धडा १०
येशूनं नेहमी ऐकलं
मम्मी-पप्पांचं नेहमी ऐकणं सोपं आहे का?— कधीकधी आपल्याला ऐकावसं वाटत नाही. तुला काय वाटतं, येशूनं यहोवाचं आणि त्याच्या आईबाबांचं ऐकलं का?— कठीण होतं तेव्हाही येशूनं ऐकलं. कसं ते पाहू या.
येशू पृथ्वीवर यायच्या आधी यहोवाबरोबर स्वर्गात होता. आणि पृथ्वीवर योसेफ व मरीया या त्याच्या आईबाबांबरोबर होता. ते त्याचे आईबाबा कसे झाले माहीतंय?—
यहोवानं एक चमत्कार केला. स्वर्गात असलेल्या येशूला त्यानं मरीयेच्या पोटात घातलं. इतर बाळांसारखं तोही मरीयेच्या पोटात नऊ महिने वाढला. आणि काही दिवसांनंतर त्याचा जन्म झाला. अशा प्रकारे योसेफ व मरीया त्याचे पृथ्वीवरील आईबाबा झाले.
तो जेव्हा लहान होता तेव्हा, यहोवावर त्याचं किती प्रेम आहे हे त्यानं दाखवून दिलं. एकदा येशू, त्याचे आईबाबा आणि त्याचे बहीण-भाऊ सगळे जेरूसलेमला वल्हांडणाचा सण साजरा करायला गेले. तिकडून घरी येत असताना योसेफ आणि मरीयेला येशू कुठंच दिसला नाही. कुठं होता तो?—
येशू मंदिरात का गेला बरं?
योसेफ व मरीया खूप घाबरले. ते पुन्हा जेरूसलेमला आले आणि इकडं-तिकडं त्याला शोधू लागले. तो कुठंच दिसत नाही हे पाहून त्यांना खूप काळजी वाटली. तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात दिसला! तो मंदिरात का गेला बरं?— यहोवाबद्दल आणखी शिकायला. त्याचं यहोवावर खूप प्रेम होतं आणि त्याला यहोवाला खूश करायचं होतं. तो मोठा झाला तेव्हाही त्यानं यहोवाचं ऐकलं. यहोवाचं ऐकल्यामुळं त्याला खूप त्रास सहन करावा लागला तरीसुद्धा त्यानं ऐकलं. त्यानं योसेफ आणि मरीयेचंपण ऐकलं का?— हो. बायबलमध्ये म्हटलं आहे की त्यानं त्यांचंपण ऐकलं.
येशूकडून आपण काय शिकतो?— हेच की, आपण मम्मी-पप्पांचं नेहमी ऐकलं पाहिजे. म्हणजे आवडत नाही तेव्हाही ऐकलं पाहिजे. तू ऐकशील ना मग?—