अशी काही सोय नव्हती आणि म्हणून शेतीसाठी त्यांना आता पाऊस आणि दव यांवर अवलंबून राहावं लागणार होतं. (अनु. ११:१०-१५ ; यश. १८:४, ५) त्यामुळे इस्राएली लोकांना आता शेती करण्याच्या नवीन पद्धती शिकून घ्याव्या लागणार होत्या. पण शेतीविषयी बोलताना यहोवाने त्यांना खोट्या दैवतांच्या उपासनेपासून दूर राहायचा इशारा का दिला? कारण यहोवाला माहीत होतं, की कनानी शेतकऱ्यांची विचारसरणी ही बआल दैवतावरच्या त्यांच्या विश्वासामुळे प्रभावित झालेली होती. आणि मूर्तिपूजा करणाऱ्या आसपासच्या या लोकांकडून शेतीची कौशल्यं शिकून घेण्याचा आपल्या इस्राएली लोकांना मोह होऊ शकतो हेसुद्धा यहोवाला माहीत होतं.—गण. २५:३, ५; शास्ते २:१३; १ राजे १८:१८. टेहळणी बुरूज१९.०६ ३ ¶४-६
गुरुवार, ११ मार्च
मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचे प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावे.—फिलिप्पै. १:९.
प्रेषित पौल, सीला, लूक आणि तीमथ्य रोमी लोकांची वसाहत असलेल्या फिलिप्पैमध्ये आले तेव्हा त्यांना आनंदाच्या संदेशात आवड असणारे बरेचसे लोक भेटले. या चार आवेशी बांधवांनी मंडळी सुरू करण्यासाठी मेहनत घेतली. मग नवीन शिष्य सभांना येऊ लागले. ते कदाचित आदरातिथ्य दाखवणाऱ्या लुदिया नावाच्या बहिणीच्या घरी सभेसाठी भेटू लागले. (प्रे. कार्ये १६:४०) नवीनच सुरू झालेल्या मंडळीला काही काळातच समस्यांचा सामना करावा लागला. सैतानाने सत्याचा द्वेष करणाऱ्या लोकांना प्रचार कार्याचा विरोध करायला प्रवृत्त केलं. यामुळे पौल आणि सीला यांना अटक करण्यात आली, काठीने मारण्यात आलं आणि तुरुंगात टाकण्यात आलं. पण तुरुंगातून सुटका झाल्यावर ते नवीन शिष्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. मग पौल, सीला, तीमथ्य यांनी ते शहर सोडलं पण लूक मात्र तिथेच राहिला. अशा परिस्थितीत आता नवीन बंधुभगिनी काय करणार होते? यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने ते देवाची सेवा आवेशाने करत राहिले. (फिलिप्पै. २:१२) यामुळे पौलला त्यांच्याबद्दल नक्कीच अभिमान वाटला असेल. टेहळणी बुरूज१९.०८ ८ ¶१-२
शुक्रवार, १२ मार्च
ऋणको धनकोचा दास होतो.—नीति. २२:७.
तुम्ही नुकतेच एखाद्या नवीन ठिकाणी स्थलांतरित झाला आहात का? नवीन ठिकाणी स्थलांतरित होणं खूप खर्चीक असू शकतं आणि अशा वेळी एक व्यक्ती कर्जात बुडू शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची खरंच गरज नाही, त्या गोष्टी पैसे उसने घेऊन किंवा क्रेडिट कार्डवर घेण्याचं टाळा. (नीति. २२:३) आपण तणावात असताना, कदाचित जवळची व्यक्ती आजारी असेल, अशा वेळी किती कर्ज काढायचं हे ठरवणं कठीण जाऊ शकतं. अशा परिस्थितींमध्ये नेहमी लक्षात ठेवा की “प्रार्थना व याचना” आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतात. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून यहोवा तुम्हाला शांती देईल जी तुमच्या “मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.” यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. (फिलिप्पै. ४:६, ७; १ पेत्र ५:७) नवीन मित्र बनवा. तुमच्या मित्रांना आपल्या भावना सांगा खासकरून अशांना ज्यांनी तुमच्यासारख्या परिस्थितीचा सामना केला असेल. असं केल्याने तुम्हाला बरं वाटेल. (उप. ४:९, १०) नवीन ठिकाणी जाण्याआधी तुम्ही बनवलेले मित्र नेहमीच तुमचे मित्र राहतील. टेहळणी बुरूज१९.०८ २२ ¶९-१०
शनिवार, १३ मार्च
त्यांनी . . . हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.—प्रकटी. १६:१६.
यहोवाने त्याच्या शेवटच्या मोठ्या युद्धाचा संबंध मगिद्दोशी का जोडला? मगिद्दो आणि त्याच्या जवळपास असलेल्या इज्रेलच्या खोऱ्यात बरीच युद्धं लढली गेली. यांपैकी काही युद्धात यहोवा आपल्या लोकांच्या वतीने लढला होता. उदाहरणार्थ, “मगिद्दोच्या जलप्रवाहांपाशी” यहोवाने इस्राएलचा शास्ता बाराक याला सीसराच्या कनानी सैन्याला हरवायला मदत केली. चमत्कारिक रीत्या हा विजय मिळवून दिल्याबद्दल बाराक आणि संदेष्ट्री दबोरा यांनी यहोवाचे आभार मानले. त्यांनी गीतात म्हटलं: “आकाशांतून तारे लढले; त्यांनी . . . सीसराशी लढाई केली. . . . हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:१९-२१, ३१) हर्मगिदोनमध्ये देवाच्या विरोधकांचीही हीच दशा होईल. मात्र देवावर प्रेम करणाऱ्या लोकांना वाचवलं जाईल. पण आधीच्या आणि हर्मगिदोनच्या युद्धामध्ये एक महत्त्वाचा फरक असेल. हर्मगिदोनमध्ये देवाच्या लोकांना लढावं लागणार नाही. त्यांच्याजवळ तर हत्यारंदेखील नसतील. याउलट ते शांत राहतील आणि यहोवा व त्याच्या स्वर्गीय सैन्यावर पूर्ण भरवसा ठेवतील.—यश. ३०:१५; प्रकटी. १९:११-१५. टेहळणी बुरूज१९.०९ ९ ¶४-५
रविवार, १४ मार्च
माझ्याकडे या.—मत्त. ११:२८.
येशूकडे ‘येण्याचा’ एक मार्ग म्हणजे त्याने जे म्हटलं आणि जे केलं त्याबद्दल जास्तीत जास्त शिकणं. (लूक १:१-४) ही गोष्ट कोणी दुसरं आपल्यासाठी करू शकत नाही तर आपल्याला स्वतः या अहवालांचा अभ्यास करावा लागेल. बाप्तिस्मा घेण्याचा आणि येशूचे शिष्य बनण्याचा निर्णय घेऊनही आपण येशूकडे ‘येऊ’ शकतो. येशूकडे ‘येण्याचा’ आणखी एक मार्ग म्हणजे मदतीची गरज असताना मंडळीतल्या वडिलांकडे जाणं. येशू त्याच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी “माणसांच्या रूपात” असलेल्या या देणग्यांचा उपयोग करतो. (इफिस. ४:७, ८, ११; योहा. २१:१६; १ पेत्र ५:१-३) आपण मदत मागायला पुढाकार घेतला पाहिजे. वडील आपल्या मनातलं ओळखतील किंवा आपल्याला कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे हे त्यांना आपोआपच समजेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. जुलियन नावाच्या बांधवाचा विचार करा. तो म्हणतो: “मी वडिलांकडे मदत मागितली तेव्हा मला कळलं की ही मदत मला मिळालेली सर्वात उत्तम भेट होती.” जुलियनला दोन वडिलांनी मदत केली. आपल्या मंडळीतले वडीलही आपल्याला “ख्रिस्ताचे मन” जाणून घेण्यासाठी, म्हणजे त्याच्या विचारांचं आणि मनोवृत्तीचं अनुकरण करण्यासाठी मदत करू शकतात. (१ करिंथ. २:१६; १ पेत्र २:२१) वडील जेव्हा अशा रीतीने मदत करतात तेव्हा ती आपल्यासाठी सर्वात चांगली भेट ठरू शकते. टेहळणी बुरूज१९.०९ २१ ¶४-५
सोमवार, १५ मार्च
माझी दुसरीही मेंढरं आहेत, जी या मेंढवाड्यातली नाहीत.—योहा. १०:१६.
आपल्याला बायबलमध्ये अशा अनेक विश्वासू स्त्रीपुरुषांबद्दल वाचायला मिळतं ज्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं होतं, पण तरी ते १,४४,००० जणांचा भाग नाहीत. उदाहरणार्थ, बाप्तिस्मा देणारा योहान. (मत्त. ११:११) दावीदच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. (प्रे. कार्ये २:३४) हे आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांना नंदनवन झालेल्या पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल. यांच्याकडे आणि मोठ्या लोकसमुदायाकडे यहोवाला आणि त्याच्या अधिकाराला विश्वासू राहण्याची संधी असेल. देवाने वेगवेगळ्या देशांतून लाखो लोकांना एकत्रित केलं आहे आणि मानव इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची आपल्याला जास्तीत जास्त लोकांना ‘दुसरी मेंढरं’ यांचा भाग बनण्यासाठी मदत करायची आहे. लवकरच, यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे तो मोठं संकट आणेल आणि मानवांचा छळ करणाऱ्या सरकारांचा आणि धर्मांचा नाश करेल. खरंच, मोठ्या लोकसमुदायाच्या सर्व सदस्यांना या पृथ्वीवर अनंतकाळासाठी यहोवाची सेवा करण्याचा खूप मोठा बहुमान मिळाला आहे!—प्रकटी. ७:१४. टेहळणी बुरूज१९.०९ ३१ ¶१८-१९
मंगळवार, १६ मार्च
शेवटच्या दिवसांत . . . थट्टेखोर लोक येतील आणि . . . थट्टा करतील.—२ पेत्र ३:३.
मोठं संकट जवळ येत असताना देवाला आणि त्याच्या राज्याला विश्वासू राहणाऱ्या लोकांना कठीण परीक्षांना तोंड द्यावं लागेल हे अपेक्षित आहे. लोक आपली निंदा करत राहतील. खासकरून आपण सैतानाच्या जगाचा भाग नाही आणि तटस्थ राहतो यामुळे ते असं करतील. आपण आताच एकनिष्ठता वाढवली पाहिजे म्हणजे मोठं संकट आल्यावर आपल्याला विश्वासू राहायला मदत होईल. मोठं संकट येईल तेव्हा या पृथ्वीवर पुढाकार घेणाऱ्या बांधवांविषयी एक बदल होईल. एका विशिष्ट वेळी पृथ्वीवरच्या सर्व अभिषिक्त जनांना स्वर्गात नेलं जाईल आणि मग ते हर्मगिदोनच्या युद्धात भाग घेतील. (मत्त. २४:३१; प्रकटी. २:२६, २७) याचा अर्थ त्या वेळी नियमन मंडळ आपल्यासोबत पृथ्वीवर नसेल. असं असलं तरी मोठा लोकसमुदाय हा संघटित असेल. दुसऱ्या मेंढरांमधले निपुण बांधव पुढाकार घेतील. आपल्याला त्या वेळी दाखवून द्यावं लागेल की आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत. हे आपण बांधवांना पाठिंबा देण्याद्वारे आणि देव त्यांच्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन देईल त्याचं पालन करण्याद्वारे दाखवून देऊ. असं करणं महत्त्वाचं असेल कारण आपला बचाव त्यावरच अवलंबून असेल! टेहळणी बुरूज१९.१० १७ ¶१३-१४
बुधवार, १७ मार्च
तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन . . . तुम्ही मराल तिथे मी मरेन.—रूथ १:१६, १७.
नामी ही यहोवावर प्रेम करणारी एक विश्वासू स्त्री होती. पण तिच्या पतीचा आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा तिला आपलं नाव बदलून “मारा” असं ठेवायचं होतं. माराचा अर्थ कडू असा होतो. (रूथ १:३, ५, २०, २१) पण या कठीण परिस्थितीतही नामीची सून रूथ ही तिला जडून राहिली. रूथने तिला व्यावहारिक रीत्या तर मदत केलीच, पण यासोबतच तिने तिला आपल्या शब्दांतून सांत्वनही दिलं. रूथने नामीप्रती असलेलं आपलं प्रेम मनापासून व्यक्त केलं. आपल्या आध्यात्मिक कुटुंबातला एखादा सदस्य आपल्या विवाह जोडीदाराला मृत्यूमध्ये गमावतो, तेव्हा त्याला आपल्या मदतीची गरज पडते. एका जोडप्याची तुलना आपण जवळजवळ वाढलेल्या दोन झाडांशी करू शकतो. जसजशी वर्षं सरतात तसतशी या झाडांची मुळं एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतून जातात. यामुळे जेव्हा एका झाडाला उपटून टाकण्यात येतं, तेव्हा दुसऱ्या झाडावर याचा खूप वाईट परिणाम होतो. त्याच प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला गमावते, तेव्हा तिला बऱ्याच काळापर्यंत दुःखाला सामोरं जावं लागू शकतं. टेहळणी बुरूज१९.०६ २३ ¶१२-१३
गुरुवार, १८ मार्च
तर प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो तेव्हा परीक्षेत पडतो.—याको. १:१४.
मनोरंजन करताना आपण काय बघतो आणि त्यासाठी किती वेळ देतो याविषयी आपण सावध असलं पाहिजे. आपण जर असं केलं नाही तर यहोवाच्या सेवेपेक्षा मनोरंजनात आपला जास्त वेळ जाईल. सर्वात आधी मनोरंजनासाठी आपण किती वेळ देत आहोत हे तपासून पाहा. मनोरंजनामागे प्रत्येक आठवडी आपला किती वेळ जातो याची नोंद करून ठेवणं फायद्याचं ठरेल. टिव्ही बघण्यात, इंटरनेट वापरण्यात आणि मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळण्यात किती तास जातात हे आपण कॅलेंडरवर लिहून ठेवू शकतो. खूप जास्त वेळ जात असल्याचं आपल्याला जाणवलं तर आपण एक आराखडा बनवू शकतो. सर्वात आधी महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ ठरवा आणि मग त्यानंतर काही वेळ मनोरंजनासाठी द्या. मग ठरवल्याप्रमाणे आपल्याला काम करता यावं यासाठी यहोवाला प्रार्थना करा. असं केल्यामुळे तुमच्याकडे वैयक्तिक बायबल अभ्यास, कौटुंबिक उपासना, मंडळीच्या सभा आणि प्रचारासाठी जास्त वेळ आणि शक्ती असेल. तसंच त्यानंतर तुम्ही मनोरंजनासाठीही काही वेळ दिला म्हणून तुमचं मन तुम्हाला खाणार नाही. टेहळणी बुरूज१९.१० ३० ¶१४, १६; ३१ ¶१७
शुक्रवार, १९ मार्च
चांगले करण्याची माझी इच्छा तर आहे, पण ते प्रत्यक्षात करणे मला जमत नाही.—रोम. ७:१८.
जवळपास इ.स. ५५ मध्ये करिंथमधल्या ख्रिश्चनांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. करिंथमधल्या बांधवांना यरुशलेम आणि यहूदीया इथे राहणाऱ्या भाऊबहिणींच्या गरजांबद्दल कळलं. तेव्हा करिंथमधल्या बांधवांनी त्यांना मदत करण्यासाठी एकत्र मिळून पैसे गोळा करायचं ठरवलं. (१ करिंथ. १६:१; २ करिंथ. ८:६) पण काही महिन्यांनंतर प्रेषित पौलला कळलं की करिंथकरांनी ठरवल्यानुसार दान गोळा केलं नाही. यामुळे जेव्हा यरुशलेमला इतर मंडळ्यांकडून आलेल्या दानासोबत हे दान घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा ते दान गोळा केलेलं नव्हतं. (२ करिंथ. ९:४, ५) करिंथकरांनी खरंच एक चांगला निर्णय घेतला होता आणि पौलने त्यांच्या भक्कम विश्वासासाठी आणि मनापासून मदत करण्याच्या त्यांच्या इच्छेसाठी त्यांची प्रशंसा केली. पण करिंथकरांनी ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी पौलला त्यांना प्रोत्साहनही द्यावं लागलं. (२ करिंथ. ८:७, १०, ११) या अनुभवावरून आपल्याला कळतं की विश्वासू ख्रिश्चनांनासुद्धा त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्य करणं कठीण जाऊ शकतं. असं का? कारण आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपण कदाचित एखादं काम वेळेवर न करता टाळाटाळ करू. किंवा एखादी अनपेक्षित घटना घडू शकते त्यामुळे आपल्याला कठीण जाऊ शकतं.—उप. ९:११. टेहळणी बुरूज१९.११ २६-२७ ¶३-५
शनिवार, २० मार्च
विश्वासाची मोठी ढाल हाती घ्या.—इफिस. ६:१६.
एक मोठी ढाल ज्या प्रकारे जवळजवळ संपूर्ण शरीराचं रक्षण करते, त्याच प्रकारे तुमचा विश्वास तुमचं अनैतिकता, हिंसा आणि या जगातल्या इतर वाईट गोष्टींपासून रक्षण करतो. ख्रिस्ती या नात्याने आपलं युद्ध आध्यात्मिक स्वरूपाचं आहे आणि यात आपण दुष्ट आत्मिक शक्तींसोबत लढतो. (इफिस. ६:१०-१२) परीक्षा आल्यावर तुमचा विश्वास मजबूत राहील याची तुम्ही आधीच खातरी कशी करू शकता? सर्वात आधी तुम्ही यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. मग देवाच्या वचनाचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे जाणून घेतलं पाहिजे. (इब्री ४:१२) बायबल सांगतं: “अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (नीति. ३:५, ६) हे तत्त्व मनात ठेवून अलीकडे तुम्ही जे निर्णय घेतले आहेत त्यावर थोडा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागला आहे का? अशा परिस्थितीत इब्री लोकांना १३:५ मध्ये यहोवाने जे अभिवचन दिलं आहे ते तुमच्या मनात आलं का? त्यात म्हटलं आहे: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” या अभिवचनामुळे यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल असा भरवसा तुम्हाला मिळाला का? जर असं झालं असेल, तर तुम्ही म्हणू शकता की तुमची विश्वासाची ढाल चांगल्या स्थितीत आहे. टेहळणी बुरूज१९.११ १४ ¶१, ४
रविवार, २१ मार्च
संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे.—स्तो. १२७:३.
एका मुलाचं संगोपन करताना आई आणि वडील दोघांनी आपला वेळ व शक्ती देणं गरजेचं आहे. जर मुलांमध्ये वयाचं कमी अंतर असेल तर पालकांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देणं कठीण जाऊ शकतं. काही जोडपी ज्यांना अनेक लहान मुलं होती त्यांनी मान्य केलं की त्यांच्यासाठी हे खूप आव्हानात्मक होतं. एक आई कदाचित शारीरिक आणि भावनिक रीत्या पार थकून जाईल. इतकी की तिला नियमितपणे प्रार्थना व वैयक्तिक अभ्यास करणं आणि प्रचाराला जाणं शक्य होणार नाही. तसंच, तिला ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणं आणि त्यातून फायदा मिळवणंही कदाचित कठीण जाईल. यात काहीच शंका नाही की एक प्रेमळ पती सभेत आणि घरीही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचा पुरेपूर प्रयत्न करून आपल्या पत्नीला साहाय्य करतो. उदाहरणार्थ, तो घरकामात आपल्या पत्नीला मदत करेल. तसंच, सर्वांना नियमितपणे कौटुंबिक उपासनेतून फायदा मिळण्यासाठी तो मेहनत घेईल आणि आपल्या कुटुंबासोबत नियमितपणे सेवाकार्यातही सहभाग घेईल. टेहळणी बुरूज१९.१२ २४ ¶८
सोमवार, २२ मार्च
हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय.—लेवी. २५:११.
योबेल किंवा सुटकेचं वर्ष याचा इस्राएली लोकांना कसा फायदा झाला? समजा एखाद्या इस्राएली व्यक्तीवर खूप कर्ज असल्यामुळे तिला आपली जमीन विकावी लागली असेल, तर योबेल वर्षादरम्यान तिला ती जमीन परत मिळायची. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या “वतनात” परत जाऊ शकत होती आणि नंतर तिच्या मुलांना ती जमीन वारसा म्हणून मिळणं शक्य व्हायचं. तसंच, एखाद्या व्यक्तीने जर कर्ज फेडण्यासाठी स्वतःला किंवा आपल्या मुलांना दास म्हणून विकलं असेल, तर सुटकेच्या वर्षात ती व्यक्ती आपल्या “कुटुंबात” परत जाऊ शकत होती. (लेवी. २५:१०) या तरतुदीमुळे कोणालाही कायमचं दास म्हणून राहायची गरज नव्हती. याशिवाय यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं: “तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल.” (अनु. १५:४) आज जगात याच्या अगदी उलट घडत आहे. गरीब हा दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे, तर श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे! टेहळणी बुरूज१९.१२ ८-९ ¶३-४
मंगळवार, २३ मार्च
माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर.—नीति. २७:११.
परीक्षांचा सामना करताना येशूने “आक्रोश करून व अश्रू गाळून” प्रार्थना केली. (इब्री ५:७) तो मनापासून प्रार्थना करायचा आणि यामुळे यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा त्याचा निर्धार आणखी पक्का झाला. येशूने केलेल्या प्रार्थना यहोवासाठी सुगंधित धूपासारख्या होत्या. येशू आयुष्यभर यहोवाला एकनिष्ठ राहिला आणि यामुळे यहोवाला खूप आनंद झाला. तसंच, यहोवालाच राज्य करण्याचा अधिकार आहे हेदेखील सिद्ध झालं. जीवनात नेहमी यहोवाला एकनिष्ठ राहून आणि त्याने दिलेल्या तत्त्वांवर चालून आपण येशूचं अनुकरण करू शकतो. आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं आहे, त्यामुळे परीक्षांचा सामना करत असताना आपण कळकळीने त्याला प्रार्थना केली पाहिजे. आपण जर यहोवाला आवडत नसलेली कार्यं करत असलो, तर तो आपल्या प्रार्थना स्वीकारणार नाही. याउलट आपण जर यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगत असलो, तर आपल्या प्रार्थना यहोवासाठी सुगंधित धूपासारख्या असतील याची आपण खातरी बाळगू शकतो. तसंच, आपल्या एकनिष्ठ सेवेमुळे यहोवाचं मन नक्कीच आनंदित होईल. टेहळणी बुरूज१९.११ २१-२२ ¶७-८
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ९: दिवसा घडलेल्या घटना) लूक १९:२९-४४
बुधवार, २४ मार्च
असा विश्वासू आणि बुद्धिमान दास खरोखर कोण आहे?—मत्त. २४:४५.
येशूने १९१९ साली अभिषिक्त बांधवांच्या एका छोट्या गटाला “विश्वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून नेमलं. हा दास जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात पुढाकार घेतो आणि ख्रिस्ताच्या अनुयायांना “योग्य वेळी अन्न” पुरवतो. विश्वासू दासाचं काम थांबवण्यासाठी सैतान आणि त्याच्या समर्थकांनी बरेच प्रयत्न केले आहेत. या दासाला जर यहोवाची मदत मिळाली नसती, तर त्याला हे काम करणं कधीच शक्य झालं नसतं. मागच्या शतकात दोन विश्व युद्धं झाली, साक्षीदारांचा छळ करण्यात आला, जगाची आर्थिक स्थिती ढासळली आणि काही ठिकाणी तर साक्षीदारांवर अन्यायदेखील झाला आहे. पण इतकं सगळं होऊनही विश्वासू दास ख्रिस्ताच्या अनुयायांना नियमितपणे आध्यात्मिक अन्न पुरवत आहे. आज आपल्याजवळ किती मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक अन्न उपलब्ध आहे याची कल्पना करा. आणि हे सर्व आपल्याला ९०० पेक्षा जास्त भाषांमध्ये अगदी मोफत पुरवलं जातं. यावरून हे स्पष्ट आहे की या कार्याला यहोवाचा पूर्ण पाठिंबा आहे. यहोवा आपल्या कार्यावर आशीर्वाद देत असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे आपलं प्रचारकार्य. आज आनंदाचा संदेश एका अर्थी “सर्व जगात घोषित” केला जात आहे.—मत्त. २४:१४. टेहळणी बुरूज१९.११ २४ ¶१५-१६
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १०: दिवसा घडलेल्या घटना) लूक १९:४५-४८; मत्तय २१:१८, १९; २१:१२, १३
गुरुवार, २५ मार्च
[ख्रिस्ताने] देवाचे भय मानल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या.—इब्री ५:७.
दरवर्षी प्रायश्चित्ताच्या दिवशी, मुख्य याजकाला आधी धूप जाळावा लागायचा आणि मग त्यानंतरच त्याला बलिदान अर्पण करणं शक्य होतं. आधी धूप जाळण्याद्वारे तो यहोवाची पसंती मिळवायचा आणि मग बलिदान अर्पण करायचा. पृथ्वीवर असताना आपलं जीवन बलिदान म्हणून अर्पण करण्याआधी येशूला एक खूप महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं होतं. ही गोष्ट मानवजातीचं तारण करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाची होती. त्याला काय करणं गरजेचं होतं? त्याला आयुष्यभर यहोवाला एकनिष्ठ राहायचं होतं. असं करण्याद्वारे त्याला यहोवाची पसंती मिळणार होती आणि यामुळेच यहोवाने त्याचं बलिदान मान्य केलं असतं. एकनिष्ठ राहण्याद्वारे येशू हे सिद्ध करू शकत होता की यहोवाच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणंच योग्य आहे. तसंच फक्त यहोवालाच राज्य करण्याचा अधिकार आहे आणि राज्य करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे, हेदेखील येशू सिद्ध करू शकत होता. पृथ्वीवर असताना येशूने नेहमी यहोवाचे स्तर पाळले. येशूसमोर अनेक प्रलोभनं आणि परीक्षा आल्या. पण तरीही तो यहोवाला एकनिष्ठ राहिला. आपल्या पित्याची राज्य करण्याची पद्धतच योग्य आहे हे सिद्ध करण्याचा त्याचा निर्धार पक्का होता.—फिलिप्पै. २:८. टेहळणी बुरूज१९.११ २१ ¶६-७
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान ११: दिवसा घडलेल्या घटना) लूक २०:१-४७
शुक्रवार, २६ मार्च
माझ्या परीक्षांमध्ये मला जडून राहिलेले तुम्हीच आहात.—लूक २२:२८.
येशूच्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान त्याला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. पण अशा परिस्थितीत विश्वासू प्रेषितांनी त्याला जडून राहण्याद्वारे दाखवून दिलं की ते त्याचे खरे मित्र आहेत. (नीति. १८:२४) अशा प्रकारचे मित्र येशूच्या नजरेत खूप मौल्यवान होते. आपल्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान त्याच्या भावांपैकी एकानेही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. (योहा. ७:३-५) त्याच्या नातेवाइकांनीही त्याच्याबद्दल असा विचार केला की त्याला वेड लागलं आहे. (मार्क ३:२१) पण याच्या अगदी उलट, पृथ्वीवर आपल्या शेवटच्या रात्री येशू आपल्या प्रेषितांना आजच्या वचनातले शब्द म्हणू शकला. येशूच्या प्रेषितांनी काही वेळा त्याला निराश केलं. पण येशूने त्यांच्या चुकांवर लक्ष न देता, त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे यावर लक्ष दिलं. (मत्त. २६:४०; मार्क १०:१३, १४; योहा. ६:६६-६९) आपल्या शेवटच्या रात्री येशूने या विश्वासू प्रेषितांना म्हटलं: “मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण माझ्या पित्यापासून ऐकलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.” (योहा. १५:१५) येशूला त्याच्या मित्रांमुळे बरंचसं प्रोत्साहन मिळालं यात काहीच शंका नाही. टेहळणी बुरूज१९.०४ ११ ¶११-१२
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १२: दिवसा घडलेल्या घटना) लूक २२:१-६; मार्क १४:१, २, १०, ११
स्मारकविधीची तारीख
सूर्यास्तानंतर
शनिवार, २७ मार्च
आत्मा आपल्या अंतःकरणाला अशी साक्ष देतो, की आपण देवाची मुले आहोत.—रोम. ८:१६.
एखाद्या व्यक्तीला कसं कळतं की तिला स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात आलं आहे? रोममधल्या ख्रिश्चनांना “पवित्र जन होण्याकरता बोलवण्यात” आलं होतं. प्रेषित पौलने त्यांना जे म्हटलं त्यावरून आपल्याला याचं उत्तर मिळतं. आजच्या वचनात दिलेल्या शब्दांसोबतच त्याने त्यांना असं म्हटलं: “देवाचा पवित्र आत्मा आपल्याला दास करत नाही, तसेच आपल्या मनात भीतीही उत्पन्न करत नाही; उलट या आत्म्याद्वारे आपल्याला पुत्र म्हणून दत्तक घेतले जाते आणि याच पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला ‘अब्बा, बापा!’ अशी हाक मारण्याची प्रेरणा मिळते.” (रोम. १:७; ८:१५) याचाच अर्थ, देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त जनांना हे स्पष्ट करून देतो की स्वर्गातल्या जीवनासाठी त्यांना बोलवण्यात आलं आहे. (१ थेस्सलनी. २:१२) एखाद्याला स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवण्यात येतं तेव्हा यहोवा त्याच्या मनात याबद्दल तिळमात्रही शंका राहू देत नाही. (१ योहा. २:२०, २७) अभिषिक्त ख्रिस्ती अभिषिक्त आहेत, याची इतरांनी त्यांना खातरी करून देण्याची गरज नाही. टेहळणी बुरूज२०.०१ २२ ¶७-८
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १३: दिवसा घडलेल्या घटना) लूक २२:७-१३; मार्क १४:१२-१६ (निसान १४: सूर्यास्तानंतर घडलेल्या घटना) लूक २२:१४-६५
रविवार, २८ मार्च
कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.—योहा. १५:१३.
ख्रिस्ताचा नियम सर्वात चांगल्या पायावर बांधला आहे. तो म्हणजे प्रेम. (गलती. ६:२) येशूने प्रेमाने प्रेरित होऊन सर्वकाही केलं. करुणा किंवा कोमल दया या गुणांमुळे खरंतर प्रेमच व्यक्त होतं. आणि या करुणेपोटी येशूने जमावाला शिकवलं, आजारी लोकांना बरं केलं, उपाशी लोकांना जेवू घातलं आणि मृत जणांना जिवंत केलं. (मत्त. १४:१४; १५:३२-३८; मार्क ६:३४; लूक ७:११-१५) येशूने नेहमी आपल्याआधी इतरांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जीवन दुसऱ्यांसाठी देण्याद्वारे त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं. आपल्याआधी इतरांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्याने आपण येशूचं अनुकरण करू शकतो. आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल कोमल दया विकसित केल्यानेही आपण त्याचं अनुकरण करू शकतो. या दयेच्या गुणामुळे आपण जेव्हा आनंदाचा संदेश प्रचार करायला आणि शिकवायला प्रेरित होतो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या नियमाचं पालन करत असतो. टेहळणी बुरूज१९.०५ ४ ¶८-१०
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १४: दिवसा घडलेल्या घटना) लूक २२:६६-७१
सोमवार, २९ मार्च
बंदिवानांची सुटका करण्यासाठी आणि . . . जुलूम सोसणाऱ्यांची सुटका करण्यासाठी . . . [यहोवाने] मला पाठवलं आहे.—लूक ४:१८.
येशूने लोकांना धार्मिक पुढारी शिकवत असलेल्या खोट्या शिकवणींपासून मुक्त होण्यासाठी मदत केली. त्या काळात मानवी परंपरा आणि चुकीचे विश्वास पाळायला बऱ्याच यहुदी लोकांना भाग पाडलं जायचं. एका अर्थी ते त्यांचे दास बनले होते. (मत्त. ५:३१-३७; १५:१-११) धार्मिक पुढारी दावा करत होते की ते इतरांना देवाची उपासना करायला शिकवत आहेत. पण ते स्वतः देवाच्या इच्छेनुसार वागत नव्हते. मसीहाला आणि तो शिकवत असलेल्या गोष्टींना नाकारण्याद्वारे ते जणू आध्यात्मिक अंधारात आणि पापाच्या दास्यातच राहिले. (योहा. ९:१, १४-१६, ३५-४१) पण येशूने मात्र लोकांना सत्याची ओळख करून दिली आणि त्याने स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं. असं करण्याद्वारे त्याने नम्र लोकांना खोट्या शिकवणींपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला. (मार्क १:२२; २:२३–३:५) येशूने आणखी एका मार्गाने लोकांना सुटका मिळवून दिली. त्याने लोकांना पापाच्या दास्यातून सुटका मिळवण्याचा मार्ग खुला केला. येशूने दिलेल्या बलिदानाच्या आधारावर यहोवाला मानवांना क्षमा करणं शक्य झालं. ही क्षमा अशा लोकांना मिळणार होती जे येशूवर आणि त्याने दिलेल्या खंडणीवर विश्वास ठेवतात.—इब्री १०:१२-१८. टेहळणी बुरूज१९.१२ १० ¶८; ११ ¶१०-११
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १५: दिवसा घडलेल्या घटना) मत्तय २७:६२-६६
मंगळवार, ३० मार्च
त्याच्याद्वारे तुमच्यावर पूर्वीच वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला. हा पवित्र आत्मा आपल्याला मिळणार असलेल्या वारशाची आधीच दिलेली एक हमी आहे.—इफिस. १:१३, १४, तळटीप.
यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर करून अभिषिक्त ख्रिश्चनांना अगदी स्पष्ट करून देतो की त्याने त्यांना निवडलं आहे. पवित्र आत्मा ही त्यांना मिळालेली “हमी [आगाऊ रक्कम]” आहे की भविष्यात त्यांना पृथ्वीवर नाही तर स्वर्गात सर्वकाळाचं जीवन मिळेल. (२ करिंथ. १:२१, २२) एक ख्रिस्ती व्यक्ती अभिषिक्त असेल तर ती नक्कीच स्वर्गात जाईल का? नाही. स्वर्गात जाण्यासाठी तिची निवड झाली आहे याची तिला खातरी असते. पण तरी तिने बायबलमध्ये दिलेल्या चेतावणीकडे लक्ष दिलं पाहिजे. ती म्हणजे: “बांधवांनो, बोलावले जाण्याचा आणि निवडले जाण्याचा जो बहुमान तुम्हाला लाभला आहे, तो टिकवून ठेवण्याचा आणखी जास्त प्रयत्न करा; कारण, जर तुम्ही असे करत राहिलात, तर तुम्ही कधीही अडखळून पडणार नाही.” (२ पेत्र १:१०) याचा अर्थ, एका अभिषिक्त ख्रिश्चनाला स्वर्गात जाण्यासाठी बोलवण्यात आलं असलं, तरी शेवटपर्यंत तो विश्वासू राहिला तरच त्याला त्याचं बक्षीस मिळेल.—फिलिप्पै. ३:१२-१४; इब्री ३:१; प्रकटी. २:१०. टेहळणी बुरूज२०.०१ २१-२२ ¶५-६
स्मारकविधी बायबल वाचन: (निसान १६: दिवसा घडलेल्या घटना) लूक २४:१-१२
बुधवार, ३१ मार्च
कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.—नीति. १२:१८.
ईयोबचे तीन मित्र त्याला दया दाखवण्यापासून चुकले. त्याचं एक कारण म्हणजे, त्यांनी परिस्थिती पूर्णपणे समजून घेतली नाही. यामुळे त्यांनी चुकीचे निष्कर्ष काढले आणि ईयोबला दोषी ठरवलं. अशा प्रकारची चूक आपण कशी टाळू शकतो? नेहमी लक्षात असू द्या की फक्त यहोवाच एखाद्या व्यक्तीच्या परिस्थितीला पूर्णपणे समजू शकतो. यामुळे दुःखात असलेली व्यक्ती जे काही बोलते ते लक्ष देऊन ऐका. आणि ऐकण्यासोबतच तिचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानंतरच आपल्याला त्या बांधवाला खऱ्या अर्थाने दया दाखवणं शक्य होईल. दयेच्या भावनेमुळेच, आपण एखादी व्यक्ती ज्या समस्यांना तोंड देत आहे त्याबद्दल चुकीची माहिती पसरवणार नाही. इतरांच्या खासगी गोष्टी सर्वांना सांगणारा मंडळीसाठी उत्तेजन ठरत नाही, उलट यामुळे तो मंडळीत फूट पाडत असतो. (नीति. २०:१९; रोम. १४:१९) आणि दुःखात असलेल्या व्यक्तीला त्याच्या शब्दांमुळे आणखी त्रास होऊ शकतो. (इफिस. ४:३१, ३२) याऐवजी आपण बांधवांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर विचार केला पाहिजे आणि त्यांना संकटांचा सामना करण्यासाठी मदत केली पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०६ २१-२२ ¶८-९