धडा १०
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
तुम्ही कधी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेला आहात का? जर नसाल, तर तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील. कदाचित तुम्ही विचार कराल, ‘सभांमध्ये नेमकं काय होतं? तिथे जाणं इतकं महत्त्वाचं का आहे? तिथे गेल्यामुळे काय फायदा होईल?’ या धड्यात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तसंच हेही शिकायला मिळेल, की यहोवासोबतचं नातं घट्ट कसं करावं आणि यामुळे तुम्हाला काय फायदा होईल?
१. एकत्र येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतंय?
बायबलच्या एका लेखकाने ते कारण सांगितलं. तो म्हणाला, “मी सभांमध्ये यहोवाची स्तुती करीन.” (स्तोत्र २६:१२, तळटीप) आजसुद्धा यहोवाचे साक्षीदार आनंदाने एकत्र येऊन उपासना करतात. जगभरात, ते देवाची स्तुती करण्यासाठी, सोबत मिळून गीत गाण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी दर आठवडी एकत्र येतात. तसंच, वर्षातून काही वेळा ते मोठ्या सभाही आयोजित करतात.
२. सभांमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?
सभांमध्ये देवाच्या वचनातून शिकवलं जातं आणि त्यातली माहिती “चांगल्या प्रकारे समजावून” तिचा “अर्थ स्पष्ट” केला जातो. (नहेम्या ८:८ वाचा.) सभांमध्ये तुम्हाला यहोवाबद्दल आणि त्याच्या सुंदर गुणांबद्दल शिकायला मिळेल. त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे याबद्दल तुम्ही जसजसं जाणून घ्याल, तसतसं तुम्ही त्याच्या आणखी जवळ याल. तसंच, जीवनात खरं समाधान मिळवायला तो कशी मदत करू शकतो, हेही तुम्हाला समजेल.—यशया ४८:१७, १८.
३. सभांमध्ये दुसऱ्यांना भेटल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा होईल?
सभांना आल्यामुळे “एकमेकांचा विचार करून आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन” देऊ शकतो. म्हणून यहोवा सांगतो, की “आपण एकत्र येणं सोडू नये.” (इब्री लोकांना १०:२४, २५) सभांमध्ये तुम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे लोक भेटतील. त्यांनाही देवाबद्दल शिकून घ्यायची इच्छा आहे. त्यांच्याकडून तुम्हाला बायबलमधल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि प्रोत्साहन मिळेल. (रोमकर १:११, १२ वाचा.) तसंच, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोलता येईल. जीवनात समस्या असतानाही ते कशामुळे आनंदी राहतात, याबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता. सभांना आल्यामुळे असे बरेच फायदे होतात. आणि म्हणून यहोवाची इच्छा आहे, की आपण सभांमध्ये नियमितपणे एकत्र यावं.
आणखी जाणून घेऊ या
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये नेमकं काय होतं, आणि सभांना जायचा आपण होईल तितका प्रयत्न का केला पाहिजे, हे जाणून घेऊ या.
४. यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा
सुरुवातीचे ख्रिस्ती, यहोवाची उपासना करायला नियमितपणे एकत्र यायचे. (रोमकर १६:३-५) कलस्सैकर ३:१६ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
सुरुवातीचे ख्रिस्ती लोक यहोवाची उपासना कशी करायचे?
आज यहोवाचे साक्षीदारसुद्धा त्यांच्या राज्य सभागृहांमध्ये उपासनेसाठी दर आठवडी एकत्र येतात. त्यांच्या सभांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग राज्य सभागृहातल्या सभेचं चित्र पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
राज्य सभागृहांमध्ये जे होतं आणि कलस्सैकर ३:१६ मध्ये आपण जे वाचलं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला सारख्या वाटल्या?
व्हिडिओमध्ये किंवा या चित्रात तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी आवडल्या?
२ करिंथकर ९:७ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये कोणाकडूनही पैसे का मागितले जात नाहीत?
तुमचा बायबल अभ्यास घेणाऱ्यासोबत, या आठवड्याच्या सभांमध्ये कशावर चर्चा केली जाणार आहे ते पाहा.
यांपैकी तुम्हाला कोणता भाग सगळ्यात जास्त आवडला?
तुम्हाला माहीत होतं का?
जगभरात कधी आणि कुठे सभा होतात हे तुम्ही jw.org वर शोधू शकता.
१. सभांमध्ये भाषणं दिली जातात. प्रात्यक्षिकं आणि व्हिडिओही दाखवले जातात. सुरुवातीला आणि शेवटी गीत गाऊन प्रार्थना केली जाते
२. सभेच्या काही भागांत, हजर असलेल्यांनाही उत्तरं द्यायची संधी दिली जाते
३. सभेला कोणीही येऊ शकतं; स्त्री-पुरुष, तरुण, वयस्कर आणि लहान मुलंसुद्धा
४. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभांसाठी प्रवेश फी घेत नाहीत किंवा दानपात्र फिरवत नाहीत
५. सभांना जायला कदाचित तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल
येशूच्या कुटुंबाचा विचार करा. दरवर्षी यरुशलेममध्ये होणाऱ्या सणाला जाण्यासाठी, त्यांना जवळजवळ १०० किलोमीटर पायी चालावं लागायचं. नासरेथपासून यरुशलेमपर्यंतचा हा प्रवास त्यांना डोंगरदऱ्यांमधून करावा लागायचा. लूक २:३९-४२ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
तुम्हाला काय वाटतं, हा प्रवास सोपा असेल का?
सभांना जाण्यासाठी तुम्हालाही मेहनत का घ्यावी लागू शकते?
आपण ही मेहनत घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला असं का वाटतं?
बायबल सांगतं की उपासनेसाठी एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
आपण दर आठवडी सभांना का गेलं पाहिजे?
काही जण म्हणतात: “सभांमध्ये एकत्र यायची काय गरज? आपण एकेकटेपण देवाची भक्ती करू शकतो.”
यहोवाला याबद्दल काय वाटतं? बायबलमधल्या कोणत्या वचनावरून किंवा उदाहरणावरून हे दिसून येतं?
थोडक्यात
सभांना गेल्यामुळे तुम्हाला यहोवाबद्दल आणखी शिकता येईल, त्याच्यासोबतचं नातं घट्ट करता येईल आणि इतरांसोबत मिळून त्याची उपासना करता येईल.
उजळणी
आपण सभांना जावं असं यहोवा आपल्याला का सांगतो?
सभांमध्ये तुम्हाला कायकाय शिकायला मिळेल?
सभांना गेल्यामुळे आणखी काय फायदा होऊ शकतो?
हेसुद्धा पाहा
सभेला जाण्याबद्दल तुमच्या मनात थोडी भीती आहे का? असंच वाटणाऱ्या एका माणसाला सभा कशा आवडू लागल्या ते पाहा.
एका तरुणाला साक्षीदारांची सभा का आवडली आणि सभेला जात राहण्यासाठी त्याने काय केलं ते पाहा.
सभांना जाण्याबद्दल काही जणांना कसं वाटतं हे जाणून घ्या.
“मी राज्य सभागृहातल्या सभांना का गेलं पाहिजे?” (वेबसाईटवरचा लेख)
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेल्यामुळे एका गुंडाचं जीवन कसं बदललं ते जाणून घ्या.
“बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही!” (टेहळणी बुरूज, १ ऑक्टोबर, २०१४)