ऑक्टोबर
गुरुवार, १ ऑक्टोबर
आनंद करणाऱ्यांसोबत आनंद करा.—रोम. १२:१५.
आपण यहोवा आणि येशूप्रमाणे लोकांची मने जाणू शकत नसलो तरी आपण इतरांच्या भावना आणि गरजा समजण्याचा प्रयत्न करू शकतो. (२ करिंथ. ११:२९) आपण या स्वार्थी जगासारखं “फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू [नये], तर इतरांच्या फायद्याचाही विचार” करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. (फिलिप्पै. २:४) मंडळीतल्या वडिलांनी खासकरून सहानुभूती दाखवण्याची गरज आहे. यहोवाने त्यांना कळपाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. आणि त्यांना माहीत आहे की यासाठी त्यांना यहोवाला हिशोब द्यावा लागेल. (इब्री १३:१७) आपल्या सहविश्वासू जणांना मदत करण्यासाठी वडिलांनी सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे. मग वडील हा गुण कसा दाखवू शकतात? इतरांबद्दल सहानुभूती दाखवणारे वडील ख्रिस्ती बंधुभगिनींना वेळ देतात. ते प्रश्न विचारून खूप धीराने आणि लक्षपूर्वकपणे त्यांचं ऐकतात. एखाद्याला आपलं मन मोकळं करायचं असतं, पण शब्द सुचत नाहीत तेव्हा असं करणं खासकरून गरजेचं असतं. (नीति. २०:५) स्वेच्छेने आपला वेळ देऊन वडील आपल्या बंधुभगिनींसोबत विश्वासाचं आणि मैत्रीचं एक मजबूत बंधन तयार करत असतात.—प्रे. कार्ये २०:३७. टेहळणी बुरूज१९.०३ १७ ¶१४-१७
शुक्रवार, २ ऑक्टोबर
रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.—नीति. २५:११.
कृतज्ञता ही अन्नासारखी आहे. आपण जेव्हा ते इतरांसोबत वाटून खातो तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. त्याच प्रकारे, आपल्याबद्दल कोणी कृतज्ञता व्यक्त केली तर आपल्याला आनंद होतो. तसंच, आपण जेव्हा इतरांचे आभार मानतो तेव्हा त्यांनाही आनंद होतो. आपण ज्यांचे आभार मानतो त्यांना जाणीव होते, की आपल्याला मदत करण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले किंवा आपल्याला जी मदत पुरवली त्याचं चीज झालं आहे. यामुळे आपल्यातली मैत्री आणखी घनिष्ठ होते. आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आपण व्यक्त केलेली कृतज्ञता मौल्यवान असते. जरा कल्पना करा, चांदीच्या परडीत सोन्याची फळं ठेवली तर ती किती सुंदर दिसतील! इतकंच काय तर ती मौल्यवानही असतील! तुम्हाला जर अशी भेट मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला ती नक्कीच आवडेल. त्याच प्रकारे, तुम्ही शब्दांतून व्यक्त केलेली कृतज्ञता इतरांसाठी तितकीच मौल्यवान ठरू शकते. आणखी एका गोष्टीचा विचार करा: फळ सोन्याचं असेल तर ते खूप काळापर्यंत टिकूही शकतं. हीच गोष्ट आभार प्रदर्शित करण्याबाबतीतही लागू होते. तुम्ही एखाद्याचे आभार मानले तर त्याला त्याची आयुष्यभर आठवण राहील. टेहळणी बुरूज१९.०२ १५ ¶५-६
शनिवार, ३ ऑक्टोबर
मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे.—उत्प. ३:२२.
आदाम आणि हव्वा यांनी बऱ्यावाइटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की त्यांना यहोवावर आणि त्याच्या स्तरांवर भरवसा नाही. बरं काय आणि वाईट काय याबद्दल त्यांनी स्वतः स्तर ठरवण्याची निवड केली. पण असं केल्यामुळे त्यांनी काय गमावलं याचा जरा विचार करा. त्यांनी यहोवासोबतची आपली मैत्री गमावली. इतकंच काय तर त्यांनी सर्वकाळ जगण्याची संधीदेखील गमावली. त्यासोबतच त्यांच्या मुलांच्या वाट्याला पाप आणि मृत्यूचा वारसा आला. (रोम. ५:१२) पण आदाम आणि हव्वा यांच्या तुलनेत कूशी षंढ मात्र वेगळ्या पद्धतीने वागला. फिलिप्पने जेव्हा कूशी षंढाला प्रचार केला तेव्हा त्याने लगेच पाऊल उचललं. यहोवा आणि येशू यांनी त्याच्यासाठी जे केलं होतं त्याबद्दल त्याला इतकी कृतज्ञता वाटली की त्याने लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्ये ८:३४-३८) देवाला समर्पण करून त्या षंढासारखं आपण बाप्तिस्म्याचं पाऊल उचलतो, तेव्हा आपणही स्पष्टपणे दाखवून देतो की यहोवा आणि येशू यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला कदर आहे. तसंच, यहोवावर भरवसा असल्याचंही आपण दाखवून देतो आणि बऱ्यावाइटाबद्दल स्तर ठरवण्याचा अधिकार यहोवालाच आहे हेही आपण मान्य करतो. टेहळणी बुरूज१९.०३ २ ¶१-२
रविवार, ४ ऑक्टोबर
मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.—ईयो. २७:५.
देवाचे सेवक देवावर अतूट आणि पूर्ण मनाने प्रेम करण्याद्वारे खरेपणा दाखवतात. आणि यामुळे ते नेहमी अशी कार्य करतात ज्यामुळे देवाचं मन आनंदित होईल. ‘खरेपणा’ या शब्दासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ संपूर्ण, निर्दोष किंवा चांगल्या स्थितीत असणं असा होतो. उदाहरणार्थ, नियमानुसार यहोवाला असा प्राणी अर्पण करायचा होता ज्यात कोणताच दोष नव्हता. (लेवी. २२:२१, २२) आंधळे, लंगडे किंवा एखाद्या प्राण्याला कान नसेल, तर असे प्राणी त्यांनी अर्पण करू नये अशी त्यांना आज्ञा देण्यात आली होती. तो प्राणी संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असणं यहोवासाठी खूप महत्त्वाचं होतं. (मला. १:६-९) संपूर्ण आणि निर्दोष हे पैलू यहोवासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे आपण एका उदाहरणावरून समजू शकतो. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेता, जसं की फळ, पुस्तक किंवा एखादं साधन, आणि जर ते फळ सडलेलं असलं, त्या पुस्तकात काही पानं नसले, किंवा त्या साधनात काही भाग नसले, तर तुम्ही ते घेणार का? नक्कीच नाही! आपल्याला ती वस्तू अगदी पूर्ण, काहीही दोष नसलेली आणि चांगली हवी असते. त्याच प्रकारे, यहोवाला वाटतं की त्याच्यासाठी असलेलं आपलं प्रेम आणि खरेपणा संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असायला हवा. टेहळणी बुरूज१९.०२ ३ ¶३
सोमवार, ५ ऑक्टोबर
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.—स्तो. ११९:९७.
चुकीच्या प्रभावांपासून आपलं रक्षण होण्यासाठी आपल्या हृदयाचं फाटक बंद करणंच फक्त पुरेसं नाही, तर चांगल्या गोष्टींसाठी ते उघडणंही गरजेचं आहे. शत्रू शहराच्या आत येऊ नये म्हणून भिंती असलेल्या शहरात द्वारपाल फाटक बंद करतो. पण अन्न किंवा इतर सामग्री आत आणण्यासाठी त्याला इतर वेळी फाटक उघडावं लागतं. पण जर फाटक नेहमीच बंद ठेवलं तर शहरातले लोक उपाशी राहतील. त्याच प्रकारे, देवाच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव होण्यासाठी आपण हृदयाचं फाटक नियमितपणे उघडलं पाहिजे. बायबलमध्ये यहोवाचे विचार दिले आहेत. म्हणून आपण प्रत्येक वेळी जेव्हा बायबल वाचतो तेव्हा आपण यहोवाच्या विचारांचा आपल्या विचारांवर, भावनांवर व कार्यांवर प्रभाव होऊ देतो. आपण बायबल वाचनातून पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकतो? वचनात दिलेल्या ‘अद्भुत गोष्टी’ स्पष्ट दिसण्यासाठी मदत व्हावी म्हणून प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. (स्तो. ११९:१८) आपण वाचलेल्या गोष्टींवर मननही केलं पाहिजे. आपण जेव्हा प्रार्थना करतो, बायबल वाचतो आणि मनन करतो तेव्हा देवाच्या वचनात दिलेल्या गोष्टी “आपल्या अंतःकरणात” खोलवर जातात आणि यहोवाची विचारसरणी आपल्याला प्रिय वाटू लागते.—नीति. ४:२०-२२. टेहळणी बुरूज१९.०१ १८ ¶१४-१५
मंगळवार, ६ ऑक्टोबर
आपण येशूच्या द्वारे नेहमी देवाला स्तुतीचे बलिदान . . . अर्पण करू या.—इब्री १३:१५.
यहोवाला माहीत आहे की आपली क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने दिलेल्या बलिदानाला तो खूप मौल्यवान लेखतो. इस्राएली लोकांनी दिलेली कोणकोणती बलिदानं त्याने स्वीकारली याचा जरा विचार करा. काही इस्राएली लोक मेंढी किंवा बकरी अर्पण करायचे. पण सर्वांचीच तशी ऐपत नव्हती. अशा वेळी गरीब इस्राएली लोक कदाचित “दोन होले अथवा पारव्याची दोन पिले” अर्पण करायचे. आणि जर त्यांना दोन पक्षी अर्पण करणं शक्य नसलं तर यहोवा “एक दशमांश एफा सपीठ” हेदेखील स्वीकारायचा. (लेवी. ५:७, ११) पीठ स्वस्त असलं तरी यहोवा या बलिदानालाही मौल्यवान लेखायचा! अट फक्त हीच होती की ते “सपीठ” किंवा ‘चांगलं पीठ’ असावं. आपल्या दयाळू देवाला आपल्याबद्दलही असंच वाटतं. आपण जेव्हा उत्तरं देतो तेव्हा आपण सर्वांनीच अपुल्लोसारखं प्रभावी वक्ता किंवा पौलसारखं खात्री पटवून देणारे असायला हवं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (प्रे. कार्ये १८:२४; २६:२८) आपल्या परीने आपण जितकी चांगली उत्तरं देऊ शकतो तितकीच तो आपल्याकडून अपेक्षा करतो. दानपत्रांत दोन छोटी नाणी टाकणाऱ्या विधवेच्या उदाहरणाचा विचार करा. तिने आपलं सर्वोत्तम दिलं यासाठी ती यहोवाच्या नजरेत मौल्यवान होती.—लूक २१:१-४. टेहळणी बुरूज१९.०१ ८-९ ¶३-५
बुधवार, ७ ऑक्टोबर
माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील.—मत्त. १०:२२.
आपल्याला अपेक्षित आहे की ख्रिस्ताचे अनुयायी यानात्याने आपला द्वेष केला जाईल. शेवटच्या दिवसांत येशूच्या शिष्यांचा तीव्र छळ केला जाईल असं त्याने आधीच सांगितलं होतं. (मत्त. २४:९; योहा. १५:२०) यशयाच्या भविष्यवाणीमुळे आपल्याला इशारा मिळतो, की आपले शत्रू फक्त आपला द्वेषच करणार नाहीत तर आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या हत्यारांचाही वापर करतील. ते कदाचित आपली फसवणूक करतील किंवा आपल्याबद्दल खोटं पसरवतील अथवा आपला तीव्र छळही करतील. (मत्त. ५:११) यहोवा शत्रूंना आपल्याविरुद्ध हत्यारांचा वापर करण्यापासून थांबवणार नाही. (इफिस. ६:१२; प्रकटी. १२:१७) पण अशा वेळी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. यहोवाने म्हटलं की आपल्याविरुद्ध चालवले जाणारे “कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) ज्या प्रकारे एक भिंत भयानक वादळी पावसापासून आपलं संरक्षण करते, त्याच प्रकारे यहोवा आपलं ‘निर्दय लोकांच्या झपाट्यापासून’ संरक्षण करतो. (यश. २५:४, ५) आपले शत्रू आपल्याला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवण्यात कधीच यशस्वी होणार नाहीत. (यश. ६५:१७) देवाच्या लोकांचे शत्रू “शून्यवत् व नष्ट होतील.”—यश. ४१:११, १२. टेहळणी बुरूज१९.०१ ६-७ ¶१३-१६
गुरुवार, ८ ऑक्टोबर
जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.—२ करिंथ. ३:१७.
तरुणांनो, यहोवाला स्वातंत्र्य आवडतं आणि आपल्यालाही ते आवडतं, कारण त्याने आपली रचनाच तशी केली आहे. पण त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा सुज्ञपणे वापर करावा. कारण यामुळे तुमचं रक्षण होतं. तुमचे काही सोबती कदाचित पोर्नोग्राफी बघत असतील, अनैतिक लैंगिक कार्यं करत असतील, जीव धोक्यात घालणारे खेळ खेळत असतील, अती प्रमाणात दारू किंवा ड्रग्सचं सेवन करत असतील. सुरुवातीला या गोष्टी कदाचित खूप मजेशीर वाटू शकतात, पण सहसा त्यांचे वाईट परिणामच घडून येतात. जसं की, एखादा आजार जडणं किंवा व्यसन लागणं. आणि कधीकधी तर यामुळे मरणही येतं. (गलती. ६:७, ८) जे तरुण अशा गोष्टी करतात त्यांना कदाचित वाटतं की ते स्वतंत्र आहेत. पण तसं नसतं, खरंतर ते स्वतःला फसवत असतात. (तीत ३:३) दुसरीकडे पाहता, यहोवाला आज्ञाधारक राहिल्याने आपलं भलं होतं. त्यामुळे आपलं शारीरिक नुकसान होत नाही आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. (स्तो. १९:७-११) तसंच स्वातंत्र्याचा सुज्ञपणे वापर करण्याद्वारे, म्हणजे यहोवाच्या परिपूर्ण नियमांचं व तत्त्वांचं पालन करण्याद्वारे तुम्ही देवाला आणि तुमच्या पालकांना दाखवत असता की तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. यामुळे कदाचित तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर आणखी भरवसा वाढेल आणि ते तुम्हाला जास्त स्वातंत्र्यही देतील.—रोम. ८:२१. टेहळणी बुरूज१८.१२ २२-२३ ¶१६-१७
शुक्रवार, ९ ऑक्टोबर
पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.—उत्प. २:२४.
आदामने पाप केलं तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यांपैकी एक बदल म्हणजे मानवांचा मृत्यू होऊ लागला आणि त्याचा प्रभाव विवाहावरही पडला. प्रेषित पौलने ख्रिश्चनांना सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचं विवाहबंधन तुटतं आणि तिचा जोडीदार परत लग्न करू शकतो. (रोम. ७:१-३) देवाने इस्राएल राष्ट्राला जे नियमशास्त्र दिलं त्यात विवाहाबद्दल काही नियम दिले होते. उदाहरणार्थ, इस्राएली पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करायची परवानगी होती. ही प्रथा यहोवाने त्यांना नियमशास्त्र देण्याआधीपासूनच चालत आली होती. पण, नियमशास्त्रामुळे स्त्रियांचं आणि मुलांचं गैरवागणूकीपासून संरक्षण झालं. उदाहरणार्थ, एखाद्या इस्राएली पुरुषाने एका दासीसोबत लग्न केलं आणि नंतर जरी त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं, तरी पहिल्या पत्नीच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी अजूनही त्याच्यावरच होती. त्याने तिचा सांभाळ आणि संरक्षण करावं अशी यहोवाची इच्छा होती. (निर्ग. २१:९, १०) हे खरं आहे की आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही. पण त्या नियमांवरून आपल्याला समजतं की यहोवाच्या नजरेत विवाह खूप मौल्यवान होता. यामुळे आपल्याला विवाहाचा आदर करण्याचं उत्तेजन मिळतं. टेहळणी बुरूज१८.१२ १० ¶३; ११ ¶५-६
शनिवार, १० ऑक्टोबर
तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.—हब. १:५.
आपल्या चिंता ऐकून यहोवा काय प्रतिक्रिया देईल असा प्रश्न कदाचित हबक्कूकला पडला असावा. पण एका प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवाने हबक्कूकच्या भावना समजून घेतल्या. त्याला माहीत होतं की हबक्कूक दुःखात आहे आणि मदतीसाठी त्याच्याकडे याचना करत आहे. यहोवा त्याला ओरडला नाही. याउलट, त्याने हबक्कूकला सांगितलं की तो लवकरच अविश्वासू यहुदी लोकांना शिक्षा करणार आहे. खरंतर, हबक्कूक हा पहिला संदेष्टा असावा ज्याला याबद्दल माहिती मिळाली. यहोवा लवकरच कार्य करणार आहे हे त्याने हबक्कूकला समजावलं. तो यहूदातल्या दुष्ट आणि हिंसक लोकांना शिक्षा करणार होता. हे “तुमच्या काळी” होईल असं सांगून यहोवाने दाखवलं की हा न्यायदंड हबक्कूक किंवा त्याच्या काळातले यहूदातले लोक जिवंत असेपर्यंत येईल. यहोवाने जे उत्तर दिलं ते हबक्कूकला अपेक्षित नव्हतं. टेहळणी बुरूज१८.११ १५ ¶७-८
रविवार, ११ ऑक्टोबर
[देवाची] अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान मिळावे.—१ तीम. २:४.
ज्यांना सत्य माहीत नाही अशांबद्दल आपण काय विचार करतो? प्रेषित पौलने अशा यहुदी लोकांना प्रचार केला ज्यांना यहोवाबद्दल माहीत होतं. पौलच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यादरम्यान तो आणि बर्णबा लुस्त्र शहरात गेले. तिथल्या स्थानिक लोकांनी पौल आणि बर्णबा यांना खूप विशेष वागणूक दिली. त्यांनी या दोघांना त्यांच्या खोट्या दैवतांच्या म्हणजे, झ्यूस आणि हर्मेस या नावांनी संबोधलं. पण यामुळे पौल आणि बर्णबा यांना आपण सर्वांपेक्षा खूप श्रेष्ठ आहोत असं वाटलं का? इथे येण्याआधी इतर दोन शहरांत त्यांचा छळ झाला, त्याच्या तुलनेत या शहरात मिळालेली वागणूक त्यांना आवडली का? इतकी लोकप्रियता मिळाल्यामुळे अनेक जण आनंदाचा संदेश ऐकतील असा त्यांनी विचार केला का? नाही. याउलट, त्यांना हे सर्व मुळीच आवडलं नाही. ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “लोकांनो, तुम्ही हे सर्व का करत आहात? आम्हीही तुमच्यासारख्याच दुर्बलता असलेली माणसं आहोत.”—प्रे. कार्ये १४:८-१५. टेहळणी बुरूज१८.०९ ४-५ ¶८-९
सोमवार, १२ ऑक्टोबर
अनीतिमान माणसे देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का? . . . तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आले आहे; . . . तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आले आहे.—१ करिंथ. ६:९, ११.
सत्य शिकून बायबल स्तरांनुसार जीवन जगण्यासाठी आपण आपल्या विचारांमध्ये आणि कार्यांमध्ये बदल करायला तयार असलं पाहिजे. प्रेषित पेत्रने लिहिलं: “आज्ञाधारक मुलांप्रमाणे व्हा आणि पूर्वी अज्ञानात असताना ज्या इच्छा तुम्ही बाळगत होता, त्यांनुसार वागण्याचे सोडून द्या.” पुढे त्याने म्हटलं: “आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.” (१ पेत्र १:१४, १५) प्राचीन करिंथ शहरात बरेच लोक अनैतिक कार्यं करायचे. पण यहोवाच्या नजरेत शुद्ध होण्यासाठी त्या लोकांना मोठमोठे बदल करण्याची गरज होती. आजही सत्य शिकल्यावर अनेक जण तसेच बदल करतात. पेत्रने याबद्दल लिहिलं: “जगाच्या लोकांच्या इच्छेनुसार वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला. कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसेच प्रमाणाबाहेर पिणे, बेलगाम मौजमस्ती, दारूबाजी आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता.”—१ पेत्र ४:३. टेहळणी बुरूज१८.११ ६ ¶१३
मंगळवार, १३ ऑक्टोबर
सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या सर्वांनी विश्वास स्वीकारला.—प्रे. कार्ये १३:४८.
“सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या” लोकांना आपण कसं शोधू शकतो? पहिल्या शतकातील ख्रिश्चनांजवळ अशा लोकांना शोधण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे प्रचार करणं. येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं: “कोणत्याही शहरात किंवा गावात गेल्यावर तिथे कोण योग्य आहे हे शोधून काढा.” (मत्त. १०:११) आज आपल्यालाही तेच करणं गरजेचं आहे. पण जर लोक अप्रामाणिक, गर्विष्ठ किंवा देवाबद्दल कदर बाळगणारे नसले, तर अशा लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा ही अपेक्षा आपण करू नये. आपण प्रचारात अशा लोकांना शोधत आहोत जे प्रामाणिक, नम्र आणि सत्य जाणून घेण्याची इच्छा बाळगणारे आहेत. आपण आज अशा लोकांना शोधण्याचं जे काम करत आहोत त्याची तुलना आपण येशूच्या सुतारकामाशी करू शकतो. लाकडापासून एखादं दार, शेतीसाठी जू किंवा इतर काही वस्तू बनवण्याआधी येशूला योग्य प्रकारचं लाकूड शोधणं गरजेचं होतं. त्यानंतर तो साधनांचा आणि त्याच्या कौशल्याचा उपयोग करून ती वस्तू बनवू शकत होता. त्याच प्रकारे, आज आपल्याला आधी प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधावं लागेल. मग आपण आपल्याजवळ असलेली साधनं आणि कौशल्य यांचा उपयोग करून त्या लोकांना शिष्य बनण्यासाठी मदत करू शकतो.—मत्त. २८:१९, २०. टेहळणी बुरूज१८.१० १२ ¶३-४
बुधवार, १४ ऑक्टोबर
फिलिप्प शोमरोनच्या शहरात जाऊन तिथल्या लोकांना ख्रिस्ताविषयी शिकवू लागला.—प्रे. कार्ये ८:५.
बदलत्या परिस्थितींत सेवाकार्यावर लक्ष केंद्रित ठेवण्याच्या बाबतीत प्रचारक फिलिप्पने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं. त्याला यरुशलेममध्ये नवीन नेमणूक मिळाली होती. (प्रे. कार्ये ६:१-६) पण मग सर्वकाही बदललं. स्तेफनला मारून टाकण्यात आलं. त्यानंतर तिथल्या ख्रिश्चनांना खूप छळ सहन करावा लागला. त्यामुळे ख्रिस्ती यरुशलेममधून पळून गेले. पण फिलिप्पला मात्र यहोवाच्या सेवेत व्यस्त राहायचं होतं आणि म्हणून आनंदाचा संदेश सांगण्यासाठी तो शोमरोन शहरात गेला. याआधी तिथल्या लोकांना कधीच प्रचार करण्यात आला नव्हता. (मत्त. १०:५; प्रे. कार्ये ८:१, ५) देवाच्या आत्म्याने फिलिप्पला जिथे कुठे जाण्याचं निर्देशन दिलं, तिथे तो जाण्यासाठी तयार होता. यामुळे यहोवाने त्याला अशा ठिकाणी पाठवलं जिथे लोकांनी कधीच आनंदाचा संदेश ऐकला नव्हता. बरेच यहुदी, शोमरोनी लोकांना तुच्छ लेखायचे आणि त्यांना वाईट वागणूक द्यायचे. पण फिलिप्प तसा वागला नाही. मनात कोणताही भेदभाव न बाळगता त्याने तिथल्या लोकांना मोठ्या उत्सुकतेने आनंदाचा संदेश सांगितला. याचा परिणाम म्हणजे, शोमरोनी लोकांनी “त्याचे बोलणे मन लावून” ऐकले. (प्रे. कार्ये ८:६-८) तो सेवाकार्यात व्यस्त राहिला. यामुळे यहोवा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देत राहिला.—प्रे. कार्ये २१:८, ९. टेहळणी बुरूज१८.१० ३० ¶१४-१६
गुरुवार, १५ ऑक्टोबर
एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.—इब्री १०:२४.
एके दिवशी जेव्हा येशू दकापलीस या क्षेत्रात होता तेव्हा “लोकांनी एका बहिऱ्या माणसाला त्याच्याकडे आणले.” (मार्क ७:३१-३५) येशूने त्याला सर्वांसमोर बरं केलं नाही. असं का? कारण बहिरा असल्यामुळे कदाचित त्याला मोठ्या जमावामध्ये अवघडल्यासारखं वाटत असावं. येशूने त्याच्या भावना समजून घेतल्या आणि “त्याला एका बाजूला, गर्दीपासून दूर नेले” व बरं केलं. ही गोष्ट खरी आहे, की आपण असे चमत्कार करू शकत नाही. पण आपण आपल्या बंधुभगिनींच्या भावनांचा, गरजांचा नक्कीच विचार करू शकतो आणि त्यांना दया दाखवू शकतो. त्या बहिऱ्या माणसाच्या भावना येशूने ओळखल्या आणि तो त्याच्याशी दयाळूपणे वागला. तसंच, वयस्क आणि शारीरिक विकलांगता असलेल्यांबद्दल आपण विचारशील असलं पाहिजे. ख्रिस्ती मंडळीची सर्वात महत्त्वाची गोष्ट, निपुणता नसून प्रेम आहे. (योहा. १३:३४, ३५) आपण प्रेमामुळेच शारीरिक विकलांगता असलेल्यांना सभेला आणि प्रचाराला नेण्यासाठी आपल्या परीने जितकं होऊ शकतं तितकं करण्याचं प्रयत्न करतो. आपल्याला सोईस्कर नसलं किंवा ते जास्त करू शकत नसले तरी आपण त्यांना मदत करतो.—मत्त. १३:२३. टेहळणी बुरूज१८.०९ २९-३० ¶७-८
शुक्रवार, १६ ऑक्टोबर
आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याची उन्नती होण्यासाठी त्याचे भले करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.—रोम. १५:२.
यहोवाला आणि येशूला त्यांचा प्रत्येक सेवक खूप मौल्यवान आहे. (गलती. २:२०) आपण आपल्या बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करतो, म्हणून त्यांच्याशी आपण कोमलतेने वागलं पाहिजे. “शांतीसाठी आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.” (रोम. १४:१९) आपण सर्वच जण नंदनवनात जगण्याचं स्वप्न पाहत आहोत, कारण तिथे कोणीही निराश होणार नाही. तिथे कोणत्याही प्रकारचं आजारपण नसेल, कोणतंही युद्ध नसेल. पापी असल्यामुळे लोकांचा मृत्यू होणार नाही, आणि तिथे छळ, कौटुंबिक समस्या किंवा अपयशामुळे निराशा नसणार. हजार वर्षांच्या शेवटी सर्व लोक परिपूर्ण झालेले असतील. शेवटच्या परीक्षेत जे टिकून राहतील त्यांना या पृथ्वीवरच यहोवा मुलं म्हणून आपल्या कुटुंबात सामील करेल आणि त्या सर्वांना “देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य मिळेल.” (रोम. ८:२१) भविष्यात या सुंदर गोष्टी मिळणार असल्यामुळे आज आपण सर्व इतरांना प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहू या आणि देवाच्या नवीन जगात जाण्यासाठी एकमेकांना मदत करत राहू या. टेहळणी बुरूज१८.०९ १४ ¶१०; १६ ¶१८
शनिवार, १७ ऑक्टोबर
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.—स्तो. ११९:९७.
देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात फक्त माहिती वाचणं किंवा प्रश्नांची उत्तरं शोधणं इतकंच सामील नाही. तर एखाद्या माहितीवर अभ्यास करताना आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो, जसं की यहोवा कोण आहे? त्याची कार्यं कशी आहेत? त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे? याबद्दल मला काय शिकायला मिळतं? यहोवा आपल्याला एखादी गोष्ट का करायला सांगतो, किंवा ती करायला मनाई का करतो हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तसंच अभ्यास करताना, आपल्याला आपल्या जीवनात आणि विचारसरणीत कुठे बदल करण्याची गरज आहे हेदेखील कळतं. हे खरं आहे की अभ्यास करताना प्रत्येक वेळी या सर्व मुद्यांवर विचार करणं कदाचित आपल्याला शक्य होणार नाही. पण आपण जी माहिती वाचतो त्यावर मनन करण्यासाठी वेळ काढणं आपल्या फायद्याचं आहे. म्हणून मग आपण अभ्यासासाठी जितका वेळ ठरवला आहे त्यातला कमीतकमी अर्धा वेळ मनन करण्यासाठी दिला पाहिजे. (१ तीम. ४:१५) आपण नियमितपणे देवाच्या वचनावर मनन केलं तर आपल्याला ‘खातरी पटते’ की यहोवाची विचार करण्याची पद्धत ही सर्वोत्तम आहे. यहोवा असा दृष्टिकोन का बाळगतो हे आपल्याला समजू लागतं आणि कालांतराने आपल्याला ते पटतंही. (रोम. १२:२) यामुळे आपण आपली विचारसरणी बदलून हळूहळू जीवनातील प्रत्येक पैलूत यहोवासारखा विचार करू लागतो. टेहळणी बुरूज१८.११ २४ ¶५-६
रविवार, १८ ऑक्टोबर
आपण देवाचे सहकारी आहोत.—१ करिंथ. ३:९.
पौलने म्हटलं की तो आणि इतर ख्रिश्चन “देवाचे सहकारी” आहेत, कारण ते लोकांना प्रचार करायचे आणि त्यांना सत्य शिकवायचे. (१ करिंथ. ३:६) आज आपणही उदारतेने आपला वेळ, शक्ती आणि भौतिक गोष्टी यांचा उपयोग प्रचार करण्यासाठी करू शकतो. असं करण्याद्वारे आपणही “देवाचे सहकारी” बनू. हा खरंच किती मोठा बहुमान आहे! उदारपणे आपल्या वेळेचा आणि शक्तीचा वापर इतरांना शिकवण्यासाठी केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. बायबल अभ्यास चालवणाऱ्या बऱ्याच बंधुभगिनींनी हा आनंद अनुभवला आहे. आपला विद्यार्थी एखादी बायबलची शिकवण समजल्यावर उत्साहित होतो, त्याचा विश्वास वाढतो, तो जीवनात बदल करतो आणि मग शिकलेल्या गोष्टी इतरांनाही सांगू लागतो, तेव्हा हे सर्व पाहून आपल्याला मनापासून आनंद होतो. येशूचे ७० शिष्य जेव्हा चांगले अनुभव मिळाल्यामुळे “आनंदाने परत आले” तेव्हा त्यांना पाहून येशूलाही खूप आनंद झाला.—लूक १०:१७-२१. टेहळणी बुरूज१८.०८ २० ¶११-१२
सोमवार, १९ ऑक्टोबर
जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख.—नीति. २८:२६.
स्वतःच्या बुद्धीवर जास्त भरवसा ठेवणं एक पाश ठरू शकतं. एखाद्या गोष्टीबद्दल संपूर्ण माहिती नसली तरीदेखील आपल्याला वाटू शकतं की आपण आपल्या अनुभवामुळे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो. तसंच, आपल्या बांधवासोबत आपलं पटत नसतं, तेव्हा एखाद्या परिस्थितीत नीट विचार करून निष्कर्ष काढणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. आपसांत असलेल्या मतभेदांवरच आपण सारखा विचार करत राहिलो, तर आपण आपल्या बांधवाच्या हेतूंवर शंका घेऊ लागू. यामुळे जेव्हा आपण त्याच्याबद्दल काही नकारात्मक ऐकू, तेव्हा आपण लगेच त्यावर भरवसा ठेवू. मग त्याबद्दल काही पुरावे नसले तरीही. आपण हे कसं टाळू शकतो? आपल्या बांधवांबद्दल आपण जर मनात नकारात्मक भावना बाळगली, तर यामुळे आपण चुकीच्या निष्कर्षावर पोचू. आणि हे निष्कर्ष संपूर्ण माहितीवर आधारित नसतील. (१ तीम. ६:४, ५) यामुळे आपण कधीही आपल्या मनात बांधवांबद्दल नकारात्मक भावना, जसं की ईर्षा किंवा हेवा बाळगू नये. यहोवाची इच्छा आहे की आपण नेहमी आपल्या बांधवांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांना क्षमा केली पाहिजे. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.—कलस्सै. ३:१२-१४ टेहळणी बुरूज१८.०८ ६ ¶१५; ७ ¶१८
मंगळवार, २० ऑक्टोबर
आकाश . . . आणि पृथ्वी व तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर याचे आहे.—अनु. १०:१४.
यहोवाने मनुष्यांना निर्माण केल्यामुळे आपण सर्व जण त्याचे आहोत. (स्तो. १००:३; प्रकटी. ४:११) पण या संपूर्ण मानवजातीतून देवाने अशा काही लोकांना निवडलं आहे जे त्याच्यासाठी खूप खास आहेत. उदाहरणार्थ, स्तोत्र १३५ मध्ये प्राचीन इस्राएलात असणाऱ्या यहोवाच्या विश्वासू सेवकांबद्दल असं सांगण्यात आलं आहे की ते देवाची “वैयक्तिक मालमत्ता” होते. (स्तो. १३५:४, सुबोध भाषांतर) तसंच, होशेयने असं भाकीत केलं की काही विदेशी यहोवाचे लोक बनतील. (होशे. २:२३) जेव्हा यहोवाने इस्राएली नसलेल्या लोकांची ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवड सुरू केली तेव्हा या भविष्यवाणीची पूर्णता झाली. (प्रे. कार्ये १०:४५; रोम. ९:२३-२६) पवित्र आत्म्याने अभिषिक्त झालेल्यांना “पवित्र राष्ट्र” म्हणण्यात आलं. ते यहोवाची “खास प्रजा आहेत.” (१ पेत्र २:९, १०) पण पृथ्वीवर सर्वकाळची आशा असणाऱ्या सर्व विश्वासू ख्रिश्चनांबद्दल काय? यहोवा त्यांनाही ‘माझे लोक’ आणि “माझे निवडलेले” असं म्हणतो.—यश. ६५:२२. टेहळणी बुरूज१८.०७ २२ ¶१-२
बुधवार, २१ ऑक्टोबर
ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या . . . त्याने आपल्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा . . . बनला.—फिलिप्पै. २:५, ७.
आपण उदारता कशी दाखवू शकतो याबद्दल येशूने एक खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. (मत्त. २०:२८) म्हणून आपण स्वतःला विचारू शकतो की, ‘येशूच्या उदाहरणाचं मी आणखी जवळून अनुकरण कसं करू शकतो?’ (१ पेत्र २:२१) यहोवा आणि येशू यांनी उदार असण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं आहे. आपण जेव्हा त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. यात लोकांमध्ये मनापासून आस्था घेणं आणि त्यांना मदत करण्यासाठी मार्ग शोधणं सामील आहे. उदार असणं किती महत्त्वाचं आहे हे येशूने चांगल्या शोमरोन्याचा दाखला देण्याद्वारे सांगितलं. (लूक १०:२९-३७) येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं की त्यांनी इतरांना मदत केली पाहिजे, मग ते कोणत्याही ठिकाणाचे किंवा पार्श्वभूमीचे असले तरीही. येशूने हा दाखला का सांगितला हे तुम्हाला आठवतं का? एका यहुदी माणसाने येशूला विचारलं होतं: “मुळात माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर देताना जो दाखला सांगितला त्यावरून दिसून येतं की आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर आपल्याला त्या शोमरोनी माणसासारखं इतरांना उदारता दाखवणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१८.०८ १९ ¶५-६
गुरुवार, २२ ऑक्टोबर
देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला: “हे आशीर्वादित कुमारी! तुला शांती असो. यहोवा तुझ्यासोबत आहे.”—लूक १:२८.
मरीयाने येशूचं विश्वासूपणे संगोपन केलं आणि त्याची काळजी घेतली, यासाठी यहोवा मरीयाला स्वीकृती देत राहिला का? हो. मरीयाने जे म्हटलं आणि जी कार्यं केली त्यातल्या काही गोष्टी बायबलमध्ये नमूद केल्या जातील याकडे यहोवाने लक्ष दिलं. असं दिसून येतं की येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान ती त्याच्यासोबत ठिकठिकाणी प्रवास करू शकली नसावी. विधवा असल्यामुळे तिला कदाचित नासरेथमध्ये राहावं लागलं असेल. यामुळे इतरांसारखं सेवाकार्यातले कितीतरी सुंदर अनुभव तिला अनुभवता आले नाहीत. पण येशूच्या मृत्यूच्या वेळी मात्र ती त्याच्यासोबत होती. (योहा. १९:२६) त्यानंतर, येशूच्या शिष्यांना पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळायच्या आधी मरीया शिष्यांसोबत यरुशलेममध्ये होती. (प्रे. कार्ये १:१३, १४) इतर शिष्यांसोबत तीही अभिषिक्त झाली. म्हणजे याचा अर्थ स्वर्गात सर्वकाळासाठी येशूसोबत राहण्याची तिला संधी मिळाली. विश्वासूपणे केलेल्या तिच्या सेवेसाठी खरंच हा किती मोठा आशीर्वाद होता! टेहळणी बुरूज१८.०७ ९ ¶११; १० ¶१४
शुक्रवार, २३ ऑक्टोबर
सर्व देवाच्या गौरवासाठी करा.—१ करिंथ. १०:३१.
येशूने तत्त्वांचा वापर करून शिष्यांना शिकवलं, की प्रत्येक व्यक्तीला तिच्या वागण्या-बोलण्याचे परिणाम भोगावे लागतात. उदाहरणार्थ, रागामुळे हिंसा घडू शकते आणि अनैतिक विचारांमुळे व्यभिचार घडू शकतो असं त्याने शिकवलं. (मत्त. ५:२१, २२, २७, २८) यहोवाच्या तत्त्वांना आपलं मार्गदर्शन करू दिल्यामुळे आपला विवेक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होतो. यामुळे देवाचा गौरव होईल असेच निर्णय आपण घेऊ. बायबल प्रशिक्षित विवेक असणाऱ्या दोन ख्रिश्चनांची काही विषयांवर मतं पूर्णपणे वेगवेगळी असू शकतात, जसं की मद्यपान. बायबलमध्ये सांगितलं आहे की मद्यपान करणं चुकीचं नाही. पण अती प्रमाणात मद्याच्या सेवनाबद्दल बायबल आपल्याला सावध करतं. (नीति. २०:१; १ तीम. ३:८) मग याचा अर्थ असा होतो का, की जर एक ख्रिस्ती व्यक्ती प्रमाणात मद्यपान करत असेल, तर तिला आणखी कोणतीच गोष्ट लक्षात घेण्याची गरज नाही? असं नाही. एखाद्याचा विवेक जरी त्याला मद्यपान करण्याची अनुमती देत असला, तरी त्याला इतरांच्या विवेकाचाही विचार करण्याची गरज आहे. टेहळणी बुरूज१८.०६ १८ ¶१०-११
शनिवार, २४ ऑक्टोबर
जागृत राहा; परूशी लोकांच्या व हेरोदच्या खमिरापासून सांभाळा.—मार्क ८:१५.
येशूने आपल्या शिष्यांना “खमिरापासून,” म्हणजेच परूशी, सदुकी आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांच्या शिकवणींपासून सावध राहण्यासाठी सांगितलं. (मत्त. १६:६, १२) विशेष म्हणजे लोक येशूला राजा बनवणार होते त्याच्या काही काळानंतरच त्याने ही ताकीद दिली. धार्मिक संघटना जेव्हा राजकीय मुद्यांचं समर्थन करतात तेव्हा सहसा हिंसेला पाठिंबा मिळतो. येशूने आपल्या शिष्यांना या बाबतीत पूर्णपणे तटस्थ राहायला सांगितलं. हेदेखील एक कारण होतं ज्यामुळे महायाजक आणि परूशी यांना येशूला ठार मारायचं होतं. त्यांना भीती होती की लोक येशूचं ऐकून आपल्याला समर्थन द्यायचं सोडून देतील. यामुळे मग त्यांच्याकडे असलेला धार्मिक आणि राजकीय अधिकार ते गमावून बसले असते. त्यांनी म्हटलं: “जर आपण त्याचं असंच चालू दिलं, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागतील आणि रोमी लोक येऊन आपलं मंदिर आणि आपलं राष्ट्रही आपल्यापासून हिरावून घेतील.” (योहा. ११:४८) यामुळे मग महायाजक कयफाने येशूला ठार मारण्याचा कट रचला.—योहा. ११:४९-५३; १८:१४. टेहळणी बुरूज१८.०६ ६-७ ¶१२-१३
रविवार, २५ ऑक्टोबर
तुमचे प्रेम निष्कपट असावे.—रोम. १२:९.
सैतान वापरत असलेला एक गळ म्हणजे अलौकिक शक्तींबद्दलची उत्सुकता. आज तो खोट्या धर्माचा आणि मनोरंजनाचा वापर करून लोकांमध्ये दुरात्म्यांबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. भूतविद्या खूप रोमांचक आहे असं चित्रपट, इलेक्ट्रॉनिक गेम्स किंवा मनोरंजनाची इतर माध्यमं भासवतात. अशा प्रकारच्या गळात अडकण्यापासून आपण स्वतःचं रक्षण कसं करू शकतो? चांगलं मनोरंजन कोणतं आणि वाईट कोणतं अशी सूची देवाच्या संघटनेने द्यावी अशी आपण अपेक्षा करू नये. यहोवाच्या स्तरांनुसार चांगल्या गोष्टी निवडण्यासाठी आपल्या विवेकाला आपण प्रशिक्षित केलं पाहिजे. (इब्री ५:१४) वर दिलेला पौलचा देवप्रेरित सल्ला जर आपण पाळला तर आपण सुज्ञपणे निवड करू. कपटी व्यक्ती बोलते एक आणि करते एक, त्यामुळे मनोरंजन निवडताना आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी इतरांना ज्या तत्त्वांबद्दल सांगतो त्या तत्त्वांचं मीदेखील पालन करतो का? मी ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करत आहे किंवा ज्यांची पुनर्भेट घेत आहे त्यांनी मी निवडलेले मनोरंजन पाहिलं तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील?’ जेव्हा आपण इतरांना सांगत असलेल्या तत्त्वांचं स्वतःदेखील पालन करतो, तेव्हा सैतान टाकत असलेल्या गळापासून वाचणं आपल्याला सोपं जातं.—१ योहा. ३:१८. टेहळणी बुरूज१८.०५ २५ ¶१३
सोमवार, २६ ऑक्टोबर
इस्राएलचे तारण व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी देवाकडे याचनासुद्धा करतो.—रोम. १०:१.
आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? सर्वात आधी “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना शोधायची आपली मनापासून इच्छा असली पाहिजे. मग प्रचार करताना चांगल्या मनाच्या लोकांनी आपला संदेश ऐकावा यासाठी आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (प्रे. कार्ये १३:४८; १६:१४) जवळपास ३० वर्षांपासून पायनियर सेवा करणाऱ्या सिलव्हाना या बहिणीनेही हेच केलं आहे. ती म्हणते की “क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या घरी जाण्याआधी मी यहोवाला प्रार्थना करते आणि सकारात्मक वृत्ती ठेवण्यासाठी मदत मागते.” आपल्या संदेशात आवड असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी देवदूतांनी आपल्याला मदत करावी यासाठीही आपण प्रार्थना केली पाहिजे. (मत्त. १०:११-१३; प्रकटी. १४:६) रॉबर्ट नावाचा बांधव ३० पेक्षा जास्त वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. तो म्हणतो, “देवदूतांना माहीत आहे की घरमालकाच्या जीवनात काय चाललं आहे, यामुळे त्यांच्यासोबत मिळून सेवाकार्य करणं हे खरंच रोमांचक आहे.” यानंतर आपण लोकांमधल्या चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ते यहोवाची सेवा करू शकतात हा दृष्टिकोन बाळगतो. कार्ल नावाचे बांधव म्हणतात: “एखादी व्यक्ती प्रामाणिक मनाची आहे का हे पाहण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो, कदाचित तिचं स्मितहास्य, तिने विचारलेला एखादा प्रामाणिक प्रश्न, किंवा मग ती आपलं लक्ष देऊन ऐकते ही सर्व प्रामाणिक असण्याची छोटी-छोटी चिन्ह आहेत.” आपण या गोष्टी केल्या तर पौलप्रमाणे आपणही “धीराने फळ” उत्पन्न करत राहू. टेहळणी बुरूज१८.०५ १५ ¶१३; १६ ¶१५
मंगळवार, २७ ऑक्टोबर
एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण . . . एकमेकांना प्रोत्साहन देत राहावे आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त करावे.—इब्री १०:२४, २५.
आपण ज्या बंधुभगिनींना मदत केली ते अजूनही विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत हे पाहून आपल्याला आनंद होतो. प्रेषित योहानने लिहिलं: “माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही.” (३ योहा. ४) पायनियर बऱ्याच लोकांना सत्य शिकायला मदत करतात. खूप वर्षांनी त्यांना जेव्हा कळतं की त्यांचा एखादा विद्यार्थी अजूनही यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहे, कदाचित तो पायनियर बनला आहे, तेव्हा त्यांना किती आनंद होत असेल याचा विचार करा. म्हणून जर पायनियर कधी निराश झाले, तर आपण त्यांना याची आठवण करून देऊ शकतो की त्यांनी इतरांना मदत करण्यासाठी किती काही केलं आहे. बऱ्याच विभागीय पर्यवेक्षकांनी म्हटलं आहे की आभार व्यक्त करण्यासाठी बांधवांनी लिहिलेल्या पत्रांमुळे, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला खूप प्रोत्साहन मिळालं आहे. ही गोष्ट मंडळीतील वडील, मिशनरी, पायनियर आणि बेथेलमध्ये सेवा करणारे बंधुभगिनी या सर्वांच्या बाबतीतही खरी आहे. हे सर्व लोक यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत. म्हणून ते करत असलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानण्याद्वारे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. टेहळणी बुरूज१८.०४ २३ ¶१४-१५
बुधवार, २८ ऑक्टोबर
राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जायचे.—अनु. १७:१७.
शलमोनने ही आज्ञा पाळली नाही आणि त्याने ७०० पत्नी आणि ३०० उपपत्नी केल्या. (१ राजे ११:३) त्यातल्या अनेक जणी खोट्या दैवतांच्या उपासक होत्या. अशा प्रकारे इस्राएली नसलेल्या स्त्रियांशी लग्न न करण्याबद्दल देवाची जी आज्ञा होती, तिचंही पालन करण्यात शलमोन अपयशी ठरला. (अनु. ७:३, ४) हळूहळू शलमोनने यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं सोडून दिलं. शेवटी त्याने अत्यंत वाईट गोष्ट केली. त्याने खोट्या दैवतांसाठी वेद्या उभारल्या जसं की अष्टोरेथ आणि कमोश या दैवतांसाठी. अशा वेद्या त्याने यरुशलेममधल्या यहोवाच्या मंदिरासमोर असणाऱ्या डोंगरावरही बनवल्या! (१ राजे ११:५-८; २ राजे २३:१३) आपण जर यहोवाच्या मंदिरात अर्पणं देत राहिलो, तर यहोवा आपल्या पापाकडे दुर्लक्ष करेल असा विचार करून शलमोन स्वतःला फसवत राहिला. पण यहोवा पापाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. टेहळणी बुरूज१८.०७ १८-१९ ¶७-९
गुरुवार, २९ ऑक्टोबर
विश्वासाची मोठी ढाल हाती घ्या, ज्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे सर्व जळते बाण विझवू शकाल.—इफिस. ६:१६.
सैतान तुमच्यावर कोणते “जळते बाण” सोडू शकतो? कदाचित यहोवाबद्दल खोटं बोलून तो तुमच्यावर हल्ला करतो. यहोवाचं तुमच्यावर प्रेम नाही आणि कोणालाच तुमची पर्वा नाही असा तुम्ही विचार करावा, अशी सैतानाची इच्छा आहे. १९ वर्षांची आयडा म्हणते: “मला बऱ्याचदा वाटतं की यहोवाशी माझं नातं घनिष्ठ नाही आणि त्याला माझा मित्र बनण्याची इच्छा नाही.” मग असं जेव्हा तिला वाटतं तेव्हा ती काय करते? “ख्रिस्ती सभांमुळे माझा विश्वास कमालीचा मजबूत होतो. आधी मी सभांमध्ये नुसतीच बसायचे, उत्तरं द्यायचे नाही. मला जे बोलायचं आहे ते कोणालाच ऐकायचं नाही असा मी विचार करायचे. पण आता मी सभांची तयारी करते आणि दोन किंवा तीन उत्तरं देण्याचा प्रयत्न करते.” एका सैनिकाची ढाल नेहमी एकाच मापाची असायची. पण आयडाच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की विश्वास तसा नसतो. आपला विश्वास वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. ते आपल्यावर अवलंबून आहे. (मत्त. १४:३१; २ थेस्सलनी. १:३) म्हणूनच आपलं संरक्षण होण्यासाठी आपण विश्वासाच्या ढालीला मजबूत करत राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज१८.०५ २९-३० ¶१२-१४
शुक्रवार, ३० ऑक्टोबर
तारण होण्यासाठी मी काय करू?—प्रे. कार्ये १६:३०.
हा अहवाल वाचल्यावर आपल्याला कळतं की भूकंप झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याची मनोवृत्ती बदलली आणि त्याने मदत मागितली. (प्रे. कार्ये १६:२५-३४) त्याच प्रकारे आज जे लोक आपला संदेश नाकारतात, त्यांच्या जीवनात कदाचित काही प्रसंग घडल्यावर ते आपल्या संदेशात आवड दाखवू शकतात. कदाचित एखाद्याची नोकरी गेल्यामुळे त्याला धक्का बसला असेल. इतर काही लोक गंभीर आजारामुळे किंवा जवळच्या व्यक्तीला मृत्यूमध्ये गमावल्यामुळे दुःखात असतील. अशा वेळी ते जीवनाबद्दल प्रश्न विचारू लागतात. असे प्रश्न ज्यांवर कदाचित त्यांनी आधी कधीच विचार केला नसावा. त्यांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की ‘माझा बचाव होण्यासाठी मी काय केलं पाहिजे?’ अशी मनःस्थिती असल्यामुळे आधी जरी त्यांनी संदेश नाकारला असला, तरी या वेळी मात्र ते आपला आशेचा संदेश ऐकायला तयार होतील. म्हणून मग आपण विश्वासूपणे आपलं प्रचारकार्य सुरू ठेवलं, तर लोकांची मनोवृत्ती बदलल्यावर त्यांना सांत्वन देण्यासाठी आपण तयार असू.—यश. ६१:१. टेहळणी बुरूज१८.०५ १९-२० ¶१०-१२
शनिवार, ३१ ऑक्टोबर
यहोवाचा पवित्र आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केला आहे.—लूक ४:१८.
सैतानाने आज लोकांची मने आंधळी केली आहेत. लोकांना याची जाणीव नाही की ते पूर्णपणे खोट्या धर्माच्या, भौतिक गोष्टींच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या गुलामीत आहेत. (२ करिंथ. ४:४) येशूसारखंच आपल्यालाही इतरांना स्वातंत्र्य देणाऱ्या यहोवा देवाची ओळख करून देण्याचा आणि त्याची उपासना करण्यासाठी मदत करण्याचा बहुमान आहे. (मत्त. २८:१९, २०) पण प्रचार करणं नेहमीच सोपं नसतं. काही ठिकाणी लोकांना देवाबद्दल जाणून घेण्यात आस्था नसते आणि काही लोकांना तर आपला संदेश ऐकून रागदेखील येतो. असं असलं तरी यहोवाने आपल्याला प्रचार करण्याची आज्ञा दिली असल्यामुळे आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारला पाहिजे: ‘मी माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग यहोवाची सेवा जास्त प्रमाणात करण्यासाठी करू शकतो का?’ दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ आला आहे हे ओळखून आज बऱ्याच बंधुभगिनींनी आपली जीवनशैली साधी करून पायनियर सेवा सुरू केली आहे. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. (१ करिंथ. ९:१९, २३) काही बंधुभगिनी आपल्या मंडळीच्या क्षेत्रात, तर इतर काही जास्त गरज असलेल्या मंडळीत जाऊन पायनियर सेवा करतात. आज इतक्या जास्त प्रमाणात लोक आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग यहोवाची सेवा करण्यासाठी करत आहेत ही किती प्रशंसनीय गोष्ट आहे!—स्तो. ११०:३. टेहळणी बुरूज१८.०४ ११-१२ ¶१३-१४