जून
सोमवार, १ जून
माझ्या नावाने तुम्ही पित्याला काहीही मागितलं तर तो तुम्हाला देईल.—योहा. १५:१६.
येशूने दिलेल्या अभिवचनामुळे प्रेषितांना किती प्रोत्साहन मिळालं असेल! येशूचा लवकरच मृत्यू होणार होता ही गोष्ट प्रेषितांना पूर्णपणे समजली नाही. पण याचा असा अर्थ होता का, की त्याच्या मृत्यूनंतर त्यांना काहीच मदत मिळणार नव्हती? नाही. यहोवा त्यांची प्रार्थना ऐकणार होता आणि प्रचारकार्यादरम्यान त्यांची मदतही करणार होता. आणि त्याने तसं केलंही. येशूचा मृत्यू झाल्याच्या काही काळानंतर प्रेषितांनी जेव्हा यहोवाकडे धैर्यासाठी विनवणी केली, तेव्हा यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. (प्रे. कार्ये ४:२९, ३१) ही गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. जेव्हा आपण धीराने प्रचारकार्य करतो तेव्हा आपली येशूसोबत मैत्री टिकून राहते. तसंच, प्रचार करायला कठीण वाटतं तेव्हा यहोवा आपली प्रार्थना ऐकायला तयार असतो याची आपण खात्री बाळगू शकतो. (फिलिप्पै. ४:१३) यहोवा आपली प्रार्थना ऐकतो आणि येशू आपला मित्र आहे यासाठी आपण खरंच खूप आभारी आहोत. यहोवा देत असलेल्या या सर्व देणग्यांमुळे आपल्याला फळ उत्पन्न करत राहण्यासाठी शक्ती मिळते.—याको. १:१७. टेहळणी बुरूज१८.०५ २१ ¶१७-१८
मंगळवार, २ जून
[आपण] एकमेकांना प्रोत्साहन देत राहावे आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त करावे.—इब्री १०:२४, २५.
पौलने आणखी जास्त प्रोत्साहन देण्याबद्दल का सांगितलं, असा विचार कदाचित तिथल्या बांधवांच्या मनात आला असेल. हे सांगितल्याच्या पाच वर्षांच्या आतच याचं एक कारण स्पष्ट झालं. यरुशलेमसाठी यहोवाच्या न्यायदंडाचा दिवस जवळ आला आहे हे त्यांना समजलं. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना शहर सोडून जाण्याची गरज आहे हे त्यांनी ओळखलं. (लूक २१:२०-२२; प्रे. कार्ये २:१९, २०) रोमी लोकांनी यरुशलेमचा इ.स. ७० मध्ये नाश केला तेव्हा तो न्यायदंडाचा दिवस आला. आज आपणही अशाच परिस्थितीत आहोत. यहोवाचा “दिवस मोठा व फार भयंकर आहे,” आणि तो खूप जवळ आला आहे. (योए. २:११) सफन्याच्या भविष्यवाणीचे शब्द आपल्या काळातही लागू होतात. त्याने म्हटलं: “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफ. १:१४) यामुळे “एकमेकांबद्दल काळजी करून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.” (इब्री १०:२४, तळटीप) बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आपला त्यांच्यासोबत जवळचा नातेसंबंध असला पाहिजे. तेव्हाच गरजेच्या वेळी आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकू. टेहळणी बुरूज१८.०४ २० ¶१-२
बुधवार, ३ जून
खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.—यहो. १:९.
वचन दिलेल्या देशात इस्राएली लोकांना घेऊन जाण्याआधी यहोवाने या शब्दांनी यहोशवाला प्रोत्साहन दिलं. यहोवाने आपल्या लोकांना एक समूह या नात्यानेही प्रोत्साहन दिलं. उदाहरणार्थ, बाबेलच्या बंदिवासात असल्यामुळे यहुद्यांना प्रोत्साहनाची गरज आहे हे यहोवाला माहीत होतं. यामुळेच यहोवाने त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन देणारी भविष्यवाणी केली. त्याने म्हटलं: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (यश. ४१:१०) नंतर यहोवाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनाही प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्यालाही तो तसंच प्रोत्साहन देतो. (२ करिंथ. १:३, ४) यहोवाने आपल्या पुत्राला, येशूलाही प्रोत्साहन दिलं. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याला स्वर्गातून एक आवाज ऐकू आला: “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्त. ३:१७) या शब्दांमुळे येशूला आपलं सेवाकार्य करण्यासाठी किती प्रोत्साहन मिळालं असेल याची कल्पना करा. टेहळणी बुरूज१८.०४ १६ ¶३-५
गुरुवार, ४ जून
पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको.—उत्प. २:१७.
यहोवाने आदामला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही असं काही लोकांना वाटू शकतं. पण असे लोक हे विसरतात की इच्छास्वातंत्र्य किंवा निवड करण्याचा हक्क आणि चांगलं काय व वाईट काय हे ठरवण्याचा हक्क, यामध्ये मोठा फरक आहे. देवाची आज्ञा पाळायची की नाही हे ठरवण्याचा हक्क आदाम-हव्वाला होता. पण चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याचा हक्क फक्त यहोवालाच आहे. आदाम-हव्वासाठी “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड” यहोवाच्या हक्काचं प्रतीक होतं. (उत्प. २:९) आदाम-हव्वाला फळ न खाण्याची आज्ञा देऊन यहोवाने त्यांना हे शिकवलं की खरं स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. पण आपल्या मूळ पालकांनी देवाची आज्ञा न मानण्याचं निवडलं. मग सैतानाने सांगितल्याप्रमाणे आदाम-हव्वाला जास्त स्वातंत्र्य मिळालं का? मुळीच नाही. उलट देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळलं. टेहळणी बुरूज१८.०४ ५-६ ¶९-१२
शुक्रवार, ५ जून
त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.—यश. ६३:९.
आपल्या सेवकांना सहन कराव्या लागत असलेल्या दुःखाबद्दल यहोवाला फक्त काळजीच वाटत नाही तर त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तो कार्यही करतो. उदाहरणार्थ, इस्राएली लोक इजिप्तच्या दास्यात दुःख-कष्ट सहन करत होते तेव्हा यहोवाने त्यांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना सोडवण्यासाठी तो प्रवृत्त झाला. यहोवाने मोशेला म्हटलं: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; . . . त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांस मिसरांच्या हातातून सोडवावे, . . . म्हणून मी उतरलो आहे.” (निर्ग. ३:७, ८) यहोवाला त्याच्या लोकांबद्दल करुणा वाटली आणि म्हणून त्याने त्यांना दास्यातून सोडवलं. अनेक शतकांनंतर वचन दिलेल्या देशात जेव्हा इस्राएली लोकांवर शत्रूंनी हल्ला केला तेव्हा यहोवाने काय केलं? “जुलूम व त्रास असह्य होऊन इस्राएल लोक कण्हत असल्यामुळे देवाला त्यांची दया येऊ लागली होती.” आपल्या लोकांप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे यहोवाने पुन्हा त्यांना वाचवलं. शत्रूंपासून सोडवण्यासाठी त्याने शास्त्यांचा वापर केला.—शास्ते २:१६,१८, सुबोधभाषांतर. टेहळणी बुरूज१९.०३ १५ ¶४-५
शनिवार, ६ जून
स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तानह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.—यश. ४९:१५.
दहा आज्ञांमधील पहिल्या दोन आज्ञांमुळे इस्राएली लोकांना समजलं की त्यांनी फक्त यहोवाची उपासना करावी. तसंच, त्यांना मूर्तिपूजा न करण्याबद्दलही ताकीद देण्यात आली होती. (निर्ग. २०:३-६) या आज्ञा यहोवाने स्वतःच्या फायद्यासाठी दिल्या नव्हत्या. तर या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या लोकांचंच भलं होणार होतं. पण जेव्हा त्यांनी इतर देवीदेवतांची उपासना केली, तेव्हा त्यांच्यावर अनेक संकटं आली. पण जेव्हा-जेव्हा इस्राएली लोक यहोवाला एकनिष्ठ राहिले आणि इतरांशी न्यायाने वागले, तेव्हा-तेव्हा यहोवाने त्यांना आशीर्वादित केलं. (१ राजे १०:४-९) यहोवाची उपासना करण्याचा दावा करणारे लोक जेव्हा त्याच्या स्तरांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्या लोकांना इजा पोहचवतात, तेव्हा त्यासाठी यहोवाला जबाबदार ठरवणं चुकीचं ठरेल. यहोवाचं आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे आणि आपण अन्याय सहन करतो तेव्हा तो पाहत असतो. एका आईला आपल्या बाळाच्या वेदना जाणवतात. पण यहोवा आपल्या लोकांचं दुःख त्यापेक्षाही जास्त समजू शकतो. हे खरं आहे की ते दुःख काढून टाकण्यासाठी यहोवा लगेच पाऊल उचलत नाही, पण पश्चात्ताप न दाखवणाऱ्या या दुष्ट लोकांना तो नक्कीच योग्य वेळी शिक्षा करेल. टेहळणी बुरूज१९.०२ २२ ¶१३-१५
रविवार, ७ जून
माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.—लूक २२:४२.
स्मारकविधीच्या काही आठवड्यांआधी आपल्या सभा सहसा, येशूचं उदाहरण व त्याने खंडणी म्हणून आपलं जीवन देण्याद्वारे दाखवलेली नम्रता या विषयांवर केंद्रित असतात. आपल्याला येशूच्या नम्रतेचं अनुकरण करण्याची आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते, मग तसं करणं आपल्याला कठीण वाटत असलं तरीही. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने दाखवलेल्या धैर्याचा जरा विचार करा. त्याचे शत्रू त्याचा अपमान करतील, त्याला मारहाण करतील आणि शेवटी त्याला मारून टाकतील हे त्याला माहीत होतं. (मत्त. २०:१७-१९) पण तरी त्याने स्वेच्छेने मृत्यूचा सामना केला. गेथशेमाने इथे येशू आपल्या प्रेषितांसोबत होता. त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्याने म्हटलं: “उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्वासघात करणारा जवळ आला आहे!” (मत्त. २६:३६, ४६) आणि जेव्हा हत्यारबंद जमाव त्याला अटक करण्यासाठी आला, तेव्हा त्याने पुढे येऊन स्वतःची ओळख सांगितली. तसंच, त्याच्या प्रेषितांना जाऊ द्यावं असंही त्याने सैनिकांना सांगितलं. (योहा. १८:३-८) खरंच, येशूने उल्लेखनीय धैर्य दाखवलं! आज अभिषिक्त बांधव आणि इतर मेंढरं येशूचं अनुकरण करून धैर्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. टेहळणी बुरूज१९.०१ २७-२८ ¶७-८
सोमवार, ८ जून
नम्रता यांचे अवलंबन करा.—सफ. २:३.
एक कलाकार जसं वेगवेगळे रंग वापरून एक सुंदर चित्र काढतो, तसंच आपल्याला नम्र बनण्यासाठी वेगवेगळे गुण विकसित करण्याची गरज आहे. या गुणांमधील काही महत्त्वाचे गुण म्हणजे लीनता, आज्ञाधारकता, सौम्यता आणि धैर्य. फक्त नम्र व्यक्तीच यहोवाची इच्छा पूर्ण करू शकते. आणि यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण सौम्य असावं. (मत्त. ५:५; गलती. ५:२३) पण आपण जेव्हा यहोवाची इच्छा पूर्ण करतो तेव्हा ते पाहून सैतानाला खूप राग येतो. यामुळेच आपण जरी इतरांशी नम्रतेने आणि सौम्यतेने वागत असलो, तरी सैतानाच्या जगातील बरेच लोक आपला द्वेष करतात. (योहा. १५:१८, १९) म्हणून सैतानाचा विरोध करण्यासाठी आपल्याला धैर्य उत्पन्न करण्याची गरज आहे. नम्रतेच्या अगदी उलट गर्व आहे. एक गर्विष्ठ व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नाही आणि यहोवाची आज्ञा पाळत नाही. ही परिभाषा सैतानावर तंतोतंत लागू होते. सैतान नम्र लोकांचा द्वेष करतो कारण ते दाखवत असलेले चांगले गुण त्याच्यात नाहीत आणि इतरांना हे दिसून येतं की तो खूप वाईट आहे. तसंच, हे लोक आपल्या चांगल्या वागणुकीतून दाखवून देतात की सैतान खोटं बोलतो. ते कसं? कारण सैतानाने कोणतेही दावे केले किंवा काहीही केलं, तरी तो नम्र लोकांना यहोवाची सेवा करण्यापासून थांबवू शकत नाही.—ईयो. २:३-५. टेहळणी बुरूज१९.०२ ८-९ ¶३-५
मंगळवार, ९ जून
घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.—यश. ४१:१०.
यहोवाला माहीत होतं की बाबेलचे रहिवासी भयभीत होतील. मेद व पारस यांचं शक्तिशाली सैन्य बाबेलवर हल्ला करणार होतं. आपल्या लोकांना बाबेलच्या बंदिवासातून सोडवण्यासाठी यहोवा या सैन्याचा वापर करणार होता. (यश. ४१:२-४) जेव्हा बाबेलच्या लोकांना आणि तिथल्या इतर लोकांना कळलं की त्यांचा शत्रू त्यांच्यावर हल्ला करणार आहे, तेव्हा त्यांनी “हिंमत धर” असं म्हणून एकमेकांना धीर दिला. खोटे देव त्यांना मदत करतील या आशेने त्यांनी आणखीन मूर्ती घडवल्या. (यश. ४१:५-७) पण त्यादरम्यान यहोवाने यहुदी बंदिवानांची मने शांत केली. त्याने इस्राएलला म्हटलं: “तू माझा सेवक आहेस [तुझे शेजारी नाहीत] . . . घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.” (यश. ४१:८-१०) यहोवाने त्यांना काय म्हटलं याकडे लक्ष द्या. तो म्हणाला: “मी तुझा देव आहे.” या शब्दांद्वारे यहोवाने आपल्या विश्वासू उपासकांना आश्वासन दिलं की तो त्यांना विसरलेला नाही आणि ते अजूनही त्याचे लोक आहेत. तो त्यांना म्हणाला: “मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन.” या सांत्वनदायक आणि प्रोत्साहनदायक शब्दांमुळे यहुदी बंदिवानांना नक्कीच धैर्य मिळालं असेल!—यश. ४६:३,४. टेहळणी बुरूज१९.०१ ४ ¶८
बुधवार, १० जून
स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.—मार्क १:११.
मार्क १:९-११ या वचनांमध्ये आपल्याला तीन प्रसंगांमधून पहिल्या प्रसंगाबद्दल वाचायला मिळतं जिथे यहोवाचा आवाज ऐकू आला. यहोवाने म्हटलं: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” आपल्या पित्याचा आवाज ऐकून आणि त्याच्या शब्दांमधून आपल्याप्रती त्याचं प्रेम आणि भरवसा यांबद्दल ऐकून येशूला किती उभारणी मिळाली असेल याची कल्पना करा! यहोवाच्या शब्दांमुळे येशूबद्दल तीन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली, येशू यहोवाचा पुत्र आहे. दुसरी, यहोवाचं येशूवर खूप प्रेम आहे. आणि तिसरी, यहोवाने येशूबद्दल आपली पसंती दर्शवली आहे. “तू माझा . . . पुत्र आहेस.” यहोवाने असं का म्हटलं? स्वर्गात असताना येशू देवाचा आत्मिक पुत्र होता. पण बाप्तिस्म्यानंतर तो पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झाला. यहोवाने आपल्या शब्दांद्वारे दाखवून दिलं की येशू त्याचा अभिषिक्त पुत्र आहे आणि आता त्याला स्वर्गात जाण्याची आशा आहे. तिथे जाऊन तो देवाचा नियुक्त राजा आणि महायाजक बनणार होता. (लूक १:३१-३३; इब्री १:८, ९; २:१७) यामुळेच येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर यहोवाने म्हटलं: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस.”—लूक ३:२२. टेहळणी बुरूज१९.०३ ८ ¶३-४
गुरुवार, ११ जून
परमेश्वरापुढे शहाणपण . . . मुळीच चालत नाहीत.—नीति. २१:३०.
चुकीचा सल्ला मिळणं ही काय नवीन गोष्ट नाही. याला जुना इतिहास आहे. सर्वात आधी मानवांना वाईट सल्ला दिला तो सैतानाने! त्याने हव्वाला म्हटलं की तिने आणि आदामने जीवन कसं जगायचं हे स्वतः ठरवलं तर ते आनंदी होतील. (उत्प. ३:१-६) सैतान स्वार्थी होता! आदाम-हव्वा आणि त्यांच्या भावी मुलांनी यहोवाचं नाही तर सैतानाचं ऐकावं व त्याची उपासना करावी अशी त्याची इच्छा होती. खरंतर, यहोवाने त्यांना सर्वकाही दिलं होतं. एक सुंदर घर, जीवनात साथ देणारा जोडीदार आणि अनंतकाळ टिकणारं परिपूर्ण शरीर. दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम-हव्वाने देवाची आज्ञा मोडली. असं करण्याद्वारे त्यांनी देवासोबत असलेलं त्यांचं नातं तोडलं. याचा खूप भयंकर परिणाम झाला. ज्या प्रकारे एखादं फूल झाडावरून तोडल्यामुळे कोमेजून मरतं, त्याच प्रकारे आदाम-हव्वा हळूहळू म्हातारे होऊन मेले. त्यांच्या मुलांना आणि आपल्या सर्वांनाही त्याची झळ लागली. (रोम. ५:१२) आज बरेच लोक देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत. (इफिस. २:१-३) याच्या परिणामांवरून आजच्या वचनाची सत्यता आपल्याला पटते. टेहळणी बुरूज१८.१२ २० ¶३-४
शुक्रवार, १२ जून
आपण मानवी बुद्धीनुसार शिकवण्यात आलेल्या शब्दांत नाही, तर देवाच्या आत्म्याने शिकवलेल्या शब्दांत बोलतो, आणि आध्यात्मिक गोष्टी आध्यात्मिक शब्दांत समजावून सांगतो.—१ करिंथ. २:१३.
प्रेषित पौल खूप बुद्धिमान व सुशिक्षित होता. त्याला हिब्रू आणि ग्रीक भाषा यायच्या. (प्रे. कार्ये ५:३४; २१:३७, ३९; २२:२, ३) पण त्याने जगातली विचारसरणी नाकारली आणि देवाच्या वचनांवर आधारित निर्णय घेतले. (प्रे. कार्ये १७:२; १ करिंथ. २:६, ७) याचा परिणाम म्हणजे, त्याने यशस्वीपणे सेवाकार्य केलं आणि अशा प्रतिफळाची वाट पाहिली जे कायमस्वरूपी टिकणार होतं. (२ तीम. ४:८) हे स्पष्टच आहे की देवाची विचारसरणी जगाच्या विचारसरणीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. जर आपण देवाच्या स्तरांनुसार चाललो तर आपल्याला खरा आनंद आणि यश मिळेल. पण यहोवा आपल्यावर त्याचे विचार थोपवत नाही. तसंच, “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आणि मंडळीतले वडीलही आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत. (मत्त. २४:४५; २ करिंथ. १:२४) यहोवाच्या विचारसरणीनुसार आपल्या विचारसरणीमध्ये फेरबदल करणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. टेहळणी बुरूज१८.११ २०-२१ ¶१२-१३
शनिवार, १३ जून
दुःख व उसासे पळ काढतील.—यश. ३५:१०.
यहोवाने यशया संदेष्ट्याला भविष्यवाणी करायला सांगितली की इस्राएली लोक मायदेशी परतल्यावर तिथे शांती असेल. तसंच, प्राणी किंवा मानव हे त्यांच्यावर कधीच हल्ला करणार नाहीत असंही यशयाने सांगितलं. तरुण असो वा वृद्ध, सर्व जण सुरक्षित राहतील. (यश. ११:६-९; ३५:५-१०; ५१:३) यशयाने संपूर्ण पृथ्वीचा उल्लेख केला, इस्राएल राष्ट्राचा नाही. त्याने म्हटलं की “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” यशयाने म्हटलं की बाबेलवरून मायदेशी परतणाऱ्या इस्राएली लोकांवर मानव किंवा प्राणी हल्ला करणार नाहीत. त्याने म्हटलं की मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे जमीन खूप पीक देईल. एदेनच्या बागेत अशीच परिस्थिती होती. (उत्प. २:१०-१४; यिर्म. ३१:१२) पण ही भविष्यवाणी फक्त इस्राएली लोकांच्या काळासाठीच होती का? या भविष्यवाणीत असंदेखील सांगितलं होतं की आंधळे, लंगडे आणि बहिरे लोक बरे होतील. पण बाबेलवरून परत आलेल्या इस्राएली लोकांच्या बाबतीत हे घडलं नाही. यावरून आपण म्हणू शकतो की यहोवा हे सर्व भविष्यात करणार आहे. टेहळणी बुरूज१८.१२ ५ ¶११-१२
रविवार, १४ जून
सत्याच्या मार्गावर चालत राहा.—३ योहा. ३.
सत्यात सदासर्वकाळ चालत राहण्याची आपली इच्छा आहे. सत्यात चालत राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण बायबलचा अभ्यास आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन करत राहिलं पाहिजे. आपण यासाठी नियमितपणे वेळ काढला पाहिजे. आपण जितकं जास्त अभ्यास करू, तितकंच सत्याबद्दल आपलं प्रेम वाढेल. यामुळे सत्याला कधीच न सोडण्याचा आपला निर्धार पक्का होईल. नीतिसूत्रे २३:२३ आपल्याला सत्य “विकत घे” असं सांगतं. पण त्यासोबतच ते आपल्याला “सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा”ही विकत घ्यायला सांगतं. बायबलची सत्यं फक्त जाणून घेणंच पुरेसं नाही, तर आपण ती आपल्या जीवनात लागूदेखील केली पाहिजेत. समंजसपणा असल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत आणि आपण जे शिकत आहोत त्यावरून यहोवाची इच्छा समजून घ्यायला मदत होते. सुज्ञता असल्यामुळे माहीत असलेल्या गोष्टी लागू करायला आपल्याला प्रेरणा मिळते. कधीकधी आपल्याला ज्या गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे त्या दाखवून सत्य आपल्याला जणू शिक्षण किंवा सल्ला देतं. असे सल्ले आपण लगेच लागू केले पाहिजेत. बायबल सांगतं की हे सल्ले चांदीपेक्षाही जास्त मौल्यवान आहेत.—नीति. ८:१०. टेहळणी बुरूज१८.११ ९ ¶३; ११ ¶१३-१४
सोमवार, १५ जून
सत्य . . . विकत घे, विकू नको.—नीति. २३:२३.
तुमच्या जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? यहोवाचे सेवक या नात्याने आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपलं यहोवासोबतचं नातं. आपण हे नातं धोक्यात घालून कोणतीही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. बायबलमधील सत्यंदेखील आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत. कारण त्यामुळे आपल्याला यहोवासोबत मैत्री करायला मदत होते. (कलस्सै. १:९, १०) यहोवा आपला महान शिक्षक आहे आणि तो आपल्याला त्याच्या वचनातून, बायबलमधून अनेक मौल्यवान सत्यं शिकवतो. तो आपल्याला त्याच्या नावाच्या महत्त्वाबद्दल आणि त्याच्या सुंदर गुणांबद्दल शिकवतो. तसंच, तो आपल्याला शिकवतो की त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे, इतकं की त्याने आपल्या प्रिय मुलाचं जीवन आपल्या सर्वांसाठी दिलं. यहोवा आपल्याला मसीही राज्याबद्दलही शिकवतो. आणि भविष्यात पृथ्वीवर जगण्याची आशा देतो. आपण जीवन कसं जगावं हे यहोवा आपल्याला शिकवतो. आपल्यासाठी ही सर्व सत्यं खूप मौल्यवान आहेत कारण ती आपल्याला आपल्या निर्माणकर्त्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडायला मदत करतात. तसंच, यामुळे आपल्या जीवनाला एक उद्देश लाभतो. टेहळणी बुरूज१८.११ ३ ¶१-२
मंगळवार, १६ जून
एकमेकांशी खोटे बोलू नका.—कलस्सै. ३:९.
एक व्यक्ती माणसांना फसवू शकते पण ते यहोवाला कधीच फसवू शकत नाही. कारण बायबल सांगतं की त्याच्या डोळ्यांपुढे “सर्व गोष्टी उघड्या व स्पष्ट आहेत.” (इब्री ४:१३) उदाहरणार्थ, हनन्या आणि सप्पीरा यांनी प्रेषितांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपली थोडी जमीन विकली आणि मिळालेल्या पैशांतून काही पैसेच प्रेषितांना दिले. मंडळीतल्या लोकांवर आपली छाप पाडण्यासाठी हनन्या आणि सप्पीरा यांनी प्रेषितांना सांगितलं की त्यांनी सर्व पैसे दिले आहेत. पण यहोवाला माहीत होतं की ते खोटं बोलत आहेत आणि त्याने त्या दोघांना शिक्षा केली. (प्रे. कार्ये ५:१-१०) खोटं बोलणाऱ्या लोकांबद्दल यहोवाला कसं वाटतं? नुकसान पोहोचवण्यासाठी जे लोक खोटं बोलतात आणि पस्तावा करत नाही, अशा सर्वांना सैतानासारखं ‘अग्नीच्या सरोवरात’ टाकलं जाईल. सोप्या शब्दांत सांगायचं तर, त्यांचा कायमचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:१०; २१:८; स्तो. ५:६) आपल्याला माहीत आहे, की यहोवा “मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी” आणि “देव कधीही खोटे बोलू शकत नाही.” (गण. २३:१९; इब्री ६:१८) यहोवा खोटं बोलणाऱ्या जिभेचा तिरस्कार करतो. (नीति. ६:१६, १७) म्हणून जर आपल्याला त्याचं मन आनंदित करायचं असेल तर आपण “एकमेकांशी खोटे बोलू” नये तर नेहमी खरं बोलावं. टेहळणी बुरूज१८.१० ८ ¶१०-१३
बुधवार, १७ जून
या गोष्टींवर सखोल विचार करत राहा.—१ तीम. ४:१५.
जर तुमच्या मालकाने तुम्हाला खोट्या धार्मिक सणांसाठी वर्गणी मागितली तर तुम्ही काय कराल? अशी एखादी परिस्थिती येण्याची वाट पाहण्यापेक्षा, आपण आताच अशा गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन जाणून घेतला पाहिजे. आपण आज असं केलं, तर मग भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला योग्य उत्तर देऊन कार्य करता येईल. यहोवाच्या विचारसरणीवर मनन केल्यामुळे आपल्याला एखाद्या तातडीच्या वैद्यकिय प्रसंगातही त्याला एकनिष्ठ राहायला मदत होईल. आपल्या सर्वांनीच निर्धार केला आहे की आपण कधीच रक्ताचं किंवा त्याच्या चार मूळ घटकांचं संक्रमण करणार नाही. (प्रे. कार्ये १५:२८, २९) पण काही अशा वैद्यकिय पद्धती आहेत ज्यांत रक्ताच्या अंशांचा किंवा आपल्या स्वतःच्या रक्ताचा उपयोग केला जातो. आणि अशा पद्धती स्वीकारायच्या की नाहीत याबद्दल प्रत्येक ख्रिस्तीने बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेण्याची गरज आहे. असे निर्णय तुम्ही कधी घेतले पाहिजेत? अपघात झाल्यावर किंवा हॉस्पिटलमध्ये तातडीचा प्रसंग उद्भवल्यावर असे निर्णय घेणं सुज्ञपणाचं ठरेल का? याऐवजी आपण आताच त्याबद्दल संशोधन केलं पाहिजे आणि वैद्यकीय उपचारांची कागदपत्रं, जसं की DPA कार्ड आधीच भरलं पाहिजे. आपल्याला कोणत्या वैद्यकीय पद्धती मान्य आहेत याचा आपण त्यात उल्लेख करू शकतो आणि आपल्या डॉक्टरांशीही आधीच त्याबद्दल बोलू शकतो. टेहळणी बुरूज१८.११ २४ ¶५; २६ ¶१५-१६
गुरुवार, १८ जून
जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो.—नीति. १:३३.
यहोवा एक अशा मेंढपाळासारखा आहे जो प्रेमळपणे आपल्या मेंढरांची काळजी घेतो आणि त्यांना त्यांच्या शत्रूंपासून सुरक्षित ठेवतो. यामुळे या व्यवस्थेच्या अंताच्या अगदी जवळ असतानाही आपल्याला आश्वासन आणि सांत्वन मिळतं. तो लवकरच येणाऱ्या मोठ्या संकटादरम्यानही आपल्या लोकांची काळजी घेत राहणार आहे. (प्रकटी. ७:९, १०) म्हणून यहोवाचे सेवक मग ते तरुण असोत किंवा वृद्ध, निरोगी असोत किंवा अपंग, मोठ्या संकटाच्या वेळी त्यांच्यात गोंधळ उडणार नाही किंवा ते घाबरणार नाहीत. खरंतर ते याच्या अगदी उलट वागतील. ते येशूचे शब्द लक्षात ठेवतील: “डोकं वर करून ताठ उभे राहा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.” (लूक २१:२८) त्यांच्यावर जरी शक्तिशाली असलेल्या गोगचा, म्हणजे राष्ट्रांच्या समूहाचा हल्ला झाला तरी त्यांना ही खातरी असेल की यहोवा त्यांना सुरक्षित ठेवेल. (यहे. ३८:२, १४-१६) त्यांना असं का वाटेल? कारण त्यांना हा विश्वास आहे की यहोवा बदलणारा नाही. तो पुन्हा एकदा दाखवून देईल की तो आपल्या लोकांची काळजी करणारा एक प्रेमळ उद्धारकर्ता आहे.—यश. २६:२०. टेहळणी बुरूज१८.०९ २६ ¶१५-१६
शुक्रवार, १९ जून
तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस . . . व मी तुझ्यावर प्रेम करतो.—यश. ४३:४.
यहोवा इस्राएली लोकांना वरील शब्द बोलला तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल याची कल्पना करा. आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्या नजरेत खूप मौल्यवान आहे. बायबल आपल्याला अभिवचन देतं: “परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करेल.” (सफ. ३:१६, १७) आपल्या सेवकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला तरी त्यांना सांत्वन आणि मदत देण्याचं अभिवचन यहोवा देतो. तो म्हणतो: “तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल. मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन. मी तुम्हाला मांडीवर खेळवीन। . . . आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.” (यश. ६६:१२, १३ ईझी-टू-रीड व्हर्शन) एका लहान बाळाला त्याची आई जवळ घेते किंवा त्याच्यासोबत खेळते तेव्हा त्याला किती सुरक्षित वाटत असेल याची कल्पना करा. तसंच, यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही सुरक्षित राहावं अशी त्याची इच्छा आहे. ‘यहोवाच्या नजरेत माझं मोल नाही’ असा विचार मुळीच करू नका.—यिर्म. ३१:३. टेहळणी बुरूज१८.०९ १३ ¶६-७
शनिवार, २० जून
तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे?—१ इति. २९:५.
प्राचीन काळात इस्राएली लोकांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी बऱ्याच संधी होत्या. (निर्ग. ३६:२; नहे. ११:२) हीच गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. आज आपल्याकडेही पुष्कळ संधी आहेत. आपण आपला वेळ, भौतिक गोष्टी, कौशल्यं यांचा वापर करून आपल्या बंधुभगिनींना मदत करू शकतो. असं करण्याद्वारे आपण आनंदी तर होऊ पण सोबतच आपल्याला बरेच आशीर्वादही मिळतील. बांधकाम प्रकल्पांमध्ये जे स्वयंसेवक म्हणून काम करतात त्यांना सहसा पुष्कळ नवीन मित्र बनवता येतात. मारजी नावाच्या बहिणीने १८ वर्षं राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक तरुण बहिणींना प्रशिक्षण देण्यात मदत केली आहे. ती म्हणते की हा एकमेकांना उत्तेजन देण्याचा खूप चांगला मार्ग आहे. (रोम. १:१२) तिच्या जीवनात जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा प्रकल्पांमध्ये तिच्यासोबत ज्यांनी काम केलं त्या मित्रमैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिलं. तुम्ही कधी बांधकाम प्रकल्पांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे का? टेहळणी बुरूज१८.०८ २५ ¶९, ११
रविवार, २१ जून
तुझ्या तरुण वयामुळे कोणीही तुला तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे. त्याऐवजी, बोलण्यात व वागण्यात, तसेच प्रेम, विश्वास व शुद्धता या बाबतीत विश्वासू जनांसाठी एक चांगले उदाहरण हो.—१ तीम. ४:१२.
पौलने तीमथ्यला हे शब्द लिहिले तेव्हा तीमथ्यचं वय ३० च्या जवळपास होतं. असं असलं तरी पौलने त्याच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. यावरून आपण काय शिकतो? आपण बांधवांचं वय पाहून त्यांच्याबद्दल मत बनवू नये. ३३ वर्षांचा होईपर्यंत येशूने सेवेत किती काही केलं होतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे! काही संस्कृतींमध्ये तरुणांना सहसा आदर दिला जात नाही. या प्रभावामुळे काही मंडळ्यांमध्ये वडील तरुणांची सहायक सेवक किंवा वडील बनण्यासाठी शिफारस करत नाहीत. मग ते तरुण त्यासाठी लागणाऱ्या योग्यता पूर्ण करत असले तरीही. पण एखाद्या बांधवाचं अमुक वय झाल्यानंतरच त्याला सहायक सेवक किंवा वडील म्हणून नियुक्त केलं जावं असं बायबल कुठेही सांगत नाही.—१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९. टेहळणी बुरूज१८.०८ ११-१२ ¶१५-१६
सोमवार, २२ जून
ज्याला “ज्ञान” असे चुकीने नाव देण्यात आले आहे . . . [त्यापासून] दूर राहा.—१ तीम. ६:२०.
चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याजवळ भरवशालायक माहिती असणं गरजेचं आहे. यामुळे आपण जे वाचतो त्याबद्दल आपण खूप सावध असलं पाहिजे. (फिलिप्पै. ४:८, ९) भरवशालायक नसलेल्या बातम्यांच्या वेबसाईट्स, किंवा ई-मेल, मेसेज यांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा वाचण्यात आपण आपला वेळ घालवणं चुकीचं ठरेल. खासकरून आपण अशा वेबसाईट्सवर माहिती वाचण्याचं टाळलं पाहिजे जिथे धर्मत्यागी लोक आपले विचार मांडतात. देवाच्या लोकांचा विश्वास कमकुवत करण्याची आणि सत्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याची त्यांची इच्छा असते. भरवशालायक नसलेल्या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे आपले निर्णय चुकतील. अशा माहितीचा आपल्यावर प्रभाव होणार नाही, असा विचार आपण कधीही करू नये. उदाहरणार्थ, मोशेच्या काळात १२ जासूद वचनयुक्त देशाची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा काय झालं याचा विचार करा. त्यातील १० जासूद त्या देशाबद्दल नकारात्मक माहिती घेऊन आले. (गण. १३:२५-३३) त्यांनी माहिती बढवून चढवून सांगितली आणि यामुळे इस्राएली लोक खूप घाबरले व निराश झाले. (गण. १४:१-४, ६-१०) त्या लोकांनी संपूर्ण आणि खरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच, त्यांनी यहोवावरही भरवसा ठेवला नाही. याउलट त्यांनी खोट्या आणि नकारात्मक माहितीवर भरवसा ठेवला. टेहळणी बुरूज१८.०८ ४ ¶४-५
मंगळवार, २३ जून
फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.—१ करिंथ. १५:३३.
बऱ्याच लोकांमध्ये चांगले गुण असतात. यहोवाची उपासना न करणारे नेहमीच चुकीच्या गोष्टी करत असतील असं नाही. तुम्ही कदाचित अशा लोकांना ओळखत असाल. मग ती चांगली सोबत आहे असा याचा अर्थ होतो का? विचार करा: यहोवाशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर त्यांचा काय प्रभाव पडतो? ते देवाच्या जवळ जाण्यासाठी तुमची मदत करतात का? त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे? ते कशाबद्दल नेहमी बोलत असतात? ते सतत फॅशन, पैसा, कंप्युटर, टॅब, मोबाईल, मनोरंजनाची साधनं आणि अशा इतर गोष्टींबद्दल बोलत असतात का? ते नेहमी इतरांना नावं ठेवतात का? घाणेरडे विनोद सांगायची त्यांना सवय आहे का? येशूने म्हटलं: “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.” (मत्त. १२:३४) तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता त्यांचा प्रभाव यहोवाशी असलेल्या तुमच्या नात्यावर होत असल्याचं जर तुम्हाला जाणवलं, तर लगेचच पाऊल उचला. त्यांच्यासोबत कमी वेळ घालवा. गरज वाटली तर मैत्रीही तोडून टाका.—नीति. १३:२०. टेहळणी बुरूज१८.०७ १९ ¶११
बुधवार, २४ जून
मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.—गण. १२:३.
मोशे ८० वर्षांचा होता तेव्हा यहोवाने त्याला इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामीतून मुक्त करायची जबाबदारी दिली. (निर्ग. ३:१०) पण मोशेने ही जबाबदारी टाळण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. तरी यहोवा मोशेसोबत धीराने वागला आणि त्याला चमत्कार करण्याची शक्तीही दिली. (निर्ग. ४:२-९, २१) यहोवा त्याच्या शक्तीचा वापर करून मोशेच्या मनात भीती घालू शकला असता आणि त्याला आपल्या आज्ञा पाळायला लावू शकला असता. पण याउलट यहोवाने त्याच्या बाबतीत धीर धरला आणि त्याच्याशी दयाळूपणे वागला. तसंच यहोवाने त्याच्या नम्र सेवकाला आश्वासन दिलं की तो त्याच्यासोबत असेल. अशा प्रकारे वागल्यामुळे काही फरक पडला का? हो नक्कीच. पुढे जाऊन मोशेने देवाच्या लोकांचं चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं. जसा यहोवाने त्याच्याबद्दल विचार केला तसंच मोशेनेही इतरांचा विचार केला आणि तो सौम्यतेने वागला. जर तुम्हालाही इतरांवर काही प्रमाणात अधिकार असेल तर तुम्ही यहोवाचं अनुकरण करून तुमच्या अधिकाराखाली असलेल्यांबद्दल दया आणि धीर दाखवू शकता. (कलस्सै. ३:१९-२१; १ पेत्र ५:१-३) जर तुम्ही यहोवा देवाचं आणि महान मोशे असलेल्या येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं तर इतर जण मनात कोणताही संकोच न बाळगता तुमच्याशी बोलतील. यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ शकाल.—मत्त. ११:२८, २९. टेहळणी बुरूज१८.०९ २४-२५ ¶७-१०
गुरुवार, २५ जून
बंधुनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!—स्तो. १३३:१.
आपल्या बांधवांना तजेला देण्यासाठी आपण प्रेमळ आणि दयाळू असणं गरजेचं आहे. यामुळे मंडळीत असलेलं ऐक्याचं बंधन आणखी मजबूत होतं. तुम्ही तुमच्या मंडळीतल्या बांधवांशी आणखी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू शकता का? (२ करिंथ. ६:११-१३) तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी तुम्ही तुमचा प्रकाश झळकवू शकता. दयाळूपणे वागल्याने तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना यहोवाविषयी शिकण्यासाठी मदत होऊ शकते. स्वतःला विचारा: ‘माझे शेजारी माझ्याबद्दल काय विचार करतात? मी माझं घर, घराभोवतीचा परिसर स्वच्छ आणि टापटिप ठेवतो का? शेजाऱ्यांच्या मदतीला मी धावून जातो का?’ तसंच, तुम्ही इतर बांधवांना त्यांचा अनुभवही विचारू शकता. दयाळूपणे वागल्याने व त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे नातेवाइकांवर, शेजाऱ्यांवर, शाळेत किंवा सोबत काम करणाऱ्यांवर याचा कसा परिणाम झाला आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता.—इफिस. ५:९. टेहळणी बुरूज१८.०६ २४ ¶१३-१४
शुक्रवार, २६ जून
अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला ठार मारणारा प्रत्येक जण, आपण देवाची पवित्र सेवा केली आहे असं समजेल.—योहा. १६:२.
स्तेफनची हत्या करणाऱ्यांनीही असाच विचार केला होता. (प्रे. कार्ये ६:८, १२; ७:५४-६०) इतिहासात अनेकदा आपल्याला अशा धार्मिक लोकांबद्दल वाचायला मिळतं ज्यांनी हत्येसारखी वाईट कृत्यं केली आहेत. ती त्यांनी देवासाठी केली असा ते दावा करतात. पण खरंतर त्यांनी देवाचे नियम मोडले आहेत. (निर्ग. २०:१३) यावरून स्पष्टच होतं, की त्यांच्या विवेकाने त्यांचं योग्य मार्गदर्शन केलेलं नाही. आपला विवेक नीट काम करत आहे की नाही याची आपण खात्री कशी करू शकतो? बायबलमध्ये दिलेले नियम आणि तत्त्वं “शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी, न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी” आहेत. (२ तीम. ३:१६) आपण बायबलचं नियमित वाचन केलं पाहिजे, त्यावर खोलवर विचार केला पाहिजे आणि वाचलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या पाहिजेत. असं केल्यामुळे आपण यहोवासारखा विचार करायला लागू. मगच आपण खात्रीने म्हणू शकतो, की आपला विवेक योग्य मार्गदर्शन करायला प्रशिक्षित झाला आहे. टेहळणी बुरूज१८.०६ १६-१७ ¶३-४
शनिवार, २७ जून
आत्म्याची तलवार, अर्थात देवाचे वचन स्वीकारा.—इफिस. ६:१७.
रोमी सैनिक वापरत असलेल्या तलवारीची लांबी जवळपास ५० सेंटीमीटर (२० इंच) इतकी असायची. रोज सराव केल्यामुळे हे सैनिक तलवार चालवण्यात खूप तरबेज होते. प्रेषित पौलने म्हटलं की देवाचं वचन तलवारीसारखं आहे आणि ते आपल्याला देवाने दिलं आहे. पण आपल्या विश्वासाचं समर्थन करण्यासाठी आणि स्वतःचे विचार सुधारण्यासाठी आपण याचा कुशलपणे वापर करायला शिकलं पाहिजे. (२ करिंथ. १०:४, ५; २ तीम. २:१५) आपल्याला सैतान आणि दुरात्म्यांना घाबरण्याची गरज नाही. हे खरं आहे की ते शक्तिशाली आहेत पण यहोवा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. शिवाय, ते कायमस्वरूपी जगणारही नाहीत. त्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान कैद केलं जाईल आणि त्या वेळी ते कोणालाही इजा पोहोचवू शकणार नाही. त्यानंतर त्यांचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:१-३, ७-१०) आपण आपल्या शत्रूला, त्याच्या कुयुक्त्यांना, त्याच्या ध्येयाला ओळखतो. यहोवाच्या मदतीने आपण खंबीरपणे त्याचा सामना करू शकतो! टेहळणी बुरूज१८.०५ ३० ¶१५; ३१ ¶१९-२१
रविवार, २८ जून
सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही.—उत्प. ३:४.
साप बोलू शकत नाही हे आदामला माहीत होतं. त्यामुळे साप हव्वाशी बोलल्याचं जेव्हा आदामला कळलं, तेव्हा एखादी आत्मिक व्यक्ती तिच्याशी बोलली हे त्याच्या लक्षात आलं असावं. (उत्प. ३:१-६) या आत्मिक व्यक्तीबद्दल आदाम-हव्वाला माहीत नव्हतं. पण तरी एका अनोळखी व्यक्तीला साथ देण्याचा आणि स्वर्गात राहणाऱ्या आपल्या प्रेमळ पित्याशी बंड करण्याचा आदामने निर्णय घेतला. (१ तीम. २:१४) त्यानंतर लगेच यहोवाने त्या दुष्ट शत्रूबद्दल जास्त माहिती द्यायला सुरुवात केली. तसंच, सैतानाचा पुढे जाऊन नाश केला जाईल हेदेखील त्याने सांगितलं. पण यासोबतच यहोवाने हासुद्धा इशारा दिला की सापाच्या माध्यमाने जी आत्मिक व्यक्ती हव्वाशी बोलली ती देवावर प्रेम करणाऱ्यांचा विरोध करेल. (उत्प. ३:१५) बंड करणाऱ्या देवदूताचं वैयक्तिक नाव यहोवाने आपल्याला सांगितलं नाही. एदेन बागेत बंडाळी झाल्याच्या २,५०० वर्षांनंतर यहोवाने बंड करणाऱ्याबद्दल सांगितलं.—ईयो. १:६. टेहळणी बुरूज१८.०५ २२ ¶१-२
सोमवार, २९ जून
ते . . . धीराने फळ देतात.—लूक ८:१५.
तुमच्या क्षेत्रातील लोक राज्याचा संदेश ऐकत नसल्यामुळे तुम्ही कधी निराश झाला आहात का? असं असल्यास प्रेषित पौलच्या भावना तुम्ही समजू शकता. त्याने जवळपास ३० वर्षं प्रचारकार्य केलं आणि बऱ्याच लोकांना ख्रिस्ती बनण्यासाठी मदत केली. (प्रे. कार्ये १४:२१; २ करिंथ. ३:२, ३) असं असलं तरी फार कमी यहुदी लोक ख्रिस्ती बनले. बऱ्याच यहुदी लोकांनी त्याचं ऐकलंसुद्धा नाही, आणि काहींनी तर त्याचा छळदेखील केला. (प्रे. कार्ये १४:१९; १७:१, ४, ५, १३) त्यांच्या अशा वागण्यामुळे पौलला कसं वाटलं? त्याने म्हटलं: “मला भयंकर दुःख आहे आणि माझ्या अंतःकरणाला सतत वेदना होत आहेत.” (रोम. ९:१-३) त्याला असं का वाटलं? कारण त्याला प्रचारकार्य खूप आवडायचं आणि लोकांवर त्याचं प्रेम होतं. पौलला यहुदी लोकांबद्दल खूप आपुलकी होती आणि देवाची कृपा त्यांनी नाकारली यामुळे पौलला खूप दुःख झालं. पौलप्रमाणे आपल्यालाही लोकांची काळजी असल्यामुळे आपण त्यांना प्रचार करतो.—मत्त. २२:३९; १ करिंथ. ११:१. टेहळणी बुरूज१८.०५ १३ ¶४-५
मंगळवार, ३० जून
मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.—नीति. १२:२५.
पौलने स्पष्ट केलं की जे बांधव इतरांना प्रोत्साहन देतात त्यांनादेखील प्रोत्साहनाची गरज असते. त्याने रोममधील बांधवांना म्हटलं: “तुम्हाला भेटण्याची माझी फार इच्छा आहे; यासाठी, की तुम्हाला काही आध्यात्मिक देणगी देऊन मला तुमचा विश्वास मजबूत करता यावा. किंवा त्यापेक्षा, एकमेकांच्या विश्वासामुळे म्हणजेच माझ्या व तुमच्या विश्वासामुळे आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता यावे.” (रोम. १:११, १२) यावरून कळतं की प्रेषित पौललाही प्रोत्साहनाची गरज होती. (रोम. १५:३०-३२). यहोवाची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या बंधुभगिनींना आपण प्रोत्साहन देऊ शकतो. आणखी कोणाला प्रोत्साहनाची गरज असते? “केवळ प्रभूमध्ये” लग्न करा, ही यहोवाने दिलेली आज्ञा पाळण्यासाठी आज बरेच बंधुभगिनी अविवाहित आहेत. अशांनाही प्रोत्साहनाची गरज असते. (१ करिंथ. ७:३९) आज काही बंधुभगिनींचा विश्वासामुळे छळ होतो किंवा मग ते आजारपणाचा सामना करत असतात. अशा बंधुभगिनींना प्रोत्साहनाची खूप गरज असते.—२ थेस्सलनी. १:३-५. टेहळणी बुरूज१८.०४ २१ ¶३-५