वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. ७-१८
  • जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • शुक्रवार, १ जानेवारी
  • शनिवार, २ जानेवारी
  • रविवार, ३ जानेवारी
  • सोमवार, ४ जानेवारी
  • मंगळवार, ५ जानेवारी
  • बुधवार, ६ जानेवारी
  • गुरुवार, ७ जानेवारी
  • शुक्रवार, ८ जानेवारी
  • शनिवार, ९ जानेवारी
  • रविवार, १० जानेवारी
  • सोमवार, ११ जानेवारी
  • मंगळवार, १२ जानेवारी
  • बुधवार, १३ जानेवारी
  • गुरुवार, १४ जानेवारी
  • शुक्रवार, १५ जानेवारी
  • शनिवार, १६ जानेवारी
  • रविवार, १७ जानेवारी
  • सोमवार, १८ जानेवारी
  • मंगळवार, १९ जानेवारी
  • बुधवार, २० जानेवारी
  • गुरुवार, २१ जानेवारी
  • शुक्रवार, २२ जानेवारी
  • शनिवार, २३ जानेवारी
  • रविवार, २४ जानेवारी
  • सोमवार, २५ जानेवारी
  • मंगळवार, २६ जानेवारी
  • बुधवार, २७ जानेवारी
  • गुरुवार, २८ जानेवारी
  • शुक्रवार, २९ जानेवारी
  • शनिवार, ३० जानेवारी
  • रविवार, ३१ जानेवारी
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. ७-१८

जानेवारी

शुक्रवार, १ जानेवारी

जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.—मत्त. २८:१९.

देवाने त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांना सेवाकार्याची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी “चांगल्या प्रकारे पूर्ण” कशी करता येईल याबद्दल त्यांना शिकून घ्यायची इच्छा आहे. (२ तीम. ४:५) कारण कोणत्याही कामापेक्षा हे काम खूप महत्त्वाचं आणि निकडीचं आहे. आपली इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त वेळ सेवाकार्यात द्यावा, पण तसं करणं आपल्याला नेहमीच शक्य होत नाही. इतर काही गोष्टींमागेही आपला वेळ आणि शक्‍ती खर्च होऊ शकते. जसं की, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला बरेच तास काम करावं लागू शकतं. तसंच, कुटुंबातल्या इतर जबाबदाऱ्‍या, आजारपण, निराशा किंवा वाढत्या वयामुळे येणाऱ्‍या समस्या यांमुळे आपल्याला जीवनात बराच संघर्ष करावा लागू शकतो. आपल्या परिस्थितीमुळे यहोवाच्या सेवेत आपल्याला जास्त वेळ देता येत नसेल, तर आपण निराश होऊ नये. येशूला माहीत आहे की आपण सर्व जण सारख्याच प्रमाणात राज्याचं फळ देऊ शकत नाही. याचा अर्थ, आनंदाचा संदेश सांगण्यासाठी सगळे जण सारख्याच प्रमाणात वेळ आणि शक्‍ती खर्च करतीलच असं नाही. (मत्त. १३:२३) यहोवाच्या सेवेत आपण सर्वोत्तम देतो तेव्हा तो आपल्या मेहनतीला खूप मौल्यवान लेखतो.—इब्री ६:१०-१२. टेहळणी बुरूज१९.०४ २ ¶१-३

शनिवार, २ जानेवारी

[सैतान] खोटारडा आणि खोटेपणाचा बाप आहे.—योहा. ८:४४.

सैतानाच्या खोट्या शिकवणीमुळे यहोवाच्या नावावर कलंक लागला आहे. मृत जणांचा अग्नीत छळ होतो हेदेखील खोट्या शिकवणींपैकी एक आहे. यामुळे देवाचा अनादर होतो. तो कसा? देव प्रेम आहे आणि अशा खोट्या शिकवणीमुळे त्याचं व्यक्‍तिमत्त्व सैतानासारखं क्रूर आहे असं भासवलं जातं. (१ योहा. ४:८) हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं? आणि विचार करा यहोवाला कसं वाटत असेल? त्याला नक्कीच वाईट वाटत असेल, कारण तो सर्व प्रकारच्या क्रूरपणाचा द्वेष करतो. (यिर्म. १९:५) मृत्यूबद्दल असलेल्या खोट्या शिकवणींमुळे येशूच्या खंडणी बलिदानावरचा विश्‍वास कमी होतो. (मत्त. २०:२८) मानवांमध्ये अमर आत्मा नावाचा प्रकार आहे हे सैतान पसरवत असलेली आणखी एक खोटी गोष्ट आहे. जर हे खरं असतं, तर सर्व जण नेहमीसाठी जगले असते. आणि आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी ख्रिस्ताला त्याचं जीवन खंडणी म्हणून देण्याची गरजच पडली नसती. ख्रिस्ताने दिलेलं बलिदान हे त्याने मानवी कुटुंबासाठी दाखवलेल्या प्रेमाचा उत्कृष्ट पुरावा आहे. (योहा. ३:१६; १५:१३) जरा विचार करा, अशा शिकवणींमुळे जेव्हा खंडणीच्या मौल्यवान भेटीला कमी लेखलं जातं, तेव्हा यहोवाला आणि येशूला कसं वाटत असेल. टेहळणी बुरूज१९.०४ १४ ¶१; १६ ¶८-९

रविवार, ३ जानेवारी

“यहोवाचं मन कोणी जाणलं आहे, की त्याने त्याला काही शिकवावं?” पण आपण ख्रिस्ताचे मन जाणतो.—१ करिंथ. २:१६.

येशूच्या शिकवणी कुठे नमूद केल्या आहेत? येशूचे शब्द आणि कार्य यांबद्दल बरीचशी माहिती आपल्याला शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. तसंच, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमधल्या इतर पुस्तकांतूनही आपल्याला येशूची विचारसरणी समजते. कारण “ख्रिस्ताचे मन” बाळगणाऱ्‍या व्यक्‍तींनी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होऊन ती पुस्तकं लिहिली आहेत. येशूच्या शिकवणी जीवनातल्या सर्व बाबतीत फायदेकारक आहेत. त्यामुळे आपण घरात, कामावर, शाळेत किंवा मंडळीत असताना जे काही करतो ते ‘ख्रिस्ताच्या नियमाला’ अनुसरून असलं पाहिजे. (गलती. ६:२) आपण ख्रिस्ती ग्रीक शास्रवचनं वाचून आणि त्यांवर मनन करून या नियमाबद्दल शिकतो. देवाच्या शास्त्रवचनांत दिलेल्या सूचना, आज्ञा आणि तत्त्वं यांनुसार जगण्याद्वारे आपण या नियमाचं पालन करत असतो. येशूने जे काही शिकवलं त्याचा स्रोत यहोवा होता. यामुळे आपण ख्रिस्ताच्या नियमाचं पालन करतो तेव्हा खरंतर आपण आपला प्रेमळ पिता, यहोवा याच्या आज्ञांचं पालन करत असतो.—योहा. ८:२८. टेहळणी बुरूज१९.०५ ३ ¶६-७

सोमवार, ४ जानेवारी

दुष्ट व फसवी माणसे अधिकाधिक वाईट होतील.—२ तीम. ३:१३.

लोक सैतानाच्या इच्छेनुसार कार्य करतात हे पाहून आपल्याला खूप दुःख होतं. सैतान कोणते डावपेच वापरतो याबद्दल यहोवाला सर्वकाही माहीत आहे. आपल्याला सहन करावा लागणारा त्रास यहोवा समजतो, आणि तो आपल्याला सांत्वन देऊ शकतो. आपण सर्व खरंच आशीर्वादित लोक आहोत कारण “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव . . . आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो, अशा हेतूने, की देवाकडून मिळणाऱ्‍या या सांत्वनाद्वारे आपल्यालाही इतरांचे, कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत सांत्वन करता यावे.” (२ करिंथ. १:३, ४) काही आईवडील मुलांवर होत असलेल्या शोषणाकडे दुर्लक्ष करतात आणि अशा मुलांना सांत्वनाची गरज असू शकते. तसंच, ज्या मुलांचं जवळच्या लोकांनी शोषण केलं आहे अशांनाही सांत्वनाची गरज पडू शकते. स्तोत्रकर्ता दावीदला माहीत होतं की यहोवा हा सांत्वन देण्याच्या बाबतीत सर्वात भरवशालायक आहे. (स्तो. २७:१०) कुटुंबातील लोकांकडून ज्या मुलांना गैरवागणूक मिळते अशांसाठी यहोवा स्वतः पिता ठरेल याची दावीदला खातरी होती. यहोवा अशा मुलांना कशा प्रकारे सांत्वन देतो? आपल्या विश्‍वासू सेवकांचा उपयोग करून तो असं करतो. यहोवाची सेवा करणारे आपले बंधुभगिनी खरंतर आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य आहेत. उदाहरणार्थ, येशूने त्याच्यासोबत मिळून यहोवाची सेवा करणाऱ्‍या लोकांना त्याचे भाऊ, बहीण आणि आई असं संबोधलं.—मत्त. १२:४८-५०. टेहळणी बुरूज१९.०५ १५-१६ ¶८-९

मंगळवार, ५ जानेवारी

कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.—फिलिप्पै. १:१०.

सर्वात आधी आपण कोणतं साहित्य वाचलं पाहिजे? ते म्हणजे देवाचं वचन, बायबल. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण दररोज एक निश्‍चित वेळ देणं गरजेचं आहे. आता मंडळीच्या आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या बायबल वाचनाचे अध्याय कमी करण्यात आले आहेत. यामागचं कारण म्हणजे आपल्याला वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी जास्त वेळ मिळावा. आठवड्यासाठी दिलेले अध्याय फक्‍त वाचून काढणं हा आपला उद्देश नसला पाहिजे तर बायबलचा संदेश आपल्या हृदयापर्यंत पोहोचावा आणि आपलं यहोवासोबतचं नातं आणखी घनिष्ठ व्हावं हा असला पाहिजे. (स्तो. १९:१४) मंडळीत टेहळणी बुरूजचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला बायबल समजायला मदत होते. म्हणून मंडळीत अभ्यासादरम्यान लेखात दिलेल्या वचनांकडे लक्ष द्या; खासकरून अशा वचनांकडे जी वाचली जातील. वचनांत दिलेले मुख्य शब्द किंवा वाक्यांश, परिच्छेदात दिलेल्या मुख्य मुद्द्‌याला कसं स्पष्ट करतात त्याकडे लक्ष द्या. त्यासोबतच, वचनं वाचताना त्यांवर मनन करण्यासाठी वेळ द्या आणि ती आपल्या जीवनात कशा प्रकारे लागू करता येतील याचा विचार करा.—यहो. १:८. टेहळणी बुरूज१९.०५ २७ ¶५; २८ ¶९

बुधवार, ६ जानेवारी

ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेनुसार करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्‍न आहे.—योहा. ४:३४.

येशूने सेवाकार्याप्रती योग्य मनोवृत्ती बाळगण्याबाबतीत आपल्यासाठी सर्वोत्तम उदाहरण मांडलं आहे. देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगणं ही गोष्ट त्याच्या जीवनात सर्वात महत्त्वाची होती. जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याबद्दल कळावं म्हणून तो शेकडो किलोमीटर चालला. त्याने प्रत्येक संधीचा वापर करून घरोघरी आणि सार्वजनिक रीत्या लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगितलं. अशा प्रकारे, येशूने आपल्या जीवनात सेवाकार्याला प्रथमस्थानी ठेवलं. येशूचं अनुकरण करून आपण कधीही आणि कुठेही आनंदाचा संदेश सांगण्यासाठी तयार असलं पाहिजे. प्रचारकार्यासाठी आपण आपल्या सुखसोयींचा स्वेच्छेने त्याग करतो. (मार्क ६:३१-३४; १ पेत्र २:२१) काही जण मंडळीमध्ये खास पायनियर, नियमित पायनियर आणि सहायक पायनियर या नात्याने सेवा करतात. तसंच काही जण दुसरी भाषा शिकतात किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करतात. पण असं असलं तरी प्रचाराचं जास्त कार्य मंडळीतल्या प्रचारकांद्वारे केलं जातं. त्यांना जरी पायनियरिंग किंवा इतर ठिकाणी जाऊन सेवा करणं शक्य नसलं, तरी ते सेवाकार्यासाठी आपलं सर्वोत्तम देतात. आपण सेवा जास्त करत असू किंवा कमी, आपल्याला शक्य आहे तितकीच यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. टेहळणी बुरूज१९.०४ ४ ¶७-८

गुरुवार, ७ जानेवारी

हे परमेश्‍वरा, . . . माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.—स्तो. १९:१४.

स्वतःला विचारा: ‘माझ्या मनात काही प्रमाणात हेवा किंवा ईर्ष्या आहे का?’ (१ पेत्र २:१) ‘माझी पार्श्‍वभूमी, शिक्षण आणि आर्थिक स्थिती यांमुळे माझ्यात गर्वाची भावना आहे का?’ (नीति. १६:५) ‘ज्यांच्याजवळ माझ्यासारख्या गोष्टी नाहीत अशांना किंवा जे वेगळे वंशाचे आहेत त्यांना मी कमी लेखतो का?’ (याको. २:२-४) ‘सैतानाच्या जगातल्या गोष्टींकडे मी आकर्षित होतो का?’ (१ योहा. २:१५-१७) ‘अनैतिक आणि हिंसक मनोरंजनाकडे माझी ओढ आहे का?’ (स्तो. ९७:१०; १०१:३; आमो. ५:१५) या प्रश्‍नांवर विचार केल्याने आपल्याला कुठे सुधार करण्याची गरज आहे हे समजायला मदत होईल. आपल्या मित्रांचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव होत असतो. (नीति. १३:२०) कामावरचे किंवा शाळेतले सोबती आपल्याला देवासारखे विचार करायला शिकवणार नाहीत. पण ख्रिस्ती सभांमध्ये मात्र आपल्याला चांगले मित्र भेटू शकतात. सभा एक असं ठिकाण आहे, जिथे आपण “प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी” प्रवृत्त किंवा उत्साहित होतो.—इब्री १०:२४, २५, तळटीप. टेहळणी बुरूज१९.०६ १२ ¶१३-१४

शुक्रवार, ८ जानेवारी

अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.—नीति. १९:११.

यहोवाने मानवांची रचना केली तेव्हा त्यांच्यावर समस्या आणि तणाव यावा अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. यामुळे तीव्र स्वरूपाच्या तणावात असताना देवाच्या एखाद्या सेवकाने अविचारीपणे काही म्हटलं तर आपण त्यामागचं कारण समजून घेतलं पाहिजे. (ईयो. ६:२, ३) तो कदाचित यहोवाबद्दल किंवा आपल्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलेल. असं झालं तर लगेच त्याच्यावर रागावू नका किंवा त्याला दोष देऊ नका. तणावपूर्ण समस्यांचा सामना करत असलेल्या एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला कधीकधी बायबलमधून सल्ला देण्याची गरज पडू शकते. (गलती. ६:१) अशांना वडील कशा प्रकारे मदत करू शकतात? त्यांनी या बाबतीत अलीहूचं अनुकरण केलं पाहिजे. त्याने ईयोबचं खूप धीराने ऐकून घेतलं. (ईयो. ३३:६, ७) ईयोबचे विचार पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच अलीहूने त्याला सल्ला दिला. अलीहूचं अनुकरण करणारे वडीलही बंधुभगिनींचं लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. असं केल्यामुळे सल्ला देताना ते सहज रीत्या त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकतात. टेहळणी बुरूज१९.०६ २२-२३ ¶१०-११

शनिवार, ९ जानेवारी

[आपण] माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे.—प्रे. कार्ये ५:२९.

बंदी असलेल्या ठिकाणी आपण यहोवाची उपासना कशी करत राहू शकतो? शाखा कार्यालय मंडळीतल्या वडिलांना मार्गदर्शन आणि व्यावहारिक सल्ले देईल. जर शाखा कार्यालय मंडळीतल्या वडिलांना संपर्क करू शकलं नाही तर वडील तुम्हाला आणि मंडळीतल्या सर्वांना यहोवाची उपासना करत राहण्यासाठी मदत करतील. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशनांवर आधारित असेल. (मत्त. २८:१९, २०; इब्री १०:२४, २५) यहोवा आपल्या सेवकांना आध्यात्मिक रीतीने तृप्त करेल असं अभिवचन त्याने दिलं आहे. (यश. ६५:१३, १४; लूक १२:४२-४४) आपण खातरी बाळगू शकतो की आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी यहोवाची संघटना आपल्याला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पण त्यासोबतच आपणसुद्धा काहीतरी करू शकतो. तुमचं बायबल आणि इतर प्रकाशनं लपवून ठेवण्यासाठी एक चांगली जागा शोधून ठेवा. ही मौल्यवान प्रकाशनं अशा ठिकाणी ठेवू नका ज्यामुळे ती सहज कोणाच्याही हाती लागतील, मग ती छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असोत. प्रत्येकाला आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी व्यावहारिक पावलं उचलण्याची गरज आहे. टेहळणी बुरूज१९.०७ १० ¶१०-११

रविवार, १० जानेवारी

मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो, यासाठी की कसेही करून काहींचे तारण करावे.—१ करिंथ. ९:२२.

हजारो वर्षांपासून जगभरातले बहुतेक लोक कोणत्या न कोणत्या धर्माशी संबंधित आहेत. पण अलीकडच्या काही दशकांत एक मोठा बदल घडत असल्याचं दिसून आलं आहे. आज पुष्कळसे लोक धर्माला मानत नाहीत. इतकंच काय, तर काही देशांत बहुतेक लोकांचं असं म्हणणं आहे की ते कुठल्याच धर्माला मानत नाहीत. (मत्त. २४:१२) का? कारण काहींचं लक्ष कदाचित चैनबाजी किंवा जीवनातल्या चिंता यांवर केंद्रित आहे. (लूक ८:१४) काही आधी देवाला मानायचे पण ते आता नास्तिक बनले आहेत, तर इतर काही असे आहेत जे देवावर विश्‍वास करतात पण त्यांना वाटतं की धर्म आजच्या पिढीसाठी नाही, व्यावहारिक नाही आणि विज्ञान व तर्काला पटणारा नाही. जीवनाची सुरुवात आपोआप झाली आहे असं कदाचित त्यांना आपल्या मित्रांकडून, शिक्षकांकडून किंवा मिडियातल्या लोकांकडून ऐकायला मिळतं. पण देवावर विश्‍वास वाढेल अशा गोष्टी त्यांना क्वचितच ऐकायला मिळतात. आणखी काहींना अशा धार्मिक पुढाऱ्‍यांचा राग येतो ज्यांना पैशांचा व अधिकाराचा लोभ आहे. आणि काही देशांत सरकारी अधिकाऱ्‍यांनी धार्मिक गोष्टींवर प्रतिबंध घातले आहेत. टेहळणी बुरूज१९.०७ २० ¶१-२

सोमवार, ११ जानेवारी

खंबीर व स्थिर राहा; आणि प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा. कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे.—१ करिंथ. १५:५८.

आध्यात्मिक वाढीसाठी आपल्याला शारीरिक बळाची गरज नाही. खरंतर, ज्या लोकांची तब्येत वयामुळे किंवा इतर काही कारणांमुळे खालावली आहे, त्यांची आजही यहोवाच्या सेवेत आपलं सर्वोत्तम देण्याची प्रबळ इच्छा आहे. (२ करिंथ. ४:१६) आपण कदाचित यहोवाची सेवा खूप वर्षांपासून करत असू. पण आता तब्येत खालावत चालल्यामुळे आपल्याला पूर्वीसारखी सेवा करणं शक्य नसेल. जर असं असेल, तर निराश होऊ नका. तुम्ही विश्‍वासूपणे केलेली सेवा यहोवा विसरणार नाही आणि तो त्याची कदर करतो याबद्दल खातरी बाळगा. (इब्री ६:१०) तसंच, आपलं यहोवावर किती प्रेम आहे हे त्याची आपण किती प्रमाणात सेवा करतो यावरून नाही, तर आपली चांगली मनोवृत्ती आणि आपण घेत असलेली मेहनत यांवरून ठरतं. (कलस्सै. ३:२३) यहोवा आपल्या कमतरता जाणतो आणि आपण जितकं करू शकतो त्यापेक्षा जास्तीची अपेक्षा तो आपल्याकडून करत नाही.—मार्क १२:४३, ४४. टेहळणी बुरूज१९.०८ ३ ¶६; ५ ¶११-१२

मंगळवार, १२ जानेवारी

तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या, म्हणजे ते तुमची चांगली कार्ये पाहतील.—मत्त. ५:१६.

आपल्या सेवकांनी केलेल्या ‘चांगल्या कार्यांद्वारे’ यहोवा लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. (मत्त. ५:१४, १५; १ पेत्र २:१२) जर तुमचा विवाहसोबती सत्यात नसेल तर तो तुमच्या मंडळीतल्या भाऊबहिणींना भेटला आहे का? नसल्यास, त्याला तुमच्यासोबत सभांना येण्याचं आमंत्रण द्या. (१ करिंथ. १४:२४, २५) आपले नातेवाईक एक न्‌ एक दिवस आपल्यासोबत यहोवाची सेवा करतील अशी आशा आपण बाळगतो. पण आपण पुरेपूर प्रयत्न करूनही ते कदाचित सत्यात येणार नाहीत. मग, अशा वेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयासाठी आपण स्वतःला दोष देऊ नये. खरंतर, आपण कोणालाही सत्य स्वीकारण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. पण असं असलं तरी यहोवाची सेवा करत असल्यामुळे आपण किती आनंदी आहोत हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडू शकतो. म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्याशी विचारपूर्वक बोला आणि त्यांना मदत करण्याचं थांबवू नका. (प्रे. कार्ये २०:२०) यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल याची खातरी बाळगा. तुमच्या नातेवाइकांनी तुमचं ऐकण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं जीवन वाचेल! टेहळणी बुरूज१९.०८ १८-१९ ¶१५-१७

बुधवार, १३ जानेवारी

डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमची नजर एकाग्र असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.—मत्त. ६:२२.

येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? हाच की आपलं जीवन साधं ठेवणं किंवा लक्ष विचलित होऊ न देता एकाच ध्येयावर किंवा उद्देशावर लक्ष केंद्रित करणं. सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण मांडलं, आणि त्याने आपल्या शिष्यांना यहोवाच्या सेवेवर आणि त्याच्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिकवलं. येशूसारखंच आपणही आपल्या जीवनात सेवाकार्याला प्रथमस्थान देऊन “देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न” करतो. (मत्त. ६:३३) आपल्या सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक मार्ग म्हणजे कमी महत्त्वाच्या गोष्टींना जास्त वेळ न देणं. असं केल्यामुळे आपण इतरांना मदत करण्यात जास्त वेळ देऊ शकतो. यामुळे लोकांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, आठवड्यादरम्यान सेवाकार्यात जास्त वेळ देण्यासाठी आपण आपल्या नोकरीच्या वेळेत फेरबदल करू शकतो का? तसंच, मनोरंजन करण्यात आपला जास्त वेळ जात असेल तर आपण तो कमी करू शकतो का? टेहळणी बुरूज१९.०४ ५-६ ¶१२-१३

गुरुवार, १४ जानेवारी

मी उच्च व पवित्र स्थानी बसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्‍त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो.—यश. ५७:१५.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये, बऱ्‍याच वर्षांचा अनुभव असणाऱ्‍या भाऊबहिणींची नेमणूक बदलण्यात आली. बऱ्‍याच भाऊबहिणींना या बदलांशी जुळवून घेणं कठीण गेलं आहे. कारण त्यांना त्यांच्या कामामुळे खूप आनंद मिळायचा. अनेक भाऊबहिणींच्या बाबतीत पाहिलं तर बऱ्‍याच वर्षांपासून असलेली त्यांची नेमणूक त्यांना खूप आवडायची. काहींना बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेताना खूप दुःख झालं, पण कालांतराने त्यांनी बदलांशी जुळवून घेतलं. त्यांना असं का करता आलं? कारण त्यांचं यहोवावर सर्वात जास्त प्रेम आहे. त्यांना माहीत आहे की त्यांनी कोणत्याही कामाला, पदवीला किंवा नेमणुकीला नाही, तर यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे. (कलस्सै. ३:२३) ते नम्रपणे यहोवाची सेवा आनंदाने करण्यासाठी तयार आहेत, मग त्यांना कुठलीही नेमणूक मिळाली तरीही. ते “आपल्या सर्व चिंता” देवावर टाकून देतात, कारण त्यांना माहीत आहे की त्याला त्यांची काळजी आहे. (१ पेत्र ५:६, ७) आपण नम्रता हा सुंदर गुण विकसित करतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही याचा फायदा होतो. तसंच, आपल्याला जीवनातल्या समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करणंही शक्य होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ येतो. टेहळणी बुरूज१९.०९ ६-७ ¶१५-१७

शुक्रवार, १५ जानेवारी

परमेश्‍वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात . . . ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते.—स्तो. १९:८, ११.

यहोवाने दावीदला फक्‍त आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून नाही, तर संपूर्ण इस्राएल राष्ट्राचा प्रमुख म्हणून नेमलं होतं. एक राजा या नात्याने दावीदकडे मोठा अधिकार होता. काही वेळा त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि गंभीर अपराधही केले. (२ शमु. ११:१४, १५) पण त्याने यहोवाला अधीनता दाखवली. ती कशी? यहोवाने त्याला सुधारलं तेव्हा त्याने शिस्त स्वीकारली. त्याने प्रार्थनेत आपल्या मनातल्या सर्व भावना व्यक्‍त केल्या. (स्तो. ५१:१-४) त्यासोबतच तो नम्र होता. त्याने फक्‍त पुरुषांनी दिलेले सल्लेच नाही तर स्त्रियांनी दिलेले सल्लेही स्वीकारले. (१ शमु. १९:११, १२; २५:३२, ३३) दावीद आपल्या चुकांतून शिकला आणि यहोवाच्या सेवेला त्याने आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवलं. यहोवाच्या अधीन राहण्याचे कोणते फायदे आहेत ते त्याला माहीत होतं. यहोवाच्या अधीन राहणारे आणि त्याचा प्रेमळ सल्ला न ऐकणारे यांमधला फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आज यहोवाच्या अधीन राहणारे “हर्षित चित्ताने जयजयकार” करतात.—यश. ६५:१३, १४. टेहळणी बुरूज१९.०९ १७ ¶१५; १९ ¶२१

शनिवार, १६ जानेवारी

एक मोठा लोकसमुदाय, . . . राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा असलेला मला दिसला.—प्रकटी. ७:९.

१९३५ या वर्षी यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव झाली की मोठ्या लोकसमुदायाला खरोखर स्वर्गात “राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा” असण्याची गरज नाही. तर या समूहाच्या लोकांना लाक्षणिक अर्थाने तसं करावं लागणार होतं. मोठ्या लोकसमुदायाचे लोक पृथ्वीवर जगले तरी ते “राजासनासमोर” उभे राहू शकतात. हे ते कसं करू शकतात? यहोवा हाच सर्व विश्‍वाचा शासक आहे हे मान्य करण्याद्वारे आणि त्याचे आज्ञाधारक राहण्याद्वारे ते दाखवू शकतात की त्यांना त्याचा अधिकार मान्य आहे. (यश. ६६:१) ते येशूने दिलेल्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याद्वारेही “कोकऱ्‍यासमोर” उभं राहू शकतात. हे अगदी त्याच प्रकारे आहे, जसं मत्तय २५:३१, ३२ या वचनांत सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे की “सर्व राष्ट्रांना” ज्यात दुष्ट लोकांचाही समावेश होतो त्यांना येशूच्या वैभवी राजासनासमोर “जमवलं जाईल.” आणि हे स्पष्टच आहे, की सर्व राष्ट्रं ही स्वर्गात नसून पृथ्वीवर आहेत. ही सुधारित समज तर्कशुद्ध वाटते. यावरून आपल्याला समजायला मदत होते की बायबलमध्ये मोठ्या लोकसमुदायाला स्वर्गात नेलं जाईल असा उल्लेख का नाही. फक्‍त एकाच समूहाला स्वर्गात अनंतकाळाचं जीवन मिळेल असं अभिवचन त्यात दिलं आहे. तो म्हणजे येशूसोबत “राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य” करणारा १,४४,००० जणांनी मिळून बनलेला समूह.—प्रकटी. ५:१०. टेहळणी बुरूज१९.०९ २८ ¶९

रविवार, १७ जानेवारी

परमेश्‍वराचे सर्व भक्‍तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा.—स्तो. ३१:२३.

यहोवा आपल्या उपासकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी मोठ्या बाबेलशी पूर्णपणे संबंध तोडून टाकावा. पण इतकंच करणं पुरेसं नाही, तर आपण यहोवाची सेवा करत राहण्याचा दृढ निश्‍चयही केला पाहिजे. आपण कोणत्या दोन मार्गांनी ही सेवा करत राहू शकतो यावर आता आपण चर्चा करू या. पहिला मार्ग म्हणजे, यहोवाच्या नैतिक स्तरांना जडून राहणं. जगातली मूल्यं आणि स्तर आपण कधीच स्वीकारणार नाही. जसं की, कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेला आपण मान्यता देणार नाही किंवा समलैंगिक विवाह अथवा त्यांसारखी जीवनशैली योग्य आहे असा विचार आपण करणार नाही. (मत्त. १९:४, ५; रोम. १:२६, २७) दुसरा मार्ग म्हणजे, सहविश्‍वासू बांधवांसोबत एकत्र मिळून उपासना करत राहणं. जिथे कुठे आपल्याला शक्य होईल तिथे आपण एकत्र मिळून उपासना करत राहू. म्हणजे राज्य सभागृहात, गरज पडल्यास साक्षीदारांच्या घरांत किंवा लोकांच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी. पुढे परिस्थिती कशीही निर्माण झाली तरी आपण उपासना करण्यासाठी नियमितपणे एकत्र येण्याचं थांबवणार नाही. याउलट, “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त” करणं गरजेचं आहे.—इब्री १०:२४, २५. टेहळणी बुरूज१९.१० १६ ¶६-७

सोमवार, १८ जानेवारी

तू केवळ तुझा देव यहोवा याचीच उपासना कर.—मत्त. ४:१०.

आपण जीवनाचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे आणि मनोरंजनातून आपल्याला तो आनंद मिळू शकतो. खरंतर, देवाचं वचन सांगतं की “मनुष्याने खावे, प्यावे आणि आपल्या श्रमात आपल्या जिवाला सुख भोगू द्यावे यापेक्षा त्याला काही उत्तम नाही.” (उप. २:२४, पं.र.भा.) पण जगातल्या बहुतेक मनोरंजनाचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या मनोरंजनामुळे लोकांचे नैतिक स्तर ढासळत चालले आहेत. तसंच, यामुळे देवाचं वचन ज्या गोष्टींची निंदा करतं त्या गोष्टी फक्‍त चालवून घेण्याचंच नाही, तर त्यांवर प्रेम करण्याचाही बढावा मिळतो. आपल्याला फक्‍त यहोवाचीच उपासना करण्याची इच्छा आहे आणि यामुळे आपण “यहोवाच्या मेजावरून” आणि “दुरात्म्यांच्याही मेजावरून” जेवू शकत नाही. (१ करिंथ. १०:२१, २२) एखाद्यासोबत जेवणं हे सहसा त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीचं चिन्ह असतं. आपण हिंसा, भुताटकी, लैंगिक अनैतिकता किंवा इतर चुकीच्या इच्छांना व मनोवृत्तीला बढावा देणारं मनोरंजन निवडलं, तर एका अर्थी आपण देवाच्या शत्रूंनी तयार केलेलं जेवण त्यांच्यासोबत खात असू. यामुळे आपलं स्वतःचं नुकसान तर होतंच पण यहोवासोबत असलेली आपली मैत्रीही धोक्यात येते. टेहळणी बुरूज१९.१० २६ ¶२; २९-३० ¶११-१२

मंगळवार, १९ जानेवारी

माणसे देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने बोलली.—२ पेत्र १:२१.

नाव चालवणाऱ्‍या नाविकाला जर वाऱ्‍यापासून फायदा मिळवायचा असेल तर त्याने दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, त्याने आपली नाव वारा वाहतो त्या दिशेला फिरवायला हवी. नाव जर वारा वाहतो त्यापासून दूर बंदरावरच राहिली तर ती पुढे जाणार नाही. दुसरी गोष्ट, नाविकाने नावेचं शीड उभारून ते पूर्णपणे उघडलं पाहिजे ज्यामुळे वारा नावेला पुढे नेईल. त्याच प्रकारे, आपल्याला पवित्र आत्म्याची मदत असली तरच आपण यहोवाची सेवा करू शकू. तेव्हा पवित्र आत्म्याकडून आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर आपल्याला दोन पावलं उचलावी लागतील. पहिलं पाऊल म्हणजे, देवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना जे मार्गदर्शन देतो त्यानुसार कार्य करणं. दुसरं पाऊल म्हणजे, आपल्या नावेचं शीड उभारून त्याला ‘पूर्णपणे उघडण्याचा’ प्रयत्न करणं. याचाच अर्थ, देवाने आपल्याला जी कामं दिली आहेत ती जमेल तितक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. (स्तो. ११९:३२) आपण असं केलं तर पवित्र आत्मा आपल्याला विरोधाच्या आणि परीक्षांच्या लाटांशी झुंज देत पुढे जात राहायला आणि विश्‍वासू राहायला मदत करेल. टेहळणी बुरूज१९.११ ९ ¶८; १० ¶११

बुधवार, २० जानेवारी

मी माझी शांती तुम्हाला देतो.—योहा. १४:२७.

पृथ्वीवर येशूची शेवटची रात्र होती. लवकरच दुष्ट लोक त्याला क्रूरपणे ठार मारणार होते. पण येशूला फक्‍त आपल्या मृत्यूची चिंता नव्हती, तर त्यापेक्षाही एका जास्त महत्त्वाच्या गोष्टीची चिंता होती. त्याचं आपल्या पित्यावर खूप प्रेम होतं आणि त्याला आपल्या पित्याचं मन आनंदित करायचं होतं. त्याला माहीत होतं, की तो जर येणाऱ्‍या कठीण परीक्षेत विश्‍वासू राहिला तर यहोवाच्या नावाला लागलेला कलंक मिटवण्यात त्याचा हातभार असेल. येशूचं लोकांवरसुद्धा प्रेम होतं. तो आपल्या मृत्यूपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिला तरच मानवांना कायमस्वरूपी जगण्याची आशा मिळेल याचीही त्याला जाणीव होती. परिस्थिती जरी खूप तणावपूर्ण होती तरी येशूचं मन शांत होतं. येशूकडे “देवाची शांती” होती. यहोवासोबत असलेल्या घनिष्ठ नात्यामुळे अशी शांती मिळणं शक्य होतं. देवाच्या शांतीमुळे येशूचं मन स्थिर होतं आणि त्याला चिंतेपासून दूर राहायला मदत झाली. (फिलिप्पै. ४:६, ७) येशूने ज्या दबावांचा सामना केला त्या दबावांचा आपल्यापैकी कोणालाही सामना करावा लागणार नाही. पण येशूचे अनुयायी या नात्याने आपल्याला परीक्षांचा सामना नक्की करावा लागेल. (मत्त. १६:२४, २५; योहा. १५:२०) तसंच, येशूसारखं आपल्यालाही काही वेळा चिंतांचाही सामना करावा लागेल. टेहळणी बुरूज१९.०४ ८ ¶१-३

गुरुवार, २१ जानेवारी

पवित्र आत्म्याची आग विझवू नका.—१ थेस्सलनी. ५:१९.

आपण स्वतःला विचारलं पाहिजे की ‘यहोवाच्या संघटनेचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून कदर बाळगतो का?’ यहोवा आज त्याच्या लोकांना आशीर्वाद देत आहे याचा स्पष्ट पुरावा त्याने आपल्याला दिला आहे. यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण मनापासून त्याचे आभार मानले पाहिजेत. (१ थेस्सलनी. ५:१८) यहोवाच्या संघटनेला आपलं समर्थन आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आपली प्रकाशनं, सभा, संमेलनं आणि अधिवेशनांमधून आपल्याला जे बायबल आधारित मार्गदर्शन दिलं जातं, त्याचं पालन करण्याद्वारे आपण आपलं समर्थन दाखवू शकतो. यासोबतच, प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात होईल तितका सहभाग घेऊनही आपण संघटनेला आपलं समर्थन असल्याचं दाखवू शकतो. (१ करिंथ. १५:५८) आपण जे बलिदान अर्पण करतो, म्हणजे सेवेसाठी जे त्याग करतो ते यहोवाने स्वीकारावेत म्हणून आधी आपण त्याची पसंती मिळवू या. यहोवाबद्दल मनात कदर असल्यामुळे आपण त्याची सेवा करू या. त्याच्यावर मनापासून प्रेम असल्यामुळे आपण नेहमी आपलं सर्वोत्तम त्याला देत राहू या. तसंच, आपण यहोवाच्या संघटनेला पूर्ण मनाने समर्थन देऊ या कारण तो संघटनेला भरभरून आशीर्वाद देत आहे. या सर्व गोष्टी करण्याद्वारे आपण त्याला दाखवून देऊ शकतो की त्याचे साक्षीदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत. टेहळणी बुरूज१९.११ २५ ¶१७-१८

शुक्रवार, २२ जानेवारी

जो कोणी माझ्यावर विश्‍वास ठेवतो, तो . . . यांहूनही मोठी कार्यं करेल.—योहा. १४:१२.

येशूच्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता, की त्याचे अनुयायी त्याच्यासारखे चमत्कार करतील; तर आपले अनुयायी, आपण केलं त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात, जास्त लोकांना आणि जास्त काळासाठी प्रचार व शिकवण्याचं कार्य करतील असं त्याला म्हणायचं होतं. तुम्ही जर नोकरी करत असाल तर स्वतःला विचारा: ‘माझ्या कामावर लोक मला एक मेहनती व्यक्‍ती म्हणून ओळखतात का? मला दिलेलं काम मी वेळेवर आणि अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का?’ जर तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरं होकारार्थी देऊ शकला तर तुम्ही नक्कीच तुमच्या मालकाचा भरवसा मिळवला असेल. यामुळे तुमच्या कामावरच्या सोबत्यांनी आनंदाच्या संदेशाबद्दल आवड दाखवण्याचीही जास्त शक्यता असेल. प्रचार आणि शिकवण्याच्या कामाबाबतीत स्वतःला पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: ‘मी सेवाकार्यात मेहनत घेतो असं माझ्याबद्दल इतरांचं मत आहे का? मी पहिल्या भेटीसाठी चांगली तयारी करतो का? ज्यांनी संदेशात आवड दाखवली आहे त्यांना मी पुन्हा लवकरात लवकर भेटतो का? मी नियमितपणे सेवाकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये भाग घेतो का?’ जर तुम्ही या प्रश्‍नांची होकारार्थी उत्तरं देऊ शकला तर सेवाकार्यात तुम्हाला आनंद मिळेल. टेहळणी बुरूज१९.१२ ५ ¶१४-१५

शनिवार, २३ जानेवारी

तुमच्यापैकी प्रत्येक जण जसे स्वतःवर प्रेम करतो, तसेच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावे; त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.—इफिस. ५:३३.

एक जोडपं जेव्हा आपलं कुटुंब वाढवण्याचा विचार करतं तेव्हा त्यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रश्‍नांवर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. पहिला, त्यांना मुलं कधी व्हावीत असं त्यांना वाटतं? दुसरा, त्यांना किती मुलं हवी आहेत? या प्रश्‍नांवर एका जोडप्याने कधी चर्चा करणं योग्य राहील? आणि हे दोन मुद्दे इतके महत्त्वपूर्ण का आहेत? आपल्याला मुलं असली पाहिजेत की नाही या विषयावर बऱ्‍याच जोडप्यांनी लग्नाआधीच चर्चा केली आहे. पण तेव्हा चर्चा करणं का योग्य राहील? कारण या विषयावर दोघांचं एकमत असणं महत्त्वाचं आहे. तसंच, या जबाबदारीसाठी ती दोघं तयार आहेत का, यावरही त्यांना विचार करणं गरजेचं आहे. काही जोडप्यांनी असं ठरवलं की ते लग्नाच्या एक किंवा दोन वर्षांनंतरच पालक होण्याचा निर्णय घेतील. पण का? कारण एक विवाहित जोडपं म्हणून त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एकमेकांसोबत नातं मजबूत करण्यासाठी वेळ द्यायचा असतो. टेहळणी बुरूज१९.१२ २३ ¶४-५

रविवार, २४ जानेवारी

विपत्कालासाठी तो [मित्र] बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.—नीति. १७:१७.

आज जगभरातल्या बऱ्‍याच यहोवाच्या सेवकांना अतिशय दुःखी आणि निराश करणाऱ्‍या समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही ख्रिश्‍चनांना गंभीर आजारपण किंवा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर इतर काहींना त्यांच्या कुटुंबातली व्यक्‍ती किंवा जवळचा मित्र सत्य सोडून जाण्याचं दुःख आहे. काही असेही आहेत ज्यांना नैसर्गिक विपत्तीमुळे दुःख सहन करावं लागलं आहे. या सर्व भाऊबहिणींना सांत्वनाची गरज आहे. मग अशा वेळी आपण या भाऊबहिणींना कशा प्रकारे मदत करू शकतो? त्यांचे एकनिष्ठ मित्र बनण्याद्वारे. आपल्याला भाऊबहिणींना मदत करता यावी म्हणून एकनिष्ठ मित्र बरेचसे त्याग करतात. उदाहरणार्थ, पिटर नावाच्या बांधवाला समजलं की त्यांना एक असा आजार झाला आहे जो वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होईल. त्यांची पत्नी कॅथरीन म्हणते: “आमच्या मंडळीतल्या एका जोडप्याने आम्हाला डॉक्टरकडे नेलं होतं, तिथेच आम्हाला पीटरच्या या आजारपणाबद्दल कळलं. त्या जोडप्याने तेव्हाच ठरवलं की ते या कठीण परिस्थितीत आम्हाला एकटं सोडणार नाहीत. जेव्हापण आम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते आमच्यासोबत होते.” खरंच, परीक्षेच्या काळात खऱ्‍या मित्रांनी आपल्यासोबत असणं किती सांत्वन देणारं आहे! टेहळणी बुरूज२०.०१ ८ ¶१; ९ ¶५; १० ¶६

सोमवार, २५ जानेवारी

ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि . . . ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले.—प्रे. कार्ये २:४.

कल्पना करा, जर तुम्ही इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी वरच्या खोलीत जमलेल्या शिष्यांपैकी एक असता, तर पवित्र आत्म्याने तुम्हाला अभिषिक्‍त केलं आहे याबद्दल तुम्हाला जराही शंका नसती. (प्रे. कार्ये २:५-१२) पण प्रश्‍न असा येतो, की ज्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात येतं त्या सर्वांना अशाच आश्‍चर्यकारक पद्धतीने अभिषिक्‍त करण्यात येतं का? नाही. पहिल्या शतकात काही ख्रिश्‍चनांना कधी अभिषिक्‍त करण्यात आलं याचा विचार करा. त्या दिवशी फक्‍त १२० ख्रिश्‍चनांचाच नाही, तर इतरांचाही पवित्र आत्म्याने अभिषेक झाला. नंतर त्याच दिवशी जवळपास ३,००० लोकांना पवित्र आत्मा मिळाला आणि त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्यांना अभिषिक्‍त करण्यात आलं. (प्रे. कार्ये २:३७, ३८, ४१) पण याच्या काही वर्षांनंतर सर्वच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी अभिषिक्‍त करण्यात आलं नाही. शोमरोनी लोकांना तर त्यांच्या बाप्तिस्म्याच्या काही काळानंतर अभिषिक्‍त करण्यात आलं. (प्रे. कार्ये ८:१४-१७) आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कर्नेल्य आणि त्याच्या घराण्याला त्यांच्या बाप्तिस्म्याआधीच अभिषिक्‍त करण्यात आलं होतं.—प्रे. कार्ये १०:४४-४८. टेहळणी बुरूज२०.०१ २०-२१ ¶२-४

मंगळवार, २६ जानेवारी

मी त्यांना तुझं नाव प्रकट केलं आहे.—योहा. १७:२६.

शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांत येशूने जवळजवळ १६५ वेळा यहोवाचा उल्लेख ‘पिता’ म्हणून केला. पण असं का? याचं एक कारण म्हणजे लोकांना खातरी पटावी की यहोवा एक प्रेमळ पिता आहे. (योहा. १७:२५) यहोवा आपल्या मुलासोबत ज्या प्रकारे वागला त्यातून आपण काय शिकू शकतो हे आता आपण पाहू या. यहोवाने नेहमीच येशूची प्रार्थना ऐकली आणि त्याने ती फक्‍त ऐकली नाही तर तिचं उत्तरही दिलं. (योहा. ११:४१, ४२) येशूला जेव्हापण परीक्षेचा किंवा छळाचा सामना करावा लागला तेव्हा त्याला नेहमीच आपल्या पित्याच्या प्रेमाची आणि मदतीची जाणीव झाली. (लूक २२:४२, ४३) यहोवाने येशूला खातरी करून दिली की एक प्रेमळ पिता या नात्याने तो येशूला मदत करत आहे. (मत्त. २६:५३; योहा. ८:१६) यहोवाने येशूला छळाचा सामना करू दिला, पण त्यादरम्यान त्याने त्याला धीर धरण्यासाठी मदत केली. येशूला माहीत होतं की त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला तरी तो तात्पुरता असेल. (इब्री १२:२) यहोवाने येशूची प्रार्थना ऐकली, त्याच्या गरजा पूर्ण केल्या, त्याला प्रशिक्षण दिलं आणि त्याला मदत केली. असं करून त्याने दाखवून दिलं की त्याचं येशूवर प्रेम आहे.—योहा. ५:२०; ८:२८. टेहळणी बुरूज२०.०२ ३ ¶६-७, ९

बुधवार, २७ जानेवारी

जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. . . . अडखळण बनू नका.—१ करिंथ. १०:३१, ३२.

एखाद्या प्रथेत किंवा रितीरिवाजात भाग घेण्याआधी आपण हा विचार करणं गरजेचं आहे, की आपल्या निर्णयाचा इतरांवर आणि खासकरून सहविश्‍वासू बांधवांवर कसा प्रभाव पडेल. आपण कोणासाठीच अडखळण बनू नये! (मार्क ९:४२) तसंच, आपण साक्षीदार नसलेल्याचंही मन विनाकारण दुखवणार नाही. तर प्रेमामुळे प्रेरित होऊन आपण त्यांच्याशी आदाराने बोलू आणि यामुळे देवाचा गौरव होईल. आपण लोकांशी वाद घालणार नाही किंवा त्यांच्या प्रथांना नावं ठेवणार नाही. प्रेमात खूप बळ आहे हे नेहमी लक्षात असू द्या! आपण जेव्हा विचारपूर्वक आणि आदरपूर्वक वागतो तेव्हा आपल्या विरोधकांचा राग नाहीसा होण्याचीही शक्यता असते. तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात हे आपल्या नातेवाइकांना आणि शेजाऱ्‍यांना सांगा. (यश. ४३:१०) तुमच्या कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यावर तुम्ही विशिष्ट रितीरिवाजात भाग घेत नाही म्हणून तुमचे नातेवाईक आणि शेजारी कदाचित खूप चिडतील. पण तुम्ही यहोवाचे उपासक आहात हे जर तुम्ही त्यांना आधीच सांगितलं असेल तर अशी नाजूक परिस्थिती उद्‌भवल्यास ती हाताळणं सोपं जाईल. आपण सत्यासाठी जी ठाम भूमिका घेतो त्याची आपल्याला कधीही लाज वाटू नये.—रोम. १:१६. टेहळणी बुरूज१९.०४ १७-१८ ¶१४-१६

गुरुवार, २८ जानेवारी

प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे; इतकेच काय, तर प्रेषित म्हणवून घेण्याचीसुद्धा माझी लायकी नाही.—१ करिंथ. १५:९.

येशू जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हा त्याचे बारा प्रेषित सतत त्याच्यासोबत होते. पण प्रेषित पौल मात्र येशूच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती बनला. पौलला जरी पुढे ‘विदेश्‍यांसाठी प्रेषित’ म्हणून नेमण्यात आलं, तरी बारा प्रेषितांपैकी एक असण्याचा खास बहुमान त्याला मिळाला नाही. (रोम. ११:१३; प्रे. कार्ये १:२१-२६) त्या बारा प्रेषितांनी येशूसोबत जो वेळ घालवला त्याबद्दल त्यांचा हेवा करत बसण्यापेक्षा, पौल त्याच्याजवळ जे होतं त्यात समाधानी राहिला. आपण जर समाधानी आणि नम्र असलो तर आपण पौलसारखं असू. यहोवाने ज्यांना नेमणूक दिली त्यांचा पौलने जसा आदर केला तसा आपणही करू. (प्रे. कार्ये २१:२०-२६) यहोवाने ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेण्यासाठी वडिलांना नियुक्‍त केलं आहे. त्यांच्यात कमतरता आहेत तरी यहोवा त्यांना “माणसांच्या रूपात देणग्या” समजतो. (इफिस. ४:८, ११) या नियुक्‍त बांधवांचा आपण जेव्हा आदर करतो आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचं नम्रपणे पालन करतो, तेव्हा यहोवासोबतची आपली मैत्री घनिष्ठ होते. तसंच, आपल्या भाऊबहिणींसोबत आपल्याला शांतीने राहायला मदत होते. टेहळणी बुरूज२०.०२ १७ ¶१३-१४

शुक्रवार, २९ जानेवारी

आधी त्याने आपल्यावर प्रेम केले, म्हणून आपण प्रेम करतो.—१ योहा. ४:१९.

साक्षीदारांसोबत अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला बायबलबद्दल कदर वाटत असेल व येशूवरही तुमचं प्रेम असेल. आणि आता तुम्ही साक्षीदारांना ओळखत असल्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत असेल. पण या गोष्टींवरच्या प्रेमामुळे तुम्ही यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित व्हालच असं नाही. खरंतर यहोवावर असलेल्या प्रेमामुळे तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रेरित व्हाल. तुमचं त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम असेल तर कोणतीच गोष्ट किंवा व्यक्‍ती तुम्हाला त्याची सेवा करण्यापासून रोखू शकत नाही. यहोवावरचं प्रेम तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी आणि त्यानंतरही त्याला विश्‍वासू राहण्यासाठी मदत करेल. येशूने म्हटलं की आपण पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्‍तीने यहोवावर प्रेम केलं पाहिजे. (मार्क १२:३०) तुम्ही पूर्ण मनाने यहोवावर प्रेम करायला आणि त्याची कदर करायला कसं शिकू शकता? यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे यावर मनन केल्यामुळे आपणही त्याच्यावर प्रेम करायला लागतो. टेहळणी बुरूज२०.०३ ४ ¶४-५

शनिवार, ३० जानेवारी

आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर.—२ तीम. ४:५.

आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा काय अर्थ होतो? सोप्या शब्दांत सांगायचं, तर आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रचारात आणि शिकवण्याच्या कामात आपण जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे. पण या कार्यात फक्‍त वेळ देणं महत्त्वाचं नाही तर, आपण कोणत्या हेतूने यहोवाची सेवा करतो हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आपण यहोवावर आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम करत असल्यामुळे पूर्ण जिवाने सेवाकार्याचं काम करतो. (मार्क १२:३०, ३१; कलस्सै. ३:२३) पूर्ण जिवाने यहोवाची सेवा करणं म्हणजे स्वतःला झोकून देणं आणि त्याच्या सेवेसाठी आपल्या शक्‍तीचा व क्षमतांचा वापर करणं. आपण सेवाकार्य करण्याच्या बहुमानाची कदर करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न करतो. पण, आपण आपल्या परिस्थितीमुळे कदाचित प्रचाराच्या कार्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नसू. असं असलं, तरी हे कार्य करायला आपल्याला नक्कीच आवडतं. त्यामुळे, आनंदाचा संदेश लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपली कौशल्यं वाढवत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रचारकार्याला जीवनात जास्त महत्त्व देतो. टेहळणी बुरूज१९.०४ २ ¶३; ३ ¶४, ६

रविवार, ३१ जानेवारी

त्याच्यामध्ये सत्य नाही.—योहा. ८:४४.

सैतानाच्या खोट्या शिकवणींमुळे दुःख-त्रासात आणखी भर पडते. ज्या पालकांनी आपल्या मुलांना मृत्यूत गमावलं आहे त्यांना सांगितलं जातं, की देवाने तुमच्या मुलांना स्वर्गात राहायला बोलवलं आहे आणि ते देवदूत झाले आहेत. विचार करा, सैतानाच्या या खोट्या शिकवणीमुळे त्यांचं दुःख कमी होत असेल की आणखी वाढत असेल? तसंच, नरकाग्नीच्या शिकवणीचा आधार घेऊन क्रूरपणे छळ करण्यालाही योग्य ठरवण्यात आलं आहे. पूर्वी चर्चच्या शिकवणींचा विरोध करणाऱ्‍यांना स्तंभावर लटकवून जाळण्यात यायचं. “द स्पॅनीश इन्क्वीसीशन” यावर असलेल्या एका पुस्तकानुसार, खूप वर्षांआधी द स्पॅनीश इन्क्वीसीशन या न्यायालयाने कॅथलीक चर्चच्या विरोधात असलेल्यांचा खूप निष्ठुरपणे छळ केला. ज्या लोकांनी चर्चच्या शिकवणी स्वीकारल्या नाहीत अशांना या न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी जिवंतच जाळलं. त्यांच्या मते, लोकांनी आपल्या मृत्यूआधी पश्‍चात्ताप करणं गरजेचं आहे नाहीतर त्यांना कायमस्वरूपी नरकाग्नीत जळत राहावं लागेल. आजही बऱ्‍याचशा देशात लोकांकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी पूर्वजांची उपासना करावी. पूर्वजांकडून आशीर्वाद मिळवण्याच्या किंवा त्यांचा आदर करण्याच्या हेतूने ते असं करतात. इतर काही लोक मानतात की पूर्वजांना शांती मिळाली तर ते जिवंत लोकांना शिक्षा करणार नाहीत. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे सैतानाच्या खोट्या शिकवणीवर आधारलेल्या या गोष्टींमुळे खरं सांत्वन मिळत नाही. याउलट, विनाकारण नैराश्‍य येतं आणि इतकंच काय तर भीतीची भावनाही मनावर पगडा धरून बसते. टेहळणी बुरूज१९.०४ १४ ¶१; १६ ¶१०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा