धडा ११
बायबलचा पूर्ण फायदा कसा घ्याल?
एखादं मोठं काम सुरू करण्याआधी तुम्हाला थोडी भीती वाटते का? मग ते सोपं जावं म्हणून तुम्ही काय करता? तुम्ही ते एका दमात करण्याऐवजी थोडं थोडं करून पूर्ण करता. बायबल वाचायच्या बाबतीतही असंच आहे. कदाचित तुम्ही विचार करत असाल, की ‘नक्की सुरुवात कुठून करायची?’ तर या धड्यात, आपण काही साध्यासोप्या गोष्टी पाहणार आहोत, ज्यांमुळे तुम्हाला बायबल वाचायला आणि त्याचा अभ्यास करायला सोपं जाईल आणि ते आवडायलाही लागेल.
१. आपण दररोज बायबल का वाचलं पाहिजे?
आपण दररोज ‘यहोवाचं नियमशास्त्र’ म्हणजेच बायबल वाचलं, तर आपण जीवनात सुखी आणि यशस्वी होऊ. (स्तोत्र १:१-३ वाचा.) सुरुवातीला, दररोज फक्त पाच-दहा मिनिटं बायबल वाचायचा प्रयत्न करा. मग पुढे जसजसं तुम्ही बायबल वाचत जाल, तसतसं तुम्हाला ते आवडायला लागेल.
२. बायबल वाचताना जास्त फायदा होण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
यासाठी, वाचत असताना आपण थोडं थांबून विचार करू शकतो. कारण बायबलमधली माहिती वाचण्यासोबतच, तिच्यावर “मनन,” म्हणजेच विचार करणंही महत्त्वाचं आहे. (यहोशवा १:८) म्हणून वाचत असताना स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘या वचनांमधून मला यहोवा देवाबद्दल काय शिकायला मिळतं? मला दररोजच्या जीवनात याप्रमाणे कसं वागता येईल? आणि इतरांनाही मदत करण्यासाठी मला या वचनांचा उपयोग कसा करता येईल?’
३. बायबल वाचण्यासाठी तुम्हाला वेळ कसा काढता येईल?
बायबल वाचायला वेळ काढणं तुम्हाला कठीण जातं का? आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही समस्या आहे. म्हणून “वेळेचा चांगला उपयोग” करायचा प्रयत्न करा. (इफिसकर ५:१६) यासाठी, तुम्ही बायबल वाचायला दररोज काही वेळ बाजूला काढू शकता. काही जणांना सकाळीच बायबल वाचायला आवडतं. तर काही जण दुपारी, त्यांच्या जेवणाच्या सुट्टीत बायबल वाचतात. आणि इतर काही जण रात्री झोपायच्या आधी बायबल वाचतात. तुमच्यासाठी कोणती वेळ सगळ्यात चांगली राहील?
आणखी जाणून घेऊ या
बायबल वाचन मजेदार कसं बनवायचं हे शिकून घेऊ या. तसंच, बायबलच्या या अभ्यासाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी चांगली तयारी कशी करायची हेही पाहू या.
एखाद्या नवीन पदार्थासारखीच, आपण बायबल वाचायचीही आवड निर्माण करू शकतो
४. बायबल वाचायची आवड निर्माण करा
सुरुवातीला कदाचित तुम्हाला बायबल वाचावंसं वाटणार नाही. पण हळूहळू आपण त्यासाठी “तीव्र इच्छा उत्पन्न” करू शकतो. नवीन पदार्थ पहिल्यांदा खालल्यावर कदाचित आपल्याला आवडणार नाही. पण नंतर तो आवडू लागतो, त्यासारखंच हे आहे. १ पेत्र २:२ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
दररोज बायबल वाचल्यामुळे त्याची गोडी लागू शकते असं तुम्हाला वाटतं का?
काहींनी बायबल वाचायची आवड कशी निर्माण केली हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
व्हिडिओमधल्या तरुणांना आधी बायबल वाचणं कठीण का वाटायचं?
मग त्यांना नियमितपणे बायबल वाचत राहणं कशामुळे शक्य झालं?
बायबल वाचताना त्यांनी ते आणखी मजेदार कसं बनवलं?
बायबल वाचायला सुरुवात करताना:
आजच्या काळातली भाषा असलेलं, अचूक भाषांतर निवडा. नवे जग भाषांतर हे बायबल वाचून पाहा.
सगळ्यात आधी तुमच्या आवडीचे भाग वाचा. यांपैकी काही “बायबल वाचायला सुरुवात करा” या तक्त्यामध्ये सुचवलेले आहेत.
कुठपर्यंत वाचलं हे लिहून ठेवा. यासाठी याच पुस्तकातल्या “माझ्या बायबल वाचनाची प्रगती” या तक्त्याचा वापर करा.
JW लायब्ररी ॲप वापरा. याचा वापर करून तुम्ही कुठेही, फोन किंवा टॅबवर बायबल वाचू किंवा ऐकू शकता.
नवे जग भाषांतर यात दिलेल्या अतिरिक्त लेखांचा वापर करा. यांत नकाशे, तक्ते आणि एक शब्दार्थसूची आहे. यांमुळे बायबलमधली माहिती तुम्हाला आणखी स्पष्टपणे समजेल.
५. बायबल अभ्यासाची तयारी करा
स्तोत्र ११९:३४ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
बायबल वाचण्याआधी किंवा बायबल अभ्यासाची तयारी करण्याआधी प्रार्थना का केली पाहिजे?
प्रत्येक धडा चांगल्या प्रकारे समजावा म्हणून तुम्ही काय करू शकता? त्यासाठी, अभ्यासाची तयारी करताना हे करून पाहा:
१. प्रत्येक धड्याचा पहिला भाग वाचून काढा.
२. दिलेली वचनं बायबलमधून वाचा आणि धड्यातल्या माहितीशी त्यांचा काय संबंध आहे यावर विचार करा.
३. ज्या शब्दांत किंवा वाक्यांत प्रश्नाचं उत्तर आहे, त्यांखाली रेघ ओढा किंवा ती हायलाईट करा; यामुळे तुमच्या शिक्षकासोबत त्या धड्याची चर्चा करताना तुम्हाला सोपं जाईल.
तुम्हाला माहीत होतं का?
यहोवाच्या साक्षीदारांनी आजपर्यंत बायबलच्या बऱ्याच भाषांतरांचा वापर केलाय. पण, आम्ही पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर हे बायबल वापरणं पसंत करतो, कारण हे अचूक आणि समजायला सोपं आहे आणि यात देवाचं नाव वापरलंय.—“यहोवाच्या साक्षीदारांचं स्वतःचं बायबल आहे का?” हा वेबसाईटवरचा लेख पाहा.
काही जण म्हणतात: “बायबलचा अभ्यास म्हणजे मेहनतीचं कामए. माझ्याजवळ तितका वेळ आणि शक्ती नाहीए.”
तुम्ही त्यांना काय सांगाल?
थोडक्यात
बायबलचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ते वाचायला वेळ बाजूला काढा, ते समजून घेण्यासाठी प्रार्थना करा आणि बायबल अभ्यासाची आधीपासूनच तयारी करा.
उजळणी
बायबलचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
बायबल वाचायला आणि त्याचा अभ्यास करायला तुम्ही कधी वेळ काढू शकता?
बायबल अभ्यासाची आधीपासूनच तयारी केल्यामुळे काय फायदा होईल?
हेसुद्धा पाहा
बायबल वाचनाचा जास्त फायदा करून घेण्यासाठी काही सल्ले.
“बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवा” (टेहळणी बुरूज क्र. १ २०१७)
बायबल वाचायच्या तीन पद्धती जाणून घ्या.
“बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग १: सुरुवात अशी करा” (वेबसाईटवरचा लेख)
बायबल वाचन मजेशीर कसं बनवायचं हे जाणून घ्या.
“बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग २: बायबल वाचन मजेशीर बनवा” (वेबसाईटवरचा लेख)
पुष्कळ वर्षांपासून बायबल वाचणाऱ्यांकडून काही सल्ले घ्या.