मे
शुक्रवार, १ मे
परदेशीयांवर प्रीति करावी.—अनु. १०:१९.
गेल्या काही वर्षांत अनेक लोकांना आपला देश सोडून दुसऱ्या देशात निर्वासित म्हणून राहावं लागलं आहे. त्यांच्या भाषेत नमस्ते कसं म्हणतात, हे तुम्ही शिकू शकता. तुम्ही त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून कदाचित त्यांना तुमच्याशी चर्चा करावीशी वाटेल. त्यानंतर तुम्ही jw.org वरून त्यांच्या भाषेत उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि साहित्यं त्यांना दाखवू शकता. प्रभावीपणे प्रचारकार्य करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या यहोवा पुरवतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य या सभेद्वारे आपल्याला खूपकाही शिकायला मिळतं. यामुळे आपल्याला कुशलतेने पुनर्भेट घ्यायला आणि बायबल अभ्यास सुरू करायला मदत होते. पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांना आपल्या शब्दांत उत्तरं द्यायला शिकवू शकता. मुलांची सोप्या शब्दांत व मनापासून दिलेली उत्तरं ऐकून, काही लोकांना सत्य शिकून घ्यायचं प्रोत्साहनही मिळालं आहे!—१ करिंथ. १४:२५. टेहळणी बुरूज१८.०६ २२-२३ ¶७-९
शनिवार, २ मे
ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीसुद्धा एकमेकांचा स्वीकार करा.—रोम. १५:७.
आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक वेळ अशी होती जेव्हा आपण सर्वच देवापासून फार दूर होतो. (इफिस. २:१२) पण आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे यहोवाने आपल्याला त्याच्या जवळ आणलं. (होशे. ११:४; योहा. ६:४४) ख्रिस्तानेही आपला आनंदाने स्वीकार केला. त्याच्यामुळेच आपल्याला देवाच्या कुटुंबाचा भाग बनणं शक्य झालं. आपण अपरिपूर्ण आहोत तरीही येशूने प्रेमळपणे आपला स्वीकार केला आहे. त्यामुळे कोणाला नाकारण्याचा आपण कधी विचारही करू नये. या दुष्ट जगाचा अंत जवळ येत असताना लोक दिवसेंदिवस पक्षपाती, विचारांमध्ये विभागलेले आणि द्वेष करणारे बनत चालले आहेत. (गलती. ५:१९-२१; २ तीम. ३:१३) पण यहोवाचे लोक या नात्याने आपण “वरून येणारी बुद्धी” मिळवतो. यामुळे आपल्याला सर्वांशी समानतेने वागायला आणि शांती टिकवून ठेवायला मदत होते. (याको. ३:१७, १८) इतर देशांतील लोकांशी मैत्री करायला आणि त्यांच्या पद्धती स्वीकारायला आपण आनंदाने तयार असलं पाहिजे. तसंच, शक्य असल्यास आपण त्यांची भाषादेखील शिकू शकतो. या गोष्टी केल्यामुळे आपण “समुद्राच्या लाटांसारखी” धार्मिकता आणि “नदीसारखी” शांती अनुभवू शकतो.—यश. ४८:१७, १८. टेहळणी बुरूज१८.०६ १२ ¶१८-१९
रविवार, ३ मे
शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी तुमची तयारी दाखवणारे जोडे पायांत घाला व स्थिर उभे राहा.—इफिस. ६:१५.
एक रोमी सैनिक आपले जोडे घातल्याशिवाय युद्धभूमीवर जाऊ शकत नव्हता. सैनिक घालत असलेल्या जोड्यांचे तळवे चामड्याच्या तीन थरांनी बनलेले असून, खूप मजबूत असायचे. पण त्यासोबतच ते खूप आरामदायीही असायचे. यामुळे सैनिकाला आत्मविश्वासाने चालता यायचं आणि त्याला घसरून पडण्याची भीती नसायची. जोडे घातल्यामुळे रोमी सैनिकाला युद्ध जिंकायला मदत व्हायची. त्याच प्रकारे, लाक्षणिक जोडे घातल्यामुळे आपल्याला “शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित” करायला मदत होते. (यश. ५२:७; रोम. १०:१५) पण कधीकधी प्रचार करण्यासाठी धैर्याची गरज असते. २० वर्षांचा रॉबर्टो म्हणतो: “माझ्या वर्गसोबत्यांना प्रचार करण्याची मला भीती वाटायची. साक्ष देण्याची कदाचित लाज वाटत असल्यामुळे मी घाबरायचो. त्याबद्दल आता विचार केला की वाटतं, की मी तसा विचार करायला नको होता. पण आता मात्र मी आनंदाने माझ्या सोबत्यांना प्रचार करतो.” अनेक ख्रिस्ती तरुणांनी अनुभवलं आहे, की आधीच तयारी केल्यामुळे त्यांना प्रचार करताना अवघडल्यासारखं वाटत नाही. टेहळणी बुरूज१८.०५ २९ ¶९-११
सोमवार, ४ मे
तुम्ही भरपूर फळ देता.—योहा. १५:८.
येशूने आपल्या प्रेषितांना म्हटलं: “मी माझी शांती तुम्हाला देतो.” (योहा. १४:२७) प्रचार करत राहण्यासाठी येशूने दिलेल्या शांतीमुळे आपल्याला कशी मदत होते? जेव्हा आपण प्रचार करत राहतो तेव्हा आपण यहोवाचं आणि येशूचं मन आनंदित करत असतो ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपण शांती अनुभवतो. (स्तो. १४९:४; रोम. ५:३, ४; कलस्सै. ३:१५) प्रेषितांनी आनंदी असावं अशी आपली इच्छा आहे हे येशूने त्यांना सांगितलं. यानंतर, प्रेषितांनी नि:स्वार्थ प्रेम दाखवणं का महत्त्वाचं आहे हे त्याने समजावलं. (योहा. १५:११-१३) मग त्याने म्हटलं: “मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे.” खरंच येशूचा मित्र असणं किती मोठा बहुमान आहे. पण ही मैत्री कशी टिकून राहणार होती? येशूने याबद्दल समजावलं: “तुम्ही जावं आणि फळ देत राहावं.” (योहा. १५:१४-१६) दुसऱ्या शब्दांत, त्यांनी प्रचार करत राहावं. याच्या जवळपास दोन वर्षांआधी येशूने आपल्या प्रेषितांना म्हटलं: “जात असताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.’” (मत्त. १०:७) म्हणूनच, आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने त्याच्या शिष्यांना धीराने प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं.—मत्त. २४:१३; मार्क ३:१४. टेहळणी बुरूज१८.०५ २०-२१ ¶१५-१६
मंगळवार, ५ मे
एखादा मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.—गलती. ६:७.
तरुणांनो तुम्ही यहोवाचं मन आनंदित करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आध्यात्मिक ध्येयं ठेवली पाहिजेत. पण तुमच्या वयाच्या बऱ्याच मुलामुलींना जीवनात फक्त मजा करायची असते. आणि असं करण्यासाठी ते तुम्हालादेखील म्हणतील. कधी ना कधी अशी परिस्थिती येईल जेव्हा तुम्हाला मित्रांना सांगावं लागेल की तुम्ही ठेवलेली ध्येयं तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत. तुम्हाला तुमच्या ध्येयांपासून विचलित करण्याची संधी इतरांना देऊ नका. सोबत्यांनी तुमच्यावर दबाव आणल्यावर तुम्ही त्याला बळी पडू नये, यासाठी तुम्ही आधीच काय करू शकता? असे प्रसंग टाळा जिथे दबावाचा सामना करणं तुम्हाला कठीण जाईल. (नीति. २२:३) चुकीच्या गोष्टी केल्याचे कोणते वाईट परिणाम होतील याचा आधीच विचार करा. तसंच, तुम्हाला सल्ल्याची गरज आहे याची नेहमी जाणीव असू द्या. तुमचे आईवडील आणि मंडळीतले अनुभवी बंधुभगिनी तुम्हाला जे सल्ले देतात ते ऐकून त्यांवर विचार करा. (१ पेत्र ५:५, ६) सल्ला स्वीकारण्यासाठी लागणारी नम्रता तुमच्यामध्ये आहे का? टेहळणी बुरूज१८.०४ २८-२९ ¶१४-१६
बुधवार, ६ मे
मी येईपर्यंत, जे तुमच्याजवळ आहे ते पक्के धरून ठेवा. आणि जो विजय मिळवेल आणि शेवटपर्यंत माझ्या कार्यांचं अनुकरण करेल, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.—प्रकटी. २:२५, २६.
आशिया मायनरमधल्या विशिष्ट मंडळींसाठी असलेल्या आपल्या संदेशात येशूने त्याच्या अनुयायांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उदाहरणार्थ, त्याने थुवतीरा मंडळीला दिलेल्या संदेशाच्या सुरुवातीला म्हटलं: “मला तुझी कार्ये, तुझं प्रेम, तुझा विश्वास, तुझं सेवाकार्य व धीर माहीत आहे. आणि तुझी अलीकडची कार्ये तू पूर्वी केलेल्या कार्यांपेक्षा जास्त आहेत हेही मला माहीत आहे.” (प्रकटी. २:१९) त्याने फक्त त्यांच्या सेवाकार्यात झालेल्या वाढीबद्दलच त्यांची प्रशंसा केली नाही, तर चांगली कार्यं करण्यासाठी ज्या गुणांमुळे त्यांना प्रेरणा मिळाली त्याबद्दलही त्याने प्रशंसा केली. त्याला थुवतीरा इथल्या काही जणांना सल्ला द्यायचा होता पण तरी त्याने आपल्या संदेशाच्या सुरुवातीला आणि शेवटी त्यांना प्रोत्साहन दिलं. (प्रकटी. २:२७, २८) विचार करा, येशू सर्व मंडळ्यांचे मस्तक असल्यामुळे त्याच्याजवळ किती अधिकार आहे! खरंतर, आपण त्याच्यासाठी जे काम करतो त्याबद्दल त्याने आपले आभार मानण्याची गरज नाही. पण तरी तो आपल्याबद्दल कदर व्यक्त करतो. खरंच, वडिलांसाठी त्याने किती उत्तम उदाहरण मांडलं आहे! टेहळणी बुरूज१९.०२ १६ ¶१०
गुरुवार, ७ मे
यहूदा आणि सीला . . . [यांनी] बांधवांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा विश्वास दृढ केला.—प्रे. कार्ये १५:३२.
पहिल्या शतकात मंडळीमधील पुढाकार घेणाऱ्यांना आणि इतर बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी यहोवाने नियमन मंडळचा उपयोग केला. त्यांनी नियमन मंडळाच्या दोन सदस्यांना, म्हणजेच पेत्र आणि योहान यांना ख्रिस्ती झालेल्या बांधवांवर पवित्र आत्मा यावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी पाठवलं. (प्रे. कार्ये ८:५, १४-१७) नियमन मंडळाकडून मिळालेल्या या मदतीमुळे फिलिप्पला आणि नवीनच बनलेल्या ख्रिश्चनांना खूप प्रोत्साहन मिळालं. आजच्या काळातलं नियमन मंडळदेखील बेथेलमध्ये काम करणाऱ्यांना, क्षेत्रांत काम करणाऱ्या खास पूर्ण वेळच्या सेवकांना आणि आपल्या सर्वांनाच प्रोत्साहन देतं. पहिल्या शतकातील बांधवांसारखंच, आपल्यालाही या प्रोत्साहनामुळे आनंद होतो. तसंच जे लोक सत्य सोडून गेले आहेत किंवा अक्रियाशील झाले आहेत अशांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमन मंडळाने २०१५ सालच्या अधिवेशनात यहोवाकडं परत या हे माहितीपत्रक प्रकाशित केलं. टेहळणी बुरूज१८.०४ १९ ¶१८-२०
शुक्रवार, ८ मे
तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.—योहा. ८:३२.
काही लोकांना वाटतं की कोणत्याही मर्यादा नसलेलं स्वातंत्र्य असणंच सर्वात चांगलं आहे. पण हे फायद्याचं आहे का? स्वातंत्र्य असणं चांगलं आहे, पण जर काहीच मर्यादा नसल्या तर या जगाची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करा. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया म्हणतं की प्रत्येक संघटित समाजाचे नियम हे गुंतागुंतीचे असतात. यामुळे लोकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण तर होतंच, पण यासोबतच त्यांच्या स्वातंत्र्याला काही मर्यादाही घालता येतात. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. म्हणूनच प्रत्येक देशात बरेच नियम-कायदे असतात आणि ते समजवण्यासाठी व लागू करण्यासाठी अनेक वकील व न्यायाधीशही असतात. याचाच अर्थ खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करण्याची गरज आहे. पहिली, आपल्याला येशूने शिकवलेली सत्यं स्वीकारण्याची गरज आहे. आणि दुसरी, आपल्याला त्याचे शिष्य बनण्याची गरज आहे. या दोन गोष्टी केल्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. पण हे स्वातंत्र्य कोणत्या गोष्टीपासून असेल? येशूने म्हटलं: “जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.” त्याने पुढे म्हटलं: “जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्त केलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल.”—योहा. ८:३४, ३६. टेहळणी बुरूज१८.०४ ६-७ ¶१३-१४
शनिवार, ९ मे
[तुम्ही सर्व] एकमेकांशी वागताना सहानुभूती . . . दाखवा.—१ पेत्र ३:८.
आपल्या भावना समजून घेणाऱ्या आणि आपल्या भल्याचा विचार करणाऱ्या लोकांसोबत राहायला आपल्याला नेहमी आवडतं. आपण काय विचार करतो आणि आपल्या काय भावना आहेत हे समजून घेण्यासाठी ते जणू स्वतःला आपल्या जागी ठेवतात. कधीकधी तर काही सांगण्याआधीच आपल्याला कशाची गरज आहे हे ते ओळखतात आणि लगेच मदत करतात. “सहानुभूती” दाखवणाऱ्या अशा लोकांबद्दल आपण खरंच मनापासून कदर बाळगतो. ख्रिस्ती या नात्याने इतरांप्रती सहानुभूती दाखवण्याची आपल्या सर्वांची इच्छा असते. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. का? याचं एक कारण म्हणजे आपली अपरिपूर्णता. (रोम. ३:२३) जन्मतःच आपल्यात फक्त स्वतःबद्दल विचार करण्याची प्रवृत्ती असते आणि या प्रवृत्तीविरुद्ध आपल्याला लढत राहावं लागतं. तसंच संगोपन किंवा जीवनातले अनुभव यांमुळेही काहींना सहानुभूती दाखवणं कठीण जाऊ शकतं. त्यासोबतच, या शेवटच्या दिवसांत पुष्कळ जण इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. याउलट, ते “स्वतःवर प्रेम करणारे” आहेत. (२तीम. ३:१,२) आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या अशा लोकांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. पण यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांचं अनुकरण करण्याद्वारे आपण आणखी चांगल्या प्रकारे सहानुभूती दाखवू शकतो. टेहळणी बुरूज१९.०३ १४ ¶१-३
रविवार, १० मे
आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.—नीति. ४:२३.
दहा आज्ञांमधील शेवटच्या आज्ञेत लोभ न करण्याबद्दल सांगितलं होतं. म्हणजेच इतरांचा हक्क असलेल्या गोष्टींबद्दल मनात चुकीच्या इच्छा बाळगणं. (अनु. ५:२१; रोम. ७:७) एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी यहोवाने हा नियम दिला होता. यहोवाची इच्छा होती की त्याच्या लोकांनी आपल्या मनाचं, म्हणजेच आपल्या विचारांचं, भावनांचं आणि तर्क करण्याच्या क्षमतेचं रक्षण करावं. यहोवाला माहीत आहे की वाईट कृत्यासाठी मनातील वाईट विचार आणि भावना कारणीभूत असतात. दावीद राजाच्या हातून हीच चूक घडली. तसा तो खूप चांगला मनुष्य होता, पण एका प्रसंगी दुसऱ्याच्या पत्नीविषयी त्याच्या मनात लोभ उत्पन्न झाला. त्याच्या या चुकीच्या इच्छांमुळे तो पाप करून बसला. (याको. १:१४, १५) दावीदने व्यभिचार केला, मग त्याने त्या स्त्रीच्या पतीला फसवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याला जिवे मारण्याची योजना केली. (२ शमु. ११:२-४; १२:७-११) यहोवा एका व्यक्तीचं फक्त बाह्यस्वरूपच पाहत नाही, तर ती व्यक्ती आतून कशी आहे, तिचं मन कसं आहे हेही तो पाहतो. (१ शमु. १६:७) आपल्या मनातील कोणताही विचार, कोणतीही भावना, कोणतेही कार्य आपण यहोवापासून लपवू शकत नाही. यहोवा आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी पाहतो आणि चांगलं करत राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतो. पण त्याची इच्छा आहे की आपण आपल्या मनातील चुकीचे विचार ओळखावे आणि आपल्या हातून एखादी चूक घडण्याआधीच त्या विचारांवर नियंत्रण करावं.—२ इति. १६:९; मत्त. ५:२७-३०. टेहळणी बुरूज१९.०२ २१ ¶९; २२ ¶११
सोमवार, ११ मे
देशांतील सर्व नम्र जनांनो . . . त्याचा आश्रय करा . . . नम्रता यांचे अवलंबन करा.—सफ. २:३.
बायबलमध्ये मोशेबद्दल असं म्हटलं आहे की तो, “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. १२:३) पण याचा अर्थ असा होतो का की त्याच्यात आत्मविश्वासाची कमी होती, तो निर्णय घ्यायला कचरायचा आणि इतरांनी विरोध केल्यावर घाबरून जायचा? एक नम्र व्यक्ती अशीच असते असं काही लोकांना वाटू शकतं. पण हे मुळीच खरं नाही. मोशे हा खूप धाडसी, योग्य निर्णय घेणारा आणि धैर्यवान सेवक होता. यहोवाच्या मदतीने त्याने इजिप्तच्या शक्तिशाली सम्राटाचा सामना केला आणि अरण्यात जवळपास ३० लाख लोकांचं नेतृत्व केलं. तसंच, त्याने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंवर मात करण्यासाठी मदत केली. मोशेला ज्या समस्यांचा सामना करावा लागला, तशा समस्या आज आपल्यासमोर नाहीत. पण दररोज आपल्याला अशा लोकांसोबत राहावं लागतं किंवा परिस्थितींचा सामना करावा लागतो ज्यात नम्रता दाखवणं कठीण जाऊ शकतं. असं असलं तरीही हा गुण विकसित करत राहण्यासाठी आपल्याजवळ एक महत्त्वाचं कारण आहे. यहोवाने अभिवचन दिलं आहे की नम्र किंवा “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तो. ३७:११) तुम्ही नम्र आहात असं तुम्ही स्वतःबद्दल म्हणू शकता का? इतरांचंही तुमच्याबद्दल असंच मत आहे का? टेहळणी बुरूज१९.०२ ८ ¶१-२
मंगळवार, १२ मे
जे वाईटाला बरे . . . [म्हणतात] त्यांचा धिक्कार असो.—यश. ५:२०.
यहोवाने मानवांना एक खास गोष्ट दिली आहे. ती म्हणजे आपला विवेक. आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यानंतर ते त्याच्यापासून लपले. यावरूनच कळतं की त्यांचा विवेक त्यांना सतावत होता. विवेक आपल्यात असणारी एक अशी जाणीव आहे ज्यामुळे योग्य व अयोग्य यांमधला फरक आपल्याला कळतो. आणि यामुळे जीवनात मार्गदर्शन मिळवायला आपल्याला मदत होते. एका व्यक्तीचा विवेक जर चांगल्या प्रकारे प्रशिक्षित नसेल तर ती व्यक्ती अशा जहाजासारखी आहे जिचं होकायंत्र (चुंबकसुई असलेलं दिशादर्शक उपकरण) मोडलेलं आहे. वारा आणि समुद्री प्रवाहामुळे ते जहाज चुकीच्या दिशेला जाऊ शकतं. पण नीट चालणाऱ्या होकायंत्रामुळे कॅप्टनला जहाज योग्य दिशेला न्यायला मदत होते. त्याच प्रकारे, जर आपण आपल्या विवेकाला योग्य प्रशिक्षण दिलं तर ते आपलं योग्य मार्गदर्शन करेल. आपला विवेक योग्यपणे प्रशिक्षित नसेल तर चुकीच्या गोष्टी करण्यापासून तो आपल्याला सावध करणार नाही. (१ तीम. ४:१,२) यामुळे आपण कदाचित “वाईटाला बरे” म्हणू. टेहळणी बुरूज१८.०६ १६ ¶१-३
बुधवार, १३ मे
या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.—रोम. १२:२.
पटकन लक्षात न येणाऱ्या जगातल्या विचारांनाही आपण ओळखायला आणि टाळायला शिकलं पाहिजे. जसं की, काही बातम्या विशिष्ट राजनैतिक पक्षाच्या मतांची फक्त सकारात्मक बाजूच मांडतात. आणि काही बातम्यांमध्ये जगाला पसंत असलेली ध्येयं आणि साध्य केलेल्या गोष्टींना बढावा दिला जातो. काही चित्रपटांमध्ये आणि पुस्तकांमध्ये “आधी स्वतःचा विचार करा” व “आधी कुटुंबाचा विचार करा” असा बढावा दिला जातो. यामुळे आपल्याला ते वाजवी, पटणारं आणि योग्य असल्याचं वाटू शकतं. पण ही विचारसरणी बायबलनुसार नाही. त्यात म्हटलं आहे की जर आपण यहोवाला सर्वात जास्त प्रेम केलं तरच खऱ्या अर्थाने आपण आणि आपलं कुटुंब आनंदी होऊ शकतं. (मत्त. २२:३६-३९) याचा अर्थ असा होत नाही की आपण योग्य मनोरंजनाचा आनंद घेऊ नये. असं असलं तरी, आपण स्वतःला पुढील प्रश्नं विचारले पाहिजेत: ‘जगातल्या विचारांना अप्रत्यक्ष रीतीने बढावा दिला जात असला तरी मी त्यांना ओळखतो का? टिव्हीवरचे विशिष्ट कार्यक्रम किंवा आक्षेपार्ह साहित्य यांपासून मी स्वतःचं आणि माझ्या मुलांचं रक्षण करतो का? माझ्या मुलांवर जगातल्या विचारांचा प्रभाव होऊ नये म्हणून मी त्यांना यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यासाठी मदत करतो का?’ टेहळणी बुरूज१८.११ २२ ¶१८-१९
गुरुवार, १४ मे
तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.—यश. ४१:१०.
आपल्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याद्वारे आणि आपली काळजी करण्याद्वारे यहोवा दाखवतो की तो आपल्यासोबत आहे. त्याला आपली मनापासून काळजी आहे हे व्यक्त करण्यासाठी तो काय म्हणतो याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुजवर प्रेम करतो.” (यश. ४३:४) या जगातली कोणतीच शक्ती यहोवाला त्याच्या सेवकांवर प्रेम करत राहण्यापासून थांबवू शकत नाही. त्याची आपल्यासाठी असलेली एकनिष्ठता स्थिर आणि अटळ आहे. (यश. ५४:१०) आपल्या जीवनातून समस्या नाहीशा होतील असं अभिवचन यहोवा आपल्याला देत नाही. पण तो आपल्याला समस्यांच्या ‘नद्यांत’ बुडू देणार नाही किंवा परीक्षांच्या “अग्नीतून” जाताना अशी इजा होऊ देणार नाही ज्यामुळे आपलं कायमचं नुकसान होईल. तो नेहमी आपल्यासोबत राहील आणि समस्यांचा सामना करत असताना आपली मदत करेल याची तो हमी देतो. यहोवा हे कसं करेल? आपल्या भीतींवर मात करायला आणि आपलं मन शांत ठेवायला तो आपली मदत करेल. यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्याप्रती असलेली आपली एकनिष्ठता टिकवून ठेवू शकू. (यश. ४१:१३; ४३:२) “मी तुझ्याबरोबर आहे” या देवाच्या अभिवचनावर आपण जेव्हा भरवसा दाखवतो तेव्हा आपल्यालाही परीक्षांचा सामना करण्यासाठी धैर्य आणि शक्ती मिळते. टेहळणी बुरूज१९.०१ ३ ¶४-६
शुक्रवार, १५ मे
मनुष्याच्या मनांत अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.—नीति. १९:२१.
तरुणांनो, तुम्हाला कदाचित शिक्षक, सल्लागार किंवा इतर जण म्हणतील की भरपूर पैसा कमवण्यासाठी उच्च शिक्षण किंवा चांगलं करियर करणं गरजेचं आहे. पण यहोवा तुम्हाला खूप वेगळा सल्ला देतो. त्याला वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही अभ्यासात मेहनत घ्यावी. (कलस्सै. ३:२३) पण त्याला हेही माहीत आहे की तरुण असताना तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि या निर्णयांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होईल. म्हणूनच तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी तो तुम्हाला तत्त्वं देतो. या तत्त्वांमुळे तुम्हाला शेवटच्या काळात त्याच्या मर्जीनुसार जीवन जगायला मदत होईल. (मत्त. २४:१४) भविष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि या व्यवस्थेचा शेवट किती जवळ आहे याबद्दल यहोवाला माहीत आहे. (यश. ४६:१०; मत्त. २४:३, ३६) तसंच, यहोवाला तुमच्याबद्दलही माहीत आहे. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे दुःख होतं हेदेखील तो जाणतो. मानवांनी दिलेले सल्ले आपल्याला चांगले वाटू शकतात. पण जर ते देवाच्या वचनावर आधारित नसले तर ते सुज्ञ नसतात. टेहळणी बुरूज१८.१२ १९ ¶१-२
शनिवार, १६ मे
दुर्जन नाहीसा होईल.—स्तो. ३७:१०.
पण याउलट त्या काळात “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील,” असं दावीदने लिहिलं. त्याने असंदेखील भाकीत केलं: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.” (स्तो. ३७:११, २९; २ शमु. २३:२) देवाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांवर या अभिवचनांचा कसा प्रभाव पडला? त्यांना आशा मिळाली की एक असा काळ येईल जेव्हा पृथ्वीवर फक्त नीतिमान लोक राहतील आणि पृथ्वी परत एदेन बागेसारखी नंदनवन बनेल. कालांतराने यहोवाची उपासना करण्याचा दावा करणाऱ्या बऱ्याच इस्राएली लोकांनी यहोवाला आणि खऱ्या उपासनेला सोडून दिलं. त्यामुळे देवाने बाबेलच्या सैन्याला त्याच्या लोकांवर विजय मिळवू दिला, त्यांच्या देशाचा नाश होऊ दिला आणि बऱ्याच लोकांना बंदीवासात जाऊ दिलं. (२ इति. ३६:१५-२१; यिर्म. ४:२२-२७) पण संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली होती की यहोवाचे लोक ७० वर्षांनंतर आपल्या मायदेशी परततील. आणि त्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. यातून भविष्यात नंदनवनाबद्दल असणाऱ्या आपल्या आशेबद्दल आपण आजही बरंच काही शिकू शकतो. टेहळणी बुरूज१८.१२ ४ ¶९-१०
रविवार, १७ मे
आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत.—यश. ५५:९.
जगातल्या बऱ्याच गोष्टी बायबलशी मेळ खात नाहीत. पण जग देत असलेला सल्ला हा आज बायबल देत असलेल्या सल्ल्यापेक्षा जास्त व्यावहारिक आहे का? येशूने म्हटलं: “बुद्धी ही कार्यांद्वारे सिद्ध होते.” (मत्त. ११:१९) जरी जगाने तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली असली तरी युद्ध, जातीभेद आणि गुन्हेगारी यांसारख्या मोठमोठ्या समस्या ते सोडवू शकलं नाही. यामुळे आपण आजही दुःखी आहोत. त्यासोबतच, जगात लैंगिक अनैतिकता चालवून घेतली जाते. पण बऱ्याच लोकांनी मान्य केलं आहे की यामुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात, शारीरिक समस्या निर्माण होतात आणि इतर वाईट परिणामही होतात. पण यहोवाच्या सल्ल्यांबद्दल काय? यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारलेल्या ख्रिस्ती बंधुभगिनींची कुटुंबं आनंदी आहेत व त्यांना अनेक शारीरिक समस्या टाळणं शक्य झालं आहे. तसंच, जगभरातल्या बंधुभगिनींसोबत त्यांचे शांतीपूर्ण नातेसंबंध आहेत. (यश. २:४; प्रे. कार्ये १०:३४, ३५; १ करिंथ. ६:९-११) यावरून स्पष्टच आहे, की यहोवाची विचारसरणी जगाच्या विचारसरणीपेक्षा श्रेष्ठ आहे. टेहळणी बुरूज१८.११ २० ¶८-१०
सोमवार, १८ मे
वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.—१ करिंथ. १५:३३.
आपण आपल्या परीने कुटुंबातील सदस्यांसोबत चांगलं नातं ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि त्यांच्यासोबत प्रेमानेही वागतो. पण त्यांना खुश करण्यासाठी आपण यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. यहोवावर प्रेम करणारे लोकच आपले जवळचे मित्र असले पाहिजेत. सत्यात चालत राहण्यासाठी आपण यहोवाच्या नजरेत पवित्र किंवा शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. (यश. ३५:८; १ पेत्र १:१४-१६) आपण सत्य शिकलो तेव्हा बायबलच्या स्तरांनुसार जगण्यासाठी जीवनात आपण बरेच बदल केले. काही लोकांना तर यासाठी जीवनात मोठमोठे बदल करावे लागले. असं असलं तरी आपण आजही सावध असलं पाहिजे. अनैतिक जीवनशैलीला आपल्या जीवनात कोणतीच जागा नसली पाहिजे. अनैतिक कार्य करण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? आपण पवित्र असावं यासाठी यहोवाने आपल्याला काय दिलं आहे याचा विचार करा. त्याने आपल्या प्रिय पुत्राचं, येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्यासाठी दिलं आहे. (१ पेत्र १:१८, १९) यहोवाच्या नजरेत नेहमी शुद्ध राहण्यासाठी आपण येशूने दिलेलं खंडणी बलिदान किती मौल्यवान आहे, यावर मनन करत राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज१८.११ ११ ¶१०-११
मंगळवार, १९ मे
मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.—मीखा ७:७.
पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या अनेकांचं म्हणणं आहे, की सेवाकार्यावर लक्ष केंद्रित ठेवल्याने त्यांना बदलत्या परिस्थितींतही आनंदी राहायला आणि सकारात्मक मनोवृत्ती बाळगायला मदत होते. या उदाहरणांवरून आपल्याला समजतं, की जर आपण आहे त्या परिस्थितीत आपलं सर्वोत्तम दिलं आणि यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवला, तर कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मनाची शांती टिकवून ठेवू शकतो. मग कालांतराने आपल्याला कदाचित जाणवेल की आपण ज्या प्रकारे बदलांशी जुळवून घेतलं त्यामुळे खरंतर यहोवासोबत आपली मैत्री घनिष्ठ झाली आहे. या व्यवस्थेत आपल्या जीवनात अनपेक्षित बदल घडू शकतात. यहोवाच्या सेवेत आपली नेमणूक बदलू शकते, शारीरिक समस्या उद्भवू शकतात किंवा कुटुंबाशी संबंधित असलेली एखादी नवीन जबाबदारी आपल्यावर येऊ शकते. पण कोणतेही बदल झाले तरी यहोवाला तुमची काळजी आहे आणि योग्य वेळी तो तुम्हाला मदत करेल याची खात्री बाळगा. (इब्री ४:१६; १ पेत्र ५:६, ७) तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. आपल्या पित्याला, यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवा. असं करण्याद्वारे तुमची परिस्थिती बदलली तरीही तुम्ही मनाची शांती टिकवून ठेवू शकाल. टेहळणी बुरूज१८.१० ३० ¶१७; ३१ ¶१९, २२
बुधवार, २० मे
तो [यहोवा] आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.—स्तो. १०३:१४.
यहोवा त्याच्या लोकांचा विचार करतो याबद्दल बायबलमध्ये बरीच उदाहरणं दिली आहेत. उदाहरणार्थ, १ शमुवेल ३:१-१८ मध्ये, महायाजक एलीला न्यायाचा संदेश सांगता यावा यासाठी लहान असलेल्या शमुवेलला यहोवाने प्रेमळपणे कशी मदत केली ते लक्षात घ्या. मुलांनी मोठ्यांचा खासकरून अधिकारपदावर असलेल्यांचा आदर करावा अशी आज्ञा नियमशास्त्रात होती. (निर्ग. २२:२८; लेवी. १९:३२) त्यामुळे शमुवेलसारख्या लहान मुलाने एलीकडे जाऊन न घाबरता देवाकडून आलेला न्यायाचा संदेश सांगणं ही गोष्ट आपल्याला अशक्य वाटते. बायबलमध्ये सांगितलं आहे की हा दृष्टान्त एलीला सांगायला शमुवेलला भीती वाटत होती. पण देवाने एलीला स्पष्टपणे दाखवून दिलं की तो शमुवेलला बोलवत होता. यामुळे एलीने शमुवेलला सांगितलं, की देवाने सांगितलेली एकूण एक गोष्ट त्याने त्याला सांगावी. यावर शमुवेलने एलीची आज्ञा पाळली आणि त्याला “सर्व काही सांगितले.” याआधीही देवाने असाच एक संदेश एलीला दिला होता. (१ शमु. २:२७-३६) या अहवालावरून आपल्याला शिकायला मिळतं की यहोवा खूप बुद्धिमान आणि इतरांचा विचार करणारा आहे. टेहळणी बुरूज१८.०९ २३ ¶२; २४ ¶४-५
गुरुवार, २१ मे
हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? [जो] मनापासून सत्य बोलतो [तो].—स्तो. १५:१, २.
आज खोटं बोलणं खूप सामान्य गोष्ट बनली आहे. या सर्वांचा काय परिणाम होतो? लोकांचा एकमेकांवरून भरवसा उठला आहे आणि यामुळे अनेक नाती तुटली आहेत. “आपण का खोटं बोलतो” या लेखात युधिजीत भट्टाचारजी यांनी असं म्हटलं आहे, की “खोटं बोलणं हे मानवांच्या मूळ स्वभावातच आहे असं म्हणता येईल.” दुसऱ्या शब्दांत लोकांना असं वाटतं की खोटं बोलण्यात काहीच गैर नाही, ते अगदी स्वाभाविक आहे. लोक सहसा स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोलतात. कदाचित त्यांच्या हातून एखादी चूक झाली असेल किंवा त्यांनी एखादा अपराध केला असेल तर ते लपवण्यासाठी ते खोटं बोलतात. लोक पैसे कमवण्यासाठी किंवा इतर मार्गांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीही खोटं बोलतात. त्या लेखात असंदेखील सांगितलं होतं की काही लोकांना “अनोळखी लोकांशी, कामावरच्या सोबत्यांशी, मित्रांशी आणि जवळच्या लोकांशी” खोटं बोलण्यात काहीच गैर वाटत नाही.—जख. ८:१६. टेहळणी बुरूज१८.१० ७ ¶४; ८ ¶९-१०; १० ¶१९
शुक्रवार, २२ मे
त्याने त्यांस सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत.—स्तो. ७८:५३.
इ.स.पू. १५१३ साली, तीस लाखापेक्षा जास्त इस्राएली लोकांनी इजिप्त सोडलं असावं. त्यात मुलं, वृद्ध आणि कदाचित आजारी किंवा अपंग सामील असावेत. या मोठ्या जमावाला एका प्रेमळ आणि त्यांना समजून घेणाऱ्या नेत्याची गरज होती. आणि यहोवाने मोशेद्वारे दाखवून दिलं की तो एक प्रेमळ नेता आहे. यामुळे इस्राएली लोकांनी आपलं घर सोडलं तेव्हा ते घाबरले नाहीत. (स्तो. ७८:५२) यहोवाने त्याच्या लोकांना सुरक्षित कसं ठेवलं? इस्राएल राष्ट्र इजिप्त सोडून निघाल्यावर यहोवाने त्यांना “लढाईला सज्ज” असलेल्या सैनिकांप्रमाणे संघटित केलं. (निर्ग. १३:१८) या प्रकारे संघटित असल्यामुळे ते स्पष्टपणे पाहू शकले की परिस्थिती यहोवाच्या नियंत्रणात आहे. तसंच यहोवाने त्यांना “दिवसा मेघ” आणि रात्री “अग्निप्रकाश” दिला. असं करण्याद्वारे त्याने दाखवून दिलं की तो त्यांच्यासोबत आहे, त्यांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करत आहे.—स्तो. ७८:१४. टेहळणी बुरूज१८.०९ २६ ¶११-१२
शनिवार, २३ मे
तू मला अधोलोकात लपवशील . . . माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करशील.—ईयो. १४:१३.
बायबल काळातही देवाच्या काही विश्वासू सेवकांना आपल्या जीवनात खूप समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनाही जीवन नकोसं झालं होतं. उदाहरणार्थ, ईयोबला इतक्या वेदना होत होत्या की त्याने म्हटलं: “मला आपल्या जिवाचा वीट आला आहे; सर्वकाळ जगणे मला नको.” (ईयो. ७:१६) योनाही इतका निराश झाला होता की त्याने म्हटलं: “तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.” (योना ४:३) तसंच, एलीया संदेष्ट्यालाही इतकं एकटं वाटलं होतं की त्याने म्हटलं: “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर.” (१ राजे १९:४) पण यहोवाचं या सर्व सेवकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांनी जगावं अशी त्याची इच्छा होती. अशा भावना व्यक्त केल्यामुळे यहोवाने त्यांना दोषी ठरवलं नाही. याउलट त्याने या सेवकांना जगण्याची आशा उत्पन्न करण्यासाठी मदत केली. यामुळे ते पुढेही यहोवाची विश्वासूपणे सेवा करू शकले. टेहळणी बुरूज१८.०९ १३ ¶४
रविवार, २४ मे
आपण देवाचे सहकारी आहोत.—१ करिंथ. ३:९.
देवाचे सहकारी पाहुणचार दाखवण्यासाठी ओळखले जातात. बायबलमध्ये, “पाहुणचार” या शब्दासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘अनोळखी लोकांशी प्रेमळपणे वागणं’ असा होतो. (इब्री १३:२; तळटीप) बायबलमध्ये अनेक उदाहरणं दिली आहेत ज्यांवरून अशा प्रकारचं प्रेम कसं दाखवलं जाऊ शकतं हे आपण शिकू शकतो. (उत्प. १८:१-५) विश्वासात असलेल्या आणि नसलेल्या लोकांना आपण मदत करण्याची संधी शोधू शकतो आणि असं करणं गरजेचंसुद्धा आहे. (गलती. ६:१०) पूर्णवेळेच्या सेवकांना पाहुणचार दाखवण्याद्वारे तुम्ही यहोवासोबत काम करत आहात हे दिसून येईल. (३ योहा. ५, ८) त्यांना आपल्या घरी राहू दिल्याने त्यांच्यासोबतच आपल्यालाही फायदा होतो. बायबलमध्ये याला “एकमेकांना प्रोत्साहन” देणं असं म्हटलं आहे. (रोम. १:११, १२) देवाचं वचन बांधवांना उत्तेजन देतं की त्यांनी मंडळीत साहाय्यक सेवक आणि वडील म्हणून इतरांची सेवा करण्याद्वारे यहोवासोबत काम करावं. (१ तीम. ३:१, ८, ९; १ पेत्र ५:२, ३) उपासनेसंबंधी साहाय्य करण्याद्वारे आणि व्यावहारिक मदत करण्याद्वारे ते इतरांना मदत करू शकतात. (प्रे. कार्ये ६:१-४) जे बांधव मंडळीतल्या जबाबदाऱ्या पार पाडतात त्यांचा अनुभव आहे की त्यांना या कामांत खूप आनंद मिळतो. टेहळणी बुरूज१८.०८ २४ ¶६-७; २५ ¶१०
सोमवार, २५ मे
वयस्कर माणसाची कठोर शब्दांत टीका करू नको. उलट, त्याला आपल्या वडिलांसारखे समजून प्रेमाने सल्ला दे.—१ तीम. ५:१.
तीमथ्यला वृद्ध बांधवांवर काही प्रमाणात अधिकार असला, तरी त्याला त्यांच्यासोबत वागताना नेहमी दया आणि आदर दाखवणं गरजेचं होतं. पण एखाद्या वृद्ध बांधवाने जाणूनबुजून चूक केली किंवा यहोवाला पसंत नसलेली गोष्ट करण्यासाठी इतरांना प्रवृत्त केलं तेव्हा काय? जाणूनबुजून पाप करणारी व्यक्ती कधीच यहोवाच्या नजरेतून सुटत नाही, मग ती वृद्ध आणि इतरांच्या नजरेत खूप आदरणीय असली तरीही. यशया ६५:२० (ईझी-टू-रीड व्हर्शन) मध्ये एक तत्त्व दिलं आहे: “पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.” यहेज्केलच्या दृष्टान्तातही आपल्याला यासारखंच एक तत्त्व सापडतं. (यहे. ९:५-७) सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपण अगणित वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या यहोवा देवाचा आदर केला पाहिजे. (दानी. ७:९, १०, १३, १४) यहोवाबद्दल असलेल्या आदरामुळे आपल्याला एखाद्या वृद्ध बांधवाची चूक सुधारण्यासाठी लागणारं धैर्य मिळेल.—गलती. ६:१. टेहळणी बुरूज१८.०८ ११ ¶१३-१४
मंगळवार, २६ मे
भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.—नीति. १४:१५.
खरे ख्रिस्ती या नात्याने आपण एखादी माहिती कितपत खरी आहे हे पडताळून पाहायला शिकणं गरजेचं आहे. यामुळे आपल्याला योग्य निष्कर्षावर पोचणं शक्य होईल. (नीति. ३:२१-२३; ८:४, ५) आपण हे शिकून घेतलं नाही, तर सैतान आणि त्याचं जग आपल्या विचारांवर चुकीचा प्रभाव पाडू शकतं. (इफिस. ५:६; कलस्सै. २:८) पण योग्य निष्कर्षावर पोचण्यासाठी आपल्याजवळ एखाद्या गोष्टीबद्दल संपूर्ण आणि खरी माहिती असणं गरजेचं आहे. आज आपल्यावर चारही बाजूंनी माहितीचा भडिमार होत आहे. इंटरनेट, टिव्ही आणि इतर माध्यमांतून ही माहिती सतत आपल्यापर्यंत येत असते. आपल्या मित्रांकडून एखादा अनुभव किंवा माहिती आपल्याला ई-मेल आणि मेसेज यांद्वारे येऊ शकते. सतत येणाऱ्या या माहितीला अंत नाही. यामुळे आपण सावध असणं गरजेचं आहे. आपले मित्र आपल्याला जे काही पाठवतात त्यामागे त्यांचा हेतू चांगला असतो. पण जगात असेही लोक आहेत जे मुद्दाम चुकीची माहिती पसरवतात किंवा एखाद्या गोष्टीत आपल्या मनाचं जोडून लोकांची दिशाभूल करतात. तर मग आपण जे काही ऐकतो किंवा वाचतो ती माहिती खरी आहे की नाही, हे आपण ओळखलं पाहिजे. टेहळणी बुरूज१८.०८ ३ ¶१, ३
बुधवार, २७ मे
देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.—लूक १:३०.
देवाच्या पुत्राला मानव म्हणून या पृथ्वीवर पाठवायचं होतं, तेव्हा यहोवाने मरीया नावाच्या नम्र व तरुण स्त्रीला येशूची आई होण्यासाठी निवडलं. मरीया यरुशलेम आणि त्यातल्या सुंदर मंदिरापासून दूर असलेल्या नासरेथ नावाच्या एका छोट्याशा शहरात राहायची. (लूक १:२६-३३) तिची नातेवाईक असलेल्या अलीशिबाला तिने जे नंतर म्हटलं त्यावरून आपल्याला कळतं, की तिचा यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध होता. (लूक १:४६-५५) मरीयाच्या कार्यांवर यहोवाचं लक्ष होतं. यहोवाला विश्वासू असल्यामुळे तिने अपेक्षाही केली नाही अशा पद्धतीने त्याने तिला आशीर्वाद दिले. येशूच्या जन्माबद्दल यहोवाने कोणाला सांगितलं? याबद्दल त्याने यरुशलेम आणि बेथलेहेममधल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना किंवा शासकांना सांगितलं नाही. याउलट बेथलेहेमच्या बाहेर मेंढरांची राखण करणाऱ्या गरीब मेंढपाळांकडे त्याने आपले देवदूत पाठवले. (लूक २:८-१४) मग ते मेंढपाळ बाळाला भेटायला गेले. (लूक २:१५-१७) येशूला अशा प्रकारे आदर मिळालेला पाहून मरीया आणि योसेफ यांना आश्चर्य वाटलं असेल. टेहळणी बुरूज१८.०७ ९-१० ¶११-१२
गुरुवार, २८ मे
परमेश्वर त्याच्यावर कोपला.—१ राजे ११:९.
शलमोनावर यहोवाचा राग का भडकला? बायबल सांगतं की शलमोनचं मन यहोवापासून “फिरले.” म्हणून मग यहोवा त्याच्यावर रागावला. पण त्याने शलमोनची मदत करण्याचा प्रयत्नही केला. त्याने त्याला दोनदा दर्शन दिलं आणि “अन्य देवांच्या नादी लागू नको” अशी खास ताकीदही दिली. पण शलमोनने त्याकडे दुर्लक्ष केलं. याचा परिणाम असा झाला, की तो देवाची स्वीकृती आणि पाठिंबा गमावून बसला. यहोवाने त्याच्या वंशजांना संपूर्ण इस्राएल राष्ट्रावर राज्य करण्याची परवानगी दिली नाही. तसंच शेकडो वर्षांपर्यंत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. (१ राजे ११:९-१३) यहोवाचे स्तर समजून न घेणारे आणि त्यांचा अनादर करणारे मित्र जर आपण निवडले तर आपल्या विचारांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो आणि यहोवाशी असलेला आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. ते कदाचित मंडळीतले बंधुभगिनी असतील पण यहोवासोबत त्यांचा नातेसंबंध दृढ नसेल किंवा ते यहोवाची उपासना न करणारे आपले नातेवाईक, शेजारी, सोबत काम करणारे किंवा शाळेतले सोबती असू शकतील. यहोवाच्या स्तरांनुसार आचरण न करणाऱ्या लोकांसोबत जर आपण आपला वेळ घालवला तर त्यांचा प्रभाव देवाशी असलेल्या आपल्या चांगल्या नातेसंबंधावर होऊ शकतो. टेहळणी बुरूज१८.०७ १९ ¶९-१०
शुक्रवार, २९ मे
सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.—१ योहा. ५:१९.
सैतान आपली विचारसरणी पसरवण्यासाठी चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रम यांचा उपयोग करतो. त्यांतल्या कहाण्या फक्त आपलं मनोरंजनच करत नाहीत, तर आपल्याला हेदेखील शिकवतात की आपले विचार, भावना आणि वागणं कसं असलं पाहिजे. येशूने महत्त्वपूर्ण धडे शिकवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला. जसं की, त्याने चांगल्या शोमरोन्याच्या आणि उधळ्या पुत्राच्या उदाहरणांचा वापर केला. (मत्त. १३:३४; लूक १०:२९-३७; १५:११-३२) पण सैतानाच्या विचारांनी दूषित झालेले लोक आपल्याला भ्रष्ट करण्यासाठी कहाण्यांचा वापर करतील. अशा वेळी आपण समजबुद्धीचा वापर केला पाहिजे. हे खरं आहे की काही चित्रपट आणि टिव्हीवरचे कार्यक्रम आपले विचार भ्रष्ट न करता आपलं मनोरंजन करू शकतात व आपल्याला त्यांतून शिकायलाही मिळतं. पण असं असलं तरी आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणून मनोरंजन निवडताना आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारणं गरजेचं आहे: ‘शारीरिक इच्छेला बळी पडण्यात काहीच चूक नाही, असं हा चित्रपट किंवा टिव्ही कार्यक्रम मला शिकवतो का?’ (गलती. ५:१९-२१; इफिस. २:१-३) एखादा कार्यक्रम सैतानाच्या विचारांना बढावा देत असल्याचं तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्ही काय कराल? एका संसर्गजन्य रोगापासून जसं तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करता, तसंच या प्रकारच्या मनोरंजनापासूनही दूर राहा! टेहळणी बुरूज१९.०१ १५-१६ ¶६-७
शनिवार, ३० मे
तारणाचा टोप . . . स्वीकारा.—इफिस. ६:१७.
ज्या प्रकारे, टोपामुळे एका सैनिकाच्या मेंदूचं रक्षण होतं, त्याच प्रकारे ‘तारणाच्या आशेमुळे’ आपल्या विचारांचं रक्षण होतं. (१ थेस्सलनी. ५:८; नीति. ३:२१) आपला टोप काढण्यासाठी सैतान आपल्याला कसं फसवू शकतो? त्याने येशूसोबत काय केलं याचा जरा विचार करा. येशू मानवजातीचा राजा बनेल ही गोष्ट सैतानाला माहीत होती. पण त्याआधी येशूला खूप त्रास सहन करून मृत्यूला सामोरं जावं लागणार होतं. त्यानंतर यहोवा येशूला राजा बनवत नाही तोपर्यंत त्याला थांबून राहावं लागणार होतं. त्यामुळे सैतानाने त्याला लवकर राजा बनण्याचं आमिष दाखवलं. सैतानाने येशूला वचन दिलं की जर त्याने फक्त एकदा त्याची उपासना केली तर तो लगेच जगाचा राजा बनू शकतो. (लूक ४:५-७) त्याच प्रकारे यहोवा आपल्याला नवीन जगात खूप चांगल्या गोष्टी देणार आहे हेही सैतानाला ठाऊक आहे. पण यहोवाचं नवीन जगाबद्दलचं अभिवचन पूर्ण होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आणि तोपर्यंत आपल्याला कदाचित खूप समस्यांचाही सामना करावा लागेल. म्हणून सैतान आपल्याला आताच आरामदायी आणि सुखदायी जीवन जगण्याचं आमिष दाखवतो. आपण देवाच्या राज्याला दुसऱ्या स्थानी ठेवून स्वतःच्या सुखसोयींचा आधी विचार करावा अशी त्याची इच्छा आहे.—मत्त. ६:३१-३३. टेहळणी बुरूज१८.०५ ३०-३१ ¶१५-१७
रविवार, ३१ मे
तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो.—उप. ११:९.
तरुणपणात तुम्ही आनंदी असावं अशी यहोवाची इच्छा आहे. आध्यात्मिक ध्येयांवर नेहमी आपलं लक्ष केंद्रित करून ठेवा आणि योजना करताना व निर्णय घेताना यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारा. तुम्ही जितक्या कमी वयात हे कराल, तितकं लवकर तुम्ही यहोवाच्या मार्गदर्शनाचा, संरक्षणाचा आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव घेऊ शकाल. बायबलमध्ये तुमच्यासाठी दिलेल्या सर्व सल्ल्यांवर विचार करा आणि पुढील सल्ला लागू करा: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उप. १२:१) तरुणांनो, तुम्ही यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या वेळेचा उपयोग करत आहात, यासाठी आम्ही मनापासून तुमची प्रशंसा करतो. तुम्ही आध्यात्मिक ध्येयं ठेवली आहेत आणि प्रचारकार्याला तुम्ही खूप महत्त्वाचं समजता. तसंच, तुम्हाला आपल्या ध्येयांपासून विचलित करण्याची संधी तुम्ही जगाला देत नाही. या सर्व गोष्टी इतरांच्या लक्षात येतात याची खात्री बाळगा. मंडळीत अनेक बंधुभगिनी आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हाला मदत करायची त्यांची इच्छा आहे. म्हणून मग बायबलमधील सल्ला आपण नेहमी पाळू शकतो. त्यात म्हटलं आहे: “आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.” टेहळणी बुरूज१८.०४ २९ ¶१७, १९