वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es20 पृ. ८१-९४
  • जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै
  • शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०२०
  • उपशिर्षक
  • बुधवार, १ जुलै
  • गुरुवार, २ जुलै
  • शुक्रवार, ३ जुलै
  • शनिवार, ४ जुलै
  • रविवार, ५ जुलै
  • सोमवार, ६ जुलै
  • मंगळवार, ७ जुलै
  • बुधवार, ८ जुलै
  • गुरुवार, ९ जुलै
  • शुक्रवार, १० जुलै
  • शनिवार, ११ जुलै
  • रविवार, १२ जुलै
  • सोमवार, १३ जुलै
  • मंगळवार, १४ जुलै
  • बुधवार, १५ जुलै
  • गुरुवार, १६ जुलै
  • शुक्रवार, १७ जुलै
  • शनिवार, १८ जुलै
  • रविवार, १९ जुलै
  • सोमवार, २० जुलै
  • मंगळवार, २१ जुलै
  • बुधवार, २२ जुलै
  • गुरुवार, २३ जुलै
  • शुक्रवार, २४ जुलै
  • शनिवार, २५ जुलै
  • रविवार, २६ जुलै
  • सोमवार, २७ जुलै
  • मंगळवार, २८ जुलै
  • बुधवार, २९ जुलै
  • गुरुवार, ३० जुलै
  • शुक्रवार, ३१ जुलै
शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०२०
es20 पृ. ८१-९४

जुलै

बुधवार, १ जुलै

यहोवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करा.—इफिस. ५:१७.

आज आपण “अतिशय कठीण” काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१) आणि यहोवा या दुष्ट जगाचा नाश करून पृथ्वीवर खरी शांती आणेपर्यंत परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत जाणार आहे. यामुळे आपण सर्वांनीच स्वतःला पुढील प्रश्‍न विचारणं गरजेचं आहे: ‘मी मार्गदर्शन आणि मदतीसाठी कोणाकडे बघतो?’ बऱ्‍याच वर्षांआधी बायबलच्या एका लेखकाने, मदतीसाठी यहोवावर लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं आहे याबद्दल सांगितलं. (स्तो. १२३:१-४) त्याने म्हटलं की आपण जेव्हा यहोवावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण मालकावर लक्ष केंद्रित करणाऱ्‍या एका दासासारखे असतो. कोणत्या अर्थाने? एक दास आपल्या मालकावर अन्‍नासाठी, त्याच्या गरजांसाठी आणि संरक्षणासाठी अवलंबून राहतो. या गोष्टींसाठी त्याचं लक्ष मालकावर केंद्रित असतं. पण यासोबतच त्याने आपल्या मालकाची इच्छा समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार कार्य करण्यासाठीही त्याच्यावर नेहमी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच प्रकारे आपणही यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण्यासाठी दररोज त्याच्या वचनाचा खोलवर अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यानुसार कार्य केलं पाहिजे. आपण असं केलं तर आपण खातरी बाळगू शकतो की गरजेच्या वेळी यहोवा आपल्याला नक्की मदत करेल. टेहळणी बुरूज१८.०७ १२ ¶१-२

गुरुवार, २ जुलै

जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्‍त केलं तरच तुम्ही खऱ्‍या अर्थाने मुक्‍त व्हाल.—योहा. ८:३६.

येशू इथे पापाच्या दास्यातून मिळणाऱ्‍या सुटकेविषयी बोलत होता. मानवजातीने आजपर्यंत अनुभवलेल्या गुलामीच्या तुलनेत पापाची गुलामी ही सगळ्यात जास्त वाईट आहे. (योहा. ८:३४) आज आपण कोणत्या अर्थाने पापाचे गुलाम आहोत? पापामुळे आपण वाईट कामं करायला प्रेरित होतो. जे चांगलं आहे ते करण्यापासून किंवा यहोवाला आपलं सर्वोत्तम देण्यापासूनही पाप आपल्याला रोखतं. यामुळे जीवनात आपल्याला निराशा, दुःख, त्रास सहन करावा लागतो आणि शेवटी आपला मृत्यू होतो. (रोम. ६:२३) पाप पूर्णपणे काढून टाकल्यानंतरच आपल्याला आदाम-हव्वा यांच्याकडे एके काळी असलेलं खरं स्वातंत्र्य अनुभवता येईल. “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला” या येशूच्या शब्दांवरून कळतं की त्याने आपल्याला मुक्‍त करावं अशी जर आपली इच्छा असेल, तर आपल्याला काही पावलं उचलण्याची गरज आहे. (योहा. ८:३१) कोणती पावलं? समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपण स्वतःचा त्याग केला आहे आणि येशूने त्याच्या शिष्यांसाठी दिलेल्या मर्यादांचं पालन करण्याचं ठरवलं आहे. (मत्त. १६:२४) भविष्यात जेव्हा आपल्याला खंडणी बलिदानाचे संपूर्ण फायदे मिळतील, तेव्हा येशूने वचन दिल्याप्रमाणे आपल्याला खऱ्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. टेहळणी बुरूज१८.०४ ७ ¶१४-१६

शुक्रवार, ३ जुलै

सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस.—२ इति. ६:३०.

आपल्या सेवकांची विचारसरणी योग्य नसते तेव्हादेखील यहोवा त्यांच्या भावनांची कदर करतो. योनाचंच उदाहरण घ्या. देवाने त्याला निनवेविरुद्ध न्यायाचा संदेश सांगण्याची कामगिरी सोपवली होती. लोकांनी जेव्हा पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्यांना माफ करण्याचा निर्णय घेतला. पण योनाला मात्र हा निर्णय आवडला नाही. त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण होणार नाही म्हणून त्याला “राग आला.” पण यहोवा योनाशी धीराने वागला आणि त्याची विचारसरणी सुधारण्यासाठी त्याने त्याला मदत केली. (योना ३:१०–४:११) त्यानंतर योनाला आपली चूक लक्षात आली. आज आपल्याला फायदा व्हावा म्हणून हा अहवाल लिहिण्यासाठी यहोवाने त्याचा वापरही केला. (रोम. १५:४) यहोवा ज्या प्रकारे आपल्या लोकांशी वागला त्यावरून त्याला आपल्या सेवकांबद्दल सहानुभूती असल्याची खात्री आपल्याला पटते. आपल्यापैकी प्रत्येकाचं दुःख आणि त्रास त्याला माहीत आहे. आपल्या मनातल्या खोल भावना, विचार आणि आपल्या कमतरता तो जाणतो. आणि आपण “सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो [आपल्यावर] येऊ देणार नाही.” (१ करिंथ. १०:१३) देवाच्या या वचनामुळे आपल्याला खरंच खूप दिलासा मिळतो! टेहळणी बुरूज१९.०३ १६ ¶६-७

शनिवार, ४ जुलै

आपण ज्याला हिशोब देणार आहोत त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या व स्पष्ट आहेत.—इब्री ४:१३.

मोशेच्या नियमशास्त्रात नियुक्‍त केलेल्या वडीलजनांना फक्‍त आध्यात्मिक गोष्टींबद्दलच नाही, तर लोकांमधील मतभेद आणि गुन्हेगारीचे खटले यांचाही न्याय करायचा होता. याबद्दल काही उदाहरणं पाहू या. जर एखाद्या इस्राएली व्यक्‍तीने दुसऱ्‍याचा खून केला, तर त्याला लगेच मृत्युदंडाची शिक्षा दिली जात नव्हती. तो राहत असलेल्या शहराचे वडीलजन तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला याचं आधी परीक्षण करायचे आणि मग मृत्युदंडाची शिक्षा देणं योग्य आहे की नाही हे ठरवायचे. (अनु. १९:२-७, ११-१३) हे वडीलजन जीवनातील इतर पैलूंबद्दलही न्याय करायचे, जसं की मालमत्तेबद्दल वाद आणि वैवाहिक समस्या. (निर्ग. २१:३५; अनु. २२:१३-१९) या वडीलजनांनी जेव्हा नीतीने न्याय केला आणि इस्राएली लोकांनीही नियमांना पाळलं, तेव्हा त्याचा फायदा सर्वांनाच झाला आणि यामुळे यहोवाच्या नावाला गौरव मिळाला. (लेवी. २०:७, ८; यश. ४८:१७, १८) यातून कळतं की आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू यहोवासाठी महत्त्वाचा आहे. इतरांशी व्यवहार करताना आपण नेहमी प्रेमाने आणि न्यायाने वागावं अशी त्याची इच्छा आहे. तसंच, आपण जे काही बोलतो व करतो, मग ते एकट्यात का असेना, त्या सर्व गोष्टींकडे यहोवाचं लक्ष असतं. टेहळणी बुरूज१९.०२ २३ ¶१६-१८

रविवार, ५ जुलै

त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही.—यश. ५३:७.

तणावात असताना नम्र राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. आपण कदाचित इतरांशी कठोरपणे बोलू किंवा वागू. तुम्हाला कधी तणावाचा सामना करावा लागला असेल, तर येशूच्या उदाहरणातून तुम्ही बरंच काही शिकू शकता. येशू आपल्या मृत्यूच्या काही महिन्यांआधीपासून खूप तणावात होता. त्याला माहीत होतं की त्याचा खूप छळ करण्यात येईल आणि त्याला जिवे मारलं जाईल. (योहा. ३:१४, १५; गलती. ३:१३) मृत्यूच्या काही महिन्यांआधी त्याने म्हटलं होतं की तो खूप अस्वस्थ आहे. (लूक १२:५०) आणि मृत्यूच्या काही दिवसांआधी येशूने म्हटलं की “आता मी फार खिन्‍न झालो आहे.” त्याने आपल्या पित्याला केलेल्या प्रार्थनेत आपलं मन मोकळं केलं. त्यातून आपल्याला त्याचा आज्ञाधारकपणा आणि नम्रता दिसून येते. (योहा. १२:२७, २८) येशूच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा तो धैर्याने स्वतःहून शत्रूंसमोर गेला. आणि शत्रूंनी त्याला खूप लाजिरवाण्या पद्धतीने वागणूक दिली आणि त्याचा खूप छळ केला. येशू खूप तणावात होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या, तरीही त्याने नम्र राहून देवाची इच्छा पूर्ण केली. तणावात असतानाही नम्रता दाखवण्याच्या बाबतीत येशू सर्वोत्तम उदाहरण आहे, यात काहीच शंका नाही!—यश. ५३:१०. टेहळणी बुरूज१९.०२ ११ ¶१४-१५

सोमवार, ६ जुलै

एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.—इब्री १०:२४.

सभेला नियमितपणे हजर राहण्यासाठी आपल्याला कठीण परिस्थितीत कदाचित धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते. आपल्या काही बंधुभगिनींना दुःखाचा, नैराश्‍याचा किंवा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तर इतर काहींना कुटुंबाच्या किंवा सरकारी अधिकाऱ्‍यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो. असं असलं तरी ते धैर्य दाखवून सभांना हजर राहतात. काही क्षणांसाठी जरा विचार करा की विश्‍वासामुळे तुरुंगात असलेल्या आपल्या बांधवांवर आपल्या उदाहरणाचा कसा परिणाम होत असेल. (इब्री १३:३) आपण परीक्षेतही यहोवाची सेवा करत आहोत हे जेव्हा ते ऐकतात, तेव्हा त्यांना विश्‍वास, धैर्य आणि एकनिष्ठता टिकून ठेवण्यासाठी बळ मिळतं. पौल रोममध्ये तुरुंगात असताना, त्याला जेव्हा त्याच्या बांधवांबद्दल बातमी मिळायची की ते विश्‍वासूपणे देवाची सेवा करत आहेत, तेव्हा त्याला आनंद व्हायचा. (फिलिप्पै. १:३-५,१२-१४) पौलची सुटका होण्याच्या काही काळाआधी किंवा सुटका झाल्याच्या काही काळानंतर लगेच त्याने इब्री लोकांना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्याने विश्‍वासू ख्रिश्‍चनांना एकत्र भेटणं कधीही सोडू नका असं आर्जवलं.—इब्री १०:२५. टेहळणी बुरूज१९.०१ २८ ¶९

मंगळवार, ७ जुलै

सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.—१ योहा. ५:१९.

सैतानाने यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करून बंड केलं आणि तो स्वार्थी होता. आणि त्याची इच्छा आहे की आपणदेखील त्याच्यासारखं व्हावं. त्याच्याद्वारे आधीच भ्रष्ट झालेल्या लोकांना तो आपल्या अवतीभोवती ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशा वाईट लोकांसोबत राहून आपले विचार आणि कार्यं भ्रष्ट होतील हे आपल्याला माहीत असतं, पण तरीही तो आशा बाळगतो की आपण अशा लोकांसोबत वेळ घालवू. (१ करिंथ. १५:३३) यहोवाच्या बुद्धीपेक्षा मानवी बुद्धीवर भरवसा ठेवणं योग्य आहे, या विचारानेदेखील सैतान आपलं हृदय भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. (कलस्सै. २:८) सैतान बढावा देत असलेला एक विचार लक्षात घ्या. तो म्हणजे, श्रीमंत होणं ही आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असायला हवी. असा विचार करणारे लोक कदाचित श्रीमंत बनतील किंवा बनणार नाहीत. पण दोन्ही बाबतीत धोका आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण पैसा कमवण्याचं ध्येय गाठण्यासाठी ते कदाचित आपलं आरोग्य, कौटुंबिक नातेसंबंध आणि देवासोबत असलेलं त्यांचं नातंदेखील धोक्यात घालतील. (१ तीम. ६:१०) खरंच, स्वर्गात राहणारा आपला सुज्ञ पिता आपल्याला पैशांच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवायला मदत करतो. आणि यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत!—उप. ७:१२; लूक १२:१५. टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶६; १७ ¶९

बुधवार, ८ जुलै

शाब्बास, चांगल्या व विश्‍वासू दासा! तू थोड्या गोष्टींविषयी विश्‍वासू ठरला. मी तुला पुष्कळ गोष्टींवर अधिकार देईन. आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो.—मत्त. २५:२१.

येशूने प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं. पण तो पृथ्वीवर येण्याआधीही देवाच्या सेवकांना याची जाणीव होती की त्यांनी इतरांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हिज्कीया राजाच्या उदाहरणावर विचार करा. अश्‍शूरी लोक यरुशलेमवर हल्ला करणार होते तेव्हा हिज्कीयाने त्याच्या सैन्याच्या प्रमुखांना बोलावून त्यांना प्रोत्साहन दिलं. त्याच्या शब्दांवर सर्वांनी भरवसा ठेवला आणि त्यांना धैर्य मिळालं. (२ इति. ३२:६-८) आपण प्रोत्साहन देण्याबद्दल ईयोबकडूनही शिकू शकतो. खरं पाहिलं तर त्यालाच प्रोत्साहनाची गरज होती, पण तरी त्याने प्रोत्साहन कसं द्यायचं हे इतरांना शिकवलं. ईयोबला सांत्वन देण्यासाठी आलेल्या लोकांना त्याने म्हटलं, की तो जर त्यांच्या जागी असता तर त्याने सांत्वन देण्यासाठी उत्तेजन देणाऱ्‍या शब्दांचा उपयोग केला असता. त्यांना दुःख होईल असं काहीही तो बोलला नसता. (ईयो. १६:१-५) त्या लोकांनी ईयोबला सांत्वन दिलं नसलं, तरी अलीहू आणि यहोवा यांच्याकडून मात्र त्याला सांत्वन मिळालं.—ईयो. ३३:२४, २५; ३६:१, ११; ४२:७, १०. टेहळणी बुरूज१८.०४ १६ ¶६; १७ ¶८-९

गुरुवार, ९ जुलै

मी तुला शक्‍ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.—यश. ४१:१०.

यहोवा आपल्या लोकांना कशी शक्‍ती देईल याबद्दल यशयाने आधीच सांगितलं होतं. त्याने म्हटलं: “प्रभु परमेश्‍वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील.” (यश. ४०:१०) बायबलमध्ये शक्‍ती दर्शवण्यासाठी अनेकदा “भुज” किंवा बाहू या शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे यहोवाचा “भुज त्याचे प्रभुत्व चालवील” या वाक्यांशातून आपल्याला समजतं की यहोवा हा शक्‍तिशाली राजा आहे. प्राचीन काळात त्याने त्याच्या असीम सामर्थ्याचा वापर आपल्या सेवकांना साहाय्य करण्यासाठी व वाचवण्यासाठी केला होता. आणि तो आजही त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचं धैर्य वाढवतो आणि संरक्षण करतो. (अनु. १:३०, ३१; यश. ४३:१०) “मी तुला शक्‍ती देतो” हे अभिवचन यहोवा खासकरून शत्रू आपला छळ करतात तेव्हा पूर्ण करतो. आज काही देशांमध्ये शत्रू आपलं प्रचारकार्य थांबवण्याचा किंवा आपल्या संघटनेवर बंदी आणण्याचा खूप करत प्रयत्न आहेत. पण असे हल्ले होत असतानाही आपण अवाजवी चिंता करत नाही. यहोवाने आपल्याला हमी दिल्यामुळे आपल्याला धैर्य मिळतं व आपला भरवसा वाढतो. त्याने आपल्याला अभिवचन दिलं आहे: “तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.”—यश. ५४:१७. टेहळणी बुरूज१९.०१ ५-६ ¶१२-१३

शुक्रवार, १० जुलै

जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत.—मत्त. ५:३.

प्राण्यांना आध्यात्मिक गरज भासत नाही. पण आपल्याला मात्र आपल्या निर्माणकर्त्याला जाणून घ्यायची इच्छा असते. (मत्त. ४:४) जेव्हा आपण देवाचं ऐकतो तेव्हा आपल्याला समज, बुद्धी आणि आनंद मिळतो. देवाने आपल्याला बायबल दिलं आहे. तसंच, “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” याच्याद्वारे तो आपल्याला प्रकाशनं पुरवतो. (मत्त. २४:४५) या प्रकाशनांना आपण आध्यात्मिक अन्‍न असं म्हणतो कारण यामुळे आपला विश्‍वास आणि यहोवासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत होतं. यहोवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं उत्तम आध्यात्मिक अन्‍न पुरवतो! (यश. ६५:१३, १४) आध्यात्मिक अन्‍नामुळे तुम्हाला बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता मिळू शकते. यामुळे तुमचं अनेक मार्गांनी संरक्षण होऊ शकतं. (नीति. २:१०-१४) तुम्हाला खोट्या शिकवणी ओळखता येतील. जसं की, निर्माणकर्ता अस्तित्वात नाही आणि पैसे व भौतिक गोष्टींमुळे तुम्ही आनंदी व्हाल. तसंच तुम्हाला नुकसान पोहोचवणाऱ्‍या वाईट इच्छा किंवा सवयी टाळायला मदत होईल. म्हणून तुम्ही सुज्ञ बनण्यासाठी आणि योग्य विचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा. टेहळणी बुरूज१८.१२ २० ¶६-७

शनिवार, ११ जुलै

वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल.—यश. ६५:२२.

काही झाडं हजारो वर्षं जगतात. पण मानवांना इतकी वर्षं जगायचं असेल तर त्यांना सुदृढ राहणं गरजेचं आहे. मानव जर यशयाने वर्णन केलेल्या शांतीपूर्ण आणि सुंदर परिस्थितीत राहिले तर ते त्यांच्यासाठी खऱ्‍या अर्थाने नंदनवन असेल. ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होईल! भविष्यातील नंदनवनाबद्दल असलेली अभिवचनं आपल्याला काय सांगतात यावर विचार करा. संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या लोकांना देव आशीर्वादित करेल. कोणालाच हिंसा करणाऱ्‍या मानवांची किंवा प्राण्यांची भीती नसेल. आंधळे, बहिरे आणि लंगडे या लोकांना बरं केलं जाईल. लोक स्वतःची घरं बांधून त्यात राहतील आणि मळे लावून त्यांची फळं खातील. त्यांचं आयुष्य झाडांपेक्षाही जास्त असेल. बायबलमध्ये दिलेल्या या पुराव्यांवरून दिसून येतं की नंदनवन लवकरच येईल. पण काही लोक कदाचित आपल्याला म्हणू शकतात की या भविष्यवाण्या असं कुठेच सांगत नाहीत की हे सर्व पृथ्वीवर घडेल. मग नंदनवन पृथ्वीवरच येईल याचे आपल्याजवळ कोणते खात्रीलायक पुरावे आहेत? या पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वश्रेष्ठ मनुष्य, येशू ख्रिस्त याने आपल्याला याबाबतीत एक खात्रीलायक पुरावा दिला.—लूक २३:४३. टेहळणी बुरूज१८.१२ ५ ¶१३-१५

रविवार, १२ जुलै

आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.—रोम. १२:२.

आपले विचार बदलत राहू शकतात. आणि आपण ज्या गोष्टींवर जास्त विचार करण्याची निवड करतो त्यांवर हे सहसा अवलंबून असतं. जर आपण यहोवाच्या विचारसरणीवर मनन केलं तर त्याचा दृष्टिकोन नेहमी योग्यच असतो हे आपल्याला पटेल. मग त्याच्या दृष्टिकोनासारखाच आपला दृष्टिकोन असावा असं आपल्याला वाटू लागेल. पण यहोवाच्या विचारसरणीनुसार आपल्या विचारसरणीला आकार देण्यासाठी आपण “जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण” करण्याचं थांबवलं पाहिजे. याचा अर्थ आपण देवाच्या विचारसरणीनुसार नसणाऱ्‍या गोष्टी वाचण्याचं, पाहण्याचं आणि ऐकण्याचं टाळलं पाहिजे. हे किती महत्त्वाचं आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला सुदृढ व्हायचं असेल तर तो कदाचित पौष्टिक अन्‍नाचं सेवन करेल. पण जर त्याने त्यासोबतच नियमितपणे दूषित अन्‍नाचंही सेवन केलं तर त्याची सर्व मेहनत वाया जाईल. त्याच प्रकारे, जर आपण जगातल्या विचारसरणीचा आपल्या मनावर प्रभाव होऊ दिला तर यहोवाची विचारसरणी शिकून घेण्याचे आपले प्रयत्न निष्फळ ठरतील. टेहळणी बुरूज१८.११ २१ ¶१४-१५

सोमवार, १३ जुलै

आपल्या कंबरेभोवती सत्याचा पट्टा बांधा आणि . . . स्थिर उभे राहा.—इफिस. ६:१४.

आपण दररोजच्या जीवनात शिकलेल्या गोष्टी लागू करण्याचा निर्धार केला पाहिजे. बायबलमध्ये सत्याची तुलना एका सैनिकाच्या कमरपट्ट्याशी करण्यात आली आहे. बायबल काळात कमरपट्ट्यामुळे सैनिकाला युद्धात आधार आणि संरक्षण मिळायचं. पण जर तो पट्टा घट्ट बांधलेला नसला तर त्याचा काहीच उपयोग नव्हता. सत्य आपल्याला एका पट्ट्यासारखं कसं सुरक्षित ठेवतं? आपण जर बायबलची सत्यं एखाद्या पट्ट्यासारखी मनाशी घट्ट बांधून ठेवली, तर यामुळे मनात चुकीचे विचार येणार नाहीत आणि योग्य निर्णय घ्यायलाही आपल्याला मदत मिळेल. आपल्या जीवनात एखादी गंभीर समस्या उद्‌भवली किंवा आपल्याला चुकीचं काम करण्याचा मोह झाला, तर बायबलमधील सत्य आपल्याला योग्य ते करण्यासाठी मदत करू शकतात. एक सैनिक आपल्या कमरपट्ट्याशिवाय युद्धात कधीच जात नव्हता, तसंच आपणही सत्याला कधीच सोडू नये. टेहळणी बुरूज१८.११ १२ ¶१५

मंगळवार, १४ जुलै

सत्य . . . विकत घे, विकू नको.—नीति. २३:२३.

बायबलमधून सत्य शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. यासाठी आपल्याला बऱ्‍याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणून ‘सत्य विकत’ घेतल्यावर म्हणजे सत्य शिकून घेतल्यावर आपण नेहमी एका गोष्टीची दक्षता बाळगली पाहिजे. ती म्हणजे आपण कधीही ते “विकू” नये म्हणजेच सोडू नये. एखादी गोष्ट मोफत आहे याचा अर्थ असा होत नाही की त्याची काहीच किंमत नाही. नीतिसूत्रे २३:२३ या वचनात “विकत घे” यासाठी असलेल्या मूळ इब्री शब्दाचा अर्थ “मिळवणं” असादेखील होऊ शकतो. या दोन्ही शब्दांवरून आपल्याला कळतं की एखाद्या मौल्यवान गोष्टीला मिळवण्यासाठी एका व्यक्‍तीला परिश्रम घ्यावे लागतात किंवा मग त्याग करावे लागतात. आपण सत्य कसं विकत घेतो हे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाचा विचार करा. कल्पना करा की एक दुकानदार फुकटात फळं वाटत आहे. ही फळं आपोआप आपल्या घरी येतील अशी अपेक्षा आपण करू शकतो का? मुळीच नाही. फळं मिळवण्यासाठी आपल्याला त्या दुकानात जावं लागेल. त्या फळांसाठी आपल्याला काहीच पैसे मोजावे लागत नसले, तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला काही परिश्रम घेणं भाग आहे. अशा प्रकारेच सत्य शिकण्यासाठी आपल्याला पैसे देण्याची गरज नसली, तरी आपल्याला परिश्रम आणि त्याग करणं गरजेचं आहे. टेहळणी बुरूज१८.११ ४ ¶४-५

बुधवार, १५ जुलै

त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी दिसू लागले.—मत्त. १७:२.

उंच डोंगरावर जाण्यासाठी येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं होतं. तिथे पोचल्यावर त्यांनी एक रोमांचक दृष्टान्त पाहिला. येशूचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी झाले. तिथे त्यांना दोन आकृत्या दिसल्या ज्या मोशे आणि एलीया यांना सूचित करत होत्या. ते दोघं येशूसोबत त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांबद्दल बोलत होते. (लूक ९:२९-३२) यानंतर एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकून टाकलं आणि त्या ढगातून त्यांना यहोवाचा आवाज ऐकू आला! देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशूचं वैभव कसं असेल आणि त्याच्याजवळ किती शक्‍ती असेल याची एक झलक या दृष्टान्तातून मिळाली. या दृष्टान्तामुळे येशूला पुढे येणाऱ्‍या छळाचा आणि वेदनादायक मृत्यूचा सामना करण्यासाठी नक्कीच ताकद मिळाली असेल. या दृष्टान्तामुळे शिष्यांचा विश्‍वासदेखील खूप वाढला. यामुळे त्यांना पुढे येणाऱ्‍या एकनिष्ठेच्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी बळ मिळालं. तसंच, त्यांना पुढे जाऊन बरीच वर्षं सेवेत जी मेहनत घ्यायची होती त्यासाठीही त्यांना ताकद मिळाली. या घटनेच्या जवळपास ३० वर्षांनंतर पेत्रने आपल्या पत्रात त्याचा उल्लेख केला. यावरून दिसून येतं की तो दृष्टान्त त्याला अजूनही लक्षात होता.—२ पेत्र १:१६-१८. टेहळणी बुरूज१९.०३ १० ¶७-८

गुरुवार, १६ जुलै

आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो . . . खरे बोलण्याद्वारे.—२ करिंथ. ६:४, ७.

खरे ख्रिस्ती खोट्या धर्माच्या लोकांपासून कोणत्या एका बाबतीत वेगळे आहेत? ते नेहमी “खरे” बोलतात. (जख. ८:१६, १७) आपण अनोळखी लोकांशी, कामावर असलेल्या सोबत्यांशी, मित्रांशी आणि आपल्या जवळच्या लोकांशी खरं बोललं पाहिजे. तुम्ही तरुण असाल तर आपल्या सोबत्यांनी आपल्याशी मैत्री करावी, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ही इच्छा बाळगल्यामुळे काही तरुण दुहेरी जीवन जगत आहेत. कुटुंबासोबत आणि मंडळीसोबत असताना ते असं दाखवतात की त्यांचे नैतिक मूल्य चांगले आहेत. पण याच्या अगदी उलट ते जेव्हा सोशल मिडिया किंवा जगातल्या लोकांसोबत असतात तेव्हा ते अगदी वेगळे वागतात. असे तरुण आपल्या आईवडिलांशी, बंधुभगिनींशी आणि यहोवाशी खोटं बोलत असतात. (स्तो. २६:४, ५) आपण जेव्हा यहोवाची सेवा करण्याचं भासवतो, पण कोणी पाहत नसताना त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी करतो, तेव्हा यहोवा ते पाहतो. (मार्क ७:६) असं करण्यापेक्षा नीतिसूत्रात जे म्हटलं आहे ते करणं फायद्याचं ठरेल. त्यात असं म्हटलं आहे: “तुझ्या हृदयाने पाप्यांचा हेवा करू नये, परंतु सारा दिवस तू यहोवाचे भय धरत जा.”—नीति. २३:१७, पं.र.भा. टेहळणी बुरूज१८.१० ९ ¶१४-१५

शुक्रवार, १७ जुलै

देव प्रेम आहे, आणि जो कोणी प्रेमात टिकून राहतो तो देवासोबत आणि देव त्याच्यासोबत ऐक्यात राहतो.—१ योहा. ४:१६.

जगभरातले यहोवाचे उपासक एका कुटुंबाचे भाग आहेत. ते एकमेकांवर प्रेम करणारे बंधुभगिनी आहेत. (१ योहा. ४:२१) कधीकधी ते आपल्या बंधुभगिनींसाठी मोठे त्याग करतात. पण अनेकदा बऱ्‍याच लहानसहान गोष्टी करण्याद्वारे ते आपलं प्रेम व्यक्‍त करतात. जसं की, बांधवांना काहीतरी चांगलं बोलून किंवा त्यांच्याशी दयाळूपणे वागून ते आपलं प्रेम दाखवतात. आपण जेव्हा इतरांचा विचार करतो तेव्हा आपण आपल्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याचं अनुकरण करत असतो. (इफिस. ५:१) येशूने आपल्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं. तो इतरांशी नेहमी दयाळूपणे वागला. त्याने म्हटलं: “अहो कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन.” (मत्त. ११:२८, २९) जेव्हा आपण येशूचं अनुकरण करतो आणि “दीनांची चिंता वाहतो” किंवा त्यांचा विचार करतो तेव्हा आपण यहोवाचं मन आनंदित करत असतो. असं केल्यामुळे आपल्यालाही आनंद होतो. (स्तो. ४१:१) तेव्हा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी, आपल्या बंधुभगिनींशी आणि सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांशी वागताना विचारशीलपणे वागून आपण प्रेम दाखवत राहू या. टेहळणी बुरूज१८.०९ २८ ¶१-२

शनिवार, १८ जुलै

आपण देवाचे सहकारी आहोत.—१ करिंथ. ३:९.

नैसर्गिक आपत्तीनंतर आपल्या बांधवांना मदत करण्याद्वारेही आपण यहोवासोबत काम करू शकतो. जसं की, दान देण्याद्वारे. (योहा. १३:३४, ३५; प्रे. कार्ये ११:२७-३०) आपत्तीनंतर साफसफाई किंवा दुरुस्तीच्या कामात हातभार लावण्याद्वारेही आपण मदत करू शकतो. पोलंडची एक बहीण गॅब्रीएला हिच्या घराचं पूरामुळे खूप नुकसान झालं होतं. पण मदतीला आलेल्या जवळच्या मंडळीतल्या बंधुभगिनींना जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. त्या प्रसंगाबद्दल सांगताना ती म्हणते, की तिने कोणत्या गोष्टी गमावल्या त्याबद्दल ती जास्त विचार करत नाही, तर त्याऐवजी तिने काय मिळवलं त्यावर ती लक्ष केंद्रित करते. ती म्हणते: “या अनुभवावरून मला आणखी जास्त खात्री पटलीये, की ख्रिस्ती मंडळीचा भाग असणं एक खास सुहक्क आहे. तसंच, यामुळे आपण आनंदीही राहू शकतो.” ज्या लोकांना नैसर्गिक आपत्तीनंतर मदत मिळाली त्यांनाही असाच अनुभव आला आहे असं ते म्हणतात. शिवाय जे बांधव यहोवासोबत काम करून इतरांना मदत करतात तेदेखील यामुळे समाधान आणि आनंद अनुभवतात.—प्रे. कार्ये २०:३५; २ करिंथ. ९:६, ७. टेहळणी बुरूज१८.०८ २६ ¶१२

रविवार, १९ जुलै

आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.—नीति. ४:२३.

आपल्याला जर आपल्या हृदयाचं रक्षण करण्यात यशस्वी व्हायचं असेल तर धोके ओळखणं आणि संरक्षणासाठी लगेच पाऊल उचलणं गरजेचं आहे. “रक्षण” या भाषांतरित केलेल्या शब्दामुळे आपल्याला एका पहारेकऱ्‍याच्या कामाची आठवण होते. शलमोन राजाच्या दिवसांत पहारेकरी शहराच्या भिंतींवर तैनात असायचे. कोणी शत्रू येत असल्याचं त्यांना दिसलं की ते लगेच इशारा द्यायचे. आपल्या मनात याचं चित्र उभं केल्याने आपल्याला समजतं की सैतानाला आपली विचारसरणी भ्रष्ट करण्यापासून रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. प्राचीन काळात पहारेकरी शहराच्या द्वारपालासोबत मिळून काम करायचे. (२ शमु. १८:२४-२६) एखादा शत्रू जवळ येत असल्यास शहराचे फाटक बंद आहेत याची ते खात्री करून घ्यायचे. असं करण्याद्वारे ते एकत्र मिळून शहराचं रक्षण करायचे. (नहे. ७:१-३) आपले विचार, भावना, हेतू आणि इच्छा यांवर सैतान प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. असं करण्याद्वारे जेव्हा तो आपल्या हृदयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपला बायबल प्रशिक्षित विवेक एका पहारेकऱ्‍यासारखा आपल्याला सावध करू शकतो. ज्या वेळी आपला विवेक आपल्याला इशारा देतो, त्या वेळी आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि धोका टाळण्यासाठी लगेच फाटक बंद केलं पाहिजे; म्हणजेच आपल्या परीने होता होईल तितके प्रयत्न केले पाहिजेत. टेहळणी बुरूज१९.०१ १७ ¶१०-११

सोमवार, २० जुलै

[ते] निर्दोष आढळल्यास त्यांनी सेवक म्हणून कार्य करावे.—१ तीम. ३:१०.

वडिलांनी आपल्या स्वतःच्या मतांनुसार किंवा स्थानिक संस्कृतीनुसार तरुण बांधवांबद्दल मत बनवू नये. तर त्यांनी देवाच्या वचनाच्या आधारावर त्यांची पारख करावी. (२ तीम. ३:१६, १७) मंडळीतल्या वडिलांनी बायबलनुसार आपला दृष्टिकोन ठेवला नाही तर जबाबदारीसाठी पात्र असलेल्या बांधवांना सहायक सेवक किंवा वडील बनण्यापासून रोखण्याची चूक त्यांच्या हातून होऊ शकते. एका देशातील मंडळीमध्ये एक सहायक सेवक चांगल्या प्रकारे आपल्या जबाबदाऱ्‍या हाताळत होता. सर्व वडिलांनी हे मान्य केलं की हा बांधव बायबलमध्ये वडील बनण्यासाठी दिलेल्या पात्रताही पूर्ण करत आहे. पण काही वयस्कर वडिलांना वाटलं की तो खूप लहान दिसतो. म्हणून त्यांनी मंडळीमध्ये वडील बनण्यासाठी त्याची शिफारस केली नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे फक्‍त त्याच्या स्वरूपामुळे त्याला नेमण्यात आलं नाही. पण आपण आपल्या मतांवर नाही, तर बायबलवर अवलंबून राहणं खूप गरजेचं आहे. असं केल्याने आपण स्वरूप पाहून त्यांच्याबद्दल मत बनवण्याचं टाळू आणि येशूने दिलेल्या आज्ञेचं पालन करू.—योहा. ७:२४. टेहळणी बुरूज१८.०८ १२ ¶१६-१७

मंगळवार, २१ जुलै

ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.—नीति. १८:१३.

अविचारीपणे ई-मेल आणि मेसेज पाठवण्यात एक धोका आहे. काही देशांमध्ये आपल्या कामावर काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत आणि काही ठिकाणी तर पूर्णपणे बंदी आहे. अशा देशांमध्ये साक्षीदारांच्या मनात भीती घालण्यासाठी किंवा शंका उत्पन्‍न करण्यासाठी विरोधक आपल्याबद्दल मुद्दाम खोटी माहिती पसरवू शकतात. पूर्वीच्या काळात असलेल्या सोव्हिएत संघात काय घडलं याचा विचार करा. तिथे गुप्त पोलिसांचा एक गट होता. त्याला केजीबी असं म्हटलं जायचं. आपल्या संघटनेत जबाबदारीच्या पदावर असलेल्या काही बांधवांबद्दल या पोलिसांनी अफवा पसरवली की त्यांनी साक्षीदारांना धोका दिला आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे बऱ्‍याच बंधुभगिनींनी या बातमीवर भरवसा ठेवला आणि ते संघटना सोडून गेले. यांपैकी बरेच जण नंतर मंडळीत परत आले, पण काही लोकांनी कायमचंच यहोवाला सोडून दिलं. त्यांनी या अफवांवर भरवसा ठेवून यहोवावरचा आपला विश्‍वास गमावला. (१तीम. १:१९) आपण अशा प्रकारचे वाईट परिणाम कसे टाळू शकतो? नकारात्मक किंवा खात्री नसलेली माहिती इतरांना पाठवू नका. ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर भरवसा ठेवू नका. याऐवजी त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. टेहळणी बुरूज१८.०८ ४ ¶८

बुधवार, २२ जुलै

आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.—लूक २३:४३.

मूळ ग्रीक हस्तलिखितांमधून आपल्याला कळतं की त्या काळात विरामचिन्हांचा जास्त वापर केला जात नव्हता. त्यामुळे येशू त्या गुन्हेगाराला नेमकं काय म्हणाला याबद्दल प्रश्‍नं उभे राहतात. येशू त्याला असं म्हणाला का: “मी तुला खरं सांगतो, तू आज माझ्यासोबत नंदनवनात असशील,” की येशूला असं म्हणायचं होतं: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात असशील.” हे वचन समजून घेण्यासाठी, येशूने आपल्या मृत्यूबद्दल शिष्यांना जे सांगितलं त्यावर विचार करणं गरजेचं आहे. त्याने म्हटलं: “मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.” (मत्त. १२:४०; १६:२१; १७:२२, २३; मार्क १०:३४; प्रे. कार्ये १०:३९, ४०) यावरून आपल्याला कळतं की येशूने त्या गुन्हेगाराला वचन दिलं त्या दिवशी तो नंदनवनात गेला नाही. बायबल सांगतं की देवाने येशूचं पुनरुत्थान करेपर्यंत तो तीन दिवस “कबरेत” होता. (प्रे. कार्ये २:३१, ३२) येशू त्या गुन्हेगाराशी नंदनवनाबद्दल बोलला तेव्हा तो स्वर्गातील नंदनवनाबद्दल बोलत नव्हता. आपण असं कोणत्या आधारावर म्हणू शकतो? याचं एक कारण म्हणजे त्या गुन्हेगाराला हे माहीत नव्हतं की येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत स्वर्गात राज्य करण्याचा करार केला आहे. (लूक २२:२९) तसंच, त्या गुन्हेगाराचा बाप्तिस्माही झाला नव्हता. (योहा. ३:३-६, १२) येशू त्या गुन्हेगाराला पृथ्वीवर येणाऱ्‍या नंदनवनाच्या अशा एका अभिवचनाबद्दल बोलत होता, जे भविष्यात पूर्ण होणार होतं. टेहळणी बुरूज१८.१२ ६ ¶१७-१८, २०-२१

गुरुवार, २३ जुलै

आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही.—निर्ग. ३२:१.

काही वेळातच इस्राएली लोक सोन्याच्या वासराची उपासना करायला लागले. असं करण्याद्वारे त्यांनी यहोवाची आज्ञा मोडली होती. पण अजूनही आपण यहोवाच्या पक्षाचे आहोत असा विचार करून ते स्वतःला फसवत होते. अहरोनने वासराच्या उपासनेला ‘यहोवासाठी उत्सव’ असं म्हटलं. मग यहोवाने काय केलं? त्याने मोशेला म्हटलं: “ते बिघडले आहेत; ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत.” यहोवा इस्राएली लोकांवर इतका रागवला, की संपूर्ण राष्ट्राला नष्ट करण्याचा विचारही त्याच्या मनात आला. (निर्ग. ३२:५-१०) पण यहोवाने त्या राष्ट्राचा नाश केला नाही. (निर्ग. ३२:१४) अहरोनने जरी सोन्याचं वासरू बनवलं असलं तरी त्याने पश्‍चात्ताप केला आणि इतर लेव्यांसोबत यहोवाचा पक्ष घेतला. पण त्या दिवशी सोन्याच्या वासराची उपासना करणारे हजारो लोक मरण पावले. पण यहोवाचा पक्ष घेतलेले बचावले आणि त्यांना आशीर्वादित करण्याचं वचन यहोवाने दिलं.—निर्ग. ३२:२६-२९. टेहळणी बुरूज१८.०७ २० ¶१३-१६

शुक्रवार, २४ जुलै

शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना . . . बाजारांत लोकांकडून नमस्कार घेणं . . . व मेजवान्यांत सर्वात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.—लूक २०:४६.

सर्वोत्तम स्वीकृती म्हणजे काय? बरेच लोक उच्च शिक्षणात, व्यवसायात, कला व खेळाच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वाटतं की यामुळे लोक त्यांना ओळखतील. पण खरंतर ही सर्वोत्तम स्वीकृती नाही. याबद्दल पौलने म्हटलं: “आता मात्र तुम्हाला देवाची ओळख झाली आहे; खरेतर, देवानेच तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग, तुम्ही पुन्हा पूर्वीच्या त्या निरर्थक आणि तुच्छ अशा प्राथमिक गोष्टींकडे वळून त्यांचे दास का होऊ पाहता?” (गलती. ४:९) संपूर्ण विश्‍वाचा शासक आपल्याला ओळखतो हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे! आपण कोण आहोत हे यहोवा जाणतो व त्याचं आपल्यावर प्रेम आहे. आपण त्याच्याशी मैत्री करावी अशी त्याची इच्छा आहे आणि म्हणून त्याने आपली रचनाही तशाच प्रकारे केली आहे.—उप. १२:१३, १४. टेहळणी बुरूज१८.०७ ८ ¶३-४

शनिवार, २५ जुलै

मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो.—स्तो. ११९:९९.

देवाच्या नियमांनी तुम्हाला प्रशिक्षित करावं अशी जर तुमची इच्छा असेल, तर त्या नियमांबद्दल आपल्याला प्रेम आणि आदर असला पाहिजे. (आमो. ५:१५) आपण हे कसं करू शकतो? यासाठी आपण यहोवासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हे समजण्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या: तुम्हाला चांगली झोप लागत नाही म्हणून डॉक्टर तुम्हाला पौष्टिक आहार, जास्त व्यायाम आणि जीवनशैलीत काही बदल करायला सांगतात. तुम्ही त्यांच्या सल्ल्याचं पालन करता आणि तुमची झोपेची समस्या नाहीशी होते. यामुळे डॉक्टरांनी दिलेला सल्ला खरंच खूप उपयुक्‍त होता असा तुम्ही विचार करणार नाही का? त्याच प्रकारे, पापाच्या वाईट परिणामांपासून आपलं संरक्षण होण्यासाठी व आपलं जीवन सुधारण्यासाठी आपल्या सृष्टिकर्त्याने आपल्याला नियम दिले आहेत. उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटलं आहे की आपण खोटं बोलू नये, चोरी करू नये, कोणाला फसवू नये. तसंच त्यात हेही सांगितलं आहे की आपण अनैतिक कार्य, हिंसा किंवा भूतविद्या या गोष्टींपासून लांब राहावं. (नीति. ६:१६-१९; प्रकटी. २१:८) यहोवाच्या नियमांचं पालन केल्यामुळे आपल्याला जे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात त्यामुळे आपलं यहोवावरचं आणि त्याच्या नियमांवरचं प्रेम आणखी वाढत जातं. टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶५-६

रविवार, २६ जुलै

तू यहुद्यांचा राजा आहेस का?—योहा. १८:३३.

पिलातला कदाचित भीती वाटली असेल की येशू यहुदी लोकांना रोमी साम्राज्याविरुद्ध बंड करायला लावेल. पण येशूने उत्तर देत त्याला म्हटलं: “माझं राज्य या जगाचा भाग नाही.” (योहा. १८:३६) येशूने कोणत्याही प्रकारे राजकारणात भाग घेतला नाही, कारण त्याचं राज्य स्वर्गात स्थापित होणार होतं. त्याने म्हटलं की पृथ्वीवर त्याचं काम “सत्याबद्दल साक्ष” देण्याचं आहे. (योहा. १८:३७) येशूला चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्याची नेमणूक काय आहे. आपणदेखील आपली नेमणूक समजून घेतली पाहिजे. यामुळे मग आपण आपल्या बोलण्यातून कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करणार नाही, इतकंच काय तर आपल्या मनात तसा विचारही आणणार नाही. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. एका विभागीय पर्यवेक्षकाने म्हटलं की त्यांच्या क्षेत्रातील लोकांची मनोवृत्ती दिवसेंदिवस बंडखोर होत चालली आहे. या लोकांना आपल्या देशावर खूप गर्व आहे. सत्ता चालवणाऱ्‍यांमध्ये त्यांच्या समाजाचे लोक असतील तरच त्यांचं जीवन सुधारेल असा विचार ते करतात. विभागीय पर्यवेक्षक म्हणतात: “आपल्या बांधवांनी मात्र राज्याची सुवार्ता सांगण्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याद्वारे त्यांची ख्रिस्ती एकता टिकवून ठेवली आहे. ही खरंच प्रशंसेची गोष्ट आहे. फक्‍त यहोवाच त्यांच्या समस्यांवर आणि अन्यायावर मात करू शकतो असा भरवसा ते बाळगतात.” टेहळणी बुरूज१८.०६ ४-५ ¶६-७

सोमवार, २७ जुलै

सैतानाचा विरोध करा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल.—याको. ४:७.

सैतान या पदवीचा अर्थ “विरोध करणारा” असा होतो. हिब्रू शास्त्रवचनांतल्या १ इतिहास, ईयोब आणि जखऱ्‍या या पुस्तकांमध्येच सैतानाचा उल्लेख आढळतो. पण मसीहा येण्याआधी या शत्रूबद्दल एवढी कमी माहिती का देण्यात आली होती? हिब्रू शास्त्रवचनांत यहोवाने सैतानाबद्दल किंवा त्याच्या कार्यांबद्दल जास्त माहिती दिली नाही. कारण हिब्रू शास्त्रवचनाचा उद्देश मसीहाची ओळख आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी लोकांना मदत करणं हा होता. (लूक २४:४४; गलती. ३:२४) जेव्हा मसीहा प्रकट झाला तेव्हा यहोवाने सैतानाबद्दल आणि त्याला साथ देणाऱ्‍या देवदूतांबद्दल माहिती पुरवण्यासाठी, येशूचा आणि त्याच्या शिष्यांचा वापर केला. त्यांचा वापर करणं योग्यच होतं, कारण सैतान आणि त्याला साथ देणाऱ्‍यांचा नाश करण्यासाठी यहोवा, येशू आणि अभिषिक्‍त जणांना वापरणार आहे. (रोम. १६:२०; प्रकटी. १७:१४; २०:१०) सैतानाची शक्‍ती मर्यादित आहे हे लक्षात घ्या. तसंच यहोवा, येशू आणि विश्‍वासू देवदूतही आपलं संरक्षण करतात. त्यांच्या मदतीने आपण आपल्या शत्रूचा सामना करू शकतो. टेहळणी बुरूज१८.०५ २२-२३ ¶२-४

मंगळवार, २८ जुलै

फळ न देणारी माझ्यातली प्रत्येक फांदी तो कापून टाकतो.—योहा. १५:२.

आपण जर फळ उत्पन्‍न केले तरच आपण यहोवाचे सेवक बनू शकतो. (मत्त. १३:२३; २१:४३) म्हणून मग योहान १५:१-५ मधल्या दृष्टान्तात, फळ उत्पन्‍न करण्याचा अर्थ नवीन शिष्य बनवणं असा होऊ शकत नाही. (मत्त. २८:१९) कारण जर असं असेल तर मग जिथे लोक आपला संदेश ऐकत नाही, अशा ठिकाणी सेवा करणारे विश्‍वासू सेवक त्या फांद्यांसारखे ठरतील जे काहीच फळ देत नाहीत. पण यहोवा नक्कीच असा विचार करत नाही. आपण लोकांवर येशूचे शिष्य बनण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. तसंच, यहोवा हा प्रेमळ देव आहे. आपल्याला अशक्य असणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा तो आपल्याकडून कधीच करणार नाही. आपल्याला जे शक्य आहे त्याचीच तो अपेक्षा करतो. (अनु. ३०:११-१४) तर मग फळ उत्पन्‍न करण्याचा नेमका अर्थ काय होतो? ही एक अशी गोष्ट असली पाहिजे जी करणं आपल्या सर्वांनाच शक्य होईल. मग ही कोणती गोष्ट असू शकते? इतरांना त्याच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचं काम.—मत्त. २४:१४. टेहळणी बुरूज१८.०५ १४ ¶८-९

बुधवार, २९ जुलै

तुम्ही तुमचा पिता, सैतान याच्यापासून आहात . . . तो खोटारडा आणि खोटेपणाचा बाप आहे.—योहा. ८:४४.

आज आपल्या काळातही बरेच धार्मिक पुढारी आहेत. त्यांना पाळक, फादर, स्वामी किंवा इतर पदव्या देण्यात येतात. हेदेखील परूशी लोकांसारखंच देवाच्या वचनातील सत्य शिकवत नाहीत. त्यांनी “देवाच्या सत्याऐवजी असत्याला पसंत केले” आहे. (रोम. १:१८, २५) ते ज्या खोट्या शिकवणीबद्दल सांगतात त्यांमध्ये नरकाग्नी, अमर आत्मा, पुनर्जन्म, समलैंगिक लग्न व तशा जीवनशैलीला देवाची संमती या शिकवणी सामील आहेत. राजकीय पुढाऱ्‍यांनीही खोट्याचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल केली आहे. लवकरच भविष्यात ते आतापर्यंतचं सर्वात मोठं खोटं बोलतील, ते म्हणजे “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा ते करतील. त्यांनी जगात शांती आणि सुरक्षा आणली आहे हे दाखवण्यासाठी ते असं करतील. पण तेव्हाच “त्यांच्यावर अचानक नाश येईल.” त्यामुळे राजकीय पुढारी जेव्हा म्हणतात की ते जगाची परिस्थिती सुधारत आहेत, तेव्हा आपण त्यांच्यावर भरवसा ठेवू नये. सत्य हेच आहे की “रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा दिवस येत आहे,” आणि हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.—१ थेस्सलनी. ५:१-४. टेहळणी बुरूज१८.१० ७-८ ¶६-८

गुरुवार, ३० जुलै

तुम्हीही अशा प्रकारे कष्ट करून दुर्बलांना मदत करावी आणि प्रभू येशूचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवावे की, “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रे. कार्ये २०:३५.

आज आपण कठीण काळात जगत असल्यामुळे निराश होण्याची शक्यता जास्त आहे. येशू ख्रिस्त त्याच्या अभिषिक्‍त बांधवांचा आणि मोठ्या कळपातील ‘सरदार’ म्हणजेच वडिलांचा उपयोग करून आपल्याला प्रोत्साहन देतो. मंडळीतील वडील आपल्या विश्‍वासावर “सत्ता गाजवणारे” नसून, आपल्या आनंदात “सहकारी” आहेत. आपण आनंदी आणि यहोवाला विश्‍वासू राहावं यासाठी ते आपल्याला मदत करतात. (यश. ३२:१, २; २ करिंथ. १:२४) वडील प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. त्याने जसं बांधवांना प्रोत्साहन दिलं तसं तेही देऊ शकतात. थेस्सलनीकामधल्या ख्रिस्ती बांधवांचा छळ झाला तेव्हा त्याने त्यांना पत्र लिहिलं. त्यात त्याने म्हटलं: “तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाविषयीचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही देण्यास तयार होतो, कारण तुम्ही आमच्यासाठी अतिशय प्रिय बनला होता.” (१ थेस्सलनी. २:८) फक्‍त प्रोत्साहनाचे दोन शब्द बोलणं पुरेसं नाही हे सांगत असताना इफिसमधल्या वडिलांसाठी पौलने आजच्या वचनातल्या शब्दांचा उपयोग केला. टेहळणी बुरूज१८.०४ २१-२२ ¶६-८

शुक्रवार, ३१ जुलै

यहोवा आत्मिक व्यक्‍ती आहे आणि जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.—२ करिंथ. ३:१७.

पौलने स्पष्ट केलं की जर आपल्याला हे स्वातंत्र्य हवं असेल तर आपला यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध असला पाहिजे. (२ करिंथ. ३:१६) ओसाड प्रदेशात असताना इस्राएली लोकांनी यहोवाच्या नाही, तर मानवी दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहिलं. एका अर्थाने त्यांच्या मनावर आणि हृदयावर पडदा होता. गुलामगिरीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग त्यांना स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा होता. (इब्री ३:८-१०) यहोवाचा आत्मा आपल्याला जे स्वातंत्र्य देतो त्यात गुलामीतून सुटका याव्यतिरिक्‍त इतर गोष्टीही सामील आहेत. मानव देऊ शकतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त स्वातंत्र्य देवाचा आत्मा आपल्याला देतो. तो आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सोडवू शकतो. तसंच, तो आपल्याला खोटी उपासना आणि त्याच्या चालीरिती यांपासूनही सोडवू शकतो. (रोम. ६:२३; ८:२) हे स्वातंत्र्य खरंच खूप मोठं आहे! एखादी व्यक्‍ती गुलामीत किंवा तुरुंगात असली तरीही तिला देवाचा आत्मा देत असलेलं स्वातंत्र्य मिळू शकतं.—उत्प. ३९:२०-२३. टेहळणी बुरूज१८.०४ ९ ¶३-५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा