वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ia अध्या. १४ पृ. १३४-१४३
  • तो दया दाखवण्यास शिकला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तो दया दाखवण्यास शिकला
  • त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • न्यायदंडाचा संदेश आणि अनपेक्षित प्रतिक्रिया
  • देवाचा दयाळूपणा आणि माणसांचा कठोरपणा
  • यहोवानं योनाला दया दाखवण्यास कसं शिकवलं?
  • तो दया दाखवण्यास शिकला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • योनाला यहोवाची दया प्रत्ययास येते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवा योनाशी सहनशीलतेने वागला
    बायबलमधून शिकू या!
  • तो स्वतःच्या चुकांमधून शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
ia अध्या. १४ पृ. १३४-१४३
संदेष्टा योना

अध्याय चौदा

तो दया दाखवण्यास शिकला

१. (क) योनाच्या प्रवासाचं वर्णन करा. (ख) निनवे शहर जवळ येऊ लागलं तेव्हा योनाला कसं वाटलं?

योनाला आता विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार होता. तो एका लांबच्या प्रवासाला निघाला होता. ८०० किलोमीटरपेक्षाही जास्त अंतराच्या या प्रवासात योनाला जवळजवळ महिनाभर, किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त काळ पायी चालावं लागणार होतं. त्यामुळं प्रवासाला निघण्याआधी, जवळच्या रस्त्यांनी जायचं की लांबून जाणाऱ्‍या पण सुरक्षित असलेल्या रस्त्यांनी जायचं, हे योनाला ठरवावं लागलं असेल. त्याला बहुतेक प्रवास दऱ्‍याखोऱ्‍यांतून जाणाऱ्‍या रस्त्यांनी करावा लागणार होता. कदाचित सिरियाच्या (अराम) भल्या मोठ्या वाळवंटाच्या कडेकडेनं तो गेला असावा. शिवाय, फरात नदीसारख्या मोठ्या नद्यासुद्धा त्याला ओलांडाव्या लागल्या असतील. अराम, मेसोपोटेमिया आणि अश्‍शूर या देशांतील नगरांमधून व गावांमधून जात असताना त्याला कदाचित त्या विदेशी लोकांकडे आश्रय घ्यावा लागला असेल. पण, जसजसा एकेक दिवस सरत गेला, तसतशी योनाच्या मनातील चिंता व भीती वाढू लागली. कारण प्रत्येक पावलागणिक, त्याच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्‍या निनवे शहराच्या तो जवळ जात होता.

२. यहोवानं दिलेल्या कामगिरीपासून आपण पळ काढू शकत नाही, हे योनाला कोणत्या अनुभवामुळं कळून चुकलं होतं?

२ एक गोष्ट योनाला अगदी पक्की ठाऊक होती. ती म्हणजे, देवानं त्याच्यावर सोपवलेल्या कामगिरीपासून पळ काढण्याचा तो विचारही करू शकत नव्हता. पूर्वी एकदा त्यानं तसं करून पाहिलंही होतं. पण, यहोवानं अगदी धीरानं योनाची चूक त्याच्या लक्षात आणून दिली होती. याआधीच्या अध्यायात आपण पाहिल्याप्रमाणे, यहोवानं समुद्रात वादळ आणलं आणि मग एका मोठ्या माशाच्या पोटातून चमत्कारिक रीत्या योनाला वाचवलं होतं. मग तीन दिवसांनंतर, त्या माशानं योनाला समुद्रकिनाऱ्‍यावर ओकून टाकलं होतं. या संपूर्ण अनुभवानं हेलावून गेलेला योना आता पूर्वीपेक्षा जास्त विनम्र आणि आज्ञाधारक बनला होता.—योना, अध्याय १, २.

३. यहोवानं योनाशी कशा प्रकारे व्यवहार केला होता, पण तरीसुद्धा कोणता प्रश्‍न निर्माण होतो?

३ यहोवानं दुसऱ्‍यांदा योनाला निनवेला जायला सांगितलं, तेव्हा त्यानं त्याच्या आज्ञेचं पालन केलं आणि तो या लांबच्या प्रवासाला निघाला. (योना ३:१-३ वाचा.) पण, यहोवाकडून ताडन मिळाल्यानंतर योनानं खरोखरच आपली चुकीची मनोवृत्ती पूर्णपणे बदलली होती का? यहोवानं त्याला किती दया दाखवली होती याचा विचार करा. त्यानं योनाला समुद्रात बुडण्यापासून वाचवलं होतं; योनानं त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करूनही त्यानं त्याला शिक्षा न देता, त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याची आणखी एक संधी त्याला दिली होती. पण, हे सर्व अनुभवल्यानंतर योना स्वतः इतरांना दया दाखवण्यास शिकला का? मुळात, अपरिपूर्ण मानवांना इतरांना दया दाखवणं सोपं जात नाही. तेव्हा, योनाच्या अनुभवातून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकू शकतो, हे आता आपण पाहू.

न्यायदंडाचा संदेश आणि अनपेक्षित प्रतिक्रिया

४, ५. यहोवानं निनवेचा ‘मोठे शहर’ असा उल्लेख का केला, आणि यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं?

४ निनवेबद्दल योनाचा दृष्टिकोन हा यहोवाच्या दृष्टिकोनासारखा नव्हता. अहवालात म्हटलं आहे: “निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते.” (योना ३:३) योनाच्या या अहवालात यहोवा तीन वेळा निनवेचा, ‘मोठे शहर’ म्हणून उल्लेख करतो. (योना १:२; ३:२; ४:११) पण, यहोवाच्या दृष्टीत हे शहर मोठं, किंवा महत्त्वाचं का होतं?

५ निनवे हे फार प्राचीन शहर होतं. निम्रोदानं जलप्रलयानंतर वसवलेल्या अगदी सुरुवातीच्या काही शहरांपैकी ते एक होतं. या मोठ्या महानगराला बरीच उपनगरंही जोडलेली होती. पायी चालत गेल्यास, शहराच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत जायला तीन दिवस लागायचे. (उत्प. १०:११; योना ३:३) निनवे हे एक अतिशय दिमाखदार शहर असून, त्यात अनेक प्रशस्त मंदिरं, मोठ्या तटबंदी आणि इतर आलिशान इमारती होत्या. पण या सर्व गोष्टींमुळे यहोवाला ते शहर महत्त्वाचं वाटलं, असं नाही. तर त्याच्याकरता महत्त्वाचे होते, ते तिथले लोक. त्या काळातल्या इतर शहरांच्या तुलनेत निनवेची लोकसंख्या खूप जास्त होती. आणि तिथले बहुतेक लोक वाईट होते. पण तरीसुद्धा, यहोवाला त्यांच्याबद्दल कळकळ होती. यहोवा मानवी जीवनाला अतिशय मौल्यवान समजतो आणि प्रत्येक व्यक्‍तीमध्ये पश्‍चात्ताप करून योग्य मार्गावर येण्याची क्षमता आहे, हे तो जाणतो.

निनवे शहरातील मंदिरासमोर तेथील दुष्ट लोकांमध्ये उभा असलेला योना

निनवे हे एक मोठं शहर असून त्यातले बहुतेक लोक वाईट होते असं योनाला आढळलं

६. (क) निनवेला आल्यावर योनाला भीती का वाटली असावी? (तळटीपही पाहा.) (ख) योनानं ज्या प्रकारे देवाचा संदेश घोषित केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

६ शेवटी योना निनवेला पोहोचला. या शहराची लोकसंख्या १,२०,००० पेक्षा जास्त होती. इतक्या सगळ्या लोकांमध्ये यहोवाच्या वतीनं बोलणारे आपण एकटेच आहोत या विचारानं योनाला कदाचित जास्तच भीती वाटली असेल.a तो एक दिवसाचं अंतर चालून त्या महानगराच्या गजबजलेल्या भागात पोहोचला. आपला संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कदाचित त्यानं एखादं योग्य ठिकाण शोधलं असेल. पण, निनवेच्या लोकांशी तो कोणत्या भाषेत बोलला असेल? त्यानं अश्‍शूरी लोकांची भाषा शिकून घेतली होती का? की यहोवानं चमत्कारिक रीत्या त्याला ती बोलण्याची क्षमता दिली होती? हे आपल्याला माहीत नाही. कदाचित योनानं आपल्या मातृभाषेत म्हणजे इब्री भाषेत यहोवाचा संदेश घोषित केला असेल आणि निनवेकरांना तो समजावून सांगण्यासाठी त्यानं एखाद्या अनुवादकाची मदत घेतली असेल. ते काहीही असो, एक मात्र खरं की योनाचा संदेश अगदी सरळ आणि सोपा होता: “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” (योना ३:४) साहजिकच, हा संदेश लोकांना आवडेल असा नव्हता. तरीसुद्धा, योनानं निर्भयपणे आणि वारंवार तो घोषित केला. असं करण्याद्वारे त्यानं उल्लेखनीय धैर्य आणि विश्‍वास दाखवला. खरंच, आज ख्रिस्ती या नात्यानं आपल्यालाही या गुणांची पूर्वी कधी नव्हती इतकी गरज आहे.

योनाचा संदेश सरळ आणि सोपा असला, तरी तो लोकांना आवडेल असा नव्हता

७, ८. (क) योनाचा संदेश ऐकून निनवेच्या लोकांनी काय केलं? (ख) निनवेच्या राजानं योनाची घोषणा ऐकल्यावर काय केलं?

७ योनाच्या संदेशानं निनवेच्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं. आता हे लोक संतप्त होतील, कदाचित आपल्याला मारहाणही करतील, असं योनाला वाटलं असेल. पण, प्रत्यक्षात जे घडलं ते अगदीच अनपेक्षित होतं. लोक लक्ष देऊन त्याचा संदेश ऐकू लागले. योनाचा संदेश वाऱ्‍यासारखा पसरला आणि पाहता-पाहता संपूर्ण निनवे शहरात, योना घोषित करत असलेल्या नाशाच्या भविष्यवाणीबद्दल चर्चा होऊ लागली. (योना ३:५ वाचा.) स्त्री-पुरुष, लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वच जण पश्‍चात्ताप करण्यास प्रवृत्त झाले. आपला पस्तावा व्यक्‍त करण्यासाठी त्यांनी उपवास करायचं ठरवलं. लोकांनी धरलेल्या या सामूहिक उपवासाची खबर लवकरच राजाच्या कानावर आली.

योना घोषित करत असलेला संदेश ऐकताना निनवेचे लोक

निनवे शहरात देवाचा संदेश घोषित करण्यासाठी योनाला धैर्याची व विश्‍वासाची गरज होती

८ योनाच्या न्यायसंदेशामुळं राजाच्याही मनाचं परिवर्तन झालं. खऱ्‍या देवाचं भय वाटून तो आपल्या राजासनावरून उठला आणि आपली राजवस्त्रं काढून त्यानंही आपल्या प्रजेतील लोकांप्रमाणेच गोणताटाची जाडीभरडी वस्त्रं घातली. इतकंच काय, तर तो “राखेत बसला.” शिवाय, त्यानं आपल्या ‘सरदारांसोबत’ मिळून एक जाहीरनामा काढला आणि लोकांनी उपवास करण्याचं जे स्वतःहून ठरवलं होतं त्याला शासकीय आदेशाचं रूप दिलं. सर्व लोकांनी गोणताट घालावं, इतकंच काय, तर गुराढोरांनांही ते घालावं असा हुकूम त्यानं काढला.b आपल्या लोकांनी वाईट कृत्यं आणि हिंसाचार केला असल्याचं त्यानं नम्रपणे कबूल केलं. तसंच, आपण पश्‍चात्ताप केल्यामुळं देव आपल्याला दया दाखवेल अशी आशाही त्यानं व्यक्‍त केली. तो म्हणाला: “देव कदाचित . . . आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”—योना ३:६-९.

९. काही टीकाकारांनी निनवेच्या लोकांबद्दल कोणती शंका व्यक्‍त केली आहे, पण त्यांची शंका निराधार आहे असं आपण का म्हणू शकतो?

९ इतक्या कमी वेळात निनवेच्या लोकांच्या मनाचं परिवर्तन कसं काय घडू शकतं, अशी शंका काही टीकाकार व्यक्‍त करतात. पण, बायबल विद्वानांच्या मते, प्राचीन काळातल्या संस्कृतींतील लोक अतिशय अंधश्रद्धाळू आणि अतिभावूक वृत्तीचे होते. त्यामुळं, निनवेच्या लोकांनी उपवास करण्याचा सामूहिक निर्णय घेतला याचं आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. शिवाय, निनवेच्या लोकांच्या मनाचं परिवर्तन होण्याविषयी जे शंका व्यक्‍त करतात त्यांची ही शंका अगदीच निराधार आहे, असं आपण खातरीनं म्हणू शकतो. कारण, निनवेकरांनी पश्‍चात्ताप केल्याचं नंतर स्वतः येशू ख्रिस्तानंही सांगितलं होतं. (मत्तय १२:४१ वाचा.) आणि येशूनं जे सांगितलं त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो कारण या सर्व घटना घडत असताना तो स्वर्गातून त्या पाहत होता. (योहा. ८:५७, ५८) खरं पाहता विशिष्ट लोक, मग ते आपल्याला कितीही दुष्ट वाटत असले, तरीसुद्धा ते कधीच पश्‍चात्ताप करू शकत नाहीत, असा निष्कर्ष आपण काढू नये. कारण, एखाद्याच्या हृदयात काय चाललं आहे हे केवळ यहोवाच पाहू शकतो.

देवाचा दयाळूपणा आणि माणसांचा कठोरपणा

१०, ११. (क) निनवेच्या लोकांनी केलेल्या पश्‍चात्तापाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन होता? (ख) यहोवानं केलेला न्याय चुकीचा नव्हता असं आपण खातरीनं का म्हणू शकतो?

१० निनवेच्या लोकांनी केलेल्या पश्‍चात्तापाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन होता? याविषयी नंतर योनानं असं लिहिलं: “देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांजवर ते आणले नाही.”—योना ३:१०.

११ पण मग, आधी यहोवानं निनवेचा जो न्याय केला होता, तो चुकीचा होता असा याचा अर्थ होतो का? नाही. यहोवाचा न्याय नेहमीच परिपूर्ण असतो, असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. (अनुवाद ३२:४ वाचा.) निनवेच्या लोकांप्रती यहोवाचा क्रोध हा नक्कीच नीतिमत्त्वाला धरून होता; पण, आता मात्र त्याला त्यांच्याविरुद्ध राग बाळगण्याचं कारण नव्हतं. ते लोक आपल्या वाईट मार्गापासून वळले आहेत हे त्यानं पाहिलं आणि त्यांच्यावर जो न्यायदंड आणण्याचं त्यानं आधी ठरवलं होतं, त्याची आता गरज नाही असं त्याला वाटलं. त्यामुळं, यहोवानं निनवेच्या लोकांना दया दाखवायचं ठरवलं.

१२, १३. (क) यहोवा समजूतदार आणि दयाळू आहे असं आपण का म्हणू शकतो? (ख) योनानं केलेली भविष्यवाणी खोटी का नव्हती?

१२ बऱ्‍याचदा धर्मपुढाऱ्‍यांच्या काही शिकवणींमुळं, देव अतिशय कठोर, भावनाशून्य आणि क्रूर आहे असं लोकांना वाटतं. पण यहोवा असा मुळीच नाही. उलट तो अतिशय समजूतदार आहे. परिस्थितीनुसार तो आपले निर्णय बदलण्यासही तयार असतो आणि तो अतिशय दयाळूदेखील आहे. जेव्हा तो दुष्ट लोकांना शिक्षा देण्याचं ठरवतो, तेव्हा सर्वात आधी तो पृथ्वीवरील आपल्या सेवकांद्वारे त्यांना याविषयी इशारा देतो. कारण निनवेच्या लोकांनी केला त्याप्रमाणे सर्व वाईट लोकांनी पश्‍चात्ताप करावा आणि आपले मार्ग बदलावेत, असं यहोवाला मनापासून वाटतं. (यहे. ३३:११) यहोवानं आपला संदेष्टा यिर्मया याच्याद्वारे असं म्हटलं: “एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो; तरी पण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडेल तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.”—यिर्म. १८:७, ८.

निनवेच्या लोकांप्रमाणेच सर्व दुष्ट लोकांनी पश्‍चात्ताप करावा आणि वाईट मार्गापासून फिरावं, अशी देवाची इच्छा आहे

१३ मग, योनानं केलेली भविष्यवाणी खोटी होती असं म्हणता येईल का? नाही, कारण या भविष्यवाणीमुळं लोकांना न्यायदंडाचा इशारा देण्याचा उद्देश साध्य झाला. निनवेच्या लोकांची कृत्यं वाईट होती आणि त्यामुळं त्यांना तो इशारा देणं योग्यच होतं. पण, नंतर त्यांनी आपले मार्ग बदलले. त्यांनी पुन्हा वाईट मार्ग धरला असता, तर देवानं तोच न्यायदंड त्यांच्यावर आणला असता. आणि कालांतरानं अगदी हेच घडलं.—सफ. २:१३-१५.

१४. यहोवानं निनवेच्या लोकांना दया दाखवली तेव्हा योनाची प्रतिक्रिया काय होती?

१४ योनानं अपेक्षा केली होती त्या वेळी निनवेचा नाश झाला नाही तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती? अहवालात म्हटलं आहे: “योनाला यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला.” (योना ४:१) त्या मनःस्थितीत योनानं यहोवाला जी प्रार्थना केली ती वाचल्यावर, तो सर्वसमर्थ देवाला खडसावत आहे असं वाटतं! मी आपल्या घरी, आपल्या देशात होतो तेच बरं होतं, असं तो प्रार्थनेत म्हणाला. तसंच, यहोवा निनवेवर नाश आणणार नाही हे तर आपल्याला पूर्वीपासूनच माहीत होतं, आणि म्हणूनच आपण तार्शिशला निघून जायचं ठरवलं होतं, असंही तो म्हणाला. मग, जिवंत राहण्यापेक्षा आपण मेलेलं बरं, असं म्हणून आपल्याला मरण यावं अशी त्यानं यहोवाला विनंती केली.—योना ४:२, ३ वाचा.

१५. (क) योना कशामुळं निराश झाला होता? (ख) दुःखी मनःस्थितीत असलेल्या आपल्या संदेष्ट्याशी यहोवानं कशा प्रकारे व्यवहार केला?

१५ योनाला नेमका कशामुळे इतका राग आला होता? त्याच्या मनात नेमकी काय घालमेल चालली होती हे आपल्याला माहीत नाही; पण, इतकं मात्र आपल्याला माहीत आहे की निनवेचा नाश होणार हे त्यानं त्या सर्व लोकांच्या देखत घोषित केलं होतं. आणि त्यांनी त्याच्यावर विश्‍वासही ठेवला होता. पण आता मात्र नाश येणारच नव्हता. मग, आता लोक आपल्याला वेड्यात काढतील, आपल्याला खोटा संदेष्टा म्हणतील, अशी योनाला भीती वाटली असावी का? कदाचित. पण एवढं मात्र खरं, की लोकांनी पश्‍चात्ताप केल्याबद्दल किंवा यहोवानं त्यांना दया दाखवल्याबद्दल योनाला आनंद झाला नाही. उलट, तो निराशेच्या गर्तेत गेला. तो स्वतःची कीव करू लागला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. पण योनाच्या मनाची अशी अवस्था झाली असतानाही यहोवानं दयाळूपणे त्याच्या चांगल्या गुणांकडेच लक्ष दिलं. आपला अनादर केल्याबद्दल योनाला शिक्षा देण्याऐवजी यहोवानं फक्‍त त्याला सौम्यपणे, विचार करायला लावणारा एक प्रश्‍न विचारला: “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?” (योना ४:४) योनानं या प्रश्‍नाचं उत्तर दिलं का? बायबलच्या अहवालात याविषयी काहीही सांगितलेलं नाही.

१६. काही जणांचा दृष्टिकोन कशा प्रकारे देवाच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा असू शकतो, आणि योनाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१६ योनाचं वागणं अगदीच चुकीचं होतं, असं कदाचित काही जण म्हणतील. पण, अपरिपूर्ण मानवांचा दृष्टिकोन नेहमीच देवाच्या दृष्टिकोनाशी जुळत नाही, हे आपण आठवणीत ठेवलं पाहिजे. एखादी दुःखद घटना घडते तेव्हा, देवानं ती घडण्याआधीच का थांबवली नाही, किंवा तो दुष्टांना तडकाफडकी शिक्षा का करत नाही; इतकंच काय, तर या दुष्ट जगाचा त्यानं फार पूर्वीच नाश करायला हवा होता, असं कदाचित काहींना वाटू शकतं. पण, योनाच्या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे, जेव्हा आपला दृष्टिकोन यहोवा देवाच्या दृष्टिकोनाशी जुळत नाही, तेव्हा खरंतर आपल्याच विचारसरणीत काहीतरी बदल करण्याची गरज असते; यहोवाचा दृष्टिकोन कधीही चुकीचा नसतो.

यहोवानं योनाला दया दाखवण्यास कसं शिकवलं?

१७, १८. (क) निनवे शहर सोडल्यावर योनानं काय केलं? (ख) भोपळ्याचा वेल आणि त्याच्याशी संबंधित इतर चमत्कारांमुळं योनावर काय परिणाम झाला?

१७ नाराज झालेला योना निनवेहून निघाला तर खरा, पण आपल्या घरी परत जाण्याऐवजी तो पूर्व दिशेला असलेल्या डोंगराळ भागात गेला. तिथून निनवे शहर स्पष्ट दिसत होतं. तिथं त्यानं आपल्यासाठी एक छोटासा मांडव तयार केला आणि त्याखाली बसून तो निनवे शहराकडे पाहू लागला. कदाचित निनवे शहराचा नाश होईल अशी अजूनही कुठेतरी एक पुसटशी आशा योनाच्या मनात होती. मग, यहोवानं या कठोर मनाच्या आपल्या सेवकाला दया दाखवण्यास कसं शिकवलं?

१८ यहोवानं एका रात्रीत भोपळ्याचा एक वेल उगवायला लावला. सकाळी उठून योनानं तो वेल पाहिला. त्यानं बांधलेल्या मांडवापेक्षा या वेलाच्या मोठ्या पानांमुळं त्याला जास्त सावली मिळाली. त्यामुळं, “योनाला फार आनंद झाला.” चमत्कारिक रीत्या उगवलेला तो वेल देवाच्या आशीर्वादाचा आणि त्याची मर्जी आपल्यावर असल्याचा पुरावा आहे, असंही कदाचित योनाला वाटलं असावं. पण, यहोवानं फक्‍त योनाचा रुसवा दूर करण्यासाठी किंवा फक्‍त उष्णतेपासून त्याचं रक्षण करण्यासाठी तो वेल उगवला नव्हता. तर, योनाला अगदी मनापासून आपल्या चुकीची जाणीव व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून यहोवानं आणखी काही चमत्कार घडवून आणले. त्यानं एक कीडा उत्पन्‍न केला, जो भोपळ्याच्या वेलाला लागला आणि तो वेल सुकून गेला. मग यहोवानं “पूर्वेचा झळईचा वारा” वाहायला लावला. या उष्ण, कोरड्या वाऱ्‍यामुळे योना अगदी गळून गेला. यामुळं तो आणखीनच खिन्‍न झाला आणि पुन्हा एकदा आपल्याला मरण यावं अशी देवाकडे प्रार्थना करू लागला.—योना ४:६-८.

१९, २०. भोपळ्याच्या वेलाबद्दल यहोवानं कशा प्रकारे योनाशी तर्क केला?

१९ पुन्हा एकदा यहोवानं योनाला, भोपळ्याचा वेल सुकून गेल्यामुळं त्याचं रागावणं योग्य आहे का असं विचारलं. पण, पश्‍चात्ताप करण्याऐवजी योनानं स्वतःच्या वागण्याचं समर्थनच केलं. तो म्हणाला: “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.” आता मात्र योनाची चूक अगदी स्पष्ट शब्दांत त्याला समजावून सांगण्याची वेळ आली होती.—योना ४:९.

वेल सुकल्यामुळे रागावलेला योना

योनाला दया दाखवण्यास शिकवण्यासाठी देवानं एका भोपळ्याच्या वेलाचा उपयोग केला

२० यहोवानं योनाशी तर्क केला. त्यानं त्याला समजावून सांगितलं की तो वेल त्यानं स्वतः लावला नव्हता. तो एका रात्रीत आपोआप उगवला होता. मग, तो सुकून गेल्यामुळं जर त्याला इतकं वाईट वाटत होतं, तर “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”—योना ४:१०, ११.c

२१. (क) यहोवानं वेलाच्या उदाहरणातून योनाला कोणता धडा शिकवला? (ख) योनाच्या अहवालातून आपल्याला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा कशी मिळते?

२१ त्या वेलाचा उपयोग करून यहोवाला नेमकं काय शिकवायचं होतं, ते तुम्हाला कळलं का? योनानं त्या वेलाची काळजी घेतली नव्हती किंवा त्यासाठी काहीही केलं नव्हतं. पण, यहोवानं मात्र निनवेच्या लोकांना जीवन दिलं होतं आणि जगातल्या इतर सर्व लोकांप्रमाणेच त्यानं आजवर त्यांच्या गरजादेखील पुरवल्या होत्या. मग, त्या १,२०,००० माणसांपेक्षा व त्यांच्या सर्व गुराढोरांपेक्षा योनाचं एका साध्या वेलाला जास्त महत्त्व देणं खरंच योग्य होतं का? असा विचार करणं हे स्वार्थीपणाचंच नव्हतं का? कारण शेवटी, त्या वेलापासून त्याला स्वतःला काहीतरी फायदा होत होता, आणि म्हणूनच तो सुकून गेल्याचं त्याला वाईट वाटलं होतं. तसंच, निनवेचा नाश झाला नाही याबद्दल त्याला जो राग आला होता, तोसुद्धा स्वार्थीपणानं विचार केल्यामुळंच नव्हता का? आपण जे सांगितलं ते खरं होतं हे सिद्ध व्हावं आणि लोकांसमोर आपलं हसू होऊ नये, हीच स्वार्थी इच्छा त्यामागे नव्हती का? योनाच्या अहवालामुळं आपल्यालाही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा मिळते. कारण शेवटी, आपल्यापैकी असा कोण आहे ज्याच्या मनात अधूनमधून असे स्वार्थी विचार येत नाहीत? पण, यहोवा अगदी प्रेमळपणे व धीरानं आपल्याला त्याच्यासारखं बनण्यास, म्हणजेच अधिक निःस्वार्थी, सहानुभूतीशील आणि दयाळू बनण्यास मदत करतो, याबद्दल आपण त्याचे किती आभार मानू शकतो!

२२. (क) यहोवानं दया दाखवण्याविषयी जो धडा शिकवला त्यामुळं योनावर काय परिणाम झाला? (ख) आपण सर्वांनी कोणती गोष्ट शिकून घेण्याची गरज आहे?

२२ पण, प्रश्‍न हा आहे की या सगळ्या अनुभवातून योना काही शिकला का? बायबलमधल्या ‘योना’ नावाच्या पुस्तकात शेवटी आपण यहोवानं विचारलेला प्रश्‍न वाचतो आणि तिथंच हे पुस्तक संपतं. तो प्रश्‍न जणू वाचकांना अधांतरीच ठेवतो. काही टीकाकारांचं असं मत आहे, की योनानं या प्रश्‍नाचं काहीच उत्तर दिलं नाही. पण खरं पाहता, त्याच्या नावाचं हे पुस्तकच त्याचं उत्तर आहे. पुराव्यांवरून दिसून येतं की हे पुस्तक स्वतः योनानं लिहिलं होतं. त्या सर्व घटना घडल्यानंतर आपल्या घरी सुखरूप परतलेला योना काही काळानं हा अहवाल लिहीत असल्याची कल्पना करा. आता तो काहीसा वयस्क झाला आहे आणि आपल्या अनुभवांमुळं पूर्वीपेक्षा जास्त सुज्ञ आणि नम्र बनला आहे. आपण कशी देवाची आज्ञा मोडली होती, किती हट्टी झालो होतो आणि दया दाखवण्यास तयार नव्हतो, हे सर्व आठवून योनानं नक्कीच खेदानं मान हलवली असेल. योनानं लिहिलेल्या या पुस्तकावरून स्पष्ट दिसून येतं, की यहोवानं शिकवलेला महत्त्वाचा धडा त्यानं मनापासून स्वीकारला होता. तो दया दाखवण्यास शिकला होता. तुम्हीही योनाचं अनुकरण कराल का?—मत्तय ५:७ वाचा.

a एका अंदाजानुसार, योनाच्या काळात इस्राएलच्या दहा-वंशीय राष्ट्राची राजधानी शोमरोन, याची लोकसंख्या सुमारे २०,००० ते ३०,००० इतकी असावी; म्हणजेच निनवेच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षाही कमी. निनवेच्या समृद्धीच्या काळात ते कदाचित जगातलं सर्वात मोठं शहर असावं.

b ही माहिती कदाचित थोडी विचित्र वाटेल. पण प्राचीन काळात असं घडल्याची उदाहरणं आहेत. प्राचीन काळात पर्शियन लोकांचा एक लोकप्रिय सेनापती मरण पावला, तेव्हा शोक व्यक्‍त करण्याच्या प्रथांमध्ये त्यांनी आपल्या गुराढोरांचाही समावेश केला होता, असं ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यानं एका ठिकाणी लिहिलं आहे.

c त्या लोकांना उजव्याडाव्याचा भेद कळत नाही असं जे यहोवानं म्हटलं त्यावरून, त्यांना देवाच्या नीतिनियमांची ओळख नव्हती असं त्याला म्हणायचं होतं.

यावर विचार करा. . .

  • निनवे शहरात देवाचा संदेश घोषित करताना योनानं धैर्य व विश्‍वास कसा दाखवला?

  • निनवेच्या लोकांनी केलेल्या पश्‍चात्तापावरून आपण काय शिकू शकतो?

  • निनवेच्या लोकांनी केलेल्या पश्‍चात्तापाबद्दल योनाच्या मनोवृत्तीवरून आपण काय शिकतो?

  • तुम्हाला कधी ताडन मिळाल्यास, तुम्ही कोणत्या मार्गांनी योनाचं अनुकरण कराल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा