वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es20 पृ. ९४-१०६
  • ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट
  • शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०२०
  • उपशिर्षक
  • शनिवार, १ ऑगस्ट
  • रविवार, २ ऑगस्ट
  • सोमवार, ३ ऑगस्ट
  • मंगळवार, ४ ऑगस्ट
  • बुधवार, ५ ऑगस्ट
  • गुरुवार, ६ ऑगस्ट
  • शुक्रवार, ७ ऑगस्ट
  • शनिवार, ८ ऑगस्ट
  • रविवार, ९ ऑगस्ट
  • सोमवार, १० ऑगस्ट
  • मंगळवार, ११ ऑगस्ट
  • बुधवार, १२ ऑगस्ट
  • गुरुवार, १३ ऑगस्ट
  • शुक्रवार, १४ ऑगस्ट
  • शनिवार, १५ ऑगस्ट
  • रविवार, १६ ऑगस्ट
  • सोमवार, १७ ऑगस्ट
  • मंगळवार, १८ ऑगस्ट
  • बुधवार, १९ ऑगस्ट
  • गुरुवार, २० ऑगस्ट
  • शुक्रवार, २१ ऑगस्ट
  • शनिवार, २२ ऑगस्ट
  • रविवार, २३ ऑगस्ट
  • सोमवार, २४ ऑगस्ट
  • मंगळवार, २५ ऑगस्ट
  • बुधवार, २६ ऑगस्ट
  • गुरुवार, २७ ऑगस्ट
  • शुक्रवार, २८ ऑगस्ट
  • शनिवार, २९ ऑगस्ट
  • रविवार, ३० ऑगस्ट
  • सोमवार, ३१ ऑगस्ट
शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा—२०२०
es20 पृ. ९४-१०६

ऑगस्ट

शनिवार, १ ऑगस्ट

आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, यातूनच देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो.—रोम. ५:८.

यहोवा आणि येशू यांनी आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत याची आपल्याला सभांमध्ये नेहमी आठवण करून देण्यात येते. आपण प्रत्येक दिवशी कृतज्ञतेमुळे सर्व बाबतीत येशूचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. (२ करिंथ. ५:१४, १५) त्यासोबतच यहोवाने आपल्यासाठी केलेल्या खंडणीच्या तरतुदीमुळे आपल्याला त्याची स्तुती करण्याचीही प्रेरणा मिळते. आणि त्याची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणजे सभांमध्ये मनापासून उत्तरं देणं. यहोवा आणि त्याच्या पुत्रावर आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपण स्वेच्छेने कोणताही त्याग करायला तयार असलं पाहिजे. सभेला हजर राहण्यासाठी आपल्याला बऱ्‍याचदा वेगवेगळे त्याग करावे लागतात. अनेक मंडळ्यांच्या आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभा संध्याकाळी असतात. पण त्या वेळी आपण दिवसभर काम करून थकलेलो असतो. तसंच दुसरी सभा शनिवारी किंवा रविवारी असते, तेव्हा इतर लोक आराम करत असतात. मग जेव्हा आपण थकलेलो असतानाही सभांना जातो, तेव्हा यहोवा आपल्याकडे लक्ष देतो का? हो नक्कीच देतो! खरंतर, आपण जितका जास्त संघर्ष करतो तितकं जास्त यहोवा आपल्या प्रेमाची कदर करतो.—मार्क १२:४१-४४. टेहळणी बुरूज१९.०१ २९ ¶१२-१३

रविवार, २ ऑगस्ट

तिला पाहताच प्रभूला तिचा कळवळा आला.—लूक ७:१३.

येशूने इतरांप्रमाणेच काही समस्यांचा सामना केला. उदाहरणार्थ, येशू गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झाला. येशूने आपल्या वडिलांकडून म्हणजे योसेफकडून कष्टाचं काम शिकून घेतलं. (मत्त. १३:५५; मार्क ६:३) येशूने सेवाकार्य सुरू करण्याच्या काही काळाआधी योसेफचा मृत्यू झाला असावा. त्यामुळे येशूने आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावण्याचं दुःख अनुभवलं होतं. तसंच, एकाच कुटुंबातल्या सदस्यांचा विश्‍वास वेगळा असतो तेव्हा परिस्थिती कशी असते हेदेखील त्याने अनुभवलं होतं. (योहा. ७:५) अशा प्रकारे, सर्वसामान्य लोकांना कोणत्या समस्या असतात आणि त्यांच्या काय भावना असतात हे या व इतर परिस्थितींमुळे येशूला समजायला मदत झाली. खासकरून येशूने केलेल्या चमत्कारांवरून लोकांबद्दल त्याला काळजी असल्याचं दिसून येतं. त्याने फक्‍त कर्तव्य म्हणून नाही, तर दुःखात असलेल्यांबद्दल त्याला “कळवळा आला” म्हणून चमत्कार केले. (मत्त. २०:२९-३४; मार्क १:४०-४२) यावरून कळतं की येशूने त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना मदत करण्याची त्याची इच्छा होती.—मार्क ७:३२-३५; लूक ७:१२-१५. टेहळणी बुरूज१९.०३ १६ ¶१०-११

सोमवार, ३ ऑगस्ट

एकमेकांचे सहन करत राहा.—कलस्सै. ३:१३.

येशूच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याला किती ताण असेल याची कल्पना करा. कोट्यवधी लोकांचं भविष्य त्याच्या एकनिष्ठेवर अवलंबून होतं. त्यामुळे शेवटपर्यंत यहोवाला एकनिष्ठ राहणं त्याला खूप गरजेचं होतं. (रोम. ५:१८, १९) याहूनही महत्त्वाचं म्हणजे येशूच्या निर्णयामुळे एकतर त्याच्या पित्याच्या नावाचा गौरव झाला असता किंवा त्यावर कलंक लागला असता. (ईयो. २:४) अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेवटचं भोजन करताना “आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणाला मानले जाते, यावरून [प्रेषितांमध्ये] मोठा वाद सुरू झाला.” पण इतकं सर्व होऊनही येशू त्या परिस्थितीत चिडला नाही. याऐवजी तो त्यांच्याशी शांतपणे बोलला. येशूने दयेने पण स्पष्टपणे प्रेषितांना हे समजवलं की त्यांनी कशा प्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे. आणि यानंतर येशूने प्रेषितांची प्रशंसा केली कारण ते त्याला एकनिष्ठ राहिले. (लूक २२:२४-२८; योहा. १३:१-५, १२-१५) आपण येशूचं अनुकरण करू शकतो आणि तणावात असतानाही नेहमी नम्रता दाखवू शकतो. आपणही कधीकधी अशा गोष्टी बोलतो किंवा करतो ज्यामुळे इतरांना राग येतो. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला यहोवाने दिलेली आज्ञा पाळणं सोपं जाईल. (नीति. १२:१८; याको. ३:२, ५) इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांसाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे.—इफिस. ४:२९. टेहळणी बुरूज१९.०२ ११-१२ ¶१६-१७

मंगळवार, ४ ऑगस्ट

[परमेश्‍वराने] न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे.—स्तो. ९:७.

मोशेच्या नियमांमुळे एखाद्या व्यक्‍तीवर गुन्हा करण्याचा खोटा आरोप लावण्याची शक्यता फार कमी होती. ज्या व्यक्‍तीवर आरोप लावला जायचा, त्याला हे जाणून घेण्याचा हक्क होता की तो आरोप कोण लावत आहे. (अनु. १९:१६-१९; २५:१) तसंच, त्याला दोषी ठरवण्याआधी, कमीतकमी त्या घटनेबद्दल दोन साक्षीदारांनी साक्ष देणं गरजेचं होतं. (अनु. १७:६; १९:१५) पण जर एखाद्या व्यक्‍तीला गुन्हा करताना फक्‍त एकानेच पाहिलं तेव्हा काय? अशा परिस्थितीत त्याने हा विचार करणं चुकीचं होतं की आपल्याला शिक्षा होणार नाही. कारण यहोवाने ते पाहिलं होतं. न्याय करण्याच्या बाबतीत यहोवा सर्वोत्तम उदाहरण मांडतो, तो कधीच कोणावर अन्याय करत नाही. जे लोक त्याच्या नीतिमान स्तरांनुसार जगतात त्यांना तो आशीर्वाद देतो. पण जे लोक आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, त्यांना मात्र तो शिक्षा करतो. (२ शमु. २२:२१-२३; यहे. ९:९, १०) वाईट गोष्टी करणाऱ्‍या काही लोकांना शिक्षा होत नाही, असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. पण योग्य वेळ आल्यावर यहोवा त्यांना त्यांच्या वाईट कामांसाठी शिक्षा देईल. (नीति. २८:१३) आणि जर त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही, तर त्यांना याची जाणीव होईल की “जिवंत देवाच्या हातात सापडणे ही भयंकर गोष्ट आहे.”—इब्री १०:३०, ३१. टेहळणी बुरूज१९.०२ २३-२४ ¶२०-२१

बुधवार, ५ ऑगस्ट

परमेश्‍वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही.—अनु. ३४:१०.

मोशे मार्गदर्शनासाठी नेहमी यहोवावर अवलंबून राहिला. बायबल त्याच्याबद्दल सांगतं की “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री ११:२४-२७) इजिप्त देशातून निघाल्याच्या दोन महिन्याच्या आतच एक गंभीर परिस्थिती उद्‌भवली. इस्राएली लोक अजून सीनाय पर्वताजवळ पोचले नव्हते. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे इस्राएली लोक मोशेविरुद्ध कुरकुर करू लागले. लोक मोशेवर इतके जास्त रागावले की “मोशेने परमेश्‍वराचा धावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत.” (निर्ग. १७:४) यावर यहोवाने मोशेला काही स्पष्ट सूचना दिल्या. यहोवाने सांगितलं की त्याने आपली काठी होरेबमधील खडकावर मारावी. या घटनेबद्दल बायबल सांगतं: “इस्राएलांच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले.” मग खडकातून पाणी वाहू लागलं आणि इस्राएली लोकांना पिण्यासाठी भरपूर पाणी मिळालं. अशा प्रकारे यहोवाने ती समस्या सोडवली.—निर्ग. १७:५, ६. टेहळणी बुरूज१८.०७ १३ ¶४-५

गुरुवार, ६ ऑगस्ट

प्रेम उन्‍नती करते.—१ करिंथ. ८:१.

यहोवा त्याच्या प्रेमाद्वारे आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळीचाही उपयोग करतो. आपण आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करतो तेव्हा आपण यहोवावरील आपलं प्रेम दाखवत असतो. यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत याची जाणीव करून देण्यासाठी आपण त्यांना जमेल ती मदत करतो. (१ योहा. ४:१९-२१) प्रेषित पौलने म्हटलं: “आता जसे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.” (१ थेस्सलनी. ५:११) प्रोत्साहन देण्याचं काम फक्‍त वडिलांचं नाही. तर प्रत्येक जण बंधुभगिनींना सांत्वन देऊन यहोवा आणि येशूचं अनुकरण करू शकतो. (रोम. १५:१, २) मंडळीमध्ये काही लोक कदाचित तीव्र स्वरूपाच्या निराशेचा किंवा चिंतेचा सामना करत असतील आणि त्यांना औषधांची व वैद्यकीय मदतीची गरज पडू शकते. (लूक ५:३१) मंडळीतील वडील आणि इतर बंधुभगिनी हे डॉक्टरसारखा उपचार तर करू शकत नाही, पण ते त्या व्यक्‍तीला मदत आणि सांत्वन नक्कीच देऊ शकतात. असं करणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळीमधल्या प्रत्येक व्यक्‍तीला असं उत्तेजन देण्यात आलं आहे: “निराश झालेल्यांचे सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनी. ५:१४. टेहळणी बुरूज१८.०९ १४ ¶१०-११

शुक्रवार, ७ ऑगस्ट

घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.—यश. ४१:१०.

यहोवाला आणखी चांगल्या रीतीने जाणल्यामुळे आपण त्याच्यावर असलेला आपला भरवसा वाढवू शकतो. असं करण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे, बायबलचं वाचन आणि त्यावर मनन करणं. यहोवाने प्राचीन काळात आपल्या लोकांचं कसं संरक्षण केलं याबद्दल बायबलमध्ये भरवशालायक अहवाल दिले आहेत. या अहवालांमुळे आपल्याला खात्री पटते की तो आजदेखील आपली काळजी घेईल. यहोवा आपलं रक्षण कसं करतो हे समजण्यासाठी यशयाने एका सुंदर शब्दचित्राचा उपयोग केला. त्याने यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी आणि त्याच्या सेवकांची तुलना कोकरांशी केली. यशया यहोवाबद्दल म्हणतो: “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्‍यांस संभाळून नेईल.” (यश. ४०:११) आपण जेव्हा यहोवाच्या मजबूत बाहूंमध्ये असल्याचं अनुभवतो, तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित आणि शांत वाटतं. समस्यांचा सामना करत असताना आपलं मन शांत असावं यासाठी आजच्या वचनावर मनन करा. असं केल्यामुळे पुढे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी हे सांत्वनदायक शब्द तुम्हाला नक्कीच बळ देतील. टेहळणी बुरूज१९.०१ ७ ¶१७-१८

शनिवार, ८ ऑगस्ट

हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.—स्तो. ४०:८.

तुम्ही अशी काही ध्येयं ठेवली आहेत का, जी तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करत आहात? कदाचित ती ध्येयं रोज बायबल वाचन करणं, सभांमध्ये चांगली उत्तरं देणं, भाग तयार करणं किंवा सेवाकार्यात आणखी कुशलपणे बायबलचा वापर करणं ही असतील. तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रगतीबद्दल जाणवतं किंवा इतर जण तुम्हाला त्याबद्दल सांगतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला कदाचित खूप आनंद होतो आणि तो झालादेखील पाहिजे! असं का? कारण येशूसारखं तुम्हीही यहोवाच्या इच्छेनुसार कार्यं करत आहात. (नीति. २७:११) जेव्हा तुम्ही यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही आनंद देणारी कामं करत असता आणि यामुळे तुमच्या जीवनाला एक उद्देश लाभतो. पौलने सल्ला दिला: “खंबीर व स्थिर राहा; आणि प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा. कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे.” (१ करिंथ. १५:५८) पण जेव्हा लोक जगातली ध्येयं जसं की, पैसे कमवणं किंवा प्रसिद्धी मिळवणं यांवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा ते खऱ्‍या अर्थाने आनंदी नसतात. ते जरी यशस्वी असले तरी सहसा त्यांच्या जीवनात एक पोकळी असते.—लूक ९:२५. टेहळणी बुरूज१८.१२ २२ ¶१२-१३

रविवार, ९ ऑगस्ट

नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील.—स्तो. ३७:२९.

या वचनात दावीद एका अशा काळाबद्दल सांगत होता जेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक यहोवाच्या नीतिमान स्तरांचे पालन करतील. (२ पेत्र ३:१३) यशया ६५:२२ मध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे: “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल.” यावरून आपल्याला कळतं की नवीन जगात यहोवाची उपासना करणारे लोक हजारो वर्षं जगतील. प्रकटीकरण २१:१-४ या वचनांनुसार देव संपूर्ण मानवजातीला अनेक आशीर्वाद देईल आणि त्यांपैकी एक म्हणजे तेव्हा “मरण नसेल.” आदाम-हव्वाने नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याची आशा गमावली, पण ही पृथ्वी पुन्हा एक नंदनवन बनेल. देवाने वचन दिल्याप्रमाणे तो पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना आशीर्वाद देईल. दावीदने म्हटलं की नम्र आणि नीतिमान लोक पृथ्वीचे वतन पावतील आणि त्यात नेहमीकरता राहतील. (स्तो. ३७:११) तसंच, यशयाच्या पुस्तकातील भविष्यवाण्या आपल्याला नंदनवन झालेल्या सुंदर पृथ्वीवर राहण्याची आशा देतात. (यश. ११:६-९; ३५:५-१०; ६५:२१-२३) हे कधी घडेल? येशूने त्या गुन्हेगाराला दिलेलं अभिवचन पूर्ण होईल तेव्हा. (लूक २३:४३) आपण सर्व त्या नंदनवनाचा आनंद घेऊ. टेहळणी बुरूज१८.१२ ७ ¶२२-२३

सोमवार, १० ऑगस्ट

सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.—नीति. ४:२३.

आपण पूर्णपणे जगाची विचारसरणी टाळू शकतो का? नाही. कारण आपण या जगातून प्रत्यक्षपणे बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून काही अंशी तरी आपल्यावर त्याचा परिणाम होणार. (१ करिंथ. ५:९, १०) जेव्हा आपण प्रचाराला जातो तेव्हा लोक त्यांचे चुकीचे विचार आणि खोटे विश्‍वास आपल्याला सांगतात. हे टाळणं आपल्याला शक्य नसलं तरी आपण त्यांवर विचार करत बसत नाही किंवा ते स्वीकारत नाही. येशूप्रमाणे आपणही सैतानाचे विचार लगेच फेटाळून लावले पाहिजेत. तसंच, अनावश्‍यकपणे जगाच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येण्याचं टाळल्याने आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. उदाहरणार्थ, आपण विचारपूर्वक आपल्या मित्रांची निवड केली पाहिजे. बायबल आपल्याला इशारा देतं की जर आपण यहोवाचे उपासक नसलेल्या लोकांसोबत घनिष्ठ मैत्री केली तर आपणही त्यांच्यासारखा विचार करायला लागू. (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:१२, ३२, ३३) उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त, हिंसा किंवा अनैतिकता यांना बढावा देणारं मनोरंजन विषासारखं आहे. तेव्हा, “देवाच्या ज्ञानाच्या विरोधात” असलेल्या या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.—२ करिंथ. १०:५. टेहळणी बुरूज१८.११ २१ ¶१६-१७

मंगळवार, ११ ऑगस्ट

मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.—स्तो. ८६:११.

सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा आपला निर्धार आपण आणखी पक्का कसा करू शकतो? एक मार्ग म्हणजे, आपण इतरांना बायबलची सत्यं शिकवण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. बायबलची तुलना एका तलवारीशी करण्यात आली आहे. एक कुशल सैनिक जसं तलवार घट्ट धरून ठेवतो, तसंच आपणही देवाच्या वचनाला घट्ट धरून ठेवलं पाहिजे. (इफिस. ६:१७) आपल्यापैकी प्रत्येक जण “सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारा” बनू शकतो. (२ तीम. २:१५) आपण बायबलची सत्यं इतरांना शिकवतो तेव्हा सत्यावर असलेलं आपलं प्रेमही आणखी वाढतं. आणि यामुळे सत्यात चालत राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. आपल्याला मिळालेलं सत्य यहोवाकडून आपल्यासाठी एक भेट आहे. यामुळे आपल्या स्वर्गीय पित्यासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडणं आपल्याला शक्य होतं. सत्य आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. यहोवाने आजपर्यंत आपल्याला बरंच काही शिकवलं आहे, पण ही फक्‍त एक सुरुवात आहे! यहोवा आपल्याला सदासर्वकाळ शिकवत राहण्याचं वचन देतो. त्यामुळे एखाद्या मौल्यवान मोत्यासारखं आपण सत्य जपलं पाहिजे. नेहमी सत्य विकत घ्या, पण ते कधीही विकू नका.—नीति. २३:२३. टेहळणी बुरूज१८.११ ८ ¶२; १२ ¶१५-१७

बुधवार, १२ ऑगस्ट

नीतिमत्त्वाचा प्रचारक असलेल्या नोहाला इतर सात जणांसोबत सुखरूप ठेवले.—२ पेत्र २:५.

जलप्रलय येण्याआधी नोहाने जो संदेश सांगितला त्यात येणाऱ्‍या नाशाबद्दल सावधगिरीचा इशारादेखील नक्कीच असेल. येशूने त्या काळाबद्दल म्हटलं: “जलप्रलय येण्याआधीच्या काळात, नोहा जहाजात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुषांची लग्न होत होती आणि जलप्रलय येऊन ते सर्व त्यात वाहून जाईपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही. तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळातही घडेल.” (मत्त. २४:३८, ३९) जवळपास सर्वांनीच नोहाचा संदेश नाकारला, पण तरी तो यहोवाने दिलेला संदेश सांगत राहिला. देव भविष्यात मानवांसाठी काय करणार आहे हे जाणून घेण्याची संधी इतरांना मिळावी म्हणून आपण राज्याचा संदेश सांगतो. यहोवासारखीच आपलीही इच्छा आहे की लोकांनी हा संदेश ऐकून आपला जीव ‘वाचवावा.’ (यहे. १८:२३) आपण घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी प्रचारकार्य करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना देवाचं राज्य येणार आहे आणि ते या जगाच्या दुष्ट व्यवस्थेचा नाश करणार आहे यांबद्दल सावध करतो.—यहे. ३:१८, १९; दानी. २:४४; प्रकटी. १४:६, ७. टेहळणी बुरूज१८.०५ १९ ¶८-९

गुरुवार, १३ ऑगस्ट

ज्याच्या तोडून सत्याचे उद्‌गार श्‍वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्याय्यत्व प्रगट करतो.—नीति. १२:१७.

तुमच्या राहत्या ठिकाणी आपल्या कामावर बंदी आहे आणि सरकारी अधिकाऱ्‍यांनी तुम्हाला अटक करून आपल्या बांधवांबद्दल माहिती विचारली, तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना तुमच्याजवळ असलेली सर्व माहिती सांगणार का? रोमी राज्यपालाने जेव्हा येशूला प्रश्‍नं विचारले तेव्हा त्याने काय केलं? “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो” हे तत्त्व येशूने लागू केलं आणि काही वेळा तर तो काहीच बोलला नाही. (उप. ३:१, ७; मत्त. २७:११-१४) आपण जर अशा परिस्थितीत असलो तर सुज्ञपणे वागणं गरजेचं आहे. सावधगिरी बाळगल्यामुळे आपल्या बांधवांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. (नीति. १०:१९; ११:१२) जर मंडळीतल्या एका प्रचारकाने गंभीर पाप केल्याचं तुम्हाला कळलं, आणि तो तुमचा मित्र किंवा नातेवाईक असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? जे खरं आहे ते सांगा. काहीही न लपवता संपूर्ण माहिती वडिलांना सांगणं ही तुमची जबाबदारी आहे. खरंतर, सर्व माहिती जाणून घेणं हा वडिलांचा हक्क आहे. यामुळे ते पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला योग्य ती मदत पुरवू शकतील आणि यहोवासोबत त्याचं तुटलेलं नातं परत जोडण्यासाठी त्याला मदत करू शकतील.—याको. ५:१४, १५. टेहळणी बुरूज१८.१० १० ¶१७-१८

शुक्रवार, १४ ऑगस्ट

तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.—१ थेस्सलनी. ५:११.

तुम्ही इतरांना प्रेमाने प्रोत्साहन कसं देऊ शकता? एक मार्ग म्हणजे इतरांचं चांगल्या प्रकारे ऐकण्याद्वारे. (याको. १:१९) धीराने ऐकणं हा प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. आपल्या बांधवाच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याला विचारपूर्वक प्रश्‍न विचारा. तुम्हाला त्याच्याबद्दल काळजी आहे, हे तुमच्या हावभावावरून जरी दिसलं तरी तो त्याचं मन मोकळं करेल. तो बोलत असताना धीराने ऐका आणि मधे न बोलता त्याला त्याच्या भावना व्यक्‍त करू द्या. त्याचं चांगल्या प्रकारे ऐकून घेतल्यामुळे तुम्ही त्याच्या भावना समजू शकाल आणि तुमच्यावर त्याचा भरवसा वाढेल. यामुळे तुम्ही जेव्हा त्याला काही सांगाल तेव्हा तो ते लक्षपूर्वक ऐकेल. तुम्हाला जेव्हा इतरांची मनापासून काळजी असते तेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सांत्वन देऊ शकता. टेहळणी बुरूज१८.०९ १४ ¶१०; १५ ¶१३

शनिवार, १५ ऑगस्ट

सत्य . . . विकत घे.—नीति. २३:२३.

एखादी गोष्ट विकत घेणाऱ्‍याला जशी किंमत मोजावी लागते तशी सत्य विकत घेणाऱ्‍या प्रत्येकाला वेळेची किंमत मोजावी लागते. राज्याचा संदेश ऐकण्यासाठी, बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनं वाचण्यासाठी आणि यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच, सभांसाठी तयारी करायला आणि तिथे उपस्थित राहायलाही वेळ द्यावा लागतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण कमी महत्त्वाच्या इतर गोष्टींमधून वेळ काढला पाहिजे. (इफिस. ५:१५, १६) बायबलची मूलभूत सत्यं शिकून घेण्यासाठी किती वेळ लागतो? हे प्रत्येक व्यक्‍तीवर अवलंबून आहे. यहोवाच्या बुद्धीबद्दल, त्याच्या मार्गांबद्दल आणि त्याने केलेल्या कार्यांबद्दल शिकण्याला कोणतीच मर्यादा नाही. (रोम. ११:३३) इंग्रजीमधील टेहळणी बुरूजच्या पहिल्या अंकात सत्याची तुलना “एका लहान फुलाशी” करण्यात आली होती. त्यात असं म्हटलं होतं: “सत्याच्या फक्‍त एका फुलानेच संतुष्ट होऊ नका. जर एकच फूल पुरेसं असतं, तर इतर फुलांची गरजच पडली नसती. नेहमी फुलं वेचत राहा आणि शोधत राहा.” आपण जरी सदासर्वकाळ जगलो तरी यहोवाबद्दल शिकणं संपणार नाही. पण आज खासकरून हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्याजवळ असलेल्या वेळेत यहोवाबद्दल होईल तितकं शिकत राहावं. टेहळणी बुरूज१८.११ ४ ¶७

रविवार, १६ ऑगस्ट

पतींनो, . . . आपल्या पत्नींवर प्रेम करा.—इफिस. ५:२५.

कुटुंबात इतरांचा विचार करण्याच्या आणि इतरांची काळजी घेण्याच्या बाबतीत पतींनी एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. बायबल म्हणतं की पतीने आपल्या पत्नीचा विचार करणं आणि तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे. (१ पेत्र ३:७; तळटीप) एका समजूतदार पतीला जाणीव असते की तो आपल्या पत्नीपेक्षा जरी बऱ्‍याच बाबतीत वेगळा असला, तरी तो तिच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. (उत्प. २:१८) तो तिच्या भावनांचा विचार करतो आणि तिला आदराने वागवतो. एक विचारशील पती आपल्या पत्नीच्या भावनांचा विचार करतो. तो कधीच इतर स्त्रियांशी इश्‍कबाजी करणार नाही किंवा त्यांच्यात अयोग्य आवड दाखवणार नाही. (ईयो. ३१:१) तसंच, तो सोशल मिडियाचा वापर करून त्यांच्याशी जवळीक साधणार नाही अथवा इंटरनेटवर ख्रिश्‍चनांसाठी अयोग्य असणाऱ्‍या वेबसाईट पाहणार नाही. आपल्या पत्नीवर प्रेम असल्यामुळेच नाही, तर यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि वाइटाबद्दल द्वेष असल्यामुळे तो तिला नेहमी विश्‍वासू राहील.—स्तो. १९:१४; ९७:१०. टेहळणी बुरूज१८.०९ २९ ¶३-४

सोमवार, १७ ऑगस्ट

तुम्हा सर्वांमध्ये जो स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून वागतो तोच श्रेष्ठ आहे.—लूक ९:४८.

देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करणं आपल्याला कठीण का वाटतं? त्याचं एक कारण म्हणजे, योग्य गोष्टी करण्यासाठी आपल्याला नम्र बनण्याची गरज असते. या “शेवटच्या दिवसांत” नम्र राहणं कठीण आहे कारण अनेक लोक “केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ” आणि “संयम नसलेले” आहेत. (२ तीम. ३:१-३) आपण देवाचे सेवक आहोत. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारची वागणूक चुकीची आहे. पण आपल्याला वाटू शकतं, की अशा प्रकारे वागणारे लोक यशस्वी आहेत आणि ते आपल्या जीवनात खरोखर आनंदी आहेत. (स्तो. ३७:१; ७३:३) आपल्याला कदाचित असंही वाटेल: ‘स्वतःचा विचार करण्याआधी इतरांबद्दल विचार करण्याचा काही फायदा आहे का? “मी स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून” वागलो तरीही लोक माझा आदर करतील का?’ जर आपण जगातल्या स्वार्थी मनोवृत्तीला आपल्यावर हावी होऊ दिलं, तर आपल्या बांधवांसोबत असलेल्या चांगल्या नातेसंबंधावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसंच, इतरांना आपण ख्रिस्ती आहोत अशी ओळख पटायलाही कठीण जाऊ शकतं. पण आपण जेव्हा देवाच्या नम्र सेवकांच्या उदाहरणांचा अभ्यास करून त्यांचं अनुकरण करतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम होतात. टेहळणी बुरूज१८.०९ ३ ¶१

मंगळवार, १८ ऑगस्ट

देण्यात जास्त आनंद आहे.—प्रे. कार्ये २०:३५.

सृष्टी बनवण्याआधी यहोवा स्वर्गात एकटा होता. मग त्याने इतरांना जीवन भेट म्हणून द्यायचं ठरवलं. यासाठी त्याने बुद्धिमान स्वर्गदूतांची आणि मानवांची निर्मिती केली. आपल्या आनंदी देवाला, यहोवाला इतरांना चांगल्या गोष्टी देण्यात खूप आनंद होतो. (१ तीम. १:११; याको. १:१७) यहोवाची इच्छा आहे की आपणही आनंदी असावं, म्हणून तो आपल्याला उदार बनण्यास शिकवतो. (रोम. १:२०) देवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवलं. (उत्प. १:२७) याचा अर्थ यहोवामध्ये जे गुण आहेत ते गुण त्याने आपल्याला दिले आहेत. जीवनात खऱ्‍या अर्थाने आनंदी होण्यासाठी आणि यहोवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला त्याचं अनुकरण करण्याची गरज आहे. आपण इतरांमध्ये आस्था घेतली पाहिजे आणि त्यांना उदार मनाने मदत करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. (फिलिप्पै. २:३, ४; याको. १:५) असं करणं का गरजेचं आहे? कारण यहोवाने आपली रचना तशी केली आहे. आज आपण अपरिपूर्ण असलो तरीही यहोवाचं अनुकरण करू शकतो आणि त्याच्यासारखी उदारता दाखवू शकतो. यहोवाची इच्छा आहे की मानवांनी त्याचं अनुकरण करावं. त्यामुळे आपण जेव्हा उदारता दाखवतो तेव्हा त्याला आनंद होतो.—इफिस. ५:१. टेहळणी बुरूज१८.०८ १८ ¶१-२; १९ ¶४

बुधवार, १९ ऑगस्ट

माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात.—योहा. १०:२७.

येशूचे शब्द फक्‍त ऐकणंच पुरेसं नाही, तर त्यानुसार कार्य करणंही गरजेचं आहे. असं करण्याद्वारे आपण दाखवतो की आपण येशूचं ऐकत आहोत. “जीवनाच्या चिंता” यांमुळे आपण आपलं लक्ष सेवेपासून विचलित होऊ देत नाही. (लूक २१:३४) याउलट आपण येशूच्या आज्ञा पाळण्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान देतो, मग असं करणं कठीण असलं तरीही. पण या सर्व प्रसंगांतून जात असताना ते यहोवाला विश्‍वासू राहतात. त्यांचं कितीही नुकसान झालं तरी ते यहोवाला कधीच सोडत नाहीत. आपण येशूचं ऐकत आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे, पुढाकार घेण्यासाठी नेमलेल्या लोकांचं ऐकणं. (इब्री १३:७, १७) मागील काही वर्षांत यहोवाच्या संघटनेने बरेच बदल केले आहेत. यात सेवेत वापरण्यासाठी नवनवीन पद्धती व साधनं, आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेचं स्वरूप आणि राज्य सभागृहांचं निर्माण व नवीनीकरण यांबद्दल मार्गदर्शन, यांसारख्या गोष्टी सामील आहेत. संघटना आपल्या गरजा ओळखून खूप विचारपूर्वक आणि प्रेमळपणे आपल्याला मार्गदर्शन देते त्यासाठी आपण किती कृतज्ञ आहोत! आपण खात्री बाळगू शकतो की संघटनेकडून योग्य वेळी मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज१९.०३ १०-११ ¶११-१२

गुरुवार, २० ऑगस्ट

यापुढे आपण . . . धूर्त, चलाख माणसांकडून फसवले जाऊन . . . इकडेतिकडे वाहवत जाणारे असे असू नये.—इफिस. ४:१४.

एखाद्या माहितीत फक्‍त अर्धसत्य असलं तर आपण त्यावर भरवसा ठेवू शकत नाही. यहोशवाच्या दिवसांत यार्देन नदीच्या पश्‍चिमेला राहणाऱ्‍या इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्यातून आपण धडा घेऊ शकतो. (यहो. २२:९-३४) या लोकांना बातमी मिळाली की पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएली लोकांनी एक मोठी वेदी बांधली आहे. ही बातमी खरी होती. आणि ती ऐकून नदीच्या पश्‍चिमेला राहणाऱ्‍या इस्राएली लोकांना वाटलं की पूर्वेकडे राहणाऱ्‍या त्यांच्या बांधवांनी यहोवाविरुद्ध बंड केलं आहे. (यहो. २२:९-१२) पण युद्ध करण्याआधी सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी काही माणसांना पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएली लोकांकडे पाठवलं. तिथे गेल्यावर या लोकांना काय माहिती मिळाली? ही वेदी खोट्या देवतांना बलिदानं देण्यासाठी बनवण्यात आली नव्हती, तर इतर राष्ट्रांतील लोकांना कळून यावं की इस्राएली लोक फक्‍त यहोवाचीच उपासना करतात यासाठी त्यांनी ही वेदी बांधली होती. पश्‍चिमेकडच्या इस्राएली लोकांना हे ऐकून किती बरं वाटलं असेल! तसंच, त्यांना आनंद झाला असेल की त्यांनी आपल्या बांधवांसोबत युद्ध करण्याआधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी वेळ दिला. टेहळणी बुरूज१८.०८ ५ ¶९-१०

शुक्रवार, २१ ऑगस्ट

आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.—१ करिंथ. १०:१२.

पौलने सांगितल्याप्रमाणे यहोवाची उपासना करणारेदेखील वाईट कृत्यं करण्यात गुंतू शकतात. आपल्याला यहोवाची स्वीकृती आहे असंही त्यांना कदाचित वाटू शकतं. आपल्याला यहोवाचं मित्र बनून राहायचं आहे किंवा आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत असा दावा जर एखादी व्यक्‍ती करत असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्‍तीला यहोवाची स्वीकृती आहे. (१ करिंथ. १०:१-५) अपेक्षेप्रमाणे मोशे सीनाय पर्वतावरून खाली आला नाही तेव्हा इस्राएली लोकांना चिंता वाटू लागली. त्याचप्रमाणे या जगाचा अंत अपेक्षेप्रमाणे लवकर येत नाही हे पाहून आपणही कदाचित चिंता करू लागू. यहोवाने ज्या सुंदर भविष्याचं अभिवचन दिलं आहे. ते पूर्ण व्हायला अजून खूप वेळ आहे किंवा ते खरं होणं कदाचित अशक्य आहे असं आपल्याला वाटू लागेल. आणि यहोवाच्या इच्छेपेक्षा आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करू. आपण जर सावध राहिलो नाही तर यहोवापासून दूर जाण्याचा आपल्याला धोका आहे आणि यामुळे कदाचित आपण कधी विचारही केला नव्हता अशा चुकीच्या गोष्टी करायला लागू. टेहळणी बुरूज१८.०७ २१ ¶१७-१८

शनिवार, २२ ऑगस्ट

हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्‍तीशः नावाने ओळखत आहे.—निर्ग. ३३:१७.

यहोवा आपल्याला वैयक्‍तिक रीत्या ओळखू शकतो. पण त्याचा मित्र बनण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपलं त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे आणि आपण आपलं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे. (१ करिंथ. ८:३) पण आपल्या स्वर्गीय पित्यासोबत असलेली मौल्यवान मैत्री आपण टिकवून ठेवली पाहिजे. गलतीया इथल्या सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांसारखं आपण जगातल्या “निरर्थक आणि तुच्छ अशा प्राथमिक” गोष्टींचे दास बनू नये. यात जग देत असलेली प्रसिद्धी आणि यशदेखील समाविष्ट आहे. (गलती. ४:९) गलतीयामधल्या त्या ख्रिश्‍चनांनी देवाला जाणलं होतं आणि देवही त्यांना ओळखत होता. पण आता हेच बांधव “पुन्हा पूर्वीच्या” निरर्थक गोष्टींकडे वळत होते असं पौलने म्हटलं. सोप्या शब्दांत सांगायचं तर तो त्यांना विचारत होता: ‘तुम्ही त्या निरर्थक आणि व्यर्थ गोष्टींच्या मागे जाऊन त्याचे पुन्हा दास का बनला आहात?’ टेहळणी बुरूज१८.०७ ८ ¶५-६

रविवार, २३ ऑगस्ट

ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे.—नीति. १:५.

देवाचे नियम मोडल्यामुळे कोणते वाईट परिणाम घडू शकतात हे जाणण्यासाठी ते आपण स्वतः अनुभवण्याची गरज नाही. गत काळात इतरांनी ज्या चुका केल्या त्यांवरून आपण खूप काही शिकू शकतो. आणि अशी उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. हे ज्ञान म्हणजे देवाकडून येणाऱ्‍या सूचना आहेत आणि त्या सर्वोत्तम आहेत! दावीदच्या उदाहरणावरून आपण ही गोष्ट समजू शकतो. त्याने बथशेबासोबत अनैतिक संबंध ठेवले व यहोवाची आज्ञा मोडली. त्यामुळे त्याला खूपकाही सोसावं लागलं. (२ शमु. १२:७-१४) हा अहवाल वाचल्यावर स्वतःला विचारा: ‘बथशेबासोबत व्यभिचार केल्यामुळे ज्या समस्यांना दावीदला सामोरं जावं लागलं त्यांना तो कसा टाळू शकला असता? मी जर अशा परिस्थितीत असतो तर मी काय केलं असतं? मी दावीदसारखं अनैतिक कार्य केलं असतं की योसेफसारखा तिथून पळ काढला असता?’ (उत्प. ३९:११-१५) जर आपण पापाच्या भयानक परिणामांबद्दल खोलवर विचार करत राहिलो तर आपल्या मनात वाईट गोष्टींबद्दल “द्वेष” वाढत जाईल.—आमो. ५:१५. टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶५, ७

सोमवार, २४ ऑगस्ट

जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.—मत्त. २२:२१.

आपल्या आजूबाजूला लोक जेव्हा अन्याय पाहतात तेव्हा सहसा ते राजकारणात सक्रियपणे सहभाग घेतात. येशूच्या काळात कर देणं हा एक मोठा मुद्दा होता आणि यामुळे बऱ्‍याच लोकांनी राजकीय गटांची बाजू घेतली. तेव्हा त्यांना बऱ्‍याच गोष्टींसाठी कर भरावा लागायचा, जसं की मालमत्ता, जमीन आणि घर. तसंच, त्या काळचे कर वसूल करणारे लोकही खूप भ्रष्ट होते आणि यामुळे लोकांचा राग आणखी वाढला होता. हे कर वसूल करणारे महत्त्वाचं पद मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्‍यांना लाच द्यायचे आणि मग मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून लोकांना लुबाडायचे. यरीहो शहरातला कर वसूल करणारा मुख्य अधिकारी जक्कय यानेही लोकांना लुबाडलं होतं. यामुळेच तो खूप श्रीमंत बनला होता. (लूक १९:२, ८) येशूच्या शत्रूंनी त्याला कर देण्याच्या मुद्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी येशूला रोमी सम्राटाला दिल्या जाणाऱ्‍या कराबद्दल विचारलं. हा कर एक दिनार इतका होता आणि प्रत्येक यहुदी व्यक्‍तीला तो भरण्याची सक्‍ती होती. (मत्त. २२:१६-१८) या गोष्टीचा यहुदी लोक खूप द्वेष करायचे कारण यामुळे ते रोमी साम्राज्याच्या अधिकाराखाली आहेत ही जाणीव त्यांना नेहमी व्हायची. टेहळणी बुरूज१८.०६ ५-६ ¶८-१०

मंगळवार, २५ ऑगस्ट

एखादा मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.—गलती. ६:७.

सैतानाची बाजू निवडल्याचे नेहमीच वाईट परिणाम घडून येतात. खरंतर यात कोणताच फायदा नसतो! (ईयो. २१:७-१७; गलती. ६:७, ८) सैतानाचं या जगावर नियंत्रण आहे हे आपल्याला का माहीत असलं पाहिजे? कारण यामुळे आपल्याला सरकारांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्यासाठी मदत होते आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपण सरकारांना आदर द्यावा अशी यहोवाची इच्छा आहे हे आपल्याला माहीत आहे. (१ पेत्र २:१७) सरकारांचे नियम आपल्याला देवाचे स्तर मोडायला जोपर्यंत भाग पाडत नाहीत, तोपर्यंत आपण त्या नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (रोम. १३:१-४) त्यासोबतच आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की आपण नेहमी तटस्थ भूमिका घेतली पाहिजे आणि कोणत्याही मानवी नेत्याला किंवा राजकीय पक्षाला समर्थन देण्याचं टाळलं पाहिजे. (योहा. १७:१५, १६; १८:३६) सैतान देवाचं नाव लपवत आहे आणि त्याच्या नावाला कलंक लावत आहे म्हणून आपण लोकांना देवाबद्दलचं सत्य सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. यहोवाचे साक्षीदार असण्याचा आणि देवाच्या नावाचा वापर करण्याचा आपल्याला अभिमान आहे. पैशांवरच्या किंवा भौतिक गोष्टींवरच्या प्रेमापेक्षा देवावर असलेलं आपलं प्रेम खूप-खूप मौल्यवान आहे.—यश. ४३:१०; १ तीम. ६:६-१०. टेहळणी बुरूज१८.०५ २४ ¶८-९

बुधवार, २६ ऑगस्ट

पत्नीने आपल्या पतीपासून वेगळे होऊ नये.—१ करिंथ. ७:१०.

जर त्यांच्या विवाहात समस्या असल्या तर ते विभक्‍त होऊ शकतात का? पण एक व्यक्‍ती कोणत्या परिस्थितींमध्ये विभक्‍त होऊ शकते हे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं नाही. पौलने फक्‍त इतकं म्हटलं: “जर एखाद्या स्त्रीचा पती विश्‍वासात नसेल, पण तिच्यासोबत राहण्यास तयार असेल, तर तिने आपल्या पतीला सोडू नये.” (१ करिंथ. ७:१२, १३) हा सल्ला आजदेखील लागू होतो. पण काही परिस्थितींमध्ये असं घडलं आहे की “विश्‍वासात” नसलेल्या पतीने आपल्या शब्दांतून किंवा कार्यांतून दाखवून दिलं आहे की तो “तिच्यासोबत राहण्यास तयार” नाही. उदाहरणार्थ, तो कदाचित तिला खूप मारहाण करत असेल, आणि याची तीव्रता कदाचित इतकी असेल की तिच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका आहे असं तिला वाटत असेल. तो कदाचित कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यास नकार देत असेल, किंवा कदाचित तिला देवाची सेवा करण्यापासून पूर्णपणे रोखत असेल. अशा परिस्थितींमध्ये एक ख्रिस्ती बहीण असा विचार करू शकते की तिचा पती “तिच्यासोबत राहण्यास तयार” नाही आणि यामुळे ती विभक्‍त होण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकते. मग तिच्या पतीने स्पष्टपणे असं बोलून दाखवलं नसलं तरी ती असा निर्णय घेऊ शकते. पण अशाच परिस्थितींमध्ये असलेल्या काही ख्रिश्‍चनांनी आपल्या जोडीदारासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बरंच काही सहन केलं आहे आणि आपला विवाह मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. टेहळणी बुरूज१८.१२ १३ ¶१४, १६; १४ ¶१७

गुरुवार, २७ ऑगस्ट

ते . . . धीराने फळ देतात.—लूक ८:१५.

लूक ८:५-८, ११-१५ मध्ये असणारा बी पेरणाऱ्‍याचा दृष्टान्त देताना येशूने सांगितलं की बी हे “देवाचं वचन”, म्हणजेच देवाच्या राज्याबद्दलचा संदेश याला सूचित करतं. जमीन एका व्यक्‍तीच्या मनाला सूचित करते. जे बी चांगल्या जमिनीवर पडलं ते मुळावलं, त्याला अंकुर फुटला आणि “शंभरपट फळ दिलं.” त्या चांगल्या जमिनीप्रमाणे, पेरलेलं बी आपल्या मनात वाढत गेलं आणि शेवटी ते फळ देण्यासाठी तयार झालं. आपण आधी पाहिलं की गव्हाचं रोप नवीन रोपं उत्पन्‍न करत नाही, तर त्यातून आपल्याला बी मिळतं. तसंच, आपण नवीन शिष्य बनवत नाही, तर बी उत्पन्‍न करतो. याचा काय अर्थ होतो? आपण जेव्हा-जेव्हा देवाच्या राज्याबद्दल कोणाला प्रचार करतो, तेव्हा-तेव्हा जणू आपण आपल्या मनात जे बी पेरलं होतं ते बहुगुणित करतो आणि इतरांच्या मनात पेरतो. (लूक ६:४५; ८:१) म्हणजे आपण जर देवाच्या राज्याचा प्रचार करत राहिलो, तर आपण “धीराने फळ” देत आहोत असा याचा अर्थ होईल. टेहळणी बुरूज१८.०५ १४ ¶१०-११

शुक्रवार, २८ ऑगस्ट

ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे त्या सर्वांना मी सुधारतो आणि त्यांचं ताडन करतो.—प्रकटी. ३:१९.

पौल बांधवांसाठी आपलं सर्व काही द्यायला तयार होता. बांधवांच्या हितासाठी तो त्याचं सर्वोत्तम द्यायला तयार आहे हे त्याने आपल्या कार्यांद्वारे दाखवलं. (२ करिंथ. १२:१५) त्याच प्रकारे, वडिलांनी फक्‍त आपल्या शब्दांनी नव्हे तर आपल्या कार्यांनीसुद्धा इतरांना प्रोत्साहन आणि सांत्वन दिलं पाहिजे. यावरून हे दिसून येईल की त्यांना इतरांबद्दल मनापासून काळजी आहे. (१ करिंथ. १४:३) बांधवांना मदत करण्यासाठी कधीकधी वडील त्यांना सल्ला देतात. प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे सल्ला कसा देता येईल हे वडील बायबलमधून शिकू शकतात. सल्ला देण्याच्या बाबतीत येशूने उत्तम उदाहरण मांडलं. पुनरुत्थानानंतर आशिया मायनरमधील मंडळ्यांना दिलेल्या संदेशात येशूने त्यांना सल्ला दिला. इफिस, पर्गम आणि थुवतीरा इथल्या मंडळ्यांना त्याने कडक शब्दांत ताकीद दिली. पण हे करण्याआधी येशूने ते करत असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांची प्रशंसा केली. (प्रकटी. २:१-५, १२, १३, १८, १९) येशूच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करून वडील बांधवांना सल्ला देऊ शकतात. टेहळणी बुरूज१८.०४ २२ ¶८-९

शनिवार, २९ ऑगस्ट

वडिलांनो, आपल्या मुलांना . . . यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवत राहा.—इफिस. ६:४.

पालकांनो, आजारांपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न करता. यासाठी तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवता आणि घरात अशा कोणत्याही गोष्टी ठेवत नाही, ज्यामुळे तुम्ही व तुमची मुलं आजारी पडतील. त्याच प्रकारे, सैतानाच्या विचारसरणीमुळे तुमची मुलं भ्रष्ट होण्याची शक्यता असलेले चित्रपट, टिव्ही कार्यक्रम, इलेक्ट्रॉनिक गेम्स आणि वेबसाईट यांपासून तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे. मुलांच्या आध्यात्मिकतेची जबाबदारी यहोवाने तुमच्यावर सोपवली आहे. (नीति. १:८) त्यामुळे तुमच्या कुटुंबात बायबलवर आधारित नियम घालून देण्यासाठी कचरू नका. तुमच्या लहान मुलांना सांगा की काय पाहावं आणि काय पाहू नये. तसंच, त्यामागची कारणंही त्यांना समजण्यासाठी मदत करा. (मत्त. ५:३७) मुलं मोठी होत असताना यहोवाच्या स्तरांनुसार काय बरोबर आणि काय चूक आहे हे त्यांना स्वतः ठरवण्यासाठी प्रशिक्षित करा. (इब्री ५:१४) आणि हे लक्षात असू द्या की तुम्ही जे करता त्यावरून तुमची मुलं खूप काही शिकतात.—अनु. ६:६, ७; रोम. २:२१. टेहळणी बुरूज१९.०१ १६ ¶८

रविवार, ३० ऑगस्ट

वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत.—स्तो. १४८:१२, १३.

तरुणांनो तुम्ही वयस्क बंधुभगिनींसोबत मैत्री करण्याचं ध्येय ठेवू शकता का? बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत राहण्यासाठी त्यांना कशामुळे मदत झाली हे तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्हाला त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळेल. यामुळे तुम्हाला आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल. तसंच, आपण सर्वच, मग आपण तरुण असो वा वृद्ध, मंडळीत येणाऱ्‍या नवीन लोकांचं मनापासून स्वागत करू शकतो. तुम्ही क्षेत्र सेवेची सभा घेताना वयोवृद्ध लोकांना त्यांचा प्रकाश झळकवण्यासाठी मदत करू शकता. त्यांना प्रचार करणं शक्य होईल अशा क्षेत्रात पाठवा. तरुणांना त्यांच्यासोबत असू द्या. वयस्क बंधुभगिनींना आणि शारीरिक समस्या असलेल्यांना सहसा निराशेचा सामना करावा लागतो कारण ते आधीसारखं प्रचार करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांची काळजी घेता आणि त्यांची परिस्थिती समजून घेता तेव्हा त्यांना बरं वाटतं. त्यांना जरी सत्यात बरीच वर्षं झाली असली किंवा त्यांचं वय खूप झालं असलं, तरी त्यांच्याशी दयाळूपणे वागल्यामुळे त्यांना आवेशाने प्रचार करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकतं.—लेवी. १९:३२. टेहळणी बुरूज१८.०६ २३-२४ ¶१०-१२

सोमवार, ३१ ऑगस्ट

वाईट कामांवर पांघरूण घालण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका, तर देवाचे दास व्हा.—१ पेत्र २:१६.

पौलसारखंच आपणही हे नेहमी लक्षात ठेवावं की यहोवाने आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सोडवलं आहे. खंडणीमुळे आपल्याला देवाची शुद्ध अंतःकरणाने सेवा करणं शक्य होतं आणि यामुळे आपल्याला मनापासून आनंद होतो. (स्तो. ४०:८) स्वातंत्र्य दिल्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यासोबतच आपण त्याचा दुरुपयोग तर करत नाही याची खबरदारीही बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्रने सांगितलं की मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण पाप करण्यासाठी सबब म्हणून करू नये. ही ताकीद आपल्याला ओसाड रानात इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्याची आठवण करून देते. आज आपल्यालादेखील या इशाऱ्‍याची गरज आहे, खरंतर आजचा काळ पाहता आपल्याला याची जास्त गरज आहे. सैतान आणि त्याचं जग आपल्याला वेगवेगळ्या फॅशनचे कपडे, खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि विविध प्रकारचं मनोरंजन यांचं आमिष दाखवतं. जाहिरात करणारे सुंदर दिसणाऱ्‍या लोकांचा उपयोग करून चलाखीने गरज नसलेल्या गोष्टीही घेण्यास आपल्याला भाग पाडतात. आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्यासाठी हे जग आपल्याला अगदी सहज भुलवू शकतं. टेहळणी बुरूज१८.०४ १० ¶७-८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा