जानेवारी
बुधवार, १ जानेवारी
मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.—गण. १२:३.
इजिप्तच्या राजघराण्यात असताना मोशे नम्र नव्हता. त्या वेळी त्याला लगेच राग यायचा, इतका की एका प्रसंगी त्याने अन्याय करणाऱ्या एका व्यक्तीला ठार मारलं. त्या वेळी मोशेला असं वाटलं की यहोवाला ते मान्य आहे. पण नंतर जवळपास ४० वर्षं यहोवाने मोशेला हे समजण्यासाठी मदत केली की इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी फक्त धैर्य असणंच पुरेसं नाही. तर त्याला नम्रता विकसित करणं जास्त गरजेचं होतं. आणि नम्रता विकसित करण्यासाठी त्याला आज्ञाधारकता, लीनता आणि सौम्यता विकसित करणं गरजेचं होतं. पण त्याने हे गुण विकसित केले आणि तो एक खूप चांगला नेतृत्व करणारा बनला. (निर्ग. २:११, १२; प्रे. कार्ये ७:२१-३०, ३६) आज कुटुंबप्रमुखांनी आणि मंडळीतील वडिलांनी मोशेच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. तुमचा कोणी अनादर केला तर लगेच मनाला लावून घेऊ नका. तुमच्यात काही कमतरता असतील तर त्या नम्रतापूर्वक स्वीकारा. (उप. ७:९, २०) समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल यहोवा जे मार्गदर्शन देतो त्याचा स्वीकार करा. आणि इतरांशी बोलताना नेहमी सौम्यतेने बोला. (नीति. १५:१) कुटुंबप्रमुख आणि जबाबदाऱ्या सांभाळणारे बांधव जेव्हा यहोवाच्या इच्छेनुसार इतरांशी वागतात, तेव्हा ते शांती टिकवून ठेवतात आणि नम्रता दाखवण्याच्या बाबतीत इतरांसाठी उत्तम उदाहरण मांडतात. टेहळणी बुरूज१९.०२ ८ ¶१; १० ¶९-१०
गुरुवार, २ जानेवारी
येशूला त्यांचा कळवळा आला.—मार्क ६:३४.
येशूला लोकांचा कळवळा आला त्यामागचं कारण काय होतं? त्याने पाहिलं की लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” होते. कदाचित येशूने पाहिलं असेल की तिथे आलेले काही लोक गरीब आहेत आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागत आहे. कदाचित इतर काही जण आपल्या प्रिय जणांच्या मृत्यूचं दुःख सहन करत असतील. असं असेल तर येशू त्यांची परिस्थिती समजू शकत होता. पण कदाचित येशूलाही वरीलपैकी काही समस्यांचा सामना करावा लागला होता. येशूला इतरांबद्दल काळजी होती आणि त्यामुळे त्यांना सांत्वन देण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली. (यश. ६१:१, २) आपण येशूच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो? येशूप्रमाणेच आपल्या अवतीभोवतीही “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” लोक आहेत. त्यांच्या जीवनात बऱ्याच समस्या आहेत. त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती आपल्याजवळ आहे, ती म्हणजे राज्याचा संदेश. (प्रकटी. १४:६) “दुबळा व दरिद्री” यांच्याबद्दल आपल्या मनात ‘दयेची’ भावना आहे. त्यामुळे आपल्या प्रभूचं अनुकरण करून आपण आनंदाचा संदेश सांगितला पाहिजे. (स्तो. ७२:१३) लोकांबद्दल करुणा असल्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं. टेहळणी बुरूज१९.०३ २१-२२ ¶६-७
शुक्रवार, ३ जानेवारी
प्रभु धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो.—स्तो. ६८:१९.
यहोवावर प्रेम करण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. तो आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी पुरवतो ज्यांचा आपण दररोज आनंद घेत असतो. यासोबतच तो आपल्याला त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल सत्यही शिकवतो. (योहा. ८:३१, ३२) त्याने आपल्याला ख्रिस्ती मंडळीसुद्धा दिली आहे जिथे आपल्याला मार्गदर्शन आणि साहाय्य मिळतं. तो आज आपल्याला समस्येत धीर धरण्यासाठी मदत करतो आणि भविष्यात एका परिपूर्ण स्थितीत सर्वकाळ जगण्याची आशाही देतो. (प्रकटी. २१:३, ४) यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी त्याने जे काही केलं आहे, त्यावर आपण जेव्हा मनन करतो तेव्हा आपण त्याच्या आणखी जवळ येतो. यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण योग्य प्रकारची भीती बाळगण्यासाठी शिकतो आणि त्याला आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट आपण करत नाही. यहोवाच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला नेहमी फायदा होतो हे समजल्यावर, तुमचं त्याच्याबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल असलेलं प्रेम आणखी वाढत जाईल. यहोवाची सेवा थांबवण्यासाठी सैतान दाखवत असलेल्या कोणत्याही आमिषाला आपण बळी पडणार नाही. जरा कल्पना करा, हजारो वर्षं ओसरली आहेत आणि तुम्ही नवीन जगात आहात. तुम्ही आपल्या बाप्तिस्म्याचा दिवस आठवता आणि त्या वेळी तुम्हाला पक्की खात्री पटते की बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय हा तुमच्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय होता! टेहळणी बुरूज१९.०३ ६ ¶१४; ७ ¶१९
शनिवार, ४ जानेवारी
सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे.—नीति. ३१:१०.
कुटुंबातला प्रत्येक सदस्य आभार व्यक्त करतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो. विवाहसोबती जितकं जास्त एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील तितकं त्यांचं नातं आणखी घनिष्ठ होईल. तसंच, त्यांना एकमेकांना क्षमा करणंही सोपं जाईल. आपल्या पत्नीची कदर करणारा पती, फक्त तिच्या वागण्या-बोलण्याकडे लक्षच देत नाही, तर तो “तिची प्रशंसा” करतो. (नीति. ३१:२८) आणि सुज्ञ पत्नीदेखील आपल्या पतीला सांगते की कोणत्या विशिष्ट गोष्टींसाठी ती त्याची कदर करते. पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना कृतज्ञता दाखवायला कसं शिकवू शकता? तुम्ही जसं वागता, जसं बोलता त्याचं मुलं अनुकरण करतील हे लक्षात असू द्या. म्हणून तुमची मुलं जेव्हा तुमच्यासाठी काही करतात तेव्हा त्यांना थँक्यू बोलून त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडा. त्यासोबतच, इतर जण तुमच्या मुलांसाठी काही करतात तेव्हा तुमच्या मुलांना त्यांचे आभार मानायलाही शिकवा. कदर ही मनापासून बाळगली जाते आणि ती व्यक्त केल्याने खूप चांगले परिणाम होऊ शकतात हे समजण्यासाठी त्यांना मदत करा. टेहळणी बुरूज१९.०२ १७ ¶१४-१५
रविवार, ५ जानेवारी
माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन [खरेपणा, NW] सोडणार नाही.—ईयो. २७:५.
या शब्दांवरून सिद्ध होतं की सैतानाने आणलेल्या या छळामध्ये ईयोब आपला खरेपणा सोडणार नव्हता. ईयोबने हार मानली नाही आणि आपणही तसंच करू शकतो. सैतान आपल्या प्रत्येकावर रोज हेच आरोप लावतो. सैतानाने ईयोबच्या बाबतीत उपस्थित केलेल्या वादविषयात तुम्ही कसे सामील आहात? त्याचं म्हणणं आहे की तुमचं यहोवावर खरं प्रेम नाही, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी त्याची सेवा करण्याचं सोडून द्याल आणि तुम्ही खरेपणा टिकवून ठेवणार नाही. (ईयो. २:४, ५; प्रकटी. १२:१०) हे ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल! पण जरा याचा विचार करा: यहोवाचा तुमच्यावर इतका भरवसा आहे की त्याने तुम्हाला एक उत्कृष्ट संधी दिली आहे. यहोवाने सैतानाला तुमची परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. पण तुम्ही आपला खरेपणा टिकवून ठेवाल आणि सैतान खोटं असल्याचं सिद्ध कराल असा पूर्ण भरवसा यहोवाला आहे. तसंच, यहोवा वचन देतो की असं करण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. (इब्री १३:६) संपूर्ण विश्वाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा तुमच्यावर भरवसा आहे, हा खरंच किती मोठा बहुमान आहे! यावरून आपल्याला समजतं की खरेपणा इतका महत्त्वपूर्ण का आहे. खरेपणा बाळगल्यामुळे आपण सैतानाच्या खोट्या आरोपांना फेटाळून लावू शकतो, आपल्या पित्याचं नाव उंचावू शकतो आणि त्याच्या अधिकाराचं समर्थन करू शकतो. टेहळणी बुरूज१९.०२ ५ ¶९-१०
सोमवार, ६ जानेवारी
अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला ठार मारणारा प्रत्येक जण, आपण देवाची पवित्र सेवा केली आहे असं समजेल.—योहा. १६:२.
येशूने त्यांना पुढे येणाऱ्या समस्यांबद्दल आणि छळाबद्दलही सांगितलं. मग स्वतःच्या उदाहरणावर लक्ष केंद्रित करत येशूने त्यांना म्हटलं “हिंमत धरा!” (योहा. १६:१-४क, ३३) बऱ्याच वर्षांनंतरही येशूचे शिष्य त्याच्या आत्मत्यागी उदाहरणाचं अनुकरण करत होते आणि धैर्य दाखवत होते. त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला, तरीदेखील ते एकमेकांना मदत करत राहिले. (इब्री १०:३३, ३४) आज आपणही धैर्य दाखवण्याच्या बाबतीत येशूचं अनुकरण करतो. जसं की, विश्वासामुळे आपल्या बांधवांचा छळ केला जातो तेव्हा आपण त्यांना धैर्याने मदत करतो. कधीकधी तर आपल्या बांधवांना काहीही आधार नसताना तुरुंगात टाकण्यात येतं. असं झाल्यावर, आपण त्यांना जमेल ती मदत केली पाहिजे आणि त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. (फिलिप्पै. १:१४; इब्री १३:१९) धैर्य दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे “धैर्याने” प्रचार करणं. (प्रे. कार्ये १४:३) येशूसारखंच आपणही राज्याबद्दल प्रचार करण्याचा निर्धार केला आहे, मग लोकांनी आपला विरोध आणि छळ केला तरीही. टेहळणी बुरूज१९.०१ २२-२३ ¶८-९
मंगळवार, ७ जानेवारी
एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या, आणि जशी काहींची रीत आहे, त्याप्रमाणे आपण आपले एकत्र येणे सोडू नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावे.—इब्री १०:२४, २५.
प्रोत्साहनदायक उत्तरं देण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदतीची ठरू शकते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सभेची तयारी करा. सभेची आधी आणि चांगली तयारी केल्यामुळे तुम्ही आणखीन जास्त आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल. (नीति. २१:५) सभेची चांगली तयारी करण्यात काय सामील आहे? प्रत्येक वेळी तुम्ही सभेच्या तयारीसाठी बसता तेव्हा यहोवाकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. (लूक ११:१३; १ योहा. ५:१४) मग तुम्ही शीर्षक, उपशीर्षक, चित्रं आणि चौकटी यांवर एक नजर टाका आणि त्यांचं परीक्षण करा. त्यानंतर प्रत्येक परिच्छेदाची तयारी करताना जी वचनं दिली आहेत, शक्य असल्यास ती सर्व वाचण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या माहितीवर मनन करा आणि तुम्ही जी उत्तरं देण्याची ठरवली असतील खासकरून त्या मुद्द्यांवर विचार करा. तुम्ही जितकी जास्त चांगली तयारी कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होईल आणि उत्तर द्यायलाही सोपं जाईल.—२ करिंथ. ९:६. टेहळणी बुरूज१९.०१ ९ ¶६; ११-१२ ¶१३-१५
बुधवार, ८ जानेवारी
हा दृष्टांत लिहून काढ.—हब. २:२.
यहोवाने हबक्कूकला हे सर्व लिहिण्याची प्रेरणा दिली यावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. तो म्हणजे, आपण आपल्या चिंता किंवा शंका यहोवाला सांगायला कधीही कचरू नये. खरंतर, आपण त्याला प्रार्थना करावी आणि आपल्या मनातल्या भावना त्याला सांगाव्यात यासाठी तो आपल्याला प्रेमळपणे आर्जवतो. (स्तो. ५०:१५; ६२:८) हबक्कूकने आपल्या मित्रावर व पित्यावर म्हणजे यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तो आपल्या परिस्थितीविषयी चिंता करत बसला नाही किंवा त्याने स्वतःच्या बळावर समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट, त्याने प्रार्थनेत त्याच्या भावना आणि चिंता यहोवासमोर मांडल्या. हबक्कूकने खरंच आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे! प्रार्थना ऐकणारा यहोवा देव आपल्याला आर्जवतो, की प्रार्थना करून आपण त्याला आपल्या चिंता सांगाव्यात. असं करण्याद्वारे आपण त्याच्यावर भरवसा असल्याचं दाखवतो. (स्तो. ६५:२) यामुळे यहोवा आपल्या प्रार्थनांचं कसं उत्तर देतो हे आपल्याला समजायला मदत होईल. जेव्हा तो आपल्याला सांत्वन देतो आणि आपलं मार्गदर्शन करतो, तेव्हा त्याने आपल्याला प्रेमळपणे जवळ घेतलं आहे याची जाणीव आपल्याला होईल. (स्तो. ७३:२३, २४) आपल्या परिस्थितीबद्दल, आपल्या समस्येबद्दल त्याला काय वाटतं हे समजायला तो आपल्याला मदत करेल. आपला यहोवावर भरवसा आहे हे दाखवण्यासाठी सर्वात उत्तम मार्गांपैकी एक म्हणजे त्याला प्रार्थना करणं. टेहळणी बुरूज१८.११ १३ ¶२; १४ ¶५-६
गुरुवार, ९ जानेवारी
पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे.—स्तो. १६:३.
दावीदने फक्त आपल्या वयाच्या लोकांशीच मैत्री केली नाही. तुम्ही दावीदच्या एखाद्या जवळच्या मित्राचं नाव सांगू शकाल का? तुम्हाला कदाचित योनाथानचं नाव आठवेल. बायबलमध्ये दावीद आणि योनाथान यांच्या मैत्रीबद्दल खूप सुंदर वर्णन केलं आहे. पण योनाथान दावीदपेक्षा जवळपास ३० वर्षं मोठा होता. मग ते इतके जिवलग मित्र कसे बनले? त्यांची मैत्री देवावर असलेल्या विश्वासावर आधारलेली होती. ते एकमेकांचा आदर करायचे आणि एकमेकांमध्ये असलेल्या गुणांना मौल्यवान लेखायचे. जसं की, देवाच्या शत्रूंसोबत लढताना त्यांनी दाखवलेलं धैर्य. (१ शमु. १३:३; १४:१३; १७:४८-५०; १८:१) दावीद आणि योनाथान यांसारखं आपणही देवावर प्रेम करणाऱ्यांसोबत आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसोबत मैत्री केली तर आपल्यालाही ‘मोठा संतोष’ मिळू शकतो. किएरा बऱ्याच वर्षांपासून देवाची सेवा करत आहे. ती म्हणते: “मी जगभरातल्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या आणि संस्कृतीच्या अनेक लोकांशी मैत्री केली आहे.” जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की बायबल आणि पवित्र आत्मा यांद्वारे आपण जगभरातल्या उपासकांच्या कुटुंबाचा एक भाग बनतो. टेहळणी बुरूज१८.१२ २६ ¶११-१३
शुक्रवार, १० जानेवारी
जो कोणी अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या पत्नीला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.—मत्त. १९:९.
“अनैतिक लैंगिक” कृत्यांमध्ये अनेक गंभीर पाप येऊ शकतात जसं की व्यभिचार, वेश्याव्यवसाय, अविवाहित लोकांमधील लैंगिक संबंध, समलैंगिकता आणि प्राण्यांसोबत शरीरसंबंध ठेवणं. जर एखाद्या पुरुषाने अनैतिक लैंगिक कृत्य केलं तर त्याला घटस्फोट द्यायचा की नाही हे त्याची पत्नी ठरवू शकते. येशूने असं नाही म्हटलं, की जर एखाद्या विवाहित व्यक्तीने अनैतिक लैंगिक कृत्य केलं, तर तिच्या जोडीदाराने तिला घटस्फोट दिलाच पाहिजे. उदाहरणार्थ, पतीने अनैतिक लैंगिक कृत्य केलं असलं, तरी एक पत्नी त्याच्यासोबत राहण्याची निवड करू शकते. असं का? कदाचित तिचं अजूनही त्याच्यावर प्रेम असेल आणि ती त्याला माफ करायला तयार असेल. तसंच ती विचार करू शकते की ते दोघे मिळून त्यांचं विवाहबंधन मजबूत करतील. तसंच, जर तिने घटस्फोट घेतला आणि पुन्हा लग्न केलं नाही तर तिला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जसं की, तिच्या भौतिक आणि शारीरिक गरजांबद्दल काय? तिला एकटेपणा जाणवेल का? घटस्फोट घेतल्यामुळे तिच्या मुलांवर कसा परिणाम होईल? (१ करिंथ. ७:१४) यावरून हे स्पष्ट आहे की जर निर्दोष जोडीदाराने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. टेहळणी बुरूज१८.१२ १२ ¶१०-११
शनिवार, ११ जानेवारी
अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा.—स्तो. ९७:१०.
यहोवा अनीतीचा द्वेष करतो. (रोम. १:१८) आपण अपरिपूर्ण असल्यामुळे यहोवाला याची जाणीव आहे की प्रत्येक वेळी योग्य ते करणं कदाचित आपल्याला जमणार नाही. तरीदेखील तो आपल्याकडून अपेक्षा करतो की आपणही त्याच्यासारखंच वाइटाचा द्वेष करावा. यहोवा वाईट गोष्टींचा द्वेष का करतो यावर आपण मनन केलं, तर आपल्याला त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगायला मदत होईल. तसंच यामुळे आपल्याला वाईट कार्यांचा प्रतिकार करणं शक्य होईल. आपण वाइटाचा द्वेष करायला शिकलो, तर यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे ठरवायलाही मदत होईल. मग अशा गोष्टींबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे काही नियम दिलेले नसले तरीही. उदाहरणार्थ, आजकाल जगात नृत्याचा एक अनैतिक प्रकार खूप प्रचलित होत आहे. यात लोक अर्ध-नग्न अवस्थेत नाचतात. काही लोकांना वाटू शकतं की यात लोक शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे अशा गोष्टींत भाग घेणं चुकीचं नाही. पण याबद्दल यहोवाचादेखील दृष्टिकोन असाच आहे का? हे लक्षात असू द्या की यहोवा सर्व प्रकारच्या वाइटाचा द्वेष करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीपासून आपण पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. यासाठी आपण आत्मसंयम विकसित केला पाहिजे आणि यहोवासारखंच वाईट गोष्टींचा द्वेष केला पाहिजे.—रोम. १२:९. टेहळणी बुरूज१८.११ २५ ¶११-१२
रविवार, १२ जानेवारी
धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल.—हब. २:४.
प्रेषित पौलने त्याच्या पत्रांत याचा तीन वेळा उल्लेख केला! (रोम. १:१७; गलती. ३:११; इब्री १०:३८) आपण खातरी बाळगू शकतो की आपल्याला कितीही समस्यांचा सामना करावा लागला, तरी यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आपण त्याची अभिवचनं पूर्ण होताना पाहू. भविष्यासाठी असलेल्या आशेवर आपलं लक्ष केंद्रित असावं अशी त्याची इच्छा आहे. शेवटच्या दिवसांत राहणाऱ्या आपल्या सर्वांसाठी हबक्कूकच्या पुस्तकात महत्त्वाचा धडा दिला आहे. यहोवावर भरवसा ठेवणाऱ्या प्रत्येक नीतिमान व्यक्तीला सर्वकाळाचं जीवन देण्याचं अभिवचन तो देतो. तेव्हा, आज आपल्याला कोणत्याही समस्यांचा व चिंतांचा सामना करावा लागत असला तरी आपण यहोवावर असलेला भरवसा आणखी वाढवत राहू या. यहोवाने हबक्कूकला जे म्हटलं त्यावरून आपल्याला खातरी पटते की तो आपल्याला मदत आणि संरक्षण पुरवेल. तो आपल्याला प्रेमळपणे आर्जवतो की आपण त्याच्यावर भरवसा ठेवावा आणि त्याचं राज्य पृथ्वीवर स्थापित करण्याची ठरवलेली वेळ येईपर्यंत धीराने वाट पाहावी. त्या वेळी पृथ्वी यहोवाच्या आनंदी आणि शांतीप्रिय उपासकांनी भरून जाईल.—मत्त. ५:५; इब्री १०:३६-३९. टेहळणी बुरूज१८.११ १६-१७ ¶१५-१७
सोमवार, १३ जानेवारी
माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात.—३ योहा. ४.
येशूच्या काळात सत्य स्वीकारणाऱ्या काही लोकांनी नंतर ते सोडून दिलं. उदाहरणार्थ, येशूने एक चमत्कार करून एका मोठ्या लोकसमुदायाला अन्न पुरवल्यानंतर ते लोक येशूच्या मागेमागे गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला गेले. पण मग येशूने त्यांना असं काही सांगितलं ज्यामुळे त्यांना धक्का बसला. तो म्हणाला: “जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचं मांस खात नाही आणि त्याचं रक्त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही.” येशूच्या शब्दांचा अर्थ काय होतो हे त्याला विचारण्याऐवजी त्यांनी म्हटलं: “किती धक्कादायक आहे हे! कोण ऐकून घेऊ शकतो अशा गोष्टी?” यामुळे “त्याच्या शिष्यांपैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामागे चालण्याचे सोडून दिले आणि पूर्वी ते ज्या गोष्टी करत होते, त्यांकडे परत गेले.” (योहा. ६:५३-६६) आजदेखील काही लोकांनी सत्य सोडून दिलं आहे. असं का? एखाद्या जबाबदार बांधवाच्या बोलण्यामुळे किंवा कार्यामुळे ते अडखळले. इतर काहींना बायबलमधून दिलेला सल्ला आवडला नाही, किंवा मंडळीत एखाद्या बांधवासोबत त्यांचे मोठे मतभेद झाले. टेहळणी बुरूज१८.११ ९ ¶३-५
मंगळवार, १४ जानेवारी
तुमच्यात प्रमुख केवळ एकच, म्हणजे ख्रिस्त आहे.—मत्त. २३:१०.
ख्रिस्त आजही ख्रिस्ती मंडळीचं नेतृत्व करत आहे. म्हणून जर तुम्हाला संघटनेत होणारे बदल समजत नसले तर प्राचीन काळात ख्रिस्ताने देवाच्या लोकांचं नेतृत्व कसं केलं याचा विचार करा. येशूने नेहमीच देवाच्या लोकांचं सुज्ञपणे मार्गदर्शन केलं आहे, मग ते यहोशवाच्या दिवसांत असो अथवा प्रेषितांच्या काळात. यामुळे देवाच्या लोकांचं संरक्षण झालं, त्यांचा विश्वास मजबूत झाला आणि ऐक्यात राहण्यासाठी त्यांना मदत झाली. (इब्री १३:८) आज “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आपल्याला अगदी योग्य वेळी निर्देशन देतो. (मत्त. २४:४५) यावरून आपल्याला पुरावा मिळतो की येशूला आपली काळजी आहे. ख्रिस्त आपलं नेतृत्व कसं करत आहे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला याची जाणीव होईल की आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. प्रचारकार्य हे पृथ्वीवर होणारं सर्वात महत्त्वाचं काम आहे. या कामावर आपलं लक्ष केंद्रित राहावं यासाठीही येशू आपली मदत करतो.—मार्क १३:१०. टेहळणी बुरूज१८.१० २५ ¶१३-१६
बुधवार, १५ जानेवारी
देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असे चाला. नेहमी नम्रता [बाळगा].—इफिस. ४:१, २.
आपल्याला गैरवागणूक दिली जाते तेव्हा संयम बाळगण्याबद्दलचं एक उत्तम उदाहरण आपल्याला २ शमुवेल १६:५-१३ या वचनांत वाचायला मिळतं. शिमी हा शौल राजाचा नातेवाईक होता. त्याने दावीद आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक केली आणि त्यांचा अपमान केला. दावीद त्याला थांबवू शकला असता. पण त्याने धीर धरला आणि शिमीने केलेला अपमान सहन केला. अशा प्रकारचा संयम बाळगायला दावीदला कशामुळे मदत झाली? दावीदचा मुलगा अबशालोम जेव्हा त्याच्या जीवावर उठला होता तेव्हा दावीदने तिसरे स्तोत्र रचले. या काळातच शिमीने दावीदवर हल्ला केला. पण अशा वेळी शांत राहण्यासाठी दावीदला कशामुळे मदत मिळाली? स्तोत्र ३:४ मध्ये दावीद म्हणतो: “मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो . . . माझे ऐकतो.” आपल्याला जेव्हा गैरवागणूक दिली जाते तेव्हा आपणही दावीदसारखं यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला धीर धरण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा देईल. जेव्हा तुम्हाला कोणी वाईट वागणूक देतं तेव्हा तुम्ही संयम आणि क्षमाशील वृत्ती दाखवू शकता का? तुम्हाला होत असलेला त्रास यहोवा जाणतो आणि तो तुम्हाला मदत करेल व आशीर्वाद देईल असा तुम्हाला भरवसा आहे का? टेहळणी बुरूज१८.०९ ६-७ ¶१६-१७
गुरुवार, १६ जानेवारी
आपण देवाचे सहकारी आहोत.—१ करिंथ. ३:९.
प्रचारकार्य करत असताना आपण आपल्या क्षेत्रात नेहमी लोकांशी दयाळूपणे आणि आदराने वागलं पाहिजे. आणि असं करण्यासाठी आपण त्यांना नीट जाणून घेतलं पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा, की घरोघरचं प्रचारकार्य करताना लोकांना माहीत नसतं की आपण त्यांना भेटणार आहोत. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, की आपण त्यांना अशा वेळी भेटलं पाहिजे जेव्हा ते आपल्याशी बोलायला तयार असतील. (मत्त. ७:१२) उदाहरणार्थ, तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना शनिवारी-रविवारी जास्त झोपायला आवडतं का? मग तुम्ही आधी रस्त्यावरचं, सार्वजनिक साक्षकार्य करू शकता किंवा तुमच्याशी बोलायला तयार असणाऱ्या पुनर्भेटी करू शकता. आज अनेक लोक खूप व्यस्त आहेत. त्यामुळे खासकरून सुरुवातीच्या भेटी कमी वेळाच्या असणं कदाचित योग्य राहील. (१ करिंथ. ९:२०-२३) लोक व्यस्त आहेत याची आपल्याला जाणीव आहे हे जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा पुढच्या वेळी त्यांना भेटल्यावर ते कदाचित आपल्याला जास्त वेळ देतील. जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या फळाचे पैलू दाखवतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने “देवाचे सहकारी” बनतो. कदाचित यहोवा एखाद्याला सत्य जाणून घेण्यासाठी आपला वापरही करेल.—१ करिंथ. ३:६, ७. टेहळणी बुरूज१८.०९ ३२ ¶१५-१७
शुक्रवार, १७ जानेवारी
जे सौम्य वृत्तीचे ते सुखी आहेत, कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.—मत्त. ५:५.
सौम्य वृत्ती बाळगल्याने आपण आनंदी कसे बनू शकतो? आज बरेच लोक उद्धट आणि रागीट स्वभावाचे आहेत आणि यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पण असे लोक जेव्हा सत्य शिकतात, तेव्हा ते स्वतःत बदल करून “नवीन व्यक्तिमत्त्व” परिधान करतात. मग ते, “करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता” असे गुण विकसित करतात. (कलस्सै. ३:९-१२) यामुळे त्यांच्या जीवनात शांती टिकून राहते, इतरांसोबत चांगले संबंध टिकून राहतात आणि ते आनंदी बनतात. अशा लोकांबद्दल देवाचं वचन सांगतं की “त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.” (स्तो. ३७:८-१०, २९) सौम्य वृत्तीच्या लोकांना “पृथ्वीचा वारसा मिळेल” या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो? अभिषिक्त जण जेव्हा पृथ्वीवर राजे आणि याजक या नात्याने राज्य करतील तेव्हा त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल. (प्रकटी. २०:६) पृथ्वीवर जीवनाची आशा बाळगणाऱ्या लाखो लोकांना पृथ्वीवर सदासर्वकाळ राहण्याची संधी मिळेल तेव्हा त्यांना एका अर्थी तिचा वारसा मिळेल. ते परिपूर्ण असतील आणि शांती व आनंद अनुभवतील. टेहळणी बुरूज१८.०९ १९ ¶८-९
शनिवार, १८ जानेवारी
प्रत्येकाने ऐकण्यास उत्सुक . . . असावे.—याको. १:१९.
याबाबतीत यहोवा एक सर्वोत्तम उदाहरण आहे. (उत्प. १८:३२; यहो. १०:१४) हे आपल्याला निर्गम ३२:११-१४ मध्ये दिलेल्या संवादावरून कळतं. यहोवाला मोशेचं सर्वकाही ऐकून घेण्याची गरज नव्हती तरी त्याने मोशेला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली. तुम्ही कधी अशा व्यक्तीचं लक्षपूर्वक ऐकाल का, जिच्या हातून चूक झाली आहे? आणि मग तिने दिलेले सल्ले तुम्ही लागू कराल का? आपण कदाचित असं करणार नाही. पण विश्वासाने प्रार्थना करणाऱ्या सर्वांचं यहोवा धीराने ऐकतो! स्वतःला विचारा: ‘यहोवाने अब्राहाम, राहेल, मोशे, यहोशवा, मानोहा, एलीया आणि हिज्कीया यांचं ऐकलं. जर तो इतका नम्र होऊन लोकांचं ऐकतो, तर मीही तसं करण्याचा प्रयत्न करू नये का? शक्य असेल तेव्हा बांधवांनी दिलेले सल्ले ऐकण्याद्वारे आणि ते लागू करण्याद्वारे मी त्यांना आणखी आदर देऊ शकतो का? माझ्या मंडळीत किंवा कुटुंबात कोणी अशी व्यक्ती आहे का, जिला माझ्या मदतीची गरज आहे? तिला मदत करण्यासाठी मी काय करू शकतो?’—उत्प. ३०:६; शास्ते १३:९; १ राजे १७:२२; २ इति. ३०:२०. टेहळणी बुरूज१८.०९ ६ ¶१४-१५
रविवार, १९ जानेवारी
उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.—नीति. ११:२५.
आपण आज ज्या समाजात राहतो तिथे सहसा लोक फक्त स्वतःचाच विचार करतात. यामुळे अशा वातावरणात इतरांना उदारता दाखवत राहणं सोपं नाही. पण येशूने आपल्याला सर्वात महत्त्वाच्या दोन आज्ञांची आठवण करून दिली. एक म्हणजे, यहोवा देवावर पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्तीने प्रेम करणं आणि दुसरी म्हणजे आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम करणं. (मार्क १२:२८-३१) जे लोक यहोवावर प्रेम करतात, ते त्याचं अनुकरण करतात. यहोवा आणि येशू ही दोघंही उदार आहेत आणि आपण त्यांचं अनुकरण करावं असं उत्तेजन ते आपल्याला देतात. यामुळे आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ. आपण जर यहोवाने दिलेलं काम उदारपणे केलं आणि लोकांना उदारता दाखवली तर आपण यहोवाचा आदर करत असू. तसंच यामुळे आपल्याला आणि इतरांनाही फायदा होईल. तुम्ही सर्व जण इतरांना, खासकरून आपल्या बंधुभगिनींना उदारता दाखवण्यात आणि मदत करण्यात खूप मेहनत घेत आहात. (गलती. ६:१०) तुम्ही अशीच मेहनत घेत राहिलात तर लोक तुमची कदर करतील आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतील. यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. टेहळणी बुरूज१८.०८ २२ ¶१९-२०
सोमवार, २० जानेवारी
वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या.—योहा. ७:२४.
यहोवा वंश, देश, जात, किंवा भाषा यांमुळे लोकांमध्ये भेदभाव करत नाही. आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की आपण जर त्याचं भय बाळगलं आणि त्याच्या नजरेत जे योग्य ते केलं, तर आपल्याला त्याची स्वीकृती मिळेल. (गलती. ३:२६-२८; प्रकटी. ७:९, १०) पण समजा तुम्ही अशा देशात किंवा कुटुंबात लहानाचे मोठे झाला आहात जिथे सहसा भेदभाव केला जायचा तेव्हा काय? तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही भेदभाव करत नाही. पण असं होऊ शकतं का, की तुमच्या मनात काही अंशी भेदभावाची भावना अजूनही घर करून आहे? देव भेदभाव करत नाही हे शिकण्यासाठी पेत्रने इतरांना मदत केली. तरीदेखील नंतर त्याने भेदभाव केला. (गलती. २:११-१४) तर मग आपण इतरांबद्दल मत बनवण्याचं किंवा त्यांचा न्याय करण्याचं कसं टाळू शकतो? आपल्या मनात पूर्वग्रह आहेत का, हे ओळखण्यासाठी स्वतःचं परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. आपण देवाच्या वचनातून जे शिकतो त्यासोबत आपण आपल्या विचारांचं परीक्षण केलं पाहिजे. (स्तो. ११९:१०५) तसंच, आपण आपल्या मित्राची मदतही घेऊ शकतो. आपण त्याला विचारू शकतो की त्याने आपल्यामध्ये कधी भेदभावाची वृत्ती पाहिली आहे का, जी कदाचित आपल्या लक्षात आली नसेल. (गलती. २:११, १४) आपल्याला सामान्य वाटणाऱ्या भावनासुद्धा कदाचित भेदभावाच्या असू शकतात. टेहळणी बुरूज१८.०८ ९ ¶५-६
मंगळवार, २१ जानेवारी
तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या.—मत्त. ५:१६.
स्वतःला विचारा: ‘मी यहोवाला एकनिष्ठ आहे हे इतरांना दिसून येतं का? मी यहोवाचा साक्षीदार आहे हे मी इतरांना अभिमानाने सांगतो का?’ आपण यहोवाचे आहोत हे सांगताना जर आपल्याला लाज वाटत असेल, तर हे पाहून यहोवाला किती वाईट वाटेल याची कल्पना करा. (स्तो. ११९:४६; मार्क ८:३८) दुःखाची गोष्ट आहे की काही साक्षीदारांनी ‘जगाच्या आत्म्याचं’ अनुकरण केलं आहे. यामुळे ते जवळजवळ यहोवाची उपासना न करणाऱ्यांसारखेच ठरले आहेत. (१ करिंथ. २:१२) “जगाचा आत्मा” लोकांना स्वार्थी इच्छांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. (इफिस. २:३) उदाहरणार्थ, आपले कपडे कसे असावेत याबद्दल बरंचसं मार्गदर्शन मिळालं असतानाही, काहींनी शालीन नसलेले कपडे घालण्याची निवड केली आहे. ते ख्रिस्ती सभांनाही तंग किंवा टाईट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतात. तसंच ते जगातल्या लोकांसारखी आणि लक्ष वेधणारी केशभूषा करतात. (१ तीम. २:९, १०) अशा प्रकारची केशभूषा व वेशभूषा केल्यामुळे आपण यहोवाचे साक्षीदार आहोत की नाही असा प्रश्न कदाचित लोकांना पडू शकतो.—याको. ४:४. टेहळणी बुरूज१८.०७ २४-२५ ¶११-१२
बुधवार, २२ जानेवारी
तुम्ही सर्व जण भाऊ आहात.—मत्त. २३:८.
आदामची मुलं असल्यामुळे एका अर्थी आपण सर्वच जण बांधव आहोत. (प्रे. कार्ये १७:२६) येशूने समजावून सांगितलं की त्याच्या शिष्यांनी यहोवाला त्यांचा पिता मानल्यामुळेही ते एकमेकांचे बांधव आहेत. (मत्त. १२:५०) यामुळे ते सर्व देवाच्या कुटुंबाचे भाग बनले होते आणि प्रेम व विश्वासात एकतेत होते. म्हणूनच प्रेषितांनी मंडळ्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रांत ख्रिश्चनांना बंधुभगिनी असं म्हटलं. (रोम. १:१३; १ पेत्र २:१७; १ योहा. ३:१३) शिष्यांनी एकमेकांना बंधुभगिनी समजलं पाहिजे हे सांगितल्यानंतर, नम्र राहणं किती गरजेचं आहे हे येशूने त्यांना सांगितलं. (मत्त. २३:११, १२) आपण सुरुवातीलाच पाहिलं की गर्वामुळे कधीकधी शिष्यांमध्ये वाद व्हायचा. येशूच्या काळातील लोकांना आपल्या जातीबद्दल खूप अभिमान होता. बऱ्याच यहुदी लोकांना वाटायचं की ते अब्राहामची मुलं असल्यामुळे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने त्यांना म्हटलं: “देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्न करू शकतो.”—लूक ३:८. टेहळणी बुरूज१८.०६ ९-१० ¶८-९
गुरुवार, २३ जानेवारी
जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते.—नीति. १७:२७.
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आपल्याला सारखी-सारखी चीड आणते, तेव्हा आपण अविचारीपणे बोलतो का? आपण आपल्या रागावर ताबा ठेवतो का? (नीति. १०:१९; मत्त. ५:२२) इतर जण आपल्याला चीड आणतात, तेव्हा आपण “क्रोध व्यक्त करणे देवावर सोडून” दिलं पाहिजे. (रोम. १२:१७-२१) याचा काय अर्थ होतो? रागावण्याऐवजी आपण धीराने यहोवावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यहोवाला योग्य वाटेल तेव्हा तो आपली समस्या सोडवेल असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. यहोवावर भरवसा न ठेवता जर आपण बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण यहोवाचा अनादर करत असू. यहोवा आपल्याला वेळोवेळी ज्या काही सूचना देतो त्या आपण पूर्णपणे पाळतो का? आपण आधीपासून करत आलो आहोत म्हणून एखादी गोष्ट तशीच केली पाहिजे असा आपण विचार करू नये. याऐवजी यहोवा त्याच्या संघटनेद्वारे देत असलेल्या कोणत्याही नवीन सूचनांचं आपण लगेच पालन केलं पाहिजे. (इब्री १३:१७) तसंच, “ज्या लिहिण्यात आल्या आहेत, त्या गोष्टींच्या पलीकडे” आपण कधीही जाऊ नये. (१ करिंथ. ४:६) आपण जेव्हा यहोवाने दिलेल्या सूचना पूर्णपणे पाळतो तेव्हा आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असतो. टेहळणी बुरूज१८.०७ १५-१६ ¶१७-१८
शुक्रवार, २४ जानेवारी
प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट करू या.—इब्री ६:१.
आपण जसजसं प्रौढ ख्रिस्ती बनत जातो तसतसं आपल्या नजरेत तत्त्वांचं मोल वाढत जातं. नियम सहसा विशिष्ट परिस्थितीला लागू होतात, पण तत्त्वं मात्र वेगवेगळ्या परिस्थितींना लागू होतात. उदाहरणार्थ, वाईट लोकांशी मैत्री करणं धोक्याचं आहे हे एका लहान मुलाला समजणार नाही. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी पालकांनी त्याच्यासाठी काही नियम ठरवणं आवश्यक आहे. (१ करिंथ. १५:३३) पण जसजसं ते लहान मूल प्रौढ बनत जातं, तसतसं ते बायबल तत्त्वांबाबतीत तर्क करायला शिकतं. आणि या तत्त्वांमुळे त्याला चांगले मित्र निवडण्यासाठी मदत होईल. (१ करिंथ. १३:११; १४:२०) आपण जितकं जास्त बायबलमधल्या तत्त्वांवर तर्क करू, तितका जास्त आपला विवेक भरवशालायक बनेल. अशा प्रकारे, एखाद्या परिस्थितीत यहोवाच्या इच्छेनुसार निर्णय कसे घ्यावेत हे चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. यहोवाचं मन आनंदित होईल असे निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे पुरेशी मदत उपलब्ध आहे. बायबलमध्ये असे नियम आणि तत्त्वं आहेत, ज्यामुळे आपल्याला “सर्व बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज” व्हायला मदत होते.—२ तीम. ३:१६, १७. टेहळणी बुरूज१८.०६ १९ ¶१४; २० ¶१६-१७
शनिवार, २५ जानेवारी
मुळात माझा शेजारी कोण?—लूक १०:२९.
शेजाऱ्यावर प्रेम करण्याबद्दल एक शोमरोनी, यहुदी लोकांना शिकवू शकतो हे येशूच्या दाखल्यातून दिसून आलं. (लूक १०:२५-३७) स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की ते “सबंध यहूदीयात आणि शोमरोनात, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत” साक्ष देतील. (प्रे. कार्ये १:८) पण ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी शिष्यांना गर्व आणि भेदभाव यांसारख्या भावनांवर मात करणं गरजेचं होतं. येशूने बऱ्याच वेळा विदेशी लोकांच्या चांगल्या गुणांचा उल्लेख केला आणि यामुळे विदेशी लोकांना प्रचार करण्यासाठी शिष्यांचं मन तयार झालं. उदाहरणार्थ, येशूने विदेशी असलेल्या सैन्यातील एका अधिकाराच्या विश्वासाची प्रशंसा केली होती. (मत्त. ८:५-१०) नासरेथमध्ये असताना येशूने सांगितलं की यहोवाने अनेक विदेशी लोकांना मदत केली आहे. जसं की सीदोन देशातील सारफथची विधवा आणि सूरिया देशातील नामान. (लूक ४:२५-२७) येशूने एका शोमरोनी स्त्रीलाही प्रचार केला. तसंच, एका शोमरोनी गावातल्या लोकांनी येशूच्या संदेशात आवड दाखवल्यामुळे तो तिथे दोन दिवस थांबला.—योहा. ४:२१-२४, ४०. टेहळणी बुरूज१८.०६ १० ¶१०-११
रविवार, २६ जानेवारी
सैतानाच्या डावपेचांविरुद्ध तुम्हाला स्थिर उभे राहता यावे म्हणून देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.—इफिस. ६:११.
प्रेषित पौलने ख्रिस्ती लोकांची तुलना सैनिकांशी केली. आपण एका युद्धात असून खरोखरच्या शत्रूंसोबत लढत आहोत. पण ते शत्रू मानव नसून सैतान आणि दुरात्मे आहेत. हजारो वर्षांपासून युद्ध लढत असल्यामुळे ते तरबेज योद्धा बनले आहेत. म्हणून आपल्याला कदाचित वाटेल की आपण हे युद्ध जिंकू शकणार नाही आणि खासकरून तरुणांना तर हे अशक्यच वाटेल. पण तरुण अशा शक्तिशाली शत्रूंविरुद्ध युद्ध जिंकू शकतात का? हो, ते जिंकू शकतात आणि जिंकतही आहेत. असं करणं त्यांना कशामुळे शक्य झालं आहे? यहोवा देत असलेल्या शक्तीमुळे. त्यासोबतच चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झालेल्या सैनिकांसारखं, तरुण जण “देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण” करतात. यामुळे ते लढा द्यायला अगदी सुसज्ज होतात. (इफिस. ६:१०-१२) पौलने जेव्हा या उदाहरणाचा उल्लेख केला, तेव्हा कदाचित तो एका रोमी सैनिकाने घातलेल्या युद्धाच्या शस्त्रसामग्रीबद्दल विचार करत असावा.—प्रे. कार्ये २८:१६. टेहळणी बुरूज१८.०५ २७ ¶१-२
सोमवार, २७ जानेवारी
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.—मत्त. ६:९.
देवाच्या नावाचा गौरव व्हावा आणि मानवांपुढे त्याचं नाव पवित्र व्हावं हे प्रचार करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. (योहा. १५:१, ८) असं असलं तरीही आपण त्याला आणखी पवित्र करू शकत नाही. तर मग प्रचारकार्य करण्याद्वारे आपण त्याच्या नावावर लागलेला कलंक कसा मिटवू शकतो? यशया संदेष्ट्याने म्हटलं: “सैन्यांचा यहोवा यालाच तुम्ही पवित्र माना.” (यश. ८:१३, पं.र.भा.) आपण जेव्हा या नावाला सर्वात जास्त महत्त्व देतो आणि ते किती पवित्र आहे हे समजायला इतरांना मदत करतो, तेव्हा आपण त्याच्या नावावरचा कलंक मिटवत असतो. उदाहरणार्थ, आपण इतरांना यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल आणि मानवांना नंदनवनात सदासर्वकाळ ठेवण्याच्या त्याच्या उद्देशाबद्दल शिकवतो. असं करण्याद्वारे आपण त्यांना सांगत असतो की सैतान यहोवाबद्दल जे काही वाईट बोलला ते साफ खोटं होतं. (उत्प. ३:१-५) “गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास” फक्त यहोवाच पात्र आहे ही गोष्ट आपण इतरांना शिकवतो, तेव्हा आपण त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवत असतो.—प्रकटी. ४:११. टेहळणी बुरूज१८.०५ १८ ¶३-४
मंगळवार, २८ जानेवारी
परमेश्वराचे उपकारस्मरण करणे . . . चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो.—स्तो. ९२:१, ४.
आध्यात्मिक ध्येयं ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यहोवाने दाखवलेल्या प्रेमासाठी त्याचे आभार मानणं. यहोवाने आपल्या सर्वांसाठी खूप काही केलं आहे. यहोवाने आपल्याला कायकाय दिलं आहे याचा जरा विचार करा: जीवन, त्याची ओळख, त्याच्याबद्दलचं सत्य, बायबल, मंडळी आणि नंदनवनात सदासर्वकाळ राहण्याची आशा. आध्यात्मिक ध्येयं ठेवल्यामुळे तुम्ही यहोवाला दाखवता की या सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्याचे मनापासून आभारी आहात. यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत होतं. जेव्हा आपण आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपण यहोवासाठी चांगली कार्यं करत असतो. यामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल. प्रेषित पौलने अभिवचन दिलं: “तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) अगदी कमी वयातही तुम्ही आध्यात्मिक ध्येयं ठेवू शकता. तुम्ही एखादं ध्येयं ठेवून ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता का?—फिलिप्पै. १:१०, ११. टेहळणी बुरूज१८.०४ २६ ¶५-६
बुधवार, २९ जानेवारी
जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.—२ करिंथ. ३:१७.
पहिल्या शतकातील ख्रिस्ती, रोमी साम्राज्यात राहत होते. रोमी लोकांना आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल, कायद्यांबद्दल आणि त्यांना असलेल्या स्वातंत्र्याबद्दल खूप अभिमान होता. असं असलं तरी कष्टाचं बहुतेक काम रोमी लोक गुलामांकडूनच करून घ्यायचे. एक वेळ अशी होती जेव्हा रोमी साम्राज्यात सरासरी प्रत्येक ३ मधील १ व्यक्ती गुलाम होती. अशी परिस्थिती असल्यामुळे साहजिकच गुलामगिरी आणि स्वातंत्र्य हे त्या काळच्या सामान्य लोकांसाठी आणि ख्रिश्चनांसाठी महत्त्वाचे विषय होते. प्रेषित पौलने बऱ्याच वेळा आपल्या पत्रांत स्वातंत्र्याबद्दल लिहिलं. पण असं करून तो त्या काळच्या इतर लोकांसारखं जगातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नव्हता. याउलट पौल आणि इतर ख्रिश्चनांनी देवाच्या राज्याची आनंदाची बातमी सांगण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसंच, ख्रिस्त येशूने दिलेली खंडणी किती मौल्यवान आहे हे समजण्यासाठीही त्यांनी लोकांना मदत केली. खरं स्वातंत्र्य कुठून मिळू शकतं हे पौलने ख्रिश्चनांना सांगितलं. टेहळणी बुरूज१८.०४ ८ ¶१-२
गुरुवार, ३० जानेवारी
शिमोन, शिमोन, पाहा! सैतानाने तुम्हा सर्वांना गव्हाप्रमाणे पाखडण्याची मागणी केली आहे. पण तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे; आणि तू मागे फिरल्यावर आपल्या बांधवांचा विश्वास दृढ कर.—लूक २२:३१, ३२.
येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, त्याने प्रेषित पेत्रसोबत बोलताना हे शब्द वापरले. सुरुवातीला स्थापित झालेल्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेणाऱ्यांपैकी पेत्र एक होता. (गलती. २:९) पेन्टेकॉस्टच्या दिवशी आणि त्यानंतर आपल्या धाडसी कार्यांद्वारे पेत्रने बांधवांना प्रोत्साहन दिलं. बरीच वर्षं सेवा केल्यानंतर त्याने एका पत्रात बांधवांना म्हटलं: “मी थोडक्यात तुम्हाला हे पत्र लिहिले आहे, यासाठी की तुम्हाला प्रोत्साहन द्यावे आणि हीच देवाची खरी अपार कृपा आहे अशी प्रामाणिक साक्ष द्यावी. या अपार कृपेत तुम्ही स्थिर राहा.” (१ पेत्र ५:१२) पेत्रने लिहिलेल्या पत्रांमुळे त्या काळच्या ख्रिश्चनांना खूप प्रोत्साहन मिळालं. आणि आज यहोवाने दिलेल्या अभिवचनांच्या पूर्णतेची वाट पाहत असताना ही पत्रं आपल्यालाही प्रोत्साहन देतात.—२ पेत्र ३:१३. टेहळणी बुरूज१८.०४ १७ ¶१२-१३
शुक्रवार, ३१ जानेवारी
जो कोणी स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने परीक्षण करतो आणि त्याचे पालन करत राहतो . . . त्याला आनंद मिळेल.—याको. १:२५.
आज लोकांना निवड करण्याचं आणि मनाप्रमाणे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. जवळजवळ सगळेच स्वातंत्र्य मिळवण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक सहसा रस्त्यावर उतरून आपला निषेध दर्शवतात आणि काही वेळा तर आंदोलनंही करतात. पण हे सगळं केल्याने त्यांना हवं असलेलं स्वातंत्र्य मिळतं का? मुळीच नाही. उलट यामुळे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो आणि काही वेळा तर ते आपला जीवही गमावतात. शलमोन राजाने उपदेशक ८:९ मध्ये लिहिलेले शब्द आजच्या काळात अगदी खरे ठरत आहेत. त्याने म्हटलं: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे प्रेषित याकोबने आजच्या वचनात सांगितलं. परिपूर्ण नियम यहोवाकडून मिळतो. तसंच, काय केल्याने आपण आनंदी व समाधानी होऊ हेही त्याला माहीत आहे. यहोवाने आदाम आणि हव्वाला खरं स्वातंत्र्य दिलं होतं आणि आनंदी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीही त्यांना दिल्या होत्या. टेहळणी बुरूज१८.०४ ३ ¶१-३