मार्च
रविवार, १ मार्च
तू सर्वांवर प्रभुत्व करतोस.—१ इति. २९:१२.
उत्पत्ती पुस्तकाच्या १ आणि २ अध्यायांमध्ये आदाम आणि हव्वाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आपल्याला कळतं. त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्याजवळ होत्या, त्यांना कशाचीही भीती नव्हती आणि कोणीही त्यांच्यावर अन्याय करू शकत नव्हतं. त्यांना अन्नाची, कामाची, आजारांची किंवा मृत्यूची चिंता करण्याची काहीच गरज नव्हती. (उत्प. १:२७-२९; २:८, ९, १५) फक्त यहोवा देवाजवळच मर्यादा नसलेलं म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्य आहे ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. असं का? कारण यहोवानेच सर्व गोष्टींची रचना केली आणि तोच या विश्वाचा सर्वसमर्थ शासक आहे. (१ तीम. १:१७; प्रकटी. ४:११) यहोवाला सोडून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक सृष्टीला काही मर्यादा आहेत. यालाच आपण मर्यादित स्वातंत्र्य असं म्हणू शकतो. एखादी मर्यादा रास्त, आवश्यक आणि वाजवी आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त यहोवा देवालाच आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनी लक्षात घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. सुरुवातीपासूनच यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींना काही मर्यादा घालून दिल्या होत्या. टेहळणी बुरूज१८.०४ ४ ¶४, ६
सोमवार, २ मार्च
जो सुवार्ता सांगतो . . . त्याचे पाय . . . किती मनोरम दिसतात.—यश. ५२:७.
आजच्या जगात आपण तग धरून राहू शकतो कारण यहोवा आपल्याला मदत करतो. (२ करिंथ. ४:७, ८) पण अशा लोकांचा विचार करा ज्यांचा यहोवासोबत जवळचा नातेसंबंध नाही. यहोवाच्या मदतीशिवाय या जगात जीवन जगणं त्यांच्यासाठी किती कठीण असेल. येशूसारखंच आपल्यालाही अशा लोकांना पाहून कळवळा येतो आणि त्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी आपण प्रेरीत होतो. म्हणून तुम्ही ज्यांना बायबलबद्दल शिकवता त्यांच्याशी धीराने वागा. लक्षात असू द्या की ज्या बायबलच्या शिकवणी आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत, त्यांपैकी काहींबद्दल इतरांनी कधी ऐकलं किंवा विचारसुद्धा केला नसेल. आणि बऱ्याच लोकांना त्यांच्या धार्मिक शिकवणी खूप प्रिय असतात. त्यांना कदाचित वाटू शकतं की त्यांच्या धर्मामुळेच त्यांचं कुटुंब, संस्कृती आणि समाज यात एकता आहे. लोकांना त्यांच्या मनाला प्रिय असलेल्या “जुन्या” शिकवणी सोडायला सांगण्याआधी, आपण “नवीन” सत्यांबद्दल त्यांच्या मनात कदर उत्पन्न करणं खूप गरजेचं आहे. ही नवीन सत्यं म्हणजे लोकांना माहीत नसलेल्या बायबलच्या शिकवणी. असं केल्यानंतरच लोक आपले जुने विचार बदलू शकतील. अशा प्रकारचे बदल करायला वेळ देणं गरजेचं असतं.—रोम. १२:२. टेहळणी बुरूज१९.०३ २३ ¶१०, १२; २४ ¶१३
मंगळवार, ३ मार्च
तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.—मार्क १:११.
आपल्या शब्दांतून प्रेम आणि पसंती दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाकडून शिकू शकतो. आपणदेखील इतरांना प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत. (योहा. ५:२०) आपली काळजी करणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रेम दाखवते आणि आपल्या चांगल्या कार्यांबद्दल प्रशंसा करते तेव्हा आपल्याला खूप उत्तेजन मिळतं. याच प्रकारे, आपल्या मंडळीतील बंधुभगिनींना आणि कुटुंबातील सदस्यांना आपल्या प्रेमाची आणि प्रोत्साहनाची गरज आहे. इतरांना प्रोत्साहन देण्याद्वारे आपण त्यांचा विश्वास मजबूत करतो आणि यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करत राहण्यासाठी त्यांना मदत करतो. खासकरून पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देत राहण्याची गरज आहे. पालक जेव्हा आपल्या मुलांची मनापासून प्रशंसा करतात आणि त्यांना प्रेम दाखवतात, तेव्हा मुलांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी मदत मिळते. “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” या शब्दांवरून आपल्याला कळतं की येशू शेवटपर्यंत विश्वासूपणे आपली इच्छा पूर्ण करेल या गोष्टीवर यहोवाला पूर्ण भरवसा होता. जर यहोवाला त्याच्यावर इतका भरवसा होता, तर मग आपल्यालाही त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवण्याची गरज आहे, की तो यहोवाने दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण करेल. (२ करिंथ. १:२०) येशूच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे, त्याच्याबद्दल आणखी शिकण्यासाठी आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते.—१ पेत्र २:२१. टेहळणी बुरूज१९.०३ ८ ¶३; ९ ¶५-६
बुधवार, ४ मार्च
कारण पवित्र आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूद्वारे जीवन देतो, त्याने तुम्हाला पापाच्या व मृत्यूच्या नियमातून स्वतंत्र केले आहे.—रोम. ८:२.
आपल्याला जर कोणी खूप मौल्यवान भेटवस्तू दिली तर आपण त्या व्यक्तीबद्दल खूप कदर बाळगू. पण यहोवाने दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल इस्राएली लोकांच्या मनात जराही कदर नव्हती. यहोवाने इजिप्तमधून त्यांना बाहेर आणलं त्याच्या काही महिन्यांतच ते लोक इजिप्तमध्ये मिळणाऱ्या अन्नाबद्दल सारखं बोलू लागले. यहोवा त्यांना देत असलेल्या मान्नाबद्दल ते कुरकुर करू लागले. आपण इजिप्तला परत जाऊ असंदेखील ते म्हणू लागले. यहोवाने त्यांना त्याची उपासना करण्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्यापेक्षा, इजिप्तमधील ‘मासे, काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण’ त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. यामुळेच यहोवाचा क्रोध या लोकांवर भडकला. (गण. ११:५, ६, १०; १४:३, ४) आपण यातून एक महत्त्वाचा धडा शिकतो. यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल आपण कदर बाळगायचं कधीही सोडू नये असा आर्जव पौलने केला.—२ करिंथ. ६:१. टेहळणी बुरूज१८.०४ ९-१० ¶६-७
गुरुवार, ५ मार्च
त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.—स्तो. ३३:५.
आपल्या सर्वांनाच वाटतं की इतरांनी आपल्यावर प्रेम करावं. तसंच, आपल्यासोबत कधीही अन्याय होऊ नये असंदेखील सर्वांना वाटतं. पण जर आपल्यासोबत वारंवार अन्याय झाला आणि इतरांनी आपल्यावर प्रेम केलं नाही, तर आपल्यात कमीपणाची भावना येऊ शकते आणि आपण खचून जाऊ शकतो. आपण प्रेमासाठी आसुसलेले आहोत आणि न्याय मिळवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत हे यहोवाला माहीत आहे. (स्तो. ३३:५) आपण खात्री बाळगू शकतो की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्याला चांगली वागणूक मिळावी अशी त्याची इच्छा आहे. ही गोष्ट यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र दिलं त्याचं परीक्षण केल्यामुळे स्पष्ट होते. मोशेच्या नियमशास्त्राचं परीक्षण केल्यामुळे, यहोवा देवाच्या लोकांप्रती असलेल्या प्रेमळ भावना समजून घ्यायला आपल्याला मदत होते. (रोम. १३:८-१०) यहोवा जे काही करतो त्याचा आधार प्रेम असतं, त्यामुळे आपण म्हणू शकतो की नियमशास्त्र प्रेमावर आधारलेलं होतं. (१ योहा. ४:८) यहोवाने दिलेलं संपूर्ण नियमशास्त्र दोन मूलभूत आज्ञांवर आधारलेलं होतं, त्या म्हणजे देवावर प्रेम करणं आणि शेजाऱ्यावर प्रेम करणं. (लेवी. १९:१८; अनु. ६:५; मत्त. २२:३६-४०) नियमशास्त्रात जे ६०० पेक्षा जास्त नियम देण्यात आले होते त्यातील प्रत्येक नियमातून यहोवाच्या प्रेमाचा एक पैलू आपल्याला दिसून येतो. टेहळणी बुरूज१९.०२ २०-२१ ¶१-४
शुक्रवार, ६ मार्च
जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.—मत्त. ६:२१.
स्त्रियांसोबत आपला व्यवहार कसा असावा याबाबतीत ईयोब खूप काळजीपूर्वक वागला. (ईयो. ३१:१) त्याला जाणीव होती, की दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणं चुकीचं आहे. आज आपण अशा जगात राहत आहोत ज्यात आपल्यावर रोजच लैंगिक अनैतिकतेचा दबाव टाकला जातो. ईयोबप्रमाणेच आपणही दुसऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला वाईट नजरेने पाहण्याचं टाळू का? आपण असभ्य किंवा अश्लील चित्रं पाहण्याचं टाळू का, मग ते कोणत्याही माध्यमाद्वारे आपल्यासमोर आले तरीही? (मत्त. ५:२८) आपण जर रोज आत्मसंयम बाळगला तर खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होऊ शकतो. भौतिक गोष्टींबाबत आपण कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे याबद्दलही ईयोबने यहोवाची आज्ञा पाळली. भौतिक गोष्टींवर भरवसा ठेवणं हे शिक्षेस पात्र असलेल्या गंभीर पापासारखं आहे ही गोष्ट ईयोबला समजली. (ईयो. ३१:२४, २५, २८) आज आपण अशा जगात राहत आहोत ज्यात जास्त करून लोक भौतिक गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण आपण पैसा आणि भौतिक गोष्टी यांबद्दल संतुलित दृष्टिकोन ठेवला, तर बायबलच्या सल्ल्यानुसार खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आपण पक्का करू शकतो.—नीति. ३०:८, ९; मत्त. ६:१९, २०. टेहळणी बुरूज१९.०२ ६ ¶१३-१४
शनिवार, ७ मार्च
पित्याने माझ्यावर प्रेम केलं, तसंच मीही तुमच्यावर प्रेम केलं आहे.—योहा. १५:९.
यहोवाचं आपल्या सर्वांवर मनापासून प्रेम आहे आणि येशू ख्रिस्ताने आपल्या कार्यांतून ते प्रेम दाखवलं. (१ योहा. ४:८-१०) सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येशूने आपल्या सर्वांसाठी आपलं जीवन दिलं. आपला समावेश अभिषिक्तांमध्ये होत असो किंवा दुसऱ्या मेंढरांमध्ये, यहोवा आणि येशू यांनी खंडणीद्वारे दाखवलेल्या प्रेमाचा फायदा आपल्या सर्वांनाच होतो. (योहा. १०:१६; १ योहा. २:२) तसंच, सांजभोजनामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात, त्यावरून येशूचं प्रेम आणि शिष्यांबद्दलची काळजी दिसून येते. कशा प्रकारे? येशूने सांजभोजनात बऱ्याच गोष्टींचा समावेश केला नाही, तर ते भोजन साधं ठेवून त्याने आपल्या अभिषिक्त बांधवांसाठी प्रेम दाखवलं. अभिषिक्त बंधुभगिनींना दर वर्षी स्मारकविधी पाळायचा होता, मग ते तुरुंगात किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरीही. (प्रकटी. २:१०) येशूची आज्ञा पाळणं त्यांना शक्य झालं का? हो, त्यांनी येशूची आज्ञा पाळली. पहिल्या शतकापासून ते आजपर्यंत खऱ्या ख्रिश्चनांनी स्मारकविधी पाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. टेहळणी बुरूज१९.०१ २४ ¶१३-१५
रविवार, ८ मार्च
तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.—योहा. ८:३२.
आपण खोटा धर्म, अजाणपणा आणि अंधविश्वास यांपासून मुक्त झालो आहोत. आणि यासाठी आपण यहोवाचे खरंच खूप आभारी आहोत. भविष्यात “देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य” मिळण्याची आपण वाट पाहत आहोत. (रोम. ८:२१) ख्रिस्ती शिकवणींचं पालन केल्याने तुम्ही आजही या स्वातंत्र्याचा काही प्रमाणात आनंद लुटू शकता. (योहा. ८:३१) यामुळे तुम्हाला सत्य फक्त जाणून घेतल्यानेच नाही तर त्यांनुसार जगल्यानेही ‘ते समजेल.’ या जुन्या व्यवस्थेत लोक ज्याला चांगलं जीवन म्हणतात ते कमी काळाचंच आहे. उद्या काय होणार हे कोणत्याही मानवाला माहीत नाही. (याको. ४:१३, १४) त्यामुळे असा मार्ग निवडा ज्यामुळे तुम्हाला “खरे जीवन” म्हणजे अनंतकाळाचं जीवन मिळेल. (१ तीम. ६:१९) यहोवा कोणालाही त्याची सेवा करण्याची बळजबरी करत नाही. हा निर्णय त्याने सर्वस्व प्रत्येकावर सोपवला आहे. तेव्हा, यहोवाला आपला “वाटा” बनवा. (स्तो. १६:५) आणि त्याने दिलेल्या सर्व ‘उत्तम पदार्थांची’ कदर बाळगा. (स्तो. १०३:५) आणि असा पक्का विश्वास असू द्या की तो तुम्हाला “पूर्णानंद” आणि नेहमी “सौख्ये” देईल!—स्तो. १६:११. टेहळणी बुरूज१८.१२ २८ ¶१९, २१
सोमवार, ९ मार्च
पतीनेही आपल्या पत्नीला सोडू नये.—१ करिंथ. ७:११.
यहोवा आणि येशू यांच्यासारखंच सर्व ख्रिश्चनांनी विवाहाचा आदर केला पाहिजे. पण आपण सर्व अपरिपूर्ण असल्यामुळे काही जणांना हे करणं कधीकधी कठीण जाऊ शकतं. (रोम. ७:१८-२३) यामुळेच आपण जेव्हा पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती जोडप्यांच्या विवाहात असलेल्या गंभीर समस्यांबद्दल वाचतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य होत नाही. पौलने सल्ला दिला की “पत्नीने आपल्या पतीपासून वेगळे होऊ नये.” पण काही लोकांना हा सल्ला पाळणं जमलं नाही. (१ करिंथ. ७:१०) पहिल्या शतकातील ही जोडपी कोणत्या कारणांमुळे विभक्त झाली हे पौलने सांगितलं नाही. पण आपल्याला हे माहीत आहे की याचं कारण अनैतिक लैंगिक कृत्य नव्हतं. कारण जर असं असतं तर त्या स्त्रीजवळ घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करण्याचं शास्त्रीय कारण असतं. पौलने म्हटलं की जर एक पत्नी आपल्या पतीपासून विभक्त होत असेल, तर “तिने एकतर अविवाहित राहावे, किंवा मग आपल्या पतीसोबत समेट करावा.” याचा अर्थ यहोवाच्या नजरेत ते अजूनही पती-पत्नी होते. पौलने म्हटलं की जर जोडप्यांमध्ये काही मतभेद किंवा समस्या असल्या आणि त्याचं कारण अनैतिक लैंगिक कृत्य नसलं, तर त्यांचा उद्देश समेट करण्याचा असला पाहिजे. म्हणजेच त्या समस्या आणि मतभेद सोडवून त्यांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज अशी जोडपी मंडळीतील वडिलांची मदत घेऊ शकतात. टेहळणी बुरूज१८.१२ १३ ¶१४-१५
मंगळवार, १० मार्च
आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.—मत्त. ६:३३.
यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्यासोबत मैत्री करावी आणि आनंदाची बातमी सांगण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत. (मत्त. २८:१९, २०; याको. ४:८) पण काही लोक आपल्याला निराश करण्याचा प्रयत्न करू शकतात. पेत्रसारखेच त्यांचे हेतू कदाचित चांगले असतील. उदाहरणार्थ, कदाचित तुमचा बॉस तुम्हाला पगार वाढवून देत असेल, पण यामुळे तुम्हाला कामात जास्त वेळ द्यावा लागेल. मग तुम्हाला सभांसाठी किंवा मंडळीसोबत प्रचारासाठी वेळ मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? किंवा कदाचित शाळेत तुमचे शिक्षक तुम्हाला आणखी जास्त शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याचं उत्तेजन देतील. असं झालं तर निर्णय घेण्याआधी तुम्ही प्रार्थनापूर्वक यावर विचार केला पाहिजे. तुम्ही याबद्दल संशोधन केलं पाहिजे आणि इतरांसोबत याविषयावर बोललं पाहिजे. तुम्ही आताच या गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन जाणून घेतला आणि त्याच्यासारखा विचार करायला शिकलात तर ते तुमच्या फायद्याचं ठरेल. असं केल्यामुळे भविष्यात तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली तर तुम्ही त्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. अशा परिस्थितीत काय करायचं हे आधीच ठरवल्यामुळे तुम्ही यहोवाच्या सेवेवर आपलं लक्ष केंद्रित करू शकाल. टेहळणी बुरूज१८.११ २७ ¶१८
बुधवार, ११ मार्च
सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.—नीति. ४:२३.
शलमोन तरुण असताना इस्राएलचा राजा बनला. राजा बनल्याच्या काही काळानंतर यहोवाने त्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हटलं: “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.” शलमोनने उत्तर दिलं: “मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही . . . यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त [आज्ञाधारक हृदय, NW] दे.” (१ राजे ३:५-१०) ‘आज्ञाधारक हृदय’ देण्याच्या या मागणीवरून शलमोनने दाखवून दिलं की त्याला आपल्या कमतरतांची जाणीव होती. आणि यामुळेच यहोवाचं शलमोनवर प्रेम होतं. (२ शमु. १२:२४) या तरुण राजाचं उत्तर ऐकून देवाचं मन इतकं आनंदित झालं की त्याने शलमोनला “बुद्धिमान व विवेकी चित्त” दिलं. (१ राजे ३:१२) शलमोन यहोवाला विश्वासू राहिला तोपर्यंत त्याला भरपूर आशीर्वाद मिळाले. त्याला इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी मंदिर बांधण्याचा बहुमान मिळाला. (१ राजे ८:२०) देवाने दिलेल्या बुद्धीमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. तसंच, त्याने देवाच्या प्रेरणेने लिहिले शब्द बायबलच्या तीन पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत. त्यांपैकी एक पुस्तक म्हणजे नीतिसूत्रे. टेहळणी बुरूज१९.०१ १४ ¶१-२
गुरुवार, १२ मार्च
या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.—रोम. १२:२.
आपल्या विचारसरणीवर कोणाचाच प्रभाव पडू नये अशी काही लोकांची इच्छा असते. ते म्हणतात: “माझे निर्णय मीच घेतो.” त्यांना कदाचित म्हणायचं असतं की त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात आणि तसं करण्याचा त्यांना हक्क आहे. इतर कोणाचं त्यांच्यावर नियंत्रण असलेलं त्यांना आवडत नाही किंवा त्यांना आपला वेगळेपणा टिकवून ठेवायचा असतो. आपल्याला हे जाणून दिलासा मिळतो की यहोवाची विचारसरणी स्वीकारल्यावरही आपले वैयक्तिक विचार किंवा मतं असू शकतात. २ करिंथकर ३:१७ म्हणतं: “जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.” आपल्याला कशा प्रकारची व्यक्ती बनायचं आहे हे निवडण्याचं स्वातंत्र्य यहोवा आपल्याला देतो. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी असू शकतात. यहोवाने आपली रचनाही त्याच प्रकारे केली आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपल्याला अमर्यादित स्वातंत्र्य आहे. (१ पेत्र २:१६) पण बरोबर काय आणि चूक काय हे ठरवताना मात्र आपण यहोवाचं वचन मार्गदर्शक म्हणून वापरावं अशी त्याची इच्छा आहे. टेहळणी बुरूज१८.११ १९ ¶५-६
शुक्रवार, १३ मार्च
देमासला सध्याच्या जगाच्या व्यवस्थेची ओढ असल्यामुळे तो मला सोडून . . . गेला आहे.—२ तीम. ४:१०.
आपण सत्य शिकलो तेव्हा आपल्याला जाणीव झाली की यहोवाची सेवा करणं हे भौतिक गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. यामुळे आपण भौतिक गोष्टींचा त्याग करायलाही तयार होतो. पण काही काळानंतर इतरांना नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना पाहून किंवा इतर गोष्टींचा आनंद घेताना पाहून कदाचित आपल्याला त्यांचा हेवा वाटू शकतो. आपल्यालाही या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं कदाचित आपल्या मनात येऊ शकतं. यामुळे आपल्याजवळ जे आहे त्यात आपण समाधानी राहणार नाही आणि म्हणून यहोवाच्या सेवेपेक्षा भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी आपण खटपट करू लागू. पहिल्या शतकातील देमासच्या बाबतीतही हेच घडलं. त्याला “सध्याच्या जगाच्या व्यवस्थेची ओढ” लागली. त्याची इच्छा इतकी बळावली की त्याने प्रेषित पौलसोबत सेवा करण्याची नेमणूक सोडून दिली. देमासचं कदाचित यहोवाच्या सेवेपेक्षा भौतिक गोष्टींवर जास्त प्रेम होतं. किंवा, कदाचित त्याला पौलसोबत सेवा करण्यासाठी त्याग करण्याची इच्छा नव्हती. आपण त्याच्या उदाहरणातून कोणता धडा शिकतो? सत्यात येण्याआधी कदाचित आपलं भौतिक गोष्टींवर खूप प्रेम असेल. आज आपण सावध नसलो, तर ते प्रेम परत आपल्या मनात वाढू शकतं आणि यामुळे कालांतराने सत्याप्रती आपलं प्रेम नाहीसं होईल. टेहळणी बुरूज१८.११ १० ¶९
शनिवार, १४ मार्च
तुम्ही खरोखर मरणार नाही.—उत्प. ३:४.
सैतानाची खोटं बोलण्यामागची भावना नुकसान पोहोचवण्याची होती. त्याला माहीत होतं की जर हव्वाने ते फळ खाल्लं तर तिचा मृत्यू होईल आणि तेच झालं. हव्वाने आणि मग आदामने यहोवाची आज्ञा मोडली आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला. (उत्प. ३:६; ५:५) आदामने केलेल्या पापाचा वाईट परिणाम असा झाला की “मरण सर्व माणसांमध्ये पसरले.” खरंतर “ज्यांनी आदामच्या अपराधाप्रमाणे पाप केले नव्हते, अशांवरही मरणाने राजा म्हणून राज्य केले.” (रोम. ५:१२, १४) त्यामुळेच आज आपण अपरिपूर्ण आहोत आणि देवाच्या इच्छेनुसार नेहमीसाठी जगत नाही. याउलट आपलं “आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे” असतं, आणि तेदेखील “कष्टमय व दु:खमय” असतं. (स्तो. ९०:१०) सैतान जे खोटं बोलला त्यामुळे या सर्व गोष्टी घडल्या. येशूने सैतानाबद्दल असं म्हटलं: “तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.” (योहान ८:४४) सैतान आजदेखील बदललेला नाही. तो खोटं बोलून आजही “सबंध पृथ्वीवरील लोकांना” फसवत आहे. (प्रकटी. १२:९) पण सैतानाच्या फसवणुकीला बळी पडावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. टेहळणी बुरूज१८.१० ६-७ ¶१-४
रविवार, १५ मार्च
जे शांती राखण्याचा प्रयत्न करतात ते सुखी आहेत, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हटलं जाईल.—मत्त. ५:९.
इतरांसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी जेव्हा आपण पुढाकार घेतो तेव्हा आपण आनंदी राहू शकतो. याकोबने म्हटलं: “नीतिमत्त्वाचे बी शांतिपूर्ण परिस्थितीत पेरले जाते आणि शांतीसाठी झटणाऱ्यांना त्याचे फळ मिळते.” (याको. ३:१८) यामुळे जर मंडळीतल्या किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसोबत जुळवून घ्यायला तुम्हाला कठीण जात असेल, तर यहोवाला कळकळून प्रार्थना करा आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी मदत मागा. यहोवा तुम्हाला पवित्र आत्मा देईल. यामुळे तुम्ही ख्रिस्ती गुण दाखवू शकाल आणि तुम्ही आनंदी व्हाल. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल येशूने म्हटलं: “तर मग, तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना, तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.”—मत्त. ५:२३, २४. टेहळणी बुरूज१८.०९ २१ ¶१७
सोमवार, १६ मार्च
मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा; जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.—योहा. १३:३४.
येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री शिष्यांसोबत असताना जवळजवळ ३० वेळा प्रेम या गुणाचा उल्लेख केला. त्याने शिष्यांना सांगितलं की त्यांनी “एकमेकांवर प्रेम करावं.” (योहा. १५:१२, १७) शिष्यांमध्ये असलेलं प्रेम इतकं उल्लेखनीय असणार होतं की इतरांना ते स्पष्टपणे दिसून आलं असतं. तसंच, या प्रेमावरूनच लोक शिष्यांना ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणून ओळखणार होते. (योहा. १३:३५) येशूने ज्या प्रेमाचा उल्लेख केला ते फक्त भावनांवर आधारित नाही. तर त्यात आत्मत्यागाचा समावेश आहे. येशूने म्हटलं: “कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही केलं, तर तुम्ही माझे मित्र ठराल.” (योहा. १५:१३, १४) आज यहोवाच्या लोकांना त्यांच्यात असलेल्या निःस्वार्थ व आत्मत्यागी प्रेमासाठी आणि कायम टिकणाऱ्या एकतेसाठी ओळखलं जातं. (१ योहा. ३:१०, ११) जगभरात असलेले यहोवाचे सेवक एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. मग ते कोणत्याही राष्ट्राचे, वर्णाचे, कोणतीही भाषा बोलणारे, किंवा कोणत्याही संस्कृतीचे असले तरीही. टेहळणी बुरूज१८.०९ १२ ¶१-२
मंगळवार, १७ मार्च
जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्वास नाकारला आहे, आणि विश्वास नसलेल्या मनुष्यापेक्षाही तो वाईट आहे.—१ तीम. ५:८.
आपण कुटुंबाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो. जसं की, तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसा कमवावा लागत असेल. पुष्कळ स्त्रियांना आपल्या तान्ह्या मुलांची देखभाल करता यावी म्हणून घरी राहावं लागत असेल. तसंच, काही जणांवर आपल्या आजारी पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी असेल. आणि या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. जर तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्हाला यहोवाची जास्त सेवा करण्याची इच्छा असूनही तुम्हाला ती करता येत नसेल तर निराश होऊ नका. कारण जेव्हा आपण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतो तेव्हा यहोवाचं मन आनंदित होतं. (१ करिंथ. १०:३१) तुमच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी नसल्यास तुम्ही आजारी, वृद्ध किंवा इतर काही गरज असलेल्या बंधुभगिनींना मदत करण्यात हातभार लावू शकता का? किंवा त्यांची काळजी घेणाऱ्यांना तुम्ही मदत करू शकता का? तुमच्या मंडळीत एखाद्याला अशा मदतीची गरज आहे का? असं करण्याद्वारे तुम्ही जणू एखाद्याच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी यहोवासोबत काम करत असता.—१ करिंथ. १०:२४. टेहळणी बुरूज१८.०८ २४ ¶३, ५
बुधवार, १८ मार्च
देव त्याच्यासोबत होता; त्याने त्याच्या सर्व संकटांतून त्याची सुटका केली.—प्रे. कार्ये ७:९, १०.
योसेफच्या उदाहरणाचा विचार करा. सर्व मुलांमध्ये तो याकोबचा लाडका होता. यामुळे त्याची भावंडं त्याच्यावर जळायची. योसेफ १७ वर्षांचा असताना त्यांनी त्याला दास म्हणून विकलं. (उत्प. ३७:२-४, २३-२८) मग जवळपास १३ वर्षं मिसर देशात त्याला एक दास आणि नंतर एक कैदी म्हणून खूप त्रास सहन करावा लागला. योसेफचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं पण तो त्यांच्यापासून फार दूर होता. अशा बदललेल्या परिस्थितीत त्याला राग येऊ शकला असता आणि आशाहीन वाटू शकलं असतं. पण असं झालं नाही. मग कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत मिळाली? तुरुंगात त्रास सहन करत असताना यहोवा आपली कशी मदत करत आहे यावर योसेफने नक्कीच लक्ष केंद्रित केलं असेल. (उत्प. ३९:२१; स्तो. १०५:१७-१९) लहान असताना त्याला जी भविष्यसूचक स्वप्नं पडली होती त्यांचाही कदाचित त्याने विचार केला असेल. यामुळे त्याला आश्वासन मिळालं की यहोवा त्याच्यासोबत आहे. (उत्प. ३७:५-११) त्याने अनेकदा प्रार्थना करून यहोवाला आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या असतील. (स्तो. १४५:१८) काहीही झालं तरी “देव त्याच्यासोबत” राहील असा भरवसा देवाकडून त्याला मिळाला. अशा प्रकारे यहोवाने योसेफच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. टेहळणी बुरूज१८.१० २८ ¶३-४
गुरुवार, १९ मार्च
गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.—नीति. १४:२०.
भौतिक संपत्ती ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे इतरांबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर प्रभाव होऊ शकतो. पण एखाद्याकडे किती पैसा आहे हे पाहून नकळतपणे त्यांच्याबद्दल मत बनवण्याची चूक आपल्याकडून कशी घडू शकते? आजच्या वचनात असलेलं कटू सत्य लिहिण्याची प्रेरणा शलमोनला मिळाली. या वचनातून आपल्याला काय कळतं? आपण सावध नसलो, तर आपण फक्त श्रीमंत बांधवांसोबतच मैत्री करण्याची चूक करू शकतो. इतरांकडे किती संपत्ती आहे या आधारावर त्यांच्याबद्दल मत बनवणं घातक का ठरू शकतं? कारण आपले बांधव श्रीमंत आहेत की गरीब या आधारावर आपण त्यांच्याबद्दल मत बनवलं तर यामुळे मंडळीत फूट पडू शकते. पहिल्या शतकातील काही मंडळ्यांमध्ये हेच घडलं. त्यामुळे याकोबने मंडळ्यांना याबद्दल सतर्क केलं. (याको. २:१-४) मंडळीमध्ये अशा प्रकारची फूट निर्माण होऊ नये यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत आणि इतरांकडे ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या आधारावर त्यांच्याबद्दल मत बनवण्याचं टाळलं पाहिजे. टेहळणी बुरूज१८.०८ १० ¶८-१०
शुक्रवार, २० मार्च
एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा.—१ पेत्र ४:८.
आपण ज्या प्रकारे आपल्या बंधुभगिनींशी वागतो त्यावरून आपण दाखवतो की आपल्याला यहोवासोबत असलेल्या आपल्या नात्याची कदर आहे. आपण जसे यहोवाचे आहोत तसे आपले बंधुभगिनीही यहोवाचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि दयेने वागू. (१ थेस्सलनी. ५:१५) हे किती महत्त्वाचं आहे? येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) आपले सेवक एकमेकांशी कसं वागतात याकडे यहोवा लक्ष देतो असं मलाखी सांगतो. (मला. ३:१६) “जे आपले आहेत त्यांना यहोवा ओळखतो.” (२ तीम. २:१९) आपण जे करतो व बोलतो ते सर्वकाही यहोवाला माहीत आहे. (इब्री ४:१३) आपण आपल्या बंधुभगिनींशी दयेने वागलो नाही तर ते यहोवा पाहतो. पण आपण जेव्हा पाहुणचार, उदारता, क्षमाशीलता आणि दयाळूपणा दाखवतो तेव्हा यहोवा याकडेही लक्ष देतो याची आपण खातरी बाळगू शकतो.—इब्री १३:१६. टेहळणी बुरूज१८.०७ २६ ¶१५, १७
शनिवार, २१ मार्च
आपला देव [यहोवा] . . . त्याला धरून राहा.—अनु. १०:२०.
यहोवाचा पक्ष घेणं सुज्ञतेचं आहे, कारण त्याच्यासारखा शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेमळ दुसरा कोणीच नाही! आपली नेहमी हीच इच्छा असते, की आपण त्याला एकनिष्ठ राहावं व त्याचा पक्ष घ्यावा. (स्तो. ९६:४-६) पण इतर असे काही देवाचे उपासक होते जे त्याचा पक्ष घेण्यात अपयशी ठरले. काइनच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने खोट्या दैवतांची उपासना केली नाही, पण तरीही यहोवाने त्याची उपासना स्वीकारली नाही. का? कारण त्याच्या मनातली दुष्ट प्रवृत्ती यहोवाने पाहिली होती. (१ योहा. ३:१२) त्यामुळे यहोवाने त्याला इशारा दिला होता: “जर तू बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? आणि तू बरे करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे; आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल; परंतु तू त्यावर अधिकार कर.” (उत्प. ४:६, ७, पं.र.भा.) दुसऱ्या शब्दात यहोवा काइनला सांगत होता की ‘जर तू पश्चात्ताप केलास आणि माझा पक्ष निवडलास तर मी तुला स्वीकारेन.’ पण काइनने देवाचं ऐकलं नाही. टेहळणी बुरूज१८.०७ १७ ¶१, ३; १८ ¶४
रविवार, २२ मार्च
तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या.—मत्त. ५:१६.
आपला प्रकाश झळकवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे प्रचार करणं आणि शिष्य बनवणं. (मत्त. २८:१९, २०) प्रचार करण्यासोबतच आपण ज्या प्रकारे वागतो त्याद्वारेही यहोवाचा गौरव होतो. आपण आनंदाचा संदेश सांगतो तेव्हा बऱ्याच लोकांचं आपल्यावर लक्ष असतं. आपण जेव्हा त्यांना पाहून स्मितहास्य करतो, प्रेमाने नमस्ते किंवा हॅलो म्हणतो, तेव्हा ते आपल्याबद्दल व आपण ज्या देवाची उपासना करतो त्याच्याबद्दल चांगला विचार करतात. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “एखाद्या घरात गेल्यावर घरातल्या लोकांना नमस्कार करा आणि त्यांना शांती मिळो अशी सदिच्छा व्यक्त करा.” (मत्त. १०:१२) येशूने ज्या क्षेत्रात प्रचार केला तिथे अनोळखी लोकांना घरात बोलवण्याची रीत होती. पण आज बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत नाही. एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्या घराचं दार वाजवलं तर आज सहसा लोक घाबरतात किंवा चिडतात. पण आपण जर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ रीत्या संवाद साधला तर तेही आपल्याशी बोलताना कचरणार नाहीत. साक्षकार्यात ट्रॉलीजवळ उभे असताना आपण सहसा स्मितहास्य करून लोकांना मैत्रीपूर्ण अभिवादन करतो. टेहळणी बुरूज१८.०६ २२ ¶४-५
सोमवार, २३ मार्च
देव भेदभाव करत नाही.—प्रे. कार्ये १०:३४.
पेत्रने आपला बहुतेक वेळ यहुदी लोकांना प्रचार करण्यातच घालवला होता. त्या वर्षी देवाने स्पष्ट केलं की ख्रिश्चनांनी पक्षपात करणं चुकीचं आहे. यामुळे मग पेत्रने एक रोमी सैनिक, कर्नेल्य याला प्रचार केला. (प्रे. कार्ये १०:२८, ३५) यानंतर पेत्र यहुदी नसलेल्या ख्रिश्चनांसोबत खाऊ-पिऊ लागला. पण याच्या काही वर्षांनंतर अंत्युखियामध्ये असताना त्याने यहुदी नसलेल्या लोकांसोबत खाण्याचं सोडून दिलं. (गलती. २:११-१४) यामुळे पौलने पेत्रची चूक दाखवून दिली आणि पेत्रनेही तो सल्ला स्वीकारला. हे आपण कशावरून म्हणू शकतो? त्याने आशिया मायनरमध्ये असलेल्या यहुदी आणि विदेशी ख्रिश्चनांना आपल्या पहिल्या पत्रात सांगितलं की सर्व बांधवांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. (१ पेत्र १:१; २:१७) येशूने मांडलेल्या चांगल्या उदाहरणामुळेच शिष्य “सर्व प्रकारच्या” लोकांवर प्रेम करायला शिकले. (योहा. १२:३२; १ तीम. ४:१०) लोकांबद्दल आपले विचार बदलण्यासाठी त्यांना वेळ लागला, पण तरी त्यांनी आपली विचारसरणी बदलली. या ख्रिश्चनांनी “नवीन व्यक्तिमत्त्व” परिधान केल्यामुळे ते सर्व लोकांकडे देवासारखंच समानतेच्या नजरेने पाहायला शिकले.—कलस्सै. ३:१०, ११. टेहळणी बुरूज१८.०६ ११ ¶१५-१६
मंगळवार, २४ मार्च
नीतिमत्त्वाचे कवच घालून स्थिर उभे राहा.—इफिस. ६:१४.
एका रोमी सैनिकाचे कवच सहसा लोखंडाच्या आडव्या लहान पट्ट्यांनी बनलेलं असायचं. त्या पट्ट्या जागच्याजागी आहेत की नाहीत याची त्याला नेहमी खात्री करून घ्यावी लागायची. कारण यामुळे त्याच्या हृदयाचं आणि इतर अवयवांचं रक्षण व्हायचं. यहोवाच्या नीतिमान स्तरांची तुलना कवचाशी केली जाऊ शकते. कारण यामुळे आपल्या “अंतःकरणाचे” किंवा आपल्या आतल्या व्यक्तिमत्त्वाचं रक्षण होतं. (नीति. ४:२३) एक सैनिक आपल्या लोखंडी कवचाच्या बदल्यात कमजोर धातूने बनलेलं कवच कधीच घेणार नाही. त्याच प्रकारे, योग्यतेबद्दल असलेल्या यहोवाच्या स्तरांच्या बदल्यात आपण स्वतःचे विचार स्वीकारणार नाही. कारण आपण आपल्या हृदयाचं रक्षण करण्याइतपत सुज्ञ नाही. (नीति. ३:५, ६) म्हणूनच, हे कवच आपल्या हृदयाचं रक्षण करत आहे की नाही, याचं आपण नेहमी परीक्षण करत राहिलं पाहिजे. देवाच्या वचनातून शिकलेल्या सत्यांबद्दल आपलं प्रेम जितकं वाढेल, तितकं देवाच्या स्तरांनुसार जीवन जगणं किंवा “कवच” घालणं आपल्याला सोपं जाईल.—स्तो. १११:७, ८; १ योहा. ५:३. टेहळणी बुरूज१८.०५ २८ ¶३-४, ६-७
बुधवार, २५ मार्च
ते मोशेशी भांडू लागले.—गण. २०:३.
मोशेने या लोकांचं निःस्वार्थपणे नेतृत्व केलं होतं, तरीदेखील लोक कुरकुर करू लागले. त्यांनी फक्त पुरेसं पाणी नसल्याचीच तक्रार केली नाही, तर ते मोशेविरुद्ध बोलू लागले आणि या परिस्थितीसाठी त्यालाच जबाबदार ठरवू लागले. (गण. २०:१-५, ९-११) यामुळे मोशेला खूप राग आला आणि रागाच्या भरात तो नम्रता दाखवण्यात चुकला. यहोवाने त्याला आज्ञा दिली होती की त्याने खडकाशी बोलावं, पण याउलट मोशे लोकांशी कठोरतेने बोलला आणि तो स्वतः चमत्कार करेल असं त्याने लोकांना सांगितलं. मग त्याने खडकावर दोन वेळा काठी मारली आणि त्यातून पाणी वाहू लागलं. गर्व आणि राग यांमुळे त्याच्या हातून ही गंभीर चूक घडली. (स्तो. १०६:३२, ३३) या प्रसंगात त्याने नम्रता दाखवली नाही, म्हणून त्याने वचनयुक्त देशात जाण्याची संधी गमावली. (गण. २०:१२) या घटनेवरून आपण बरेच धडे घेऊ शकतो. पहिला म्हणजे, आपण नेहमी नम्रता विकसित करत राहिलं पाहिजे. तसं करण्याचं आपण थोड्या वेळासाठीही थांबवलं, तर मग आपल्या मनात गर्व येऊ शकतो आणि आपल्या शब्दांतून व कार्यांतून आपण चुका करू शकतो. दुसरं म्हणजे, तणावामुळे आपल्याला नम्रता दाखवणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आपण नेहमी, अगदी तणावात असतानाही नम्र बनून राहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहिले पाहिजेत. टेहळणी बुरूज१९.०२ १२-१३ ¶१९-२१
गुरुवार, २६ मार्च
सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल.—मत्त. २४:१४.
प्रचार करणं आपल्याला ओझ्यासारखं वाटतं का? मुळीच नाही. येशूने द्राक्षवेलीचा दृष्टान्त दिल्यावर सांगितलं की प्रचार केल्यामुळे आपल्याला त्याच्यासारखा आनंद मिळेल. (योहा. १५:११) असं आपण का म्हणू शकतो? हे लक्षात घ्या की दृष्टान्तात येशूने स्वतःची तुलना वेलीशी आणि शिष्यांची तुलना फांद्यांशी केली. (योहा. १५:५) ज्या प्रकारे, वेलीला जडून राहिल्यामुळे फांद्यांना पाणी आणि आवश्यक पोषण मिळतं. त्याच प्रकारे, येशूसोबत ऐक्यात राहिल्याने आणि त्याचं जवळून अनुकरण केल्याने आपण आनंदी होऊ. आणि हा आनंद येशूने अनुभवलेल्या आनंदासारखाच असेल जो देवाची इच्छा केल्याने मिळतो. (योहा. ४:३४; १७:१३; १ पेत्र २:२१) हॅने नावाची बहीण ४० पेक्षा जास्त वर्षं पायनियरींग करत आहे. ती म्हणते: “सेवाकार्य करून आल्यावर मला जो आनंद मिळतो, त्यामुळे यहोवाची सेवा करत राहण्यासाठी मला प्रेरणा मिळते.” लोक आपल्या संदेशाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हाही आनंदी राहिल्यामुळे आपल्याला प्रचार करत राहण्याची शक्ती मिळते.—मत्त. ५:१०-१२. टेहळणी बुरूज१८.०५ १७ ¶२; २० ¶१४
शुक्रवार, २७ मार्च
विश्वास व सत्य यांविषयी सांगण्यासाठी विदेश्यांचा शिक्षक म्हणून [मला] नेमण्यात आले आहे.—१ तीम. २:७.
बांधवांना उत्तेजन देण्याच्या बाबतीत प्रेषित पौलनेही उत्तम उदाहरण मांडलं. पवित्र आत्म्याने त्याला अनेक दैवतांची उपासना करणाऱ्या ग्रीक, रोमी आणि इतर लोकांना प्रचार करण्यासाठी पाठवलं. (गलती. २:७-९) आज टर्की, ग्रीस आणि इटली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशांत पौलने प्रचारासाठी प्रवास केला होता. या ठिकाणी राहणाऱ्या गैर-यहुदी लोकांना त्याने प्रचार केला आणि तिथे मंडळ्याही स्थापित केल्या. नुकतेच ख्रिस्ती झालेल्या या लोकांना समस्यांचा सामना करावा लागला. तिथल्या लोकांनी त्यांचा छळ केला आणि यामुळे त्यांना प्रोत्साहनाची खूप गरज होती. (१ थेस्सलनी. २:१४) म्हणून इ.स. ५० च्या आसपास पौलने थेस्सलनीकामधल्या नवीन मंडळीला एक प्रोत्साहन देणारं पत्र लिहिलं. या पत्रात त्याने म्हटलं: “आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हा सर्वांचा उल्लेख करून नेहमी देवाचे आभार मानतो, कारण तुम्ही विश्वासूपणे जे कार्य केले आणि प्रेमळपणे जे परिश्रम घेतले; तसेच, . . . तुम्ही जो धीर धरला, त्याची आम्ही सतत आपला देव व पिता याच्यासमोर आठवण करतो.” (१ थेस्सलनी. १:२, ३) त्याने त्या बंधुभगिनींना एकमेकांना दृढ करण्याचंही प्रोत्साहन दिलं. त्याने म्हटलं: “एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.”—१ थेस्सलनी. ५:११. टेहळणी बुरूज१८.०४ १८-१९ ¶१६-१७
शनिवार, २८ मार्च
आधी राज्याविषयीच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाणं गरजेचं आहे.—मार्क १३:१०.
यहोवाचं मन आनंदित करण्यावर तुम्ही आपलं लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल इतरांनाही सांगावसं वाटेल. यावरून आपल्याला कळतं की प्रचारकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्याला आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. तुम्ही तुमची सेवा वाढवण्याचं ध्येय ठेवू शकता का? तुम्ही पायनियर बनू शकता का? तुम्ही इतरांना आपला बायबल आधारित विश्वास आणखी चांगल्या प्रकारे समजावून कसा सांगू शकता? प्रचार करणं तुम्हाला इतकं आवडत नसेल तेव्हा काय? दोन गोष्टींमुळे तुम्हाला मदत मिळेल: चांगली तयारी करा, आणि यहोवाबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते इतरांना सांगत राहा. असं केलं तर प्रचारकार्य करणं तुम्हाला आवडू लागेल. तुमचे मित्र सहसा तुम्हाला जे प्रश्न विचारतात किंवा ज्या विषयांवर बोलतात त्यांचं उत्तर तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता. आपल्या वेबसाईटवर आणि प्रकाशनांत असे बरेच लेख आहेत जे तरुणांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. उदाहरणार्थ, समजा तुमच्या एखाद्या मित्राने विचारलं की, ‘तुझे आईबाबा कसं ऐकून घेतात तुझं, माझं तर कधीच ऐकत नाही?’ तर तुम्ही तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं या माहितीपत्रकातून मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो? हा धडा वाचू शकता. टेहळणी बुरूज१८.०४ २७ ¶१०-११
रविवार, २९ मार्च
फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा.—उत्प. १:२८.
आदाम आणि हव्वाला बऱ्याच बाबतीत स्वातंत्र्य असलं तरी त्यांना काही मर्यादा होत्या. यांपैकी काही तर अगदी स्वाभाविक होत्या. उदाहरणार्थ, जिवंत राहण्यासाठी त्यांना श्वास घेण्याची, अन्न सेवन करण्याची आणि झोप घेण्याची गरज होती. याचा अर्थ त्यांना स्वातंत्र्य नव्हतं का? असं नाही. उलट या गोष्टी करण्यात त्यांना आनंद आणि समाधान मिळावं याची यहोवाने व्यवस्था केली. (स्तो. १०४:१४, १५; उप. ३:१२, १३) यहोवाने आदाम-हव्वाला एक विशिष्ट आज्ञा दिली होती. त्याने त्यांना मुलांना जन्म देऊन पृथ्वी भरून टाकण्याची आणि तिची काळजी घेण्याची आज्ञा दिली. या आज्ञेमुळे यहोवाने त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं का? नाही. यामुळे पूर्ण पृथ्वीचं नंदनवनात रूपांतर करण्याची चांगली संधी त्यांना मिळाली. एक असं घर जिथे ते आणि त्यांची परिपूर्ण मुलं सदासर्वकाळ राहू शकली असती. हा यहोवाचा उद्देश होता. (स्तो. १२७:३; यश. ४५:१८) आदाम-हव्वाने यहोवाची आज्ञा पाळली असती तर ते आणि त्यांचं कुटुंब सदासर्वकाळाच्या जीवनाचा आनंद घेऊ शकले असते. टेहळणी बुरूज१८.०४ ४-५ ¶७-८
सोमवार, ३० मार्च
सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्या सर्वांनी विश्वास स्वीकारला.—प्रे. कार्ये १३:४८.
सेवाकार्यात आपण लोकांशी धीराने वागलो तर त्यांना बायबलमधली सत्यं पहिल्या भेटीतच समजली पाहिजेत किंवा त्यांनी स्वीकारली पाहिजेत अशी अपेक्षा आपण करणार नाही. उदाहरणार्थ, नंदनवन पृथ्वीवर सर्वकाळाच्या जीवनाच्या आशेबद्दल आपण लोकांना कसं समजवणार याचा जरा विचार करा. बरेच लोक मृत्यू म्हणजे शेवट असं मानतात. किंवा चांगले लोक स्वर्गात जातात असं त्यांना वाटतं. नंदनवनात जगण्याच्या आशेबद्दल एक बांधव कसं समजावतो त्याकडे लक्ष द्या. सर्वात आधी तो उत्पत्ति १:२८ हे वचन वाचतो. मग तो घरमालकाला विचारतो की मानवांनी कुठे आणि कशा परिस्थितीत राहावं अशी देवाची इच्छा होती. “या पृथ्वीवर चांगल्या परिस्थितीत” असं बरेच जण उत्तर देतात. त्यानंतर बांधव यशया ५५:११ हे वचन वाचतो आणि विचारतो की देवाचा उद्देश बदलला आहे का? सहसा घरमालक ‘नाही’ असं उत्तर देतो. मग शेवटी तो स्तोत्र ३७:१०, ११ ही वचनं वाचतो आणि आपलं भविष्य कसं असणार हे घरमालकाला विचारतो. शास्त्रवचनांच्या आधारे अशा प्रकारे तर्क केल्यामुळे, चांगल्या लोकांनी नंदनवन पृथ्वीवर कायमचं राहावं या देवाच्या इच्छेबद्दल समजायला त्याने बऱ्याच लोकांना मदत केली आहे. टेहळणी बुरूज१९.०३ २४ ¶१४-१५; २५ ¶१९
मंगळवार, ३१ मार्च
याचं ऐका.—मत्त. १७:५.
या शब्दांद्वारे यहोवाने स्पष्टपणे दाखवलं की आपण येशूचं ऐकावं आणि त्याची आज्ञा पाळावी अशी त्याची इच्छा आहे. येशूने आपल्या शिष्यांना आनंदाच्या संदेशाचा प्रचार करायला शिकवलं आणि वारंवार त्यांना जागृत राहण्याची ताकीद दिली. (मत्त. २४:४२; २८:१९, २०) तसंच, त्याने त्यांना सेवेत खूप मेहनत घेण्यासाठी आर्जवलं आणि कधीही हार न मानण्यासाठीही सांगितलं. (लूक १३:२४) त्याच्या शिष्यांनी नेहमी एकमेकांवर प्रेम करावं, एकतेत राहावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात या गोष्टींवर त्याने जोर दिला. (योहा. १५:१०, १२, १३) त्या काळासारखंच आजही ते सल्ले आपल्यासाठी तितकेच फायद्याचे आहेत. येशूने म्हटलं: “जो कोणी सत्याच्या बाजूने आहे, तो माझं ऐकतो.” (योहा. १८:३७) “एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा” या सल्ल्याचं आपण पालन करतो, तेव्हा आपण येशूचं ऐकत आहोत हे दाखवत असतो. (कलस्सै. ३:१३; लूक १७:३, ४) यासोबतच “चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत” आवेशाने प्रचार करूनही आपण दाखवतो की आपण येशूचं ऐकत आहोत.—२ तीम. ४:२. टेहळणी बुरूज१९.०३ १० ¶९-१०