डिसेंबर
मंगळवार, १ डिसेंबर
येशूला त्यांचा कळवळा आला.—मार्क ६:३४.
येशूच्या व्यक्तिमत्त्वात मनाला भिडणारे अनेक गुण होते. त्यातल्या एका गुणामुळे तो मानवांना अपरिपूर्णतेमुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांना समजून घेऊ शकत होता. पृथ्वीवर असताना येशूने पुढील सल्ल्याचं पालन केलं: “आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.” (रोम. १२:१५) उदाहरणार्थ, सेवाकार्याची जबाबदारी पूर्ण करून येशूचे ७० शिष्य जेव्हा आनंदाने परत आले, तेव्हा येशू “अतिशय आनंदित” झाला. (लूक १०:१७-२१) पण जेव्हा लाजरच्या मृत्यूमुळे त्याच्या जवळच्या लोकांवर कोसळलेलं दुःख त्याने पाहिलं, तेव्हा तो “अगदी आतून कण्हला आणि खूप दुःखी झाला.” (योहा. ११:३३) अपरिपूर्ण मानवांसोबत व्यवहार करताना येशू इतकी दया आणि करुणा का दाखवू शकला? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याचं लोकांवर प्रेम होतं. येशूने मानवांबद्दल असं म्हटलं: “मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.” (नीति. ८:३१) लोकांवर असलेल्या प्रेमामुळेच त्याला मानवांची विचार करण्याची पद्धत समजून घेण्याची प्रेरणा मिळाली. प्रेषित योहानने येशूबद्दल म्हटलं: “माणसाच्या मनात काय असते हे त्याला माहीत होते.”—योहा. २:२५. टेहळणी बुरूज१९.०३ २० ¶१-२
बुधवार, २ डिसेंबर
तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.—ईयो. १:११.
सैतानाने ईयोबच्या मालमत्तेची नासधूस केली, त्याची संपत्ती, त्याचे सेवक आणि समाजातलं त्याचं नाव, या सर्व गोष्टी त्याने हिरावून घेतल्या. त्याने ईयोबच्या कुटुंबावर हल्ला केला आणि त्याच्या १० मुलांचा जीव घेतला. मग त्याने ईयोबला शारीरिक रीत्या पीडित केलं. त्याने त्याला डोक्यापासून ते पायापर्यंत खूप वेदनादायक व भयंकर फोडांनी पीडित केलं. ईयोबची बायको निराशेमुळे खूप दुःखी झाली आणि तिने ईयोबला म्हटलं, की त्याने आपला खरेपणा सोडून द्यावा व देवाची निंदा करून मरून जावं. ईयोबला आपला जीव नकोसा झाला होता पण तरी त्याने आपला खरेपणा सोडला नाही. मग सैतानाने दुसऱ्या मार्गाने त्याच्यावर हल्ला केला. त्याने ईयोबच्या तीन सोबत्यांचा उपयोग केला. ते बरेच दिवस ईयोबला भेटायला गेले. पण त्यांनी त्याचं सांत्वन केलं नाही. याउलट, त्यांनी खूप निर्दयीपणे त्याला सुनावलं आणि त्याची निंदा केली. त्यांनी असंसुद्धा म्हटलं, की ईयोब दुष्ट व्यक्ती आहे आणि म्हणून त्याच्यासोबत सर्व वाईट गोष्टी घडत आहेत.—ईयो. १:१३-२२; २:७-११; १५:४,५; २२:३-६; २५:४-६. टेहळणी बुरूज१९.०२ ४ ¶७-८
गुरुवार, ३ डिसेंबर
परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.—स्तो. १११:१०.
काही बाबतीत भीती असणं ही चांगली गोष्ट असते. जसं की, यहोवाचं मन दुखावलं जाऊ नये अशी भीती बाळगणं योग्य आहे. आदाम आणि हव्वा यांनी जर अशी भीती बाळगली असती तर त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं नसतं. पण याउलट त्यांनी बंड केलं. आणि त्यानंतर त्यांचे डोळे उघडले आणि ते पापी असल्याची त्यांना जाणीव झाली. ते वारशाने आपल्या मुलांना फक्त पाप आणि मृत्यू या गोष्टीच देऊ शकले. आदाम आणि हव्वा आपली परिस्थिती पाहू शकत होते, समजू शकत होते आणि त्यामुळे त्यांना आपल्या नग्नावस्थेची लाज वाटली व त्यांनी आपलं शरीर झाकून घेतलं. (उत्प. ३:७, २१) आपण यहोवाबद्दल योग्य भय बाळगलं पाहिजे. पण वारशाने मिळालेल्या मृत्यूची दहशत आपल्यात नसावी. कारण आपल्याला सर्वकाळ जगता यावं यासाठी यहोवाने एक योजना केली आहे. आपल्या हातून पाप घडल्यावर आपण मनापासून पश्चात्ताप केला तर यहोवा आपल्याला क्षमा करतो. त्याच्या पुत्राने दिलेल्या खंडणी बलिदानावर आपण विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला माफ करतो. विश्वास दाखवण्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण मार्गांपैकी एक म्हणजे आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेणं.—१ पेत्र ३:२१. टेहळणी बुरूज१९.०३ ५-६ ¶१२-१३
शुक्रवार, ४ डिसेंबर
यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता.—गण. २६:६५.
इस्राएली लोकांकडे कृतज्ञता व्यक्त करण्याची अनेक कारणं होती. यहोवाने इजिप्तवर दहा पीडा आणल्या आणि त्यानंतर त्यांची गुलामगिरीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना संकटातून वाचवण्यासाठी त्याने संपूर्ण इजिप्तच्या सैन्याला तांबडा समुद्रात बुडवून टाकलं. यामुळे इस्राएली लोकांनी यहोवासाठी विजयाचं स्तुतिगीत गाऊन आपले आभार व्यक्त केले. पण ते नेहमी कृतज्ञ राहिले का? इस्राएली लोकांना जेव्हा आणखी समस्यांचा सामना करावा लागला तेव्हा यहोवाने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी ते लवकरच विसरून गेले. त्यांच्यात कृतज्ञतेची भावना नाही हे दिसून आलं. (स्तो. १०६:७) ते कसं? “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधाने कुरकुर केली.” खरंतर त्यांनी यहोवाविरुद्धच कुरकुर केली. (निर्ग. १६:२, ८) लोकांमध्ये कदर नसल्याची मनोवृत्ती पाहून त्याला दुःख झालं. त्याने नंतर भविष्यवाणी केली की कालेब आणि यहोशवा यांना सोडून, ही इस्राएलची पिढी ओसाड रानातच नष्ट होईल.—गण. १४:२२-२४. टेहळणी बुरूज१९.०२ १७ ¶१२-१३
शनिवार, ५ डिसेंबर
मी सौम्य मनाचा आणि नम्र आहे.—मत्त. ११:२९.
येशूने कधीच इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधलं नाही. त्याचा मृत्युदिन पाळण्यासाठी त्याने खूप मोठा विधी करायला सांगितलं नाही. याऐवजी त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की वर्षातून एकदा त्याची आठवण म्हणून त्यांनी हा साधा विधी पाळावा. (योहा. १३:१५; १ करिंथ. ११:२३-२५) या साध्या विधीवरूनच दिसून येतं की येशू गर्विष्ठ नव्हता. नम्रता हा आपल्या स्वर्गीय राजाचा एक महत्त्वाचा गुण आहे हे जाणून आपल्याला आनंद होत नाही का? (फिलिप्पै. २:५-८) आपण येशूच्या नम्रतेचं अनुकरण कसं करू शकतो? आपला नाही तर इतरांचा जास्त विचार करण्याद्वारे आपण असं करू शकतो. (फिलिप्पै. २:३, ४) पृथ्वीवरील येशूच्या शेवटच्या रात्री घडलेल्या घटना आठवा. आपल्याला लवकरच खूप वेदनादायक मृत्यूला सामोरं जावं लागेल हे येशूला माहीत होतं. पण अशा परिस्थितीतही त्याला आपल्या विश्वासू प्रेषितांबद्दल जास्त काळजी होती, कारण लवकरच त्याच्या मृत्यूमुळे त्यांना खूप दुःख होणार होतं. यामुळेच त्याने त्या रात्री आपल्या शिष्यांना वेळ दिला. येशूने त्यांना शिकवलं, प्रोत्साहन दिलं व त्यांची हिंमत वाढवली. (योहा. १४:२५-३१) येशूने स्वतःच्या नाही तर इतरांच्या हिताचा जास्त विचार करून नम्रता दाखवली. आपल्या सर्वांसाठी त्याने किती उत्तम उदाहरण मांडलं! टेहळणी बुरूज१९.०१ २१ ¶५-६
रविवार, ६ डिसेंबर
हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर.—स्तो. ११९:१०८.
प्रत्येक वेळी उत्तर देण्यासाठी हात वर करण्याच्या नुसत्या विचारानेच तुमच्या पोटात गोळा येतो का? असं फक्त तुमच्याबाबतीतच घडतं असा विचार करून निराश होऊ नका. खरंतर आपल्यापैकी बहुतेक जणांना उत्तर देताना काही प्रमाणात तरी भीती वाटतेच. खरंतर, अशी भीती बाळगणं एका चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे. ती म्हणजे, तुम्ही नम्र आहात आणि इतरांना तुम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ समजता. आणि यहोवाला नम्रतेचा गुण आवडतो. (स्तो. १३८:६; फिलिप्पै. २:३) पण यहोवाची हीदेखील इच्छा आहे, की तुम्ही त्याची स्तुती करावी आणि सभेदरम्यान बंधुभगिनींना प्रोत्साहन द्यावं. (१ थेस्सलनी. ५:११) त्याचं तुमच्यावर प्रेम आहे आणि उत्तर देण्यासाठी लागणारं धैर्य तो तुम्हाला देईल. बायबलमध्ये काय सांगितलं आहे त्यावर विचार करा. त्यात म्हटलं आहे की आपण सर्वच जण जे बोलतो आणि ज्या प्रकारे बोलतो त्यात चुकतो. (याको. ३:२) यहोवा आणि आपले बंधुभगिनी आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१२-१४) एका अर्थी, आपण सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत आणि त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. (मार्क १०:२९, ३०; योहा. १३:३५) कधीकधी ठरवल्याप्रमाणे आपल्याला उत्तर देणं जमत नाही, पण ही गोष्टी ते समजून घेतात. टेहळणी बुरूज१९.०१ ८ ¶३; १०-११ ¶१०-११
सोमवार, ७ डिसेंबर
आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.—उप. १२:१.
असं करणं नेहमीच सोपं नसतं, पण हे अशक्यही नाही. देवाच्या मदतीने तुम्ही फक्त तरुण असतानाच नाही तर मोठं झाल्यावरही यशस्वी जीवन जगू शकता. हे चांगल्या रीतीने समजण्यासाठी आता आपण इस्राएली लोकांना वचनयुक्त देश काबीज करायला आणि दावीदला महाकाय गल्याथशी लढायला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली यावर चर्चा करू या. इस्राएली लोक जेव्हा वचनयुक्त देशात पाऊल ठेवणार होते तेव्हा यहोवाने त्यांना कोणती निर्देशनं दिली? त्याने त्यांना चांगले सैनिक बनायला सांगितलं का किंवा त्याने त्यांना युद्धासाठी प्रशिक्षण दिलं का? नाही! (अनु. २८:१, २) त्याने इस्राएली लोकांना त्याची आज्ञा पाळायला आणि त्याच्यावर भरवसा ठेवायला सांगितलं. (यहो. १:७-९) मानवी दृष्टिकोनाने हा सल्ला अर्थहीन वाटू शकला असता पण तो त्यांच्यासाठी सर्वात चांगला सल्ला होता. यहोवाने इस्राएली लोकांना एकापाठोपाठ एक कनानी लोकांवर विजय मिळवून दिला. (यहो. २४:११-१३) देवाला आज्ञाधारक राहायला विश्वास लागतो आणि हाच विश्वास नेहमी यशाच्या मार्गावर नेतो. ही गोष्ट प्राचीन काळात खरी होती आणि आजही तितकीच खरी आहे. टेहळणी बुरूज१८.१२ २५ ¶३-४
मंगळवार, ८ डिसेंबर
प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.—योहा. ६:६८.
इतर काही जणांना धर्मत्यागी लोकांच्या शिकवणी आवडल्या किंवा साक्षीदारांबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या लोकांचं म्हणणं त्यांना पटलं. ही फक्त काही कारणं आहेत ज्यामुळे काही लोक स्वतःहून मंडळीपासून आणि यहोवापासून दूर गेले आहेत. (इब्री ३:१२-१४) या लोकांनी पेत्रसारखंच येशूवर भरवसा ठेवला असता तर किती बरं झालं असतं! आपण पाहिलं की येशूचे शब्द ऐकून लोकसमुदायातील बऱ्याच लोकांना धक्का बसला. काही जण सत्यातून हळूहळू बाहेर गेले आहेत, आणि कधीकधी तर हे त्यांच्या लक्षातही आलेलं नाही. हळूहळू सत्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची तुलना एका अशा नावेसोबत केली जाऊ शकते जी किनाऱ्यापासून हळूहळू वाहवत जाते. बायबल आपल्याला इशारा देतं की आपण कधीही “वाहवत जाऊ” नये. (इब्री २:१) जी व्यक्ती सत्यातून हळूहळू बाहेर जाते तिची सहसा तसं करण्याची इच्छा नसते. पण ती व्यक्ती तिचं यहोवासोबतचं नातं कमजोर होऊ देते आणि कालांतराने ती ते नातं गमावून बसते. टेहळणी बुरूज१८.११ ९ ¶५-६
बुधवार, ९ डिसेंबर
तुझे लोक संतोषाने पुढे होतात.—स्तो. ११०:३.
यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी तुम्हाला जास्त प्रशिक्षण हवं आहे का? तुम्ही सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचा अर्ज भरू शकता. ही प्रशाला यहोवाची पूर्णवेळेची सेवा करणाऱ्या प्रौढ बंधुभगिनींना प्रशिक्षण देते. यामुळे यहोवाची संघटना त्यांचा आणखी जास्त वापर करू शकते. प्रशालेतल्या विद्यार्थ्यांना जिथे कुठे सेवा करायला पाठवलं जाईल तिथे जाण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. यहोवाची जास्त सेवा करण्याचा हादेखील एक मार्ग आहे. (१ करिंथ. ९:२३) आपण यहोवाचे लोक असल्यामुळे उदारता, दया, चांगुलपणा आणि प्रेम हे गुण दाखवतो. आपण प्रत्येक दिवशी इतरांची काळजी करतो. यामुळे आपल्याला आनंद आणि शांती अनुभवायला मिळते. (गलती. ५:२२, २३) तुमची परिस्थिती कशीही असो, जोपर्यंत तुम्ही यहोवाच्या उदारतेचं अनुकरण कराल तोपर्यंत तुम्ही आनंदी राहाल आणि त्याचे एक मौल्यवान सहकारी ठराल!—नीति. ३:९, १०. टेहळणी बुरूज१८.०८ २७ ¶१६-१८
गुरुवार, १० डिसेंबर
देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये.—मत्त. १९:६.
काही जणांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, ‘घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करण्यासाठी ख्रिश्चनांकडे काही शास्त्रवचनीय आधार आहे का?’ येशूच्या शब्दांवर लक्ष द्या: “जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, आणि जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न केलं, तर तीही व्यभिचार करते.” (मार्क १०:११, १२; लूक १६:१८) येशूच्या शब्दांवरून स्पष्ट होतं की तो विवाहाचा आदर करायचा आणि इतरांनीही तसं करावं अशी त्याची इच्छा होती. जर एका पुरुषाने आपल्या विश्वासू पत्नीला घटस्फोट देऊन पुन्हा लग्न केलं, तर तो व्यभिचार करत आहे असा त्याचा अर्थ होईल. हीच गोष्ट एका स्त्रीच्या बाबतीतही खरी आहे. जर तिने आपल्या विश्वासू पतीला घटस्फोट दिला आणि दुसरं लग्न केलं तर तीदेखील व्यभिचार करत आहे असा त्याचा अर्थ होईल. याचं कारण म्हणजे फक्त घटस्फोट घेतल्यामुळे विवाहबंधन तुटत नाही. देवाच्या नजरेत ते दोघं अजूनही विवाहित आहेत आणि तो त्यांना “एकदेह” समजतो. येशूने असंदेखील म्हटलं की जर एका पुरुषाने आपल्या निर्दोष पत्नीला घटस्फोट दिला तर तिच्या हातून व्यभिचार होऊ शकतो. येशूने असं का म्हटलं? कारण त्या काळात घटस्फोट झालेल्या एका स्त्रीला असं वाटणं स्वाभाविक होतं, की आर्थिक आधार मिळवण्यासाठी तिला पुन्हा लग्न करणं गरजेचं आहे. आणि जर त्या स्त्रीने लग्न केलं तर त्यालादेखील व्यभिचार समजलं जायचं. टेहळणी बुरूज१८.१२ ११ ¶८-९
शुक्रवार, ११ डिसेंबर
मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन.—हब. २:१.
यहोवासोबत झालेल्या संभाषणामुळे हबक्कूकला मनाची शांती मिळाली. यामुळे त्याने यहोवाची वाट पाहण्याचा निर्धार केला. त्याचा निर्धार पक्का असल्याचं त्याने आपल्या शब्दांद्वारे व्यक्त केलं. त्याने म्हटलं: “त्या दिवसाची मी शांतपणे वाट पाहत राहीन.” (हब. ३:१६, सुबोध भाषांतर) हबक्कूकने केलेल्या निर्धारावरून आपण काय शिकू शकतो? पहिलं हे, की आपल्यासमोर कोणतीही समस्या आली तरी आपण कधीच प्रार्थना करण्याचं थांबवू नये. दुसरं, यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे जे सांगतो ते आपण ऐकलं पाहिजे. आणि तिसरं, यहोवा कार्य करेल यासाठी आपण त्याची धीराने वाट पाहिली पाहिजे व त्याने ठरवलेल्या वेळी तो आपल्याला दुःखातून बाहेर काढेल हा भरवसा ठेवला पाहिजे. जर आपण हबक्कूकचं अनुकरण केलं तर आपल्याला मनाची शांती लाभेल आणि धीर धरायला मदत मिळेल. तसंच, आपण कोणत्याही समस्येत असलो तरीही आशेमुळे आपल्याला टिकून राहण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी मदत होईल. आपल्याला भरवसा आहे की स्वर्गात राहणारा आपला पिता नक्कीच कार्य करेल.—रोम. १२:१२. टेहळणी बुरूज१८.११ १५-१६ ¶११-१२
शनिवार, १२ डिसेंबर
स्त्रियांनी उचित पेहराव करून, शालीनतेने व विचारशीलपणे स्वतःला सजवावे.—१ तीम. २:९.
इतरांना अडखळण ठरणाऱ्या व्यक्तीबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे? अशी व्यक्ती इतरांना पाप करायला किंवा यहोवाची सेवा सोडून द्यायला प्रवृत्त करते. येशूने अशा व्यक्तीबद्दल म्हटलं: “माझ्यावर विश्वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो त्याच्या गळ्यात, गाढव ओढतो तसा जात्याचा दगड बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं जावं, हेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.” (मार्क ९:४२) येशूच्या शब्दांवरून आपल्याला याची गंभीरता कळते. आणि येशू हा विचार करण्याच्या बाबतीत आपल्या पित्यासारखाच आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती जर येशूच्या शिष्याला अडखळण ठरली तर यहोवाला नक्कीच त्या व्यक्तीचा खूप राग येईल. (योहा. १४:९) एखाद्याला अडखळण ठरणं या गोष्टीला आपण यहोवा आणि येशूसारखंच गंभीर लेखतो का? आपल्या कार्यांवरून काय दिसून येतं? उदाहरणार्थ, आपल्याला एका विशिष्ट प्रकारचे कपडे आणि केशभूषा आवडत असेल. पण जर आपली निवड मंडळीतील बंधुभगिनींना खटकली तर? किंवा आपल्या पेहरावामुळे इतरांच्या मनात चुकीचे विचार आले तर? अशा वेळी बंधुभगिनींसाठी असलेल्या प्रेमामुळे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला आपण तयार असू का? टेहळणी बुरूज१८.११ २५ ¶९-१०
रविवार, १३ डिसेंबर
सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? . . . तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.—ईयो. १:९, ११.
आपल्या सर्वांना खरेपणाची गरज का आहे? कारण सैतानाने फक्त यहोवाच्या बाबतीतच प्रश्नं उपस्थित केला नाही, तर तुमच्याबाबतीतही केला आहे. त्या बंडखोर स्वर्गदूताने देवाच्या नावाला कलंक लावला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम आणि हव्वा यांनी बंड करून सैतानाची बाजू घेतली. (उत्प. ३:१-६) एदेन बागेत असताना यहोवावरचं प्रेम वाढवण्याच्या बऱ्याच संधी त्यांच्याजवळ होत्या. पण सैतानाने जेव्हा दावा केला तेव्हा आदाम-हव्वाचं प्रेम संपूर्ण आणि निर्दोष नव्हतं. मग त्यानंतर आणखी एक प्रश्नं उभा राहिला: कोणताही मनुष्य यहोवाला प्रेमापोटी एकनिष्ठ राहील का? दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर मानव खरेपणा दाखवू शकतात का? आणि हाच प्रश्नं ईयोबच्या बाबतीतही उभा राहिला. (ईयो. १:८-११) आपल्यासारखाच ईयोबदेखील अपरिपूर्ण होता. त्याच्या हातूनही चुका झाल्या. पण ईयोबच्या खरेपणामुळे यहोवाचं त्याच्यावर प्रेम होतं. टेहळणी बुरूज१९.०२ ३-४ ¶६-७
सोमवार, १४ डिसेंबर
आपल्याजवळ असलेलं सर्वकाही विकून त्याने तो . . . विकत घेतला.—मत्त. १३:४६.
येशूने मौल्यवान मोत्यांच्या शोधात असणाऱ्या एका व्यापाऱ्याचं उदाहरण दिलं. त्याने सांगितलं की एक खूप मौल्यवान मोती मिळाल्यावर त्या व्यापाऱ्याने तो विकत घेण्यासाठी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली. तो मोती देवाच्या राज्याबद्दलच्या सत्याला सूचित करतो. या उदाहरणावरून येशूने दाखवून दिलं की सत्याचा शोध घेणाऱ्यांसाठी त्याचं मूल्य खूप जास्त असेल. (मत्त. १३:४५, ४६) आपण जेव्हा सत्य शिकलो, म्हणजे देवाच्या राज्याबद्दल आणि बायबलमधील इतर सत्यं शिकलो तेव्हा आपण ते मिळवण्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करायला तयार होतो. आपण जर सत्याचं मूल्य नेहमी लक्षात ठेवलं तर आपण ते कधीच सोडणार नाही. (नीति. २३:२३) पण दुःखाची गोष्टी ही आहे की काही लोकांनी सत्याला मौल्यवान लेखण्याचं सोडून दिलं आहे आणि ते सत्यातून बाहेर गेले आहेत. असं आपल्या बाबतीतही व्हावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. “सत्याच्या मार्गावर चालत” राहा हा बायबलमधील सल्ला आपण नेहमी पाळला पाहिजे. (३ योहा. २-४) याचा अर्थ आपण जीवनात सत्याला नेहमी पहिलं स्थान दिलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे. टेहळणी बुरूज१८.११ ९ ¶३
मंगळवार, १५ डिसेंबर
विश्वासानेच, इस्राएल लोकांनी यरीहो शहराभोवती सात दिवस फेऱ्या घातल्यावर शहराच्या भिंती कोसळल्या.—इब्री ११:३०.
एका स्वर्गदूताने यहोशवाला सांगितलं की इस्राएली लोकांनी यरीहोवर हल्ला करू नये. याऐवजी त्यांना दिवसातून एकदा, असं सहा दिवसांसाठी संपूर्ण शहराभोवती फेरी मारायची होती. पण सातव्या दिवशी मात्र त्यांना सात वेळा फेऱ्या मारायच्या होत्या. सैनिकांना कदाचित असं वाटलं असेल: ‘कशाला आपला वेळ आणि शक्ती उगाचच वाया घालवायची!’ पण इस्राएलच्या अदृश्य नेत्याला त्याच्या कार्यांवर पूर्ण भरवसा होता. त्याच्या निर्देशनांचं पालन केल्यामुळे इस्राएली लोकांचा विश्वास मजबूत झाला. तसंच, त्यांना यरीहोच्या सैनिकांशी युद्ध करण्याची गरज पडली नाही. (यहो. ६:२-५) या अहवालातून आपण काय शिकू शकतो? यहोवाची संघटना कधीकधी अशा नवनवीन पद्धती वापरते ज्या आपल्याला नेहमीच समजत नाही. उदाहरणार्थ, वैयक्तिक अभ्यास, सेवाकार्य किंवा सभा यांसाठी मोबाईल किंवा टॅबचा वापर करणं योग्य राहील की नाही, असा प्रश्न आपल्या मनामध्ये सुरुवातीला आला असेल. पण जर आपण यांचा वापर करत असू तर त्याचे चांगले परिणाम होत असल्याचे आपण पाहू शकतो. जेव्हा आपण अशा बदलांचे सकारात्मक परिणाम पाहतो तेव्हा आपला विश्वास मजबूत होतो आणि बंधुभगिनींमधलं ऐक्य आणखीन वाढतं. टेहळणी बुरूज१८.१० २३ ¶८-९
बुधवार, १६ डिसेंबर
प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची पुनःस्थापना करणार आहेस का?—प्रे. कार्ये १:६.
येशूच्या शिष्यांप्रमाणेच यहुदी लोकांचीसुद्धा अशी अपेक्षा होती की मसीहा आपल्या सर्व समस्या सोडवेल. कदाचित याच कारणामुळे गालीलमधील लोकांना येशूला आपला राजा बनवायचं होतं. येशू एक प्रभावी वक्ता होता, तो आजारी लोकांना बरं करू शकत होता आणि लोकांना अन्नदेखील पुरवू शकत होता. येशूने जवळपास ५,००० माणसांना अन्न पुरवलं हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. म्हणून गालीलच्या लोकांना वाटलं असेल की येशू सर्वात चांगला शासक ठरेल. त्यांच्या मनात काय आहे हे येशूने ओळखलं. बायबल सांगतं: “लोक आपल्याला बळजबरीने राजा बनवण्यासाठी धरायला येत आहेत, हे ओळखून येशू पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला.” (योहा. ६:१०-१५) दुसऱ्या दिवशी कदाचित लोक शांत झाले असतील. मग येशूने त्यांना समजावून सांगितलं की तो त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी आला आहे. त्याने लोकांना म्हटलं: “नाश होणाऱ्या अन्नासाठी खटपट करू नका, तर जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं, अशा अन्नासाठी खटपट करा.”—योहा. ६:२५-२७. टेहळणी बुरूज१८.०६ ४ ¶४-५
गुरुवार, १७ डिसेंबर
चेपलेला बोरू [गवताची काडी, NW] तो मोडणार नाही मिणमिणती वात तो विझवणार नाही.—यश. ४२:३.
जे चेपलेल्या गवताच्या काडीसारखे किंवा मिणमिणत्या वातीसारखे निराश आणि कमजोर होते त्यांच्या भावना येशूने समजून घेतल्या. म्हणूनच तो त्यांच्याशी खूप दयेने आणि धीराने वागला. (मार्क १०:१४) हे खरं आहे, की आपण येशूसारखं लोकांच्या भावना समजू शकत नाही किंवा त्याच्यासारखं लोकांना शिकवू शकत नाही. पण आपल्या क्षेत्रातल्या लोकांशी कसं, कधी व किती वेळ बोलावं याबद्दल आपण नक्कीच विचारशील असू शकतो. या जगातले भ्रष्ट आणि जुलुमी व्यापार, राजनैतिक आणि धार्मिक पुढारी यांमुळे आज लाखो लोक “जखमी झालेले व भरकटलेले” आहेत. (मत्त. ९:३६) यामुळे पुष्कळ लोकांचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही आणि त्यांच्याकडे कोणतीच आशाही नाही. म्हणूनच, आपल्या शब्दांतून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून इतरांना आपण दयाळू असल्याचं आणि लोकांबद्दल काळजी असल्याचं दिसून यायला हवं. बऱ्याच लोकांना आपल्या संदेशात आवड फक्त यासाठी नसते की आपल्याला बायबलबद्दल खूपकाही माहीत आहे, तर यासाठीही असते की आपण मनापासून त्यांच्यात आस्था दाखवतो आणि त्यांना आदर देतो. टेहळणी बुरूज१८.०९ ३१-३२ ¶१३-१४
शुक्रवार, १८ डिसेंबर
जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत.—मत्त. ५:३.
आपण आपली आध्यात्मिक गरज ओळखतो हे आपण कसं दाखवू शकतो? देवाला ओळखण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आणि मार्गदर्शन व मदत यांसाठी त्याच्यावर अवलंबून राहण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो. तसंच, बायबलचा अभ्यास आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याद्वारे व त्याच्या उपासनेला जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देण्याद्वारेही आपण दाखवून देतो की आपण आपली आध्यात्मिक गरज ओळखतो. या गोष्टी केल्यामुळे आपण आनंदी बनू. तसंच, देवाने दिलेली अभिवचनं लवकरच पूर्ण होतील यावरचा आपला भरवसा वाढेल. (तीत २:१३) जीवनातील कोणत्याही प्रसंगात आपल्याला आनंद टिकवून ठेवायचा असेल, तर यहोवासोबतचा आपला नातेसंबंध घनिष्ठ करत राहण्याची गरज आहे. प्रेषित पौलने म्हटलं: “प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!” (फिलिप्पै. ४:४) यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. (नीति. ३:१३, १८) पण आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी लागू करणं खूप गरजेचं आहे. असं करण्याच्या महत्त्वावर जोर देत येशूने म्हटलं: “तुम्हाला जर या गोष्टी कळत असतील, तर त्यांचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल.” (योहा. १३:१७; याको. १:२५) आपली आध्यात्मिक गरज पूर्ण करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी असं करणं खूप गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१८.०९ १८ ¶४-६
शनिवार, १९ डिसेंबर
[एपफ्रास] नेहमी तुमच्यासाठी जीव तोडून प्रार्थना करत असतो.—कलस्सै. ४:१२.
एपफ्रास बांधवांना जवळून ओळखायचा आणि त्याला त्यांची खूप काळजी होती. पौलने त्याला “माझा सोबतीचा कैदी” असं म्हटलं. याचा अर्थ एपफ्रासच्या जीवनातही काही समस्या होत्या. (फिले. २३) पण अशा परिस्थितीतही एपफ्रासने इतरांचा विचार केला आणि मग त्यांना मदत करण्याचाही प्रयत्न केला. एपफ्रासने आपल्या बंधुभगिनींचं नाव घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आपणही तसंच करू शकतो. आणि अशा प्रार्थना खूप परिणामकारक असतात. (२ करिंथ. १:११; याको. ५:१६) तुम्ही एखाद्याचं वैयक्तिक नाव घेऊन प्रार्थना करू शकता का? समस्यांचा सामना करावा लागत असणाऱ्या तुमच्या मंडळीतल्या मित्रांसाठी किंवा कुटुंबांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. त्यांना कदाचित एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल किंवा एखाद्या मोहाचा सामना करावा लागत असेल. यासोबतच आपण इतर जणांसाठीही प्रार्थना करू शकतो. जसं की, आपल्या प्रियजनांना मृत्यूत गमावलेल्यांसाठी, युद्धातून किंवा नैसर्गिक विपत्तीतून बचाव झालेल्यांसाठी आणि आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी. जगभरात असे बरेच बंधुभगिनी आहेत ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. टेहळणी बुरूज१८.०९ ५-६ ¶१२-१३
रविवार, २० डिसेंबर
घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.—प्रे. कार्ये २०:३५.
पौल इथे फक्त भौतिक गोष्टी देण्याबद्दल बोलत नव्हता. भौतिक गोष्टींसोबतच आपण इतरांना उत्तेजन व बायबलमधून चांगले सल्ले देऊ शकतो. तसंच, आपण त्यांना व्यावहारिक मार्गानेही मदत करू शकतो. (प्रे. कार्ये २०:३१-३५) पौलने आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून आपल्याला शिकवलं की आपला वेळ, शक्ती आणि प्रेम हे इतरांना उदारपणे देणं खूप महत्त्वाचं आहे. मानवी स्वभावाचा अभ्यास करणाऱ्यांनाही हे दिसून आलं आहे की उदारतेने इतरांना मदत केल्यामुळे एक व्यक्ती आनंदी होते. एका लेखात सांगितलं होतं की इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्यामुळे लोकांना मनापासून आनंद होतो. अभ्यासकांचं म्हणणं आहे की आपण जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनाला अर्थ आणि उद्देश लाभतो. यामुळेच काही तज्ज्ञ, लोकांना आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं सुचवतात. यांबद्दल ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य होत नाही, कारण आपला प्रेमळ पिता, यहोवा नेहमीच आपल्याला उदार बनण्यास शिकवत आला आहे.—२ तीम. ३:१६, १७. टेहळणी बुरूज१८.०८ २२ ¶१७-१८
सोमवार, २१ डिसेंबर
वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या, तर खरेपणाने न्याय करा.—योहा. ७:२४.
येशू ख्रिस्ताबद्दल यशयाने जी भविष्यवाणी केली त्यामुळे आपल्याला आशा आणि प्रोत्साहन मिळतं. यशयाने सांगितलं होतं की येशू “डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल.” (यश. ११:३, ४) हे शब्द आपल्याला खूप प्रोत्साहन देतात कारण आज आपण अशा जगात राहात आहोत जिथे लोक भेदभाव करतात. तसंच, लोक वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवतात. आपल्या सर्वांनाच परिपूर्ण न्यायाधीश, येशू याची गरज आहे. तो कधीच बाह्यस्वरूप पाहून आपला न्याय करणार नाही! आपण दररोज लोकांबद्दल मत बनवत असतो. पण येशूसारखं परिपूर्ण नसल्यामुळे आपलं मत नेहमीच योग्य असेल असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला जे दिसतं त्याचा प्रभाव आपल्या मतांवर होतो. असं असलं तरी येशूने आपल्याला “वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या” आधारावर नव्हे, तर “खरेपणाने” न्याय करण्याबद्दल सांगितलं. यावरून आपल्याला येशूची इच्छा काय आहे ते कळतं. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं आणि स्वरूप पाहून इतरांचा न्याय करू नये. टेहळणी बुरूज१८.०८ ८ ¶१-२
मंगळवार, २२ डिसेंबर
हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.—यश. ३०:२१.
आज आपल्याला स्वर्गातून यहोवाचा आवाज ऐकू येत नाही. पण त्याने आपल्याला त्याचं वचन, बायबल दिलं आहे. त्याद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन देतो. यासोबतच आपल्या सर्वांना आध्यात्मिक अन्न देत राहण्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा “विश्वासू आणि बुद्धिमान कारभारी”ला प्रेरीत करतो. (लूक १२:४२) आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आज आपल्याला छापील स्वरूपात आणि वेबसाईटवर भरपूर माहिती मिळते. तसंच, आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात ऑडिओ आणि व्हिडिओ प्रकाशनंही आहेत ज्यांद्वारे यहोवा आपल्याला आध्यात्मिक अन्न पुरवतो. बायबलमध्ये असलेले यहोवाचे शब्द आपल्याला नेहमी भरवसा देत राहतील की संपूर्ण परिस्थिती त्याच्या नियंत्रणात आहे. आणि सैतान व त्याचं जग यांमुळे आपलं जे काही नुकसान झालं आहे, ते सर्व यहोवा लवकरच भरून काढेल. म्हणून आपण यहोवाचा आवाज ऐकण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. आपण असं केलं, तर आज आणि भविष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांचा आपण यशस्वी रीत्या सामना करू शकू. बायबल आपल्याला सांगतं: “देवाची इच्छा पूर्ण केल्यावर, त्याने दिलेल्या अभिवचनाचे प्रतिफळ तुम्हाला मिळावे, म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.”—इब्री १०:३६. टेहळणी बुरूज१९.०३ १३ ¶१७-१८
बुधवार, २३ डिसेंबर
यहोशवा याला परमेश्वराने सांगितले की, माझा सेवक मोशे मृत्यु पावला आहे; तर आता ऊठ व . . . तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.—यहो. १:१, २.
मोशेने इस्राएली लोकांचं खूप वर्षांपर्यंत नेतृत्व केलं होतं, पण आता यहोशवा त्यांचं नेतृत्व करणार होता. त्याला लोक प्रमुख म्हणून स्वीकारतील की नाही, अशी शंका त्याच्या मनात आली असावी. (अनु. ३४:८, १०-१२) यहोशवा १:१, २ या वचनांबद्दल एका बायबलच्या संदर्भग्रंथात म्हटलं आहे, की गतकाळात किंवा आजही जेव्हा एका नेत्याच्या जागी दुसरा नेता येतो तेव्हा तो काळ त्या राष्ट्रासाठी खूप कठीण व धोकादायक असतो. अशा वेळी यहोशवाला चिंता वाटणं साहजिकच होतं. पण त्याने यहोवावर भरवसा ठेवला आणि वेळ न घालवता लगेच त्याच्या निर्देशनांचं पालन केलं. (यहो. १:९-११) यहोशवाने यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं व इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी एका स्वर्गदूताचा वापर केला. आणि असं दिसून येतं की हा स्वर्गदूत शब्द, म्हणजे देवाचा प्रथम पुत्र असावा. (निर्ग. २३:२०-२३; योहा. १:१) यहोशवा आता इस्राएल राष्ट्राचा नवीन नेता होता. यहोवाने इस्राएली लोकांना या बदलाशी जुळवून घ्यायला मदत केली. टेहळणी बुरूज१८.१० २२-२३ ¶१-४
गुरुवार, २४ डिसेंबर
परमेश्वराचे भय धरणारे . . . यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.—मला. ३:१६.
यहोवाची मनापासून सेवा करणाऱ्यांना तो ओळखतो आणि तो त्यांची नावं आपल्या स्मरणवहीत लिहितो. यहोवाच्या स्मरणवहीत, जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव असावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. मलाखी सांगतो की आपण यहोवाचं भय मानलं पाहिजे आणि त्याच्या नावावर मनन केलं पाहिजे. आपण जर दुसऱ्या कोणाची उपासना केली तर यहोवाच्या स्मरणवहीतून आपलं नाव काढून टाकलं जाईल. (निर्ग. ३२:३३; स्तो. ६९:२८) म्हणून यहोवाची इच्छा करण्याचं वचन देणं आणि मग बाप्तिस्मा घेणंच फक्त पुरेसं नाही. या अशा गोष्टी आहेत ज्या आपण एकदाच करतो, पण यहोवाची उपासना मात्र आपल्याला जीवनभर करायची आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत दररोज आपण आपल्या कार्यांद्वारे दाखवलं पाहिजे, की आपण यहोवाच्या आज्ञा पाळत आहोत.—१ पेत्र ४:१, २. टेहळणी बुरूज१८.०७ २३-२४ ¶७-९
शुक्रवार, २५ डिसेंबर
आता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे आपण प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट करू या.—इब्री ६:१.
अनेक वर्षांपासून सत्यात असल्यामुळे आपण प्रौढ ख्रिस्ती बनत नाही, तर त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. आपण आपलं ज्ञान आणि समज वाढवत राहिलं पाहिजे आणि यासाठी रोज बायबलचं वाचन करणं गरजेचं आहे. (स्तो. १:१-३) जसजसं तुम्ही नियमितपणे बायबलचं वाचन कराल, तसतसं यहोवाचे नियम आणि तत्त्वं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. प्रेमाचा नियम हा ख्रिश्चनांसाठी सर्वात महत्त्वाचा नियम आहे. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) प्रेमाला “राजाज्ञा” आणि “नियमशास्त्राची पूर्णता” असं म्हटलं आहे. (याको. २:८; रोम. १३:१०) बायबल म्हणतं की “देव प्रेम आहे” आणि त्यामुळे आपण समजू शकतो की प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे.—१ योहा. ४:८. टेहळणी बुरूज१८.०६ १९ ¶१४-१५
शनिवार, २६ डिसेंबर
त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले.—स्तो. १०६:३३.
इस्राएली लोकांनी मोशेविरुद्ध नाही तर यहोवाविरुद्ध बंड केलं होतं. पण तरी राग मात्र मोशेने व्यक्त केला. त्याने आत्मसंयम दाखवला नाही आणि तो अविचारीपणे बोलला. मोशेने यहोवावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं, पण इतरांच्या वागण्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालं. इस्राएली लोकांनी जेव्हा पहिल्यांदा पाण्याबद्दल कुरकुर केली, तेव्हा मोशेने योग्य ते केलं होतं. (निर्ग. ७:६) पण नंतर अनेक वर्षं इस्राएली लोक करत असलेल्या बंडामुळे कदाचित मोशे वैतागला असेल. आपण यहोवाचा गौरव कसा करू शकतो यावर विचार करण्याऐवजी तो कदाचित आता फक्त स्वतःच्या भावनांबद्दल विचार करत होता. मोशेसारख्या विश्वासू संदेष्ट्याचं जर लक्ष विचलित होऊन त्याच्या हातून पाप घडू शकतं, तर आपल्या बाबतीतही हे घडू शकतं. मोशे वचनयुक्त देशाच्या उंबरठ्यावर होता, आणि आपणही नवीन जगाच्या अगदी दारात येऊन पोचलो आहोत. (२ पेत्र ३:१३) हा विशेष बहुमान गमावण्याची आपल्यापैकी कोणाचीच इच्छा नाही. पण नवीन जगात जाण्यासाठी आपल्याला यहोवावर नेहमी लक्ष केंद्रित करण्याची आणि त्याच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे.—१ योहा. २:१७. टेहळणी बुरूज१८.०७ १५ ¶१४-१६
रविवार, २७ डिसेंबर
तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.—१ योहा. २:१४.
लोकांची इच्छा नसलेल्या गोष्टी करायला सैतान त्यांना भाग पाडू शकत नाही. (याको. १:१४) आपण सैतानाच्या बाजूने आहोत याची जगातल्या बऱ्याच लोकांना जराही कल्पना नाही. पण सत्य शिकल्यावर एका व्यक्तीला निर्णय घ्यावाच लागतो की ती सैतानाची बाजू घेईल की यहोवाची. (प्रे. कार्ये ३:१७; १७:३०) आपण जर यहोवाची आज्ञा पाळण्याचा निर्धार केला, तर सैतान आपली एकनिष्ठा तोडू शकणार नाही. (ईयो. २:३; २७:५) सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना अशक्य असणाऱ्या अशा इतर गोष्टीही आहेत. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं की तो आपल्या मनातल्या गोष्टी ओळखू शकत नाही. या गोष्टी फक्त यहोवा आणि येशूच ओळखू शकतात. (१ शमु. १६:७; मार्क २:८) जर देवाच्या इच्छेनुसार बोलण्याचा आणि कार्य करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला, तर आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा दियाबलापासून आपलं रक्षण करेल. सैतान आपली अशी कोणतीही हानी करू शकत नाही, जी यहोवाला भरून काढणं अशक्य आहे. (स्तो. ३४:७) आपल्या शत्रूला आपण ओळखण्याची गरज आहे, घाबरण्याची नाही. जरी आपण अपरिपूर्ण असलो तरी यहोवाच्या मदतीने आपण सैतानावर विजय मिळवू शकतो! आपण त्याचा विरोध केला तर तो आपल्यापासून दूर जाईल.—याको. ४:७; १ पेत्र ५:९. टेहळणी बुरूज१८.०५ २६ ¶१५-१७
सोमवार, २८ डिसेंबर
आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.—नीति. १६:३.
कल्पना करा की तुम्हाला दुसऱ्या शहरात होणाऱ्या एका खास कार्यक्रमाला जायचं आहे. तिथे जाण्यासाठी तुम्ही बसचं तिकिट काढता. बस स्थानकावर तुम्हाला खूप गाड्या दिसतात. पण कुठे जायचं आहे आणि कोणत्या बसमध्ये चढायचं आहे हे माहीत असल्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन बसची वाट पाहता. या गोष्टी माहीत असल्यामुळे तुम्ही दिसेल त्या बसमध्ये चढणार नाही, कारण असं केल्यामुळे तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहचाल. तरुणांचं जीवनही एका प्रवासासारखंच आहे. कधीकधी आयुष्यात इतके पर्याय असतात की निवड करताना ते गोंधळून जातात. पण तुम्हाला कुठे जायचं आहे हे जर आधीच माहीत असलं, तर मग योग्य निवड करणं सोपं जाईल. तुम्ही यहोवाचं मन आनंदित करण्याचा मार्ग निवडाल का? यामुळे जीवनात कोणतेही निर्णय घेताना, जसं की शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही यहोवाचं मार्गदर्शन स्वीकाराल. तसंच, आध्यात्मिक ध्येयं मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. यामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल. यहोवाची सेवा करण्यावर तुम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं, तर खात्री बाळगा की तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि यश मिळवण्यास मदत करेल. टेहळणी बुरूज१८.०४ २५ ¶१-३
मंगळवार, २९ डिसेंबर
हाय, हाय! मुली, तू माझे मन खचवले आहे तू; माझ्यावर मोठे संकट आणले आहे.—शास्ते ११:३५.
इफ्ताहने आपलं वचन पाळलं आणि आपल्या मुलीला आयुष्यभर निवासमंडपात यहोवाची सेवा करण्यासाठी पाठवलं. (शास्ते ११:३०-३५) इफ्ताहसाठी हे नक्कीच सोपं नसेल. पण कल्पना करा की त्याच्या मुलीला आपल्या वडिलांचं वचन पाळणं किती कठीण गेलं असेल. असं असलं तरी ती निवासमंडपात जायला तयार झाली. (शास्ते ११:३६, ३७) हे वचन पाळण्याचा अर्थ असा होता की तिला लग्न करणं, मुलांना जन्म देणं आणि वंश पुढे चालवणं शक्य होणार नव्हतं. म्हणूनच तिला सांत्वनाची आणि प्रोत्साहनाची खूप गरज होती. बायबल सांगतं: “इस्राएल लोकांत अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.” (शास्ते ११:३९, ४०) तिच्या उदाहरणाचं अनुकरण करून आज बरेच बंधुभगिनी यहोवाची सेवा करण्यासाठी अविवाहित राहतात. अशा बंधुभगिनींची प्रशंसा करून आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो.—१ करिंथ. ७:३२-३५. टेहळणी बुरूज१८.०४ १७ ¶१०-११
बुधवार, ३० डिसेंबर
देवदूत आपल्या नेमलेल्या सेवेत टिकून राहिले नाहीत, तर [त्यांनी] आपले उचित निवासस्थान सोडून दिले.—यहू. ६.
देवाविरुद्ध बंड करण्यात बऱ्याच देवदूतांनी सैतानाची साथ दिली. जलप्रलय येण्याआधी सैतानाने त्यांपैकी काहींना स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या मोहात पाडलं. बायबलमध्ये याला लाक्षणिक रीतीने समजवण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे, की स्वर्गातून खाली पडलेल्या अजगराने त्याच्यासोबत एकतृतीयांश तारे ओढले. (उत्प. ६:१-४; प्रकटी. १२:३, ४) या देवदूतांनी देवाच्या कुटुंबाचा त्याग केला तेव्हा ते सैतानाच्या अधिकाराच्या अधीन झाले. आपण असा विचार करू नये की बंड केलेले देवदूत संघटित नाहीत. अदृश्य आत्मिक जगात सैतानाने देवाच्या राज्यासारखंच स्वतःचं एक राज्य तयार केलं आहे. त्याने स्वतःला राजा बनवून दुरात्म्यांना संघटित केलं आहे. त्याने त्यांना शक्ती देऊन जगातले शासक बनवलं आहे. (इफिस. ६:१२) सर्व मानवी सरकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैतान त्याच्या संघटनेचा वापर करतो. टेहळणी बुरूज१८.०५ २३ ¶५-६
गुरुवार, ३१ डिसेंबर
परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते.—स्तो. १६:७.
कधीकधी देव एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्याला सुधारतो. असं करण्याद्वारे तो आपल्याला प्रेम दाखवतो. दावीदला जेव्हा सुधारण्यात आलं तेव्हा त्याने त्याला मौल्यवान लेखलं. दावीदने देवाच्या विचारांवर मनन केलं आणि तो देवासारखा विचार करू लागला. त्याने देवाच्या विचारांना स्वतःला आकार देऊ दिला, म्हणजेच स्वतःत बदल करू दिला. तुम्हीही जेव्हा असं करता तेव्हा देवावर असलेलं तुमचं प्रेम आणि त्याचं मन आनंदित करण्याची तुमची इच्छा वाढेल. आणि यामुळे तुम्ही एक प्रौढ व्यक्ती बनाल. क्रिस्टीन नावाची एक बहीण म्हणते की वाचलेल्या गोष्टींवर ती जेव्हा संशोधन आणि मनन करते तेव्हा यहोवाने त्या गोष्टी तिच्यासाठीच लिहिल्या आहेत असं तिला वाटतं! जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगता तेव्हा या जगाकडे आणि त्याचं भविष्यात जे होईल त्याकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहता. हे अद्भुत ज्ञान आणि समज यहोवा तुम्हाला देतो. पण का? कारण त्याची इच्छा आहे की तुमच्या जीवनात कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे तुम्ही जाणून घ्यावं. तसंच, तुम्ही चांगले निर्णय घ्यावेत आणि भविष्याकडे निर्भयपणे पाहावं असंही त्याला वाटतं.—यश. २६:३. टेहळणी बुरूज१८.१२ २६ ¶९-१०