वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es20 पृ. १३२-१४५
  • नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर
  • शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०२०
  • उपशिर्षक
  • रविवार, १ नोव्हेंबर
  • सोमवार, २ नोव्हेंबर
  • मंगळवार, ३ नोव्हेंबर
  • बुधवार, ४ नोव्हेंबर
  • गुरुवार, ५ नोव्हेंबर
  • शुक्रवार, ६ नोव्हेंबर
  • शनिवार, ७ नोव्हेंबर
  • रविवार, ८ नोव्हेंबर
  • सोमवार, ९ नोव्हेंबर
  • मंगळवार, १० नोव्हेंबर
  • बुधवार, ११ नोव्हेंबर
  • गुरुवार, १२ नोव्हेंबर
  • शुक्रवार, १३ नोव्हेंबर
  • शनिवार, १४ नोव्हेंबर
  • रविवार, १५ नोव्हेंबर
  • सोमवार, १६ नोव्हेंबर
  • मंगळवार, १७ नोव्हेंबर
  • बुधवार, १८ नोव्हेंबर
  • गुरुवार, १९ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २० नोव्हेंबर
  • शनिवार, २१ नोव्हेंबर
  • रविवार, २२ नोव्हेंबर
  • सोमवार, २३ नोव्हेंबर
  • मंगळवार, २४ नोव्हेंबर
  • बुधवार, २५ नोव्हेंबर
  • गुरुवार, २६ नोव्हेंबर
  • शुक्रवार, २७ नोव्हेंबर
  • शनिवार, २८ नोव्हेंबर
  • रविवार, २९ नोव्हेंबर
  • सोमवार, ३० नोव्हेंबर
शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०२०
es20 पृ. १३२-१४५

नोव्हेंबर

रविवार, १ नोव्हेंबर

ही भाकर खाणारा सर्वकाळ जिवंत राहील.—योहा. ६:५८.

आदाम आणि हव्वा यांनी गमावलेल्या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाऊन मिळतील. तसंच, त्यांनी गमावलेलं सर्वकाळचं जीवनही आपल्याला मिळेल. आदाम आणि हव्वा यांना यहोवाबद्दल प्रेम नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी यहोवाची सेवा न करण्याचं निवडलं. असं असलं तरी यहोवाने त्यांना बरीच वर्षं जगू दिलं, मुलं होऊ दिली. तसंच, त्यांच्या मुलांसाठी स्तर ठरवण्याची अनुमतीही यहोवाने त्यांना दिली. आदाम आणि हव्वा यांनी यहोवाला सोडून स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला तो किती मूर्खपणाचा होता हे लवकरच दिसून आलं. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाने आपल्या निर्दोष भावाचा खून केला. हळूहळू हिंसा व स्वार्थीपणा मानवी कुटुंबावर राज्य करू लागलं. (उत्प. ४:८; ६:११-१३) पण यहोवाची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्‍या आदाम आणि हव्वाच्या मुलांसाठी त्याने एक तोडगा काढला. (योहा. ६:३८-४०, ५७) यहोवा किती प्रेमळ आहे आणि तो किती धीराने वागतो याबद्दल तुम्ही जितकं जास्त शिकत राहाल, तितकं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढत जाईल. असं केल्यामुळे आदाम आणि हव्वाने निवडलेला मार्ग तुम्ही नाकाराल आणि यहोवाला समर्पण करण्याची निवड कराल. टेहळणी बुरूज१९.०३ २ ¶३; ४ ¶९

सोमवार, २ नोव्हेंबर

[तुम्ही सर्व] एकमेकांशी वागताना सहानुभूती . . . दाखवा.—१ पेत्र ३:८.

आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि मंडळीतल्या बंधुभगिनींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्याद्वारे सहानुभूती दाखवा. मंडळीतल्या तरुणांची, आजारी असलेल्या बंधुभगिनींची, वृद्धांची आणि ज्यांनी आपल्या प्रिय जणांना मृत्यूत गमावलं आहे त्यांची काळजी असल्याचं दाखवा. त्यांची विचारपूस करा. ते जेव्हा त्यांच्या भावना व्यक्‍त करतात तेव्हा लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला त्यांच्या परिस्थितीची खरंच जाणीव आहे हे त्यांना दिसून आलं पाहिजे. तुमच्याकडून होता होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टी केल्याने दिसून येईल की आपलं त्यांच्यावर खरंच प्रेम आहे. (१ योहा. ३:१८) सर्वांना एकाच प्रकारे मदत करण्यापेक्षा प्रत्येकाची परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं का? कारण समस्येत असताना प्रत्येक जण सारख्याच पद्धतीने वागत नाही. काही जण त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. पण इतर काही जणांना आपल्या समस्यांबद्दल बोलायला आवडत नाही. त्यामुळे मदत करताना आपण अगदी खाजगी प्रश्‍न विचारण्याचं टाळलं पाहिजे. (१ थेस्सलनी. ४:११) आपल्याशी बोलताना इतर जण जेव्हा मन मोकळं करतात तेव्हा आपल्याला कदाचित असंही जाणवेल की आपले विचार त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. पण तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, त्या परिस्थितीत त्यांच्या तशा भावना आहेत. अशा वेळी आपण ऐकण्यासाठी उत्सुक आणि बोलण्यात संयमी असलं पाहिजे.—मत्त. ७:१; याको. १:१९. टेहळणी बुरूज१९.०३ १९ ¶१८-१९

मंगळवार, ३ नोव्हेंबर

मी फार भ्यालो.—नहे. २:२.

लोकांसमोर साक्ष देताना तुम्हाला भीती वाटते का? नहेम्याच्या उदाहरणाचा विचार करा. तो एका शक्‍तिशाली राजाच्या दरबारात काम करायचा. यरुशलेमची फाटकं आणि भिंती पडल्या आहेत हे ऐकून तो खूप दुःखी झाला. (नहे. १:१-४) त्याचा चेहरा का उतरलेला आहे हे राजाने विचारलं, तेव्हा त्याला किती भीती वाटली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? नहेम्याने पटकन प्रार्थना केली आणि मग राजाला उत्तर दिलं. यावर राजाने म्हटलं की तो देवाच्या लोकांची मदत करेल. (नहे. २:१-८) आता जरा योनाचा विचार करा. यहोवाने त्याला निनवेच्या लोकांना त्याचा संदेश सांगण्याची कामगिरी सोपवली, तेव्हा योना इतका घाबरला की तो उलट दिशेला पळून गेला. (योना १:१-३) पण यहोवाच्या मदतीने योना आपली नेमणूक पूर्ण करू शकला. योनाच्या शब्दांमुळे निनवेच्या लोकांना खूप मदत झाली. (योना ३:५-१०) नहेम्याच्या उदाहरणावरून आपण शिकतो की उत्तर देण्याआधी प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच, योनाकडून आपण शिकतो की आपली भीती कितीही मोठी असली तरी यहोवा आपल्याला तिच्यावर मात करायला मदत करेल. टेहळणी बुरूज१९.०१ ११ ¶१२

बुधवार, ४ नोव्हेंबर

माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी ज्यांनी घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलंबाळं . . . यांचा त्याग केला आहे, त्यांपैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात . . . शंभरपटीने घरंदारं, बहीणभाऊ, आईवडील, मुलंबाळं . . . आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.—मार्क १०:२९, ३०.

बायबलमधून शिकलेल्या गोष्टी आपण लागू करू लागतो तेव्हा आपल्या मित्रांसोबतच्या आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम होऊ शकतो. येशूने आपल्या शिष्यांसाठी जी प्रार्थना केली त्याच्या शब्दांवरून आपल्याला याचं कारण समजतं. त्याने म्हटलं: “सत्याद्वारे त्यांना पवित्र कर, तुझं वचन सत्य आहे.” (योहा. १७:१७; तळटीप) “पवित्र” करण्याचा अर्थ “वेगळं” करणं असा होतो. आपण जीवनात सत्य लागू करू लागतो तेव्हा आपण बायबलमध्ये दिलेले स्तर पाळू लागतो. आपण आपल्या मित्रांसोबत, नातेवाइकांसोबत चांगले संबंध टिकवून ठेवण्याचा होईल तितका प्रयत्न करतो. पण सत्य शिकल्यामुळे आपल्याप्रती त्यांच्या भावना बदलू शकतात आणि काही जण तर आपला विरोधही करू शकतात. या गोष्टीचं आपण आश्‍चर्य करू नये, कारण येशूने म्हटलं होतं: “खरोखर, मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे शत्रू होतील.” (मत्त. १०:३६) पण येशूने आपल्याला वचन दिलं आहे की आपण सत्यासाठी जितके त्याग करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आशीर्वाद आपल्याला मिळतील. टेहळणी बुरूज१८.११ ६ ¶११

गुरुवार, ५ नोव्हेंबर

विदेशी लोकांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे आभार मानतात.—रोम. १६:४.

प्रेषित पौलने बंधुभगिनींबद्दल असलेली कदर आपल्या शब्दांद्वारे व्यक्‍त केली. त्याच्या वैयक्‍तिक प्रार्थनेत त्याने त्यांच्याबद्दल देवाचे आभार मानले. तसंच, त्याने जेव्हा त्यांना पत्र पाठवलं तेव्हाही त्याने कृतज्ञता व्यक्‍त केली. रोमकर १६व्या अध्यायाच्या पहिल्या १५ वचनांत, पौलने २७ सहविश्‍वासू जणांचा नावाने उल्लेख केला आहे. पौलने प्रिस्का आणि अक्विल्ला यांबद्दल म्हटलं, की त्यांनी त्याच्यासाठी “स्वतःचा जीव धोक्यात घातला.” तसंच, फीबी हिच्याबद्दल म्हटलं की ती “पुष्कळांच्या आणि माझ्यासुद्धा मदतीला धावून आली.” प्रेमळ बंधुभगिनींनी घेतलेल्या मेहनतीबद्दल पौलने त्यांची प्रशंसा केली. (रोम. १६:१-१५) पौलला माहीत होतं की त्याचे बंधुभगिनी अपरिपूर्ण आहेत. पण त्याने त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्याची निवड केली. मंडळीत जेव्हा मोठ्याने पौलचं पत्र वाचण्यात आलं तेव्हा कल्पना करा की त्या बंधुभगिनींना ते ऐकून किती प्रोत्साहन मिळालं असेल! यामुळे पौल आणि त्या बंधुभगिनींमध्ये असलेलं मैत्रीचं नातं नक्कीच आणखी घनिष्ठ झालं असेल. तुमच्या मंडळीतले बंधुभगिनी आपल्या शब्दांद्वारे आणि कार्यांद्वारे ज्या चांगल्या गोष्टी करतात त्याबद्दल तुम्ही नियमितपणे कदर व्यक्‍त करता का? टेहळणी बुरूज१९.०२ १६ ¶८-९

शुक्रवार, ६ नोव्हेंबर

माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.—ईयो. २७:५.

खरेपणा बाळगण्यासाठी आपण परिपूर्ण असलं पाहिजे असा याचा अर्थ होतो का? आपल्यात खूप दोष आहेत आणि आपल्या हातून बऱ्‍याच चुका होतात असं आपल्याला वाटू शकतं. पण खरेपणा बाळगण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही. यहोवा आपल्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करत नाही. बायबल सांगतं: “हे परमेश्‍वरा, तू अधर्म लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) आपण अपरिपूर्ण, पापी मानव आहोत हे त्याला माहीत आहे आणि तो आपल्याला उदार मनाने क्षमा करतो. (स्तो. ८६:५) यासोबतच, यहोवा आपल्या मर्यादा जाणतो आणि आपण जितकं करू शकतो त्यापलीकडे तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१२-१४) यहोवाच्या सेवकांसाठी प्रेम ही खरेपणाची गुरुकिल्ली आहे. देवासाठी असलेलं आपलं प्रेम आणि स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्यासाठी असलेली आपली एकनिष्ठ भक्‍ती ही संपूर्ण आणि निर्दोष असायला हवी. परीक्षेतही जेव्हा हे प्रेम बदलत नाही, अटळ राहतं तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने म्हणू शकतो की आपल्यात खरेपणा आहे. (१ इति. २८:९; मत्त. २२:३७) यहोवाचे स्तर नीतिमान आहेत हे आपल्याला माहीत आहे. तसंच, स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याचं मन आनंदित करण्यावर आपलं लक्ष केंद्रित आहे. आपलं यहोवावर प्रेम असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी आपण त्याचा विचार करतो. असं करण्याद्वारे आपण आपला खरेपणा दाखवत असतो. टेहळणी बुरूज१९.०२ ३ ¶४-५

शनिवार, ७ नोव्हेंबर

आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.—नीति. ४:२३.

योग्य त्या गोष्टी करण्याचे कोणते फायदे होतात हे प्रत्येक वेळी जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. (याको. १:२, ३) आपण आपल्या वागण्याद्वारे यहोवाचं मन आनंदित केलं आहे, यामुळे त्याला आपल्याबद्दल अभिमान वाटतो व तो आपल्याला त्याच्या मुलांपैकी एक समजतो. आणि यामुळे आपल्याला आनंद होतो व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आपला निर्धार आणखी मजबूत होतो. (नीति. २७:११) प्रत्येक परीक्षा ही आपल्यासाठी एक संधी आहे, कारण अशा वेळी आपण दाखवतो की आपण आपल्या प्रेमळ पित्याची सेवा वरवर किंवा अर्ध्या मनाने करत नाही. (स्तो. ११९:११३) याउलट, आपण दाखवून देतो की आपण यहोवावर पूर्ण हृदयाने प्रेम करतो. त्याची आज्ञा पाळण्याचा आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा आपला पक्का निर्धार आहे. (१ राजे ८:६१) आपल्या हातून चुका होतील का? हो, कारण आपण अपरिपूर्ण आहोत. जर तुम्ही अडखळलात तर हिज्कीया राजाचं उदाहरण लक्षात ठेवा. त्याच्या हातून चुका झाल्या, पण त्याने पश्‍चात्ताप केला आणि तो “सात्विक मनाने” किंवा पूर्ण हृदयाने चालला. (यश. ३८:३-६; २ इति. २९:१, २; ३२:२५, २६) तेव्हा, आपली विचारसरणी भ्रष्ट करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांना आपण नाकारू या. आणि आपलं हृदय आज्ञाधारक बनण्यासाठी आणि यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आपण प्रार्थनाही करू या.—१ राजे ३:९; स्तो. १३९:२३, २४. टेहळणी बुरूज१९.०१ १८-१९ ¶१७-१८

रविवार, ८ नोव्हेंबर

तर मग, आपण येशूच्या द्वारे नेहमी देवाला स्तुतीचे बलिदान, म्हणजेच त्याच्या नावाची जाहीर रीत्या घोषणा करणाऱ्‍या आपल्या ओठांचे फळ अर्पण करू या.—इब्री १३:१५.

सभांमध्ये उत्तर दिल्यामुळे आपल्याला फायदा होतो. (यश. ४८:१७) ते कसं? पहिला फायदा म्हणजे, जर आपण एखादं उत्तर देण्याचं ठरवलं असेल, तर खासकरून आपल्याला सभेची चांगली तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळते. चांगली तयारी केल्यामुळे देवाच्या वचनांची आपल्याला सखोल समज मिळते. जितकी जास्त आपली समज सखोल असेल, तितकं जास्त आपण शिकलेल्या गोष्टी चांगल्या रीतीने लागू करू. दुसरा म्हणजे, आपण चर्चेत सहभाग घेतो तेव्हा आपल्याला सभांमध्ये जास्त आनंद होऊ शकतो. तिसरा म्हणजे, उत्तरासाठी मेहनत घेतल्यामुळे तो मुद्दा आपल्याला सहसा सभेनंतरही बऱ्‍याच काळापर्यंत लक्षात राहतो. विश्‍वास उत्तरांद्वारे व्यक्‍त केल्याने यहोवाला आनंद होतो. आपण पक्की खात्री बाळगू शकतो की मेहनत घेऊन सभेत दिलेली उत्तरं यहोवा ऐकतो आणि त्यांना मौल्यवान लेखतो. (मला. ३:१६) त्याचं मन आनंदित करण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देऊन कदर व्यक्‍त करतो. (मला. ३:१०) यावरून स्पष्टच आहे की आपल्याकडे सभेत उत्तरं देण्याची बरीच चांगली कारणं आहेत. टेहळणी बुरूज१९.०१ ८ ¶३; ९-१० ¶७-९

सोमवार, ९ नोव्हेंबर

वाइटाचा द्वेष करा आणि चांगल्याला जडून राहा.—रोम. १२:९.

यहोवा आपल्याशी ज्या प्रकारे वागतो त्यावरून आपल्याला त्याची सुज्ञता दिसून येते. अनेक नियम देण्याऐवजी त्याने आपल्याला एकच नियम, म्हणजे प्रेमाचा नियम दिला आहे. तो नियम कसा पाळावा याबद्दल तो अगदी धीराने आपल्याला शिकवतो. तो आपल्याला त्याच्या तत्त्वांचं पालन करायला आणि वाइटाचा द्वेष करायला शिकवतो. डोंगरावरील प्रवचनात त्याच्या पुत्राने, येशूने आपल्याला समजायला मदत केली की लोक वाईट गोष्टी का करतात. (मत्त. ५:२७, २८) तसंच, नवीन जगातही देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू आपल्याला शिकवत राहील. यामुळे बरोबर काय व चूक काय यांबद्दल त्याच्या दृष्टिकोनाचं आपण हुबेहूब अनुकरण करू शकू. (इब्री १:९) येशू आपल्याला शारीरिक आणि मानसिक रीत्याही परिपूर्ण बनवेल. कल्पना करा, त्या वेळी वाईट गोष्टी करण्याचा आपल्याला मोह होणार नाही आणि अपरिपूर्णतेमुळे होणारं दुःख आपल्याला सहन करावं लागणार नाही! मग शेवटी यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे आपण ‘गौरवी स्वातंत्र्याचा’ आनंद लुटू. (रोम. ८:२१) पण नवीन जगात आपल्या स्वातंत्र्याला सीमा असेल. म्हणून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, की देवाचं अनुकरण केल्यानेच आपण खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतो.—१ योहा. ४:७, ८. टेहळणी बुरूज१८.१२ २३ ¶१९-२०

मंगळवार, १० नोव्हेंबर

त्याने सूटपत्र लिहून . . . तिला घराबाहेर काढावे.—अनु. २४:१.

“अनुचित वागणूक” यामध्ये कोणत्या गोष्टी सामील आहेत हे नियमशास्त्रात सांगण्यात आलं नव्हतं. पण हे नक्कीच क्षुल्लक चुकांना सूचित करत नसून, खूप लाजिरवाण्या वागणुकीला किंवा एखाद्या गंभीर पापाला सूचित करत असावं. (अनु. २३:१४) पण दुःखाची गोष्ट म्हणजे येशूच्या काळापर्यंत बरेच यहुदी लोक “कोणत्याही कारणाने आपल्या पत्नीला घटस्फोट” देत होते. (मत्त. १९:३) अशा प्रकारची मनोवृत्ती आपण कधीही बाळगू नये. संदेष्टा मलाखीच्या दिवसांत घटस्फोट देणं खूप सर्वसामान्य झालं होतं. बरेच पुरुष खोट्या देवांची उपासना करणाऱ्‍या तरुण स्त्रियांशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट देत होते. पण त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं हे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्याने म्हटलं: “मला सूटपत्राचा [घटस्फोटाचा, NW] तिटकारा आहे.” (मला. २:१४-१६) विवाहाबद्दल यहोवाने सृष्टीच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की पुरुष “आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्प. २:२४) आणि मलाखीच्या दिवसांतही यहोवाचा दृष्टिकोन बदलला नव्हता. येशूने यहोवाच्या दृष्टिकोनाला दुजोरा देत असं म्हटलं: “देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.”—मत्त. १९:६. टेहळणी बुरूज१८.१२ ११ ¶७-८

बुधवार, ११ नोव्हेंबर

पीक तर भरपूर आहे, पण कामकरी थोडे आहेत.—मत्त. ९:३७.

काही बंधुभगिनींची परिस्थिती अनुकूल आहे आणि ते दूर जाऊन सेवा करू शकतात. अशांची मनोवृत्ती यशया संदेष्ट्यासारखी आहे. जेव्हा यहोवाने विचारलं: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा तो म्हणाला: “हा मी आहे, मला पाठव.” (यश. ६:८) यहोवाच्या संघटनेला मदत करण्याची तुमची इच्छा आहे का? तसं करण्यासाठी तुमची परिस्थिती अनुकूल आहे का? येशूने प्रचारकार्य आणि शिष्य बनवण्याच्या कार्याबद्दल म्हटलं: “म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करण्यासाठी कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.” (मत्त. ९:३८) जिथे प्रचारकांची जास्त गरज आहे तिथे तुम्ही पायनियर म्हणून सेवा करू शकता का? किंवा इतर कोणी असं करायला तयार असेल तर त्यांना तुम्ही मदत करू शकता का? अनेक बंधुभगिनींना वाटतं की देवासाठी आणि शेजाऱ्‍यांसाठी प्रेम दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन पायनियरींग करणं. तुम्ही आणखी कोणत्या मार्गाने सेवा वाढवू शकता? आपली सेवा वाढवल्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. टेहळणी बुरूज१८.०८ २७ ¶१४-१५

गुरुवार, १२ नोव्हेंबर

आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा.—इब्री १३:५.

येशूच्या जन्माबद्दलच्या अहवालावरून यहोवाचा भौतिक गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन स्पष्टपणे कळून येतो. योसेफ आणि मरीया हे श्रीमंत नव्हते, पण तरीदेखील स्वतः यहोवा देवाने येशूचे आईवडील बनण्यासाठी त्यांची निवड केली. (लेवी. १२:८; लूक २:२४) येशूचा जन्म झाला तेव्हा मरीयाने त्याला “गव्हाणीत ठेवले, कारण मुक्काम करण्यासाठी त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.” (लूक २:७) यहोवाची इच्छा असती तर येशूचा जन्म एका चांगल्या ठिकाणी होऊ शकला असता. पण त्याची इच्छा होती की येशूचा जन्म अशा कुटुंबात व्हावा जिथे देवाच्या उपासनेला पहिलं स्थान दिलं जातं. ही गोष्ट यहोवासाठी सर्वात महत्त्वाची होती. येशूच्या जन्माच्या अहवालावरून आपल्याला यहोवाचा भौतिक गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन कळतो. काही आईवडिलांना वाटतं की त्यांच्या मुलांना सर्वात चांगल्या भौतिक गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मग असं करण्यात मुलांचा यहोवासोबतचा नातेसंबंध कमकुवत झाला तरी त्यांना काही हरकत नसते. पण यहोवासाठी त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध हा सर्वात मोलाचा आहे. या बाबतीत तुम्ही यहोवासारखा विचार करता का? तुमच्या कार्यांवरून काय दिसून येतं? टेहळणी बुरूज१८.११ २४ ¶७-८

शुक्रवार, १३ नोव्हेंबर

ज्या लोकांचा देव परमेश्‍वर आहे ते धन्य!—स्तो. १४४:१५.

यहोवा हा आनंदाचा स्रोत असल्यामुळे त्याची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं आणि यासाठी तो आपल्याला बऱ्‍याच गोष्टी पुरवतो. (अनु. १२:७; उप. ३:१२, १३) पण आजच्या जगात नेहमी आनंदी राहणं सोपं नाही. असं का म्हणता येईल? आपण जीवनात कठीण प्रसंगांचा सामना करतो तेव्हा आनंदी राहणं कठीण जाऊ शकतं. जसं की, जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, कुटुंबातील एखाद्याला बहिष्कृत केलं जातं, किंवा मग घटस्फोट होतो तेव्हा. तसंच जेव्हा नोकरी जाते किंवा घरात सारखा वाद होत असल्यामुळे शांती टिकून राहात नाही तेव्हाही आनंदी राहणं सोपं नाही. कामावरचे सोबती किंवा वर्गसोबती आपली टिंगल करतात किंवा यहोवाची सेवा करत असल्यामुळे आपला छळ होतो आणि आपल्याला तुरुंगात टाकलं जातं तेव्हाही आनंदी राहणं सोपं नाही. आपली तब्येत खालावू शकते, आपल्याला एखादा जीवघेणा आजार होऊ शकतो, किंवा आपल्याला नैराश्‍य येऊ शकतं. या सर्व परिस्थितींत आपला आनंद टिकवून ठेवणं मुळीच सोपं नाही. पण नेहमी लक्षात असू द्या की आनंदी आणि “एकमेव सामर्थ्यशाली अधिपती” येशू ख्रिस्त याला लोकांचं सांत्वन करायला आणि त्यांना आनंद द्यायला मनापासून आवडायचं. (१ तीम. ६:१५; मत्त. ११:२८-३०) डोंगरावरील उपदेशात येशूने अशा काही गुणांचा उल्लेख केला ज्यांमुळे आपण आनंदी बनू शकतो. या गुणांमुळे आपल्याला सैतानाच्या दुष्ट जगात अनेक समस्यांचा सामना करत असतानाही आनंद टिकवून ठेवायला मदत मिळेल. टेहळणी बुरूज१८.०९ १७-१८ ¶१-३

शनिवार, १४ नोव्हेंबर

मृतांकरिता आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा क्षौर करून घेऊ नका.—अनु. १४:१.

आपल्या सर्वांना कराव्या लागणाऱ्‍या कठीण बदलांपैकी एक म्हणजे यहोवाला न आवडणाऱ्‍या प्रथा सोडून देणं. (नीति. २३:२३) यहोवाला याबद्दल काय वाटतं हे जाणल्यावरही काहींना त्या प्रथा सोडून देणं कठीण जातं. कुटुंबातले सदस्य, कामावरचे लोक किंवा मित्र आपल्याबद्दल काय विचार करतील याची त्यांना भीती असते. त्यांना माहीत असतं की काही प्रथांबद्दल इतरांच्या मनात खूप आदर असतो, जसं की मृत लोकांसाठी पाळल्या जाणाऱ्‍या प्रथा. मग योग्य ते बदल करण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करेल? प्राचीन काळातील काही लोकांनी सत्य शिकल्यावर बदल केले. आपण त्यांच्या चांगल्या उदाहरणांपासून शिकू शकतो. इफिसमध्ये जादूटोणा करणारे काही लोक ख्रिस्ती बनले तेव्हा त्यांनी काय केलं? बायबल सांगतं: “[त्यांनी] आपली पुस्तके जमा करून सर्वांसमोर जाळून टाकली. हिशोब केल्यावर, त्यांची किंमत पन्‍नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी असल्याचे दिसून आले.” (प्रे. कार्ये १९:१९, २०) ते विश्‍वासू ख्रिस्ती आपली मौल्यवान पुस्तकं नष्ट करायला तयार होते आणि यहोवाने त्यांच्या या त्यागासाठी त्यांना खूप आशीर्वाद दिले. टेहळणी बुरूज१८.११ ७ ¶१५-१६

रविवार, १५ नोव्हेंबर

सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपआपल्या ठिकाणी राहिले.—यहो. ५:८.

इस्राएली लोकांनी यार्देन नदी ओलांडल्यानंतर यहोशवाला हातात तलवार असलेला एक माणूस त्याला भेटला. तो देवाच्या लोकांच्या वतीने लढायला तयार असणारा “परमेश्‍वराचा सेनापती” होता. (यहो. ५:१३-१५) यरीहो शहर जिंकण्यासाठी नक्की काय करण्याची गरज आहे याबद्दल त्या स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं. स्वर्गदूताने सुरुवातीला दिलेल्या काही सूचना कदाचित वेगळ्या वाटल्या असतील. उदाहरणार्थ, स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं की सर्व सैनिकांची सुंता केली जावी. याचा अर्थ आता त्यांना काही दिवस लढणं शक्य होणार नव्हतं. (उत्प. ३४:२४, २५; यहो. ५:२) कदाचित त्या सैनिकांना वाटलं असेल, की ‘शत्रूंनी जर आमच्या छावणीवर हल्ला केला तर आम्ही आमच्या कुटुंबाचं कसं रक्षण करणार?’ पण काहीतरी अनपेक्षित घडलं! इस्राएली लोकांवर हल्ला करण्याऐवजी यरीहोची माणसं त्यांना घाबरू लागली. बायबल म्हणतं: “इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.” (यहो. ६:१) या बातमीमुळे, देवाच्या मार्गदर्शनावर इस्राएली लोकांचा भरवसा नक्कीच वाढला असावा! टेहळणी बुरूज१८.१० २३ ¶५-७

सोमवार, १६ नोव्हेंबर

तुम्ही हे सर्व का करत आहात? आम्हीही तुमच्यासारख्याच दुर्बलता असलेली माणसं आहोत.—प्रे. कार्ये १४:१५.

आपण नम्र आहोत हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे पौलसारखं नेहमी नम्र बनून राहणं. यहोवा त्याची सेवा करण्यासाठी पुरवत असलेल्या मदतीमुळे आपण स्वतःला श्रेष्ठ समजू नये. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘माझ्या प्रचाराच्या क्षेत्रात असलेल्या लोकांबद्दल मला काय वाटतं? समाजातल्या काही विशिष्ट लोकांबद्दल माझ्या मनात भेदभावाची भावना आहे का?’ जगभरात यहोवाचे साक्षीदार भेदभाव न करता, जो कोणी आनंदाच्या संदेशाबद्दल आस्था दाखवतो त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. काही साक्षीदार, अशा लोकांची भाषा किंवा त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धती शिकण्याचाही प्रयत्न करतात ज्यांना समाजात कमी लेखलं जातं. पण ते कधीच असा विचार करत नाही की आपण ज्यांना प्रचार करत आहोत त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. याउलट, जास्तीत जास्त लोकांना राज्याचा संदेश स्वीकारण्यासाठी मदत व्हावी म्हणून ते प्रत्येक व्यक्‍तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. टेहळणी बुरूज१८.०९ ५ ¶९, ११

मंगळवार, १७ नोव्हेंबर

मग . . . गालीलचा यहूदादेखील उठला होता आणि त्यानेही काही माणसांना आपल्यामागे ओढले.—प्रे. कार्ये ५:३७.

रोमी लोकांनी यहूदाला मृत्यूदंड दिला. पण बरेच यहुदी लोक मात्र येणाऱ्‍या मसीहाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना वाटलं की हा मसीहा रोमी लोकांपासून त्यांची सुटका करेल आणि इस्राएलला पुन्हा एक महान राष्ट्र बनवेल. (लूक २:३८; ३:१५) बऱ्‍याच लोकांना वाटलं की मसीहा इस्राएलमध्ये त्याचं राज्य स्थापित करेल. आणि जर असं झालं तर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे सर्व यहुदी लोक इस्राएलला परत येतील. एकदा बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहाननेही येशूला विचारलं होतं: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्‍याची वाट पाहावी?” (मत्त. ११:२,३) योहानला वाटलं असेल की यहुदी लोकांना सोडवणारा कदाचित हा नाही. पुनरुत्थान झाल्यानंतर येशू अम्माऊसला जाणाऱ्‍या रस्त्यावर आपल्या दोन शिष्यांना भेटला. त्याच्याशी बोलताना त्यांनी त्याला सांगितलं की येशू इस्राएल राष्ट्राची सुटका करेल असं त्यांना वाटलं होतं. (लूक २४:२१) या घटनेच्या काही काळातच येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं: “प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची पुनःस्थापना करणार आहेस का?”—प्रे. कार्ये १:६. टेहळणी बुरूज१८.०६ ४ ¶३-४

बुधवार, १८ नोव्हेंबर

भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो.—नीति. १४:१५.

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आपण जेव्हा इतरांकडून काही ऐकतो, खासकरून तेव्हा सावध असणं गरजेचं आहे. आपल्या शत्रूला, सैतानाला बायबलमध्ये “बांधवांवर दोष” लावणारा असं म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. १२:१०) येशूने आपल्याला आधीच सांगितलं आहे की विरोधक आपल्यावर “सर्व प्रकारचे खोटे आरोप” लावतील. (मत्त. ५:११) आपण जर येशूचे शब्द नेहमी लक्षात ठेवले तर आपण साक्षीदारांबद्दल काही विचित्र गोष्टी ऐकून गोंधळून जाणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांना मेसेज, ई-मेल पाठवायला नक्कीच आवडत असेल. तुम्ही एखादी रोचक बातमी पाहता किंवा एखादा चांगला अनुभव ऐकता, तेव्हा तुम्हाला एखाद्या पत्रकारासारखं लगेच ती माहिती इतरांना सांगाविशी वाटते का? अशी माहिती इतरांना मेसेज, ई-मेल यांद्वारे पाठवण्याआधी स्वतःला विचारा: ‘मी खात्रीने म्हणू शकतो का, की ही माहिती खरी आहे? याबद्दल माझ्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?’ तुमच्याजवळ जर संपूर्ण माहिती नसेल, तर कदाचित तुमच्या हातून खोटी माहिती पसरवली जाऊ शकते. म्हणून एखादा अनुभव किंवा माहिती भरवशालायक आहे की नाही, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मग ती इतरांना पाठवू नका. ती लगेच डिलिट करा! टेहळणी बुरूज१८.०८ ३ ¶३; ४ ¶६-७

गुरुवार, १९ नोव्हेंबर

“इतरांना देत राहा म्हणजे तेही तुम्हाला देतील.—लूक ६:३८.

येशूची इच्छा आहे की आपण उदार असावं कारण त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपण उदारता दाखवली तर इतर लोकांनाही उदार बनण्यास प्रोत्साहन मिळेल. हे खरं आहे की सर्वच लोक त्याबद्दल कदर दाखवत नाहीत. पण नेहमी उदारता दाखवत राहा, लोक त्याबद्दल कदर दाखवत नसले तरीही. कारण उदारतेच्या एका कृत्यामुळे एखाद्याच्या मनावर कसा परिणाम होईल हे आपण सांगू शकत नाही. मनापासून उदार असलेले लोक इतरांकडून परतफेडीची कधीच अपेक्षा करत नाही. येशूने म्हटलं: “तू मेजवानी देशील तेव्हा जे गरीब, लंगडेलुळे व आंधळे आहेत त्यांना आमंत्रण दे. म्हणजे तू आनंदी होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नाही.” (लूक १४:१३, १४) बायबल आपल्याला हेदेखील सांगतं: “ज्याची दृष्टि उदार त्याचे कल्याण होते,” आणि “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य!” (नीति. २२:९; स्तो. ४१:१) आपल्याला इतरांना मदत करायची इच्छा आहे म्हणून आपण नेहमी उदार असलं पाहिजे. टेहळणी बुरूज१८.०८ २१-२२ ¶१५-१६

शुक्रवार, २० नोव्हेंबर

तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.—नीति. ३:५, ६.

आज भरवशालायक माहिती मिळवणं आणि तिला अचूकपणे पडताळणं खूप कठीण झालं आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण आपल्या अपरिपूर्णतेमुळे हे करणं शक्य होत नाही. तसंच, आज उपलब्ध असलेली बहुतेक माहिती अपूर्ण असते किंवा ती पूर्णपणे खरी नसते. पण आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? यासाठी बायबलमध्ये तत्त्वं दिली आहेत. उदाहरणार्थ, एक तत्त्व असं म्हणतं की संपूर्ण माहिती ऐकून घेण्याआधी उत्तर देणं मूर्खपणाचं आहे. (नीति. १८:१३) आणखी एका तत्त्वामुळे आपल्याला समजतं की आपण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर भरवसा ठेवण्याऐवजी, ती खरी आहे का हे आधी पडताळून पाहणं गरजेचं आहे. (नीति. १४:१५) तसंच, जरी अनेक वर्षं आपण यहोवाची सेवा करत असलो तरी आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचं टाळलं पाहिजे. बायबलच्या तत्त्वांमुळे आपण भरवशालायक माहितीचा उपयोग करून योग्य निष्कर्षावर पोचलो आणि सुज्ञ निर्णय घेतले तर आपलं संरक्षण होईल. टेहळणी बुरूज१८.०८ ७ ¶१९

शनिवार, २१ नोव्हेंबर

मग, आपल्याला आध्यात्मिक जीवन देणाऱ्‍या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिले पाहिजे?—इब्री १२:९.

आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो तेव्हा सर्वांना कळतं की आपण यहोवाचे आहोत आणि त्याच्या आज्ञेत राहण्याची आपली इच्छा आहे. येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळीही असंच काहीतरी केलं. त्या वेळी तो जणू म्हणत होता: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.” (स्तो. ४०:७, ८) येशूने जेव्हा बाप्तिस्मा घेतला तेव्हा यहोवाला कसं वाटलं? बायबल म्हणतं: “बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा! आकाश उघडले व देवाचा आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरताना योहानला दिसला. आणि त्याच वेळी स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: ‘हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्त. ३:१६, १७) येशू आधीपासून यहोवाचा होता. पण जेव्हा यहोवाने पाहिलं की फक्‍त त्याची सेवा करण्यासाठी येशू आपल्या जीवनाचा उपयोग करणार आहे, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. आपणही जेव्हा आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो आणि यासाठी तो आपल्याला नक्की आशीर्वाद देईल.—स्तो. १४९:४. टेहळणी बुरूज१८.०७ २३ ¶४-५

रविवार, २२ नोव्हेंबर

तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय?—गण. २०:१०.

मोशेने जेव्हा “आम्ही” असं म्हटलं तेव्हा तो त्यात स्वतःचा आणि अहरोनचा समावेश करत होता. असं बोलण्याद्वारे त्याने यहोवाचा अनादर केला. यहोवाने नाही तर त्याने हा चमत्कार केला आहे असं मोशेने दर्शवलं. स्तोत्र १०६:३२, ३३ मध्ये म्हटलं आहे: “मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले; कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले.” (गण. २७:१४) जो आदर यहोवाला द्यायचा होता तो मोशेने दिला नाही. यहोवाने मोशे आणि अहरोनला म्हटलं की तुम्ही “माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.” (गण. २०:२४) यहोवाच्या नजरेत ही खूप गंभीर चूक होती. याआधी यहोवाने एका संपूर्ण पिढीला वचनयुक्‍त देशात जाऊ दिलं नाही कारण त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं होतं. (गण. १४:२६-३०, ३४) यामुळे जेव्हा मोशेने यहोवाविरुद्ध बंड केलं तेव्हा त्यालाही त्याच प्रकारे शिक्षा देणं हे रास्त आणि योग्य होतं. यहोवाने मोशेलाही वचनयुक्‍त देशात जाऊ दिलं नाही. टेहळणी बुरूज१८.०७ १४ ¶९, १२; १५ ¶१३

सोमवार, २३ नोव्हेंबर

मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझ्या भावाला अडखळण होईल असे काहीही न करणे हेच चांगले.—रोम. १४:२१.

आपल्याला मद्य पिण्याची सूट असली तरी त्यामुळे जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाच्या विवेकाला ठेच लागणार असेल तर मद्याचा त्याग करायला आपण तयार असलं पाहिजे. कदाचित त्या ख्रिस्ती बांधवाला सत्य शिकण्याआधी दारूचं व्यसन असावं आणि ती पूर्णपणे सोडून देण्याचा त्याने निर्धार केला असावा. आपण असं काहीही करणार नाही ज्यामुळे सोडलेल्या सवयीच्या पुन्हा आहारी जाण्यासाठी त्याला उत्तेजन मिळेल. (१ करिंथ. ६:९, १०) अशा बांधवाला आपण घरी जेवायला बोलवलं व त्याने पिण्यासाठी नकार दिला, तरीही आपण त्याला आग्रह करणार का? नक्कीच नाही! सुंता केल्यामुळे वेदना होतील हे माहीत असूनही तीमथ्य त्यासाठी तयार झाला. कारण तो ज्या यहुदी लोकांना प्रचार करणार होता त्यांच्यासाठी सुंता करणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला माहीत होतं. पौलसारखंच तीमथ्यलासुद्धा कोणाचंही मन दुखवायचं नव्हतं. (प्रे. कार्ये १६:३; १ करिंथ. ९:१९-२३) इतरांना मदत व्हावी म्हणून स्वतःच्या इच्छांचा त्याग करायला तुम्हीदेखील तयार आहात का? टेहळणी बुरूज१८.०६ १८-१९ ¶१२-१३

मंगळवार, २४ नोव्हेंबर

मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन.—सफ. ३:९.

सत्यात नसलेल्या एखाद्या व्यक्‍तीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल केवढी माहिती असते? तिचं नाव, ती कशी दिसते यापलीकडे कदाचित तिच्याबद्दल तुम्हाला फार कमी माहिती असेल. पण सत्यात असलेल्या व्यक्‍तीबद्दल असं नसतं. अशा व्यक्‍तीला भेटल्यावर तुम्हाला माहीत असतं की तिचं यहोवावर प्रेम आहे. तसंच, यहोवाने तिच्यात काहीतरी चांगलं पाहिलं आणि त्याच्या उपासकांच्या कुटुंबात तिला सामील केलं हेदेखील तुम्हाला माहीत असतं. (योहा. ६:४४) ती व्यक्‍ती वेगळ्या पार्श्‍वभूमीची, देशाची किंवा संस्कृतीची असली तरी तुम्हाला तिच्याबद्दल आणि तिला तुमच्याबद्दल बरंच काही माहीत असतं! तुम्ही जेव्हा एका साक्षीदाराला भेटता तेव्हा तुमच्यात समान असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आधीच माहीत असते. तुम्ही दोघं जरी वेगवेगळ्या भाषा बोलत असलात, तरी तुम्ही सत्याची एकच “शुद्ध वाणी” बोलत असता. याचा अर्थ, तुम्ही दोघंही देवावर विश्‍वास ठेवता, समान नैतिक स्तरांनुसार जगता आणि भविष्यासाठी तुमच्या समान आशा असतात. या गोष्टींमुळे तुम्हाला एकमेकांवर भरवसा ठेवायला आणि कायम टिकणारी घनिष्ठ मैत्री जोडायला मदत होते. टेहळणी बुरूज१८.१२ २१ ¶९-१०

बुधवार, २५ नोव्हेंबर

जोपर्यंत . . . तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.—प्रे. कार्ये १५:१.

ख्रिस्ताच्या निर्देशनानुसार नियमन मंडळाने हे स्पष्ट केलं की गैरयहुदी ख्रिश्‍चनांना सुंता करण्याची गरज नाही. (प्रे. कार्ये १५:१९, २०) तरी अनेक वर्षांनंतर बरेच यहुदी ख्रिश्‍चन त्यांच्या मुलांची सुंता करत होते. असं असलं तरी आपल्या मनात कदाचित असा प्रश्‍न येईल, की येशूच्या मृत्यूनंतर मोशेचं नियमशास्त्र रद्द झालं, तरीही येशूने सुंतेविषयीचा हा मुद्दा इतक्या वर्षांपर्यंत का राहू दिला? (कलस्सै. २:१३, १४) एखादी नवीन समज आल्यावर तिच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागू शकतो. काही यहुदी ख्रिश्‍चनांना हे स्वीकारायला वेळ लागणार होता की ते आता मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. (योहा. १६:१२) कारण त्यांना अजूनही वाटायचं की सुंता करणं, हे देवासोबत असलेल्या एका खास नातेसंबंधाचं चिन्ह आहे. (उत्प. १७:९-१२) तर काहींना अशी भीती होती, की सुंता न केल्यामुळे यहुदी समाज त्यांचा छळ करेल. (गलती. ६:१२) पण काही काळानंतर येशूने त्यांना पौलच्या पत्रांद्वारे आणखीन सूचना दिल्या.—रोम. २:२८, २९; गलती. ३:२३-२५. टेहळणी बुरूज१८.१० २४-२५ ¶१०-१२

गुरुवार, २६ नोव्हेंबर

कयफानेच यहूद्यांना असा सल्ला दिला होता, की एका मनुष्याने सर्व लोकांसाठी मरावे यातच त्यांचे भले आहे.—योहा. १८:१४.

कयफाने रात्र होऊ दिली आणि मग येशूला अटक करण्यासाठी सैनिकांना पाठवलं. पण त्यांनी रचलेल्या कटाबद्दल येशूला आधीपासूनच माहीत होतं. यामुळे आपल्या प्रेषितांसोबत शेवटचं भोजन झाल्यानंतर त्याने त्यांना सोबत तलवार घ्यायला सांगितली. शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी त्याने त्यांना दोन तलवारी सोबत ठेवायला सांगितल्या. (लूक २२:३६-३८) नंतर त्या रात्री येशूला अटक करण्यासाठी एक जमाव आला. येशूवर होणारा अन्याय पाहून पेत्र इतका चिडला की त्याने तलवार काढून एकावर हल्ला केला. (योहा. १८:१०) पण येशूने पेत्रला म्हटलं: “आपली तलवार जागच्या जागी ठेव, कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.” (मत्त. २६:५२, ५३) आपल्या शिष्यांनी या जगाचा भाग बनू नये ही गोष्ट येशूने किती प्रभावीपणे त्यांना शिकवली! ही घटना घडण्याआधी त्या रात्री येशूने याबद्दलच प्रार्थना केली होती. (योहा. १७:१६) फक्‍त यहोवा देवालाच अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार आहे. पण आपण मात्र नेहमी एकतेने आणि शांतीने राहतो. हे जग विभागलेलं आहे, पण आपल्यात ऐक्य आहे हे पाहून यहोवाला खूप आनंद होत असेल.—सफ. ३:१७. टेहळणी बुरूज१८.०६ ७ ¶१३-१४, १६

शुक्रवार, २७ नोव्हेंबर

अजगर स्त्रीवर संतापला आणि तिच्या संततीपैकी जे उरले आहेत, . . . त्यांच्यासोबत युद्ध करायला निघून गेला.—प्रकटी. १२:१७.

आपण यहोवाला एकनिष्ठ राहू नये म्हणून सैतान आपल्याला त्रास देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, तो कदाचित सरकारला आपल्या प्रचार कार्यावर बंदी घालायला लावेल. तसंच, आपण बायबलच्या स्तरांनुसार जगतो म्हणून तो कामावरच्या सोबत्यांना किंवा वर्गसोबत्यांना आपली थट्टा करायला लावेल. (१ पेत्र ४:४) आपले अविश्‍वासू नातेवाईकही सैतानाच्या प्रभावाखाली येऊ शकतात. त्यांचे हेतू चांगले असावेत; पण ते आपल्याला सभेला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील. (मत्त. १०:३६) सैतानाच्या अशा प्रकारच्या विरोधाचा आपण खंबीरपणे सामना कसा करू शकतो? सैतान आपल्यावर अशा प्रकारचे हल्ले करेल याचं आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. कारण त्याचं युद्ध आपल्याशी आहे. (प्रकटी. २:१०) शिवाय, जो मुख्य वादविषय आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणजे, आपल्याला सोयीस्कर असतं तेव्हाच आपण यहोवाची सेवा करू आणि परिस्थिती कठीण झाली की आपण देवाला नाकारू हा सैतानाचा दावा. (ईयो. १:९-११; २:४, ५) त्यासोबतच, आपल्याला बळ देण्यासाठी आपण नेहमी यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे कारण तो आपल्याला कधीच सोडणार नाही.—इब्री १३:५. टेहळणी बुरूज१८.०५ २६ ¶१४

शनिवार, २८ नोव्हेंबर

त्यांतून कोणते फळास येईल . . . हे तुला ठाऊक नसते.—उप. ११:६.

आपल्या प्रचारकार्याचा लोकांवर चांगला परिणाम होतो हे आपण कधीही विसरू नये. मग लोक आपला संदेश ऐकत नसले तरीही. प्रचार करताना लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं. आपले कपडे नीटनेटके आहेत आणि आपण नम्रतेने, आपुलकीने बोलतो हे लोक पाहतात. याचा त्यांच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो आणि जे लोक आपल्याबद्दल नकारात्मक विचार करतात, तेही कदाचित पुढे जाऊन आपला संदेश ऐकायला तयार होऊ शकतात. सर्जिओ आणि ओलिंडा हे पायनियर जोडपं म्हणतं: “एकदा आजारी असल्यामुळे आम्ही काही दिवस चौकात प्रचारकार्याला जाऊ शकलो नाही. आम्ही परत गेलो तेव्हा अनेकांनी आम्हाला विचारलं, ‘काय झालं होतं? बरेच दिवस दिसला नाहीत.’” आपण जर ‘हात न आवरता’ इतरांना राज्याचा आनंदाचा संदेश सांगत राहिलो, तर “सर्व जगात” हा संदेश घोषित करण्याच्या कामात आपण एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असू. (मत्त. २४:१४) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण हे काम करून यहोवाचं मन आनंदित करत आहोत या जाणीवेने आपल्याला खूप समाधान मिळेल. जे लोक “धीराने फळ” उत्पन्‍न करतात त्यांच्यावर यहोवा खूप प्रेम करतो.—लूक ८:१५. टेहळणी बुरूज१८.०५ १६ ¶१६-१८

रविवार, २९ नोव्हेंबर

[देवाची] स्तुती असो. तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला धीर देतो.—२ करिंथ. १:३, ४, तळटीप.

यहोवा हा प्रोत्साहन देणारा देव आहे. मानव पाप करून अपरिपूर्ण बनले तेव्हापासूनच तो प्रोत्साहन देत आला आहे. आदाम-हव्वाने देवाविरुद्ध बंड केल्यानंतर लगेच यहोवाने एक भविष्यवाणी केली. त्यांच्या येणाऱ्‍या संततीला या भविष्यवाणीचा अर्थ समजल्यामुळे आशा आणि धैर्य मिळणार होतं. उत्पत्ति ३:१५ या वचनात ही भविष्यवाणी देण्यात आली आहे. यात अभिवचन देण्यात आलं आहे की सैतान आणि त्याच्या सर्व दुष्ट कामांचा पूर्णपणे नाश केला जाईल. (१ योहा. ३:८; प्रकटी. १२:९) यहोवाने नोहाला कसं प्रोत्साहन दिलं त्यावर विचार करा. त्याच्या काळातील लोक खूप हिंसक आणि अनैतिक बनले होते. त्या काळात फक्‍त नोहा व त्याचं कुटुंबच यहोवाची उपासना करत होतं. आजूबाजूची परिस्थिती पाहून नोहा कदाचित निराश झाला असता. (उत्प. ६:४, ५, ९, ११; यहू. ६) पण यहोवाने नोहाला सांगितलं की तो या दुष्ट जगाचा विनाश करणार आहे. तसंच, नोहा आणि त्याच्या कुटुंबाला वाचण्यासाठी काय करण्याची गरज आहे हेदेखील यहोवाने त्याला सांगितलं. (उत्प. ६:१३-१८) यहोवा नोहासाठी प्रोत्साहन देणारा देव ठरला. टेहळणी बुरूज१८.०४ १५ ¶१-२

सोमवार, ३० नोव्हेंबर

आता जसे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.—१ थेस्सलनी. ५:११.

इतरांबद्दल असलेल्या भावना व्यक्‍त करणं तुम्हाला कठीण जातं का? खरं पाहिलं तर इतरांना प्रोत्साहन देणं खूप अवघड नाही. यासाठी सुरुवात म्हणून तुम्ही इतरांना पाहून स्मितहास्य करू शकता. जर इतरांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिली नाही, तर याचा अर्थ कदाचित ते एखाद्या समस्येतून जात आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. अशा प्रसंगी तुम्ही त्यांचं धीराने ऐकून त्यांना सांत्वन देऊ शकता. (याको. १:१९) आपल्यापैकी प्रत्येक जण गरज असलेल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देऊ शकतो. शलमोन राजाने म्हटलं: “समयोचित बोल किती उत्तम! नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्लासवते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.” (नीति. १५:२३, ३०) तसंच, पौलने आपल्याला सांगितलं आहे की सोबत मिळून राज्य गीत गायल्यामुळेही आपण इतरांना प्रोत्साहन देऊ शकतो. (कलस्सै. ३:१६; प्रे. कार्ये १६:२५) यहोवाचा दिवस जसजसा “जवळ येत” असल्याचं आपण पाहतो, तसतसं एकमेकांना प्रोत्साहन देणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे.—इब्री १०:२५. टेहळणी बुरूज१८.०४ २३ ¶१६; २४ ¶१८-१९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा