फेब्रुवारी
शनिवार, १ फेब्रुवारी
आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर.—२ तीम. ४:५.
येशूच्या मनात इतरांबद्दल खूप प्रेम आणि करुणा होती. लोकांना त्याचं प्रेम जाणवायचं आणि म्हणून त्यांनी राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला. आपणही जर येशूसारखंच इतरांप्रती प्रेम उत्पन्न केलं, तर आपण आणखी परिणामकारक रीत्या आपलं सेवाकार्य करू शकू. प्रचारात भेटणाऱ्या लोकांप्रती आपण सहानुभूती कशी दाखवू शकतो? आपण स्वतःला इतरांच्या जागी ठेवून त्यांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. तसंच, इतरांनी आपल्याशी जसा व्यवहार करावा असं आपल्याला वाटतं, तसाच व्यवहार आपण त्यांच्याशी केला पाहिजे. (मत्त. ७:१२) प्रत्येक व्यक्तीच्या गरजा समजून घ्या. प्रचारात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी एकाच प्रकारे संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. याउलट, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि विचार समजून घेऊन तिच्याशी बोला. विचारपूर्वक प्रश्न विचारून तिच्या मनात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. (नीति. २०:५) आपण प्रश्न विचारून इतरांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी देतो, तेव्हा त्यांना आनंदाच्या बातमीची गरज का आहे, हे आपल्याला समजतं. एकदा आपण त्यांची गरज ओळखली, तर मग त्याबद्दल आपण सहानुभूती दाखवू शकतो आणि योग्य ती मदत पुरवू शकतो. येशूनेही हीच पद्धत वापरली.—१ करिंथकर ९:१९-२३ पडताळून पाहा. टेहळणी बुरूज१९.०३ २० ¶२; २२ ¶८-९
रविवार, २ फेब्रुवारी
आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.—नीति. १६:३.
यहोवाने त्यांच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची आपल्याला बिलकुल कदर नाही हे आदाम-हव्वाने दाखवून दिलं. त्यांनी घेतलेला निर्णय किती चुकीचा होता हे दाखवण्याची संधी आपल्या सर्वांकडे आहे. आपण बाप्तिस्मा घेण्याद्वारे हे दाखवून देतो की आपल्यासाठी बऱ्यावाइटाचे स्तर ठरवण्याचा अधिकार फक्त यहोवाला आहे. आणि असं केल्यामुळे आपल्या पित्यावर आपलं प्रेम आणि विश्वास असल्याचं आपण सिद्ध करत असतो. बाप्तिस्म्यानंतर आपल्या सर्वांना प्रत्येक दिवशी स्वतःच्या नाही तर यहोवाच्या स्तरांनुसार जगणं गरजेचं असतं आणि हे आपल्याला आव्हानात्मक वाटू शकतं. पण असं करणं शक्य आहे कारण आज लाखो लोक यहोवाच्या स्तरांनुसार जगत आहेत. म्हणून मग देवाच्या वचनाची खोलवर समज मिळवत राहा; आपल्या बंधुभगिनींसोबत नियमितपणे संगती करत राहा आणि आपल्या प्रेमळ पित्याबद्दल शिकलेल्या गोष्टी इतरांना आवेशाने सांगत राहा. या गोष्टी केल्यामुळे तुम्हीही यहोवाच्या स्तरांनुसार जगत असलेल्या लाखो लोकांपैकी एक व्हाल. (इब्री १०:२४, २५) कोणताही निर्णय घेताना यहोवा आपल्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे देत असलेलं निर्देशन ऐका. (यश. ३०:२१) मग तुम्ही जे काही कराल त्यात नक्की यशस्वी व्हाल.—नीति. १६:२०. टेहळणी बुरूज१९.०३ ७ ¶१७-१८
सोमवार, ३ फेब्रुवारी
प्रत्येक उत्तम देणगी व परिपूर्ण दान वरून, म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या पित्याकडून येते.—याको. १:१७.
यहोवाने आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न दिलं आहे. तो आपल्याला सभा, नियतकालिकं आणि वेबसाईट यांद्वारे मदतदायी ठरेल असं मार्गदर्शन देतो. एखादं भाषण ऐकल्यावर, लेख वाचल्यावर किंवा ब्रॉडकास्टिंग पाहिल्यावर तुम्हाला कधी असं वाटलं का की ‘हे तर माझ्यासाठीच आहे!’ आपण यहोवाला कृतज्ञता कशी दाखवू शकतो? (कलस्सै. ३:१५) असं करण्याचा एक मार्ग म्हणजे या चांगल्या भेटवस्तूंसाठी प्रार्थनेत त्याचे आभार मानणे. आपल्या उपासनेची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवल्यानेही आपण यहोवाला कृतज्ञता व्यक्त करतो. आपण राज्य सभागृहाची साफसफाई आणि दुरुस्तीचं काम यांत नियमितपणे सहभाग घेतो. तसंच, साऊंड आणि व्हिडिओ यांसाठी असलेली साधनं बिघडू नयेत म्हणून आपण ती खूप जपून वापरतो. राज्य सभागृहाची नीट काळजी घेतल्याने ते बऱ्याच काळासाठी चांगल्या स्थितीत राहतील आणि दुरुस्तीची जास्त मोठी कामं निघणार नाहीत. अशा प्रकारे, आपल्याकडे जगभरात नवीन राज्य सभागृह बनवण्यासाठी आणि इतर राज्य सभागृहांचं नवीनीकरण करण्यासाठी जास्त पैसा असेल. टेहळणी बुरूज१९.०२ १८ ¶१७-१८
मंगळवार, ४ फेब्रुवारी
या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते.—ईयो. २६:१४.
ईयोबने यहोवाच्या विस्मयकारक सृष्टीवर मनन केलं. (ईयो. २६:७, ८) पृथ्वी, आकाश, ढग, गर्जना यांच्या विचाराने तो अगदी थक्क झाला. त्याने मान्य केलं की यहोवाच्या अफाट सृष्टीबद्दल त्याला खूप कमी माहीत आहे. तसंच, यहोवाच्या वचनांनाही त्याने खूप मौल्यवान लेखलं. ईयोबने देवाच्या शब्दांविषयी म्हटलं: “मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.” (ईयो. २३:१२) यहोवाबद्दल असलेल्या विस्मयाच्या भावनेमुळे त्याच्या मनात यहोवाबद्दल गाढ आदर होता. तसंच, त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि त्याचं मन आनंदित करण्याची त्याची इच्छा होती. आणि याचा परिणाम म्हणजे, खरेपणा टिकवून ठेवण्याचा त्याचा निर्धार आणखी पक्का झाला. ईयोबचं अनुकरण करण्याची आपलीही इच्छा आहे. ईयोबच्या काळात लोकांना यहोवाच्या विस्मयकारक सृष्टीबद्दल जितकं माहीत होतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आज आपल्याला माहीत आहे. तसंच, आपल्याकडे देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं संपूर्ण बायबलही आहे. यामुळे आपल्याला यहोवा कसा आहे हे जाणून घ्यायला मदत होते. आपण जे काही शिकू त्यामुळे आपल्या मनात देवाबद्दल विस्मयाची भावना वाढेल. यहोवाबद्दल असलेली विस्मयाची भावना आणि आदर यांमुळे आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करायला, त्याच्यावर प्रेम करायला आणि त्याची आज्ञा पाळायला मदत होईल. तसंच, खरेपणा टिकवून ठेवण्याची मनापासून असलेली आपली इच्छा बळकट करायलाही मदत होईल.—ईयो. २८:२८. टेहळणी बुरूज१९.०२ ५ ¶१२
बुधवार, ५ फेब्रुवारी
मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?—स्तो. ११८:६.
मानवजातीच्या संपूर्ण इतिहासात अनेक शासकांनी यहोवाच्या लोकांचा छळ केला आहे. ते आपल्यावर कदाचित अनेक “आरोप” लावतील, पण त्याचं मूळ कारण हे आहे की आपण “माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा” पाळतो. (प्रे. कार्ये ५:२९) आपला छळ होऊ शकतो, आपल्याला मारहाण केली जाऊ शकते किंवा तुरुंगातही टाकण्यात येऊ शकतं. अशा परिस्थितीत आपण कधीच हिंसा करणार नाही, तर यहोवाच्या मदतीने शांत राहण्याचा प्रयत्न करू. बाबेलच्या बंदीवासात असणाऱ्या तीन इब्री तरुणांनी, म्हणजेच हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या यांनी आपल्यासाठी उत्तम उदाहरण मांडलं. राजाने बनवलेल्या मूर्तीला नमन न करण्याचं कारण त्यांनी राजाला आदराने समजावून सांगितलं. यहोवाची जी काही इच्छा असेल ती स्वीकारायला ते तयार होते. (दानी. ३:१, ८-२८) आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होते, तेव्हा आपण या तीन इब्री तरुणांचं अनुकरण कसं करू शकतो? अशा परिस्थितीत आपण नम्र राहिलं पाहिजे आणि यहोवा आपली काळजी घेईल असा पूर्ण भरवसा बाळगला पाहिजे. (स्तो. ११८:७) आपल्यावर चुकीचे आरोप लावणाऱ्यांना आपण आदरपूर्वक उत्तर दिलं पाहिजे. (१पेत्र ३:१५) यहोवासोबतची आपली मैत्री धोक्यात येईल अशी कोणतीही गोष्ट करायला आपण साफ नकार दिला पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०२ १०-११ ¶११-१३
गुरुवार, ६ फेब्रुवारी
हिंमत धरा!—योहा. १६:३३.
येशू ख्रिस्ताने दिलेल्या खंडणीमुळे आपल्याला आशा मिळाली आहे. त्या आशेवर मनन केल्यामुळे आपण धैर्य उत्पन्न करू शकतो. (योहा. ३:१६; इफिस. १:७) स्मारकविधीच्या आधीच्या आठवड्यांमध्ये खंडणीबद्दल आपली कदर वाढवण्याची आपल्याजवळ चांगली संधी आहे. या काळात स्मारकविधीचं बायबल वाचन करा आणि येशूच्या मृत्यूच्या वेळी ज्या काही घटना घडल्या त्यावर प्रार्थनापूर्वक मनन करा. असं केल्यामुळे स्मारकविधीला उपस्थित असताना आपल्याला त्या प्रतीकांचा अर्थ आणखी चांगल्या प्रकारे समजेल. तसंच, एका अतुलनीय बलिदानाला ती प्रतीकं कशी सूचित करतात हेदेखील आपल्याला समजेल. येशू आणि यहोवा यांनी आपल्यासाठी कायकाय केलं आहे आणि त्याचा आपल्याला व आपल्या प्रिय जणांना कसा फायदा होतो हे समजून घेतल्यामुळे आपली आशा बळकट होईल. तसंच, शेवटपर्यंत धैर्याने विश्वासू राहण्यासाठी आपण प्रेरीत होऊ. (इब्री १२:३) आपला महायाजक या नात्याने येशू आपल्या सर्वांच्या वतीने याचना करतो. ती करत असताना तो आजही नम्रता आणि हिंमत हे गुण दाखवत आहे यासाठी आपण किती कृतज्ञ आहोत! (इब्री ७:२४, २५) येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल मनापासून कदर दाखवण्यासाठी आपण त्याने आज्ञा दिल्याप्रमाणेच विश्वासूपणे हा विधी पाळला पाहिजे.—लूक २२:१९, २०. टेहळणी बुरूज१९.०१ २२ ¶८; २३-२४ ¶१०-११
शुक्रवार, ७ फेब्रुवारी
हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर.—स्तो. ११९:१०८.
यहोवाने आपल्या सर्वांना त्याची स्तुती करण्याचा बहुमान दिला आहे. सभेत आपण जी उत्तरं देतो ती ‘स्तुतीच्या बलिदानाचा’ एक भाग आहे आणि कोणी दुसरं आपल्या वतीने हे देऊ शकत नाही. (इब्री लोकांना १३:१५) मग यहोवा आपल्या प्रत्येकाकडून एकाच प्रकारच्या बलिदानाची किंवा उत्तराची अपेक्षा करतो का? मुळीच नाही! मंडळीतली सभा ही जणू जिवलग मित्र एकत्र जेवतात त्यासारखी आहे. कल्पना करा, तुमच्या मंडळीतल्या काही मित्रांनी एकत्र जेवणाचा बेत ठरवला आहे आणि त्यांनी तुम्हाला एखादा साधा पदार्थ बनवून आणायला सांगितलं आहे. मग यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? अशा वेळी तुम्हाला कदाचित थोडी चिंता वाटेल, पण सर्वांना आवडेल असं काहीतरी बनवण्यासाठी तुम्ही नक्कीच मेहनत घ्याल. त्याच प्रकारे, यहोवा देव आपल्याला सभांद्वारे भरपूर चांगल्या गोष्टी पुरवतो. (स्तो. २३:५; मत्त. २४:४५) अशा वेळी आपण आपल्या परीने एखादी सर्वोत्तम भेटवस्तू देतो तेव्हा तो आनंदित होतो; मग ती साधी असली तरीही. म्हणूनच चांगली तयारी करा आणि जितकी जास्त उत्तरं देता येतील तितकी देण्याचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे तुम्ही यहोवाच्या मेजावरून मिळालेल्या अन्नाचं सेवन तर करालच, पण त्यासोबतच तुम्ही मंडळीतल्या सर्व बंधुभगिनींसाठी काही भेटवस्तूही आणाल. टेहळणी बुरूज१९.०१ ८ ¶३; १३ ¶२०
शनिवार, ८ फेब्रुवारी
जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील.—स्तो. १६:४.
बायबल काळात, खोट्या धर्मांत अनेकदा लैंगिक अनैतिकतेचा समावेश असायचा. (होशे. ४:१३, १४) बऱ्याच लोकांना खोटी उपासना आवडायची कारण त्यात अनैतिकता खपवून घेतली जायची. पण अशा उपासनेमुळे ते आनंदी होते का? मुळीच नाही! दावीदने अशा खोट्या देवांच्या उपासकांबद्दल म्हटलं की “त्यांना पुष्कळ दुःखे” होतात. त्या लोकांनी तर खोट्या देवांसाठी आपल्या मुलांचासुद्धा बळी दिला होता! (यश. ५७:५) यहोवाला त्यांच्या क्रूरपणाचा द्वेष होता. (यिर्म. ७:३१) आज बरेचसे खोटे धर्म लैंगिक अनैतिकता व समलैंगिकता चालवून घेतात. अनैतिक जीवन जगल्यामुळे लोकांना वाटू शकतं की ते स्वतंत्र आहेत. पण वस्तुस्थिती ही आहे की “त्यांना पुष्कळ दुःखे” होतात. (१ करिंथ. ६:१८, १९) आणि हे तुमच्याही लक्षात आलं असेल. म्हणून तरुणांनो, आपल्या स्वर्गात राहणाऱ्या पित्याचं ऐका! देवाची आज्ञा पाळल्याने तुमचं भलं होतं याची पक्की खात्री करून घ्या. अनैतिकतेमुळे कोणते वाईट परिणाम होतात याचा विचार करा. यामुळे होणारं नुकसान, क्षणिक सुखापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.—गलती. ६:८. टेहळणी बुरूज१८.१२ २७-२८ ¶१६-१८
रविवार, ९ फेब्रुवारी
मीही तुझ्याशी असाच वागेन.—होशे. ३:३.
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने अनैतिक लैंगिक कृत्य केलं, तर तिच्यासोबत राहायचं की नाही हा निर्णय तिचा निर्दोष जोडीदार घेऊ शकतो. येशूने म्हटलं की घटस्फोट घेण्याचं हे शास्त्रीय कारण आहे आणि मग तो निर्दोष जोडीदार पुन्हा विवाह करू शकतो. (मत्त. १९:९) पण, जर त्या निर्दोष जोडीदाराने आपल्या सोबत्याला माफ करण्याचा निर्णय घेतला तर ते चुकीचं ठरणार नाही. होशेयने गोमरला पुन्हा स्वीकारलं. घरी परतल्यावर होशेयने तिला सांगितलं की तिने कोणत्याही पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवू नये आणि तिला म्हटलं की काही काळासाठी “मी पण तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.” (होशे. ३:१-३, मराठी कॉमन लँग्वेज) पण कालांतराने होशेयने त्याच्या पत्नीसोबत संबंध नक्कीच ठेवले असतील. हे या गोष्टीला दर्शवणार होतं की यहोवा इस्राएली लोकांना माफ करून त्यांच्यासोबत पुन्हा एक जवळचं नातं जोडायला तयार होता. (होशे. १:११; ३:४, ५) यावरून आज आपण विवाहाबद्दल काय शिकतो? समजा एका ख्रिस्ती व्यक्तीने व्यभिचार केला आहे. पण याबद्दल माहीत असूनही जर तिच्या निर्दोष जोडीदाराने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर याचा अर्थ होईल की त्याने तिला माफ केलं आहे. (१ करिंथ. ७:३, ५) यानंतर घटस्फोट घेण्यासाठी निर्दोष जोडीदाराजवळ कोणतंही शास्त्रीय कारण उरणार नाही. त्या जोडप्याने सोबत मिळून आपला विवाह मजबूत करावा आणि विवाहाबद्दल देवाचा दृष्टिकोन बाळगण्यास एकमेकांना मदत करावी. टेहळणी बुरूज१८.१२ १३ ¶१३
सोमवार, १० फेब्रुवारी
चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.—नीति. २२:३.
अभ्यास करताना आपण यहोवाचा दृष्टिकोन सजमून घेतला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत मिळेल. यामुळे जर एखाद्या परिस्थितीत आपल्याला लगेच निर्णय घेण्याची वेळ आली तर आपण गोंधळून जाणार नाही. पोटीफरच्या पत्नीने योसेफला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला लगेच नकार दिला. तो हे यासाठी करू शकला कारण त्याने विवाहाबद्दल असलेल्या यहोवाच्या दृष्टिकोनावर आधीच मनन केलं होतं. (उत्प. ३९:८, ९) योसेफने पोटीफरच्या पत्नीला म्हटलं: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” या शब्दांवरून कळतं की योसेफचा दृष्टिकोन यहोवासारखा होता. आपल्या बाबतीत काय? कामाच्या ठिकाणी जर एखाद्याने तुमच्याशी इश्कबाजी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? किंवा तुम्हाला जर कोणी मोबाईलवर उत्तेजक मेसेज किंवा फोटो पाठवला तर तुम्ही काय कराल? आपण जर आधीच यहोवासारखा विचार करायला शिकलो आणि अशा गोष्टींबद्दल त्याचा दृष्टिकोन स्वीकारला, तर प्रलोभन आल्यावर आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहायला सोपं जाईल. टेहळणी बुरूज१८.११ २५ ¶१३-१४
मंगळवार, ११ फेब्रुवारी
मी परमेश्वरामुळे हर्ष पावेन.—हब. ३:१८.
काही विद्वान या वचनाचा शब्दशः अर्थ असा काढतात: “मी प्रभूसाठी आनंदाने उड्या मारीन; मी देवासाठी प्रसन्न होऊन गिरक्या घालीन.” आपल्या सर्वांसाठीच हा खरंच खूप महत्त्वाचा धडा आहे! यहोवाने आपल्याला भविष्यासाठी सुंदर अभिवचनं दिली आहेत पण त्यासोबतच त्याने आपल्याला भरवसाही दिला आहे की तो लवकरच ती अभिवचनं पूर्ण करेल. हबक्कूकच्या पुस्तकातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे यहोवावर भरवसा ठेवणं. (हब. २:४) यहोवावरचा भरवसा टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध घनिष्ठ करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या गोष्टी करू शकता. (१) प्रार्थना करत राहा. यहोवाला आपल्या सर्व चिंता आणि समस्या सांगा. (२) यहोवा त्याच्या वचनाद्वारे जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्या संघटनेद्वारे जे मार्गदर्शन देतो त्याचं पालन करा. (३) यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करेल याची वाट पाहत असताना धीर धरा आणि विश्वासू राहा. हबक्कूकनेसुद्धा हेच केलं. यहोवासोबत त्याने संभाषण सुरू केलं तेव्हा जरी तो निराश होता तरी शेवटी त्याला प्रोत्साहन मिळालं आणि तो आनंदी झाला. जर आपण हबक्कूकचं अनुकरण केलं तर आपल्या पित्याने, यहोवाने आपल्यालाही प्रेमळपणे जवळ घेतलं आहे हे जाणल्यामुळे सांत्वन मिळेल. खरंच, या दुष्ट जगात आपल्याला यापेक्षा जास्त सांत्वन कोणीच देऊ शकत नाही! टेहळणी बुरूज१८.११ १७ ¶१८-१९
बुधवार, १२ फेब्रुवारी
[ख्रिस्त] सर्वांसाठी मेला ते या हेतूने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावे.—२ करिंथ. ५:१५.
यहोवा आपल्यावर प्रेम करतो हे दाखवणारं आणखी एक कारण म्हणजे: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहा. ३:१६) येशूने दिलेल्या बलिदानावरून दिसून येतं की त्याचंही आपल्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. बायबल सांगतं की “संकट, दुःख” या गोष्टीही आपल्याला “ख्रिस्ताच्या प्रेमापासून” वेगळं करू शकत नाहीत. (रोम. ८:३५, ३८, ३९) कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण शारीरिक किंवा भावनिक रीत्या खचून जातो किंवा यहोवाच्या सेवेतील आपला आनंद नाहीसा होतो. येशू ख्रिस्ताचं आपल्यावर किती प्रेम आहे यावर अशा वेळी विचार केल्यामुळे आपल्याला बळ मिळू शकतं. (२ करिंथ. ५:१४) त्यामुळे आपल्या मनात जगण्याची आणि यहोवाची सेवा करत राहण्याची इच्छा निर्माण होते. आपल्याला नैसर्गिक विपत्ती, छळ, निराशा किंवा चिंता यांचा सामना करावा लागला, तरीदेखील ख्रिस्ताच्या प्रेमामुळे धैर्याने त्यांचा सामना करण्यास आणि जीवन जगत राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते. टेहळणी बुरूज१८.०९ १४ ¶८-९
गुरुवार, १३ फेब्रुवारी
मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.—स्तो. ८६:११.
सत्यात चालत राहण्यासाठी आपण, यहोवा सांगत असलेली प्रत्येक गोष्ट ऐकून त्यानुसार चाललं पाहिजे. सत्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक कार्यांत आपण बायबलची तत्त्वं लागू केली पाहिजेत. सत्यात चालत राहण्याचा दावीदने पक्का निर्धार केला होता आणि आपणही तेच केलं पाहिजे. आपण असं केलं नाही, तर कदाचित आपण सत्य स्वीकारण्यासाठी ज्या गोष्टींचा त्याग केला त्यांबद्दल परत विचार करू लागू. यामुळे त्या गोष्टी परत मिळवण्याची इच्छा आपल्या मनात येऊ शकते. पण आपण बायबलची मोजकी सत्यं स्वीकारून इतर सत्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. याऐवजी आपण सत्यात “पूर्णपणे” चाललं पाहिजे. (योहा. १६:१३) सत्यापासून आपण वाहवत जाऊ नये म्हणून आपण आपल्या वेळेचा नेहमी चांगला उपयोग केला पाहिजे. आपण सावध नसलो तर मनोरंजनात, छंद जोपासण्यात, इंटरनेट वापरण्यात किंवा टिव्ही पाहण्यात आपला खूप वेळा वाया जाऊ शकतो. या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या नाहीत. पण कदाचित असं होऊ शकतं की आपण आधी जो वेळ बायबलचा अभ्यास करण्यात आणि सेवेत देत होतो, तो वेळ आता आपण या गोष्टी करण्यात देत आहोत. टेहळणी बुरूज१८.११ १० ¶७-८
शुक्रवार, १४ फेब्रुवारी
मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे.—स्तो. १३१:२.
आपण अपेक्षाही केली नसेल असे बदल आपल्या जीवनात वेळोवेळी होत राहतील. यामुळे कदाचित आपल्याला खूप चिंता वाटू शकते आणि नैराश्य येऊ शकतं. (नीति. १२:२५) बदल स्वीकारणं किंवा त्यांच्याशी जुळवून घेणं आपल्याला जेव्हा कठीण जातं, तेव्हा कोणती गोष्ट आपल्या मनाची शांती टिकवून ठेवायला मदत करू शकते? (स्तो. १३१:१-३) आपली परिस्थिती कितीही कठीण असली तरी “देवाची शांती” आपल्या “बुद्धीचे रक्षण करेल” आणि आपल्याला मनाची शांती लाभेल. (फिलिप्पै. ४:६, ७) जेव्हा आपल्याला चिंतेचा किंवा नैराश्याचा सामना करावा लागतो, तेव्हा “देवाची शांती” आपल्याला त्याची सेवा करत राहायला ताकद देते आणि धीर धरायला मदत करते. देवाच्या आत्म्यामुळे आपल्याला शांती तर मिळते, पण त्यासोबत तो आपल्याला बायबलची वचनंही लक्षात आणून द्यायला मदत करू शकतो. यामुळे आपल्याला समजेल की आपल्या जीवनात कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.—योहा. १४:२६, २७. टेहळणी बुरूज१८.१० २७ ¶२; २८ ¶५, ८
शनिवार, १५ फेब्रुवारी
तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला.—जख. ८:१६.
अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे मानवजातीचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे? खोटं बोलणं! खोटं बोलणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला फसवण्यासाठी किंवा तिची दिशाभूल करण्यासाठी सत्य नसलेली गोष्ट सांगणं. मानव इतिहासात सर्वात पहिलं खोटं कोण बोललं? दियाबल सैतान! येशूने त्याला “खोटेपणाचा बाप” असं म्हटलं. (योहा. ८:४४) सैतान सर्वात पहिलं खोटं कधी बोलला? एदेन बागेत हजारो वर्षांआधी तो पहिलं खोटं बोलला. यहोवाने मानवांसाठी जे सुंदर नंदनवन बनवलं होतं त्यात आदाम आणि हव्वा जीवनाचा आनंद लुटत होते. देवाने त्यांना आधीच सांगितलं होतं की जर त्यांनी “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ” खाल्लं तर त्यांचा मृत्यू होईल. सैतानाला हे माहीत होतं, तरीदेखील त्याने एका सापाचा उपयोग करून हव्वाला असं म्हटलं: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” हे सर्वात पहिलं खोटं होतं. सैतानाने असंदेखील सांगितलं की, “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”—उत्प. २:१५-१७; ३:१-५. टेहळणी बुरूज१८.१० ६ ¶१-२
रविवार, १६ फेब्रुवारी
ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत, कारण ते देवाला पाहतील.—मत्त. ५:८.
मनाने शुद्ध असण्याचा अर्थ आपल्या इच्छा आणि आपले विचार शुद्ध ठेवणं. यहोवाने आपली उपासना स्वीकारावी अशी आपली इच्छा असेल तर मनाने शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. (२ करिंथ. ४:२; १ तीम. १:५) यहोवाने म्हटलं होतं: “माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्ग. ३३:२०) असं असेल तर मग मनाने शुद्ध असणारे लोक देवाला कसं पाहू शकतात? या वचनात, “पाहिल्यास” या शब्दासाठी मूळ ग्रीक भाषेत जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ कल्पना करणं, समजून घेणं आणि ओळख करून घेणं असा होतो. म्हणून ‘देवाला पाहणं’ याचा अर्थ, त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घेणं आणि त्याच्या गुणांबद्दल आदर बाळगणं असा होतो. (इफिस. १:१८) यासोबतच आपण आपल्या जीवनात जेव्हा देवाची मदत अनुभवतो तेव्हाही आपण देवाला पाहत असतो. (ईयो. ४२:५) मनाने शुद्ध आणि विश्वासू राहणाऱ्यांना यहोवाने जी अभिवचनं दिली आहेत त्यावर आपलं लक्ष केंद्रित करूनही आपण देवाला पाहू शकतो. टेहळणी बुरूज१८.०९ २० ¶१३, १५-१६
सोमवार, १७ फेब्रुवारी
ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर.—नीति. ४:७.
आपण यहोवाच्या नजरेत योग्य असलेल्या गोष्टी करू तेव्हा आपण सुज्ञ बनू. आणि यासाठी तो आपल्याला आशीर्वाद देईल. हे खरं आहे, की बुद्धी ज्ञानावर आधारित असते, तरी यात माहिती समजून घेण्यासोबत बरंचकाही गोवलेलं आहे. आपण जे निर्णय घेतो त्यात बुद्धीचा समावेश होतो. मुंग्यांमध्येही बुद्धी असते. त्या हिवाळ्यासाठी अन्न गोळा करून ठेवतात. (नीति. ३०:२४, २५) “बुद्धीचा पुरावा” असणारा ख्रिस्त नेहमी यहोवाचं मन आनंदित करतो. (१ करिंथ. १:२४; योहा. ८:२९) जर आपणही नम्र राहिलो आणि सुज्ञपणे योग्य त्या गोष्टी करण्याची निवड केली तर देव आपल्याला आशीर्वाद देईल. (मत्त. ७:२१-२३) त्यामुळे मंडळीत असं वातावरण असू द्या जिथे सर्व यहोवाची सेवा नम्रपणे करू शकतील. योग्य ते करण्यासाठी वेळ आणि धीर लागतो खरा, पण असं केल्याने आपण नम्र आहोत हे दिसून येईल. तसंच, नम्र राहिल्यामुळे आपण आज आणि सर्वकाळासाठी आनंदी राहू! टेहळणी बुरूज१८.०९ ७ ¶१८
मंगळवार, १८ फेब्रुवारी
प्रत्येकाने स्वतःच्या कार्यांचे परीक्षण करावे, म्हणजे मग दुसऱ्या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कार्यांमुळे त्याला आनंदी होता येईल.—गलती. ६:४.
यहोवाने मानवांना घडवलं तेव्हा त्याची इच्छा होती की त्यांनी त्याचे सहकारी बनावं. आज मानव अपरिपूर्ण असले तरी विश्वासू सेवक यहोवासोबत रोज काम करू शकतात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा राज्याचा आनंदाचा संदेश सांगून शिष्य बनवतो तेव्हा आपण “देवाचे सहकारी” म्हणून काम करत असतो. (१ करिंथ. ३:५-९) इतकं महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी सर्वसमर्थ सृष्टिकर्त्याने आपल्याला निवडलं आहे, हा खरंच खूप मोठा बहुमान आहे! असं असलं तरी प्रचारकार्य करणं फक्त हाच यहोवासोबत काम करण्याचा मार्ग नाही. इतर मार्गांनीही आपण यहोवासोबत काम करू शकतो. ते मार्ग म्हणजे आपल्या कुटुंबाला व मंडळीतल्या बंधुभगिनींना मदत करणं, आदरातिथ्य दाखवणं, आपल्या संघटनेने जगभरात जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्याला हातभार लावणं आणि यहोवाची सेवा वाढवणं. (कलस्सै. ३:२३) हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. आपलं वय, आरोग्य, परिस्थिती, आणि क्षमता सारख्या नाहीत. त्यामुळे तुम्ही यहोवासाठी जे करता त्याची तुलना इतर जे करतात त्याच्याशी करू नका. टेहळणी बुरूज१८.०८ २३ ¶१-२
बुधवार, १९ फेब्रुवारी
त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.—हब. २:३.
यहोवाने हबक्कूकला प्रेमळपणे आश्वासन दिलं की तो त्याच्या प्रामाणिक प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल. हबक्कूकच्या सर्व चिंता लवकरच दूर होणार होत्या. जणू यहोवा या संदेष्ट्याला म्हणत होता: “धीर धर आणि माझ्यावर भरवसा ठेव. जरी तुला उशीर वाटत असला तरी मी तुझ्या प्रार्थनेचं नक्की उत्तर देईन.” यहोवाने आपली अभिवचनं पूर्ण करण्याची एक वेळ ठरवली आहे, हे त्याने हबक्कूकला सांगितलं. म्हणून त्याने हबक्कूकला वाट पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तो निराश होणार नव्हता. यहोवा कार्य करेल याची आपणही वाट पाहिली पाहिजे. तो आपल्याला काय सांगतो हेसुद्धा आपण नीट लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मग आपण कोणत्याही समस्येत असू तरी आपला भरवसा वाढेल आणि आपल्याला मनाची शांती मिळेल. येशूने आपल्याला प्रोत्साहन दिलं, की देवाने “जे काळ व जे समय” आपल्याला कळवलेले नाहीत त्यावर आपण लक्ष केंद्रित करू नये. (प्रे. कार्ये १:७) यहोवाला कार्य करण्याची योग्य वेळ माहीत आहे यावर आपला भरवसा असला पाहिजे. त्यामुळे हार न मानता आपण नम्रता, विश्वास आणि धीर धरला पाहिजे. तोपर्यंत आपण वेळेचा सदुपयोग करून आपल्या क्षमतांचा होता होईल तितका वापर यहोवाच्या सेवेसाठी केला पाहिजे.—मार्क १३:३५-३७; गलती. ६:९. टेहळणी बुरूज१८.११ १६ ¶१३-१४
गुरुवार, २० फेब्रुवारी
मी कोणत्याही माणसाला दूषित किंवा अशुद्ध म्हणू नये, असं देवाने मला दाखवलं आहे.—प्रे. कार्ये १०:२८.
पेत्रला लहानपणापासूनच शिकवण्यात आलं होतं की परराष्ट्रीय लोक अशुद्ध असतात. पण कर्नेल्यच्या घरी जाण्याची आज्ञा मिळण्याच्या थोड्या वेळाआधीच अशा काही घटना घडल्या ज्यांमुळे पेत्रचं मत बदललं. उदाहरणार्थ, पेत्रला एक दृष्टांत देण्यात आला. (प्रे. कार्ये १०:९-१६) पेत्रप्रमाणे आपणही स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तसंच, आपण आपल्यामध्ये काही अंशी असलेल्या अशा चुकीच्या भावना ओळखण्यासाठी इतरांची मदतदेखील स्वीकारली पाहिजे. यासोबतच, आपण आणखी काय करू शकतो? आपण आपले “मन मोठे केले” असेल, तर आपण भेदभावाची वृत्ती काढून टाकून इतरांबद्दल प्रेम उत्पन्न करू. (२ करिंथ. ६:११-१३) तुम्हाला सहसा तुमच्याच देशाच्या, भागाच्या किंवा भाषेच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडतं का? असं असेल, तर इतरांसोबतही वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या बंधुभगिनींसोबत तुम्ही प्रचारकार्य करू शकता. तसंच, तुम्ही त्यांना तुमच्या घरी जेवायला बोलवू शकता. (प्रे. कार्ये १६:१४, १५) तुम्ही असं करत राहिलात तर एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्या मनातून भेदभावाची भावना पूर्णपणे निघून गेलेली असेल. टेहळणी बुरूज१८.०८ ९ ¶३, ६; १० ¶७
शुक्रवार, २१ फेब्रुवारी
अडखळण बनू नका.—१ करिंथ. १०:३२.
काही साक्षीदारांनी आपल्या वागणुकीतून दाखवलं आहे की ते काही प्रमाणात या जगाचे भाग आहेत. उदाहरणार्थ, काही जण पार्ट्यांमध्ये अशा प्रकारे नाचले व वागले आहेत जे ख्रिश्चनांसाठी अयोग्य आहे. काहींनी तर असे फोटो आणि कमेंट्स सोशल मिडियावर टाकले आहेत ज्यावरून त्यांची शारीरिक विचारसरणी दिसून येते. पण त्यांचा वाईट प्रभाव अशा बंधुभगिनींवर पडू शकतो जे या जगापासून वेगळे राहण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. (१ पेत्र २:११, १२) आपलं लक्ष “शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा” यांवर केंद्रित करण्यासाठी हे जग आपल्याला प्रवृत्त करतं. (१ योहा. २:१६) पण आपण यहोवाचे असल्यामुळे आपण वेगळे आहोत. आपण “देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार” करतो आणि “या जगाच्या व्यवस्थेत समंजसपणे, नीतीने आणि सुभक्तीने जीवन” जगतो. (तीत २:१२) आपल्या संपूर्ण जीवनशैलीवरून म्हणजे आपली बोली, खाणं-पिणं, कपडे आणि काम यांवरून सर्वांना हे स्पष्टपणे दिसून आलं पाहिजे की आपण यहोवाचे आहोत. टेहळणी बुरूज१८.०७ २५ ¶१३-१४
शनिवार, २२ फेब्रुवारी
आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करेपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात.—स्तो. १२३:२.
आपण नेहमी यहोवाकडे पाहत राहिलो तर इतरांच्या चुकांमुळे आपण कधीही मनात कटू भावना येऊ देणार नाही किंवा यहोवासोबतची आपली मैत्री तोडणार नाही. मोशेसारखी आपल्याला जर संघटनेत जबाबदारी मिळाली असेल तर खासकरून तेव्हा याबद्दल खबरदार राहणं खूप गरजेचं आहे. हे खरं आहे की तारण मिळवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकालाच मेहनत करण्याची आणि यहोवाच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे. (फिलिप्पै. २:१२) पण आपल्याला जर संघटनेत जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या असतील, तर यहोवा आपल्याकडून जास्त अपेक्षादेखील करतो हे आपण कधीही विसरू नये. (लूक १२:४८) आपण जर नेहमी यहोवावर विसंबून राहिलो तर मग कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अडखळण बनणार नाही किंवा आपल्याला त्याच्या प्रेमापासून दूर करणार नाही. (स्तो. ११९:१६५; रोम. ८:३७-३९) आज आपण कठीण काळात जगत आहोत. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की “स्वर्गात राजासनारूढ” असलेल्या यहोवा देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. (स्तो. १२३:१) आपण इतरांच्या वागण्याचा परिणाम यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कधीही होऊ देऊ नये. टेहळणी बुरूज१८.०७ १६ ¶१९-२०
रविवार, २३ फेब्रुवारी
तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या, म्हणजे ते . . . [तुमच्या] पित्याचा गौरव करतील.—मत्त. ५:१६.
देवाचे सेवक आपला प्रकाश झळकू देत आहेत, हे पाहून आपल्या सर्वांनाच खूप आनंद होतो. २०१७ मध्ये आपण १ कोटीपेक्षा जास्त बायबल अभ्यास चालवले. तसंच, लाखो आस्थेवाईक लोक स्मारकविधीसाठी उपस्थित राहिले होते. यामुळे त्यांना यहोवाची प्रेमळ तरतूद, खंडणी याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. (१ योहा. ४:९) जगभरात यहोवाचे साक्षीदार अनेक वेगवेगळ्या भाषा बोलतात. पण संघटित जगव्याप्त कुटुंब म्हणून यहोवाची स्तुती करण्यासाठी ही गोष्ट एक अडथळा ठरत नाही. (प्रकटी. ७:९) आपली भाषा कोणतीही असो अथवा आपण कुठेही राहत असू, आपण “जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत” राहू शकतो. (फिलिप्पै. २:१५) आपलं सेवाकार्य, आपलं ख्रिस्ती ऐक्य आणि अंत जवळ असल्याची जाणीव या गोष्टींमुळे यहोवाचा गौरव होतो. टेहळणी बुरूज१८.०६ २१ ¶१-३
सोमवार, २४ फेब्रुवारी
रब्बी, काहीतरी खाऊन घे.—योहा. ४:३१.
येशू त्या स्त्रीला संदेश सांगण्यात इतका गुंतला होता की अन्नाकडे त्याने लक्षच दिलं नाही. देवाची इच्छा पूर्ण करणं त्याच्यासाठी अन्नासारखंच होतं. यात शोमरोनी स्त्रीला प्रचार करण्याचाही समावेश होता. (योहा. ४:३२-३४) याकोब आणि योहान मात्र हा महत्त्वाचा धडा शिकले नाहीत. येशूसोबत इतर शिष्य जेव्हा शोमरोनातून प्रवास करत होते तेव्हा एका गावात थांबण्यासाठी ते जागा शोधू लागले. पण शोमरोनी लोकांनी त्यांना जागा दिली नाही. यामुळे याकोब आणि योहान यांना इतका राग आला की त्या संपूर्ण गावाचा अग्नीने नाश करण्यासाठी येशूने त्यांना आज्ञा करावी असं ते म्हणाले. पण येशूने त्यांची कानउघडणी केली. (लूक ९:५१-५६) याकोब आणि योहान जर गालील प्रांतात असते तर कदाचित त्यांना इतका राग आला नसता, कारण ते त्या प्रांताचेच होते. त्यांच्या मनात शोमरोनी लोकांबद्दल भेदभावाची भावना असल्यामुळे त्यांना खूप राग आला होता. काही काळानंतर जेव्हा योहान शोमरोनात प्रचार करत होता तेव्हा बऱ्याच लोकांनी संदेश ऐकला. हे पाहून त्याला आपल्या आधीच्या वागण्याचा पस्तावा झाला असावा.—प्रे. कार्ये ८:१४, २५. टेहळणी बुरूज१८.०६ १०-११ ¶१२-१३
मंगळवार, २५ फेब्रुवारी
आपल्या कंबरेभोवती सत्याचा पट्टा बांधा आणि . . . स्थिर उभे राहा.—इफिस. ६:१४.
देवाच्या वचनांत दिलेली सत्यं आपल्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे बायबलमध्ये दिलेल्या गोष्टींचं आपण पालन करतो आणि नेहमी खरं बोलतो. खोटं बोलणं हे सैतानाच्या यशस्वी हत्यारांपैकी एक आहे. खोटं बोलणारा आणि खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा या दोघांनाही यामुळे इजा पोहोचते. (योहा. ८:४४) म्हणून आपण अपरिपूर्ण असलो तरी आपण नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (इफिस. ४:२५) पण असं करणं कठीण जाऊ शकतं. १८ वर्षांची अबीगईल म्हणते: “खरं बोलणं कदाचित नेहमीच फायद्याचं वाटणार नाही; खासकरून खोटं बोलल्यामुळे एखाद्या मोठ्या समस्येतून आपली सुटका होणार असेल तेव्हा.” मग आपण खरं का बोललं पाहिजे? २३ वर्षांची व्हिक्टोरिया म्हणते: “जेव्हा तुम्ही खरं बोलता आणि खंबीरपणे आपल्या विश्वासाचं समर्थन करता, तेव्हा कदाचित इतर जण तुम्हाला त्रास देतील. पण खरं बोलल्याने खूप फायदे होतात; म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो, यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ होतो आणि तुमच्यावर प्रेम असलेल्या लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटतो.” म्हणूनच “सत्याचा पट्टा” नेहमी घालणं खूप महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज१८.०५ २८ ¶३, ५
बुधवार, २६ फेब्रुवारी
जागृत राहा.—मत्त. २४:४२.
आज कधी नव्हे इतकं जास्त जागृत राहण्याची आपल्याला गरज आहे. जगाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पण यहोवाने ठरवलेल्या योग्य वेळी अंत नक्की येईल. (मत्त. २४:४२-४४) तोपर्यंत भविष्यात आपल्यासाठी जे राखून ठेवलं आहे, त्यावर आपण धीराने आपलं लक्ष केंद्रित करून ठेवू शकतो. दररोज बायबलचं वाचन करण्यासोबत आपण यहोवाला प्रार्थनाही केली पाहिजे. (१ पेत्र ४:७) त्यासोबतच, यहोवाची अनेक वर्षं सेवा करणाऱ्या बंधुभगिनींकडून आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, बांधवांच्या जीवन कथा वाचणं. यहोवाच्या सेवेत नेहमी व्यस्त राहा. इतरांना दया दाखवून त्यांना मदत करा आणि आपल्या बंधुभगिनींसोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मदत तर होईल पण त्यासोबतच वेळ अगदी भरभर जात आहे असंदेखील तुम्हाला वाटेल. (इफिस. ५:१६) आपल्या हातून बऱ्याच चुका घडत असल्या, तरी यहोवा आपल्याला त्याची सेवा करू देत आहे. त्याने आपल्या मदतीसाठी “माणसांच्या रूपात देणग्या” असणारे मंडळीतले वडील आपल्याला दिले आहेत. (इफिस. ४:८, ११, १२) त्यामुळे जेव्हा वडील तुम्हाला भेट देऊन काही सांगतात, सल्ला देतात तेव्हा त्यातून फायदा मिळवा. टेहळणी बुरूज१८.०६ २४-२५ ¶१५-१८
गुरुवार, २७ फेब्रुवारी
तुम्हीसुद्धा माझ्या आज्ञांचं पालन केल्यास माझ्या प्रेमात टिकून राहाल.—योहा. १५:१०.
येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की “माझ्या प्रेमात टिकून राहा.” येशूने असं का म्हटलं? कारण आपल्या शिष्यांना खरे ख्रिस्ती या नात्याने जीवन जगताना धीराची गरज भासेल हे येशूला माहीत होतं. योहान १५:४-१० या वचनांमध्ये येशूने ‘टिकून राहा,’ ‘ऐक्यात राहा’ आणि अशा अर्थाचे इतर शब्द बऱ्याच वेळा वापरले. याचं मुख्य कारण म्हणजे येशूला त्यांना शिकवायचं होतं की त्यांनी धीर उत्पन्न करण्याची गरज आहे. आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमात टिकून राहायचं आहे आणि त्याची पसंती मिळवायची आहे हे आपण कसं दाखवू शकतो? त्याच्या आज्ञांचं नेहमी पालन करण्याद्वारे. येशूने म्हटलं: “मी पित्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या प्रेमात टिकून राहिलो.” त्यामुळे त्याने स्वतः जे केलं तेच करण्याची अपेक्षा तो आपल्याकडूनही करतो. खरंच येशूने आपल्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे! (योहा. १३:१५) येशूने दिलेली आज्ञा खरंतर यहोवाकडून येते, त्यामुळे आपण जेव्हा येशूने दिलेली प्रचार करण्याची आज्ञा पाळतो, तेव्हा आपण यहोवावरही प्रेम करत असतो. (मत्त. १७:५; योहा. ८:२८) आपण आज्ञा पाळून यहोवावर आणि येशूवर असलेलं आपलं प्रेम दाखवतो, तेव्हा तेही आपल्याला त्यांच्या प्रेमात टिकून राहायला मदत करतात. टेहळणी बुरूज१८.०५ १८ ¶५-७
शुक्रवार, २८ फेब्रुवारी
उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात.—नीति. २१:५.
तरुण वयात तुम्हाला बरेच निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही कोणतं शिक्षण घ्याल, कशा प्रकारची नोकरी कराल आणि अशा इतर गोष्टींबद्दल तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. तुमची ध्येयं काय आहेत हे जर तुम्ही आधीच ठरवलं, तर मग तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. तुम्ही जीवनात जितकं लवकर ध्येयं ठेवाल, तितकं लवकर तुम्हाला यश मिळेल. या बाबतीत जगभरातील हजारो तरुण बंधुभगिनी खूप चांगलं उदाहरण मांडत आहेत आणि यासाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. यहोवासोबतची मैत्री आणि आध्यात्मिक ध्येयं यांना त्यांच्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व आहे. हे तरुण जीवनाचा आनंद तर घेतातच, पण यासोबतच ते प्रत्येक गोष्टीत, म्हणजे कुटुंबातही यहोवाच्या इच्छेनुसार निर्णय घ्यायला शिकत आहेत. शलमोनने म्हटलं: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव.” त्याने पुढे म्हटलं: “तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीति. ३:५, ६) तरुणांनो यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे! तुम्ही त्याच्या नजरेत खूप मौल्यवान आहात. म्हणून तो तुमचं रक्षण करेल, तुम्हाला मार्गदर्शन देईल आणि आशीर्वाद देईल. टेहळणी बुरूज१८.०४ २६ ¶७; २७ ¶९
शनिवार, २९ फेब्रुवारी
एकमेकांवर प्रेम करा; जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.—योहा. १३:३४.
प्रेषित योहानने सुरुवातीच्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेतला. त्याने येशूच्या सेवाकार्याचा एक रोमांचक अहवाल लिहिला. यालाच आपण योहानचं शुभवर्तमान असं म्हणतो. या पुस्तकाने मागील दोन हजार वर्षांपासून ख्रिश्चनांना प्रोत्साहन दिलं आहे आणि आजही ते तितकंच प्रोत्साहनदायक आहे. उदाहरणार्थ, प्रेम या गुणावरून इतर लोक ओळखतील की आपण येशूचे शिष्य आहोत, हे शब्द फक्त योहानच्या पुस्तकातच आपल्याला वाचायला मिळतात. (योहा. १३:३५) योहानने लिहिलेल्या तीन पत्रांतूनही आपल्याला मौल्यवान सत्यं शिकायला मिळतात. आपल्या हातून होणाऱ्या चुकांमुळे आपण जेव्हा निराश होतो, तेव्हा येशूचं खंडणी बलिदान “आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते,” हे वाचून आपल्याला सांत्वन मिळतं. (१ योहा. १:७) तरीही आपल्याला दोषी वाटत असेल तर “देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे” हे वाचून आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं. (१ योहा. ३:२०) “देव प्रेम आहे” हे शब्द आपल्याला योहानच्या पत्रातच वाचायला मिळतात. (१ योहा. ४:८, १६) त्याने त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पत्रांत “सत्याच्या मार्गावर चालत” राहणाऱ्या ख्रिश्चनांची प्रशंसा केली.—२ योहा. ४; ३ योहा. ३, ४. टेहळणी बुरूज१८.०४ १८ ¶१४-१५